Home Blog Page 196

एसबीआय लाईफ इन्शुरन्सने 7,268 कोटी रुपयांचा न्यू बिझनेस प्रीमियम नोंदवला

देशातील आघाडीची जीवन विमा कंपनी असलेल्या एसबीआय लाईफ इन्शुरन्सने 30 जून 2025 रोजी संपलेल्या कालावधीत 7,268 कोटी रुपयांचा न्यू बिझनेस प्रीमियम नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीसाठी हा प्रीमियम 7,033 कोटी रुपये होता. तर 30 जून 2024 रोजी संपलेल्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा नियमित प्रीमियममध्ये 12% ची वाढ झाली आहे.

संपूर्ण लक्ष सुरक्षेवर केंद्रित करत एसबीआय लाईफचा प्रोटेक्शन न्यू बिझनेस प्रीमियम 30 जून 2025 रोजी संपलेल्या कालावधीसाठी 980 कोटी रुपये होता. तर प्रोटेक्शन इंडीव्हिज्युअल न्यू बिझनेस प्रीमियम याच कालावधीसाठी 165 कोटी रुपये होता. 30 जून 2024 रोजी संपलेल्या कालावधीच्या तुलनेत वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियम 4% वाढीसह 4,939 कोटी रुपये होता.

30 जून 2025 रोजी संपलेल्या कालावधीत एसबीआय लाईफचा कर वजा जाता नफा 594 कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील नफ्यापेक्षा 14% नी वाढला आहे.

कंपनीचा सॉल्व्हन्सी रेशो सामान्यपणे 1.50 च्या आसपास असण्याची आवश्यकता असते. त्या तुलनेत 30 जून 2025 रोजी 1.96 वर राहिला आहे.

एसबीआय लाईफच्या एयूएममध्ये 15% ने वाढ होऊन 30 जून 2025 रोजी तो 4,75,813 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत (30 जून 2024) तो 4,14,772 कोटी रुपये होता, ज्यात डेबिट-इक्विटीचे गुणोत्तर 60:40 होते. 94% कर्ज गुंतवणूक AAA आणि सॉवरेन इंस्ट्रुमेंट्समध्ये आहे.

कंपनीकडे 3,23,838 प्रशिक्षित विमा व्यावसायिकांचे वितरण नेटवर्क आहे तसेच देशभरात 1,146 कार्यालये देखील आहेत. यामध्ये मजबूत बँकाश्युरन्स चॅनल, एजन्सी चॅनल आणि कॉर्पोरेट एजंट्स, ब्रोकर्स, पॉइंट ऑफ सेल पर्सन (पीओएस), विमा मार्केटिंग फर्म्स, वेब एग्रीगेटर्स आणि डायरेक्ट बिझनेस यांचा समावेश आहे.

30 जून 2025 रोजी संपलेल्या कालावधीतील कामगिरी

  • आयआरपी आणि इंडस्ट्रीज एनबीपीमध्ये खासगी बाजारपेठेतील अनुक्रमे 22.3% आणि  25% बाजार हिस्सा घेत आघाडी.
  • वार्षिक प्रीमियम इक्विव्हॅलंटमध्ये (एपीई) 9% वाढ नोंदवत रु. 3,969 कोटी.
  • 73% वाढ नोंदवून वैयक्तिक नवीन व्यवसाय विमा रक्कम रु. 66,631 कोटी.
  • 13 दशलक्ष आणि 61 दशलक्ष स्थिरतेमध्ये अनुक्रमे 58 बीपीएस आणि 501 बीपीएसने सुधारणा.
  • नवीन व्यवसायाचे मूल्य (व्हीओएनबी) 12% वाढीसह 1,088 कोटी रु.
  • व्होएनबी मार्जिन 27..
  • इंडियन एम्बेडेड व्हॅल्यू (आयईव्ही) 20% वाढ नोंदवत 74,257 कोटी रु. झाली आहे.
  • 14% वाढीसह करपश्चात नफा (PAT) 594 कोटी रु. झाला आहे.
  • सॉल्व्हन्सी रेशो मजबूत 1.96 वर.
  • 15% वाढीसह व्यवस्थापनाखालील मालमत्ता 4,75,813 कोटी रु. झाली आहे.

एसबीआयकडून 13,455 ज्युनिअर असोसिएट्सच्या नियुक्तीला सुरुवात

संपूर्ण देशभर ग्राहक सेवा बळकट करण्याचे उद्दिष्ट्य

मुंबई, 25 जुलै 2025: देशाची सर्वात मोठी आणि विश्वासार्ह बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया देशभरातील आपल्या विस्तृत शाखा नेटवर्कमध्ये नव्याने भरती करण्यात आलेल्या 13,455 ज्युनिअर असोसिएट्स (कनिष्ठ सहायक) च्या नेमणुकीला सुरुवात करत आहे.

हे नवे असोसिएट्स बँकेच्या अग्रणी, आघाडीवरील कर्मचाऱ्यांच्या कार्यशक्तीत एक मोलाची भर घालत आहेत. त्यायोगे एसबीआयच्या सेवाभावाला अनुसरून नवचैतन्य, बांधिलकी आणि ग्राहक प्रथम हा दृष्टिकोन जोमाने पुढे येत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या सेवांचा  अनुभव उंचावण्यासाठी आणि प्रत्येक पातळीवर कार्यक्षमता वाढवण्यासाठी बँकेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना बळकटी मिळणार आहे.

एसबीआयने 11 जून रोजी ज्युनिअर असोसिएट्सच्या भरतीची घोषणा केली होती. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री. सी. एस. सेठी यांनी बदलत्या कार्यात्मक व तांत्रिक गरजांशी सुसंगत अशा सुव्यवस्थित कौशल्य विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीद्वारे मनुष्यबळ विकास क्षमतेच्या बळकटीकरणावर भर दिला होता.

एसबीआयचे 2,36,000 हून अधिक कर्मचारी असून बँकिंग क्षेत्रातील व्यावसायिकांच्या पुढील पिढीला घडवण्याचा त्यांना अभिमान आहे. अधिक मजबूत, सर्वसमावेशक भविष्याच्या उभारणीसाठी एसबीआय कटिबद्ध आहे. 

दिल्लीत देवेंद्र फडणवीस – अमित शहा यांची भेट:मंत्रिमंडळ फेरबदलावर चर्चा झाल्याची माहिती

नवी दिल्ली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या दाव्यानुसार, जवळपास 8 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून ‘डच्चू’ मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार, ज्या मंत्र्यांची मंत्रिपदे धोक्यात येण्याची शक्यता आहे, त्यात शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते संजय शिरसाट, संजय राठोड, भरत गोगावले आणि योगेश कदम यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे माणिकराव कोकाटे यांचेही मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या सर्व चर्चांदरम्यान, भाजपचे संकटमोचक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळातून बाजूला करत त्यांना पक्षाची संघटनात्मक जबाबदारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चांवर सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मंत्रिमंडळातील फेरबदलाबद्दल कोणतीही चर्चा कोअर ग्रुपमध्ये झालेली नाही. मंत्रिमंडळाबाबतचा कुठलाही निर्णय राज्यस्तरावर होत नाही, तो केंद्रीय स्तरावर होत असतो. अशा प्रकारचा काही बदल होणार असेल, तर तो योग्य वेळी कळतो, पण सध्या असा काही बदल होईल, असे मला वैयक्तिकरित्या वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्षपदाबद्दलही आपल्याला सध्या काही माहिती नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. पुढील काळात नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे त्या-त्या जिल्ह्यातील नेत्यांना मंत्रिपदावरून अस्थिर करण्याचे काम होणार नाही.

जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मनोभावे प्रार्थना

जेजुरी, दि. २५ जुलै २०२५ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज जेजुरी येथील श्री खंडेरायाच्या गडावर मनोभावे दर्शन घेतले. सकाळी लवकर मंदिरात आगमन करून त्यांनी श्री खंडोबाची पूजा-अर्चा केली व राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी तसेच सर्वसामान्यांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

डॉ. गोऱ्हे यांच्या आगमनावेळी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांनी त्यांचे स्वागत केले. दर्शनानंतर त्यांनी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व मंदिर परिसरातील सोयी-सुविधा, स्वच्छता आणि भाविकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत माहिती जाणून घेतली.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “जेजुरी हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असून इथे येऊन प्रत्येक वेळी आत्मिक समाधान मिळते. राज्यातील जनतेसाठी चांगल्या योजना राबविण्याची प्रेरणा अशा पवित्र स्थळांवरूनच मिळते.”

बुकिंग करूनही गृहप्रकल्प रेंगाळला,१५० जणांच्या फसवणूकीचा आरोप:हिंदू महासंघ आणि ग्राहकांचा ‘विष प्राशन’आंदोलनाचा इशारा

पुणेःनऱ्हे येथील किशोरी प्रांगण गृहप्रकल्पात १५० ग्राहकांनी  वीस टक्के बुकिंग रक्कम भरून देखील  प्रकल्पाचे चार वर्ष बांधकाम सुरु न केल्याने  १८ कोटीची फसवणूक झाली असून हिंदू महासंघाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत या ग्राहकांनी  पोलिस आयुक्त कार्यालयासमोर  विषप्राशन आंदोलनाचा   इशारा दिला.पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे २५ जुलै रोजी दुपारी १ वाजता ही पत्रकार परिषद झाली.या पत्रकार परिषदेत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे ,ग्राहकांच्या कायदेशीर सल्लागार एड.नीता जोशी, ग्राहकांचे प्रतिनिधी गिरीश चौधरी, प्रशांत कोल्हे,सूर्यकांत कुंभार उपस्थित होते. 

कसबा पेठेतील सामाजिक कार्यकर्ते  श्रीकांत शेटे,तसेच विजय रायकर हे किशोरी प्रांगण एल एल पी या भागीदारी संस्थेत भागीदार आहेत.जागामालक निलेश दांगट,शाम दांगट यांनी या  जागेचा विकसन करारनामा ( DAPA Agreement) हे दिनांक ०३/११/२०२१ रोजी केले आहे.कोणतातरी राजकीय दबाव पोलीस यंत्रणेवर आहे,असा आरोप या ग्राहकांनी पत्रकार परिषदेत केला.तसेच पोलिसांच्या वर्तणूक बाबत शंका सुद्धा व्यक्त केली. 

२०२१ साली १५० ग्राहकांनी नऱ्हे येथील किशोरी प्रांगण या गृहप्रकल्पात २० टक्के रक्कम भरून १५० ग्राहकांनी बुकींग केले. रेरा रजिस्ट्रेशन असतानाही हे पैसे बिल्डरने रेरा अकाऊंटला न घेता वैयक्तिक खात्यात घेतले. बुकींगचे निबंधक कार्यालयात नोंदणी रजिस्ट्रेशन केले नाही. बांधकामही सुरु केले नाही.आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ग्राहकांनी २०२४ मध्ये सिंहगड रस्ता  पोलिस स्थानकात तक्रार केली.३० ग्राहकांनी    एकत्र येऊन सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ती तक्रार नंतर पोलिस कमिशनर ऑफिसला वर्ग करण्यात आली आहे व त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे  अधिकारी कैलास करे हे  करत आहेत. सर्व सभासदांची स्टेटमेंट नोंद करूनही साधारण २ महिने झाले तरीही पोलिस बिल्डर्स च्या विरोधात व जागा मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करत नाहीत.या ग्राहकांचे कर्ज आणि हप्ते सुरु झाले आहेत,सध्या जिथे राहतात त्या जागेचे घरभाडे सुरु आहे.सिबिल खराब  होऊ नये म्हणून हप्ते थकवता येत नाहीत आणि पोलीस दाद देत नाहीत,अशी बिकट अवस्था या दीडशे ग्राहकांची झाली आहे.आत्तापर्यंत यातील दोघांनी आत्महत्याचा प्रयत्न केला आहे, पोलिसांना हे सांगून सुद्धा त्यात काही प्रगती होत नाही . 
‘आम्ही पोलिसांना पैसे दिले आहेत.आमचे काही वाकडे होणार नाही’ असे  हे बिल्डर ग्राहकांना  तोंडावर सांगत असतात.२०% रक्कम गुंतविल्यास सदनिकेचा करारनामा करून देणार हे आश्वासन बिल्डर व जागा मालक अशा  तिघांनी केल्याप्रमाणे साधारण  १५० जणांनी फ्लॅट बुकींग केले .बिल्डरकडे ती रक्कम साधारण १८ कोटी पेक्षा जास्त जमा झाली आहे.ही रक्कम जमा करूनही अनेक सभासदांचे फ्लाटचे रजिस्ट्रेशन करून दिले नाही. दर वेळी प्रकल्प उशीरा सुरू होणार आहे याची वेगवेगळी कारणे सांगण्यात आली. सदर प्रकल्प हा रेरा रजिस्ट्रेशन झाला आहे. रेरा सर्टिफिकेट प्रमाणे सदर प्रकल्प हा डिसेंबर २०२५ रोजी पूर्ण झाला पाहीजे. पण आजतागायत त्या जागेवर खड्डाही मारलेला नाही.
पोलिसांनी,आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई न केल्यास पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर विष प्राशन आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला. 

सुदर्शन केमिकल्सने 1,847 हेक्टर क्षेत्रात परिवर्तन घडविले; एकत्रित पर्यावरण संवर्धन प्रकल्पांद्वारे 350 हून अधिक कुटुंबांना सक्षम केले

मुंबई, 25 जुलै 2025 – वर्ल्ड नेचर काँझर्व्हेशन डेच्या निमित्ताने, सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड (“SCIL” किंवा “कंपनी”) ने एकत्रित पर्यावरण संवर्धन प्रकल्प यशस्वीपणे राबवून विविध ठिकाणी एकूण 1,847.25 हेक्टर क्षेत्र व्यापले असून, पाण्याचे स्रोत विकास, शाश्वत शेती व कचरा व्यवस्थापन यांद्वारे दीर्घकालीन पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम साधण्याचा कंपनीचा दृढ संकल्प अधोरेखित केला आहे.

सुदर्शनच्या जलसंवर्धन उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम झाले असून, योजनाबद्ध हस्तक्षेपातून विस्तृत क्षेत्रावर प्रभाव पडला आहे. एससीआयएलने 2,915 घनमीटर इतके नाला खोलीकरण पूर्ण केले असून, 8 गॅबियन रचना व 4 चेक डॅम्सचे बांधकाम केले आहे, ज्याचा 100 हेक्टरहून अधिक शेती क्षेत्रावर सकारात्मक परिणाम झाला आहे. सुखदरे कोंड आणि बौद्धवाडी येथील झऱ्यांचे पुनरुज्जीवन प्रकल्पांमुळे 250 लाभार्थ्यांना 24×7 स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा सहज वापर मिळत असून, टँकरची गरज पूर्णपणे टळली आहेत. यामुळे समुदायाचा खर्च वाचला असून, बाह्य पाणीस्रोतांवरील अवलंबित्वही कमी झाले आहे.

यासह 800 मीटर पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन आणि वॉटर फिल्टर्स स्थापन केल्यामुळे पाण्याच्या टंचाईच्या काळात व ऋतुपरत्वे होणाऱ्या बदलांमध्ये 100 हून अधिक घरांना लाभ मिळतो आहे, तसेच माती व पाणी संवर्धनासाठी 1,400 घनमीटर ‘कंटिन्युअस काँटूर ट्रेन्चेस’ (CCTs) राबविण्यात आले आहेत आणि 100 एकरहून अधिक जमीन शेती सुधारण्यासाठी प्रक्रियेत आणली गेली आहे.

सुदर्शनने रोहा, महाड आणि सुतारवाडी या भागांमध्ये 5,000 हून अधिक वृक्ष लागवड केली असून, यामध्ये आंबा, चिकू आणि फणस अशा स्थानिक हवामानात फुलणाऱ्या आणि बाजारात उच्च मागणी असलेल्या फळझाडांच्या 1,200 रोपांचा समावेश आहे. या प्रजातींची निवड त्यांच्या स्थानिक हवामानाशी सुसंगततेसाठी, फळ उत्पादनाच्या आर्थिक मूल्यासाठी आणि मातीच्या स्थिरीकरणासाठी करण्यात आली आहे.

याशिवाय, कंपनीने 120 हून अधिक किचन गार्डन्सची स्थापना केली असून, 150 एकर क्षेत्र जैविक शेतीसाठी रूपांतरित केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक संधी उपलब्ध होत असून, उत्पन्नातील चढ-उतार व मातीची गुणवत्ता खालावणे यांसारख्या समस्यांवर प्रभावी उपाय मिळत आहे. वृक्षारोपण मोहिमेसाठी एकूण 75 कर्मचाऱ्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग नोंदविला, ज्यामुळे संस्थेमध्ये पर्यावरणप्रेमी संस्कृती वृद्धिंगत झाली आहे.

सुदर्शनने रोहा आणि महाड येथे केंद्रीकृत कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू केले आहेत. याबरोबरच 2,500 हून अधिक घरगुती कंपोस्ट प्लांटर्सचे वितरण करण्यात आले आहे. प्रत्येक प्लांटर दररोज 1 किलो ओला किचन कचरा प्रक्रिया करतो आणि त्याला उपयुक्त सेंद्रिय खतामध्ये रूपांतरित करतो, यामुळे घराच्या पातळीवर सर्क्युलर इकॉनॉमीचे उत्तम उदाहरण उभे राहत आहे.

कंपनीने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘नेचर क्लब्स’ची स्थापना केली असून, विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण शिक्षण कार्यशाळाही आयोजित केल्या आहेत. नियमितपणे नर्माल्य संकलन मोहिमा, जैवविविधता, कचरा व जलसंवर्धन विषयक जनजागृती अभियान यांद्वारे स्थानिक समुदायांमध्ये पर्यावरणपूरक वर्तनात्मक बदल घडवून आणले आहेत.

या विषयावर बोलताना शिवारिका राजे, प्रमुख – पीपल प्रॅक्टिसेस  चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर, सुदर्शन केमिकल्स म्हणाल्या“खरे पर्यावरण संवर्धन तेव्हाच शक्य होते, जेव्हा निसर्ग रक्षणाचा भाग समुदाय सक्षमीकरणाशी जोडला जातो. सुदर्शनमध्ये आमचा विश्वास आहे की, नफा आणि उद्दिष्ट यांच्यात योग्य समतोल साधला, तर अशी शाश्वत उपाययोजना निर्माण होते, जी पर्यावरण  समाज दोघांच्याही हिताची ठरते. आम्ही आमच्या पर्यावरणीय परिणामांमध्ये सतत घट करण्यासाठी, संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सक्रियपणे काम करत आहोत.”

सुदर्शन येत्या काळात लावण्यात आलेल्या रोपांची वाढ आणि टिकाव नियमितपणे तपासत राहणार आहे, तसेच दरवर्षी मूल्यांकन करून शेतकऱ्यांना मिळालेल्या फायदे व जैवविविधता, मातीची आरोग्यदशा व जलसंवर्धन अशा पर्यावरणीय सुधारणा यांचा आढावा घेत राहणार आहे.

एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाणानंतर 18 मिनिटांत आपत्कालीन लँडिंग

जयपूर-शुक्रवारी एअर इंडियाच्या एका विमानाचे जयपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हे विमान जयपूरहून मुंबईला निघाले होते. उड्डाणानंतर अवघ्या १८ मिनिटांतच विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यानंतर वैमानिकाने जयपूर विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग केले.सध्या विमानात सर्व १३५ प्रवासी आहेत. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसह जयपूर विमानतळावरील तज्ज्ञ पथक विमानाची तपासणी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाण घेतल्यानंतर पायलटला विमानाचे चिन्ह (कार्गोचे गेट दर्शविणारे) उघडे आढळले.

खरंतर, एअर इंडियाचे विमान AI-612 शुक्रवारी दुपारी १:३५ वाजता जयपूरहून मुंबई विमानतळावर निघणार होते. विमानाने नियोजित वेळेपेक्षा २३ मिनिटे उशिरा मुंबईसाठी उड्डाण केले.१८ मिनिटांनी विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

कार्गो गेटचे चिन्ह लागताच, पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोल युनिटशी संपर्क साधला आणि जयपूर विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्याची परवानगी मागितली. उड्डाणानंतर अवघ्या १८ मिनिटांनी, विमानाचे जयपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.तथापि, सध्या एअर इंडियाकडून विमानाच्या लँडिंगबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. हे एअरबस ए३२० निओ आहे.

एअर इंडियाच्या फ्लाइट AI-612 मधील हवेतच उद्भवलेली समस्या तांत्रिक पथकाने दुरुस्त केली आहे. यानंतर, विमान दुपारी ४:२९ वाजता मुंबई विमानतळाकडे रवाना झाले. तथापि, विमानातील तांत्रिक बिघाडाबद्दल एअर इंडियाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.

जयपूरहून चंदीगडला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातही जयपूर विमानतळावर तांत्रिक बिघाड झाला. शुक्रवारी, इंडिगो एअरलाइन्सचे विमान 6E-7516 दुपारी 1:45 वाजता चंदीगडला रवाना होणार होते. पण उड्डाण सुरू होताच तांत्रिक बिघाड आढळून आला. यानंतर उड्डाण थांबवण्यात आले.

इंडिगो एअरलाइन्सच्या अभियांत्रिकी शाखेने विमानाची तपासणी केली आणि सुमारे दीड तासात तांत्रिक बिघाड दुरुस्त केला. यानंतर, इंडिगोचे विमान दुपारी ३.२५ वाजता चंदीगडसाठी रवाना झाले.

१२ जून रोजी दुपारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले. या अपघातात २७० लोकांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी विमानात २४२ प्रवासी होते, ज्यात ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला. एक जण वाचला होता. विमान ज्या वसतिगृहाच्या इमारतीत कोसळले त्या इमारतीत २९ मृतदेह आढळले.

अखिल भारतीय राष्ट्रीय सांस्कृतिक नृत्य स्पर्धा ‘अंतरंग उत्सव’ मध्ये ध्रुव ग्लोबलच्या विद्यार्थीनी शरीन काळे व मृदुला जोडे चे उत्कृष्ट प्रदर्शन

पुणे, २५ जुलैः भारतीय शास्त्रीय ओडिसी नृत्य स्पर्धेत नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलची  विद्यार्थीनी शरीन काळे हिने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासोबतच तिला ‘आऊटस्टँडिंग परफॉर्मर ऑफ द सेशन’ चा सन्मानही मिळाला आहे. तसेच नववीच्या मृदुला जोडे हिने ही याच स्पर्धेत कनिष्ठ गटात दुसरे स्थान पटकविले.
अभिनव कला अकादमी व सांस्कृतिक मंत्रालयाच्या पाठिंब्याने आयोजित केलेल्या प्रतिष्ठितअखिल भारतीय राष्ट्रीय सांस्कृतिक नृत्य स्पर्धे अंतर्गत अंतरंग उत्सव स्पर्धेत तिने भारतीय शास्त्रीय ओडिसी नृत्यात राष्ट्रीय स्तरावर हे यश मिळवले आहे.
तिच्या या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी, प्राचार्य संगीता राऊतजी आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनदंन केले. यावेळी यशवर्धन मालपाणी म्हणाले की, या दोघींच्या अदभुत कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्या उज्ज्वल भविष्य व यशासाठी शुभेच्छा.
नववीच्या वर्गातील विद्यार्थिनी शरीन काळे ने शुभश्री राउतराय यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ओडिशा नृत्य सादर केले. तिने भारतीय शास्त्रीय ओडिशा नृत्य अंतर्गत सोलो डान्स-ज्युनिअर एज ग्रपमध्ये भाग घेतला. यामध्ये तिने ओडिशा नृत्यातील अभिनयाचे बारकावे आणि भाव उत्कृष्ट पद्धतीचे सादरीकरण केले. तिच्या नृत्यात तिने सिर भेद, आंख भेद, गर्दन भेद, सीना भेद या सारख्या एकत्रित आणि असंघटित हस्तमुद्रा सादर केले.

वाघोली ते हिंजवडी माण फेज ३ या नवीन बसमार्गावर धावणार स्मार्ट एसी इकोफ्रेंडली ई बसेस

पुणे -महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या वतीने वाघोली ते हिंजवडी माण फेज ३ या
नवीन बसमार्ग क्र. ३२८ चा उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वा. पार
पडला. या नवीन बसमार्गाचे उद्‍घाटन मा. श्री. बापूसाहेब पठारे, आमदार, वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघ यांच्या
शुभहस्ते करण्यात आले. या नवीन बसमार्गावर एकूण ४ स्मार्ट एसी इकोफ्रेंडली ई बसेस १ तास वारंवारितेने धावणार
आहेत.
नवीन बसमार्ग क्र. ३२८ चा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पुणे महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक
संदीप सातव व शांताराम कटके, तसेच पंढरीनाथ कटके, पीएमपीएमएल चे सहव्यवस्थापकीय संचालक
नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमास पीएमपीएमएलचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतिश गव्‍हाणे, वाहतूक नियोजन व
संचलन अधिकारी नारायण करडे, प्र. कामगार व जनता संपर्क अधिकारी किशोर चौहान, वाघोली डेपो मॅनेजर
विजयकुमार मदगे यांच्यासह स्थानिक नागरिक व प्रवासी उपस्थित होते.
बसमार्ग क्र. ३२८ चे प्रमुख थांबे पुढीलप्रमाणे –

वाघोली → डायमंड वॉटर पार्क → लोहगाव → धानोरीगाव → विश्रांतवाडी → दिघी → भोसरी → शिवार चौक → मानकर
चौक → इन्फोसिस फेज १ व २ → हिंजवडी माण फेज ३.
पीएमपीएमएल कडून सुरू करण्यात आलेल्या या नवीन मार्गामुळे वाघोली परिसरातील नागरिकांना हिंजवडी
आयटी पार्कपर्यंत जलद, सुलभ व सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहे. तरी नवीन बसमार्ग क्र.३२८-वाघोली ते
हिंजवडी माण फेज ३ या बसमार्गाचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल कडून
करण्यात येत आहे.

“साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार २०२५” ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण खोरे यांना जाहीर

-विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांची माहिती

-लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या  जयंतीदिनी होणार पुरस्कार प्रदान

पुणे :  लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे यांच्या वतीने “साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार २०२५” जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, लेखक व पत्रकार अरुण खोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

“साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार २०२५”  हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांच्या अध्यक्षतेखाली १ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वा. सम्यक विहार विकास केंद्र, बोपोडी, पुणे येथे प्रदान केला जाईल. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, शाल, मानपत्र व रोख रु. ११०००/- असे आहे. याप्रसंगी पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या पूर्वी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने पुणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते, परिवर्तनवादी चळवळीतील नेते, साहित्यिक आणि अधिकारी यांना गौरवण्यात आले आहे. यामध्ये अंकल सोनवणे, रमेश राक्षे, प्रा. सुकुमार कांबळे, शाहीर दीनानाथ साठे,  वाल्मीक अवघडे, दत्ता शेंडगे, सदाशिव वाघमारे, वसंत वाघमारे, श्रीमती शुभा अंगीर तसेच दिवंगत विनायक जाधव यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले होते.

ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे गेली ४७ वर्षे लेखक आणि संपादक, पत्रकार म्हणून काम करीत आहेत.  सकाळ, लोकमत, पुढारी, प्रभात आदि दैनिकांमध्ये त्यांनी संपादक पदावर कार्य केले आहे. तर लोकसत्ता, पुण्यनगरी मध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.   ‘पोरके दिवस’ हे त्यांचे आत्मचरित्र लोकप्रिय असून दोन युरोप, इंदिरा प्रियदर्शनी, मुद्रित माध्यमांसाठी लेखन कौशल्ये ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.  सामाजिक प्रश्न, समाजातील वंचित, दलीत, अपंग, कष्टकरी महिला यांचे प्रश्न त्यांनी मांडले आहेत .महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, दलित आत्मचरित्रे यांचा अभ्यास करून त्यावर त्यांनी लेखन केले आहे. याशिवाय गांधीजींची पुनर्भेट.  दिव्यांग आणि आपण. महाड सत्याग्रह – ९० वें स्मरण वर्ष विशेषांक. महाराष्ट्र – विकासाचे नवे प्रवाह. लोकशाहीला बळ देणाऱ्या विचारधारा विशेषांक. दलित उद्योजकता विशेषांक. गांधीजींचे प्रेरणादायी विचार- मराठी आणि इंग्रजी . कृतिशील परिवर्तनवादी शरद पवार. दलित साहित्याच्या शोधात. महाड सत्याग्रह: ९० वे स्मरणवर्ष – मार्च २०१७. लोकसभा निवडणूक विशेषांक २०१९. विधानसभा निवडणूक विशेषांक २०१९. महाराष्ट्र- विकासाचे नवे प्रवाह. महात्मा फुले- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मरण अंक आदि ग्रंथ आणि विशेषांकाचे संपादन , लेखन अरुण खोरे यांनी केले केले आहे.

अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भीमराव पाटोळे यांना साहित्यरत्न पुरस्कार

पुणे : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे ज्येष्ठ साहित्यिक भीमराव पाटोळे यांचा साहित्यरत्न पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, दि. ३० जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोहिनूर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर असणार आहेत, अशी माहिती फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. माजी नगरसेविका लता राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

अरुण काकतकर लिखित ‘व्यक्तकं’ आणि ‘रंगांना फुटले पंख’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : कला, संगीत, साहित्य, संस्कृतीसंबंधित विविध विषयांना स्पर्श करणारे, त्यांचे सूक्ष्म निरीक्षण मांडणारे संदर्भश्रीमंत लेखन अरुण काकतकर यांनी केले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक, लेखक विजय कुवळेकर यांनी केले. जीवनातील आणि निसर्गातील अनेक रंग काकतकरांच्या जीवनाचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत मिसळून गेले आहेत, अशी टिप्पणही त्यांनी केली.

उत्कर्ष प्रकाशन प्रकाशित आणि अरुण काकतकर लिखित ‘व्यक्तकं’ आणि ‘रंगांना फुटले पंख’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन कुवळेकर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २४) झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे, अभिनेत्री, दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी, अरुण काकतकर, प्रकाशक सु. वा. जोशी, निसर्ग आणि पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे व्यासपीठावर होते. कर्वे रस्त्यावरील अश्वमेध मंगल कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभाला ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, स्वरानंद प्रतिष्ठानचे प्रकाश भोंडे, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, जयंत जोशी, गायक श्रीकांत पारगावकर, गायिका अनुराधा मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
कुवळेकर पुढे म्हणाले, शब्दांविषयीचे विलक्षण प्रेम हे काकतकर यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. मात्र, हे शब्दप्रेम वरवरचे नाही. ते अभ्यासातून, व्यासंगातून आले आहे. शब्दांशी खेळण्याचा त्यांना छंद आहे. त्यांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी लाभली. या संधींचा उपयोग त्यांनी अभ्यास, निरीक्षण अधिक सूक्ष्म करण्यासाठी केला. त्यांचे लेखन या निरीक्षणांतून, अभ्यासातून, सहवासातून आले आहे. त्यामागील लेखकाची दृष्टी महत्त्वाची आहे.
सर्वार्थाने सुंदर पुस्तके असल्याचे सांगून मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, मी स्वतःला पडद्यावर प्रथम पाहिले ते काकतकर यांच्यामुळे. दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमांतून आमच्या पिढीवर उत्कृष्ट संस्कार काकतकरांसारख्या निर्माता–दिग्दर्शकांनी केले आहेत.
सुरेश खरे म्हणाले, काकतकर हे अतिशय भाग्यवान निर्माते ठरले. सूक्ष्म निरीक्षण, थक्क करणारे शब्दसामर्थ्य, प्रवाही लेखनशैली हे त्यांचे विशेष दिसतात. त्यांच्या लेखनातून नवे, वेगळे शब्द परिचित होतात. सरकारी नोकरीत दीर्घकाळ असूनही त्यांच्यातील संवेदनशीलता अबाधित राहिली, हेही महत्त्वाचे आहे.
अरुण काकतकर म्हणाले, मला लेखनाची पहिली संधी मनोहर मासिकात मिळाली. सर्वच पहिल्या गोष्टींचे महत्त्व असते. त्यामुळे मला संधी देणाऱ्या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. योग्यता असूनही संधीविना जे मागे राहिले त्यांच्याविषयी माझ्या मनात संवेदनाही आहेत.
निलिमा जोशी-वाडेकर यांनी प्रकाशकीय प्रास्ताविक केले. राधिका काकतकर यांनी आभार मानले. ऋतुजा फुलकर यांनी सूत्रसंचालन केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सन्मानित

“हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, समाजातील प्रत्येक महिलेसाठी आहे – डॉ. नीलम गोऱ्हे”

जेजुरी (पुरंदर), दि. २५ जुलै २०२५ : समाजासाठी आणि राज्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. होळकर संस्थान, इंदोरचे राजे भूषणसिंह होळकर महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

या प्रसंगी राजे भूषणसिंह होळकर महाराज म्हणाले, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाजातील वंचित घटकांसाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य स्तुत्य आहे. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे की राजकीय मतभेद असले तरी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी सर्वजण उभे राहतात. ताईंनी अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श जपत महिलांना न्याय व शिक्षणाची दिशा दिली आहे. आपल्या दैनंदिन जीवनात महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण झाले पाहिजे. पुरस्कार सोहळ्यात केवळ बुके न देता, विचारांचे पोषण करणारी पुस्तके भेट दिली पाहिजेत. म्हणूनच मी ताईंना महाराजा यशवंतराव होळकर यांच्यावर आधारित ‘महाराजा-ए-हिंद’ हे इतिहास असलेले विशेष पुस्तक प्रदान केले.”

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, तर समाजातील त्या सर्व महिलांसाठी आहे ज्या आपल्या हक्कांसाठी, शिक्षणासाठी आणि सन्मानासाठी लढत आहेत. जेजुरी परिसरातील मुरळी प्रथेच्या निर्मूलनासाठी सातत्याने काम करून जवळपास २०० महिलांना व मुलींना या प्रथेतून मुक्त केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि समाजपरिवर्तनासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणे, हेच अहिल्यादेवी होळकर यांना खरी आदरांजली ठरेल.”

त्या पुढे म्हणाल्या, “राजकारणात विचारभेद असले तरी चांगल्या कामांना सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे, हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे. आमदार निधीतून जेजुरी व इतर तीर्थक्षेत्रांच्या विकासास हातभार लावला आहे. स्त्री सक्षमीकरण आणि समाजकल्याणाचे काम हीच माझी खरी ध्येयपूर्ती आहे.”

सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्यास ममता लांडे-शिवतारे (आमदार प्रतिनिधी), दिलीपदादा बारभाई (माजी नगराध्यक्ष, जेजुरी), दिलीपआबा यादव (माजी जि.प. सदस्य), सचिन पशवे (अध्यक्ष भाजप, पुरंदर),विठ्ठल सोनवणे (अध्यक्ष शिवसेना, जेजुरी), शांताराम पोमण (सचिव आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान), डॉ. धनाजी नागणे (प्राचार्य शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जेजुरी) आदी मान्यवर उपस्थित होते.शिवसेनेच्या सुदर्शन त्रिगुणाईत, रंजना कुलकर्णी, स्वाती टकले, शालिनी सुर्वे, वैशाली काडे, हेमा घुले तसेच स्त्री आधार केंद्राच्या लता सोनवणे यांसह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन त्रिसूत्रीवर काम करा!

0

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आढावा बैठक

पुणे:वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करा, असे निर्देश ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. तसेच, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक्तेनुसार सीसीटीव्ही आणि एआय चलानची संख्या वाढवा, अशी सूचना ही त्यांनी आजच्या बैठकीत केली.

कोथरुडमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेणार असल्याचे ना. पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार आज ना. पाटील यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, महापालिका पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण विभागाचे संदीप खलाटे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, प्रकाश बालवडकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, नवनाथ जाधव, अजय मारणे, डॉ. संदीप बुटाला, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला मागील बैठकीतील इतिवृत्तानुसार झालेल्या कारावाईचा आढवा ना. पाटील यांनी घेतला. त्यामध्ये ५० वॅार्डन नियुक्तीबाबत काय कारवाई केली असा, सवाल ना. पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक शाखेकडून आश्वास्त करण्यात आले. यासोबतच वाहतूक कोंडी होणाऱ्या भागात काय उपाययोजना केल्या याचीही विचारणा ना. पाटील यांनी केली. त्यावर वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांची पाहाणी करून, आवश्यकतेनुसार वाहतूक पोलीसांची नियुक्ती केली असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

या बैठकीत सीसीटीव्हीचा मुद्दा ही चर्चेत आला. त्यावर ना. पाटील यांनी वाहतूक विभागाने कोथरुडमध्ये कुठे कुठे सीसीटीव्ही लावण्याची आवश्यकता आहे, याची पाहणी करावी, लोकसहभागातून सीसीटीव्ही कार्यान्वित करु असे आश्वस्त केले. त्यासोबतच आवश्यकतेनुसार एआय बेस चलान प्रणालीचाही अवलंब करावा, असेही सूचित केले. वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करावे, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करु, अशी ग्वाही त्यांनी यावेळी वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांना दिली.

दरम्यान, बाणेर-बालेवाडी भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी याच आठवड्यात बैठक घेणार असून, विभागाने मागील बैठकीच्या इतिवृत्तावर कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.