पुणे दि.21:-राज्य निवडणूक आयोग यांनी राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांकरिता निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यात पुणे जिल्हयातील 748 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
याव्दारे उपरोक्त ग्रामपंचायतीमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही. अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांस आवाहन करण्यात येत की, दि.1 ऑगस्ट 2020 पासून जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आलेला आहे.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज www.bartievalidity.maharashtra.gov.in या वेबपोर्टलवर परिपूर्ण भरल्यानंतर आवश्यक दस्तऐवज अपलोड करुन ऑनलाईन सबमिट करावेत. तदनंतर त्याची प्रिंट घेऊन पूर्वीप्रमाणेच विहित कार्यपध्दतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत समिती कार्यालयाकडे प्रत्यक्ष सादर करावेत. जुन्या पध्दतीने हस्तलिखित स्वरुपातील अर्ज समिती कार्यालयात स्वीकारले जाणार नाहीत. याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त नितीन ढगे यांनी केले आहे.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत बदल
मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्याप्रकरणी 260 महाविद्यालयांना सामाजिक न्याय विभागाची कारणे दाखवा नोटीस
- सहायक आयुक्त संगीता डावखर यांची माहिती.
पुणे,दि.21 :- आर्थिकदृष्या दुर्बल मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना शैक्षणिक शुल्क अथवा परीक्षा शुल्क अभावी विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने महाविद्यालयीन, व्यावसायिक,अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून महाविद्यालयांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु ही शिष्यवृत्ती देतांना विद्यार्थ्यांकडून जी माहिती घेवून सामाजिक न्याय विभागाला वेळेत देणे अपेक्षित असते. या बाबतीत अनेक महाविद्यालय जाणीवपूर्वक टाळाटाळ करतात. असाच प्रकार पुणे शहर व जिल्ह्यात घडला असून जिल्ह्यातील जवळपास 260 महाविद्यालयांना सामाजिक न्याय विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याचा खुलासा पाच दिवसात देण्याचे आदेश सहायक आयुक्त संगीता डावखर यांनी दिले आहेत.
सन 2018-19 व 2019-20 या शैक्षणिक वर्षातील भारत सरकारची शिष्यवृत्ती शिक्षण फी, परीक्षा फी या योजनेअंतर्गत महाडीबीटी संकेतस्थळाद्वारे शिष्यवृत्ती मंजूर झालेली असून सदरील शिष्यवृत्तीची रक्कम ही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते परंतु विद्यार्थ्यांचे बॅंक खाते क्रमांक चुकीचे असणे, बँक खात्यांस आधार कार्ड संलग्नित न करणे, बँक निष्क्रीय असणे आदी त्रुटीची पूर्तता करून पुल खात्यामधील प्रलंबित अर्ज जलद निकाली काढण्याबाबत सामाजिक न्याय विभागाने जिल्ह्यातील शेकडो महाविद्यालयांना 26 नोव्हेंबर रोजी पहिले स्मरणपत्र तसेच 2 डिसेंबर 2020 रोजी दुसरे स्मरणपत्र पाठवूनही या 260 महाविद्यालयांनी वेळेत माहिती पुरवलेली नाही. तसेच सदर महाविद्यालयांची दि. 3 डिसेंबर 2020 व दि. 5 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाईन् बैठक गुगल मीट अँपद्वारे घेण्यात आली. त्यामध्ये सहायक आयुक्त संगिता डावखर, यांनी सर्वाना मार्गदर्शन करुन पीएफएमएस प्रणालीवरील सर्व प्रलंबित विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्याबाबत सूचना दिल्या. तसेच पुणे कार्यालयाने दि. 6 डिसेंबर 2020 रोजी सर्व महाविद्यालयांना यासंदर्भात तिसरे स्मरणपत्र दिले तरी देखील महाविद्यालयांनी वेळेत कार्यवाही न केल्याने समाज कल्याण आयुक्त यांनी 8 डिसेंबर 2020 रोजी पुणे येथे झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देय असलेली शिष्यवृत्ती अदा करण्यास झालेल्या विलंबास संबंधित महाविद्यालय कारणीभूत असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास अथवा त्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती, फ्रीशिप रक्कम न मिळाल्यास त्याला सर्वस्वी संबंधित महाविद्यालयाचे संस्थाचालक, प्राचार्य जबाबदार राहतील, असे या कारणे दाखवा नोटीसद्वारे सूचित केले आहे, असे सहायक आयुक्त यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकांन्वये कळविले आहे.
केंद्र सरकारने मका आणि बाजरी खरेदीची मर्यादा वाढवावी – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ
मुंबई, दि. 21 : केंद्र शासन राज्य सरकारच्या माध्यमातून किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका, बाजरी ह्या पिकाची खरेदी करत असते. केंद्र सरकार मका आणि बाजरी खरेदीसाठी प्रत्येक वर्षी मर्यादा आखून देत असते पण ह्या वर्षीच्या अधिक उत्पादनामुळे खरेदीची मर्यादा वाढविण्याची मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
पीक पद्धतीतील बदलांमुळे राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका आणि बाजरीचे उत्पादन घेतले आहे. खरीप हंगाम २०२०-२१ साठी केंद्र शासनाने ४ लाख ४ हजार ९०५ क्विंटल मका खरेदीस महाराष्ट्राला मान्यता दिली आहे. पण मोठ्या प्रमाणात झालेल्या उत्पादनामुळे त्यात बदल करून मक्याची खरेदी मर्यादा १५ लाख क्विंटल तर बाजरी खरेदीची मर्यादा १ लाख ७०० क्विंटल पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडे केली आहे.
कोरोना संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांनी ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात मकाचे उत्पादन घेतले आहे. मका आणि बाजरी खरेदीची मर्यादा वाढविण्यासाठी केंद्र सरकारशी या अगोदर दोन वेळा पत्रव्यवहार केल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा विचार करता लवकरात लवकर ही मागणी मान्य करावी, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.
श्री.भुजबळ म्हणाले, मागील वर्षी २०१९-२० मध्ये महाराष्ट्र शासनाला ‘खरीप पणन हंगाम २०१९-२० (रब्बी)’ अंतर्गत १.५० लाख क्विंटल ज्वारी (हायब्रिड) आणि २.५० लाख क्विंटल मका खरेदी करण्यास मान्यता दिली होती. खरेदीची अंतिम मुदत ३० जून, २०२० पर्यंत होती पण त्यावेळीदेखील केंद्राकडे पाठपुरावा केल्यामुळे ही मर्यादा वाढवून ११.५ लाख क्विंटल करण्यात आली. या वर्षात देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मका व बाजरी शिल्लक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मका व बाजरी खरेदीच्या उद्दिष्टांत वाढ करून हे उद्दिष्ट मका १५ लाख क्विंटल तर बाजरीची मर्यादा १ लाख ७०० क्विंटल करण्याची गरज असल्याचे श्री.भुजबळ यांनी सांगितले.
भिमा-कोरेगाव अभिवादनासाठी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आजाद 1 जानेवारीला उपस्थित राहणार
पुणे- भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे भीम आर्मी प्रमुख भाई चंद्रशेखर आजाद उर्फ रावण हे उपस्थित राहणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भिमाकोरेगाव अभिवादन महारॅली आयोजित करण्यात येणार आहे. या रॅलीची संपूर्ण तयारी झाली असल्याचे भीम आर्मी पुणे शहर अध्यक्ष अभिजीत गायकवाड यांनी कळविले आहे.
1 जानेवारी रोजी अभिवादनासाठी येणाऱ्या चंद्रशेखर आजाद यांच्या दौऱ्याचे निमित्त साधत पुणे परिसरांमध्ये भीम आर्मी च्या संघटनात्मक बांधणी च्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचा मेळावा, कार्यकारिणीची बैठक, व हितचिंतक समर्थक यांच्यासमवेत विविध बैठकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रमाच्या अनुषंगानेची पूर्वतयारी पूर्ण झाली असून या नियोजित कार्यक्रमांमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहा निर्माण झालेला आहे व याचा आगामी काळात संघटना बांधणीसाठी मोठा फायदा होणार असल्याचेही अभिजीत गायकवाड यांनी सांगितले.
भविष्यातील आरोग्य व्यवस्थापनात आयुर्वेदाला महत्वाचे स्थान :केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
- गुजरात सरकारच्या ‘माईंड टू मार्केट’ मेंटरिंग प्रकल्पाचे उदघाटन.
- आयुर्वेद क्षेत्रातील इनोव्हेटर्सना प्रोत्साहन देण्यासाठी गुजरात सरकारचा बीव्हीजी लाईफ सायन्सेस लिमिटेडसोबत करार
पुणे :युवाशक्तीच्या नव संकल्पनांना प्रोत्साहन देऊन भारताची ५ हजार वर्षाची आयुर्वेद प्रणाली आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी गुजरात सरकारच्या २०० कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी अशा माईंड टू मार्केट (‘एम टू एम ‘) या प्रकल्पाचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी आयुष खात्याचे केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक,बी व्ही जी ग्रुप चे संस्थापक हणमंतराव गायकवाड,गुजरातचे शिक्षण मंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा,स्टार्ट अप अँड इनोव्हेशन हब (आय हब) चे चीफ मेंटॉर हिमांशू पांड्या,आय हब चे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरण्मय महंता यांच्या हस्ते झाले. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात ‘माईंड टू मार्केट’ प्रकल्पातील युवकांनी,संशोधकांनी सहभाग घेतला.
या प्रकल्पात युवकांना आणि विद्यार्थ्यांच्या आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पती च्या उपयोगाविषयीच्या नवसंकल्पनांना मार्गदर्शन आणि बळ दिले जाणार आहे.युवकांना संशोधन,प्रमाणीकरण,उत्पादन,विपणन अशा सर्व टप्प्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.त्यासाठी गुजरात सरकारने बी व्ही जी लाईफ सायन्सेस लिमिटेडशी सहकार्य करार केला आहे.माईंड टू मार्केट (‘एम टू एम ‘) हा २०० कोटी चा मेंटरींग प्रकल्प आहे.आयुर्वेद आणि हर्बल लाईफ क्षेत्रातील स्टार्ट अप्सला या प्रकल्पातून बळ दिले जाणार आहे.’मेक इन इंडिया’संकल्पनेअंतर्गत उत्पादन केले जाणार आहे.
या प्रसंगी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले,’कोविड साथीच्या काळात ‘आयुष’ च्या उपायांनी भारतीयांना मदत झाली आयुर्वेदावरील विश्वास वाढीस लागला आहे,मागणी वाढली असून भविष्यातील आरोग्य व्यवस्थापनात आयुर्वेद आणि औषधी वनस्पतींच्या उपचाराला महत्वाचे स्थान असणार आहे. आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनात गुणवत्तायुक्त कच्चा माल लागणार असून रोपवाटिका,हर्बल गार्डन यांना उत्तेजन मिळणार आहे ग्रामीण अर्थकारणाला याचा चांगला उपयोग होणार आहे’.
हणमंतराव गायकवाड म्हणाले,’बी व्ही जी लाईफ सायन्सेस लिमिटेड आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पतींपासून सर्व प्रकारच्या विकारांवर गुणकारी औषधे निर्माण करीत आहे.आयुर्वेदिक औषधांवर संशोधन,प्रमाणीकरण,निर्मिती आणि विपणन यावर भर दिला जाणार आहे.भारत हा ५ हजार वर्षांपासून वनौषधींचा खजिना असून या वनौषधी,आयुर्वेद आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.’
गुजरातचे शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चुडासामा म्हणाले,’आयुर्वेदाने अनेक जुनाट विकारांवर गुणकारी इलाज शोधले आहेत.या शास्त्राची व्याप्ती पाहता भारतातील प्रत्येक राज्यात आयुर्वेद विद्यापीठे उभी राहिली पाहिजेत’.
हरीश पंड्या,विभारीबेन दवे,अंजु शर्मा या मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. जी टी पंड्या यांनी आभार मानले.
औरंगाबाद, पैठण, गंगापूर तालुक्यातील पीक नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी
औरंगाबाद : औरंगाबाद तालुक्यातील निपाणी, पिंपळगाव पांढरी, पैठण तालुक्यातील गाजीपूर, निलजगाव, शेकटा आणि गंगापूर तालुक्यातील मुरमी, ढोरेगाव, जाखमाथा आणि वरखेड येथील शेतकऱ्यांशी त्यांच्या थेट बांधावर जाऊन केंद्रीय पथक प्रमुख तथा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव रमेश कुमार गंता, केंद्रीय वित्त मंत्रालयाचे सल्लागार आर.बी.कौल यांनी आज पाहणी करून संवाद साधला. अति पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत दुःख व्यक्त करत शासनाची लवकरच मदत मिळेल, असे आश्वासन शेतकऱ्यांना केंद्रीय पथकाच्या समितीने दिले.
पाहणी दरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
मुरमी येथील संजय म्हस्के यांच्या शेतातील ज्वारी, मकाच्या नुकसानीची माहिती विभागीय आयुक्त श्री.केंद्रेकर यांनी सदस्यांना दिली. ढोरेगाव येथील अहेमद जाफर शेख यांनी सव्वा एकर मका पिकाचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. तसेच धर्म बेडवाल यांनीही दोन एकरातील कापसाचे अति पावसाने नुकसान झाले आहे. जाखमाथा येथे सदानंद थोरात यांच्या दोन एकर शेतातील अद्रक खराब झाली असल्याने, बाळासाहेब जाधव यांच्या शेतातील बाजरी, वरखेड येथे विकास उबाळे यांच्या 4 एकर क्षेत्रातील मका आणि दोन एकरातील कापूस पिकांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. गंता आणि श्री. कौल यांनी ‘तुमच्या पिकांची पाहणी केली आहे, पंचनामा झाला आहे, झालेल्या नुकसानीची पाहणीही केली आहे, शासनाच्या नियमाप्रमाणे मदतही मिळेल’ असे शेतकऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर वरखेड येथील पाणंद रस्त्याची पाहणी आणि गौतम कांबळे यांच्या शेतातील कांदा लागवाडीचीही पाहणी त्यांनी केली.
जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी पथकाच्या पाहणीबाबत सांगताना पथकाने जिल्हातील विविध ठिकाणी भेट देऊन कापूस, मका, सोयाबीन, बाजरी, अद्रक आदी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आहे, जास्त पावसामुळे शेतकऱ्यांना कापणी करता आली नाही, त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, या नुकसानीची योग्य तपासणी पथकातील समिती सदस्यांनी केली आहे, त्यामुळे जिल्ह्याला योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली.
औरंगाबाद, पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांशीही संवाद
औरंगाबाद तालुक्यातील निपाणी येथे सुनील काला, नंदू भालेकर, संदीप दुदल, दिलीप भालेकर, सखाराम पुंगळे, लहू भालेकर, पिंपळगाव पांढरी येथे विपिन कासलीवाल, विठ्ठल बहुरे, गाजीपूर येथे रामभाऊ राहतवाडे, निलजगाव येथे मच्छिंद्र मोगल आणि शेकटा येथे हरिश्चंद्र भवर यांच्याशी देखील केंद्रीय पथक प्रमुख श्री. गंता आणि श्री. कौल यांनी संवाद साधत नुकसानीची पीक पाहणी केली.
एकात्मिक वैद्यकीय प्रणाली ‘संकल्पपॅथी’, 21 व्या शतकाची वैद्यकीय गरज
पुणे-कोणत्याही पॅथीला विरोध न करता प्रत्येक पॅथीची खास वैशिष्ठ्ये तसेच त्याची मर्यादा लक्षात घेउन ‘एकात्मिक वैद्यकीय प्रणाली’ म्हणजे (Ideal Integrated Medical Model) वापरता येऊ शकतो, याचे प्रॅक्टीकल उदाहरण म्हणजे ‘संकल्पपॅथी’. संकल्पपॅथी ही एक विचारप्रणाली आहे जेथे प्रत्येक पॅथीने हातात हात देऊन, एकमेकांना समजून घेऊन जर ती वापरण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक पॅथीतील कार्यकुशलतेचा फायदा रुग्णांना नक्कीच होऊ शकतो. अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि निसर्गोपचार आणि मानवी मानसशास्त्र यांचे एकत्रिकरण करण्याचा हा आग्रही प्रयत्न असून ही एकात्मिक वैद्यकीय प्रणाली आहे. आज देशामध्ये या घडीला वैद्यकिय क्षेत्राला ‘संकल्पपॅथी’ची गरज असल्याचे मत वैद्यकिय क्षेत्रात गेली तीस वर्षे काम करत असलेले डॉक्टर, माजी वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी आणि ‘संकल्प’ मानवसंसाधन विकास संस्थेचे संचालक डॉ. पी.एन. कदम (M.B.B.S., MS(Psy)) यांनी व्यक्त केले.
वैद्यकीय क्षेत्रातील पॅथींबाबतचा वाद याविषयीच्या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत डॉ. पी. एन. कदम होते. यावेळी ‘संकल्प’ संस्थेच्या संचालिका डॉ. अपूर्वा अहिरराव, डॉ. मनिषा कदम, संशोधन आणि विकास विभाग प्रमुख शर्वरी डोंबे, डॉ. प्रचिती पुंडे, माजी प्राचार्य प्रा. सुभाष पतके यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते. पत्रकार परिषदेचे सुत्रसंचालन, स्वागत आणि आभार डॉ. प्रचिती पुंडे यांनी मानले.
संकल्पपॅथी हि अॅलोपॅथी किंवा होमिओपॅथी अशा सारखी केवळ एक विशिष्ट औषधोपचार शिकवणारी पद्धती सुचवणारी पॅथी नसून एक एकात्मिक वैद्यकीय प्रणालीचे तत्वज्ञान आहे. 21 व्या शतकात केवळ लाक्षणिक उपचार हा उद्देश ठेऊन काम वैद्यकीय सेवा करण्यापेक्षा व्यक्तीच्या जीवनशैलीचा अभ्यास मनोकायिक आजारांचा अभ्यास थोडक्यात शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक स्थितीचा सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच संकल्पने एकात्मिक वैद्यकीय प्रणालीचा स्वीकार करून ज्या त्या विषयातील तज्ञांने त्याच्या दृष्टिकोनातून निदान आणि योग्य उपचार सुचवावे मात्र हे करत असताना आपल्या पॅथीच्या मर्यादा आणि निश्चितता याची त्याला जाणीव असावी असे वक्तव्य डॉ. कदम यांनी व्यक्त केले.
प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक औषध या दोन्हींच्या विकसनशील आवश्यकतांचे विश्लेषण केल्यावर मी असा निष्कर्ष काढला आहे की, कोणत्याही तथाकथित उपचार जे अवयवाचे सामान्य शरीरविज्ञान परत आणण्यास असमर्थ असतात ते केवळ तात्पुरते आहे. प्रत्येक भारतीयांप्रमाणेच मला आयुष्यातील आयुर्वेदिक विज्ञानावर, चांगल्या आरोग्यासाठी मनावर आणि शरीरावर लक्ष केंद्रित करणारी आपली वेळ-मानित देशी औषध प्रणालीवर विश्वास आहे. त्यात भर म्हणून होमिओपॅथी आणि निसर्गोपचार, तसेच आधुनिक काळातील मानसशास्त्रीय साधने यांचे आंतरिक शहाणपण आणि आपल्याकडे एक समाकलित प्रणाली आहे जी मानवी शरीरावर वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते.
डॉ. अपूर्वा अहिरराव म्हणाल्या कि, निदान होत नाही?, निदान झालेय पण उपचारांबद्दल संदिग्धता, कन्फ्युजन, कित्येक दिवस / महिने उपचार सुरु आहेत पण प्रतिसाद अत्यल्प किंवा नाहीच अशावेळी ‘संकल्प’. आजाराच्या मुळाशी कसं जायचं आणि मुळापासून आजारांना बरं कसं करायचं हे संकल्पचे वैशिष्ठ्ये आहे. आहार, विहार आणि विचार या त्रिसुत्रिंबरोबरच वैद्यकीय क्षेत्रातील अभिनव प्रयोग म्हणजेच संकल्प एम.एन.टी. (MNT) मेडीकल न्युट्रीशन थेरपी. डेंगूपासुन ते अप्लॅस्टीक अॅनिमियापर्यंत आणि पित्तापासून ह्र्दयापर्यंत पेशींचे पोषन आणि बॉडी पीएच नॉर्मल करण्यासाठी २१व्या शतकातील ‘संकल्पपॅथी’ हा नवा अध्याय लिहिण्यास सिद्ध आहे.
शर्वरी डोंबे म्हणाल्या कि, वैद्यकीय क्षेत्र खूप झपाट्याने बदलत आहे. निदान करण्याच्या नवनवीन मशीन्स आणि लॅबोरेटरी टेस्ट येत असल्यातरी उपचारांमध्ये फार फरक पडलेला दिसत नाही. 2020 हे वर्ष वैद्यकीय क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलणारे आहे. अनेक अॅंटीबायोटिक्स हे अक्षरश: रिटायर होत असतानाच नेहमीच्या वापरातील अनेक औषधे बॅन्ड मेडिसिन होतील. स्टॅटीन, निमेसुलाईड आणि नुकतेच धोकादायक म्हणून जाहीर झालेली पित्तशामक रॅनीटीडीन (Ranitidine), रॅबीप्रॅझॉल (Rabiprazole), पॅन्टोप्रॅझॉल (Pantoprazole) ही तर फक्त सुरुवात आहे. वर्षानुवर्षे एकाच चाकोरीतून उपचार करणारी आयुर्वेद आणि होमिओपॅथी तसेच सतत नवनवीन इव्हीडन्स बेस्ड औषधांचा शोध लागूनही प्रचंड इयाट्रोजेनिक कॉम्प्लिकेशन्स (Iatrogenic Complications) आणि मॉडर्न मेडीसीनच्या मर्यादा समोर येत आहेत. नेमकं कोणत्या डॉक्टरांवर विश्वास ठेवावा हा विचार करत असताना आणि स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेधालिस्टच्या रेफरलमुळे कन्फ्यूज झालेल्या वैद्यकीय क्षेत्राला नवी दिशा देणारा प्रयोग म्हणजे ‘संकल्पपॅथी’
माजी प्राचार्य प्रा. सुभाष पतके म्हणाले कि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील वैद्यकिय क्षेत्रातील वाद आज गंभीर चर्चेत आहेत. अनेक पॅथी आपण किती श्रेष्ठ आहोत, आपले वर्चस्व किती महत्वाचे आहे हे सिद्ध करत आहेत. त्यातून वाद घडत आहेत. होमिओपॅथी, आयुर्वेदाचे डॉक्टर्स अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करत आहेत वैगेरे गोष्टी सतत चर्चेत आहेत. त्याचबरोबर सर्व पॅथी एकत्र करुन मिक्सोपॅथी करण्याची मागणी होत आहे. मात्र ‘मिक्सोपॅथी’ची मागणी हि चुकीची आहे.
यूकेमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- ब्रिटनमधील नवीन कोरोनामुळे भारतात दहशत.
नवी दिल्ली – ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरचा नवीन स्ट्रेन आढळल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती पाहता सरकारने यूकेतून भारतात होणाऱ्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 22 डिसेंबर रात्री 11.59 वाजेपासून 31 डिसेंबर रात्री 11.59 पर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे. उद्या जे लोक भारतात येतील त्यांची विमानतळावरच RT-PCR चाचणी केली जाणार आहे.
ब्रिटेनमध्ये कोरोना व्हायरसमध्ये म्यूटेशन (कोरोना व्हायरसचे नवीन व्हेरिएंट) असल्याचे समोर आले आहे. हा स्ट्रेन पहिल्यापेक्षा 70% अधिक संसर्ग पसरवणारा असल्याची शक्यता आहे. कोरोनाच्या या नवीन स्ट्रेनमुळे भारतातही दहशतीचे वातावरण पसरले आहे. एका सर्व्हेक्षणात 50% लोकांनी व्हायरसच्या नवीन स्वरूपामुळे पीडित देशांमधून विमानांची आवकजावक बंद करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे ब्रिटनमध्ये मिळालेला कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेनमुळे घाबरण्याचे काही कारण नाही. सरकार याबाबत सतर्क असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
7 हजार लोकांमध्ये केले सर्व्हेक्षण
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन VUI-202012/01 आढळला आहे. हा अत्यंत सुपरस्प्रेडर असल्याचे सांगितले जात आहे. अनेक देशांनी ब्रिटनला जाणाऱ्या फ्लाइट्स बंद केल्या आहेत. या दहशतीत सोशल मीडिया कम्युनिटी LocalCircles ने सोमवारी दिल्लीत 7091 लोकांमध्ये सर्व्हेक्षण केले. यापैकी 50% लोकांनी ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि कोरोना व्हायरसच्या नवीन स्वरूपामुळे प्रभावित सर्व देशांमधून भारतात ये-जा करणाऱ्या फ्लाइट्स तत्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.
व्हायरसचे नवीन रूप पूर्वीपेक्षा 70% जास्त धोकादायक असू शकते
व्हायरसमध्ये सतत म्यूटेशन होत असते, म्हणजे याचे गुण बदलत असतात. म्यूटेशन होणारे बहुतेक व्हायरस स्वतःच संपतात, परंतु कधीकधी हे पूर्वीपेक्षा अधिक पटीने मजबूत आणि धोकादायक बनतात. ही प्रक्रिया इतक्या वेगाने होते की वैज्ञानिकांना एक रूप समजेपर्यंत नवीन रूप समोर येत आहे. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाव्हायरसचे नवीन रूप पूर्वीपेक्षा 70% जास्त धोकादायक असू शकते, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.
उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ संचारबंदी
- युरोप, मध्य-पूर्व देशांतील प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक
मुंबई, दि. २१ : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत अशी संचारबंदी लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क राहावे लागेल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. राहूल पंडीत, मुख्यमंत्र्यांचे पुणे विभागाचे सल्लागार दीपक म्हैसेकर आदी यावेळी उपस्थित होते.
ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणूची घातकता पुढील काही दिवसात कळेल त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पिटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. युरोपीयन देश, मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
युरोप आणि मध्य-पूर्व देशातून प्रवास केलेल्यांनी देशांतर्गत विमान प्रवास केला असेल तर त्यांची माहिती त्यांनी देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकची काळजी घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महापालिकेत 23 गावांचा समावेश, भाजप ग्रामस्थांच्या बरोबर- जगदीश मुळीक
पुणे- पुणे महापालिका हद्दीत 23 गावांचा समावेश करण्यासाठी संबंधित गावातील ग्रामस्थांच्या भूमिकेबरोबर भारतीय जनता पक्ष राहील असे ठाम मत शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.
महापालिकेत समावेश करायच्या प्रस्तावित 23 गावांतील ग्रामस्थांची याबाबतची भूमिका, नागरी समस्या आणि विकासकामांची माहिती घेण्यासाठी मुळीक यांनी शेवाळेवाडी येथून दौरा सुरू केला. पुढील 15 दिवसांमध्ये सर्व 23 गावांना भेट देऊन संवाद साधण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना मुळीक म्हणाले, ’23 गावांच्या समावेशाबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता असूनही सर्वच गावे विकासापासून वंचित राहिली आहे. आपले अपयश लपविण्यासाठी राष्ट्रवादी महापालिकेत समवेशासाठी आग्रही आहे. मात्र उर्वरित घटक पक्ष या भूमिकेशी सहमत दिसत नाहीत.’
कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता गावांना नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. विकासासाठी आम्ही ग्रामस्थांबरोबर राहणार आहोत, असेही मुळीक यांनी सांगितले.
संघटनात्मक बांधणी करण्यासाठी या दौऱ्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात येत असून, संघटना सक्षम करण्यावर भर देत असल्याचे ही मुळीक यांनी सांगितले.
पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 261
पुणे विभागातील 5 लाख 28 हजार 516 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 55 हजार 241 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 21 :- पुणे विभागातील 5 लाख 28 हजार 516 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 55 हजार 241 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 261 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 464 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.19 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 56 हजार 458 रुग्णांपैकी 3 लाख 39 हजार 21 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 826 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 611 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.11 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 664 रुग्णांपैकी 51 हजार 50 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 866 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 748 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 347 रुग्णांपैकी 45 हजार 426 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 239 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 682 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 388 रुग्णांपैकी 45 हजार 415 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 247 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 726 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 384 रुग्णांपैकी 47 हजार 604 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 83 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 697 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 843 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 616, सातारा जिल्ह्यात 69, सोलापूर जिल्ह्यात 134, सांगली जिल्ह्यात 12 तर कोल्हापूर जिल्ह्यात 12 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 775 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयात 564, सातारा जिल्हयामध्ये 85, सोलापूर जिल्हयामध्ये 87, सांगली जिल्हयामध्ये 26 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 13 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 31 लाख 72 हजार 369 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 55 हजार 241 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 20 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
माझी इच्छा आहे महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवावी – फडणवीस
महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्र लढवतील, असं सांगितलं जात आहे. मी म्हणेन त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, माझी तर तशी इच्छाच आहे. असं वक्तव्य विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं.” तसेच, आगामी काळात भाजपात अनेकांचा प्रवेश होणार आहे, भाजपा सोडून कुणीही जाणार नाही. काहीजण उगाचच वावड्या उठवत असल्याचं म्हणत फडणवीस यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधल्याचेही दिसून आले.
शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत आज भाजपात प्रवेश केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सानप यांनी कमळ हाती घेतलं. या प्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. नाशिक महापालिका निवडणुका जवळ येत असताना शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सांगितले की, “सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्रपणे लढवतील, असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. मी म्हणेन त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, माझी तर इच्छाच आहे. कारण, एकत्र लढल्याने एखादा तात्कालीक फायदा त्यांना होईल. परंतु, तीन पक्ष एकत्र आल्यामुळे जी राजकीय जागा असते, त्या जागेत किती लोकं मावतील? हे देखील एक महत्वाचं असतं. दोनच पक्ष एकत्रितपणे त्या राजकीय जागेत मावणं कठीण जातं, हे तीन पक्ष एकत्र येतो म्हणतात. याचा अर्थ असा आहे, त्यातली सर्वात मोठी जागा जी आहे ती भाजपासाठी ते मोकळी सोडणार आहेत आणि भाजपा ती जागा व्यापल्या शिवाय राहणार नाही. म्हणून एखाद्या-दुसऱ्या निवडणुकीत इकडंतिकडं झालं तरी चिंता करण्याची गरज नाही.”
आगामी काळात भाजपामध्ये अनेकांचा प्रवेश –
तसेच, “आगामी काळात भाजपामध्ये अनेकांचा प्रवेश होणार आहे. मात्र, काहीजण उगाचच वावड्या उठवत आहेत की, भाजपाचे आमादार आमच्याकडे येणार. अशा वावड्या उठण्याचं एकमेव कारण म्हणजे कुणी त्यांच्याकडे जाणार नाही हे त्यांना देखील माहिती आहे. पण त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये एवढी प्रचंड अस्वस्थता आहे व आमदरांमध्ये एवढी जास्त नाराजी आहे. की हे आमदार काय करतील? अशा प्रकारची भीती मनात असल्यामुळेच त्यांना संकेत देण्यासाठी उगाचच पक्ष प्रवेशाच्या वावड्या उठवल्या जात आहेत. दुर्देवाने त्यांनी उठवलेल्या वावड्या माध्यमांमधीलही काहीजण पुढे करतात. मात्र, चिंता करायची गरज नाही भाजपाचे सर्व आमदार एकत्र आहेत. विशेष उल्लेख करून सांगतो की, विविध पक्षांमधून जे भाजपात आलेले आहेत, ते राजकीयदृष्ट्या अधिक प्रगल्भ आहेत. त्यांनी मोठं राजकारण बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांना हे समजतं आहे.” असं देखील फडणवीस यांनी बोलून दाखवलं.
व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने भीती; सौदीने एका आठवड्यासाठी इंटरनॅशनल फ्लाइट्स थांबवल्या, बॉर्डरही सील
जगात कोरोना व्हॅक्सिनची वाट पाहिली जात आहे. मात्र महामारीचा धोका अद्यापही कमी झालेला नाही. ब्रिटेनमध्ये व्हॅक्सीनेशन सुरू होऊनही व्हायरसमध्ये म्यूटेशन (कोरोना व्हायरसचे नवीन व्हेरिएंट) असल्याचे समोर आले आहे. हे पाहात सौदी अरब सरकारने इंटरनॅशनल फ्लाइट्सवर एक आठवड्याची बंदी घातली आहे. सौदीने आपल्या सीमा एका आठवड्यासाठी सील केल्या आहेत.
सरकारच्या वतीने असे म्हटले आहे की जे युरोपियन देशांमधून सौदीला आले आहेत त्यांना दोन आठवड्यांसाठी आयसोलेशनमध्ये रहावे लागेल. त्याचबरोबर, जे गेल्या 3 महिन्यांत युरोपमधून किंवा नवीन कोरोना स्ट्रेनच्या भागांमधून आले आहेत, त्यांना कोरोना चाचणी करुन घ्यावी लागेल. दरम्यान, तुर्कीनेही ब्रिटन, डेनमार्क, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सकडून येणाऱ्या उड्डाणांना तात्पुरती बंदी घातली आहे.
जगात कोरोनाचे 7 कोटी 71 लाख 69 हजार 359 केस झाल्या आहेत. विशेष म्हणजे 5 कोटी 40 लाख 88 हजार 483 लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत महामारीमुळे 16 लाख 99 हजार 560 लोकांचा मृत्यू झाला आहे.
व्हायरसचे नवे रुप पहिल्यापेक्षा 70% जास्त धोकादायक असू शकते
व्हायरसमध्ये सातत्याने म्यूटेशन होत राहते. म्हणजेच याचा गुण बदलत राहतो. म्यूटेशन झाल्याने जास्तीत जास्त व्हेरिएंट स्वतःच संपतात, मात्र कधी-कधी हे पहिल्यापेक्षा जास्त पटींनी मजबूत आणि धोकादायक होते. ही प्रोसेस एवढ्या तेजीने होते की, वैज्ञानिकांना एक रुप समजत नाही, तोपर्यंत दुसरे नवीन रुप समोर येते. वैज्ञानिकांनना अंदाज आहे की, कोरोना व्हायरसचे जे नवीन रुप ब्रिटेनमध्ये आढळले आहे. ते पहिल्यापेक्षा 70% धोकादायक असू शकते.
कचरावाहतुक करणाऱ्या भरधाव गाडीने भर सकाळी घेतला एका वृद्धाचा जीव
पुणे- सारसबागेच्या गेटसमोरच एका दुचाकीस्वाराला कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक दिली. यात त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा चेंदा मेंदा झाला. यानंतर डंपर चालक डंपर सोडून पसार झाला आहे. घटनास्थळी स्वारगेट पोलीस आणि वाहतूक विभागाचे पोलीस दाखल झाले आहेत. .याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक्टीव्हा वरुन जाणारा सिंहगड रोडने आलेला दुचाकी चालक सारसबागेच्या समोरून आण्णा भाऊ साठे चौकात जात होता.हीरालाल मोतीलाल ललवानी (वय 83 )असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यावेळी पालिकेच्या कचरा वाहतूक करणारा डंपर पाठीमागून वेगात आला. यात अगदी गेटसमोरच दुचाकीस्वाराला त्याने ठोकर दिली. यानंतर डंपरच्या चाकाखाली त्याचे डोके आले. यात डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान रस्ता रक्ताने माखला होता. पाहणाऱ्याच्या अंगावर शहारे उभा राहिले होते. माहिती मिळताच स्वारगेट पोलीस व वाहतूक पोलिसांनी धाव घेतली आहे. त्याचे नाव आणि पत्ता याचा शोध पोलीस घेत आहेत.
सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ महिला सहायक निरीक्षक शेख हे अधिक माहिती घेत आहेत.
गृहनिर्माण संस्थांसाठी ‘ संकुल सुविधा ‘ हेल्पलाईनचा प्रारंभ
पुणे :
शहरांमध्ये गृहनिर्माण संस्थांची संख्या वाढत असताना, विविध सेवांची गरज तयार होत आहे. या समस्या, अडचणी सोडविण्यास गृहनिर्माण संस्थांना वेळ अपुरा पडतो.गृहनिर्माण संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. तरुण पिढीने त्यात पुढाकार घेतला पाहिजे’ असा सूर ‘ संकुल सुविधा ‘ आयोजित संवाद कार्यक्रमात उमटला.
गृहनिर्माण संस्थांसाठी सर्व प्रकारच्या सेवा, सुविधा देणाऱ्या ‘ संकुल सुविधा ‘ या हेल्पलाईनचा प्रारंभ रविवारी बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेडचे संस्थापक हणमंत गायकवाड , पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांच्या हस्ते झाला. यावेळी ‘ गृहनिर्माण संस्थांसमोरील आव्हाने ‘ या विषयावरील संवाद कार्यक्रमात मान्यवरांनी मते मांडली.
बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेडचे संस्थापक हणमंत गायकवाड, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे सिंहगड रस्ता विभाग अध्यक्ष समीर रुपदे,रोटरी क्लब च्या सेवा विभागाचे संचालक अभय जोशी,डॉ विवेक येळगावकर ,शंतनू येळगावकर या संवाद कार्यक्रमात सहभागी झाले.
हणमंत गायकवाड म्हणाले, ‘ सेवा क्षेत्रात कामाच्या चांगल्या संधी आहेत.सेवा क्षेत्रात काम करताना आपण बरे किंवा उत्तम असून चालत नाही, सर्वोत्तम असावे लागते. या क्षेत्रात काम करताना आधुनिकतेचा वसा घ्या. कारण पुढील काळात स्वच्छता करण्याचे काम रोबो करेल. तसेच सरकारी नियमांमध्ये आता पळवाट काढता येत नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे.
सुहास पटवर्धन म्हणाले, ‘ पुणे जिल्ह्यात १८ हजार सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. या संस्थांमध्ये अनेक कामे असतात, आव्हाने असतात. त्या सोडवताना सातत्य, सचोटी ठेवली पाहिजे ‘.
समीर रुपदे म्हणाले, ‘ गृहनिर्माण संस्थांच्या कामात वादविवाद टाळायचे असतील, तर, तरुण पिढीने जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत ‘.
या संवाद कार्यक्रमात प्रास्ताविक करताना शंतनू येळगावकर म्हणाले, ‘गृहनिर्माण संस्थांच्या संचालनात अनेक अडचणी येत असतात. त्या सोडवण्याच्या ध्येयाने, चांगल्या सेवा -सुविधा देत कार्यरत राहू.
स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. अभय जोशी, डॉ. विवेक येळगावकर, समीर रुपदे व्यासपिठावर उपस्थित होते.दशरथ कुऱ्हाडकर, महेश भुरे, सुधीर कुऱ्हाडकर यांनी स्वागत आणि संयोजन केले. रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम कै. ज्ञानेश्वर नरहरे सभागृह , प्रेस्टीज पॉईंट, सदाशिव पेठ, पुणे येथे झाला.’संकुल सुविधा’ मार्फत गृहनिर्माण संस्थाना कायदेशीर सल्ला सेवा ,हाउसकीपिंग,सिक्युरिटी,गार्डनिंग,रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्लम्बिंग,वॉटर प्रूफिंग,इलेक्ट्रिकल,पेस्ट कंट्रोल, सोलर अशा अनेक सेवा पुरविल्या जाणार आहेत.त्यासाठी ९१५६२१९८२९ या हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल.
