Home Blog Page 2360

पुणे शहरातील पहिलीच मिस इंडिया: निकिता जगताप

0

पुणे- : वानवडी हेवनपार्क येथील कु. निकाता स्वाती संदीप जगताप हिने गुडगाव दिल्ली येथे पार पडलेल्या सौदर्यवती स्पर्धेमध्ये देशभरातून आलेल्या २१ स्पर्धकामधून वानवडीतील निकिता जगताप हिने बाजी मारत डायडम मिस इंडिया किताब पटकवला

व्हिडीओ…

पहाटे पासून मध्यराञी पर्यंत काबड कष्ट करणार्या जगताप कुटूंबीयातील निकिताने दिल्ली येथे झालेल्या सौंदर्यवती स्पर्धेतील डायडम मिस इंडिया किताब पटकविला आणि आईवडीलांसह अवघ्या वानवडी वासियांना सुखद धक्का दिला. मुळ पुण्याची ती पहिलीच मिस इंडिया किताब पटकविणीरी मुलगी आहे.. मुलीच्या यशामुळे अवघे जगताप कुटूंबीय भारावून गेले आहेत. निकाताचे वडील संदीप जगताप हे दुध व्यवसाय करतात तर आई गृहिणी आहे. निकिता आर्कीटेक्चरच्या शेवटच्या वर्षाला आहे. ती मुलांच्या शिकवणी घेते व आईला घर कामात मदत करते. सतत कामामध्ये व शिक्षणामध्ये व्यस्त असणाऱ्या निकिताने मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल वानवडी व शहर परिसरातील सामाजीक, शैक्षणिक, राजकीय क्षेञातील नागरिक शुभेच्छा देत आहेत. मुळची वानवडी येथील निकिता जगताप ही पुणे शहरातील पहिली मिस इंडिया किताब पटकविणारी ती पहिलीच मुलगी आहे. अभिनयाची मला विशेष आवड आहे मिस सिंहगड, ट्रिनेटी मिस केजे हे किताब मला मिळाले आहेत. अभिनयाबरोबर सामाजीक क्षेञात मला भरीव कामगिरी करायची आहे. आईवडीलांच्या संस्कारामुळे डायडम मिस इंडिया किताबाला गवसणी घालू शकले असे निकिता जगताप म्हणाली.

बांधकाम प्रीमियम करिता जाहीर केलेली सवलत अत्यंत स्वागतार्ह -क्रेडाई महाराष्ट्र

0

पुणे- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बांधकामासाठी  भराव्या लागणाऱ्या  प्रीमियममध्ये शासनाने पन्नास टक्के इतकी भरघोस सूट जाहीर केली आहे. मुळातच बांधकाम परवाना घेतेवेळी मोठ्या प्रमाणात प्रीमियम भरावे लागायचे त्यामध्ये सन 2021 या एक वर्षाच्या कालावधीसाठी जाहीर केलेल्या या सवलतीमुळे बांधकाम व्यवसायिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे व  निश्चितच बांधकाम व्यवसायाला चांगली चालना मिळेल. क्रेडाई महाराष्ट्र ही राज्यव्यापी बांधकाम व्यावसायिकांची संघटना या निर्णयाचे स्वागत करीत असून महाविकास आघाडी, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व नगरविकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे या महत्त्वाकांक्षी निर्णयाबद्दल आभार, या प्रीमियम मधील सवलतीचा फायदा देखील ग्राहकांना निश्चित मिळेल अशी ग्वाही क्रेडाई महाराष्ट्र अध्यक्ष राजीव परिख व मानद सचिव सुनील कोतवाल यांनी येथे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

त्यांनी असे म्हटले आहे कि,’प्रीमियम सवलतीचा हा फायदा सर्वसामान्य घर घेणाऱ्या ग्राहकांना मिळावा या हेतूने शासनाने अश्या सूट घेतलेल्या प्रकल्पांतील ग्राहकांना लागणारे मुद्रांक शुल्क यापुढे बांधकाम व्यावसायिकांनी भरावयाची अट सुनिश्चित केली आहे. ग्राहकाभिमुख झालेल्या अशा निर्णयाचे सर्वसामान्यांमध्ये देखील स्वागत होत आहे.सदर सवलत नवीन  प्रकल्पांसाठी आहे का जुन्या प्रकल्पांना देखील लागु राहील व सवलत कालावधी काय असेल याची खातरजमा शासनाचे परिपत्रक प्राप्त झाल्यानंतर  होईल व संभ्रम दुर होईल. राज्याच्या बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी मा.श्री दीपक पारेख यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती गठण केली होती. त्यांनी परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढण्याच्या दृष्टिकोनातून व बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक जास्त आकर्षक व्हावी याकरिता शासनास अहवाल सादर केला होता. त्यास अनुसरून सदरची सवलत शासनाकडून जाहीर केली गेली आहे.       यापूर्वी शासनाने सप्टेंबर महिन्यामध्ये मुद्रांकशुल्क मध्ये तीन टक्के सवलत दिली होती त्याचाही फायदा घर घेणाऱ्या ग्राहकांना व्यापक प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

कोकणच्या विकासासाठी बांधिल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. 6 :-  कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ‘इनोव्हेटिव्ह’ संशोधनासाठी अनुकुल वातावरण व क्षमता आहे. त्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची सूचना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, राज्य शासन कोकणच्या शाश्वत विकासासाठी बांधिल असून खासदार श्री. पवार यांच्या सूचनेची अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

कोकण विभागास (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे) आंतरराष्ट्रीय नवोन्मेश (इनोव्हेशन) विभाग म्हणून विकसित करण्यासंदर्भात राज्य सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.राजेंद्र जगदाळे यांनी ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड  इनोव्हेटिव्ह रिजन’ संदर्भात सादरीकरण केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनीही इनोव्हेटिव्ह रिजनच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शवत कोकणच्या व राज्याच्या विकासासाठी या संकल्पनेची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले.

बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, परिवहनमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री आदिती तटकरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र जगदाळे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राला अनेक क्षेत्रात पुढे नेण्याचे प्रयत्न होत असताना कोकणला ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड  इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची मोठी संधी आहे. कोकणात त्यासाठी अनुकुल वातावरण आहे. कोकणात बुद्धिमत्ता, सर्जनशीलता प्रचंड आहे. मुंबई विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, मत्स्यविज्ञान संस्था याठिकाणी आहेत. कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करुन घेत तेथील निसर्गाला हानी न पोहोचवता या विभागाचा विकास करणे शक्य आहे. पुढील पन्नास – शंभर वर्षांचा विचार करुन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे, असेही श्री.पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरही या संकल्पनेचे सादरीकरण करुन त्यांच्या मान्यतेनंतर पुढे जावे, अशी सूचनाही श्री.पवार यांनी केली.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, कोकणातील तिन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. तिनही मंत्री आणि राज्य सरकार कोकणचा ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड  इनोव्हेटिव्ह रिजन’ विकास करण्यासाठी सकारात्मक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरणानंतर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. पर्यावरणाचा ऱ्हास न करता कोकणचा विकास या माध्यमातून साधला जाणार आहे तसेच हा प्रकल्प राज्यासाठी भविष्यातील मोठी गुंतवणूक ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी व्यक्त केला.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘इनोव्हेशन’ क्षेत्राचा विकास होण्यासाठी हे बंधन आणि दबावापासून मुक्त असले पाहिजे. त्यासाठी राज्याचे  धोरण आवश्यक असल्याचेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्डइनोव्हेटिव्ह रिजनसंदर्भातील मुद्दे

  • इनोव्हेटिव्ह रिजन अंतर्गत रायगड,रत्नागिरी, सिंधुदु्र्ग जिल्ह्यांचा समावेश
  • कोकणात विकासाची अमर्याद संधी
  • कोकणातील साधनसंपत्तीचा उपयोग करुन पर्यावरणपूरक उद्योगांचा विकास
  • पर्यावरण व आर्थिक क्षेत्राचा एकत्रित शाश्वत विकास
  • उद्योग,विद्यापीठ व संशोधन केंद्रांच्या सहभागातून ज्ञानाधारित समाजाची निर्मिती
  • नागरिकांच्याजीवनपद्धतीत व आनंद निर्देशांकात वाढीचे ध्येय्य.

मुंबईतील गिरणी कामगारांना तात्काळ घरे उपलब्ध करुन देण्याचे – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

0

मुंबई, दि. ६ : मुंबई शहरामध्ये जशी एसआरएच्या माध्यमातून घरे उपलब्ध करुन दिली जातात त्याचप्रमाणे गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्येच घरे तातडीने उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

मुंबईतील गिरणी कामगारांना तात्काळ घरे उपलब्ध करुन देण्याबाबत विधानभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार प्रकाश आबिटकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (१) भूषण गगराणी, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष बोबडे, कामगार विभागाचे सह सचिव स.मा. साठे, कामगार उपायुक्त गिरीश लोखंडे, गृहनिर्माण उपसचिव रा.को. धनावडे, अवर सचिव अरविंद शेठे, यासह गिरणी कामगार विभागाचे अध्यक्ष बी.के. आंब्रे, उदय भट, तसेच गिरणी कामगार उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले म्हणाले, मुंबईतील गिरणी कामगारांच्या जमिनीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन झालेली आहे. गिरणी कामगारासाठी सध्याला १ लाख ७४ हजार अर्ज म्हाडाकडे प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये काही दुबार नावे आली आहेत. त्या अर्जाची छाननी तातडीने करावी. तसेच गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्येच जमीन उपलब्ध करुन त्याचे पुनर्वसन मुंबईतच  करावे, असे निर्देशही श्री.पटोले यांनी दिले.

गिरणी कामगारांसाठी २००१ मध्ये शासनाने धोरण निश्चित केले असून या धोरणाची अंमलबजावणी तातडीने पूर्णत्वास न्यावी, असे निर्देशही श्री.पटोले यांनी दिले.

पत्रकारितेतील नव्या पिढीला मार्गदर्शनासाठी ज्येष्ठ पत्रकारांनी पुढे सरसावण्याची गरज

0

नांदेड– माध्यमे ही समाजाचा आरसा असतात. समाजाचे प्रतिबिंब माध्यमात उमटतात. समाजातील चांगल्या वाईट बदलांचे प्रतिबिंब देत असताना माध्यमांवर अधिक जबाबदारी येऊन पडते. समाजातील सहिष्णुता, एकात्मता टिकून राहण्यासाठी माध्यमांची जबाबदारी मोठी असून नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकारांचे योगदान अधिक आवश्यक व गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले. दर्पणदिनामित्त जिल्हा माहिती कार्यालय नांदेड व महात्मा गांधी मिशन संचलित वृत्तपत्र विद्या व माध्यमशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एमजीएम महाविद्यालयात आयोजित ‘भवताल, माध्यमे आणि आपण’ या परिसंवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर हे किनवट येथे आदिवासी आरोग्य शिबिरासाठी असल्याने त्यांनी झुमद्वारे सर्व पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, प्राचार्य गणेश जोशी, ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी, संपादक शंतनु डोईफोडे, मुन्तजोबोद्दीन मुनिरोद्दीन, आकाशवाणीच्या श्रीमती राजश्री मिरजकर, भारत होकर्णे, कुंवरचंद मंडले, विजय जोशी, माजी जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे तसेच जिल्ह्यातील माध्यमाचे प्रतिनिधी, पत्रकार, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

मागील 6 जानेवारी ते यावर्षीच्या 6 जानेवारीपर्यंत गेलेला कालखंड हा सर्वच दृष्टिने सर्व घटकाला नवे स्थित्यंतर देणारा ठरला आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे जी भयावता व धास्ती समाजात निर्माण झाली होती ती धास्ती घालवून समाजामध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम माध्यमांनी व माध्यमातील प्रतिनिधींनी अत्यंत जबाबदारीने केले या शब्दात जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी पत्रकारांच्या योगदानाचा गौरव केला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, कोविड-19 मुळे जे व्यक्ती बाधित झाले त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यासाठी प्रशासनाने जी प्रयत्नाची पराकाष्ठा केली तेवढीच पराकाष्ठा पत्रकारांनीही समाजात अफवा पसरु नयेत यादृष्टीने वस्तुस्थिती वेळोवेळी समाजापुढे मांडून लोकशिक्षकाची भूमिका बजावली आहे.

लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या आवाजाला महत्व आहे. हे लक्षात घेऊन आज माध्यमातील क्रांतीमुळे जी वेगवेगळी डिजिटल माध्यमे समोर येत आहेत त्याचे आपण स्वागत करुन या माध्यमांसाठी काम करणाऱ्या नव्या पिढीला नैतिक आणि लोकशाही मुल्यांचे बळ दिले पाहिजे, असे रापतवार यांनी स्पष्ट केले. शाळेत विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची जशी आवश्यकता असते त्याच धरतीवर लोकशाही भक्कम करण्यासाठी पत्रकारांवर समाजाच्या शिक्षणासाठी लोकशिक्षकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जेष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांनी माध्यमशास्त्राच्या विद्यार्थी व विद्यार्थीनीना मार्गदर्शन करताना पत्रकार हा समाजाचा  चौकीदार, पहारेकरी असून पत्रकारामध्ये नैतिकता व चारित्र्य या गोष्टी असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे यांनी दर्पणदिन हा पत्रकारासाठी आत्मचिंतन करण्याचा दिवस असल्याचे स्पष्ट करुन गत एक वर्षातील कोरोनाचे आव्हान स्विकारुन माध्यमांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. या काळात बातम्या आणि बातम्यांचे संपादन करतांना कधी नव्हे तेवढी काळजी घ्यावी लागली असे स्पष्ट केले. घटनेतील 19 व्या कलमाने व्यक्ती स्वातंत्र्याला दिलेली मुभा ही कुणाच्या अधिकारावर व स्वातंत्र्याला धक्का पोहचविणारी तर नाही ना याची अधिक काळजी घेण्याचे शिक्षण गतवर्षाने माध्यमाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक नांदेड टाइम्स उर्दूचे संपादक मुन्तजोबोद्दीन मुनिरोद्दीन यांनी आपल्या मनोगतात नांदेडच्या पत्रकारिता क्षेत्रात महिलांचा सहभाग कमी असून या क्षेत्रात काम करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. तसेच यावेळी आकाशवाणीच्या राजश्री मिरजकर यांनी विद्यार्थींनींना या क्षेत्रात आवाहन करुन उपस्थित विद्यार्थींनींना प्रोत्साहन दिले. इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे भारत होकर्णे, कुंवरचंद मंडले यांनीही यावेळी संवाद साधला.

प्राचार्य गणेश जोशी यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत करुन एमजीएम महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. पत्रकारिता प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न होण्यासाठी महाविद्यालयातर्फे आवर्जून पत्रकार दिनासारखे उपक्रम सातत्याने विनाखंड सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार शीतल महाजन यांनी केले.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा

0

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी किरण तारे, सिद्धार्थ गोदाम यांची निवड

चंदन शिरवाळे यांनाही उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

मुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष तसेच विख्यात लेखक चित्रकार आणि चाळीस वर्षे राजकीय पत्रकारितेची उत्तुंग शिखरे गाजवणारे ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रकाश बाळ जोशी यांना २०२० चा मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृ.पां. सामक जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

श्री.प्रकाश बाळ जोशी यांनी १९७२ साली पत्रकारितेला केसरीतून सुरुवात केली. सकाळ, फ्री प्रेस जर्नल, इंडियन एक्सप्रेस, द डेली आदि मराठी व प्रामुख्याने इंग्रजी वर्तमानपत्रांबरोबरच २५ वर्षे टाइम्स ऑफ इंडियामध्ये ज्येष्ठ राजकीय वार्ताहर व विश्लेषक म्हणून कामगिरी बजावली.

दहा वर्षांपूर्वी टाइम्स ऑफ इंडिया मधून निवृत्ती घेतल्यावर त्यांनी चित्रकार म्हणून एका नवीन इंनीन्ग्जला सुरुवात केली आणि त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक कमावला.

“प्रकाश बाळ जोशी यांच्या ‘कथा” या कथा संग्रहास राज्य शासनाचा उत्कृष्ट साहित्याचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आहे. या कथा संग्रहाचे इंग्रजीत “Mirror in the Hall” नावाने भाषांतर झाले आहे. गुजराती, हिंदी, फ्रेंच आणि मल्याळम आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.

पत्रकारितेत कार्यरत असताना पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी अनेक लढ्यांमध्ये सहभाग नोंदविला आहे. मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ, अखिल भारतीय श्रमिक पत्रकार संघ आदी संघटनांवर त्यांनी अध्यक्ष, कार्यवाह अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

याशिवाय राज्यस्तरीय वृत्तपत्र प्रतिनिधीसाठी देण्यात येणारा पत्रकारिता पुरस्कार किरण तारे, इंडिया टुडे यांना जाहीर झाला असून राज्यस्तरीय इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी पुरस्कार सिद्धार्थ गोदाम, न्यूज १८ लोकमत, औरंगाबाद यांना जाहीर झाला आहे.

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांसाठी असणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पुढारी, मुंबईचे चंदन शिरवाळे यांना जाहीर  झाला आहे.

पुरस्कार निवड समितीचे प्रमुख म्हणून श्री. प्रकाश सावंत, सदस्य श्री.इंद्रकुमार जैन  व सदस्य सचिव म्हणून श्री.सचिन गडहिरे यांनी काम केले.

महावितरणचे अस्तित्व टिकविण्यासोबतच वीजग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी कटिबद्ध

0

प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांचा कर्मचारी संघटनांशी संवाद

पुणे-: कोरोना कालावधीमधील वीजबिले अचूक असतानाही त्याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे थकबाकीमध्ये वाढ होत आहे. परिणामी आर्थिक संकट गडद झाले आहे. अशा स्थितीत महावितरणचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान आपण स्वीकारले आहे. वीजग्राहकांना तत्परतेची व आपुलकीची सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहेच. सोबतच येत्या मार्चपर्यंत वीजबिलांच्या थकबाकी वसुलीसाठी ग्राहकसंवादाचे सर्वतोपरी प्रयत्न करीत राहू असे प्रतिपादन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी कर्मचारी संघटनांच्या संवाद कार्यक्रमात केले.

पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील महावितरणमधील विविध कर्मचारी संघटनांच्या सुमारे 60 वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी श्री. नाळे यांनी मंगळवारी (दि. 5) नववर्षानिमित्त व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे थेट संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 2020 वर्षाचा मागोवा घेत कोरोना संकट, ‘निसर्ग’ चक्रीवादळ तसेच इतर प्रतिकूल परिस्थितीत महावितरणच्या कर्मचारी, अभियंता, अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांचे श्री. नाळे यांनी विशेष कौतुक केले.

पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. नाळे म्हणाले, की वीजबिलांच्या थकबाकीमुळे सध्याचे आर्थिक संकट अभुतपूर्व असले तरी महावितरणसाठी हे आव्हान नवीन नाही. ते दूर करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने व एकत्रितपणे प्रयत्न सुरु केले आहेत. येत्या मार्च 2021 पर्यंत जास्तीत जास्त थकबाकी वसुलीसाठी वीजग्राहकांना विश्वासात घेऊन प्रत्यक्ष किंवा व्हॉट्स अॅप ग्रुपद्वारे त्यांच्या शंका, संभ्रम व तक्रारी दूर करण्यासाठी तत्पर रहा. यासोबतच महावितरणच्या महसुलाकडे बारकाईने लक्ष ठेवा. मीटर रिडींगमध्ये एजंसीकडून चुका होत असल्यास त्यांच्याविरुद्ध तात्काळ व कठोर कारवाई करा. महावितरणच्या विविध कामांवर लक्ष ठेवा. काही चुकीचे आढळल्यास त्याची माहिती संबंधितांना देण्यात यावी. वीजक्षेत्रामधील खासगीकरणाशी संबंधीत संभाव्य बदल हे आव्हानात्मक आहे. मात्र महावितरण ही सरकारी पर्यायाने जनतेच्या मालकीची कंपनी आहे. त्यामुळे महावितरणला सध्याच्या  जग्राहकांशी थेट संवाद साधावा. स्थानिक लोकप्रतिनिधींशी देखील संवाद साधावा. वीजक्षेत्रातील संभाव्य विपरित परिस्थिती आणि महावितरणचे अस्तित्व टिकविण्याची गरज आदींची त्यांना माहिती देण्यात यावी. आपले वीजग्राहक चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करून निश्चितपणे सहकार्य करतील असा विश्वास प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. नाळे यांनी व्यक्त केला.

या संवाद कार्यक्रमात यावेळी उपमहाव्यवस्थापक (मासं) श्री. अभय चौधरी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर (पुणे), श्री. श्रीकृष्ण वायदंडे (बारामती) व श्री. भूपेंद्र वाघमारे (कोल्हापूर) यांच्यासह सब ऑर्डिनेट इंजिनिअर्स, इलेक्ट्रिसीटी वर्कर्स फेडरेशन, विद्युत श्रमिक कॉग्रेस इंटक, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी, वीज कामगार कॉग्रेस इंटक, वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियन, अधिकारी संघटना, वीज तांत्रिक कामगार संघटना, बहुजन विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी फोरम, कार्यालयीन कर्मचारी संघटना, वर्कर्स युनियन, राष्ट्रवादी वीज कामगार कॉग्रेस, भारतीय कामगार सेना, नवनिर्माण वीज कर्मचारी जनाधिकार सेना, लाईन स्टाफ असोशिएशन आदी संघटनांचे प्रादेशिक, परिमंडल व मंडलस्तरीय पदाधिकारी सहभागी झाले होते.

मेट्रोचे ‘हे’नदीवर अतिक्रमण नाहीय का ? मनसेने म्हटले थांबवा हे काम …

0

पुणे- शहराला मेट्रो जरूर हवी ,पण पर्यावरणाचा ऱ्हास करून अगर पर्यावरणावर हाथोडे मारून ती आणू नये अशी भूमिका सर्वमान्य असताना नदीपात्रातून जाणारी मेट्रो , त्यासाठी टाकले जाणारे भराव हे नदीवर झालेले अतिक्रमण का मानण्यात येत नाही ? असा सवाल करीत प्रथम हे काम थांबवा आणि यावर मुद्देसूद उत्तरे द्या अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त व मुख्य अभियंता जलसंपदा आणि महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या कडे या संदर्भात मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे .यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे उपशहर अध्यक्ष राम बोरकर, प्रल्हाद गवळी, हेमंत बत्ते विभाग अध्यक्ष प्रशांत मते , सुनील कदम,सुहास निम्हण, विभाग सचिव वसंत खुंटवड ,राजेंद्र वेडे पाटील, भुपेंद्र शेंडगे, रमेश जाधव ,अभिजित थिटे आदी उपस्थित होते.

हातच्या कंकणाला आरसा कशाला ..पहा हा व्हिडीओ….

या निवेदनात असे म्हटले आहे कि, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून पुणे शहरात मेट्रो रेल साठी मार्गिका तयार करण्याचे काम चालू आहे त्या पॆकी पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या पात्रामधून देखील मेट्रो जाणार आहे साधारण पणे डेक्कन जिमखाना ते पुणे महानगर पालिका अशा मार्गा साठी नदी पात्रात पूल उभारणी करून त्यावरून मेट्रो नेली जाणार आहे .सदर मार्गाला परवानगी देते वेळी देखील या भागातील नदीच्या पर्यावरणाला कोठेही अडथळा होणार नाही  कोठेही भराव टाकले जाणार नाही, अश्या स्वरूपाचे प्रस्तुतीकरण मेट्रो कडून केल्या गेलं होत. मात्र गेल्या काही महिन्यात मेट्रो कडून डेक्कन ते पुणे महानगर पालिका या भागातील नदीपात्रात प्रचंड राडारोडा टाकून मोठं मोठे भराव तयार केले जात आहे या भरावाच्या माध्यमातून डेक्कन ते मनपा इमारत या दरम्यानचा नदीपात्रातील नदीचा प्रवाह भविष्यात वळवला जाणार आहे इतकेच नाही तर पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्यास किंवा नदीपात्रात धरणातून पाणी सोडल्यास नदी काठालगतच्या पेठामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे . सदर बाब अतंत्य गंभीर असून नदीच्या पर्यावरणावर हा हल्ला तर आहेच , पण या मुळे मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता आहे .

 सबब सदर प्रकरणात संबंधित प्रकार थांबवण्या बाबत त्वरित सूचना  ( स्टॉप वर्क नोटीस ) संबंधित कंपनीस देण्यात यावी अशी मागणी मनसेने मनपा आयुक्त व मुख्य अभियंता जलसंपदा आणि महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या कडे केली आहे

मुंबई महापालिका कॉंग्रेस स्वबळावर लढणार -भाई जगताप

0

मुंबईः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. भाजप, शिवसेनेनं महापालिका निवडणूकीसाठी आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे. तर, काँग्रेसनंही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी ही घोषणा केली आहे.राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनपक्षांचं महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळं २०२२मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसाठीही तिन्ही पक्ष एकत्रित निवडणुका लढवणार असल्याची चिन्हे असताना मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं जाहीर केली आहे.मुंबई महानगरपालिकेत आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत पण राज्यात आम्ही सत्तेत आहोत आणि महाविकास आघाडीचे सदस्य आहोत. महाराष्ट्र सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चालतेय. त्यामुळं महाविकास आघाडी आणि महानगरपालिकाचा काही एक संबंध नाही, असंही भाई जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.
पालिकेच्या वॉर्डनुसार काँग्रेसनं तयारी केली आहे. प्रत्येक वॉर्डनिहाय आम्ही १०० दिवसांची रणनीती आखली आहे. मुंबई शहरात पाणी माफियांचा सुळसुळाट आहे. यामुळं गरिबांना पिण्याचे पाणी मिळत नाही, असंही जगताप म्हणाले आहेत. तसंच, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्तापर्यंत झोपडपट्टीवासीयांची घरं नियमित करण्याची घोषणा केली, पण त्याचं पुढं काय झालं?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मोफत पाणी देण्यासाठी प्रयत्न करु, असं आश्वासन देतानाच भाई जगताप यांनी यामुळं मनपाच्या तिजोरीवर १६८ कोटींचा अधिक भार पडणार असला तरी या रहिवाशांना मोफत पाणी पुरवणे गरजेचं आहे, असंही नमूद केलंय.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 173

0

पुणे विभागातील 5 लाख 44 हजार 47 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 66 हजार 945 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.6 :- पुणे विभागातील 5 लाख 44 हजार 47 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 66 हजार 945 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 173 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 725 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.77 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.96 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 65 हजार 519 रुग्णांपैकी 3 लाख 51 हजार 251 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5 हजार 498 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 770 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.40 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.10 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार 674 रुग्णांपैकी 52 हजार 351 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 548 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 775 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 475 रुग्णांपैकी 46 हजार 864 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 876 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 688 रुग्णांपैकी 45 हजार 751 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 202 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 589 रुग्णांपैकी 47 हजार 830 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 49 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 710 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 656 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 496, सातारा जिल्ह्यात 41, सोलापूर जिल्ह्यात 67, सांगली जिल्ह्यात 32 तर कोल्हापूर जिल्ह्यात 20 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 860 आहे. पुणे जिल्हयामध्ये 583, सातारा जिल्हयामध्ये 120, सोलापूर जिल्हयामध्ये 119, सांगली जिल्हयामध्ये 18 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 20 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 33 लाख 72 हजार 601 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 66 हजार 945 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 5 जानेवारी 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

८-१० जानेवारीला ‘ऍस्पायर टू इन्सपायर’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

0

खासदार डॉ. अमोल कोल्हे, नौदल अधिकारी सुनील भोकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा, स्टुडंट स्किल्स एनरीचमेन्ट बोर्ड (बोर्ड ऑफ स्टडीज), आयसीएआय पुणे विकासा यांच्या संयुक्त विद्यमाने सीए विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ८, ९ व १० जानेवारी २०२१ या तीन दिवशी आयसीएआय भवन, बिबवेवाडी येथे ही परिषद प्रत्यक्ष, तसेच ऑनलाईन स्वरूपात होणार आहे.

या परिषदेचे उद्घाटन शुक्रवार, ८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय नौदलाचे व्हॉइस ऍडमिरल सुनील भोकरे, खासदार अमोल कोल्हे, उद्योजक अभिजित पवार उपस्थित राहणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व ‘आयसीएआय’चे माजी अध्यक्ष सीए प्रफुल्ल छाजेड विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

परिषदेचा समारोप रविवार, दि. १० जानेवारी रोजी दुपारी १.०० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी सीए डॉ. एस. बी. झावरे यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती पुणे ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्डा, सचिव व खजिनदार सीए काशिनाथ पाठारे यांनी दिली आहे.

या तीन दिवसीय परिषदेमध्ये तांत्रिक, प्रेरणादायी, तसेच विशेष सीए सत्र होणार आहेत. आयएएस अधिकारी सीए संपदा मेहता, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. च्या कार्यकारी संचालक आर. एम. विशाखा यांचेही विशेष मार्गदर्शन सीएच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासह स्वामी गोविंददेव गिरी महाराज, सीए जय छायरा, सीए राजेश शर्मा, सीए दयानिवास शर्मा, सीए प्रमोदकुमार बुब, सीए चंद्रशेखर चितळे, सीए भारत फाटक, डॉ. संजय मालपाणी यांची विशेष व्याख्याने होणार आहेत. विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी www.puneicai.org या संकेस्थळाला भेट द्यावी, असेही धामणे यांनी कळविले आहे.

ईडीचे संजय राऊतांच्या पत्नीला पुन्हा 11 जानेवारीला हजर होण्याचे समन्स

0

मुंबई-शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना पुन्हा ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावला असून 11 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. याआधी 4 जानेवारी रोजी सुमारे साडेतीन तास चौकशी केली होती. PMC बँक घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंगचा तपास करणाऱ्या ईडीच्या टीमने त्यांना 5 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र त्या एक दिवस आधीच ईडीसमोर हजर झाल्या होत्या.

असे समजते कि, वर्षा राऊत यांना 55 लाख रुपयांच्या व्यवहाराबाबत अनेक प्रश्न विचारले गेले होते. त्या आपल्याबरोबर अनेक कागदपत्रे घेऊन ईडी कार्यालयात गेल्या होत्या. त्याआधी ईडीने वर्षा यांना 4 वेळा समन्स बजावला होता. मात्र त्या एकदाच हजर झाल्या. वर्षा राऊत यांना देण्यात आलेल्या कर्जाचे पीएमसी घोटाळ्याशी काही संबंध असल्याचा ईडीला संशय आहे. दुसरीकडे . EDच्या दाव्याला उत्तर देताना राऊत कुटुंबीयांनी सांगितले की, हे पैसे दहा वर्षांपूर्वी घेतले होते आणि या संदर्भात, आयकर विवरण देखील दाखवला आहे.

काय आहे PMC बँक घोटाळा?

पीएमसी बँक खोटे खाते दाखवत एका रियल इस्टेट डेव्हलपरला जवळपास 6500 कोटी रुपये कर्ज देत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला 2019 मध्ये मिळाली होती. हा व्यवहार होऊ नये आणि पैसे वाचावे या हेतूने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर 24 सप्टेंबर 2019 रोजी निर्बंध लादले. हे निर्बंध 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचे कर्ज बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

0

पुणे, दि.6 :- मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसंचालक (माहिती) तथा जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी माहिती अधिकारी वृषाली पाटील, माहिती सहायक गीतांजली अवचट तसेच विलास कसबे, विशाल कार्लेकर, मिलींद भिंगारे, सचिन बहूलेकर, ज्ञानेश्वर कोकणे, संजय गायकवाड, सुहास सत्वधर, संतोष मोरे, चंद्रकांत खंडागळे, मोहन मोटे, संजय घोडके, जितेंद्र खंडागळे, विलास कुंजीर, पांडूरंग राक्षे, दिलीप कोकाटे, रावजी बांबळे, वर्षा कोडलिंगे, मीरा गुथालिया आदी कर्मचारी उपस्थित होते.
00000

राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान-केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची टीका

0

पुणे-केंद्र सरकारकडून मका आणि ज्वारीच्या आणखी खरेदीच्या परवानगीसाठी राज्य सरकार आवश्यक ती माहिती केंद्र सरकारला पुरवत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करायचा आणि दुसरीकडे मका, ज्वारीच्या खरेदीबाबत हलगर्जीपणा दाखवणाऱ्या महाआघाडी सरकारचा दुटप्पी चेहराच यातून उघड झाला आहे, अशी टीका केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेबव पाटील दानवे यांनी केली आहे.
त्यांनी पाठविलेल्या प्रसिद्धीपत्रकात दानवे यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारकडून राज्यांना प्रत्येक हंगामात धान्य खरेदीसाठी तसेच वितरणासाठी निधी दिला जातो. या वर्षीही राज्यातील शेतकऱ्यांकडून मका व ज्वारीचे अधिक उत्पादन झाल्यावर राज्य सरकारने केंद्राकडे 7 ऑगस्टला 2020 – 21 च्या हंगामात 7145.135 मेट्रिक टन ज्वारी आणि 1,15,096.539 मेट्रिक टन मका अशी एकुण 1,22,241.675 मेट्रिक टन धान्य खरेदी केली असल्याचे कळवण्यात आले होते. तसेच गव्हाऐवजी धानाच्या खरेदीची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने तयारीही दर्शवली आहे. मात्र नियमांनुसार राज्य सरकारला खरेदी केलेल्या धानाची वितरण व्यवस्था कशी असणार आहे याची माहिती केंद्राला द्यावी लागते. या बाबत केंद्राकडून 18 ऑगस्ट पासून वारंवार पत्रव्यवहार करूनही व त्यासंबंधात 5 स्मरणपत्रे देऊनही राज्य सरकारने कोणतीही माहिती पुरवली नाही. त्यामुळे राज्य सरकार ही माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे.
राज्य सरकारने यावर्षभरात धान्याचे किती उत्पादन होणार आहे याचा आढावा घेऊन राज्याला किती मका खरेदीची आवश्यकता आहे हे केंद्राला स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे. या पद्धतीने काम केल्यास खरेदी प्रक्रियेत होणारी दिरंगाई टळेल. अधिकाधिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा घेता येईल. आघाडी सरकारच्या नेत्यांनी आपल्या कृतीतून शेतकरी प्रेम दाखवावे असे श्री. दानवे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

राम मंदिरासाठी निधी संकलन करण्यास भाजपा कार्यकर्ते राज्यात घरोघर जाणार

0

प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

मुंबई – अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी निर्माण होत असलेल्या भव्य मंदिरासाठी ट्रस्टतर्फे होणाऱ्या निधी संकलनात भारतीय जनता पार्टी सक्रीय सहभागी होणार असून पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन लोकांकडून मंदिरासाठी निधी गोळा करतील, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. . चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी दिली.

ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व प्रदेश माध्यमविभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे प्रभारी सी. टी. रवी, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राज्याचे सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे व जयभानसिंह पवैय्या यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दोन दिवस मुंबईत पक्षाची कोअर कमिटी, प्रदेश पदाधिकारी, मोर्चांचे अध्यक्ष इत्यादींच्या बैठका झाल्या. बैठकांमधील निर्णयांची माहिती आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, अयोध्येतील श्री राम जन्मभूमी येथील भव्य मंदिरात आपला वाटा असावा असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे ट्रस्टच्या वतीने नागरिकांकडून निधी संकलन करण्यात येणार आहे. भाजपा निधी संकलनासाठी सक्रीय मदत करणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन मंदिर निर्मितीसाठी दहा दहा रुपये गोळा करतील. त्यासाठी बूथ पातळीपासून सर्वांची योजना पक्षाच्या मुंबईतील बैठकीत निश्चित करण्यात आली.

त्यांनी सांगितले की, राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणूक निकालांची समीक्षा बैठकीमध्ये करण्यात आली. शेवटच्या तासात संशयास्पद रितीने मतदान वाढणे, पदवीधर नसलेल्यांची नावे मतदारयादीत असणे, खूप मोठ्या प्रमाणात कोऱ्या मतपत्रिका आढळणे असे अनेक गैरव्यवहार झाल्याचे या निवडणुकांमध्ये आढळले आहे. त्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात येईल तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल.

ते म्हणाले की, पक्षाचे 28 नेते आगामी तीन दिवसात राज्यभर प्रवास करणार आहेत. राज्यातील 14,500 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आढावा घेऊन निवडणूक लढवत असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पक्षातर्फे मदत करण्याची योजना हे नेते निश्चित करतील. राज्यात लवकरच होणाऱ्या 92 नगरपालिका – नगरपंचायती व 5 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बैठकांमध्ये विचार झाला.