मुंबई, दि. 26 : माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिकांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशाद्वारे कळविले आहे
‘गिव्ह विथ डिग्निटी’मुळे वंचितांची दिवाळी आनंदमय
- मकरंद अनासपुरे; मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने तीन लाख लोकांना जीवनावश्यक साहित्य
- २४ राज्यात राबविला उपक्रम; आनंदीबेन पटेल, विजय रूपानी, मकरंद अनासपुरे यांचा पाठिंबा
पुणे : “मुकुल माधव फाउंडेशच्या ‘गिव्ह विथ डिग्निटी’ उपक्रमामुळे वंचितांची दिवाळी आनंदमय होईल. कोरोना आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात मुकुल माधव फाउंडेशनने गरजुंना दिलेला मदतीचा हात कौतुकास्पद आहे. या संकट काळात कोणाचा विसर पडू नये, मदतीवाचून वंचित राहू नये, यासाठी घेतलेल्या या उदात्त पुढाकाराबद्दल ऋण व्यक्त करतो,” अशा भावना अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केल्या.
कोरोना वैश्विक महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन झाला, त्यातच नैसर्गिक आपत्तीही आली आणि त्यातून मानवी संकट उभे राहिले. या कठिण परिस्थितीत देशभरातील गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी पुण्यातील मुकुल माधव फाउंडेशनने राबविलेल्या ‘गिव्ह विथ डिग्निटी’ उपक्रमांतर्गत अनासपुरे यांच्या हस्ते गरजू रंगमंच कलाकारांना किराणा व जीवनाश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. आरोग्य, शिक्षण, सामाजिक कल्याण, जल संधारण आणि पर्यावरण अशा सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे.
‘गिव्ह विथ डिग्निटी’ उपक्रम भारतातील २४ राज्यांतील ७० हजार कुटुंबातील तीन लाख लोकांपर्यंत पोहोचला. चार सदस्यीय कुटुंबाला २१ दिवसांसाठी पुरेल इतके साहित्य देण्यात आले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी या उपक्रमाचा शुभारंभ केला. भारताला पुन्हा एकदा आपल्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने ‘गिव्ह विथ डिग्निटी’ उपक्रम राबवला. या उपक्रमाला समविचारी मित्र, दात्यांचा सहभाग लाभला. फिनोलेक्स इंडस्ट्रीज, केव्हिनकेअर, मारिको, हिंदुजा फाऊंडेशन, नेसले, इंडोरमा, इंडसइंड बँक आदींचा समावेश आहे.
महामारीच्या काळात अनिश्चितता हा कळीचा मुद्दा झाला होता. प्रत्येक क्षणी नव्या आव्हानाला सामोरे जाण्याची, हाताळण्याची वेळ आली. अशावेळी नाऊमेद न होता मुकुल माधव फाऊंडेशन गरजूंपर्यंत पोहोचले. स्थानिकांना जगण्यासाठी आणि आर्थिक मदत करण्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनने किराणा पाकिटे तयार करण्यासाठी स्थानिक मध्यम उद्योग आणि देशभरातील लहान उदयोजकांकाडून उत्पादने घेतली. देशातील लघु आणि मध्यम पातळीच्या उद्योगांना सहाय्य करण्याच्या फाऊंडेशनच्या या प्रयत्नांचे आणि कल्पनेचे कौतुक केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी देखील केले आहे.
मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितु प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “वैश्विक महामारीचा हा काळ आव्हानात्मक होता. लोकांच्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर, तसेच दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टींवर त्याचा नकारात्मक परिणाम झालेला दिसून आला. ‘गिव्ह विथ डिग्निटी’ उपक्रमातून अनेक कुटंबांच्या आयुष्यात आशेचा दिवा तेवत राहुन ही दिवाळी प्रकाशाने उजळून निघावी, अशी आशा आहे.”
ऊर्जामंत्री पोहोचले ग्राउंड झिरोवर, टाटा कंपनीला घेतले फैलावर
मुंबई – मुंबईची आयलँडिंग यंत्रणा 12 ऑक्टोबरला कार्यान्वित न झाल्याने वीज पुरवठा ठप्प झाल्याबद्दल आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी टाटा पॉवर या वीज निर्मिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
राज्याला अखंडीत वीज पुरवठा करण्यात महत्वाची भूमिका वठविणाऱ्या राज्य भार प्रेषण केंद्र,ऐरोली (SLDC) येथे राऊत यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन या केंद्राचे कामकाज कसे चालते याची पाहणी केली. यावेळेस टाटा वीज कंपनीचे अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर मुंबई आयलँडिंग यंत्रणा नेमकी काय आहे आणि 12 ऑक्टोबरला नेमके काय घडले याबद्दल सादरीकरण केले.
“मुंबईचे आयलँडिंग करणे आणि बाहेरून मुंबईला होणारा वीज पुरवठा ठप्प झाल्यावर मुंबई शहराला अतिरिक्त वीज पुरवठा करणे ही जबाबदारी तुमच्यावर असताना तुम्ही तुमच्या झालेल्या चुका लपवत आहात काय? चुका झाल्या असतील तर त्या प्रामाणिकपणे कबूल करा! जर मुंबईत संसद असती आणि पंतप्रधान बोलत असताना वीज ठप्प झाली असती तर तुम्ही हेच उत्तर दिले असते का?,” असे प्रश्न मंत्री डॉ राऊत यांनी विचारले.
या बैठकीला ऊर्जा मंत्री डॉ राऊत यांच्यासह ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महापारेषण संचालक संजय ताकसांडे, तांत्रिक सल्लागार उत्तम झाल्टे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
कोरोना चाचणीसाठी आता ९८० रुपये दर निश्चित – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. 26 : राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रती तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही. 4500 रुपयांवरुन 980 रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
कोरोना चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर 980 रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करुन तपासणी करण्यासाठी 1400 रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी 1800 रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे. सामान्य माणूस केंद्र स्थानी ठेवून राज्य शासनाने सातत्याने दरामध्ये घट करुन रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात येणार असून प्रती दहा लाख लोकसंख्येमागे 70 हजार चाचण्या केल्या जात असून त्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जेणेकरुन कोरोनावर अधिक नियंत्रण मिळविता येईल. राज्यभरात सुधारित दरानुसार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.
महिला सक्षमीकरणातील ‘सुदर्शन’चा पुढाकार कौतुकास्पद
- अदिती तटकरे यांचे प्रतिपादन; सुदर्शन केमिकल्सतर्फे ‘नारीशक्ती सन्मान’ पुरस्कारांचे वितरण
पुणे : “उत्पादन विभागात कामाची जबाबदारी मुलींवर टाकण्याचा सुदर्शन केमिकल्सचा निर्णय धाडसी आहे. उत्तम काम करण्याची मानसिकता, चिकाटी मुलींमध्ये अधिक असते. सुदर्शनने घालून दिलेले हे एक आदर्श उदाहरण आहे. त्यामुळे इतर कंपन्याही महिलांना प्राधान्याने नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करतील. कागदी पिशव्या बनविण्याचा प्रकल्प, महिला बचत गटांना दिलेले प्रोत्साहन आणि प्लांटमध्ये तिन्ही शिफ्टमध्ये महिलांना दिलेली कामाची संधी यातून महिला सक्षमीकरणात ‘सुदर्शन’ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे,” असे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केले. कोरोना काळात मास्क शिवण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून, कापडी पिशव्यांच्या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर दिला, असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने सुदर्शन केमिकल्समध्ये उत्तम काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ‘नारीशक्ती सन्मान’ पुरस्कार त्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. त्यावेळी अदिती तटकरे बोलत होत्या. कोरोना काळात जीव धोक्यात घालून जनजागृतीचे काम करणाऱ्या पत्रकारांनाही कोरोनायोद्धा म्हणून गौरविण्यात आले. धाटाव (ता. रोहा) येथील सुदर्शन केमिकल्सचा आवारात झालेल्या या सोहळ्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, तहसीलदार कविता माने, प्रांताधिकारी यशवंत माने, पोलीस निरीक्षक नितीन बंडगर, सुदर्शन केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी, सीएसआर हेड शिवालिका पाटील, प्लांट हेड संजय शेवडे, वरिष्ठ व्यवस्थापक (सीएसआर) माधुरी सणस, स्थानिक लोकप्रतिनिधी विनोद पाशिलकर, विजयराव मोरे आदी उपस्थित होते.
अदिती तटकरे म्हणाल्या, “रोहासह रायगड जिल्ह्याच्या विकासात सुदर्शनने योगदान दिले आहे. शहरी, ग्रामीण, दुर्गम अशा तीन भागात रायगड विभागला आहे. त्यामुळे कंपन्यांना विस्तार करताना अनेक अडचणी येतात. त्यासाठी चांगले औद्योगिक धोरण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. रोजगार निर्माण करून देण्यासाठी अनही प्रयत्न करत आहेत. समानता हाच सामाजिक विकासाचा महत्वाचा धागा आहे. औद्योगिक आणि पर्यटन जिल्हा अशी ओळख निर्माण व्हावी. कोरोनाने अनेक नवे शब्द दिले. येथे स्वच्छता आणि सुरक्षित उपाय कौतुकास्पद आहेत. कोविड सेंटर, व्हेंटिलेंटर आदी गोष्टीत सुदर्शनसह इतर कंपन्यांची चांगली मदत झाली.”
राजेश राठी म्हणाले, “सुदर्शनने सर्वांना सोबत घेऊन विकास साधण्याचे ध्येय ठेवले आहे. सद्यस्थितीत महिलांना समान संधी देण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. आज या गुणवान महिला सहकाऱ्यांचा सन्मान करताना आनंद होतो आहे. महिलानी केवळ कार्यालयीन काम करावे, ही मानसिकता बदलत असून, उत्पादन, तंत्र यंत्रणा, प्लांट अशा सर्व ठिकाणी उत्तम काम करत आहेत. रसायन क्षेत्रात काम असल्याने पर्यावरण संवर्धन यावरही आम्ही काटेकोरपणे लक्ष देत आहोत. कोरोना काळात सामाजिक बांधिलकीतून मदत करण्यासह सर्व प्रकारची सुरक्षेची काळजी घेतली गेली.”
निधी चौधरी म्हणाल्या, “प्लांटमध्ये मुली काम करताना पाहून मला आनंद झाला. कंपनीच्या आवारात केलेले पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, योग्य प्रकारे घेतलेली काळजी समाधानकारक आहे. शिक्षण, लग्न, जमेल ती नोकरी न करता आपली आवड जोपासून काम करायला हवे. आयुष्यात योग्य ध्येय ठेवून आपण काम करावे. चांगली स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी. या प्रवासात आपल्याला थांबवणाऱ्या अनेक व्यक्ती भेटतील, त्यांना दुर्लक्षित करून आपण आपले ध्येय पूर्ण करावे. महिला काम करतात, तेव्हा ते उत्तम दर्जाचे काम होते. सख्यांनो, चांगले आणि मानापासून काम करा.”
स्वागत प्रास्ताविक शिवालिका पाटील यांनी केले. अंकिता मांढरे यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी सणस, ऍड. विशाल घोरपडे, रुपेश मारबते, अमित भुसारे, नीरजा कोटे यांनी सोहळ्याचे संयोजन केले. आभार संजय शेवडे यांनी मानले.
——————-
‘सुदर्शन’मधील उपाययोजनांचे कौतुक
सन्मान सोहळ्यापूर्वी अदिती तटकरे, निधी चौधरी यांच्यासह अधिकारी व पत्रकारांनी सुदर्शन केमिकल्सच्या प्लांटची पाहणी केली. विविध लॅब, साईट्स, प्रक्रिया केंद्र, रंगनिर्मिती, वेअरहाऊस यासह इतर विभागाला भेटी दिल्या. तेथील प्रक्रिया समजून घेतल्या. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुदर्शनने केलेल्या सुरक्षेबाबतच्या विविध उपाययोजना, महिलांसाठी स्वच्छतेच्या सोयीसुविधा, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केलेले प्रयत्न याचे मान्यवरांनी कौतुक केले. या सगळ्या उपाययोजना आदर्शवत असल्याचेही अदिती तटकरे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
———————
या महिलांचा झाला सन्मान
बेस्ट वुमेन टेकनिशिएशन ऑफ द इयर सन्मान प्रियांका पाटील, प्रगती कर्णेकर, उल्लेखनीय योगदानाबद्दल चंदा रटाटे, बेस्ट आयडिया सन्मान दीपिका दळवी, मंचिता ठाकूर, समीक्षा कडव, बेस्ट प्रेजेंटर दीप्ती गावंड, बेस्ट एक्सिक्युटर अंकिता पाटील, प्रगती जाधव, मंजुळा मोहिते या महिलांचा सन्मान करण्यात आला.
पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 607
पुणे विभागातील 4 लाख 56 हजार 888 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 4 लाख 96 हजार 243 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे,दि.26 :- पुणे विभागातील 4 लाख 56 हजार 888 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 96 हजार 243 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 607 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 748 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.77 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.07 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 19 हजार 743 रुग्णांपैकी 2 लाख 97 हजार 755 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 14 हजार 395 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 593 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.37 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.12 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 260 रुग्णांपैकी 39 हजार 157 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 4 हजार 606 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 497 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 39 हजार 270 रुग्णांपैकी 34 हजार 465 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 394 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 411 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 193 रुग्णांपैकी 40 हजार 524 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 52 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 617 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 777 रुग्णांपैकी 44 हजार 987 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 160 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 630 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 154 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 643, सातारा जिल्ह्यात 190, सोलापूर जिल्ह्यात 132, सांगली जिल्ह्यात 154 तर कोल्हापूर जिल्ह्यात 35 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 903 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 972 ,सातारा जिल्हयामध्ये 171, सोलापूर जिल्हयामध्ये 306, सांगली जिल्हयामध्ये 225 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 229 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 23 लाख 6 हजार770 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 96 हजार 243 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 25 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
दस-याला सई ताम्हणकरचं नव्या क्षेत्रात सीमोल्लंघन, ‘दि सारी स्टोरी’सह सई बनली उद्योजिका !!
अभिनेत्री सई ताम्हणकरने बॉलीवूड, आणि फॅशनविश्व गाजवल्यावर आता विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर अजून एका विश्वात पाऊल ठेवलं आहे. सई ताम्हणकरने आपलं स्वत:चं ‘दि सारी स्टोरी’ हे लेबल लाँच केलं आहे.
सई ताम्हणकरने आजवर अनेक यशाची शिखरं पादाक्रांत केली आहेत. मग ते मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलीवूड आणि फॅशन दुनियेत तिने कमावलेलं नाव असेल किंवा स्वत:ची एक कुस्ती टिम असणं. सईने नेहमीच वेगळी वाट चोखाळलीय. आणि प्रत्येक संधीचं सोनं केलंय. आता फॅशनिस्टा सई ‘दि सारी स्टोरी’ हे आपलं स्वत:चं लेबल घेऊन आली आहे. अनेकजणी सईला आपली ‘रोल मॉडेल’ मानतात. सईच्या चाहत्यांना ह्यानिमीत्ताने सईच्या निवडीच्या साड्या नेसण्याचा मौका चालून आलाय.

आपली कॉलेजपासूनची मैत्रीण श्रुती भोसले-चव्हाणसोबत सईने हे लेबल लाँच केले आहे. सई ताम्हणकर म्हणते, “कॉलेजमध्ये असल्यापासूनच आपण दोघी मिळून काहीतरी नवीन करूया, असं मला आणि श्रुतीला नेहमी वाटत असे. पण काय नवं ते उमजतं नव्हतं. पूढे आम्ही दोघीही आपापल्या क्षेत्रात करीयर करण्यात गुंतून गेलो. पण 2020 ने आम्हांला नव्या कल्पनांवर विचार करायची संधी दिली. आणि आता ‘दि सारी स्टोरी’ने आमचं स्वप्न आकाराला येतंय.”

‘दि सारी स्टोरी’मध्ये ‘सई टच’ काय असेल असं विचारल्यावर सई सांगते, “माझ्या सिनेमा आणि भूमिकांबाबत जशी मी चोखंदळ आहे ना, अगदी तशीच साड्यांबाबतही आहे. प्रत्येक साडीचा पोत, रंग, डिझाइन ह्यावर माझं आणि श्रुतीचं बारकाईने लक्ष असणार आहे. जसे माझ्या प्रत्येक चित्रपटाला एक कथानक असते. तसेच आमच्या लेबलची साडीही एखादी गोष्ट उलगडावी तशीच सुरेख असेल.”

‘दि सारी स्टोरी’ची प्रेरणा कशी मिळाली ह्याविषयी श्रुती भोसले-चव्हाण सांगते, “माझ्या आईकडे साड्यांचे मोठे कलेक्शन आहे. भारतातल्या कानाकोप-यात मिळणा-या प्रत्येक प्रकारातल्या साड्या तिच्याकडे आहेत. आईची ही साड्यांची आवड लहानपणापासून माझ्यात रूजत गेली. आणि आता त्याचीच परिणिती आहे ‘दि सारी स्टोरी’. “

भारताला लाभलेली साड्यांची समृध्द परंपरा जपत, प्रत्येक वयोगटातील, क्षेत्रातील स्त्रियांना आवडतील, शोभतील, अशा रंगांच्या, डिझाइनच्या साड्या ‘दि सारी स्टोरी’मध्ये असतील. श्रुती ह्याविषयी सांगते, “साडी कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही. आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या सण-समारंभांना साडी नेसण्याकडे जगभरातल्या अगदी 18 वर्षाच्या मुलीपासून ते 80 वर्षांच्या आजींपर्यंत प्रत्येक स्त्रीचा कल असतो. म्हणूनच ‘दि सारी स्टोरी’मध्ये 30हून अधिक वैविध्यपूर्ण प्रकारातल्या साड्या तुम्हांला मिळतील.”

अजित पवार करोना पॉझिटिव्ह; रुग्णालयात दाखल
मुंबई –
गेल्या काही दिवसांपासून क्वारंटाइनमध्ये असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अजित पवार यांना करोनाची लागण झाल्याचं निदान झाल्यानंतर रुग्णालयात हलवण्यात आलं. अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर अजित पवार यांना थकवा जाणवू लागला होता. त्यानंतर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं स्वतः क्वारंटाइनमध्ये होते.
मागील आठवड्यात अजित पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांचा प्रदेश कार्यालयात जनता दरबार होणार होता. मात्र, तो रद्द करण्यात आला होता. त्यानंतर अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्याचं समोर आलं होतं. मात्र, करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, सोमवारी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
“माझी करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून, प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून, थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
सर्व राज्यांनी एकत्र येऊन जीएसटी बाबत केंद्रावर दबाव आणावा -उद्धव ठाकरे (व्हिडीओ)
मुंबई – राज्यांचे हक्काचे पैसे राज्यांना वेळेवर मिळत नसतील , त्यासाठी वारंवार मागण्या कराव्या लागत असतील तर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन जीएसटी बाबत केंद्रावर ,पंतप्रधानांवर दबाव आणून जीएसटी फेल गेली असेल तर प्रसंगी जुनी करप्रणाली सुरु करावी अशी सूचना देत आज शिवसेनेचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाजपावर कडाडून हल्ला चढविला .
कोरोनाचं सावट असल्याने यंदा पहिल्यांदाच दसरा मेळावा शिवतीर्थावरून न होता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात केवळ ५० जणांच्या उपस्थिततीत पार पडला. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून न बोलता शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी सर्व महाराष्ट्राला आपल्या दसरा मेळाव्यातून संबोधित केलं. वर्षभर मनात साचलेलं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून बोलून दाखवले.
आम्ही बोललो. जीएसटीचे पैसे येत नसतील, इतर हक्काचे पैसे येत नसतील. केंद्राकडे जून महिन्यापासून आपत्तीग्रस्तांसाठी पैसे मागितले. त्यासाठी एक छदाम आलेला नाही. मागायचे नाहीत का पैसे? मग दानवे म्हणाले लग्न तुम्ही केलं आणि पैसे बापाकडे मागता? दानवेजी बाप तुमचा असेल, माझा बाप इकडे आहे. माझ्यासोबत आहे. मला भाडोत्री बाप स्वीकारण्याची तयारी नाही. भाडोत्री बाप तुमचे तुम्हाला लखलाभ होवो. माझे मायबाप या मातीत आहेत. का पैसे मागायचे नाहीत. लग्न आम्ही केलं. जरूर केलं. पण लग्न करताना बाप तर सोडाच, आहेराची पाकिटं ज्याला देत होतो. तो सुद्धा आहेर घेऊन पळालेला आहे. मोजतो म्हणाला, मोजतोय की काय करतोय देव जाणो,” अशा शब्दात ठाकरे यांनी दानवे यांच्यावर टीकेची तोफ डागली.
मंदिरं खुली करण्यावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदुत्वावरून डिवचलं होतं. त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी उत्तर दिलं होतं. त्यानंतर दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरे यांनी नामोल्लेख टाळत टोला लगावला. काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावं,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.“हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात, का तर मंदिरं उघडले नाहीत म्हणून.. पण आम्हाला कोण विचारतंय… ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते. घंटा बडवा, थाळ्या बडवा, हे तुमचं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या. संजयजी उद्याच्या सामनात सरसंघचालकांचं भाषणं व्यवस्थित आलं पाहिजे. काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावं,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
“आम्हाला हिंदुत्वाबद्दल कोण विचारतंय? ज्यावेळी बाबरी पाडली गेली त्यानंतर देशात जो हल्लकल्लोळ उसळला. तेव्हा कोणाची हिंमत नव्हती सांगायची. आता जे आम्हाला हिंदुत्वावर प्रश्न विचारत आहेत, ते त्यावेळी शेपट्या घालून कुठल्या बिळात लपले होते, काही कल्पना नाही. कदाचित त्या वेळेला ज्यांचं नाव त्यांच्या कुटुंबाशिवाय कुणालाही माहिती नव्हतं ते आम्हाला विचारताहेत तुमचं हिंदुत्व कुठं गेलं? तुम्ही अचानक सेक्युलर झालात?
“शिवसेनाप्रमुखांचं आणि तुमच्या हिंदुत्वामध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे आम्हाला देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व नको. हे हिंदुत्व आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलं. तुम्हीच बडवा ती घंटा तुम्हाला दुसरं येतंय काय? मला अतिरेक्यांना बडवणारं हिंदुत्व हवंय. नाहीतर करोना आला थाळ्या बडवा, घंटा बडवा हेच तुमचं हिंदुत्व. बेडूक उड्या, कोलांटी उड्या, दोरीच्या उड्या मारणारं हे कसलं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असं नाही,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची हिंदुत्वाची व्याख्याच सांगितली.
हिंदुत्व कसं हवं जे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं, हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व आहे. सकाळी रा. स्व. संघाचा मेळावा झाला यामध्ये सरसंघचालकांनी भाषण केलं. त्यांना मानणारे आणि त्यांच्यासारखी काळी टोपी घालणारे आहेत. त्या टोपीखाली जर डोक असेल तर त्या डोक्यानं तुमच्या सरसंघचालकांच्या वाक्याचा विचार करावा आणि त्यांच्याकडून हिंदुत्व समजून घ्यावं, अशा कठोर शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीकास्त्र डागलं. जीएसटीच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या धोरणांवरून निशाणा साधला. “दानवेजी बाप तुमचा असेल, माझा बाप इकडे आहे. माझ्यासोबत आहे. मला भाडोत्री बाप स्वीकारण्याची तयारी नाही. भाडोत्री बाप तुमचे तुम्हाला लखलाभ होवो. माझे मायबाप या मातीत आहेत,” अशा शब्दात ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं.उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे, भाजपा नेते, राज्यपाल यांच्यावर शरसंधान साधलं. ठाकरे म्हणाले, सगळ्या राज्यात पाडापाडी कशासाठी करताय? पक्षावर लक्ष द्या पण थोडं लक्ष देशावरही द्या. देश रसातळाला चालला आहे. देश कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. क्रांतिकारकांनी भाजपसाठी हा देश स्वतंत्र केलेला नाही. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हा पंतप्रधान मोदींचा अपमान आहे,
उद्धव ठाकरे म्हणाले,”प्रत्येक दसरा मेळाव्याला काय बोलणार असं विचारलं जातं. पण, टार्गेट करण्यासाठी नाही. पण, सध्या करोना जोरात आहे. बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. काही जणांना इंजेक्शन द्यावं लागतं. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचं इंजेक्शन द्यावं लागतं. काही जण तर अशी बेडक आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही,” अशी टीका ठाकरे यांनी केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील सर्व मुद्दे :
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघालेत, काही वेळातच शिवसैनिकांना संबोधित करणार
- आपल्या संपूर्ण परिवारासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघालेत
- शिवाजी पार्कवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकात जात उद्धव ठाकरे नतमस्तक
- उद्धव ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दाखल, सोबतच रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दाखल
- उद्धव ठाकरे सहकुटुंब स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दाखल, ढोलताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचं स्वागत
- शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा पहिल्यांदाच सभागृहात, कोरोनामुळे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंचं संबोधन
- उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांचं व्यासपीठावर आगमन
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परंपरेनुसार केलं शस्त्रपूजन
- उद्धव ठाकरे यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्यात, मराठीत मातीत काय तेज आहे मराठी मातीची ताकद काय आहे याची प्रचिती दिली नंदेश उमप यांनी करून दिली
- जर हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, आम्ही गुळाच्या ढेपेला चिकटणारे मुंगळे नाहीत – उद्धव ठाकरे
- वर्षभरापासून मुख्यमंत्री झालो,गेल्या सहा महिन्यापासून फेसबुकवरून लाईव्ह बोलत होतो. आज मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजूला ठेऊन बोलणार आहे.
- ज्या मातीने औरंगजेब गाडला त्या महाराष्ट्राच्या मातीचं तेज अजूनही तसंच आहे.
- हिंदुत्त्वावरून प्रश्न विचरतायत कारण मंदिरं उघडत नाही, हिंदुत्वाबाबत विचारणारे हे कोण ? – उद्धव ठाकरे
- एकमेकांना केवळ टोप्या नका घालू, हिंदुत्वाचा अर्थ सरसंघचालकांकडून समजून घ्या – उद्धव ठाकरे
- तुमच्यासाठी राज्यातील जनता मतं असतील पण माझ्यासाठी ही हाडामाणसाची माणसं आहेत – उद्धव ठाकरे
- जेवढं लक्ष पक्षावर देतायत, तेवढं लक्ष देशातील जनतेकडे द्या – उद्धव ठाकरे
- शिवसेना कायम GST ला विरोध करत होती, GST मुळे राज्याचे पैसे त्यांना मिळत नाहीत.
- GST करपद्धती सदोष आहे, आमच्या हक्काचा पैसा आम्हाला मिळत नसेल तर या करपद्धतीवर चर्चा करायला हवी
- GST करप्रणालीमध्ये त्रुटी असतील तर मोदींनी त्या चुका सुधाराव्या
- माझं टार्गेट भाजप नाही, पण देशाची विल्हेवाट लागत चालली आहे, राजकारण एके राजकारण सुरु आहे
- दानवेंचा बाप भाडोत्री असेल माझा नाही, लग्नाच्या आहेराची पाकिटं पळवून नेणारे तुमचे बाप – उद्धव ठाकरे
- मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर म्हणणारा रावण आलाय, घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचे – उद्धव ठाकरे
- महाराष्ट्र पुढे जातोय म्हणून महाराष्ट्राची बदनामी, मुंबई पाकव्याप्त काश्मीर, मुंबई पोलिसांचे काहीही लक्ष नाही असं दाखवलं जातंय
- महाराष्ट्र नशेडयांचं राज्य असल्याचं चित्र रंगवलं जातं – उद्धव ठाकरे
- आमच्या अंगणात तुळशी वृंदावने आहेत, गांजाची नव्हे – उद्धव ठाकरे
- तोंडात शेण आणि गोमूत्र भरून ठाकरेंवर गुळण्या केल्यात, शेण आणि गोमूत्राच्या चुळा आमच्यावर भरल्यात, आता ते शेण गिळा आणि गप्प बसा
- तुमच्याकडे लाठी काठी असेल, आमच्याकडे मनगट आहे. तलवारीने युद्ध जिंकलं जातं पण त्यासाठी मनगट लागतं
- आम्ही महाराष्ट्र हिताचे निर्णय घेतलेत तर फटाके नका वाजवू पण खोटं तरी नका बोलू
- आम्ही एक नया पैसा खर्च न करता कारशेड उभारत आहोत, आम्ही ८०८ एकरांचा जंगल वाचवलं
- सध्याचा काळ कठोर आहे , मात्र केवळ राजकारण झालं तर देशात अराजकता निर्माण होईल
- विरोधक म्हणजे अहंकारी राजा आणि कळसूत्री बाहुल्या, यापुढे महाराष्ट्रात कळसूत्री बाहुल्यांचा खेळ होणार नाही
- केवळ पाडापाडी करण्याचं भाजपाला रस आहे
- सर्व समाजाच्या लोकांना हात जोडून सांगतो, जातीपातींचं राजकारण करणार्यांना बळी पडू नका
- मराठा, धनगर OBC आदिवासी सर्व समाजांना न्याय देणार, महाराष्ट्रात जातीवरून दुफळी माजू देऊ नका
आता भगवान गडच नाही तर मुंबईतले शिवाजी पार्कही भरवायचे आहे- पंकजा मुंडेंचा निर्धार
बीड- आता नुसते भगवान गडावरच नाही तर मुंबईतील शिवाजी पार्कही भरवायचे आहे. मी संपले असे म्हणणाऱ्यांना आपली ताकद दाखवून द्यायचा निर्धार पंकजा मुंडेंनी केली. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, परंतु हे पॅकेज पुरेसे नसल्याचेही म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी अजून थोडी उदारता दाखवावी असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

दसऱ्याच्या मुहुर्तावर आज सावरगाव घाट येथे आयोजित दसरा मेळाळ्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी व्हर्जुअल माध्यमातून संवादा साधला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी राष्ट्रीय सचिव आहे. पण तरीही मी महाराष्ट्रातच राहणार आहे. महाराष्ट्रात काम करणार आणि देशातही काम करणार आहे. देशामध्येही ऊसतोड कामगार आहेत. त्यांचे प्रश्न देखील सोडवणार असल्याचे ते म्हणाल्या. तसेच आता मी राज्यामध्ये फिरणार आहे. गावोगावात जाऊन पाहणी करणार आहे. कोरोना असला तरीही मी गावागावात जाणार आहे. रस्त्यावर कसे उतरायचे हे मला माहितीये. तसेच आता फक्त भगवान गडावरच नाही तर आपल्याला मुंबईमधील शिवाजी पार्कही भरवायचे आहे. आपली शक्ती दाखवून द्यायची आहे असा निर्धार पंकजा मुंडे यांनी केला आहे.
‘या’ पॅकेजमध्ये साधा रुमालही येणार नाही
पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी 10 हजार कोटींचे पॅकेज घोषित केले. मी त्यांचे स्वागत करते. मात्र शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी हे पॅकेज पुरेसे नाही. या दहा हजार कोटीच्या पॅकेजमध्ये साधा रुमालही येणार नाही, अशी टीकाही भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पंकजा मुंडेंनी दिला आहे.
मी घर बदलणार नाही
पंकजा मुंडेंच्या पक्ष बदलाच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या. त्यांनी या चर्चांना आज पुर्णविराम दिला आहे. मी घर बदलणार नाही आहे तिथं आहे असे त्या म्हणाल्या. तसेच आता राष्ट्रीय मंत्री झाले आहे. पक्षाच काम देशाच्या पातळीवर करणार आहे असे पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले.
निवडणुकांमध्ये वैचारिक लढा हवा, युद्ध नको – मोहन भागवत
नागपूर : सत्ता प्रत्येकाला हवी असते. सत्तेसाठी संघर्ष करतानाही विवेक वापरायला हवा. निवडणुकांमध्ये वैचारिक लढा हवा, युद्ध नको. सामाजिक अंतर निर्माण करणे हे राजकारण नाही. निवडणूक ही एक स्पर्धा आहे. ही स्पर्धा खेळीमेळीनं व्हावी, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमी उत्सवात अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत संबोधन केले. यावेळी स्वयंसेवक डिजिटली या विजयादशमी कार्यक्रमात सहभागी झाले होते.
धर्मनिरपेक्षेतेचं नाव पुढे करुन समाज तोडू नका असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी उत्सवात केलं आहे. हिंदू राष्ट्र हा शब्द संघ जेव्हा वापरतो तेव्हा त्यामुळे सत्तापिपासूपणा नसतो. त्यामध्ये सत्ता मिळवण्याची लालसा नसते तर सर्वसमावेशक अर्थाने हा शब्द संघ वापरत असतो. राजकीय स्वार्थासाठी देश तोडण्याचं काम काही लोक देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेविरोधात करतात. त्यांना ओळखणं खूप आवश्यक आहे असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. एकमेकांच्या स्वार्थासाठी जे नातं जोडतात ते स्वार्थ संपला की बाजूला होतात. संघाचं नातं तसं नाही संघाचं नातं हे समरसतेचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशाच्या वैविध्यतलेला विभाजनाचं नाव दिलं जातं आहे ही बाब चुकीचं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
हिंदू शब्दावरुन वाद निर्माण समाजात दुरावा निर्माण करतात. संघाला काही कारण नसताना बदनाम केलं जातं आहे. संघाबाबत कोणत्याही चुकीच्या गोष्टी पसरवण्याच्या आधी संघाची विचारधारा समजून घ्या असंही आवाहन मोहन भागवत यांनी केलं. आपण सगळे भारतमातेचे सुपुत्र आहोत, भारतीयांना आम्ही हिंदू म्हणतो यात गैर काय? आपलं संपूर्ण शरीर एकच आहे त्यामध्ये हात वेगळे आहेत, पाठीचा भाग आणि चेहरा हे ज्याप्रमाणे दिसण्यासाठी समान नसतात पण एकाच शरीराचा भाग असतात अगदी तसेच देशाचे स्वरुप आहे.
सगळे शरीर जसं एकच आहे तसाच आपला देशही एकच आहे मात्र काही लोक त्यातला फरक दाखवण्याचा प्रयत्न करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. फुटिरतावादी लोक हे राष्ट्रीय एकात्मतेविरोधात काम करत आहेत. तुकडे तुकडे गँग असंही त्यांना म्हटलं जातं आहे ही गँग देश तोडण्याचं काम करते आहे असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. करोना काळात स्वदेशी हा शब्द चांगलाच प्रचलित झाला. स्वदेशीमधला स्व हेच आमचं हिंदुत्व आहे. स्वामी विवेकानंदांनीही स्वदेशीचा मंत्र दिला होता आम्हीही तेच म्हणतो आहोत. विनोबा भावेंनी स्वदेशी म्हणजे स्वावलंबन हा अर्थ सांगितला आहे आम्हीही ती गोष्ट मानतोच आहोत असंही मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं.
मानवता कॅन्सर केअर सेंटरमुळे नाशिकच्या आरोग्य विकासात भर : पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक: मुंबई येथे कॅन्सरवर उपचार करणारे टाटा हॉस्पिटल, कोकिलाबेन रुग्णालयांसारखी अनेक मोठी रुग्णालये आहेत. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांना योग्य व माफक दरात मानवता कॅन्सर केअर सेंटर रुग्णांना सेवा देत आहेत . तसेच मुंबई-पुण्यासारख्या सर्व वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अशा मानवता कॅन्सर सेंटरमुळे नाशिकच्या आरोग्य विकासात भर पडली असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मायलान सर्कल जवळील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये अद्ययावत न्यूक्लिअर मेडिसीन विभागाची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. या विभागाच्या उदघाटन पालकमंत्री श्री. भुजबळ यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. प्रसंगी श्री. यावेळी एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे एमडी आणि मुख्य सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राज नगरकर, आयमाचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे, डॉ. चैतन्य बोराडे, डॉ. प्रशांत पाटील उपस्थित होते.
श्री. भुजबळ म्हणाले, नाशिकच्या पोषक हवामानाची भुरळ प्रभु रामचंद्र, कवी कुसुमाग्रजांना देखील होती. नाशिकचे हवामान आपल्या जिल्ह्याची फार मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे जिल्ह्यात भविष्यात शैक्षणिक हब, मेडीकल हब, शेतीवर आधारित उद्योग, आय.टी.पार्क आणण्याचा मानस आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील पहिले अद्ययावत न्यूक्लिअर मेडिसीन विभागाचे आज नव्याने उभारणी करण्यात आली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्याबरोबरचं इतरही जवळील जिल्ह्यातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना यामुळे नक्कीच दिलासा मिळणार असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
आधुनिक उपचार पध्दतीमुळे कॅन्सरसारख्या रोगावर नियत्रंण मिळविणे शक्य झाले आहे. अनेक मोठे राजकीय नेते, कलाकार, खेळाडू यांनी योग्य उपचार घेऊन कॅन्सरसारख्या आजारावर मात केली आहे. त्यामुळे या आजाराला कॅन्सरग्रस्त रुग्णांनी घाबरुन न जाता मोठ्या इच्छाशक्तीने यावर मात करावी, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या अद्ययावत न्यूक्लिअर मेडिसीन विभागाची पाहणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली व त्यातील सेवा सुविधांची माहिती घेतली.
डॉ. राज नगरकर यांनी यावेळी सांगितले की, उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या अद्ययावत न्यूक्लिअर मेडिसीन विभागासह पेट सिटी स्कॅनची उभारणी करण्यात आली आहे. न्यूक्लिअर मेडिसीन विभागात पेशंटला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी तज्ञ् डॉक्टरांच्या टीम बरोबरच एकाच छताखाली 2 पेट सिटी स्कॅन मशीन, गॅमा कॅमेरा, गॅलियम जनरेटर आणि 4 आयोडीन थेरपी वॉर्ड यासारख्या अत्याधुनिक सेवा देणारे एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर हि पहिली संस्था ठरणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विजयादशमीच्या शुभेच्छा
मुंबई, दि. २४ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अज्ञानावरील ज्ञानाच्या, अन्यायावरील न्यायाच्या, असत्यावर सत्याच्या, दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचा हा उत्सव सर्वांनी आनंदानं, उत्साहानं, सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाप्रतिबंधन नियमांचं पालन करुन साजरा करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
विजयादशमीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, दसरा हा आनंदाचा, उत्साहाचा सण आहे. ‘दसरा सण मोठा… नाही आनंदाला तोटा…’ असं आपल्याकडे म्हटलं जातं. त्यासाठी जुने वाद-विवाद, भांडण-तंटे विसरुन प्रेमाचं, स्नेहाचं, चांगल्या विचारांचं आदानप्रदान करण्याचा हा सण आहे. आज दसऱ्याच्या निमित्तानं वाईट विचारांना तिलांजली देऊया… असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. दसऱ्याच्या निमित्तानं सर्वांच्या घरात धनधान्याची आणि मनात चांगल्या विचारांची समृद्धी यावी. राज्यातून, देशातून, जगातून कोरोना संकटाचं उच्चाटन व्हावं, अशा शुभेच्छाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
कोरोनारूपी रावणाचा नाश करू या’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा
मुंबई, दि. २४ :- विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊन आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करू या, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संकटावर मात करून महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, लढवय्या महाराष्ट्र अशी आपली ओळख आहे. आपण अनेकदा संकटांचा यशस्वी मुकाबला केला आहे. त्यामुळे कोरोना विषाणुच्या विरोधातील लढ्यातही आपण सर्व भेद बाजुला ठेवून एकवटले आहोत. कोरोनाच्या संकटातच निसर्गाची अवकृपा झाली. पण या सगळ्या संकटांना न डगडगमता सामोरे जात आहोत. कोरोनाच्या विषाणूला पराजीत करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबवत आहोत. घराघरापर्यंत पोहचून विषाणुचाच पाठलाग करून, त्याला रोखण्याचा आपले कोरोना योद्धा प्रय़त्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सगळ्यांनीच खूप संयम दाखवला आहे. सर्वच धर्मींयानी आपले सण, उत्सव घरीच साजरे केले आहेत. उद्या विजयादशमी अर्थात दसऱ्याचा उत्सव साजरा करणार आहोत. दसरा संकटावर, वाईट प्रवृत्तीवर मात करण्यासाठी सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे आपल्याला दसरा उत्साहात साजरा करतानाच विषाणुच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य दक्षतेचे गर्दी न करण्याचे – शारिरीक अंतर राखण्याचे, मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याच्या सूचनेचे पालन करावे लागेल. अशा प्रय़त्नातूनच आपण कोरोनारुपी रावणाचा नाश करू आणि नव्या जोमाने भरभराटीकडे आणि समृद्धीकडे वाटचाल करू, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक -भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
पुणे- मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांना भरती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरलेल्या पाच मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या. पोलिसांनी सांगितले कि भारती विद्यापीठ पोलीस शुक्रवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना सिद्धिविनायक सोसायटी जांभूळवाडी येथील पल्सर चोरून नेणारे दोघेजण स्वामी नारायण मंदिर परिसरात फिरत आहेत.पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवी ची उत्तरे दिली. अधिक तपास केला असता त्यांनी परिसरात मोटारसायकल चोरीच्या पाच घटना उघकीस आल्या. आकाश दगडू थोरात उर्फ समारत (वय,२५ रा. शेवाळेवाडी,हडपसर) आणि विकी उर्फ विकास दिलीप पवार (वय. २४ रा. लक्ष्मीनगर दत्तवाडी ) अशी त्यांची नवे असून पल्सर हि गाडी त्यांनी सिद्धिविनायक सोसायटी जांभूळवाडी येथून चोरल्याचे निष्पण्ण झाले.या याशिवाय त्यांनी यामाहा आर.वन फाईव्ह, डिलक्स टीव्हीएस व्हेगो,ज्युपिटर अशा भारतीविद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन आणि कोंढवा हद्दीतील दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी या सर्व गाड्या जप्त केल्या आहेत. परिमंडळ १ चे पोलीस आयुक्त स्वारगेट , सर्जेराव बाबर, पोलीस निरीक्षक,विष्णू ताम्हाणे, भारती विद्यापीठ उपनिरीक्षक, भूषण कोते,महेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी, पुणे- मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांना भरती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरलेल्या पाच मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या. पोलिसांनी सांगितले कि भारती विद्यापीठ पोलीस शुक्रवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना सिद्धिविनायक सोसायटी जांभूळवाडी येथील पल्सर चोरून नेणारे दोघेजण स्वामी नारायण मंदिर परिसरात फिरत आहेत.पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवी ची उत्तरे दिली. अधिक तपास केला असता त्यांनी परिसरात मोटारसायकल चोरीच्या पाच घटना उघकीस आल्या. आकाश दगडू थोरात उर्फ समारत (वय,२५ रा. शेवाळेवाडी,हडपसर) आणि विकी उर्फ विकास दिलीप पवार (वय. २४ रा. लक्ष्मीनगर दत्तवाडी ) अशी त्यांची नवे असून पल्सर हि गाडी त्यांनी सिद्धिविनायक सोसायटी जांभूळवाडी येथून चोरल्याचे निष्पण्ण झाले.या याशिवाय त्यांनी यामाहा आर.वन फाईव्ह, डिलक्स टीव्हीएस व्हेगो,ज्युपिटर अशा भारतीविद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन आणि कोंढवा हद्दीतील दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी या सर्व गाड्या जप्त केल्या आहेत. परिमंडळ १ चे पोलीस आयुक्त स्वारगेट , सर्जेराव बाबर, पोलीस निरीक्षक,विष्णू ताम्हाणे, भारती विद्यापीठ उपनिरीक्षक, भूषण कोते,महेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी संतोष भापकर, गणेश शेंडे , एस.सुतार, कृष्ण बढे, सर्फराज देशमुख, अभिजित जाधव, राहुल तांबे, यांनी हि कामगिरी केली
