Home Blog Page 2410

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 19 हजार 767

0

पुणे विभागातील 4 लाख 71 हजार 84 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 4 हजार 965 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे :- पुणे विभागातील 4 लाख 71 हजार 84 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 4 हजार 965 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 19 हजार 767 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 114 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.29 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 24 हजार 294 रुग्णांपैकी 3 लाख 4 हजार 550 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11 हजार 929 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 815 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.41 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.91 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 531 रुग्णांपैकी 41 हजार 898 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 78 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 555 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 40 हजार 767 रुग्णांपैकी 37 हजार 142 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 168 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 457 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 184 रुग्णांपैकी 41 हजार 930 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 610 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 644 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 189 रुग्णांपैकी 45 हजार 564 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 982 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 643 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 441 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 717, सातारा जिल्ह्यात 156, सोलापूर जिल्ह्यात 423, सांगली जिल्ह्यात 99 तर कोल्हापूर जिल्ह्यात 46 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 2 हजार 267 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 815 ,सातारा जिल्हयामध्ये 125, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 119, सांगली जिल्हयामध्ये 176 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 32 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 24 लाख 5 हजार 61 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 4 हजार 965 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 1 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

मुंबई महापालिकेची कामगारांना मोठी दिवाळी भेट; 15 हजार 500 रुपये बोनसची घोषणा

0

दिवाळीला अवघे काही दिवस बाकी असताना मुंबई महापालिकेने कामगारांसाठी मोठी भेट देऊन दिवाळी गोड केली आहे. मुंबईचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी कामगारांना 15 हजार 500 रुपये बोनस देण्याची घोषणा केली आहे. कोरोना संकटामुळे कामगारांच्या बोनसमध्ये गेल्यावर्षीपेक्षा फक्त 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

कामगार संघटनांनी 20 हजार रुपये बोनस देण्याची मागणी केली होती. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी करत हा तिढा सोडवला आणि आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन कामगारांचा बोनस जाहीर केला. यानुसार पालिका कामगारांना 15 हजार 500, अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 7750, शिक्षण खात्यात मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना 4700 आणि अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना 2350 रुपये बोनस देण्यात येणार आहे. शिवाय सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 4400 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा किशोरी पेडणेकर यांनी केली.

‘राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार नाही, आलीच तर राज्य सरकार परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम’- आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. अशातच राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच, कोरोनाची दुसरी लाट आली तरी, राज्य सरकार पूर्ण तयारीत आहे, असेही टोपे म्हणाले.

टोपे म्हणाले की, ‘युरोपियन देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे तिकडच्या देशांमध्ये परत लॉकडाऊन करण्यात आला. या संदर्भातल्या बातम्या आपण पाहतच आहोत. आपल्याकडेही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, आपल्याकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. पण, जर कोरोनाची दुसरी लाट आलीच,तर राज्य सरकार त्या परिस्थितीशी तोंड देण्यास सक्षम आहे, असे टोपे यांनी सांगितले.

विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर, 1 डिसेंबरला होणार मतदान

0

मुंबई-विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणुका जाहीर झाली आहे. या 5 जागांसाठी येत्या 1 डिसेंबरला मतदान होणार होईल. या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी लढत पाहायला मिळेल.

1 डिसेंबरला होणारी निवडणूक औरंगाबाद, नागपूर आणि पुणे पदवीधर मतदार संघ तर अमरावती आणि पुणे शिक्षक मतदार संघासाठी होईल. यापूर्वी भाजप-शिवसेना सोबत होते. पण, यंदा भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे तीन पक्ष पाहायला मिळतील. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतं, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

मराठा आरक्षणासाठी घटनापीठ स्थापन करण्याबाबतच्या अर्जावर लवकरच निर्णय – मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण

0

मुंबई, दि. २ : मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. मराठा आरक्षण प्रकरणी शासनाचे वकील व ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांच्या यासंदर्भातील विनंतीनंतर सरन्यायाधीशांनी हे सूतोवाच केल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ९ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती श्री. रोहतगी यांनी आज सरन्यायाधीशांना केली. राज्य शासनाने यापूर्वी दोन वेळा म्हणजे ७ ऑक्टोबर आणि २८ ऑक्टोबर रोजी लेखी अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याचेही श्री. रोहतगी यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर या अर्जाबाबत लवकरात लवकर विचार केला जाईल, असे सरन्यायाधीशांनी सांगितले.

घटनापीठाची तातडीने स्थापना करून त्यांच्यासमोर मराठा आरक्षणाबाबतचा अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्याचा लेखी अर्ज यापूर्वी दोन वेळा केलेला असला तरी आज सोमवारी २ नोव्हेंबर रोजी याच मागणीचा लेखी अर्ज तिसऱ्यांदा सादर करण्यात आल्याचे श्री. अशोक चव्हाण म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार रुग्णालयातून घरी परतले

0

मुंबई, दि. २ :- राज्यातील कोट्यवधी जनतेच्या सदिच्छा, कार्यकर्त्यांची प्रार्थना तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे. माझी प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आणखी काही दिवस घरीच विलगीकरणात राहणार आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचा मी मनापासून आभारी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेचे तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 26 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: ट्विट करुन त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने ते रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती दिली होती. सात दिवसांच्या उपचारानंतर आज उपमुख्यमंत्र्यांना घरी सोडण्यात आले. पुढील काही दिवस ते विलगीकरणात राहणार असून कार्यालयीन कामकाज घरुनच करणार आहेत. महत्त्वाच्या बैठकांना देखील उपमुख्यमंत्री व्हिसीद्वारे उपस्थित असतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.

मेट्रोचा कारभार मनमानी ,विना परवाना ? अंधेरीसारखी घटना पुण्यात घडल्यास आतापर्यंतचे सर्व आयुक्त जबाबदार

0

कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुलांकडून भंडाफोड?

पुण्यात मेट्रोचा मनमानी कारभार नियोजनाशिवाय व  परवानग्या न घेता काम सुरु महापालिकेला ठेवले अंधारात ..

मेट्रोचा मंजूर केलेला प्लॅन त्वरित जाहीर करावा

पुणे- शहराच्या मेट्रो प्रकल्पाचे गेली दोन वर्ष काम सुरू असून या कामाचे नियोजन करून त्याचा प्लॅन मंजूर केला आहे का? असेल तर त्यानुसारच हे काम चालू आहे काय? याचा खुलासा पुणेकर जनतेला आयुक्तांनी करणे आवश्यक आहे.  किंबहुना तो प्लॅन मंजूर न करताच मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे का? असे असल्यास ही गंभीर बाब असून आयुक्तांनी त्याबाबत तातडीने खुलासा करावा. तसेच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नियोजन करून त्यासाठी कोणता प्लॅन मंजूर केलेला नसेल तर मेट्रोचे काम पूर्णपणे थांबवून आवश्यक असलेला प्लॅन व परवानग्या घेऊनच मेट्रोचे काम सुरु करण्यात यावे अशी मागणी पुणे महानगरपालिकेतील  काँग्रेस पक्षाचे  गटनेते आबा बागुल यांनी आयुक्तांना केली. 

ते म्हणाले, गेल्या काही काळात मेट्रोचे काम चालू असताना अनेकदा मार्गातील बदल व  स्टेशन मधील बदल अनुभवास येत आहे. त्यात पुणेकर जनतेला कोठेही विश्वासात घेतले जात नाही. मेट्रो प्रकल्प काहीही करून पूर्ण करायचा हे धेय्य असणे ठीक आहे. मात्र त्याचे कोणतेही नियोजन नसेल व त्यास कोणतीही मान्यता नसेल तर मार्ग बदलणे,स्टेशन बदलणे हे कसे शक्य होते. तसेच मुंबई मेट्रोच्या कामात कालच अंधेरीमध्ये एक युवतीचा बळी गेला.असे अपघात पुण्यातही घडले तर त्यास जबाबदार कोणाला धरायचे.पुणे महानगरपालिकेला, पुणे मेट्रोला की, संबंधित ठेकेदाराला व त्याची नुकसान भरपाई कोण देणार. असे अनेक प्रश्न या ठिकाणी उभे आहेत. प्रामुख्याने मेट्रो ही पुणेकरांची जीवन वाहिनी बनणार असे जे भासवले जाते ते अयोग्य आहे. पुण्यात मेट्रोचा वापर हा अल्प प्रमाणातच राहणार आहे. मुंबई सारख्या ठिकाणी किंवा लांब अंतर असलेल्या ठिकाणी मेट्रोचा वापर योग्य आहे. मात्र मध्य पुण्यात मेट्रो चालवणे कधीही शक्य होणार नाही.व त्याची गरजही नाही. कात्रज ते पिंपरी-चिंचवड अश्या लांब ठिकाणी जाणाऱ्यांनाच मेट्रो उपयोगी पडेल हे मान्य केले.  तरी ठीक ठिकाणी ज्या पद्धतीने कामे चालू आहे. त्याचे सुसूत्रीकरण करून पुणेकरांना विश्वासात घेऊन मेट्रोचा मंजूर केलेला प्लॅन हा जनतेसमोर प्रदर्शित केला गेला.तर त्यानुसार काम होत आहे, की नाही हे पाहणे देखील सोयीचे होईल. मात्र आंधळं दळतय अन कुत्र पीठ खातय अशी अवस्था मेट्रो कामाची आता होताना दिसत आहे असे आबा बागुल म्हणाले

मेट्रोचा देऊ केलेला प्लॅन व त्याच्या पर्यावरण विषयक घेतलेल्या परवानग्या जाहीर केल्यानंतर त्यात बदल करता येत नाहीत.बदल केल्यास सर्व मान्यता आवश्यक असतात. आजपर्यंत मेट्रो प्रकल्पाचा मंजूर प्लॅन जाहीर केला गेला नाही.तसेच पर्यावरण विषयक सर्व परवानग्या घेतल्या आहेत का, हे ही दाखवले जात नाही. त्यामुळेच पुणेकरांच्या मनात संशय निर्माण झाला असून या पद्धतीने मेट्रोने मनमानी काम करणे पुणेकरांच्या हिताचे निश्चितच नाही.आयुक्त येतात, बदलले जातात.त्यामुळे कोणतेच आयुक्त मेट्रो प्रकल्प पूर्ण होईपर्यंत जबाबदारी घेऊन इथे राहील अशी कोणतीही व्यवस्था केली गेली नाही. त्यामुळे प्रशासकीय जबाबदारीचा अभाव व ठेकेदारांची मनमानी आणि मेट्रोचे कामाकडे दुर्लक्ष असे चित्र असताना मेट्रोचा मंजूर केलेला प्लॅन त्वरित जाहीर करावा व पर्यावरण विषयक घेतलेल्या सर्व परवानग्या जाहीर कराव्यात अशी मागणी मी करीत आहे. असे न केल्यास किंवा परवानग्या घेतल्या नसल्यास त्याचा आढावा घ्यावा  व मेट्रोचा प्लॅन व पर्यावरण विषयक सर्व परवानग्या घेऊनच काम सुरू करावे असे न झाल्यास पुणेकरांच्या जीवाशी खेळ होईल व काँग्रेस पक्ष असे कदापि होऊ देणार नाही.त्यासाठी रस्ते अडवून आंदोलन करण्यात येईल असा इशारा आबा बागुल यांनी दिला.

मेट्रोच्या मनमानी कारभाराविषयी  महानगरपालिकेला कोणतीही कल्पना नाही. मेट्रोबरोबर महानगरपालिकेने एकाही जागेचे करारनामे अजून केलेले नाहीत. मेट्रो शहरातील मोक्याच्या जागेवर व्यावसायिक संकुल देखील उभारणार असल्याचे निदर्शनास आले आहे. व त्यात महापालिकेची  भागीदारी देखील निश्चित झालेली नाही. महापालिकेने ५० टक्के भागीदारीचा प्रस्ताव मेट्रोला दिला असून तो त्यांनी मान्य केला की, कसे याबाबत खुलासा होणे अत्यंत गरजेचे आहे. अश्या विविध परवानग्या न घेता बेधडकपणे या प्राधिकरणामध्ये मेट्रो काम कसे करू शकते. असा देखील संभ्रम पुणेकरांच्या मनामध्ये झाला आहे. तरी मेट्रो प्रकल्पाची तात्काळ चौकशी करून आपण योग्यतो निर्णय लवकर घ्याल अशी खात्री असून आमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची व्यवस्था लवकरात लवकर करावी. तसेच  मेट्रोचा काम पूर्ण करण्याचा कालावधी किती आहे.  महापालिकेने किती टक्के हिस्सा मेट्रोला  द्यायचा आहे. कालावधी वाढल्यास  त्याची एस्कलेशन कॉस्ट वाढते तर त्याचा देखील बोजा महापालिकीवर येणार आहे का? याची पूर्ण माहिती महानगरपालिकेच्या मुख्यसभेला देणे गरजेचे आहे.त्यामुळे या सर्व बाबींचा अहवाल करून मुख्यसभेच्या पटलावर ठेवावा व नियोजनाशिवाय सुरु असलेले मेट्रोचे काम महापालिकेच्या सर्व परवानग्या घेतल्याशिवाय सुरु न करण्याचे आदेश पारीत करावेत. असे न झाल्यास मुंबई सारखी घटना घडली तर त्यास पूर्णतः आपण जबाबदार असाल यासाठी मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेऊन यावर  कार्यवाही करावी अशी मागणी आबा बागुल यांनी केली.

आंबेगाव कचरा डेपो जाळण्यामागचे कारस्थान पोलीसांच्या नजरेच्या टप्प्यात …

0

पुणे-

आंबेगाव येथील महापालिकेचा कचरा डेपो जाळून ४ कोटी रुपयांचे नुकसान केल्याची माहिती प्रसार माध्यमांतून येते आहे. अचानकपणे आंबेगाव कचरा डेपोचा विषय संवेदनशील कसा झाला ? यापूर्वी हा डेपो कधीपासून येथे होता ? राज्य सरकार आणि महापालीकेने येथे कचरा डेपोचे आरक्षण टाकले नव्हते काय ? टाकले असेल तर कधी टाकले ? आणि जर हे आरक्षण टाकले असेल तर तेव्हा विरोध न करता ; आता तिथे कचरा डेपोला विरोध नेमके कोण करत आहेत त्याचे नेतृत्व करणारे कोण कोण आहेत ? त्यांनीच येथे आंदोलन किंवा बैठकी साठी लोकांना निमंत्रित केले होते काय ? येथे आंदोलन अगर बैठकीसाठी पोलीस परवानगी घेण्यात आली होती काय ? या बैठकीचे कव्हरेज करण्यासाठी माध्यामांपैकी कुणाला कुणी बोलाविले होते काय ?कोणत्या माध्यमाने या आंदोलनाचे , बैठकीचे व्हिडीओ कव्हरेज केले आहे काय ? अशा विविध प्रश्नांचा मागोवा घेत पुणे पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात कचरा डेपो जाळण्यामागचे षडयंत्र जवळ जवळ उघड झाल्याचे समजते आहे. कचरा डेपोच्या आसपास बिल्डर कोण कोण आहेत ? या डेपोच्या अस्तित्वामुळे त्यातील कोणा कोणाच्या जागांचे भाव ,उतरणीला लागणार होते किंवा लागलेत . हे बिल्डरच राजकारणी आहेत काय ? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी शोधण्यास श्रम घेतले आहे. आता फक्त पुरावे गोळा करून सूत्रधाराला ताब्यात घेण्याचे काम उरले असल्याचेही समजते आहे. मात्र आता पोलीस याप्रकरणी नेमकी कोणती माहिती अधिकृतरीत्या माध्यमांना देतील याकडेही लक्ष लागून आहे.

महापालिकेने केलेला कचरा डेपोच अनधिकृत होता असा जो आरोप होत आहे ,किंवा जे करत आहेत त्यांना उत्तर तर महापालिकेला द्यावे लागणार आहेच . याबरोबर असा आरोप करणाऱ्यांची काही बेकायदा बांधकामे या परिसरात आहेत काय ? याचा हि खुलासा महापालिकेला करावा लागणार आहे . मात्र आता तो महापालिका कशा पद्धतीने करते आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पुण्याचे नागरिक सोशिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत . देश अशांत असला तरी पुणे शांत असते असे म्हणतात . कचऱ्याची समस्या सर्वच भागात आहे . पण जिथे अशा कचरा प्रकल्पांची आरक्षणे पडतात , तेव्हा सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून शासन आणि महापालिका स्तरावर पुढे कार्यवाही केली जाते . आरक्षणे असताना मग आजुबाजू ला , किंवा नाल्या ओढ्याच्या बाजूला घरे घेणारी लोक याच पुण्यात आहेत . आणि नंतर त्रास झाला कि ओरडणारी लोक देखील येथेच आहेत . आणि त्यांना तीच लोक हवा देतात ज्यांनी आरक्षणे टाकलेली असतात ,किंवा नाल्या ओढ्याच्या काठी घरे बांधताना आपले ओठ शिवून घेतलेली असतात . पुण्यात लोकवस्ती बाहेर कचरा प्रकल्प उभारण्याची परंपरा महापालिकेने कायम राखली आहे. पण लोकांनी नंतर या आजूबाजूला जागा घरे घेऊन त्याची पर्वा केलेली नाही . आणि नंतर मात्र आरडाओरडा करीत लोकशाही मार्ग तोडून आंदोलनांचे प्रयत्न करून काही भाग संवेदनशील करण्यात धन्यता मानली आहे. आता अशा लोकांना मताच्या पेटीसाठी सध्याचे राजकीय नेते साथ देणार कि त्यांची ते पर्वा न करता कायदेशीरतेचे पालन करतील हे देखील येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

वारजे येथे भाजपचे पदवीधर मतदार नोंदणी अभियान

0

पुणे :

   भारतीय जनता पक्षाचे वतीने आज रविवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी संपुर्ण पुणे शहरात पदवीधर मतदार नोंदणी महाअभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन पुणे मनपाचे स्वीकृत सभासद सचिन दशरथ दांगट यांनी केले
.
   वारजे माळवाडी परिसरातील नोंदणी कक्षाला भेट देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष  विक्रांत पाटील, आमदार भिमराव तापकीर, युवा मोर्चा पुणे अध्यक्ष बापु मानकर, नगरसेवक सुशील मेंगडे, खडकवासला अध्यक्ष  सचिन बदक, सरचिटणीस  प्रतिक देसरडा,निहाल घोडके ऊपस्थित होते.          

   या अभियानात ३२५ पदवीधर मतदारांची नावे नोंदण्यात  आली. गेले काही दिवस सोसायटी परिसरात रहाणारे पदवीधरांचे घरोघरी जाऊन नावनोंदणी ॲानलाईन करून घेण्याचे काम स्वयंसेवक आणि पदाधिकारी यांचे मार्फत केले जात आहे.

 हे अभियान यशस्वी करण्यासाठी रेश्मा पाटणकर, ऋषिकेश रजावात, रेणुका मोरे, वर्षा पवार, परशुराम पुजारी, सिध्दार्थ बदीरगे, ओंकार काळोखे, चेतन मिस्री, करण सोनवणे, व्यंकटेश दांगट, किरण ऊभे, किरण साबळे, महंमद पठाण, अरविंद खताळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

   हा कार्यक्रमाचे संयोजन सचिन दशरथ दांगट स्वीकृत सभासद, पुणे मनपा यांनी केले होते.

दाभोळकरांचा लढा पुढे नेणे गरजेचे -उपमुख्यमंत्री

0

मुंबई : अंधश्रद्धाविरोधी चळवळीतील कार्यकर्ते, विज्ञानवादी विचारवंत, दिवंगत डॉ.नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धाविरोधात दिलेला लढा पुढं घेऊन जाणं गरजेचे आहे असे प्रतिपादन येथे यांच्या जन्मदिनानिमित्त काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

पुरोगामी, प्रगतशील, विज्ञानवादी महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी त्यांनी दिलेले योगदान, समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धाविरोधात त्यांनी दिलेला लढा पुढं घेऊन जाणं, हीच या महान विचारवंताला, सामाजिक कार्यकर्त्याला खरी श्रद्धांजली ठरेल, डॉ.नरेंद्र दाभोळकर साहेबांच्या कार्याला, विचारांना, स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो, असे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी म्हटले आहे.

‘आई माझी काळुबाई’ मालिकेत ‘वीणा जगताप’ आर्याच्या भूमिकेत!

0

सध्या मराठी मालिका विश्वात विशेष चर्चा आहे, ती सोनी मराठीवरच्या ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतल्या ‘आर्या’या  व्यक्तिरेखेची. या भूमिकेत आता लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप दिसणार आहे. 

सध्या ही मालिका रंजक वळणावर आहे. स्वप्नात दिसणार्‍या गोष्टींचा शोध घेताना, त्या प्रत्यक्षात असल्याचा साक्षात्कार आर्याला झाला आणि या शोधमोहिमेत त्या गोष्टींचा तिच्या भूतकाळाशी काहीतरी सबंध आहे, हे कळेपर्यंत तिच्या भावाचं अपहरण झालं आणि त्याच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्या तालेवार पाटील कुटुंबाच्या नजरकैदेत ती सून म्हणून अडकली.  

खलनायक विराटच्या  कह्यात असलेलं पाटील कुटुंब आणि काळुबाईवरच्या श्रद्धा-भक्तीनी त्यांच्यासमोर उभी ठाकलेली आर्या आणि वेळोवेळी तिला वाचवणारा, पण पाटलांचा वंश असलेला अमोघ; अशा रंजक टप्प्यावर ही मालिका आता आहे. ज्या घरात देवीचं नाव उच्चारायला बंदी आहे, त्या घरात देवीची पूजा होऊ घातली आहे आणि आर्याच्या भूमिकेतली वीणा जगताप  सत्य आणि असत्य यांच्यातल्या  लढाईची मुहूर्तमेढ पाटील घरात  रोवणार आहे. ह्या कथेचा नवा उत्कंठावर्धक टप्पा 

  महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री, मालिका आणि रिएलिटी शो यांमधून आपला वेगळा ठसा उमटवणारी वीणा जगताप  सादर करणार असल्यानी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सोमवार ते शनिवार,संध्याकाळी सात वाजता सोनी मराठीवर सादर होणारा, सातार्‍याच्या निसर्गरम्य परिसरात उलगडणारा हा पौराणिक कथेचा संदर्भ असलेला कौटुंबिकपट सर्वार्थानी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.  वीणाच्या प्रसन्न, ग्लॅमरस प्रवेशानी रंजकतेत भर पडली आहे. 

विधान परिषदेसाठी 12 नावे ठरली,पण गुपित ठेवली …

0

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अखेर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावे निश्चित झाली आहे. विधान परिषदेसाठी 12 नावे ठरली आहेत, परंतु ती गुपित आहेत. ही नावे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने तसे पत्र लवकरच राज्यपालांना देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपालांनी या नावांना तत्काळ मंजुरी देणे अपेक्षित असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

राज्यपाल नियुक्त आमदारांची यादीत कुणाचे नाव वर्णी लागावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार बैठका सुरू होत्या. अखेर तीन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नावांना मान्यता देण्यात आली. यात 12 नावे असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून ही यादी तयार केली आहे. यात अनेक नवीन चेहरे असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, यात काही जणांना डच्चू देण्यात आला आहे.ही यादी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांकडे देणार आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे महाधिवक्ता यांचा सल्ला घेऊन ही यादी तयार केली आहे.

पदवीधर मतदार नोंदणी महाअभियाना’ला प्रतिसाद

0

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पदवीधर मतदार नोंदणी महाअभियाना’ला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला.
आज संपूर्ण शहरात ५५० हून अधिक ठिकाणी तीन हजार कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर २५ हजार पदवीधरांची मतदार नोंदणी केली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक‘म पाटील यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन नोंदणीला प्रोत्साहन दिले.

महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, पश्‍चिम महाराष्ट्र नोंदणी प्रमुख राजेश पांडे, पुणे नोंदणी प्रमुख डॉ. श्रीपाद ढेकणे यांनी नोंदणीसाठी मार्गदर्शन केले.

निवडणुक आयोगाची पुढील सुचना येईपर्यंत मतदार नोंदणीची प्रकि‘या सुरू राहणार असून, आगामी काळात बूथ आणि संस्था स्तरावर अधिकाधिक नोंदणी करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

लष्करात नौकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक

0

पुणे : लष्कर गुप्तचर आणि पुणे शहर गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत लष्कर भरतीतील रॅकेटचा भंडाफोड करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे लष्करात भरती करुन देण्याच्या आमिषाने अनेकांना फसविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी राजस्थानमधील अजमेर येथील एक रहिवासी, त्याचे सहकारी, सैन्यात कार्यरत असणारे एक सैन्य कर्मचारी यांना गुन्हे शाखेने पकडले आहे. त्यांच्या ताब्यातून १३ मुळ शाळेची कागदपत्रे, प्रवेश पत्रे, प्रवेशपत्रे जप्त केली आहे. या प्रत्येकाला ३ ते ४ लाख रुपये घेऊन त्यांना लष्करात भरती करण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

वेनसिंग लालासिंग रावत (वय ४५ रा. पिंगळे वस्ती, मुंढवा, रवींद्र राठोड रा राजस्थान) आणि रिक्रुटमेंट ऑफिसमधील कर्मचारी जयदेव सिंह परिहार असे याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथे होणाऱ्या सैन्य भरतीच्या लेखी परीक्षेत काही मुलांची लाखो रूपयांची फसवणूक करण्याच्या तयारीत काही जण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वेनसिंग लालासिंग रावत, रवींद्र राठोड आणि लष्करातील हवालदार जयदेव सिंह परिहार यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं. त्यांची चौकशी करण्यात आल्यानंतर तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.लष्करात सैन्यभरती फेब्रुवारीमध्ये शारीरिक क्षमतेची परिक्षा घेण्यात आली होती. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा आज रविवारी वानवडी येथील एआयपीटीच्या मैदानावर घेण्यात आली. यावेळी वानसिंग व त्याचा एजंट सहकारी आणि लष्करातील एक लिपिकाला पकडण्यात आले. परिक्षेला आलेल्या दोन बॅचमधील ३० उमेदवारांना लष्कर भरतीचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून ३ ते ४ लाख रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून बनावट भरती रॅकेटमधील इतर संबंधित सदस्यांची चौकशी करण्यात येत आहे.

धक्कादायक पद्धतीने कचरा प्रकल्पाला आग -पोलीस तपास सुरु

0

पुणे – आंबेगाव बुद्रुक येथील सर्वे नंबर ५१ मधील आरक्षित जागेवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पामुळे आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, दत्तनगर परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कचरा प्रकल्पाला संतप्त जमावाकडून आग लावण्यात आली . तसेच काही अज्ञात व्यक्तींनी ऑफिसची तोडफोड केल्याची घटना रविवारी (दि.१) घडली आहे. या सर्व प्रकाराचे नेतृत्व कोणी नगरसेवकांनी केले असल्याची चर्चा आहे. हे नगरसेवक कोण ,ते स्वतःहून पुढे येतील कि पोलीस त्यांना पुढे आणतील हे आता यापुढील काळातच स्पष्ट होईल असे चित्र आहे. दरम्यान एकूणच पुणे शहर आणि परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून कचऱ्याची विल्हेवाट हि समस्या पुन्हा शहरापुढे आ वासून उभी राहिली आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात अशी समस्या स्मार्ट पुण्यात उभी रहाणे हे निश्चितच गंभीर मानळे जाईल असे दिसते आहे.

आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द या परिसराचा गेली तीन वर्षापूर्वी महानगरपालिकेत समावेश झाला आहे. महापालिका समावेशनांत्तर कोणताही ठोस विकास निधी या भागासाठी मिळाला नाही. परंतु असे असतानाही कचरा प्रकल्प मात्र आंबेगावकरांचे माथी मारल्याने नागरिक तीव्र नाराजी असून रविवारी या संदर्भात आंबेगाव येथील भैरवनाथ मंदिर येथे ग्रामस्थांच्या वतीने निषेध बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात सर्व पक्षाचे नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

यावेळी आंबेगाव चे फुरसुगी होऊ देणार नाही. मनपा प्रशासनाच्या जाहीर निषेध अशा घोषणा दिल्या. बैठकी नंतर संतप्त नागरिकांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प येथे मोर्चा काढला तसेच प्रकल्पासाठी जाणारा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदण्यात आला. तसेच या संतप्त नागरिकांपैकी काही अज्ञात युवकांनी प्रकल्पाला आग लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच या प्रकल्पाचे कार्यालय फोडण्यात आले असून मोठे नुकसान करण्यात आले आहे. यामध्ये टेबल, खुर्ची, टीव्ही यासारख्या साहित्याचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. या ठिकाणी कचऱ्याला आग लावल्याने धुराचे लोट परिसरात पाहायला मिळाले. आग विझवण्यासाठी कात्रज अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. त्यांनी थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली. या संदर्भात भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर यांच्यासह वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने उपस्थित होते. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.