Home Blog Page 2377

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदाच्या १३९ जागा

0

पदाचे नाव :- टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) –  २३ पदे

शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- टेक्निशियन (फिटर) – १३ पदे

शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- टेक्निशियन (सिव्हिल) – ०२ पदे

शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) – १३ पदे

शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- टेक्निशियन (AC & Reff.)- ०२ पदे

शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर/ट्रेन कंट्रोलर – ५६ पदे

शैक्षणिक पात्रता –  संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल) – ०४ पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर – (IT) – ०१ पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) – ०५ पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर (मेकॅनिकल) – १ पद

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) – ०८ पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) – ०३ पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर  (मेकॅनिकल) – ०६ पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल) – २ पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २१ जानेवारी २०२१

वयोमर्यादा : २१ जानेवारी २०२१ रोजी १८ ते २८ वर्षे (एससी/एसटी- ५ वर्षे, ओबीसी – ३ वर्षे सूट)

ऑनलाईन अर्जासाठी :- https://bit.ly/3oyyauo

 अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/33Uxs2G आणि https://bit.ly/39RhVVf

सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना ब्लँकेट वाटप

0

पुणे : पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्ताने जाहिरातीचा खर्च टाळून गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.डेक्कन येथील भिडे पुल, पुणे स्टेशन आणि ससून भागातील रस्त्यावर राहणार्‍या गरजू लोकांना सदर ब्लँकेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ बाळासाहेब अमराळे यांनी केले होते. कार्यक्रमास युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल मलके, विवेक कडू, प्रताप शिळीमकर, कुणाल काळे, विवीयन केदारी, धनराज माने, अक्षय नवगिरे आदी उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीजचोरीविरोधात मोहीम आणखी तीव्र करा

0

पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांचे निर्देश

पुणे : वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासोबतच सर्व वीजग्राहकांना योग्य दाबाच्या वीजपुरवठ्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील वीजचोरीविरुद्धची मोहीम आणखी तीव्र करण्यात यावी तसेच रब्बी हंगामामध्ये कृषिपंपांना योग्य दाबाने सुरळीत वीजपुरवठ्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करावी असे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी दिले.

पुणेकोल्हापूर, सांगलीसातारा व सोलापूर जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. नाळे यांनी मंगळवारी (दि. 8) व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेतला. यावेळी ते बोलत होते. मुख्य अभियंता सर्वश्री सचिन तालेवार (पुणे)सुनील पावडे (बारामती) व प्रभाकर निर्मळे (कोल्हापूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.  

वीजबिलांचा भरणा होत नसल्याने महावितरण सध्या आर्थिक संकटात आहे. त्यामुळे थेट वीजग्राहकांशी संवाद साधून त्यांना वीजबिल भरण्याची विनंती करण्यात यावी. कोरोनाच्या लॉकडाऊन कालावधीतील वीजबिलांबाबत शंका किंवा तक्रारी असल्यास त्याचे देखील तात्काळ निवारण करण्यात यावे असे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. नाळे यांनी सांगितले. यासोबतच प्रत्येक विभागनिहाय वितरण व वाणिज्यिक हानी आणखी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध मोहीम तीव्र करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ज्या वीजवाहिन्यांवर हानीचे प्रमाणे अधिक दिसून येत आहे त्या वाहिन्यांवरील सर्व वीजजोडण्यांची तात्काळ तपासणी सुरु करण्यात यावी. अनधिकृत वीजजोडण्या काढून टाकण्यासोबतच संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आवश्यक तेथे महावितरणच्या भरारी पथकांसह पोलिस विभागाचे देखील सहकार्य घ्यावेअसेही त्यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रात शेतीसाठी रब्बी हंगाम महत्वाचा असल्याने कृषिपंपांना योग्य दाबाने सुरळीत वीजपुरवठा करावा. त्यासाठी येत्या 31 डिसेंबरपर्यंत कृषिपंपांसह संबंधीत रोहित्रांचे सर्वेक्षण करून अनधिकृत वीजजोडण्या काढून टाकण्याची मोहीम पूर्ण करावी. या दरम्यान रोहित्रांची क्षमता वाढविणे आवश्यक असल्यास त्याचे प्रस्ताव देखील तातडीने सादर करावे. सुरळीत वीजपुरवठा व रोहित्रावरील वीजभार कमी करण्यासाठी उपयुक्त असलेले कॅपॅसिटर योग्य क्षमतेनुसार कृषिपंपांना बसविण्याचे आवाहन यावेळी प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. नाळे यांनी केले. अभियंता व कर्मचाऱ्यांनी कृषिपंपांना कॅपॅसिटर बसविण्याबाबत शेतकऱ्यांना माहीती द्यावीअसे निर्देश त्यांनी दिले. कृषिपंपांचे रोहित्र नादुरुस्त झाल्यास दुरुस्तीची किंवा बदलण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. पुरेशा प्रमाणात रोहित्र व ऑईल उपलब्ध असून मागणीप्रमाणे पुरविण्यात येत आहे. त्यामुळे नादुरुस्त रोहित्र किंवा इतर तांत्रिक कारणांनी वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्यास संबंधीत जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. नाळे यांनी सांगितले.

या आढावा बैठकीमध्ये महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. अलोक गांगुर्डेप्रादेशिक विभागातील सर्व अधीक्षक अभियंते व कार्यकारी अभियंते तसेच वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.

महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी शक्ती विधेयकास मान्यता

0

मुंबई -महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहे.  या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) ॲक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इंप्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 अशी दोन विधेयके विधिमंडळात मांडण्यात येतील.

  • महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा केला आहे. या कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कायदा करण्याच्या दृष्टीने दिशा कायदा समजून घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेसह तत्कालीन अ.मु.स. (गृह) संजय कुमार आणि पोलीस महासंचालक  सुबोध जयस्वाल व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी आंध्र प्रदेशला भेट दिली होती.
  • आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी विधेयकाचा मसुदा करण्याकरिता अश्वथी दोरजे, संचालक, महाराष्ट्र पोलीस अकाडमी, नाशिक यांचे अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती.
  • या समितीने तयार केलेल्या उपरोक्तप्रमाणे दोन विधेयकांचे मसुदे मंत्रिमडळासमोर 12 मार्च 2020 रोजी ठेवण्यात आले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विधेयकांची सखोल तपासणी करून विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी मंत्रिमडळ उप समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंत्रिमंडळाच्या निर्देशानुसार  अशोक चव्हाण, मंत्री  (सा.बां. व सा.उ.वगळून) यांच्या अध्यक्षतेखाली उप समिती नेमण्यात आली होती. या समितीचे सदस्य पुढीलप्रमाणे होते.

अनिल देशमुख, मंत्री ( गृह ),  एकनाथ शिंदे, मंत्री (नगर विकास),  जयंत पाटील, मंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र), यशोमती ठाकूर, मंत्री (महिला व बाल विकास), वर्षा गायकवाड, मंत्री (शालेय शिक्षण)

प्रस्तावित कायद्यांची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :-

  • नवीन गुन्हे परिभाषित केले आहेत.
    • समाज माध्यमांमधून महिलांना धमकावणे व बदनामी करणे.
    • बलात्कार, विनयभंग आणि ॲसिड हल्ला याबाबत खोटी तक्रार करणे.
    • समाजमाध्यम, इंटरनेट व मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी  तपास कार्यात सहकार्य न करणे.
    • एखाद्या लोकसेवकाने तपासकार्यात सहकार्य न करणे.
    • बलात्कार पीडितेचे नाव छापण्यावर बंधने होती ती बंधने विनयभंग आणि ॲसिड हल्ला बाबत लागू करणे.
  • शिक्षेचे प्रमाण वाढविले आहे.
    • बलात्कार, ॲसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंड प्रस्तावित केला आहे.
    • शिक्षांचा कालावधी वाढविला आहे.
    • ॲसिड हल्ला प्रकरणी दंडाची तरतूद केली असून ती रक्कम पीडितेला वैद्यकीय उपचार व प्लास्टिक सर्जरीकरिता देण्याचे प्रस्तावित आहे.
  • फौजदारी प्रक्रियेमध्ये बदल सुचविला आहे.
    • तपासाचा कालावधी दोन महिन्यांवरून 15 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांचा केला आहे.
    • खटला चालविण्याचा कालावधी दोन महिन्यांवरून 30 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांचा केला आहे.
    • अपिलाचा कालावधी सहा महिन्यांवरून ४५ दिवसांचा केला आहे.
  • नवीन न्यायालयीन व्यवस्था प्रस्तावित केली आहे.
    • 36 अनन्य विशेष न्यायालय स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.
    • प्रत्येक अनन्य विशेष न्यायालयासाठी विशेष शासकीय अभियोक्ता नेमण्याचे प्रस्तावित आहे.
    • प्रत्येक घटकामध्ये महिला व बालकांवरील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी (जिल्हा अधीक्षक/आयुक्तालय) विशेष पोलीस पथक, ज्यामध्ये किमान एका महिला अधिकाऱ्याचा समावेश असेल, नेमण्याचे प्रस्तावित आहे.
    • पीडितांना मदत व सहकार्य करण्यासाठी सेवाभावी संस्थांना अधिसूचित करण्याचे प्रस्तावित आहे.

बँक कर्जांशी संबंधित दस्तांवर यापुढे एकसमान मुद्रांक शुल्क

मालमत्तांवर कर्ज घेण्यासाठी नोंदणी करावयाच्या करारांसाठी मुद्रांक शुल्क कमी करण्याचा तसेच त्यामध्ये एकसमानता आणण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे यापुढे सामान्य नागरिक, झोपडपट्टीधारक, शेतकरी तसेच अन्य असंघटित घटक ज्यांच्याकडे नोंदणीकृत दस्त नाही परंतु, सात-बारा किंवा मिळकत प्रमाणपत्राचा पुरावा आहे. अशा घटकाला त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेच्या टायटल तथा पुराव्याच्या आधारावर कर्ज घेण्यासाठी नोंदणी करावयाच्या करारनाम्यावर कमी मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे.

बँकांशी संबंधित दस्तांवरच्या मुद्रांक शुल्कामधील तफावतीमुळे मुद्रांक शुल्क चुकवेगिरी होत असे. त्याला आळा घालण्याच्या उद्देशाने बँकाशी संबंधित डिपॉझिट ऑफ टायटल डिड किंवा इक्विटेबल मॉरगेज किंवा हायपोथिकेशनच्या दस्तावर आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्काचा दर 0.2 टक्के ऐवजी 0.3 टक्के तर, ज्यामध्ये गहाणखतामध्ये समाविष्ट असलेल्या मालमत्तेचा कब्जा दिलेला नसेल अशा साधेगहाणखताच्या दस्तावर आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्काचा दर 0.5 टक्केऐवजी 0.3 टक्के असा करण्यात आला आहे. यामुळे बँकांशी संबंधित दस्तांवर एकसमान मुद्रांक शुल्क आकारणी तसेच, दस्तांच्या ऑनलाईन पध्दतीने नोंदणीसाठी किंवा नोटीसच्या ऑनलाईन फायलिंगच्या नोंदणीसाठी पंधरा हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

याशिवाय, ज्या दस्तामध्ये वेगवेगळया बाबी समाविष्ट असतात. अशा दस्तावर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम 5 अन्वये मुद्रांक शुल्काची आकारणी केली जाते. त्यानुसार, बँकाच्या समुहाव्दारे देण्यात येणाऱ्या कर्जाच्या गहाणखतावर मुद्रांक शुल्काची आकारणी करण्याच्या अनुषंगाने मा.सर्वोच्च न्यायालयाच्या 11 ऑगस्ट, 2015 रोजीच्या निकालानुसार पूर्वलक्षी प्रभावाने त्या कलमामध्ये वेगवेगळया बाबी किंवा वेगवेगळी हस्तांतरणे तथा व्यवहार अशी सुधारणा करण्याचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविणार

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून योजना राबविण्यात येईल. 

मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत राबविण्यात येतील. त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग या चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येईल.

ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्याला वैयक्तिक व सार्वजनिक कामे हाती घेऊन त्याद्वारे कायमस्वरुपी मत्ता निर्माण करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे व कामाअभावी होणारे स्थलांतर थांबविणे हा आहे. उपरोक्त कामांसाठी आवश्यक असणारे 60:40 अकुशल कुशल प्रमाण संतुलित राहण्यासाठी  मग्रारोहयोच्या विविध योजनांच्या जसे कीशेततळेवृक्ष लागवडशोषखड्डे, फळबाग लागवडइत्यादी अकुशल खर्चाचे प्रमाण जास्त असलेल्या योजनांच्या संयोजनातून या बाबी दिल्याने प्रत्येक शेतकरी समृध्द (लखपती) होतील असा योजनेचा उद्देश आहे.

गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे–  जनावरांसाठी गोठ्यांची जागा ही ओबडधोबड आणि खाचखळग्यांनी भरलेली असते तसेच ती अस्वच्छ असल्याने जनावरांना विविध आजार होतात. गाई आणि म्हशींची कास निकामी होऊन शरीरावर खालच्या बाजूस जखमा होतात.  याठिकाणी मौल्यवान मूत्र व शेण साठवता न आल्याने वाया जाते.  यासाठी या ठिकाणी चारा आणि खाद्यासाठी चांगली गव्हाण बांधणे तसेच मूत्र संचय टाके बांधण्यात येतील. स्वत:ची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील.  एका गोठ्यासाठी 77 हजार 188 रुपये खर्च येईल.  यासाठी 6 गुरांची पूर्वीची तरतूद रद्द करून 2 गुरे ते 6 गुरे या करिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी 6 च्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट आणि 18 गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी 3 पट अनुदान देय राहील.

शेळीपालन शेड बांधणे- शेळ्यामेढ्यांकरिता चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहणार असून वाया जाणारे मल, मूत्र शेतीमध्ये उत्कृष्ट सेंद्रीय खत म्हणून वापरले जाऊ शकेल. शेळी ही गरीबांची गाय समजली जाते.  शासनाचे अनुदान न मिळाल्यास एका भूमिहीन शेतकऱ्याला स्वत:च्या पैशातून 10 शेळ्या विकत घेणेही शक्य होत नाही.  10 शेळ्यांचा गट हा शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ग्राह्य धरला जातो, पण कमी शेळ्या असतील तर शेत मजुराला त्याचा फायदा होत नाही. ही बाब लक्षात घेता किमान 2 शेळ्या असलेल्या भूमीहिन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेला लाभ देता येऊ शकेल.  एका शेडसाठी 49 हजार 284 रुपये खर्च येतो.  हे शेड सिमेंट व विटा व लोखंडी तुळ्यांच्या आधाराने बांधण्यात येईल. एका कुटुंबास जास्तीत जास्त 30 शेळ्यांकरिता 3 पट अनुदान मंजुर करण्यात येईल.

कुक्कुटपालन शेड बांधणे– कुक्कुटपालनामुळे ग्रामीण भागात कुटुंबांना पूरक उत्पादनाबरोबर आवश्यक पोषक अशा प्राणिजन्य प्रथिनांचा पुरवठा होतो. मात्र, निवारा चांगला नसल्याने कुक्कुटपक्षांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते. चांगल्या निवाऱ्यामुळे रात्रीच्यावेळी त्यांचे, पिल्लांचे आणि अंड्यांचे प्राण्यांपासून संरक्षण होते.  प्रत्येक शेडला 49 हजार 760 रुपये खर्च अपेक्षित आहे.  100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थींनी पक्षांची संख्या 150 च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग– शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्धारे प्रक्रिया केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात भर पडते.  सेंद्रीय पदार्थात सूक्ष्म जीवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.  त्याचा फायदा जमिनीला होतो.  याकरिता शेतात एक नाडे बांधण्यासाठी ही योजना आहे.  या नाडेपमध्ये सेंद्रिय पदार्थ, कचरा, शेणमाती आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात.  2 ते 3 महिन्यात काळपट तपकीरी भुसभुसीत, मऊ, दुर्गंधी विरहित कंपोस्ट तयार होते.  या नाडेपच्या बांधकामासाठी 10 हजार 537 रुपये खर्च अपेक्षित आहे.

कोल्हापूर येथे डी.वाय.पाटील ॲग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी स्थापनेस मान्यता

कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथे डी.वाय.पाटील ॲग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापनेस आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव विधानमंडळात मांडण्यात येईल.

डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटी पुणे यांना या विद्यापीठाचे प्रायोजक मंडळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून या विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. स्वंयसहाय्यित विद्यापीठ स्थापनेनंतर अभियांत्रिकी तंत्रज्ञान, व्यवस्थापन, व्यवसाय व वाणिज्य, उपयोजित व सृजनात्मक कला, प्रसारमाध्यम, माहिती व दळणवळण तंत्रज्ञान असे विविध अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेसाठी विधिमंडळात विधेयक आणणार

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र 2020 च्या प्रारुप विधेयकास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री या विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा केली होती. हे विधेयक विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर करण्यात येईल.

या क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आवश्यक अधिनियम प्रारुप तयार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय खोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अधिनियम प्रारुप विधेयकास विधि व न्याय विभागाच्या मान्यतेनंतर मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आले होते.

कृषी कायदा रद्द करा; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी

0

नवी दिल्ली-काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोध पक्षातील पाच नेत्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. सर्वांनी यावेळी राष्टपतींकडे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली.

“थंडीच्या दिवसात शेतकरी रस्त्यावर आहेत. अगदी शांतपणे ते आपली नाराजी सरकारसमोर मांडत आहेत. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावणं हे सरकारचं कर्तव्य आहे”, असं शरद पवार म्हणाले. विरोधकांनी राष्टपतींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सिस्ट) नेते सीताराम येचुरी यांच्यासहीत पाच नेते यावेळी उपस्थित होते.

“कृषी विधेयकांवर सखोल चर्चा व्हायला हवी होती. तशीच सर्व विरोधी पक्षांची मागणी होती. दुर्दैवाने या सगळ्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि विधेयकं घाईघाईनं मंजूर केली गेली”, असं शरद पवार म्हणाले.

शेतकऱ्यांना सरकारवर विश्वास राहीला नाही: राहुल गांधी
शेतकऱ्यांच्या ताकदीसमोर कुणीच उभं राहू शकत नाही. शेतकरी आता मागे हटणार नाहीत आणि कुणालाही घाबरणार नाहीत. जोवर हे काळे कायदे मागे घेतले जात नाहीत तोवर शेतकरी आंदोलन सुरुच ठेवतील, असं राहुल गांधी म्हणाले. यासोबत शेतकऱ्यांना आता मोदी सरकारवर विश्वास राहिला नसल्याचा घणाघात राहुल यांनी यावेळी केला.

महाविकास आघाडी एकत्रितपणे लढली तर भाजपचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत-जयंत पाटील

0

पुणे : राज्यात काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद स्पष्टपणे समोर आली आहे. पुढील काळात जर विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्षांची महाविकास आघाडी एकत्रितपणे लढली तर भाजपचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

पुण्यात जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाची माहिती दिली. पाटील म्हणाले, भाजपाला अलीकडेच हैदराबाद आणि राजस्थान येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर आता भाजपकडून मिशन मुंबईचा नारा दिला गेला आहे. यावर भाष्य करताना पाटील म्हणाले, राजस्थान आणि हैदराबाद येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक मुद्दे काय होते. काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील अंतर्गत धुसफूस होती का, हे मुद्दे विचारात घ्यावे लागतील, असेही पुढे ते म्हणाले.

मोदी सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला; शेतकरी देशभर अंबानी-अडानींच्या प्रोडक्टचा बायकॉट करणार

0

नवी दिल्ली -कृषी कायद्यावरुन सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतरही तोडगा निघू सकला नाही. शेतकऱ्यांनी आज मोदी सरकारचा प्रस्ताव फेटाळला असून, आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. मंगळवारी गृहमंत्री अमित शाहंच्या भेटीनंतर बुधवारी सरकारने शेतकरी नेत्यांना प्रस्ताव पाठवला होता. पण, शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर शेतकर्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. यात शेतकऱ्यांनी 4 महत्त्वाच्या घोषणा केल्या..

1. शेतकरी शनिवारी देशभरातील टोल प्लाजा फ्री करणार. दिल्ली-जयपूर हायवे बंद केला जाईल.

2. देशभरातील सर्व जिल्हा मुख्यालयात आंदोलन केले जाईल. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थानातील शेतकरी यात सामील होतील. ज्यांना या आंदोलनात सामील होता आले नाही, ते शेतकरी दिल्लीकडे जातील.

3. अंबानी-अडानींचे मॉल, प्रोडक्ट आणि टोलचा बायकॉट केला जाईल. जियोचे प्रोडक्ट्सदेखील बायकॉट केले जाणार.

4. भाजप नेत्यांचा नॅशनल लेव्हलवर बायकॉट केला जाईल. त्यांचे बंगले आणि कार्यालसांसमोर आंदोलन केले जाईल.

सरकारने शेतकऱ्यांच्या सर्वात मोठी मागणीस नकार दिला

सरकारने शेतकऱ्यांच्या प्रमुख 10 मुद्द्यांपैकी सर्वात महत्वाची मागणी असलेल्या कृषी कायद्यास रद्द करण्यास नकार दिला. 5 मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले जाईल आणि 4 मुद्द्यांमध्ये बदल करण्यास तयार झाले.

वाहतूक समस्येच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्राधिकरणातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे-विभागीय आयुक्त सौरभ राव

0

पुणे दि. 9: पुणे व परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासोबतच वाहतुक विषयक विविध समस्या सोडविण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (PUMTA) ची स्थापना करण्यात आली आहे. वाहतूक समस्येच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्राधिकरणातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज केल्या.
विधानभवन कार्यालयाच्या सभागृहात पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (PUMTA)ची चतुर्थ बैठक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ राजेंद्र जगताप, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, महाराष्ट्र मेट्रो रेलचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. साळुंखे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक विषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणात पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांची भूमीका अत्यंत महत्वाची आहे. पुणे शहर आणि परिसरासाठी समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून दीर्घकालीन उपाययोजना आखून त्यावर कृती करण्याची गरज आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्व विभागांनी समन्वयाने काम करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. प्राधिकरणाचे काम करताना यामध्ये सर्वसमावेशकता येण्यासाठी सामाजिक काम करणाऱ्या संस्थांबरोबरच वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले.
या बैठकीत नवीन मेट्रो मार्ग महामेट्रो कॅरिडोर 1 मधील निगडी-कात्रज, चांदणी चौक-वाघोली, हिंजेवाडी-शिवाजीनगर, शिवाजीनगर-हडपसर, हिंजेवाडी-चाकण तसेच महामेट्रो कॅरिडोर 2 मधील वारजे-स्वारगेट, वाघोली-हिंजेवाडी, चांदणी चौक-हिंजेवाडी प्रस्तावित मार्गाबाबत आढावा घेण्यात आला. याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सविस्तर अहवाल सादर करणे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ चौकातील नवीन एकात्मिक दुमजली उड्डाणपुल बांधणी आराखडे अंतिम करणे. याअनुषंगाने उड्डाणपुल संरचना अतिंम करुन लवकरात लवकर पुणे महानगरपालिका आणि शासनास सादर करणे, सर्व कामे एकाचवेळी पुर्ण करणे, पुणे महानगरपालिकेने यासंबंधी स्वतंत्र जबाबदारी घेण्याबाबत निर्णय घेणे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. कंपनीस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीपर्यंत वाहतूक सेवा विस्तारित करण्यास व त्याअनुषंगिक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी संबंधित यंत्रणेस समन्वय साधण्याबाबत चर्चा झाली.
या बैठकीला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 265

0

पुणे विभागातील  5 लाख 15 हजार 784 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
 विभागात कोरोना बाधित 5 लाख 44  हजार 260 रुग्ण  -विभागीय आयुक्त सौरभ राव

 पुणे,दि.09 :- पुणे विभागातील  5  लाख 15  हजार 784 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5  लाख 44  हजार 260 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13  हजार  265 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 211  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण  94.77 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  3 लाख 48  हजार 862 रुग्णांपैकी  3  लाख  30  हजार 72  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण  10  हजार 357  आहे. कोरोनाबाधित एकूण 8  हजार 433  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.42  टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  94.61 टक्के आहे.
सातारा जिल्हा
  सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण  52  हजार 127 रुग्णांपैकी  49 हजार 921  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  462 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार  744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
 सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 972 रुग्णांपैकी  43 हजार 502  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1   हजार 835 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 635  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  सांगली जिल्हा
 सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 47  हजार  99 रुग्णांपैकी 45 हजार 13 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 377 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1  हजार 709 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 49 हजार 200 रुग्णांपैकी 47  हजार  276 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 234 आहे. कोरोनाबाधित एकूण  1 हजार 690  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 776 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 567 , सातारा जिल्ह्यात 64, सोलापूर जिल्ह्यात 93, सांगली जिल्ह्यात 38 तर कोल्हापूर जिल्ह्यात 14 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण  1 हजार 265 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 924, सातारा जिल्हयामध्ये 112, सोलापूर जिल्हयामध्ये  177, सांगली जिल्हयामध्ये  24 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 28 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 29 लाख 88 हजार  830 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी   5 लाख  44 हजार 260  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि.  8 डिसेबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेरणे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेने, संयमाने साजरा करुया

0

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन

पुणे दि.9:- हवेली तालुक्यातील पेरणे फाटा (कोरेगाव भिमा) येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम साजरा केला जातो. यावर्षी कोविड-19 चा प्रादुर्भाव विचारात घेऊन हा कार्यक्रम शांततेने आणि संयमाने साजरा करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मौजे पेरणे (कोरेगाव भिमा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख व सचिन बारावकर तसेच पोलीस व संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, आपल्या राज्यासह देश आणि जग कोरोना विरुद्ध लढत आहे. अशा परिस्थितीत योग्य पध्दतीने अभिवादन कार्यक्रम साजरा करणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हा कार्यक्रम शांततेने आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख म्हणाले, विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम साजरा करण्याबाबत येथील नागरिकांच्या भावना जाणून घेण्याच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात येत आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन यावर्षी सर्व सण-समारंभ साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. पेरणे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घेऊन कार्यक्रम साजरा करुया, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केले.

यावेळी पेरणे व वढू येथील सरपंच, विविध संस्था- संघटनांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून गर्दी होवू नये, यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

भारत लीडरशिप अवॉर्डस्:पहा कोणाकोणाचा आहे समावेश ..

0

पुणे-समाजाला दिलेल्या सकारात्मक योगदानांची दखल घेण्याचा एक प्रयत्न म्हणून, लेक्झिकॉन एमआयएलई ही लेक्झिकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सची, फ्लॅगशिप पदव्युत्तर शिक्षणसंस्था सरकार, कायदा, सामाजिक कार्य, कॉर्पोरेट, शिक्षण आणि मनोरंजन या क्षेत्रातील दिग्गजांचा त्यांनी कला, धोरण यांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल तसेच त्यांनी आपापल्या क्षेत्रात निर्माण केलेल्या प्रभावाबद्दल सन्मान करणार आहे. हा समारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत पुणे येथे १२ डिसेंबर, २०२० रोजी होणार आहे.

लेक्झिकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष पंकज शर्मा म्हणाले,  “आपल्या उद्योगक्षेत्रांवर प्रभाव निर्माण करण्यासाठी लक्ष केंद्रित करणाऱ्या, सकारात्मक बदलाला चालना देणाऱ्या आणि नवोन्मेषाचे स्फुल्लिंग चेतवणाऱ्या उद्योगक्षेत्रातील नेत्यांसोबत संवाद साधण्याच्या, समन्वय करण्याच्या आणि त्यांची दखल घेण्याच्या आमच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही भारत लीडरशिप अवॉर्डस् सुरू करण्याचा निर्णय केला. आमच्या विद्यार्थ्यांना दिग्गजांशी संवाद साधता यावा आणि त्यांच्या स्वत:च्या कारकिर्दीच्या मार्गात मापदंड तयार करता यावेत यासाठी आम्ही कायमच प्रयत्नशील असतो. विद्यार्थ्यांना स्वत:चा सर्वांगीण विकास साधण्यात मदत करता यावी म्हणून विविध दृष्टिकोनांचे दर्शन घडवणारे वातावरण तयार करण्यावर आमच्या अध्यापनशास्त्राने कायमच भर दिला आहे. या दिशेनेच एक पाऊल म्हणून हे पुरस्कार प्रदान करताना आम्हाला रोमांचित झाल्यासारखे वाटत आहे.“

लेक्झिकॉन ग्रुप्स ऑफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष नीरज शर्मा म्हणाले,“लेक्झिकॉन एमआयएलई ही परिवर्तन करणारी व उद्योगक्षेत्राच्या चाकोऱ्या मोडणारी नवीन पिढी घडवण्याचे उद्दिष्ट समोर असलेली उदयोन्मुख पदव्युत्तर व्यवस्थापन शिक्षणसंस्था आहे. कोविडच्या साथीने आपल्या उद्योगांना तर उद्ध्वस्त केलेच, शिवाय व्यक्तीच्या वैयक्तिक उद्दिष्टांबद्दलच्या तसेच करिअरच्या निवडीबद्दलच्या मानसिकतेवरही आघात केला आहे. एक संस्था म्हणून आम्हाला एक नवीन विचारप्रक्रिया आत्मसात करणे तसेच शिक्षण व अनुभव देण्यासाठी स्वतंत्र असा दृष्टिकोन तयार करणे गरजेचे आहे. आमच्या डेटावर आधारित दृष्टिकोनासह, समस्या-निवारण आणि शून्यातून उद्योजक निर्माण करणारी विशेष कौशल्ये व क्षमता विद्यार्थ्यांना देण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे.”

विख्यात दिग्गजांसह या समारंभात, पिंकसारख्या चित्रपटांतून प्रभावी अभिनय करणारी बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक व प्रख्यात नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझा, यांचाही भारत लीडरशिप अवॉर्डने गौरव केला जाणार आहे.

या समारंभामध्ये “दि इंडिया ग्रोथ स्टोरी पोस्ट पॅण्डेमिक” या विषयावर चर्चासत्रही घेतले जाणार आहे. सरकारी तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रख्यात व्यक्ती या चर्चेत भाग घेतील. संस्थेने हा समारंभ मर्यादित लोकांपुरता ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सर्व संबंधितांना चर्चासत्रात सहभागी होता यावे या उद्देशाने कार्यक्रमाची लिंक उपलब्ध करून दिली जाईल. लेक्झिकॉन एमआयएलईला दृष्टिकोनांच्या आदानप्रदानासाठी व्यासपीठे उभी करायची आहेत तसेच भारताच्या वाढीच्या पुढील टप्प्याला चालना देणारे उपाय शोधून काढायचे आहेत.

पुरस्कारप्राप्त व्यक्तींची नावे

पुरस्कारप्राप्त व्यक्ती

लाइफटाइम अचीव्हमेंट भारत लीडरशिप अवॉर्ड्स

१.     श्री. एस. डी. शर्मा

अध्यक्ष- लेक्झिकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स

२.     डॉ. परवेझ ग्राण्ट

प्रमुख कार्डिओलॉजिस्ट आणि अध्यक्ष, कार्डिओव्हस्क्युलर सर्व्हिसेस तसेच पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त

भारत लीडरशिप अवॉर्डस्

३.     श्री. सौरभ राव (आयएएस)

विभागीय आयुक्त, पुणे

४.    डॉ. दीपक म्हैसेकर (आयएएस)

माजी विभागीय आयुक्त

मुख्यमंत्र्यांचे सल्लागार

५.    श्री. श्रावण हर्डीकर (आयएएस)

पालिका आयुक्त, पीसीएमसी

६.    श्री. विशाल सोळंकी (आयएएस)

शिक्षण आयुक्त (महाराष्ट्र राज्य)

७.    श्री. कृष्ण प्रकाश (आयपीएस)

पोलिस आयुक्त पीसीएमसी

८.    श्री. रंजनकुमार शर्मा (आयपीएस)

डीआयजी, सीआयडी क्राइम पुणे

९.    श्री. रामनाथन सुब्रमणियम

संचालक, महाराष्ट्र मेट्रो रेल प्रायव्हेट लिमिटेड

१०.  श्री. वेदप्रकाश शर्मा

समुदाय विकास आणि समाजसेवा, पुणे

११.  श्रीमती कविता द्विवेदी (आयएएस)

पीएमआरडीए

१२.  श्रीमती तापसी पन्नू

भारतीय अभिनेत्री

१३.  श्री. चंद्रकांत वामनराव काळे

अध्यक्ष, वाई अर्बन कोऑपरेटिव बँक लिमिटेड, वाई

१४.  श्री. नेविल श्रॉफ

मॅनेजिंग पार्टनर, माझदा केमिकल्स

१५. श्री. शशांक भूषण

इंडिया साइट हेड आणि व्हीपी- एचआर, बीएमसी सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी भारत लीडरशिप अवॉर्डस्

१६. श्री. कार्तिक आनंद

संस्थापक आणि अध्यक्ष, एक्सडीबीएस कॉर्पोरेशन

१७. श्री. कुंदन देशमुख

व्यवस्थापकीय संचालक, परभणी अ‍ॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड

१८.  श्री. संदीप खंडेलवाल

व्यवस्थापकीय संचालक, संदीप स्टील्स

१९.  श्री. विवेक बिडगर

सोशल आँत्रप्रेन्युर

२०. श्री. रोहन सिंग

संस्थापक- ट्रस्टफोर्ट इव्हेंट अँड ट्रस्टमाइस

२१.  श्री. विजय अडवाणी

संस्थापक- अडवाणी अॅडव्हर्टायजिंग

२२. स्वस्तिक सिर्सीकर

विश्वस्त- पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नोलॉजी, पीआयसीटी मॉडेल स्कूल, उपाध्यक्ष- लक्ष्य स्पोर्टस्, कॅप्टन- पूना क्लब गोल्फ कोर्स

२३. प्रमोद माणिकचंद दुग्गड

सामाजिक प्रभाव

२४. गौरव दुग्गड

उदयोन्मुख आंत्रप्रेन्युर

२५. प्रवीण सिंग

२६. रेमो डिसोझा

दिग्दर्शक/नृत्यदिग्दर्शक

नळस्टॉप चौकात दुहेरी उड्डाण पुलाचे काम सुरु – जून अखेर संपूर्ण काम पूर्ण होईल मेट्रोच्या अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

0

पुणे-नळस्टॉप चौकात दुहेरी उड्डाण पुलाचे काम सुरु झाले असून मेट्रोचे काम ही पूर्णत्वास जात आहे.हे काम जून अखेरीस पूर्ण होईल असा विश्वास मेट्रो ने दिल्याची माहिती येथे भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी दिली .

भाजप चे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या निर्देशानुसार कोथरूड मधील विविध नागरी समस्यांवर समाधान शोधण्यासाठी समन्वयक म्हणून संदीप खर्डेकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.त्यानुसार नळस्टॉप चौकातील समस्यांवर समाधान शोधण्यासाठी आणि येथील पुढील कामांचे नियोजन करण्यासाठी संदीप खर्डेकर आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने आज मेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे,प्रकल्प अधिकारी मुलमुले,मनपा पथ विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष तांदळे,मलनिस्सारण चे मुख्य अभियंता जगदीश खानोरे,पथ चे कार्यकारी अभियंता अभिजीत डोंबे,उपअभियंता संदीप रणवरे, कनिष्ठ अभियंता राजेश धुमाळ,कविता पाटील यांच्यासह विविध खात्यातील अधिकाऱ्यांसह पाहणी करण्यात आली.
खर्डेकर म्हणाले ,’यावेळी खालील विषयांवर एकमत झाले असून मेट्रोचे काम जून अखेरपर्यंत वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले.तसेच खालील विषयात निर्णय घेण्यात आले ….
१) मेट्रोच्या वतीने एस एन डी टी ते नळस्टॉप या पट्ट्यात ४ मीटर चा रस्ता,किमान २ मीटर कमाल ३ मीटरचा पदपथ करण्यात येणार आहे.
२) नळस्टॉप चौकात पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत असून अनेक सोसायटीच्या आवारात यावर्षी पाणी घुसले.यावर मात करण्यासाठी कर्वे रस्त्यावर दोन्ही बाजूस ९०० मि.मी व्यासाची पावसाळी लाईन टाकण्यास मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली.
३) तर याच भागात ६०० मि.मी व्यासाची ड्रेनेज लाईन मनपा तर्फे टाकण्यासाठी मान्यता देण्यात आली.
वरील कामे फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येतील

४) मेट्रोचे काम पूर्णत्वास गेल्यावर संपूर्ण कर्वे रस्त्याचे डांबरीकरण पुणे मनपा तर्फे करण्यात येइल.
५) तसेच काम वेगाने करत जून अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे ही नियोजन करण्यात आले.
सदरचे काम करत असताना एल ॲंड टी,विविध केबल कंपन्या,महावितरण,एम एन जी एल यांच्याशी संपर्क साधून सर्व कामे एकाच वेळी पूर्ण करावे असे संदीप खर्डेकर यांनी सुचवले.तर नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी दर १५ दिवसांनी संयुक्त बैठक घेऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घ्यावा असे सुचवले.
मात्र ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडणे सोपे व्हावे यासाठी ठराविक अंतरावर डिव्हायडर च्या मधे क्रॉसिंग ठेवावे या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या सूचनेवर हे शक्य नसल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले व पौड फाटा ते खंडूजीबाबा चौक ह्या २:२ किमी च्या रस्त्यावर ५ सिग्नल चौकातून रस्ता ओलांडावा लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकारमुळे मराठा युवकांसमोर अंधार, सरकारचा तीव्र निषेध-भाजपा प्रदेशाध्यक्ष आ . चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे-मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर बुधवारी सुनावणी होत असताना शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुरेशी तयारी करून प्रभावी मांडणी केली नसल्याने न्यायालयाने स्थगिती उठविण्यास नकार दिला आणि मराठा समाजातील युवक – युवतींसमोर प्रचंड अंधार निर्माण झाला, याचा आपण तीव्र निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन भाजपा सरकारप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना मदत करण्याची मागणी त्यांनी केली.

आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज तरी पुरेशा तयारीने बाजू मांडेल आणि मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवली जाईल, अशी अपेक्षा होती. पण महाविकास आघाडी सरकार पुन्हा अपयशी ठरले. सुनावणीची तयारी करण्यासाठी मंत्री आणि ॲडव्होकेट जनरल दिल्लीला गेले नाहीत. वकिलांसोबत पुरेसा समन्वय केला नाही. तसेच त्यांना आकडेवारी दिली गेली नाही. सरकारच्या वतीने न्यायालयासमोर आज नवे मुद्दे मांडणे आवश्यक असताना पुन्हा तेच तेच मुद्दे मांडल्याने नाचक्की झाली.

मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारला दिशा नाही आणि त्यांच्या वकिलांनाही दिशा नाही हे दिसून आले. मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती देण्यापूर्वी शैक्षणिक प्रवेश व नोकरीच्या बाबतीत जिथे प्रक्रिया पूर्ण झाली होती त्यांच्या बाबतीत तरी आरक्षणाचा लाभ देण्याची परवानगी न्यायालयाकडून मिळवायला हवी होती, असे मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे आणि राज्य सरकारने मराठा युवकांना खुल्या प्रवर्गात अर्ज करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सध्या मराठा समाजाला आरक्षण नाही, अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने ज्या प्रकारे मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती दिल्या त्या सवलती महाविकास आघाडी सरकारनेही मराठा समाजाला आता दिल्या पाहिजेत.

फडणवीस सरकारने मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 642 शैक्षणिक अभ्यासक्रमात निम्मी फी माफ केली होती. त्यामध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे अभ्यासक्रमही होते. आता महाविकास आघाडी सरकारने ती योजना पुन्हा सुरू केली पाहिजे. आघाडी सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळ बरखास्त केले असून त्याची लवकरात लवकर फेररचना करून मराठा युवकांना व्यवसायासाठी दहा लाखापर्यंत बिनव्याजी कर्जाची योजना आर्थिक तरतूद करून प्रभावीपणे राबवली पाहिजे. भाजपा सरकारने परगावी राहणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांसाठी पंजाबराव देशमुख यांच्या नावाने थेट आर्थिक मदतीची योजना सुरू केली होती, ती पुन्हा चालू करावी. भाजपा सरकारने मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे चालू केली होती ती पुन्हा सक्षमपणे चालवावीत. तसेच सारथी संस्था पुन्हा सक्षम करून मराठा विद्यार्थ्यांना मदत करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या.

मराठा आरक्षणासाठी भाजपा सरकारने केलेला कायदा हा घटनेच्या 102 व्या दुरुस्तीपूर्वीचा असल्याने त्या घटनादुरुस्तीची तरतूद मराठा आरक्षण कायद्याला लागू होत नाही. हा मुद्दा उच्च न्यायालयाने मान्य केला होता, अशी माहिती त्यांनी दिली.

‘हे’ तैलचित्र नव्या पिढीला प्रेरणादायी : जयंत पाटील(व्हिडीओ)

0

शरद पवार यांच्या भव्य पेंटिंगचे लोकार्पण – माजी उपमहापौर दीपक मानकर यांची संकल्पना

पुणे (प्रतिनिधी) :’शरद पवार यांच्या सातारा येथील ऐतिहासिक सभेत भर पावसात सभेला मार्गदर्शन करताना भिंतीवर उभारलेली भव्य दिव्य पेंटिंग ही शहरातील नव्या पिढीला आणि सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केला . रमणबाग चौक येथे शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या संकल्पनेतून आणि नीलेश खराडे यांच्या कुंचल्यातून साकारण्यात आलेल्या ६० बाय ३० फूट भव्य दिव्य पेंटिंगचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांनतर ते माध्यमांशी बोलत होते.

याप्रसंगी आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आ.चेतन तुपे, पुणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, शहर शिवसेना प्रमुख संजय मोरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, दत्ता सागरे, हर्षवर्धन मानकर, करण मानकर, संजय पालवे, निलेश शिंदे, अप्पा जाधव तसेच महाविकास आघाडीचे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी भिंतीवर पेंटिंग काढणारे आर्टिस्ट निलेश खराडे, योगेश भुवड, पंकज विसापूरे, विनायक आडगळे, शंतनु जोशी, नितीन परदेशी यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, ‘ पवार साहेबांचा येत्या १२ डिसेंबर रोजी ८० वा वाढदिवस होणार आहे, त्यानिमित्ताने दीपक मानकर यांच्या संकल्पनेतून आणि निलेश खराडे या आर्टिस्टनी भिंतीवर पवार साहेबांची हुबेहुब आणि उत्तम दर्जाची अशी पेंटिंग साकारली आहे. त्यांचे अभिनंदन आणि दीपक मानकर व त्याच्या मित्र परिवाराचे आभार मानतो. पवारसाहेब हे महाराष्ट्रातील नाही, तर देशातील नव्या पिढीचे प्रेरणादायी आहेत.’ दीपक मानकर म्हणाले की,’ आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब हे माझे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही तरी वेगळे करावे, असे मनात होते. तेव्हा विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठरलेल्या सभेचे पेंटिंग काढण्याचे ठरवले आणि तसे ते काढून पुणेकरांच्या वतीन साहेबांना भेट दिली.

कोथरूडमध्ये आलेला रानगवा अखेर मृत्यूमुखी ….(व्हिडीओ)

0

पुणे – शहरातील कोथरूड उपनगरातील महात्मा सोसायटीत रानगवा आला असल्याचे तेथील रहिवाशांनी कळवले होते. अत्यंत दाट लोकवस्तीत रानटी प्राणी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. रान गवा  आल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला .  वनविभाग आणि अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. वनविभागाने तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर रानगव्याला पकडले, मात्र काही वेळातच या प्राण्यानं आपला जीव सोडला.

बुधवार आज पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रानगवा दिसताच एकच धांदल उडाली. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला. गव्याचे वय सुमारे चार वर्षे असावे, असे सांगण्यात आले. गवा चुकल्यामुळे बिथरला होता. तो शेजारीच असणाऱ्या एनडीएच्या जंगलातून आल्याचा अंदाज वर्तवत पोलीस, वन विभाग कर्मचारी आणि अग्निशामक दल दाखल झाले. मदत कार्य रेस्क्यू ऑपरेशनानंतर रानगव्याला ताब्यातही घेतले. मात्र, काही वेळातच रानगव्याचा मृत्यू झाला. पुण्यातील या रानगव्याचे वृत्त सोशल मीडियात झळकताच, सोशल मीडियातून त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले.  काहींनी तुम्ही त्यांच्या जंगलात शिरलात, ते तुमच्या घरात शिरले, असे म्हणत त्यांची व्यथाही मांडली.

मनुष्यवस्तीत आल्यानंतर गवा बिथरल्याने तेथील बंगल्यांच्या भिंतींना धडका देत होता. त्यामुळे नाक, तोंडाजवळ जखम होऊन रक्त येत होते. रानगवा बिथरल्याने प्रथम त्याला शांत करण्यासाठी उपाययोजना करीत आहोत. तो बहूदा डूक्कर खिंडीतून रात्री आला असावा, मात्र नागरिकांनी म्हैस असावी या शक्यतेने दुर्लक्ष केले असावे, अशी माहिती वन विभागाचे अधिकारी दीपक पवार यांनी माध्यमांना  दिली होती. दरम्यान, बिथरलेल्या रानगव्याला बेशुध्द करण्यासाठी वनविभागाकडे आवश्यक तेवढ्या प्रमाणात डोस उपलब्ध नसल्याने मदत कार्य काही काळ रेंगाळले होते.

एका झाडाखाली शांत उभा असलेला गवा तेथून बाहेर पडून नागरी वस्तीकडे पळाला. महात्मा सोसायटीच्या गेटवरून नागरी वस्तीकडे पळण्यात यशस्वी झालेला रानगवा भुसारी कॉलनी, गादिया इस्टेट, भारतीनगरमार्गे मुख्य पौडरसत्यावर आला आणि तेथून जूना कचराडेपोजवळील जंगलाकडे पळाला. त्याच्यामागे रेस्क्यू टीमबरोबरच अतिउत्साही नागरिक आरडा ओरड करीत पळत असल्याने गवा आणखीनच बिथरला होता. नागरिकांच्या प्रचंड गोंधळातच वन कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत तीनवेळा भूलदेण्यासाठी फेकून मारायचे इंजेक्शन  (डार्ट )मारले. त्यापैकी एक प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर गव्याला जाळी टाकून पकडण्यातही आले. दरम्यान, सुदैवाने ६-७ किलोमीटर पळूनही गव्याने कोणालाही जखमी केलेले नाही. मात्र, स्वत:चा जीव गमावला.

तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर रानगवा कोथरूडमधील पौड रस्त्यावरील भारतीनगर सोसायटी ऋतुगंध बंगला परिसरात जाळ्यात अडकला  वन विभाग, अग्निशमन दलासह पोलीस प्रशासनाच्या चार तास शर्थीच्या प्रयत्नातून रेस्क्यू ऑपरेशन राबवत बेशुद्ध करून ताब्यात घेत असताना रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोथरुडच्या इंदिरा नगर परिसरात रानगवा बेशुद्ध पडल्यानंतर त्याचे चारही पाय बांधून ताब्यात घेऊन ट्रकमध्ये नेत असताना गव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.