Home Blog Page 2418

खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधितांना रेमडेसिविर मिळणार २३६० रुपयांना

0

मुंबई, दि. २३ : खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन वाजवी किंमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले आहे. २३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसीविर इंजेक्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी संबंधितांना पत्राद्वारे केले आहे.

राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये हे औषध मोफत उपलब्ध आहे. परंतु खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठ्या प्रमाणावर येत असून त्याची दखल घेऊन शासनाने हा निर्णय घेतला. त्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना निश्चित केलेल्या दरात रेमडेसीविर उपलब्ध होण्याकरीता अन्न व औषध प्रशासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यातील खाजगी औषधी केंद्रे निश्चित केली आहेत.

राज्यामध्ये ५९ औषध केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अमरावती विभागात ५, कोकण विभागात १०, नागपूर विभागात ६, औरंगाबाद विभागात ११, नाशिक विभागात ९, बृहन्मुंबई विभागात ५ आणि पुणे विभागात १३ औषध विक्रेते निश्चित करण्यात आले आहेत.

इंजेक्शनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णालयाने त्याबाबत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. त्यासोबत प्रिस्क्रिप्शन, रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, आधार कार्ड किंवा छायाचित्र असलेले परवाना अथवा प्रमाणपत्र तसेच रुग्णाची वैद्यकीय माहिती कळविणे आवश्यक आहे.

खाजगी वाहनांचा महापूर रोखण्यासाठी पीएमपी कात टाकणार … (व्हिडीओ)

0

पुणे- वाढती खाजगी वाहने ,आणि उग्र होत चाललेली वाहतूक समस्येचा महापूर रोखण्याच्या उद्देशाने पीएमपीएमएल ची बस सेवा आता कात टाकू पाहते आहे. गरीबातल्या गरिबा पासून ते अलिशान मोटारी वापरणाऱ्यांना देखील आकर्षित करेल अशी अद्यावत बस सेवा देण्याच्या प्रयत्नांना आता सुरुवात झाली आहे असे वाटावे अशी सुरुवात आता होते आहे .याच पार्श्वभूमीवर आज कॉंग्रेसचे नगरसेवक आणि माजी गटनेते अरविंद शिंदे यांनी आपल्या प्रभागात पहिल्या पाच स्मार्ट बस स्थानकांचे उद्घाटन कॉंग्रेसचे नेते माजी आमदार मोहन जोशी ,पीएमपीएमएल चे मुख्य कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप ,नगरसेवक अजित दरेकर, मेहबूब नदाफ यांच्या प्रमुख  उपस्थितीत केले.

महिला सुरक्षा , रुगणालये, पोलीस ,सार्वजनिक सुविधांची माहिती या सर्व बाबींची दक्षता घेऊन हि बस स्थानके उभारण्यात आली आहेत . आगामी काळात मेट्रो आणि खाजगी वाहनांच्या स्पर्धेला सामोरे जाऊन पीएमपीएमएल ची बस सेवा उभारण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर या उद्घाटन समयी केलेला हा छोटासा व्हिडीओ रिपोर्ट …पहा यावेळी कोण काय म्हणाले …

महापारेषण’मध्ये होणार 8500 पदांवर भरती

0

मुंबई–  ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी धम्मचक्र प्रवर्तनाच्या पावन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तरुणांना नोकरीच्या संधीच्या रूपात एक आगळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत  जवळपास  8500  तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी आज दिले. त्यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग आता मोकळा झाल्याने हजारों तरुणांच्या नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.    राज्यात वीज पारेषण कंपनीत तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे.तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत असल्याने बेकारीचे संकट झेलणाऱ्या हजारो तरुणांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत.     मंत्री डॉ राऊत यांच्या सुचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी हा पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. आज मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पद भरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.  नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आय.टी. आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी या भरतीत निर्माण होणार आहेत.
  यासोबतच बक्षी समितीच्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व राज्य शासनास नवा मंजूर पदाचा आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सन 2005 साली महावितरण, महापारेषण,  महानिर्मिती व सूत्राधारी कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची सांख्य वाढत गेल्यानंतरही अपेक्षित भरती करण्यात आली नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढल्याने ताण निर्माण झाला आहे. आता लवकरच पदभरती होत असल्याने कोरोना काळात राज्यात सरकारी नोकरीची संधी हजारो तरुणास उपलब्ध होणार आहे.
यंत्रचालक,तंत्रज्ञ संवर्ग एकत्रीकरण
यंत्रचालक व तंत्रज्ञ संवर्गाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णयही डॉ. राऊत यांनी घेतला आहे.  यामुळे कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे. बदलत्या गरजेनुसार नवीन कौशल्य निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनेक वर्षे पदे रिक्त असल्याने पदोन्नतीमध्ये निर्माण झालेली कुंठित अवस्था या मेगा भरतीमुळे संपुष्टात येणार असल्याने महापारेषण कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

0


पुणे- राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले असताना केवळ दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

शेतकऱ्यांची घोर निराशा केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचा भाजपा निषेध करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी स्वतः मागणी केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करून शब्द पाळावा, अशी पक्षाची मागणी असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये मदत जाहीर केली आहे. याचा अर्थ ही मदत प्रति एकर केवळ चार हजार रुपये आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक हातचे गेले आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतीने शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नाहीच. पण आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची सरकारने घोर निराशा केली आहे.

ते म्हणाले की, भाजपा महायुतीचे सरकार असताना सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूर किंवा अशा आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या तिप्पट मदत दिली होती.

त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी यंदाप्रमाणेच अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असताना काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मर्यादित अधिकार असतानाही दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे पॅकेज त्रोटक असल्याचे सांगितले होते व हेक्टरी पंचवीस हजार ते पन्नास हजार रुपये मदतीची मागणी केली होती. त्यानंतर ते स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्या वेळच्या नुकसानीबद्दलचे आपले आश्वासन अद्याप पाळले नाही. उलट यंदा पुन्हा अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर त्यावेळी जे त्यांना त्रोटक वाटले होते तेवढेच दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.

ते म्हणाले की, राज्यातील शेतकरी संकटात असताना महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन मदत करायला हवी. त्यासाठी कर्ज काढावे. हे सरकार सतत केंद्र सरकारकडे बोट दाखवून शेतकऱ्यांना मदत करण्याच्या जबाबदारीतून पळ काढत आहे. महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांना मदत करायची नसल्याने ते सतत सबबी सांगत असतात.

शहरातील CCTV यंत्रणेचे सर्वेक्षण व्हावे : आमदार सिद्धार्थ शिरोळे

0

पुणे-कायदा सुव्यवस्था राखणे आणि तपास कामात अधिक प्रभावी ठरण्यासाठी शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेचे सर्वेक्षण केले जावे, अशी मागणी पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटी सीईओ यांच्याकडे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्राद्वारे केली आहे.

शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता झाले, त्यांच्या तपासासाठी मॉडेल कॉलनी आणि परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले पण त्याचा उपयोग होऊ शकला नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयाचा अभाव दिसून येतो.. या प्रकरणातून धडा घ्यावा आणि पुणे महापालिकेने बसविलेले सीसीटीव्ही किती? पोलीस खात्याने बसविलेले सीसीटीव्ही किती? कोणत्या खाजगी संस्थांना या यंत्रणांचे काम दिले आहे? या यंत्रणा व्यवस्थित कार्यन्वित आहेत की नाही? सीसीटीव्ही गरजेप्रमाणे बसविण्यात आले आहेत का? या सगळ्याचे सर्वेक्षण व्हावे असे आमदार शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.

शहरातील कायदा, सुव्यवस्था स्थिती चांगली रहावी. रस्त्यात चालणारी गुन्हेगारी, चोऱ्या-माऱ्या, विनयभंग आदी प्रकार उघड व्हावेत. त्यांना आळा बसावा अशा हेतूने ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले. परंतु, त्याचा उपयोगच होणार नसेल तर या यंत्रणेचा उपयोग काय? असा प्रश्न मनात येतो याकरिता सर्वेक्षण होणे गरजेचे आहे आणि त्यानुसार आवश्यक त्या सुधारणा केल्या जाव्यात, असे आमदार शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.

अतिवृष्टी-पूरग्रस्तांसाठी, पायाभूत सुविधांच्या पुनर्उभारणीसाठी १० हजार कोटींच्या मदतीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

0
  • राज्याचा हक्काचा ३८ हजार कोटी रुपयांचा निधी केंद्राकडे प्रलंबित.
  • संकटकाळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभे- मुख्यमंत्र्यांची ग्वाही
  • दिवाळीपूर्वी मदत पोहोचविण्याचे प्रशासनाला निर्देश

मुंबई, दि. २३ : राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या पुनर्उभारणीसाठी १० हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

आज मुख्यमंत्र्यांनी आपद्ग्रस्त भागात झालेल्या नुकसानी संदर्भात आढावा बैठक घेतली. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील,  मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, मुख्य सचिव  संजय कुमार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

शेती आणि फळपिकासाठी केंद्राच्या निकषापेक्षा अधिक मदत

या बैठकीनंतर माध्यमप्रतिनिधींशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, नुकसानग्रस्त शेती आणि फळपिकासाठी राज्य  शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा पुढे जाऊन मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना  जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये याप्रमाणे २ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल.

फळपिकासाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत

फळपिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल.  मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी आणि घर पडझडीसाठीही निकषाप्रमाणे मदत देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पायाभूत सुविधांच्या पुनर्उभारणीसाठी विभागांना निधी

अतिवृष्टीमुळे राज्यात शेतपिकांप्रमाणेच पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाला या सुविधांच्या पुनर्उभारणीसाठी निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे ते म्हणाले. या १० हजार कोटी रुपयांमध्ये कृषी क्षेत्रासाठी ५५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यानंतर रस्ते आणि पुल यासाठी २६६५ कोटी, नगरविकास विभागासाठी ३०० कोटी, महावितरण आणि उर्जा विभागासाठी २३९ कोटी, जलसंपदा विभागास १०२ कोटी, ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा विभागास १ हजार कोटी, रुपयांचा‍ निधी देण्यात येईल. अतिवृष्टीने रस्ते, पुल, वीजेच्या पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा योजना, घरे, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत इमारती आणि शेतजमिनीचे जे नुकसान झाले त्याची कामे या निधीतून केली जातील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवा

माझ्यासह सर्व विभागाच्या मंत्री महोदयांनी राज्यभर फिरून आपत्तीचा आढावा घेतला असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, संकट मोठे आहे, या संकटात राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. सण समारंभापूर्वी ही मदत शेतकरी आणि नुकसानग्रस्त बांधवांच्या हातात पोहोचेल असा शब्द दिला होता. तो  पाळणार असून दिवाळीच्या आधी सर्व नुकसानग्रस्तांना ही मदत पोहोचवावी असे निर्देश आपण प्रशासनाला दिले आहेत.

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांचा निधी केंद्राकडे प्रलंबित

हे सरकार आल्यानंतर आतापर्यंत कर्जमुक्तीसह ३० हजार ८०० कोटी रुपयांची मदत विविध कारणांसाठी केली गेली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना १०६५.५८ कोटी रुपयांची मदत देण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. पण अद्यापही केंद्र शासनाने राज्याला कोणतीच मदत दिलेली नाही. असे असले तरी राज्य शासनाने निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना संपूर्ण मदत केली आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

पूर्व विदर्भातील आपत्तीग्रस्तांच्या मदतीचा निधीही केंद्राकडे प्रलंबित

पूर्व विदर्भात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या भरपाईचा ८००.८८ कोटी रुपयांचा प्रस्तावही केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे. त्यासंदर्भातही केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही मदत प्राप्त झालेली नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जीएसटी आणि केंद्रीय कराचे ३८ हजार कोटी रुपयेही केंद्राकडून राज्याला मिळणे बाकी

वस्तू आणि सेवा कराची थकबाकी, केंद्रीय करातील राज्याचा हिस्सा यापोटी राज्याचे हक्काचे ३८ हजार कोटी रुपये केंद्र शासनाकडे प्रलंबित आहेत. राज्याचा हा हक्काचा निधी देण्याबाबतही केंद्र सरकारला पत्रे आणि स्मरणपत्रे पाठवण्यात आली तरी केंद्र शासनाकडून राज्याला हा निधी मिळालेला नाही. कोरोना, नैसर्गिक आपत्तीत राज्यशासनाने स्वत: मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन खर्च केला. लॉकडाऊनच्या काळात राज्याच्या उत्पन्नात घट होऊन आर्थिक तणाव निर्माण झाला. याही परिस्थितीत राज्याने पूर, गारपीटग्रस्त शेतकरी, चक्रीवादळ आणि कोरोना यासारख्या संकटाचा सामना करत नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना मदत केली आहे.

कोरोना सुरक्षा साधनासाठीचा केंद्राचा निधी बंद

आपण अनलॉक प्रक्रिया सुरु करतांना स्वयंशिस्त पाळत कोरोनासोबत जगा असे नागरिकांना सांगत आहोत. अशा परिस्थितीत आतापर्यंत एन ९५ मास्क आणि पीपीई कीट मिळणारा केंद्राचा निधी देण्याचेही केंद्र शासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाही ३०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार शासनावर पडणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रधानमंत्री यांनी आपल्याशी दूरध्वनीहून चर्चा करून आपद्ग्रस्तांना केंद्र शासनाकडूनही मदत केली जाईल असे सांगितले. आपल्यालाही यात कोणतेही राजकारण आणायचे नाही हे स्पष्‍ट करून मुख्यमंत्री म्हणाले की कठीण परिस्थितीतही राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिक यांच्यापाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने त्यांचे पाहणी पथक पाठवून झालेल्या नुकसानीचा आढावा घ्यावा यासाठी आधीच तीन पत्रे पाठविण्यात आली आहेत. ही पथके पाठवून लवकरात लवकर आढावा घ्यावा व राज्यातील नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना केंद्राने मदत करावी अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.

फाईव्ह स्टार, थ्री स्टार हॉटेलात वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांना कर आकारण्यास प्रशासनाचा नकार – आबा बागुलांची सूचना नाकारली

0

पुणे – महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाई ला आल्याचे दाखवून पालिकेच्या मालमत्ता विक्रीला काढण्या ऐवजी पुणे शहरात टुरिझम टॅक्स च्या धर्तीवर बाहेरून येऊन फाईव्ह स्टार, थ्री स्टार हॉटेलात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांवर कर आकारणी करून उत्पन्न वाढीचा विचार करावा अशा पद्धतीच्या कॉंग्रेसच्या गटनेते आबा बागुल यांच्या प्रस्तावाला प्रशासनाने लाल दिवा दाखवून नकारघंटानाद केला आहे. विशेष म्हणजे नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने असा कर लाऊ नये असा कळवळा यामागे कारण म्हणून नमूद करण्यात आला आहे. यावर बागुल यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रस्तावाचा विचार करावा या साठी फेरविचार प्रस्ताव दिला आहे.

या प्रस्तावात बागुल यांनी म्हटले आहे की,’महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी मनपाच्या मालकीच्या सदनिका विक्री करणे, अॅमिनिटी स्पेसेस विक्री करणेबाबत आपण निर्णय घेत आहोत. पुणे महाापालिकेचे उत्पन्न कायमस्वरूपी वाढविणेसाठी आम्ही वेळोवेळी शाश्वत पर्याय सुचवित असतो. यामध्ये .स्थायी समितीपुढे टुरिझम टॅक्स व मिळकत करामध्ये वार्षिक करपात्र रक्कमेवर ५ टक्के आरोग्य सेवा कराची आकारणी करणेबाबत लावणेबाबत ठराव होता. पुणे महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविणे म्हणजे मनपाची संपत्ती विक्री करणे नाही तर शहरात देण्यात येणा-या सुविधांवर योग्य कर घेणे, ही आयुक्तांची जबाबदारी आहे.
पुणे शहरात अन्य शहरातून, राज्यातून, देशातून नागरिक येत असतात. हे नागरिक शहरात आल्यानंतर शहरातील पाणी, उदयान, ड्रेनेज, रस्ते, विदयुत अशा सेवांचा उपभोग घेतात, शहरात प्रदूषण करतात. या सुविधा महानगरपालिकेकडून पुरविण्यात येतात.  महाराष्ट्र महापालिका अधिनियम १२७ (२) मध्ये उपभोग, उपयोग याबाबत कर आकारणी करणेची स्पष्ट तरतूद केलेली आहे. देशातील अन्य महापालिकांमध्ये व परदेशामध्ये अशा प्रकारे शहरात येणा-या टुरिस्टवर कर आकारणी केलेली आहे. पुणे शहरात अन्य देशातून, राज्यातून विविध कामानिमित्त येणारे नागरिक 5 स्टार, थ्री स्टार, टू स्टार अशा हॉटेलमध्ये वास्तव्य करतात, त्यांना रू.५०० /- र.रू.३००/- र.रू.२००/- अशा पध्दतीने टुरिझम कर आकारणी केल्यास मनपाच्या उत्पन्नामध्ये अंदाजे १०० कोटी इतकी कायमस्वरूपी वाढ होईल. टुरिझम टॅक्स या शब्दामुळे कर आकारता येत नसेल तर योग्य शब्द आपण ठरवून कर आकारणी करावी. आम्ही स्थायी समितीपुढे ठराव देण्याचा उददेश मनपाने दिलेल्या सुविधांवर कर आकारणी करून मनपाचे उत्पन्न वाढविणे, परंतू खेदाने नमूद करावेसे वाटते की, प्रशासनाने सदर विषय सकारात्मक घेणे गरजेचे असताना अभिप्रायामध्ये नागरिकांचे विविध कारणाने उत्पन्न कमी झाले आहे, रोजगार नाही अशा बाबी दिलेल्या आहेत.
तसेच पुणे शहरातील नागरिकांना आरोग्याची सुविधा देणे स्थानिक स्वराज्य संस्थेस कायदयाने बंधन असून याकामी पुणे मनपाने रूग्णालये उभारली आहेत. कोरोनाने पुण्यामध्ये शिरकाव केल्यावर पुणेकरांवर आरोग्य विषयक खर्च करणेसाठी मनपाने कोटयावधी रूपये खर्च केले आहेत. आरोग्य विषयक सुविधा देणे हे काम कायमस्वरूपी चालू राहणार आहे. वर्ल्ड हेल्थ ऑगनायझेशनने सांगितल्यानुसार  भविष्यात अनेक गंभीर आजार येतील असा अंदाज आहे. अशा वेळी देखील मनपास आरोग्य विषयक कोटयावधी रूपयांचा खर्च करावा लागणार आहे. मनपाचे एकमेव मुख्य उत्पन्न स्त्रोत मिळकत कर आहे. सदयस्थितीत होणारा खर्च व उत्पन्न यांचा अंदाज पाहता महानगरपालिकेस शाश्वत उत्पन्नाचे मार्ग शोधणे अत्यावश्यक आहे. आम्ही दिलेल्या ठरावाच्या अभिप्रायामध्ये राज्य शासनास कराबाबत अधिकार आहे असे आपण नमूद केलेले आहे.तरी सदर विषयी आम्ही पुन्हा.स्थायी समितीपुढे उपरोक्त नमूद दोन्ही ठरावांचे फेरविचार दिलेले आहेत. सदर विषयी  फेरअभिप्राय सकारात्मक पध्दतीने ठेवून महापालिकेच्या अधिकारात टुरिझम टॅक्सबाबत कर आकारणीचा विषय शब्दामध्ये न अडकवता निर्णय घ्यावा. तसेच आरोग्य सेवा कराबाबत राज्य शासनाकडे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणेसाठी सकारात्मक विषयपत्र पाठविण्याबाबत निर्णय घ्यावा असे म्हटले आहे.

पालिकेच्या नाले सफाईत तिजोरीचीही सफाई -शिवसेनेचे आंदोलन

0

पुणे-महापालिकेच्या वतीने पावसाळी गटारे, ओढे आणि नाल्यांच्या सफाईचे कोट्यवधींचे टेंडर काढले होते. परंतु, या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे पुणेकरांना पाण्यात लोटल्याचा आरोप करीत शिवसेनेने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या निषेधार्थ शुक्रवारी आंदोलन केले.शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन पार पडले. यावेळी नगरसेवक बाळा ओसवाल, अविनाश साळवे, माजी नगरसेविका कल्पना थोरवे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल हि या आंदोलनात थोडा वेळ सहभागी झाले होते.

‘पावसाळी गटारे साफ झालीच पाहीजे’, ‘कोट्यवधींच्या टेंडरमधील पैसे खाणाऱ्यांची चौकशी करा’, अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून सोडला.यावेळी शहरप्रमुख मोरे म्हणाले, महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जाते. परंतु यामध्ये सर्वांनी पैसे खाल्ले. याची सखोल चौकशी झाली पाहीजे. पुणेकरांना गोड बोलून फसविणाऱ्या सत्ताधारी भाजपचा निषेध. तुंबलेली सांडपाणी आणि पावसाळी गटारांची सफाई झाली पाहीजे. नागरिकांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. पुणेकरांना पाण्यात उभे करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची काम करण्याची मनस्थिती दिसत नाही. त्यांना जागं करण्यासाठी शिवसनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

ठाकरे सरकारचा वचनभंग आणि मदतीचा बनाव-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0

मुबई, दि . २३- मुख्यमंत्री महोदयांनी आज १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर केले. पण त्या पॅकेजचा त्यांनीच जाहीर केलेला तपशील बघितला तर प्रत्यक्षात ९ हजार ७७६ कोटी रुपयांचे हे पॅकेज आहे. त्यामधील प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी म्हणून त्यांनी ४ हजार २७६ कोटी रुपये दिल्याचे सांगितले. तेही शेतकऱ्यांसाठी नाही. कारण, त्यामध्येच त्यांनी घराचे नुकसान, मृत व्यक्तींच्या वारसांना मदत, मयत पशुधन याच्या नुकसानीची नुकसानभरपाई देखील धरलेली आहे. म्हणजे, प्रत्यक्ष शेतीच्या नुकसानीसाठी अंदाजे ३ हजार कोटी रुपयेच मिळतील, अशी अपेक्षा आहे.
राज्यात सर्वसाधारणपणे १ कोटी ३६ हजार वहिती खातेदार आहेत. त्यामधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची आणि शेती क्षेत्राची आकडेवारी बघितली तर जाहीर केलेल्या ३ हजार कोटी रुपयांपैकी नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात फक्त तीन ते साडेतीन हजार रुपयेच पडणार आहेत. यामधून शेतकऱ्याचा काढणीचा खर्चही निघणार नाही. बी-बियाणे, खते, पाणी, फवारणी, आणि शेतीचा बाकीचा खर्च तो कुठुन भरुन काढणार, असा प्रश्न आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कोरडवाहू शेतकऱ्यांना २५ हजार रुपये, बागायतीसाठी ५० हजार रुपये मदतीचे वचन दिले होते. प्रत्यक्षात शेतपिकांसाठी १० हजार रुपये आणि बागायतीसाठी २५ हजार रुपये हेक्टरी मदत त्यांनी जाहीर केली. त्यामध्येही २ हेक्टरची मर्यादा त्यांनी घातली. म्हणजे, या सरकारने स्वत:च शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचा भंग केला आहे, शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही.
ठिबक सिंचन अनुदानाबाबत, पीक कर्ज भरुन देण्याबाबत, खरवडलेल्या शेतीबाबत कोणताही उल्लेख या पॅकेजमध्ये नाही. त्यामुळे महविकास आघाडी सरकारने जाहीर केलेले पॅकेज हा रिकामा खोका आहे, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राणा भिमदेवी थाटात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दिलेल्या वचनाचा वचनभंग आहे. या पॅकेजमधून शेतकऱ्याच्या हातात काही पडणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही संघर्ष करु.

पीएमपीएलच्या स्मार्ट एअरपोर्ट बस सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. खा.गिरीश बापट

0

पुणे-पीएमपीएलच्या स्मार्ट एअरपोर्ट बस सेवाचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन खा.गिरीश बापट यांनी येथे केले आहे.


ते हणाले ,’पु ण्यामध्ये पीएमपीएलच्या माध्यमातून एअरपोर्ट करिता आगळी-वेगळी जलद व स्वस्त स्मार्ट एअरपोर्ट बस सेवा प्रवाशांना उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून मी पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे सूचना केली होती. त्याचा विचार करून पीएमपीएलने स्मार्ट सिटी मध्ये उपलब्ध असलेला निधी व मागील वर्षी पीएमपीएल मध्ये दाखल झालेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रीक बस यांचा वापर करून लोहगाव विमानतळ येथून बस सेवेचा शुभारंभ आज माझ्या हस्ते पहिल्या टप्प्यात ए-१ हिंजवडी, ए-२ हडपसर, ए-३ स्वारगेट, ए-४ कोथरूड, ए-५ निगडी या पाच मार्गावर सुरू करण्यात आली आहे. मागील काळात दोन वेळा अशा प्रकारची सेवा सुरू करण्यात आली होती. त्यासेवेतील काही त्रुटी- उणिवा दूर करून नव्याने ही सेवा नागरिकांकरिता विमानतळाच्या आगमन परिसरा जवळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना विमानतळाबाहेर अशा प्रकारची सेवा उपलब्ध आहे याची इत्यंभूत माहिती सूचना फलकाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यात ए-१ हिंजवडी, ए-२ हडपसर, ए-३ स्वारगेट, ए-४ कोथरूड, ए-५ निगडी या मार्गावर दर तीस मिनिटाला बस उपलब्ध असणार आहे. यामध्ये मुख्यतः विमानाने येणारे प्रवाशी, शहरातील पंचतारांकित हॉटेल, कॉर्पोरेट समारंभ, आंतराष्ट्रीय बैठका आदी गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. ही सेवा पूर्ण वातानुकूलित असली तरी यामध्ये बस कुठे व कोणत्या वेळेला आहे ही माहिती प्रवाशांना मिळण्याकरिता ॲपची सुविधा देण्यात आलेली आहे. सध्या शहरातील पाच मार्गावर सुरू असणारे सेवा पुढील काळात विमानाच्या वाढणाऱ्या संख्येप्रमाणे वाढविण्यात येणार आहे.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक प्रशांत बधे, विमानतळ प्राधिकरण सल्लागार समितीचे सदस्य उज्वल केसकर, कवी बादशाह सय्यद, अनिल पाटील, संचालक कुलदीप सिंग, पीएमपीएलचे सीएमडी ,स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 28 हजार 731

0

पुणे विभागातील 4 लाख 49 हजार 793 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 4 लाख 92 हजार 85 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे,दि.23 :- पुणे विभागातील 4 लाख 49 हजार 793 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 92 हजार 85 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 28 हजार 731 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 561 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.76 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.41 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 17 हजार 608 रुग्णांपैकी 2 लाख 94 हजार 70 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 16 हजार 46 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 492 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.59 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 410 रुग्णांपैकी 38 हजार 268 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 4 हजार 676 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 466 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 771 रुग्णांपैकी 33 हजार 687 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 700 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 384 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 653 रुग्णांपैकी 39 हजार 715 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 336 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 602 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 643 रुग्णांपैकी 44 हजार 53 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 973 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 617 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 604 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 832, सातारा जिल्ह्यात 274, सोलापूर जिल्ह्यात 198, सांगली जिल्ह्यात 226 तर कोल्हापूर जिल्ह्यात 74 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 2 हजार 703 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 530 ,सातारा जिल्हयामध्ये 575, सोलापूर जिल्हयामध्ये 263, सांगली जिल्हयामध्ये 264 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 71 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 22 लाख 68 हजार 636 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 92 हजार 85 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 22 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

“नाथाभाऊंचं समाधान राष्ट्रवादी काँग्रेस लिमलेटची गोळी देऊन करणार की कॅडबरी?”

0

पुणे- एकनाथ खडसे यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. समाधान मानण्यावर असतं. काही लोक लिमलेटची गोळी मिळाली तरीही समाधानी होतात. आता राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आज दुपारी २ वाजता खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार होता. त्या प्रवेशा दोन तास अगोदरच आता पाहू काय होतं. नाथाभाऊंना पुष्कळ दिलंय पक्षाने. खडसेंच्या नाराजीवर मार्ग निघाला असता. पण ते काही भाजपात थांबले नाहीत. राष्ट्रवादी काय देतंय पाहू. तुमचे समाधान होईल असे आश्वासन मिळाल्यानंतर नाथाभाऊ नरिमन पॉईंटच्या घरुन बाहेर पडलेत. आता समाधान म्हणजे लिमलेटची गोळीही असते आणि डेरीमिल्कही. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना काय देणार ते पाहणं महत्त्वाचं असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

जे काही मिळेल त्यामुळे नाथाभाऊ समाधानी होतील का? की काही पर्यायच उरलेला नाही म्हणून जे मिळेल ते स्वीकारतील? असाही प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला.  देवेंद्र फडणवीस यांनी क्लिअर केलं आहे की अश्लील बोलल्यावरही विनयभंगाची केस दाखल होणार नाही का? देवेंद्र फडणवीस हे असं व्यक्तीमत्त्व आहे की जे अनेक प्रकारच्या थपडा खातात पण शांत राहतात. प्रत्येक वेळी तुम्ही आरोप करायचा आणि त्यांनी गप्प बसायचं हे योग्य नाही. भाजपात होणारे निर्णय सामूहिक निर्णय असतात. एकट्या देवेंद्र फडणवीस यांना नाथाभाऊंनी दोष देणं योग्य नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडे दिवस जाऊ द्या, कुणी किती भूखंड घेतले ते मी दाखवेन…त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन-खडसे

0

मुंबई- ज्येष्ठ ज्येष्ठ म्हणून आता त्यांनी मला घरीच बसवलं होतं असं सांगत थोडे दिवस जाऊ द्या, कुणी किती भूखंड घेतले ते मी दाखवेन…त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन असे गर्भित इशारे आज राष्ट्रवादीत प्रवेश करतानाच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिले.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/657892178258372/

भाजपच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर खडसे यांनी सडकून टीका केली. गेले चार वर्षे मी अन्याय सहन केला. माझ्यावरील अन्याय दूर होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. आता तर पक्षात येऊन चार दिवस झाले नाहीत तेसुद्धा मला सल्ले देऊ लागले होते. केवळ ज्येष्ठ म्हणत राहिले आणि मला अडगळीत टाकले गेले, अशी मनातील सलच खडसे यांनी बोलून दाखवली. राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याबद्दल शरद पवार व जयंत पाटील यांचे आभार मानताना मला राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिल्लीतील काही भाजप नेत्यांनीच दिला होता, असा गौप्यस्फोटही खडसे यांनी केला. भाजपात तुम्हाला यापुढे काही भवितव्य नाही, असे मला या नेत्यांनी सांगितल्याचा दावाही खडसे यांनी केला. माझ्या आयुष्यातील चार वर्षे वाया गेली. कदाचित राष्ट्रवादीत प्रवेश मिळाला नसता तर कायमचा घरीच बसलो असतो, असेही खडसे म्हणाले. भाजप सोडण्याची अजिबात इच्छा नव्हती. मात्र कार्यकर्त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून माझ्याकडे तसा आग्रह धरला होता. कार्यकर्त्यांच्या इच्छेपोटीच आज मी राष्ट्रवादीत जात आहे. राष्ट्रवादीत जात असताना कोणत्याही पदाची मी अपेक्षा केलेली नाही. ज्या निष्ठेने भाजपात काम केले त्याच निष्ठेने मी राष्ट्रवादीत काम करणार आहे. पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेणार आहे, असा विश्वास खडसे यांनी पवारांना दिला.   मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारण करतो आहे. मात्र कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही.  ४० वर्षे मी भाजपाची सेवा केली, त्याबदल्यात मला काय दिलं पक्षाने? माझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर भाजपाचे लोक देऊ शकले नाही. मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. तोंडावर गोड बोलायचं आणि पाठीमागे कारवाया करत रहायचं हे मी कधी केलं नाही  ”४० वर्षे पक्षात राहिल्यानं पक्ष सोडावा असं कधी वाटलं नाही. माझी छळवणूक झाली सर्वांनी पाहिली. मी वारंवार त्याबाबत विचारत होतो. सभागृहात सांगा, भ्रष्टाचार झाला, तर कागदपत्रं द्या, बऱ्याच वेळा विचारलं पण त्याचं उत्तर आतापर्यंत मला मिळालं नाही. मी खूप संघर्ष केला. भाजपामध्ये आणि मंत्रिमंडळातही संघर्ष केला. संघर्ष माझ्या पाचवीला पूजलेला,” असं खडसे पक्षप्रवेशावेळी म्हणाले.

“संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं की माझा किती छळ झाला, अन्याय झाला. मी विधानसभेतही विचारलं की माझा गुन्हा काय? जर माझा काही गुन्हा असेल तर त्याचे कागदपत्र दाखवा असंही म्हटलं. मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपामध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपाला ६ खासदारकीच्या जागा यायच्या. येथे मी सातत्याने ५ जागा जिंकून आणल्या. ४० वर्षात बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलं नाही,” असा टोला खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

“ज्यावेळी मी राष्ट्रवादी प्रवेश करण्यासंदर्भात पक्षातील नेत्यांशी चर्चा करत होतो. तेव्हा एकदा जयंत पाटील यांच्यासोबत एकदा बोलत होतो. तेव्हा जयंत पाटील मला म्हणाले की, ‘तुम्हाला राष्ट्रवादी यायचं आहे. पण त्यांनी तुमच्यामागे ईडी लावली तर काय?’ जयंत पाटलांना मी म्हणालो त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन,” असं सांगत खडसे यांनी गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिला.

‘माझ्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. अँटी करप्शन विभागाची चौकशी लावण्यात आली. विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मला छळलं गेलं. आता थोडे दिवस जाऊ द्या. खरं काय ते मी तुम्हाला सांगेन. कुणी किती भूखंड घेतले ते मी दाखवेन. नियमाच्या बाहेर जाऊन जर कुणी काही केले असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, असे माझे मत असून तशी मागणी मी आता सरकारकडे करणार आहे’, असे नमूद करत आधीच्या सरकारच्या काळातील भूखंड घोटाळे बाहेर काढण्याचे स्पष्ट संकेतच एकनाथ खडसे यांनी दिले.  

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/726696861251373/

मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाहीत- शरद पवार

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना मंत्रिमंडळात जागा देण्यात येईल, अशा चर्चा सध्या सुरू आहेत. यावर आता स्वतः शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले की, ‘खडसेंच्या पक्षप्रवेशानंतर मंत्रिमंडळात कोणताही बदल केला जाणार नाही. सगळेजणं आहे त्या ठिकाणी आहेत आणि राहतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. यासोबतच, अजित पवारांच्या अनुपस्तितीवरुन ते नाराज नसल्याचेही पवारांनी सांगितले. कोरोना संकटामुळे काळजी घ्यावी लागते, त्यामुळे ते घरी आहेत, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले,”गेल्या काही दिवसांपासून माध्यमं खडसे यांच्या प्रवेशाच्या बातम्या चालवत होते. आज काही तरी वेगळंच. मध्येच काहीतरी जाहीर करून टाकलं की, अजितदादा नाराज आहेत. अरे कशाला नाराज आहेत. असं आहे की, करोनाच्या संकटात प्रत्येकाची काळजी घ्यावी लागते. काळजी घेण्याच्या सूचना मी प्रत्येकाला दिल्या आहेत. जितेंद्र आव्हाड व्हेटिंलेटरवर होते. राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांना करोना झाला. त्यामुळे काळजी घेत आहोत. खबरदारी म्हणून काही सहकारी दिसले नाही म्हणून लगेच काहीतरी गडबड झाली. काहीही गडबड झालेली नाही.

“इतिहासाचा दुसरा टप्पा सुरू झालाय”“खान्देश हा संपूर्ण परिसर गांधी-नेहरुंच्या विचाराचा होता. मध्यंतरी त्याला उतरती कळा लागली. या काळात नवी पिढी तयार झाली. ही पिढी घडवण्याचं काम नाथाभाऊंनी केलं. त्यांनी जिल्हा परिषद, खासदार, नगर परिषद, पंचायत समित्या आणल्या. इतिहासाचा हा पहिला टप्पा संपला आहे. आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने आता पक्षाला गती येईल. नाथाभाऊंनी खान्देशात पक्ष वाढवण्याचा शब्द दिला आहे. ते जेव्हा शब्द देतात, तेव्हा तो पूर्ण करतात. त्यावरून मागे हटत नाहीत. ही त्यांची खासियत आहे. आता करोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर आपण जळगावात जाणार असून, नाथाभाऊ काय चीज आहे हे दाखवून देणार आहोत,” असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

राधानगरी इको सेन्सेटिव्ह झोन; अधिसूचना प्रसिद्ध

0

मुंबई दि. 22 : राधानगरी अभयारण्याच्या सीमेच्या चारही बाजूने 200 मीटर ते 6.01 कि.मी. पर्यंत विस्तारित क्षेत्र करुन कोल्हापूर जिल्ह्यातील 26 गावांचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 15 गावांना पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली.

राज्य शासनाने 16 सप्टेंबर 1985 रोजी अधिसूचना काढून 351.16 चौ.किलोमीटर क्षेत्रावर राधानगरी वन्यजीव अभयारण्य जाहीर केले. 1986 ला पर्यावरण कायदा झाला. त्यानुसार अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने यांच्या बाहेरच्या सीमेपासून 10 किलो मीटरपर्यंत संवेदन क्षेत्र राहील अशी तरतूद करण्यात आली. राज्य शासन, केंद्र शासन यांच्यामार्फत वेळोवेळी मार्गदर्शक सूचनांच्या आधारे उप वनसंरक्षक कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील 26 गावे 15 हजार 039 हेक्टर क्षेत्र व सिंधुदुर्गमधील 15 गावे 10 हजार 26 हेक्टर क्षेत्र असे एकूण 250.66 चौरस किलोमीटर  क्षेत्रावर इको सेन्सेटिव्ह झोन प्रस्तावित करुन 9 ऑक्टोबर 2019 ला केंद्र शासनाला पाठविण्यात आला होता.

त्यावर 15 ऑक्टोबर 2020 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली. राधानगरी अभयारण्याच्या सीमेच्या चारही बाजूने 200 मीटर ते 6.01 कि.मी. पर्यंत क्षेत्र निश्चित केले.

राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतीसह सस्तन प्राण्यांच्या 47 प्रजाती, सरीसुर्पांच्या 59 प्रजाती, उभयचाऱ्यांच्या 20 आणि फुलपाखरांच्या 60 प्रजाती आढळतात. अभयारण्यात बिबट्या, रानमांजर, जंगली कुत्रे, शेकरु, गवा, पटेरी वाघ, हत्ती आदी आढळतात. अभयारण्याच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्र विस्ताराचे क्षेत्रफळ 250.66 चौ. कि.मी. आहे. या क्षेत्रामध्ये व्यावसायिक उत्खनन, प्रदूषण उत्पन्न करणारे उद्योग, जल विद्युत प्रकल्प, लाकूड गिरण्या, विटभट्टी, प्लॅस्टिक पिशव्यांचा उपयोग, व्यावसायिक हॉटेल, प्रदूषण निर्माण करणारे लघु उद्योग, वृक्षतोड यावर निर्बंध असणार आहेत. स्थानिक नागरिकांना घरांच्या बांधणी आणि दुरुस्तीसाठी जमीन खोदाईला परवानगी असणार आहे.

राधानगरी वन्यजीव अभयारण्याच्या विस्तारीत क्षेत्राच्या देखरेखीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 13 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचा प्रतिनिधी, राज्य शासनाद्वारे नियुक्त वन्यजीव संरक्षक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेचा प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे क्षेत्रीय अधिकारी, वरिष्ठ नगर योजनाकार, महाराष्ट्र शासनाचा महसूल विभागाचा प्रतिनिधी, पाटबंधारे विभागाचा प्रतिनिधी, लोक निर्माण विभागाचा प्रतिनिधी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक, राज्य सरकार तर्फे नियुक्त पर्यावरण क्षेत्रातील विश्व विद्यालयातील पर्यावरण क्षेत्रातील विशेष तज्ञ, राज्य जैव विविधता बोर्डाचा सदस्य, सावंतवाडी विभागाचे उप वनसंरक्षक हे सदस्य तर कोल्हापूर विभागाचे उप वन संरक्षक हे सदस्य सचिव असणार आहेत अशी माहितीही वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

गृहविलगीकरणातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालयीन कामकाज सुरु, व्हीसीद्वारे बैठकांना उपलब्ध

0

मुंबई, दि. 23 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वत:ला गृहविलगीकरण केले असले तरी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित सुरु आहे. उपमुख्यमंत्री आवश्यकतेनुसार व्हीसी व दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. शासकीय नस्त्यांवर निर्णय घेणे, अधिकाऱ्यांना सूचना देणे, पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा, मदतकार्याचा आढावा घेणे, फाईलींचा निपटारा करणे आदी कार्यालयीन कामे निवासस्थानावरुन नियमित व सुरळीत सुरु आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री हे ‘देवगिरी’ निवासस्थानाहून व्हीसीद्वारे सर्व बैठकांसाठी उपलब्ध असून त्यांच्या गृहविलगीकरण काळातही राज्य शासनाची निर्णयप्रक्रिया सुरु राहील, याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. असेही उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.