Home Blog Page 1959

वारकऱ्यांना असुविधेला तोंड द्यावे लागू नये याची दक्षता घेण्याचे प्रशासनाला निर्देश

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पालखीमार्ग व पालखीतळांना भेट
पुणे, दि. ८: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हवेली तसेच पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-सासवड-जेजुरी-नीरा या पालखीमार्गाला व पालखी तळ, विसाव्यांच्या ठिकाणांना भेटी देऊन तेथील तयारीच्या अनुषंगाने आढावा घेतला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, दौण्ड- पुरंदर उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, हवेली प्रांताधिकारी संदेश शिर्के, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे संचालक संजय कदम, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते, पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत, हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, पुरंदरचे गटविकास अधिकारी अमर माने, पुणे सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे मनपा क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, संबंधित गावचे पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

वारकऱ्यांना कोणत्याही असुविधांना तोंड द्यावे लागू नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. पालखीमार्गावर आरोग्य सुविधा, पुरेसा औषध साठा, फिरत्या शौचालयांची व्यवस्था, पाणी, वीज आदी सर्व सुविधा प्राधान्याने पुरवण्यात याव्यात. कोविड तपासण्यांची व्यवस्था करण्यात आली असून खबरदारी म्हणून जास्तीत जास्त नमुने घेण्यात यावेत, असे निर्देश डॉ. देशमुख यांनी यावेळी दिले.

पालखीमार्गाच्या साईडपट्टया भरुन घेण्यासह खड्डे तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणी मुरूम व अन्य पर्यायांचा वापर करुन डागडुजी करावी. हे काम कोणत्याही परिस्थितीत २० तारखेच्या आत पूर्ण करुन घ्यावे. दिवे घाटाचा टप्पा पार केल्यानंतर झेंडेवाडी विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांना मोठा विसावा घ्यावा लागतो. तेथील विसाव्याच्या लगतच्या शेतकऱ्यांनी संरक्षक जाळ्या (कंपाऊंड) केलेले आहे. त्या ठिकाणी वारकऱ्यांना विसावा घेता यावा यासाठी प्रशासनाने संबंधित खातेदारांशी संपर्क साधून व्यवस्था करावी.

सासवड पालखीतळ येथे पावसाचे पाणी साचते त्यामुळे या पालखीतळाची उंची वाढवण्याचे काम सुरू असून ते गतीने पूर्ण करण्याच्या सूचना सासवड नगरपरिषदेला दिल्या. कऱ्हा नदीवरील पुलाचे कामही पालखी प्रस्थानापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जेजुरी पालखीतळ नवीन तयार करण्यात येत असून त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार काम सुरू आहे. वाल्हे पालखीतळासाठी वेगळी प्रवेश कमान आणि प्रस्थान कमानीचे काम सुरू आहे. नीरा पालखीतळाच्या बाजूचे मजबुतीकरणाचे (पिचींग) काम सुरू आहे. नीरा नदीवरील पुलाचे संरक्षक कठड्यांची दुरूस्ती तात्काळ करुन घेण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

हवेली तालुक्यात ऊरुळी देवाची पोलीस ठाण्याजवळील विसाव्याच्या ठिकाणाची डागडुजी करण्याच्या सूचना दिल्या. वडकी विसावा येथे स्थायी स्वरुपात सिमेंट काँक्रेटचे स्टेज बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते पालखीपूर्वी पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले.

घाटामध्ये मेडिकल वेस्ट टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई
दिवे घाटामध्ये रात्री वैद्यकीय कचरा (मेडिकल वेस्ट) टाकण्यात येत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने घाटामध्ये दिवसा तसेच रात्री गस्त घालण्यात यावी. असे प्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात घटना आढळल्यास नागरिकांना तक्रार करणे सोपे जावे यासाठी घाटमार्गावर अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक रंगविण्यात यावेत, असेही निर्देश डॉ. देशमुख यांनी दिले.

सदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी बालविवाह रोखण्याची मोहिम राबवा-राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

पुणे, दि. 8: समाजातील वाढती बालविवाहाची कुप्रथा रोखणे हे सर्वांचे कर्तव्य असून सदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवावी, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ योजनेअंतर्गत बाल लिंग गुणोत्तर कमी असलेल्या गावातील पदाधिकाऱ्यांकरीता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस सह आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मितेश घट्टे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिराशे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, महिला आयोगाच्यावतीने राज्यात बालविवाह, गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा, एकल महिला यांच्या समस्या आदींबाबत जनजागृती करण्यात येते. आयोग महिलांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी कार्य करते. त्याचप्रमाणे बालविवाह रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कामामध्ये मध्ये गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांची महत्वाची भूमिका असून गावातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कोणाच्या दबाबाला बळी न पडता बालविवाह आदी कुप्रथा रोखण्यासाठी संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. प्रसाद म्हणाले, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, महर्षी धोंडो केशव कर्वे, बाया कर्वे यांनी महिलांच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याचा गौरवशाली इतिहास पुणे जिल्ह्याला आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या क्षेत्रात गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह, रोखण्यासाठी प्रयत्न करावे. गावातील अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांनी प्रत्येक गर्भवती महिलांची नोंदणी करावी. यासाठी सरपंच, पोलीस पाटील यांनी लक्ष द्यावे. ग्रामपंचायतीच्या मदतीने सूचना बॉक्स उपलब्ध करुन देण्यात यावे. गावात भजनी मंडळाच्या माध्यमातून प्रबोधन करावे, असेही ते म्हणाले.

अप्पर पोलीस आयुक्त श्री. चव्हाण म्हणाले, सर्वांनी मिळून मनात संकल्प केला तर या प्रश्नावर मात निश्चित मात करता येईल. आपल्या परिसरात होणाऱ्या गर्भलिंग निदानचाचण्या, स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह याबाबत पोलीस प्रशासनाला माहिती दिल्यास निश्चितपणे अशा घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. समाजातील कुप्रथेस प्रतिबंध घालणाऱ्या मोहिमेस पोलीसांचे नेहमीच सहकार्य राहील, असेही ते म्हणाले.

अप्पर पोलीस आयुक्त श्री. घट्टे म्हणाले, समाजातील अशा चुकीच्या घटनांवर पोलीस विभागाचे लक्ष आहे. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रयत्न करुन आपल्या गावातील घटत्या स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तराला आळा बसेल याकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

यावेळी चाईल्ड लाईन संस्थेचे पदाधिकारी, जिल्ह्यातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आदी पदाधिकारी उपस्थित होते. बालविवाह रोखण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

मंत्रालयाच्या प्रवेशपास खिडक्यांवर टपाल स्वीकारण्यासाठीची तात्पुरती व्यवस्था बंद

0

मुंबई, दि. 8 : कोविड- १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून गृह विभागाच्या दि.१६ मार्च २०२० रोजीच्या परिपत्रकान्वये मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मंत्रालय प्रवेश पास प्रक्रिया बंद करण्यात आली होती. या विभागाच्या दि. ३० ऑगस्ट २०२१ च्या परिपत्रकान्वये सामान्य जनतेच्या सुविधेसाठी मंत्रालय गार्डन गेट प्रवेशद्वाराजवळ असलेल्या प्रवेशपास खिडक्यांच्या ठिकाणी बाहेरून येणारे टपाल स्विकारण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती.

अभ्यागतांना प्रवेशपास देण्यासाठी राबविण्यात येणारी Visitor Pass Management System (VPMS) दि. १८ मे, २०२२ पासून पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. प्रवेशपास ठिकाणी टपाल स्वीकृतीकरिता केलेली व्यवस्था बंद करण्यात आली असून टपाल प्रत्यक्षात मंत्रालयात स्वीकारले जाणार आहे. यानुसार सर्व विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी तसेच मंत्रालयीन नियंत्रणाखालील सर्व विभाग व कार्यालयांनी टपाल शक्यतो ईमेलद्वारे पाठवावे. याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दि. 18 मे 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत राज्यातील पाच जिल्ह्यांना पुरस्कार

0

मुंबई, दि. 8 : केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत राज्यातील पाच जिल्ह्यांना २०२०-२१ चे उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय पातळीवर सादरीकरणाकरीता निवड झालेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जिल्हे महाराष्ट्र राज्याचे असल्याची माहिती, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी दिली. सातारा आणि सिंधुदुर्ग (Award for Excellence), वाशिम आणि ठाणे (Certificate of Excellence) तर सोलापूर (Letter of Appreciation) या जिल्ह्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत उद्या ९ जून २०२२ रोजी नवी दिल्ली येथे पुरस्कार वितरण होणार आहे.

कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त तथा कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी संबंधित जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तसेच सदस्य सचिव पदावरील सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) यांचे अभिनंदन केले आहे.

केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विकास नियोजनातील उत्कृष्टतेसाठी २०२०-२०२१ (Award of Excellence in District Skill Development Planning-DSDP) या पुरस्कार स्पर्धेत देशातील ३३६ जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता. त्यातून प्राथमिक स्तरावर ३० जिल्ह्यांची केंद्रीय समितीसमोर सादरीकरणासाठी निवड झाली होती. त्यामध्ये राज्यातील ५ जिल्ह्यांच्या कौशल्य विकास कृती आराखड्याचा समावेश होता. राष्ट्रीय पातळीवर सादरीकरणाकरीता निवड झालेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जिल्हे महाराष्ट्र राज्याचे आहेत. जिल्ह्यातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय, नैसर्गिक संसाधने तथा साधनसाम्रगी व कुशल मनुष्यबळाची मागणी असलेली क्षेत्रे निश्चित करून जिल्ह्याचा वार्षिक कृत्ती आराखडा राज्यातील सर्व जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समित्यांमार्फत तयार करण्यात आला आहे.

मागील वर्षीप्रमाणे सन २०२२-२३ करीता सुद्धा आपण स्वत: पुढाकार घेवून जिल्ह्याचा वार्षिक कृती आराखडा तयार करावा आणि त्याची यथोचित अंमलबजावणी करून जिल्ह्यातील युवक-युवतींना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता क्षेत्रामध्ये महत्तम संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी केले आहे.

उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडे तयार करुन स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या सर्व जिल्ह्यांचे अभिनंदन मंत्री श्री. टोपे यांनी केले असून यापुढील काळात या आराखड्यांची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्यांनी जास्तीत जास्त युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात, असे आवाहन मंत्री श्री. टोपे यांनी केले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात २६ वेळा येणार मोठी भरती नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे

0

एरवी नितांत सुंदर आणि शांत असणारा सागर पावसाळ्यात मात्र रौद्र रुप धारण करतो. त्याचेहे रौद्ररुप अनेकवेळा किनाऱ्यावरील नागरी वस्तीला अनुभवास येते. त्यातही पावसाळ्याच्या दिवसात असे काही दिवस असतात ज्यावेळी समुद्राला मोठे उधान येते. त्याचवेळी जर मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असेल तर समुद्र किनाऱ्यासोबतच खाडी किनाऱ्यावरील वस्त्यांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता असते. यंदाच्या पावसाळ्यात समुद्रामध्ये 26 वेळा मोठे उधान येणार असल्याची माहिती प्रादेशिक बंदर विभागाने दिली आहे.

पावसाळ्यात जून महिन्यात 6 वेळा, जुलै महिन्यात 7 वेळा, ऑगस्ट महिन्यात 7 वेळा आणि सप्टेंबर महिन्यात 6 वेळा मोठे उधान येणार आहे. जूनमध्ये मंगळवार दि. 14 जून पासून शनिवार दि. 18 जून हे सलग 5 दिवस मोठ्या भरतीचे असून याकालावधीत 2 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा समुद्रात उठणार आहेत. तर 30 जून रोजीही दुपारी मोठी भरती येणार असून दोन मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा उठतील असा अंदाज आहे. जुलै महिन्यामध्ये बुधवार दि. 13 जुलै ते रविवार दि. 17 जुलै या कालावधीत मोठी भरती येणार आहे. या काळात समुद्रात 2 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उठणार आहेत. तसेच 30 व 31 जुलै हे दिवसही मोठ्या भरतीचे असणार आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये गुरुवार दि. 11 ऑगस्ट ते सोमवार दि. 15 ऑगस्ट या काळात मोठी भरती येणार आहे. याही कालावधीत 2 ते सव्वादोन मीटर उंचीच्या लाटा उसळतील. तसेच दि. 29 व 30 ऑगस्ट या दिवशीही मोठी भरती असणार आहे. सप्टेंबर महिन्यात शुक्रवार दि. 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर हे मोठ्या उधानाचे दिवस असून याकाळात 2 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या उधानाच्या काळात समुद्राच्या आणि खाडीच्या पाणीपातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी याकाळात दक्ष राहून होणाऱ्या जीवित व वित्त हानीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे.

बंदर विभागामार्फत या काळात बंदरात धोक्याची सूचना देारा बावटा लावला जातो. तसेच या काळात मच्छिमारांनी तसेच नागरिकांनी समुद्रात जाऊ नये असाही इशारा देण्यात आला आहे.

मोठी भरती आणि जोरदार पाऊस एकाच वेळी सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता असते. अशावेळी नागरिकांनी पुढीलप्रमाणे खबरदारी घ्यावी. कचरा, प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्या या नाले व गटारामध्ये तुंबणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मोठ्या भरतीच्या काळात जास्तीत जास्त घरीच राहण्याचा प्रयत्न करावा. आकाशवाणी तसेच स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेऊन त्याचे पालन करावे. पाणी शिरण्याची शक्यता असलेले किनाऱ्यावरील तसेच खाडी किनाऱ्यावरील वस्तीस्थान रिकामे करून तात्पुरते स्थलांतर करावे. स्थलांतरावेळी कंदिल, टॉर्च, खाण्याचे सामान, पाणी, कोरडी कपडे, महत्वाची कागदपत्रे जवळ ठेवावीत. पाण्यात अडकल्यास सोडवण्यासाठी आलेल्या टीमला सहकार्य करावे.

वस्तीपर्यंत पाणी आल्यास घरातील वीज कनेक्शन बंद करावे. सर्व आवश्यक साहित्यासह स्थलांतर करावे व त्याविषयी आपले आप्त, नातेवाईक यांना कल्पना द्यावी. जर जवळपास वीजेची तार कोसळली असेल तर त्याची माहिती महावितरणला द्यावी. अशा वीजेच्या तारेपासून लांब रहावे. साठलेल्या पाण्यातून जाण्याची वेळ आलीच तर सोबत एक मोठी काठी ठेवावी व त्याच्या आधाराने पाण्याच्या खोलीचा आदांज घेत जावे. जेणेकरून एकदम खोल पाण्यात किंवा खड्ड्यात पडणार नाही.

पुढील गोष्टी करण्याचे टाळा – वाहत्या प्रवाहामध्ये जाऊ नका, उधानाच्या काळात तसेच जोरदार पाऊस पडत असताना समुद्रामध्ये किंवा खाडीमध्ये पोहण्यासाठी उतरू नका. पाणी आलेल्या रस्तावरून वाहने चालवू नका. पुराच्या पाण्याच्या संपर्कातील कोणतेही खाद्यान्न खाऊ नका. घरामध्ये पाणी आले असेल तर विद्युत पुरवठा स्वतःहून सुरू करू नका. त्यासाठी महावितरणच्या अभियंत्यांना संपर्क करून त्यांच्याकडूनच विद्युत पुरवठा सुरू करून घ्या. पडण्याच्या स्थितीत असलेले वीजेचे खांब, झाड, भिंत यापासून दूर रहा.

नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना सर्वती मदत करण्यासाठी प्रशासन सज्ज असतेच. पण, आपणच केलेली आपली मदत जास्त महत्वाची असते. प्रशासन आपल्यापर्यंत पोहचेपर्यंत आपणच आपली मदत करणे जास्त गरजेचे आहे. त्यामुळे अशा उधानाच्या काळात परिस्थितीपाहून सूचनांचे योग्य पालन करणे गरजेचे आहे.

                                                                                                                                         हेमंतकुमार चव्हाण,

                                                                                                                                         माहिती सहाय्यक,

                                                                                                                                    जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग

पुण्यासह २७ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

हवामान खात्याने आज पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना पिवळा इशारा जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.पुढील तीन ते चार दिवस दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानाची ही स्थिती मान्सूनच्या आगमानासाठी फायदेशीर ठरणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे जळगाव, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांना हवामान खात्यानं पिवळा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. संबंधित जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही तासांत या जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

बीड जिल्ह्यात सातत्याने मोठया प्रमाणात अवैधरित्या गर्भपात:कडक कार्यवाही आणि SOP तयार करा : विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आदेश

0

औरंगाबाद, ता. ८ : बक्करवाडी ता.गेवराई जि.बीड येथे आणखी महिलेचे अवैध गर्भपात प्रकरण उघडकीस आले आहे. यात अतिरक्तस्त्रावामुळे सीता गाडे या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी गेवराईच्या महिला एजंटला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पिंपळनेर ता.गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज बीड जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे.
तसेच या प्रकरणी जिल्हास्तरीय समित्या स्थापन करून या घटनेची सखोल तपास करावा असे निर्देश गृह सचिवांना पत्राद्वारे दिले आहेत.

त्यांनी याबाबत पत्रात म्हटले आहे की, या घटनेनंतर परळी येथील सुदाम मुंडे प्रकरणानंतर लिंगनिदान चाचणी करणारी मोठी टोळी उघड होण्याची शक्यता वाटत आहे.

तसेच या घटनेतील आरोपी नर्सने देखील आत्महत्या केली आहे त्यामुळे यास संबंधित आणखी किती व्यक्ती यांनी गायब आहेत याच तपास तात्काळ करण्याबाबत सुचविले आहे. त्या आपल्या पत्रात म्हणतात, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सातत्याने बीड जिल्ह्यात अवैधरित्या घटना घडत असल्याने पुढील सूचना त्यांनी दिल्या आहेत.
१) या घटनेतील सर्व संबंधित आरोपींवर कडक कारवाई करून आयपीएस कलम ३०२ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात विधी विभागाकडून तपासून कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधीक्षक यांना द्याव्यात.
२) PCPNDT आणि MTP कायद्याअंतर्गत गुन्हा संबंधित आरोपींवर दाखल करण्यात यावा.
३) केंद्रीय गर्भधारणा वैद्यकीय
समाप्तीच्या कायदा (Medical Termination of Pregnancy Act) जुन २१ मधील तरतुदीनुसार जिल्हास्तरीय समिती स्थापन केल्याशिवाय अवैध गर्भपातांना आळा बसणार नाही. त्यामुळे PCPNDT व MTP अंतर्गत जिल्हास्तरीय गृह विभागाच्या समिती स्थापन करण्यात यावी. तथापि अद्याप या जिल्हास्तरीय समित्या अस्तित्वात आलेल्या नाहीत. या अभावी अल्पवयीन मुलींच्या अपुर्ण व अवैध गर्भपात होत आहेत. त्यामुळे जिल्हानिहाय तात्काळ या समित्या नेमण्या बाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी.
४) यातील आरोपी नर्सने आत्महत्या केली आहे त्यामुळे या घटनेशी किती लोक संबंधित आहेत याचा तपास करण्यात यावा.
५) यातील सर्व आरोपींच्या मोबाईल रेकॉर्ड तपासण्यात यावा.

महिंद्रातर्फे कार्गो आणि पॅसेंजर प्रकारात नवीन अल्फा सीएनजी सादर

मुंबई,8 जून २०२२: महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने लोकप्रिय अल्फा ब्रँडवर आधारित नवीन अल्फा सीएनजी पॅसेंजर आणि कार्गो प्रकार सादर केली. नवीन प्रकाराची आकर्षक किंमत अल्फा पॅसेंजर डीएक्स BS6 सीएनजी साठी ₹  2,57,570.00 आणि अल्फा लोड प्लस साठी ₹ 2,58,580.00 आहे (एक्स-शोरूम, लखनऊ). याव्यतिरिक्त, अल्फा कार्गो आणि पॅसेंजर मालक डिझेल कार्गो थ्री-व्हीलरच्या तुलनेत ५ वर्षांमध्ये ₹ 4,00,000.00 अतिरिक्त इंधन खर्चात बचत करू शकतात. ही वाहने उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, बिहार, झारखंड, केरळ आणि मध्य प्रदेशमधील महिंद्रा डीलरशिपवर उपलब्ध असतील.

महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा बोलल्या “नवीन अल्फा सीएनजी कार्गो आणि पॅसेंजर सादर केल्याने आमच्या ग्राहकांना त्यांच्या विविध गतिशीलतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रिक, डिझेल आणि सीएनजीसह अनेक पर्याय सादर करून आम्हाला पूर्ण श्रेणीचे उत्पादक बनवले आहे. भारतातील काही सीएनजी स्टेशन्सच्या वाढत्या घनतेसह अल्फा कार्गो आणि पॅसेंजर ही मोठी बचत करू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट पर्याय होइल”

महिंद्रा अल्फा सीएनजीची वैशिष्ट्ये

1.       ५ वर्षात ₹ 4,00,000.00 अतुलनीय बचत

डिझेल थ्री-व्हीलरच्या तुलनेत (लखनऊ मध्ये मार्च २०२२ पर्यंत CNG ₹ 68.1/kg, आणि

डिझेल = ₹ 90.92/litre)  5 वर्षात ₹ 4,00,000.00 इंधन खर्चाची बचत

2. विभागातील सर्वोत्तम मायलेज

·         अल्फा डीएक्स पॅसेंजर 40.2 km/kg तर  लोड प्लस 38.6 km/kg मायलेज देते (ARAI चाचण्यांनुसार). हे अतिशय उत्तम ऑपरेटिंग रेंजचे प्रदान करते.

3. विभागातील सर्वोत्तम इंजिन क्षमता आणि टॉर्क

·         395 cm³, वॉटर-कूल्ड इंजिन त्याच्या वर्गातील सर्वात मोठे आहे आणि दीर्घकालीन विश्वासार्हतेची खात्री देते

·         इंजिन 23.5 Nm चे विभागातील सर्वोत्तम टॉर्क सादर करते ज्यामध्ये रहदारीच्या पुढे राहण्यास मदत होण्यासाठी कमी वेगात जास्तीत जास्त 20 Nm टॉर्क उपलब्ध

4. अतुलनीय विश्वसनीयताटिकाऊपणा

·         खडबडीत  प्लॅटफॉर्मवर आधारित, 0.90 mm सर्वोत्कृष्ट शीट मेटल जाडीसह, पॅसेंजर सीएनजी तसेच कार्गो प्रकार उच्च टिकाऊपणा देतात.

·         संपुर्ण भारतामध्ये 800 हून अधिक डीलर टच पॉइंट्ससह महिंद्रा  सीएनजीची देखभाल सुलभ पोहोच मध्ये

‘ईट राईट चॅलेंज’ स्पर्धेमध्ये पुणे विभागाची उल्लेखनीय कामगिरी: अन्न प्रशासनची मोलाची भूमिका

पुणे, दि. ८:- ‘ईट राईट चॅलेंज’ स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याने देशात १० वा क्रमांक तर सोलापूर जिल्ह्याने २१ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अन्न व औषध प्रशासन पुणे विभागांतर्गत अन्न प्रशासनाने यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.

भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणातर्फे ‘ईट राईट चॅलेंज’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अन्न सुरक्षा व मानके कायद्याची अंमलबजावणी व ग्राहक जागृती, अन्न व्यावसाईकांचे प्रशिक्षण, ‘ईट राईट कँपस’, धार्मिक स्थळांमधील प्रसादाची स्वच्छता व सुरक्षा, पदपथावर विक्री होणाऱ्या अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत हमी आदी निकषावर उत्तम कामगिरी करणाऱ्या देशभरातून ७५ जिल्ह्याची निवड करण्यात आली. त्यामधे पुणे व सोलापूर जिल्ह्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. काल ७ जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित समारोहात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन या जिल्ह्यांचा बहूमान करण्यात आला.

पुणे विभाग अन्न प्रशासनाच्या पथकाने या स्पर्धेमध्ये सर्व स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. दैनंदिन अंमलबजावणीसह पुण्यातील जंगली महाराज (जेएम) कॉर्नर या ठिकाणाला ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’ चा दर्जा मिळवून दिला. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर मंदिर, नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिरामधील अन्न छत्राला स्वच्छ प्रसाद निर्मिती आणि वाटपासाठी प्रमाणपत्र मिळाले आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, यशदा, येरवडा कारागृह, सिरम इन्स्टिट्यूट येथील उपहारगृहांना ‘ईट राईट कँपस’ चा दर्जा मिळाला आहे. पुणे आकुर्डी, कॅम्प, बारामती, देहू – १ व २, चाकण, चिंचवड व लोणावळा येथील फळे व भाजीपाला मार्केट साठी ‘क्लिन अॅण्ड फ्रेश फ्रूट अॅण्ड व्हेजिटेबल मार्केट’ चा दर्जा मिळालेला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील ११६ हॉटेल्सना हायजिन रेटींगचा दर्जा मिळालेला आहे.

पुणे जिल्ह्याला हा बहुमान मिळवून देण्यासाठी अन्न प्रशासनचे पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) संजय नारगुडे, अर्जुन भुजबळ, बाळू ठाकूर, साहेबराव देसाई, श्रीकांत करकाळे तसेच अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय काम केले.

बळीराजाच्या आरोग्यासाठी…

0

कोरोना संकटकाळात शेतकरी बांधवांमुळे अर्थव्यवस्थेला ताकद मिळाली. त्यामुळे कृषी क्षेत्राचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. कृषिप्रधान संस्कृतीचा शेतकरी हा कणा आहे. देशाच्या, राज्याच्या अर्थव्यस्थेचा शेतकरी आधार आहे. मात्र सर्वांच्या पोटाची काळजी घेणाऱ्या शेतकरी बांधवांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची शासनाने काळजी घेतली आहे. कृषी विभाग आता शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे वाण मोफत देणार आहे. यामुळे पोषणमूल्यांची गरज भागण्यास मदत होणार आहे. ‘आत्मांतर्गत पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजना सन 2022-23’ च्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातले पहिले राज्य ठरले आहे.

विषमुक्त सुरक्षित अन्न

शेतकरी कुटुंबाला भाजीपाला, कडधान्य बीयाणे कीट पुरवठा करून त्यांची लागवड केल्यास त्यातून येणाऱ्या पोषणमूल्यांची गरज भागविता येऊ शकते. पोषणमूल्य असणाऱ्या वाणांची लागवड करून त्यातून येणाऱ्या भाज्या, कडधान्यांचा शेतकरी कुटुंबाने स्वत:च्या आहारात  वापर करायचा आहे. आपण स्वत: लागवड केलेल्या शेतात किड रोगांसाठीच्या विषारी औषध फवारण्याचे प्रमाण मर्यादित ठेऊन किंवा पूर्णता टाळून विषमुक्त सुरक्षित अन्न शेतकरी कुटुंबाला मिळू शकते.

लाभार्थ्यांची निवड

शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना पोषणयुक्त व सुरक्षित अन्नाचा पुरवठा करणे, संतुलित अन्नाचा पुरवठा करणे, विषमुक्त सुरक्षित अन्नाचा पुरवठा करणे, ग्रामीण भागातील पोषणमूल्याअभावी होणारे कुपोषण कमी करणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून ही योजना पुढे आली आहे. सुरूवातीला प्रत्येक गावात 10 किट देण्यात येणार आहेत. त्यांनतर टप्प्याटप्प्याने कीट देण्याचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. डीपीसी, सीएसआर, पंचायत समिती सेस, जिल्हा परिषद सेस, फलोत्पादन विभागाची परसबाग योजना यासाठी उपयोगात आणली जाणार आहे. आत्माचे प्रकल्प संचालक यासाठी प्रयत्नशिल आहेत.

या योजनेसाठी 50 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असून गावातील कुपोषित बालके असलेल्या कुटुंबाला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच गावातील अनुसूचित जाती/जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असून उर्वरित लाभार्थी आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट,महिला बचत गटातील असणार आहेत. ग्राम कृषी विकास समितीच्या मान्यतेने लाभार्थी अंतिम करण्यात येणार आहेत.

बियाणे

भोपळा, शिरी दोडका, चोपडा दोडका, भेंडी, चवळी, वाल, मेथी, गाजर, गवार, मिरची, कोथिंबीर या बियाणांचे वाण शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. हे बियाण्यांचे किट एक गुंठ्यासाठी पुरेसे असून एका शेतकरी कुटुंबाची दैनंदिन गरज भागू शकणार आहे. शेतकऱ्यांनी बियाणे बँक तयार करून स्वत: वापरून इतरांनाही बियाणे द्यावयाचे आहेत. या बियाणांच्या लागवडीनंतर हंगामाच्या शेवटी येणाऱ्या बिया पुढच्या वर्षी वापरायचा आहेत. या बीयाण्यांचा पुरवठा महाबीज करणार असून गुणवत्तेची जबाबदारी महाबीजची आहे.

अशी करावी लागवड

या बियाण्यांच्या लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी जागा निवडावी. जागा शक्यतो राहत्या घराजवळ जागा असावी, जणेकरून देखरेख करणे सोईचे होईल. लागवड करताना मशागत करून माती भुसभुशीत करून शेणखत टाकावे. पालेभाज्यांसाठी गादी वाफे तयार करावेत. फळभाज्यांसाठी सरीवरंबे, हंगामानुसार येणाऱ्या पिकांची लागवड करावी. भाजापाल्याचे आहारातील महत्व, लागवड, जोपासना, कीड व रोग, बीयाणे बँक यासाठी ग्रामस्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबाचे पोषणमान उंचावणार असून शेतकरी कुटुंब रोगमुक्त जीवन जगू शकणार आहे.

अन्न सुरक्षेबरोबरच पोषण सुरक्षितता

शेतकरी कुटुंबाच्या अन्न सुरक्षेबरोबरच पोषण सुरक्षितताही महत्वाची आहे. आहारात प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे इत्यादी आवश्यक पोषणमुल्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. कुपोषण हे अन्न कमतरतेमुळे नसून पोषणमूल्यांच्या अभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. पोषणमूल्यांच्या अभावी लहान मुलांमध्ये तसेच महिलांमध्ये रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता आढळून येते. त्यामुळे ॲनिमियासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. पोषण मूल्यांच्या कमी सेवनामुळे ग्रामीण भागातील मुलांमध्ये वाढ खुंटण्यासारखे गंभीर परिणाम दिसून आल्याचे अधोरेखित केले जात आहे. त्यामुळे रोजच्या आहारात  कडधान्य, भाज्या असणे आवश्यक आहे.

सागरकुमार कांबळे

सहायक संचालक(माहिती)

महिंद्रा ट्रॅक्टरतर्फे महाराष्ट्रातील युवो टेक+ मालिकेतील सहा नवीन ट्रॅक्टर मॉडेल्स सादर

·         37 – 50 एचपी  (27.6 36.7 kW) विभागामध्ये नवीन सादर केलेल्या युवो टेक+ ब्रँड अंतर्गत 6 नवीन मॉडेल्स सादर

·         उत्कृष्ट पॉवर, टॉर्क आणि मायलेजसाठी महिंद्रा ट्रॅक्टरच्या प्रगत ३-सिलेंडर एम-झेडआयपी इंजिन आणि ४-सिलेंडर ईएलएस इंजिनद्वारे समर्थित

·         12 F + 3 R ट्रान्समिशन, ट्रू-साइड शिफ्ट, हाय प्रिसिजन हायड्रॉलिक, 4-व्हील ड्राइव्ह, ड्युअल क्लच, SLIPTO, 2-स्पीड PTO यासारख्या अनेक क्लास-अग्रणी वैशिष्ट्यांसह परिपूर्ण

·         सुलभ आणि सुव्यवस्थित कामकाजासाठी महिंद्राच्या 6-वर्षांच्या वॉरंटी कार्यक्रमाचे पाठबळ

पुणे, ८ जून २०२२: महिंद्रा ट्रॅक्टर, महिंद्रा समूहाचा एक भाग असलेल्या आणि संख्येने जगातील सर्वात मोठे ट्रॅक्टर उत्पादक असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने आज नुकत्याच सादर केलेल्या युवो टेक + ब्रँड अंतर्गत सहा नवीन मॉडेल्सचे अनावरण केले असून त्यामुळे कंपनीने गेल्या वर्षी सादर केलेल्या ट्रॅक्टर प्लॅटफॉर्मला आणखी बळ मिळाले आहे.

महिंद्रा युवो टेक + चेन्नईतील महिंद्राज रिसर्च व्हॅली (MRV) येथे जागतिक दर्जाच्या मानकांनुसार डिझाइन आणि विकसित केले आहे. ब्रँड श्रेणीचा विस्तार करताना, सहा नवीन ट्रॅक्टर महिंद्रा ट्रॅक्टरच्या नवीन एम-झेडआयपी इंजिन 3-सिलेंडर आणि ईएलएस ४-सिलेंडर इंजिनद्वारे समर्थित आहेत आणि ते सर्वोत्तम पॉवर, टॉर्क आणि मायलेज देतात.

सहा नवीन मॉडेल्स ट्रॅक्टर 37 – 50 एचपी (27.6 36.7 kW) पॉवर बँडमध्ये सादर केलेले असून ४-व्हील ड्राइव्ह, ड्युअल क्लच, SLIPTO, ऑक्झिलरी व्हॉल्व्ह आणि २-स्पीड पीटीओ या प्रमुख वैशिष्ट्यांसह येतात. ३० हून अधिक कृषी सुविधांसाठी ते योग्य आहेत.

युवो टेक + रेंज १२ एफ (फॉरवर्ड) + ३आर(रिव्हर्स) ट्रान्समिशन तंत्रज्ञानासह, ड्युअल क्लच आणि ४ डब्ल्यूडीसह ३-स्पीड श्रेणी पर्याय (H-M-L) सह चांगल्या कामगिरीसाठी येते. वेगवेगळ्या मातीच्या प्रकारांवर आणि कृषी अनुप्रयोगांवर आधारित गती निवडण्यात मदत करते. उच्च तंतोतंत नियंत्रण वाल्वसह आणि १७०० किलो पर्यंतची सर्वोत्तम श्रेणीतील उचलून घेण्याची क्षमता यांसह, नवीन ट्रॅक्टर जड अवजारे सहजपणे आणि अचूकपणे हाताळू शकतात. SLIPTO वैशिष्ट्य बेलर्स सारख्या अवजारांसाठी सहज कार्य करण्यास सक्षम करते.महिंद्रा ट्रॅक्टरने ३-सिलेंडर एम-झेडआयपी इंजिनसह २७५ युवो टेक+, ४०५ युवो टेक+ आणि ४१५ युवो टेक+ आणि 4 सिलेंडर ईएलएस इंजिनसह ४७५ युवो टेक+, ५७५ युवो टेक+ आणि ५८५ युवो टेक+ सादर केले.

नवीन उत्पादने लवकरच येत्या काही महिन्यांत संपूर्ण भारतात सादर केली जातील.

या सादरीकरणाबद्दल बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले, “शेतीक्षेत्रात परिवर्तन आणून जीवन समृद्ध करण्याच्या महिंद्रा फार्म इक्विपमेंट सेक्टरच्या उद्देशाला अनुसरून युवो टेक+ ‘तंत्रज्ञानात नंबर 1, हर काम में नंबर 1’ हे आपले ब्रँडचे ब्रीदवाक्य जपत आहे. शेतकरी वेग आणि कार्यक्षमतेसाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना सर्वाधिक प्रगत आणि आपल्या विभागातील बहुपयोगी युवो टेक+ ची रचना भारतीय शेतकऱ्यासाठी अधिक चांगली कमाई करण्यासाठी उत्पादकता, आराम आणि बचतीचे एक विजयी सूत्र सादर करण्यासाठी विकसित केले आहे. या सादरीकरणामुळे आम्हाला खात्री आहे की युवो टेक+ मालिकेतील ही उत्पादने ट्रॅक्टर मार्केटमध्ये आमचे नेतृत्व स्थान आणखी मजबूत करतील.”

नवीन महिंद्रा युवो टेक + ट्रॅक्टर श्रेणीची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे:

·         इंजिन- टेक्नॉलॉजी अशी जी पॉवर आणि मायलेज मध्ये असेल नंबर १-प्रगत आणि शक्तिशाली ३-सिलेंडर एम-झिप इंजिन आणि ४ सिलेंडर ईएलएस इंजिन

·         उच्च बॅक अप टॉर्क – गियर न बदलता लोड अचानक बदलून देखील चांगले कार्य करते

·         उच्च कमाल टॉर्क – किमान आरपीएम ड्रॉप १९७ एनएमसह विविध अॅप्लिकेशन्स खेचते

·         सर्वोत्कृष्ट पीटीओ पॉवर – दीर्घ कामकाज तास आणि मोठ्या उपकरणांसह जलद

टर्नअराउंड ३३.९ kW (४५.५HP)

·         सर्वोत्तम श्रेणीतील मायलेज – इंधन खर्च वाचवते

·         समांतर इंजिन कूलिंग – स्टॉल फ्री दीर्घ कामाचे तास सुनिश्चित करते

ट्रान्समिशन: टेक्नॉलॉजी ऐसी जो स्पीड ऑप्शन्स में हो नंबर १

·         १२ फॉरवर्ड + ३ रिव्हर्स- सुलभ कामकाजासाठी अनेक वेग पर्याय

·         H-M-L स्पीड रेंज- इतर ट्रॅक्टरच्या तुलनेत अधिक चांगले वेगाचे पर्याय

·         विश्वसनीय आणि टिकाऊ प्लॅनेटरी रीडक्शन – दीर्घकाळ आयुष्य

·         जास्त भार वाहून नेण्यासाठी हेलिकल गियर क्षमता

·         फुल कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशन- सुलभ गियर शिफ्ट आणि ट्रू साइड शिफ्ट.

हायड्रोलिक्स: हायड्रॉलिकमध्ये मध्ये प्रथम क्रमांकावर असलेले तंत्रज्ञान

·         हाय-प्रिसिजन कंट्रोल व्हॉल्व्ह – एकसमान खोली साठी

·         उचलून घेण्याची वर्धित क्षमता – १७०० किलो पर्यंत मजबूत अवजारांसह कार्य करते.

·         जलद खाली करणारी आणि उचलून घेणारी अवजारे

कम्फर्ट: टेक्नॉलॉजी ऐसी जो ड्रायव्हिंग कंफर्ट मे हो नंबर १

·         साइड शिफ्ट गियर – कार सारखा आराम

·         सर्वोत्तम श्रेणीतील अर्गोनॉमिक्स

·         दुहेरी अभिनय संतुलित पॉवर स्टीयरिंग- आरामदायक ड्रायव्हिंग

+प्लस: इतर तंत्रज्ञान वैशिष्ट्ये

·         ६ वर्षांची वॉरंटी

·         उत्तम सेवा अंतराल (४०० तास)- सेवा केंद्राला कमी वेळा भेट देण्याची गरज

·         फॅक्टरी फिट केलेले टिपिंग ट्रेलर पाईप

·         ४ डब्ल्यूडी- चारही टायर्सला जास्त पॉवर. जास्त ट्रॅक्टर आणि कमी टायर. विशेषतः पुडलिंग दरम्यान ट्रान्समिशनमध्ये पाणी टाळण्यासाठी यांत्रिक सील

·         ड्युअल क्लच: वेगळे मुख्य क्लच आणि पीटीओ क्लच. सीआरपीटीओ आणि आरसीआरपीटीओ चोकिंग होत नाही आणि शेतीच्या विविध कामांमध्ये मदत मिळते.

·         SLIPTO: सिंगल लीव्हर स्वतंत्र पीटीओ सर्व क्रिया सुलभ करते

·         ५४० इकॉनॉमी पीटीओ कमी आरपीएमवर चालण्यास आणि इंधन बचत करण्यात मदत करते

महिंद्रा तीन दशकांहून अधिक काळ भारतातील प्रथम क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रँड आहे. इंटरनॅशनल हार्वेस्टर इंक., यूएसए आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे १९६३ मध्ये त्यांचा पहिला ट्रॅक्टर बाजारात आल्यानंतर, मार्च २०१९ मध्ये ३ दशलक्ष ट्रॅक्टर विकणारा पहिला भारतीय ट्रॅक्टर ब्रँड बनला. यामध्ये जागतिक पातळीवरील ग्राहकांना केलेल्या विक्रीचाही समावेश होता.

खडबडीत जमिनीवरतीही अपवादात्मक उभारणी गुणवत्ता कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या, महिंद्राच्या ट्रॅक्टरने कंपनीला डेमिंग अवॉर्ड आणि जपानी क्वालिटी मेडल्स दोन्ही मिळवून दिले आहे. ही कामगिरी करणारी ही कंपनी एकमेव ट्रॅक्टर उत्पादक कंपनी असून कंपनीतर्फे आज देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी बहु-कार्यक्षम वापरासाठी विविध श्रेणीतील ट्रॅक्टर्स विकसित केले जातात.

महिंद्राचे काम सहा खंडांतील ५० हून अधिक देशांमध्ये असून अमेरिका ही भारताबाहेरील कंपनीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आज महिंद्राचे जगभरात उत्पादन आणि असेम्ब्लीचे काम असून सहाय्यक कंपन्यांच्या माध्यमातून उत्तर अमेरिका, ब्राझील, मेक्सिको, फिनलंड, तुर्की आणि जपान येथे काम सुरु आहे.

अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचाबारावीचा निकाल सलग नवव्या वर्षी शंभर टक्के

पुणे, दि. ८ जून २०२२ : महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल सलग नवव्या वर्षी शंभर टक्के लागला आहे. सुमारे २०८ मुलांना डिस्टिंक्शन मिळाले असून, उज्वल निकालाची परंपरा कायम राखल्याचे समाधान संस्थेच्या चेअरमन सुमन घोलप यांनी व्यक्त केले.
पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ज्ञानदानाचे कार्य गेली अनेक वर्ष नेटाने करत असून, येथील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी गुणवत्ता जोपासत आहेत. यावेळी शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे परिश्रमाला उचित फळ मिळाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अभिनंदन करण्यासाठी संस्थेचे चेअरमन सुमन घोलप, सचिव प्रसाद मारुतराव आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, सदस्य प्रज्योत आबनावे, गौरव आबनावे, ज्युनिअर कॉलेजच्या रेखा दराडे, प्राचार्य विद्या कांबळे आदी उपस्थित होते. 
सुमन घोलप यांनी संस्थेचे शिक्षक व कर्मचारी यांना गुणवत्ता कायम राखण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रसाद आबनावे यांनी ज्ञानदानाचे कार्य असेच कायम ठेवून विद्यार्थ्यांना घडवणे हेच पुण्याचे काम आहे, असे सांगितले. संस्थेचे मानद अध्यक्ष मोहन जोशी यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज

0

सांगली जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. जिल्ह्यात खरीपाची 633 व रब्बीची 103 गावे आहेत. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 8 लाख 61 हजार हेक्टर असून निव्वळ लागवडीखालील क्षेत्र 5 लाख 76 हजार 903 हेक्टर आहे. यामध्ये सिंचनाखालील क्षेत्र 3 लाख 63 हजार 890 हेक्टर असून भूपृष्ठावरील सिंचीत क्षेत्र 2 लाख 80 हजार 747 हेक्टर आहे. ठिबक सिंचनाचे क्षेत्र 56 हजार 700 हेक्टर तर 83 हजार 219 विहीरी जिल्ह्यात आहेत. कृषी विभागाने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बी-‍बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी तसेच साठेबाजीला आळा घालण्यासाठी नियोजन केले आहे. खरीप हंगामासाठी सांगली जिल्हा कृषी विभाग सज्ज झाला आहे.

जिल्ह्यात भात, खरीप ज्वारी, रब्बी ज्वारी, बाजरी, मका, तूर, मुग, उडीद, भुईमुग, सोयाबीन, ऊस, गहू, हरभरा यासारखी पिके प्रामुख्याने घेतली जातात. गतवर्षी जिल्ह्यात 1 लाख 24 हजार 977 हेक्टर क्षेत्रावर ऊसाची त्याखालोखाल 56 हजार 124 हेक्टर क्षेत्रावर बाजरीची, 51 हजार 755 हेक्टरवर सोयाबीन, 44 हजार 651 हेक्टरवर मका, 38 हजार 791 हेक्टरवर खरीप ज्वारी यांची पेरणी झाली. तर खरीप हंगाम सन 2022-23 साठी 1 लाख 22 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर ऊस, 60 हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरी, 38 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर खरीप ज्वारी, 44 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर मका, 38 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर भुईमुग, 51 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, 18 हजार 200 हेक्टरवर उडीद, 15 हजार 700 हेक्टरवर भात, 11 हजार 800 हेक्टरवर तूर, 9 हजार 500 हेक्टरवर मूग, 8 हजार 300 हेक्टरवर इतर कडधान्य पेरणीचे उद्दिष्ट असून उत्पादन व उत्पादकता या दोहांमध्ये वाढ करण्यासाठीही जिल्ह्यातील शेतकरी आणि विभाग प्रयत्नशील आहेत.

सांगली जिल्ह्यात गत काही वर्षांमध्ये पर्जन्यमान चांगले राहिले आहे. गतवर्षी 770 मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला आहे. खरीप हंगाम सन 2022 साठी 64 हजार 24 क्विंटल बियाणांची आवश्यकता असून महाबीजकडून या हंगामासाठी 15 हजार 175 क्विंटल तर खाजगीरित्या 22 हजार 815 क्विंटल बियाणांची उपलब्धता आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडे 63 हजार 336 क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी, एनपीके अशा विविध प्रकारची 1 लाख 51 हजार 530 मेट्रीक टन खतांची उपलब्धता आहे. तर सध्याचा शिल्लक साठा 43 हजार 111 मेट्रीक टनाचा आहे.

रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यायी खतांचा वापर वाढविण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. नॅनो युरियाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून सध्या सांगली जिल्हा नॅनो युरिया वापरामध्ये राज्यात अग्रेसर आहे. जीवाणू खत वापरासाठी बीज प्रक्रिया मोहिम हाती घेण्यात आली आहे. पोटॅशला पर्यायी खतांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. ऊस पिकासाठी बेसल व भरणी डोसेसमध्ये BIO-Enriched Organic Mannure चा वापर केल्यास रासायनिक खतांमध्ये 30 ते 40 टक्के बचत व खर्चात 50 टक्केपर्यंत बचत होणार आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये साधारणपणे 2 हजार 249 बियाणे, 2 हजार 947 खते व 2 हजार 450 कीटकनाशके परवानाधारकांच्या माध्यमातून कृषि निविष्ठांचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गुणवत्तापूर्ण निविष्ठा वितरीत व्हाव्या यासाठी कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग यांनी मिळून 32 गुणनियंत्रण निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. सन 2021-22 मध्ये 30 बियाणे व 11 रासायनिक खते अप्रमाणित नमुन्यांवर केसेस दाखल केल्या आहेत. 104 बियाणे, 140 रासायनिक खते व 14 कीटकनाशके परवानाधारकांवर निलंबनांची कारवाई कृषी विभागाने केली आहे. तर 11 बियाणे, 39 रासायनिक खते व 44 कीटकनाशके परवानाधारकांना विक्री बंदी करण्यात आली आहे.

खरीप हंगाम सन 2022-23 साठी निविष्ठा गुणनियंत्रण नियोजन करण्यात आले असून 11 भरारी पथके जिल्ह्यात स्थापन केली आहेत. जिल्हास्तरावर 30 मार्च पासून सनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून 15 हजार 880 शेतकऱ्यांना 7 हजार 940 हेक्टर क्षेत्रासाठी ठिबकचा तर 140 शेतकऱ्यांना 115 हेक्टरसाठी तुषार सिंचन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 1 लाख 42 हजार 223 शेतकऱ्यांना तर रब्बी हंगामासाठी 79 हजार 430 शेतकऱ्यांना सन 2021-22 मध्ये 2 हजार 188 कोटी 11 लाख रूपये कर्ज विविध बँकाच्या माध्यमातून वितरीत करण्यात आले आहे. सन 2022-23 मध्येही बँकनिहाय पतपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असून खरीपसाठी 1 हजार 994 कोटी 64 लाख तर रब्बीसाठी 855 कोटी 37 लाख रूपये पीक कर्ज वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना विनासहायास, विनाविलंब पीक कर्ज वितरण करण्याचे आदेश सर्व बँकांना दिले आहेत.

शेतकऱ्यांनी 75 ते 100 मि. मी. पाऊस झाल्याशिवाय व जमिनीमध्ये पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये. खरीप हंगाम 2022 साठी खते व बियाणे निविष्ठा उपलब्धतेसाठी अडचणी उद्भवल्यास जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी 0233-2601412, 0233-2601413, 0233-2372718 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

श्रीमती वर्षा पाटोळे,

जिल्हा माहिती अधिकारी,

सांगली

लाभार्थींची संख्या वाढणार याचा आनंद – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

0

मुंबई, दि. 8 : 28 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 4 महामंडळाचे भागभांडवल वाढवण्याचा निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी होत असून, राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे.

या शासन निर्णयानुसार महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे भागभांडवल पूर्वी 500 कोटी होते, ते वाढवून एक हजार कोटी करण्यात आले आहे. त्याचबरोबर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे भागभांडवल 73 कोटींवरून वाढवून एक हजार कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे भागभांडवल 300 कोटींवरून वाढवून एक हजार कोटी आणि राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे भागभांडवल 50 कोटींवरून दहा पटीने वाढवून 500 कोटी करण्यात आले आहे.

महामंडळाच्या भागभांडवल वाढीसाठी राज्य सरकारने भरभरून निधी दिला असून अतिरिक्त निधी टप्प्याटप्प्याने महामंडळांना वितरित करण्यात येईल. या महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्यक्ष लाभ मिळणाऱ्या गरजू लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून, त्यांना थेट लाभ मिळाल्याने त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचा विशेष आनंद असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

0

मुंबई, दि. 8: रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये अजूनही युद्ध सुरु आहे. यादरम्यान युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम शिकण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी गेले आहेत. यातील काही विद्यार्थी परत आले असून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यात युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता यांच्यासह युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, सध्या राज्यामध्ये २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये (३ हजार ६५० जागा), महानगरपालिकेची ५ वैद्यकीय महाविद्यालये (९०० जागा), शासन अनुदानित १ वैद्यकीय महाविद्यालय (१०० जागा), खाजगी विनाअनुदानित १९ वैद्यकीय महाविद्यालये (२ हजार ७७० जागा) आणि १२ अभिमत वैद्यकीय महाविद्यालये (२ हजार २०० जागा) यामध्ये एकूण ९ हजार ६२० इतक्या एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या जागा उपलब्ध आहेत. या सर्व महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. चे प्रवेश अखिल भारतीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या नीट-युजी प्रवेश परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार करण्यात येतात. नीट-यूजीच्या गुणवत्तेच्या अभावी अथवा अन्य कारणास्तव राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी युक्रेनसह रशिया, फिलिपाईन्स किंवा इतर देशात वैद्यकीय प्रवेश घेत असतात.

सध्या अजूनही रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु असून ही युद्धाची परिस्थिती किती दिवस राहील हे सांगता येणार नाही. शिवाय युद्धासारखी परिस्थिती आल्यामुळे आता भारतासह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे बहुतांश पालक आपल्या मुलांना पुन्हा तेथे पाठविण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेता येण्यासाठी केंद्र शासनाचे परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य विभाग याबरोबरच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत या तिन्ही ठिकाणी पाठपुरावा करुन या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी परवानगी मागण्यात येईल, असे मंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले.

भारतामध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने विहित केलेला वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम तसेच युक्रेन या देशातील विद्यापीठांमार्फत शिकविण्यात येणारा अभ्यासक्रम यामध्ये समानता नाही. वैद्यकीय शिक्षण पाठ्यक्रम, शैक्षणिक कालावधी, सत्र निहाय विषय व प्रात्यक्षिक यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे युक्रेन येथून एमबीबीएस अभ्यासक्रम शिक्षणाकरिता गेलेल्या व राज्यात परत येत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांबाबत केंद्र शासनामार्फत ठरविण्यात येणाऱ्या धोरणानुसार योग्य तो निर्णय घेणे योग्य राहील. 15 मे 2022 पर्यंत युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या 532 विद्यार्थ्यांची माहिती, वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत संकलित करण्यात आली आहे. तसेच युक्रेनमधल्या विद्यार्थ्यांची निवेदने, अडचणी जाणून घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण सहसंचालक अजय चंदनवाले हे नोडल अधिकारी असतील, असेही मंत्री श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले.

ज्येष्ठ नेते खासदार श्री.पवार म्हणाले, युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, त्यांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम करता येईल. तसेच या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांचे ग्रंथालयही वापरता येईल. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे त्यांना दूरस्थ शिक्षण (Foster Education) सुविधा देण्याची तयारी वैद्यकीय शिक्षण विभागाने ठेवली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी दूरस्थ शिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही सुरु करावी, अशा सूचना यावेळी श्री. पवार यांनी दिल्या.