Home Blog Page 2369

केजरीवालांनी विधानसभेत कृषी कायद्याच्या प्रती फाडत केला धिक्कार

0

नवी दिल्ली – आणखी किती जणांचे बळी घेणार ? असा सवाल करत आज केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी संमत केलेल्या कृषी कायद्याच्या प्रती दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेच्या सभागृहात फाडून संताप व्यक्त केला आहे.

करोना काळात घाई घाईने हे तीन कायदे संमत करुन घेण्याची मोदी सरकारला काय गरज होती? असाही प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी विचारला आहे. शेतकऱ्यांसाठी आणले गेलेले हे कायदे काळे कायदे आहेत. आम्ही त्यांचा धिक्कार करतो. दिल्ली राज्यात हे कायदे लागू होणार नाहीत असंही आज विधानसभेत अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं.

कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी चर्चा करण्यासाठी दिल्लीत विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होते. यावेळी या कृषी कायद्यांवर चर्चा झाली. त्यानंतर कृषी कायदे नाकारण्याचा निर्णय झाला. यावेळी जय जवान-जय किसान असे नारेही दिले गेले. गेले अनेक दिवस दिल्ली राज्याच्या सर्वा सीमांवर पंजाब, हरयाणामधील शेतकरी ठिय्या देऊन बसले असून, त्यांनी शेतकरी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमा बंद केल्या आहेत.

याविषयी दिल्ली विधानसभेत खुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या कायद्याविरोधात केंद्र सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले की, हा जुलमी कायदा आणखी किती बळी घेणार आहे? शेतकऱ्यांच्या आंदोलनात आत्तापर्यंत 20 पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. आपल्या देशातला शेतकरी हा भगतसिंग यांच्या प्रमाणे कायद्यांविरोधात आंदोलन करतो आहे. त्यामुळे मोदी सरकारने आता इंग्रजांपेक्षाही जास्त वाईटपणा करु नये.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बरेली येथे रॅली काढून तीन कृषी कायद्यांचे फायदे समजावून सांगितले. भाजपाचे सगळे नेते हे पाठ केल्याप्रमाणे कृषी कायद्यांचे फायदे समजावून सांगत आहेत.

शेतकरी देशात कुठेही त्याचा शेतमाल विकू शकतो. मात्र या सगळ्या हवेतल्या गप्पा आहेत. शेतकऱ्यांमध्ये कुणीही भ्रम पसरवलेला नाही. भाजपाच्या नेत्यांमध्ये भ्रम पसरवण्यात आला आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

कवयित्री अरुणा ढेरे आणि अभिनेते मोहन जोशी यांना ‘ साहित्य-कला गौरव’ पुरस्कार जाहीर

0

पुणेः- साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे यंदाचा वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री डॉ.अरूणा ढेरे आणि प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झाला आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दि. 25 आणि 26 डिसेंबर रोजी 20 वे साहित्यिक कलावंत संमेलन होत आहे. शनिवारी ( 26 डिसेंबर) रोजी दुपारी ४ वाजता ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे यांनी कळविली आहे.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी साहित्यिक कलावंत संमेलनात कला आणि साहित्य क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या दोन व्यक्तींना स्व. रमेश गरवारे स्मरणार्थ वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

यापूर्वी हृदयनाथ मंगेशकर, कवी ग्रेस, यशवंत देव, सुलोचना चव्हाण, श्रीनिवास खळे, डॉ.गिरीश ओक, जगदीश खेबुडकर, अभिनेते सयाजी शिंदे, डॉ.अच्युत गोडबोले यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदा मोहन जोशी व डॉ.अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आहे.

ज्येष्ठ कवयित्री आणि 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे यांनी कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित आणि बालसाहुित्यात विपूल लेखन केले आहे. त्यांची जवळपास 40 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत तर मोहन जोशी यांनी 250 मराठी चित्रपट, 350 हिंदी चित्रपट, 50 मालिका आणि 48 नाटकांमध्ये अभिनय केला आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई : भेसळ युक्त तुपाचे १०० डब्बे ताब्यात

0

पुणे- आंबेगाव भागातील अभिनव कॉलेज समोरून सुमारे १०० डब्बे तूप घेऊन जाणारा टेम्पो पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना संशय आल्याने चेक केला.यावेळी चालकाने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली असता हे भेसळ युक्त गायीचे तूप असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
याविषयी माहिती देताना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी सांगितले की,१२ डिसेंबर ला आंबेगाव परिसरातील अभिनव कॉलेज जवळ मी व माझे सहकारी पेट्रोलीग करीत होतो.यावेळी आमचे कर्मचारी राहुल तांबे व सचिन पवार यांना या भागातून भेसळ युक्त तूप जात असल्याची माहिती मिळाली.काही गाड्याची चेकीग केल्यानंतर एक मेगा एक्सल कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एच १२ आर एन २४५० टेम्पो आम्ही थांबवला यामध्ये कुटलाही मार्क,कपनीचे नाव नसलेले सुमारे १०० डब्बे तूप आढळले. गाडी चालक शिवराज हळमणी (रा.हत्तीकनबस,ता.अक्कलकोट,जी.सोलापूर) याने हा माल डीजीएम (देवक फुड्स कंपनी ) शिवणे येथील कंपनीतून घेतला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने अन्न औषध प्रशासनाला याची माहिती कळवली.या विभागातील क्रांती बारवकर यांनी पाहणी करून हे भेसळ युक्त गायीचे तूप असल्याची खात्री केली.या कारवाई मध्ये सुमारे १४९९ किलो गायीचे तूप किमत अंदाजे साडेचार लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहे.ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर,पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर,पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे,पोलीस कर्मचारी संतोष भापकर,सोमनाथ सुतार,रविंद्र भोसले,सर्फराज देशमुख,सचिन पवार,अभिजित जाधव,गणेश शेंडे,राहुल तांबे,विक्रम सावंत यांनी केली

फुरसुंगी येथील जमिनीतील इनामी शेरा रद्द करण्यासाठी ६ लाखांच्या लाचेची मागणी; एकाला अटक

0

पुणे : फुरसुंगी येथील जमिनीतील इनामी शेरा रद्द करण्यासाठीचे पत्र मिळवून देण्यासाठी तहसिलदाराच्या नावाने ६ लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एकाला अटक केली आहे.

राजेंद्र बाळासाहेब मोरे (रा. फुरसुंगी, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार गुंजाळ याच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार यांच्या फुरसुंगी गावातील जमिनीवरील इनामी शेरा रद्द करण्याचे प्रकरण हवेली तहसील कार्यालयात होते. हे प्रकरण तहसीलदारांनी पूर्ण केले होते. राजेंद्र मोरे यांनी तक्रारदाराशी संपर्क साधून इनामी शेरा रद्द करण्यासाठीचे पत्र मिळवून देण्यासाठी ६ लाख रुपयांची लाचेची मागणी केली. इनामी शेरा रद्द करण्यासाठीचे नोंद घेण्याबाबतचे पत्र मिळवून दिले. त्याची तक्रार आल्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १७, १८ व १९ ऑगस्ट रोजी पडताळणी केली.

त्यात लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. मात्र, लाच देण्यात आली नाही. परंतु, मागणी केली असल्याने शेवटी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने खडक पोलीस ठाण्यात लाचेच्या मागणीचा गुन्हा दाखल करुन राजेंद्र मारे यांना अटक केली आहे. गुंजाळ याचा शोध घेण्यात येत असून पोलीस निरीक्षक सुनिल बिले अधिक तपास करीत आहेत.

केंद्राने परवानगी दिल्यावर जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होईल- आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई- ‘केंद्र सरकार कोरोना लसीबाबत मायक्रो प्लॅनिंग करत आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे, ज्या तारखेला लस द्यायची आहे, त्या व्यक्तीला मेसेज केला जाईल. त्यानंतर तो येईल. त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देण्यात येईल,’ अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

टोपे पुढे म्हणाले की, ‘केंद्र सरकार आपल्याला लस पुरवले, अशी मला खात्री आहे. जी कामे राज्य सरकारने करायची आहेत ती आम्ही करतच आहोत. लसीकरणाच्या परिणामाबाबत एक युनिट तयार केले आहे. साधारण दोन कंपन्या सिरम आणि भारत बायोटेक यांनी लसीबाबत केंद्राकडे परवानगी मागितली आहे. आता केंद्राला निर्णय घ्यायचा आहे. लसीकरण कार्यक्रमासाठी आम्ही तयार आहोत. डिसेंबर शेवटपर्यंत केंद्राने परवानगी दिली तर जानेवारीपासून लसीकरण सुरु होईल, असेही राजेश टोपे म्हणाले.

मायक्रो प्लॅनिंग सुरू

टोपे पुढे म्हणाले की, ‘लस देण्याबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, 50 वर्षांवरील नागरिक, शिवाय इतर आजार असलेले 50 वर्षाखालील असा सगळा डेटा तयार करत आहोत. 18 हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचे काम आता पूर्ण होईल. कसीच्या स्टोरेजसाठी कोल्डचेनची व्यवस्था झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायचे आहे, त्या व्यक्तीला मेसेज मिळेल, तो येणार, त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देणार. अशाप्रकारची मायक्रो प्लॅनिंग सुरू’ असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

भारतीय शिक्षणाचे आंतरराष्टीयीकरण ही काळाची गरज -चौथ्या नॅशनल टीचर्स कॉँग्रेसच्या तिसर्‍या दिवशी मान्यवरांचा सूर

0

पुणे-“ भारताने शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीयीकरणासाठी उचललेले पाऊल भविष्यासाठी सर्वांनाच लाभदायी असेल. त्यामुळे देशात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ होऊन परदेशी चलनात मोठी वृद्धि होईल. शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण संशोधन व  कौशल्यांचा विकास झाल्याने भारतीय विद्यार्थी हा जागतिक नागरिक बनेल. त्यामुळे शिक्षणाचे जागतिकीकरण हेही अत्यंत महत्वाचे आहे.” एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे आयोजित ऑनलाईन चौथ्या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’च्या तिसर्‍या दिवसाच्या सत्रात असा सूर मान्यवरांनी काढला.
ही परिषद ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020ः उपलब्ध संधी’ या विषयावर आहे. यावेळी शैक्षणिक तंत्रज्ञानः उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षणामध्ये मूलभूत परिवर्तन आणि भारतीय शिक्षणाचे जागतिकीकरण  या विषयांवर मान्यवरांनी विचार मांडले.
 या समारंभासाठी पॅरिस येथील सहयोगी प्राध्यापिका भूमिका गुप्ता, एआययूच्या महासचिव डॉ. पंकज मित्तल, न्यूझीलँड युनिव्हर्सिटीच्या फायनॅन्शियल एज्युकेशन अँण्ड रिसर्च सेंटरच्या संचालिका डॉ. पुष्पा वूड, मिलर कॉलेज ऑफ बिजनेसचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुशील शर्मा, प्रदिप कुमार, अहमदाबाद येथील आयआयएमचे प्राध्यापक सॅबेस्टियन मॉरियस, एसएनडीटी युनिव्हर्सिटीच्या एज्युकेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या संचालिका जयश्री शिंदे, ईएमएमआरसी पुणेचे संचालक समीर सहस्त्रेबुद्धे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.  
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या शिक्षणविभागाच्या संचालिका डॉ. सुहासिनी देसाई उपस्थित होत्या.
भूमिका गुप्ता म्हणाल्या,“ भारतीय शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे हे आमच्या समोरिल मोठे आव्हान आहे. त्यासाठी येथील शैक्षणिक संस्थांनी जागतिक दर्जाचे अध्यापन करावे. एकीकडे सरकारने उच्च शिक्षणावरील परिणामाचे सखोल अध्ययन केले आहे. त्यमुळे आंतरराष्ट्रीय करणाचा भारतीय दृष्टिकोन जगासमोर आला पाहिजे. जागतिकी करणामुळे विद्यार्थ्याना विशेष अभ्यासक्रम निवडण्याची सोय आहे. तसेच निवडक विद्यापिठांमध्ये विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण दयावे. विद्यार्थ्यांनी पाश्चात देशात संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात सहभागी व्हावे. उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयी करण देशासाठी उत्तम आहे. काळानुसार कौशल्य विकास अत्यंत महत्वाचा आहे.”
सुशील शर्मा म्हणाले,“ जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीयीकरण या दोन्हींमध्ये सूक्ष्म फरक आहे. आज ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीयीकरण मोठ्या प्रमणात होत आहे ते जागतिकीकरणाच्या दिशेने उचललेले पाऊल आहे. अमेरिकेतील सर्व शिक्षण संस्थेत जगातील सर्व देशातील विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. त्यामुळे येथील विद्यार्थी हा जागतिक नागरिक बनतो. शिक्षण संस्थांनी विविध प्रकारच्या परिषदांचे आयोजन केल्यास सहभागी प्राध्यापक जगासमोर येतांना दिसतील.”
डॉ. पुष्पा वूड म्हणाल्या,“ आंतरराष्ट्रीयीकरणामुळे आपण देशात जागतिक नागरिक घडवित आहोत. नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचे मन व बुद्धि घडविले जात आहे. येथील शिक्षण पद्धती आणि पाश्चात्य शिक्षण पद्धतीत खूप मोठे अंतर आहे. आंतरराष्ट्रीय करणामुळे आपल्या येथे मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीची जडण घडण होण्यास मदत होईल. आता समग्र स्वरूपाच्या शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी शालेय शिक्षणपासूनच लक्ष दयावे. आर्थिक कारणामुळे शिक्षण पद्धतीवर परिणाम होताना दिसतात. परदेशी शिक्षणामुळे देशातील विद्यार्थ्यांना परदेशी वातावरणाचा परिचय होतो.”
डॉ.पंकज मित्तल म्हणाल्या,“उच्च शिक्षणासाठी देशात विदेशातील बरेच विद्यार्थी येतांना दिसत आहेत. यावरून भारताच्या शिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्वरूप येत आहे. तरी सुद्धा या संदर्भातील आपल्या देशातील कायदे शिथिल करण्याची गरज आहे. वर्तमान काळात भारतीय विद्यापीठे आणि परदेशी विद्यापीठांमध्ये शैक्षणिक करार होत आहेत. त्यामुळे आपल्या देशात परदेशी चलन येतांना दिसत आहे. देशातील आयुर्वेद व योग सारख्या विद्याशाखांना मोठी मागणी आहे. काही बाबतीत आंतरराष्ट्रीय धोरण हे खुले असावे. त्यासाठी असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी कार्य करीत आहे. सध्या ऑनलाइन टीचिंग पद्धतीमुळे परदेशी विद्यार्थ्यांची चांगली सोय होतांना दिसतेे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे परदेशी विद्यार्थ्यांना भारताचा परिचय होतो. त्यातून ते येथे प्रवेश घेण्यास प्रवृत्त होतात. भारतात आंतरराष्ट्रीय स्वरूपाची समिती अस्तिवात आली पाहिजे.”
प्रा. सॅबेस्टियन मॉरियस म्हणाले,“ शिक्षणाची पाळेमुळे ही शालेय शिक्षणापासून सुरू होतात. शिक्षणाच्या प्रवाहात आपण विद्यार्थ्यांच्या कौशल्याकडे दुर्लक्ष केले आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या काळात कालानुरूप पारंपारिक विद्यापीठे नाहिशी होतील. अशा परिस्थितीत तंत्र शिक्षण संस्था आणि  खाजगी शिक्षण संस्था मोठी कामगिरी बजावतील. आजच्या काळात सरकारकडून अर्थपूरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे समाजातून अनुदान मिळणे गरजेचे आहे. जगातील सर्व उच्च माध्यमिक शाळा वेगळ्या पद्धतीने चालविल्या जात आहेत. आजच्या काळात विद्यापीठांचे विकेंद्रीकरण आवश्यक बनले आहे. त्यामुळे उच्च शिक्षणामध्ये मुलभूत स्वरूपाचे बदल होतील.”
डॉ. जयश्री शिंदे म्हणाल्या,“ राष्ट्रीय शिक्षण धोरण हे वेगाने बदलणार्‍या तंत्रज्ञानावर आधारित आहे. अशा वेळेस एका प्रकारचे तंत्र शिकल्यास दुसरीकडे त्याचा खूप मोठा उपयोग होतो असे नाही. त्यासाठी अनेक प्रकारच्या अभ्यासक्रमांचे एकत्रीकरण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरते. चांगल्या शिक्षणासाठी नवीन तंत्रज्ञान शोधणे आवश्यक आहे. तसेच यामुळे शिक्षणावर काय परिणाम होईल याचे ही संशोधन करावे लागेल. या शिक्षण पद्धतीत कौशल्यांचाही विचार होणे गरजेचे आहे.”
समीर सहस्त्रबुद्धे म्हणाले, “आजच्या तंत्रज्ञानाने एक नवीन समाजच जन्माला घातला आहे. त्यामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागातून याला मोठी मागणी येत आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी यात समरस होतांना दिसत आहे. हे सर्व पृथककरणात्मक तंत्र असल्यामुळे आम्हाला सामाजिक दृष्टिकोन असावयास हवा. या पद्धतीसाठी शिक्षकांनासुद्धा पूर्व तयारी करणे आावश्यक ठरते. त्यासाठी ऑनलाइन पद्धती उपयुक्त आहे. यामध्ये असंख्य अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. त्यातून आपल्याला एकाची निवड करावयाची आहे.”
यानंतर प्रदीप कुमार यांनी शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचे लाभ सविस्तर समजावून सांगितले.
प्रा. अनुराधा पै व प्रा. आसावरीफडके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मंगेश बेडेकर यांनी आभार मानले.

ऊर्जा विभागाच्या वीज कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना त्वरित सामावून घेण्याच्या प्रक्रियेस गती द्या – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

0

मुंबई दि. 17 : राज्यातील औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासंदर्भात महापारेषण, महावितरण आणि महानिर्मितीच्या संपूर्ण रिक्त जागांसाठी विशेष जाहिरात देण्यात यावी व नियमाप्रमाणे त्यांना सेवेत सामावून घेण्यात यावे, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या फोर्ट येथील कार्यालयात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, ‘महानिर्मिती’चे मुख्य व्यवस्थापकिय संचालक संजय खंदारे, आमदार प्रतिभा धानोरकर, महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती प्रगतकुशल कृती समितीचे सभासद उपस्थित होते.

ऊर्जामंत्री डॉ.राऊत म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील जे कुशल प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांना करार पद्धतीने प्राधान्याने सेवेत घेण्यात यावे व त्यासमान मानधन देण्यात यावे. याचबरोबर कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी विशेष जाहिरात देऊन पुढील प्रक्रियेस गती द्यावी. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ नये यासाठी दहावी तसेच बारावी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना परिक्षेसाठी विशेष प्रशिक्षण द्यावे अथवा त्यांच्या शालांत पात्रतेनुसार परीक्षेचे निकष तयार करण्यात यावे, असे डॉ.राऊत यांनी सांगितले.

ज्या शेतकऱ्यांची चोवीस तास वीज पुरवठ्याची मागणी आहे, ते शेतकरी थकबाकीची अर्धी रक्कम अदा करून नव्या दराप्रमाणे पुढील वीज देयक अदा करण्यास तयार असतील अशा शेतकऱ्यांना तातडीने दिवसा वीज जोडणी देण्यात यावी, असे निर्देशही मंत्री डॉ.राऊत यांनी दिले.

शासकीय पदभरतीसाठी आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांतील ओबीसी लोकसंख्येचा अभ्यास

0

मुंबई, दि. 17 : राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांतील इतर मागासवर्ग तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीच्या प्रवर्गाची प्रचलित शासकीय पदभरतीमधील  आरक्षणाची टक्केवारी आणि प्रवर्गाची असलेली लोकसंख्या विचारात घेऊन या संदर्भात राज्य सरकारला उपाययोजना सुचविण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात पार पडली यावेळी या समितीचा अहवाल लवकरच मंत्रिमंडळाला सादर करणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा या समितीचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली.

ही समिती पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ, गडचिरोली, रायगड व चंद्रपूर या आदिवासीबहुल जिल्ह्यांतील इतर मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गाच्या  आरक्षणाची सध्याची टक्केवारी व त्या त्या प्रवर्गाची असलेली नवीन लोकसंख्या विचारात घेऊन जिल्हास्तरीय गट-क आणि गट-ड संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी आरक्षणनिश्चितीच्या संदर्भात शासनास उपाययोजना सुचविणार आहे.

राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांत इतर मागासवर्ग प्रवर्ग तसेच वि.जा.भ.ज. प्रवर्गाच्या आरक्षणाची टक्केवारी ही जिल्ह्यातील या प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या तुलनेत विविध प्रवर्गाकरिता कमी झालेली असल्याने प्रचलित आरक्षणाची टक्केवारी आणि प्रवर्गाची असलेली लोकसंख्या विचारात घेऊन ती सध्या असलेल्या अनुसूचित जमातींच्या आरक्षणाला धक्का न लावता लोकसंख्येनुसार त्या त्या जिल्ह्यात लागू करण्यात येणार असल्याची माहिती श्री.भुजबळ यांनी दिली. त्याचबरोबर यासंदर्भात उपाययोजना ह्या मंत्रिमंडळाला सुचविण्यात येणार आहे.

या बैठकीला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा या समितीचे अध्यक्ष छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार, वनमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अॅड.के. सी. पाडवी तसेच सामान्य प्रशासन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, विधी व न्याय विभागाच्या सहसचिव अश्विनी सैनी,  आदी उपस्थित होते.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 503

0

पुणे विभागातील 5 लाख 24 हजार 856 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 51 हजार 761 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.17 :- पुणे विभागातील 5 लाख 24 हजार 856 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 51 हजार 761 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 503 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 402 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.12 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 53 हजार 884 रुग्णांपैकी 3 लाख 36 हजार 557 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 760 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 551 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.10 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 332 रुग्णांपैकी 50 हजार 541 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 47 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 908 रुग्णांपैकी 44 हजार 937 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 301 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 303 रुग्णांपैकी 45 हजार 289 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 289 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 725 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 334 रुग्णांपैकी 47 हजार 532 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 106 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 696 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 968 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 665 , सातारा जिल्ह्यात 101, सोलापूर जिल्ह्यात 155, सांगली जिल्ह्यात 23 तर कोल्हापूर जिल्ह्यात 24 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 70 आहे. पुणे जिल्हयामध्ये 696, सातारा जिल्हयामध्ये 168, सोलापूर जिल्हयामध्ये 140, सांगली जिल्हयामध्ये 39 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 27 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 31 लाख 15 हजार 119 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 51 हजार 761 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 16 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू झालेल्या आतापर्यंत २२ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत -ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ

0

मुंबई, दि. १७ : कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झालेल्या ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या विविध पदावरील आणखी ४ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची विमा रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असून संबंधीत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी आज दिली.

आतापर्यंत कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झालेल्या २२ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत देण्यात आली असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, कोरोना संकटकाळात ग्रामीण पातळीवरील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सीएससी कंपनीचे केंद्र चालक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी, कामगार, जिल्हा परिषद कर्मचारी यांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले होते. हे सर्व कर्मचारी कोरोना संकटकाळात ग्रामीण भागातील संक्रमण रोखण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करत होते. लोकांमध्ये जावून जनजागृती करत होते. माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाची अंमलबजावणी करण्यामध्ये या कर्मचाऱ्यांनी महत्वाचे योगदान दिले. गृहभेटी करणे, ऑक्सीमीटर, थर्मामीटर आदींच्या सहाय्याने लोकांची तपासणी करणे अशी विविध कामे करताना कर्तव्यावर असताना दुर्दैवाने काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला. अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात येत आहे.

प्राप्त प्रस्तावांपैकी आज रघुनाथ वाटेगांवकर, ग्रामसेवक (खरातवाडी, जि. सांगली), अशोक भोसले, ग्रामविकास अधिकारी (वाठार तर्फ वडगाव, जि. कोल्हापूर), मजिद शेख, ग्रामपंचायत कर्मचारी (डिगडोह देवी, जि. नागपूर), अंबादास ठाणगे, कनिष्ठ सहायक लिपीक (अहमदनगर जिल्हा परिषद) या मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपये विमा कवच मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

घरातील कमावती व्यक्ती गमावल्याने संकटात सापडलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या संकटकाळात मदत देण्याचा हा प्रयत्न आहे. कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ईतर अधिकारी, कर्मचारी यांच्या वारसांना विमा कवच मदत मिळण्यासाठीचे प्रस्ताव लवकर पाठविण्याच्या सूचना जिल्हा परिषदांना देण्यात आल्या असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

गृहमंत्री करणार मानस कन्येचे कन्यादान

0

रविवारी नागपुरात लग्नसोहळा

मुंबई, दि.१७ : बाबुल की दुवाँये लेती जा…. जा तुझको सुखी संसार मिले… असा आशीर्वाद एका मानस कन्येला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडून मिळत असेल तर..आणखी काय पाहिजे.!

हे काही चित्रपटाचे कथानक नसून वास्तव आहे. मतीमंद व मुकबधीर अनाथ मुलांच्या संगोपनासोबतच पुनर्वसनासाठी कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवी शंकरबाबा पापडकर यांची मानस कन्या कु. वर्षा शंकरबाबा पापडकर व अनाथालय बालगृहातील समीर यांचा विवाह संपन्न होत आहे. या विवाहात कु. वर्षा हिचे कन्यादान वधुपिता-माता म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख व सौ. आरती देशमुख करणार आहेत.

अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथे स्व. अंबादासपंत वैद्य मतीमंद, मुकबधीर अनाथालय येथे 23 वर्षापूर्वी नागपूर रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत पोलीसांना सापडलेल्या मुलीचे संगोपन करुन चिमुकलीचा तिचा आईवडीलाप्रमाणे सांभाळ करुन तिला वडीलाचे नाव दिले. ती सहा वर्षाची झाल्यानंतर शिक्षणाकरीता संत गाडगेबाबा निवासी मुकबधीर विद्यालय येथे चौथीपर्यंत शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभे केले. तर डोंबिवली येथे बेवारस स्थितीत सापडलेल्या दोन वर्षाच्या समीरचे सुध्दा वझ्झर येथील अनाथालयात शंकरबाबा पापडकरांनी स्वत:चे नाव देवून सांभाळ केला. सातव्या वर्गापर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी नोकरी मिळवून दिली.
श्री. देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी त्यांच्या सुनबाई सौ. रिध्दी देशमुख यांनी नव वधु वरांचे स्वागत व औक्षण करुन लग्नसोहळयाच्या पूर्व विधींची सुरुवात केली.
जिल्हाधिकारी वरपिता
मुकबधीर असलेल्या समीर याच्या वरपित्याची जबाबदारी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व सौ. ज्योत्स्ना ठाकरे यांनी स्वीकारली आहे. रविंद्र ठाकरे व सौ. ज्योत्सना ठाकरे यांनी आज समीर व वर्षा यांना विशेष निमंत्रित केले.बालगृहातील कु. वर्षा सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर शंकरबाबांनी स्वतंत्र घर तसेच पुढील पुनर्वसनाच्या दृष्टीनेसुध्दा स्वावलंबी केले. त्यानंतरच दोघांच्या विवाहाला समंती दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बालगृहाला भेट दिली असता दोघांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवून संमती मिळाल्यानंतर कन्यादान करण्याचे त्यांनी मान्य केले. हा विवाह ‘सदभावना लॉन’ सीआयडी ऑफिस समोर पोलिस लाइन टाकळी नागपूर येथे दि. 20 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजता संपन्न होणार आहे. कोरोना संदर्भात राज्य सरकारने ज्या अटी घालून दिलेल्या आहेत त्या अटींना पाळून या विवाह सोहळ्यात नागरिकांनी उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद द्यावेत असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. जर या मूकबधिर दांपत्यास संसारोपयोगी साहित्य दिले तर मला आनंदच होईल असे मत सुद्धा यावेळी अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा आता २० डिसेंबरपर्यंत

0

नोकरीइच्छूक तरुणांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे मंत्री श्री. नवाब मलिक यांचे आवाहन

मुंबई, दि. १७ : कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राज्यात नुकत्याच १२ आणि १३ डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यास उमेदवार व उद्योजकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या मेळाव्याचा कार्यक्रम आता २० डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आला असल्याची माहिती विभागाचे मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली. राज्यातील बेरोजगार तरुण व उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

रोजगार मेळाव्यात सहभागासाठी नोकरीइच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. यापूर्वीच नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, जेणेकरुन त्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ याद्वारे सहज उपलब्ध होवू शकेल. असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले आहे.

नोकरीइच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून यामध्ये राज्यातील सर्वसाधारणपणे 9 वी पास पासून पूढ़े 10 वी, 12 वी. आयटीआय, डिप्लोमा तसेच बीई व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार सहभागी होऊ शकतात. विविध नामांकित उद्योग, व्यवसाय यांनाही त्यांच्याकडील रिक्तपदांसह मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

मेळाव्यात राज्यभरातील नामांकीत उद्योगांचा सहभाग

मेळाव्यात दररोज विविध क्षेत्रातील उद्योजक सहभागी होत आहेत. आतापर्यंत नामांकित उद्योजकांनी सहभाग नोंदविला आहे. प्रिमियर सील्स, मरेली मदरसन ऑटो, व्होडाफोन इंडिया सर्व्हिसेस, महिंद्रा स्टील सर्व्हीस सेंटर, एल जी इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., हायर अॅप्लायन्सेस, महिंद्रा सीआयई ऑटोमोटीव्ह लि., मिंडा कॉर्पोरेशन लि., रुप पॉलिमर्स, बीएनवाय मेलन (बीपीओ), मास्टरकार्ड मोबाईल ट्रान्झॅक्शन सोल्युशन प्रा. लि., अॅडविक हाय-टेक, युकेबी इलेक्ट्रॉनिक्स, राधेय मशिनिंग, युरेका फोर्ब्स, फोर्स मोटार्स, वायका इन्स्ट्रमेन्टस, विल्यम्स कंट्रोल्स, जयहिंद सियाकी. कायनेटिक कम्युनिकेशन्स, एमक्युअर फार्मास्युटिकल्स इ. सारख्या पुणे जिल्ह्यातील नामांकित कंपन्या तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील नामांकित खाजगी कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकारची रिक्तपदे नोंदविली आहेत.

असा करावा ऑनलाईन अर्ज…

हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. होमपेजवरील नोकरीसाधक (Job Seekar) लॉगीनमधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करुन प्रथम आपणास जिथे अर्ज करावयाचा आहे तो जिल्हा निवडून त्यातील STATE LEVEL MEGA JOB FAIR या रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर View Vacancy List पाहून उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी, आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन आपली पात्रता असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.

इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा सोयीच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येईल. शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल. व्हॉटस्ॲप, स्काईप, झूम इत्यादी माध्यमांद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतात. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे मंत्री श्री. नवाब मलिक यांनी सांगितले.

संजय राऊत यांचा न्यायालयावर आरोप :कायदेशीर कारवाई गरजेची -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0


मुंबई, दि.१७ डिसेंबर शिवसेना नेते संजय राऊत यांची वक्तव्ये आता बेताल व बेजबाबदार होत चालली आहेत. एकीकडे ते न्यायालयावर टिका करत असताना दुसरीकडे न्यायालयाने काय केलं पाहिजे अश्याप्रकरे मार्गदर्शन ते करू लागले आहेत. यावरून न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवला जात आहे ते लोकशाहीसाठी घातक आहे, आज त्यांनी न्यायालयावर आरोप केले आहेत त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई गरजेची आहे अशी जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.
न्यायालय कोणत्याही सरकारच्या विचारांवर चालत नसते. त्यामुळे या विषयावर अश्या प्रकारचा आरोप न्यायालयावर करणे चुकीचे आहे. त्यामुळे राऊत यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे असे सांगताना दरेकर म्हणाले की, देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही घटना लिहीली. या घटनेच्या माध्यमातून सर्वोच्च अशी न्यायव्यवस्था तयार करण्यात आली, पण जर त्या न्यायव्यवस्थेच्या बाबतीत अश्या प्रकारचे कोणी आक्षेप घेत असतील व न्यायालयाने काय करावे हे जर ते सांगत असतील तर यापेक्षा लोकशाहीसाठी दुर्दैव होऊ शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘न्यायालय सध्या कशातही पडत आहे’- खा. संजय राऊत

0

मुंबई-मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जमिनीच्या वापरावरुन उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला फटकारले आहे. दरम्यान निर्णय दुर्दैवी असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त व्यक्त केले. तसेच विरोधी पक्षाने हा विषय राजकीय केलेला आहे, त्यात न्यायालयाने पडू नये असे म्हणत राऊत संतापले आहे.

‘विरोधी पक्षाने विषय राजकीय केलेला आहे, त्यात न्यायालयाने पडू नये आणि हेच योग्य आहे. जमीन महाराष्ट्राची आहे, हे सरकार महाराष्ट्राचे आहे. हे मीठागरवाले कुठून आले? असा सवालही राऊतांनी केला. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.राऊतांनी न्यायालयावर रोष व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ‘न्यायालय सध्या कशातही पडत आहे. खालच्या न्यायालयाला डावलून एका खुनी माणसाला वरच्या न्यायालयाकडून जामीन दिला जातो. बेकायदा बांधकाम तोडण्यासंदर्भात कारवाई केली तर सरकारलाच बेकायदेशीर ठरवले जाते. देशाच्या न्यायव्यलस्थेला आम्ही असे कधी पाहिले नव्हते. ‘ असे म्हणत राऊतांनी न्यायालयावरही टीका केली.

सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू
‘कांजूरच्या जागेवर कुणी राजकारणी बंगले किंवा फार्महाऊस बांधले जाणार नाही. हा मुंबई, महाराष्ट्र आणि पर्यायाने देशाच्या विकासाचा विषय आहे. बुधवारी उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे. याच जमिनीवर मागील सरकार पोलिसांसाठी, गरीबांसाठी घरे बांधणार होते. मग आता ही जमीन सरकारची नाही का? असा सवालही राऊतांनी केला. पुढे ते म्हणाले की, अशाप्रकारच्या प्रकल्पाला विलंब होईल अशी परिस्थिती निर्माण करायची, लोकांमध्ये रोष निर्माण करायचा आणि सरकारला बदमान करण्याचे काम सध्या सुरू आहे. अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.


गोविंदा ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर

0

महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ हा कार्यक्रम थोड्याच काळात प्रेक्षकांचा आवडता झाला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेली नृत्यातली प्रतिभा प्रेक्षकांना या मंचावर पाहायला मिळतीय. 

येत्या आठवड्यात २१ आणि २२ डिसेंबरला ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’मध्ये हिरो नंबर वन गोविंदा उपस्थित असणार आहे. गोविंदाच्या येण्यानी स्पर्धक आणि गुरू यांच्यातला उत्साह वाढला आहे. या आठवड्यात होणारी सगळी सादरीकरणं  गोविंदाला समर्पित असणार आहेत. गोविंदासाठी खास ट्रिब्यूटही सर्व स्पर्धक आणि त्यांचे गुरू यांनी सादर केलेले पाहायला मिळणार आहे. 

गोविंदाच्या गाण्यांवर आणि गोविंदाच्या स्टेप्स वापरून केलेली नृत्यं पाहून गोविंदाही भारावून गेला. एवढंच नाही तर मंचावर येऊन त्यानी स्पर्धकांबरोबर नृत्यही केलं. 

गोविंदाच्या आयकॉनिक स्टेप्स नृत्याच्या महामंचावर  प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. धर्मेश सर स्वतः गोविंदाचे चाहते असल्यानी गोविंदाच्या उपस्थितीनं तेही भारावून गेले होते. स्पर्धकांमधील आर्य डोंगरे याच्या आजोबांनी जमवलेल्या गोविंदाच्या आईच्या आवाजातली दुर्मीळ चित्रफीतही  ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ टीमकडून भेट म्हणून देण्यात आली. 

कार्यक्रमातला हा  बाद फेरीचा पहिलाच आठवडा आहे. या भागात टॉप १२ पैकी कोणता एक स्पर्धक  बाद होणार, हे कळणार आहे.