Home Blog Page 2181

शिरुर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

0

पुणे, दि.13 : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत गोलेगाव रोड शिरूर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात 2021-2022 साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ,अपंग आदी प्रवर्गाच्या विद्यार्थीनींना प्रवेश देण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थींनी ही बाहेरगावची परंतु शिरूरमध्ये शिक्षण घेणारी असावी. मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकाऱ्याच्या सहीचे जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र, तसेच महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, मुलीचे आणि वडिलांचे आधारकार्ड, शिधापत्रिकेची सत्यप्रत अर्जासोबत जोडावी. कोविड-19 आजाराबाबत वडिलांचे व विद्यार्थींनीचे लेखी संमतीपत्रक असावे. शाळा अथवा महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू असल्याबाबत मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचे लेखी हमीपत्र देखील अर्जासोबत असणे आवश्यक आहे.

शासकिय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनाची सुविधा आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दराने पुस्तके, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदीकरिता रक्कम आधार क्रमांक जोडलेल्या विद्यार्थ्याच्या बचत खात्यावर जमा होते.

कोविड-१९ महामारीमुळे रिक्त जागेच्या ५० टक्केच जागा भरल्या जाणार आहेत. बाहेरगावाकडील परंतु शिरूर जि. पुणे परिसरात शिक्षण घेणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात येऊन नोंदणी करावी, असे आवाहन गृहपाल श्रीमती आर.व्ही.साखरे यांनी केले आहे.

तंत्रज्ञानाने सक्षम पिढी घडविण्यासाठी काम करा-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

0

पुणे,दि.१३: उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची किमया ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. शिक्षणसंस्थांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाने सक्षम पिढी घडविण्यासाठी काम करावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात आयोजित शासकीय अभियांत्रिकी पदविका संस्थांच्या प्रायार्य व सहसंचालकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक अभय वाघ, उपसचिव सतिष तिडके, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे (एमएसबीटीई) संचालक डॉ. विनोद मोहितकर, सहसंचालक प्रमोद नाईक, दत्तात्रय जाधव उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेणारी पिढी घडविण्यावर भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयात सर्व सोईसुविधा मिळाल्या पाहीजेत, यासाठीचा आराखडा तयार करावा. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ आणि आवश्यक सुविधांनीयुक्त राहील यासाठी प्रयत्न करावे. विद्यार्थी आणि पालक आकर्षित होतील असा परिसर असाव. त्यासोबतच नवे ज्ञान आणि नव्या कल्पनादेखील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

कोरोना कालावधीत उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्राचार्यांच्या नियोजनाने ऑक्सीजन ऑडीटचे अत्यंत चांगले काम केले आहे. त्यामुळे कोरोना कालावधीत ऑक्सीजनचे नियोजन सुलभ झाल्याचा उल्लेख करून मंत्री सामंत म्हणाले, महाविद्यालयाचा परिसर सुसज्ज असला पाहीजे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला शासनाचे सर्वाधिक प्राधान्य आहे. विद्यार्थी व पालकांना बरोबर घेत शैक्षणिक वातावरण अधीक चांगले करण्यासाठी प्राचार्यांनी भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल. कार्यशाळेत भविष्यातील शैक्षणिक प्रगती कशी असावी, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयावर मंथन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत सामंजस्य करार केला असल्याचेही मंत्री सामंत म्हणाले.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक अभय वाघ यांनी प्रास्ताविक करताना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे रोजगारावर आधारीत अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यातील अभियांत्रिकी पदविका संस्थांचे प्राचार्य, सहसंचालक तसेच ‘एमएसबीटीई’चे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तरावरील मूट कोर्ट स्पर्धेचे यशस्वी आयोजन

0

पुणे दि. १३: महाराष्ट्र राजैवविविधता मंडळ नागपूर आणि सिम्बॉयसिस लॉ स्कूल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जैवविविधता अधिनियम २००२ अंतर्गत वैधानिकष्ट्या देय असलेले योग्य व समन्यायी लाभांश स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्याबाबत राष्ट्रीय स्तरावरील मूट कोर्ट स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ३ ते ५ डिसेंबरदरम्यान आयोजित या स्पर्धेमध्ये भारतातील विविध भागातील १० नामांकित विधी महाविद्यालयांनी भाग घेतला.

मूट कोर्ट स्पर्धेचे 3 डिसेंबर रोजी निवृत्त न्यायाधीश व्ही. के. शुक्ला यांच्या मनोगताने उद्घाटन करण्यात आले. पहिल्या सत्रात सिम्बॉयसिस लॉ स्कूलचे संचालक सुकवींदर सिंग दरी यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रवीण श्रीवास्तव यांनी जैवविविधता अधिनयिम २००२ ची अंमलबजावणी करण्याकरीता या मूट कोर्ट स्पर्धेचे महत्त्व स्पष्ट केले.

राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेषराव पाटील आणि राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण चेन्नईचे सचिव जे. जस्टीन मोहन यांनी जैवविविधता कायद्याचे महत्त्व, अंमलबजावणीप्रसंगी येत असलेल्या अडीअडचणी आदींबाबत चर्चा करुन जैवविविधता उद्यानामध्ये प्रवेश व लाभ वाटप करीत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग वाढवणे यादृष्टीने मार्गदर्शन केले. शिकाऊ किंवा नुकतेच विधी विषयाला प्रवेश घेतलेले किंवा पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून मूट कोर्ट स्पर्धेचे आयोजन करणे आवश्यक आहे. जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनामध्ये मूट कोर्टच्या माध्यमातून विद्यार्थी तसेच प्राध्यापक, प्राचार्य आदींचा सहभाग मोलाचा ठरु शकेल असे यावेळी व्यक्त करण्यात आले.

मूट कोर्टमध्ये सहभागी १० महाविद्यालयांचे २ गट तयार करून स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये जिंदल ग्लोबल लॉ स्कूल या गटाला विजयी घोषित करण्यात आले. तसेच नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आसामला ‘बेस्ट मेमोरियल ॲवॉर्ड’ घोषित करण्यात आला. उत्कृष्ट वक्ता म्हणून महर्षी दयानंद विद्यापीठातील विद्यार्थी हर्षवर्धन यादव याला पुरस्कार प्रदान करण्यात आला.. सिंबायसिस लॉ स्कुल पुणे या गटाला उपविजेते घोषित करण्यात आले.

कार्यक्रमाचा समारोप करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश एस. बी. शुकरे यांनी विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण, वन व जैवविविधता याविषयामध्ये प्राविण्य मिळवावे असे आवाहन केले.

बेंगलुरू येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. एम. के. रमेश यांनी जैवविविधता कायदा २००२ व त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांची सविस्तर माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ अभियोक्ता ॲड. संजय उपाध्याय यांनी पर्यावरण, वन्यजीव व जैवविविधतेचे महत्व केस लॉ सहित समजावून सांगितले व येणाऱ्या अडीअडचणीचे निराकरण करण्यासंबंधी मार्गदर्शन केले.

विघ्नहर्ता देवस्थान रस्त्यासाठी ११ लाखांचा निधी-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे

0

पुणे दि. 13: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज श्री क्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथे विघ्नहर्ता गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रवेशद्वार ते मंदिर या रस्त्याच्या कामासाठी स्वत:च्या आमदार निधीतून 11 लाख रुपये देण्याचे जाहीर केले.

देवस्थानच्यावतीने डॉ.गोऱ्हे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, जुन्नर पंचायत समिती सभापती विशाल तांबे, तहसिलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले, पर्यटन विभागाच्या माध्यमातून अष्टविनायक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला असून पर्यटनाच्यादृष्टीने विकासकामांना गती देण्यात येत आहे. ओझर प्रवेशद्वार ते मंदिर असा आठशे मिटरचा रस्ता वर्षभरात काँक्रेटिकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अष्टविनायक विकास प्रकल्पांतर्गत मंजूर निधीची पूर्ततादेखील लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगून प्रवेशद्वार ते मंदिर या रस्त्याच्या कामासाठी आमदार निधीतून 11 लाख रुपये देण्याचे जाहीर केले. देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात असेदेखील त्यांनी सांगितले.

यावेळी ओझर गावच्या सरपंच मथुरा कवडे, ओझर नं. 2 च्या सरपंच तारामती कर्डक, देवस्थानचे खजिनदार कैलास घेगडे, विश्वस्त बी. व्ही. मांडे, आनंदराव मांडे, मंगेश मांडे, गणपत कवडे, विजय घेगडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

पुणे येथे प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनी आणि बारामतीला मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

0

पुणे,दि.१३: पुणे ही शिक्षणाची पंढरी असून ही ओळख आणखी ठळकपणे जगासमोर आणण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच पुणे येथे प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनी आणि बारामती येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११९ व्या पदवी प्रदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचे मुंबई येथील महावाणिज्यदूत पिटर ट्रसवेल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीला चालना मिळणार आहे. यशदाच्या माध्यमातून प्राध्यापकांना आवश्यक प्रशिक्षण देण्याबाबत विचार करण्यात येत आहे. पुणे येथे मुक्त विद्यापीठाचे विभागीय कार्यालय असून लवकरच बारामती येथे उपकेंद्र सुरू करण्यात येईल. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी आणि त्यांना त्यासाठी आवश्यक संधी मिळावी असे शासनाचे प्रयत्न आहेत.

गरीब कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी ‘कमवा व शिका’ योजना अधिक व्यापक आणि नव्या स्वरूपात राबविण्याचा विचार करण्यात येत आहे. अधिकाधिक मुलांना या योजनेचा लाभ होण्यासाठी प्रत्येक विद्यापीठातून या योजनेचा प्रसार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जागतिक स्पर्धेला यशस्वीपणे सामोरे जाणारे विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यापीठातून नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्याची गरज असल्याचे मतही श्री.सामंत यांनी व्यक्त केले.

पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ते म्हणाले विद्यापीठाला जगात अग्रेसर ठेवण्याचे कार्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केले आहे. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने विद्यापीठाची स्थापना झाली. आज विद्यापीठाने देशाच्या सीमा ओलांडल्या असून कतारसारख्या देशातही विद्यापीठाने अभ्यासक्रम सुरू करणे ही गौरवास्पद बाब आहे. पुण्याचा ऐतिहासिक वारसा चित्ररूपाने पुणेकरांसमोर यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पद्धतीवर चर्चा होणे गरजेचे असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी अहवाल सादर करताना विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पदवी प्रदान समारंभात सन ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२० या वर्षात व त्यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील एकूण ३ हजार ८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्यापैकी ४३ स्नातकांना पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे आदींसह व्यवस्थापन परिषद सदस्य, शैक्षणिक परीषद सदस्य, अधिसभा सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक आणि पदवी प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीक्षांत मिरवणुकीने झाली. मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वार्ताच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करण्याची किंमत सरकारला मोजावी लागेल – प्रविण दरेकर

0


मुंबई, दि. १२ डिसेंबर – हे सरकार सातत्याने विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करतेय. परिक्षार्थी परीक्षा देण्यासाठी तयार असतात. पण आदल्या रात्री परीक्षा रद्द करण्याचे पाप हे सरकार करते. युवक आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ या सरकारने मांडलेला आहे. त्याची किंमत निश्चितपणे सरकारला मोजावी लागेल, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.
म्हाडाची परीक्षा आयत्या वेळेला गैरव्यवहार झाल्याच्या कारणावरून अचानक रद्द करण्यात आली, त्या पार्श्वभूमीवर दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, परीक्षांचा पूर्णपणे बट्टयाबोळ या सरकारने केला आहे. आरोग्य सेवकांच्या परीक्षेच्या बाबतीत असेच झाले. एजन्सीने घोळ घातला. त्याचबरोबर एमपीएससी परीक्षेच्या बाबतीत अशीच दुरवस्था झाली. सरकार कोणत्याही प्रकारे या परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत गंभीर नाही. किंबहुना या परीक्षांच्या माध्यमातून भ्रष्टाचार तसेच आपली लोक घेणे, त्या माध्यमातून भ्रष्टाचार करणे हे तर त्यामागे लपलेले नाही ना, अशा प्रकारचा संशयही दरेकर यांनी व्यक्त केला. याची जबाबदारी सरकारने घ्यायला पाहिजे. जे संबंधित असतील त्यांनी याचे प्रायश्चित्त घेतले पाहिजे. भविष्यात मुलांच्या आयुष्याशी खेळ होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे, अशी टीकाही त्यांनी केली

नव्या वर्षात महेश मांजरेकरांचा नवा मराठी चित्रपट

0

आशय, विषय आणि सादरीकरण यांत नेहमी वैविध्य राखीत महेश मांजरेकर यांनी अनेक कलाकृती केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा येणारा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी मेजवानीच असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘अंतिम’ या हिंदी चित्रपटाचं सिनेरसिकांकडून जोरदार कौतुक होतंय आणि आता नव्या वर्षात ते एक नवा मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ असं वेगळं शीर्षक असलेला हा चित्रपट २१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय. चित्रपटाच्या पोस्टरनंतर नेमके कोणते कलाकार या चित्रपटात झळकणार? कोणती भूमिका साकारणार? याकडे रसिक प्रेक्षकांच्या नजरा आहेत. ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी लिहिलेल्या ‘वरनभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथेवर हा चित्रपट आधारित असून चित्रपटाची पटकथा व दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी महेश मांजरेकर यांनी सांभाळली आहे.

अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांची निर्मिती तसेच वितरण करणाऱ्या ‘एन एच स्टुडिओज’ या भारतातल्या अग्रगण्य निर्मिती संस्थेने ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटाच्या प्रस्तुतीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘एन एच स्टुडिओज’ मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र हिरावत व श्रेयांस हिरावत यांनी केली असून सहनिर्मिती ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’च्या विजय शिंदे यांनी केली आहे.

महेश मांजरेकर यांच्या आजवरच्या चित्रपटांची लोकप्रियता लक्षात घेता ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट ही त्याला अपवाद नसेल. २१ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल

‘महागाई’वरील रांगोळ्यांतून व्यक्त झाल्या पुणेकरांच्या भावना

0

सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत आयोजन; रांगोळीतून झाला सामान्यांचा रोष व्यक्त : मोहन जोशी
पुणे : पेट्रोल-डिझेलचा उडालेला भडका, गॅस सिलेंडरमधील दरवाढ, गृहिणींचे कोलमडले बजेट, आरोग्य-शिक्षणाच्या महागल्या सुविधा, महागाईमुळे पिचलेला सामान्य माणूस, महिला-शेतकरी-नोकरवर्ग यांना होणार त्रास रांगोळीतून प्रतिबिंबित झाला. निमित्त होते, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत आयोजित महागाईवरील रांगोळी प्रदर्शन व स्पर्धेचे!

घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रातील आर्ट गॅलरी, बाळासाहेब ठाकरे कलादालन, बालगंधर्व कलादालन येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. बुधवारी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांच्या हस्ते प्रदर्शनातील उत्कृष्ट रांगोळींना बक्षिसे देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हासदादा पवार, सप्ताहाचे संयोजक मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश काँग्रेसचे संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, नगरसेविका लता राजगुरू, महिला अध्यक्षा संगीता तिवारी, कल्याणी साळुंके, भागुजी शिखरे, रफिक शेख, शाबीर खान, अयुब पठाण आदी उपस्थित होते.


या रांगोळी स्पर्धेत भाग्यश्री देशपांडे प्रथम, गौरी रोठे द्वितीय, मयूर दुधाळ तृतीय, तर ज्ञानेश्वरी कोतली, रचना गवळी, पूनम पोटे, महेंद्र मेटकरी यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. प्रथम क्रमांकास ७०००/- द्वितीय क्रमांकास ५०००/- तृतीय क्रमांकास ३०००/- व उत्तेजनार्थ प्रत्येकी १०००/- रुपये रोख पारितोषिक व प्रशस्तिपत्रक देण्यात आले.
विवेक वेलणकर म्हणाले, “महागाईमुळे देशातील जनतेला जगणेही महाग झाले आहे. चित्रकलेच्या, रांगोळीच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या महागाईविषयीच्या तीव्र भावना रेखाटलेल्या आहेत. पेट्रोल, डिझेलसह अन्य वस्तूंच्या वाढलेल्या किंमती सामान्यांसाठी अन्यायकारक आहेत. केंद्र व राज्य सरकारने महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.”
उल्हासदादा पवार म्हणाले, “रांगोळी, चित्रांतून विविध विषयांना हात घातला आहे. एक तासाच्या भाषणापेक्षा एकेक रांगोळी बोलकी आहे. महागाईने जनसामान्य त्रासलेला असताना केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी केवळ उत्सव साजरे करण्यात दंग आहेत. महागाई कमी करून सामान्यांना दिलासा देण्याचे काम मोदींनी करावे व अच्छे दिन प्रत्यक्षात आणावेत.”
मोहन जोशी म्हणाले, “सप्ताहाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांना जोडण्याचे काम करत आहोत. सामान्य माणूस महागाईचे चटके सहन करत आहे. महागाईच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी काँग्रेसला पुन्हा आणण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ‘अच्छे दिन’चे दिवास्वप्न दाखवले. ते खोटे ठरले. रांगोळी स्पर्धेतून कलाकारांना व्यक्त होण्यास वाव मिळाला.”
सूत्रसंचालन संगीता तिवारी यांनी केले. आबनावे कला महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्याणी साळुंखे यांनी आभार मानले.  

अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

0

 पुणे-       भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी चे टेक्नोलॉजी अनेब्लिंग सेंटर व नीती विद्यापीठ  मंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित केलेल्या नॅशनल लेवल आयडीएशन ड्राईव्ह इन हेल्थ अँड अलाईड सायन्सेस २०२१ स्पर्धेमध्ये अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे महाविद्यालयाच्या एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले. शुभम मोहिते व त्याच्या टीमने या राष्ट्रीय पातळीवरील आयडीएशन ड्राईव्ह इन हेल्थ अँड अलाईड सायन्सेस २०२१ स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून प्रथम पारितोषिक पटकाविले.डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी चे टेक्नोलॉजी अनेब्लिंग सेंटर तर्फे नुकतीच हि स्पर्धा घेण्यात आली. आयडीएशन ड्राईव्ह इन हेल्थ अँड अलाईड सायन्सेस २०२१  हि या स्पर्धेची संकल्पना होती. या स्पर्धेमध्ये वॉटर अँड सॅनिटेशन, सॉलिड वेस्ट अँड बायो वेस्ट मॅनेजमेंट  या संकल्पनेवर सादरीकरण केले. या स्पर्धेमध्ये   पात्रता फेरी, उपांत्यपूर्व फेरी व अंतिम फेरी अश्या विविध टप्प्यातून अंतिम फेरीमध्ये  अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे महाविद्यालयाच्या एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग विभागातील शुभम व त्याच्या टीमने प्रथम पारितोषिक पटकाविले. या विद्यार्थ्यांनी प्रा. सागर गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचे सादरीकरण केले या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक  मिळाल्याबद्दल संस्थेच्या सरचिटणीस मा.सौ. प्रमिला गायकवाड व डॉ .एन.बी.पासलकर सदस्य, महाविद्यालय विकास समिती, डॉ. प्रभाकर देशमुख देशमुख माजी सनदी अधिकारी,संयुक्त चिटणीस अँड भगवानराव साळुंखे,खजिनदार श्री. विजयसिंह जेधे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे , सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

सनसिटी रस्त्यावरची वाहतूक कोंडी सोडण्यासाठी रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात

0

, पुणे –
सिंहगड रस्त्यावरील संतोष हॉल चौकातून सनसिटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. यामुळे शिवपुष्प पार्क ते क्राऊन बेकरी या भागात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
शिवपुष्प पार्क ते क्राऊन बेकरी रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक असलेली जागा महनगरपालिकेच्या ताब्यात आली असून त्याचे काम सुरू झाले आहे. या कामाची सुरुवात जागा मालक हर्षल चरवड यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली. या रस्त्यावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी स्थानिक नगरसेविका मंजुषा नागपुरे आग्रही होत्या. यासाठी नागपुरे यांनी पालिका प्रशासनाचे अधिकारी तसेच स्थानिक जागा मालक यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य करण्याचे आश्वासन शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी देत संबधित अधिकाऱ्यांना त्यासाठीच्या सूचना देखील दिल्या होत्या.
या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम शनिवारी सुरू झाले. हे काम सुरू झाल्याने आपल्या प्रयत्नांना यश आल्याची भावना नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केली. या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जागामालक शैलेश बाळासाहेब चरवड, हर्षल शिवाजी चरवड यांचे यांचे विशेष सहकार्य मिळाले. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २८ गुंठे जागा चरवड परिवाराने दिली आहे. या कामाची सुरुवात हर्षल चरवड यांनी नारळ फोडून केली. हे काम आता सुरू झाले असून लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सोडविणे ही आमची जबाबदारी असून त्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. पर्यायी रस्त्यांची कामे देखील सुरू असून त्यासाठी आवश्यक तो निधी देखील उपलब्ध करून दिला जात असल्याचे नागपुरे यांनी सांगितले

विकास आराखड्यामध्ये (डीपी) असलेले या परिसरातील सर्व रस्ते, पालिकेने लक्ष घालून सुधारले पाहिजेत. आवश्यक त्या जागा ताब्यात घेऊन रस्ते विकसित करणे यासाठी पालिकेने युद्ध पातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे.
– मंजुषा नागपुरे, स्थानिक नगरसेविका*

स्टार्ट अप कार्यक्षेत्रामध्ये  पुणे आणि मुंबई यांच्यातील निकोप  स्पर्धा कायम राहिली पाहिजे : पीयूष  गोयल

पुणे-सावित्रीबाल फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्यामुळे पुण्यातील या विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्क पार्कमध्ये महिला उद्योजकांनी त्यांचे कार्य दाखवणे अत्यंत समर्पक आहे ,असे  वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. पीयूष गोयल यांनी आज पुणे विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्कला भेट दिली.

महाराष्ट्रात स्टार्ट-अप संस्कृतीचे नेतृत्व महिलांनी करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत  “आपण उद्योजकीय चौकट जिवंत ठेवली पाहिजे,” असे ते म्हणाले. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामध्ये  स्टार्ट-अपमध्ये कार्यक्षेत्राचा  भाग म्हणून नोंदणीकृत  46 टक्के एककांमध्ये महिला भागीदार आहेत त्याचप्रमाणे श्रेणी 2 आणि श्रेणी 3 शहरांचा  स्टार्टअप्समध्ये 45 टक्के वाटा आहे, ही बाब उत्साहवर्धक आहे .” असे त्यांनी सांगितले.

इनक्यूबेटरची तुलना पालकांशी  करताना मंत्री म्हणाले की, हे दोघेही मार्गदर्शक आणि समर्थक असून त्यांची  स्टार्ट-अप्सना गरज आहे.“आज आपल्याकडे संपूर्ण भारतभर स्टार्टअप कार्यक्षेत्र आहे. भारतात 50000 पेक्षा जास्त स्टार्ट अप्स नोंदणीकृत असून हे जगातील तिसरे  सर्वात मोठे  स्टार्ट अप कार्यक्षेत्र  आहे”, असे ते म्हणाले.

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागामध्ये  केलेल्या नोंदणीनुसार पुण्यात 3200 तर मुंबईत 3274 स्टार्ट-अप्स  आहेत, अशी माहिती देत मंत्र्यांनी  पुणे-मुंबईमधील ही निकोप  स्पर्धा सुरू ठेवावी, अशी सूचना केली.

पुण्यात असलेले उद्योग, माहिती आणि तंत्रज्ञान  तसेच उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांमुळे  स्टार्ट-अपला पाठबळ देण्यात  पुण्याच्या अनोख्या योगदानाचे वर्णन करत गोयल म्हणाले की, स्टार्ट-अप कार्यक्षेत्रामध्ये  आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याची वेळ आली आहे.

स्टार्ट-अप्सच्या भरभराटीसाठी, अकादमी, उद्योग आणि संशोधन यांच्या सहकार्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भारतातील 79 युनिकॉर्नपैकी 4 पुण्यातील आहेत ही  आनंददायी बाब आहे, असे ते म्हणाले. पुणे विद्यापीठातील विज्ञान तंत्रज्ञान  पार्कमध्ये 153  स्टार्ट अप्स  आहेत.

आज  विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्कमध्ये  दिव्यांग लोकांसाठी दाखवण्यात आलेले काही नवनवीन शोध उत्कंठावर्धक होते हे लक्षात घेऊन,शेतकरी, दिव्यांग आणि गरीबांसाठी  आणखी नवनवीन संशोधन केले जाईल  अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

सरकारच्या हस्तक्षेपामुळे उद्योगांची प्रगती नेहमीच खुंटते यावर भर देत मंत्र्यांनी साठ  आणि सत्तरच्या दशकात सरकारी हस्तक्षेपामुळे औद्योगिक प्रगती खुंटल्याचे उदाहरण दिले. आज कोणताही युनिकॉर्न केवळ सरकारी पाठिंब्याच्या आधारे या स्थितीपर्यंत पोहोचला नसता, असे ते म्हणाले.  स्टार्ट-अपची रचना उद्योजकांनी तयार केली असेल आणि सरकार केवळ सहाय्यासाठी सुविधा देण्याच्या स्वरूपात असेल तरच पुढे जाण्याचा मार्ग सुकर होईल, असे त्यांनी सांगितले. 

कोवॅक्सिनसारखे काही उपक्रम हे सरकार आणि उद्योग सहकार्याचे उत्तम उदाहरण आहेत असे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणाचा समारोप करताना गोयल म्हणाले की, भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात परंतु या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीनें  शेतकरी, दिव्यांग आणि गरीब यांच्यासाठी अत्यंत किफायतशीर उपायांसह अब्जावधी उद्योजकही आहेत.

पार्श्वभूमी

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि पुणे विद्यापीठ यांनी संयुक्तपणे विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजक पार्क, पुणे,स्थापन केले आहे. इतर विविध मंत्रालयांव्यतिरिक्त या पार्कला अलीकडेच स्टार्टअप इंडियाच्या बीजनिधी (सीड फंड) कार्यक्रमांतर्गत निधी देण्यात आला आहे.

स्टार्टअप इंडियाचा बीजनिधी (सीड फंड) कार्यक्रम हा वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत एक प्रमुख कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम संपूर्ण भारतातील स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि अॅग्रिकल्चर, पुणे चे प्रशांत प्रशांत गिरबाने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, आणि महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि  उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

स्वर्णिम विजय दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शन

0

पुणे, डिसेंबर : अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या वतीने स्वर्णिम विजय दिनानिमित्त (१६ डिसेंबर) भारतीय सेनेच्या विजयगाथेवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती परिषदेचे प्रभारी योगेश गोगावले आणि महासचिव वीरेंद्र महाजनी यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.
बांगलादेश निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त म्हात्रे पूलाजवळील डी. पी. रस्त्यावरील सिद्धी गार्डन येथे १६ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत प्रदर्शन होणार आहे. ते सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. प्रदर्शनापूर्वी सकाळी साडेनऊ वाजता ताथवडे उद्यानातील हुतात्मा प्रदीप ताथवडे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून पथ संचलनाला प्रारंभ होणार आहे.
कारगील युद्धात अतुलनीय पराक्रम आणि जबरदस्त शौर्यामुळे महावीर चक्र मिळवलेले भारतीय पायदळाचे कमांडो नायक दिगेंद्र कुमार उर्फ कोब्रा कमांडो विजय मशाल घेऊन संचलनात सहभागी होणार असून, ते या संपूर्ण कार्यक्रमाचे नेतृत्व करणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सकाळी दहा वाजता सिद्धी गार्डन येथे विजय स्तंभाला मानवंदना देऊन प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) महासंचालक (एसीई) प्रवीणकुमार मेहता, एआरडीईचे संचालक डॉ. व्ही. व्यंकटेश्वर राव, आरएनडी इंजिनिअरचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बॅटल ऑफ हिली (ईस्ट पाकिस्तान), बांगलादेशी निर्वासित, बॅटल ऑफ लोंगोवाल, आयटेशन तंगाली (पॅराशूट ड्रॉप), बॅटल ऑफ शकरगड, पाकिस्तान सैन्याची शरणागती, शरणागतीवर स्वाक्षरी, परमवीर चक्र विजेत्यांची माहिती आदी शंभरहून अधिक छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
डीआरडीओ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या प्रदर्शनाच्या संयोजनात सहभागी होणार आहेत.

पुणेकरांनो, हॉर्न नॉट ओके प्लीज…

0
  • लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, पुणे पोलीस (वाहतूक शाखा) आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्यावतीने पुण्यातील १० चौकांमध्ये एकाच वेळी नो हॉंकिंग डे निमित्त हॉन एक दिवस बंद ठेवण्याबाबत जनजागृतीचे आयोजन

पुणे :  नका वाजवू जोरात हॉर्न… आपली तब्येत राहिल छान, हॉर्न नॉट ओके प्लीज…एक, दोन, तीन, चार नो हॉर्न बार बार…ऐका हो ऐका हॉर्न वाजवू नका… अशा घोषणा देत पुणेकरांनी नो हॉंकिंग डे अर्थात नो हॉर्न डे एकाच वेळी १० चौकांमध्ये राबविला. टिळक चौक  (अलका टॉकीज चौक) येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमात पुणे वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सहभाग घेत पुणेकरांनो हॉर्न वाजवू नका, असे सांगण्यासोबतच वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले. 
लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, पुणे पोलीस (वाहतूक शाखा) आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्या वतीने नो हाँकीग डे अर्थात पुण्यात हॉर्न ठेवा एक दिवस बंद अशी संकल्पना राबविता जनजागृती आली. पुण्यातील १० चौकांमध्ये एकाच वेळी नो हाँकींग डे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे मुख्य जनजागृतीपर कार्यक्रम झाला. यावेळी पुणे पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे, विश्रामबाग पोलीस स्टेशन वाहतूक विभागाचे चंदनशिव, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू, लाईफ सेव्हिंग फाऊंडेशनचे देवेंद्र पाठक, साई पॅकेंजिंगचे शंतनु प्रभुणे आदी मान्यवर उपस्थित होते. 
राहुल श्रीरामे म्हणाले, पुण्यामध्ये वाहतूक नियोजन करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. तब्बल ४ हजार वाहनांच्या मागे १ कर्मचारी अशी सध्या संख्या आहे. पुणे शहरात ९८० कर्मचारी ४६ लाख वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन करीत आहेत. लोकसंख्येपेक्षा जास्त वाहने असलेले पुणे हे एकमेव शहर आहे. एक वाहन दिवसातून ५ ते १० वेळा हॉर्न वाजविते. त्यामुळे दिवसभरात १ कोटी पेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजविला जातो. ध्वनीप्रदूषणाची समस्या देखील महत्वाची असून त्यावर वेळेत उपाययोजना करायला हवी. 
मकरंद टिल्लू म्हणाले, वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे पुणेकरांना उच्च रक्तदाब, हदयरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणा, नैराश्य आणि बहिरेपणा या त्रासांचा देखील सामना करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी नो हॉर्न ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम पाळून आपल्या कृतीने इतरांची वृत्ती बदलण्याचा आपण प्रयत्न करुया. 
देवेंद्र पाठक म्हणाले, पुण्यात ९० टक्के वेळा जे हॉर्न वाजविले जातात, हे अनावश्यक असतात. बहुतांशी पुणेकर हे दिवसाला दीड ते दोन तास ट्रॅफिक मध्ये असतात आणि या अनावश्यक हॉर्नमुळे त्यांना ब-याचश्या दुष्परिणामांना सामारे जावे लागते, त्यामुळे नो हॉर्न या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोथरुड, विश्रांतवाडी, पाषाण, बाणेर आणि जंगली महाराज रस्ता येथे एकाच वेळी जनजागृती करण्यात आली. मी स्वत: गेले अनेक महिने हॉर्न न वाजविता वाहन चालवित आहे. हॉर्न न वाजविता वाहन चालविणे शक्य असून तसा प्रयत्न आपण करायला हवा, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पद्माकर पुंडे यांनी केले.

स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

पुणे दि.१२ –  विद्यापीठाची पदवी प्राप्त केल्यानंतर स्नातकांनी आपल्या प्रदेशातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तेथील भाषेत विज्ञान – तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान उपलब्ध करून दिल्यास ती देशाची मोठी सेवा ठरेल आणि नव्या पिढीला त्यामुळे प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय  विद्यापीठाच्या १८ व्या पदवीदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला कुलपती डॉ.एस.बी. मुजुमदार, मुख्य संचालिका आणि  प्र-कुलगुरू डॉ.विद्या येरवडेकर,  कुलगुरू डॉ.रजनी गुप्ते, कुलसचिव डॉ.एम.एस.शेजुळ, परीक्षा नियंत्रक श्रद्धा चितळे आदी उपस्थित होते.

श्री.कोश्यारी म्हणाले, शिक्षण क्षेत्रात संशोधनासोबत सृजनशीलतेलाही महत्व आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला महत्व असलेल्या युगात मूल्याची जाण ठेवणेही महत्वाचे आहे. विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा आणि मूल्यांच्या विकासावरही भर द्यावा. नव्या शैक्षणिक धोरणात या बाबींवर भर देण्यात आला आहे.  विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण प्रादेशिक भाषेत देताना सोबत इंग्रजीचे शिक्षण दिल्यास त्यांचा विकास चांगल्याप्रकारे होईल. स्नातकांनी त्यासाठी प्रादेशिक भाषेत पुस्तके लिहिण्याचे काम केल्यास ती समाजाची मोठी सेवा ठरेल.

सिम्बॉयसिस विद्यापीठ विश्वबंधुत्वाचे प्रतीक आहे. एकमेकांना सहकार्य करण्यासाठी आपण जागतिक पातळीवर एकत्र येणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवर प्रगतीची झेप घेताना विद्यार्थ्यांनी आपला देश, राज्य आणि गावाच्या प्रगतिकडेही लक्ष द्यावे. जगाच्या कल्याणाचा विचार करताना देशाच्या उत्कर्षाचा विद्यार्थ्यांनी प्राधान्याने विचार करावा. शैक्षणिक प्रगतीला विनयाची जोड दिल्यास आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन स्वीकारल्यास जीवनात अधीक चांगले यश संपादन करता येईल, असे ते म्हणाले.

यावेळी केंद्रीय उच्च शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा संदेश दाखविण्यात आला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचा उपयोग देशाच्या उन्नतीसाठी करावा. विद्यार्थ्यांपुढे अनेक आव्हाने आहेत. मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे त्यांनी या आव्हानांवर मात करीत यश संपादन करावे असे त्यांनी सांगितले. त्यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून  शुभेच्छा दिल्या.

डॉ.मुजुमदार म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्राला भारतीय चेहरा मिळाला आहे. भारतीय ज्ञानप्रवाहाचा शिक्षणात समावेश करताना ‘वसुधैव कुटुंबकम’ची भावनाही त्यात समाविष्ट आहे. सिम्बॉयसिस विद्यापीठाने या धोरणानुसार वाटचाल सुरू ठेवली आहे. साहचर्य आणि स्वावलंबन हा विद्यापीठाचा आत्मा आहे. सर्व भेद बाजूला सारून वैश्विक भावनेचा संदेश देताना पर्यावरण संवर्धनासारख्या महत्वाच्या विषयावरही विद्यापीठाने लक्ष दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीमती येरवडेकर यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती दिली. डॉ. गुप्ते यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला.

राज्यपाल महोदयांच्या हस्ते विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि विविध पुरस्कार  प्रदान करण्यात आले, तसेच विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

सुमारे ४०० मी लांबीचा रस्ता पूर्णतः वाहनासाठी बंद करून पादचारी दिन केला साजरा

0

पुण्यातील पहिला पुणे महापौर पादचारी दिन साजरा

पादचारी दिनात दिलासा पुणेकरांचा उत्साह
पुणे – लक्ष्मी रस्त्याचा झालेला खुला मॉल, शहरात ठिकठिकाणी सजलेले रस्ते, पादचारी मार्गांच्या सोडवलेल्या समस्या आणि रस्त्यावर चालण्यासाठी पुणेकरांचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद. अशा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी पुण्यातील पहिला पुणे महापौर पादचारी दिन साजरा करण्यात आला. शिवाय या पादचारी दिनासोबतच पुणे पादचारी दिन साजरा करणारे देशातील पहिले शहर बनले.

पुणे शहरातील ठिकाणी ५०० मी लांबीचे रस्ते पादचारीपूरक निर्माण करणे, चौक पादचारी सुरक्षितता लक्षात घेऊन सुधारणा कामे करणे आणि सुरक्षित मिड ब्लॉक क्रॉसिंग सुधारणा कामे करणे या पादचारी अनुषंगे कामांचा समावेश होता.सर्वात महत्वाचा उपक्रम लक्ष्मी रस्त्यावर “ओपन स्ट्रीट मॉल” ही संकल्पना घेऊन नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौक या सुमारे ४०० मी लांबीचा रस्ता पूर्णतः वाहनासाठी बंद करून पादचारी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला. सकाळी ११ वाजता मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात झाली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रमकुमार कुणाल खेमणार यांचे उपस्थित पादचारी कामांची पाहणी केली.

संपूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूचे फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे केले, रस्त्याचे दोन्ही कडेला रंगीत रचना निर्माण केल्या व त्यामध्ये पथारी व्यावसायिक यांना जागा देण्यात आली, रस्त्यावर विविध ठिकाणी आकर्षक झाडे, फुले यांच्या कुंड्या ठेवणेत आल्या.रस्त्यावर लहान मुलांना खेळण्याचे स्वरूपात प्रशिक्षण सेफ किड्स संस्थेद्वारे सोय केली होती.सकाळी ११ ते संध्याकाळी ४ पर्यंत या संकल्पनेस प्रतिसाद दिला. व्यापारी, पथारी व्यावसायिक व नागरिकांनी या संकल्पनेस पाठिंबा दिलालोकांच्या सूचना व प्रतिक्रिया यातून यापुढे पुणे शहरात पादचारी सुविधा आणखी चांगल्या स्वरूपात निर्माण करणेचा प्रयत्न राहणार आहे.

पादचारी दिन हे केवळ निमित्त : महापौर मोहोळ

पादचारी दिन हे केवळ एकदिवसीय निमित्त असले तरी या निमित्ताने पादचाऱ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी, शहरातील पादचारी मार्गांची दुरुस्ती व्हावी, झेब्रा क्रॉसिंग रंगवले जावेत, भुयारी मार्गांची दुरुस्ती व्हावी, भुयारी मार्गातील विद्युत व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणा सुरु व्हावी, असे अनेक उद्देश या आयोजनामागे होते, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

पाषाण-सुस रस्त्यावर ‘स्ट्रीट फॉर पीपल’

केंद्र शासनाच्या उपक्रमात भाग घेऊन पाषाण-सुस रस्त्यावर ‘स्ट्रीट फॉर पीपल’ ही संकल्पना निर्माण केली आहे. अभिनव आर्ट कॉलेज ते मुंबई-पुणे हायवे पर्यंत सुमारे ५०० मी लांबीचा रस्ता विकसित केला आहे. या रस्त्यावर वाहनासाठी तीन लेन, स्वतंत्र सायकल मार्ग, प्रशस्त पादचारी मार्ग आणि रस्त्याच्या कडेला ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था निर्माण केली असून व्यायामाची साधने, स्केट बोर्ड खेळणेची सुविधा, रोलर स्केटिंग खेळणेची सुविधा, लहान मुलांना अर्बन ९५ संकल्पनेवर आधारित खेळणेची साधने, फ्लोअर गेम उपलब्ध करून देणेत आली आहेत.