Home Blog Page 2399

ससून रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा

0

पुणे,दि.12:- ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिनस्त 20 शय्या आयुर्वेदीक कक्षात ‘५ वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ साजरा करण्यात आला. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवात धन्वंतरी पूजनाने झाली.

                यावेळी आयुर्वेद विभागाचे विभाग प्रमुख वैद्य व्यंकट धर्माधिकारी तसेच श्री लक्ष्मण लावगनकर, श्रीमती अर्पणा सोल, रिया बोन्तापले, डॉ.हरिश, डॉ.सपना यादव आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

                याप्रसंगी बोलताना डॉ.मुरलीधर तांबे यांनी कोवीड-19 विषयी आयुर्वेद योगदानाची माहिती दिली आणि आयुर्वेद संशोधनासंदर्भात आयुर्वेद डॉक्टरांनी पुढे येऊन काम करावे, असे आवाहन केले. आयुर्वेद विभागाचे विभाग प्रमुख वैद्य व्यंकट धर्माधिकारी यांनी आयुर्वेदिक कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच सर्वांनी आयुर्वेदातील दिनचर्या, ऋतूचर्या, आहार इत्यादी बाबींचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले.  आभार अर्पणा सोले यांनी मानले.

राज्यपालांकडून सर्वांना ‘शुभ दीपावली’

0

मुंबई, दि. 12 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपावलीच्या मंगल पर्वावर सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. कोरोनाचे गंभीर आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळी सुरक्षित, पर्यावरणयुक्त व प्रदुषणमुक्त वातावरणात साजरी करावी, असे आवाहन करतो. दिवाळीच्या आनंदात किमान एका गरीब व उपेक्षित व्यक्तीला सामावून घेतल्यास ही दिवाळी खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक होईल. हा प्रकाशोत्सव सर्वांच्या जीवनात सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो, असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

आयुष विभागीय कार्यालयात राष्‍ट्रीय आयुर्वेद दिन साजरा

0

पुणे- सहायक संचालक (आयुष) यांच्‍या विभागीय कार्यालयात उपसंचालक (माहिती) राजेंद्र सरग यांच्‍या उपस्थितीत व सहायक संचालक डॉ. व्यंकट धर्माधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली राष्‍ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्‍यात आला.

यावेळी प्रशासकीय अधिकारी प्र.द.सोमवंशी, अंजली कांबळे, अशोक शेगर, जगदीश कुलकर्णी, रणजित ढेरे

पंचाक्षरी पाटील, राजू मोहोळ, सुनील भोसले हे उपस्थित होते. उपसंचालक सरग यांनी ‘कोविड-19 महामारीसाठी आयुर्वेद’ या संकल्‍पनेवर आधारित विचार व्‍यक्‍त केले. कोरोना किंवा कोविड-19 वर अजूनही लस सापडलेली नाही, तथापि, खबरदारी आणि गरजेनुसार आयुर्वेद उपचार पध्‍दती यामुळे या आजारापासून मुक्‍तता मिळवता येवू शकते. आपली रोगप्रतिकारक शक्‍ती वाढवणे आणि कोरोनापासून बचाव करणे याचा अवलंब करणे गरजेचे असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. आयुर्वेद ही उपचार पध्‍दती मुळापासून रोग नष्‍ट करणारी असल्‍याने तिचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे.

सहायक संचालक डॉ. व्यंकट धर्माधिकारी यांनी आयुर्वेदाचे महत्‍त्‍व विशद केले. आयुर्वेदीक कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी विविध योजना मांडल्या तसेच निरोगी दीर्घायुष्यासाठी सर्वांनी आयुर्वेदातील दिनचर्या, ऋतुचर्या, आहार आदी बाबींचा अवलंब करावा, असे सांगितले. प्रारंभी राजेंद्र सरग यांच्‍या हस्‍ते धन्वंतरीचे पूजन करण्‍यात आले. प्र.द.सोमवंशी यांनी आयुष विभागाच्‍या कार्याची माहिती दिली. अशोक शेगर यांनी सूत्रसंचालन तर जगदीश कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.

महिला व बालकांवरील अत्याचारांना लगाम घालण्यासाठी नियोजनबद्ध काम करणार

0

मुंबई, दि. 12 : महिला व बालकांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीला लगाम घालून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी महिला व बालविकास विभाग नियोजनबद्धरित्या काम करेल, अशी ग्वाही महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली.

बालदिनानिमित्त महिला व बालविकास विभाग आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात कोविड काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल कोविड योद्ध्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, आयुक्त डॉ.ऋषिकेश यशोद, युनिसेफच्या बालसंरक्षण तज्ज्ञ अल्पा वोरा, मॅक्सवुमनच्या संपादक प्रियदर्शनी हिंगे व्यासपीठावर उपस्थित होत्या

महिलांच्या कल्याणासाठी खूप काम करणे आवश्यक असून महिला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी येत्या काळात करायची आहे, असे सांगून ॲड. ठाकूर म्हणाल्या की, महिला, बालके तसेच तृतीयपंथीयांच्या मागे ज्याप्रमाणे शासन उभे आहे त्याचप्रमाणे समाजानेही उभे राहिले पाहिजे. अत्याचारग्रस्त बालके आणि महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. बाल लैगिंक शोषण तसेच महिलांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीला लगाम घालायचा असेल तर तो गप्प बसून सहन न करता त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. अशा घटकांना बोलण्यासाठी प्रवृत्त करणे तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विभागाकडून आगामी काळात नियोजनबद्धरित्या काम केले जाईल, असेही ॲड.ठाकूर म्हणाल्या.

कोविड काळामध्ये माता-बाल पोषण, बालविवाह प्रतिबंध, आरोग्य आदी क्षेत्रामध्ये केलेल्या कामाबद्दल तुम्हाला ‘हॅट्स ऑफ’ असे म्हणत ॲड. ठाकूर यांनी यावेळी पुरस्कारार्थींबद्दल गौरवोद्गार काढले. अंगणवाडी सेविकांनी माता-बालकांना पोषण आहार पोहोचविण्यासाठी मोठे काम केले असेही त्या म्हणाल्या. सक्षम महिला, सदृढ बालक आणि सुपोषित महाराष्ट्र ही जन चळवळ गतीमान करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

सचिव श्रीमती कुंदन म्हणाल्या की, बालकांचे कायदेशीर संरक्षण तसेच मानसिक, शारीरिक तंदुरुस्ती साधणे हे महिला व बालविकास विभागाचे प्राथमिक ध्येय्य आहे. पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब गरजेचा असून विभागाने त्यादृष्टीने काम सुरू केले आहे. त्यानुसारच ‘जेजेआयएस’ मोड्यूल विकसित करण्यात आले आहे. बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी महत्त्वाच्या ठरु शकणाऱ्या ग्राम बालसंरक्षण समित्या (व्हीसीपीसी) बळकट करण्याकडे विभाग गांभिर्याने लक्ष देत आहे, असेही कुंदन यांनी सांगितले.

डॉ.यशोद यांनी सांगितले की, महिला व बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने काम करत असताना विविध यंत्रणांशी समन्वयाचे काम आव्हानात्मक असते. त्यासाठी विभागाकडून तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग केला जाईल.

ज्युवेनाईल जस्टीस बोर्डसाठी विकसित करण्यात आलेले ज्युवेनाईल जस्टीस इन्फॉर्मेशन सिस्टीम (जेजेआयएस) मोड्यूल विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकांना बाल न्याय मंडळासमोर सादर करणे, त्यांना समुपदेशन, पुनर्वसन, आवश्यक मदत आदींच्या अनुषंगाने कार्यवाही, पोलिसांकडे अर्ज पाठविणे, तपास अधिकाऱ्यांनी तपास कार्यवाहीचा तपशील भरणे आदी बाबी या माध्यमातून यापुढे ऑनलाईन होणार आहेत. या सर्व प्रक्रिया यापूर्वी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून होत असल्यामुळे विलंब लागत होता. आता ऑनलाईन यंत्रणेमुळे विधीसंघर्षग्रस्त बालकांची देखरेख आणि या प्रक्रियेचे संनियंत्रण ऑनलाईनरित्या करणे सोपे होणार आहे. तसेच सर्व अद्ययावत डाटा वेळीच उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमात जेजेआयएस मोड्यूलचे उद्घाटन, बाल लैंगिक शोषणाच्या अनुषंगाने बालकांचे लैंगिक शोषण, सुरक्षितता त्यांची-जबाबदारी आपली या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन, व्हीसीपीसीसाठी बाल संरक्षणाच्या अनुषंगाने माहितीचा समावेश असलेल्या चित्रफीती, पोस्टर्स आदी साहित्याच्या कीटचे अनावरण यावेळी करण्यात आले. तसेच राज्यात कोविड कालावधीमध्ये विशेष काम केलेल्या आणि सेवा दिलेल्या  महिलांचा गौरव, बाल विवाह प्रतिबंध कामात विशेष कार्य केलेल्या अधिकारी-कर्मचारी आणि संस्थांचा सत्कार, राजमाता जिजाऊ माता-बाल पोषण अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

कोविडदरम्यान आपल्या प्राणांचीही पर्वा न करता कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या कोविड योद्ध्यांना यावेळी ॲड.ठाकूर यांच्या सूचनेनुसार श्रद्धांजली वाहण्यात आली.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 643

0

पुणे विभागातील 4 लाख 84 हजार 537 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 14 हजार 687 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे,दि.12 :- पुणे विभागातील 4 लाख 84 हजार 537 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 14हजार 687 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 643 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 507 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.14 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 29 हजार 490 रुग्णांपैकी 3 लाख 11 हजार 817 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 643 आहेत. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.64 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 296 रुग्णांपैकी 44 हजार 175 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 495 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 626 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 375 रुग्णांपैकी 38 हजार 711 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 144 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 520 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 913 रुग्णांपैकी 43 हजार 569 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 673 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 671 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 613 रुग्णांपैकी 46 हजार 265 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 688 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 660 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 912 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 533, सातारा जिल्ह्यात 141, सोलापूर जिल्ह्यात 152, सांगली जिल्ह्यात 53 तर कोल्हापूर जिल्ह्यात 33 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 400 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 817 ,सातारा जिल्हयामध्ये 301, सोलापूर जिल्हयामध्ये 134, सांगली जिल्हयामध्ये 108 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 40 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 25 लाख 49 हजार 267 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 14 हजार 687 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 11 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

तू सुखकर्ता.. तू दुखहर्ता …

0

दिवाळी निमित्त केलेल्या रोषणाई मुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणराजाचे मंदिर असे तेजोमय झालेले दिसत आहे.

पुण्यभूषण ची ‘पहाट  दिवाळी यंदा ऑनलाईन

0
  • निवडक पहाट मैफिलींचा स्मृतिगंध पुणेकरांच्या भेटीला !

पुणे : त्रिदल -पुणे आणि ‘पुण्यभूषण फौंडेशन ‘ ची ‘पहाट  दिवाळी’ संगीत मैफल  यंदा ऑनलाईन साजरी होणार असून पुण्यभूषण च्या निवडक पहाट मैफिलींचा स्मृतिगंध पुणेकरांच्या भेटीला येणार आहे !

‘ दीपसूर तेजाळती’ असे या पहाट मैफिलीचे नाव असून शनिवार ,१४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ‘पुण्यभूषण फौंडेशन ‘चे संस्थापक डॉ सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

रोटरी क्लब ३१३१ च्या प्रांतपाल रश्मी कुलकर्णी ,डॉ सतीश देसाई हे या पहाट दिवाळीचे आयोजक असून मकरंद टिल्लू यांनी संयोजन सहकार्य केले आहे . यू ट्यूब आणि फेसबुक लाइव द्वारे ही मैफल रसिकांच्या भेटीस येणार आहे . 

‘१९९३ साली ‘त्रिदल ‘  संस्थेने प्रथम ‘दिवाळी पहाट ‘ मैफिलीच्या संकल्पनेला प्रारंभ केला आणि आता जवळपास प्रत्येक गल्लीत ,गावात दिवाळी पहाट साजरी होते . या संकल्पनेमुळे दिवाळी अधिक रंगतदार होऊ लागली आणि नवनवीन प्रतिभांना व्यासपीठ मिळाले. यंदा कोविड साथीमुळे जाहीर मैफल शक्य नसली तरी ऑनलाईन माध्यमातून ही परंपरा सुरू ठेवली जाणार आहे. ‘, असे डॉ. सतीश देसाई यांनी सांगीतले.

मल्टिप्लेक्स सिनेमा संदर्भातील अडीअडचणी सोडविण्याबाबत निश्चित प्रयत्न करणार – मंत्री जयंत पाटील

0

मुंबई, दि. 11 : मल्टिप्लेक्स सिनेमा संदर्भातील अडीअडचणी सोडविण्याबाबत निश्चित प्रयत्न करु, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

मल्टिप्लेक्स सिनेमासंदर्भातील विविध अडीअडचणी सोडविण्याबाबत यूएफओ, सिनेपोलीस व इतर कंपन्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालय येथे मंत्री श्री. पाटील यांना निवेदन दिले.

मल्टिप्लेक्स सुरु करताना येत असलेल्या अडचणी, खाद्यपदार्थ थिएटरमध्ये घेऊन जाण्याची परवानगी तसेच कर परती व इतर अनुषंगिक बाबींबाबत मदत करावी अशा या शिष्टमंडळाच्या मागण्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत चर्चा करुन लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे श्री. पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

अभिनेते सुदीप पांडे, सिनेपोलीसचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवांग संपथ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रविन्द्र मानगावे, यूएफओचे सचिव प्रकाश चाफळकर, पदाधिकारी,अरविंद चाफळकर, शिरीष देशपांडे, विष्णू पटेल आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.

कोरोनाबाबत महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक

0

मुंबई, दि. ११: देशातील विविध राज्यांनी केलेल्या कोरोना उपाययोजनांचा आढावा आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. कोरोनाकाळात महाराष्ट्र राज्याने सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जे नाविन्यपूर्ण निर्णय घेतले, त्याबद्दल डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी कौतुक केले.

या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासह सात राज्यांचा आढावा घेतला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यावेळी उपस्थित होते.

कोरोना नियंत्रणासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून चाचण्यांचे दर कमी करणे, एचआरसीटी चाचण्यांच्या दरांवर नियंत्रण, प्लाझ्माच्या दरावर तसेच मास्कच्या दरांवर नियंत्रण, खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव ठेवणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व नागरिकांना लागू करणे, माझे कुटुंब माझी जबाबदारी  मोहीम यासारखे चांगले व अभिनव निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतले.  ते अन्य राज्यांसाठीही उपयुक्त ठरतील अशा शब्दात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत खासगी डॉक्टरांना विमा संरक्षण मिळावे 

राज्यातील सर्व खासगी डॉक्टरांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण मिळण्याची मागणी आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी केली. त्यावर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी  सांगितले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत कोरोनाविषयक तपासणी व जनजागृती करता आल्याने त्याचा प्रभावी परिणाम दिसून येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी दिली.

दिवाळी सण, हिवाळा या पार्श्वभूमीवर राज्य शासन घेत असलेल्या खबरदारीविषयी आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील ॲक्टिव्ह केसेस कमी झाल्या आहेत. सध्या ९२ हजार रुग्ण उपचाराखाली असून रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संख्या वाढलीच तर त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. खाटांचे नियोजन, औषधांचा साठा पुरेसा असून चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याचा मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जिल्हा टास्क फोर्स करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रत्येक रुग्णालय स्तरावर इन्स्टिट्यूशनल डेथ ऑडिट कमिटी स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय लवकर निदान लवकर उपचारावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘राष्ट्रीय माध्यम पुरस्कार’साठी अर्ज करण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. 11:  मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्रसारमाध्यमांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रीय माध्यम पुरस्कार 2020 (नॅशनल मीडिया अवॉर्ड) देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी प्रसारमाध्यमांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे दि. 17 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

विविध माध्यमातून मतदार जनजागृती करणाऱ्या माध्यम संस्थांसाठी हे पुस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये वर्तमानपत्र (प्रिंट मीडिया), इलेक्ट्रॉनिक (दूरचित्रवाहिनी) मीडिया, इलेक्ट्रॉनिक (रेडिओ) मीडिया व ऑनलाईन (इंटरनेट)/सोशल मीडिया अशा चार विभागात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. माध्यमांद्वारे सुलभ मतदान, मतदान प्रक्रियेसंदर्भात जागृती, मतदानाचे महत्त्व आदी विषयांवर विविध माध्यमातून जनजागृतीचे उत्कृष्ट काम करणाऱ्या माध्यमांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पुरस्कारांसाठी माध्यम संस्थांची निकषांच्या आधारे शिफारस करण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे माध्यम प्रतिनिधी व माध्यम संस्थांनी आपले अर्ज 17 नोव्हेंबरपर्यंत प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, 6 वा मजला, मंत्रालय विस्तार, मुंबई 400032 ईमेल ceo_maharashtra@eci.gov.in या पत्त्यावर पाठवावेत. पुरस्कारांचे निकष आणि अटींबाबत अधिक माहिती आयोगाच्या https://eci.gov.in/files/file/12547-national-media-award-for-best-campaign-on-voters-education-awareness-2020-memorandum-reg या लिंकवर उपलब्ध आहे.

माध्यम संस्था भारत निवडणूक आयोगाकडे थेट अर्जसुद्धा करू शकतात. त्यासाठीचे अर्ज दि. 20 नोव्हेंबरपर्यंत पवन दिवाण, अवर सचिव (संवाद), भारतीय निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रस्ता, नवी दिल्ली 110001, फोन नं. 011-23052133, ई मेल media.election.eci@.com, pppaaawandiwan@eci.gov.in या पत्त्यावर पाठवावेत.

प्रा. मेधा कुलकर्णी; डॉ. दत्तात्रय शेकटकर, नरेंद्र भंडारी यांना’सूर्यभूषण आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

0

पुणे : “जैव, रासायनिक युद्धाचा धोका अधिक असल्याचे कोरोनाने दाखवून दिले आहे. एकही गोळी न झाडता, बॉम्बस्फोट न होता लाखो लोकांना जीव गमवावा लागला. या लढ्यात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांनी मोठी जबाबदारी निभावली आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव जपणे अत्यंत महत्वाचे आहे,” असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. दत्तात्रय शेकटकर यांनी व्यक्त केले. ज्ञान ही आत्मसात करण्याची गोष्ट असून, त्याला मूल्यांची व संस्काराची जोड मिळायला हवी. राष्ट्र समृद्ध होण्यासाठी आपल्यातील ‘माणूस’पण जिवंत ठेवायला हवे, असेही त्यांनी नमूद केले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दत्तात्रय शेकटकर व लायन्स क्लब इंटरनॅशनलचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी यांना माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते ‘सुर्यभूषण आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्ता’च्या बावधन प्रांगणातील बन्सीरत्न सभागृहात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी ‘सुर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, समूह संचालक डॉ. शैलेश कासंडे, कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, सामाजिक कार्यकर्त्या सीमा दाबके यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ‘सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन महाएनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, ज्येष्ठ संपादक व लेखक अरुण खोरे, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नितीन दलाया, लॅप्रोस्कोपीक सर्जन डॉ. पुष्कराज करमरकर, स्पाईन सर्जन डॉ. रमेश रांका सन्मानित करण्यात आले.
प्रा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “अडचणीत असलेल्यांना मदत करण्याची आपली सेवावृत्ती समाधान देत असते. त्यामुळे आपण जे काम करतो, ते का करतो आणि त्याचा इतरांना चांगला उपयोग होईल, यावर आपण लक्ष दिले पाहिजे. सुर्यदत्ता शिक्षण संस्था केवळ पदवीधर नाही, तर माणूस घडवत आहे.”
नरेंद्र भंडारी म्हणाले, “जगभरात मानवतेच्या भावनेतून कार्यरत असलेल्या लायन्स क्लबमार्फत गरजू व गरिबांचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. समाजाच्या उत्थानासाठी सर्व लायन सदस्य मेहनत घेत आहेत, याचा आनंद वाटतो. सेवा हाच धर्म मानून आपण काम करावे.”
शेखर मुंदडा म्हणाले, “कोरोना काळात तीन लाख लोकांना मदतीचा हात दिला. दिवाळीच्या निमित्ताने महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्या घरी दिवाळी प्रकाशमय होईल, याचा प्रयत्न सुरू आहे. सामाजिक भावनेतून केलेल्या कार्याचा गौरव प्रोत्साहन देणारा असतो.”

अरुण खोरे म्हणाले, “महाराष्ट्र हे सामाजिक कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. गांधीजींच्या अनेक चळवळीत महाराष्ट्रीयन लोकांचा मोठा सहभाग होता. आपल्यातील समाजभावना आपण कायम जिवंत ठेवली पाहिजे. त्यातून स्वतःचा आणि समाजाचाही विकास होत असतो.”

डॉ. नितीन दलाया म्हणाले, “अलीकडच्या काळात मानसिक आजार जडण्याचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियाचा अतिवापर, होणारे अपेक्षाभंग, दुखावणाऱ्या भावना यातून नैराश्य येऊन मानसिक आजारांना बळी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यावर समुपदेशन आणि संवाद प्रभावी ठरू शकतो.”
डॉ. रमेश रांका म्हणाले, “कोरोनाच्या लढ्यात भारतीयांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. मात्र, हा लढा अजूनही संपलेला नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या नियमांचे आपण काटेकोरपणे पालन केले पाहिजे. सूर्यदत्ता या काळातही उत्साहाने करत असलेले कार्य प्रेरणा देणारे आहे.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी प्रास्ताविकात सांगितले की, समाजाच्या, देशाच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करून विद्यार्थी-शिक्षकांसमोर आदर्श ठेवण्याचा प्रयत्न आहे. आजच्या कोविडच्या परिस्थितीचे भान ठेवून सर्व नियम पाळून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले.

एमटीडीसीच्या नवीन लोगोमधून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

0

मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) नवीन लोगो, नाशिक येथील बोट क्लबचा लोगो तसेच एमटीडीसीच्या नवीन फिडबॅक क्यूआर कोडचे अनावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यातील पर्यटनास चालना देण्याच्या अनुषंगाने एअर बीएनबीसोबत सामंजस्य करारही करण्यात आला.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, इंडियन स्कूल ऑफ डिजाईन अँड इनोव्हेशनच्या प्रमुख इंदू शाहनी, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर, एमटीडीसीचे सरव्यवस्थापक दिनेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. एअर बीएनबीचे व्यवस्थापक अमनप्रित बजाज हे ऑनलाईन सहभागी झाले होते.

पर्यटनमंत्री  आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले, चंद्रकोर बिंदू, वारली कला, संतभूमी अशा विविध घटकांना अर्थपूर्ण रितीने मांडणाऱ्या एमटीडीसीच्या नवीन लोगोमधून महाराष्ट्राची संस्कृती दिसते. कोरोनोत्तर काळात पर्यटन क्षेत्राच्या विकासाला मोठा वाव आहे. त्या पार्श्वभूमीवर एमटीडीसीचे राज्यातील रिसॉर्टस् आणि विविध उपक्रमांची भूमिका महत्त्वाची आहे. राज्यात पर्यटनातून रोजगार निर्मितीला येत्या काळात चालना देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पर्यटन राज्यमंत्री कुमार आदिती तटकरे म्हणाल्या की, सध्याच्या काळात पर्यटन विभाग व एमटीडीसी एकत्रितपणे नवनवीन उपक्रम राबवून राज्यातील पर्यटन आणि आदरातिथ्य व्यवसायाला चालना देत आहेत. एमटीडीसीचा नवीन लोगो हा राज्याची संस्कृती, शौर्य, निसर्ग संपन्नता दाखवणारा आहे. पर्यटकांना यातून महाराष्ट्रातील पर्यटनाची नवीन ओळख होईल. महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमातून राज्यात येणाऱ्या पर्यटकांना अधिक सोयी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

इंडियन स्कूल ऑफ डिजाईन अँड इनोव्हेशनच्या प्रमुख इंदू शाहनी आणि त्यांच्या टीमने लोगो बनवले आहेत, त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

बिहार निवडणुकांचे निकाल म्हणजे शिवसेनेला चपराक-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0

भाजपा प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष
मुंबई दि. ११ नोव्हेंबर- बिहार निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयाचा जल्लोष आज भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात साजरा करण्यात आला. बिहारच्या घवघवीत यशाबददल भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून विजयाचा आनंद साजरा केला. या जल्लोषात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बिहारच्या निवडणुकांचे निकाल म्हणजे भाजपाच्या नावाने उठसुठ टोलेबाजी करणा-या शिवसेनेला सणसणीत चपराक आहे. शिवसेनेला बिहारमध्ये आपल्या उमेदवारांचे डिपॉझिटही वाचविता आले नसल्याची नामुष्की ओढावली आहे, असा टोला विरोधी पक्ष नते प्रविण दरेकर यांनी मारला.
भाजपा कार्यालयातील या विजयी जल्लोषात भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, माजी खासदार किरिट सोमय्या, आमदार प्रसाद लाड, राज पुरोहित, अतुल शहा यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना दरेकर यांनी सांगितिले की, बिहार विधानसभा निवडणुकीतल सर्व एक्झिट पोल बिहारच्या जनतेने खोटे ठरवुन पुन्हा एकदा भाजपा प्रणित एनडीएला स्पष्ट कौल दिला आहे. देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या नेतृत्वाला बिहारच्या जनतेने पाठिंबा दिला आहे. भाजपाच्या सहकार्याने नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होतील अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. भाजपा दिलेला शब्द पाळतो असा संदेश या निकालाच्या माध्यमातून देशवासियांपर्यंत पोहोचला आहे असेही त्यांनी सांगितले.
भाजपावर उठसुठ टिका करणा-यांना बिहारसह उत्तरप्रदेश, गुजरात ,मणिपूर, तेलंगणा, येथील पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे सणसणीत चपराक बसली आहे. जे भाजपाच्या नावने खडे फोडत आहेत, त्यांच्या उमेदवारांचे निवडणुकीतील डिपॉझिट सुध्दा जप्त होण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे असल्याचा टोला मारताना दरेकर यांनी सांगतिले की, बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला थोडी फार मते मिळाली असून बिहारच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखविली आहे. भविष्यामध्ये सुध्दा महाराष्ट्रात याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सुध्दा बिहारमध्ये सुपडा साफ झाला आहे.
काँग्रेसला पण बिहारच्या जनतेने नाकारले असून त्यांना फक्त १८-१९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे बिहार निवडणुकीत तिन्ही पक्षाला भुईसपाट करण्याच काम या बिहारच्या जनतेने केलेल आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपाच्यावतीने बिहारच्या जनतेचे आणि देशामधील विविध ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये जनतेने भाजपावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल भाजपा सर्वांचे आभार मानत असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

अजबच – ड्रायव्हिंग शिकणाऱ्या महिलेला प्रशिक्षण देणाऱ्याने लुटले ..

0

पुणे-कोंढवा परिसरात एका आयटी इंजिनिअर महिलेला हात बांधून लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्याने एकाच्या मदतीने या महिलेला लुटले असून, त्यांनी गुगल पे व एटीएमच्या माध्यमातून महिलेकडील 50 हजार रुपये आणि हातातील 3 अंगठ्या काढून घेतल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी ३५ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रादेश सिंग (रा. साळुंके विहार) आणि त्याच्या मित्रावर जबरी चोरी, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबधित महिला साळुंके विहार परिसरात राहते . त्या बंगळुरू येथील एका कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करते . ती वडिलांच्या ओळखीचा असलेल्या सिंगकडे गेल्या आठ दिवसांपासून कार चालविण्याचे प्रशिक्षण घेत होती . त्याच्याकडे असलेल्या ओमिनी व्हॅनवर ती गाडी शिकत होती . आरोपी सिंग हा मंगळवारी सकाळी त्यांच्या घरी एका मित्रासोबत आला. त्याने फिर्यादी यांना मित्राच्या फियाट कारवर आज ड्रायव्हिंग करायचे असल्याचे सांगून त्यांना घेऊन गेला. उंड्री परिसरापर्यंत तो त्यांना कार चालविण्याचे प्रशिक्षण देत होता. पण, त्या ठिकाणी चढ आल्यानंतर त्याने त्यांना बाजूच्या सीटवर बसविले.फिर्यादी या बाजूच्या सीटवर बसल्यानंतर पाठीमागे बसलेल्या सिंगच्या मित्राने आचानक त्यांच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबला. तसेच, त्यांचे हात बांधून टाकले. उंड्रीपासून ते एनआयबीएम रस्ता परिसरात येईपर्यंत आरोपींनी फिर्यादी यांच्या गुगल पेवरून ४० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्याच्याकडून घराची चावी घेतली. त्याच्या मदतीने घर उघडून त्यांची पर्स आणली. त्यामधील एटीएम कार्डच्या मदतीने दहा हजार रुपये काढून घेतले, तर त्यांच्या हातामधील तीन अंगठ्या कटरने कापून काढल्या. तसेच, त्यांच्याजवळील रोकड घेतली व आरोपी पळून गेले. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

राज्यात 19 नोव्हेंबरपासून “कौमी एकता सप्ताह”

0

मुंबई, दि. ११ : राज्यात येत्या 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान “कौमी एकता सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी योग्य काळजी घेत विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सामाजिक सौहार्द वाढविण्याच्या दृष्टीने सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी केले आहे.

या सप्ताहांतर्गत गुरूवार 19 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जाईल. यामध्ये धर्मनिरपेक्षता, जातीयवाद विरोध व अहिंसा यावर भर देणाऱ्या सभा, चर्चासत्रे व परिसंवादाचे ऑनलाईन किंवा वेबिनार पध्दतीने आयोजन करण्यात येईल. शुक्रवार 20 नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याक कल्याण दिवस साजरा केला जाईल. अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी 15 कलमी कार्यक्रमावर भर देण्यात यावा, तसेच कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार यावर्षी मिरवणूका काढण्यात येवू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शनिवार 21 नोव्हेंबर रोजी भाषिक सुसंवाद दिवस साजरा करण्यात येईल. भारताच्या अन्य भागातील लोकांच्या भाषेच्या वारसाचा परिचय करुन देण्याच्या दृष्टीने ऑनलाईन किंवा वेबिनार पध्दतीने विशेष वाङमयीन कार्यक्रम व कवी संमेलने आयोजित करण्यात येतील. रविवार 22 नोव्हेंबर रोजी दुर्बल घटक दिवस साजरा करण्यात येईल. यामध्ये 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती व जमातीमधील व्यक्ती व कमकुवत घटकातील व्यक्ती यांना मदत करण्यासाठी ठरवून दिलेले कार्यक्रम ठळकपणे निदर्शनास आणण्याच्या दृष्टीने ऑनलाईन किंवा वेबिनार पध्दतीने कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. सोमवार 23 नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक एकता दिवस साजरा करण्यात येणार आहे. भारतीयांच्या विविधतेतील एकतेवर भर देणारे आणि सांस्कृतिक संरक्षण व एकात्मता संबंधाची भारतीय परंपरा सादर करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. मंगळवार 24 नोव्हेंबर हा महिला दिन म्हणून साजरा करण्यात येईल. भारतीय समाजातील महिलांचे महत्व व राष्ट्र उभारणीच्या विकासामधील त्यांची भूमिका यावर भर देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. बुधवार 25 नोव्हेंबर हा जोपासना दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. पर्यावरणाची जोपासना व त्याची जाणीव यासाठीच्या वाढत्या गरजेवर भर देणारे मेळावे व कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. सर्व कार्यक्रम आयोजित करताना केंद्र व राज्य शासनाच्या कोव्हीड-19 च्या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

19 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घ्यावयाची आहे. राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सर्व कार्यालयातून ही शपथ घेण्याचा कार्यक्रम राबविण्यात यावा. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जागेवर उभे राहून किंवा प्रांगणात सामाजिक अंतर ठेऊन शपथ घ्यावी. तसेच भित्तीपत्रके, फलक यांच्यावर ठसठशीत असे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिकचिन्ह प्रदर्शित करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळा बंद असल्याने तेथे यावर्षी कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. तसेच स्वयंसेवी संस्थांनी करावयाचे कार्यक्रम त्यांच्या सोयीने करण्याची त्यांना मोकळीक आहे.

याबरोबरच केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय सांप्रदायिक सदभावना प्रतिष्ठान, नवी दिल्ली या संस्थेच्या वतीने कौमी एकता सप्ताहामध्ये “सांप्रदायिक सदभावना मोहिम निधी संकलन सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. 25 नोव्हेंबर, 2020 रोजी “ध्वजदिन साजरा” करण्यात येणार आहे. ध्वजदिनाचा निधी संकलित करण्याकरिता व संकलित केलेला निधी राष्ट्रीय सांप्रदायिक सदभावना प्रतिष्ठान, नवी दिल्ली यांच्याकडे सुपूर्द करण्याकरिता अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.