Home Blog Page 201

तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांची आत्महत्या:जलजीवन मिशनची थकबाकी न मिळाल्याने उचलले टोकाचे पाऊल

मुंबई- जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत काम केलेल्या तरुण कंत्राटदाराने थकबाकी न मिळाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 35 वर्षीय हर्षल पाटील असे या कंत्राटदाराचे नाव आहे. सरकारच्या विविध विभागाकडून सुमारे दिड कोटी रुपयांची बिले थकल्याने आपल्या शेतात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आता या प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, खासदार नीलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात सरकारवर टीका केली आहे. सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचे संवेदनशील वास्तव, असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. तर ही आत्महत्या नाही सरकारने घेतलेला बळी असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

सरकारच्या लोकप्रिय योजना मागचे असंवेदनशील वास्तव – जितेंद्र आव्हाड सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू, तरुण कंत्राटदार.त्याने सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केलं.पण… काम झालं, बिलं दिली, पण बिचाऱ्याला पैसे मिळालेच नाहीत! त्याचे सरकारकडे ₹1.40 कोटी इतकी थकबाकी होती. पैसे मिळत नाहीत म्हणून त्याने ₹65 लाखांचं कर्ज काढलं…आणि शेवटी आर्थिक तणावात येऊन फास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं! पाठीमागे पत्नी, लहान मुलगी, वृद्ध आईवडील, आणि दोन लहान भाऊ…यांना ठेवून.”लाडकी बहीण योजना” – एक लोकप्रिय योजना असली तरी ती आर्थिकदृष्ट्या राज्याला पेलवणारी योजना नाहीये.एकीकडे या योजनेसाठी सरकारनं कोट्यवधी रुपयांचा निधी बाजूला काढला.राज्यावर कर्जाचा बोजा वाढवला. दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा खात्यांची हजारो कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांचं बिल अडवली गेली आहेत.कारण राज्य सरकारकडे ही बिलं देण्यासाठी पैसेच नाहीयेत. मी मागे म्हणालो होतो, “काही महिने जाऊ द्या..कितीतरी कंत्राटदार आत्महत्या करतील…!” दुर्दैवाने त्याची सुरुवात झाली आहे. आज हर्षल पाटील गेलाय,पण उद्या अजून किती जण या दुर्दैवी फेऱ्यात अडकतील,याची कल्पनाच न केलेली बरी. हे केवळ आर्थिक संकट नाही – तर प्रशासकीय अपयश देखील आहे! निवडणुका जिंकण्यासाठी लोकांना मोफत सुविधा द्यायच्या, पण त्या माग आवश्यक असणारा आर्थिक ताळेबंद साधायचा नाही. हर्षल पाटील यांची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक दु:खद घटना नाही – ती एक इशारा आहे.राज्य शासन, प्रशासन आणि समाजाने ही गोष्ट गांभीर्याने घेणं गरजेचं आहे.

अनिल अंबानींच्या 50 कंपन्यांवर ED चे छापे:येस बँकेतून झालेल्या ३००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणातून कारवाई

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित ३५ हून अधिक ठिकाणी आणि ५० कंपन्यांवर छापे टाकले. येस बँकेतून झालेल्या ३००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी, २४ जुलै रोजी दिल्ली आणि मुंबईत टाकण्यात आलेला हा छापा सुरू आहे.पीटीआय या वृत्तसंस्थेच्या मते, सीबीआयने नोंदवलेल्या दोन एफआयआर आणि सेबी, नॅशनल हाऊसिंग बँक, बँक ऑफ बडोदा आणि नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी (एनएफआरए) सारख्या एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.छाप्याच्या बातमीनंतर, अनिल अंबानींच्या दोन प्रमुख कंपन्या, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवरचे शेअर्स ५% पर्यंत घसरले आहेत.काही दिवसांपूर्वी, स्टेट बँकेने अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि स्वतः अनिल अंबानी यांना “फ्रॉड” म्हणून घोषित केले होते.एसबीआयचे म्हणणे आहे की आरकॉमने बँकेकडून घेतलेल्या ३१,५८० कोटी रुपयांच्या कर्जाचा गैरवापर केला. यापैकी सुमारे १३,६६७ कोटी रुपये इतर कंपन्यांच्या कर्जाची परतफेड करण्यात खर्च झाले. १२,६९२ कोटी रुपये रिलायन्स ग्रुपच्या इतर कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आले.एसबीआयने असेही म्हटले आहे की आम्ही या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहोत. याशिवाय, अनिल अंबानींविरुद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) मुंबई येथे वैयक्तिक दिवाळखोरीची कारवाई देखील सुरू आहे.

मात्र २०१७ ते २०१९ दरम्यान अनिल अंबानींशी संबंधित रिलायन्स ग्रुप कंपन्यांना येस बँकेने दिलेल्या सुमारे ३,००० कोटी रुपयांच्या कर्जाशी हा छापा संबंधित असल्याचेही सांगण्यात आले आहे.ईडीच्या सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की ही कर्जे बनावट कंपन्या आणि ग्रुपच्या इतर युनिट्सकडे वळवण्यात आली होती. तपासात असेही उघड झाले आहे की येस बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच देण्यात आली असावी. ईडी म्हणते की ही एक “सुविचारित आणि सुनियोजित” योजना होती, ज्या अंतर्गत बँका, भागधारक, गुंतवणूकदार आणि इतर सार्वजनिक संस्थांना चुकीची माहिती देऊन पैसे हडप करण्यात आले. तपासात अनेक अनियमितता आढळून आल्या,

जसे की:कमकुवत किंवा पडताळणी नसलेल्या कंपन्यांना कर्ज देणे.
अनेक कंपन्यांमध्ये एकाच संचालकाचा आणि पत्त्याचा वापर.
कर्जाशी संबंधित आवश्यक कागदपत्रांचा अभाव.
बनावट कंपन्यांना पैसे हस्तांतरित करणे.
जुने कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज देण्याची प्रक्रिया (कर्ज सदाबहार).

सीबीआयने दोन प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवला होता. ही प्रकरणे येस बँकेने रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडला दिलेल्या दोन वेगवेगळ्या कर्जांशी संबंधित आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये सीबीआयने येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांचे नाव घेतले होते.यानंतर, नॅशनल हाऊसिंग बँक, सेबी, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी आणि बँक ऑफ बडोदा यासारख्या इतर एजन्सी आणि संस्थांनीही ईडीशी माहिती शेअर केली. आता ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाच्या महायज्ञाची विक्रमी नोंद


एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ तर्फे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा सन्मान

मुंबई:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भान ठेवत भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांनी दोन विश्व विक्रम प्रस्थापित केले. या महारक्तदान उपक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली असून त्याबद्दल एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या प्रतिनिधींनी बुधवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना सन्मानित केले . एका दिवसात पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील सर्व १२२१ मंडलांमध्ये सर्वाधिक १०८८ रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा आणि सर्वाधिक ७८ हजार ३१३ युनिट्स रक्ताचे संकलन, असे दोन विश्वविक्रम केल्याबद्दल एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या प्रतिनिधींनी श्री. चव्हाण यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. प्रदेश भाजपा आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी न्यासाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स चे वरिष्ठ परीक्षक संजय भोला, वरिष्ठ परिक्षक सीमा मन्नीकोट यांच्या हस्ते श्री. चव्हाण यांना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, राजेश पांडे , विजय चौधरी , मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे , माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी एकाच दिवशी झालेल्या महारक्तदान उपक्रमाने दोन जागतिक विक्रम केले ही पक्षासाठी अभिमानास्पद आणि आनंदाची बाब आहे. सातत्याने समाजासाठी काम करण्याच्या पक्ष संघटनेच्या शिकवणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अव्याहतपणे कार्य करत आहेत त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्याची संधी या शिबिरामुळे सर्वांना मिळाली .रक्तदात्यांनीही सामाजिक जाणीवा जागृत ठेवत रक्तदानाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना समर्पण भावाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल श्री. चव्हाण यांनी रक्तदात्यांचे आभार मानले.संघटित शक्तीमुळेच रक्तदानाच्या या महायज्ञाने दोन विक्रमांना गवसणी घातली या शब्दांत कौतुक करत श्री. चव्हाण यांनी पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी , प्रदेश कार्यलायातील कर्मचारी यांच्या योगदानाची दखल घेतली. पक्षकार्यकर्त्यांचे हे यश असून मी भाजपा प्रदेशाध्यक्ष या नात्याने प्रतिनिधी म्हणून प्रशस्तीपत्राचा स्विकार केला असेही त्यांनी नमूद केले.

मुंबई विद्यापीठातील 87 अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यास मान्यता

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

उच्च व तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न

मुंबई, दि. २३ जुलै – मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या ८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या आहेत. या निर्णयास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

आज मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत माहिती दिली.या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांसाठी १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. या अंतर्गत आकृतीबंध अद्ययावत करणे, नियुक्ती नियम (Recruitment Rules) सुधारित करणे आणि अनुकंपा तत्वावरील भरती १०० टक्के करण्यावर भर देण्यात आला आहे.याच पार्श्वभूमीवर
मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित नियुक्त्यांचा आढावा घेऊन त्या संदर्भात कालबद्ध नियोजनानंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात आल्या आहेत. तसेच, सध्या रिक्त असलेल्या अनुकंपाच्या जागांचा पुन्हा आढावा घेऊन तातडीने उच्च व तंत्र शिक्षण विभागातील अशा सर्व रिक्त जागा १०० टक्के भराव्यात, असे निर्देशही मंत्री श्री.पाटील यांनी बैठकीत दिले.
00000

जेएनयू’मध्ये मराठीचा झेंडा आता फडकणार! कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्रमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४ जुलैला उद्घाटन

0

मुंबई (प्रतिनिधी)- दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) मराठी भाषेसाठी स्वतंत्र अध्यासन केंद्र असावं, ही कल्पना १७ वर्षांपूर्वी मांडली होती. पण ही कल्पना वर्षानुवर्षं कागदावरच राहिली. अनेक परिपत्रकं, बैठकं, आश्वासनं झाली. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी कधीच झाली नाही. मराठी विद्यार्थ्यांच्या मनात एक खोल प्रश्न सतत भिरभिरत राहिला: “आपल्या भाषेला इथे स्थान कधी मिळणार?”आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रखडलेल्या प्रकल्पाला नवसंजीवनी दिली. ‘प्रलंबित राहिलेलं काहीही अपूर्ण ठेवायचं नाही’ या त्यांच्या कार्यशैलीनुसार त्यांनी ‘कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्रा’चा प्रस्ताव पुन्हा पुढे रेटला आणि केवळ काही महिन्यांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत हे केंद्र प्रत्यक्षात आणलं. २४ जुलै रोजी फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज सामरिक व संरक्षण विशेष अध्यासन केंद्राच्या स्थापनेचा कोनशिला समारंभही पार पडणार आहे.‘कुसुमाग्रजांच्या नावाचे मराठी भाषेचे केंद्र सुरू होणे म्हणजे मराठीचा अभिमान आणि अस्मिता यांचाच गौरव आहे. ‘जेएनयू’मध्ये मराठी अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय २००५ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. परंतु आजवर मराठी भाषेसाठी ‘मेळावे’, ‘सभासद संमेलने’, ‘भाषणाचे गाजावाजा’ असे उपक्रम भरपूर झाले. तथापि प्रत्यक्ष धोरणात्मक निर्णय, शैक्षणिक पातळीवरील प्रयत्न आणि प्रशासकीय कृतिशीलता कमीच होती. याउलट फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अनेक ठोस निर्णय झाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी दिल्लीत अहर्निश प्रयत्न केले गेले.३ ऑक्टोबर २०२४ला ‘अभिजात मराठी दिवस’ म्हणून जाहीर केला असून मराठी अभिजात सप्ताहदेखील साजरा होणार आहे. मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी उच्च शिक्षणात तिचा वापर सुरू केला. मराठी माध्यमातून अभियांत्रिकी शिक्षण सुरू करणे, कृषी आणि तांत्रिक शिक्षण मराठीतून देण्याचा निर्णय असेल वा ‘एमपीएससी’च्या सर्व परीक्षा मराठीतून घेण्याचा क्रांतिकारी निर्णय असेल; हे सगळेच निर्णय एकात्मिक दृष्टिकोनातून झाले. भाषिक अस्मितेची व्याख्या केवळ घोषणांपुरती न ठेवता ती शिक्षण, प्रशासन आणि संशोधन यांच्यात प्रत्यक्ष उतरविण्याची ही दिशादर्शक वाट आहे. मराठीचा वापर शासकीय व्यवहारात सक्तीने लागू करण्याचा निर्णय मराठीप्रेमी सरकारने घेतला. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठीतून संवादही आता अनिवार्य केला गेला आहे.

महाराष्ट्र सरकारने मराठीसाठी जी ठोस पावले उचलली, ज्या उपाययोजना राबवल्या, त्या प्रत्यक्षात आणताना, त्याचा राजकीय लाभ काय होईल किंवा भाषिक मतांच्या समीकरणांची गणिते मांडण्यासाठी नव्हे. ठाकरे बंधूना निवडणुका जवळ आल्या की मुंबईतील मराठी भाषिकांची आठवण होते आणि मराठी भाषेची गळचेपी होत असल्याचा त्यांना साक्षात्कार होतो. निवडणुका झाल्या की पुन्हा मायमराठीचा विषय ते गुंडाळून बाजूला ठेवून देतात. मात्र डबल इंजिन सरकारची कार्यपद्धती तशी नाही. सरकारची भूमिका ही केवळ प्रशासकीय नाही, तर ती सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्याही परिवर्तनाची आहे.

जेएनयूच्या भिंती आता शिवरायांचा जयघोष ऐकतील!

कधी काळी जेएनयू हे ‘डाव्या विचारांचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखले जात होते. याच विश्वविद्यालयात भारतविरोधी घोषणांनी भिंती थरथरल्या होत्या. “भारत तेरे टुकड़े होंगे” आणि “अफझल हम शर्मिंदा हैं…” असे घोष, तिरंग्याचा अवमान, आणि ‘आजादी’च्या गोंगाटात देशाच्या अस्मितेलाच प्रश्नांकित करण्यात आलं होतं.

मात्र आता तिथे नवा अध्याय लिहिला जातोय. याच जेएनयूच्या परिसरात आता छत्रपती शिवाजी महाराज सामरिक व संरक्षण विशेष अध्यासन केंद्र उभं राहतंय. एका अशा हिंदू राष्ट्रनायकावर अभ्यास होणार आहे, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, मुघल-सुलतानशाहीला ललकारी दिली आणि लोकशाही, धर्मनिरपेक्षतेचा खरा पाया घातला. ही केवळ घटना नाही, ही इतिहासाने केलेला काव्यात्म न्याय आहे.

ज्येष्ठ कलाकारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन, राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजना

0

मुंबई, दि. 23 दि. २३ ( प्रतिनिधी ) : राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या 100 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा पाच हजार रुपये इतके मानधन दिले जाणार आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी 31 जुलैपर्यंत ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन मुंबई शहरचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवनंदा लंगडापूरे यांनी केले आहे.

या योजनेसाठी लाभार्थ्याचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असावे. तसेच दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे करण्यात आली आहे. कला व साहित्य क्षेत्रात किमान 15 वर्षांचे योगदान आवश्यक असून वयोमानानुसार ज्येष्ठ असणारे विधवा, परितक्त्या व दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाईल. त्याचप्रमाणे कलाकारांचे वार्षिक उत्पन्न 60,000 रुपयांपेक्षा अधिक नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका पूर्णतः कलेवर अवलंबून आहे, व इतर कोणताही उत्पन्नाचा स्रोत नाही, असे कलाकार पात्र ठरतील. केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही महामंडळ किंवा नियमित मासिक पेन्शन योजनेत लाभार्थी असता कामा नये तसेच कलाकार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती-पत्नीचा एकत्र फोटो (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्वाचा दाखला (लागू असल्यास), राज्य व केंद्र सरकारची प्रमाणपत्रे (लागू असल्यास) आणि नामांकित संस्था/व्यक्ती यांचे शिफारसपत्र (लागू असल्यास) ही आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या पुरस्कारांची घोषणा

0

धायगुडे, जवादे, वंसकर, मलये, जाधव, झुंजारराव पुरस्काराचे मानकरी

पुणे : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे देण्यात येणार्‍या राज्यस्तरीय विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा बुधवारी (दि. 23) करण्यात आली. सन 2024 वर्षातील बालसाहित्यातील नऊ विभागात पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे दिली.

कादंबरीसाठी दिला जाणारा लोखंडे-जोशी पुरस्कार कल्पना मलये कणकवली यांच्या ‘सई’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. वा. गो. आपटे पुरस्कार रवींद्र जवादे, मूर्तिजापूर यांच्या ‘चिंटू अस्वल आणि त्याचे घर’ या कथासंग्रहाला, ग. ह. पाटील पुरस्कार रमेश वंसकर, गोवा यांच्या ‘वार्‍या वार्‍या आंबे पाड’ या कवितासंग्रहाला, दयार्णव कोपर्डेकर पुरस्कार प्रमोद धायगुडे, वाघोशी, खंडाळा यांच्या ‘आबली’ या किशोर कथासंग्रहाला, लीलाताई भागवत पुरस्कार डॉ. विठ्ठल जाधव, बीड यांच्या ‘एकविसाव्या शतकातील बालसाहित्य’ या समीक्षा ग्रंथाला, प्रथम प्रकाशनासाठी कारले गुरुजी पुरस्कार राजेंद्र झुंजारराव, पुणे यांच्या ‘चिमण्यांची शाळा’ या पुस्तकाला, तर उत्कृष्ट सजावटीचा सर्जेराव जगताप पुरस्कार विजयकुमार चित्तरवाड, छ. संभाजीनगर यांना ‘वाचू गाऊ नाचू आनंदे’ पुस्तकाच्या सजावटीसाठी जाहीर झाला आहे. दिवाळी अंक – आनंद मासिक हा पुरस्कार ‘छावा’ दिवाळी अंकाला जाहीर झाला आहे. ‘छावा’च्या संपादक डॉ. गीताली टिळक आहेत. बालसाहित्य प्रकाशनासाठी दिला जाणारा बा. रा. मोडक पुरस्कार नंदिनी प्रकाशन, पुणे यांना जाहीर झाला आहे.

बालसाहित्य पुरस्कारासाठी संस्थेकडे 100 पेक्षा अधिक पुस्तके प्राप्त झाली होती. पुस्तकाचे परीक्षण प्रा. सचिन पालवे, रवीकांत आदरकर, सचिन बेंडभर व शिवाजी चाळक यांनी केले. संस्थेतर्फे 2 ऑगस्ट रोजी पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सकाळी 10.30 वाजता लता मंगेशकर सभागृह, मॉर्डन महाविद्यालय, शिवाजीनगर पुणे -5 येथे आयोजित करण्यात आला असून 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख व संदर्भ तज्ज्ञ, ग्रंथ प्रसारक प्रसाद भडसावळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

सन्मानपत्र, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती माधव राजगुरू आणि अनिल कुलकर्णी यांनी दिली. या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

अभिनव वाचन उपक्रमातील विद्यार्थ्यांचा गौरव

संस्थेतर्फे ऑगस्ट 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी अभिनव वाचन उपक्रम घेण्यात आला होता. त्यात विद्यार्थ्यांनी अभ्यासेतर पुस्तके, ग्रंथांचे वाचन करून त्या त्या पुस्तकाबद्दलचे मनोगत स्वहस्ताक्षरात दर महिन्याला नियमित लिहून पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार या उपक्रमात सर्वाधिक पुस्तके वाचणार्‍या विद्यार्थ्यांचा गौरव केला जाणार आहे. त्यात उपरी ता. पंढरपूर विद्यार्थी – श्रावणी नागणे, राधा पवार, साक्षी वाघमारे, कीर्ती शिरगुरकर, सायली लोखंडे, छ. संभाजीनगर येथील विद्यार्थी – राहेश कुलकर्णी, श्रेया नातू, गौतमी अजगावकर, अंजली केने, निधी कांकरिया, कवडा, हिंगोली येथील विद्यार्थी – पवित्रेश्‍वर चक्रधारी, सृष्टी नरवडे, तेजस्विनी देवरे, अनुष्का भोपळे, वरद भुजंग, नयना गवई यांचा गौरव केला जाणार आहे. तसेच मार्गदर्शक शिक्षक शिवाजी नागणे, सोलापूर, डॉ. विनोद सिनकर, छ. संभाजीनगर, बबन शिंदे हिंगोली, प्रा. सुहास सदावर्ते, जालना यांचा वाचनगुरू म्हणून पाहुण्यांच्या हस्ते सत्कार केला जाणार असल्याचेही संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू यांनी सांगितले.

पुण्यातील उद्योजकांना मिळणार शासकीय आणि बँकांच्या विविध योजनांचा लाभ

0

पुणे: पुण्यातील उद्योजक आणि स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना विविध शासकीय योजना, बँकांच्या योजना, वित्तीय संस्था देत असलेल्या योजना आणि शासकीय अनुदानाच्या योजना याबाबत माहिती देण्यासाठी आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशनच्या वतीने पुण्यात पहिल्यांदाच ‘लोन आणि सबसिडी एक्सपो-2025’ चे शुक्रवार दिनांक 25 रोजी, सकाळी 10 ते सायं 7 पर्यंत,सिद्धी बँक्वेट,डीपी रोड,पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विक्रम गायकवाड, सचिव सई बहिरट पाटील, उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला माजी अध्यक्ष अरुण निम्हण,उपाध्यक्ष विजय गवारे, प्रमोद साठे,खजिनदार राजेश कुराडे, कार्यकारिणी सदस्य आश्रम काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामध्ये आघाडीच्या पुणे पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक, एमएससी बँक, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॉसमॉस बँक, विद्या सहकारी बँक, लोकमंगल बँक,एचडीएफसी बँक, महानगर बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, क्रिसिल, मेडा, अण्णासाहेब पाटील महामंडळ अशा शासकीय व खाजगी बँका, वित्तीय संस्था, उद्योजकांना अनुदान देणाऱ्या शासकीय व अन्य संस्था यांच्याशी एका छताखाली उद्योजकांना चर्चा करून आपल्या उद्योगांना लाभ मिळवून देता येणार आहे.

या उपक्रमामध्ये संस्थेचे सदस्य, विविध शासकीय, खाजगी व सहकारी बँकांचे अधिकारी सहभागी होणार असून यामध्ये उद्योजकांसाठी विविध शासकीय योजना, त्यासाठी राष्ट्रीय व सहकारी बँकांची होऊ शकणारी मदत याबद्दल माहिती चर्चासत्राद्वारे दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे या उपक्रमात उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे विविध शासकीय विभाग, शासकीय खाजगी व सहकारी बँका यांचे स्टॉल उपलब्ध असणार आहेत. त्याद्वारे उद्योजकांना अथवा उद्योग करू इच्छिणाऱ्यांना विविध शासकीय व इतर योजनांची माहिती उपलब्ध होणार आहे.

त्याचप्रमाणे या उपक्रमात बँकांनी उद्योगांसाठी उपयुक्त असलेल्या जप्त केलेल्या मालमत्ता,यंत्रसामग्री आणि औद्योगिक जागा यांची माहिती देणारे आणि त्यासंबंधी व्यवहार करणारे स्टॉल उपलब्ध असणार आहेत.

मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशन ही 16 लोकांच्या सहभागाने सन 2014 मध्ये स्थापन झालेली संस्था असून तिचा वेगाने विस्तार होत आहे. सध्या या संस्थेत 800 पेक्षा अधिक मराठा उद्योजकांचा सहभाग असून त्यापैकी 110 पेक्षा अधिक महिला उद्योजकांचा समावेश आहे. या संस्थेने पिंपरी चिंचवड या औद्योगिक विभागात विस्तार केला असून या विभागातही 200 पेक्षा अधिक संस्थेचे सदस्य आहेत. परस्पर सहकार्यातून व्यवसाय वाढीसाठी मदत करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे.

स्वातंत्र्य संग्रामाचे सेनानी लोकमान्य टिळक आदर्शवत प्रेरणास्त्रोत – डॉ. नीलम गोऱ्हे

लोकमान्य टिळकांच्या १६९ व्या जयंतीनिमित्त विधान भवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन

मुंबई, दि. २३ जुलै २०२५ : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी, समाजसुधारक आणि लोकशाही मूल्यांचे पुरस्कर्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १६९ व्या जयंतीनिमित्त विधान भवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “देशहित, सामाजिक अस्मिता आणि लोकशाही यांचे रक्षण करण्यासाठी स्वातंत्र्य संग्राम पुढे नेणारे सेनानी म्हणून आपण लोकमान्य टिळक यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतो. त्यांनी ‘केसरी’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारला धाडसाने आव्हान दिले, तर ‘गीतारहस्य’ या ग्रंथातून समाजाला कर्मयोगाचा मार्ग दाखवला. लोकमान्यांचा विचार आजही समाजाला प्रेरणा देतो. महाराष्ट्रात त्यांच्या विचारांची परंपरा आजही तितक्याच ताकदीने जिवंत आहे. जयंतराव टिळक यांनी विधान परिषदेचे सभापती म्हणून केलेले कार्य लक्षणीय आहे, आणि विधान परिषदेच्या उपसभापती या नात्याने मला आज लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्याचा सन्मान लाभला आहे.”

विधान भवनात आयोजित या कार्यक्रमाला विधान परिषद आमदार संजय खोडके, विधानसभा आमदार सुलभा खोडके, सचिव (कार्यभार-१) जितेंद्र भोळे, सचिव (कार्यभार-४) शिवदर्शन साठ्ये, उपसभापती यांचे खाजगी सचिव अविनाश रणखांब, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने तसेच इतर मान्यवर आणि कर्मचारी उपस्थित होते.

लोहगाव येथील हरणतळे, पवार वस्ती व खांदवेनगर या ठिकाणी नवीन मतदान केंद्रे उभारा; आमदार बापूसाहेब पठारे यांची मागणी

0

पुणे: लोहगाव मधील हरणतळे, पवार वस्ती, खांदवेनगर येथे नवीन मतदान केंद्रे स्थापन झाली पाहिजेत, अशी मागणी आमदार बापूसाहेब पठारे यांनी येरवडा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे निवेदनाद्वारे केली. त्यानुसार आज संबंधित अधिकाऱ्यांकडून संबंधित स्थळांची पाहणी देखील केली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये लोहगाव परिसर झपाट्याने वाढला आहे. मतदार संख्येतही मोठी वाढ पाहायला मिळते आहे. परिणामी, सध्याच्या मतदान केंद्रांवर प्रचंड गर्दी होत असून काही खांदवेनगर भागांतील मतदारांना ८ ते १० किमी अंतरावर मतदानासाठी जावे लागत आहे.

मतदारांना ही ये-जा असुविधाजनक व त्रासदायक ठरत असल्याने नव्या मतदान केंद्र सुरु होणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

हरणतळे, लेक व्ह्यू सिटी, जनार्दन नगर व आजूबाजूच्या परिसरात दाट वस्ती झाली आहे. या भागातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून ते सध्या लांबच्या मतदान केंद्रांवर जात आहेत. त्यामुळे हरणतळे येथील मनपा शाळेत नवीन मतदान केंद्र स्थापन केल्यास स्थानिकांना मोठा दिलासा मिळेल.

पवारवस्ती, वाघमारे वस्ती, काळभोर वस्ती, काळभोर पार्क, माळवाडी, वॉटर पार्क रोड आणि कर्मभूमी या भागांत नव्या गृहप्रकल्पांमुळे झपाट्याने लोकवस्ती वाढली आहे. पवारवस्ती येथील मनपा शाळा हा नव्या केंद्रासाठी योग्य पर्याय ठरू शकतो.

खांदवेनगर, नगर रस्ता, रामचंद्र काळे नगर, संताजी नगर, गोठण ओढा, फॉर्च्यून सिटी, गोकुळ पार्क व गणेश पार्क हे परिसर सध्या प्रचंड वेगाने विकसित होत आहेत. या भागातील मतदारांना आजही लांब अंतरावरील मतदान केंद्रांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे खांदवे नगर येथील मनपा शाळेत नवीन मतदान केंद्र उपयुक्त ठरेल.

निवडणूक विभागाने लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केली. सोबतच, मतदार यादीतील खांदवे नगर झोपडपट्टी असा चुकीचा उल्लेख आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी याभागाचा शोध घेऊन ही सापडत नाही. पर्यायाने अचूक काम होत नाही त्यामुळे मतदार यादीवर खांदवे नगर असाच योग्य उल्लेख यावा. यातून झोपडपट्टी शब्द वगळावा अशीही मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

सदाबहार हिंदी चित्रपट गीतांच्या सान्निध्यात एक उनाड सायंकाळ..!पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित ‘छायागीत’ कार्यक्रमाला रसिकांची भरभरून दाद

0

पुणे : किशोर कुमार, महंमद रफी, मन्ना डे, मुकेश, हेमंतकुमार, गीता दत्त, लता मंगेशकर, आशा भोसले, तलत मेहमुद या प्रसिद्ध गायकांनी लोकप्रिय केलेल्या अजरामर गीतांचा नजराणा हिंमत कुमार पंड्या, गितांजली जेधे या कलाकारांनी पुणेकर रसिकांसमोर पेश केला. तरुणांसह ज्येष्ठांनी जुन्या सदाबहार हिंदी गीतांचा आनंद घेत फर्माईशीतून खुलत गेलेल्या गाण्यांना टाळ्या-शिट्ट्यांनी मनमुराद दाद दिली. तर अनेक गाण्यांवर जेष्ठांनी गायकांच्या सुरात सुर मिसळत गायनाचा आनंद लुटला.
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे सोमवारी (दि. २१ जुलै) सायंकाळी लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊस येथे ‘छायागीत’ या जुन्या हिंदी अवीट गोडीच्या गाण्यांची मैफल आयोजित करण्यात आली होती. तब्बल तीन तास रंगलेल्या या मैफलीत कलाकारांनी ४० पेक्षा जास्त गीते ऐकविली. कार्यक्रमाची सुरुवात गणेशस्तवनाने करण्यात आली.
‘जीवनसे भरी तेरी आँखे’, ‘लुटे कोई मन का नगर’, ‘ये रात भिगी भिगी’, ‘दिवाना हुआ बादल’, ‘कोरा कागज था’, ‘वो शाम कुछ अजिब थी’, ‘मै हु झुम झुम झुम झुमरू’, ‘मेरे मेहबुब ना जा’, ‘नखरेवाली’, ‘रूप तेरा मस्ताना’, ‘ओ मेरी जोहरा जबी’, ‘लग जा गले’, ‘जय जय शिवशंकर’, ‘याद किया दिल ने’, ‘बदन पे सितारे लपेटे हुऐ’, ‘शाम ए गम की कसम’, ‘तेरी आखों के सिवा’ अशी एकाहून एक लोकप्रिय गीते सादर करण्यात आली. ‘लागा चुनरिमे दाग’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हे गीत कार्यक्रमाचा कळसाध्याय ठरले. आपल्या समर्पक निवेदनाने अनुराधा भारती यांनी कार्यक्रमात रंग भरले.
कार्यक्रमाचे संयोजन किशोर सरपोतदार यांनी केले. सुरुवातीस अजित कुमठेकर यांनी कार्यक्रमाची संकल्पना विशद केली. तर प्रास्ताविक प्रांजली गांधी यांनी केले. कलाकारांचा सत्कार मेलडी मेकर्सचे संस्थापक अशोककुमार सराफ, निवृत्त पोलिस अधिकारी चंद्रशेखर दैठणकर यांनी केला. सतिश देव, डॉ. रोहिणी काळे, डॉ. प्रसाद पिंपळखरे, आनंद सराफ, ॲड. मोहन शेटे, संत साहित्याचे अभ्यासक श्रीयुत तापकीर, डी. के. अभ्यंकर, समिर धर्माधिकारी, जमिर दरबार, श्रीधर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमाबाबतएक दिवसीय कार्यशाळेचे 25 जुलै रोजी आयोजन

0

पुणे दि. 23 : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 25 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वा. एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळचे बहुउद्देशिय सभागृह पाचवा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये महसूल व वन विभागातील उपविभागीय अधिकारी (प्रांत), तथा अध्यक्ष उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती, गृह विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच पोलीस विभागाकडे असलेला नागरी हक्क संरक्षण शाखेतील अधिकारी-कर्मचारी तथा सदस्य, जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती आणि उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती, सामाजिक न्याय विभागातील संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण तथा सदस्य सचिव, जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती व संबंधित योजनेचे कामकाज पाहणारे अधिकारी-कर्मचारी व विधी व न्याय विभागातील सरकारी अभियोक्ता तथा सदस्य, जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती आणि उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती तसेच ग्रामविकास विभागातील गटविकास अधिकारी (बीडीओ) तथा सदस्य सचिव, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती इत्यादींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तरी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहणेबाबत विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांनी आवाहन केले आहे.

लम्पी चर्मरोग संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे दि. 23 : जिल्ह्यात 9 तालुक्यामध्ये लम्पी चर्मरोग संसर्गजन्य रोगाचा गोवर्गीय जनावरांमध्ये संसर्ग झालेल्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून “नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषित करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जितेंद्र डूडी यांनी आदेश जारी केले आहे. तसेच लम्पी चर्म रोगाचा फैलाव इतरत्र होवू नये यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाह्य किटक नियंत्रण कार्यक्रम राबविण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

लम्पी चर्म रोगावर नियंत्रण, प्रतिबंध व निर्मूलन करता येईल आणि (गुरे) आणि गोजातीय प्रजातींमधील इतर सर्व प्राणी (म्हैस वर्गीय वगळून) यांना पालन करण्याच्या ठिकाणापासून नियंत्रण क्षेत्रातील किंवा क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण किंवा वाहतूक करण्यापूर्वी किमान 28 दिवस अगोदर लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगावे.

गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरविणे किंवा बाजारातील खरेदी विक्री करणे, शर्यती आयोजित करणे, जत्रा भरवणे, प्रदर्शन आयोजित करणे आदीमध्ये सहभागी होणारी सर्व गोवर्गीय प्रजातीच्या जनावरांचे 28 दिवस अगोदर लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा आरोग्य दाखला सादर करणे बंधनकारक राहील.

बाधित गोजातीय प्रजातीचे जिवंत अथवा मृत प्राणी, त्यांच्या संपर्कात आलेले वैरण, गवत किंवा अन्य साहित्य तसेच त्यांचे शव, कातडी, कोणताही भाग अशा प्राण्यापासून अन्य कोणत्याही उत्पादन नियंत्रित क्षेत्रामधून बाहेर नेण्यास मनाई करण्यात येत आहे.

प्रयोगशाळा निदानामध्ये जिल्ह्यातील ज्या भागात पशुपालकांचे गोजातीय प्रवर्गातील जनावरांना लम्पी चर्म रोगाची लागण झाल्याचे निष्कर्ष होकारार्थी येतील अशा ठिकाणापासून 5 कि.मी त्रिजेच्या परिघामधील सर्व संक्रमित न झालेले जनावरांचे रिंग व्हॅक्सीनेशन त्वरीत करुन घ्यावेत. या रोगाचा फैलाव इतरत्र होणार नाही याबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.

बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत, 26 लाख स्थलांतरित व 7 लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार

मुंबई, दि. 23 : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकनात (Special Intensive Revision – SIR) आतापर्यंत सुमारे 18.66 लाख मतदार मृत, 26.01 लाख अन्य मतदार स्थलांतरित झालेले असून, 7.5 लाख मतदारांची नोंदणी दोन ठिकाणी आढळली आहे.

या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जोरदार मोहीम हाती घेतली असून, येत्या 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 1 लाख बीएलओ (BLO), 4 लाख स्वयंसेवक आणि 12 प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी नियुक्त केलेले 1.5 लाख बीएलए (BLA) कार्यरत आहेत.

आतापर्यंत प्राप्त माहिती :

एकूण मतदार (२४ जून २०२५ रोजीपर्यंत): ७,८९,६९,८४४

प्राप्त गणनापत्रक (Enumeration Forms): ७,१६,०४,१०२ (९०.६७%)

डिजिटायझ्ड गणनापत्रक: ७,१३,६५,४६० (९०.३७%)

पत्त्यावर न सापडलेले मतदार: ५२,३०,१२६ (६.६२%)

मृत मतदार: १८,६६,८६९ (२.३६%)

कायमचे स्थलांतरित: २६,०१,०३१ (३.२९%)

दुहेरी नोंदणी: ७,५०,७४२ (०.९५%)

न सापडणारे: ११,४८४ (०.०१%)

एकूण कव्हर झालेले मतदार : ७,६८,३४,२२८ (९७.३०%)

अद्याप प्राप्त न झालेले गणनापत्रक: २१,३५,६१६ (२.७०%)

याबाबत 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना प्रारूप मतदार यादीबाबत अधिकाऱ्यांकडे हरकती, दुरुस्ती, समावेश किंवा वगळण्याबाबत अर्ज करता येणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छांचा अर्थ

पंढरपूर -महाराष्ट्रामध्ये सर्व नेते वैचारिक विरोधक असतील मात्र, ते शत्रू नाहीत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जन्मदिनाच्या दिवशी, एखाद्याच्या अभीष्टचिंतन प्रसंगी एखाद्याने चांगली भावना व्यक्त करणे, याचा अन्यथा अर्थ काढणे अतिशय अयोग्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचा राजकीय अर्थ काढण्याचा प्रयत्न अयोग्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

या संदर्भात पंढरपूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांनी याचा चूकीचा अर्थ न काढण्याचे आवाहन केले आहे. या विषयी मुख्यमंत्री म्हणाले की, याचा चूकीचा अर्थ काढून महाराष्ट्रामध्ये एका चुकीच्या संस्कृतीला आपण पुढे करतो आहोत का? असा याचा अन्यथा अर्थ निघेल त्यामुळेच याला याच परिक्षेपात पाहायला हवे. जन्मदिवसाच्या निमित्ताने काही लोकांनी एक पुस्तक प्रकाशित केले, त्यांनी ज्या महाराष्ट्रातील प्रमुख दोनही नेत्यांना प्रतिक्रिया मागितली त्यांनी ती प्रतिक्रिया दिली. त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली आणि शुभेच्छा दिल्या. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मात्र याचा अन्य अर्थ काढणे खूपच संकुचित ठरेल असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.