Home Blog Page 2427

नऱ्हेमध्ये लघुदाब वीजवाहिन्या तुटल्याने सुमारे 1500 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

0

पुणे, दि. 16 ऑक्टोबर 2020 नऱ्हे परिसरात एकीकडे रस्त्याच्या खोदकामात महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचे सत्र सुरु आहे. त्यातच पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या पुलाचे काम करताना गुरुवारी (दि. 15) रात्री 10 वाजता जेसीबीच्या खोदकामात सात लघुदाब भूमिगत वीजवाहिन्या तुटल्या. त्यामुळे नऱ्हेमधील नवदीप सोसायटी व परिसरातील सुमारे 1500 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

दरम्यान, पर्यायी व्यवस्थेतून सुमारे एक हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्याचे काम सुरु आहे. शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी उशिरापर्यंत हे काम पूर्ण होईल. तर उर्वरित 500 ग्राहकांचा वीजपुरवठा तुटलेल्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर रात्री उशिरापर्यंत सुरु करण्यात येणार आहे.

      पुणे व पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी झालेल्या अभुतपूर्व अतिवृष्टीमुळे सुमारे 310 रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता तर काहींचा खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळपर्यंत केवळ 8 रोहित्र वगळता उर्वरित सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरु झाला. सदाशिव पेठमधील पावसाच्या पाण्याने भूमिगत वाहिनी नादुरुस्त झाल्याने 4 रोहित्र बंद पडली होती. त्याठिकाणी आज 60 मीटर नवीन वीजवाहिनी टाकण्यात आली व वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. सातारा रोडवरील जांभुळवाडी येथे एक रोहित्र जमीनदोस्त झाले होते. ते उभारण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. क्विन्स गार्डनमधील भूमिगत वाहिनी नादुरुस्त झाल्याने एका रोहित्राचा वीजपुरवठा बंद होता. तो सायंकाळी सुरु करण्यात आला आहे. याशिवाय आकुर्डी परिसरातील दोन रोहित्रांमध्ये गंभीर बिघाड झाल्याने हवालदारवस्ती, अजिंठानगर, संभाजीनगर परिसरातील सुमारे 400 ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. या दोन्ही रोहित्रांच्या दुरुस्तीचे काम सायंकाळी पूर्णत्वाकडे होते.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात काही ठिकाणी अजूनही वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. मात्र तेथील वीजपुरवठा प्राधान्याने पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आला आहे. काही सोसायटींच्या पार्कींगमध्ये किंवा रोहित्रांच्या बंद खोलीत पाणी शिरल्याने पाण्याचा उपसा करणे, वीजयंत्रणा कोरडी करणे तसेच पाण्यात असलेल्या भूमिगत वाहिन्यांची तपासणी व दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरु करण्यात येत आहे. यासोबतच ग्राहकांच्या खंडित वीजपुरवठ्यासंबंधीच्या वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम जलदगतीने सुरु आहे.

वीजपुरवठा खंडित असल्याच्या तक्रारी करण्यासाठी महावितरणचे 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 किंवा 1912 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. यासह मोबाईल अॅप, www.mahadiscom.in वेबसाईटद्वारेही तक्रारी स्विकारल्या जातात. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या 022-41078500 या क्रमांकावर मिस्ड कॉलदिल्यास किंवा मोबाईल क्रमांकावरून NOPOWER<space><Consumer Number>हा ‘एसएमएस’ महावितरणच्या 9930399303 या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ न देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे, दि. 16 : कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा रुग्णालयावर कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबवून कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ‘कोविड-19’ विषाणू प्रादुर्भाव निमूर्लन आढावा बैठक पार पडली. यावेळी दृकदृश्य प्रणालीद्वारे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे उपस्थित होत्याल. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार सर्वश्री अशोक पवार, संजय जगताप, ॲड राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, अतुल बेनके यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे,पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. डी.बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जिल्ह्या तील काही रुग्णािलये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर आहेत. तथापि, ती रुग्णालये पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा रुग्णालयांवर कार्यवाही करण्यायत यावी. केंद्रीय पथकाच्या इशाऱ्यानुसार कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने सतर्क राहून कोरोना विषाणूचा संक्रमण होणार नाही या अनुषंगाने नियोजन करावे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहिम हाती घेतलेली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने अधिक प्रभावीपणे राबवावा. मृत्यदर कमी करण्याबाबत सूक्ष्म नियोजन करुन मृत्यदर शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावे, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणाकाळात नागरिक घराबाहेर पडल्यास कोरोना विषाणूचे संसर्ग वाढण्याची शक्यता विचारात घेवून प्रशासनानी सतर्क राहून कामकाज करावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाबाबत तसेच राज्य शासनाने ग्रंथालय सुरु केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. लोकप्रतिनिधींना नॉन-कोवीड रुग्णालयातील खाटांबाबतची माहिती उपलब्ध करुन द्यावी, स्था निक आकाशवाणी केंद्र तसेच समाज माध्यमातून मास्क वापरण्यालबाबत जनजागृती करावी, सणाच्या काळात नागरिकांना उत्कृष्ट दर्जाचे गहू, तांदूळ, साखर, शेंगदाणे इत्यादी जीवनावश्यक वस्तू रास्त दरात मिळण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना प्रशासनाला केल्या.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवून घरोघरी सर्व्हेक्षणावर भर देण्यात येत आहे तसेच लोकशिक्षण,जनजागृतीवर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी कोरोनाबाधित रुग्णाचे होणारे मृत्य याबाबत विश्लेषण करण्याबरोबरच सूक्ष्म नियोजन करुन मृत्यदर शुन्यावर आणणे, कोरोना विषाणूचा संसर्ग पसरणार नाही, यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे, असे सांगितले.
पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरी भागातील कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांनी ही पूरस्थितीला ठरविले महापालिकेला जबाबदार : आता बोला मेयर साहेब ….

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा

पुणे, दि. 16-खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर पुण्यातील पूरस्थितीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महापालिकेला जबाबदार धरले असून, पावसाळ्या पूर्वीच नदी नाले सफाई आणि पाणी अडविणारी ,वळविणारी अनधिकृत ,अधिकृत बांधकामे यावर कामे का केली नाही .रस्त्यांच्या नद्या कशा होतात ? पूर्ण क्षमतेने , जास्त पावसाचाच अनुमान कायम ग्राह्य धरून ड्रेनेजची कामे का केली गेली नाहीत ? असे प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनीही आज पुण्यात पूरस्थिती निर्माण होण्यास महापालिकेलाच जबाबदार धरले आहे.

परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार तथा पुणे जिल्हा पालकमंत्री यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोलापूर, पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- एनडीआरफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी दृकदृश्य प्रणालीद्वारे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार सर्वश्री अशोक पवार, संजय जगताप, ॲड राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, अतुल बेनके यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे,पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. डी.बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. स्थलांतरीत नागरिकांना जेवण, निवाऱ्यासोबतच इत्यादी मुलभूत सुविधा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करुन द्याव्यात. सोलापूर, पंढरपूर, बारामती तसेच विभागातील इतर नुकसानग्रस्त भागातील नागरिकांची जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देशही उपमुख्यंत्री श्री पवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बदलत्या हवामानानुसार पडणाऱ्या पाऊसाची नोंद घेत विभागातील परिस्थितीबाबत प्रशासकीय यंत्रणा सतर्क असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे करण्याची कार्यवाही करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरी भागातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या अनुषंगाने प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आता मुंबईत बार, हॉटेल, रेस्टॉरंट, फुड कोर्ट सकाळी 7 ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू

0

मुंबई-आता मुंबईत बार, हॉटेल, रेस्टॉरंट, फुड कोर्ट सकाळी 7 ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू ठेवायला तर दुकाने आणि व्यापारी आस्थापनांना सकाळी 7 ते रात्री साडेनऊपर्यंत सुरू ठेवायला मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. याबाबतचे परिपत्रक पालिकेने काल रात्री जारी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता मिशन बिगीन अगेननुसार, हळूहळू शिथील करण्यात येत आहे.या आधी मुंबईतील हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, फुड कोर्टला तसेच दुकानांना सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली होती. त्याचबरोबर हॉटेल्समध्ये क्षमतेच्या 50 टक्के ग्राहक घेण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता हॉटेल, बार, रेस्टॉरंट आणि फुड कोर्टला अडीच तास वाढवून देण्यात आला असून दुकानांनाही अर्धा तास वाढवून देण्यात आला आहे. मात्र, प्रतिबंधिक क्षेत्रामध्ये वेळोवेळी जारी केलेले नियम लागू राहतील तसेच मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे, असे पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.

महापौरसाहेब ४ वर्षे तुम्ही काय केले ते सांगा …विरोधी पक्षनेत्यांचा सवाल

0

पुणे- खा. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर ; २५ वर्षापासून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सत्ता होती , पूर प्रश्नी राजकारण करू नये असे म्हणणाऱ्या महापौरांना विरोधी पक्षनेत्यांनी जोरदार टोला लगावला आहे. स्थायी समिती  अध्यक्ष तुम्ही होतात एकदा नव्हे दोनवेळा बजेट तुम्ही केले ,त्यानंतर महापौर हि झालात … या चार वर्षात १०० मुखी फौज तुमची आहे असे असताना नैसर्गिक संकट म्हणून तुम्ही पाठ फिरवू शकत नाही तुम्ही संकटांवर मात करण्यासाठी काय केले .असा सवाल विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे. त्या म्हणाल्या , खासदार सुळे यांनी कात्रज पूरग्रस्तांच्या पाहणीनंतर केलेले वक्तव्य सत्य आहे म्हणूनच यांना लागलेले आहे. पुणे पाण्यात गेले असताना हे राजकारण करू नका म्हणतात … हे वक्तव्य असमंजस पणाचे आहे. रस्ते दुथडीभरून  वाहत होते. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर असेल शहराचा भाग असेल ,उपनगरे असतील सर्वच ठिकाणी  पाणी शिरले होते. पाउस पडणार , आता तो जास्त आणि कमी काय महापौरांचे राजकारण पाहून पडणार काय ? झोपेचे सोंग घेऊन काहीतरी बोलून त्यांच्यावरचे बालंट टळेल असे त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. पाऊस काल एवढा झाला , पुढे अजून जास्ती होईल किंवा कमी होईल .. पावसाचे संकट कसे म्हणता येईल आपण निसर्गाच्या प्रत्येक हालचालीला कसे सामोरे जातो ते महत्वाचे आहे . आणि या चार वर्षात महापालिकेतील हे सत्ताधारी वेगळ्याच विश्वात रमलेले आहेत . त्यांनी जनतेची फिकीर केलेली दिसत नाही .म्हणूनच जे २५ वर्षात झाले नाही ते या चार वर्षात होते आहे. खऱ्या वास्तवतेचा सामना करण्यास सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी पुढे आलेलेच नाही हेच पुण्याचे दुर्दैव आहे. 

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

0

अमरावती-महिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व त्यांच्यासोबतच्या तिघांनी ८ वर्षांपूर्वी शहरात एका वाहतूक पोलिसासोबत वाद घातला होता. या प्रकरणात येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला जोशी-फालके यांच्या न्यायालयाने गुरुवारी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासह अन्य तिघांना प्रत्येकी ३ महिन्यांचा कारावास व १५,५०० दंडाची शिक्षा सुनावली.रम्यान याप्रकरणी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत असे ॲड. यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले आहे.

प्रकरण २०१२ चे-महिला न्यायाधीशांनी सुनावली महिला मंत्र्यांना शिक्षा

२४ मार्च २०१२ ला आमदार यशोमती ठाकूर, वाहनचालक व अन्य दोघे असे एका कारने राजापेठकडून गांधी चौकाकडे जात होते. चुनाभट्टी चौकात वाहतूक पोलिस उल्हास बाळकृष्ण रौराळे यांनी अॅड. ठाकूर यांचे वाहन थांबवले आणि वनवे असल्यामुळे पुढे नेता येणार नाही, असे सांगितले. त्या वेळी आ. ठाकूर यांनी रौराळे यांच्याशी वाद घातला. त्यांच्यासोबतच्या सागर खांडेकर, शरद जवंजाळ व राजू इंगळे यांनीही वाद घालून मारहाण केली होती. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी अॅड. ठाकूर यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण, शासकीय कामात अडथळा अशा कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

कोर्टाच्या प्रक्रियेचा आदर, उच्च न्यायालयात दाद मागणारॲड. यशोमती ठाकूर

न्यायालयीन प्रक्रियेचा सदैव आदर करते. मी स्वत: वकील आहे. फार भाष्य योग्य नाही. आम्ही हायकोर्टात दाद मागू. आता राजीनाम्यासाठी एका महिलेच्या मागे अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकेच काम आहे.

रुग्णांची सेवा करणारे कोरोना योद्धे ‘देवदूत’ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. १५ : कोरोना रुग्णांची सेवा करून त्यांना जीवनदान देणारे आरोग्य सेवेतील कोरोना योद्धे हे देवदूत असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे काढले. गौरविण्यात आलेल्या कोरोना योद्ध्याला प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याची घोषणा देखील राज्यपालांनी यावेळी केली.

राजभवन येथे झालेल्या सोहळ्यात कोरोना साथरोग नियंत्रणासाठी कार्य करणाऱ्या राज्यातील विविध आरोग्य सेवकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.

यावेळी डॉक्टर, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, सफाई कामगार, आशा कार्यकर्ती, कक्षसेवक, भट्टीचालक, क्ष-किरण अधिकारी, परिसेविका अशा सुमारे ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास आणि अवर सचिव अर्चना वालझाडे या दोघांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्याच्या पहिल्या दिवसापासून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे मैदानात उतरले आणि कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले. कोरोना रुग्णांची सेवा करणारे हे योद्धे देवदूत आहेत. त्यांचे कौतुक करायला शब्द देखील कमी पडतील, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

ज्याप्रमाणे सीमेवर लढून सैनिक देशाचे रक्षण करतात त्याचप्रमाणे कोरोना योद्ध्यांनी रुग्णांचे रक्षण करुन त्यांना जीवनदान देण्याचे काम केले आहे. सर्वांनी नेहमी चांगला विचार करा. चांगले काम करा. सकारात्मक विचार करत रहा, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

कोरोना रुग्णांची सेवा करताना ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यांना राज्यपालांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.

आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले, आज झालेला हा सत्कार वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचाच त्यापैकी काहींचा प्रातिनिधिक सत्कार येथे करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडे सामान्य माणूस आशेने पाहत असून त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागत, आस्थापूर्वक चौकशी करीत रुग्णांना बरे करुया, असे आवाहन आरोग्यमंत्र्यानी यावेळी केले. राज्यातील रुग्णांना अधिक चांगली आणि दर्जेदार सेवा देण्याकरिता मिशन मोडवर काम करु, अशी ग्वाहीही आरोग्यमत्र्यांनी यावेळी दिली.

कोरोनापासून बचावासाठी स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे असून मास्कचा वापर, फिजीकल डिस्टसींग आणि सॅनिटायझरचा वापर या गोष्टी आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाच्या लढाईमध्ये आरोग्यसेवेतील कोरोनायोद्ध्यांनी जोरदार लढाई लढली असून राज्यामध्ये बऱ्याच अंशी परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी डॉ.व्यास यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती अंबेकर यांनी केले

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालये महत्त्वाची – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

0

मुंबई, दि. १५ : वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य मध्यवर्ती ग्रंथालय येथे आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. सामंत म्हणाले, ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व ग्रंथालये सुरू होत आहेत. ‘वाचन प्रेरणा दिन’ केवळ विशिष्ट दिवशी साजरा न करता तो 365 दिवस साजरा करण्यात यावा. विशेषतः वाचनाची चळवळ गावागावात जाण्यासाठी हा दिवस गाव पातळीवर साजरा होणे आवश्यक आहे.

ग्रंथालय चळवळ रूजावी यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच दिनी शासनाने ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सर्वस्तरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. डॉ.कलाम यांनी अनेक पुस्तके लिहिली. या अनमोल साहित्याचे वाचन सर्वांनी करीत त्यांचे विचार आचरणात आणावेत, असेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

श्री. सामंत म्हणाले, बदलत्या काळानुरूप वाचन संस्कृती वाढण्यासाठी आवश्यक त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. ग्रंथालये आधुनिक होण्यासाठी शासनाने वेळोवेळी पावले उचलली असून शासन यासाठी सर्व सहकार्य करेल. ‘वाचन प्रेरणा दिन’ हा महाविद्यालयीन स्तरावरही मोठ्या उत्साहाने साजरा केला पाहिजे, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

यावेळी, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, लेखक विश्वास पाटील, ग्रंथालय संचालनालय संचालिका श्रीमती शालिनी इंगोले उपस्थित होते.

कोविड – १९ काळात निष्पक्ष, पारदर्शक व सुरक्षित निवडणुकांकरिता स्टार प्रचारकांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी

0

नवी दिल्ली, दि. १५ : कोविड-१९ काळात सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराकरिता स्टार प्रचारकांसाठी भारत निवडणूक आयोगाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून या निवडणुका निष्पक्ष, शांततापूर्ण, पारदर्शक, नैतिक आणि सुरक्षितरित्या व्हाव्या हा यामागील मुख्य उद्देश आहे. भविष्यात कोविड-१९ काळात होणाऱ्या निवडणुकांत प्रचारासाठी स्टार प्रचारकांना या मार्गदर्शक तत्त्वाचा अवलंब करावे लागेल. असे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे.

या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार आता मान्यताप्राप्त राष्ट्रीय / राज्यस्तरीय राजकीय पक्षाला स्टार प्रचारकांची संख्या ४० ऐवजी ३० ठेवावी लागेल. तसेच मान्यताप्राप्त असलेल्या नोंदणीकृत राजकीय पक्षांसाठी स्टार प्रचारकांची संख्या कोविड-१९ च्या काळात वीस ऐवजी १५ असेल. त्याचप्रमाणे स्टार प्रचारकांची यादी सादर करण्याचा कालावधी अधिसूचना जारी केल्यानंतर सात दिवसांऐवजी दहा दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे. ज्या राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी सादर केलेली आहे, त्यांना सुधारित यादी दिलेल्या कालावधीत पुन्हा सादर करावी लागेल. स्टार प्रचारकांच्या सभेसंबंधी परवानगी घेण्यासाठी प्रचाराच्या ४८ तास अगोदर जिल्हा निवडणूक प्रशासनाकडे याची माहिती द्यावी लागेल जेणेकरून सर्व सुरक्षा उपाय वेळेच्या आत करणे शक्य होईल. ही सर्व सुधारित मार्गदर्शक तत्त्वे तात्काळ प्रभावाने अंमलात येतील.

२१ ऑगस्ट २०२० रोजी आयोगाने निवडणुका आयोजित करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या अंतर्गत निवडणुकांच्या काळात कशाप्रकारे मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करावी  याबद्दल निर्देश आहेत. यासाठी राजकीय पक्ष, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी वार्तालाप करून मार्गदर्शक तत्त्वे घोषित करण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने बिहार भेटीत सार्वत्रिक निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यासाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्ष राज्याचे मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी, अतिरिक्त मुख्य सचिव, (गृह), मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षक इत्यादींशी विस्तृत चर्चा केली. यावेळी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले जात असल्याचे आयोगाला सूचित करण्यात आले.

कचरा गाड्या आणि चेन बुलडोझरच्या भ्रष्ट कारभाराला आळा  घाला – नगरसेवक ओसवाल (व्हिडिओ)

0

पुणे- कचरा गाड्यांची टेंडर्स आणि चेन बुलडोझर चा काळा बाजार त्वरित थांबवावा अशी मागणी आज स्थायी समितीच्या सभेतच शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांनी केली .स्थायी समितीच्या सभेत त्यांनी चेन बुलडोझरच्या टेंडर प्रकरणाला आक्षेप घेतला. हे लागतातच कशाला ? आणि ठेकेदाराला जेवढे पैसे दिलेत तेवढ्या पैशात तर पालिका स्वतःचे चेन बुलडोझर घेऊ शकत होती .. एकाच ठेकेदारावर हि कृपा का केली जाते आहे? असे प्रश्न उपस्थित केल्याने स्थायी समितीने हा विषय आठवडाभर पुढे ढकलला . कचरा उचलण्यासाठी च्या १०० गाड्यांच्या टेंडर प्रकरणी देखील नियमबाह्य काम होत असल्याचा आक्षेप घेऊन याप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई ची आणि चौकशीची मागणी ओसवाल यांनी केली . पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे. 

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/1049838215440935/

आयुक्त साहेब …महापौरांच्या हट्टापायी नायडू हॉस्पिटलचा बळी देऊ देणार नाही – अरविंद शिंदे (व्हिडिओ)

0
https://www.facebook.com/1501539223422053/posts/2743809379195025/

पुणे- केवळ महापौर मोहोळ यांच्या हट्टासाठी नायडू हॉस्पिटलचा बळी देऊ देणार नाही, आयुक्त साहेब , या महापौरांच्या तालावर नाचू नका ..असा सणसणीत इशारा कॉंग्रेसचे माजी गटनेते आणि नगरसेवक अरविंद शिंदे यांनी दिला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने महापालिकेने मेडिकल कॉलेज उभारावे याबाबतचा हट्ट जरूर पूर्ण करता येईल पण आत्ता ती वेळ नाही तरीही त्यासाठी आता ४०० कोटीच्या निविदेची प्रक्रिया महापालिकेने सुरु केली आहे . एकीकडे महापालिकेची आर्थिक अवस्था डबघाईला आल्याचे सांगटा आणि दुसरीकडे ४०० कोटीची टेंडर्स अशा काळात काढता ? शिवाय या कॉलेजसाठी नायडू हॉस्पिटलचा बळी द्यायला हि मंडळी निघाली आहे. अनेक सांसर्गिक रोगांच्या साथीत ,महामारीत नायडू हॉस्पिटलने पुणेकरांना साथ दिली आहे. गोरगरिबांच्या आरोग्याचा आसरा बनलेल्या नायडूचा असा कोणाच्या हट्टापायी आयुक्तांना आपण बळी देऊ देणार नाही अशी भूमिका पत्रकार परिषदेतून काल अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केली आहे. प्रसंगी आपण कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नायडू हॉस्पिटल बचावो ची मोहीम सुरु करू असेही त्यांनी म्हटले आहे. 

सत्ताधारी भाजपच्या भोंगळ कारभारामुळे पुणेकरांचे हाल – खा.सुप्रिया सुळे

0

पुणे – पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भोंगळ कारभारामुळे पुणेकरांना पावसाच्या पूरस्थितीचे फटके बसून हाल अपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे असा स्पष्ट आरोप खा. सुप्रिया सुळे यांनी केला आहे . काल दुपारपासून पुणे शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शहरातील अनेक रहिवासी भागांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यानंतर आता पुण्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानावरुन राजकारण सुरु झाले असून बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी यासाठी भाजपाला जबाबदार धरले आहे.

कात्रज येथील संरक्षक भिंत दोन वर्षापुर्वी कोसळली होती. त्यावर महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून कोणत्याही प्रकाराच्या उपाय योजना करण्यात आल्या नसल्यामुळे आजच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीला भाजपच जबाबदार असून आता हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून उद्या मार्गदर्शन घेणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे सांगितले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी कात्रज परिसरातील विश्वकर्मा नगर येथे पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे आदी नगरसेवक, पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या की, दोन वर्षांपूर्वी पुणे शहरात अतिवृष्टीमुळे कात्रज येथील संरक्षक भिंत कोसळल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. महापौर, महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे त्यावर उपयोजना करण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात वेळोवेळी मांडली. पण महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीकडे नेहमी दुर्लक्ष केले. पुण्यातील नागरिकांचे सत्ताधाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळेच मोठे नुकसान झाल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. या प्रश्नावर उपाय काढण्यासाठी प्रयत्न पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीत केले जातील असे आश्वासन सुळे यांनी दिले.

वनक्षेत्राच्या रस्त्यातील खड्डे भरण्याच्या कामासाठी राज्य शासनाच्या परवानगीची आवश्यकता नाही – वनमंत्री संजय राठोड

0

मुंबई, दि. १५ :- वन संरक्षण कायदा १९८० च्यापूर्वी तयार करण्यात आलेले व फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया डेहराडूनच्या टोपोशीट नकाशावर दर्शविण्यात आलेल्या वन क्षेत्रातील रस्त्यांच्या खड्डे भरण्याच्या कामासाठी राज्य शासनाच्या परवानगीची आता आवश्यकता नाही, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

वन संरक्षण कायदा 1980 च्या पूर्वीच्या वन क्षेत्रातील रस्त्यांची देखभाल – दुरूस्ती व नूतनीकरण करावयाचे असल्यास याबाबत परवानगीचे अधिकार राज्य शासनास असून त्याबाबतच्या प्रस्तावांच्या संपूर्ण तांत्रिक बाबींची तपासणी होवून अशी परवानगी राज्य शासनाकडून दिली जाते. मात्र राखीव वनामधील रस्त्यांचे खड्डे भरणे हे किरकोळ स्वरूपाचे काम असल्याने प्रस्ताव तयार करणे व तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवणे यासाठी विलंब होत असल्याने त्यासाठी विभागाने निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी विविध लोकप्रतिनिधींकडून सातत्याने केली जात होती. तसेच अशा रस्त्याच्या  दुरूस्तीसाठी विलंब लागत असल्याने अपघाताची शक्यता वाढत होती. यासर्व बाबींचा साकल्याने विचार करून राखीव वन क्षेत्रातील खड्डे भरण्याच्या कामास आता वन विभागाच्या परवानगीची आवश्यकता राहणार नाही. मात्र असे काम करण्यापूर्वी त्याची सूचना संबंधित वन अधिकारी यांना देणे व रस्त्याचे खड्डे भरण्यासाठी माती व इतर साहित्य हे संबंधित काम करणाऱ्या एजन्सी यांना वन क्षेत्राच्या सीमेच्या बाहेरून उपलब्ध करून घ्यावे लागणार आहे, अशी माहितीही श्री. राठोड यांनी दिली.

मेळघाट येथील रस्त्यांच्या अशा परवानगीबाबत नुकतीच  मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर वन क्षेत्रातील खड्डे भरण्याचे काम हे महत्त्वाचे असल्याने याबाबत विभागाने तांत्रिक बाबी तपासून सुधारित सूचना निर्गमित करण्याच्या सूचना वनमंत्र्यांनी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा; यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

0

मुंबई, दि. १५ : राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत. उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- एनडीआरफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. तसेच वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले आहेत.

पंढरपुरातील कुंभार घाट येथे अतिवृष्टीमुळे भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करून त्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

परतीचा पाऊस आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सर्वदूर अशी वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने वाहणारे वारे आणि ढगफुटीतून निर्माण होणारी अतिवृष्टीची परिस्थिती यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषतः पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण क्षेत्रातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे पूर्णपणे भरली आहेत. बारामती तालुक्यालाही मोठा फटका बसला आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. जायकवाडी व माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु  आहे.

या सर्वच परिस्थितीचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सकाळपासूनच आढावा घेणे सुरु केले. मुख्य सचिव, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच गृह विभागाकडून परिस्थितीचा आढावा घेतानाच,  त्यांना नागरिकांच्या मदतीसाठी आणि समन्वय आणि संनियत्रणावर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयासह विभागीय आयुक्तालय, संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी सातत्यपूर्ण समन्वय राखण्यात यावा. आवश्यक त्याठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात याव्यात आणि तातडीच्या मदतीसाठी अग्निशमन, पोलिस, तसेच महसूल आणि वैद्यकीय अशा सर्वच विभागांना मदत पथके पाठविण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

महसूल, कृषी, मदत व पुनर्वसन या विभागांसह आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत व अन्य आवश्यक मदत पोहोचविण्यासाठी यंत्रणांना सज्जतेचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष राज्यातील जिल्हा कक्षांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवून समन्वय राखत आहे.

चतुःशृंगी देवीच्या मंदिरात साधेपणाने नवरात्रौत्सव

0
  • धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने.
  • दर्शनासाठी ऑनलाइन व्यवस्था, डिजिटल पेमेंटची सुविधा.
  • देवीच्या पूजेसाठी अकरा किलो चांदीची उपकरणे.
  • कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विशेष उपाययोजना.
  • लवकरच जीर्णोद्धाराचे काम सुरू.
  • विविध रुग्णालयांना देणग्या.

पुणे – चतुःशृंगी देवीच्या मंदिरात शासनाने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे पालन करून या वर्षीचा नवरात्रौत्सव १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत साधेपणाने साजरा केला जाणार आहे.

शासनाच्या नियमांनुसार भाविकांना दर्शनासाठी मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र ऑनलाइन पद्धतीने देवीच्या दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. अशी माहिती ‘श्री देवी चतुःश्रृंगी मंदिर ट्रस्ट’चे अध्यक्ष किरण अनगळ आणि कार्यकारी विश्‍वस्त देवेंद्र अनगळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

नवरात्रौत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरे केले जाणार आहेत. येत्या शनिवारी (१७ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजता देवीचा अभिषेक, षोडशोपचार पद्धतीने महापूजा व महावस्त्र अर्पण करून मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे. नारायणशास्त्री कानडे गुरुजी आणि श्रीरामशास्त्री कानडे गुरुजी पौरोहित्य करणार आहेत. नरेंद्र अनगळ यांच्याकडे या वर्षीच्या पूजेची जबाबदारी आहे.

देवीची आरती दररोज सकाळी १० वाजता आणि रात्री साडेआठ वाजता करण्यात येणार आहे. रविवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी ८ ते ११ या वेळेत नवचंडी होम करण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी विजयादशमीनिमित्त देवस्थानचे कर्मचारी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत मंदिराच्या परिसरात सीमोल्लंघन करण्यात येणार आहे.

देवीचे दर्शनआणि सर्व धार्मिक सोहळ्यांचे थेट प्रक्षेपण www.chattushringidevasthanpune.org आणि www.chattushringidevasthan.org या संकेतस्थळांवर पाहाता येणार आहे. भाविकांसाठी देवस्थानच्या फेसबूक पेजवर आणि यूट्यूबवर दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर थेट दर्शनासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. भाविकांना देणगी देण्यासाठी विशेष ऍपद्वारे डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

देवीचे मंदिर आणि परिसरातील स्वच्छता व रंगरंगोटीची कामे पूर्ण करण्यात आली असून, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. या वर्षी देवीच्या पूजेसाठी अकरा किलो चांदीची उपकरणे घडविण्यात आली आहेत. चतुःशृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने या वर्षीचे सर्वच धार्मिक विधी केवळ कर्मचारी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत. या सर्वांचा मेडिक्लेम, कोरोना कव्हर आणि अपघाती विमा उतरविण्यात आला आहे. दररोज तापमान आणि ऑक्सिजन लेव्हल तपासली जाणार आहे. शिवाय सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायझेशन, मास्क आणि हातमोजांचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

मंदिराच्या जीर्णोद्धार प्रकल्पाला फेब्रुवारी महिन्यात महापालिकेच्या हेरिटेज विभागाने मान्यता दिली आहे. नजिकच्या काळात बांधकाम विभागाची परवानगी मिळणे अपेक्षित आहे. ही परवानगी मिळताच मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले जाणार आहे.

ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी ट्रस्टच्या वतीने नुकतीच पाच लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशनचे जोशी हॉस्पिटल, रत्ना हॉस्पिटल आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेणार्‍या गरीब आणि गरजू रुग्णांना रुग्णालयांच्या शिफारसीनुसार गेल्या वर्षभरात आर्थिक मदत केली आहे.