Home Blog Page 2420

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 29 हजार 899

0

पुणे विभागातील 4 लाख 47 हजार 90 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 4 लाख 90 हजार 481 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे, 22 :- पुणे विभागातील 4 लाख 47 हजार 90 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 90 हजार 481 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 29 हजार 899 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 492 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.15 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 16 हजार 776 रुग्णांपैकी 2 लाख 92 हजार 540 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 16 हजार 785 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 451 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.35 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.35 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 136 रुग्णांपैकी 37 हजार 693 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 985 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 458 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 573 रुग्णांपैकी 33 हजार 424 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 777 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 372 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 427 रुग्णांपैकी 39 हजार 451 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 379 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 597 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 569 रुग्णांपैकी 43 हजार 982 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 973 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 614 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 713 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 20, सातारा जिल्ह्यात 271, सोलापूर जिल्ह्यात 140, सांगली जिल्ह्यात 191 तर कोल्हापूर जिल्ह्यात 91 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 2 हजार 615 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 717 ,सातारा जिल्हयामध्ये 288, सोलापूर जिल्हयामध्ये 296, सांगली जिल्हयामध्ये 244 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 70 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 22 लाख 54 हजार 986 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 90 हजार 481 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 21 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

जम्बो हॉस्पिटलमध्ये पोस्ट कोविड ओपीडी

0

पुणे : शिवाजीनगर  येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेल्या अद्ययावत जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांच्या आरोग्य तपासणीची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी स्वतंत्र बाह्य रूग्ण विभाग (पोस्ट कोविड ओपीडी) सज्ज करण्यात आला आहे.

कोरोनाबाधीतांना एकाच छताखाली अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज वैद्यकीय सेवा उपलब्ध केली जात आहे. गेल्या ४३ दिवसांमध्ये १२०० पेक्षा जास्त रूग्णांना उपचारासाठी शिवाजीनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यापैकी ६० टक्क्यांहून अधिक रूग्ण खडखडीत बरे होऊन घरी गेले आहेत. अत्यंत वयोवृद्ध, कोरोवाबरोबरच इतर आजार असलेल्या गुंतागुंतीच्या रूग्णांवर या जवळपास दीड महिन्यांमध्ये यशस्वी उपचार करण्यात येथील डॉक्टरांना यश आले आहे. काही रूग्णांनी पंधरा-पंधरा दिवस अतीदक्षता विभागात (आयसीयू) मृत्यूशी अक्षरश: झुंज दिली. मात्र अचूक निदान, योग्य उपचार आणि प्रभावी औषधांचे नियोजन या त्रिसूत्रीमुळे कोरोनामुक्त होऊन जम्बो हॉस्पिटलमधून बाहेर जाणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे, अशी माहिती हॉस्पिटलतर्फे देण्यात आली.

मात्र, सद्य:स्थितीत कोरोनामुक्त म्हणजे निर्धास्त, असे निश्चित म्हणता येत नाही. विशेषतः मधुमेही, उच्च रक्तदाब, हृदयविकाराच्या रुग्णांना कोरानामुक्त ‌झाल्यानंतरही धोका कायम असतो. कोरोनामुक्त झाल्यानंतरही सुमारे एक महिनाभर हृदयविकार होण्याचा धोका रहातो. त्यातून हृदयाची क्रिया अचानक बंद पडून रुग्णाचा मृत्यू होण्याची काही अंश शक्यता असते. तसेच, काही रुग्णांमध्ये अर्धांगवायूचा झटका आल्याचे दिसले आहे. तसेच, खूप दिवस फुफ्फुसांचे आजार सुरू राहिल्यांचेही निदान झाले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रूग्णांची नियमित आरोग्य तपासणी करण्याची मोठी गरज निर्माण झाली. ही गरज ओळखून जम्बो हॉस्पिटलमध्ये पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली, अशी माहिती हॉस्पिटलतर्फे देण्यात आली.

हॉस्पिटलमधून उपचार घेऊन बरे झालेले रूग्ण आणि येथील डॉक्टर यांच्यात विश्वासाचे नाते तयार झाले आहे. त्यामुळे बहुतांश रूग्ण हॉस्पिटलमधून घरी गेल्यानंतर फॉलोअपसाठी पोस्ट कोविड ओपीडीमध्ये येतात, असे निरीक्षण येथील डॉक्टरांनी नोंदविले. रूग्णांची ही आरोग्य तपासणी पूर्णत: मोफत होते. आवश्यकता असेल तर रूग्णांचा एक्स-रे काढला जातो. त्याच वेळी अत्यावश्यक तपासण्यांचा सल्लाही दिला जातो. त्यामुळे जम्बो हॉस्पिटल आणि रूग्ण, त्यांचे नातेवाइक यांच्यात आत्मीयता निर्माण होत असल्याचे दिसते.
……
कोरोनानंतरचा धोका
– हृदयाला झालेली इजा
– ही इजा भरून येण्यासाठी लागणारा वेळ
– हृदयाला आतून सूज येण्याची शक्यता
– रक्तवाहिन्या सूजतात.
– रक्ताच्या गाठी तयार होणे
– त्यातून हृदयविकाराचा झटक्याची शक्यता
– श्वसनाचे विकार असणाऱया धोका

अजित पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांती करणार..

0

मुंबई -राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्बेत बिघडल्याने त्यांनी होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांची तातडीने कोरोनाची चाचणीही करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. पण थोडी ताप थंडी सारखी लक्षणे असल्याने पवारांनी सार्वजनिक कार्यक्रमात न जाण्याचे ठरवले आहे. तसेच आजच्या नियोजित बैठकाही रद्द केल्या आहेत. कालही त्यांनी मंत्रालयातील सर्व बैठका रद्द केल्या होत्या. अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.असे असले तरी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी शरद पवार यांच्यासोबत वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकांना अजित पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.अजित पवार बुधवारी मंत्रालयात सुद्धा अनुपस्थितीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पॅकेज देण्यावर होणार मंत्रिमंडळाची कालची आणि आजची बैठक रद्द झाली आहे. आता शुक्रवारी ही बैठक होणार आहे. तर आजचा राष्ट्रवादी कार्यालयातील जनता दरबार ही पवारांनी रद्द केला आहे.

राष्ट्रवादी व काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेत्यांची घरवापसी शक्य

0

मुंबई- राष्ट्रवादी व काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेते ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या कारवाईच्या भीतीने अजूनही काठावर आहेत. या नेत्यांचा आत्मविश्वास खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे दुणावणार आहे. परिणामी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची पक्षात घरवापसी होऊ शकते.असा राजकीय समीक्षकांचा अंदाज आहे .

भाजपमध्ये बहुजन नेत्यांना ऐनवेळी बाजूला केले जाते, असे चित्र खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने झाले आहे. विधानसभेत ४० पेक्षा अधिक ओबीसी आमदार आहेत. आगामी काळात खडसे प्रकरणामुळे ओबीसी नेते भाजपकडे वळण्याची शक्यता कमी होईल.असाही दावा केला जातो आहे.

राज्य सरकारच्या परवानगी शिवाय सीबीआयला महाराष्ट्रात आता ‘नो एन्ट्री’

0

राज्यातील कोणत्याही प्रकरणात तपासासाठी सीबीआयला दिलेली सर्वसाधारण संमती महाराष्ट्र सरकारने आदेश जारी करून मागे घेतली आहे. आता सीबीआयला राज्यात तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तथापि, आधीपासून सुरू असलेल्या तपासावर या आदेशाचा परिणाम होणार नाही. भविष्यात सीबीआयला महाराष्ट्रात एखाद्या नव्या प्रकरणात तपासाची गरज भासली तर जोवर कोर्टाकडून तपासाचे आदेश दिले जाणार नाहीत तोवर सीबीआयला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल.

सुशांत मृत्यू प्रकरणात सीबीआय तपास करत असताना राज्य सरकारने हा नवा आदेश जारी केला. बिहार सरकारच्या शिफारशीनंतर सीबीआयची टीम मुंबईत सुशांत प्रकरणात तपासासाठी आली. सीबीआयकडे टीआरपी घोटाळ्याचाही तपास सोपवण्याची मागणी करण्यात येत आहे

यापूर्वी आंध्र प्रदेश व प. बंगाल सरकारने राज्यात छापेमारी व तपासासाठी सीबीआयला दिलेली संमती मागे घेतली हाेती. ममता बॅनर्जींनी सीबीआय आदी संस्था बरबाद करत असल्याचा आरोप केंद्रावर केला होता. आंध्रच्या तत्कालीन चंद्रबाबू नायडू सरकारने सीबीआयला तपासाची संमती मागे घेतली होती.  

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला घोटाळे बाहेर येण्याची भीती म्हणून घेतला ‘हा’ निर्णय, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

राज्यातील कोणत्याही प्रकरणात तपासासाठी सीबीआयला दिलेली सर्वसाधारण संमती महाराष्ट्र सरकारने आदेश जारी करून मागे घेतली आहे. आता सीबीआयला राज्यात तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील पक्षांवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला घोटाळे बाहेर येण्याची भीती असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

यावर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, ‘सीबीआयला महाराष्ट्रात एन्ट्री नाही, असे ठाकरे सरकारने म्हटले आहे. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी केलेल्या घोटाळ्याबाबतची माहिती सीबीआयच्या हातात गेली तर सर्व बाहेर येईल, अशी त्यांना भीती वाटते, असे म्हणत भाजपच्या किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे.

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले की, ‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी मिळून स्वत:च्या गुंडगिरीची काळजी घेता यावी यासाठी त्यांनी सीबीआयची सर्वसाधारण परवानगीचा निर्णय मागे घेतला आहे. असा टोलाही सोमय्यांनी लगावला. तसेच सोशल मीडियावर कुणीही विरोधात बोलले तर हे सरकार त्याच्या घरी जाऊन त्याला मारहाण करत असते. पत्रकारांनी आवाज उठवला तर त्यांना जेलमध्ये टाकण्यात येत आहे असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

आयुक्त साहेब ,आहे तेच 6299 टॅब प्रसंगी अद्यावत करून वापरावेत-अश्विनी कदम

0

पुणे,- मनपाच्या ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांकरिता नवीन खरेदी करण्याऐवजी आहे तेच 6299 टॅब अद्यावत करून वापरावेत अशी मागणी आज एका पत्राद्वारे स्थायी समिति च्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांनी आयुक्तांकडे केली आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मी स्टँडिंग कमिटी चेयरमन असताना पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडील ८ वी १० वी च्या विद्यार्थ्यांना इलर्निंग सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून अंदाज पत्रकात भरघोस तरतूद करून दिली होती. त्या निधी मधून मध्यवर्ती भांडार विभागामार्फत सन 2016 रोजी कार्यादेश क्रमांक 948 द्वारा 6299 टॅब माध्यमिक शिक्षण विभागाकडील ८ वी १० वी च्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेले आहेत. हे टॅब माध्यमिक विभागाकडील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. ह्या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांचे हस्ते करण्यात आला होता.
हे टॅब अँड्रॉइड बेस असून त्यामध्ये आवश्यक असणारे ऑडिओ-व्हिज्युअल कन्टेन्ट साहित्य विकत घेण्यात आलेले होते. त्यापोटी पुणे महानगरपालिकेने चार करोड 64 लाख 23 हजार 630 रुपये खर्च करण्यात आले.
सदरील टॅब हे माध्यमिक शिक्षण विभागातील शाळांमध्ये उपलब्ध असून तेच टॅब आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे ऑडिओ-व्हिज्युअल कन्टेन्ट, बालभारतीचे पुस्तके इत्यादी अद्यावत सिलेबस प्रमाणे सुसज्जित करून दिले तर विद्यार्थ्यांचा मोठा फायदा होईल व वेळ सुद्धा वाचेल याकरिता आवश्यक असणारे किरकोळ रिपेअर ऍण्ड मेन्टेनन्स त्याच कंपनी कडून करून घेतल्यास करोनाच्या काळामध्ये आधीच महानगरपालिकेची आर्थिक स्थिती खालावलेली असताना ही बचत झाल्यास आर्थिक फायदा नक्कीच होईल असे ही अश्विनी नितीन कदम यांनी म्हटले आहे.

खडसेंच्या जाण्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

0

औरंगाबाद -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. यादरम्यान औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंवर पलटवार केला. ‘फडणवीस यांच्यामुळेच मला पक्ष सोडावा लागत आहे,’ असा आरोप करून भाजपमधून बाहेर पडलेल्या एकनाथ खडसेंबाबत फडणवीस म्हणाले की, पक्ष सोडताना कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं. त्यांनी मला व्हिलन ठरवलं. योग्य वेळ आल्यावर बोलेल.

यावेळी फडणवीस म्हणाले की, नाथाभाऊंनी राजीनामा दिला हे दुर्देव आहे. त्यांनी राजीनामा दिला नसता तर चांगले झाले असते. माझ्याबद्दल त्यांना काही तक्रारी होत्या तर त्यांनी त्या वरिष्ठांना सांगायला हव्या होत्या. खडसे आता अर्धसत्य सांगत आहेत, मला त्यावर बोलायचे नाही. अशा परिस्थितीत कुणाला तरी व्हिलन ठरवायचे असते, त्यांनी मला ठरवले. पण, योग्य वेळ आल्यावर या सर्वांवर नक्की बोलेल, असे फडणवीस म्हणाले.

पक्षातील एखादा कार्यकर्ता असो किंवा मोठा नेता असो, पक्षातून गेल्यावर त्याची निश्चितच झळ पोहोचते. पण भाजप हा मोठा पक्ष आहे. कुणाच्या जाण्याने तो थांबत नाही. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. जनता भाजपसोबतच आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. पुढे खडसेंच्या रुपाने पक्षांतराची सुरुवात झाली आहे का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, एकही आमदार भाजपमधून जाणार नाही. सर्व आमदार भाजपसोबतच आहेत.

जम्बो’मध्ये ९१ वर्षीय आजोबांनी जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई !

0

पुणे : विविध प्रकारचे रुग्ण जम्बो कोविड सेंटरमधून बरे होऊन घरी परतत आहेत. नुकतेच एका ९१ वर्षीय व्यक्तीने कोरोनाच्या संसर्गावर मात करीत या विषाणूवर विजय मिळविला. नारायण रामचंद्र शेलार असे या करोना योद्ध्याचे नाव आहे. 


श्री. शेलार यांनी तब्बल २५ दिवस जम्बो कोविड सेंटरमध्ये करोनाविरुद्ध झुंज दिली. त्यांना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे खोकला व श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने दम लागत होता. त्यामुळे त्यांना जम्बो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांनी कोरोनावर विजय मिळवलाच आणि आज बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. हे आजोबा व्यवस्थित बरे होऊन घरी जात असल्याबद्दल त्यांच्या सर्व कुटुंबीयांसह जम्बो सेंटरमधील करोना योद्ध्यांनीही आनंद व्यक्त केला.
यापूर्वी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या यवतच्या संगीता पांढरे या गंभीर अवस्थेतील ५५ वर्षीय करोनाबाधित महिला पेशंटने तब्बल ३१ दिवस करोनाविरुद्ध लढा देत कोरोनावर विजय मिळवला होता. आठ दिवस व्हेंटिलेटरवर असूनही इच्छाशक्ती व येथील सर्व कोरोना योद्धे यांच्या प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी करोनावर मात केली. 
‘जम्बो’मध्ये चांगली आरोग्य यंत्रणा असून, नाश्ता, जेवण, औषधे वेळेवर देण्यात येत होते. डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी व विचारपूस करण्यात येत होती. तसेच, कुटुंबीयांशी नियमित संपर्क साधता येत होता, असे सांगून श्री. शेलार यांनी जम्बोतील सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी जम्बो कोविड सेंटरमधील सर्व करोना योद्धे आणि प्रशासनाला मनोमन धन्यवाद दिले. 
महपौर मुरलीधर मोहोळ व मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी जम्बोमधील आरोग्य सेवकांची प्रशंसा केली. “सर्व प्रकारच्या रुग्णांची जम्बोमध्ये अत्यंत काळजीपूर्वक देखभाल केली जाते. प्रत्येक रुग्ण येथून ठणठणीत बरा होऊन घरी जावा यासाठी करोना योद्धे प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळून ते बरे होत आहेत हे दिलासादायक चित्र आहे,” असे जम्बो कोविड सेंटरच्या कार्यकारी अध्यक्ष व अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

शेतकरी हक्कासाठी कॉंग्रेसचे नेते शेतकऱ्याच्या दारी ..घ्याया स्वाक्षरी …

0

पुणे- हुकुमशाही केंद्र सरकार विरूध्द एल्गार म्हणून शेतकरी बचाओ आंदोलन सुरु केलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नेते कार्यकर्ते पुण्यात शेतकऱ्याच्या व्यवसाय स्थळी ,किंवा शेतावर जाऊन शेतकरी विधेयकाला विरोध म्हणून स्वाक्षरी घ्यायची मोहीम राबवत आहेत . सुमारे 2 कोटीहून अधिक स्वाक्षऱ्या गोळा करण्याचा निर्धार या मोहिमेंतर्गत करण्यात आला आहे.
आज मार्केटयार्ड येथे शहर काँग्रेस तर्फे हि मोहीम राबवण्यात आली याप्रसंगी आबा बागुल(गटनेते पुणे मनपा),अभय छाजेड,कमलव्यवहारे आणि पर्वती काँग्रेस चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

माझा जाणूनबुजून निवडणुकीत पराभव करण्यात आला, मी सुद्धा भाजपचा राजीनामा देत आहे- रोहिणी खडसे

0

मुंबई -भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली. खडसे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या या घोषणेनंतर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीदेखील भाजप सोडून राष्ट्रवादीत जाण्याची घोषणा केली आहे.

रोहिणी खडसे म्हणाल्या की, ‘ज्या व्यक्तीने 40 वर्ष पक्षनिष्ठेने काम केले त्यांना हा निर्णय घेताना दुःख होणे स्वाभाविक आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नाथाभाऊंनी उत्तर महाराष्ट्रात पक्ष उभा केला, पण त्यांना सतत दुय्यम वागणूक देण्यात आली. मला विधानसभा निवडणुकीत तिकीट दिल्यानंतरदेखील निवडणूकीत पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला गेला. याची तक्रार पुराव्यासह करुनदेखील भाजप पक्षश्रेष्ठींनी कोणतीही दखल घेतली नव्हती. मी देखील सक्रिय राजकारणात असून आता भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.

रक्षा खडसे भाजपमध्येच राहतील

‘मी भारतीय जनता पक्षातच राहणार आहे. भाजपला सोडणार नाही. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. मला पक्षात कुठलाही त्रास नाही,’ अशी माहिती भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांनी वृत्त वाहिनीशी बोलताना दिली. दरम्यान, रक्षा खडसे यांच्या मदतीसाठी रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारीही पक्षातील राहातील आणि लोकसभेची मुदत संपल्यानंतर त्यांचेही पक्षांतर होईल, असे सांगण्यात येत आहे.

दीपक मारटकर खून प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्काची कारवाई-पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

0

पुणे- पुण्यातील कसबा युवा सेनेचे विभाग प्रमुख दीपक मारटकर यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या कारवाईचे आदेश काढले.

दीपक मारटकर हे युवा सेनेचे पदाधिकारी होते. दोन ऑक्टोबर च्या रात्री कोयत्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

पोलिसांनी या प्रकरणी दहा आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे बापू नायर आणि स्वप्निल उर्फ सचिन चॉकलेट मोडवे या गुन्हेगारी टीमचे सदस्य असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.

अश्विनी सोपान कांबळे ( वय 25, बुधवार पेठ), महेंद्र मदनलाल सराफ (वय 57), निरंजन सागर महंकाळे (वय 19) ,सनी कोलते, राहुल रागिर, रोहित क्षीरसागर, रोहित कांबळे, संदीप उर्फ मुंगळ्या प्रकाश कोलते (वय 23) चंद्रशेखर वाघेल आणि लखन मनोहर ढावरे (वय 30) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू नायर याच्या सांगण्यावरून तसेच बुधवार पेठेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आरोपींना आर्थिक मदत पुरवून हा गुन्हा केला असल्याचे तपासात दिसून आले आहे. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी त्यांच्यावर मोक्कानुसार कारवाई करावी असा प्रस्ताव पाठविला होता.

यानुसार डॉ. संजय शिंदे यांनी त्याबाबत कागदपत्रे तपासली असता त्यात बापू नायर टोळीशी निगडित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपींवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या गुन्हेगारी टीमवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची सूचना दिली आहे.

‘मी गोपीनाथ मुंडेंच्या अपघाताच्या चौकशीची मागणी केल्यामुळे मला पक्ष सोडायला लावला, आता खडसेंवरही तीच वेळ आणली’-प्रकाश शेंडगे

0

पुणे-भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज भाजपला सोडचिठ्ठी दिली. यानंतर आता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावरुन माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ‘मी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी केली होती, म्हणून मला पक्ष सोडण्यास भाग पाडले. आता एकनाथ खडसेंवरही तीच वेळ आणली, असा गंभीर आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.

प्रकाश शेंडगे पुढे म्हणाले की, ‘मी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केले. मुंडेंसोबत ओबीसी समाजाचे अनेक नेते होते, एकनाथ खडसेसुद्धा त्यापैकीच एक आहेत. गोपीनाथ मुंडेंचा जेव्हा अपघात झाला, तेव्हा त्यांच्या मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी मी केली होती. माझ्या या मागणीमुळेच मला पक्ष सोडावा लागला. माझे तिकीटही कापण्यात आले. आता तीच वेळ एकनाथ खडसेंवर आली आहे,’ असे प्रकाश शेंडगे म्हणाले.

खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले -प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रीया

0

मुंबई -ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री.पाटील एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
श्री .पाटील म्हणाले की, खडसे यांचा राजीनामा माझ्याकडे आला आहे. खडसे यांनी पक्षात राहावे अशीच आम्हा सर्वांची भूमिका होती. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. कितीही रागावले तरी ते पक्ष सोडतील असे वाटत होते. त्यांच्या नाराजीच्या मुद्द्यांवर काही ना काही मार्ग निघेल असे वाटत होते. आज सकाळीही मी त्यांच्याशी संपर्क साधला होता. पण आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. ते ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी चांगले काम करावे यासाठी त्यांना शुभेच्छा.
खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्याबाबत मी काही बोलणार नाही,असेही श्री.पाटील यांनी यावेळी नमूद केले.

’40 वर्षांपासून भाजपचे काम पाहत आलो, पण…फडणविसांनी त्रास दिला …’ एकनाथ खडसे भावुक

0

मुंबई-भाजपच्या अगदी सुरुवातीपासून पक्षात असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर आज भाजपातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. पक्षातून बाहेर पडत असल्याची घोषणा करताना एकनाथ खडसे यांचा गळा भरून आला होता. यावेळी खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्षा सोडत असल्याचा आरोप केला.

मुक्ताईनगरमध्ये बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, ‘माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांनी सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्रभर गोंधळ घातला, त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे, पोलिस याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते’, असा आरोप खडसे यांनी केला.

खडसे पुढे म्हणाले की, ‘मी 40 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे काम पाहत आलो. जेव्हा भाजप खेड्यापाड्यात पोहोचली नव्हती. तेव्हापासून गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासह अनेक नेत्यांसोबत काम केले. आतापर्यंत पक्षात काम करत असताना मला अनेक पदे मिळाली हे मी नाकारत नाही. मी कुठल्याही नेत्यावर टीका केली नाही. पण, मी जेव्हा मुख्यमंत्रिपदाचा दावा केला, त्यानंतर माझ्यावर अनेक आरोप झाले. अनेक वेळा चौकश्या झाल्या. इतक्या दिवसांपासून खूप अत्याचार सहन केले. माझ्या चौकशीची मागणी कुणीही केली नाही. विधिमंडळातील रेकॉर्ड काढावे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कोणताही पक्षा असेल त्यांनी राजीनामा आणि चौकशीची मागणी केली नव्हती. पण भाजपने माझ्या राजीनाम्याची मागणी केली आणि राजीनामा घेतला,’ असेही खडसे म्हणाले.

खडसेंच्या पत्रकार परिषदेतील 15 महत्वाचे मुद्दे -
1) कोणीही माझ्या राजीनाम्याची, चौकशीची मागणी केली नसताना राजीनामा घेतला गेला. सभागृहात कोणी असं सिद्ध केलं तर मी राजकारण सोडण्यास तयार आहे.
2) मी देखील पक्षासाठी उभं आयुष्य घालवलं. दगड धोंडे खाल्ले, लोकांनी मारलं, थुंकलं, वाळीत टाकलं अशा कालखंडातही आम्ही काम केलं. पक्षानं कमी दिलं असं नाही. परंतु मी देखील पक्षासाठी 40 वर्षे काम केलं. आजही माझी कोणाविरोधातही तक्रार नाही. माझी तक्रार वारंवार बोलून दाखवली आहे.
3) देवेंद्र यांनी ज्याप्रकारे विनयभंगाचा खटला दाखल केला, भूखंड प्रकरणी चौकशी लावली त्या सर्वांमधून मी सुटलो. परंतु मला मनस्ताप किती झाला. विनयभंगाचा खटला दाखल करणं, कोर्टात ते चालणं यापेक्षा मरण परवडलं. मी जेव्हा खटला दाखल करण्यासंबंधी देवेंद्रजींना विचारलं तेव्हा ते म्हणाले, ती महिला खूप गोंधळ घालत होती, टीव्हीवर दाखवलं जात होतं. म्हणून नाईलाजानं सांगितलं. नियमानुसार काम करा असं सांगता आलं असतं. मला बदनामी सहन करावी लागली. इतक्या खालच्या पातळीला जाऊन राजकारण झालं.
4) यानंतरही मी 4 वर्षे काढली. 9 महिने माझ्यावर आणि कथित पीएवर पाळत ठेवल्याचं मान्य केलं होतं. काय मिळालं काय नाही याचं दु:ख नाही. परंतु मनस्ताप झाला याचं दु:ख आहे.
5) आयुष्यात अनेक पदं ताकदीनं मिळवली आहेत. म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. मी निर्णय स्वयंस्फूर्तीं घेतला आहे. जनतेची ताकद माझ्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातील जनेतनं मला मोठा प्रतिसाद दिला आहे आणि आजही देत आहेत.
6) राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना किंवा काँग्रेसने कधीही माझ्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती. तुम्ही एक प्रसंग दाखवून द्या.
7) मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे. एका प्रकारे विनयभंगाचा खटला दाखल करणं तोही बनावट यापेक्षा वाईट काय. त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फोन करणं त्यापेक्षा वाईट.
8) भ्रष्टाचाराचा आरोप वगैरे ठिके पंरतु विनयभंगाचा आरोप किती वाईट. मी सुटलो त्यातून नाही तर 3 महिने जेलमध्ये जावं लागलं असतं. बदनामी घेऊन  गेलो असतो.
9) पदावर आहेत त्यांचं भाजपसाठी काय योगदान आहे अशी विचारणा करणार आहे. पक्षात घेतलेल्यांना मंत्रीपदं दिली. आम्ही 40 वर्षे घालवली परंतु पदासाठी लाचार नव्हतो. फडणवीसांनी आरोप करण्याआधी कोणीही आरोप केलेला असेल तर सांगा. माणसाला उध्वस्त करण्याचं काम यांनी केलं. त्यामुळंच पक्षत्याग करावा लागला.
10) फक्त फडणवीसांमुळंच आपण पक्ष सोडत आहोत.
11) मी आधीही विचारलं होतं आणि आजही माझा काय गुन्हा आहे ते पक्षानं स्पष्ट करावं.
12) मी लाचार नाही. कोणाचीही भीती बाळगणारा नाही. कोणाचे पाय चाटत बसणाऱ्यातला तर अजिबात नाही.
13) आपल्यासोबत एकही आमदार ,खासदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार नाही. रक्षाताईंनी काय निर्णय घ्यावा हे त्यांनी ठरवावं. परंतु त्यांनी मला भाजप सोडणार नसल्याचं सांगितलं आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत.
14) भाजप सोडण्याच्या वेदना आहे. परंतु इतक्या खालचं राजकारण करणाऱ्यांसोबत काम करणं कठिण आहे. उद्या बलात्काराचा आरोप करतील.
15) राष्ट्रवादीकडून आपल्याला कोणतंही आश्वासन मिळालेलं नाही.

एकनाथ खडसे 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

0

मुंबई-गेल्या अनेक दिवसांपासून कथित मुहूर्ताच्या प्रतीक्षेत असलेले एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त अखेर लागला. त्यांनी फोन करून आज भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसने ते आपल्या पक्षात येत असल्याची घोषणा केली. एकनाथ खडसे 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले.

एकनाथ खडसे यांनी आज फोन करून भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत असेही जयंत पाटील म्हणाले. आता फक्त त्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत त्यांनाही काही दिवसांत प्रवेश दिला जाईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

खडसेंचे महाविकास आघाडीत स्वागत -उद्धव ठाकरे

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उस्मानाबाद दौऱ्यावर असताना त्यांना एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली. त्यावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना, एकनाथ खडसे यांचे महाविकास आघाडीमध्ये स्वागत आहे असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. खडसेंना महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणते पद मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. तरीही त्यांना कृषीमंत्री पद दिले जाणार अशी चर्चा आहे.

एकनाथ खडसे भाजपवर नाराज

भारतीय जनता पक्षाकडून गेल्या साडेचार वर्षांपासून डावलले जात असल्यामुळे एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. विशेषत: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा विशेष राग आहे. पक्षातील केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांना भेटूनही उपयोग झाला नाही, याची त्यांना खंत आहे. विधानसभा, विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने आणि पक्षाच्या संघटनात्मक रचनेतही डावलले गेल्याने त्यांनी आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या नेत्यांशी चर्चा केल्यामुळे या पक्षांतराच्या वृत्ताला पुष्टी मिळाली होती.

रक्षा खडसे भाजपतच राहतील; रोहिणी यांचाही प्रवेश शक्य

भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे मात्र भाजप सोडणार नाहीत. त्यांच्या मदतीसाठी रावेर लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारीही पक्षातील राहातील, असे ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येते. लोकसभेची मुदत संपल्यानंतर त्यांचेही पक्षांतर हाेईल, असे सांगण्यात येते आहे.