Home Blog Page 2390

कुसुमवत्सल्य फांउडेशनतर्फे महाराष्ट्राची सौभाग्यवती स्पर्धेचे आयोजन

0

पुणे, दि. 24 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील प्रत्येक गृहिणीला तिची आवड जोपासण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळावं, तसेच लॉकडाउन काळात पडद्यामागील अनेक तंत्रज्ञ आणि कलाकार यांच्या जगण्याला नवीन उमेद देण्यासाठी “महाराष्ट्राची सौभाग्यवती” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुसमवत्सल्य फांउडेशनतर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तर ‘संकल्प’ मानवसंसाधन विकास संस्था कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यातील असंख्य महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून या स्पर्धेची अंतिम फेरी बुधवार, दि. 25 नोव्हेंबर रोजी महाबळेश्वर येथे होणार आहे.

कुसमवत्सल्य फांउडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भवाळकर म्हणाले कि, महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विवाहित स्त्रियांचा विचार करून सदर स्पर्धेची आखणी केलेली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ही स्पर्धा फक्त स्पर्धकांपुरती मर्यादित न राहता या स्पर्धेचा उपयोग पडद्यामागील इतर तंत्रज्ञ आणि कलाकार मंडळीनाही व्हावा. गेले काही महिने महाराष्ट्रासाठी खुपच अवघड गेले, त्यात प्रामुख्याने हातावर पोट असणाऱ्यांची बिकट अवस्था झाली. फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे लोक छोटी-मोठी कामे करत होती, त्यांचे खायचे हाल झाले तसेच ब्युटिशन, पार्लरवाल्यांचे अक्षरश: दिवाळे निघाले. काहींचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस ढासळत गेले तर काहींनी आत्महत्या केली. या सर्वांची अवस्था लक्षात घेता कुसुमवत्सल्य फाउंडेशनने या स्पर्धेला त्यांच्या अर्थार्जनाचे साधन मानले व आपला समाजसेवेचा प्रेम शाबूत ठेवला. या एका स्पर्धेच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार प्राप्त होईलच पण त्याचबरोबर आपापल्या व्यवसायात गमावून बसलेली उमेद त्यांना पुन्हा नव्याने जगता येईल. महाराष्ट्रातील तमाम गृहिणींना आपली कला जोपासता येईल व त्यांच्यात नवीन चैतन्य निर्माण होईल.

संकल्प मानवसंसाधन विकास संस्थेचे संचालक डॉ. पी.एन.कदम म्हणाले कि, लॉकडाउन दरम्यान प्रत्येक घरातील स्त्रीला मोठ्या प्रमाणात जबाबदारी पार पाडावी लागली. या सर्व जबाबदारीतून थोडा विरंगुळा मिळण्याबरोबर स्वत:चे स्वास्थ आणि सौंदर्य जोपासण्याची गोडी लागली पाहिजे. या उद्देशाने संकल्पतर्फे नैसर्गिक संसाधनांचा वापर करुन स्त्रियांच्या स्वास्थ आणि सौंदर्य अबाधीत ठेवण्यासाठी रिसर्च सुरु आहे. लवकरच याबाबतील सौंदर्य प्रसाधने उपलब्ध होणार असल्याची माहिती डॉ. कदम यांनी दिली.

‘एक महिला घरी नसताना…फौजफाटा घेऊन तिचे ऑफिस उद्ध्वस्त केले, यात कोणती मर्दानगी होती? प्रविण दरेकरांचा राऊतांना सवाल

0

‘प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली, ही नामर्दांगी आहे’ असे म्हणत संजय राऊतांनी ईडी आणि भाजपवर टीका केली होती. आता या टिकेला भाजप नेते प्रविण दरेकरांनी उत्तर दिले आहे. ‘घरी नसताना एका महिलेचं ऑफिस फौजफाटा नेऊन तोडले, यात कोणती मर्दानगी? असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला आहे. त्यावरुन आता दरेकरांनी त्यांना कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईची आठवण शिवसेनेला करुन दिली आहे.

प्रताप सरनाईक सध्या विदेशात आहे. त्यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. याचा निषेध करताना राऊत म्हणाले होते की,’प्रताप सरनाईक नसताना त्यांच्या घरी धाड टाकली आहे तो पुरुषार्थ नाही. भाजपने सरळ लढाई पाहिजे. शिखंडीसारखे ईडीचा, केंद्रीय सत्तेचा वापर करु नये’ असे राऊत म्हणाले होते. यालाच प्रविण दरेकरांनी कंगनावरील कारवाईची आठवण करुन देत सवाल केला आहे.

दरेकर ट्विट करत म्हणाले की, ‘प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली,यात कसली मर्दानगी”,असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांना विचारले पाहिजे, एक महिला घरी नसताना… सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचे ऑफिस उद्ध्वस्त केले, यात कोणती मर्दानगी होती?’

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे. सध्या शोधमोहीम सुरु आहे. यासोबतच सरनाईकांसंबंधीत इतर 10 ठिकाणांवरही ईडीकडून शोधमोहीम केली जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या मुलांच्या घरी आणि कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचे पथक दाखल झाले होते. तसेच ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचे पथक रवाना झाले आहे. त्यांना चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आल्याची माहिती आहे.

आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू! – खा. संजय राऊत

0

मुंबई-शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित 10 ठिकाणांवर मलबजावणी संचलनालयाने धाडी टाकल्या. या कारवाईवर . आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा. सुरुवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करू अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राउत यांनी दिली आहे. ईडी असो की मग कुणीही असो, एखाद्या राजकीय पक्षाच्या शाखेप्रमाणे काम करू नये असेही संजय राऊत यांनी ठणकावले आहे.

हे सरकार पुढील 4 वर्षेच नाही तर पुढची 25 वर्षे सत्तेत राहील. काहीही झाले तरी आमचे आमदार आणि नेते कुणाला शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. ईडीचा किंवा कुणाचा दबाव सरकारवर आणणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. पुढील 25 वर्षे तुमची सत्ता येणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे. हे स्वप्न आता विसरूनच जा. आज जर सुरुवात तुम्ही करत असलात तरी त्याचा शेवट कसा करायचा हे आम्हाला नक्कीच माहिती आहे असा इशारा राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

संजय राऊत एवढ्यातच थांबले नाहीत. पुढे जात ते म्हणाले, “ते (ईडी) ज्या लोकांचे आदेश पाळत आहेत, त्यांच्या 100 माणसांची यादी मी देतो. त्यांचे काय धंदे, उद्योग आहेत, मनी लाँड्रिंग कशा पद्धतीने चालते आणि निवडणुकीत पैसा कुठून पैसा येतो इथपासून तो कसा वापरला जातो, कोणाच्या माध्यमातून येतो, बेनामी काय आहे वैगेरे याची कल्पना ईडीला नसली तरी आम्हाला आहे. पण गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखे वागत असतील तर आम्ही पर्वा करत नाही. तुम्ही कितीही नोटीसी पाठवा, धाडी टाका, खोटी कागदपत्रे सादर करा पण विजय शेवटी सत्याचाच होईल. फक्त महाराष्ट्रातच सत्यमेव जयतेचा विजय होऊ शकतो.”

ईडी पुरावे असल्याशिवाय कारवाई करत नाही-देवेंद्र फडणवीस

0

सोलापूर – काही पुरावे असतील म्हणूनच ईडीने सरनाईकांवर कारवाई करत धाड टाकली आहे.चूक नसेल तर सरनाईकांनी घाबरायचे कारण नाही अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली आहे.

फडणवीस याविषयी बोलताना म्हणाले की, ‘ज्यांनी चूक केलेली नाही त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. काही पुरावे मिळाले असतील म्हणूनच ईडीकडून कारवाई करण्यात आली असेल. ईडी पुरावे असल्याशिवाय कारवाई करत नाही’ प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडी पथक दाखल झाल्याची माहिती आहे. तसेच प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले आहे.

टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरू असल्याची माहिती आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यानुसार प्रताप सरनाईकांसंबंधित 10 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे.

इडी कारवाईचे किरीट सोमय्या यांनी स्वागत केले

0

मुंबई-शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांच्या कार्यालयांवर तसेच घरांवर सक्तवसुली संचालनालयाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यानंतर राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या कारवाईचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी स्वागत केले आहे. यासोबतच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबावर थेट आरोप केले आहेत.

प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईविषयी बोलताना सोमय्या म्हणाले की, ‘प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबाच्या अनेक कंपन्या आहेत. या सर्व कंपन्या बेनामी असतील. या कंपन्यांचे काम व्यवस्थित नसतील. सरकारी पैसा किंवा भ्रष्टाचाराचा पैसा त्यांनी वळवला असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. सरनाईक यांच्याबद्दल मी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ऐकल्या असल्याचा दावाही सोमय्यांनी केला आहे.

ठाकरेंवर केले आरोप
यासोबतच किरीट सोमय्यांनी थेट ठाकरे कुटुंबावर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, ‘शिवसेनेचे मोठे मोठे नेते आणि त्यांचे मुखिया व त्यांचा परिवार असेच उद्योगधंदे करतात हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेचे मुंबई, ठाण्यातील अनेक नेते महापालिकेच्या कंत्राटदारांकडून हफ्ते घेत असल्याचा आरोप केला. तसेच त्यांच्यावर कारवाई व्हायला नको का? असा प्रश्नही सोमस्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांच्या मुलांच्या कार्यालयावर ईडीचा छापा-एका मुलाला घेतले ताब्यात

0

मुंबई ठाण्यातील शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या मुलांच्या घरांवर आणि कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाने छापेमारी केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र ही छापेमारी कोणत्या प्रकरणी केली जात आहे याचा कोणताही खुलासा अद्याप झालेला नाही. विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक अशी प्रताप सरनाईकांच्या मुलांची नावे आहेत. दिल्लीच्या टीमच्या नेतृत्त्वात ही कारवाई सुरू असल्याचे वृत्त आहे.दरम्यान विहंग ला गाडीत बसवून इडी अधिकारी सोबत घेऊन गेल्याने त्यास ताब्यात घेतल्याचे मानले जाते आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मनी लाँड्रिंगच्या संशयावरून ही छापेमारी केली जात आहे. यासोतबच सरनाईक यांच्या संबंधीत इतर 10 ठिकाणांवरही छापेमारी केली असल्याची बोलले जात आहे. सरनाईक हे ठाण्यातील ओव्हळा-माजीवाडा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. यासोबतच ते मीरा-भाईंदर परिसराचे शिवसेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते आहेत.

दरम्यान अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना रनोट प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी यांना आवाज उठवत विरोध केला होता. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी तसेच त्यांची कोंडी करता यावी यासाठी ही कारवाई केल्याची चर्चा आहे. मात्र भाजपच्या प्रवक्त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

पुणे विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान, मतमोजणीची तयारी वेळेत पूर्ण करावी -विभागीय आयुक्त सौरभ राव

0

पुणे, दि. 23 : पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान व मतमोजणीसाठीची सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी,अशा सूचना विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातून आज विभागातील पाचही जिल्ह्यांच्या निवडणूक विषयक कामकाजाचा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपायुक्त तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपायुक्त प्रताप जाधव, उपायुक्त सुधीर जोशी, उपायुक्त नयना बोंदार्डे यांच्यासह निवडणूक यंत्रणेशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा चे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे दौलत देसाई, मिलिंद शंभरकर, अभिजित चौधरी, शेखर सिंग व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सहभागी झाले.

पुणे विभागाच्या निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेताना विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी सर्वांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. मतदानासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारे प्रशिक्षण लवकरात लवकर द्या. निवडणूकीचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडा. निवडणूकीचे काम सांघिक भावनेने एकमेकांत समन्वय ठेवून करा. कामे वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करुन त्यानुसार आपापली जबाबदारी पार पाडा. बोगस मतदान होवू नये, यादृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्या, असे सांगून मतदान केंद्रावर तक्रारी नंतर पडताळणीअंती बोगस मतदार असल्याचे निष्पन्न झाल्यास गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कोविड-19 प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मतदान केंद्र निर्जंतुकीकरण करुन घेणे, रांगेत सामाजिक अंतर राखणे, हँड वॉश, सॅनिटायझर पुरवणे आदी व्यवस्था करावी. निवडणूकीच्या अनुषंगाने आयत्या वेळी येणाऱ्या कामांचा विचार करुन या कामासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तयार ठेवा. मतपत्रिका व मतदानाच्या दृष्टीने आवश्यक साहित्य वेळेत प्राप्त करुन घेऊन संबंधितांच्या ताब्यात द्या. सोपवलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन द्या, असे सांगून स्थापन करण्यात आलेली पथके, निवडणूक विषयक झालेले कामकाज व उर्वरित विविध प्रकारच्या कामकाजाचा श्री. राव यांनी आढावा घेतला.

उपायुक्त संजयसिंह चव्हाण यांनी पाचही जिल्ह्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या कामकाजाची माहिती दिली.

पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, साताराचे जिल्हाधिकारी अनुक्रमे डॉ. राजेश देशमुख, दौलत देसाई, मिलिंद शंभरकर, अभिजित चौधरी, शेखर सिंग यांनी आपापल्या जिल्ह्यात निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या तयारीबाबत व कामकाजाबाबत माहिती दिली.

मुंबईतील पाणीकपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. २३ : मुंबईत मे व जून महिन्यातील पाणीकपात टाळण्यासाठी मनोर येथे समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी दिले.

वर्षा या शासकीय निवासस्थानी 200 एमएलडी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,  मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांची प्रमुख  उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, पावसाळ्याच्या सुरुवातीला सातत्याने पाऊस उशिरा येत असल्याने मे व जून महिन्यामध्ये मुंबईत 10 ते 15 टक्के पाणीकपात करावी लागते. हे टाळण्यासाठी समुद्रातील खारे पाणी गोडे केल्यास मुंबईतील नागरिकांना पाणी कपातीचा होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. जगात अनेक देशांमध्ये हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला आहे, तर काही देशांमध्ये अशा प्रकल्पाची उभारणी सुरु आहे. मुंबईसारख्या महानगरात हा प्रकल्प नक्कीच लाभदायक ठरणार असल्याने प्रकल्पासाठी करण्यात येणारी कार्यवाही पुढे सुरु ठेवण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी लागणारे पाणी उपलब्ध असणार आहे. सौर ऊर्जेवर हा प्रकल्प राबविल्यास निर्मिती खर्चही कमी लागणार आहे. मनोर येथे पाण्याची गुणवत्ता चांगली आहे. पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होऊ शकतात. मनोर येथे शासनाचा भूखंड उपलब्ध आहे तसेच रस्तेही उपलब्ध आहेत. या ठिकाणी नागरी वसाहत नसल्याने हा प्रकल्प विनाव्यत्यय पूर्ण होऊन मुंबईच्या नागरिकांना कपातीविना नियमित पाणीपुरवठा होणार आहे.

मनोर येथे 25 ते 30 एकरामध्ये हा प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव असून 200 एमएलडी क्षमतेचा हा प्रकल्प भविष्यात क्षमता वाढविण्यासाठी सोयीस्कर आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारत: अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादरीकरणात सांगितले.

चंपा म्हटले तर काय झाले, तो शॉर्टफार्म, चंपांनी रागावू नये -जयंत पाटील

0

पुणे- आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना कधीही टरबुज्या म्हटलेले नाही. पण चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा राग मानून घेऊ नये, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना ( Chandrakant Patil) जोरदार टोला लगावला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी शेलक्या शब्दात चंद्रकांत पाटील यांचाया खरपूस समाचार घेतला. मात्र त्यानंतर पाटील यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. मी फक्त कायदेशीर बाबींचा संदर्भ घेऊन बोलत होतो, अशी सारवासारव करत अनेकवेळा राष्ट्रवादीचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. तसेच देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या तर मला ‘चंपा’ संबोधतात ते कसे काय चालते? अशा शब्दात टीकाकारांना प्रतिसवाल पाटील यांनी केला होता. मात्र या प्रश्नाला उत्तर देतानाच जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे. पुणे पदवीधर निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ जयंत पाटील हे पुण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री पाटील पुढे म्हणाले की,चंद्रकांत पाटील जिथे जातात तिथे प्रश्नच निर्माण करतात. कारण चंद्रकांत पाटलांसाठी भाजपच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांना कोथरूड विधानसभा मतदार संघाचे तिकीट नाकारण्यात आले. त्यानंतर तिथे पाटील आमदार झाले. त्यामुळे नाराज झालेल्या मेधा कुलकर्णी यांना पक्षाकडून पदवीधर निवडणुकीसाठी आपला विचार होईल अशी अपेक्षा होती. मात्र भाजपने पदवीधर निवडणुकीत देखील त्यांना तिकीट नाकारले. त्यांच्याऐवजी संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी पुण्यात येऊन काय प्रश्न निर्माण केले ? हे माझ्यापेक्षा मेधा कुलकर्णीच चांगल्या प्रकारे सांगतील अशा शब्दात जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना चिमटा काढला.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची पत्रकार परिषद (अनकट )

बोगस मतदार नोंदणी झाल्याचा मंत्री जयंत पाटलांचा आरोप (व्हिडीओ)

0

पुणे : पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुका जिंकण्यासाठी बोगस मतदार नोंदणी झाल्याचा घणाघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी पुण्यात केले. काहीही करून निवडणुका जिंकायच्याच या हव्यासातून वाटेल तो मार्ग निवडतात, याकडे लक्ष वेधत पाटील यांनी भाजपवर शरसंधान साधले.पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदार संघातील जयंत आसगावकर यांच्या प्रचारासाठी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत माजी उपमहापौर दीपक मानकर आणि मित्र परिवार आयोजित मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. पुणे पदवीधर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. अरूण गणपती लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे प्रा. जयंत आजगावकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी कार्यकर्ता बैठक आज दीपक मानकर आणि मित्आर परिवाराने आयोजित केली होती. राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे, आ. श्री. संजय शिंदे, पुणे शहराध्यक्ष, आ. श्री. चेतन तुपे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश प्रवक्ते श्री. अंकुश काकडे, शिवसेना शहर प्रमुख श्री. संजय मोरे, सेना गटनेते श्री. पृथ्वीराज सुतार, शिक्षक संघटनेचे श्री मारणे, तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी दीवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. हर्षवर्धन मानकर यांनी स्वागत केले.

पुणे पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आदर्श उमेदवार असून त्यांच्या घराण्याची देशसेवेची परंपरा आहे. प्रश्न धसाला लावण्याची वृत्ती असलेले लाड विचारांशी तडजोड न करता प्रश्न सोडवतात. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात परिवर्तन होईल, जयंत पाटील साहेब यांनी सांगितले. ‘सरकारने तिजोरी मोकळी झाल्यानंतरही कायम अनुदानित शिक्षकांच्या पुढील अनुदानाचा निर्णय घेतला. तसेच कोरोनाच्या काळात पावलोपावली भाजपाने राजकारणाची संधी साधली. एक बेजाबदार विरोधी पक्ष कसा असू शकतो? याचे उदाहरण भाजपने दिले. पदवीधरचे अधिकृत उमेदवार अरूण लाड हे प्रामाणिक, स्पष्ट वक्ता आणि विचारावर श्रद्धा असणारे क्रांतिकारकी घराण्यांची परंपरा असलेले उमेदवार आहेत. ते पदवीधरांच्या प्रश्नासाठी उभे राहतील, पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी चंद्रकांत पाटील किती पुढे होते? पुणे येथील काही भागातील यादीमध्ये शंभर एक मतदारांच्या नावासमोर एकच मोबाईल नंबर आणि दिलेल्या पत्त्यावर तो मतदार रहात नाही, अशी बोगस मतदार नोंदणी झाली आहे. त्यासंबंधी निवडणुक आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे, अशी माहितीही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिली.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी , ‘महाविकास आघाडी सरकारचे अधिकृत दोन्ही उमदेवार यांना मतदाररुपी आशिर्वाद द्यावा, व त्यांना प्रथम क्रमांकाची पसंती देऊन निवडून आणावे असे आवाहन यावेळी केले.’ पदवीधर उमेदवार अरूण लाड म्हणाले की , ‘गेल्या अकरा वर्षात मागील पदवीधर आमदार चंद्रकांत पाटील यांनी महामंडळ नेमू असे म्हंटले होते, पण केंद्रात आणि राज्यात सरकार असतानाही ते महामंडळ नेमू शकले नाहीत.’ ‘आम्ही पुणेकरांनी एकदा एखाद्या विडा उचलला की, त्याला मार्गी लावल्याशिवाय थांबणार नाही, आणि पुणे पदवीधर मतदार संघात परिवर्तन निश्चित असून पुणेकर मतदार लाड आणि प्रा. आजगावकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहेत, अशी भूमिका यावेळी दीपक मानकर यांनी मांडली.

रुपाली चाकणकर यांनी यावेळी चंद्रकांत पाटील हे केवळ स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करून उथळ पणा दाखवीत आहेत अशी टीका केली. तर सेनेचे संजय मोरे यांनीही कानपूर विद्यापीठाच्या बोगस पदव्यांच्या विषयावर सत्तेत असताना तक्रारी करूनही चंद्रकांत पाटलांनी त्यावर कारवाई केली नाही असा आरोप केला .

ताकदीच्या माणसाला त्रास कसा द्यायचा? हे भाजपकडून शिकावे : पाटील

‘माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी अत्यंत जिव्हाळ्याने ही कार्यकर्ता बैठक आयोजित केली. बघता-बघता या बैठकीला सभेचे स्वरुप आले, आपणाकडे असलेले संघटन कौशल्य आम्ही जाणतो, पण एका ताकदीच्या माणसाला बदनाम कसे करायचे, हे भारतीय जनता पक्षाकडून शिकावे असा टोला, यावेळी पाटील यांनी भाजपला लगावला.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या नावाचा गैरवापर करुन दीड कोटी रुपयांची फसवणूक; एकाला अटक

0

पुणे : श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा डिस्ट्रीक डेव्हलपमेंट कॉर्डिनेटर असल्याचे सांगत बोगस कंपनीद्वारे जमिनीत गुंतवणुक करायला लावून दीड कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट ४च्या पथकाने अटक केली आहे. प्रणय उदय खरे (वय २८, रा. साळुंखे विहार, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी अश्विनीकुमार कांबळे (वय ४४, रा. औंध) यांची फिर्याद दिली आहे. प्रणय खरे याने जे. के. व्हेंजर्स नावाची बोगस कंपनीची स्थापना केली. कंपनीमार्फत रत्नागिरी, खेड येथे ७ हजार एकर जागा घेतली आहे, असे खरे याने कांबळे यांना सांगून या जागेमध्ये १५ वर्षाकरीता १ एकर जागेसाठी गुंतवणुक केल्यास पहिल्या ११ गुंतवणूकदारांना १ कोटी रुपये, त्यानंतरच्या ५० गुंतवणूकदारांना ५० लाख रुपये , त्यानंतरच्या उर्वरीत गुंतवणुकदारांना ४० लाख रुपये, ६ वर्षानंतर टप्प्या टप्प्याने दिले जातील. तसेच शॉर्ट टर्म प्लॅन व मोरींगा झाडे लावण्याच्या प्लॅनमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर नफा मिळेल, असे भासवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना १ कोटी ४५ लाख १६ हजार १११ रुपये त्यांच्या कंपनीच्या स्कीममध्ये गुंतविण्यास भाग पाडले. जानेवारी २०१७ मध्ये फिर्यादी यांनी त्यात गुंतवणुक केली. त्यानंतर आजपर्यंत कोणताही परतावा न देता फिर्यादी यांनी दिलेली रक्कम स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता वापरुन फसवणूक केली.

खरे याने विस्तार ३६०, दि योगीक, ए. एच. ओ लाईफ स्टाईल प्रा. लि., प्रणल्स मेडिया प्रा. लि. नावाने कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यामार्फत त्याने वेगवेगळ्या लोकांची स्कीमच्या माध्यमातून पुणे शहर व बाहेर बर्याच लोकांना फसविले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे, अशा लोकांनी खडकी येथिल युनिट ४ च्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक दीपक माने, गीता पाटील व त्याच्या पथकाने ही कामगिरी केली.

आर्ट ऑफ लिव्हीगचे मुख्यालय उदयपूर बंगलुरु येथे असून त्यांच्या देशभरात शाखा आहेत. ही संस्था लोकांना ध्यान धारणांचे प्रशिक्षण देण्याचे व ध्यान धारणेचे महत्व लोकांना पटवून देण्याचे महत्वाचे काम करते. त्यांच्या पुण्यातही शाखा आहेत. प्रणय उदय खरे याने आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेत प्रवेश मिळवून डी डी सी (डिस्ट्रीक डेव्हलपमेंट कॉर्डिनेटर ) या पदावर असल्याचा बनाव करुन आर्ट ऑफ लिव्हींग ची त्याच्या जे. के. व्हेंचर्स कंपनी माफर्त कार्यशाळा आयोजित करत होता. ही कंपनी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेशी संबंधित असल्याचे सांगून लोकांचा विश्वास संपादन करत असे. त्यांना आपल्या जाळ्यात ओढून वेगवेगळ्या आर्थिक गुंतवणुकीच्या स्कीम सांगून त्यांच्याकडून मोठमोठ्या रक्कमा घेऊन त्याची फसवणूक करत होता. अनेक दिवस पोलीस त्याच्या मागावर होते.

………….

प्रणय खरेची २० बँक खाती…
आर्ट ऑफ लिव्हींगचा पदाधिकारी असल्याचे सांगणार्या प्रणय खरे याच्याकडे अनेक महत्वाची कागदपत्रे आढळून आली आहेत. त्यातून त्याची २० बँक खाती असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने प्रथम पुण्यातील आर्ट ऑफ लिव्हींगच्या केंद्रात प्रवेश घेतला. त्या ठिकाणी येणार्या नागरिकांना तो तेथील पदाधिकारी असल्याचे भासवत होता. त्याने आर्ट ऑफ लिव्हींगच्या काही कार्यशाळाही आयोजित केल्या होत्या. त्यातून लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला. आपण रत्नागिरी, खेड येथे जमीन खरेदी केली आहे. तेथे चंदनाची व शेवग्याची झाडे लावून व्यवसाय करणार असल्याचे सांगत असे. तो लोकांना आपण अध्यात्मिक असल्याचे भासवत असल्याने लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 981, रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1253 ने वाढ

0

पुणे विभागातील 4 लाख 96 हजार 928 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 25 हजार 701 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.23 :- पुणे विभागातील 4 लाख 96 हजार 928 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 25 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 981 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 792 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.53 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.कालच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1253 ने वाढ

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 36 हजार 210 रुग्णांपैकी 3 लाख 17 हजार 985 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 42 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 183 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.43 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.58 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 732 रुग्णांपैकी 47 हजार 73 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 978 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 369 रुग्णांपैकी 40 हजार 829 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 972 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 568 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 474 रुग्णांपैकी 44 हजार 379 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 406 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 689 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 916 रुग्णांपैकी 46 हजार 662 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 583 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 671 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1253 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 785 , सातारा जिल्ह्यात 166, सोलापूर जिल्ह्यात 229, सांगली जिल्ह्यात 52 तर कोल्हापूर जिल्ह्यात 21 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 826 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 597, सातारा जिल्हयामध्ये 20, सोलापूर जिल्हयामध्ये 131, सांगली जिल्हयामध्ये 53 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 25 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 27 लाख 18 हजार 720 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 25 हजार 701 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 22नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोविड टेस्ट सक्तीची

0

मुंबई -महाराष्ट्र सरकारने चार राज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी करोना चाचणी सक्तीची केली आहे. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात करोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या चार राज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी करोना चाचणी सक्तीची केली आहे.

राजधानी दिल्लीत करोनाची तिसरी लाट आली आहे. दररोज तिथे करोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहेत. “दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरातमधून येणाऱ्या हवाई प्रवाशांना महाराष्ट्रातील विमानतळावर उतरल्यानंतर RT-PCR रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे. नियोजित प्रवासाच्या ७२ तास आधी ही चाचणी करावी लागेल” असे महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या SOP मध्ये म्हटले आहे.

चार राज्यातून ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांनाही निगेटीव्ही रिपोर्ट सादर करावा लागेल. प्रवाशाच्या ९६ तास आधी हा करोना चाचणी करावी लागेल. रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची बॉर्डरवरच्या चेकपोस्टवर तपासणी केली जाईल. “ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसतील, त्यांची अँटीजेन चाचणी केली जाईल. प्रवासी पॉझिटिव्ह आढळला तर त्या प्रवाशाला कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. उपचाराचा खर्च त्यालाच करावा लागेल” असे एसओपीमध्ये म्हटले आहे.

काय म्हटलं आहे महाराष्ट्र सरकारने?

दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या चार राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी आरटीपीसीआर निगेटिव्ह असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात येण्याच्या ७२ तास आधी हा चाचणी अहवाल घेतला गेला पाहिजे.

आरटी पीसीआर टेस्ट रिपोर्टचा अहवाल ज्या प्रवाशांसोबत नसेल त्यांना विमानतळावर आल्यानंतर ती टेस्ट करावील लागेल. विमानतळांनी यासंदर्भातले टेस्टिंग सेंटर्स उभारले पाहिजेत. या चाचणीचे शुल्क प्रवाशांकडून घेण्यात येईल.

दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या चार राज्यांमधून जे प्रवासी रेल्वेने येणार आहेत त्यांनाही आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट सोबत आणावा. तो निगेटिव्ह असेल तरच प्रवास करावा आरटीपीसीआर टेस्ट मागील ९६ तासांमध्ये केलेली असली पाहिजे.

राजधानी दिल्लीत करोनाची तिसरी लाट आली आहे. दररोज तिथे करोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहेत. “दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरातमधून येणाऱ्या हवाई प्रवाशांना महाराष्ट्रातील विमानतळावर उतरल्यानंतर RT-PCR रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे. नियोजित प्रवासाच्या ७२ तास आधी ही चाचणी करावी लागेल” असे महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या SOP मध्ये म्हटले आहे.
या चार राज्यातून ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांनाही निगेटिव्ह रिपोर्ट सादर करावा लागेल.

अशाच प्रकारची नियमावली रस्ते मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठीही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

सर्पसंकटातून ‘आर्या’ कशी वाचवेल स्वतःला ?

0

सोनी मराठी वाहिनीवरची ‘आई माझी काळुबाई’ सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.त्याची विशेष चर्चा सोशल मीडियावर सातत्याने होताना दिसते.  असा दावा या दूरचित्रवाहिनी ने केला आहे.‘आई काळुबाई’ हे साताऱ्या जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असfलेलं देवस्थान आहे. विशेष म्हणजे या मालिकेचं चित्रीकरण साताऱ्यातच होत असल्यानं मालिकेला मातीतला अस्सलपणा आणि दृश्यश्रीमंती लाभली आहे. 

मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची आहे. या मालिकेत आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते. आपल्या भावाला, संकेतला शोधण्यासाठी म्हणून आर्या माधवराजेंची अट मान्य करून त्यांच्या मुलाशी, अमोघशी लग्न करते. पाटील घरात आल्यापासून आर्या तिच्या भावाचा म्हणजेच संकेतचा शोध घेताना वेगवेगळ्या जीवघेण्या संकटात सापडते,त्यापैकीच एक संकट म्हणजे  विषारी सापाशी तिचा सामना होतो. आर्यावर आलेले हे सर्पसंकट नेमके कसे आले आणि कोणी घडवून आणले ,त्यातून आर्या कशी मार्ग काढते, त्यात तिला आई काळुबाईचा काय संकेत मिळतो. याची उत्कंठावर्धक गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल.असा दावा या दूरचित्रवाहिनी ने केला आहे.

महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा, चैत्यभूमीवर गर्दी नको

0

मुंबई, दि. 23 : महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ठेवून अनुयायांनी आपल्या कृतीतून  विचारांची प्रगल्भता दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

सहा डिसेंबर रोजीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.

महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही सहा डिसेंबर रोजी अनुयायांनी अभिवादनासाठी मुंबईत येऊ नये असे आवाहन केले आहे. या भूमिकेचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वागत केले. समितीने चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांबाबत संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले. त्यानुसार महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधा यांचे नियोजन करण्यात येणार आहे.

या बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख,  खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंह, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सचिव नागसेन कांबळे, समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सी. एल. थूल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले दैवत आहे. आपण त्यांचे अनुयायी आहोत, त्यांच्या विचारांची प्रगल्भता कृतीतून दाखविण्याची ही वेळ आहे. बाबासाहेब आयुष्यभर अन्यायाच्या विरोधात संघर्ष करत राहिले. त्यांच्या अभिवादनाच्या कार्यक्रमात लोकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. कोविडचे संकट जाता जात नाही. ते संपले असे मानू नये. चैत्यभूमीवर गर्दी न करता डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी ज्या-ज्या काही गोष्टी करायच्या त्या सर्व केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ दिला जाणार नाही. यापूर्वीही आपण सर्व सणवार साधेपणाने साजरे केले आहेत. डॉ.बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण हा गांभीर्याने आणि अभिवादन करण्याचा प्रसंग आहे. त्यामुळे या कठीण काळात आपण जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नुकताच झालेला स्मृतिदिनही साधेपणानेच साजरा केला होता. त्यापूर्वी लाखोंच्या गर्दीच्या साक्षीने होणारी विठुरायाची पंढरीची वारीही साधेपणाने करावी लागली होती. याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, महापरिनिर्वाणदिनी गर्दी न करता, मोजक्यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्याचा महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचा निर्णय स्वागतार्ह असाच आहे. सरकार म्हणून आम्ही जबाबदारी घेतली आहे. पण आता अनुयायी म्हणून जबाबदारी घ्यावी लागेल. आपण बाबासाहेबांकडून प्रेरित होऊन समाजाला पुढे नेऊया. माझ्या आजोबांचे आणि डॉ. बाबासाहेब यांचे ऋणानुबंध होते. त्यांच्यामध्ये स्नेह होता. हे ऋणानुंबध आपण समाजापर्यंत नेऊया, असेही त्यांनी सांगितले.

गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने चांगली भूमिका घेतली आहे. आतापर्यंत सर्वधर्मीयांनी सणवार अत्यंत साधेपणाने साजरे केले आहेत. महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकट काळात तो साधेपणाने व्हावा. नियमांचे पालन केल्यास या संकटाला रोखता येणार आहे. अभिवादन आणि दर्शनासाठी गृह विभागासह सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. शेख यांच्यासह खासदार श्री. शेवाळे, आमदार श्री. सरवणकर, समन्वय समितीचे सचिव श्री. कांबळे,  उपाध्यक्ष साळवे, डॉ. मुणगेकर आदींनीही सहभाग घेतला.

मुख्य सचिव संजय कुमार यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने शासन-प्रशासन परिपूर्ण तयारी करेल, असे सांगून आभार मानले.