Home Blog Page 2383

विधानपरिषद निवडणुकीत अमरिश पटेल विजयी

0

धुळे : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या धुळे तथा नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अमरिश रसिकलाल पटेल (भारतीय जनता पार्टी) विजयी झाले. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अभिजित मोतीलाल पाटील यांचा पराभव केला. श्री. पटेल यांना 332, तर श्री. पाटील यांना 98 मते मिळाली. चार मते अवैध ठरली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते श्री. पटेल यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या धुळे तथा नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान झाले. त्यानंतर आज सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन‍ नियोजन सभागृहात मतमोजणीला सुरवात झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक सोनिया सेठी, जिल्हाधिकारी संजय यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे (नंदुरबार) उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो) यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी विजयी उमेदवार श्री. पटेल यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर श्री. पटेल यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार उपस्थित होते.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 45,कालच्या तुलनेत रुग्णसंख्येत 1 हजार 327 ने वाढ.

0

पुणे विभागातील 5 लाख 8 हजार 165 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 38 हजार 267 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.3 :- पुणे विभागातील 5 लाख 8 हजार 165 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 38 हजार 267 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 45 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 57 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.41 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 327 ने वाढ झाली आहे.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 44 हजार 740 रुग्णांपैकी 3 लाख 24 हजार 958 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11 हजार 443 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 339 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.26 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 369 रुग्णांपैकी 48 हजार 870 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 775 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 724 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 182 रुग्णांपैकी 42 हजार 522 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 52 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 608 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 878 रुग्णांपैकी 44 हजार 758 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 420 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 700 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 98 रुग्णांपैकी 47 हजार 57 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 355 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 686 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 327 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 913, सातारा जिल्ह्यात 144, सोलापूर जिल्ह्यात 198, सांगली जिल्ह्यात 56 तर कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 484 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयात 970, सातारा जिल्हयामध्ये 177, सोलापूर जिल्हयामध्ये 226, सांगली जिल्हयामध्ये 74 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 37 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 28 लाख 99 हजार 195 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 38 हजार 267 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 2 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

सरपंचांनी आर्थिक नियोजन केल्यास ग्रामोन्नती होईल – भास्कर पेरे-पाटील

0

पुणे: “सरपंचांनी राजकारण न करता गावाचा विकास व कल्याणासाठी आर्थिक नियोजन करावे. नव नवीन कल्पनांना साकारतांना जनतेचा सहभाग घ्यावा. गावात पाणी, शिक्षण ,य आरोगय व आवश्यक गरजांच्या पुर्तेतेसाठी काम केल्यास निश्चितच ग्रामोन्नती  होईल.” असा सल्ला पाटोडा या आदर्श गावाचे सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी दिला.
‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटेतर्फे 2 ते 4 डिसेंबर या दरम्यान आयोजित तीन दिवशीय दुसर्‍या ऑनलाईन ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ च्या दुसर्‍या दिवशी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या वेळी उत्तरप्रदेशचे कृषी मंत्री सूर्य प्रताप साही, राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे, माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, महाराष्ट्र राज्यातील मॉडेल व्हिलेज प्रोग्रामचे कार्यकारी संचालक पद्मश्री पोपटराव पवार, खादी आणि व्हिजेज इंडस्ट्री कमिशनचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना, सरपंच संसदेचे राज्य समन्वयक संजय गजपुरे, जालना येथील कृषी विभागाचे उपसंचालक विजय माईनकर, संदीप शिंदे आणि वेदांत लि.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रितू झिंगोण हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील आणि सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास हे उपस्थित होते.
भास्कर पेरे पाटील म्हणाले,“सरकारकडे पैसे मागण्यापेक्षा गावातच नवी योजना राबवून आर्थिक मजबूती देण्याचे काम सरपंचांनी करावे. शासनाच्या योजना व घटनेच्या तरतुदी बरोबरच आहेत परंतू अधिकारी त्याचा योग्य वापर करत नाही ही देशासाठी मोठी चिंतेची बाब आहे. ग्राम विकासाला आधुनिकतेची जोड आवश्यक द्यावे. आमच्या गावात आपत्कालीन निधी म्हणून दर महिन्याला 200 रूपये जमा केले. त्याचा वापर हा कोविडच्या काळात झाला. अश्याच प्रकारच्या अनेक योजना सरपंचांना आपल्या क्षेत्रात राबविता येतील. ग्रामविकास करतांना सरपंचानी बुद्धि आणि मेहनतीचा वापर करावा.”
सूर्य प्रताप साही म्हणाले,“कोविडच्या काळात या देशातील प्रत्येक व्यक्तीची ही शारीरिक व मानसिक हानी झालेली आहे. शहरातील व्यक्ती हे परत गावाकडे आले खरे पण रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला. यावेळी सरपंचांनी त्यांना धीर देणे गरजचे आहे. सरपंचानी या संधीचा फायदा घेऊन गावातच रोजगार कसा उपलब्ध होऊ शकतो या वर भर दयावा. सरकारने ग्राम पंचायतासाठी ज्या योजना तयार केल्या आहेत त्याचा लाभ विकासासाठी कसा होईल हे पहावे. केंद्राने कोविड काळातील गंभीर स्थिती लक्षात घेता मनरेगा आणि फूड प्रोसेसिंगसाठी विशेष निधी उपलब्ध केला आहे. देशातील प्रत्येक राज्यात कौशल्य विकास करण्यावर भर दिला जात आहे.”
छत्रपती संभाजी राजे म्हणाले,“ आपले गाव नाविन्यपूर्ण करण्यावर सरपंचांनी भर दयावा. सरपंचांना सशक्त करने ही काळाची गरज आहे. त्यांनी लक्ष निर्धारित करून नियोजन करावे. शासनाकडून अधिक सीएसआर कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावा. आज शेकडो किल्ल्यांचे संवर्धन कार्य सुरू आहे. रायगड किल्ल्यासाठी जवळील 21 गावांचे संरक्षण महत्वाचे आहे. त्यासाठी जनतेला एकत्र आणण्याची जबाबदारी ही सरपंचाची आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून सरपंचांनी आपली ताकद दाखवायची आहे.”
पोपटराव पवार म्हणाले,“ आत्मनिर्भर गावांसाठी संस्कारीत नेतृत्वाची गरज आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून गाव विकास करणे व पाणी नियोजन केल्याने दुष्काळी भाग नष्ट करता येतो. स्वयंपूर्ण आत्मनिर्भर गांव करतांना मार्केटिंग आवश्यक आहे. संघर्षाशिवाय नवनिर्मिती करता येत नाही. त्यासाठी सरपंचाने संयम आणि आरोग्य निट ठेवू ग्राम विकासाचा ध्यास घ्यावा. भविष्यात प्रत्येक गांव ऑक्सिजन युक्त व व्यसन मुक्त करण्यासाठी कार्य करावे. नियोजन, अंमलबजावणी आणि त्यात गुणवत्ता कशी येईल यावर भर द्यावा.”
चंद्रकांत दळवी म्हणाले,“ गावाची गरज आणि नियोजन हे ग्राम विकासाचे सूत्र ध्यानात ठेवावे. गावाचा विकास हाच त्यांचा श्वास असावा. त्यासाठी देशातील आदर्श लोकांकडे पाहून कार्य करावे. गावाचा अर्थिक विकास, मानव विकास व लोक सहभागाचा आराखडा तयार करावा. सरकारने भौतिक विकासासाठी ज्या योजना लागू केल्या आहेत, त्याची माहिती त्यांनी घ्यावी. आत्मनिर्भर गावासाठी कुटुंब व त्यांचे उत्पन्न वाढवावे. यासाठी शेती व दुग्ध व्यवसाय करावा.”
विनय कुमार सक्सेना म्हणाले, “ सरपंच हा आपल्या पंचायतराजचा मुख्यमंत्री असतो. गांवाचा विकास हा देशाचा विकास असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजीच्या विचारांना देशात लागू करण्याचे काम सुरू केले. खादी कमिशनच्या माध्यमातून गावातील सर्वात शेवटच्या कमकूवत व्यक्तिला आपल्या पायावर उभे केले आहे. या कमिशनच्या माध्यमातून 5 वर्षात देशात 29 लाख लोकांना रोजगार दिला आहे. हनी मिशनशी शेतकरी जोडल्या गेल्यास सृष्टीच्या विकासाबरोबरच त्यांचाही विकास होईल.”
विजय माइनकर म्हणाले, “आर्थिक आणि सामाजिक विकासातून ग्रामविकास होऊ शकतो. शेती बरोबरच कृषी पर्यटन व्यवसाय करावा. त्यातून महिला व युवकांना रोजगार निर्माण होईल.”
संदीप शिंदे म्हणाले,“ देशातील मोठ्या कंपन्या सीएसआरचा निधी ग्राम विकासासाठी करतात. प्रत्येकाचा उद्देश हा वेगवेगळा असतो.  ते आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, महिला विकास यावर जोर देतात.”
संजय गजपुरे म्हणाले,“ या संसदेने राज्यात एक चळवळ उभी केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीजीे म्हणायचे की स्वराज्यकडून आता आपल्याला सुराज्यकडे जायचे आहे. त्यामुळे खेड्यांकडे चला. गांवे स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर होण्यासाठी सरकार योजना राबवित आहेत.”
यानंतर सर्वश्री सरपंच पुरूषोत्तम घोगरे, गंगाधर निखाडे, अजय महाडिक, शिवाजी सुरसे, संतोष टिकेकर, निखील कडू, बाळासाहेब देशमुख, भारत अप्पा पाटील, विकास जाधव, नामदेवराव गुंजाळ, बाजीराव खैरनार आणि प्रकाश मुसळे यांनी आपले अनुभव सांगितले.
व्यंकटेश जोशी यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा. गिरीजा लगड यांनी सूत्रसंचालन केले. योगेश पाटील यांनी आभार मानले.

सुपरस्टार रजनीकांतची राजकारणात एन्ट्री -नवा पक्ष काढून विधानसभा लढविणार

0

चेन्नई-दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच 2021 च्या विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचीही घोषणा केली. 31 डिसेंबर रोजी पक्षाविषयी औपचारिक घोषणा केली जाईल, असे रजनीकांत यांनी गुरुवारी सांगितले.

रजनीकांत गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय आहेत, मात्र पहिल्यांदाच राजकीय वाटचालीसाठी त्यांनी आपली पत्ते उघडले आहेत. रजनीकांत यांनी पक्षाच्या स्थापनेची आणि विधानसभा निवडणुका लढलवण्याची घोषणा केल्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एका अभिनेत्याचा प्रवेश होणार आहे. यापूर्वीही तमिळनाडूच्या राजकारणात अनेक चित्रपट कलाकार यशस्वी झाले आहेत.

वर्षभरापूर्वी कमल हासनशी युती करण्याबद्दल वक्तव्य केले होते

रजनीकांत यांनी मागील वर्षी अभिनेता कमल हसन यांच्यासोबत युती करणार असल्याचे बोलले होते. राज्यातील जनतेचे हित लक्षात घेऊन जर कमल हासन यांच्याशी युती करण्याची परिस्थिती निर्माण झाली असेल तर ते नक्कीच एकमेकांसोबत येतील, असे रजनीकांत यांनी म्हटले होते.

भाजपात प्रत्येक कार्यकर्त्याला मान सन्मान मिळतो-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0

लोणावळा येथे भाजपात जाहिर प्रवेशाचा कार्यक्रम
लोणावळा, दि. ३ – भाजपात प्रत्येक कार्यकर्त्याला मान-सन्मान मिळतो. भाजपमध्ये कार्यकर्त्यांच्या कामाला मह्त्त्व देण्यात येते. भाजपमध्ये निस्वार्थी सेवाभावी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असे ठाम प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केले.
विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज लोणावळा येथे भाजप जाहीर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. शिवदुर्गेचे सुनील गायकवाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिका-यांनी भाजप प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री व आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, तालुकाध्यक्ष रवी भेगडे, शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, गट नेते देविदास कडू, नगरसेवक विशाल पादारे, रचना सिकरे, मंदाताई सोनावणे तसेच बिंद्रा गणात्रा आणि महिला अध्यक्ष योगिता कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
धुळे-नंदुरबार च्या निकालामुळे जनतेने दाखवून दिले आहे की, तुम्ही नालायक आहात,राज्यकारभार करू शकत नाही. पाच वर्षे या राज्याला देवेंद्र फडणवीस यांनी विकासाची दिशा दाखवली. पण आघाडी सरकारच्या काळात फक्त आपआपल्या बगल बच्च्यांना पोसण्याचा कारभार सुरु आहे, असे सांगताना दरेकर म्हणाले की, आज राज्यात महत्त्वाचे अनेक प्रश्न आहेत पण या प्रश्नांचे तुम्हाला काही देणे घेणे नाही. आजच्या पहिल्या निकालातून महाराष्ट्रातील पदवीधर,शिक्षक आणि स्थानिक स्वराज्याच्या मतदार संघातून दाखवून दिले. गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने राज्यातील महत्त्वाचे प्रश्न भिजत ठेवले. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण या सरकारला कोर्टात टिकविता येत नाही. तसेच मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे मराठा आरक्षणचा टक्का बाजूला काढून ठेऊन अन्य ओबीसी व इतर मागासवर्गीय समजाची भरती करावी म्हणजे त्यांच्यावरही अन्याय होणार नाही. त्यामुळे ओबीसी, मगासवर्गीय समाजाचे विद्यार्थीनांही दिलासा मिळेल. आपल्यावर अन्याय झालेला नाही अशी त्यांची भावना होईल. परंतु हे या सरकारला नको आहे. केवळ मराठा, मागासवर्गीय, ओबीसी समाजाला झुंजवत ठेवण्याचे काम हे सरकार करीत असल्याची टिकाही दरेकर यांनी यावेळी केली.
भाजपवर जनतेचा प्रचंड विश्वास असल्यामुळे महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीला जनतेने कौल दिला. पण केवळ सत्तेसाठी लाचार होऊन अनैसर्गिकरित्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन झाले. आता एक वर्षाच्या कालावधीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. पहिलाच निकाल भाजपाच्या निवडणूक होऊ घातल्या ज्यांचा निकाल आजपासून सुरु झाला आहे. विधानपरिषदेचा पहिला निकाल भाजपच्या बाजूने आला असताना आज लोणावळा येथे भाजप प्रवेश सोहळा होत आहे. या चांगल्या दिवशी भाजप मध्ये प्रवेश करून आपलं काम वाढवत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतलाय हे एक योगायोग असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.
भाजपमध्ये प्रवेश करणारे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना भाजपात आल्याचा नक्कीच अभिमान वाटेल असे सांगताना दरेकर म्हणाले की, मी भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. भाजपने मला आमदारकीची संधी दिली. आमदारकी कधी मागितली नव्हती व अपेक्षाही केली नव्हती. पण मला पक्षाने आमदार केले व विरोधी पक्ष नेते पदाची संधीही दिली. मला विरोधी पक्ष नेता करा म्हणून कधीच सांगितले नाही. देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल पुढे नेत आहे. भाजप पक्ष काम करणाऱ्या निस्वार्थी सेवाभावी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे., असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

प्राजक्ता माळीच्या ‘लक डाऊन’चा मुहूर्त संपन्न

0

लॉकडाऊन’ हा शब्द जरी कोणी उच्चारला तरी तो ऐकावासा वाटत नाही इतका तो शब्द नकोसा वाटू लागलाय. पण ‘लॉकडाऊन’ शब्दाशी मिळता-जुळता, उच्चारताना थोड्या फार प्रमाणात समान असा, पण जरा हटके असा ‘लक डाऊन’ हा शब्द कदाचित क्वचितच ऐकला असावा आणि हा तुमची उत्सुकता वाढवल्याशिवाय राहणार नाही असं पण वाटतंय. २०२० जर ‘लॉकडाऊन’ असेल तर २०२१ ‘लक डाऊन’ असू शकतो. हे कोडं वाटतं असलं तरी हे कोडं नसून आगामी मराठी सिनेमाच्या नावाची झलक आहे, ज्यामध्ये झळकणार आहे महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी.

इष्णव मीडिया हाऊस प्रस्तुत आणि दर्शन फुलपगार निर्मित ‘लक डाऊन’ या आगामी मराठी सिनेमाचा मुहूर्त जुन्नर येथे विशेष पाहुणे आणि सिनेमाची स्टारकास्ट यांच्या उपस्थितीत पार पडला. माजी आमदार श्री. शरद दादा सोनावणे (शिवजन्म भूमी), सत्यशील शेरकर चेअरमन विघ्नहर सहकारी साखर कारखाना गणेश कवडे युवासेना अध्यक्ष नगर अध्यक्ष श्री. श्याम पांड्ये (जुन्नर नगर पालिका) आणि पी.आय. युवराज मोहिते आदी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. धमाकेदार, मजेदार कथा असलेल्या या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नवीन जोडी एकत्र दिसणार असून हे देखील मुहूर्ताच्या वेळी उपस्थित होते. संतोष रामदास मांजरेकर हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघांची मतमोजणी सुरू, पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आघाडीवर

0

राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघासाठी आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झाले होते. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादर संघासाठीचे मतदान झाले. आज या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. यानंतर ही पहिली मोठी निवडणूक होती. महाविकास आघाडीने म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मिळून उमेदवार दिला होता. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती. विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसेल. तसेच काय निकाल लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर धुळ्यात भाजपचा दणदणीत विजय झाला आहे.

धुळ्यात भाजपचा विजय
धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी विजय मिळवला आहे. हा महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेला मोठा धक्का आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तब्बल 234 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. धुळे-नंदुरबारमधून भाजपचे अमरीश पटेलांनी विजय मिळवला. त्यांना 332 मते मिळाली आहेत. तर, पटेल यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना अवघ्या 98 मतांवर समाधान मानावे लागले आहे.

पुणे : पदवीधर मतमोजणीला सुरुवात 3 वाजता सुरुवात

पुणे पदवीधर मतमोजणीला 3 वाजता सुरुवात झाली आहे. दरम्यान, प्रथम पसंतीचे प्राथमिक कल हाती आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आघाडीवर आहेत, तर भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर आहेत. दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत आसगावकर यांची आघाडी कायम आहे.

अमरावती मतमोजणीस सुरुवात

विलासनगर येथील शासकीय गोदाम येथे असलेल्या मजमोजणी स्थळी आज सकाळी सहा वाजता सर्व अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. सर्वांना पुन्हा त्यांची जबाबदारी समजावून देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा कक्षाचे सील तोडून मतपेट्या मतमोजणी कक्षात हलवण्यात आल्या. निवडणूक निरीक्षक आनंद लिमये, निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यात मतपत्रिकांचे गठ्ठे बनवणे, सरमिसळ आदी कामे होत आहेत.

प्रत्येक मतदारसंघात किती झाले होते मतदान?

मतदारसंघनिहाय औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले. त्यामुळे मतदारांचा कौल कुणाला मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

ओबीसी आंदोलनाचं पहा पुण्यात काय झालं,कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच पोलीसांनी गाडीत घालून नेलं

0

पुणे : पुण्यात ओबीसी मोर्चाला सुरवात झाली मात्र, मोर्चा पुढे नेण्यास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान, माजी खासदार समीर भुजबळ पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्या ओबीसी कार्यक्रर्ते आणि नेत्यांनी शनिवारवाड्या समोर ठिय्या आंदोलन सुरु केले ..पुण्यात आज आरक्षणासह विविध मागण्यांसाठी शनिवारवाडा येथून ओबीसी मोर्चाची सुरवात होणार होती. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, कॉंग्रेसच्या दीप्ती चवधरी, राष्ट्रवादी चे नगरसेवक योगेश ससाणे यांच्या सह   असंख्य मान्यवर कार्यकर्ते,नेते येथे सहभागी झाले होते.. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा मोर्चांना परवानगी नसल्याने पुणे पोलिसांनी शनिवारवाडा येथून मोर्चा पुढे नेण्यास परवानगी नाकारली.दरम्यान समीर भुजबळ यांना पोलिसांनी  ताब्यात घेतले.आणि त्यांच्या समवेत  कॉग्रेसच्या माजी आमदार ,माजी महापौर दीप्ती चवधरी आणि असंख्य पुरुष महिला कार्यकर्त्यांना  पोलीस गाडीत घालून नेले.

मच्छिमारांना लवकरच मिळणार डिझेलवरील परतावा – मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख

0

मुंबई, दि. ३ : डिझेल परताव्यासाठी सन २०२० – २१ या वर्षासाठी करण्यात आलेल्या तरतुदीपैकी उर्वरित ४०.६५ कोटी रुपयाची रक्कम लवकरात लवकर मत्स्य व्यवसाय विभागास देण्याची मागणी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. अर्थमंत्र्यांनी डिझेल परताव्याची उर्वरित रक्कम विभागास वितरित करण्याचे निर्देश संबंधित सचिवांना दिले, असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. शेख यांनी दिली.

सन २०२० व २०२१ या आर्थिक वर्षामध्ये डिझेल परताव्यासाठी रु. ६० कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतू कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यातील फक्त १९.३५ कोटी रुपये रक्कमच मत्स्यव्यवसाय विभागाला वितरित करण्यात आली. उर्वरित ४०.६५ कोटी रुपये लवकरात लवकर मत्स्य व्यवसाय विभागास वितरित करण्याची मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. शेख यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. डिझेल परताव्याची उर्वरित रक्कम विशेष बाब म्हणून मत्स्यव्यवसाय विभागास तात्काळ वितरित करण्याचे निर्देश अर्थमंत्र्यांनी वित्त सचिवांना दिले असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. शेख यांनी दिली आहे.

श्री. अस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही काळापासून डिझेल परताव्याचा अनुशेष वाढत गेला. हा अनुशेष भरुन काढत आतापर्यंत ११० कोटी रुपयापर्यंत डिझेल परतावा मच्छिमारांना देण्यात आला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे डिझेल परताव्यासाठीची १८९ कोटींची पूरक मागणी करण्यात आलेली असून या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद अर्थमंत्र्यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात सध्या 160 मच्छीमार सहकारी संस्थांच्या 9646 यांत्रिकी नौकांना डिझेल कोटा मंजूर करण्यात आलेला आहे.

वीजबिलांची थकबाकी भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय

0

केवळ दोन टक्के रक्कम भरून योजनेत सहभागी होण्याची संधी

पुणे : महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर (कृषी वगळून) सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांना थकीत व चालू वीजबिलांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी नवीन योजना तयार करण्यात आली असून आर्थिक अडचणीत असलेल्या थकबाकीदार वीजग्राहकांनी दिलासा देण्यात आला आहे. सोबतच खंडित वीजपुरवठा पुन्हा सुरु करण्याची संधी देण्यात आली आहे.

या योजनेमध्ये वीजपुरवठा सुरु असलेल्या ग्राहकांसोबतच तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेले, वीजचोरी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील वीजग्राहकांना सहभागी होता येईल. केवळ दोन टक्के रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. उच्चदाब वीजग्राहकांना मंडल कार्यालय, 20 किलोवॅटपेक्षा अधिक वीजभार असलेल्या लघुदाब ग्राहकांना विभागीय कार्यालय आणि 20 किलोवॅटपर्यंत वीजभार असलेल्या लघुदाब ग्राहकांना उपविभाग कार्यालयांमध्ये अर्ज करून या योजनेत सहभागी होता येईल. चालू वीजबिलाच्या रकमेचे हप्ते देण्याबाबत वीजग्राहकांच्या अर्जांवर 7 दिवसांत तर वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार ग्राहकांच्या अर्जांवर 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. यासोबतच महावितरणच्या वेबसाईटवर या योजनेचे लवकरच स्वतंत्र पोर्टल सुरु होत असून त्याद्वारेही वीजग्राहकांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

कृषी ग्राहक वगळता उर्वरित सर्व वर्गवारीमधील उच्च व लघुदाब ग्राहकांना चालू वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी या योजनेमध्ये तीन हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी डाऊन पेमेंट करण्याची गरज नाही. तसेच ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या सुरु आहे मात्र वीजबिल थकीत आहे अशा आणि तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदार ग्राहकांनी 30 टक्के डाऊन पेमेंट करून या योजनेत सहभाग घेतल्यास त्यांना जास्तीत जास्त 12 सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. सोबतच खंडित झालेली वीजजोडणी पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये तात्पुरता वीजपुरवठा खंडित होऊन सहा महिन्यांपर्यंत कालावधी झाला असल्यास पुनर्जोडणी शुल्क भरून वीजजोडणी पुन्हा सुरु करता येईल. तर सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून वीजपुरवठा खंडित असल्यास संबंधीत ग्राहकांना नवीन अर्ज करावा लागेल व वीजजोडणी शुल्क भरून नवीन वीजजोडणी कार्यान्वित करता येईल. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील थकबाकीच्या व्याजाची 50 टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे.

वीजबिलांसंबंधी न्यायप्रविष्ट प्रकरणातून विनाअट माघार घेण्यास तयार असलेल्या संबंधीत वीजग्राहकांना या योजनेमध्ये सहभागी होता येईल. तसेच भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार वीजचोरीच्या 126, 138 किंवा 135 कलमानुसार वीजचोरीची रक्कम भरून उर्वरित थकबाकी भरण्यासाठी संबंधीत ग्राहकांना  योजनेमध्ये सहभागी होता येईल.

या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करते वेळी एकूण थकबाकीची दोन टक्के रक्कम संबंधीत ग्राहकांना भरावी लागेल. तसेच दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरद्वारे योजनेमधील विनाअट सहभागाचे प्रतिज्ञपत्र सादर करावे लागेल. अर्ज मंजुरीनंतर सात दिवसांमध्ये 30 टक्के डाऊन पेमेंट करणे आवश्यक आहे. या योजनेत सहभागी झाल्यानंतर चालू वीजबिलांसह दिलेल्या हप्त्यांप्रमाणे थकबाकीची रक्कम नियमित स्वरुपात भरणे आवश्यक आहे. या योजनेत 2020-21 या आर्थिक वर्षामध्येच सहभागी होण्याची मुदत असल्याने थकबाकीदार वीजग्राहकांनी लवकरात लवकर लाभ घ्यावा व योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

मिसेस वेस्‍ट इंडियाची विजेती असलेली पुण्‍याची विभुती पांडे म्‍हणते: स्‍वत:वर विश्‍वास असेल तर तुम्‍हाला कोणतीच गोष्‍ट थांबवू शकत नाही

0

पुण्‍याच्‍या विभुती पांडेला मिसेस वेस्‍ट इंडिया २०२० – सिल्‍व्‍हर विभागचा प्रतिष्ठित किताब जिंकला, तेव्‍हा तिच्‍या आनंद गगनात मावेनासा झाला आणि तिचा मंत्र ‘स्‍वत:वर विश्‍वास असेल तर तुम्‍हाला कोणतीच गोष्‍ट थांबवू शकत नाही’ खरा ठरला. अथक मेहनत व समर्पि‍ततेसह तिने ४७ फायनालिस्‍ट्समधून प्रतिष्ठित मुकुट जिंकला, मिसेस वेस्‍ट इंडिया – एम्प्रेस ऑफ वेस्‍ट इंडिया २०२० – सीझन  चा भव्‍य फिनाले यंदा २८ नोव्‍हेंबर २०२० रोजी अलिला दिवा गोवा, येथे आयोजित करण्‍यात आले.  फक्‍त एवढेच नाही – तिच्‍या आत्‍मविश्‍वासू व्‍यक्तिमत्त्वाने तिला त्‍याच व्‍यासपीठावर मिसेस कॉन्फिडण्‍ट – सिल्‍व्‍हर विभागचा उपकिताब जिंकण्‍यामध्‍ये देखील मदत केली.

पुण्‍यातील डॉएच बँकेची आर्थिक व्‍यवस्‍थापक असलेली ती हसत म्‍हणाली, ”मी लठ्ठ व्‍यक्‍तीपासून तंदुरूस्‍त व्‍यक्‍तीमध्‍ये बदलण्‍याचा निर्धार केल्‍यापासूनच माझा पेजीण्‍टसाठी प्रवास सुरू झाला. मी एका वर्षामध्‍येच माझे वजन २५ किग्रॅने कमी करण्‍यामध्‍ये यशस्‍वी झाली. माझ्या जीवनातील या परिवर्तनानंतर मी पेजीण्‍ट्रीसाठी प्रयत्न करण्‍याचे ठरवले. आणि माझ्या शोधाने मला अंजना व कार्ल मस्‍करेन्‍हास यांच्‍याद्वारे व्‍यवस्‍थापन व आयोजन केले जाणा-या दिवा पेजीण्‍ट्समध्‍ये सर्वोत्तम कामगिरी करण्‍यामध्‍ये मदत केली. त्‍यांनी आयोजित केलेल्‍या लाभदायी व जीवनाला आमूलाग्र कलाटणी देणा-या सत्रांमध्‍ये उपस्थित राहत मी स्‍वत:हून माझ्यामध्‍ये अधिक सुधारणा केली आणि यासाठी मी नेहमीच त्‍यांची कृतज्ञ राहीन.”

महाराष्‍ट्राच्‍या विदर्भ प्रांतामधील लहान नगर गोंदियामध्‍ये राहणारे डॉ. दिलीप व संध्‍या पांडे यांची मुलगी असलेली विभुती लिंग समानता, महिला स्‍वप्‍न पाहत असलेल्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्यास सहाय्य अशा कौटुंबिक मूल्‍यांसह मोठी झाली आहे आणि तिच्‍यामध्‍ये कधीच हार न मानण्‍याची वृत्ती बिंबवण्‍यात आली आहे. हैद्राबाद येथे फायनान्‍समध्‍ये एमबीए शिक्षण घेतल्‍यानंतर तिने आता पुण्‍यातील डॉएच बँकेमध्‍ये आर्थिक व्‍यवस्‍थापक म्‍हणून यशस्‍वी करिअर स्‍थापित केले आहे.

विभुती म्‍हणाली, ”अर्थातच, मुकुट जिंकणे हे माझे पती अमित यांच्‍या अविरत पाठिंब्‍याशिवाय शक्‍य नव्‍हते. ते एमएनसी येथे अभियांत्रिकी संचालक म्‍हणून काम करतात आणि माझे सर्वात मोठे प्रेरणास्रोत आहेत. तसेच माझा ११ वर्षाचा मुलगा वेदांत याचा पाठिंबा देखील मोलाचा आहे.” ती तिची धाकटी बहीण विधी आणि दीर अभिषेकला मित्र मानते. तिची पुतणी अर्चिशाने तिचा वारसा पुढे घेऊन जावा, अशी तिची इच्‍छा आहे.

पर्यटनाची खूप आवड असलेल्‍या विभुतीला नवनवीन स्‍थळे, पाककला व संस्‍कृतींचा शोध घ्‍यायला आवडते. जवळपास अर्ध्‍या जगभरात प्रवास केलेल्‍या तिची उर्वरित जगामध्‍ये प्रवास करण्‍यासाठी पुन्‍हा एकदा पर्यटनावर जाण्‍याची इच्‍छा आहे.

अधिक पुढे जात, तिची इतर महिलांना त्‍यांची स्‍वप्‍ने पूर्ण करण्‍यासाठी प्रोत्‍साहित करण्‍याची आणि दिवा पेजीण्‍ट्सद्वारे आयोजित करण्‍यात येणा-या इतर किताबांमध्‍ये सहभाग घेण्‍याची इच्‍छा आहे. तिचा विश्‍वास आहे की महिला जीवनामध्‍ये अनेक यश प्राप्‍त करतात, पण वैयक्तिक ओळख देखील राखणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. विभुती म्‍हणते, ”तुम्‍ही दुस-यांच्‍या पावलांवर पाऊल टाकत राहिलात, तर तुम्‍हाला स्वत:चे असे यश कधी मिळणार?” खरेतर या पेजीण्‍टच्‍या यशानंतर विभुतीने स्‍वत:मध्‍ये अधिक सुधारणा करत २०२१ मध्‍ये दिवा पेजीण्‍ट्सच्‍या माध्‍यमातून आंतरराष्‍ट्रीय पेजीण्‍टमध्‍ये सहभाग घेण्‍याची तयारी सुरू केली आहे, जेथे ती भारताचे प्रतिनिधीत्‍व करेल.

तिचे कुटुंब सामाजिकदृष्‍ट्या अत्‍यंत जबाबदार आहे. ते नियमितपणे वृद्धाश्रम व अनाथाश्रमांना भेट देतात. पण, विभुतीची या बाबीला अधि‍क पुढे घेऊन जात वृद्धाश्रम व अनाथाश्रम एकत्रित करण्‍याचा विचार आहे. ज्‍यामुळे वरिष्‍ठ नागरिकांना नातवांप्रमाणे असलेल्‍या अनाथ मुलांसोबत खेळण्‍याचा आनंद मिळेल आणि अनाथ मुलांना देखील आजी-आजोबांचे प्रेम मिळेल. हा अत्‍यंत थोर विचार आहे.

दि रोसरी फाऊंडेशनचे व्‍यवस्‍थापकीय संचालक विनय अरन्‍हा यांनी जहांगीर ओराकेअर डेण्‍टल सेंटरसोबत सहयोगाने आयोजित करण्‍यात आलेल्‍या या भव्‍य कार्यक्रमाला सादर केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्‍हणून केंद्रीय राज्‍यमंत्री माननीय मंत्री श्रीपाद येसो नाईक उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी महक चहल (अभिनेत्री), ब्रूना अब्‍दुल्‍ला (अभिनेत्री), सुहानी मेंडोन्‍सा (इव्‍हेण्‍ट्स), ग्‍वेन डी (डिझाइनर), विवेक मेंडोन्‍सा (लॉरेन्‍स अॅण्‍ड मायो) हे प्रख्‍यात परीक्षक लाभले. लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता अमन यतन वर्माने प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध केले. त्‍याने आत्‍मविश्‍वासासह या भव्‍य कार्यक्रमाचे उत्तम सुत्रसंचालन केले.

‘लक्ष्या’च्या अभिनयाला पुणेकरांनी दिलेली दाद अविस्मरणीय -ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे

0

पुणे : “पुण्याशी माझे नाते खूप जुने आहे. माझे पती लक्ष्मीकांत बेर्डे आणि आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते ‘लक्ष्या’ यांच्या चित्रपटांना व नाटकांना पुणेकर रसिकांनी दिलेली दाद अविस्मरणीय आहे. कलाप्रेमींच्या या शहराने अनेक दिग्गज कलाकार घडवले,” असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा प्रिया बेर्डे यांनी केले.
बेर्डे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या बावधन येथील बन्सीरत्न सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, अभिनेता अभिनय बेर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा सांस्कृतिक विभागाचे सदस्य, सुर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा सांस्कृतिक विभागातर्फे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनाही गौरविण्यात आले.

प्रिया बेर्डे म्हणाल्या, “माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण पुण्यातील महाविद्यालयात झाले आहे. सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्यानंतर कला क्षेत्रातील विद्यार्थी, तरुण आणि नवोदित कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणार आहे. कलाकारांच्या अडचणी सोडविण्यासह त्यांना पोषक वातावरण उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘सुर्यदत्ता’मध्ये शिक्षणासोबत कला व क्रीडा गुणांना वाव दिला जातो, याचा आनंद आहे.”

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी विविध अभ्यासक्रमाची, तसेच उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, “हा गौरव सुर्यदत्ता संस्थेतील प्रत्येकाचा आहे. विद्यार्थ्यांना सतत नवीन काहीतरी शिकायला मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू असतात. कला क्षेत्राला पूरक अभ्यासक्रम आमच्याकडे आहेत. परफॉर्मिंग आर्ट्स, बीसीएस ऍनिमेशन हे अभ्यासक्रम असून, गेल्या वर्षी सूर्यदत्ता प्रोडक्शन्स सुरु केले आहे. तरुणांना अभिनयाचे धडे देण्यासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे केले जाते. यामध्ये आपल्यासारख्या ज्येष्ठ व अनुभवी कलाकारांचे मार्गदर्शन आवश्यक आहे.”

माझ्या पहिल्या चित्रपटाला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. असेच माझ्या पुढच्या कामांना देखील साथ द्यावी, अशी भावना अभिनय बेर्डे याने व्यक्त केली. डॉ. सुनील धनगर यांनी सुत्रसंचलन केले.

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या प्रयत्नांमुळे येमेनच्या कैदेतून २० जहाज कर्मचाऱ्यांची सुटका

0

·      मुक्त झालेल्यांत १४ भारतीय, ५ बांगलादेशी व एक इजिप्शियन नागरिकाचा समावेश

·      या निर्धन भारतीयांना डॉ. दातार यांच्यातर्फे प्रत्येकी २० हजार रुपयांची तातडीची मदत

मुंबई – गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून येमेनमध्ये कैदेत अडकलेल्या २० जहाज कर्मचाऱ्यांची अखेर सुखरुप सुटका झाली आहे. यामध्ये १४ भारतीय, ५ बांगलादेशी व एका इजिप्शियन नागरिकाचा समावेश आहे. या सर्वांच्या सुटकेसाठी दुबईतील अल अदील ट्रेडिंग समूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. डॉ. दातार यांनी स्वतःतर्फे मदत म्हणून या निर्धन भारतीय कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २० हजार रुपये मदत हस्तांतर केली आहे. चालू आठवड्याच्या अखेरीस हे १४ भारतीय एडनहून मुंबईला परतण्याची अपेक्षा आहे. येमेनमध्ये सध्या भारताचा दूतावास नसल्याने शेजारच्या जिबोती देशातील भारतीय दूतावास या कर्मचाऱ्यांना तात्पुरते पासपोर्ट तसेच येमेनी प्रशासनातर्फे व्हिसा मंजुरी मिळवून देण्याबाबत अखंड प्रयत्नशील आहे.

ओमानस्थित एका परदेशी जहाज वाहतूक (शिपिंग) कंपनीत काम करण्यासाठी हे २० जण गेल्या जानेवारीत मस्कतला गेले होते. कंपनीला सौदी अरेबिया देशाचे वाहतुकीचे कंत्राट मिळाल्याने ते दोन जहाजांतून ३ फेब्रुवारीला ओमानहून सौदी याम्बो बंदरापर्यंत प्रवासासाठी रवाना झाले. १२ फेब्रुवारीला वादळी हवामानामुळे खवळलेल्या समुद्राने यातील एका जहाजाचा घास घेतला. वाचलेल्या दुसऱ्या जहाजातून सर्वजण पुढे निघाले परंतु लवकरच त्या जहाजालाही खराब हवामानामुळे नांगर टाकून एका जागी थांबावे लागले. दुर्दैवाने त्यांनी जहाज नांगरलेली जागा येमेनच्या युद्धप्रवण क्षेत्रात होती. येमेन व सौदी अरेबियात संघर्ष व चकमकी सुरू असल्याने येमेनी तटरक्षकांनी जहाजावर इशारादर्शक गोळीबार केला आणि नंतर सर्व कर्मचाऱ्यांना अटक करुन येमेनच्या साना शहरातील एका हॉटेलात स्थानबद्ध केले. त्यांचे पासपोर्ट, मोबाईल, कागदपत्रे व रोख रक्कम जप्त केले.

जहाज कंपनीचे मालक व एजंट आपली सुटका करतील या आशेवर या सर्वांनी सहा महिने साना शहरात काढले, परंतु काहीच हालचाल होत नव्हती. मोबाईल जप्त केल्याने कुटुंबाशी संपर्कही साधता येत नव्हता. अलिकडेच काही दिवसांपूर्वी त्यांना मोबाईल परत देऊन संपर्काची परवानगी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हालअपेष्टांचे वृत्त वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले. मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी गेल्याच महिन्यात सौदी अरेबियात तुरुंगवासात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांना प्रयत्नपूर्वक सोडवले होते. ते वृत्त सोशल मीडियातून वाचले गेल्याने या कर्मचाऱ्यांनी स्वतः तसेच आपल्या मित्रांमार्फत डॉ. दातारांशी संपर्क साधून त्यांच्या कानावर आपली व्यथा घातली. डॉ. दातार यांनी त्वरित सक्रिय होऊन जिबोतीमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून अथक पाठपुरावा केला. याकामी त्यांना जिबोतीतील भारतीय राजदूत अशोक कुमार, पुण्यातील धनश्री पाटील व माजी ज्येष्ठ राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांचे मोलाचे साह्य झाले तसेच दुबईतील डॉ. सुनील मांजरेकर यांचेही प्रयत्न सफल झाले. अखेर गेल्या आठवड्यात या सर्व कर्मचाऱ्यांची सुटका झाली असून ते आता जिबोतीमधील भारतीय दूतावासाच्या देखरेखीखाली आहेत. भारतीय दूतावासाच्या मदतीने व्हिसा व अन्य मंजुरी मिळताच ते लवकरच सानाहून एडनमार्गे मुंबईला परततील.

जहाज कर्मचाऱ्यांतील भारतीयांमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूरचे संदीप बाळू लोहार (खडकेवाडा, ता. कागल), नीलेश धनाजी लोहार (कौलव, ता. राधानगरी), फिरोज नसरुद्दीन झारी (रत्नागिरी), अहमद अब्दुल गफूर वाकणकर (दापोली), तन्मय राजेंद्र माने (मांडवा, अलिबाग), दाऊद महमूद जोवरक (दापोली, मंडणगड), गोव्यातील चेतन हरिश्चंद्र गवस, तमीळनाडूमधील मनिराज मरीप्पन, मोहनराज थानीगचलम व विल्लीयम निकामदेन, पुदुच्चेरीमधील प्रवीण थम्मकरनताविडा, केरळमधील अब्दुल वाहब मुस्तहबा व पश्चिम बंगालमधील हिरोन शेक, उत्तर प्रदेशमधील संजीव कुमार यांचा समावेश आहे.

दहा महिन्यांच्या कैदेनंतर सुटका झाल्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. डॉ. दातार यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नीलेश लोहार म्हणाले, “काहीही चूक नसताना अटक होणे, दहा महिने स्थानबद्ध राहणे, कुटुंबाशी किंवा स्वदेशाशी संपर्क न होता अनोळखी देशात उपासमारीत दिवस काढणे आणि अनिश्चिततेची तलवार डोक्यावर असणे हा साराच अनुभव फार भीतिदायक होता. आमची कागदपत्रे, मोबाईल, घरुन वाटखर्चासाठी नेलेली रोख रक्कम जप्त झाली होती. वारंवार तपशीलवार माहिती देऊनही सतत तेच ते प्रश्न विचारुन चौकशी होत होती. नऊ महिने आमचे जेवणाचे खूप हाल झाले. जेवणात फक्त डाळ-भात आणि दिवसातून एकदा चहा मिळत होता. या नोकरीसाठी आमच्यातील प्रत्येकाने एजंटला एक लाख ते तीन लाख रुपयांपर्यंत रक्कम कशीबशी जमवून दिली होती. कंपनीने तर आजवर काहीही पगार दिलेला नाही. सुटका होताना आम्ही अक्षरशः कफल्लक झालो आहोत. डॉ. दातार यांनी आम्हाला परतीच्या प्रवासासाठी आर्थिक आधार पुरवला आहे. त्यांचे हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. सुटकेनंतर आता आम्ही जिबोतीमधील भारतीय दूतावासाच्या देखरेखीत येमेनमधील साना शहरात सुरक्षित आहोत. त्यांच्या पाठपुराव्याने व्हिसाचे काम लवकर झाले तर आम्ही पुढच्या काही दिवसांत भारतात परत येऊ. आम्हालाही घरच्या लोकांना भेटण्याचे वेध लागले आहेत.” 

डॉ. धनंजय दातार यांनीही या कर्मचाऱ्यांच्या सुटकेबद्दल आनंद प्रकट केला आहे. ते म्हणाले, “आतापर्यंत करोनाच्या साथीमुळे आखाती देशांत अडकलेल्या ५००० हून अधिक भारतीयांना आमच्या अल अदील कंपनीने सर्व खर्च उचलून सुखरुप घरी पोचवले आहे. सौदी अरेबियातही तुरुंगवासात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका करण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे. कोणतीही चूक नसताना आपल्या भारतीय बांधवांना परदेशी भूमीवर हालअपेष्टा सहन करत अडकून पडणे मला पटत नाही. सध्याच्या आव्हानाच्या काळात प्रत्येकाने आपल्या कुटुंबासमवेत सुरक्षित व समाधानी असावे याच अपेक्षेने आम्ही या मोहिमेत सक्रिय आहोत. जिबोतीमधील भारतीय राजदूत अशोक कुमार आणि निवृत्त भारतीय राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांनी केलेल्या मदतीबद्दल मी त्यांचा विशेष आभारी आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीने पगाराची काहीही रक्कमही दिलेली नाही. त्यांचे न्याय्य देणे मिळवून देण्यासाठीही मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ओमानमधील कामगार मंत्रालयाशी संपर्क साधणार असून या कर्मचाऱ्यांना कायदेशीर मदत मिळवून देणार आहे.”

नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देणारा ब्रिटन ठरला जगातील पहिला देश

0

जगात कोरोना विषाणूने प्रवेश केला त्याला एक वर्ष झाले असताना त्याचा नायनाट करणारे औषधही तयार झाले आहे. बुधवारी ब्रिटनने अमेरिकी कंपनी फायझर आणि जर्मनीची कंपनी बायाेएनटेकने संयुक्तपणे तयार केलेल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली. तीन टप्प्यांतील चाचण्या पूर्ण करणाऱ्या लसीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले, ही लस अनेक जीव वाचवण्यासोबतच परिस्थिती सुधारण्यास मदत करेल. आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक म्हणाले, ख्रिसमसपूर्वी म्हणजे पुढील आठवड्यापासूनच ८ लाख डोससह ब्रिटन सामान्य नागरिकांना डोस देणे सुरू करेल. फायझर कंपनी बेल्जियममध्ये लस तयार करत आहे. तेथून नवीन वर्षात एक कोटीहून अधिक डोसचा ब्रिटनला पुरवठा केला जाणार आहे.

> ब्रिटनमध्ये २२४ वर्षांनंतर एखाद्या महामारीची लस सर्वप्रथम दिली जाईल. १७९६ मध्ये कांजण्यांची लस सर्वप्रथम देण्यात आली होती. त्यानंतर युरोपातील देश आशिया किंवा आफ्रिकी देशांत लसीचा दुष्परिणाम पाहूनच परवानगी देत आहेत.

> १० वर्षांत तयार होणारी लस १० महिन्यांत कशी तयार झाली? कुठला शॉर्टकट वापरण्यात आला?

यापूर्वी १९६० मध्ये अत्यंत वेगाने गालगुंडाची (मम्स) लस तयार झाली होती. तरीही त्यासाठी ४ वर्षे लागली होती. कोरोना लस १० महिन्यांत तयार झाली तरी यात कुठलाही शॉर्टकट वापरला गेला नाही. सर्व टप्प्यांच्या चाचण्या झाल्या. ब्रिटिश सरकारने संशोधनावर ५९ हजार कोटी रु. खर्च केले. नियामकांनी हजारो पानांच्या माहितीत अडकून राहण्याऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्सने डेटाचा अभ्यास केला. यात वेळ वाचला, मंजुरीची प्रक्रिया वेगाने झाली. नियामक एमएचआरएच्या प्रमुख जून रॅनी यांनी सांगितले की, यासाठी संपूर्ण टीमने २४ तास काम केेले.

> ही लस सुरक्षित आहे हे लोकांना कसे कळेल?

फायझर-बायोएनटेकने ४४ हजार लोकांवर चाचण्या केल्या आहेत. कोणावरही गंभीर दुष्परिणाम झालेला नाही. फक्त थकवा आणि डोकेदुखीची काही प्रकरणे आढळली होती.

> भारतात फायझरची लस येणे कठीण का आहे? कंपनीशी सरकारची चर्चा झाली आहे का?

ही लस पॅकिंग, स्टोअरेज आणि ती देईपर्यंत उणे ७० अंश तापमानात ठेवणे आवश्यक आहे. भारतात सध्या तशी कुठलीही तयारी नाही. फायझरने भारतात लस लाँच करण्याबाबत सध्या कुठलीही घोषणा केलेली नाही. सूत्रांच्या मते, भारत सरकारने लसीच्या कराराबाबत कुठलीही चर्चा केलेली नाही.

> मग ही लस ब्रिटनमध्येच दिली जाणार का?

तसे नाही. फायझरने अमेरिकेतील मंजुरीसाठी अर्ज केला आहे. त्याशिवाय जपान आणि ईयूसोबतही करार आहे. सध्या कंपनीची जेवढी उत्पादन क्षमता आहे, ती पाहता आधीचे करार पूर्ण करण्यासाठीच कंपनीला एक वर्ष लागू शकते. पण फायझर उत्पादनासाठी इतर देशांशी संपर्क साधेल, अशीही शक्यता आहे.

> फायझर किती डोस तयार करेल?

फायझर आणि बायोएनटेक मिळून डिसेंबरमध्ये ५ कोटी डोस तयार करतील. २०२१ मध्ये १३० कोटी डोस बनवण्याची तयारी आहे. त्यासाठी फायझरला इतर उत्पादकांची मदत घ्यावी लागू शकते. फायझर-बायोएनटेकने ब्रिटनसोबत पुढील वर्षापर्यंत (२०२१) ४ कोटी डोस उपलब्ध करून देण्याचा करार केला आहे. दोन कोटी लोकांना दोन-दोन डोस दिले जातील. कंपनी उर्वरित डोस इतर देशांना देईल.

> ब्रिटनमध्ये आधी कोणाला लस दिली जाईल?

सर्वात अगोदर घरांत उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या सेवेत कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यासाठी सरकारचे प्राधान्य असणार आहे. त्यानंतर ८० वर्षांवरील ज्येष्ठ आणि आधीपासूनच इतर आजारांशी झुंज देत असलेल्या लोकांना लस दिली जाईल. नंतर वेगवेगळ्या टप्प्यांत ७५, ७० आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना दिली जाईल. मुलांना लस देण्याची सध्या कुठलीही योजना नाही.

> जर एखादा भारतीय किंवा इतर देशांचा नागरिक ब्रिटनमध्ये राहत असेल, तर त्याला लस देणार?

लसीकरणासाठी एक विशेष समिती आहे. बाहेरून आलेल्या कोणाला लस आधी द्यायची, कोणाला नंतर याची शिफारस ती दोन-तीन दिवसांत करेल.

> लस दिल्यानंतरचे आव्हान काय असेल?

युरोपीय मेडिसिन एजन्सीचे प्रमुख एमर कुक यांच्या मते, लस दिल्यानंतर परिणाम काय झाला हे पाहण्यासाठी त्या लोकांची निगराणी करावी लागेल. हेच सर्वात मोठे आव्हान आहे.

> ही लस किती काळ प्रतिकारक्षमता देईल?

ते समजण्यासाठी वैज्ञानिकांना आणखी एक वर्ष लागू शकते. कारण लसीच्या परिणामाचे आधी आकलन करणे जवळपास अशक्य आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, आतापर्यंत ज्या कंपन्यांची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे त्यांचे कुठलेही गंभीर दुष्परिणाम समोर आलेले नाहीत.

हे आहेत भाजपचे पुण्याचे प्रवक्ते…

0

भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहर प्रवक्ते पदांवरील नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी त्यांना नियुक्तीपत्रे दिली. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार आमदार सिद्धार्थ शिरोळे, संदीप खर्डेकर, मंगेश गोळे, संजय मयेकर, धनंजय जाधव, श्रीपाद ढेकणे आणि विकास लवाटे अशा 7 जणांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.