पुणे : गणेशोत्सवासाठीच्या जाहिरात कमानी उभारण्यासाठी सुरु झालेली घाईगडबडीमुळे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये शनिवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. दुपारच्या सुमारास झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक अक्षरशः त्रस्त झाले.सुट्टीचा दिवस असल्याने शनिवारी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने मध्यवर्ती भागातील बाजारपेठेत येतात. पार्किंग नसलेल्या ठिकाणी, अरुंद व रहदारी असलेल्या रस्त्यांवरच वाहने पार्किंग करण्यात आल्याने शनिवारी दुपारी बारा वाजल्यापासूनच वाहतूक कोंडी सुरू झाली होती.
त्यातच गणेशोत्सवातील जाहिरातींच्या कमानी उभारण्यासाठी शनिवारी दुपारपासून बांबू, लोखंडी सापळे भरलेली वाहने मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर उभी राहीली. या वाहनांमधून जाहिरात कमानी उभारण्यासाठी लागणारे बांबू, लोखंडी सापळे उतरविली जाऊ लागल्याने रस्ता आणखीनच अरुंद होऊन वाहतूक कोंडी झाली.
मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यासह कुमठेकर, केळकर या रस्त्यांवरही वाहतूक ठप्प झाली होती. मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीचा परिणाम कर्वे रस्ता, लालबहादूर शास्त्री रस्त्यासह अन्य रस्त्यांवरही झाला.
अंतर्गत व प्रमुख रस्त्यांवरही वाहतूक संथगतीने सुरू होती. वाहतूक कोंडीमध्ये बराचवेळ गेल्याने वाहनचालक त्रस्त झाले होते. दरम्यान, वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
पुणे पोलिसांच्या ट्रॅफिक क्रेनच्या हूकने दुचाकी स्वार तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. शुभम बिरादार असं तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील चहोली फाटा, आळंदी-पुणे रोड येथे 25 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला. 28 वर्षीय शुभम मगरध्वज बिरादार यांच्या उजव्या डोळ्याला ट्रॅफिक पोलिसांच्या क्रेनच्या हूकमुळे गंभीर दुखापत झाली. शुभम जे पांडवनगर येथे राहतात आणि स्वतःचा ‘शुभम मेडिकल’ नावाचा व्यवसाय चालवतात. यांनी आपली होंडा अॅक्टीवा दुचाकी HDFC बँकेसमोर पार्क केली होती.
बँकेत काम आटोपून बाहेर आल्यानंतर त्यांना समजले की, नो-पार्किंग झोनमधील गाड्या उचलण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांचे क्रेन कार्यरत आहे. शुभम यांनी सांगितले की, त्यांनी आपली दुचाकी उचलली जाऊ नये म्हणून क्रेनजवळ जाऊन हँडल पकडले आणि आपण आल्याचे सांगितले. मात्र, क्रेन चालकाने कोणतीही सूचना न देता हूक हलवला. जो थेट शुभम यांच्या उजव्या डोळ्याला लागला. यामुळे त्यांच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले.
तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. जिथे प्राथमिक उपचारानंतर दुखापतीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांना मेरीकव्हर हॉस्पिटल, इंद्रायणीनगर येथे दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर पाचव्या मजल्यावरील रूम क्रमांक 511 मध्ये उपचार सुरू असून त्यांचा MLC क्रमांक 713/2025 आहे. या घटनेने दिघी-आळंदी वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शुभम यांनी सांगितले की, क्रेन चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कोणतीही ओळख किंवा माहिती दिली नाही. स्थानिक नागरिकांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. नो-पार्किंग क्षेत्रात गाड्या उचलताना योग्य सूचना देणे आणि क्रेन चालकांना प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी दिघी-आळंदी वाहतूक विभागाकडून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.
पुण्यातील वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. स्थानिकांनी मागणी केली आहे की, वाहतूक पोलिसांनी अधिक जबाबदारीने काम करावे आणि अशा घटना टाळण्यासाठी कठोर नियमावली लागू करावी. तसेच क्रेन चालकांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे. जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील. शुभम यांच्या कुटुंबीयांनीही या प्रकरणी कायदेशीर कारवाईचा विचार सुरू केला आहे.
पुणे शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि त्याची अंमलबजावणी यावरून अनेकदा वाद निर्माण होतात. या घटनेने वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तज्ज्ञांच्या मते, नो-पार्किंग क्षेत्रात गाड्या उचलण्यापूर्वी स्पष्ट सूचना देणे आणि नागरिकांना माहिती देणे आवश्यक आहे. यामुळे अशा अपघातांना आळा बसू शकतो. ही घटना पुण्यातील वाहतूक व्यवस्थापनातील त्रुटी दर्शवते. शुभम बिरादार यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, या घटनेने वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुंबई- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात लेटर वॉर सुरू झाले होते. या पार्श्वभूमीवर माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. या भेटीन मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामाचे कौतुक केले, सोबतच समन्वयातून काम करण्याच्या सूचनाही दिल्या.
शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात विभागीय बैठकीवरून थेट मानापमान नाट्य रंगले आहे. माधुरी मिसाळ यांनी नुकतीच सामाजिक न्याय विभागाशी संबंधित विभागीय बैठक घेतली होती. या बैठकीवर नाराजी व्यक्त करत मंत्री संजय शिरसाट यांनी मिसाळ यांना पत्र लिहित, तुम्ही माझ्याकडील विषयावर बैठक घेतलीत, पुढे अशा बैठका माझ्या अध्यक्षतेखाली घेतल्या जाव्यात, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यानंतर माधुरी मिसाळ यांनीही मी बैठक घेण्यासाठी अधिकृतपणे पात्र आहे, असे प्रत्युत्तर संजय शिरसाटांच्या पत्राला पत्रानेच दिले.
या सर्व घडोमोडींनंतर सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामाचे कौतुक केले. तसेच समन्ववायातून उत्तम करावे, अशा सूचनाही देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. या भेटीमुळे संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ वादावा अखेर पडदा पडल्याची चर्चा आहे.
शिरसाट-मिसाळ यांच्या वादाचे मूळ 11 मार्च 2025 च्या शासन निर्णयात आहे. यानुसार सामाजिक न्याय विभागातील विषयांचे वाटप मंत्री शिरसाट आणि राज्यमंत्री मिसाळ यांच्यात विभागण्यात आले आहे. याच आदेशाचा आधार घेत शिरसाट यांनी बैठकीच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, मिसाळ यांनी केवळ शिरसाट यांच्या पत्राला उत्तर दिले नाही, तर त्यांनी तो वादग्रस्त मुद्दा थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला आहे. आपल्या अधिकारांचा वापर करताना काही चुकीचे होत असेल, तर मुख्यमंत्री कार्यालय निर्णय देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मिसाळ यांच्या पत्रावर शिरसाटांची प्रतिक्रिया
माधुरी मिसाळ यांच्या पत्रानंतर संजय शिरसाट म्हणाले की, माधुरी मिसाळ यांना पत्र लिहण्याचा माझा स्पष्ट उद्देश होता की काही विषय असतात की ज्यामध्ये राज्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही. पुढे ते म्हणाले, मिसाळ चांगले काम करत आहेत. त्या काही मला आव्हान देत नाहीत. माधुरी मिसळ यांना मी जे पत्र लिहले ते केवळ सहकारी म्हणून त्यांना सूचना देण्यासाठी मी पत्र लिहले आहे. महायुतीमध्ये काही वाद आहे असा त्यांचा अर्थ नाही.
पुणे- सुमीत फॅसिलिटीज लि.ने पाठविलेल्या प्रसिद्धी पत्रकातून झारखंडमधील अबकारी धोरणाबाबत श्री. अमित साळुंके यांच्यावर करण्यात आलेले आरोप देखील खोटे आहेत. तपास यंत्रणांनी श्री. साळुंके यांना यात गोवले आहे,असे म्हटले आहे . या प्रकरणाचा खासदार श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक असल्याचे दर्शवून संबध लावण्यात आल्याने या बातम्यांना मोठी प्रसिद्धी मिळते आहे या राजकीय चर्चेच्या पार्शवभूमीवर आणि प्रसारित होणाऱ्या बातम्या संदर्भात सुमीत फॅसिलिटीज लि.ने हे स्पष्टीकरण माध्यमांना पाठविले आहे .
यात असे म्हटले आहेकी,’मद्यसंबंधी प्रकरणात आमचे संचालक, अमित साळुंके यांच्या कथित सहभागाबद्दल केलेल्या आरोपांचा आम्ही अत्यंत स्पष्ट शब्दात तीव्र निषेध करतो. हे निराधार आरोप म्हणजे सुमीत फॅसिलिटीज लि. आणि त्यांच्या नेतृत्वाची प्रतिमा मलीन करण्याचा एक प्रयत्न आहे. आमची कंपनी, आमचे संचालक किंवा त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणाचेही कोणताही राजकीय पक्ष किंवा राजकीय व्यक्तीशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे संबंध नाहीत. असे संबंध असल्याची किंवा यासंदर्भात अन्य कोणतीही माहिती असल्यास ती चुकीची आहे तसेच त्याकडे दुर्लक्ष केले जावे. रुग्णवाहिका प्रकल्प ‘108’ संदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका (पीआयएल) माननीय मुंबई उच्च न्यायालयाने 8 एप्रिल 2025 रोजी फेटाळली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने राबवलेली निविदा प्रक्रिया ही पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. खर्च वाढण्यासंबंधीचे सर्व आरोप हे निराधार असल्याचेही न्यायालयाने सांगितले आहे. 2022 मध्ये झारखंडमधील अबकारी धोरणाबाबत श्री. अमित साळुंके यांच्यावर करण्यात आलेले आरोप देखील खोटे आहेत. तपास यंत्रणांनी श्री. साळुंके यांना यात गोवले आहे. यासंबंधातील अनेक खटले रांचीमधील न्यायालयांमध्ये सुरू आहेत. भारताच्या न्यायव्यवस्थेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि लवकरच सत्य सर्वांसमोर येईल याची आम्हाला खात्री आहे. सचोटी, प्रामाणिकपणा आणि कायदेशीर वर्तनासाठी सुमीत फॅसिलिटीज लिमिटेड वचनबद्ध आहे.
पुणे-हिंजवडी परिसरात विविध विकास कामाची पाहणी करत असताना अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेले, हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना खडेबोल सुनावले आहेत. या परिसरात विकास कामात मुळे बाधित होणाऱ्या मंदिरा संदर्भातला प्रश्न सरपंच गणेश जांभूळकर यांनी उपस्थित केला. यावर अजित पवार यांनी सर्वांसमोर सरपंचाला खडे बोल सुनावले. धरण करताना मंदिरे जात नाहीत का? मात्र, तुम्हाला जे सांगायचे तुम्ही सांगा, मी ऐकून घेतो. मात्र, मला जे करायचे ते मी करेलच. अहो आपले वाटोळ होत आहे. हिंजवडीचे सर्व आयटी पार्क बाहेर चालले आहेत. माझ्या पुण्यातून आपल्या महाराष्ट्रातून ते बाहेर जात आहेत. बेंगलोरला, हैदराबादला जात आहेत. तुम्हाला इकडे काय पडले? असा प्रति प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. मी सकाळी सहा वाजता पाहणी करायला कशासाठी आलो. मला कळते, ती माझी देखील माणसे आहेत. मात्र हे काम केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
आज पहाटेपासून, पुण्यातील राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी येथील विविध स्थानिक समस्या, पुणे मेट्रो लाईन 3 प्रकल्पाची स्थळ पाहणी आणि प्रशासनाकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची पाहणी अजित पवार यांनी केली. या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना देखील केल्या.मुख्यमंत्री अजित पवार पहाटेच कामाला लागतात. त्यांची ही खाती सर्व दूर पसरली आहे. आज देखील त्यांनी सकाळी सहा वाजताच हिंजवडी परिसरातील कामाची पाहणी केली. तसेच प्रशासनाला विविध विकास कामांचे आदेश दिले. हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात आहेत. या माध्यमातून कामामध्ये अडथळा आणणाऱ्या व्यक्तीवर 353 कलम लावा, अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पुणे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका पत्रकार परिषदेदरम्यान एका व्यक्तीने थेट सरकारी नोकरीची मागणी केल्याने अजित पवार त्या व्यक्तीवर संतापल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी समोरच्या व्यक्तीला बोलण्याची ही पद्धत नाही, असे म्हणत चांगलेच सुनावले असून, नियमात बसत असेल तर शंभर टक्के लाभ मिळेल असे आश्वासनही दिले आहे.हा संपूर्ण प्रकार पुण्यातील एका पत्रकार परिषदेदरम्यान घडला. अजित पवार माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देत असताना, अचानक एका तरुणाने थेट त्यांच्या पुढे येऊन “दादा, मला सरकारी नोकरी द्या” अशी मागणी केली. सुरुवातीला पवारांनी संयम राखत, हा मुद्दा क्रीडा विभागाशी संबंधित असल्याने त्या व्यक्तीने राज्याचे क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांची भेट घ्यावी, असा सल्ला तरुणाला दिला.
अजित पवारांनी सल्ला दिल्यानंतरही तो युवक बोलतच राहिला. यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत “तुला हीच जागा आठवली का हे बोलण्यासाठी?” असा सवाल संबंधित तरुणाला केला. त्यानंतरही त्या व्यक्तीने थांबण्याचे नाव न घेतल्याने “ए, बोलायची ही पद्धत नाही!” असे म्हणत अजित पवारांनी थांबवले. तसेच ”मी माहिती घेईल. मी कागद घेईन. तो व्यवस्थित पाहीन. तू बोलतोय त्यात तथ्य आहे का? हे बघेन. राज्य सरकारचं जे क्रीडाविषयक धोरण असेल त्यात तू बसत असशील तर शंभर टक्के तुझं काम होईल. तू सरकारच्या धोरणात बसत नसशील तर तुला तसे कळवण्यात येईल,’ असे थेट अजित पवार यांनी त्या व्यक्तीला समजावले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दलही महत्त्वपूर्ण माहिती दिली. ज्या पुरुषांनी या योजनेचा गैरवापर करून लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून पैसे वसूल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार म्हणाले की, या योजनेत पुरुष लोकांची नावे येण्याचे काहीच कारण नाही. जर या योजनेत पुरुषांची नावे आलेली असतील, तर ही योजना पुरुषांसाठी नव्हती, त्यामुळे ते पैसे आम्ही वसूल करू. त्यांनी जर सहकार्य केले नाही तर, ‘लाडकी बहीण’ योजनेचा गैरफायदा घेऊन जर त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा अजित पवारांनी दिला.
हिंजवडीतील आयटी उद्योग बंगळुरुला जाईपर्यंत झोपा काढत होते का?
मुंबई, दि. २६ जुलै २०२५
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बंगळूरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबुल केले, पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार काय झोपा काढत होते काय? असा संतप्त प्रश्न विचारून अजित पवारांनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
भाजपा युती सरकार व पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांचा खरपूस समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, पुणे हे महाराष्ट्रातील औद्योगिक, सांस्कृतीक व राजकीय घडामोडींचे महत्वाचे केंद्र आहे. पुण्याचा नावलौकिक सर्वच बाबतीत मोठा होता पण तो आता इतिहासजमा झाला असून पुण्यात आता कोयता गँग, ड्रग्जचा काळाबाजार जोरात सुरु आहे. एक पाऊस पडला तरी पुणे जलमय होते वरून ट्रॅफिकची समस्या वाढलेली आहे, परिणामी आयटी उद्योगाला घरघर लागली आहे. पुण्यासह राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, सत्ताधारी पक्षाचा वाढलेला भ्रष्टाचार,पदाधिकाऱ्यांची गुंडगिरी यांना उद्योजक वैतागले असून पायाभूत सुविधांचा बट्ट्याबोळ झाला आहे म्हणून आय टी उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत. राज्यातील आहे ते उद्योग तर जातच आहेत पण राज्यात येऊ घातलेली मोठी गुतंवणूकही कशी गुजरातली गेली हे काँग्रेस पक्षाने सातत्याने उघड केले आहे. वेदांता फॉक्सकॉन हा तब्बल १.६ लाख कोटी रुपयांची गुतंवणूक व २ लाख रोजगार देणारा उद्योग भाजपा युती सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गुजरातला गेला पण भाजपा सरकार मात्र ते मान्य करायला तयार नाही. आता जर उपमुख्यमंत्रीच उद्योग बाहेर जात आहेत हे सांगत असतील तर सरकारने यावर खुलासा करावा, असे सपकाळ म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, फक्त पुणे शहराचीच वाताहत होत नसून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबईतही फारशी समाधानकारक परिस्थिती नाही. राज्यात बेरोजगारांच्या फौजा उभ्या आहेत, त्यांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहे, महागाईने जगणे कठीण झाले आहे आणि सरकारचे मंत्री मात्र हिंदू मुस्लीम भांडणे लावून खोके भरत आहेत. ही आका व खोके संस्कृतीच महाराष्ट्राचा घात करत असून एवढे भ्रष्ट, निष्क्रीय व निर्ल्लज सरकार राज्यात आजपर्यंत झालेले नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांचे शासकीय यंत्रणांना निर्देश
पिपंरी (दि.२६) : भविष्यातील अडचणी विचारात घेऊन दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पीएमआरसह हिंजवडी आणि शहर परिसराला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती तसेच आवश्यकतेनुसार रस्ते रुंदीकरण करणे अपेक्षित आहे. यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळेल. त्याअनुषंगाने प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयातून रस्ते रुंदीकरणासह दुरुस्ती करत नागरिकांच्या प्राथमिक गरजा अशा पूर्ण होतील, त्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांनी हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीसंबंधी केलेल्या उपाययोजनांची पाहणीनंतर शनिवारी सकाळी (दि.२६) आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंह, पीएमसीचे आयुक्त नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) हिंजेवडी परिसरासह माण, म्हाळुंगे, सूस आदी भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, मेट्रोची सुरु असलेली कामे गतीने पूर्ण करावेत, विविध विकास कामे करतांना स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिकांना विश्वासात घेवून वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा, असे निर्देश पालकमंत्री अजितदादा पवार यांनी दिले. आगामी काळातील पुण्याची लोकसंख्या आणि दळणवळणाच्या सुविधांचा विचार करून पीएमआर क्षेत्र, हिंजवडीसह औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारणीवर भर देणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असल्याने आवश्यक त्या रस्त्यांची दुरुस्ती करत गरजेनुसार रस्ते रुंदीकरणाचा निर्णय घ्यावा. पीएमआरडीएने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढल्यामुळे हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर होत आहे. इतर विविध विभागांनी पण अतिक्रमणासंदर्भात ठोस भूमिका घेऊन वाहतूक कोंडी दूर करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.
पाणीटंचाईसह इतर विकास कामांचा आढावा या बैठकीत पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी १३ जुलै रोजीच्या बैठकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. हिंजवडी आयटी पार्क परिसरात पीएमआरडीएमार्फत विकसित करण्यात येणारे रस्ते, पाणी आरक्षण आणि भविष्य होणारी पाणीटंचाई, वाढते प्रदूषण यांचे निराकरण करण्यासाठी पीएमआर क्षेत्रासाठी पुढील ३० वर्षांची मागणी आणि संभाव्य तरतुदीचे विश्लेषण करणाऱ्या मास्टर प्लॅनचे सादरीकरण महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी केले. यासह इंद्रायणी व पवना नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प, प्राधिकरण क्षेत्रातील नागरी विकास केंद्र गावांमध्ये मल निस्सारण प्रकल्प आदींबाबत सादरीकरण करण्यात आले.
हिंजवडीत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ! हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएने प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. मार्सिडिज शोरूम ते म्हाळुंगे (MIDC Circle), सूर्या हॉस्पिटल ते साखरे वस्ती, सूर्या हॉस्पिटल ते ठाकर वस्ती ते माण गावठाण, म्हाळुंगे ते हिंजवडी फेज, नांदे ते माण, शनी मंदिर वाकड ते मारुंजी या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.
हिंजवडी भाागात केलल्या कामांची पाहणी या बैठकीपूर्वी पुणे मेट्रो लाईन ३, स्थानक क्र. ६, क्रोमा, हिंजवडी, क्रोमा ते मेझानाईन ते लक्ष्मी चौक ते शिंदे वस्ती ते मारुंजी रोड, मारुंजी रोड – कासार साई (कॅनोल) विप्रो सर्कल फेज-२, विप्रो सर्कल फेज-२ – स्थानक क्र. ०३, डोहलर कंपनी, डोहलर कंपनी हिंजवडी फेज ३ माण गाव-पांडवनगर नगररचना रस्ता, नगररचना रस्ता ते प्राधिकरण आकुर्डी कार्यालयादरम्यान वाहतूक कोंडी सोडविण्याच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि सुरु असलेल्या विविध विकासकामाची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
मुंबई-झारखंडमध्ये उघड झालेल्या मद्य विक्री घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमित साळुंखे यांच्या सुमित फॅसिलिटीज लिमिटेड या कंपनीवरून आता महाराष्ट्रातही राजकीय वादंग निर्माण झाले आहे. कारण, या कंपनीला राज्यात कोट्यवधींची सरकारी कंत्राटे मिळाली असून, त्यामध्येही कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.अमित साळुंखेला झारखंडमध्ये अटक केल्यानंतर रांची न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. विरोधकांनी सरकारवर भ्रष्टाचार, पक्षस्नेही कंपन्यांना लाभ देणे आणि नियमबाह्य निर्णय घेण्याचे आरोप करत चौकशीची मागणी केली आहे.
नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे अशा महापालिकांची यांत्रिक स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाशी संबंधित कोट्यवधी रुपयांची कंत्राटे सुमित फॅसिलिटीज कंपनीला मिळाली आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर देखील अनेक राज्यांमध्ये अमित साळुंखेच्या सुमित फॅसिलिटीजला वेगवेगळी कंत्राटे मिळालेली आहेत. कंपनीचाच दाव्यानुसार देशातील 22 राज्यांमध्ये कंपनी काम करते आहे. कंपनीच्या दाव्यानुसार कंपनीकडे 26,00,00,000.00 रुपयांचे भाग भांडवल आहे. पण कंपनी जास्त चर्चेत आली ती तेव्हा, जेव्हा तिला महाराष्ट्रात 108 क्रमांकाच्या अँब्युलन्स सेवा पुरवण्यासाठी तब्बल 6 हजार कोटी रुपयांचे 10 वर्षांचे कंत्राट देण्यात आले.
या कंत्राटाच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आधीचे कंत्राट संपत असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या नव्या कंत्राटाचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले, असा आरोप होत आहे. नंतर ही बाब उच्च न्यायालयात गेली आणि न्यायालयाने कंत्राट वैध ठरवले. पण नवीन सरकार आल्यावर मे 2025 मध्ये केलेल्या करारात बीव्हीजी कंपनीलाही यात सामावून घेण्यात आले.
2022 मध्ये झारखंड सरकारने एक नवीन मद्यविक्री धोरण लागू केले, ज्या अंतर्गत किरकोळ मद्यविक्री सरकारी दुकानांतून करण्यात येणार होती. या दुकानांमध्ये कर्मचारी पुरवण्याचे काम सुमित फॅसिलिटीजला देण्यात आले. तत्कालीन उत्पादन शुल्क विभागाचे सचिव आयएएस विनयकुमार चौबे यांच्या शिफारसीवरून हे कंत्राट मिळाले होते.
2024 मध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केली. त्यावेळी विनयकुमार चौबे यांनी ईडीला माहिती पुरवली आणि त्यातून सोरेन यांना अटक झाली. मात्र निवडणूक जिंकल्यानंतर सोरेन परत सत्तेवर आले आणि त्यांनी चौबे यांच्यावर चौकशीचा ससेमिरा लावला. त्यातून अमित साळुंखे, चौबे आणि इतर 11 जणांना अटक झाली.
अमित साळुंखे याने पुण्यातील बीएमसीसी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर स्पेनमधून एमबीए केले. 2016 मध्ये तो सुमित फॅसिलिटीज लिमिटेड या कौटुंबिक कंपनीत सक्रिय झाला. त्याच्या आधी कंपनीच्या संचालक मंडळावर त्याचे वडील, भाऊ, आई व इतर नातेवाईक होते. आजही कंपनीच्या संचालक मंडळावर गरिमा तोमर, अजित दरंदळे, सुनील कुंभारकर ही मंडळी आहेत. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेला मद्य व्यावसायिक सिद्धार्थ सिंघानिया देखील या कंपनीच्या संचालक मंडळावर राहिलेला आहे.
या प्रकरणात आणखी एक वादग्रस्त मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनला सुमित साळुंखेच्या कंपनीकडून देणग्या देण्यात आल्या, असा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांचा आरोप आहे की, याच राजकीय संबंधांमुळे कंपनीला कोट्यवधींची सरकारी कंत्राटे मिळत आहेत. त्यामुळे शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी, अशी जोरदार मागणी सुरू आहे.
108 अँब्युलन्स कंत्राट काय आहे?
राज्यभरात 1756 अँब्युलन्सद्वारे 108 क्रमांकावर सेवा पुरवली जाणार आहे.
पहिल्या वर्षी सरकार 637 कोटी रुपये खर्च करेल.
प्रत्येक वर्षी 5 टक्क्यांनी ही रक्कम वाढणार आहे.
एकूण 10 वर्षांत कंत्राटाची एकूण किंमत 6000 कोटी रुपये असेल.
पुणे, दि. २६ जुलै २०२५: अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘भूषण पुरस्कार’ वितरण सोहळा आज मंडई म्हसोबा चौक येथे अत्यंत उत्साहात पार पडला. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. धार्मिकतेतून विधायकतेकडे यशस्वी वाटचाल करत असलेल्या या ट्रस्टच्या कार्याचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले.
यादरम्यान डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पत्रकारिता भूषण पुरस्कार: श्री. आनंद अग्रवाल,कला भूषण पुरस्कार: सविताताई मालपेकर, संगीत भूषण पुरस्कार: श्रीनिवास जोशी, व्यापार भूषण पुरस्कार: संजय चितळे, धार्मिक भूषण पुरस्कार: ह.भ.प. योगी निरंजननाथ, विशेष पुरस्कार: रागिनीजी खडके (कार्याध्यक्ष, सद्गुरू बाळूमामा देवालय), उद्योग भूषण पुरस्कार: श्री. निलेश भिंताडे यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या प्रभावी भाषणात महिलांच्या शिस्तबद्ध आणि संघर्षशील भूमिकेचा विशेष उल्लेख केला. व्यापार, उद्योजकता, प्रशासन, कला, धार्मिक, संगीत आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत यशस्वी कार्य करणाऱ्या ‘भूषण पुरस्कार’ विजेत्यांचे अभिनंदन करताना त्या म्हणाल्या, “दुधाचा भाव मिळवून देण्यापासून ते शैक्षणिक कार्यासाठी निधी वापरण्यापर्यंत संजय चितळे व चितळे उद्योग समूहाने विधायक काम केले आहे. आज उपस्थित असलेल्या महिलांमध्ये उत्साह, जिद्द आणि शिस्त लक्षणीय आहे. सतत समाजकार्यात योगदान देणे सोपे नाही, परंतु पुरस्कार विजेत्यांनी हा दरारा प्रामाणिकपणे राखला आहे.”
त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री सविता मालपेकर, उद्योजिका रागिनी खडके, गायक श्रीनिवास जोशी आणि उद्योजक संजय चितळे यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. सविता मालपेकर यांचा उल्लेख करताना त्यांनी मराठी नाट्यसृष्टी आणि मालिकांमुळे स्त्रियांच्या जीवनात आलेल्या सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकला. “घराघरातील मालिकांमुळे स्त्रिया सुख-दुःख वाटून घेतात, त्यांना जवळच्या महिलांचे प्रतिबिंब या मालिकांमध्ये दिसते. त्यामुळे त्यांच्यात एक वेगळा आत्मविश्वास जागतो,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
महिला सबलीकरणावर बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी स्त्रियांनी समाजकारण आणि राजकारणात सक्रिय होण्याची आवश्यकता अधोरेखित केली. “मा.ना. नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी लोकसभा आणि विधानसभांमध्ये एक तृतीयांश आरक्षण दिले आहे. आता महिलांनी नेतृत्वात पुढाकार घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बँका आणि शासनाच्या विविध योजना अधिक प्रभावी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. “मा.ना. देवेंद्र फडणवीस, मा.ना. एकनाथ शिंदे व मा.ना. अजित पवार यांचे महायुतीचे सरकार ‘लाडकी बहीण योजना’ कधीही बंद करणार नाही, याची ग्वाही देऊन ‘लाडक्या बहिणींना’ बँकांना जोडून घेण्याच्या कार्यक्रमाची गरज डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. ‘लाडकी बहीण योजना’, ‘वयोश्री योजना’ यांसारख्या योजनांचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा आणि उद्योजकतेसाठी पुढे यावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
महिलांच्या सुरक्षिततेबद्दल बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “स्त्रियांनी एकत्र येऊन चुकीच्या गोष्टींना विरोध केल्यास कुणालाही वाईट वागण्याची हिंमत होणार नाही. महिलांनी एकमेकींच्या पाठीशी उभे राहणे ही आजची गरज आहे. ‘महिला हीच महिलांची शत्रू असते’ ही धारणा बदलायला हवी.”
या सोहळ्याला आमदार विजय बापू शिवतारे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष श्री. राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती विजय जाधव केले तर शिवसेनेचे पदाधिकारी श्री. नितीन पवार उपस्थित होते.
पुणे, ता. 26 : कारगिल विजयदिवसाचे औचित्य साधून फर्ग्युसन महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे (एनसीसी) विजय रन मॅरेथॉन, पोस्टर प्रदर्शन स्पर्धा, आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
आज पहाटे पाच वाजता ‘विजय रन’ मॅरेथॉनने या दिवसाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सेनेच्या आधुनिक शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते. यात भारतीय सेनेद्वारे वापरली जाणारी अत्याधुनिक शस्त्रे विद्यार्थ्यांना जवळून पाहता आली. शहरातील शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट दिली.
पोस्टर प्रदर्शन स्पर्धा आयोजित केली होती. यात विद्यार्थ्यांना कारगिल युद्धाशी संबंधित चित्रे आणि संदेशांद्वारे आपली सर्जनशीलता व्यक्त करण्याची संधी मिळाली.
परमवीरचक्र सुभेदार मेजर कॅप्टन संजय कुमार आणि मेजर जनरल (निवृत्त) विक्रम सिंग राठोड यांची व्याख्याने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्याम मुडे यांनी स्वागत केले.
पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. ते स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्या सुरक्षेसाठी सैनिक सीमेवर कार्यरत आहेत. ते स्वतःसाठी नाही तर आपल्या आणि भावी पिढीच्या सुरक्षेसाठी काम करतात. आपणही प्रत्येक काम स्वार्थासाठी नाही तर हा देश माझा आहे या भावनेने केले पाहिजे असे मत संजय कुमार यांनी व्यक्त केले.
‘गणवेशापलीकडची राष्ट्रसेवा : आजच्या तरुणाईची भूमिका’ या विषयावर राठोड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्राचार्य मुडे म्हणाले, “कारगिल युद्धातील हुताम्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
फर्ग्युसन महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे सहयोगी एनसीसी अधिकारी नंदकुमार बोराडे आणि सुनील होवाळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
अध्यक्षपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत यंदा ‘महिलाराज’
पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचे यंदाचे ३०० वे वर्ष आहे. विविध कार्यक्रमातून, उपक्रमातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. एकीकडे गणेशोत्सवाला यंदा महाराष्ट्र सरकारने राज्यउत्सव म्हणून मान्यता द्यायचा निर्णय घेतला असताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या साई मित्र मंडळाने यंदाच्यावर्षी मंडळाचा सर्व कारभाराची दोरी महिलांच्या हातात देण्याचा औचित्यपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून यंदा महिलांच्या हाती कारभार देत मंडळ वेरुळ येथील कैलास मंदीर साकारणार आहे. या देखाव्याच्या कामाचे कळसपूजन चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी केंद्रीय मोहोळ यांनी ही घोषणा केली.
कोथरूड परिसरातील केंद्रीय मंत्री मोहोळ संस्थापक असलेले श्री साई मित्र मंडळ हे भव्य व देखण्या प्रतिकृती गणेशोत्सवात सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यंदाच्यावर्षी ३० वा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, अशीच भव्य, आकर्षक आणि कलात्मक प्रतिकृती सादर करताना मंडळाची धुरा महिलांच्या हातात त्यांनी दिली आहे. यंदाच्या उत्सवाचे सर्व संयोजन महिलाभगिनी करणार आहेत. त्यांना सहाय्यक म्हणून पुरूष कार्यकर्ते काम करणार आहेत.
भारतीय शिल्पकारांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका पाषाणात कैलास लेणीची केलेली निर्मिती हे जगभरासाठी आश्चर्य ठरले आहे. ही लेणी बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने परदेशी पर्यटक दरवर्षी वेरूळला भेट देतात. या कैलास लेणी संकुलातील ‘कैलास मंदिराची’ प्रतिकृती मंडळाच्यावतीने यंदा करण्यात येणार आहे. या सजावटीच्या कामाच्या कळस पूजनाचा शुभारंभ यावेळी प्रसिद्ध मूर्ती आणि मंदिर अभ्यासक गणेश धालपे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गेल्यावर्षी आयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती मंडळाने केली होती.
याबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘गणेश मंडळांचा मुख्य कारभार पुरूष मंडळींच्याच हातात असतो. मंडळातील महिला भगिनी काम करतातच, मात्र त्यांना खुले व्यासपीठ मिळत नाही. मात्र हे चित्र बदलायचे असून यंदाचे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे ३०० वे वर्षे आपण साजरे करत आहोत. त्यानिमित्ताने आमच्या मंडळातील महिला भगिनी अनोखी आदरांजली वाहतील. अहिल्यादेवींच्या चरित्रापासून महिला वर्गाल स्फूर्ती मिळावी आणि त्यांचा सार्वजनिक कामातील माताभिगीनींचा आत्मविश्वास, सहभाग वाढवण्यासाठी आम्ही सर्वांनी ही निर्णय घेतला आहे’
पुणे- आता शिवसेना शिवसेना ;राष्ट्रवादी राष्ट्रवादी ;कॉंग्रेस भाजप असा पक्षा पक्षात वॉर असताना मंत्र्या मंत्र्या तही वॉर दिसून येऊ लागला आहे. मी माधुरी सतीश मिसाळ अशी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना चांगला हिसका दाखविला आहे. तोंडी सांगून ऐकत नाही म्हटल्यावर शिरसाट यांनी मिसाळ यांना लेखी पत्र दिल्याची चर्चा आहे पण या लेखी पत्रालाही मिसाळ यांनी हिसका दाखविला आणि मला तुमच्या परवानगीची आवशक्यता नसल्याचे लेखी कळवून शिरसाट यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे
प्रकरण असे आहे कि संजय शिरसाट हे सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री असून माधुरी मिसाळ या राज्यमंत्री आहेत.
माधुरी मिसाळ परस्पर खातेच हायजॅक करत असल्याचा आरोप –
सामाजिक न्याय विभागातल्या कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेऊन खातेच हायजॅक करत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला आहे.याबाबत त्यांनी माधुरी मिसाळ यांनी पत्र लिहून नाराजी जाहीर केली आहे. आमदारांच्या पत्रावरून माधुरी मिसाळ यांनी काही बैठका लावत अधिकारी आणि कर्मचारी यांना विविध निर्देश दिले होते, मात्र याबाबत शिरसाट यांना कल्पना नव्हती. बैठकांची माहिती संजय शिरसाट यांना कळाल्यानंतर नाराज झाले आणि थेट माधुरी मिसाळ यांना पत्र लिहिलं. इतकंच काय तर पत्रातून यापुढे आपल्याकडील विषयासंबधित बैठक घ्यावयाची असल्यास सदर बैठक माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित करणे संयुक्त राहिल असं खरमरीत पत्रच लिहिलं आहे. माधुरी मिसाळ यांनीही या पत्राला प्रत्युत्तर दिलं असून तुमच्या परवानगी ची गरज नाही मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार काम करत असल्याचं सांगितलं आहे.
संजय शिरसाट यांनी लिहिलेल्या पत्रात काय?
आपणास माहित आहे कि, सामाजिक न्याय या विभागातील कामकाजासंदर्भात मंत्री व राज्यमंत्री यांचे कडील विषयाचे वाटप विभागाचा शासन आदेश दि. 19 मार्च, 2025 नुसार करण्यात आलेले आहे. माझ्या असे लक्षात आले आहे कि, वरील आदेशान्वये जे विषय मंत्री, सामाजिक न्याय यांच्याकडे वाटप करण्यात आलेले आहेत, त्या विषयांच्या संदर्भात सुद्धा आपण आपल्या अध्यक्षतेखाली बैठका घेवून अधिकारी/कर्मचारी यांना विविध निर्देश देत आहात. या संदर्भात माझ्या स्तरावर बऱ्याच बैठका आयोजित करण्यात येत असतात, हेही आपल्याला माहितच आहे.
यास्तव, प्रशासकीय दृष्ट्या योग्य समन्वयासाठी जे विषय आपल्याला वाटप करण्यात आलेले आहेत. त्याव्यतिरिक्त इतर विषयांच्या अनुषंगाने बैठक लावण्यासाठी माझी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच, माझ्याकडील विषयासंबंधित आपणास बैठक घ्यावयाची असल्यास सदर बैठक माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित करणे संयुक्तीक राहील, याची कृपया नोंद घ्यावी.
माधुरी मिसाळ यांचं पत्रानेच प्रत्युत्तर
प्रति, श्री. संजय शिरसाट, मंत्री, सामाजिक न्याय.
आपले दि. २४ जुलै २०२५ चे पत्र मिळाले. १) सामाजिक न्याय विभागाची राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा मला अधिकार आहे. सदर बैठका घेण्यासाठी आपली पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नाही. २) मी घेतलेल्या आढावा बैठकामध्ये कोणतेही निर्णय घेतलेले नाही व निर्देश दिले नाहीत. राज्यमंत्री म्हणून मी घेतलेल्या बैठकामध्ये निदर्शनास आलेल्या बाबींबद्दल अधिकाऱ्यांना काही सूचना करणे किंवा निर्देश देण्यात काहीही गैर नाही अशी माझी धारणा आहे. सदर बैठकात मी कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत. तो खात्याचे मंत्री म्हणून आपला अधिकार आहे. आढावा बैठका घेऊन मी आपल्या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ केली नाही. तरीही मी कोणतेही निर्णय घेतले असल्यास याबाबत प्रकरण परत्वे उदाहरणे कृपया सांगावी. ३) मा. मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मंत्री व राज्यमंत्री यांना शासन कार्यकाळाच्या १५० दिवसांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत ही बाब आपल्याला अवगत असेलच. हे पाहता खात्याची राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेणाचा मला अधिकार आहे व ती माझी जबाबदारी सुद्धा आहे. त्यामुळे या बैठका अनिवार्य असल्याने त्यासाठी आपली पूर्व परवानगी आवश्यक वाटत नाही. ४) आपण दिनांक १९ मार्च २०२५ रोजी दिलेल्या आदेशान्वये सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजा संदर्भात मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडील विषयांचे वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक २६ जून १९७५ च्या महाराष्ट्र शासन कार्य नियमावली मधील मुद्दा क्र. ०६ नुसार अधिकार वाटप मा. मुख्यमंत्री महोदयांच्या संमतीने करण्याच्या आवश्यकता असताना ती संमती घेण्यात आली नाही. वाटप केलेल्या अनेक अधिकारांबद्दल मागील काही वर्षात विभागाने केलेल्या कार्यवाही बद्दल विभागात माहिती सुद्धा उपलब्ध नाही. असे असताना याबाबत कोणतीही नाराजी व तक्रार व्यक्त न करता विभागाची राज्यमंत्री म्हणून मी कामकाज करत आहे. विभागाच्या राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्यासाठी आपली पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता आहे किंवा कसे याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून विधिमत घेण्यात येत आहे. (माधुरी मिसाळ)
प्रत, मा. मुख्यमंत्री यांचे सचिव, आपणास विनंती करण्यात येते की, विभागाच्या आढावा बैठका घेण्यासाठी मा. मंत्री, सामाजिक न्याय यांची पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता आहे किंवा कसे तसेच अशा बैठका मंत्रिमहोदयांच्या अध्यक्षतेखालीच आयोजित करण्यात याव्यात किंवा कसे याबाबत योग्य ते निर्देश द्यावेत.
26 जुलै रोजी साजऱ्या केला जाणाऱ्या ‘कारगिल विजय दिवसा’निमित्ताने मातृभूमीच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सशस्त्र दलाच्या शूरवीरांना राष्ट्र अभिवादन करत आहे. 1999 साली भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 26 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारक (NWM) येथे हुतात्मा वीरांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
स्मारकाला भेट देणाऱ्यांच्या नोदवहीत लिहिलेल्या संदेशात, संरक्षण मंत्री महोदयांनी राष्ट्राच्या वतीने वीर जवानांप्रति मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. कारगिल विजय भविष्यातील पिढ्यांसाठी शौर्याचे एक अद्वितीय उदाहरण राहील, असे संरक्षण मंत्र्यांनी आपल्या संदेशात लिहिले आहे. राष्ट्रीय युद्ध स्मारक हे वीरांनी केलेल्या बलिदानाचे जिवंत प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
X या समाज माध्यमावरील संदेशात राजनाथ सिंह यांनी कारगिल युद्धातील अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत देशाच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी भारतीय वीरांनी दाखवलेले असाधारण शौर्य, धैर्य आणि अटल निर्धाराचे स्मरण केले. “कारगिल युद्धातील भारतीय सशस्त्र दलांचे सर्वोच्च बलिदान आपल्या सशस्त्र दलांच्या अटल निर्धाराचे शाश्वत प्रतीक आहे. देश त्यांच्या सेवेचा कायम ऋणी राहील,” असे त्यांनी आपल्या संदेशात लिहिले आहे.
कारगिल मधील द्रास येथे, ‘मेरा युवा भारत’ या योजनेअंतर्गत युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘कारगिल विजय दिवस पदयात्रेचे नेतृत्व केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी केले. या पदयात्रेत 1,000 पेक्षा जास्त युवा, सशस्त्र दलाच्या सेवेतील आणि निवृत्त जवान, हुतात्मा वीरांचे कुटुंबीय आणि सामान्य नागरिकांनी सहभाग घेतला. या पदयात्रेची सुरुवात द्रास येथील हिमाबास पब्लिक हायस्कूल येथून झाली, आणि सुमारे 1.5 किलोमीटर अंतर कापत भीमबेट येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात या पदयात्रेची सांगता झाली.
यानंतर, दोन्ही मंत्री 100 युवा स्वयंसेवकांसह कारगिल युद्ध स्मारकाकडे रवाना झाले. 1999 साली सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना रक्षा राज्यमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
X या समाज माध्यमावरील संदेशात, रक्षा राज्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला की शूर सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाच्या कथा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील. “शूर सैनिकांचे बलिदान प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करत राहील,” असे ते म्हणाले.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कारगिल युद्ध स्मारकावर पुष्पांजली अर्पण करून हुतात्मा वीरांना अभिवादन केले.
संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमण्य यांनीही नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शूर सैनिकांना अभिवादन केले.
यावेळी चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी सशस्त्र दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी, निवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. कारगिल विजय दिवस प्रत्येक भारतीयाला आपल्या राष्ट्राची प्रादेशिक अखंडता जपण्यासाठी शौर्याने लढा देणाऱ्या आपल्या शूर सैनिकांच्या अतुलनीय शौर्याची, धैर्याची आणि देशभक्तीचे स्मरण करून देतो, तसेच हा दिवस पाकिस्तानच्या खोटेपणाचे सत्यही जगासमोर आणतो असे ते म्हणाले. आपले शत्रू आपल्या दृढनिश्चयाची सतत परीक्षा घेत राहतील, परंतु कारगिलचा वारसा आपल्याला एकता, सज्जता आणि अटूट धैर्याची शिकवण देतो. आपण शत्रूचा खोटारडेपणा आणि आक्रमकतेवर कायम विजय मिळवत राहू, ही बाब अलिकडच्याच ऑपरेशन सिंदूरच्या यशानेही पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देणाऱ्यांच्या अभिप्राय पुस्तिकेत आपला संदेशही लिहिला. आपल्या संदेशातून त्यांनी हुतात्मा वीरांच्या दृढ भावना आणि धैर्याला सलाम केला. सध्या कार्यरत असलेले सैनिक, निवृत्त सैनिक आणि वीर नारी यांच्या राष्ट्राप्रती असलेल्या समर्पणाची, दृढनिश्चयाची आणि चिरस्थायी वचनबद्धतेची प्रशंसाही त्यांनी या संदेशात केली.
यावेळी नौदल प्रमुखांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. देशाच्या शूरवीरांनी निर्माण केलेला वारसा स्वतःच्या ‘आधी कर्तव्य’ या भावनेचा आणि राष्ट्राच्या सेवेसाठी असलेल्या अतूट निष्ठेचा दाखला आहे असे ते म्हणाले. तुमचे बलिदान केवळ आपल्या देशाच्या भावी पिढ्यांसाठीच नाही, तर कर्तव्य-सन्मान-शौर्याच्या भावनेने संरक्षण दलात सेवा करण्याचा निर्णय घेणाऱ्यांसाठीही प्रेरणा देत राहील असे ते म्हणाले.
सेना प्रमुखांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्याच्या अदम्य धैर्य आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे असे ते म्हणाले. त्यांनी राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि स्वाभिमान जपण्याची भारतीय सैन्याची वचनबद्धताही आपल्या मनोगतातून पुन्हा अधोरेखित केली.
हवाईदल प्रमुखांनीही राष्ट्रीय युद्ध स्मारक हे राष्ट्रीय स्मृती आणि कृतज्ञतेचे एक पवित्र प्रतीक असल्याची भावना व्यक्त केली. हे स्मारक हुतात्मा वीरांचा वारसा अमर करते. या वीरांचे शौर्य भारतीय सशस्त्र दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रेरणा देत राहील असे ते म्हणाले. भारतीय हवाई दल आपल्या राष्ट्राचे सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि शूरवीरांनी घालून दिलेल्या धैर्य, सन्मान आणि कर्तव्याच्या गौरवशाली परंपरांचे पालन करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
संरक्षण सचिवांनीही आपल्या संदेशातून, हुतात्मा आणि भारताच्या संरक्षण दलांप्रति आदर व्यक्त केला. कारगिल विजय दिवस राष्ट्राला सशस्त्र दलातील जवानांचे शौर्य आणि त्यागाचे स्मरण करून देतो. राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या माध्यमातून हुतात्मा झालेल्या वीरांचे अदम्य धैर्य लोकांच्या हृदयात कायमच जिवंत राहील, असे ते म्हणाले.
व्हाईस चिफ ऑफ आर्मी स्टाफ यांनी देखील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या शूरवीरांची निस्वार्थ सेवा राष्ट्राच्या स्मृतीत कायमची कोरली जाईल, आणि ती भावी पिढ्यांना आपल्या सशस्त्र दलांच्या सर्वोच्च परंपरांचे पालन करण्यासाठी प्रेरणा देत राहील असे ते म्हणाले. याच शौर्याने आणि समर्पणाने राष्ट्राची सेवा करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
जळगाव- एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना तीन चॅलेंज स्वीकारण्याचे आव्हान दिले आहे. स्वतःच्या प्रॉपर्टीची चौकशी लावा, माझ्या मुलाची मृत्यूची सीआयडी चौकशी करा आणि प्रफुल्ल लोढा याची नार्को टेस्ट करा, असे आव्हान एकनाथ खडसे यांनी महाजन यांना दिले आहे.
भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पलटवार करत एकनाथ खडसे म्हणाले की, ‘त्यांनी माझे चॅनेल स्विकारावे. यामध्ये त्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी, माझ्या मुलाच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी आणि प्रफुल्ल लोढा याने महाजन यांच्यावर केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्याची नार्को टेस्ट करावी. हे माझे महाजन यांना आव्हान असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.
एकनाथ खडसे यांनी विकासाच्या मुद्यावरून देखील गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. महाजन यांनी जिल्ह्यात कोणते मोठे विकासाचे काम केले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इतकेच नाही तर आपल्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा पाढा देखील त्यांनी वाचला. महाजन हे केवळ अर्ध्या खात्याचे मंत्री असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला. महाजन यांच्या हिंमत असेल तर त्यांनी केलेल्या मोठ्या विकास कामाचे एकतरी उदाहरण दाखवावे? असेही आव्हान खडसे यांनी दिले आहे. जिल्ह्यात झालेली सर्व धरणे ही माझ्या कार्यकाळात पूर्ण झाली असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादात मंगेश चव्हाण यांनी देखील उडी घेतली होती. एकनाथ खडसे यांचे अनेक महिलांशी संबंध होते, असा आरोप चव्हाण यांनी केला होता. त्यावर देखील खडसे यांनी पलटवार केला आहे. मंगेश चव्हाण यांनी माझ्या चारित्र्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे चव्हाण यांनी पुरावा दाखवावा. त्यांनी एक जरी पुरावा दाखवला तर मी राजकारणातून निवृत्ती घेईल, असे थेट आव्हान देखील एकनाथ खडसे यांनी दिले आहे.