Home Blog Page 2388

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 336

0

पुणे विभागातील 4 लाख 98 हजार 756 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 27 हजार 941 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.25 :- पुणे विभागातील 4 लाख 98 हजार 756 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 27 हजार 941 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 336 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 849 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.47 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 37 हजार 571 रुग्णांपैकी 3 लाख 19 हजार 41 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 310 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 220 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.51 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 103 रुग्णांपैकी 47 हजार 386 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 30 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 753 रुग्णांपैकी 41 हजार 107 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 68 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 578 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 564 रुग्णांपैकी 44 हजार 470 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 403 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 691 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 950 रुग्णांपैकी 46 हजार 752 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 525 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 673 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1311 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 836, सातारा जिल्ह्यात 224, सोलापूर जिल्ह्यात 184, सांगली जिल्ह्यात 49 तर कोल्हापूर जिल्ह्यात 18 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 948 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 468, सातारा जिल्हयामध्ये 264, सोलापूर जिल्हयामध्ये 147, सांगली जिल्हयामध्ये 23 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 46 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 27 लाख 57 हजार 394 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 27 हजार 941 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 24 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडं

पंढरपूर, दि. २६ :- कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री. पवार आणि सौ.पवार यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री. पवार बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सौ सारिका भरणे, मानाचे वारकरी श्री. कवडुजी भोयर, सौ कुसुमबाई भोयर, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, पार्थ पवार, जय पवार आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, ‘अवघ्या जगासमोर कोरोनाचे आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ कोरोना आटोक्यात आला, असे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचे आहे. याबाबतीत समस्त वारकरी बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांनी शासनाच्या आवाहनाला आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद दिला. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिीणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिक यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील, असा विश्वास आहे.
राज्यातील शेतकरी यंदाच्या वर्षी अतिवृष्टिने संकटात आला आहे. या शेतकऱ्यांच्या जीवनातील दुख: हलक करण्याची ताकद शासनाला दे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केली असल्याची सांगून श्री.पवार म्हणाले, श्री विठ्ठल कोरोनाचे संकट दूर करेलच, अशी समस्त भाविकांप्रमाणेच माझीही श्रध्दा आहे. पण सर्व काही पांडुरंगावर सोडून चालणार नाही. आपणा सर्वांना कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी मास्क वापरणे. गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे, आदी गोष्टी काटेकोरपणे अंमलात आणाव्या लागतील.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करुन त्यांनी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वंदन केले. या शहिद वीरांचा त्याग महाराष्ट्र नेहमी लक्षात ठेवेल, युवकांना देशासाठी लढण्याची प्रेरणा देईल असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले.याचबरोबर त्यांनी आज असणाऱ्या संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

श्री.पवार यांच्या हस्ते मानाचे वारकरी श्री. कवडुजी नारायण भोयर आणि सौ. कुसुमबाई कवडुजी भोयर (मु.डौलापूर, पो.मोझरी, ता. हिंगणघाट जि.वर्धा) यांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात येणार प्रवास सवलत पास सुपूर्त करण्यात आला. विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या ‘दैनंदिनी 2021 ‘ चे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसिलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, एसटी महामंडळाचे दत्तात्रय चिकोर्डे, सुधीर सुतार आदी उपस्थित होते.

रिक्षा कंपनीमार्फत छोट्या वस्तू वाहतुकीस मान्यता मिळावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

0

पुणे : रिक्षा कंपनी स्थापन करून याच कंपनीमार्फत छोट्या वस्तू वाहतुकीस परवानगी मिळावी, अशा मागणीचे पत्र आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्य मंत्र्यांना पाठविले आहे.

सध्याच्या साथीच्या काळात रिक्षाद्वारे प्रवासी सेवेमार्फत मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. रिक्षा भाड्याने घेऊन प्रवासी सेवा देणारा रिक्षा चालक साथीच्या पूर्वी रिक्षा मालकास रोज शिफ्टचे २०० रुपये द्यायचा ती रक्कम १०० रुपयांवर आली आहे. रिक्षा व्यवसायावर आलेले हे संकट संधी मानून रिक्षा सेवेत अमुलाग्र बदल करता येईल. याबाबत रिक्षा कंपनी सुरू करण्याच्या रिक्षा पंचायतीच्या प्रस्तावाला परवानगी द्यावी असे आमदार शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.

रिक्षांना छोट्या वस्तू (वजन, आकाराच्या मर्यादा ठरवून) याच कंपनीमार्फत वाहतुकीला परवानगी द्यावी. त्यामुळे रिक्षा चालकांना जोड व्यवसाय मिळेल आणि वस्तू घरपोच मिळाल्यातर लोकांचे बाहेर जाणेही थांबेल.

खुल्या परवान्यांमुळे रिक्षांची संख्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दुप्पट म्हणजे सुमारे एक लाख झालेली आहे. रिक्षा तळांची संख्या मात्र पूर्वीइतकीच म्हणजे एक हजारच आहे. ती संख्या वाढवून मिळावी अशीही मागणी शिरोळे यांनी केली आहे. तसेच रिक्षा, टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करावे त्याद्वारे उत्पन्न वाढ, अन्यायकारी विमा हप्त्यातून सुटका, वैद्यकीय सहाय्य आदी योजना आमलात आणाव्या असेही शिरोळे यांनी पत्रात सुचविले आहे.

लॉकडाऊननंतर सांस्कृतिक राजधानीत पहिल्यांदाच सूर व संगीताचा ‘आवाज’!

0

पुणे, दि. 26 नोव्हेंबर : विठु माऊली तू, माऊली जगाची… माझे माहेर पंढरी… नको देवराया अंत आता पाहु… यासह अनेक अभंग व भजनाच्या ओव्या आणि टाळ-मृदंगाच्या निनादात आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने ‘विठु माऊली माझी’ हा अभंगवाणीचा भक्ती सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊननंतरचा सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील हा पहिलाच कार्यक्रम आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने झाला.  

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘विठु माऊली माझी’ या भक्ती सोहळ्याचे हे सलग 21 वे वर्ष आहे. कोरोना व लॉकडाऊननंतर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर याठिकाणी हा पहिलाच कार्यक्रम होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सिंग व इतर सर्व गोष्टींचा खबरदारी घेऊनच या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती प्रतिष्ठानचे नमोल खाबिया यांनी यावेळी दिली.

विठु माझी माऊली या अभंगावाणीच्या भक्ती सोहळ्याची निर्मिती नमोल खाबिया व राहुल देशपांडे यांनी केली. रश्मी मोघे, संजीव मेहेंदळे व सचिन इंगळे या गायकांनी अभंग व भजनांचे गायन केले. डॉ. राजेंद्र दूरकर, पद्माकर गुजर, सोमनाथ साळुंके, अमृता ठाकूरदेसाई, निलेश देशपांडे यांनी वादनाची साथ दिली. निरुपण रविंद्र खरे यांनी केले. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच होत असलेल्या कार्यक्रमात अभंग व भजनाच्या भक्ती रसात बालगंधर्व चिंब झाले.

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. २६ : सण, उत्सव असो वा सभा असो जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलीस चोवीस तास कर्तव्य बजावत असतात. स्वत:च्या कुटुंबातील, घरातील सुख दु:ख बाजूला ठेवून जनतेच्या सुख दु:खात सामिल होणाऱ्या आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध असून त्यांच्यासाठी जे-जे करणे शक्य आहे ते सर्व करणारच आणि हे वचन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्र पोलीस महासंचालनालयात आयोजित हुतात्मा दालन उद्‌घाटन व कॉफी टेबल बुक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, शौर्याला वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. २६ नोव्हेंबर हा शौर्यदिन. या दिनी शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना वंदन व नतमस्तक. हा दिवस आपण विसरू शकत नाही. त्या दिवशी मी मुंबई बाहेर होतो. मुंबईतील घटना कळताच प्रथम विजय साळसकरांना फोन लावला. घटनेची माहिती देताना साळसकरांनी सांगितले की, मी आता घरी असून लगेचच घटनास्थळी जात आहे. काही वेळानी मी त्यांना फोन लावला, पण तो फोन उचलला गेलाच नाही आणि ती दुर्दैवी घटना घडली. बारा वर्ष झाली, यापुढेही कित्येक वर्ष उलटतील, पण काळजावर झालेली ही जखम कधीही भरून येणार नाही.

अगदी नक्षलवादी अतिरेक्यांपासून ते भुरट्या चोरांपासून सर्वांना पकडणारा हा आमचा पोलीस एक महत्त्वाचा घटक आहे. तो सुदृढ राहिलाच पाहिजे, त्याला सुदृढ ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. यापुढे अतिरेकी महाराष्ट्र, मुंबईवर हल्ला काय पण मुंबईचे नाव पण घेऊ शकणार नाहीत, त्यांना धडकी भरेल असे आपण पोलीस दलाचे भक्कम सक्षमीकरण करू.

पोलिसांची कामे ही जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्याकरिता अशा हुतात्मा दालनाची संकल्पना मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच महाराष्ट्रात सर्वत्र राबविण्यात यावी. देश-विदेशातही पोलीस व लष्करी प्रशिक्षणाची व्यवस्था शालेय जीवनापासून आहे, असे सांगताना त्यांनी सिंगापूरचे उदाहरण दिले. पोलिसांवरील हल्ला ही अत्यंत चुकीची बाब असून त्यांच्या कर्तव्याचा आपण आदर केला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अप्रतिम कॉफिटेबल बुक

‘अतुल्य हिंमत’ हे युक्ती आणि प्रसंगी शक्तीचा वापर करुन पोलिसांनी कोविड काळात केलेल्या कामगिरीचा सचित्र दस्तावेज आहे. हे पुस्तक अप्रतिम झाले असून मी त्याकडे मुख्यमंत्री, नागरिक आणि कलावंत अशा तिहेरी भुमिकेतून पाहत आहे. अतिशय सुबक मांडणी व सुयोग्य सादरीकरण या कॉफिटेबल बुकमध्ये आहे. अशा प्रकारच्या अप्रतिम कॉफिटेबल बुकच्या निर्मितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव जगात सर्वदूर – गृहमंत्री अनिल देशमुख

या हुतात्मा दालनाचे उद्‌घाटन शहीद पोलीस बांधवांच्या वीर पत्नी व कुटुंबियांकडून होत आहे, ही आनंदाची बाब आहे, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, देशाचा कणा असलेल्या मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी जो हल्ला झाला तो मोठ्या हिंमतीने आपल्या पोलीस व जवानांनी परतवून लावला. ९ अतिरेकी मारले व एका अतिरेक्याविरुद्ध न्यायालयाद्वारे लढा लढवून त्यास फासावर लटकवले. नक्कीच आपल्या पोलिसांचे यात शौर्य आहे.

नक्षलवादी, अतिरेकी, गुन्हेगार, समाजकंटक अशा वेगवेगळ्या समाजविघातक शक्तींशी सामना करुन आपले पोलीस कारवाई करत असतात. तसेच विविध आपत्ती काळातही पोलीस कार्यरत असतो. सध्याच्या कोरोना काळात तर पोलीस चोवीस तास कार्यरत आहेत. कोरोना विरुद्धची लढाई अजून सुरू आहे. ही लढाई अनिश्चित काळ आहे. पण आपले पोलीस दल हिंमत हरलेले नाहीत. महाराष्ट्र पोलिसांचे नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. त्यांचे कर्तव्यावरील कौशल्य, चाणक्षबुद्धी, शिस्त याचे सर्वत्र कौतुक होते.

कोरोनामुळे कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडल्यास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान आपण मंजूर केले. राज्य शासन, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय पोलीस विभागासाठी सदैव सकारात्मक आहेत. विभागाच्या इतर मागण्यांचाही लवकरात लवकर विचार होईल, असे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कॉफिटेबल बुकमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीचे नेमके दर्शन दस्तावेज म्हणून राहील. विविध कल्पना आणि तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करुन पोलिसांनी कोरोना काळात केलेले काम या पुस्तकरुपाने जतन केले जाईल, असेही ते म्हणाले. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला एक तप पूर्ण झाले. त्यानिमित्त राज्यात उभारण्यात आलेले हे हुतात्मा दालन सर्वसामान्य नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध असावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल

आपल्या प्रास्ताविकातून पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी हुतात्मा दालन व अतुल्य हिंमत या कॉफीटेबल बुक संदर्भात माहिती दिली. १९६४ ते २०१९ या कालावधीत विविध घटनांमध्ये शहीद झालेल्या ७९७ हुतात्म्यांची एकत्रित माहिती या दालनात उपलब्ध आहे. तसेच विविध फिल्म्सद्वारेही पोलिसांच्या शौर्याची माहिती दालनातून दिली जाते. माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी सुरू केलेल्या हुतात्मा दालन निर्मितीची परिपूर्ती आज झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सध्या हे दालन रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी खुले करण्याचे नियोजन असून भविष्यात ते सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करुन दिले जाईल. त्यामुळे पोलीस व जनता यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातील शहीदांचे कुटुंबिय श्रीमती विनीता अशोक कामटे, श्रीमती स्मिता विजय साळसकर, श्रीमती तारा ओंबळे, श्रीमती मानसी शिंदे तसेच श्रीमती जिजाबाई आलम यांच्या हस्ते हुतात्मा दालनाचे औपचारीक उद्‌घाटन करण्यात आले. तद्‌नंतर सामाजिक अंतर राखून आयोजित केलेल्या हॉलमधील या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या संदर्भातील एक लघुपट दाखविण्यात आला. यात हुतात्म्यांचे नातेवाईक, तपास अधिकारी यांच्या मुलाखती आहेत. पोलिसांनी दाखविलेले धैर्य व धाडस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारा हा लघुपट आहे.

यावेळी आमदार भाई जगताप, मुख्य सचिव संजय कुमार, अपर मुख्य सचिव (गृह) सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पोलीस आयुक्त परमवीर सिंग  तसेच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. सुहास वारके यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर पोलीस महासंचालक श्री. सिंघल यांनी केले.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे बलिदान सदैव प्रेरणादायी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. २६ : मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणपणाने लढताना मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे बलिदान सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी असेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

जीवन ज्योत संस्थेच्यावतीने २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे कृतज्ञतापूर्व सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार संगमलाल गुप्ता, आमदार मंगलप्रभात लोढा, जीवन ज्योत संस्थेचे अध्यक्ष मुरजी पटेल तसेच २६/११ मध्ये शहीद झालेल्या पोलिसांचे कुटुंबिय उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, मी सर्वप्रथम आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांना तसेच त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा नमन करतो. बलिदान ही देशाच्याप्रती एक भावना असते. प्रत्येकाची एक आई असते, त्याचप्रमाणे भारतमाता, अदृश्य माता या तीन माता प्रत्येक जवानांना शक्ती देत असतात.

जे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता देशासाठी प्राणार्पण करतात ते अमर होतात. आणि हेच जवान आपल्या जीवाची पर्वा न करता आपले रक्षण करतात. त्याचप्रमाणे त्यांनी मुंबई आणि देशाचे रक्षण करून मोठे कार्य केले आहे. हे शहीद जवान वंदनीय व पूजनीय आहेत. या शहीद जवानांचे पाल्य आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करुन राज्यपालांनी शहीदांच्या कुटुंबियास पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

२६/११ हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी मुंबईवर हल्ला होऊन आपले जवान शहीद झाले त्या दिवसापासून आपण हा दिवस शहीद दिन म्हणून पाळतो.

२६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी प्राणपणाने लढताना मृत्युमुखी पडलेल्या शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहून शहीद अशोक मारुतीराव कामटे, विजय सहदेव साळसकर, प्रकाश पांडुरंग मोरे, बाबुराव साहेबराव धुरगुडे, बाळासाहेब चंद्रकात भोसले, तुकाराम गोपाळ ओंबळे, जयवंत हनुमंत पाटील, विजय मधुकर खाडेकर, अरुण रघुनाथ चित्ते, योगेश शिवाजी पाटील, अंबादास रामचंद्र पवार, शशांक चंद्रसेन शिंदे, मुरलीधर लक्ष्मण चौधरी, राहुल सुभाष शिंदे, नितेश भिकाजी जाधव यांच्या कुटुंबियांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते लॅपटॉप व सन्मान चिन्ह देऊन कृतज्ञतापूर्व सन्मान करण्यात आला.

रितु छाब्रिया यांना उल्लेखनीय समाजकार्याबद्दल ‘प्रेसिडेंट अवॉर्ड फॉर बेस्ट फिलॉन्थ्रॉफी’ पुरस्कार

0

पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या संचालिका आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितु प्रकाश छाब्रिया यांना ‘प्रेसिडेंट अवॉर्ड फॉर बेस्ट फिलॉन्थ्रॉफी’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. मुकुल माधव फाउंडेशनच्या पुढाकारातून जागतिक स्तरावरील नामवंत संस्थांना सोबत घेऊन सामाजिक क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल रितू छाब्रिया यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार लंडन येथील ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन्स फ्रॉम इंडियन ओरिजीन (बीएपीआयओ) संस्थेच्या वतीने दिला जातो.

गेल्या २० वर्षांपासून छाब्रिया मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य, सामाजिक विकास, जलसंवर्धन, शिक्षण, कौशल्य विकास आणि स्वच्छता आदी क्षेत्रात नि:स्वार्थ भावनेने विविध घटकांसाठी समाजोपयोगी कार्य करत आहेत. फाउंडेशनने २०१८ मध्ये ‘एमएमएफ युके’ नावाने लंडन धर्मादाय आयुक्तालयात नोंदणी केली. त्यानंतर अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहचून त्यांना आनंदाने जगण्याची संधी देण्यासाठी जागतिक स्तरावरील अनेक नामवंत संस्थांना या कार्यात सोबत घेतले. त्यामध्ये डॉ. संजीव निचानी संचालित बालरोग तज्ज्ञांचा ग्रुप असलेल्या ‘हीलिंग लील हार्ट्स’ने पुण्यात येऊन चार हार्ट सर्जरी शिबीर घेतले. त्यातून १०७ बालकांना लाभ झाला. ‘रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अँड चाईल्ड हेल्थ’शी २०१७ पासून फाउंडेशन काम करत असून, सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त मुलांसाठी पुणे आणि सातारा येथे काम सुरु आहे. आजवर शेकडो सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांना आणि कुटुंबियांना आधार दिला आहे. ‘युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स ऑफ लेइस्चर्स एनएचएस ट्रस्ट’मधील डॉ. दीपा पंजवानी यांच्या नेतृत्वातील टीमने पुण्यात भेट देऊन ससून सर्वोपचार रुग्णालयातील नवजात बालक अतिदक्षता विभागातील नर्सेसना प्रशिक्षण दिले. सोबतच सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंगमधील विद्यार्थिनींना प्रशिक्षण सुरू आहे. 

‘युसीएल’च्या सहकार्यातून माता व बालक यांच्यासाठी कार्य सुरु आहे. डॉ. मिमिका लाखनपॉल बाळाचे, आईचे आरोग्य-आहार याबाबत मार्गदर्शन करतात. ‘कन्सर्न फॉर मेंटल हेल्थ’ संस्थेच्या सहकार्यातून डॉ. गझला अफझल आणि त्यांची टीम पुण्यात मानसिक आरोग्य क्षेत्रातील मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतात. आजपर्यंत पाच प्रशिक्षण शिबिरे झाली असून, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात याचा चांगला उपयोग झाला आहे. ‘सपोर्ट टू एनएचएस’, ‘बर्नाडोस’, ‘अक्षयपात्र’ या संस्थांच्या सहकार्याने कोरोनाच्या कठीण काळात अन्न पुरविण्यात आले. यासह अक्षयपात्र संस्थेच्या सहकार्याने लंडन येथील शालेय मुलांना पोषण आहार देण्यासाठी उपक्रम सुरु आहे. यासह अनेक नामवंत संस्थांशी सहकार्य करार करत जगभर समाजकार्याची कक्षा मुकुल माधव फाउंडेशनने विस्तारली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये पीडितांना मदतकार्य, कोरोना महामारीच्या काळात गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, ‘गिव्ह विथ डिग्निटी’सारखा उपक्रम देशभर राबवत मदतीचा हात दिला. जवळपास तीन लाख लोकांना याचा लाभ झाला.

रितु प्रकाश छाब्रिया प्रसिद्ध समाजसेविका असून, पुण्यासह महाराष्ट्र आणि देशभर उदात्त भावनेने समाजकार्य करत आहेत. वंचित घटकांतील लोकांना चांगले शिक्षण, आरोग्याच्या सुविधा पुरवून त्यांचे आयुष्य सुखी बनविण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. ‘लिव्ह टू गिव्ह’ हा मंत्र तरुण वयातच आत्मसात करून त्या काम करत आहेत. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये संचालकपदी कार्यरत रितू छाब्रिया हिंदुजा फाउंडेशन, हिंदुजा हेल्थकेअर, सिम्बायोसिस इथिक्स कमिटी, आयएमसी मॅनेजिंग कमिटी मेंबर यासह अनेक बोर्ड व कमिटीवर कार्यरत आहेत. इतर स्वयंसेवी संस्थांप्रमाणे मुकुल माधव फाउंडेशन एखाद्या प्रकल्पाला एकवेळ देणगी देऊन थांबत नाही, तर त्या प्रकल्पाची देखरेख, आढावा आणि पाठपुरावा करून तो व्यवस्थित चालण्यासाठी प्रयत्न करते.

या सन्मानाबद्दल रितु छाब्रिया यांनी आनंद व्यक्त केला. भविष्यात आणखी जोमाने आणि भरीव सेवाकार्य कार्याचे असून, जास्तीत जास्त लोकांना सुखी-समाधानाचे जीवन जगता यावे, यासाठी प्रयत्नशील आहे. गरीब, गरजू लोकांना मदत करणे हेच मुकुल माधव फाउंडेशनचे प्रमुख कार्य आहे, ते अविरत सुरु राहील, असे रितू छाब्रिया यांनी नमूद केले.

सौम्य संपदेच्या जोरावर भारत अधिराज्य गाजवेल

0

डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचे मतः २५ व्या ऑनलाईन संतश्री ज्ञानेश्‍वर -तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत दुसरे पुष्प
पुणे, दि. २६ नोव्हेंबर:“भारतीय संस्कृती, आध्यात्मिक लोकशाही, ज्ञानोपासना, सामाजिक बांधिलकी आणि निसर्गाशी असलेले नाते या सौम्य संपदेच्या (सॉफ्ट पॉवर) गुणांमुळे भारत हा संपूर्ण जगावार अधिराज्य गाजवू शकतो. या देशाने जगाला भगवान गौतम बुद्ध, महावीर, गुरूनानक, स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी या सारखे महापुरूष दिले आहेत. त्यामुळे आपली सौम्प संपदा सांभळण्यासाठी आपले आचरण हेच महत्वाचे आहे.”असे मत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत  २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्फ् २५ व्या ऑनलाईन तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी हरिद्वार येथील देव संस्कृती विश्‍वविद्यालयाचे प्र कुलगुरू डॉ. चिन्मय पंड्या, सातारा येथील प्रेरक वक्ता प्रा.नितिन बालगुडे पाटील व जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सम्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
 अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिर्टी चे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.
या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ.मिलिंद पांडे, डॉ. आर.एम.चिटणीस, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, डॉ. अर्चना चौधरी, डॉ. प्रिती जोशी, डॉ, शुभलक्ष्मी जोशी आणि डॉ. सचिन गाडेकर हे उपस्थित होते.
डॉ. विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले,“ भारतीय जीवन पद्धतीमधील प्रत्येक अंग वैशिष्टपूर्ण आहे. अगदी, आध्यात्मिक लोकशाही पासून ते खाद्य संस्कृतीपर्यंत प्रत्येक गोष्टीचे कुतुहल पाश्‍चात्य देशांमध्ये आढळून येते. कोणत्याही बाबतीत भारतीय अशा सर्व गोष्टींचे आपले असे एक वेगळेपण आहे. येथील आयुर्वेद, संस्कृत भाषा, शिल्प कला, शास्त्रीय नृत्य, स्थापत्यकला या सर्व गोष्टींना हजारो वर्षांची परंपरा आहे. येथील प्रत्येक नागरिक समाधानाने व आशेने जगतांना दिसून येतो. ही गोष्ट पाश्‍चात्यांना फार महत्वाची वाटते. शिक्षक विद्यार्थी संबंधामध्ये जो जिवंतपणा व जिव्हाळा जपण्यात आला आहे, तो इतरत्र नाही. ”
“ सत्तेच्या जोरावर नव्हे तर संस्कृतीच्या जोरावर अग्नेय अशियातील नाट्यकला भारतीय परंपरेने भारलेली आहे. हीच गोष्ट युरोप, अमेरिकेमध्ये आपल्या खाद्य पदार्थांच्या बाबतीत सुद्धा अनुभवाला येते. पण आपल्याला जर याचे सामर्थ्य जाणवलेले असेल तर आपण आपल्या आचरणातून ते व्यक्त केले पाहिजे. तरच सर्व जगावर आपल्या सौम्य संपदेचा प्रभाव पडेल.”
डॉ, चिन्मय पंड्या म्हणाले,“ मणुष्य उपभोगाच्या मागे धावत सुटला आहे. कारण त्याला खर्‍या सुखाचा विसर पडला आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेहून परतले तेव्हा लोकांनी विचारल्यावरून ते म्हणाले मी जगभर फिरलो परंतू भारत देशाइतका चांगला ज्ञानपूर्ण देश मला जगाच्या पाठीवर आढळला नाही. आपल्या देशात अनेक महापुरूष होऊन गेले व त्यांनी ही भूमी पवित्र केली आहे. त्याचाच वारसा आपण आज चालवित आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. या देशामध्ये जी नितिमत्ता आढळून येते ती दुर्मिळ आहे. दुर्देवाने आपल्याला ही जाणीव नाही.”
“सर्व भौतिक संपत्ती सोडून जीवाला जावे लागते पण त्यांनी आत्मसात केलेला वारसा मात्र त्याच्या बरोबर येतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात सत्कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मानवामध्ये अप्रतिम ऊर्जा आहे. तो खाली पडला ता बुद्दू बनतो ,उठला तर बुदध बनतो. एकीकडे राम आहे तर दुसरी कडे रावण ही बनतो. यामुळे जीवन उंच उठविण्यासाठी सदैव प्रयत्न करावे. ”
“भारतीय संस्कृतीचे महत्वाचे केंद्र बिंदू म्हणजे मानवाच्या आतमध्ये जे उत्कृष्ट आहे त्याला बाहेर काढणे आहे. हेच काम या देशातील संतांनी केले. त्यांनी मानव जीवन उंच करण्याचा सदैव प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या संदेशावर चालत राहिल्यास जीवन सुखी व आनंदी होईल.”
प्रा. नितिन बानगुडे पाटील म्हणाले ,“ उद्याची पिढी समृद्ध करावयाची असेल तर इतिहास समजून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे उद्याचा इतिहास घडवायचा असेल तर पाठिमागच्या इतिहासाचा मागोवा घ्यावा लागेल. सृष्टीचा प्रवास हा वर्तुळाकार आहे. इतिहासाला वादाचा विषय होऊ देऊ नका तो कोणत्याही जाती जाती किंवा धर्मा धर्मासाठी नको तर तो वर्तमानकाळात मानवा मानवाचा उत्तम संवाद घडविण्यासाठी असावा. ”
“ शत्रूला सीमेवर अडविले पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सूत्र होतेे. त्याच सूत्राचे पालन आम्ही कोरोनाच्या वेळेस करून त्याला सीमेवर अडविले असते तर आज ऐवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार झाला नसता. महाराजांच्या काळात सर्व गोष्टी या समृद्ध व प्रगत होती तसेच त्यावेळेसे चे ज्ञान ही समृद्ध होते. त्यामुळे त्याचा अभ्यास करने आवश्यक आहे. प्रत्येकाला जीवनात सुखी आणि समाधानी व्हायचे असेल तर संत ज्ञानेश्‍वर आणि तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेले सूत्र म्हणजे गरजा आणि जाणिवा आवाक्यात  ठेवले पाहिजे. ”
डॉ. विजय भटकर म्हणाले “करोनाच्या पार्श्‍वभूमीवर जगात अशांततेच वातावरण निर्माण झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार मानवाला तारू शकेल. तसेच, सौम्य संपदेच्या बरोबर माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हार्ड पॉवर निर्माण होऊ शकेल. मन व बुद्धिच्या जोरावर भारत चीनला जिंकू शकेल.”
प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले “आसूरी संपत्तीचा नायनाट करून दैवी संपत्ती प्राप्त करण्याचा भारतीय जनतेचा प्रयत्न असतो. भारतीय संस्कृती, परंपरा व तत्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतिक म्हणून ज्ञानेश्‍वर महाराज, तुकाराम महाराज यांच्याकडे पाहिले जाते. भारतामध्ये देह, बुद्धि, आत्मा आणि मन यांचे चिंतन केले जात आहे. विज्ञान आणि आध्यात्माच्या समन्वयातून भारत विश्‍वगुरू म्हणून उद्यास येईल.”
डॉ. मिलिंद पांडे यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.
 महेश थोरवे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शैलश्री हरिदास यांनी आभार मानले.

कोविड कालावधीत वेश्याव्यवसायातील महिलांना राज्य शासनाचा मोठा दिलासा

0

मुंबई, दि. २६ : वेश्या व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोविड-19 च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये अर्थसहाय्य अदा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार वेश्या व्यवसायात कार्यरत ओळख निश्चित केलेल्या महिलांना दरमहा 5 हजार रुपये आणि ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त 2 हजार 500 रुपये अर्थसहाय्य कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह न धरता वितरीत करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत ऑक्टोबर ते डिसेंबर, 2020 या 3 महिन्याच्या कालावधीसाठी 51 कोटी 18 लाख 97 हजार 500 रुपये इतका निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून उपलब्ध करुन देण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयात दाखल फौजदारी अपिल क्र. 135/2010 (बुद्धदेव करमास्कर विरुद्ध पश्चिम बंगाल आणि इतर ) या प्रकरणामध्ये वेश्या व्यवसायात कार्यरत महिला व त्यांच्या मुलांना कोविड कालावधीमध्ये अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याबाबत दि. 28 नोव्हेंबर, 2020 रोजीच्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्यात तात्काळ कार्यवाही होण्यासाठी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी यंत्रणेला संवेदनशीलरित्या गतीमान कार्यवाहीचे निर्देश दिले होते. आज त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यानुसार 32 जिल्ह्यांना एकूण 51 कोटी 18 लाख 97 हजार 500 रुपये इतका निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून उपलब्ध करण्यात  येत  आहे.

नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (नॅको) या संस्थेकडून वेश्या व्यवसायात कार्यरत ओळख निश्चित केलेल्या महिलांना दरमहा 5 हजार रुपये आणि ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त 2 हजार 500 रुपये कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह न धरता अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

वेश्या व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोरडे अन्नधान्य व रोख आर्थिक सहाय्य यासारख्या मुलभूत सेवा पुरविण्याच्या अनुषंगाने जिल्हानिहाय प्रस्ताव पुढील कार्यवाहीकरिता महिला व बाल विकास आयुक्त यांच्याकडे पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सदस्य म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडील एक प्रतिनिधी, महिला पोलिस अधिकारी (पोलिस आयुक्त/ जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याव्दारे नामनिर्देशित), ‘नॅको’ यांचा जिल्हास्तरीय प्रतिनिधी आणि निमंत्रित सदस्य म्हणून स्वयंसेवी संघटनांचा प्रतिनिधी तर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत.

पाकिस्तानातून आलेल्या बोटीत सापडले 100 किलो हेरोइन आणि 5 पिस्तुल, 6 जण ताब्यात

0

नवी दिल्ली- पाकिस्तानातून आलेल्या श्रीलंकेच्या एका बोटीतून 100 किलो हेरोइन आणि सिंथेटिक ड्रग्सचे 20 पॅकेट जप्त करून याप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 5 पिस्तुल आणि सॅटेलाइट फोन जप्त करण्यात आले आहेत .इंडियन कोस्ट गार्डने तमिळनाडुच्या समुद्र किनाऱ्याजवळ हि कारवाई केली .

अधिकृत सूत्रांनी बुधवारी सांगितले की, क्रू मेंबरची चौकशी सुरू आहे. त्यांना ही हिरोइन कराचीतून दिल्याचे त्यांनी कबुल केले आहे. हे ड्रग्स बोटीत रिकाम्या टँकमध्ये लपवण्यात आले होते. बोटीचा मालक श्रीलंकेच्या नेगोम्बोचा रहिवासी आहे.

सुरक्षा यंत्रणेकडून चौकशी सुरू

इंडियन कोस्ट गॉर्ड 17 नोव्हेंबरपासून समुद्रातून होणाऱ्या तस्करी विरोधात मोठे अभियान चालवत आहे. यादरम्यान गस्त घालणाऱ्या ‘वैभव’ जहाजाने ही मोठी कारवाई केली. कोस्ट गार्डकडून सांगण्यात आले आहे की, सर्व तपास सुरक्षा यंत्रणांकडून अटक केलेल्या सहा जणांची चौकशी सुरू 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

0

मुंबई, दि. २६ :- संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उद्देशिकेच्या सामूहिक वाचनात सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

भारतीय संविधान हे आपल्या सर्वांसाठी गौरवशाली असे आहे. भारतीय संविधानाचा जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे संविधान म्हणून आदराने उल्लेख केला जातो. या संविधानाचे शिल्पकार म्हणून भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यासाठी डॉ. आंबेडकर यांच्या प्रति सदैव कृतज्ञच राहावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षातर्फे पदवीधर, शिक्षकांचा मेळावा (व्हिडीओ)

पुणे :विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

महापालिकेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी मेळाव्याचे संयोजन केले होते. शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, आमदार चेतन तुपे, माजी महापौर अंकुश काकडे, शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल, प्रा. अविनाश ताकवले आदी उपस्थित होते.

आघाडीतील घटक पक्ष एकजुटीने प्रचार करीत असल्याने पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अरुण गणपती लाड, शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जयंत आसगावकर विजयी होतील असा विश्वास नेत्यांनी भाषणात व्यक्त केला.

पदवीधर मतदारसंघातील माजी आमदार प्रकाश जावडेकर, आ. चंद्रकांत पाटील यांचीच नांवे मतदार यादीत नाहीत, यातून दोघांची मतदारांबद्दलची अनास्था दिसून येते अशीही टीका करण्यात आली.
यावेळी आबा बागुल यांनी शिक्षकांसाठी घरकुल योजना,बालवाडी शिक्षक व सेविकांसाठी कायम करण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. पुणे विभागातून दोनवेळा भाजपच्या उमेदवारांना निवडून दिले परंतु त्यांनी पदवीधर व शिक्षकांच्या समस्यांवर कोणतेही लक्ष दिले नाही. एक तारखेला मतदान असून आपण आपली एक नंबरची पसंती महाविकास आघाडीच्या उमेदवारांना देऊन निवडून देण्याचे आवाहन आबा बागुल यांनी शेवटी केले.

आजच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार

0

मुंबई: राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी आज दि.26 नोव्हेंबर, 2020 रोजी देशव्यापी लाक्षणिक संप करण्याची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने आज होणाऱ्या लाक्षणिक संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे शासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र ही संघटना सहभागी आहे. संपामध्ये राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 6 च्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यास संप करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. केंद्र शासनाचे ‘काम नाही, वेतन नाही’ हे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे. याबाबत शासनाने दि. 25 नोव्हेंबर, 2020 रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. त्याकडे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा व जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन शासनाने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.

यूपीएससी मुख्य परीक्षेस पात्र अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ‘बार्टी’मार्फत मूळ नियमावलीप्रमाणेच लाभ द्या – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

0

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 साठी पात्र असलेल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या एकरकमी अर्थसहाय्य योजनेसाठी बार्टीमार्फत मागील वर्षीच्या मूळ नियमावलीप्रमाणेच लाभ देण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

यूपीएससी मुख्य परीक्षेस पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यामार्फत एकरकमी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. यासाठी बार्टीमार्फत अर्ज मागविण्यात आले होते. परंतु अर्ज करताना बार्टीमार्फत त्यांच्या स्तरावर विविध नियमावली तयार करून ती जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती.

यातील इतर योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना एकरकमी अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेता येणार नसल्याच्या अटीसह अन्य चार ते पाच अटी जाचक असल्याच्या अनेक विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे तक्रारी केल्या होत्या.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या अटी तातडीने रद्द करून मागील वर्षी २०१९ मध्ये ज्या नियमावलीनुसार या योजनेचा लाभ दिला होता, त्यानुसारच लाभ देण्यात यावा अशा सूचना बार्टीच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याने, पात्र विद्यार्थ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

रोजगाराच्या मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुणांचे रोजगार गेले आहेत. या पार्श्वभूमीवर नव्याने रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत त्याप्रमाणे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित तयार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

वर्षा निवासस्थानी आज कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सादरीकरण झाले त्यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त दिपेद्रसिंह कुशवाह  उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले, लॉकडॉऊन काळातही विभागामार्फत एक लाख अठ्ठेचाळीस हजार रोजगार उपलब्ध केले आहेत ही चांगली बाब आहे परंतु लॉकडाऊननंतर निर्माण झालेल्या नवीन परिस्थितीत जसे रोजगार निर्माण होतील त्याला अनुसरून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे काम विभागाने करावे. यासाठी सविस्तर असा कृती आराखडा लवकर  तयार  करण्यात यावा. तसेच ऑन जॉब प्रशिक्षण योजना कार्यान्वित करावी. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये  (ITI )नवीन अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रे सुरू करावीत. कौशल्य विद्यापीठ निर्माण करण्याबाबत विचार करण्यात यावा

प्रत्येक जिल्ह्याच्या भौगोलिक रचना स्थानिक परिस्थितीनुसार रोजगार प्रशिक्षण केंद्रे सुरू करावीत. समृद्धी महामार्गालगतच्या जिल्ह्यांत नवीन रोजगार उपलब्ध होतील त्याप्रमाणे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे नियोजन करावे असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त दिपेद्रसिंह कुशवाह यांनी आयुक्तालयामार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांचे सादरीकरण केले.