Home Blog Page 2392

कॉमेडियन भारती सिंहला एनसीबी कडून अटक

0
  • भारतीच्या घरी आणि ऑफिसमध्ये सापडला 86.5 ग्राम गांजा, पती हर्षसोबत गांजा घेतल्याची दिली कबुली.
  • भारतीच्या अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा येथील तिन्ही घरांवर रेड टाकण्यात आली.

मुंबई- प्रसिद्ध विनोदी कलाकार भारती सिंहला नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB)आज अटक केली. चौकशी दरम्यान भारती आणि तिचा नवरा हर्ष यांनी गांजा घेण्याची कबुली दिली आहे. . भारतीचे घर आणि प्रॉडक्शन हाऊसवर NCB ने शनिवारी सकाळी छापेमारी केली. दोन्ही ठिकाणाहून NCB च्या अधिकाऱ्यांनी 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

एका अमली पदार्थ तस्कराच्या चौकशीत या दोघांची नावे समोर आली होती. त्यानंतर भारतीच्या अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा येथील तिन्ही घरांवर रेड टाकण्यात आली. विशेष म्हणजे, या धाडीत NCB च्या टीमने अमली पदार्थ जप्त देखील केले आहे.

भारती आणि हर्षला ताब्यात घेऊन चौकशी

NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले, की टीमने भारती आणि हर्ष दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. या दोघांच्या घरी कंझम्पशन क्वांटिटी अर्थात वापरण्यासाठी आणलेल्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, एका ड्रग पेडलरने या दोघांच्या घरी गांजा असल्याची माहिती दिली होती. त्यावरूनच भारतीच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला आहे.

पुण्यातील सर्व शाळा १३ डिसेंबर पर्यंत बंद

0

पुणे-कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेने पालिकेच्या आणि खासगी शाळा सोमवार पासून खुल्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील शाळा 13 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.

राज्य शासनाच्या सुचनेनुसार सोमवार 23 नोव्हेंबर पासून नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. मात्र मुंबई आणि पुण्यातील शाळा तूर्तास सुरू होणार नाहीत. मुंबईतील शाळा 31 डिसेंबर तर पुण्यातील शाळा 13 डिसेंबर पर्यंत खुल्या न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

दरम्यान, पुण्यातील महापालिका आणि खासगी शाळा बंदच राहणार आहेत. शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पालकांशी चर्चा करुन सद्यस्थिती लक्षात घेऊन घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मोहोळ यांनी दिली. तसेच 13 डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

कचरा प्रकल्प पेटवल्याप्रकरणी माजी नगरसेवकाला पुत्रासह अटक आणि सुटका

0

पुणे- पुणे महापालिकेच्या पर्यायाने जनतेच्या कर रुपी पैशातून उभारलेल्या प्रकल्पाची जाळपोळ करून नासधूस केल्याप्रकरणी म्हणजेच आंबेगाव बुद्रुक येथील कचरा प्रकल्प पेटवल्याप्रकरणी माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे(55,रा.आंबेगाव) व त्यांचा मुलगा कुणाल बेलदरे(35) यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. व त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.दरम्यान शंकरराव बेलदरे यांना अटक केल्याचे वृत्त कळताच त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात पोलिस ठाण्यात जमले होते. त्यांनी बेलदरे यांची अटक बेकायदा असल्याचा दावा केला. मात्र पोलिसांनी अटक कायद्यानूसारच केली असल्याचे त्यांना सांगितले. याप्रकरणी इतरही आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली.

आंबेगाव बुद्रुक येथील कचरा प्रकल्प पेटविल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोन नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी 15 ते 20 अज्ञात व्यक्तींविरोधात महापालिकेचे ठेकेदार मिलींद पवार(रा.हडपसर) यांनी तक्रार दाखल केली होती.

महापालिकेने उभारलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प हटविण्यासाठी एक नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले होते. यावेळी हिसंक झालेल्या स्थानिक नागरिकांच्या जमावाने तेथील कार्यालय आणी प्रकल्प पेटवून दिला होता. पवार यांनी दिलेल्या तक्रारीनूसार अज्ञात व्यक्तींनी गैरकायद्याची मंडळी जमवून महापालिकेच्या कचरा प्रकल्पावर हल्ला केला. यामध्ये पवार यांचा जेसीबी आणी पोकलॅंड मशिनची तोडफोड केली. महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केले.

हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आदरांजली

0

मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव संजय कुमार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी जनतेने सर्वस्व पणाला लावून लढा दिला. या लढ्यात 107 हुतात्म्यांनी आपले प्राणार्पण केले. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी 21 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळला जातो.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्मा वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

0

मुंबई, दि. 21 : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्मा महाराष्ट्रवीरांना आजच्या ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतीदिना’ निमित्त मी भावपूर्ण वंदन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजरांजली वाहिली आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात योगदान दिलेल्या सर्वांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झालं पाहिजे ही सर्व महाराष्ट्र प्रेमींची इच्छा होती. राज्यातील जनतेनं एकजुटीनं, प्राणपणानं लढून ती इच्छा पूर्ण केली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्राचा गौरवशाली, प्रेरणादायी इतिहास असून सीमाभागातील मराठीभाषक गावांसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यातून बळ मिळेल. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्मा वीरांना विनम्र अभिवादन.

१४,२३३ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची १ डिसेंबरला प्रसिद्धी

0

मुंबई, : राज्यभरातील 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 1 डिसेंबर 2020 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर 7 डिसेंबर 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

श्री.मदान यांनी सांगितले की, एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या/ नवनिर्मित 1 हजार 566; तसेच जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधित मुदत संपणाऱ्या/ नवनिर्मित 12 हजार 667 अशा एकूण 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी या मतदार याद्या तयार केल्या जातील. यातील एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविडची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता; तर 19 नोव्हेंबर 2020 रोजी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्यात आली. या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेल्या विधानसभेच्या मतदार याद्यांवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेच्या या मतदार याद्या 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होत्या; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार याद्या 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या आहेत. मतदार याद्यांत नाव नोंदविलेल्या सर्वांना मतदान करता यावे किंवा निवडणूक लढविता यावी, हे लोकशाहीचे मुलभूत तत्त्व आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमासह 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये तयार केलेल्या मतदार याद्यादेखील रद्द केल्या होत्या. आता निवडणूक प्रक्रिया रद्द झालेल्या ग्रामपंचायतींसह एकूण 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांचा हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

विधानसभा मतदारसंघाच्या 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. या प्रारूप मतदार याद्यांवर तेंव्हापासून 7 डिसेंबर 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात. हरकती व सूचनांसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

भाजपा उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ चंद्रकांत पाटील करतायेत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन प्रचार

0

पुणे- काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी कंबर कसली असून, भाजपा उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ आज कोथरूड मध्ये घरोघरी जाऊन प्रचार करत मतदारांना आवाहन केले.

येत्या १ डिसेंबर रोजी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत असून, या निवडणुकीत एकूण भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रचारासाठी झंझावाती दौरे करून मतदारांना मतदानासाठी आवाहन केले.

आज त्यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघात संपर्क अभियानावर भर दिला. कोथरूड मधील प्रभाग ३१, प्रभाग १३ आणि प्रभाग १० मधील रहिवासी भागातील ५० कुटुंबांना नागरिकांशी संवाद साधला. तसेच ५० मतदारांच्या घरी जाऊन, भाजपा उमेदवार संग्राम देशमुख यांचा मतदारांना परिचय होण्यासाठी पदवीधर विकासचा अंक देऊन, १ डिसेंबर रोजी भाजपा उमेदवार संग्राम देशमुख यांना मतदान करुन विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक

0

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या लेखामध्‍ये सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्‍या कर्तव्‍ये व जबाबदाऱ्यांबाबत महत्त्वाच्या सूचना थोडक्यात मांडण्‍यात आल्‍या आहेत. निवडणुकीचे काम नि:पक्षपातीपणे व आत्मविश्वासाने पार पाडण्‍यासाठी निवडणूक यंत्रणा कार्यरत असतेच. या लेखाचा पहिला भाग आज प्रसिद्ध करण्यात येत आहे त्‍यामुळे मतदार आणि वाचकांनाही या माहितीचा उपयोग होईल, अशी आशा आहे.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीचे मतदान 1 डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी 3 डिसेंबरला होईल. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍यात होणारी ही पहिलीच निवडणूक असल्‍याने ‘कोविडपासून सुरक्षित निवडणूक’ हे ध्‍येय्य साध्‍य करण्‍यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे.

निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना प्रसिद्ध दिनांक : दि. 5 नोव्हेंबर 2020

नामनिर्देशन पत्र दाखल करणे : दि. 12 नोव्हेंबर 2020 पर्यंत

नामनिर्देशन पत्रांची छाननी  : दि. 13 नोव्हेंबर 2020

नामनिर्देशन पत्र मागे घेणे : दि. 17 नोव्हेंबर 2020

मतदान : दि. 1 डिसेबर 2020

मतमोजणी : दि. 3 डिसेबर 2020

निवडणुकीसाठी पुण्‍याचे विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. उपायुक्‍त (सर्वसाधारण), जिल्‍हाधिकारी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून मुख्‍य कार्यकारी अधिकारी (खादी व ग्रामोद्योग) हे निवडणूक निरीक्षक म्‍हणून जबाबदारी पार पाडतील.

निवडणुकीची ठळक वैशिष्‍ट्ये

मतपत्रिकेवर उमेदवाराच्‍या नावासमोर चिन्ह छापलेली नसतात. मतपत्रिकेतील नावांसमोरील जागेत मतपत्रिकेत मतदार पसंती क्रमांक अंकात १ पासून लिहावयाचा असून ते आकडे मराठी, इंग्रजी, रोमन किंवा भारतीय घटनेतील आठव्या अनुसूचीमध्ये दिलेल्या कोणत्याही भारतीय भाषेतील अंकात लिहिण्यास मुभा आहे, परंतु ते शब्दात लिहिता येणार नाहीत.

मतदारास मतपत्रिकेवर मतदान केंद्रावर उपलब्ध केलेल्या जांभळ्या स्केच पेननेच पसंती क्रमांक लिहावयाचा असतो. त्यामुळे बाण फुलीचा शिक्का दिलेला नसून मतदारांना जांभळा स्केचपेन देवून मत नोंदविण्याची कार्यवाही पूर्ण करुन घेतली जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्‍या 11 सप्‍टेंबर 2018 च्‍या निर्देशानुसार राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतपत्रिकेवरील नोटा (NOTA- None Of The Above) हा पर्याय वगळण्यात आला आहे.

मतदान प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे

  • निवडणूक साहित्य स्‍वीकृती व तपासणी
  • मतदानाच्या आदल्या दिवशीची मतदान केंद्रावरील पूर्वतयारी
  • प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वीची कामे
  • मतदानास प्रत्यक्ष सुरूवात व मतदान केंद्राध्यक्ष / कर्मचारी यांची कामे
  • मतदान केंद्राध्यक्ष यांनी महत्त्वाच्या प्रकरणी करावयाची कार्यवाही
  • महत्‍त्‍वाचे अहवाल/नमुने
  • मतदान साहित्‍य परत करणे

पदवीधर मतदार संघासाठी मतपत्रिका पांढऱ्या रंगाची असून संविधानिक व असंविधानिक लिफाफे आणि अॅड्रेस टॅग पांढऱ्याच रंगाचे असतील. शिक्षक मतदार संघासाठी मतपत्रिका गुलाबी रंगाच्‍या असून संविधानिक व असंविधानिक लिफाफे आणि अॅड्रेस टॅग गुलाबी रंगाचे असतील.

कोविड-19 (कोरोना)च्‍या प्रादुर्भावामध्‍ये निवडणूक घेतांना मतदान केंद्रावर आवश्‍यक त्‍या दक्षता घेण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. सर्व मतदान केंद्राध्यक्ष / मतदान अधिकारी यांच्‍यासाठी मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझर, ग्लोज पुरविले जातील. त्याचा वापर करावा.

मतदानाच्‍या आदल्या दिवशी करावयाची कार्यवाही

मतदानाच्‍या आदल्या दिवशी सर्व मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य आहे.  मतदान प्रक्रिया सुलभ होण्‍यासाठी मतदारांना जास्त वेळ रांगेत ताटकळत राहू लागू नये म्हणून त्यांना टोकण वितरण करण्‍यासाठी मदत कक्ष (हेल्‍प डेस्‍क) राहील. त्या ठिकाणी स्थानिक स्तरावरील कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. मतदान केंद्रावरील रांगेमधील मतदारांना रांगेत सामाजिक अंतर ठेवणे सुलभ जावे तसेच दिव्यांग व ज्‍येष्ठ नागरिक मतदार, पुरुष मतदार आणि स्त्री मतदार यासाठी मतदान केंद्रावर तीन स्वतंत्र रांगा व दोन व्यक्तीमधील सामाजिक अंतर ६ फुटाचे ठेवण्यासाठी या स्वतंत्र रांगेमध्ये ६ फुटाच्‍या अंतरावर चुना पावडरच्‍या सहाय्याने १५ ते २० गोल वर्तुळे चिन्‍हांकित करावीत. ही कार्यवाही मतदान केंद्राच्‍या समोरील जागेतील जागा उपलब्धतेप्रमाणे करावी.

मतदान केंद्राच्‍या  इमारतीमध्ये किंवा परिसरात पुरुष व स्त्री मतदारासाठी दोन स्वतंत्र खोल्या प्रतीक्षा कक्ष म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव ठेवण्यात याव्यात. ज्यामध्ये खुर्ची,  सतरंजी व इतर व्यवस्था ठेवण्यात येईल. मतदान केंद्रावर हात स्वच्छ करण्‍यासाठी मतदान केंद्राच्‍या येण्‍या-जाण्याच्‍या ठिकाणी साबण/हॅण्‍डवॉश व पाणी ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. मतदान केंद्रामध्ये येण्या-जाण्याच्‍या ठिकाणी  सॅनिटायझर ठेवले जाईल. आपल्याकडील साहित्यामधील कोविड-१९ च्या प्रादुर्भाव संबंधाने जनजागृती बाबतचे भित्तीपत्रक मतदान केंद्राच्‍या परिसरात दर्शनी भागात लावले जातील. मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांची मतदान केंद्रावरील बैठक व्यवस्था सामाजिक अंतराच्‍या निकषाप्रमाणे केंद्राध्यक्षांनी करून घ्यावी. मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यावर त्या मतदाराकडे मास्क नसल्यास त्यास मास्क पुरविण्यात यावा. मतदारांनी मतदान केंद्रात प्रवेश करण्‍यापूर्वी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्‍या मार्फत थर्मल स्कॅनरच्‍या सहाय्याने तापमान तपासणी करावी. थर्मल स्कॅनरच्‍या तपासणीमध्ये मतदाराचे तापमान आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ठरवलेल्या निकषाप्रमाणे म्हणजे ९८.६ फॅरनहिट किंवा 37 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आढळल्यास अशा मतदाराचे तापमान पुन्हा दोनदा तपासण्यात यावे. संबंधिताचे तापमान पुन्हा ९८.६oF किंवा ३७०C पेक्षा अधिक दिसून आल्यास संबंधित मतदारास टोकण / प्रमाणपत्र देऊन त्यास मतदानासाठीच्या शेवटच्या तासात मतदानासाठी येण्यास सांगावे. मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये अशा मतदारांना मतदान केंद्रावर मतदानासाठी सुविधा पुरविण्यात यावी. मतदाराची ओळख पटविण्याबाबत कार्यवाही करताना आवश्यकता असल्यास चेहऱ्यावरील  मास्क खाली घेण्यासाठी  सांगण्यात येईल. अलगीकरणातील कोविड-१९ च्या रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्‍या पर्यवेक्षणामध्ये आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे काटेकोरपणे पालन करून मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये मतदान नोंदविण्‍यासाठी अनुमती द्यावी.  क्षेत्रिय अधिकारी या संबंधाने त्यांच्‍या क्षेत्रातील मतदान केंद्राच्‍या बाबतीत आवश्यक समन्वय ठेवतील. मतदान प्रतिनिधीच्‍या तपासणी नंतर तापमान विहित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त  आढळल्यास त्यास बदली प्रतिनिधी देण्यासाठी परवानगी देण्यात यावी व त्याप्रमाणे अभिलेख्यात त्याची नोंद घ्यावी.

मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था

प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात येईल. आपल्‍या मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह आपणांस मतदान केंद्रावर जावयाचे आहे. नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाच्‍या वेळी मतदान केंद्रामध्ये प्रवेश असणार नाही.

मतदान अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरुप

मतदान केंद्रामध्ये प्रवेश केल्यावर मतदार हा सर्वप्रथम थेट पहिल्या मतदान अधिकारी यांच्‍याकडे जाईल. मतदारास उमेदवार  किंवा प्रतिनिधी यांच्‍याकडून अनौपचारिक ओळखपत्र चिठ्ठी दिली जाते (ओळखपत्र चिठ्ठी – साध्या पांढऱ्या कागदावर मतदाराचे नाव, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि मतदान केंद्राचे नाव नमूद असते. (परंतु राजकीय पक्षाचे नाव / उमेदवाराचे नाव नमूद नसावे) ओळखपत्र चिठ्ठीवरून मतदार यादीची चिन्हांकित प्रत पाहून मतदाराची ओळख पटविणे.

भारत निवडणूक आयोगाने मतदाराची ओळख पटविण्यासाठी दिलेल्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा मतदार दर्शवील त्यावरुन ओळख पटविण्याची कार्यवाही हा अधिकारी पूर्ण करेल. मतदाराची ओळख पटल्यानंतर मतदार यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक आणि मतदाराचे नाव मतदान प्रतिनिधी व  दुसऱ्या मतदान अधिकाऱ्यास ऐकू जाईल एवढया मोठ्याने वाचून दाखवील. पुरुष मतदार असल्यास मतदार यादीच्या चिन्‍हांकित प्रतिमध्ये त्याच्या नावाखाली अधोरेखीत करेल. स्त्री मतदार असल्यास मतदाराच्या नावाखाली अधोरेखीत करुन मतदाराच्या नावाच्या डाव्या बाजूला बरोबरची (√) अशी खूण करेल.

फोटो ओळखपत्र (एपिक) नसलेल्या मतदाराची ओळख पटविण्यासाठी आवश्यक इतर पुरावे

1)आधार कार्ड 2) ड्रायव्हींग लायसन्स 3)आयकर ओळखपत्र (पॅनकार्ड ) 4)पासपोर्ट (पारपत्र) 5)केंद्र / राज्य शासकीय / निमशासकीय कर्मचारी / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था किंवा  औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवाचे ओळखपत्र 6)खासदार/विधान सभा सदस्य/विधान परिषद सदस्य यांना दिलेले शासकीय ओळखपत्र 7)संबंधित पदवीधर / शिक्षक मतदारसंघातील शिक्षण संस्‍थेत कार्यरत असलेल्या पदवीधर / शिक्षक मतदारांना वितरीत केलेले ओळखपत्र 8)विश्वविद्यालयाद्वारे वितरीत पदवी / पदविका मूळ प्रमाणपत्र 9)सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र

ज्या मतदारांना भारत निवडणूक आयोगाचे फोटो ओळखपत्र वाटप करण्यात आलेले आहे, त्‍यांनी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र मतदान केंद्रावर सादर करणे आवश्यक आहे. तथापि, असे ओळखपत्र सादर न करु शकणाऱ्या मतदारांनी वरीलपैकी एक पर्यायी फोटो ओळखपत्र त्यांची ओळख देण्‍यासाठी सादर करणे आवश्यक आहे. (भारत निवडणूक आयोगाच्‍या दि.10/11/2020 रोजीच्या पत्रात दिलेल्या निर्देशांप्रमाणे)

पक्की शाई लावण्याची पद्धत

मतदाराची ओळख पटविल्यानंतर पदवीधर मतदारसंघातील मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनी आणि शिक्षक मतदारसंघातील मतदाराच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला पक्की शाई लावणे हे पहिल्या मतदार अधिकाऱ्याचे प्रमुख काम राहील. (मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्‍या दि. 9 नोव्‍हेंबर 2020 रोजीच्या पत्राद्वारे दिलेल्या निर्देशांप्रमाणे)

मतदारास डाव्या हातावर बोटे नसतील तर पदवीधर मतदारसंघाकरीता मतदाराच्या उजव्या हाताच्या तर्जनी आणि शिक्षक मतदारसंघातील मतदाराच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला पक्की शाई लावणे. पक्की शाई लावल्‍यानंतर पहिला मतदान अधिकारी मतदारास मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्‍याकडे जाण्यास सांगेल.

दुसरा मतदान अधिकारी – दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे मतपत्रिकेचे गठ्ठे असतील. पदवीधर मतदारसंघासाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असेल तर शिक्षक मतदारसंघासाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका असेल. पहिल्या मतदान अधिकाऱ्याने मोठ्याने वाचून दाखवलेला मतदाराचा मतदार यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक मतपत्रिकेच्या स्थळ प्रतीवर नोंदवून घेईल. मतपत्रिका स्थळ प्रतिपासून वेगळी करुन मतदारास देईल आणि त्याला मतदान अधिकारी क्रमांक 3 यांच्याकडे जाण्यास सांगेल.  कोणत्याही मतदान प्रतिनिधीस मतपत्रिकेवरील अनुक्रमांकाची नोंद घेण्यास कायद्याने प्रतिबंध आहे. यामुळे मतदान प्रक्रियेचा भंग होतो.

मतदारास मतपत्रिका देणे – मतदाराला मतपत्रिका मत नोंदविण्यासाठी देण्यापूर्वी मतपत्रिकेच्या पाठीमागे स्थळ प्रतिवर व मतपत्रिकेवर उजव्या कोपऱ्यात विभेदक चिन्ह उमटवून मतपत्रिकेवरील विभेदक चिन्हाच्या खाली केंद्राध्यक्ष स्वाक्षरी करील. मतदाराला मतपत्रिका देण्‍यापूर्वी संबंधित मतदान अधिकारी चिन्‍हांकित मतदार यादीतील मतदाराचा मतदार यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक स्थळ प्रतीवर लिहील व त्यावर त्याची स्वाक्षरी घेईल.

तिसरा मतदान अधिकारी –तिसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे जांभळ्या शाईचे स्केचपेन व ढकल पट्टी असेल. तिसरा मतदान अधिकारी मतदाराकडून मतपत्रिका घेईल व मतपत्रिकेच्या मागच्या बाजूस वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यावर उमटवलेले विभेदक चिन्ह स्पष्ट दिसेल अशी मतपत्रिकेची उभी घडी व नंतर आडवी घडी अशी दोन वेळा घडी करील. त्यानंतर मतपत्रिकेची घडी उलगडून मतदारास देईल व मत नोंदवल्यानंतर परत त्याचप्रमाणे घडी करण्यास मतदारास सांगेल.

000000

– राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती  अधिकारी,  पुणे

केंद्रीय निवडणूक निरीक्षक केरकेटा यांनी मतदान केंद्रांची केली पहाणी

0

पुणे- पदवीधर मतदार संघाच्या केंद्रीय निवडणूक निरीक्षक डॉ. निलीमा केरकेटा यांनी हवेली तालुक्यातील मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर, तहसीलदार सुनील कोळी आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर ही पहिलीच निवडणूक असल्याने आरोग्याच्या दृष्टिने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही तसेच मतदारांना मतदान करतांना विनाकारण कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होवू नये, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. मतदार केंद्रावर भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उपलब्ध सुविधांची खात्री करण्यात आली.

  • जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडून मतदान केंद्रांची पाहणी.

जिल्हाधिकारी तथा शिक्षक व पदवीधर मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज जिल्ह्यातील मतदान केंद्रांची पहाणी केली. त्यांच्या समवेत उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी मतदान केंदात उपलब्ध सुविधा, कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर केंद्रावर निर्माण करावयाच्या सुविधा (सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, बसण्याची व्यवस्था) याबाबत माहिती घेतली. पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 403 इतकी

0

पुणे विभागातील 4 लाख 94 हजार 830 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी; विभागात कोरोना बाधित 5 लाख 22 हजार 983 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.21 :- पुणे विभागातील 4 लाख 94 हजार 830 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 22 हजार 983 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 403 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 750 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.62 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 34 हजार 511 रुग्णांपैकी 3लाख 16 हजार 628 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 721 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 162 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.65 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 404 रुग्णांपैकी 46 हजार 821 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 913 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 866 रुग्णांपैकी 40 हजार 517 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 788 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 561 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 342 रुग्णांपैकी 44 हजार 273 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 383 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 686 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 860 रुग्णांपैकी 46 हजार 591 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 598 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 671 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 197 वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 785 , सातारा जिल्ह्यात 107 , सोलापूर जिल्ह्यात 189, सांगली जिल्ह्यात 70 तर कोल्हापूर जिल्ह्यात 46 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण-
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 7 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 634, सातारा जिल्हयामध्ये 167, सोलापूर जिल्हयामध्ये 102 , सांगली जिल्हयामध्ये 60 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 44 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 26 लाख 61 हजार 869 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5लाख 22 हजार 983 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 20 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

“साक्षीदार गतवैभवाचे, पुन्हा बनतील शिल्पकार पुण्याच्या विकासाचे” ….. आबा बागुल (व्हिडीओ)

पुणे -जुन्या नव्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करून त्यांच्या भावना जाणून ,प्रश्न जाणून कशा पद्धतीने कॉंग्रेसची वाटचाल असावी यासाठी आज महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी बोलाविलेल्या बैठकीत अनेक जुन्या कार्यकर्त्यांचे उर दाटून आले. तर अनेकांनी कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक विचारणा करणाऱ्या या उपक्रमाबाबत आबा बागुल यांना धन्यवाद देऊन आपापली गाऱ्हाणी मांडत नेत्यांना कान पिचक्या देखील दिल्या .आज वर सातत्याने असे उपक्रम का घेतले नाही , कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम केले तर कॉंग्रेसचे गतवैभव निश्चित पुन्हा प्राप्त करवून घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होईल असे नमूद केले.

महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या वतीने महापालिकेच्या आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी  यांच्यासमवेत शनिवार दि.२१/११/२०२० रोजी सकाळी ११.०० वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे आयोजन . उल्हासदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.  या बैठकीसाठी १९९२ ते २०१७ या कालावधीतील ८० हून अधिक आजी माजी नगरसेवक उपस्थित होते. तसेच उल्हासदादा पवार, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर मोहन जोशी, डॉ.सतीश देसाई माजी महापौर कमल व्यवहारे, रजनी त्रिभुवन,बुवा नलावडे, जयसिंगराव भोसले , काका धर्मावत, भीमराव पाटोळे, संगीता तिवारी, लता राजगुरू, दत्ता बहिरट, र विंद्र धंगेकर, रफिक शेख, कैलास गायकवाड, सौ.सुजाता शेट्टी, सौ.वैशाली मराठे, माजी नगरसेविका मीनाक्षी काडगी, मिलिंद काची, बाळासाहेब मारणे, अनिल सातपुते व इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.

          या बैठकीमध्ये पुणे शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये शहरात सुरु असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी पुणे महापालिकेचा र.रु. ९१८ कोटीचा हिस्सा असणार आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेचे ४० हजार कोटी बजेट असून देखील मुंबई व नागपूर या दोन्ही महानगरपालिकांनी कुठलेही पैसे मेट्रो प्रकल्पासाठी दिलेले नाहीत. पुणे महानगरपालिकेने  मेट्रो प्रकल्पासाठी आपला हिस्सा का द्यावा असा प्रश्न उपस्थित करून पुणे मनपाने हिस्सा देवू नये यासाठी राज्य सरकारकडे कॉंग्रेस प्रयत्न करणार आहे  असे आबा बागुल यांनी सांगितले.

पीएमपीएमएल कंपनी तयार होवून देखील परिवहन महामंडळ तोट्यात आहे. महापालिकेला पीएमपीएमएलच्या तुटीपोटी दरवर्षी र.रु.२०० कोटी निधी द्यावा लागत आहे. २०० कोटी तुट देण्यासाठी महापालिकेची दमछाक होत आहे . पुणे मनपाची सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी  मेट्रो बरोबर पूर्वीप्रमाणे पी.एम.पी.एम.एल ऐवजी पी.एम.टी. सुरू केली तर त्यावर मा.मुख्य सभेचे नियंत्रण राहील असे मत सर्व सदस्यांनी व्यक्त केले. शहरातील वाहतुकीची समस्या निवारण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला एच.सी.एम.टी.आर.प्रकल्प उभा राहण्यासाठी मी सतत लढा देत आहे. अजून किती नागरिक मृत्यूमुखी पडल्यावर प्रशासन हा प्रकल्प मार्गी लावणार आहे याचा जाब प्रशासनाला  पुणेकरांनी विचारला पाहिजे. तसेच शहरातील २००० कि.मी. चे रस्ते रुंद करणे आवश्यक असून यामुळे  शहरातील वाहतूक  समस्यांचे  निराकारण होणार आहे.

रस्ता रुंदी भूसंपादन करणेसाठी अंदाजे महापालिकेला ६० हजार कोटी आवश्यक आहेत. शासनाने पाटबंधारे विभागास दिलेल्या सवलतीच्या आधारावर अॅडव्हांस रक्कम भरणेस पुणे महानगरपालिकेला सवलत द्यावी असे आबा बागुल म्हणाले.

          महापालिकेत अनेक वर्षानंतर आलेल्या माजी नगरसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक आजी माजी सदस्यांच्या  डोळ्यात आनंदअश्रू तराळले.  दिवाळीच्या फराळाचा गोडवा घेवून पुन्हा एकदा पुणे शहराच्या विकासासाठी नव्या जोमाने कॉंग्रेस पक्षाच्या उभारणीसाठी काम करण्याच्या आशा यावेळी पल्लवीत झाल्या. याप्रसंगी सर्व आजी माजी नगरसेवक हे ‘साक्षीदार आहेत  गतवैभवाचे, पुन्हा बनतील शिल्पकार पुण्याच्या विकासाचे असे आबा बागुल म्हणाले.

   त्यामध्ये डॉ. सतीश देसाई यांनी या बैठकीच्या माध्यमातून महापालिकेच्या सर्व जुन्या आठवणीना उजाळा मिळाला असल्याचे मत व्यक्त केले.  कॉंग्रेस पक्षाचा मुख्य शत्रू हा कॉंग्रेसच आहे असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. पक्षाला उभारणी देण्यासाठी महानगरपालिकेच्या स्तरावरून प्रयत्न होणे आवश्यक आहे असे मत व्यक्त त्यांनी केले.

आमदार उल्हासदादा पवार यांनी सर्व सदस्यांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी नैसर्गिक आपत्तीना सामोरे जात जात पक्षाच्या माध्यमातून काम करणे आवश्यक आहे. यासाठी विभागवार बैठकांचे आयोजन करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. आपली कामे जनते पर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर  प्रभावीपणे करावा तसेच पद नसले तरी संपूर्ण महाराष्ट्र मला ओळखतो हीच कॉंग्रेस पक्षाची खरी ओळख आहे.  पदाची अपेक्षा न ठेवता नेता बनण्याआधी कार्यकर्ता व्हायला शिका असे सर्वाना त्यांनी  मार्गदर्शन केले.

माजी मंत्री  बाळासाहेब शिवरकर यांनी नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसाठी स्वतंत्र महापालिका अस्तित्वात आणावी त्यामुळे त्या भागाचा विकास होवू शकतो. आत्ताच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विकास खुंटला आहे  असे मत व्यक्त त्यांनी केले.

महापालिकेच्या २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी आतापासून सुरुवात करावी असे मत मोहन जोशी यांनी व्यक्त केले.

नवीन वर्षात जानेवारी २०२१ पासून प्रशासन आपल्या दारी हा उपक्रम संपूर्ण पुणे शहरात राबविण्यात येणार आहे. यासाठी माजी नगरसेवक यांनी आपल्या भागातील समस्या, सूचना या १५ दिवस अगोदर मांडाव्यात असे सर्व उपस्थित सदस्यांना आबा बागुल यांनी आवाहन केले.वीरेंद्र किराड यांनी आभार मानले .(या व्हिडीओ त आबा बागुल यांचे भाषण काही तांत्रिक कारणास्तव रेकोर्ड होऊ न शकल्याने देऊ शकलेलो नाही )

पत्रकारांना अरेरावी करणाऱ्या पीआय ला केले सस्पेंड : शाब्बास कृष्णप्रकाशजी

0

पुणे- पत्रकारांशी च उद्धट ,अरेरावी जर पोलिस करत असतील तर सामान्य जनतेला ते कसे वागवत असतील असा प्रश्न नेहमी पडतो पण यावर पहिल्यांदाच आता अशा पोलिसांना दनका देण्याचे काम पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे .त्याबद्दल त्यांचे कौतुक होते आहे, आणि हा विषय मांडून त्याबद्दल कार्यवाही करून घेणाऱ्या पत्रकारांचे सलाम पुणे च्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे .

कोरोनासाठी पिंपरी चिंचवड शहरात दुसरा लॉकडाऊन घोषित करण्यात आला.यावेळी पत्रकार बापूसाहेब गोरे पिंपरी-चिंचवड परिसरात चौका-चौकात माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांनी मला ” चल सूट घरी ” असे म्हणत हात पाय तोडण्याची धमकी दिली.याबाबत तोंडी तक्रार तत्कालीन पोलीस आयुक्त व उपायुक्त यांच्याकडे केली होती.संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी ” रविंद्र जाधव यांच्या विरोधी लेखी तक्रार द्या” अशा सूचना केल्या मात्र पोलीस हा माणूस आहे.कामाच्या तणावाखाली अशी घटना घडू शकते. एक वेळ गप्प बसू मात्र पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव यांनी दुसऱ्या कोणत्याही पत्रकारांस पुन्हा त्रास दिल्यास मात्र त्यांच्याविरोधी रीतसर तक्रार करू या पत्रकारांनी त्यावेळी ठरविले.त्यामुळे जाधव यांच्या विरोधी कसलीही तक्रार न करता पत्रकारांचे शिष्टमंडळ आयुक्त कार्यालयातून परत आले.
त्यानंतर पुढच्याच आठवड्यात २ पत्रकार यांच्या बाबतीत रवींद्र जाधव यांचे गैरवर्तन समोर आले.त्यावरून लेखी तक्रार करण्यात आली व बापू गोरे याांांहीजबानी घेण्यात आली.त्यामध्ये जाधव हे दोषी आढळले.

पत्रकारांशी उद्धट भाषा!

निनावी मोबाईल क्रमांकावरून त्रास देणाऱ्या महिलेविरुद्ध ज्येष्ठ पत्रकार संतलाल यादव यांनी चिंचवड पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दिली.त्यावेळी त्यांच्या समवेत पत्रकार ओमप्रकाश पांडे हेही उपस्थित होते. “अर्जाबाबत विचारणा करायची आहे तुम्ही पोलीस स्टेशनला या” असा निरोप पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव यांनी पत्रकार संतलाल यांना दिल्यामुळे पत्रकार संतलाल हे चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यावेळी पत्रकाराला यांना रविंद्र जाधव यांनी दमबाजी केली.शिवाय त्याच रात्री मोबाईलद्वारे संतलाल यादव यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, त्यामुळे संतलाल यादव यांनी पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव यांच्या विरोधी लेखी तक्रार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली.सदरील अर्जामध्ये शहरातील तीन पत्रकारांना त्रास दिल्याचे नमूद केल्यावरून पोलीस आयुक्त प्रकाश कृष्णा यांनी अर्जाची गंभीरपणे दखल घेऊन सदरील प्रकरणाची सविस्तर चौकशीचे आदेश काढले. चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांना दिले.

उपायुक्त मंचक इप्पार यांनी प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी केली. पत्रकार बापूसाहेब गोरे,संतलाल यादव व ओमप्रकाश पांडे यांचे लेखी जबाब घेण्यात आले.व तसा लेखी अहवाल पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचेकडे सादर करण्यात आला.चौकशी अहवालात पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव दोषी आढल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करत जाधव यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काढले.आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतलेल्या निर्णयाचे पत्रकार वर्गात स्वागत होत आहे.

पत्रकारांनी केलेल्या लेखी तक्रारीची गंभीरपणे दखल घेऊन त्याप्रकारणाची निःपक्षपातीपणे चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कमी वेळेत कडक कारवाई केल्यामुळे कृष्ण प्रकाश यांच्या स्वच्छ व पारदर्शक कार्य पद्धतीचे कौतुक केले जात आहे

‘इंटरनॅशनल सर्वायव्हर ऑफ सुसाईड लॉस डे’निमित्त कनेक्टिंग एनजीओकडून मोफत हेल्पलाईन

0

पुणे : कोविडमुळे ओढवलेले आर्थिक संकट, बेरोजगारीचा प्रश्न, कौटुंबिक वाद-विवाद, नैराश्य भावना यामुळे आत्महत्येच्या विचाराने ग्रासलेल्यांची संख्या मोठी आहे. आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ नये, यासाठी आत्महत्येच्या प्रयत्नातून बचावलेल्या लोकांना मानसिक-भावनिक आधार देण्याची आवश्यकता असते. अशा लोकांना आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करण्यासाठी, तसेच त्यांना जगण्याची उमेद देण्यासाठी इंटरनॅशनल सर्वायव्हर ऑफ सुसाईड लॉस डे’ (दि. २१ नोव्हेंबर) साजरा करण्यात येतो. या लोकांकरिता पुण्यतील कनेक्टिंग एनजीओच्या वतीने मोफत हेल्पलाईन कार्यरत आहे.

‘टेलिफोनिक इमोशनल सपोर्ट टू सुसाइड सरव्हायवर्स’ ही सेवा दर बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी ३ ते ५ या दरम्यान कार्यरत असते. या सेवेमध्ये कनेक्टिंग ट्रस्टकडून आत्महत्याग्रस्त लोकांना फोनद्वारे आधी वेळ घेणेसाठी (अपॉईंटमेंटसाठी) संपर्क साधला जातो, त्यांच्या संमतीने अपॉईंटमेंट ठरवल्यानंतर दुपारी ३ ते ५ या दरम्यान त्यांना फोनद्वारे मानसिक-भावनिक आधार दिला जातो. ज्यांना धोका अधिक त्यांना प्राधान्य देऊन २४ तासांत पुन्हा फोन केला जातो. आत्महत्याग्रस्त व्यक्ती अपॉईंटमेंटसाठी ८४८४०३३३१२ या क्रमांकावर एसएमएस (SMS) करू शकतात. एसएमएसमध्ये नाव, संपर्क क्रमांक, कोणी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे किंवा आत्महत्येमुळे जवळची व्यक्ती गमावली आहे,आदी माहिती विचारली जाते. हा सर्व तपशील गोपनीय ठेवण्यात येतो (काही कायदेशीर अपवाद वगळता). तातडीने बोलायचे असल्यास आमच्या डिसट्रेस हेल्पलाईनवर- ९९२२००४३०५/९९२२००११२२ (रोज दुपारी १२ ते रात्री ८) यावर फोन करू शकता. ‘लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाहीत. कनेक्टिंग ट्रस्ट आहे तुमचे ऐकून घेण्यासाठी, तुम्हाला समजून घेण्यासाठी!’ हा कानमंत्र आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत, अशी माहिती कनेक्टिंग ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लियान सातारवाला यांनी दिली.

लियान सतारावाला म्हणाल्या, “कोरोना महामारीमुळे तसेच लॉकडाउन काळात लोकांना आजारपण, बेरोजगारी, अपयश, निराशा, एकटेपणा या समस्यांमध्ये वाढ झाली. खचल्यामुळे मनात आत्महत्येचा विचार, तसेच प्रयत्न केला गेला. अशांना लोकांना आत्महत्यतेच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी आत्महत्याग्रस्त (सुसाइड सरव्हायवर) आधार दिवस साजरा केला जातो. आत्महत्याग्रस्त लोकांना भावनिक आधार देण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, आत्महत्येचा विचार करणाऱ्या २० व्यक्तिमधील एका व्यक्तीचा आत्महत्येमुळे मृत्यू होतो. जे आत्महत्येचा प्रयत्न करतात, ते पुन्हा असा प्रयत्न करण्याची शक्यता अधिक असते. आत्महत्याग्रस्त किंवा सुसाइड सरव्हायवरचे तीन प्रकारचे असू शकतात. यामध्ये ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, ज्यांच्या कुटुंबातील किंवा जवळच्या नात्यामधील कोणीतरी आत्महत्यामुळे मरण पावले आहे किंवा ज्यांनी आत्महत्या होताना, झालेली पहिली आहे अशा लोकांचा यामध्ये समावेश असतो.”

“भावनिक आधार देण्यासाठी कनेक्टिंग ट्रस्टच्या माधयमातून काम सुरु आहे. यासाठी ट्रस्ट ‘सरव्हायवर सपोर्ट प्रोग्राम’ (SSP) राबवत आहे. या अंतर्गत टेलिफोनिक इमोशनल सपोर्ट टू सुसाइड सरव्हायवरस् (SSP-TESSS) हा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. आत्महत्याग्रस्त लोकांचे प्रमाण अधिक आहे, अशा बऱ्याच जणांना वेळीच आवश्यक तो आधार मिळत नाही. बदनामी हे त्यामागील कारण आहे. परंतु आता कनेक्टिंग ट्रस्ट हे पुणे पोलिस आणि ससुन रुग्णालयाच्या सहकार्याने थेट आत्महत्याग्रस्त लोकांपर्यंत पोहचतात. कोणताही सल्ला न देता, आत्महत्याग्रस्त व्यक्तीविषयी कोणत्याही प्रकारचे मत न बनवता, समानुभूतीने आणि अनुकंपेने आशा व्यक्तीचे दुःख ऐकून, समजून घेतले जाते,” असेही त्यांनी नमूद केले.

ग्राहकांकडून वीजबिल वुसल करणारे हे जुलमी ठाकरे सरकार आहे

0

उर्जामंत्र्यांचा राज्यातील जनतेवर विश्वास नाही
-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
सोलापूर दि. २० नोव्हेंबर- वीज कंपनीवर ऊर्जामंत्र्यांचा विश्वास आहे, परंतु ग्राहकांवर नाही…राज्यातील जनतेवर अविश्वास दाखवणे निंदनीय आहे. राज्य सरकारने १०० युनिट वीज मोफत देण्याच्या आश्वासनावरून यु टर्न मारला आहे. उलट ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम उर्जामंत्र्यांनी केले आहे. वीज बिलात सवलत नाही, मदत नाही. वीज बिले जबरदस्तीने वसुल करण्याची ही ठाकरे सरकारची जुलमी राजवट असल्याची जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
भारतीय जनता पार्टी पुणे पदवीधार मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघातील अनुक्रमे संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ सोलापूर दौ-यावर आलेले विरोधी पक्ष नेते यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी दरेकर यांनी सांगितले की, या सरकारमध्ये समन्वय नाही. याच कारण हे सरकारचे टोलवाटोलवीचे काम सुरु आहे. वीज बिलाचा निर्णय तातडीने होऊ शकतो. मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री आणि अर्थमंत्री हे तिघे एकत्र बसून निर्णय घेऊ शकतात, पण या सरकारमध्ये इच्छाशक्तीचाच अभाव आहे. हे सरकार बेफिकिर आहे. यांनी जनतेच्या प्रश्नांचे काही घेणे देणे नाही, अशी टिका करतानाच दरेकर म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी या ठिकाणी मुद्दाम काँग्रेसला अश्या प्रकारचा निर्णय न घेऊन जनतेच्या नजरेत पाडण्याचे प्रयत्न करत आहे. पण दुर्दैवाने कॉंग्रेसलाही स्वाभिमान नाही.
वाढीव वीज बिलांसदर्भात भाजपाची भूमिका अतिशय आक्रमक आहे. येत्या सोमवारी राज्य सरकारच्या वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ वीज बिल होळीचे आंदोलन होणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या प्रश्नांची जराही काळजी सरकारला असेल तर वाढीव वीज बिलासाठी सरकारने तात्काळ ५ हजार कोटीचे पॅकेज द्यावी अशी आमची मागणी आहे.
पुणे पदवीधर मतदार संघ हा पारंपरिक भाजपाला मतदान करणारा मतदार संघ आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी पदवीधरांसाठी , शिक्षकांसाठी सरकारच्या माध्यमातून मंत्री म्हणून जे काम केले त्याचा उपयोग या उमेदवारांना मिळणार असल्याचे सांगताना ते म्हणाले की, ठाकरे सरकारला वर्ष पूर्ण होत आले तरी अजूनही कुठल्याही प्रकारे जनतेला दिलासा मिळाला नाही. ना शेतक-यांना मदत, ना बेरोजगारांना रोजगार, ना कर्मचाऱ्यांना पगार, ना अतिवृष्टीमुळे खचलेल्या शेतकऱ्याला मदत आणि आता वाढीव वीज बिलाच्या विषयामुळे सरकारच्या विरोधात जनतेमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या परिस्थितीत मतदानाच्या माध्यमातून संग्राम देशमुख व जितेंद्र पवार यांना मतदार निवडून देतील असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.
केवळ बिहार विधानसभा निवडणुकीत नाही तर इतर राज्यांमध्ये देखील भारतीय जनता पार्टीला नागरिकांनी मोठा जनाधार दिला आहे. आता गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील सरकार अपयशी ठरल्यानंतर या निवडणूका होत आहेत आणि म्हणून या निवडणूकांना अनन्य साधारण महत्व असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई-दिल्ली रेल्वेसेवा ;रेल्वे मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं

0

पुणे-: गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेले अनेक दिवस मुंबईत मुंबईत हजारपेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र आज हा आकडा हजारच्या पुढे गेला आहे. तर दिल्लीतही कोरोनाची तिसरी लाट आली आहे. दिल्लीत दररोज कोरोनाचे सात हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे दिल्ली-मुंबई दरम्यानची रेल्वे सेवा बंद करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली. यावर रेल्वे मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे.

दिल्ली-मुंबई दरम्यानच्या अनेक रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द होणार असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं. मात्र रेल्वेनं असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं रेल्वे मंत्रालयानं ट्विट करून स्पष्ट केलं आहे. दिल्ली-मुंबई दरम्यानची हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय एक ते दोन दिवसांत घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यावर रेल्वे मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे.