Home Blog Page 2379

नर्सिंग संर्वगातील वरिष्ठ रिक्त पदे तातडीने भरण्याची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची सूचना

0

मुंबई, दि. 7 : नर्सिंग संर्वगातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट नवीन रुपात तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी,अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी येथे केल्या.

साथी संस्था, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, युनायटेड नर्सेस असोसिएशन, जनआरोग्य अभियान यांच्या वतीने वेबिनार आयोजित करण्यात आला. राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. कोरोना कालावधीत साथी संस्थेने कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या अनुभवावर सर्वेक्षण केले.त्याबाबत या वेबिनारमध्ये सादरीकरण करण्यात आले.

वेबिनारच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास,संचालक डॉ.अर्चना पाटील, डॉ.अभय शुक्ला, डॉ श्वेता मराठे, नर्सिंग संघटनेच्या प्रा.प्रविणा महाडकर,डॉ. स्मिता राणे उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या पुढाकाराने नर्सेससाठी प्रथमच वेबिनार आयोजित करण्यात आल्याची आणि नर्सेसना आपल्या समस्या,अनुभव मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. कोरोना काळात नर्सेसनी केलेल्या अत्यंत चांगल्या कामाची मांडणी करतानाच त्यांना आलेले अनुभव, अडचणी यावर वेबिनारमध्ये चर्चा करण्यात आली.

कोरोनाचा काळ हा कठीण काळ होता.या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री  अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच आरोग्य सेवेतील कर्मचारी,डॉक्टर्स, शासनाचे विविध विभाग यांनी अत्यंत कष्टाने ह्या आपत्तीला तोंड दिले व आवश्यक उपाययोजना केल्या. याबाबत विविध वक्त्यांनी सर्वांचे कौतुक केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, साथी संस्थेने नर्सेसच्या अनुभवावर आधारित जे सर्वेक्षण केले आहे ते शासनापर्यंत पोहोचवले जाईल. तसेच त्यावर करावयाच्या उपाययोजनांवर भर दिला जाईल. नर्सेस कॅडरमधील समन्वय करणारी जी वरिष्ठ पदे आहेत ती तातडीने भरण्यात यावी. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट आवश्यक असून त्याबाबतीत अधिक अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी. हिवाळी अधिवेशनानंतर यासंदर्भात  बैठक घेण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिली.

रिक्त पदभरतीला चालना- आरोग्यमंत्री राजेश टोपे

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, नर्सेसच्या ज्या रिक्त जागा आहेत, त्या तातडीने भरल्या जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागातील 17 हजार रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे भरण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे विभागातील रिक्त पदभरतीला चालना मिळणार असून आगामी कालावधीत ही पदे भरली जातील.

सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी निधी वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जास्तीचा निधी मिळवू, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली.शासकीय रुग्णालयाची सेवा, स्वच्छता,भोजन व्यवस्था यामध्ये गुणात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्यात आरोग्य संस्थांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे पाच हजार कोटी निधीचा प्रस्ताव दिला आहे. तोही लवकरच मंजूर होईल.

सामान्य जनतेचा सार्वजनिक आरोग्य सेवेवरचा विश्वास वाढावा तसेच ही सेवा परवडणारी, सुलभ आणि दर्जेदार असावी यासाठी प्रयत्न सुरु असून राज्यातील जुन्या रुग्णवाहिका बदलण्यात येत आहेत. पुढील आठवड्यात 500 नवीन रुग्णवाहिका दाखल होतील. असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील रुग्णांना मोफत रक्त मिळण्यासाठी धोरण करणारराज्यातील गरजू रुग्णांना यापुढे मोफत रक्त मिळावे यासाठी धोरण तयार करण्यात येत असून कुणालाही रक्तासाठी रक्कम मोजावी लागणार नाही, यासाठी निर्णय विचाराधीन असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी डॉ.व्यास, डॉ.अर्चना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ.सुभाष साळुंखे यांनी आरोग्य क्षेत्राचा आढावा घेतानाच भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.

महाविकास आघाडी व अन्य पक्ष: संघटनांच्या वतीने उद्या ‘पुणे बंद’ चे आवाहन -सकाळी मोर्चा

0

पुणे- मोदी सरकारने केलेल्या काळ्या कृषी कायद्याला विरोध म्हणून उद्या दिनांक ८ डिसेम्बर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंद मध्ये पुणे शहर देखील सहभागी होईल असा विश्वास व्यक्त करीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंद चे आवाहन करून उद्या मोर्चाचे आयोजन देखील केले आहे. अशी माहिती शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे आणि राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष आ. चेतन तुपे यांनी येथे दिली .

ते म्हणाले उद्या सकाळी अलका टॉकिज चौकातून साडेदहा वाजता मोर्चा सुरु करण्यात येईल आणि मंडई तील टीळक पुतळ्याजवल मोर्चाचा समारोप होईल .पुण्यातील हमाल पंचायत , रिक्षा संघटना ,मार्केट यार्ड कामगार युनियन ,पुणे मर्चंट चेम्बर्स , पुणे पेट्रोल डीझेल असोसिएशन ,व्यापारी संघटना , पीएमपी एल कामगार संघटना, अशा अनेकांनी या बंदला पाठींबा दिल्याचा दावा महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भात आज बोलविण्यात आलेल्या बैठकीस आ. तुपे, श्री . बागवे यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, अंग मेहनती कास्त्कारी संघटनेचे नितीन पवार ,माकप चे अजित अभ्यंकर ,शेकाप चे सागर आळत सेनेचे रघुनाथ कुचिक,प्रशांत बढे, ,दगडखाण कामगार संघटनेचे बी एम रेगे ,नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर तसेच लोकायत चे नीरज जैन, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड आदी मान्यवर कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.

‘राहुल गांधींना समजून घेण्यास शरद पवार कमी पडले’- बाळासाहेब थोरात

0

मुंबई-‘राहुल गांधी यांच्याकडे देश चालवण्यासाठी लागणाऱ्या सातत्याची कमतरता आहे’, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. यावर काँग्रेसकडून प्रत्युत्तर आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘शरद पवारांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो. पण, राहुल गांधी यांना समजून घेण्यात पवार कमी पडले’, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

माध्यमांशी संवाध साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि त्यांचे नेतृत्व पक्षाने स्विकारले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर काँग्रेस पक्ष संघटीत होतोय. त्यांनी जिवनात जे दुःख पाहिले, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही सावरत ते नेतृत्व करत आहेत. शरद पवार यांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, परंतू ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असे वाटते.’

पुढील काळात राहुल गांधीच पक्षाचं समर्थपणे नेतृत्व करणार आहे असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला. राहुल गांधी जे काम करत आहेत त्यांच्याविरोधात भाजपाच्या यंत्रणा कार्यरत असतात, असंही थोरात म्हणाले. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी…महाराष्ट्रातलं सरकार टीकवायचं असेल तर काँग्रेस नेतृत्वावर टीका करणं टाळा असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधली ही धुसफूस किती काळ चालते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मोदी सरकारने माघार घेऊ नये, अन्यथा आपण दहा वर्षे मागे जाऊ : मनसे नेते अनिल शिदोरे

0

मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून शेतकरी आंदोलनाबद्दल आपली भूमिका मांडली आहे. ‘सरकारने निर्णय मागे घेतला तर आपण दहा वर्षे मागे जाऊ’ असे मत अनिल शिदोरे यांनी व्यक्त केले आहे.

काय म्हणाले अनिल शिदोरे?

आपण वर्षानुवर्ष पाहिले की कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी हीच शेतकरी वर्गावर अन्याय करते आहे. त्याचा बिमोड करायचा म्हणून संसदेत तीन कृषी विषयक कायदे मंजूर झाले, आता इथून सरकारने माघार घेतली तर शेतकरी पुन्हा भ्रष्टाचारी व्यवस्थेत भरडला जाईल.. सरकारने माघार घेऊ नये, अशी मागणी शिदोरे यांनी केली आहे.तसेच, ‘शेतीचं भलं खुल्या बाजाराशी जोडले जाण्यात आहे. ती दिशा आहे. ज्या कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन चालू आहे, ते कायदे त्याच दिशेने जाणारे आहेत. त्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत काही सुधारणा करता येतील. परंतु आज माघार घेतली तर देशातील एकूण आर्थिक सुधारणांबाबत आपण दहा वर्ष मागे जाऊ’ असे मतही शिदोरे यांनी व्यक्त केले.

त्याचबरोबर शरद पवार यांचे एपीएमसीला पाठिंबा देणारे पत्र समोर आले आहे. याचा धागा पकडून शिदोरे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. ”राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ह्यांनी त्यांच्या “लोक माझे सांगाती..” ह्या पुस्तकात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियंत्रणामुळे कसा अन्याय होतो आहे आणि हे नियंत्रण काढले पाहिजे असे म्हटले असल्याचे समजले. मी पुस्तक वाचलेले नाही पण हे खरं आहे का? असा थेट सवाल शिदोरे यांनी सुप्रिया सुळे यांना विचारला आहे.

सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षण वर्गास प्रवेश सुरू

0

मुंबई, दि. 7 : वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन विषयाच्या 125 व्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2020 आहे.

मत्स्यव्यवसाय व सागरी मासेमारीचा विकास आणि विस्तार होण्यासाठी मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सहा महिन्याचे प्रशिक्षण शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात दिले जाते. त्याअनुषंगाने 2020-21 या वर्षातील, दि. 01 जानेवारी ते 30 जून 2021 या सहा महिन्याच्या कालावधीत सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थींनी विहित नमुना अर्ज आवश्यक कागदपत्रांसह शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा मुंबई 61 या पत्त्यावर 16 डिसेंबर 2020 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

इच्छुक बेरोजगार युवक युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

0


पुणे, दि. 7: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले. त्यामुळे आता अनलॉक 1.0 अंतर्गत काही अटी व शर्तीच्या आधारे सुरू झालेल्या औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्या अनुषंगाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पिंपरी (तांत्रिक) रास्तापेठ पुणे या कार्यालयाच्या वतीने नोकरी इच्छुक बेरोजगार युवक युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून पुणे जिल्ह्यातील नामांकित आस्थापना, कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदाद्वारे संधी देण्यात येत आहे. इच्छुक युवक युवतींनी 9 डिसेंबर 2020 पर्यंत आपापले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी हणमंत नलावडे यांनी केले आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यांतर्गत पुणे जिल्ह्यातील नामवंत विविध उद्योजकांकडील सर्वसाधारणपणे मशीन ऑपरेटर, वेल्डर, फिटर, शीटमेटल वर्कर, ऑटो मेकॅनिक, मेसन, प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, कारपेंटर, ग्राईंडर, टर्नर, मशिनिस्ट, इंजिनिअरिंग डिप्लोमा मेकॅनिकल, ॲटोमोबाईल इंजिनिअर, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन पदवीधर यासारख्या पदांसाठी आवश्यक ती पात्रताधारक तसेच एसएससी, एचएससी, पदवीधर उमेदवारांसाठी एकूण 563 पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
सदरचा मेळावा हा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, या संधीचा लाभ घेण्यासाठी आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाद्वारे लॉगीन करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदासाठी आपला पंसतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावा. पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या आसपासच्या कंपन्यांची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी जेणेकरून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने विहीत केलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे व संधीचा लाभ घेणे उद्योजक व उमेदवार यांना सहज शक्य होईल.
इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पंसतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण दिनांक व वेळ एसएमएसने कळविण्यात येईल व शक्य असेल तेथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल. तरी इच्छुक युवक युवतींनी दि. 9 डिसेंबर 2020 पर्यंत आपापले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी श्री. हणमंत नलावडे यांनी केले आहे.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 146

0

पुणे विभागातील 5 लाख 13 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 42 हजार 723 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.07 :- पुणे विभागातील 5 लाख 13 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 42 हजार 723 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 146 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 156 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.60 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 47 हजार 815 रुग्णांपैकी 3 लाख 28 हजार 488 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 927 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 400 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.44 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 947 रुग्णांपैकी 49 हजार 579 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 627 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 741 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 779 रुग्णांपैकी 43 हजार 197 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 957 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 625 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 22 रुग्णांपैकी 44 हजार 944 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 375 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 703 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 160 रुग्णांपैकी 47 हजार 213 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 260 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 17 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 685 , सातारा जिल्ह्यात 173, सोलापूर जिल्ह्यात 114, सांगली जिल्ह्यात 29 तर कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 939 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 664, सातारा जिल्हयामध्ये 56, सोलापूर जिल्हयामध्ये 138, सांगली जिल्हयामध्ये 56 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 25 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 29 लाख 62 हजार 361 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 42 हजार 723 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 6 डिसेबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

कोरोना चाचण्या वाढविण्यासोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्या-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

0

पुणे, दि. 7: कोरोना विषाणूची परिस्थिती नियंत्रणात असली, तरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून चाचण्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज दिले. कोरोना चाचण्या वाढविण्यासोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा तसेच येत्या 17 जानेवारी 2021 रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमे अंतर्गत बालकांना पोलीओ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आज कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, पल्स पोलिओ लसीकरण, कोविड लसीकरण नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोना अद्याप गेलेला नाही, आताही धोका कायम आहे. त्यामुळे सर्वांनी स्वयंशिस्त पाळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे. तसेच पुढील कालावधीतील संभाव्य अंदाज विचारात घेत तयारी ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासोबतच लसीकरणासाठी माहिती संकलित करताना अचूकता ठेवा तसेच चाचण्यांची संख्या वाढवा, अशा सूचना देत येत्या 17 जानेवारी 2021 रोजी देण्यात येणारे पल्स पोलिओ लसीकरण बालकांना करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी कोरोना स्थिती व उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. कोरोना उपाययोजना आढावा बैठकीसोबतच कोरोना लसीकरण तसेच पल्स पालिओ लसीकरणाबाबतही आढावा घेण्यात आला. यावेळी आरोग्य विभागासोबतच विविध विभागातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील ‘जलक्रीडा’ (Water Sport) सुरू करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली – मंत्री अस्लम शेख

0

मुंबई, दि.7 : राज्यातील जलक्रीडा (Water Sport) सुरु करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली (S.O.P) तयार करण्याचे आश्वासन राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील जलक्रीडा व्यावसायिकांच्या शिष्टमंडळास दिले.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधल्या जलक्रीडा व्यावसायिकांनी सोमवारी राज्याचे बंदरे मंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन जलक्रीडा (Water Sport) सुरु करण्याबाबत निवेदन दिले.

श्री.अस्लम शेख यांनी शिष्टमंडळास जलक्रीडेसाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे व राज्य सरकारचा बंदर विभाग व पर्यटन विभाग यांच्या समन्वयातून जलक्रीडा व्यवसायाशी निगडीत विविध परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ करण्याचे आश्वासन दिले.

श्री.शेख  म्हणाले की, महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन व्यवसायाला अनुकूल वातावरण आहे. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता या क्षेत्रामध्ये आहे. राज्य सरकारचा बंदरे विभाग व पर्यटन विभागाच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय वाढावा यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत.

‘राजकीय पक्षांचा विरोध म्हणजे वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रकार’- देवेंद्र फडणवीस

0

मुंबई- कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनाने आता मोठे रुप घेतले आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आणि उद्या(8 डिसेंबर) होणाऱ्या भारत बंदला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर निशाना साधला. यावेळी त्यांनी विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याचे म्हटले.

यावेळी फडणवीस म्हणाले की, ‘ज्या कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे, ते कायदे राज्यात 2006 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत असताना हे कायदे करण्यात आले होते. मला आश्चर्य वाटतं की, ज्या गोष्टी राज्यात आधीच झाल्या, त्या केंद्राने केल्या तर यांना आक्षेप का आहे ? बाजार समित्या रद्द करण्यात येईल असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात लिहिले आहे. 27 डिसेंबर 2013 मध्ये राहुल गांधींनी पीसीमध्ये एपीएमसीमधून भाजीपाला आणि फळे काढण्यात येतील असे म्हटले होते,’ असे फडणवीस म्हणाले.

‘वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रकार ‘

फडणवीस पुढे म्हणाले की, ‘ शरद पवारांनी 2010 मध्ये अनेक पत्र लिहून कृषी सुधारणा सुचवल्या होत्या. पवारांच्या आत्मचरित्रात याबाबत उल्लेख आहे. डीएमकेनेही 2016 मध्ये असेच आश्वासन दिले होते. आम आदमी पक्षाने तर हे कायदे मंजूर केले आहेत. अकाली दल 12 डिसेंबर 2012 रोजी एपीएमसी दलालांचे अड्डे बनले आहेत असे म्हटले होते. खरतर, राजकीय पक्षांचा विरोध म्हणजे वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रकार आहे,’ अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

विरोधकांची दुहेरी आणि लज्जास्पद वृत्ती समोर आली- रविशंकर प्रसाद

यापूर्वी केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या विरोधी पक्षांची दुहेरी आणि लज्जास्पद वृत्ती समोर आली, अशी टीका त्यांनी केली. तसेच, ‘विरोधक आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी आंदोलनात सहभागी झाल्याचे’ ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, “आम्ही विरोधी पक्ष, विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर पक्षांच्या लज्जास्पद दुहेरी मानसिकता देशासमोर आणण्यासाठी आलो आहोत. फक्त आपले राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी ते कोणत्याही सरकार विरोधी आंदोलनात सहभागी होत आहेत, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

प्रत्येक नागरिकाच्या मनात सैनिकांविषयी अत्याधिक आदराची भावना – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. 7 : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले जवान राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी सर्वस्व पणाला लावतात व देशाच्या सीमांचे रक्षण करताना प्राणांची आहुती देतात. प्रत्येक नागरिकाच्या मनात सैनिकांविषयी अत्याधिक आदराची भावना आहे. त्यामुळे सशस्त्र सेना ध्वज निधीला योगदान देणे आपले कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या ध्वज निधी संकलन मोहिमेचा आरंभ राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे झाला. यावेळी राज्यपालांनी ध्वज निधीला आपले योगदान दिले. सैनिक कल्याण विभागाचे संचालक प्रमोद यादव यांनी राज्यापालांच्या जॅकेटवर सशस्त्र सेना ध्वजाची प्रतिकृती लावली.

ध्वज निधीला योगदान देणे ही भावना महत्त्वाची आहे; किती योगदान देतो हे महत्त्वाचे नाही, असे सांगून ध्वज निधीला सढळ हस्ते योगदान देण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन विद्या रत्नपारखी यांचा निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

नौसेनेच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस अॅडमिरल अजित कुमार पी, स्थल सेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा मुख्यालयाचे प्रमुख जनरल ऑफिसर कमांडिंग एस.के.प्राशर, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, एअर व्हाईस मार्शल एस आर सिंह, एअर ऑफिसर कमांडिंग, मेरिटाईम एअर ऑपरेशन, तसेच ध्वज निधीला योगदान देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

000

5पैसा.कॉम आणि व्हेस्टेड फायनान्स यांच्यातर्फे अमेरिकी बाजारपेठेत शून्य कमिशन गुंतवणूक सुविधा उपलब्ध

0

भारतातील एकमेव नोंदणीकृत डिस्काउंट ब्रोकर असलेल्या 5पैसा.कॉमने आज व्हेस्टेड फायनान्सशी भागिदारी केल्याचे जाहीर केले असून त्याअंतर्गत आमच्या सर्व ग्राहकांना अमेरिकी बाजारपेठेत शून्य कमिशन गुंतवणूक सुविधा दिली जाणार आहे.

5पैसा.कॉम ही भारतीय ब्रोकर्समधील सर्वाधिक वेगाने 1 दशलक्ष ग्राहक वर्गापर्यंत पोहोचलेली कंपनी असून त्यांच्याद्वारे परवडणारा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म पुरवला जातो. हा प्लॅटफॉर्म मिलेनियनल- पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्यांमधे विशेष लोकप्रिय आहे. व्हेस्टेड फायनान्स ही अमेरिकी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहे. त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे भारताताली गुंतवणुकदारांना अगदी सहजपणे अमेरिकी शेयर्स व ईटीएफमधे गुंतवणूक करता येणार आहे.

5पैसा.कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकर्ष गगदानी म्हणाले, ‘अमेरिकेतील नव्या युगाच्या तंत्रज्ञान शेयर्सकडे गुंतवणुकदारांना कल वाढत असल्याचे आम्हाला दिसून आले आहे. बरेच उद्योग आणि संकल्पना भारतात गुंतवणूक संधीच्या स्वरुपात उपलब्ध नाहीत. व्हेस्टेड फायनान्सबरोबर आम्ही केलेल्या भागिदारीमुळे ही उणीव बरून काढली जाईल आणि आमच्या ग्राहकांना आमच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मसह जागतिक बाजारपेठांचा लाभ घेता येईल. आणि अर्थातच आम्ही या व्यवहारांसाठी कोणत्याही प्रकाराचे कमिशन आकारणार नाही.’

5पैसा.कॉमच्या प्रत्येक ग्राहकाला त्याचे खाते केवळ काही मिनिटांत व्हेस्टेड फायनान्सशी जोडता येईल. गुंतवणुकदारांना त्यांच्या खात्यात शून्य बाकी ठेवूनही फ्रॅक्शनल शेयर गुंतवणूक करता येईल. व्हेस्टेड फायनान्सद्वारे कंपनीत खास तयार केलेले प्री- बिल्ट पोर्टफोलिओज पुरवले जातील.

5पैसा.कॉमच्या म्हणण्यानुसार कंपनीच्या ग्राहकांना सहजपणे वेगवेगळ्या संकल्पना आणि धोरणांसह संशोधित पोर्टफोलिओमधे त्यांच्या जोखीम प्रोफाइलनुसार सहजपणे गुंतवणूक करता येईल आमि कोणत्याही लॉक-इन तरतुदीशिवाय कोणत्याही वेळेस पैसे काढता येतील.

कंपनीद्वारे शून्य ब्रोकरेजमधे आवडीचे म्युच्युअल फंड्स, विमा आणि कर्ज इत्यादी सुविधाही त्यांच्या प्लॅटफॉर्मवर पुरवल्या जातात. 5पैसा.कॉम हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे स्टॉक ट्रेडिंग अप असून त्यांचे सहा दशलक्ष युजर्स आहेत, तर गुगल प्लेस्टोअरवर त्याला सातत्याने 4 चे रेटिंग आहे.

रस्ता रूंदीच्या आवश्यक भूसंपादनासाठीच क्रेडीट बॉण्डचा वापर करावा – आबा बागुल यांची मागणी

0

पुणे -रस्ता रूंदीच्या आवश्यक भूसंपादनासाठीच क्रेडीट बॉण्डचा वापर करावा अशी मागणी कॉंग्रेसचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनि महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, ‘शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी रस्ते रूंद करणे क्रमप्राप्त असून रस्ते रूंद करणेसाठी भूसंपादन हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. केवळ भूसंपादनाअभावी शहरातील रस्ते अरूंद आहेत. रस्त्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही होत असताना जागा मालकांकडून टीडीआर घेणेबाबत प्रतिसाद अल्प प्रमाणात असून रोख रकमेचा मोबदल्याची मागणी होत असते. अशा विविध कारणांमुळे रस्त्यासाठी आवश्यक जागांचे भूसंपादन होणेस विलंब झाल्याने शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. मागील १० वर्षात हजारो निष्पाप नागरिकांना वाहतूकीची समस्येमुळे अपघात होवून आपला जीव गमवावा लागला आहे, यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आलेली आहेत.
पुणे महापालिकेकडून क्रेडीट बॉण्ड देणे संदर्भात कार्यवाही चालू होणार असून पुणे महापालिकेकडून के्रडिट बॉण्डची निर्मिती करण्यात येणार आहे. याचा उपयोग भूसंपादनासाठी करण्यात येवून यामध्ये प्राधान्याने रस्तारूंदीसाठी आवश्यक भूसंपादन करणेसाठी करण्यात यावा. रस्ते नव्याने डांबरी करणे, काँक्रीट करणे यासाठी क्रेडिट बॉण्डचा वापर करण्यात येवू नये.
पुणे महापालिकेने स्मार्ट सिटीचे धोरण स्विकारले असून शहरातील रस्ते विकास आराखडयाप्रमाणे करणे हे क्रमप्राप्त आहे. रस्त्यांची रूंदी सर्वांना ज्ञात व्हावी यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून रस्तारूंदीबाबत जागेवर आखणी करणेसाठी देखील आग्रही असून राज्य शासनाने याबाबत अध्यादेश काढलेला आहे. विकास आराखडयाप्रमाणे रस्ते रूंद होणेसाठी क्रेडिट बॉण्ड दिल्यास यास चांगला प्रतिसाद मिळेल. पर्यायाने पुणे महापालिकेच्या ताब्यात रस्त्यासाठी आवश्यक जागा संपादित होणेची प्रक्रिया जलद होवून ख-या अर्थाने शहरातील वाहतूकीची समस्या सुटण्यास मदत होईल. विकास आराखडयाप्रमाणे रस्तारूंदी केल्यास अर्बन स्ट्रीट गाईडलाईननुसार रस्त्याच्या कडेने \ुटपाथ, डक्टिंग या सुविधा देखील होतील. रस्त्याची जागा ताब्यात नसल्याने अंध, अपंग, ज्येष्ठ नागरिक यांना चालण्यास \ुटपाथ देखील उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती असून आम्ही पूर्वी मुख्य सभेत याप्रकरणी प्रश्नोत्तरे दिले असता शहरात ७० टक्के रस्त्यांच्या कडेने \ुटपाथ नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्ताच्या जागांवर अतिक्रमण होवून टप-या टाकण्यात आलेल्या आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या जागा संपादित न केल्याने सदर ठिकाणी रस्ता करण्यात येवू नये म्हणून अज्ञातांकडून वृक्षारोपण केले जाते. अशा अनेक समस्या केवळ रस्त्यासाठी आवश्यक जागांचे भूसंपादन रस्ता रूंदीप्रमाणे न केल्याने निर्माण होत आहे.
तरी पुणे महापालिकेकडून क्रेडीट बॉण्ड देताना सदर बॉण्ड हे रस्ता रूंदीकरणासाठी आवश्यक भूसंपानासाठीच वापरण्यात यावेत, ही नम्र विनंती. या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करून आम्हास त्याचा लेखी अहवाल कळवावा. अशी मागणी आबा बागुल यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.

अलिबाग मध्ये गरजू कोळी मच्छिमार बांधवाना आर्थिक मदत व साहित्याचे वाटप

0

विधानसभाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न
अलिबाग- यंदा निसर्ग चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले. मासेमारांचे फार मोठे नुकसान झाले. सरकारला वारंवार सांगितले, पण, दुर्दैव म्हणजे कोणतीही मदत या सरकारने केली नाही.पण आज हा कार्यक्रम आयोजित करून गरिब मासेमारांना उपयोगी साहित्याची मदत देण्यात येत आहे ही आनंदाची गोष्ट आहे असे प्रतिपादन विधानसभाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले
कोळी महासंघातर्फे आयोजित कोळी-मच्छिमार बांधवांना विविध साहित्य वितरणाचा कार्यक्रम विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. सोबत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते, तसेच माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रमेशदादा पाटील, भाई गिरकरजी आदी यावेळी उपस्थित होते.
सुमारे 2000 लाभार्थ्यांना विविध उपयोगी वस्तुंचे वाटप यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले की, यंदा निसर्ग चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले. मासेमारांचे फार मोठे नुकसान झाले. सरकारला वारंवार सांगितले, पण, दुर्दैव म्हणजे कोणतीही मदत या सरकारने केली नाही.
पण आज हा कार्यक्रम आयोजित करून गरिब मासेमारांना उपयोगी साहित्याची मदत देण्यात येत आहे.

आपल्या सरकारच्या काळात शीतपेट्या देऊन महिला मासेमारांना मदत करण्यात आली. आज केंद्रात शेतीप्रमाणेच संपूर्ण सवलती आणि योजना मासेमार बांधवांसाठी राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री मस्त्यसंपदा योजनेतून, सागरमालातून मोठ्या पायाभूत सुविधा निर्मितीचे काम करण्यात येत आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.

या समुद्राचे खरे मालक तुम्ही आहात. मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन करून ते खर्‍या अर्थाने मासेमारांचेच असले पाहिजे, हे आपल्या काळात सुनिश्चित केले गेले.आता हरिदास समितीचा अहवाल लागू करण्यासाठी नवीन सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
हे मच्छिमार बांधव पालघर पासून गोवापर्यंत मच्छिमारीचे काम करतात . आजही वर्षानुवर्ष या ठिकाणी अशाच पद्धतीचा पारंपरिक व्यवसाय ही मंडळी करत आहेत, एका बाजूला जग तंत्रज्ञानाकडे गेला असताना आता कोळी समाजाला मार्गदर्शन करून ताकद देण्याची खरी आवश्यकता आहे,असे प्रतिपादन विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केले.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले आहे या राज्याने ते पाहिलं आहे ,त्यांनी दिलेला शब्द किंवा वचन ते नेहमी पाळतात. शब्दाची जाणीव असलेला नेता,खऱ्या अर्थाने मच्छिमारंसाठी काम करणारा नेता आणि त्या विश्वासाने आज संपूर्ण कोळी समाज आणि मच्छिमार बांधव देवेंद्रजी यांच्या मागे आहेत . मच्छिमारांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्याचं काम देवेंद्र जी च्या नेतृत्वखाली या सरकार ने केले. अनेक कधी नव्हे तितक्या जेटटी कोकणात झाल्या. आमचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब होते , आदरणीय फडणवीस साहेबाच्या माध्यमातून आम्ही कोकणच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आम्ही कोकणवासी आपले ऋणी आहोत. या कोकणला नेतृत्व देण्याचं काम , तर या कोकणला विकास देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी या राज्यात केले असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून माझ्यावर आज जबाबदारी दिली , कोकणचे मच्छिमार बांधव भाजपवर विश्वास टाकतात,आपण या मेळावाच्या माध्यमातून आपल्याला शब्द देतो कि भाजप हा कोळी समाज, मच्छिमार बांधवांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही असेही दरेकर यांनी सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची गरज-वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे

0

पुणे-महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून सर्वांनी उच्च शिक्षित होऊन संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याची गरज असल्याचे मत सिंहागडरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी नऱ्हे येथील नवदीप सोसायटी मध्ये अभिवादन सभेत व्यक्त केले.
या वेळी झालेल्या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी नवदीप सोसायटीचे चेअरमन विष्णु कदम होते.
व.पो. नि. देविदास घेवारे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब ढाकणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना नऱ्हे आंबेगाव विभाग प्रमुख राज कदम यांनी केले होते.
हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती प्रभावती भुमकर, प.स.सदस्या ललिता कुटे,ग्रा. प.सदस्या सुप्रिया भुमकर,प्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा वंदना कदम, राजु कुटे,दयानंद लोखंडे, रणजित माने, मस्तान जाधव, दशरथ राजगुरू, विशाल वाघमारे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन अविनाश गायकवाड, आनंद लोखंडे, किरण शिरसाट, विशाल ओव्हाळ, अजय मळेकर, प्रतीक कदम, अमित कदम व नवदीप मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले.
सूत्रसंचालन दशरथ राजगुरू यांनी केले.