Home Blog Page 2389

राज्यभरात मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम सुरू

0

मुंबई, : राज्यभरात मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम दि. 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला असून प्रारुप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांची नाव नोंदणी आणि समाविष्ट नोंदींबाबत आक्षेप किंवा त्यामध्ये दुरूस्ती वा सुधारणा करावयाच्या असल्यास संबंधितांनी विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे. तसेच दि. 5, 6, 12 आणि 13 डिसेंबर 2020 या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मोहीमदेखील आयोजित करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभरात दि. 1 जानेवारी, 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक 17 नोव्हेंबर, 2020 रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून प्रारुप मतदार यादीतील नोंदीबाबत दावे व हरकती दि. 15 डिसेंबर, 2020 पर्यंत स्वीकारण्यात येतील. ज्या पात्र मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीत समाविष्ट नाहीत अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी संबंधित बाबीसाठीच्या विहित नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

सर्व राज्यभरात या पुनरिक्षण कार्यक्रम कालावधीत शनिवार दि. 5 डिसेंबर तसेच रविवार दि. 6, शनिवार दि. 12 आणि रविवार दि. 13 डिसेंबर, 2020 रोजी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरिता त्याच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (बूथ लेव्हल एजन्ट- बीएलए) नेमणूक करावी आणि शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बूथ लेव्हल ऑफीसर- बीएलओ) मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे.

भारत निवडणूक आयोगाद्वारे www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची आणि यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली असून या सुविधेचाही उपयोग करावा. अधिक माहितीसाठी wwww.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन  करण्यात आले आहे.

पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक पूर्वतयारीचा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी घेतला आढावा

0
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेवून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडा-मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग

पुणे, : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेवून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडा, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिल्या.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांच्या निवडणूक विषयक पूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा चे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे डॉ. राजेश देशमुख, दौलत देसाई, डॉ. अभिजित चौधरी, शेखर सिंग, पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुण्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, उपायुक्त तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण, सोलापूर चे अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्यासह निवडणूक यंत्रणेशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागाच्या निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेवून मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकी अंतर्गत मतदान व मतमोजणीसाठीची तयारी वेळेत पूर्ण करा. निवडणूकी दरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन करा. तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. बोगस मतदान होवू नये, यासाठी सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. मतदान केंद्रावर पडताळणी दरम्यान बोगस मतदार असल्याचे निष्पन्न झाल्यास गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी, असे सांगून श्री. सिंग म्हणाले, निवडणूकीचे कामकाज शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडाव्यात. योग्य नियोजन करुन समन्वयाने कामे वेळेत पूर्ण करावीत.

श्री. सिंग म्हणाले, कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करुन घ्या. मतदानासाठीच्या रांगेत सामाजिक अंतर राखले जाईल, यासाठी नियोजन करा. केंद्राच्या ठिकाणी हँड वॉश, सॅनिटायझर, साबण, हॅन्ड ग्लोव्हज, व अन्य आवश्यक साहित्य गरजेनुसार वेळेत पुरवले जाईल, याची दक्षता घ्या. मतपत्रिका व मतदानाचे साहित्य वेळेत संबंधितांच्या ताब्यात द्या, असे सांगून निवडणूक विषयी पूर्ण झालेली कामे व उर्वरित कामकाजाचा श्री. सिंग यांनी आढावा घेतला.

विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव म्हणाले, पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्याबाबत विविध माध्यमांद्वारे जनजागृती केली जात आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मतदान केंद्राचे सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. तसेच यादृष्टीने आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे सांगून श्री. राव यांनी एकूण मतदार, मतदान केंद्रे, कर्मचारी व्यवस्थापन, विविध पथके व कक्षांचे कामकाज तसेच निवडणूकीच्या अनुषंगाने पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पाचही जिल्ह्यात झालेल्या पूर्व तयारीबाबत व कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश व सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली.

लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे-अजित पवार यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडं

0

पंढरपूर, :- कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री. पवार आणि सौ.पवार यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री. पवार बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सौ सारिका भरणे, मानाचे वारकरी श्री. कवडुजी भोयर, सौ कुसुमबाई भोयर, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, पार्थ पवार, जय पवार आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, ‘अवघ्या जगासमोर कोरोनाचे आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ कोरोना आटोक्यात आला, असे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचे आहे. याबाबतीत समस्त वारकरी बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांनी शासनाच्या आवाहनाला आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद दिला. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिीणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिक यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील, असा विश्वास आहे.
राज्यातील शेतकरी यंदाच्या वर्षी अतिवृष्टिने संकटात आला आहे. या शेतकऱ्यांच्या जीवनातील दुख: हलक करण्याची ताकद शासनाला दे अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केली असल्याची सांगून श्री.पवार म्हणाले, श्री विठ्ठल कोरोनाचे संकट दूर करेलच अशी समस्त भाविकांप्रमाणेच माझीही श्रध्दा आहे. पण सर्व काही पांडुरंगावर सोडून चालणार नाही. आपणा सर्वांना कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी मास्क वापरणे. गर्दी टाळणे, वारंवार हात धुणेआदी गोष्टी काटेकोरपणे अंमलात आणाव्या लागतील.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करुन त्यांनी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वंदन केले. या शहिद वीरांचा त्याग महाराष्ट्र नेहमी लक्षात ठेवेल, युवकांना देशासाठी लढण्याची प्रेरणा देईल असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले.याचबरोबर त्यांनी आज असणाऱ्या संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
श्री.पवार यांच्या हस्ते मानाचे वारकरी श्री. कवडुजी नारायण भोयर आणि सौ. कुसुमबाई कवडुजी भोयर (मु.डौलापूर, पो.मोझरी, ता. हिंगणघाट जि.वर्धा) यांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात येणार प्रवास सवलत पास सुपूर्त करण्यात आला. विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या ‘दैनंदिनी 2021 ‘ चे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसिलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, एसटी महामंडळाचे दत्तात्रय चिकोर्डे, सुधीर सुतार आदी उपस्थित होते.

पाच तासांच्या चौकशीनंतर ED कार्यालयातून विहंग सरनाईक बाहेर पडले.

0

मुंबई : आमदार आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज सकाळी ED ने छापेमारी केली. या छापेमारीनंतर आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांना ED ने चौकशीसाठी ED कार्यालयात नेलं होतं. तब्बल पाच तासांच्या चौकशीनंतर ED कार्यालयातून विहंग सरनाईक याना सोडण्यात आलं आहे.

ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे घर व कार्यालयासह सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आज (मंगळवारी) 10 ठिकाणी छापे टाकले. मनी लाँडरिंगप्रकरणी मुंबई ठाण्यातील विविध ठिकाणी शोध मोहिम राबवण्यात आली. टॉप्स ग्रुपचे प्रमोटर संबंधीत ही शोधमोहिम राबवण्यात आली असून संबंधीत ठिकाणं रायकीय व्यक्तींशी संबंधीत असल्याचे ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

निःस्पृह भावनेने काम करणाऱ्या संस्थांची गरज-सतेज पाटील

0

पुणे : “मागासवर्गीय, वंचित घटकांतील, गरीब मुलांना ज्ञानदान करण्याचे कार्य महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ गेल्या नऊ दशकांहून अधिक काळ करत आहे. समाजाच्या कल्याणासाठी निःस्पृह भावनेने काम करणारी ही एक संस्था असून, अशा संस्थांची समाजाला गरज आहे,” असे प्रतिपादन राज्याचे गृह (शहर) राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले.
महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाच्या टिळक रस्त्यावरील अशोक विद्यालय येथील कार्यालयास सतेज पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहनदादा जोशी, मंडळाचे सचिव प्रसाद आबनावे, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्रथमेश आबनावे, गौरव आबनावे, प्रज्योत आबनावे, पॅट्रोन्स भागुजी शिखरे, विकास दळवी, धोंडिबा तरटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे दिवंगत सचिव डॉ. विकास आबनावे यांच्या स्मृतींनाही सतेज पाटील व मोहन जोशी यांनी उजाळा दिला. प्रसाद आबनावे व सहकाऱ्यांनी पाटील यांचा स्वागत सत्कार केला. तसेच कोरोना, शिक्षण संस्था, शिक्षकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या अडचणी, शैक्षणिक सुधारणा अशा विविध मुद्यांवर चर्चा केली. प्रथमेश आबनावे यांनी संस्थेच्या कार्याविषयी, तसेच ‘नवी उमेद, नवी दिशा, विकासपर्व मिशन १००’ या अभियानाची माहिती दिली. 
सतेज पाटील यांनी संस्थेमार्फत होत असलेल्या ज्ञानदानाच्या कामाचे कौतुक केले. शिक्षण संस्थांचे, शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कायमच सकारात्मक असून, अशा निःस्पृह संस्थांना कोणतीही मदत लागली, तर ती दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. मोहन जोशी यांनी डॉ. विकास आबनावे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
महाविकास आघाडीला पाठिंबा

विधानपरिषद शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आजगावकर यांना महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळतर्फे जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला.

पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिक गौतम पाषाणकर अखेर जयपूर येथील हॉटेलमध्ये सापडले

0

पुणे- येथील प्रसिद्ध पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर अखेर सापडले आहेत. तब्बल एक महिन्यानंतर त्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. २१ ऑक्टोबरला गौतम पाषाणकर अचानक बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट समोर आली होती. सुसाईड नोटमध्ये त्यांनी व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. यानंतर शहरातील उद्योजक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.जयपूर येथे गौतम पाषणाकर सापडले आहेत. गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबाने तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून युनिट १ या प्रकरणाचा तपास करत होते. पोलीस निरीक्षक ताकवले यांना गौतम पाषाणकर राज्याबाहेर गेले असावेत अशी माहिती त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. त्यादृष्टीने तपास सुरु होता. मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जयपूर येथील एका हॉटेलमध्ये गौतम पाषाणकर असल्याची माहित युनिट १ क्राइम ब्रांचला मिळाली. सध्या त्यांना पुण्यात परत आणण्याची प्रक्रिया सुरु आहे.

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

0

पुणे,दि.24:- भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.
दिनांक 18 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 या दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीमध्ये विशेष मोहिमांचे आयोजन करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने मोहिमेदरम्यान पुणे जिल्हयातील सर्व विधानसभा मतदार संघस्तरावर दिनांक 5, 6, 12 व 13 डिसेंबर रोजी शनिवार व रविवार या सुट्टयांच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या, कृष्ण धवल छायाचित्र असलेल्या मतदारांचे रंगीत छायाचित्र घेण्यात येतील.
सर्व नागरिकांनी कुटूंबातील मयत झालेल्या व्यक्ती, दुबार नावे असलेले मतदार व स्थलांतरीत झालेल्या मतदारांनी विशेष मोहिमेच्यावेळी फॉर्म क्रमांक 7 भरुन देऊन मतदार यादीतील नावांची वगळणी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहनही डॉ.देशमुख यांनी केले आहे.

पुणे विभागात झाली ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 01

0

पुणे विभागातील 4 लाख 97 हजार 808 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 26 हजार 630 रुग्ण
विभागीय आयुक्त सौरभ राव पुणे,दि.24 :- पुणे विभागातील 4 लाख 97 हजार 808 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 26 हजार 630 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 01 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 821 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.53 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 929 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 525 , सातारा जिल्ह्यात 147, सोलापूर जिल्ह्यात 200, सांगली जिल्ह्यात 41 तर कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 36 हजार 735 रुग्णांपैकी 3 लाख 18 हजार 573 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 957 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 205 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.61 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 879 रुग्णांपैकी 47 हजार 122 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 74 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 683 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 569 रुग्णांपैकी 40 हजार 960 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 37 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 572 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 515 रुग्णांपैकी 44 हजार 447 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 378 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 690 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 932 रुग्णांपैकी 46 हजार 706 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 555आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 671 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 880 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 588, सातारा जिल्हयामध्ये 49, सोलापूर जिल्हयामध्ये 131, सांगली जिल्हयामध्ये 68 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 44 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 27 लाख 35 हजार 318 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 26 हजार 630 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 23 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

” वाढीव वीज बिल विरोधी मनसेचा गुरुवारी मोर्चा “

0

पुणे- वाढीव वीज बिलांच्या विरोधात निषेध नोंदविण्यासाठी पुणे शहर माणसे च्या वतीने शनवार वाद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा येत्या गुरुवारी काढण्यात येणार आहे अशी माहिती पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी येथे दिली
या संदर्भात प्रसिद्धीस पाठविलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, ‘करोना काळात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाढीव वीज बील आली आहेत या वाढीव वीज बिला बाबत नागरिकांच्या मध्ये प्रचंड असंतोष असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यसरकार कडे वीज बिल आकारणी संदर्भात सूचना करून नागरिकांना वीज बिलात सूट देण्याची व नागरिकांना दिलासा देण्याची मागणी शिंदे केली होती मात्र सरकारने सूट देण्याच्या संदर्भात नागरिकांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत त्यामुळे गुरुवार दिनांक २६/११/२० रोजी राजठाकरे यांच्या आदेशानुसार वाढीव वीज बिल माफी साठी जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे म्हणून पुण्याचे माजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी मनसेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने जाणार आहे .महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व नागरिक शनिवार वाडा येथून निघून लालमहाल वरून दारुवाल पूल मार्गाने नरपतगीरी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालया कडे जाणार आहे.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचल्या नंतर मनसेचे नेते मोर्चाला संबोधित करतील व जिल्हाधिकारी यांना निवेदन देत मोर्च्या ची सांगता होणार आहे .असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

(या बातमीसाठी वापरण्यात आलेले छायाचित्र प्रातिनिधिक आहे )

रिक्षाचालक ते 125 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले सक्रिय राजकारणी …

0

ईडी च्या कारवाई नंतर आमदार असलेले नेमके प्रताप सरनाईक कोण आहेत, त्यांचा जीवनप्रवास कसा आणि ते किती कोटी संपत्तीचे मालक आहेत ? याविषयी आज उत्सुकता लागून होती. त्यांच्या विषयी मिळालेली माहिती अशी आहे कि, प्रताप सरनाईक यांचा जन्म वर्ध्यामध्ये झाला. ते आज 65 वर्षांचे आहेत. लहानपणीच ते वर्ध्यामधून मुंबईत स्थाइक झाले. त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. डोंबवली पूर्वेतील एस. व्ही. जोशी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण घेतले

रिक्षाचालक ते सक्रिय राजकारणी
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरनाईकांनी काही काळ रिक्षाही चालवली. यानंतर त्यांनी 1997 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यत्तव घेत सक्रीय राजकारणात उडी घेतली. 1997 साली ते पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यानंतर 2008 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

125 कोटींच्या संपत्तीचे मालक
प्रताप सरनाईक यांचा विहंग ग्रुप या नावाने अनेक व्यवसाय सुरू आहेत. त्यांनी 2019 साली निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची एकूण (स्थावर आणि जंगम एकत्रित) मालमत्ता 125 कोटींहून अधिक असल्याचे नोंदवले आहे.

2008 मध्ये पहिल्यांदा आमदार
2008 मध्ये सरनाईकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर 2009 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले आणि ते ठाण्यातून आमदार झाले. प्रताप सरनाईक हे शिवसेनेकडून सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारपदी निवडून आले आहेत. ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघातून ते आमदार आहेत.

दोन पुत्र विहंग आणि पूर्वेशही राजकारणात सक्रिय
प्रताप सरनाईकांना दोन मुलं आहेत. यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव विहंग तर धाकट्या मुलाचे नाव पूर्वेश आहे. दोघेही युवासेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे जवळचे संबंधत आहेत. पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव आहेत. तर युवासेनेच्या कामांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होतात. तर पूर्वेश यांच्या पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत.

विहंग ग्रुप काय आहे?
विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक 1989 पासून ठाणे शहरातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये सहभागी झालेले आहेत. विहंग शांतिवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे त्यांचे रहिवासी प्रकल्प आहेत. यासोबतच घोडबंदर रोडला मानपाड्याजवळ प्रताप सरनाईक यांचे विहंग्ज इन हे थ्री-स्टार हॉटेलही आहे. विहंग्ज ग्रुपकडे विहंग्ज पाम क्लबचीही मालकी आहे. यामध्ये स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, जाकूझी आणि स्क्वॅश अशा विविध सोयी आहेत.

राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची शरद पवारांची टीका

0

मुंबई–लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले आहेत. बीड जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.“राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे योग्य नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

‘रावसाहेब दानवेंचा नवीन गूण मला कळाला’

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी परत भाजपची सत्ता येणार, असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, ‘रावसाहेब दानवे यांनी विधिमंडळात अनेक वर्ष काम केले आहे. त्यांना आम्ही काम करताना पाहिले आहे. पण त्यांचा हा गूण मला माहिती नव्हता. त्यांची ज्योतिष्य अभ्यासाची तयारी मला माहिती नव्हती. ज्योतिष्य शास्त्राचा जानकार म्हणून त्यांचा परिचय नव्हता, तो आता झाला आहे. पण, सामन्य माणसे सोबत असतील कुडमुड्या ज्योतिष्याचे काही चालत नाही,’ असा सणसणीत टोला पवारांनी दानवेंना लगावला.

‘केंद्राकडून सत्तेचा गैरवापर’

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. ‘दिल्लीच्या सत्तेचा वापर लोकांचा प्रश्न सोडवण्याऐवजी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे,’ असे म्हणत सरनाईक यांच्यावरील कारवाईचा पवारांनी निषेध केला.

‘दिल्लीत वेगळे राज्य असेल तर राज्य चालवणे कठीण असते. लोकांची कामे करत असताना मदत करण्याऐवजी‌ केंद्र सरकार विरोधी पक्षाला नाउमेद करत आहे. त्याचे उदाहरण आज‌ पाहण्यास मिळाले आहे. आज जे सरकार चालू आहे, त्याला सर्वसामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे नैराश्यपणा भाजप नेत्यांमध्ये आला आहे, त्याचे हे प्रतिक आहे’, असा टोला पवारांनी भाजपला लगावला.

ईडीने कारवाई का केली तेच माहित नाही -आमदार प्रताप सरनाईक

0

ईडीने छापेमारी केल्यानंतर अखेर सुमारे आठ ते नऊ तासांनी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ईडीने ही कारवाई नेमकी का केली याची मला माहिती नाही. मी ही माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तसंच सर्व प्रकारची कायदेशीर लढाई लढणार आहे असं प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज ईडीने छापे मारले. त्यानंतर त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांनाही ताब्यात घेतलं. आता प्रताप सरनाईक यांनी ही कारवाई का झाली तेच माहित नसल्याचं म्हटलं आहे.

आदित्य रॉय कपूर बनला आपली स्वत:ची ‘3डी बोलकी बाहुली’ असलेला बॉलीवूडचा पहिला अभिनेता !

0

फिल्ममेकर अनुराग बासुच्या नुकत्याच ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झालेल्या ‘लूडो’ ह्या चित्रपटाची सध्या सर्वत्र वाखाणणी होत आहे. ह्या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूरला शब्दभ्रम आणि बोलक्या बाहुल्यांची कला अवगत असते. ह्या सिनेमात आदित्यची ‘ऑल्टर इगो’  दाखण्यात  आलेली त्याच्यासारखी हुबेहुब दिसणारी बाहुली सुप्रसिध्द शब्दभ्रमकार रामदास पाध्ये आणि त्यांचा मुलगा सत्यजीत पाध्ये ह्यांनी बनवली आहे. 3डी प्रींटिंग प्रणालीचा उपयोग करून त्यांनी आदित्यसाराखी दिसणारी बाहुली बनवलीय. आदित्य रॉय कपूर  आपली स्वत:ची अशा पध्दतीच 3डी बाहुली असलेला पहिला अभिनेता बनला आहे.

ह्याविषयी अधिक माहिती देताना शब्दभ्रमकार रामदास पाध्ये म्हणतात, “अनुराग बासु ह्यांना आम्ही हुबेहुब दिसणा-या बाहुल्या बनवू शकतो,ह्याविषयी माहिती होती. ते आमच्याकडे आले असता, आम्ही काही संग्रही असलेल्या बाहुल्या दाखवल्या. तेव्हा त्यातले बारकावे पाहून ते चकित झाले होते.”

शब्दभ्रम आणि बोलक्या बाहुल्यांच्या कलेत 53 वर्षांचा गाढा अनुभव असलेल्या रामदास पाध्येंच्या संग्रही 2200 पेक्षा जास्त बाहुल्या आहेत. वडिलांप्रमाणेच ह्या क्षेत्रात नाव कमावलेले सत्यजित पाध्ये तर इंडियाज गॉट टैंलेंट, ‘केबीसी’, ‘बिग बॉस’ अशा लोकप्रिय शो मध्येही दिसले आहेत.

सत्यजीत सांगतात, “आदित्यची 3डी बाहुली बनवताना आम्ही त्याचा 3 डी स्कॅन केरून घेतला. त्यानंतर आदित्यचे काही 3 डी फोटो काढले. आणि मग त्यानूसार, आम्ही फायनल 3डी प्रीटेंड बाहुली तयार केली. आदित्यच्या ह्या बाहुलीचं वैशिष्ठ्य ठेवायचं होतं, त्याची हेयरस्टाइल आणि त्याच्या चेह-यावरचं लांबसडक नाक. “

ही बाहुली बनवल्यावर पुढे होता सर्वात कठीण भाग. तोंडाची ठेवण, भुवया, आणि पापण्या ह्यांची हालचाल करायची होती. मग इथे रामदास पाध्ये ह्यांचा प्रगाढ अनुभव कामी आला. ह्यानंतर आदित्यला सत्यजीतने ट्रेनिंग दिले.

ट्रेनिंगच्या अनुभवाविषयी सत्यजित सांगतात, “आदित्यच्यासोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता. तो मन लावून ही कला आत्मसात करण्यामध्ये लक्ष द्यायचा. मी त्याच्या घरी त्याला शिकवायला जायचो. शब्दभ्रमकार बनण्याचे तंत्रशुध्द शिक्षण आदित्यने खूप लवकर शिकले. शुटिंगच्या दरम्यान मदतीसाठी मी उपस्थित होतो. पण मला सांगायला आनंद वाटतो, की, आदित्यने अनेक बारकाव्यांसह ही भूमिका चांगली वठवलीय. “

आदित्य रॉय कपूरने सत्यजीतला फिल्मनंतर मेसेज करत त्याचे आभार मानले आहेत. आदित्यने म्हटलंय, “ह्या चित्रपटातल्या माझ्या भुमिकेच्या तयारीसाठी आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपले धन्यवाद. आपल्याकडून ही सुंदर कला शिकणे हा एक अद्भुत अनुभव होता. आपल्या वडिलांना (रामदास पाध्ये) ह्यांनाही माझा परफॉर्मन्स आवडेल अशी आशा आहे.”

‘झोंबिवली’चे शूट पूर्ण; दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी सांगितला शूटिंगचा अनुभव

0

हॉरर-कॉमेडी जॉनरचा ‘झोंबिवली’ हा मराठी सिनेमा पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. अर्थात मराठीमध्ये झोंबीज् पाहायला मिळणार तर चर्चा तर होणारच ना. तसेच ऍक्शन-ससपेन्स पडद्यावर उत्तम प्रकारे मांडणारे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर यांसारखी तगडी स्टारकास्ट यांची साथ या सिनेमाला लाभली आहे तर सिनेमा कधी प्रदर्शित होतोय असं अनेकांना नक्कीच वाटत असणार. सध्याच्या परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती महत्त्वाची काळजी घेऊन ‘झोंबिवली’चे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. नवीन वर्ष आता लवकरच येतंय आणि नवीन वर्षात हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे त्यामुळे आता फक्त काही क्षणांची प्रतिक्षा करावी लागेल.

या सिनेमाच्या चित्रिकरणाबाबतीत सांगताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी सांगितले की, “२६ जुलैला झोंबिवलीचं शूट सुरु झालं होतं जेव्हा अनलॉकडाऊन नुकताच सुरु झालेला आणि शूटिंगला परवानगी मिळाली होती. नुकतंच १२ नोव्हेंबरला शूट संपलं. संपूर्ण युनिटने एकत्र येऊन सिनेमाचं शूटिंग सुरु केलं होतं आणि आता शूट संपलंय तर आजूबाजूची परिस्थिती ब-यापैकी कंट्रोलमध्ये आली आहे. दोन-तीन महिन्यांच्या काळामध्ये शूट करताना बरेच चॅलेंजेस आले होते, मुळात COVID Pandemic हा मोठा चॅलेंज होता. अशा वेळी शूट सुरु केले ज्यावेळी पावसाळा होता, सिनेमाचं शूट दरवेळी इनडोअर होऊ शकत नाही. पाऊस आणि COVID Pandemic या दोन्ही गोष्टींवर मात करायची असेल तर अशा ठिकाणी जायला लागेल जिथे आपल्याला पाऊस पण कमी लागेल आणि COVID केसेस पण बऱ्याच कमी असतील असा विचार करुन आम्ही लातूर शहर निवडलं. शूटची सुरुवात मुंबईतून केली आणि नंतर लातूरला रवाना झालो. सिनेमाचं अर्ध्या अधिक शूट हे लातूर मध्ये झालं आहे. भर पावसाळ्यात आम्हाला वातावरणाने खूप साथ दिली. तसेच तेथील स्थानिक लोकांनी सुध्दा खूप साथ दिली.”५०% क्षमतेने चित्रपटगृह सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे आणि सिनेसृष्टीचा एक भाग म्हणून या सध्याच्या परिस्थितीवर मत मांडताना आदित्य म्हणाले की, “थिएटर्स सुरु झाले ही ही खूप पॉझिटिव्ह साईन आहे. माझ्यामते,  डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यापासून थिएटर्स जरा चांगल्या पध्दतीने सुरु होतील. सध्या या काळात आपला प्रेक्षक वर्ग आपल्याला कशी साथ देतोय, हे कुठेतरी आपल्याला बघायला लागेल. कारण आम्ही आता दोन्ही बाजूने बघतोय की एक प्रेक्षक म्हणून मी थिएटरला कितपत जाईन आणि फिल्म मेकर म्हणून लोकांकडून थिएटरला येण्याची कितपत अपेक्षा ठेवेन. या दोन्ही गोष्टी बघितल्या तर एकत्रच आहेत. आपण सिनेमा थिएटरमध्ये बघायला जाण्याची मानसिक तयारी करु.

कोरोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्सची स्थापना

0

मुंबई, दि. 24 : कोरोनाची लाट पुन्हा येत आहे,अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत मात्र काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करीत आहेत त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. लसीकरण आणि तिचे वितरण याबाबत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील 8 राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते .याप्रसंगी नीती आयोगाने देखील येणाऱ्या लसीची निर्मिती, वितरण याबाबत सादरीकरण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील काळात लस वितरण, राज्याराज्यांतून नागरिकांचा होणारा प्रवास तसेच कंटेन्मेंट क्षेत्र निश्चिती याबाबत देशव्यापी धोरण असेल तर अधिक नियोजनबद्ध रीतीने हा लढा देता येईल. आज दिल्लीत, केरळमध्ये संसर्ग वाढला आहे तर उद्या आणखी कुठल्या राज्यात वाढेल. महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी २४ हजार रुग्ण दररोज सापडायचे. तिथे आता ४७०० ते ५००० रुग्ण दररोज आढळत आहेत. रुग्ण संख्या कमी होत असली तरी आम्ही राज्यातील जनतेला गाफील न राहण्याच्या आणि त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगावे व राजकारण न करता उपाययोजनांत सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात. आज एकीकडे आम्ही कोरोनाला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क घालणे हे आवाहन करीत असून दुसरीकडे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करीत आहेत, त्यामुळे आमचे सर्व प्रयत्न असफल होऊ शकतात व कोरोना लाटेला आमंत्रण मिळू शकते याकडेही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.

कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत असे सांगून  मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, लसीकरणाच्या बाबतीत काही गोष्टींची स्पष्टता आवश्यक असून लसीची उपलब्धता, लसीची संख्या, लसीचे दुष्परिणाम, लसीचा परिणाम, लसीवरील येणारा खर्च व त्याचे वितरण  याबाबतीत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला असून त्यामध्ये या सर्व विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

माझे कुटुंब, माझी जबाबदारीचे यश

केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या सुचना कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न महाराष्ट्र करीत असून राज्यात दोन टप्प्यात राबविण्यात आलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असून संसर्ग रोखण्यात यश मिळाले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. या मोहिमेत प्रत्येक घरात आरोग्य चौकशी करण्यात आली असून ११ कोटी ९२ लाख लोकांचा आरोग्य डेटा आपल्याकडे आहे. यातून राज्याचा आरोग्य नकाशा तयार होण्यास मदत होणार आहे. या मोहिमेत ३.५ लाख सारी आणि आयएलआयचे रुग्णही सापडले तसेच ५१ हजार कोरोना रुग्ण आढळले ज्यांच्यावर उपचार करण्यात आले अशी माहितीही त्यांनी दिली.

कोविडनंतरचे आरोग्य परिणाम

कोविडमधून बऱ्या झालेल्या  काही रुग्णांमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या देखील आढळत असून यावरही आपल्याला लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आज राज्यात दररोज ७० ते ८० हजार चाचण्या होत असून आरटीपीसीआर चाचण्या अधिक वाढविण्याचे तसेच संसर्गग्रस्त व्यक्तीचे जास्तीतजास्त संपर्क शोधण्यास सांगण्यात आले आहे. कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही अतिशय सावधपणे पाउले टाकत असून केंद्राने दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन केले जाईल.

कोरोना रुग्ण संख्येत महाराष्ट्राचा क्रमांक घसरला

तत्पूर्वी केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सादरीकरण केले. यानुसार महाराष्ट्रात  गेल्या दोन आठवड्यात दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येत घसरण झाली असून आठ राज्याच्या तक्त्यात आता राज्य सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. दिल्ली येथे दररोजच्या रुग्ण संख्येत १०० टक्के वाढ आहे, हरियाना ५३ टक्के, पश्चिम बंगाल ८ टक्के वाढ आहे . या तुलनेत गुजरातमध्ये १४ टक्के घट, केरळ २८ टक्के, छतीसगड ५० टक्के, महाराष्ट्र ७६ टक्के अशी रुग्ण संख्या कमी झाली आहे मात्र मृत्यू दर अजूनही महाराष्ट्रात सर्वात जास्त २,४४, पश्चिम बंगाल १.७५  दिल्लीत १.२२, छतीसगड १.१५ असा आहे असे सांगितले.

पुढील काळात संक्रमणाची साखळी तोडणे गरजेचे आहे. 5 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटीव्हीटी दर आणणे गरजेचे आहे. हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृती वाढविणे आवश्यक आहे. एन्टीजेनचा निगेटिव्ह अहवाल आलेल्या पण लक्षणे  दिसणाऱ्या रुग्णांवर लक्ष केंद्रित करून परत आरटीपीसीआर चाचणी करणे महत्वाचे आहे असेही ते म्हणाले