Home Blog Page 1956

तंबाखू सेवनाला आळा घालण्याची जबाबदारी सर्वांची: कार्यशाळेतील सूर

0

पुणे, दि. 10: तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे कोणत्याही स्वरुपातील सेवन ही कर्करोगासह अनेक घातक आजारांना आमंत्रण देणारी बाब असून त्याला आळा घालणे ही सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे असा सूर जिल्हा रुग्णालय आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या संयक्त विद्यमाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेतील चर्चेप्रसंगी निघाला.

जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हास्तरीय तंबाखू समन्वय नियंत्रण कक्षाच्या जिल्हा नोडल अधिकारी डॉ. सुहासिनी घाणेकर, जिल्हा सल्लागार आणि मनोवैज्ञानिक हनुमान हाडे, महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेच्या राज्य प्रकल्प अधिकारी झिया शेख, विभागीय व्यवस्थापक अभिजित संघई आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2003 (कोट्पा ॲक्ट) मधील तरतुदींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी डॉ. घाणेकर म्हणाल्या, तंबाखू सेवन करणाऱ्यांपैकी किमान 50 टक्के व्यक्तींचे मृत्यू तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या विविध आजारांमुळे होतात. हृदय बंद पडणे (आयएसडी किंवा हर्ट स्ट्रोक), विविध प्रकारचे कर्करोग, गंभीर श्वसनविकार अशा तीन मुख्य परिणामांसह अन्य आजारांनाही तंबाखू, सिगारेट कारणीभूत ठरते.

तंबाखू सेवनामुळे होणारे परिणाम अत्यंत दूरगामी असल्यामुळे कोट्पा ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करणे सर्व विभागांची जबाबदारी आहे. शालेय शिक्षण, आरोग्य विभाग, पोलीस, अन्न व औषध प्रशासन, उत्पादन शुल्क, वस्तू व सेवा कर विभाग, परिवहन विभाग आदी विभाग तसेच स्वयंसेवी संस्था यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे, असे सांगून डॉ. घाणेकर यांनी जिल्हास्तरीय तंबाखू समन्वय नियंत्रण कक्षाकडून करण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली.

यावेळी श्रीमती झिया शेख यांनी कोट्पा अधिनियमातील कलम 4 व कलम 6अ आणि 6ब मधील तरतुदींची माहिती दिली. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तसेच शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी याबाबतच्या कायद्यातील तरतुदींची माहिती दिली.

तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात, प्रदर्शित करणे, स्पॉन्सरशिप करणे या बाबींना असलेली बंदी, तंबाखूजन्य पदार्थांचे वेष्टन करणे व त्यावरील लेबलींग याबाबतची नियमने, त्यावर छापायची धोक्याची चित्रे आणि सूचना, कार्यालयांबाहेर लावायचे सूचना फलक आदींबाबत माहिती श्री. संघई यांनी दिली.

सार्वजनिक आरोग्य दंतरोगतज्ञ डॉ. साहना हेगडे- शेटिया यांनी तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती दिली.

यावेळी उपस्थितांनी तंबाखू विरोधी शपथ घेतली. कार्यक्रमास आरोग्य, पोलीस, परिवहन, महानगरपालिका, शिक्षण, कृषी, अन्न व औषध प्रशासन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महामृत्युंजय मंत्राचे सामुहिक पठन

0

माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केले आयोजन

पुणे -भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी महामृत्युंजय मंत्राचे सामुहिक पठन करण्यात आले. महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा १० जूनला वाढदिवस असल्याने शहरातील विविध भागात भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाटील यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुसाठी आणि राजकीय कारकीर्दीसाठी माजी सभागृह नेते बिडकर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. सोमवार पेठेतील श्री नागेश्वर मंदीर येथे महामृत्युंजय मंत्राचे सामूहिक पठनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये बिडकर हे सपत्नीक, सहभागी झाले होते.

मंत्रोच्चाराच्या स्वरांनी मंदिरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. सोमवार पेठेतील नागरिकांनी हजेरी लावली होती. तेजस सप्तर्षी गुरुजी आणि त्यांचे २७ सहकाऱ्यांनी हे पठन केले. यावेळी सागर अफूवाले, उद्धव मराठे, मंदार पवार, सुजित पुजारी, राहुल शर्मा, माऊली शिवले, सोमनाथ शेळके, सुमीत रांबाडे, प्रताप सावंत, दिलीप मामा बहीरट, निलेश अल्हाट, बाला शेख, सुनील बारणे, सुरेखा शिंदे, कल्पना बहीरट, किरण गोसावी, शिल्पा शेळके, बाळासाहेब घोडके, लक्ष्मी घोडके, वैशाली सोनवणे, अनुराधा तळेगावकर यांच्यासह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी इतर कार्यकर्ते यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…अखेर तो आला , पुण्यात बरसल्या जलधारा

0

पुणे- हवामान खात्यासह पुणेकरांना गेली काही दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस आज अखेर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बरसला ….

आज दुपारपासूनच आकाशात ढग जमण्यास सुरुवात झाली होती. दुपारी साडेचारच्या सुमारास आंधारून आले. काही वेळातच विजांच्या कडकडाटासह टपोऱ्या थेंबांनी पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास शहरात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही वेळातच वातावरणात गारवा निर्माण झाला होता.वाढत्या तापमानात उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या पुणेकरांना मोसमी पावसाची चाहूल देणाऱ्या पूर्वमोसमीच्या दमदार सरींची अनुभूती मिळाली. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. पावसामुळे काही वेळातच शहरातील रस्ते जलमय झाले. अनेक दिवसांच्या खंडानंतर झालेल्या पहिल्याच दमदार पावसाने अनेकांची तारांबळ उडविली असली, तरी काहींनी त्यात भिजण्याचाही आनंद घेतला.पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, शनिवारीही विजांच्या कडकडाटात शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील पाच ते सहा दिवस शहर आणि परिसरात आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पाचे प्रमाण आणि वाऱ्यांचा वेग कमी असल्याने तब्बल दहा दिवस मोसमी पाऊस कर्नाटकच्या कारवारपर्यंत रखडला होता. मात्र, गुरुवारपासून पोषक वातावरण तयार झाल्याने शुक्रवारी पहाटेपासूनच मोसमी पावसाने वेगवान प्रवास करून दक्षिण कोकणात धडक मारली. त्याचबरोबरीने राज्याच्या इतर भागात पूर्वमोसमी पावसाने जोर धरला. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील काही भागामध्येही पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. शहरात यंदा पूर्वमोसमीच्या हंगामात पुरेसा पाऊस झाला नाही. जून महिना सुरू होऊनही पावसाच्या दमदार सरी बरसल्या नव्हत्या. त्यातच शहरातील तापमानाचा पारा वाढला असल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून दुपारनंतर आकाश ढगाळ होत असले, तरी पावसाचा केवळ हलका शिडकावा झाला होता. १२ ते १६ जून या कालावधीत शहरात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे

पहिल्याच पावसात शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये झाडपडीच्या 30 घटना घडल्या.

कर्वे रस्त्यावरील एका रुग्णालयाच्या पाठीमागील बाजुला असलेली भिंत पडल्याने 11 वाहने तर पोलिस आयुक्तालयाच्या परिसरातील झाड कोसळल्यामुळे 25 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठल्याच्याही घटना घडली.

जोराचा वारा व पावसाच्या मोठ्या सरींमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात मोठमोठी झाडे उन्मळुन, तर काही ठिकाणी तुटून पडली. पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात मोठे झाड कोसळून रस्त्यावर पडले. त्यामुळे संपुर्ण रस्ता काही वेळ बंद राहीला. तर रस्त्याच्याकडेला पार्कींग केलेल्या 20 ते 25 दुचाकींवर झाड पडल्याने त्यांचे नुकसान झाले. याबरोबरच कर्वे रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयाच्या पाठीमागील बाजुला असलेली भिंत पडल्याने तेथेही दहा दुचाकी व एक चारचाकी वाहन अडकल्याने त्याचे नुकसान झाले.

दरम्यान, पावसामुळे शहरातील पर्वती शाहू कॉलनी, जीपीओ, पर्वती येथील स्टेट बॅंक कॉलनी, स्वारगेट एसटी कॉलनी, पोलिस आयुक्तालय, भवानी पेठ येथील बीएसएनएलचे कार्यालय, प्रभात रस्ता, औंध येथील आंबेडकर चौक, राजभवन परिसर, गुरुवार पेठेतील पंचहौद, कोंढवा येथील शिवनेरी नगर, एनआयबीएम रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, नवी पेठेतील पत्रकार भवन, राजेंद्र नगर, कोंढवा येथील आनंदपुरा रुग्णालय, कर्वे सह्याद्री हॉस्पिटलच्या मागे सीमा भिंत पडली असून दहा दुचाकी व एक चारचाकी गाडी अडकल्याची माहिती अग्निशामक दलाच्यावतीने देण्यात आली. दरम्यान, झाडपडीच्या घटना घडलेल्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या पथकाने तत्काळ पोहचून रस्ता मोकळा करण्यास प्राधान्य दिले. जोरदार पावसामुळे शहराच्या काही भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. त्यातुन दुचाकी काढताना नागरीकांची तारांबळ उडाली. तर काही ठिकाणी रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी वाहने घसरून पडण्याच्या घटनाही काही प्रमाणात घडल्या.

आला पावसाळा…प्रकृती सांभाळा!

0

पटकी (कॉलरा) हा दूषित पाण्यामुळे होणारा एक जलजन्य आजार आहे. या आजाराचा अधिशयन कालावधी अत्यल्प असल्याने कॉलराची साथ अत्यंत वेगाने पसरते. इतर जलजन्य आजारांच्या तुलनेत कॉलरा आजारामध्ये मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक असते. व्‍हीब्रीओ कॉलरा ओ-1, व्‍हीब्रीओ कॉलरा नॉन ओ-1      (एल टॉर), व्‍हीब्रीओ कॉलरा ओ 139 या जीवाणूमूळे हा आजार होतो.

कॉलरा आजारामुळे सुरुवातीला जुलाब सुरु होतात व त्‍यानंतर उलट्याही होतात. या आजारामध्‍ये निर्जलीकरण अत्यंत वेगाने होते. कॉलरा (पटकी) ची लागण तुरळक व साथउद्रेक स्वरुपात होते. आजाराचा प्रसारही वेगाने होतो. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात काळजी घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे विविध आजारांचा धोका वाढतो त्यामुळे आपण काळजी घेऊन या आजारापासून दूर राहू शकतो. माझे आरोग्य माझी जबाबदारी, यादृष्टीने पावसाळ्यात पाण्यापासून पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी पाण्याची विशेष काळजी घेऊन हाताळणी केली पाहिजे व जागरूक असले पाहिजे त्यामुळे संभाव्य धोके टाळले जाऊ शकतात

-डॉ.कैलास बाविस्कर, उपसंचालक, आरोग्य सेवा, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे

आजारावर परिणाम करणारे घटक :

व्‍हीब्रीओ कॉलरा या जीवाणूचा आतड्याला संसर्ग झाल्‍याने पटकी हा आजार होतो. हा आजार सर्व वयोगटामधील स्त्री-पुरुषांमध्‍ये आढळतो. रुग्‍णांच्‍या विष्‍ठेचा पाण्‍याच्‍या स्त्रोतांशी संपर्क आल्‍यानंतर हे जंतू पाण्‍यामध्‍ये वाढतात. असे अशुद्ध पाणी पिण्‍यासाठी वा स्‍वयंपाकासाठी वापरल्‍यास या आजाराचा प्रसार होतो. मलनि:सारणाच्‍या योग्‍य पद्धतीच्‍या अभावामुळे रुग्‍णाच्‍या विष्‍ठेचा पाण्‍याच्‍या स्त्रोतांशी संपर्क येतो व आजाराचा प्रसार होतो.

रोगाची लक्षणे :

पटकीचा अधिशयन कालावधी काही तास ते 5 दिवस इतका आहे. पाण्‍यासारखे किंवा तांदळाच्‍या पेजेसारखे वारंवार जुलाबउलट्या, हृदयाचे ठोके वाढणे, तोंडाला कोरड पडणे, तहान लागणे, स्‍नायूंमध्‍ये गोळे येणे, अस्‍वस्‍थ वाटणे अशा प्रकारची लक्षणे पटकीच्या रुग्णात आढळतात.

 उपचार :

जुलाब-उलट्या चालू असताना जलशुष्‍कता नसल्यास क्षारसंजीवनीचा वापर करावा. तसेच पेज, सरबत इत्‍यादी घरगुती पेयांचा वापर करावा.जलशुष्‍कतेची लक्षणे असल्‍यास क्षारसं‍जीवनी व घरगुती पेय द्यावी. तीव्र जलशुष्‍कता असल्‍यास रुग्‍णास नजीकच्‍या प्राथमिक आरोग्य केंद्र  किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करावे व रिंगर लॅक्‍टेट देण्‍यात यावे. झिंक टॅब्लेटमुळे अतिसाराचा कालावधी 25 टक्क्याने कमी होतो. तसेच उलटीचे प्रमाण‍ही घटते. जलशुष्‍कता कमी करण्‍याबरोबर योग्‍य प्रतिजैविकांची योग्‍य मात्रा देण्‍यात यावी.

प्रतिबंधात्‍मक उपाय

कॉलरावर नियंत्रणासाठी शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे. पावसाळ्यात वैयक्तिक स्‍वच्‍छता राखणेदेखील महत्त्वाचे आहे. खाण्‍यापूर्वी व स्वयंपाकापूर्वी, बाळाला दूध व अन्न भरविण्‍यापूर्वी, शौचानंतर, बाळाची शी धुतल्‍यानंतर, जुलाब असलेल्‍या रुग्‍णांची सेवा केल्‍यानंतर हात नेहमी साबणाने व स्‍वच्‍छ पाण्‍याने धुवावेत. साबण उपलब्‍ध नसेल तर आपले हात राखेनेही स्‍वच्‍छ धुवावेत. मानवी विष्‍ठेची योग्‍यप्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. रुग्‍णांवर त्‍वरित उपचार करुन घ्यावे. बालकाचे गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण अतिसाराच्‍या नियंत्रणासाठी आवश्‍यक आहे.

पटकी रोगाचा प्रादुर्भाव अधिकाधिक कमी करुन तो सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आरोग्य विभगातर्फे लागणग्रस्त भागाचे सर्वेक्षण करण्यात येते. म्हणून आजाराची लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाला तात्काळ सूचना द्यावी.पिण्याच्या नियमितमणे निर्जंतुकीकरण करावे व रोगाचे त्वरित निदान होण्याच्या दृष्टीने साथीनंतर रुग्णांवर तात्काळ औषधोपचार करावे. पाणी गाळून, उकळून आणि शुद्ध करून प्यावे. नागरिकांनी वरीलप्रमाणे कॉलरा आजाराची लक्षणे जाणवू लागल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. असे केल्यास या आजारावर योग्य नियंत्रण ठेवता येईल.

 राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या २८८ पैकी २८५ आमदारांकडून मतदान

0

राज्यसभेसाठी आमदारांचे मतदान पुर्ण झाले आहे. सायंकाळी 5 वाजता मतमोजणी ​​​​​​ होईल. काँग्रेसचे अमर राजूरकर यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने निवडणुक आयोगाकडे आक्षेप नोंदवला आहे.

  • शिवसेनेच्या 42 आमदारांची पहिल्या पसंतीची मते संजय राऊत यांना
  • संजय पवार यांना शिवसेनेच्या 13 आमदारांची पहिल्या पसंतीची मते
  • नवाब मलिकांना हायकोर्टाचा पुन्हा झटका, विशेष पीएमएलए न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.
  • हायकोर्टाच्या निकालानंतर नवाब मलिकांनी याचिकेतील जामिनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी करत पुन्हा नव्याने याचिका केली. मात्र, ही याचिका ऐकूण घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे नवाब मलिकांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
  • राष्ट्रवादीची 2 आणि काँग्रेसची 9 मतते संजय राऊतांना
  • विधानभवनात शिवसेना व काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू, दोन्ही पक्षांच्या मतदानानंतर आकडेवारीवर खल
  • एमआयएमच्या दोन आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा
  • भाजपकडून जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतांवर आक्षेप, मात्र अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळला

मतदानाचा पहिला मान

आज निवडणुकीमध्ये मतदानाचा पहिला मान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मिळाला. सर्वात पहिले मतदान भरणे यांनी केले. मतदान झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पहिले मतदान करण्याचा मान मिळणे हा पहिला कौल आमच्या बाजूने लागला आहे. आज दिवसभर महाविकास आघाडीचाच बोलबाला राहणार आहे. आमचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आमदार लक्ष्मण जगताप रुग्णवाहिकेतून तर , मुक्ता टिळक स्ट्रेचरवरून विधानभवनात

0

पिंपरी चिंचवडमधील भाजप आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजारी असूनही राज्यसभा निवडणुकीसाठी बाहेर पडले आहेत. मतदान करण्यासाठी ते रुग्णवाहिकेतून मुंबईत येत आहेत. तर, पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळकदेखील कन्सरने त्रस्त असूनही मतदानासाठी मुंबईत दाखल झाल्या आहेत. आज स्ट्रेचरवरूनच त्यांना विधानभवनात नेण्यात आले.

राज्यसभेसाठी महाराष्ट्रात 24 वर्षांनंतर मतदान होत आहे. आपापले उमेदवार राज्यसभेवर पाठवण्यासाठी महाविकास आघाडी व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे एकेका मताला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून कोणत्याही स्थितीत मत वाया जाऊ न देण्याची खबरदारी पक्षांकडून घेतली जात आहे. त्यामुळे गंभीर आजारी असणाऱ्या आमदारांनाही रुग्णवाहिका व अगदी स्ट्रेचरवरून विधानभवनात नेण्यात येत आहे.

जगताप 2 महिन्यांपासून आजारी

लक्ष्मण जगताप हे मागील 2 महिन्यांपासून गंभीर आजाराने त्रस्त आहेत. ते कोमातही गेले होते. कोमातून बाहेर आल्यानंतर 2 जूनला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र, राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रत्येक आमदाराचे मतदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे लक्ष्मण जगताप यांना मतदानासाठी मुंबईत येण्याची विनंती पक्षातर्फे करण्यात आली होती. त्यावर आपली तब्येत ठिक असल्याचे सांगून लक्ष्मण जगताप हेदेखील आज सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

मुक्ता टिळक कॅन्सरने त्रस्त

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक सध्या कॅन्सरने आजारी आहेत. मात्र, कोणत्याही स्थितीत राज्यसभेच्या मतदानास जाणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. गुरुवारीच त्या मुंबईत दाखल झाल्या. पण, रात्री त्रास सुरु झाल्याने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आज डॉक्टरांच्या देखभालीसाठी स्ट्रेचरवरून त्यांना विधानभवनात आणण्यात आले.

पहिला हक्क कोणत्या आजी-आजोबांचा ? ; सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय

0

नवी दिल्ली : ‘भारतीय समाजात वडिलांचे आई-वडील हे नेहमीच आपल्या नातवंडांची काळजी अधिक चांगल्या पद्धतीने घेतात, त्यांची नातवंडांशी अधिक भावनिक जवळीक असते,’ अशी टिपण्णी करत, करोनाच्या दुसऱ्या लाटेत आई-वडील गमावल्याने अनाथ झालेल्या सहा वर्षांच्या मुलाचा ताबा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी त्याच्या वडिलांच्या आई-वडिलांकडे दिला.उच्च न्यायालयाने आई-वडिल गमावलेल्या या मुलाचा ताबा त्याच्या मावशीकडे दिला होता.या मुलाचा ताबा त्याच्या वडिलांच्या आई-वडिलांकडे देण्यास नकार देण्यासाठी उत्पन्न हा एकमेव निकष असू शकत नाही, असेही न्यायालयाने नोंदवले.मुलाच्या वडिलांकडील आजी- आजोबांचे वय हे अनुक्रमे ६३ आणि ७१ वर्ष आहे. असं असताना नातवाच्या ताब्यासाठी आजी-आजोबांच्या वयाचा विचार करुन जास्त वयाचे लोक सशक्त राहतात, असं कोर्टाने म्हटलं होतं.

या बालकाच्या वडिलांचा १३ मे रोजी, तर आईचा १२ जूनला करोनामुळे अहमदाबादमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर आईकडील आजी आजोबांनी त्याला आपल्या घरी आणले. यावेळी वडिलांकडील आजी- आजोबांनी नातवाच्या शिक्षणाच्या संदर्भात चिंता व्यक्त करत मुलाचा ताबा मागितला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निर्णय दिला.

गुजरात उच्च न्यायालयाने या बालकाचा ताबा त्याच्या मावशीकडे दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. एम. आर. शहा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने उच्च न्यायालयाचा हा निर्णय रद्द केला. दाहोडच्या तुलनेत अहमदाबादमध्ये त्याचा चांगले शिक्षण मिळू शकेल, असेही न्यायालयाने म्हटले. मात्र बालकाच्या मावशीला या बालकाला भेटण्याचे अधिकार असतील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

वर्धापन दिन: मुंबई राष्ट्रवादी कार्यालयात ही मांदियाळी

0

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे १० वाजून १० मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या एकजुटीने पक्षाला मिळालेल्या उभारीबद्दल जयंत पाटील यांनी सर्वांचे यावेळी आभार मानले. आपला पक्ष तेवीस वर्षांचा झाला आहे. आपल्या पक्षामध्ये महाराष्ट्रातील नव्या पिढीला भविष्यातील आशा दिसत आहे. अनेक तरूण पक्षात काम करण्यास इच्छुक आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम सुरु आहे, हे पक्ष वाढण्याचे एकमेव कारण आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

तुम्हा सर्वांचे कष्ट, प्रयत्न, जिद्द यातूनच आपला पक्ष इथपर्यंत आला आहे याची आम्हा सर्वांना जाणीव आहे. हा पक्ष आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष करायचा आहे. यासाठी एकसंधपणे प्रयत्न करूया, असे आवाहन प्रदेशाध्यक्षांनी सर्व कार्यकर्त्यांना केले.

पुढे जयंत पाटील यांनी २३ वर्षांपूर्वी पक्ष स्थापन करताना राज्यात पक्षाच्या ताकदीवर आपली सत्ता स्थापन होईल असा निर्धार केला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली. राज्यातील सर्व घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आपल्याकडून होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच आगामी काळात होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या मुंबई विभागीय कार्याध्यक्ष श्रीमती राखी जाधव व कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष चांगले चित्र निर्माण करेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छनग भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. पक्ष स्थापन झाल्यावर प्रांताध्यक्ष होण्याचा मान सर्वप्रथम मला मिळाला. राज्यात पक्षाची कोणतीही बांधणी नसताना काँग्रेस खालोखाल क्रमांक दोनचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरला. तेव्हापासून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यातील गोरगरीब जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण काम करत आहोत, असे श्री. भुजबळ म्हणाले. पवार साहेबांनी मंडल आयोगाच्या माध्यमातून राज्यात आरक्षण मिळवून दिले. या आरक्षणाला नख लावण्याचे काम काही शक्तींकडून होत आहे. मात्र त्याविरोधात आपण सक्षमपणाने लढा देतोय, अशी खात्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. देशात निरनिराळ्या प्रश्नांची माहिती असलेले व त्यांची सोडवणूक करण्याची ताकद असलेले नेते म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत. आपण पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल अधिक वेगाने करण्यासाठी प्रयत्नशील राहूया, असे ते म्हणाले.

पुढे वरिष्ठ नेते . एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोणत्याही व्यक्तीच्या अथवा पक्षाच्या राजकीय जीवनात २३ वर्ष प्रवास करणे व आपला प्रभाव टिकून ठेवणे महत्त्वाचे आहे. आता खऱ्या अर्थाने आपला पक्ष युवा जीवनात प्रवेश करत आहे. या प्रवासात आदरणीय पवार साहेबांनी आपला राष्ट्रीय प्रभाव राखून ठेवला आहे. आपल्याला अजून खूप काम करायचे आहे. राजकीय पक्षाला कोणत्याही वर्षाची मर्यादा नसते. आपल्याला सर्व मर्यादा ओलांडून हा पक्ष टिकवायचा आहे, वाढवायचा आहे. आपल्याला पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडायची आहे, असे श्री. खडसे म्हणाले.

या कार्यक्रमाला खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार शेखर निकम, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी खासदार माजिद मेमन, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, लीगल सेल प्रदेशाध्यक्ष आशिष देशमुख, ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, सेवा दल कार्याध्यक्ष जानबा म्हस्के, प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक,
माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार संजय दौंड, आयटी सेल राज्यप्रमुख नीरज महांकाळ, महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, मुंबई विभागीय महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई विभागीय अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सोहेल सुभेदार, तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आज ठरणार बाहू अन् बली : इम्तियाज जलील यांनी जाहीर केला एमआयएमचा महाविकास आघाडीला पाठिंबा

0

मुंबई-विधानसभा सदस्यांमधून राज्यसभेवर पाठवायच्या ६ जागांसाठी शुक्रवारी (१० जून) मुंबईत मतदान होत आहे. आज अखेर मतदानाचा दिवस आला आहे. मतदानाच्या आदल्या रात्री उशिरा सूत्रं हलली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खेळी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे त्यानुसार इम्तियाज जलील यांनी रात्री मविआच्या नेत्यांची भेट घेतली. पहाटे पाचच्या सुमारास एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा जारी केला आहेसकाळी पाचच्या सुमारास इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.इम्तियाज जलील आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, भाजपाला हरवण्यासाठी राज्यातल्या राज्यसभा निवडणुकीसाठी एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युतीमध्ये असलेल्या शिवसेनेसोबत आमचे वैचारिक मतभेद कायम राहतील

जलील यांनी धुलिया आणि मालेगाव इथल्या एमआयएम आमदारांच्या मतदारसंघांचा विकास व्हावा, यासाठी आम्ही काही अटी घातलेल्या आहेत. एमपीएससी आयोगावर मुस्लीम, अल्पसंख्याक समाजातल्या एका व्यक्तीची नेमणूक करावी आणि महाराष्ट्र वक्फ बोर्डाचा दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ करावी, तसंच मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावं. अशा काही अति घातल्याचे सांगण्यात येते आहे.

सातवा कौन ?

दरम्यान सहाव्या जागेसाठी मोठी चुरस असून मतदानाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठकांचा जोर दिसून आला. राज्यसभेसाठी महाराष्ट्रात २४ वर्षांनंतर मतदान होत असल्याने दोन्ही बाजूंकडून आपापल्या आमदारांना गुरुवारी मतदानाचे प्रशिक्षण देण्यात आले. या निवडणुकीत भाजप, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार कोण ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेतील एकूण २८८ सदस्यांपैकी शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन झाले असून अनिल देशमुख-नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी मिळाली नाही तर मतांचा कोटा ४२ वरून ४१ वर येणार आहे. काँग्रेस आमदारांची पवईतील वेस्टईन हाॅटेलात बैठक पार पडली.

त्याला निवडणूक प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी मार्गदर्शन केले. भाजप आमदारांची बैठक कफ परेड येथील ताज प्रेसिडेंट येथे झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते बैठकीला हजर होते. शिवसेना नेत्यांची ट्रायडंट येथे बैठक झाली. वरळी येथील ब्लू सी हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. किशोर जोरगेवार यांच्यासह काही अपक्ष आमदारांनी गुरुवारी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काँग्रेस नेते पक्षाची बैठक संपल्यानंतर शरद पवार यांना सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेटले. १४ व्या विधानसभेत बहुतांश आमदार प्रथमच निवडून आलेले आहेत. १९९८ नंतर राज्यात राज्यसभेला मतदान झालेले नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाने मतदानाची रंगीत तालीम (माॅक वोटिंग) घेतली एमआयएम एक मत राष्ट्रवादीला व एक काँग्रेसला देण्याची शक्यता.

सहा जागा, आघाडी १६७, भाजप ११२; सहा आमदारांची झाकली मूठ

आघाडी + १६७ शिवसेना – ५५, राष्ट्रवादी – ५१ (दोन सदस्य तुरुंगात), काँग्रेस – ४४ अपक्ष ९ : किशोर जोरगेवार (चंद्रपूर), गीता जैन (मीरा भाईंदर), नरेंद्र भोंडेकर (भंडारा), आशिष जयस्वाल (रामटेक), संजय शिंदे (करमाळा), चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), मंजुळा गावित (साक्री), विनोद अग्रवाल (गोंदिया), राजेंद्र यड्रावकर (शिराेळ). छोटे पक्ष ८ : समाजवादी पार्टी – २, प्रहार जनशक्ती पार्टी – २, माकप – १, शेकाप – १, स्वाभिमानी पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पार्टी – १ भाजप + ११२ भाजप- १०६ छोटे पक्ष २ : जनसुराज्य पक्ष १, मनसे १ अपक्ष ४ : प्रकाश आव्हाडे- इचलकरंजी, राजेंद्र राऊत- बार्शी, महेश बालदी- उरण, रवी राणा- बडनेरा.

राज्यसभा निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. पीएमएल विशेष न्यायालयाने बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभेला मतदान करण्यास एक दिवसाचा जामीन नाकारला. या दोघांनी दुपारी उच्च न्यायालयात धाव घेतली. शुक्रवारी सकाळी ११ वाजता न्यायालय याप्रकरणी निकाल देणार आहे. मलिक आणि देशमुख यांचे मतदान होऊ न शकल्यास विजयासाठी मतांचा कोटा ४०.७१ येणार आहे.

हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची तीन मते मिळण्याचा महाविकास आघाडीला अंदाज होता, परंतु ठाकूरही साथ देण्याबाबत साशंकता आह़े

उमेदवार :  प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत (शिवसेना), पीयूष गोयल (भाजप), इम्रान प्रतापगढी (काँग्रेस), अनिल बोंडे (भाजप), संजय पवार (शिवसेना), धनंजय महाडिक (भाजप)

आमदारांचे संख्याबळ

१०६ भाजप

५५ शिवसेना

५३ राष्ट्रवादी

४४  काँग्रेस

अपक्ष व छोटे पक्ष २९

राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान होते. त्यानुसार राजकीय पक्षांच्या आमदारांना आपल्या पक्षाच्या प्रतोदाला दाखवून मतदान करावे लागते. आमदाराने पक्षादेश धुडकावल्यास त्या आमदाराच्या विरोधात पक्षाला पक्षांतरबंदी कायद्याखाली कारवाई करता येते. अपक्षांना मात्र मतपत्रिका दाखविण्याचे बंधन नसते. राज्यसभा निवडणुकीत आमदारांची मते बाद होण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. हरयाणामध्ये काँग्रेसच्या १४ आमदारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या पेनाऐवजी वेगळय़ा शाईच्या पेनाचा वापर केल्याने ही मते बाद ठरली होती. गुजरातमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांनी मते भाजपच्या नेत्यांना दाखविल्याने ती मते बाद ठरली होती. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मतदान कसे करायचे याचे प्रशिक्षण आपापल्या आमदारांना दिले आहे.

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षणासाठी २० जूनपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. ९- मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीने या व्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन आणि सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येते. मुंबईतील वर्सोवा येथील प्रशिक्षण केंद्रात दिल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणाच्या १२८ व्या सत्रासाठी इच्छुकांनी २० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्रदीप जगताप यांनी केले आहे.

वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२२ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी सागरी मत्स्यवयवसाय, नौकानयन आणि सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय नौकानयनाची मूलतत्त्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्याक्षिके आदींचे प्रशिक्षण दिले जाते. १२८ व्या प्रशिक्षण सत्रासाठी दारिद्र्यरेषेवरील प्रशिक्षणार्थ्यांकडून ४५० रुपये आणि दारिद्र्यरेषेखालील प्रशिक्षणार्थ्यांकडून १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

या प्रशिक्षणासाठी निकष निश्चित करण्यात आले आहेत, प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असावा, १८ ते ३५ वर्षे वयोगटातील असावा, पोहता येणे आवश्यक, किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण आवश्यक, मासेमारीचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असून प्रशिक्षणार्थ्याकडे बायोमॅट्रिक कार्ड अथवा आधारकार्ड असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज करताना त्या अर्जावर संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक असून दारिद्र्यरेषेखालील प्रशिक्षणार्थी असल्यास अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गटविकास अधिकाऱ्याच्या दाखल्याची स्वाक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारी करणाऱ्या तरुणांनी आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह विहित नमुन्यातील अर्ज मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-६१ येथे २० जूनपर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी  मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्रदीप जगताप संपर्क क्र. ८७८८५५१९१६ आणि यांत्रिकी निर्देशक जयहिंद सूर्यवंशी – संपर्क क्र. ७५०७९८८५५२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशिक्षण केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

सनी निम्हण यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ‘सोसायटी गार्डन संगोपन अभियान’ ला मोठा प्रतिसाद

औंध :

माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ५ जून ते १५ जून २०२२ दरम्यान आम्ही औंध, सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी ‘सोसायटी गार्डन संगोपन अभियान’ हा एक विशेष हरित उपक्रम राबविला जात आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, आपली सोसायटी स्वच्छ, सुंदर असेल तर परिसराची सर्वांगीण प्रगती साधता येते. याच विचारातून ५ जून रोजी असलेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून ते १५ जून २०२२ दरम्यान आम्ही ‘सोसायटी गार्डन संगोपन अभियान’ हा एक विशेष हरित उपक्रम राबवित आहोत.

या अभियानाला सर्व सोसायटीतर्फे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय आणि त्याचे अतिशय छान परिणाम देखील सोसायटीमध्ये व पर्यायाने परिसरात दिसत आहेत. यामध्ये झाडांचे चॉपिंग, ट्रिमिंग व कटिंग, जैविक फवारणीतून कीड नियंत्रण, झाडांना सेंद्रिय खतांचा डोस इत्यादी सेवा मोफत प्रदान केल्या जात आहेत. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी संबंधित सोसायटी मेंबर्स व परिसरातील नागरिकांचे सातत्याने विशेष सहाय्य लाभत आहे. तसेच हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी कष्ट घेत असलेल्या कामगारांचेही सनी निम्हण यांनी मनापासून आभार मानले

आपण देखील आपल्या सोसायटीमध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी व आपल्या सोसायटी गार्डनची निगा राखण्यासाठी आम्हाला 8308123555 वर संपर्क साधावा असे आव्हान सनी निम्हण यांनी केले आहे.

अ‍ॅथलेटिक्स, जलतरणात पाच सुवर्णपदके खो-खो, टेनिसमध्ये महाराष्ट्राची आगेकूच

0

खेलो इंडिया युवा स्पर्धा
पंचकुला, ९
खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा आजही पदकांचा सीलसिला सुरूच राहिला. अॅथलेटिक्समध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य पदक मिळाले. जलतरणात दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदके आली. खो-खोमध्ये मुला-मुलींच्या संघांनी विजयी सलामी देत आगेकूच केली. टेबल टेनिसमध्ये सायली राजेश वाणी व प्रिथा प्रिया वर्तीकर यांनी विजय मिळवले.
जलतरणमध्ये ४०० मीटर फ्रीस्टाईल – आन्या वाला (मुंबई) हिने सुवर्ण, १०० मीटर बटरफ्लाय – अपेक्षा फर्नांडीस हिनेही सुवर्ण पदक जिंकले. १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पुण्याच्या उत्कर्ष गौर व १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये मुंबईच्या पलक जोशीने कांस्य पदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या पदकतालिकेत आज एकंदर पाच सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य पदकांची भर पडली. वेटलिफ्टिंगमध्ये मुलांच्या संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. मुलींच्या ४ बाय ४०० रिलेच्या संघाने विजेतेपदक उंचावले.
२०० मीटर धावण्यात सातारच्या सुदेष्णा शिवणकरने आजही सुवर्ण कामगिरी केली. अवंतिका नरळे हिला याच प्रकारात रौप्यपदक मिळाले. मुलांमध्ये आर्यन कदम (पुणे) याने २०० मीटरमध्ये सुवर्ण पदक उंचावले.

मुलींच्या रिलेच्या विजेत्या संघात रिया पाटील (कोल्हापूर), वैष्णवी कातुरे (नाशिक), प्रांजली पाटील (मुंबई), शिवेच्छा पाटील (पुणे) यांचा समावेश होता. त्यांच्या संघाने सुवर्ण जिंकले. उद्या मल्लखांबमध्ये सांघिक आणि वैयक्तिक पदके मिळण्याची आशा आहे.

पदकतालिका
हरियाना – ३३ सुवर्ण, २७ रौप्य, ३६ कांस्य (एकूण ९६)
महाराष्ट्र – ३० सुवर्ण, २८ रौप्य, २५ कांस्य (एकूण ८३)
मणिपूर – १३ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य (एकूण १८)
(ही आकडेवारी सायंकाळी साते वाजेर्यंतची आहे)

जलतरणात महाराष्ट्राचा नवीन विक्रम
रात्री उशिरा झालेल्या जलतरणातील फ्रीस्टाईल रिले प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी नवीन विक्रम प्रस्थापित केला. ४ बाय ४०० मीटर प्रकारात ४ मिनिट आणि ३ सेकंदांचा रेकॉर्ड केला. यापूर्वी खेलो इंडियात महाराष्ट्राचा ४ मिनिट आणि ६ सेकंदाचा रेकॉर्ड होता. तो महाराष्ट्राच्या अपेक्षा फर्नांडीस, फलक जोशी, क्षमा अय्यर व आन्या वाला यांच्या संघाने मोडला. रिलेमध्येही महाराष्ट्राला आणखी एक सुवर्ण पदक मिळाले.

एकाच दिवशी तब्बल २९ ग्रामपंचायतीनी केला विधवा प्रथेविरुद्ध ठराव

विधवा प्रथा हद्दपार करूया, स्री सन्मानाचे साक्षीदार होऊया-राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

पुणे, दि. ९: आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून असून राज्यातील प्रत्येक गावाने विधवा प्रथा मुक्तीचा ठराव करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने खडकवासला परिसरातील धायरीसह एकूण २९ ग्रामपंचायतींनी आज विधवा प्रथा बंदी करणारा ठराव मंजूर केला. यावेळी धायरी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जामशिंग गिरासे, तहसीलदार तृप्ती कोलते, हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के उपस्थित होते.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, महिला आयोगाच्यावतीने राज्यात बालविवाह, गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा, एकल महिला यांच्या समस्यांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच महिलांना समान दर्जा देण्यासाठी व समाजातील कुप्रथा बंद करण्याचे काम सुरू आहे. खडकवासला मतदार संघातून शंभर टक्के विधवा प्रथा बंद करण्याचे ठराव होणे कौतुकास्पद आणि मार्गदर्शक आहे. राज्यातील गावागावात असे ठराव होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजात महिलांना समान दर्जा देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. गुप्ता म्हणाले, समाजातील कुप्रथा बंद करण्यासाठी आपला सर्वांचा पुढाकार आवश्यक आहे. समाजातील कुप्रथा बंद करून महिलांना सन्मान देणारा हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. समाजातील कुप्रथा बंद करण्यासाठी सर्व मिळून एकत्रित करावे, असेही ते म्हणाले.

महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, खडकवासला विभागातील अनेक ग्रामपंचायतीनी विधवा प्रथे विरुद्ध ठराव केला. २९ ग्रामपंचायतींचा कुप्रथा बंद करून महिलांना सन्मान देणारा हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. एकाच वेळी ठराव करणारा राज्यातील हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे. विधवा महिलांना समान अधिकार आहेत. गावातील सरपंच, महिला यांनी यासाठी पुढाकार घेतला ही अभिनंदनीय बाब आहे. राज्यातील गावागावात असे उपक्रम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.देशमुख म्हणाले, स्री पुरुष समानतेचा इतिहास लिहला जाईल, त्यावेळी या ऐतिहासिक कार्यक्रमाची त्यात निश्चितपणे नोंद असणार आहे. कायद्यासोबतच अनुरूप असे सामाजिक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. आजच्या या ठरावाच्या कार्यक्रमातून लोकचळवळ उभी राहील, महिलांना सन्मान देणारी चांगली सुरुवात असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

महिला आयोगाच्या प्रशासन अधिकारी श्रीमती ठाकूर यांनी प्रास्ताविक केले.महिला आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. कानडे, तहसीलदार श्रीमती कोलते,सरपंच मोनिका पडेर, राहुल पोकळे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक,महिला आदी उपस्थित होते.

एकाच दिवशी तब्बल २९ ग्रामपंचायतीनी केला विधवा प्रथेविरुद्ध ठराव

राज्य महिला आयोगाने विधवा प्रथासारख्या अनिष्ट प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते त्याला राज्यभरातून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने खडकवासला मतदारसंघातील धायरीसह तब्बल २९ ग्रामपंचायतींनी व काही प्रभागातील नागरिकांनी आज हा ठराव मंजूर केला आहे. खडकवासला हा महाराष्ट्रातील१०० टक्के विधवा प्रथा बंदी करणारा पहिला मतदारसंघ असणार आहे.

कसब्यात विकासकामेच नाहीत ? आपल्याच बालेकिल्ल्यात भाजपवर आंदोलनाची वेळ

पुणे – शहराचे विद्यमान आमदार,माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेते आणि सोबतीला डझनभर नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे असतानाही कसबा विधानसभा मतदार संघात महापालिकेकडून विकासकामे होत नसल्याचे सांगत चक्क भारतीय जनता पक्षाने महापालिका प्रशासन विरोधात आंदोलन करण्यात आले.विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय येथे व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय येथे प्रशासना विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

विशेष म्हणजे या मतदारसंघात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक सिमेंट रस्ते, ड्रेनेज लाईन बदलणे, पथदिवे, तसेच पदपथ करण्यासाठी कोट्यवधीची कामे झाली आहेत. असे असतानाही, आता या कामासाठी केलेल्या खोदाई मुळे रस्त्यावर खड्डे पडले असून आता त्यासाठी भाजपकडून आंदोलन केले जात असल्याने भाजपचे आंदोलनावर आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

तर हीच कामे सुरू असताना त्याचे श्रेय घेण्याचे फलक भाजप नगरसेवकांनी लावलेले असताना आता मात्र या आंदोलनात भाजपकडून रस्त्यावरील खड्ड्यांचे खापर महापालिका प्रशासनावर या आंदोलनात फोडण्यात आले. मात्र, या आंदोलनामुळे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कसबा मतदारसंघातील आपल्या प्रभागात खर्च केलेला निधी कुठे गेला असा प्रश्‍न विचारण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे.

एका बाजूला विकास कामे होत नसल्याची ओरड माजी सत्ताधारी भाजपच करत असताना, दुसऱ्या बाजूला भाजपचे माजी नगरसेवक मात्र प्रभागात सुस्त आहेत. प्रशासकाच्या कालावधीत विकासकामे होण्यासाठी नगरसेवकांनी डबा घेऊन पालिकेत यावे नागरिकाच्या समस्या सोडवाव्यात, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी पदाधिकारी तसेच नगरसेवकांना दिल्या होत्या.

पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत इलेक्ट्रिक व्हेईकलच्या चार्जिंग व्यवस्थेचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे- महानगरपालिकेच्या मुख्य इमारत येथे आज इलेक्ट्रिक व्हेईकलच्या चार्जिंग व्यवस्थेचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेचे सेवक व पुणे महानगरपालिकेत येणारे नागरिक यांच्कारिता पुणे महानगरपालिकेतर्फे चार्जिंग point ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच शहरात इलेक्ट्रिक वाहनाच्या वापरास प्रोत्साहन मिळावे आणि इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण वाढावे यासाठी EV सेल कायम प्रयत्नशील राहील असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
या प्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) डॉ. कुणाल खेमनार, कार्यकारी अभियंता ( विद्युत) श्रीनिवास कंदूल, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे इत्यादी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.