Home Blog Page 2373

जीमेल आणि यूट्यूबसह गूगलच्या सर्व सेवा 40 मिनीटानंतर पुर्ववत

0

जगभरात गूगलच्या अनेक सर्व्हिसेस सोमवारी संध्याकाळी 40 मिनीटांपर्यंत बंद पडल्या होत्या. लॉगइन आणि अॅक्सेसमध्ये अडचणी येत होत्या. भारतीय वेळेनुसार, सोमवारी संध्याकाळी 5.26 वाजेपासून 6.06 पर्यंत सर्व सर्व्हिस क्रॅश होत्या. गूगलकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण आले नाही.

या सर्व्हिस बंद होत्या

जीमेल, यूट्यूब, कॅलेंडर, ड्राइव, डॉक्स, शीट्स, स्लाइड्स, साइट्स, ग्रुप्स, हँगआउट्स, चॅट, मीट, वॉल्ट, करन्ट्स, फॉर्म्स, क्लाउड सर्च, कीप, टास्क, वॉइस.

या सर्व्हिस सुरू होत्या

गूगल सर्च इंजिन आणि मॅप.

जीमेलचे 180 कोटी यूजर

जगभरात जीमेलचे अंदाजे 180 कोटींपेक्षा जास्त यूजर्स आहेत. 2020 मध्ये दररोज 306.4 बिलियन ईमेल सेंड आणि रिसीव्ड झाले आहेत. तसेच,यूट्यूबचे 200 कोटींपेक्षा जास्त यूजर्स आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत सादर केले शक्ती विधेयक, बलात्कारातील दोषींना 21 दिवसांच्या आत फाशीची तरतूद

0

मुंबई-

विधानसभेचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात राज्य सरकार महिला आणि बालकांवर होणाऱ्या अपराधांवर अंकुश लावण्यासाठी ‘शक्ती विधेयक’ घेऊन आले आहेत. या विधेयकांवर सभागृहात चर्चा सुरू आहे. या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर विधिमंडळात यावर मंजुरी मिळण्याचे जवळ-जवळ निश्चित आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा आणि विधान परिषदेत हे विधेयक सादर केले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे विधेयक आणण्याचे आश्वासन दिले होते. याला आंध्र प्रदेशातील ‘दिशा अॅक्ट’च्या धर्तीवर महाराष्ट्रात आणले जात आहे. या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढवले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) ॲक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट ॲड मिशनरी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 अशी दोन विधेयके विधिमंडळात पटलावर ठेवण्यात आली आहेत.

21 दिवसांच्या आत दोषींना फाशी

या विधेयकानुसार, बलात्कारातील दोषींना मृत्युदंड, आजीवन कारावास आणि मोठ्या दंडासह कडक शिक्षा आणि लवकर सुनावणीची तरतुद करण्यात आली आहे. राज्यात प्रस्तावित कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, विधेयकाच्या मसुद्यात भादंवि, सीआरपीसी आणि मुलांचे संरक्षण बाल लैंगिक अपराध (पॉक्सो) कायद्यातील संबंधित कलमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच, दोषी आढळल्यास 21 दिवसांच्या आत फाशी देण्याचीही तरतुद विधेयकात करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक : जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्यक

0

मुंबई, दि. 14 : राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

श्री.मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 11 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 30 डिसेंबर 2020 पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. राखीव जागांवर निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशपत्र दाखल करताना जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करण्याबरोबरच एक हमीपत्रही देणे आवश्यक राहील. विजयी झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले जाईल, असे या हमीपत्रात नमूद करावे लागेल.

‘कुस्तीवर महाराष्ट्राचे नाव कोरणारे हिंदकेसरी वस्ताद’

0

मुंबई, दि. 14 :- कुस्ती ही लढवय्या महाराष्ट्राची शान आहे. मातीतल्या या खेळावर महाराष्ट्राचे नाव कोरले ते पहिला हिंदकेसरी किताब पटकावून श्रीपती खंचनाळे यांनी. त्यांच्या निधनामुळे अनेक हिंदकेसरींचे आणि होतकरू कुस्तीगीर पैलवानांचे वस्ताद  म्हणजे मार्गदर्शक छत्र हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदकेसरी ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांना वाहिली आहे.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे शोकसंदेशात म्हणतात, कुस्ती ही महाराष्ट्राची शान आणि मान आहे. महाराष्ट्राने कुस्तीला लोकाश्रय आणि राजाश्रय दिला. या कुस्तीवर महाराष्ट्राचे नाव कोरण्याची किमया ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांनी केली. देशातला पहिला हिंदकेसरी किताब पटकावून त्यांनी महाराष्ट्राचा आणि कुस्तीचा गौरव उंचावणारी कामगिरी केली. ते आयुष्यभर कुस्तीत येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहिले. अनेक हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी यांच्यासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीत नाव कमावलेल्या पैलवानांचे ते वस्ताद ठरले. काळानुसार या खेळातील बदलांकडेही त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले. त्यांना क्रीडाक्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील आणि विशेषतः कुस्तीच्या क्षेत्रातील मार्गदर्शक छत्र हरपले आहे. ज्येष्ठ कुस्तीपटू हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

मुंबई, दि. 14 : केंद्र शासनाने ठरविलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये राज्याचा क्रमांक वर यावा यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न करावेत. पर्यावरणासंदर्भात आजचा विद्यार्थी जागरूक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांमार्फत या उद्दिष्टांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत केल्या.

केंद्र शासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये केंद्र शासनाने केलेला कृती कार्यक्रम व राज्य शासनाचा कृती कार्यक्रमासंदर्भात श्रीमती गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय.एस. कुंदन उपस्थित होते. तर नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर हे यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीस उपस्थित होते.

श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या की, निती आयोगाने शाश्वत विकासाच्या 17 उद्दिष्टानुसार राज्यांचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार राज्यांनीही कृती आराखडे तयार करणे अपेक्षित आहे. शाश्वत विकासासाठी उद्दिष्टे ही व्यापक स्वरुपात आहेत. यानुसार, समाजाच्या तळागाळातील  वर्गाला सोबत घेऊन काम करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे असंघटित महिलांसाठी कृती दशक जाहीर झाले आहे. या सर्वांचा विचार करून शाश्वत विकासामध्ये आपले स्थान कुठे आहे आणि ते आणखी वर आणण्यासाठी काय करायला हवे,याबद्दल सर्वांनीच प्रयत्न करावेत. त्यासाठी लोकप्रतिनिधी व समाजाचे सहकार्य घ्यावे.

शाश्वत विकासासाठी कृतीबरोबर आकलनावर भर द्यावा – आदित्य ठाकरे

श्री.ठाकरे म्हणाले की, शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठताना कृतीबरोबरच त्या उद्दिष्टांच्या आकलानावर भर देणे आवश्यक आहे. राज्य शासन अनेक निर्णय घेत असते. हे निर्णय कोणत्या ना कोणत्या उद्दिष्टांशी निगडीत असतात. मात्र, त्याची वर्गवारी केली जात नसल्यामुळे त्याचा बोध होत नाही. ‌त्यामुळे यापुढील काळात प्रत्येक मंत्रीमंडळ निर्णयामध्ये संबंधित निर्णय कोणत्या उद्दिष्टांशी निगडित आहे, याचा उल्लेख करावा. तसेच सर्व निर्णयांचे उद्दिष्टानुसार एकत्र पुस्तक तयार करावे व युनिसेफ व शालेय शिक्षण विभागाच्या सहकार्याने त्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा.

शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांच्या माहितीबाबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनाही याबाबत जागरूक करावे. जेणेकरून सर्वांना त्याचे महत्त्व कळेल. त्याचबरोबर अशा विषयांवर चर्चाही व्हावी. तसेच उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी चांगले काम करणाऱ्या विभागाचा गौरव करावा, अशी सूचनाही श्री. ठाकरे यांनी यांनी केल्या.

महत्त्वाच्या योजनांचा आराखडा तयार करावा – मुख्य सचिव

मुख्य सचिव संजय कुमार म्हणाले की, कृती दशकाच्या अंमलबजावणीसाठी नियोजन करण्यात येत आहे. उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रत्येक विभागाला जागरूक करण्यात येत आहे. त्यासाठी नवीन योजनांचा संबंध शाश्वत विकास उद्दिष्टांशी कशा प्रकारे आहे, त्याचे मोजमाप काय आहेत, यासंदर्भात अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे. तसेच दरवर्षी प्रत्येक विभागाच्या शाश्वत उद्दिष्टांशी संबंधित अशा पाच महत्त्वाच्या योजना व एक नाविन्यपूर्ण योजनांवर जास्त लक्ष द्यावे. यासंबंधी कृती आराखडा तयार करून त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करता येईल.

अपर मुख्य सचिव श्री.देवाशिष चक्रवर्ती यांनी समन्वय विभाग म्हणून शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यातील सर्वात मागासलेल्या 27 भागांसाठी सूक्ष्म विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच राज्यस्तरावरून राबविण्यात येत असलेल्या 1335 योजना व जिल्हा वार्षिक योजनेद्वारे राबविण्यात येणाऱ्या 536 योजनांचे 17 उद्दिष्टामध्ये वर्गीकरण करण्याचे काम सुरू आहे. ही माहिती लवकरच नियोजन विभागाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतील एक टक्का रक्कम ही सूक्ष्म प्रकल्पांसाठी वापरण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शाश्वत उद्दिष्टांनुसार राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय निर्देशकाचे फ्रेमवर्क तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच त्याचे डॅशबोर्ड तयार होईल.

यावेळी श्री. गगराणी म्हणाले की, वाढते शहरीकरण व त्यानुसार शाश्वत विकासाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी लागणारे नियोजन यासाठी नगर विकास विभागाच्या वतीने उपाययोजना सुरू आहेत. त्यानुसार, जमिनीचा सुयोग्य वापर, हरित जागा उपलब्ध करून देणे, हक्काची घरे मिळण्यासाठी उपाययोजना व सार्वजनिक वाहतुकीवर भर यानुसार कामे सुरू आहेत.

श्रीमती म्हैसकर यांनी पर्यावरण व वातावरणीय बदलानुसार करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. माझी वसुंधरा या योजनेद्वारे शाश्वत विकासाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.वेणुगोपाल रेड्डी यांनी उद्योग विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या योजनांची तसेच महिला व बाल विकास सचिव श्रीमती कुंदन यांनी महिला व बालविकास विभागामार्फत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

श्री.डवले यांनी शाश्वत विकास उद्दिष्टातील उपासमारीच्या समूळ उच्चाटनासाठी कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानाचे पाणी बिल थकीत नाही – मुंबई महापालिकेचा अहवाल

0

मुंबई, दि. 14 :- मुख्यमंत्र्यांचे  शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या अहवालानुसार वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची थकबाकी ‘निरंक’ आहे.

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून मलबार हिल स्थित ‘वर्षा’ आणि त्याच्याशी संलग्न ‘तोरणा’या बंगल्यांचा समावेश आहे. या बंगल्यांचे पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलकामे विभागाच्या कार्यालयाने याबाबत थकबाकी अहवाल दिला आहे. त्यामध्ये या दोन्ही बंगल्यांची थकबाकी निरंक असल्याची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 366

0

पुणे विभागातील 5 लाख 21 हजार 729 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 49 हजार 440 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.14 :- पुणे विभागातील 5 लाख 21 हजार 729 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 49 हजार 440 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 366 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 345 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.96 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 52 हजार 232 रुग्णांपैकी 3 लाख 34 हजार 428 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 277 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 527 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.95 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 89 रुग्णांपैकी 50 हजार 174 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 171 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 584 रुग्णांपैकी 44 हजार 513 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 411 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 660 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 249 रुग्णांपैकी 45 हजार 175 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 352 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 722 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 286 रुग्णांपैकी 47 हजार 439 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 155 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 692 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 850 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 648 , सातारा जिल्ह्यात 55, सोलापूर जिल्ह्यात 111, सांगली जिल्ह्यात 17 तर कोल्हापूर जिल्ह्यात 19 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 874 आहे. पुणे जिल्हयामध्ये 669, सातारा जिल्हयामध्ये 0, सोलापूर जिल्हयामध्ये 121, सांगली जिल्हयामध्ये 50 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 34 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 30 लाख 73 हजार 43 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 49 हजार 440 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 13 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

पवारांच्या वाढदिवसानिमित्त रक्दान शिबीर आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार

0

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त पर्वती विधानसभा मतदारसंघा तर्फे रक्तदान शिबिर व कोरोना काळात काम करणारया विविध सामाजिक लोकांचा, कार्यकर्त्यांचा सत्कार तसेच ” ८ दशके कृतज्ञेची” या पवार साहेबांच्या व्हर्चुअल रॅली चे लाईव प्रसारण करण्यात आले.
त्याचबरोबर पर्वती मतदारसंघ भागातील डाॅक्टर्स, महानगरपालिकेचे कर्मचारी – सामाजिक कार्यकर्ते यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करून त्यांचे कौतुक नगरसेविका अश्‍विनी कदम व प्रिया गदादे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले होते, शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदच्या सेक्रेटरी सौ.प्रमिलाताई गायकवाड, .महेश शिंदे (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रा.काँ पार्टी), काँग्रेस पक्षाचे नेते,प्रदेश सरचिटणीस अभयजीे छाजेड,अजय पाटील ,राजेंद्र रजपूत,नितिन कुदळे ,ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे MD विनोद जाधव, संचालक सौ.हर्षदा विनोद जाधव, बँक संचालक सुभाष मोहिते, प्राचार्य श्री अरुण गायकवाड ,टी. म. वी कॉलनी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मोहन संकपाळ, महर्षीनगर जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष की.म.पवार, आप्पा ठाकर, रामजी बांगड (रक्ताचे नाते संस्था)माजी नगरसेवक शिवसेना नेते श्रीकांत पुजारी, अर्जुन जानगवळी,नेमिचंद सोळंकी,एकनाथ ढोले, राजेंद्र , शिळीमकर,द.स.पोळेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पर्वती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.कार्यक्रमाला व रक्तदान शिबिरास मतदारसंघातील नागरिकांना उत्तम प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.

दिवंगत सदस्यांच्या कुटुंबियांकडे ‘स्मृतिपत्र’ प्रत्यक्ष देऊन सांत्वन करण्याची नवी परंपरा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

0

मुंबई, दि.14 : विधानसभा सदस्यांच्या निधनाबद्दल कुटुंबियांचे सांत्वन करताना पूर्वी विधानसभेत मंजूर झालेला शोकप्रस्ताव त्यांच्या घरी पाठवण्यात येत असे. यापुढे त्या शोकप्रस्तावासोबत त्यांच्या कार्याचा उल्लेख असणारे ‘स्मृतिपत्र’ संबंधित आमदार तसेच संबंधित प्रांत, तहसीलदार यांच्यामार्फत प्रत्यक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करुन सांत्वन केले जाईल. ही नवीन परंपरा यापुढे सुरू करण्यात यावी, असे निर्देश विधानसभेत मांडण्यात आलेला शोकप्रस्ताव मंजूर करताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या आजी माजी सदस्यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव सभागृहात मांडला. यात त्यांनी दिवंगत आमदार भारत भालके, माजी मंत्री विष्णू सवरा, माजी मंत्री प्रा. जावेद इक्बाल खान, माजी राज्यमंत्री विनायकराव पुंडलिकराव पाटील, माजी सदस्य तारासिंह नंदराजोग सरदार, अनंतराव आप्पाराव देवसरकर, नरसिंगराव घारफळकर, नारायण किसन पाटील, किसनराव माणिकराव खोपडे, सुरेश नामदेव गोरे आणि डॉ. जगन्नाथ सितारामजी ढोणे यांच्या सामाजिक, राजकीय कार्याला उजाळा दिला.

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी, आमदार सर्वश्री सुनिल भुसारा, अबु आझमी, कुणाल पाटील, यशवंत माने, जयकुमार रावल, संग्राम जगताप, संग्राम थोपटे, दिलीप माने, ॲड. आशिष शेलार, संजय केळकर, श्रीमती मनीषा चौधरी, किशोर जोरगेवार, मिहीर कोटेचा यांनी शोक प्रस्तावावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

दिवंगत भालके यांच्या सामाजिक तसेच सहकार चळवळीतील आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याचा गौरव यावेळी सर्व सदस्यांनी केला. दिवंगत सवरा यांच्या शांत, संयमी स्वभावाचा उल्लेख करत आदिवासी समाजाच्या विकासासाठी, शिक्षणासाठी तसेच कुपोषणमुक्तीसाठी त्यांनी केलेल्या कार्याला यावेळी उजाळा देण्यात आला. प्रा. जावेद इक्बाल खान यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा विशेष गौरव शोकप्रस्तावावर बोलताना सदस्यांनी केला. दिवंगत विनायकराव पाटील यांच्या कृषी, वन, सहकार क्षेत्रातील कार्याविषयी तसेच प्रयोगशील व्यक्तिमत्त्वाबाबतच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.

दिवंगत तारासिंह सरदार यांच्या मितभाषी स्वभावाबद्दल तसेच त्यांनी साईभक्तांसाठी केलेले कार्य, तसेच समाजसेवी कामाचा उल्लेख यावेळी करण्यात आला. अनंतराव देवसरकर यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीचा उल्लेख करत सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नारायण किसन पाटील यांनी जामनेर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. दिवंगत नरसिंगराव घारफळकर यांनी शेतकरी आणि शेतमजुरांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले योगदान तसेच दिवंगत माणिकराव खोपडे यांच्या क्रीडा आणि शैक्षणिक, सांस्कृतिक कार्याबद्दल, सुरेश गोरे यांच्या शांत, संयमी व्यक्तिमत्त्वाबद्दल तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. वैद्यकीय क्षेत्रात उच्चविद्याभूषित असताना समाजविकासाच्या तळमळीतून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय झालेल्या डॉ. जगन्नाथ ढोणे यांच्या कार्यालाही यावेळी सदस्यांनी आपल्या भाषणातून उजाळा दिला.

‘सीसीआय’मध्ये विविध ९५ पदांसाठी भरती

0

पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)

एकूण जागा – ५

वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे

शैक्षणिक पात्रता – एमबीए (‌ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट) किंवा कृषी संबंधित विषयात एमबीए

पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट)

एकूण जागा – ६

वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे

शैक्षणिक पात्रता – सीए / सीएमए / एमबीए (फायनान्स) / एमएमएस एमकॉम किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी

पदाचे नाव – ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह

एकूण जागा – ५०

वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून बी.एससी ॲग्री पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण

पदाचे नाव -ज्युनिअर असिस्टंट (जनरल)

एकूण जागा – २०

वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून बी.एससी ॲग्री पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण

पदाचे नाव – ज्युनिअर असिस्टंट (अकाउंट)

एकूण जागा – १४

वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण

अर्ज भरण्याची शेवटची तारीख –  दि. ७ जाने. २०२१

अधिक माहितीसाठी – https://www.cotcorp.org.in

नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पाठबळ – आबा बागुल (व्हिडीओ)

0

पुणे – शहरातील नागरिकांना  छोट्या-छोट्या कामांसाठी वणवण करावी लागत आहे. नागरिकांची ही कामे मार्गी लावण्यासाठी त्या-त्या भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांना पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत करू,तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी दिली . 

पुणे शहरात येत्या जानेवारी महिन्यापासून ‘प्रशासन आपल्या दारी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत काँग्रेस पक्षाचे आजी-माजी नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग असणार आहे. नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी या मोहिमेत भर दिला जाणार असल्याचे आबा बागुलांनी सांगितले. 

पुणे महानगरपालिकेच्या माहे डिसेंबरच्या कार्यपत्रिकेवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्षाने रविवार दिनांक १३/१२/२०२० रोजी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली असून २०२२च्या महापालिका निवडणुकीमध्ये  काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळून पुन्हा काँग्रेस पक्षाची पुणे महानगरपालिकेवर सत्ता आणण्याचा निर्धार पक्षाच्या आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.  

बागुल म्हणाले की, पुणे शहराची वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर एचसीएमटीआर रस्ता होण्यासाठी काँग्रेस पक्ष पाठपुरावा करून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करेल. मुंबई व नागपूर येथे मेट्रो प्रकल्प होत असताना तेथील महानगरपालिकेकडून हिस्सा घेण्यात आला नाही.  मग पुणे शहरात मेट्रो प्रकल्प करत असताना पुणे महानगरपालिकेला १० टक्के हिस्सा देण्याची अट  घालून पुणेकरांवर बोजा टाकण्याचा घाट काँग्रेस पक्ष होऊ देणार नाही,काँग्रेसच्या काळात पीएमटी सक्षम होती परंतु आता पीएमपीएमएल अस्तित्वात असताना अंदाजे १९०० कोटी रुपयांची तूट महापालिकेकडून देण्यात येते.  त्यात पुणे शहरात मेट्रो सुरु झाल्यावर पीएमपीएमएलचे काय होणार हा मोठा प्रश्न आहे. काँग्रेसने शहरातील नळ कोंडाळे बंद करून नागरिकांना घरोघरी नळ दिले परंतु सत्ताधारी भाजपने २४x७ योजनेचा घाट घालून पुणेकरांना वेठीस धरले आहे. भविष्यात मिळकतकर कमी परंतु पाणीपट्टी जास्त अशी वेळ येईल. काँग्रेस पक्ष असे कदापि होऊ देणार नाही. रस्तारुंदीकरण, ई बाईक, अमेनिटी स्पेस, झोपडपट्टी पुनर्वसनासाठी इंदिरा संजीवनी योजना, अश्या अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. 

यावेळी उल्हास पवार म्हणाले की, पक्षाचे काम एक निष्ठेने केले पाहिजे पद मिळणे हा नशिबाचा भाग आहे. मी अनेकांना शहर अध्यक्ष केले ते मंत्री,खासदार,आमदार झाले. पक्षाचे काम करा पदे मिळत असतात. आपण नगरसेवक होणारच आहोत असे गृहीत धरून जोमाने कामाला लागा. 

डॉ सतीश देसाई म्हणाले की, काँग्रेसचा कार्यकर्ता तळागाळापर्यंत पोहचवण्याची आबा बागुलांनी केलेली ही धडपड नक्कीच फळाला येईल व येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण चांगल्याप्रकारे नियोजन करून पक्षाची ताकद वाढेल. 

श्रीकांत शिरोळे म्हणाले की, सत्ताधारी भाजप नियमांची पायमल्ली करत असून स्वीकृत सभासदाला दिलेले सभागृहनेते पद हे त्याचे उदाहरण आहे. हे घटनात्मक पद असून चार दिवसांच्यावर त्यांच्याकडे या पदाचीजबाबदारी राहणार नाही.येणारा काळ ते दाखवील. 

अभय छाजेड म्हणाले की, ईव्हीएम मशीनमध्ये घोळ आहे.  राज्य सरकारला महापालिकेच्या निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याचे अधिकार असून त्यासंदर्भात राज्य सरकारशी चर्चा करू.  

यावेळी  आजी-माजी नगरसेवक शांतीलाल सुरतवाला,कमलताई व्यवहारे,श्रीकांत शिरोळे, दीप्ती चवधरी,डॉ सतीश देसाई, सुधीर काळे,विद्या भोकरे,रजनी त्रिभुवन, बाळासाहेब अमराळे , मुख्तार शेख,लताताई राजगुरु,सुजाता शेट्टी,वैशाली मराठे,चंदू कदम, रफिक शेख, काका धर्मावत,सोनाली मारणे, भीमराव पाटोळे, द.स.पोळेकर,रमेश सोनकांबळे,अनिल सातपुते,सौरभ अमराळे व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.        

शेतकरी चळवळीच्या समर्थनार्थ युवक कॉंग्रेसचे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर आंदोलन

0

पुणे-केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटना गेल्या 15 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. शेतक -यांकडून होत असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविताना पुणे शहर युवा कॉंग्रेसच्या वतीने माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी युवा कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि  शेतकरी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी केले असून युवा शहर अध्यक्ष विशाल मलके, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष सौरभ अमराळे यांच्यासहित सुमित नवले, इंद्रजित साळुंखे, निखिल कविश्वर, प्रताप काळे, हृषिकेश साठे, अभिजित रोकडे, कुणाल काळे, प्रताप शिलीमकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळी ११. 3० च्या सुमारास पुणे युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर जमले आणि तेथे बसून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सोमवारी पुण्यात  पाऊस पडला, परंतु या पावसात ही कामगार तिथेच बसून घोषणाबाजी करत राहिले. तब्बल एक तासानंतर कोथरूड पोलिस येथे आले आणि सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

शिवदर्शन भागात मोफत नेत्र तपासणी शिबिर..

0

पुणे-आधार सेवा केंद्र आणि के.  एम. हेल्थकेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिवदर्शन भागात मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले
  यावेळी शिवदर्शन, तावरे कॉलनी ,पर्वती दर्शन या भागातील शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतला.या शिबिरा अंतर्गत  मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच मोफत चष्मा वाटप अभियान घेण्यात आले.
  या प्रसंगी आधार सेवा केंद्राचे संस्थापक अध्यक्ष हेमंत बागुल, अशोक शिंदे ,संतोष पवार,निखिल सोनवणे, योगेश निकाळजे ,सुयोग धाडवे, कुमार खटावकर, राहुल जाधव, महेश ढवळे, हर्षद शेख ,हबीब शेख ,विजय सकट, राम रणपिसे, विशाल शिंदे ,तेजस बागुल, निलेश ढावरे, सचिन पवार, आकाश खटावकर, विशाल लोणारे, भरत तेलंग, महेश बानगुडे,सुरेश गायकवाडआदी उपस्थित होते.
के.एम. असोसिएशनचेडॉ. मुकेश विसपुते ,कल्पना सोनवणे ,रजनी सोने, छाया कसबे ,यांचे राजेंद्र बागुल(सदस्य पुणे नवरात्र महोत्सव) यांनी आभार मानले.

कृषी कायद्यांच्या आडून राजकारण अराजक माजविण्याचा प्रयत्न भाजपाचे हर्षवर्धन पाटील यांचा आरोप

0


पुणे, : दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे. या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत , असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील                             यांनी केला. भाजपातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

ते म्हणाले, ‘पंजाबात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी अनेक दिवसांपासून केंद्र सरकार चर्चा करीत आहे. अचानक या संघटनांनी दिल्लीत येऊ आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला. दिल्लीत आल्यावरही या संघटनांच्या नेत्यांकडे सरकारने अनेकदाचर्चेचे प्रस्ताव पाठवले. प्रत्यक्ष चर्चेत संघटनांच्या नेत्यांच्या मनात असलेल्या शंका दूर व्हाव्यात यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करण्याचीही तयारी दर्शविली आहे. तसे प्रस्तावही या संघटनांच्या नेत्यांकडे पाठवले आहेत. मात्र आंदोलनकर्त्या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना कृषी कायद्याच्या निमित्ताने केवळ राजकारण करायचे आहे , असे आता स्पष्ट होऊ लागले आहे. किमान आधारभूत किंमतीने (एमएसपी )केंद्र सरकारकडून अन्न- धान्याची खरेदी यापुढेही चालू राहणार आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा स्पष्ट केले आहे. तसे लेखी आश्वासन देण्याची तयारीही केंद्र सरकारने चर्चेवेळी दाखविली आहे. सध्याची बाजार समित्यांची व्यवस्थाही कायम राहणार आहे. शेतकऱ्यांना बाजार समित्यांबरोबर आपल्या शेतमालाच्या विक्रीचा आणखी एक पर्याय उपलब्ध राहणार आहे. शेतकरी त्याच्या पसंतीनुसार आपला शेतीमाल कोठेही विकू शकेल. तसेच कॉन्ट्रॅक्ट शेती बाबतचे गैरसमजही केंद्र सरकारने दूर केले आहेत. असे असताना कायदे रद्दच करा या मागणीवर संघटनांचे नेते अडून बसले आहेत. या नेत्यांना कायद्याला विरोध करून राजकीय हेतू साध्य करायचे आहेत , असे आता दिसू लागले आहे, असेही त्यांनी सांगितले. या कायद्याचे फायदे सामान्य शेतकऱ्यांच्याही लक्षात येऊ लागले आहेत. त्यामुळे सामान्य शेतकरी या कायद्याविरोधात सुरु असलेल्या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत , असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठा समाजाचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करु नका अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील… विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा इशारा

0

आझाद मैदान येथे उपोषणास बसलेल्या आंदोलकांची घेतली भेट
मुंबई – गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारची जुलमी राजवट राज्यात सुरु आहे. जो कोणी सरकारच्या विरोधात बोलेल त्यांना जेलमध्ये टाकण्याचे प्रकार सध्या सुरु आहेत. मराठा मोर्चासाठी निघालेल्या आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी त्यांना नवी मुंबई, नाशिक येथे अडविले जात आहे, परंतु अश्या प्रकारे आंदोलकांना अडवून हे आंदोलन दाबता येणार नाही. जेवढे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होईल तेवढे सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील.मराठा समाजाच्या तरुणांच्या भावनांशी खेळू नका. लोकशाही मार्गाने मराठा समाजाचे तरुण जर आंदोलन करत असतील तर त्यांना रोखणे असंविधानिक आहे, त्यामुळे आंदोलक तरुणांना मुंबईत येऊ द्या अन्यथा ज्या ठिकाणी या तरुणांना अडविले जाईल त्या ठिकाणी मी विरोधी पक्ष नेता म्हणून उपस्थित राहील आणि जर यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली तर त्याची जबाबदारी सरकार ची राहील असा जोरदार इशारा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.
१३ व १४ डिसेंबर रोजीच्या न्यायालयीन स्थगिती आदेशाच्या अगोदर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले २१८५ SEBC मराठा समाजाचे उमेदवार आपल्या मागणीसाठी आझाद मैदान येथे उपोषणाला बसले आहेत. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज आझाद मैदान येथे जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली व त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, या सरकारच्या काळात मोगलाईच राज्य सुरु आहे मुख्यमंत्री जे बोलतात त्यामधील कोणतीही गोष्ट होत नाही, ते आश्वासन देतात परंतु त्या आश्वासनाची पूर्तता मात्र होत नाही , अतिवृष्टीमधील शेतकऱ्यांना आश्वासन दिले पण ते पूर्ण केले नाही. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये आठवड्यात सामील करण्याचे आश्वासनही सरकारने दिले होते, पण आज ८ महिने झाले तरी हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. जर तुम्ही स्वतःला वचन पाळणारे मुख्यमंत्री असे म्हणवून घेत असाल तर विद्यार्थाना ८ महिन्यापूर्वी दिलेले वचन ते तात्काळ पूर्ण करावे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकारने समाजा समाजा मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. ओबीसी समाज, मराठा समाज यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे असा आरोप करताना दरेकर म्हणाले की, या दोन्ही समाजाच्या वादाने उद्या राज्यात अराजकता माजू शकेल, त्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण त्या समाजाला राहू द्या आणि मराठा समाजाच्या तरुणांची मागणी मान्य करा अशी मागणीही त्यांनी केली.
मराठा समाजाच्या तरुणांनी आतापर्यंत जो संयम दाखवला आहे तो कायम ठेवावा.वैफल्यातून कोणतीही कृती करू नये असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले.

शासनाकडून ४ मे चा दाखवून कोर्टात सांगितले की आम्ही नोकर भरती करणार नाही. त्या अनुषंगाने माननीय सुप्रीम कोर्टाने ९ सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयात, आरक्षण लागू न करता पुढील नोकरभरती करावे असे सांगितले. परंतु यामुळे २१८५ पदासाठी विविध विभागातील ( तलाठी महावितरण राज्यसेवा मेट्रो इ.) उमेदवार नियुक्ती पासून वंचित राहिले. या उमेदवारीची निवडप्रक्रिया पूर्ण झालेली आहे. या उमेदवारांची माहिती सरकारने कोर्टात दिली असती तर कोर्टाने त्यासाठी नक्की मान्यता देऊन जसे वैद्यकीय प्रवेशासाठी सूट दिली तशी सूट त्या निर्णयात नक्की दिली असती आणि या नोकरभरती मध्ये दिरंगाई झाली नसती असेही दरेकर यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या या उमेदवारांना आता उपोषणाशिवाय पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे सरकारने आता तरी योग्य पाऊले उचलून या २१८५ उमेदवारांची तातडीने नियुक्ती करावी आणि रखडलेल्या सर्व नियुक्त्या पूर्णत्वास न्याव्यात ज्याने इतर संबंधित विभागातील सरकारी कामेही रखडणार नाहीत तसेच हि प्रक्रिया गतिमान झाल्याने इतर समाजातील उमेदवारांनाही त्वरित नियुक्त्या मिळतील अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.