Home Blog Page 2407

दीड महिन्यात सुरु होईल आरटीओची रोलर ब्रेक टेस्टिंग सिस्टिम

0

आमदार शिरोळे यांना आर टी ओ चे आश्वासन

पुणे-आज आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट दिली. माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधी मधून तीनचाकी व हलक्या वाहनांची योग्यता तपासणी करिता रोलर ब्रेक टेस्टिंग सिस्टिम साठी २०१८ साली पन्नास लाख रुपय निधी मंजूर करण्यात आला होता. टेस्टिंग करीत रिक्षा चालक आणि अन्य वाहनांना दिवे घाट येथे जावे लागते. हे टेस्टिंग जर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाले तर छोट्या वाहनधारकांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. हे लक्ष्यात घेता आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज तिथे भेट दिली आणि कामाचा पाठपुरावा केला. ह्या वेळी सार्वजनिक बांधकाम च्या पाटील मॅडम , श्री गुरव , ए. आर. ए. आई चे श्री भालेराव, श्री दातार आणि पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे श्री शिंदे उपस्थित होते. पाच ते सहा आठवड्यात तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे उपस्थित अधिकाऱ्यांनी शिरोळे यांना सांगितले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 18 हजार 196

0

पुणे विभागातील 4 लाख 75 हजार 813 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 8 हजार 258 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे,दि.05 :- पुणे विभागातील 4 लाख 75 हजार 813 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 8 हजार 258 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 18 हजार 196 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 249 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.62 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 25 हजार 984 रुग्णांपैकी 3 लाख 6 हजार 674 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11 हजार 417 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 893 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.08 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 169 रुग्णांपैकी 43 हजार 104 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 485 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 580 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 41 हजार 265 रुग्णांपैकी 37 हजार 587 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 202 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 476 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 505 रुग्णांपैकी 42 हजार 546 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 307 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 652 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 335 रुग्णांपैकी 45 हजार 902 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 785 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 648 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 371 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 772, सातारा जिल्ह्यात 237, सोलापूर जिल्ह्यात 187, सांगली जिल्ह्यात 111 तर कोल्हापूर जिल्ह्यात 64 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 678 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 729 ,सातारा जिल्हयामध्ये 424, सोलापूर जिल्हयामध्ये 147, सांगली जिल्हयामध्ये 177 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 201 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 24 लाख 49 हजार 357 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 8 हजार 258 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 4 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. ५ : सिनेमा व नाटक हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते. कारण समाजात जे आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पहायला मिळते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्यशासन पुढाकार घेईल, असे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘पॅनोरमा इन्वीशनिंग फिल्म मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट पॉलिसी फॉर महाराष्ट्र’ या विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्यासह मुख्य सचिव संजय कुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, सहसंचालिका आंचल गोयल, निर्माते दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा, निर्माते सिध्दार्थ रॉय कपूर, टी.पी.अग्रवाल. अभिनेते आदेश बांदेकर, अभिनेते सुबोध भावे, आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, मनोरंजन हे एकमेव असे माध्यम आहे जिथे आपण आपले दु:ख काही वेळाकरिता का होईना विसरुन जातो. मनोरंजन क्षेत्र मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचे काम करीत असते. या क्षेत्रामुळे एक चांगला समाज घडण्यास मदत होत असते. त्यामुळेच महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला या क्षेत्राचा आनंद घेता यावा यासाठी ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. राज्य शासनाचा एखादा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकार हे एक उत्तम माध्यम आहे. कारण जनमानसात कलाकारांची लोकप्रियता आणि त्यांच्या मनातील स्थान असते. त्यामुळे महाराष्ट्रातील कलाकारांच्या पाठिशी राज्य शासन कायम उभे असून कलाकारांना बळ देण्याचे काम करण्यात येईल, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

हिंदी आणि इतर भाषांबरोबरच मराठीतही उत्तम चित्रपट बनत असतात. पण काही वेळा एकाच दिवशी अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहातले शो (खेळ) मिळत नाही आणि पर्यायाने या चित्रपटांचे नुकसान होते. त्यामुळेच मराठी चित्रपटांसाठीही पुरेशा प्रमाणात शो राखीव ठेवण्याबाबत राज्य शासन आग्रही असल्याचे श्री. ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

मागील अनेक वर्षात या क्षेत्रातून अनेक कलाकार घडले. याच क्षेत्रामुळे अनेकांना रोजगारही मिळाले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या चित्रीकरणासाठी चांगली जागा विकसित करणे, नव नवीन तंत्रज्ञान आणणे यासाठी प्रयत्न केले जातील. मुंबईत असलेल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीचे येणाऱ्या काळात दर्जोन्नती करण्यावर भर असेल. आज देशासह राज्यावरही कोविड-19 चे संकट आहे. गेल्या आठ महिन्यानंतर आजपासून सिनेमागृहे व नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेसह सुरु होत आहेत. त्यामुळे या क्षेत्राला बळकटी देत असताना प्राधान्याने कोणती कामे करण्याची आवश्यकता आहे हे ठरविणे आवश्यक असल्याचेही श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले. चित्रपट व करमणूक माध्यम क्षेत्र गतीमान व्हावे यासाठी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. पहिल्यांदाच अशा प्रकारे चर्चासत्र आयोजित करुन या क्षेत्राला उभारी देण्याचे काम होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जन्मस्थान असून चित्रपट व करमणूक माध्यमांच्या क्षेत्रात कायमच अग्रेसर राहिले आहे. या अनुषंगाने चित्रपट, मनोरंजन क्षेत्रासाठी धोरण असावे या मुख्य उद्देशातूनच तीन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्राचा उद्देश या क्षेत्रातील महाराष्ट्राचे अग्रस्थान बळकट करणे, राज्यात चित्रपट निर्मिती आणि मनोरंजन माध्यम केंद्र प्रस्थापित करणे आणि या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देणे असा असणार आहे.

चित्रीकरण केंद्र बनविणे,चित्रपट माध्यम व करमणूक क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देणे,चित्रपट माध्यम व करमणूक क्षेत्राच्या वाढीसाठी सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देणे, प्रादेशिक चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देऊन चित्रपट, माध्यम व करमणूक क्षेत्रातील कौशल्य विकास वृद्धिंगत करणे यासारख्या सर्वांगीण विषयांचा समावेश असणार आहे, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

या चर्चासत्राच्या दरम्यान केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या उपक्रमाचे कौतुक केले. मुंबई ही सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात असताना आजच्या काळात चित्रपट, माध्यम व करमणूक धोरण आखण्यासाठी ठोस सूचना मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.या चर्चासत्रात चित्रपट क्षेत्रातील प्रतिनिधी आणि अनेक नामवंत तज्ञ मंडळी सहभागी झाले होते.

‘मास्क नाही-प्रवेश नाही’ यासह सर्व नियमांचे काटेकोर पालन करून नाट्यप्रयोग करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. 5 : नाटकांसाठी आता सरकारने तिसरी घंटा वाजविली आहे, मात्र कोरोनाची भीती अद्याप गेलेली नाही हे लक्षात  घेऊन निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नाट्यप्रयोग करा व कलाकार तसेच प्रेक्षकांची काळजी घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मराठी रंगभूमीदिनानिमित्त त्यांनी नाट्य निर्माते, कलाकार यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय हे देखील सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, कोरोना नंतरच्या काळात निर्मात्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या विविध मागण्या येत आहेत. नाट्यगृहांच्या भाड्याच्या बाबतीत आपल्या मागणीवर शासन नक्की विचार करेल. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ असे आपण म्हणतो पण आता पुढील काळात ते अत्यंत खबरदारीने टाकणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी लंडन आणि युरोपमध्ये कोरोनाचे संकट परत वाढले आहे याची जाणीव करून दिली.

चित्रपट आणि थिएटर यात फरक हा आहे की इथे रिटेक नाही. त्यामुळे अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. प्रत्येक निर्मात्याने कलाकारांचे चेकअप करावे, स्टेजवर कलाकारांनी अंतर ठेवावे, स्वच्छता ठेवावी. थिएटरमध्ये सुद्धा ‘नो मास्क नो एन्ट्री’ असे असले पाहिजे. नाट्यगृहाबाहेरील खाण्याचे स्टॉल्स देखील नियम पाळतात की नाही हे पाहिले पाहिजे, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले की, बऱ्याच कालावधीनंतर नाट्यगृहे उघडतो आहोत. अनेक छोट्या मोठ्या समस्या येतील. आपण सर्वांनी बरोबर राहून यातून मार्ग काढू, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

यावेळी आदेश बांदेकर, सुबोध भावे, मंजिरी भावे, अमेय खोपकर, प्रदीप कबरे, बिभीषण चवरे, डॉ.गणेश चंदनशिवे, प्रदीप वैद्य, प्रसाद कांबळी, यांनी चर्चेत सहभाग घेऊन काही सूचनाही केल्या.

महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

0

मुंबई, दि. ५ : दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी नागरिकांना केले आहे. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून फिव्हर सर्वेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही श्री. टोपे यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठीच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला.

बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डेथ ऑडीट कमिटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे, राज्य साथरोग नियंत्रण कक्ष समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, राज्याचा मृत्यूदर कमी करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. ज्या रुग्णालयांमध्ये मृत्यूदर अधिक आहे त्या ठिकाणी रुग्णालयस्तरावरच डेथ ऑडिटी कमिटी नेमून शासनाला अहवाल देण्याचे यावेळी तज्ज्ञांनी संगितले.

५०० लॅबच्या माध्यमातून चाचण्यांवर अधिक भर

राज्यात कोरोनाची दुसरी लाट शक्यतो येणार नाही मात्र संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी खबरदारीची उपाययोजना करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. सध्या राज्यात कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत त्यात खंड पडणार नसून त्याउलट अधिक प्रभावीपणे ५०० लॅबच्या माध्यमातून चाचण्यांवर अधिक भर दिला जाणार असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.

राज्यभरात फिव्हर सर्वेलन्स वाढविणार

थंडीमध्ये इन्फ्लुएन्झासारखे आजार वाढतात. त्यामुळे तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून खासगी डॉक्टरांनी तापाच्या रुग्णांचे लक्षणानुसार तातडीने चाचण्या करण्यासाठी प्राधान्य देण्याचे समितीने सुचविले आहे. त्यानुसार राज्यभरात फिव्हर सर्वेलन्स वाढविणार असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले.

‘सूपर स्प्रेडर’यांच्या चाचण्यांवर भर

राज्यभरात किराणा दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक, सार्वजनिक वाहतुकीतील कर्मचारी ज्यांचा लोकांशी कायम संपर्क येते अशा ‘सूपर स्प्रेडर’ यांच्या चाचण्यांवर भर देण्याचे निर्देश क्षेत्रिय पातळीवरील यंत्रणेला देण्यात आले आहेत.

डॉक्टर्स,नर्स यांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम

लहान शहरांमधील रुग्णालयांमध्ये आयसीयुमधील डॉक्टर्स, नर्स यांची कमतरता लक्षात घेऊन तेथील कर्मचाऱ्यांना सिम्युलेशन लॅबच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय कायम

राज्यात सध्या कोरोनासाठी ज्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत तसेच जी सुविधा निर्माण करण्यात आली आहे ती कायम ठेऊन त्यात अजून वाढविण्यासाठी प्रयत्न करतानाच खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णयही कायम राहील. त्याचप्रमाणे टास्क फोर्सने जी आदर्श उपचार कार्यपद्धती तयारी करून दिली आहे त्यानुसार उपचार करण्याचे आवाहन श्री. टोपे यांनी केले.

आगामी दिवाळी लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करावा. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरे करण्याचे आवाहन आरोग्मयंत्र्यांनी केले आहे. महाराष्ट्र फटाकेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर मागणी करणार असल्याचेही श्री. टोपे यांनी सांगितले.

सोने-चांदीच्या दरात उसळी

0

मुंबई : अमेरिकन राष्ट्रध्यक्षपदाची मत मोजणी निर्णायक टप्प्यावर आली असून त्याचे पडसाद कमॉडिटी बाजारावर उमटत आहेत. सोने आणि चांदीने आज गुरुवारी सकाळी जोरदार उसळी घेतली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५१२५८ रुपये आहे. त्यात ४३८ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीत देखील ६७४ रुपयांची वाढ झाली असून एक किलोचा भाव ६२०६३ रुपये झाला आहे.goodreturns.in या वेबसाईटनुसार गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९९०० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ५०९१० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९६६० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५४१६० रुपये आहे. कोलकात्यात ग्राहकांना २२ कॅरेट सोने खरेदीसाठी ४९७६० रुपये मोजावे लागत आहेत. तर २४ कॅरेटचा भाव ५२९६० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोने प्रती १० ग्रॅमसाठी ४७९०० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२२६० रुपये आहे. सोमवारी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली होती. तर मंगळवारी आणि बुधवारी घसरण झाली होती. बुधवारी बाजार बंद होताना सोने ५०८१० रुपयांवर बंद झाले होते. त्यात ७८८ रुपयांची घसरण झाली. चांदीचा भाव १३६५ रुपयांनी कमी झाला होता.जागतिक बाजारात आज सोन्याचा भाव प्रती औंस भाव १९०४.६६ डॉलर आहे. चांदीच्या दरात ०.३ टक्के वाढ झाली असून चांदीचा भाव प्रती औंस २३.९८ डॉलर आहे. इतर चलनांच्या तुलनेत डॉलर इंडेक्स ०.०२ टक्क्यांनी वधारला आहे. त्याआधीच्या सत्रात डॉलर इंडेक्स ०.८ टक्क्यांनी वधारला होता.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीचे प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणी कलानुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात अटीतटीची लढत सुरू असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी निर्णायक आघाडी घेतली असून विजयासमीप ते पोहचले आहेत.

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडेन बहुमताच्या 270 आकड्या जवळ

0

अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे श्वेत-कृष्णवर्णीय हे कार्ड अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. मतदानपूर्व सर्व्हेचे निष्कर्ष चुकीचे ठरवत ते तगडी लढत देण्यात यशस्वी ठरले. मतदानानंतरच्या चाचणीनुसार, ट्रम्प यांच्या अप्रवासी धोरणाविरुद्ध ८७% आणि ६७% आशियाई वंशाच्या लोकांनी डेमाेक्रॅटिक पक्षाच्या जो बायडेन यांना मतदान केले. २० वर्षांतील सर्वात रोमांचक लढतीत बायडेन विजयाकडे वाटचाल करत आहेत. त्यांना २३७ इलेक्टोरल मते पडली आहेत. ३३ मते असलेल्या ३ राज्यांत ते आघाडीवर आहेत. तर, ट्रम्प यांना २१३ मते असून ५४ इलेक्टोरल मते असलेल्या ४ राज्यांत ते आघाडीवर आहेत. व्हाइट हाऊसमध्ये विराजमान होण्यासाठी २७० मते हवी आहेत. अद्याप पेन्सिल्व्हेनिया, जॉर्जिया, विस्कोन्सिन आणि नॉर्थ कॅरोलिनासारख्या राज्यांतून टपालाने पाठवलेली मते मोजलेली नाहीत. म्हणूनच ११६ वर्षांत प्रथमच मतदानादिवशी राष्ट्राध्यक्ष ठरला नाही. या राज्यांतील ८० लाख मतांची मोजणी होण्यापूर्वीच ट्रम्प यांनी आपल्या विजयाची घोषणा केली होती. या मतांमध्ये घोटाळे झाल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी कोर्टात जाण्याची धमकीही दिली आहे. तर, बायडेन यांनी लोकांना संयम राखण्याचे आवाहन करत आपण विजयाकडे वाटचाल करत असल्याचे म्हटले आहे. उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी म्हटले आहे की, पूर्ण मतमोजणी होईपर्यंत निकाल स्पष्ट होणार नाही. भारतीयांची अधिक लोकसंख्या असलेल्या ६ पैकी ५ राज्यांत बायडेन यांच्या पक्षाला विजय मिळाला आहे. भारतीय वंशाचे डॉ. अमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमूर्ती विजयी झाले आहेत. रिपब्लिकन नीरज अंतानी ओहायोतून सिनेटमध्ये दाखल झाले आहेत. न्यूयॉर्कमधून मीरा नायर यांचा मुलगा जोहरान व वकील जेनिफर राजकुमार विजयी ठरले.

> १९९२ पासून आतापर्यंत अध्यक्षांना दोन टर्म: १९९२ पासून २०१६ पर्यंत केवळ तीन अध्यक्ष झाले. बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बराक ओबामा. ट्रम्प हरले तर जॉर्ज डब्ल्यू बुश सीनियर यांच्यानंतर अमेरिकेत एकही अध्यक्ष दुसऱ्यांदा निवड झालेला नाही.

> परंतु, ट्रम्प यांना २०१६ च्या तुलनेत अधिक मते : ट्रम्प यांना आतापर्यंत ६.७ कोटींहून अधिक मते पडली आहेत. २०१६ मध्ये त्यांना ६.३ कोटी मते पडली होती. बायडेन यांना आतापर्यंत ६.९५ कोटी मते पडली आहे. २०१६ मध्ये हिलरी क्लिंटन यांना ६.६ कोटी मते पडली होती.

गेमचेंजर: 6.5 कोटी टपाली मते ठरवणार नवा राष्ट्राध्यक्ष

अमेरिकेत प्रथमच टपालाने पाठवलेली मते सरकार पलटवू शकतात. यंदा टपालाने (मेल-इन) विक्रमी ६.५ कोटी मते पडली होती. हा घोळ असल्याचे ट्रम्प सुरुवातीपासूनच म्हणत आहेत. दुसरीकडे, बायडेन व कमला हॅरिस यांनीही आपली मते टपालाने पाठवली. ट्रम्प यांनी बूथवर जाऊन मतदान केले आणि आपल्या समर्थकांना मतदानाच्या दिवशीच मतदानाचे आवाहन केले. आता हीच टपाली मते ट्रम्प यांची व्हाइट हाऊसमधून गच्छंती करू शकतात. आता फक्त मेल इन मतांची माेजणी बाकी आहे. यात बायडेन आघाडीवर असल्याचे अमेरिकेचे सर्व पोल सांगत आहेत. यामुळे ट्रम्प सुरुवातीपासून त्याविरुद्ध बोलत आलेले आहेत.

अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयांनी कोठडी

0

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ, पत्रकार अर्णब गोस्वामी यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अलिबाग कोर्टाकडून अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयांनी कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. आज सकाळी अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक केली गेली आहे. यानंतर त्यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आलं. अन्वय नाईक यांनी मे २०१८ मध्ये त्यांच्या राहत्या घरी अलिबागमध्ये आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्याने अन्वय नाईक यांना आत्महत्या करावी लागली असा आरोप नाईक कुटुंबियांकडून केला गेलाय.

अर्णब गोस्वामी यांची दुसऱ्यांदा मेडिकल टेस्ट केल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता कोर्टात पुन्हा सुनावणीला सुरवात केली गेली. आता अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मुंबईत कलम ३५३ अंतर्गत आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि पोलिसांसोबत गैरवर्तन करणे, या आरोपात अर्णब गोवामी यांच्याविरोधात मुंबईतील लोअर परळमधील ना म जोशी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुधवारी सकाळी मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली. यावेळी गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीने पोलिसांच्या कारवाईला विरोध केला. यावेळी अर्णब यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

५ नोव्हेंबरपासून जलतरण तलाव, योगा संस्था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी

0

मुंबई :  उद्या दिनांक ५ नोव्हेंबरपासून राज्यातील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलाव, योगा संस्था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि काही इनडोर खेळांना सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती देताना असे म्हटले आहे की, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलावांना परवानगी देण्यात येत आहे. यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देश लागू असतील.

प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर असलेल्या योगा संस्थांना पुनश्च सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील.

बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोर शूटिंग सारख्या इनडोर क्रीडा प्रकारांनाही शारीरिक अंतर आणि सॅनिटेशनसंबंधी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर पाच नोव्हेंबरपासून मुभा देण्यात येत आहे.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स यांनाही ५० टक्के आसन व्यवस्था पालन करण्याच्या अटीवर प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर पुन्हा सुरू करण्यासाठीही अनुमती देण्यात आली आहे. परंतु चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्समध्ये कोणत्याही खाद्यपदार्थांना परवानगी नसेल. यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना सांस्कृतिक कार्य विभाग तथा स्थानिक प्रशासनाद्वारे लागू असतील.

मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड-19 प्रतिबंधक मार्गदर्शक निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो कोटी रुपयांचे वसुलीचे दावे प्रलंबित:कागदपत्रांना वाळवी -पुणे डीआरटी बार असोसिएशनचा दावा

0

पुणेकर्जवसुली प्राधिकरण पुणे अर्थात डी आर टी या न्यायालयात राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज वसूली संबंधित हजारो कोटी रुपयांचे वसुलीचे दावे प्रलंबित असून या न्यायालयात पुणे सहित इतर सात जिल्ह्याचे कार्यक्षेत्र दिलेले आहे. या न्यायालयाच्या इमारतीमध्ये वसुली दाव्यांच्या प्रकरणांच्या फाईलींची अतिशय दुरावस्था झाली असून आज दिनांक 4 नोव्हेंबर बुधवार रोजी पुणे डीआरटी बार असोसिएशन यांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्ज वसुली प्रकरणांच्या मूळ कागदपत्रे वाळवी आणि मुंग्या लागून नष्ट झाली हि बाब कर्जवसुली प्राधिकरणाच्या प्रबंधक यांच्या नजरेस आनून दिली आणि अशाप्रकारे कर्जवसुली दाव्यांमध्ये गंभीर अडचण निर्माण होऊ शकते आणि हा जनतेचा पैसा वसूल न झाल्यास राष्ट्रीय नुकसान होऊ शकते. इतकी गंभीर परिस्थिती असून सुद्धा कर्जवसुली प्राधिकरण न्यायालय अन्य चांगल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करावे अशी मागणी पुणे डिआरटी बार असोसिएशनने वारंवार केंद्र शासनाकडे केलेली आहे. परंतु आजतागायत याची गंभीर दखल न घेतल्यामुळे कागदपत्रे नष्ट होण्याची परिस्थिती ओढवलेली आहे.असा दावा पुणे डीआरटी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅॅड.विजय चांडवले,तसेच योगेश हिरवे आणि पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

त्यांनी असे म्हटले आहे कि,’ बार असोसिएशन यांच्यातर्फे केंद्र शासनास वारंवार विनंती करण्यात आली आहे की कर्जवसुली प्राधिकरणाची इमारत पुणे शहरातील शहरातील चांगल्या सुविधा असलेल्या इतर इमारतीमध्ये तात्काळ स्थलांतरित करावी वसुलीचे दावे हे तात्काळ निकाली काढावेत तसेच व राष्ट्रीय नुकसान वाचेल अशी आमची मागणी आहे तसेच या न्यायालयात गेल्या एक वर्षापासून न्यायाधीशाचे पद रिक्त असून तात्पुरता पदभार हैदराबाद येथे आहे व त्यामुळे हजारो कोटी रुपयांचे वसुलीचे दावे हे प्रलंबित पडलेले असून वसुलीची कार्यवाही ठप्प झालेली आहे तरी पुणे डिआरटी बार असोसिएशनची अशी आग्रहाची मागणी आहे कि राष्ट्रीय हितासाठी व शासनाच्या पैशाच्या वसुलीसाठी तात्काळ कर्जवसुली प्राधिकरण पुणे येथे प्राधिकृत अधिकारी तथा न्यायाधीश यांची नेमणूक करावी व कर्ज वसुली प्रकरणांना न्याय देऊन राष्ट्रीय हिताचे रक्षण करावे.असेही पुणे डीआरटी बार असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

कोरोना प्रतिबंधक लस उपलब्धतेनंतर ती जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून पूर्वतयारी- जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख

0

पुणे, दिनांक 4- कोरोना जागतिक साथ उद्रेक सुरु असतानाच या आजारावर लस शोधण्याचे अविरत प्रयत्न सुरु आहेत. या अनुषंगाने कोविड १९ या आजारावर लवकरच लस उपलब्‍ध होईल असे अनुमानित करून भारत सरकारने तयारी सुरु केली आहे. लस उपलब्धतेनंतर ती वेगाने जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून NEGCAV (National Expert Group on Vaccine Administration for COVID 19) स्थापना करण्यात आली असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.
जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख म्‍हणाले, या माध्यमातून लसीकरणासाठी प्राधान्य घटक ठरवणे, लसीकरण मागणी, साधनसामुग्री व लस देण्‍याबाबतची व्‍यवस्थेबाबत मार्गदर्शक सूचना ठरवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून CVBMS ( COVID 19 Vaccination Beneficiary Management System) ही प्रणाली तयार करण्यात येत आहे. प्रथम फेरीत आरोग्य संस्था व आरोग्य व्‍यवस्थेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची माहिती एकत्र करण्यात येत आहे. यामध्ये खाजगी व शासकीय संस्था यांचा समावेश आहे. या घटकांना लस उपलब्ध झाल्‍यानंतर कोविड १९ लसीकरणामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे व यांच्या माध्यमातून पुढील लसीकरण कार्यक्रम राबवण्‍यात येणार आहे.
पुणे जिल्‍ह्यामध्‍ये अंदाजे 1 लाख 10 हजार आरोग्य व्यवस्थेत काम करणारे विविध घटक आहेत, या अनुषंगाने माहिती मागवणे, एकत्रित करणे. ही माहिती सीव्‍हीबीएमएस प्रणालीवर अपलोड करणे तसेच प्रशिक्षण, लसीकणाची साधन सामुग्री उपलब्धता, आवश्यक मनुष्यबळ इत्‍यादी बाबत आढावा सुरु करण्‍यात आला असून यासाठी UNDP यांचे सहकार्य घेण्‍यात येत असल्‍याचेही जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.
आरोग्य व्यवस्थेतील कोविड १९ लसीकरणासाठी प्राधान्याने निवड करण्‍यात आलेले घटक (शासकीय व खाजगी संस्था दोन्हीकरिता)
1)अग्रभागी कार्यरत कर्मचारी ( front line health workers)- आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका,गटप्रवर्तक, तालुका समूह संघटक तसेच अंगणवाडी सेविका इत्‍यादी
2) नर्स सुपरव्हायजर : PHN, LHV, CHO, HA, BEO ( H ) इत्‍यादी
3) वैद्यकीय अधिकारी: MBBS, Post graduate, Teaching and Non teaching, Administrative doctors, AYUSH Doctors, Dentists.
4) Paramedical staff : OT technicians LAB Technicians, pharmacists, physiotherapists, radiographers, ward boys etc
5) Scientists and Research staff
6) Students : medical, dental, AYUSH Nursing and Paramedical students
7) Support Staff dietary staff, CSSD staff, BMW staff, Sanitation workers, Ambulance drivers, Security staff, other support staff
8) Clerical and administrative staff – data entry operators, engineers, clerical staff in hospital
9) Other health staff working in the facility not covered above
मार्च २०२० मध्ये पुणे जिल्‍ह्यात कोविड १९ चा प्रथम रुग्‍ण आढळल्यापासून आरोग्‍य यंत्रणा पूर्ण क्षमतेने अहोरात्र काम करत आहे. त्यात शासकीय व खाजगी दोन्ही क्षेत्रात हे काम सुरु आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत दैनंदिन सर्वेक्षण, संपर्क शोध, किरकोळ आजार ते गंभीर आजारी रुग्णांचे अति दक्षता विभागातील व्यवस्थापन इत्‍यादी कार्य अव्याहतपणे सुरु आहे. या प्रक्रियेमध्ये आरोग्य यंत्रणेतील अनेकांना कोविड लागण झाली. काहींना आपले प्राण गमवावे लागले. तरीही माघार न घेता आरोग्य यंत्रणेतील आपले कोविड योद्धे कोरोना प्रतिबंधाचे कार्य करीत आहेत व या पुढेही हे कार्य असेच सुरु राहणार आहे, असा विश्‍वास जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलेल्‍या संदेशात व्‍यक्‍त केला आहे.
कोविड १९ लस उपलब्ध झाल्‍यानंतर ती सर्व जनतेपर्यंत पोहोचवणे हे एक मोठे आव्हान असणार आहे आणि ही लस आरोग्य व्यवस्थेमार्फत जनतेपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे ही लस देताना कोविड १९ चा प्रसार रोखला जाईल हे पाहणे जितके महत्त्वाचे आहे. तेव्हढेच आरोग्य यंत्रणेतील घटकांचे कोविड १९ पासून संरक्षण करणे हेही आवश्‍यक आहे. यामुळे प्राधान्याने आरोग्य व्यवस्थेतील सर्व घटकांना ही लस देणे आवश्यक ठरते, असेही जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख यांनी म्‍हटले आहे.
भविष्यात येणारी कोरोना लस व सद्यस्थिती: कोविड १९ लसी संदर्भात सध्या मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे. अनेक लसी फेज ३ ट्रायलमध्ये आहेत. लवकरच लस उपलब्ध होईल, अशी आशा आहे. तरीही या प्रक्रियेसाठी व लस तयार झाल्‍यानंतर ती सर्व जनतेपर्यंत पोहोचताना वेळ लागणार आहे. सध्या पुणे जिल्हा व राज्यात कोरोनाचे रुग्‍ण कमी झाले आहेत. दैनंदिन अहवाल पाहता रुग्ण संख्‍या व मृत्यु कमी झाल्‍याचे दिसून येते. तथापि, युरोप, दिल्ली, केरळ या ठिकाणी परत रुग्ण संख्या वाढताना दिसून येत आहे आणि ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. आवश्यक काळजी न घेतल्यास आपल्याकडेही अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे पुढील काळात लस उपलब्ध होईपर्यंत सर्वांनी सतर्क राहून सुरक्षित अंतर (६ फूट), मास्कचा वापर व हातांची स्वच्छता या त्रिसूत्रीचा सातत्याने वापर करणे आवश्यक असल्‍याचेही जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख यांनी म्‍हटले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारू -आ.चंद्रकांतदादा पाटील

0

नागपूर:-अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्यास राज्य सरकारकडून विलंब होत आहे. परिणामी राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाईल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केले. प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, विदर्भात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी काहीच हालचाल केलेली नाही. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आघाडी सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात राज्य सरकारला आलेल्या अपयशाचा जाब नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला विचारला जाईल.

कांजूरमार्ग येथील मिठागराच्या जमिनीवरून सुरु असलेल्या वादाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की आघाडी सरकार नियम, संकेत बाजूला ठेवून काम करत आहे. मिठागरांच्या जमिनीवर कार शेड उभे करायचे झाल्यास त्यासाठी प्रचंड खर्च येणार आहे, परिणामी मेट्रो प्रकल्प आणखी रेंगाळणार आहे.

यावेळी श्री . पाटील यांनी रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा तीव्र निषेध केला. सोनिया गांधींच्या विरोधात मत व्यक्त केले म्हणून गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. गांधी घराणे, काँग्रेस आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात बोलणाऱ्या पत्रकारच नव्हे तर सामान्य माणसांचाही आवाज बंद करण्याचा प्रयत्न महाआघाडी सरकारच्या राजवटीत होत आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपाचा अलिबाग येथे मोर्चा

0

मुंबई- रिपब्लिकन चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ विधानपरिषदेचे विरोधी नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आज अलिबाग न्यायालयलाबाहेर जोरदार आंदोलन केले. कायदा सर्वांना समान आहे व तो आम्हालाही मान्य आहे. परंतु अर्णब गोस्वामी यांना करण्यात आलेली अटक म्हणजे सरकारने सूडभावनेने केलेली कारवाई आहे. लोकशाहीच्या चौथा स्तंभाच्या पाठीशी भाजप ठामपणे उभे आहोत. परंतु महाराष्ट्रातील ठाकरे सरकारची हुकुमशाही या प्रकारची प्रवृत्ती आम्ही खपवून घेणार नाही असा जोरदार इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला.
भाजपाने हा निषेध मोर्चा भाजपा पक्ष कार्यालय ते अलिबाग न्यायालय असा काढला केला होता. भारत माता की जय…,वंदे मातरम, आणीबाणी लावणा-या सरकारचा धिक्कार असो.. महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो…मुर्दाबाद मुर्दाबाद ठाकरे सरकार मुर्दाबाद…अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी भाषण केले.
यावेळी माजी खासदार किरिट सोमय्या, आमदार रविशेठ पाटील, आमदार राहुल नार्वेकर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, कृष्णा कोबनाक, पनवेलच्या महापौर कविता चौतमल, उपमहापौर जगदीश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, आज आणीबाणी सदृश्य परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे कारण काँग्रेसने १९७५ मध्ये लावलेल्या आणीबाणीला शिवसेनेने समर्थन केले होते आणि पुन्हा अश्या प्रकारचे वातावरण या राज्यात निर्माण होतेय, जी केस बंद केली आहे ती पुन्हा उकरून काढायची आणि केवळ दिखावा करण्याचा प्रयत्न केला जोतोय. नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी आम्ही गोस्वामी यांना अटक करत आहे, पण यामागील मूळ उद्देश हा मीडियाची मुस्कटदाबी करणे हाच आहे असा आरोपही त्यांनी केला.
सूडाचा अंत हा वाईटच असतो. मग तो कुठलाही पक्ष असो वा कुठलेही सरकार, कोणालही सूडाने फार काळ वागता येत नाही. जेव्हा देशात आणीबाणी झाली त्यावेळी जनतेने काय उठाव केलाय हे देशाने पाहिले आहे. मोठे सत्ताधीश व दिग्गज उध्वस्त करण्याची ताकद या जनतेत आहे. जेव्हा अत्याचार होतात तेव्हा जनतेमध्ये यांना उध्वस्त करण्याची ताकद असते आणि तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास जनतेचा उद्रेकच या सरकारला यांची जागा दाखवून देईल अशी टिकाही दरेकर यांनी केवली.
राज्यात आणीबाणी सारखे वातावरण होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टी वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी त्यांच्या पाठीशी उभी आहे असे स्पष्ट करतानाच ते म्हणाले की, याप्रकरणात महिलेचे कुंकू पुसण्याची गोष्ट काही जण करत आहेत पण महाराष्ट्रात तुमच्या सरकारच्या काळात अनेक महिलांचे कुंकू पुसले गेल्याच्या घटना आहेत, मग या निमित्ताने त्याही केसेस बाहेर काढाव्यात. परंतु केवळ अर्णब गोस्वामी यांना याप्रकरणात अडकवायचे हाच उद्देश्य असेल तर ते अत्यंत वाईट आहे. केवळ नाईक कुटुंबिय नाही तर महाराष्ट्रातील ज्या-ज्या महिलांवर अत्याचार झाले आहेत, त्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. परंतु केवळ अर्णब गोस्वामी यांना टार्गेट करण्यासाठी या केसचा आधार घेतला जातोय व या माध्यमातून ठाकरे सरकार खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहे असा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.

चित्रपट व मनोरंजन क्षेत्राच्या धोरणनिर्मितीसाठी ५ ते ७ नोव्हेंबर दरम्यान चर्चासत्राचे आयोजन

0

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजन.

मुंबई, दि.4 : महाराष्ट्र हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान असून चित्रपट व करमणूक माध्यमांच्या क्षेत्रात कायमच अग्रेसर राहिले आहे. चित्रपट व माध्यम मनोरंजन क्षेत्रासाठी धोरण असावे या मुख्य उद्देशातून महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून ५ ते ७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत ‘पॅनोरमा इन्वीशनिंग फिल्म मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट पॉलिसी फॉर महाराष्ट्र’ या विषयावर तीन दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

5 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने उद्घाटनपर सत्र सुरू होणार आहे. हे चर्चासत्र फेसबुक लाइव्ह व यूट्यूब च्या माध्यमातून सर्वांसाठी खुले राहणार आहे. या सत्राचा उद्देश या क्षेत्रातील महाराष्ट्राचे अग्रस्थान बळकट करणे, राज्य चित्रपट निर्मिती आणि मनोरंजन माध्यम केंद्र प्रस्थापित करणे आणि या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देणे असे असेल.

चित्रपट व करमणूक माध्यम क्षेत्र गतीमान व्हावे यासाठी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या वेबिनारमध्ये राज्यात जागतिक स्तरावरील चित्रीकरण केंद्र बनविणे, चित्रपट माध्यम व करमणूक क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देणे, चित्रपट माध्यम व करमणूक क्षेत्राच्या वाढीसाठी सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देणे, चित्रपटसृष्टीशी निगडीत पर्यटन आणि त्याचे फायदे यांचा अभ्यास करणे, प्रादेशिक चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देऊन चित्रपट, माध्यम व करमणूक क्षेत्रातील कौशल्य विकास वृद्धिंगत करणे यासारख्या सर्वांगीण विषयांचा समावेश असेल.

चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच चित्रपट सृष्टी व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि अनेक नामवंत तज्ज्ञ सहभाग घेणार आहेत.

या चर्चासत्राद्वारे राज्याचे चित्रपट, माध्यम व करमणूक धोरण आखण्यासाठी ठोस सूचना, मार्गदर्शन मिळणे तसेच या क्षेत्राच्या वाढीसाठी सुयोग्य वातावरण उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. चित्रपट व करमणूक माध्यमाचे प्रस्तावित धोरण तयार करताना या क्षेत्रातील समस्यांचे तातडीने प्रभावी निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून या क्षेत्रातील तज्ज्ञ नामवंतांची मते जाणून घेणे हा वेबिनार मागचा मुख्य हेतू आहे. याशिवाय महाराष्ट्र हे केवळ राष्ट्रीय स्तरावरील नव्हे तर जागतिक स्तरावरील निर्मात्यांसाठी आदर्श चित्रीकरण स्थळे म्हणून विकसित करण्यासाठी करावयाच्या संभाव्य उपाययोजना जाणून घेण्याचा प्रयत्न या चर्चासत्राद्वारे करण्यात येईल. वेबिनार बाबतची तपशीलवार माहिती महामंडळाच्या www.filmcitymumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी, सांस्कृतिक क्षेत्रात रुची असणाऱ्या अधिकाधिक लोकांनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 18 हजार 553

0

पुणे विभागातील 4 लाख 74 हजार 135 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 6 हजार 887 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे:- पुणे विभागातील 4 लाख 74 हजार 135 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 6 हजार 887 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 18 हजार 553 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 199 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.54 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 25 हजार 212 रुग्णांपैकी 3 लाख 5 हजार 945 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11 हजार 404 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 863 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.08 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 932 रुग्णांपैकी 42 हजार 680 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 684 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 568 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 41 हजार 78 रुग्णांपैकी 37 हजार 440 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 166 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 472 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 394 रुग्णांपैकी 42 हजार 369 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 375 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 650 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 271 रुग्णांपैकी 45 हजार 701 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 924 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 646 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 9 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 546, सातारा जिल्ह्यात 157, सोलापूर जिल्ह्यात 184, सांगली जिल्ह्यात 74 तर कोल्हापूर जिल्ह्यात 48 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 623 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 680 ,सातारा जिल्हयामध्ये 546, सोलापूर जिल्हयामध्ये 137, सांगली जिल्हयामध्ये 217 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 43 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 24 लाख 31 हजार 838 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 6 हजार 887 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 3 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )