Home Blog Page 2425

अतिवृष्टीमुळे कांद्याचे भाव कडाडले..

0

पुणे- अतिवृष्टीमुळे राज्यातील नवीन कांद्याच्या पिकाचे झालेले नुकसान त्यामुळे सध्या कांद्याचे भाव कडाडले आहेत. घाऊक बाजारात नवीन कांद्याला किलोस 30 ते 50 रुपये, तर, जुन्या कांद्यास 50 ते 63 रुपये भाव मिळत आहे. दर्जानुसार 50 ते 80 रुपये किलो भावाने किरकोळ बाजारात कांद्याची विक्री होत आहे.

दोन महिन्यांपूर्वी कांद्याची घाऊक बाजारात 15 ते 20 रुपये किलो भावाने विक्री होत होती. मात्र, जास्त प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसला नवीन कांदा आता बाजारात येणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे 50 टक्के नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. रविवारी केवळ 300 पोती नवीन कांद्याची आवक झाली.

डिसेंबर महिन्यात चांगल्या नवीन कांद्याचे पिक बाजारात येईल. तोपर्यंत भाव चढेच राहणार आहेत. जुना कांदा तुलनेने कमी उपलब्ध आहे. असलेल्या मालापैकी 60 ते 70 माला नित्कृष्ट दर्जाचा आहे. बाजारात चांगल्या मालाला मागणी आहे. त्यातच कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यातील कांद्याचे पिक येत असते. मात्र, पावसमुळे तेथील कांद्याच्या दर्जावर परिणाम झाला आहे.

राज्यातील सुकलेल्या आणि वाळलेल्या कांद्याला त्या राज्यातून मागणी आहे. त्यामुळे कांद्याचे भाव तेजीत आहेत. रविवारी येथील बाजरात सुमारे 60 ट्रक जुन्या कांद्याची आवक झाली.

भाजयुमोच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे सरकारची जिम उघडण्याची तयारी : विक्रांत पाटील

0

पुणे : दिनांक १६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील युवांसमोरील काही ज्वलंत प्रश्न घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यपालांची भेट घेतली. महाराष्ट्रातील असंख्य युवांचा प्रश्न म्हणजे जिम सुरू करणे, भारतीय जनता युवा मोर्चा ने त्या विषयाला हात घातला व राज्य सरकार च्या जिम विषयीच उदासीन धोरणा विषयी ‘जिम खोलो आंदोलनाची’ हाक दिली. आंदोलनाची माहिती मिळताच राज्य सरकार सतर्क झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी भाजयुमो कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आंदोलनाच्या घेतलेल्या परवानग्या तसेच सोशल मीडिया च्या माध्यमातून दिवसभर चालविलेली मोहीम हे सर्व विषय राज्य सरकार दरबारी पोहचले म्हणून भाजयुमोच्या आक्रमक पवित्र्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घाईघाईने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत जिम उघडण्यासाठी सकारात्मक असल्याचे बोलून दाखवावे लागले.
भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितले की, आमच्या आंदोलनाच्या हाकेला मिळालेलं हे यश आहे ,म्हणून या निमित्ताने अनेक जिम चालकांशी केलेल्या चर्चेअंती असे ठरले की,राज्य सरकारला या पूर्वी अनेक संधी दिल्या त्यामुळे आता अजून एक संधी देऊन पाहावे आणि दसऱ्यापर्यंत जिम उघडण्याची सकारात्मक वाट पहावी. या सरकारने या आधीही अनेक विषयात घुमजाव ची भूमिका घेतली आहे, परंतु जिम संदर्भात अशी भूमिका राज्य सरकारने घेतली तर आंदोलनाचा आमचा पवित्रा कायम राहील; युवांची अशी फसवणूक राज्य सरकार करणार नाही तसेच युवांसाठी महत्त्वाच्या आणि अनेकांचे रोजगार ज्यावर आहेत अश्या जिम त्वरीत सुरू होतील अशी आशा व्यक्त करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार – शरद पवार

0

राज्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारपुढे मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहीजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. उभ्या पिकांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही. त्यासाठी महाविकास आघाडीच्या खासदारांचे शिष्टमंडळ घेऊन आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार यांनी रविवारी धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.

तुळजापूर येथे हेलिकॉप्टरने रविवारी सकाळी 9.30 वाजता शरद पवार यांचे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी काक्रंबा, काक्रंबावाडी, लोहारा, सास्तूर, राजेगाव त्यानंतर उमरगा तालुक्यातील कवठा येथील शेतीची पाहणी केली. यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून त्यांना धीर दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती धाराशिव जिल्ह्याबरोबरच राज्यात अनेक जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. शक्य तितक्या लवकर मदत मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असून नुकसानीचे प्रमाण लक्षात घेता राज्य सरकारला मदत करण्यासाठी काही मर्यादा येत आहे. त्यामुळे आपण महाविकास आघाडीतील खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादीचे नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पोटभाडेकरू ठेवल्यास पथारी व्यावसायिकांवर होणार कारवाई

0

पुणे-

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून परवाने देण्यात आलेल्या 70 टक्के व्यावसायिकांनी आपले परवाने आणि दुकाने भाड्याने दिली आहेत. अशाप्रकारे बेकायदेशीरपणे पोटभाडेकरू ठेवणार्‍यां पथारी व्यावसायिकांवर थडक कारवाई अतिक्रमण विभागाकडून करण्यात येणार आहे.

शहरातील फेरीवाल्यांना आणि पथारी व्यावसायिकांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वार्षिक शुल्क भरुन घेऊन फेरीवाला प्रमाणपत्र दिले जाते. ज्याच्या नावावर प्रमाणपत्र आहे, त्या व्यक्तीने किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने परवानगी दिलेल्या ठिकाणी व्यावसाय करणे बंधनकारक आहे. पोटभाडेकरू ठेवल्याचे आढळल्यास अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते. फेरीवाला प्रमाणपत्रातील अटी-शर्तींचा भंग केल्यास प्रथम वेळेस एक हजार रुपये दंड तर दुसर्‍या वेळेस 5 हजार दंड आकारण्यात येतो. त्यानंतरही अंतिमत: फेरीवाला प्रमाणपत्र रद्द करण्यात येते.

मात्र नोंदणीकृत आणि परवानाधारक फेरीवाल्यांकडून आणि पथारी व्यावसायिकांकडून परवाने व दुकाने भाड्याने दिली जातात. अशा प्रकारे 70 टक्के व्यावसायिकांनी प्रमाण पत्रातील अटी व शर्थींचा भंग केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक्ष व्यावसायिक आणि त्यांच्याकडे असलेले प्रमाणपत्र तपासण्यासाठी पालिका प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे.

व्यवसायाभिमुख, कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर हवा-विवेक वेलणकर यांचे मत

0
  • आशा प्रतिष्ठानतर्फे गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

पुणे: “कोरोनामुळे नर्सिंग, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, वैद्यकीय कर्मचारी यांचे महत्व अधोरेखित झाले आहे. आजच्या काळात व्यवसायाभिमुख आणि कौशल्याधारित मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी अशाप्रकारचे शिक्षण घेण्यावर भर द्यायला हवा,” असे मत सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.

आशा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने ‘आशा शिष्यवृत्ती सन्मान सोहळा’ पार पडला. ग्रामीण, दुर्गम भागातील, पुण्यातील वाडी-वस्ती भागातील गुणवंत आणि आर्थिक मागास २५ विद्यार्थिनींना नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने २५०० रुपयांची शिष्यवृत्ती, तसेच शैक्षणिक साहित्य देण्यात आले. पत्रकार भवन येथे झालेल्या सोहळ्यावेळी ‘आपलं घर’चे विजय फळणीकर, ‘आरोग्यभारती’चे प्रमुख डॉ. शिरीष कामत, मॅथ्स अकॅडमीचे सचिन ढवळे, आशा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अंजली लोणकर, पुरुषोत्तम डांगी आदी उपस्थित होते.

विवेक वेलणकर म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये मोठी क्षमता असते. त्यांना दिशा दिली, योग्य मार्गदर्शन मिळाले, तर त्या स्वावलंबी होऊ शकतात. दहावी-बारावीनंतर स्वतःच्या पायावर उभे राहता येईल, अशा स्वरूपाचे अनेक छोटे-छोटे अभ्यासक्रम आहेत. डॉक्टर, अभियंता, अधिकारी होण्याबरोबरच रुग्णसेवा, लेखापाल, संगणक प्रशिक्षण घेतले तर नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात.”

विजय फळणीकर म्हणाले, “लोकांमध्ये आपलेपणाची भावना जोपासणे गरजेचे आहे. नवीन कौशल्ये अभ्यासक्रम शिकण्यासह माणुसकी शिकावी. मिळालेल्या संधीचे आपल्याला सोने करता आले पाहिजे. आशा प्रतिष्ठानसारखे दातृत्ववान लोक समाजातल्या वंचित घटकांसाठी हात पुढे करतायेत, हे आशादायी आहे. शिक्षण समृद्ध, सामर्थ्यवान बनवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे शिक्षणात मागे पडू नये.”

सचिन ढवळे यांनी स्पर्धा परीक्षांच्या संदर्भाने मार्गदर्शन केले. अंजली लोणकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रा. सुनील मोरे व गणेश ठाकर यांनी सूत्रसंचालन केले. चंदन डाबी यांनी प्रास्ताविक केले. प्रातिनिधिक स्वरूपात एका विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. प्रतीक डांगी यांनी आभार मानले.

कोरोनाविरुद्धचा लढा निर्णायक वळणावर; आपल्यासाठी आजही मास्क हीच लस – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

सुरक्षित आणि निरोगी महाराष्ट्रासाठी आपण सगळे घेऊया, ‘MAHकसम

रत्नागिरी ( जि.मा.का) दि. 18: कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर  लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मां कसम’ सर्वांनी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केले.

दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्याने आज या सुविधेचे उद्घाटन झाले. जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री ॲड. अनिल परब, सार्वजनिक आरोग्यमंत्री  राजेश टोपे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबतच खासदार विनायक राऊत सहभागी झाले. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने,  आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांचीही उपस्थिती होती.

कोकणाला लाटांचा सामना कसा करायचा ते शिकवण्याची गरज नाही पण कोरोनाबाबत दुसरी लाट न येऊ देणे ही प्राथमिकता आहे.  कोरोनामुक्त झालेली एक व्यक्ती एका महिन्यात दोन वेळा प्लाझ्मा दान करुन चार जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्यूदर देखील कमी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत रत्नागिरीत झालेले काम कौतुकास्पद आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की याच पद्धतीने आगामी काळात जाणीव जागृती करुन कोरोनाचा घसरता आकडा आणखी कमी करा. युरोपप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन की मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता याबाबत प्रत्येकापर्यंत जागृती करा.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या उपचार केंद्राबाबत माहिती दिली. उद्घाटनानंतर याबाबत चित्रफित दाखविण्यात आली.

इतर रोगांमध्येही फायदा

प्लाझ्मा अफेसेसिस युनिट मलेरिया, डेंग्यू तसेच इतरही अनेक आजारात मदत करणार आहे. यासाठी लागणारी यंत्रे 1 ते 2 लाखात येतील ती खरेदी करुन यातून कायमस्वरुपी उपचार व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी असे आरोग्यमंत्री श्री. टोपे याप्रसंगी म्हणाले. रत्नागिरीत घराघरापर्यत पोहोचून आरोग्ययंत्रणा व जिल्हा प्रशासनाने उत्तम कामगिरी केली याबद्दल त्यांनी अभिनंदनदेखील यावेळी केले.

मुख्यमंत्र्यांचे आभार

जिल्ह्याला आरटीपीसीआर प्रयोगशाळेची आवश्यकता आहे असे सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्यता दिली. त्यांच्याच संकल्पनेतून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरु झाली. यामुळे रत्नागिरीत कोरोनाची वाढ रोखण्यात यश आले याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो असे सांगून परिवहन तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी जिल्हा प्रशासनाचेही याबद्दल अभिनंदन केले.

ओसर सुरु

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून राबविलेल्या मोहिमेमुळे  रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आणता आला. रत्नागिरीत गेल्या 24 तासात एकाही मृत्यूची नोंद नाही हेदेखील त्यामुळेच शक्य झाले असे खासदार विनायक राऊत म्हणाले.

शून्याकडे वाटचाल

रोज 35 ते 40 रुग्ण पॉझिटिव्ह होणाऱ्या  रत्नागिरी तालुक्यासह लगतच्या माझ्या मतदारसंघात आता आकडा शून्यावर आला. यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम व जिल्हा प्रशासन यांचे यश आहे असे सांगून  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपण लवकरच या प्लाझ्मा उपचार सुविधेतून मृत्यूदरदेखील एक टक्क्यांच्या खाली नेऊ असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबिता कमलापूरकर आदींची या कार्यक्रमास उपस्थिती होती.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. इंन्दुराणी जाखड यांनी आभार मानले.

कोरोना युध्दात फुले आजहीकार्यक्रमाची तयारी करीत असतानाच पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले या रुग्णालयातून  कार्यक्रमात सहभागी झाल्या याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेत फुले-शाहूंनी घडविलेल्या या महाराष्ट्रात कोरोनायुध्दात आजही फुलेंचा सहभाग आहे अशा शब्दात त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

शासन देणारच आहेमाझ्याकडे कौतुकाचे अभिनंदानाचे शब्द कानावर येतात त्यावेळी त्यामागे आपली मागणी केलेली असते. रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यासाठी सर्व अटींची पूर्तता करा. रायगड आणि सिंधुदुर्गात दिलंय तसंच ते तुम्हालाही देऊ असे मुख्यमंत्री म्हणाले.

ई-संजीवनीद्वारे रुग्ण तपासणीच्या वेळेत वाढ

0

मुंबई, दि. 18 :- कोरोनामुळे लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी ऑनलाईन सल्ला घेता यावा यासाठी सुरु झालेल्या ई-संजीवनी ओपीडीच्या माध्यमातून राज्यभरात आतापर्यंत 6000 पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी दिवसातून दोन वेळेस ओपीडीदेखील सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी सकाळी 9.30 ते दु.1.30 या वेळेतच रुग्णांना ऑनलाईन सल्ला दिला जायचा आता त्यात वाढ करुन दु.3.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेतदेखील ओपीडी सुरु असणार आहे.

या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाईल ॲप देखील सुमारे 4 महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले आहे. ॲण्ड्राईड आधारित ॲप असल्याने त्याचा फायदा स्मार्ट फोनधारकांना होत आहे.

राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे मध्ये पूर्णपणे सुरू करण्यात आली. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट दिल्यास त्यांना तज्ज्ञांचा सल्ला घेता येतो. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप, मोबाईल यांचा वापर करून कुठल्याही आजारावर वैद्यकीय सल्ला, उपचार रुग्णाला घेता येतो. राज्यभरात आतापर्यंत 6072 जणांनी यासेवेचा लाभ घेतला, आहे.

ई-संजीवनी ओपीडी ॲप :

1)   मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ‘ओटीपी’ येतो. त्या माध्यमातून रुग्ण त्याचा नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो.

2) लॉगईनसाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकाच्या आधारे लॉगईन करता येते.

3) डॉक्टरांशी चर्चेनंतर  लगेच ई-प्रिस्क्रिप्शन प्राप्त होते.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 36 हजार 773

0

पुणे विभागातील 4 लाख 34 हजार 938 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 4 लाख 84 हजार 927 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.18 :- पुणे विभागातील 4 लाख 34 हजार 938 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 84 हजार 927 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 36 हजार 773 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 216 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.73 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 89. 69 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 13 हजार 645 रुग्णांपैकी 2 लाख 84 हजार 907 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 21 हजार 431 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 307 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.33 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 90.84 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 233 रुग्णांपैकी 36 हजार 397 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 414 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 422 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 27 रुग्णांपैकी 32 हजार 209 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 493 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 325 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 732 रुग्णांपैकी 38 हजार 116 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 48 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 568 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 290 रुग्णांपैकी 43 हजार 309 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 387 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 594 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 674 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 946 , सातारा जिल्ह्यात 264, सोलापूर जिल्ह्यात 125, सांगली जिल्ह्यात 260 तर कोल्हापूर जिल्ह्यात 79 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 4 हजार 372 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 232, सातारा जिल्हयामध्ये 698, सोलापूर जिल्हयामध्ये 320, सांगली जिल्हयामध्ये 678 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 444 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 22 लाख 8 हजार 375 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 84 हजार 927 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 17 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

३० वर्षांनी बदलला फार्मसी डिप्लोमा अभ्यासक्रम

0
  • फार्मसी डिप्लोमा अभ्यासक्रम बदलण्याच्या निर्णयाचे पुण्यात स्वागत  

पुणे : फार्मसी शिक्षणातील डिप्लोमा (पदविका ) अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय कौन्सिल ऑफ फार्मसीने घेतला असून १६ ऑकटोबर रोजी त्याची अधिसूचना जारी केली आहे.३० वर्षांनी कालबाह्य अभ्यासक्रम बदलल्याने  पुण्यातील फार्मसी महाविद्यालयांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.’नव्या जगातील नव्या बदलांना साजेसा हा निर्णय असून आम्ही त्याचे स्वागत करतो ‘असे हा  अभ्यासक्रम बदलण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे इन्स्टिट्यूट  ऑफ फार्मसी (आझम कॅम्पस ) चे प्राचार्य डॉ व्ही एन जगताप यांनी म्हटले आहे . 
‘फार्मसी शिक्षणाच्या भवितव्यासाठी कालबाह्य अभ्यासक्रम बदलणे आवश्यक होते. फार्मसी शिक्षणाचा दर्जा उंचावणे यामुळे शक्य होणार आहे. आम्ही अभ्यासक्रम बदलला जावा यासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया कडे सतत पाठपुरावा करीत होतो . त्याला यश आले आहे’, असे डॉ   व्ही एन जगताप यांनी पत्रकाद्वारे सांगितले .  ते म्हणाले,’नव्या कालोचित  अभ्यासक्रमात कौशल्ये ,ज्ञान ,रोजगारभिमुकता आहे .त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. ‘
अभ्यासक्रम बदलण्याच्या प्रक्रियेचा अनेक फार्मसी महाविद्यालयांनी पाठपुरावा केला होता . भारती विद्यापीठच्या पूना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ आत्माराम पवार म्हणाले,’३० वर्षांत पदविका अभ्यासक्रमात एकही बदल करण्यात आला नव्हता . अभ्यासक्रमात बदल करावा ही आमची जुनी मागणी होती. ती मान्य झाल्याचा आनंद आहे. यामुळे फार्मसी पदविका अभ्यासक्रमाला नवी दिशा मिळणार आहे. ‘
 महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनीही केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला . सेंट्रल ऍडव्हायजरी बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य डॉ लतीफ मगदूम यांनीही तेथे प्रयत्न केले .महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव इरफान शेख यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर

0

मुंबई, दि. 18 :- अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे सोमवार दि.19 ऑक्टोबरपासून तीन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात राज्यमंत्री श्री.सत्तार हे सोमवारी सकाळी जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट देतील. त्यानंतर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील  पांढरवाडी ,पाडळसिंगी  व पाचेगाव येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी बीड जिल्ह्यातील कुर्ला, शिवनी व पाली या भागांचा दौरा करणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतील. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ आणि महाराजस्व अभियान याबाबत आढावा बैठक घेणार आहेत.

मंगळवार दि. 20 ऑक्टोबर 2020 रोजी महसूल राज्यमंत्री श्री. सत्तार हे उस्मानाबाद जिल्ह्यातील सिलवडी व सुरडी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे त्यांचे आगमन होणार असून तेथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ व महाराजस्व अभियानाचाही आढावा ते यावेळी घेणार आहेत. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

बुधवार दि. 21 ऑक्टोबर रोजी श्री. सत्तार हे लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा व लातूर तालुक्‍यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.    दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा ते घेणार आहेत. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ व महा राजस्व अभियान याबाबतही आढावा घेणार आहेत.

“नीट-मेडिकल प्रवेश परीक्षेत देखील चाटेंच्या विद्यार्थ्यांची बाजी “.व्यंकटेश राजमाने-662 व ओंकार कळंबे-651

0

पुणे -वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वाची समजली जाणारी नीट या देशपातळीवरील प्रवेश परीक्षेमध्ये चाटे शिक्षण समूहातील १९७  विद्यार्थ्यांनी घवघवीत असे यश संपादन केले.राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या जवळ जवळ सर्वच परीक्षांमध्ये जसे की जेईई मेन ,जेईई ॲडवांस इत्यादी परीक्षांमध्ये देखील चाटे च्या विद्यार्थ्यांनी यावर्षी दैदिप्यमान असे यश मिळवत चाटें ची उज्वल यशाची परंपरा कायम राखली. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रा फुलचंद चाटे सर,संचालक चाटे शिक्षण समूह पुणे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. झूम मीटिंग द्वारे आयोजित कौतुक सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

                   नीट परीक्षेमध्ये नीयती केंभवी -617, सुदर्शन पाटील-615, साक्षी दळवी-592, खोपडे पूरब-571, वरून जोशी-560, वैष्णवी जाधव-554, शोएब अत्तर-543, सुमेधा भोसले-509, हार्दिक साखलीकर-508 इत्यादी विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवत वैद्यकीय प्रवेशाकरिता पात्र ठरले.

                  अकरावी आणि बारावी ही दोन वर्ष विद्यार्थ्यांनी चाटे शिक्षण समूहाच्या कार्यप्रणाली नुसार अविरत मेहनत घेतल्याने विद्यार्थ्यांना हे अद्वितीय असे यश संपादन करता आले असे यावेळी प्रा चाटे सर म्हणाले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालकांसमवेत सर्व शिक्षक वृंद व चाटे शिक्षण समूहास दिले. यावेळी पालकांनी चाटे शिक्षण समूहाचे मनःपूर्वक आभार मानले.

‘एसओपी’चे काटेकोर पालन करत दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

सामूहिक व्यायाम प्रकार झुंम्बा, स्टिम, सौना बाथ बंद राहणार

मुंबई, दि. 17 :- कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी आज जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेत ते बोलत होते.

जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा याठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्याची ग्वाही या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली. पण स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुंम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार ‘एसओपी’तील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचेही सांगण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, डॉ. शशांक जोशी तसेच महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचे निखिल राजपुरीया, ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य, करण तलरेजा, अभिमन्यू साबळे, महेश गायकवाड, हेमंत दुधवाडकर, साईनाथ दुर्गे, राजेश देसाई, योगिनी पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, जिम, व्यायामशाळा या आरोग्यासाठीच आहेत. पण त्यामुळे आरोग्याचे प्रश्न वाढू नयेत याची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे मोठ्या शहरांबरोबच राज्यातील ग्रामीण भागातही जिम, व्यायामशाळा यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना तयार करण्यात आलेली ‘एसओपी’चे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. हा व्यवसाय आहे, पण तसा तो जनतेच्या आरोग्याशी निगडीत आहे, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आता रुग्ण संख्या कमी होते आहे. पण युरोप खंडातील उदाहरणांवरून आपल्याला सावधही रहावे लागेल. आपण अनेक निर्बंध शिथिल करत आहोत. पण यातून हळू-हळू गाफीलपणा वाढू नये यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

उपचारांसाठी आपण मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण केल्या आहेत. आता रुग्ण कमी होण्यामुळे रुग्णशय्या रिकाम्या राहू लागल्या आहेत. त्या रिकाम्याच रहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोना प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष झाल्यास, आहे त्या सुविधांवरही अचानक ताण येऊ नये याची खबरदारी घ्यावी लागेल. कारण उपकरणे, सुविधा म्हणजे रुग्णशय्या, व्हेंटीलेटर्स, रुग्णवाहिका या यापूर्वीच आपण पुरेश्या संख्येने उपलब्ध केल्या आहेत. त्या आणखीही वाढविता येतील. पण त्यासाठी लागणारे डॉक्टर्स, परिचारिका असे चांगले मनुष्यबळ उभे करणे मुश्किल होते. त्यामुळे विषाणू संसर्ग आटोक्यात येतो आहे, असे दिसतानाच, संसर्ग वाढू नये यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण जिम, व्यायामशाळांसाठी ‘एसओपी’ तयार केली आहे, आणि तिचे काटेकोरपालन होणे आवश्यक आहे. त्यामुळे या ‘एसओपी’चे पालन करण्याची जबाबदारी जिम, व्यायामशाळा यांच्या मालकांवर आहे. या ‘एसओपी’चे काटेकोर पालन न केल्यास, गलथानपणा आढळल्यास मात्र संबंधितावर कठोर कारवाई करणे भाग पडेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार श्री.मेहता, प्रधान सचिव श्री. व्यास, डॉ. जोशी यांनी सहभाग घेतला.

एसओपीनुसारच दसऱ्यापासून जिमफिटनेस सेंटर्सव्यायामशाळा चालणार

आरोग्य विभाग, वैद्यकीय तज्ज्ञ आणि जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायामशाळांचे चालक यांनी तयार केलेल्या ‘एसओपी’चे पालन करूनच दसऱ्यापासून जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा सुरू करता येणार आहेत. हे नियम तपशीलाने आणि नेमकेपणाने तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये व्यायामासाठी येणाऱ्या सदस्यांना या ‘एसओपी’ची पूर्णपणे माहिती देणे अपेक्षित आहे. व्यायाम शाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे. प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी तसेच स्वच्छतेच्या बाबी यासाठी तपशीलाने नियमावली तयार करण्यात आली आहे. व्यायामशाळेत प्रवेश करण्यापासून ते व्यायाम करताना कोण-कोणती काळजी घ्यावे याचे नियम आहेत. शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टी बरोबरच, क्षेत्रफळांनुसार जास्तीत जास्त सुरक्षित शारीरिक अंतर राखणे. व्यायामशाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे. उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे. दररोज रात्री जिम,व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी

0

बारामती, दि. 17:- बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला, या पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजताच बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरुन बाधित क्षेत्राची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भिगवण रस्त्यावरील अमरदिप हॉटेल, तांदुळवाडी भागातील वृध्दाश्रम, पंपहाऊस येथील चांदगुडे वस्ती, कऱ्हा नदीवरील खंडोबानगर येथील पूल, कऱ्हावागज-अंजनगाव पूल आणि बंधारा, बारामती-फलटण रोडवरील पाहुणेवाडी, गुणवडी आणि इंदापूर ओढ्यावरील पुलाच्या परिसराची पाहणी केली.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. पुढील काळात पूरस्थिती टाळण्यासाठी नदीचे खोलीकरण करणे, नदीच्या आणि ओढ्याच्या काठावरील अतिक्रमण हटविणे, नदीच्या आणि ओढ्याच्या काठी पूररेषेच्या आत अतिक्रमणे होणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बारामती तालुक्यातील कऱ्हावागज-अंजनगाव येथील बंधाऱ्याजवळील पुलाचा भराव खचला आहे. तसेच बारामती-फलटण रस्त्यावरील पाहुणेवाडी येथील रस्त्याचा भराव खचला असून या दोन्ही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. या ठिकाणची दुरुस्तीची कामे तातडीने करुन याठिकाणची वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना उपमख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई, उपविभागीय अभियंता विश्वास ओव्हाळ, नगरसेवक सचिन सातव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

0

पंढरपूर, दि. १७ : गेल्या चार-पाच दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. नुकसानभरपाई पासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन, वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करावा, असे निर्देश  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अतिवृष्टीमुळे पंढरपूर तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांची व चंद्रभागा नदीवरील कुंभारघाट येथे भेट देवून पाहणी केली. कुंभारघाटावरील संरक्षित भिंत कोसळल्यामुळे सहा जण मरण पावलेल्या कुंटुबियांच्या नातेवाईकांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यानी घेतली.

यावेळी  आमदार भारत भालके, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय शिंदे, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, पांटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, महावितरणचे एच.पी कासार आदी  उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, परतीच्या पावसाने अतिवृष्टी झाल्यामुळे महाराष्ट्रात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीसोबतच घरांचे व पशुधनाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे व घरांचे तातडीने पंचनामे करावेत. पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून  सुरु असलेल्या घाटांचा तसेच इतर कामांचा दर्जा व गुणवत्ता चांगली राहिल, याबाबत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.  घाटबांधकामाबाबत चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सुरु असलेल्या व करण्यात येणाऱ्या कामांबाबत लवकरच पुणे येथे बैठक घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यावेळी चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटावरील संरक्षित भिंत कोसळल्यामुळे मरण पावलेल्या अभंगराव कुंटुबियांच्या नातेवाईकांची भेट घेवून शासनाच्या वतीने आवश्यक ती मदत देण्यात येईल  तसेच केंद्र शासनाकडे नुकसानग्रस्त पिकांच्या भरपाईसाठी निधी मागणीसाठी प्रस्ताव पाठण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली, कासेगांव येथील गावांना भेट देवून  नुकसानग्रस्त पिकांची तसेच पूरग्रस्त भागांची पाहणी  उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी केली. यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सरसकट पिकांचे पंचनामे करावेत, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.  पटवर्धन कुरोली येथे शेतकऱ्यांशी व नागरिकांशी संवाद साधून नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगितले. अतिवृष्टीमुळे तसेच भीमा नदीला पूर आल्यामुळे अनेक नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटलेल्या असतो, यासाठी आवश्यक तेथे पूल बांधणी करण्याबाबत कार्यवाही करण्यात  येईल. महापुरामुळे नदीकाठचे वीज रोहित्रे, वीजेचे पोल, पाण्यात वाहून गेल्यामुळे  नदी काठच्या गावांची  वीज खंडीत झाली आहे. महावितरण कंपनीने तात्काळ अधिकचे कर्मचारी उपलब्ध करुन वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशा सुचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

बोरखेडा हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात – गृहमंत्री अनिल देशमुख

0

जळगाव, (जि.मा.का.) दि.१७ – बोरखेडा, ता. रावेर येथील हत्याकांड माणुसकीला काळिमा फासणारे असून याची निंदा करतो. या हत्याकांडातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी व पीडितांना शीघ्र न्याय मिळण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल. यासाठी अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.

बोरखेडा, ता.रावेर येथे चार बालकांची निघृण हत्या झाली त्या ठिकाणास गृहमंत्री श्री.देशमुख यांनी आज दुपारी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली तसेच पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री सर्वश्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे, प्रांताधिकारी कैलास कडलग, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे आदी उपस्थित होते.

यावेळी गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले, या हत्याकांडाचा पोलीस योग्य दिशेने तपास करीत असून त्यांना सकारात्मक पुरावे मिळाले आहेत. काही संशियतांना ताब्यातही घेण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आवश्यक तो तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी दिले. त्याचबरोबर शासन नियमानुसार पीडितांना योग्य ती मदत देण्यात येईल तसेच त्यांना रेशनकार्ड, जातीचा दाखला, घरकुल व शेती करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याची सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.