Home Blog Page 191

शैक्षणिक संस्था ह्या संस्कार व सद्विचारांची विद्यापीठे व्हावीत-स्वरूपानंद सरस्वती स्वामी

डॉ. विश्वनाथ दा. कराड ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार’ ने सन्मानीत

पुणे,३० जुलै  : “देशातील सर्व विद्यापीठांकडून अत्याधुनिक शिक्षण दिले जावे, मात्र संस्कार आणि सद् विचार हे जीवन घडविणारे असतात. त्यामुळेच शैक्षणिक संस्था या सद्विचारांचे विद्यापीठ व्हावेत. संस्कार हे जीवन घडविणारे, विचार तर्क शुद्ध असल्याने सुंदर नव पिढी निर्माण करू शकू.” असे विचार श्रुतिसागर आश्रम फुलगावचे संस्थापक परमपूज्य स्वरूपानंद सरस्वती स्वामी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने परमपूज्य स्वरूपानंद सरस्वती स्वामी यांच्या हस्ते एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार’ २०२५ या विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश, स्मृती चिन्ह, मानपत्र, पगडी, कवड्याची माळ आणि शेला प्रदान करण्यात आला. तसेच, इतिहास अभ्यासक डॉ. केदार फाळके यांना श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती २०२५ ने सन्मानीत करण्यात आले. त्यांना प्रशस्तीपत्रक, ५० हजार रुपयांचा धनादेश, कवड्याची माळ व पगडी देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, अमृत पुरंदरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे संचालक रवींद्र वंजारवाडकर होते. जाणता राजाचे कलाकार सुनील थोपटे यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.
स्वरूपानंद सरस्वती स्वामी म्हणाले,”बाबासाहेबांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार महान शिक्षणमहर्षिला दिला गेला आहे. योग्य पुरस्कार योग्य व्यक्तिला देणे हाही एक योगायोग आहे. मन हे माणसाला शुन्यापासून उच्च स्तरापर्यंत घेऊन जाते. तसेच ते उच्च स्तरापासून जमिनीपर्यंत ही आणते. अशा वेळेस काळानुरूप मनावर संस्कार घडविणारी शिक्षण पद्धती गरजेची आहे.”
सत्काराला उत्तर देतांना डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”जीवनभर विनम्रतेने कार्य करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंतरिक समाधानाची अनुभूती घेत आहे. सद्गुणांची पूजा हीच ईश्वराची पूजा आहे. बाबासाहेब वयाच्या शंभरीत पदार्पण करीत होते. तेव्हा त्यांची भेट घेतली. बाबासाहेब नेहमी नम्रतेने, लीनतेने बोलत. शिवरायांच्या जीवनाचे खरे दर्शन बाबासाहेबांनी राज्याला आणि देशाला एका वेगळ्या भूमिकेतून घडवले.”
डॉ. केदार म्हणाले,”बाबासाहेब पुरंदरे नेहमीच म्हणत असे की घाबरत असाल तर इतिहासाचा अभ्यास करू नका. इतिहास संशोधकाने सत्य कथन करावे, त्याने मागे कधीच हटू नये आणि कोणाचा अपमान ही करू नये. सातत्याने सत्याचा वेध घेऊन समस्यांच्या मुळापर्यंत पोहोचावे.”
रवींद्र वंजारवाडकर म्हणाले,” डॉ. विश्वनाथ कराड यांना बाबासाहेब यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार म्हणजे एका ध्यासपर्वाने दुसर्‍या ध्यासपर्वाचा केलेला सन्मान असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बाबासाहेबांनी इतिहासात जसे आहे तसेच मांडले, त्यांनी कधिही सत्येची मोडतोड केली नाही.”

त्यानंतर प्रदीप रावत आणि अमृत पुरंदरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
 सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी व राधा पुरंदरे आगाशे यांनी आभार मानले.

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य संवाद आणि संघर्षाचे प्रतीक : डॉ. श्रीपाल सबनीस

फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे भीमराव पाटोळे यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव
पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज यांचे संतत्व, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम, स्वातंत्र्य यांचा जागर करत बहुसंस्कृतीत एकात्मता जागविणारे साहित्य अण्णा भाऊ साठे यांनी निर्माण केले. त्यांच्या साहित्यकृती संवाद आणि संघर्षाच्या प्रतीक आहेत. बहुसंस्कृतीचे आव्हान पेलण्याची ताकद त्यांच्या साहित्यकृतींमध्ये होती. अण्णा भाऊंचे कर्तृत्व देश-धर्म-पंथाच्या सीमा ओलांडून विश्र्वात्मक मानदंड निर्माण करणारे होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. अण्णा भाऊंना वंदनीय मानून जात-धर्म-पंथाच्या सीमा ओलांडून जगण्याची भूमिका भीमराव पाटोळे यांनी आपल्या साहित्यकृतीतून मांडली आहे, अशा शब्दांत त्यांचा गौरवही केला.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे ज्येष्ठ साहित्यिक भीमराव पाटोळे यांच आज (दि. ३०) समाजरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते. कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल गायकवाड, माजी नगसेविका लता राजगुरू, विशाला पाटोळे मंचावर होते. शाल, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. दीप्ती पाटोळे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, बहुधार्मिक समाजाचे एकात्म चित्रण, स्वातंत्र्याचा जागर अण्णा भाऊंच्या शाहिरीत प्रकर्षाने दिसतो. भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीचा मिलाफ करत विचारधारेचे वेगळेपण जपत अण्णा भाऊ साठे यांनी एकात्म मानवता समाजापुढे मांडली. ते संवादी लेखक होते.
सत्काराला उत्तर देताना भीमराव पाटोळे म्हणाले, दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी निर्माण केलेल्या साहित्यकृती या चमत्कार आहेत. त्यांना भारतरत्न हा किताब मिळावा यासाठी मी प्रयत्नशील आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. प्रमोद आडकर यांनी तर सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भीमराव पाटोळे लिखित ‘ना खेद ना खंत’ या पुस्तकावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात बाळासाहेब शिवरकर, ॲड. दीपक मानकर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले, अजय पाटोळे यांचा सहभाग होता.

“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

राज्य महिला आयोगामार्फत संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा कृतीशाळेचे आयोजन

मुंबई, दि. ३० जुलै २०२५ : “मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा, ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, मानवी तस्करीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक यंत्रणा, पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि जनतेने एकत्र येऊन जनजागृती करत, लोकचळवळ तयार करावी, असेही त्या म्हणाल्या.

राज्य महिला आयोगामार्फत ‘संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा’ या कृतीशाळेचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले होते. जागतिक मानवी तस्करीविरोधी दिनानिमित्त हा उपक्रम पार पडला. या वेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्यासह पशुसंवर्धन व पर्यावरण बदल मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, गृह निर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सर्व श्री व श्रीमती आमदार प्रज्ञा सातव, श्रीजया चव्हाण, मनिषा कायंदे, हारून खान, सना मलिक, मोनिका राजाळे आणि आयोगाच्या सदस्य सचिव नंदीनी आवाडे यांच्यासह विविध सामाजिक संस्था, ॲन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग यंत्रणांचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी विदर्भातील व्यवसायिक लैंगिक शोषण अन्वेषण अहवाल व ‘समस्या, मदत, कायदे काय सांगतात’ या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. देशभरातील तज्ज्ञांनी परिसंवादात सहभाग घेतला.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महिलांनी आत्मसंरक्षणासाठी सजग व सक्षम होणे अत्यंत गरजेचे आहे. शासन या लढ्यात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. तस्करीविरोधातील लढ्यात तंत्रज्ञानाचा वापर करून ‘दोषसिद्धी’ वाढवणे शक्य आहे. प्रत्येक जिल्ह्याने शाश्वत विकास उद्दिष्टे यानुसार ३ टक्के निधी यासाठी वापरण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.” तसेच त्यांनी मानवी तस्करी झालेल्या मुलींनी यातून बाहेर पडल्यानंतर स्वत:ला कसे घडवले, पुढे नेले याची उदाहरणे दिली.

प्रथम परिसंवादात ‘तंत्रज्ञानाधिष्ठित उपाययोजना आणि मॉडेल्स’ यावर चर्चा झाली. यात श्री. ज्ञानेश्वर मुळे (माजी सदस्य, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग), स्टँक टेक्नोलॉजीचे संस्थापक श्री. अतुल राय, प्रेरणा संस्थेच्या रश्मी टेलर आणि सायबर पीस फाउंडेशनचे इरफान सिद्धावतम यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन प्रयास संस्थेच्या शॅरॉन मेनेझेस यांनी केले.

दुसऱ्या सत्रात ‘प्रवासा दरम्यान आणि ऑनलाइन माध्यमातून होणारी तस्करी’ या विषयावर चर्चा झाली. रेल्वे स्थानकं, महामार्ग, बस डेपो, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, एक्स यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर तस्करी ओळखण्याचे आणि रोखण्याचे उपाय यामध्ये मांडण्यात आले. परिवहन क्षेत्र, कायदेशीर तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था, पोलीस अधिकारी यांनी समन्वय व सुधारणा यावर आपले विचार मांडले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांचे हे स्पष्ट मत होते की, मानवी तस्करीविरोधातील लढा केवळ कायद्याने नव्हे, तर संवेदनशीलतेने आणि सामूहिक कृतीने लढायचा आहे.

इस्रोने सर्वात महागडा व शक्तिशाली उपग्रह NISAR लाँच केला

श्रीहरिकोटा-सर्वात महागडा आणि सर्वात शक्तिशाली पृथ्वी निरीक्षण उपग्रह NISAR आज, म्हणजे बुधवार, ३० जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आला. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सायंकाळी ५:४० वाजता GSLV-F16 रॉकेटद्वारे त्याचे प्रक्षेपण करण्यात आले.

हे रॉकेट NISAR ला ७४३ किमी उंचीवर, ९८.४ अंश कललेल्या सूर्य-समकालिक कक्षेत स्थापित करेल. यासाठी सुमारे १८ मिनिटे लागतील. हा उपग्रह NASA आणि ISRO ने संयुक्तपणे तयार केला आहे.

निसार ७४७ किमी उंचीवर असलेल्या ध्रुवीय कक्षेत फिरेल. ध्रुवीय कक्षा म्हणजे अशी कक्षा ज्यामध्ये उपग्रह पृथ्वीच्या ध्रुवांवरून जातो. या मोहिमेचा कालावधी ५ वर्षांचा आहे.NISAR हा एक उच्च तंत्रज्ञानाचा उपग्रह आहे. त्याचे पूर्ण नाव NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार आहे. हे अमेरिकन अंतराळ संस्था NASA आणि भारतीय संस्था ISRO यांनी संयुक्तपणे तयार केले आहे. या मोहिमेवर १.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १२,५०० कोटी रुपये खर्च झाले आहेत.

हा उपग्रह ९७ मिनिटांत पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल. १२ दिवसांत १,१७३ प्रदक्षिणा पूर्ण करून, तो पृथ्वीच्या जमिनीच्या जवळजवळ प्रत्येक इंचाचा नकाशा तयार करेल.
यामुळे त्याला ढग, घनदाट जंगले, धूर आणि अंधारातही पाहण्याची क्षमता मिळते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अगदी लहान बदल देखील तो पाहू शकतो.
NISAR मोहिमेचा मुख्य उद्देश पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाला जवळून समजून घेणे आहे. हा उपग्रह विशेषतः तीन गोष्टींवर लक्ष ठेवेल:

जमीन आणि बर्फातील बदल: यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा हिमनद्यांमध्ये किती बदल होत आहेत ते पाहिले जाईल. जसे की जमीन खाली जाणे किंवा बर्फ वितळणे.
भूपरिसंस्था: पर्यावरणाची स्थिती समजून घेण्यासाठी जंगले, शेतजमीन आणि इतर नैसर्गिक क्षेत्रांच्या स्थितीचे निरीक्षण करा.
सागरी क्षेत्र: समुद्राच्या लाटा, त्यांचे बदल आणि सागरी पर्यावरणाचा मागोवा घेईल.
या माहितीमुळे, शास्त्रज्ञ हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील. मिशनचा ओपन-सोर्स डेटा सर्वांना मोफत उपलब्ध असेल.

अनधिकृत बांधकामांमुळे मोठे गैरव्यवहार:महापालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणी माजी आयुक्तांच्या घरी ईडीचे छापे

मुंबई,-मुंबई, नाशिक आणि वसई-विरार शहरांमध्ये मंगळवारी सकाळी सक्त वसुली संचालनालयाने (ED) एकाचवेळी मोठी कारवाई केली. अवैध बांधकामाशी संबंधित प्रकरणात एकूण 12 ठिकाणी छापे मारी करण्यात आली असून, यामध्ये वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या वसई तील निवासस्थानी ही धाड टाकण्यात आली आहे.

वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानी सुरू असलेली अंमलबजावणी संचालनालयची (ईडी) चौकशी तब्बल 18 तासांनंतर पूर्ण झाली आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता सुरू झालेली कारवाई रात्री दीड वाजेपर्यंत सुरू होती. या दरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी कोणालाही ताब्यात घेतले नसले तरी, निवासस्थानातून अनेक महत्वाची कागदपत्रे, हार्ड डिस्कमधील मोठ्या प्रमाणातील डिजिटल डाटा हस्तगत केला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.वसईच्या दीनदयाल येथील पालिकेच्या शासकीय निवासस्थानी मंगळवारी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. मात्र माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दरवाजा उघडण्यास विलंब केल्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना तब्बल 1तास 15 मिनिटे बाहेर वाट बघावी लागली, त्यानंतर त्यांनी नाईलाजास्तव टाळे खोलण्यासाठी दुसरी चावी बनवणाऱ्या कारागिराला बोलवावे लागले त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी शासकीय गृहात प्रवेश केला.कारवाई सुरू असताना माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या पत्नीला देखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानातून दुपारी दोनच्या सुमारास गाडीतून बाहेर नेले होते. त्यानंतर त्यांना रात्री 9च्या सुमारास शासकीय निवासस्थानी परत आणण्यात आले होते. त्यानंतर या कारवाईचा वेग वाढला होता. दोन प्रिंटर देखील कारवाईदरम्यान आणण्यात आले होते. तर संगणक तपशील जाम करण्यासाठी तीन हार्डडिस्क (संगणक संचयन यंत्र) ताब्यात घेण्यात आले होते.वसई विरार शहर महानगर पालिकेच्या माजी आयुक्तांची मंगळवारी सकाळी सुरू झालेली चौकशी अखेर बुधवारी दुसऱ्या दिवशी रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी पूर्ण झाली त्यानंतर रात्री दोन वाजता ईडीचे अधिकारी निवासस्थानातून बाहेर पडले होते. या कारवाईमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.

विशेष बाब म्हणजे, अनिल कुमार पवार यांनी सोमवारीच आयुक्तपदाचा पदभार सोडून तो मनोज कुमार सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांतच ईडीने ही धडक कारवाई केली. अनिल कुमार पवार यांचा सोमवारी पालिकेत निरोप समारंभ पार पडला होता आणि दुसऱ्याच मंगळवारी त्यांच्यावर ही कारवाई झाली. अनिल कुमार पवार यांची ठाण्यात एसआरए विभागात बदली झाली आहे.

ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसई-विरार परिसरातील डंपिंग ग्राउंड साठी आरक्षित असलेल्या 60 एकर जमिनीवर बेकायदेशीररीत्या 41 इमारती उभारण्यात आल्या. या प्रकरणाशी संबंधित मनी लाँडरिंगच्या संशयावरून ही छापे मारी करण्यात येत आहे.या आधीही ईडीने याच प्रकरणात 13 ठिकाणी छापे टाकून सुमारे 9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्या वेळी काही बिल्डर, आर्किटेक्ट आणि तत्कालीन अधिकारी वाय.एस. रेड्डी यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती.

सध्या ईडीचे पथक अनिल कुमार पवार यांच्या दीनदयाल नगर येथील घरात कागदपत्रांची सखोल तपासणी करत आहे. वसई, विरार आणि नालासोपारा पूर्व भागातील बेकायदेशीर इमारतींवरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा संशय ईडीला आहे.ईडीच्या या कारवाईमुळे वसई-विरार महापालिकेत आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

फडणवीस, दादांची शिस्त नावालाच उरली..

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिस्त सध्या नावालाच उरल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. हे दोन्ही नेते सध्या नाराजी, तीव्र नाराजी व अतितीव्र नाराजीच व्यक्त करताना दिसतात, असे ते म्हणालेत.
महायुती सरकार गत काही महिन्यांपासून आपल्या नेत्यांच्या व मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने वादात अडकत आहे. सुरूवातीला मंत्री नीतेश राणे यांनी वादग्रस्त विधाने करून सरकारला अडचणीत आणले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे जय गुजरात म्हणून सरकारच्या अडचणी वाढवल्या. त्यानंतर शिंदेंच्याच नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विधानभवनातील कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण करून आपला हात साफ करून घेतला. हे कमी की काय म्हणून त्यानंतर लगेचच मंत्री संजय शिरसाट यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला.
या व्हिडिओत संजय शिरसाट आपल्या बेडरूममध्ये पैशांच्या बॅगेसोबत बसल्याचे दिसून येत आहे. त्यांचा हा व्हिडिओ समोर येताच विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. यामुळे सरकारचा पुरता गोंधळ उडवला. हा वादाचा क्रम इथेच थांबला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याने विधिमंडळाच्या लॉबीतच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल केला. यावरूनही सरकारला सध्या रोज टीकेचे धनी व्हावे लागत आहे. विशेष म्हणजे कोकाटे यांच्या यापूर्वीच्या काही विधानांमुळेही सरकारची चांगलीच गोची झाली होती.

या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी बुधवारी एका ट्विटद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिस्त सध्या नावालाच उरल्याचा दावा केला आहे. राज्याचे कारभारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची शिस्त तशी नावालाच उरली आहे वाटते. घपले करून हॉटेल घ्या, विधिमंडळात रम्मी खेळा, बरळा, मारामारी करा, कोणाच्याही नाकावर बुक्का मारा.. काहीही करा! आता हे दोन शिस्तीचे लोक फक्त नाराजी.. तीव्र नाराजी.. अति तीव्र नाराजी व्यक्त करतानाच दिसतात, असे दानवे यांनी म्हटले आहे. दानवे यांनी हे ट्विट फडणवीस व अजित पवारांनाही टॅग केले आहे.

सैनिकासोबतच त्यांच्या कुटुंबियांचा सन्मानाकरिता विधी सेवा चिकित्सालय केंद्र ठोस पाऊल-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे: सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मानासोबतच अचूक, वेळेवर आणि विनामूल्य कायदेशीर साहाय्य मिळणे आवश्यक असून विधी सेवा चिकित्सालय केंद्र त्याच दिशेने एक ठोस पाऊल आहे. प्रशासन, न्यायसंस्था आणि सामाजिक बांधिलकीचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नाल्सा वीर परिवार सहायता योजना २०२५’ आणि विधी सहाय्य केंद्राचे सैनिक कल्याण विभाग, घोरपडी, पुणे येथे सोमवारी (दि. 28) उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन, सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल (निवृत्त) दीपक थोंगे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील आदी उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले, सुमारे ५० टक्के नागरिकांना कायदे साहाय्य योजना आणि सरकारी योजनांची माहिती नसते. विशेषतः सैनिक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा यामध्ये समावेश आहे. हे विधी साहाय्य केंद्र म्हणजे त्यांच्यासाठी ऐतिहासिक सुवर्णसंधी आहे. आपले सैनिक कोणतीही परिस्थितीत माघार घेत नाही, ते सदैव देशाच्या रक्षणाकरिता उभे असतात, त्यांच्या राष्ट्रभक्तीचे ऋण फेडण्यासोबच त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे संरक्षण करणे हेच खऱ्या न्यायाचे स्वरूप आहे, असेही श्री. महाजन म्हणाले.

सोनल पाटील म्हणाल्या, आपल्या शूर जवानांनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यांच्या परिवारांना न्याय व सन्मान देणे ही आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे. एक सैनिक रणभूमीवर लढतो, पण त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाची लढाई न्यायासाठी सुरू होते, त्या लढाईत त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, असेही श्रीमती पाटील म्हणाले.

या केंद्राच्या माध्यमातून माजी सैनिक, वीरपत्नी, शहीद जवानांचे कुटुंबीय व लष्करातील कर्मचाऱ्यांना फौजदारी, दिवाणी, सेवा व पगार, निवृत्तीवेतन आदीसंबंधी कायदेशीर सल्ला, अपघात व विमा भरपाई प्रकरणांवरील मदत, जमीन व संपत्ती विवादांवर मार्गदर्शन, सरकारी योजनांविषयी माहिती व अर्ज प्रक्रियेत साहाय्य, मोफत वकील व समुपदेशन सेवा, वैध कागदपत्रांबाबत सल्ला, तक्रार नोंदणी व न्यायालयीन कार्यवाहीसाठी साहाय्य आदी सेवा पूर्णतः मोफत उपलब्ध असून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यातील वनपर्यटनात मोठ्या क्षमता; पर्यावरणपूरक पद्धतीने पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यात- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे: पुणे जिल्ह्यात वनक्षेत्रात अतुलनीय अशी पर्यटनस्थळे असून त्यांचा सर्वांगीण विकास केल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल. त्यादृष्टीने पुणे वनविभागांतर्गत राजगड तसेच अन्य किल्ले, जुन्नर वनविभागांतर्गत विविध घाट, धबधबे, डोंगर आदींच्या ठिकाणी पर्यटकांसाठी विविध सुविधा पर्यावरणपूरक पद्धतीने विकसित करण्याबाबत आराखडा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वनपर्यटन विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) जयश्री पवार, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई आदी उपस्थित होते.

राजगड पायथा येथे वनविभागाच्या कार्यक्षेत्रात विविध सुविधा निर्माण करण्यात याव्यात. त्या निर्माण करताना वनविभागाचे नियम, मानके लक्षात घ्याव्यात. स्थानिक दगड, माती, लाकूड आदींचा वापर करुन पर्यावरणपूरक विकास करावयाचा आहे. सीमेंट काँक्रेट किंवा अन्य बाबींचा वापर करण्यात येणार नाही. पर्यटक अधिकाधिक भेटी देतात अशी ठिकाणे निश्चित करुन त्या ठिकाणी दगडी बाकडे, शौचालये, आवश्यक त्या ठिकाणी दगडी पायऱ्यांचा वापर करुन लहान रस्ते, लाकडी बॅरिकेटिंग, रेलिंग आदी करावे. संबंधित ठिकाणांची महत्त्वाची माहिती पर्यटकांना मिळावी यासाठी सायनेजेस तयार करावेत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रात करावयाच्या कामांसाठी संबंधित विभागाची ना-हरकत घ्यावी. राजगड किल्ला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाल्यामुळे येथे विविध सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकेल, असेही ते म्हणाले.

या विविध ठिकाणी निर्माण करावयाच्या सुविधांच्या अनुषंगाने सल्लागार संस्थेच्यावतीने यावेळी सादरीकरण करण्यात आले.

उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी नानेघाट, दाऱ्याघाट, आंबोली, कांचन, काळू, धूरनळी धबधबे, दुर्गवाडी कोकणकडा, भिवेगाव खेड कुंड, कुंडेश्वर निसर्ग पर्यटन, शिंगेश्वर मंदीर टेकडी, भामचंद्र डोंगर, तुकाईमाता मंदीर, अरण्येश्वर मंदीर, शिरूर ऑक्सिजन पार्क या ठिकाणी करावयाच्या पर्यटक सुविधांच्या अनुषंगाने आराखडा सादर केला.

यावेळी इको टूरिझम क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. या सूचनांचा समावेश पर्यटन स्थळांचा विकास करताना केला जाईल, असे जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले.

पंतप्रधान मोदींवर आचारसंहिता कारवाई करण्यास निवडणूक आयोगाकडून टाळाटाळ, हाय कोर्टात दाद मागणार: पृथ्वीराज चव्हाण.

कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, इंदिराजी गांधी व बाळासाहेब ठाकरेंवर कारवाई मग मोदींवर कारवाई का नाही?

प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत ६६ टक्के नवे चेहरे, ४४ टक्के ओबीसी तर एससी-एसटी १९ टक्के: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. ३० जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचे आयोगाने मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली पण मोदींवर कारवाई केलेली नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली होती. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही मग नरेंद्र मोदींवर आयोग कारवाई का करत नाही असा प्रश्न विचारूरन याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.या वेळी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, अनंत गाडगीळ आदी उपस्थित होते.

यासंदर्भात टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, दि. २८ डिसेंबर २०२० रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन रेल्वे मंत्री, कृषी मंत्री यांनी सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमार या किसान रेल्वेच्या १०० व्या गाडीचा शुभारंभ केला. यावेळी महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका व पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु होत्या. हा कार्यक्रम देशभर टीव्हीवर प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासन यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. याविषयी प्रफुल्ल कदम या कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असता सुरुवातीला वेळकाढूपणा करण्यात आला पण शेवटी आचारसंहिता भंग झाल्याचे मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज देण्यात आली. या प्रकरणी सरळ सरळ कायदा धाब्यावर बसवण्यात आलेला आहे हे स्पष्ट दिसत असतानाही नरेंद्र मोदी यांच्यावर कारवाई केली जात नाही, असे चव्हाण म्हणाले.

या प्रकरणी तक्रार करणारे प्रफुल्ल कदम यांनी आचारसंहिता भंग कशी झाली याची माहिती सर्व नियम व कायद्यानुसार दिली. निवडणूक काळात मतदारांवर प्रभाव पाडण्याचा हा प्रयत्न असून आदर्श आचारसंहितेचा उघड भंग केलेला असल्याने नरेंद्र मोदी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर..
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत ३३ टक्के ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत तर ६६ टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. ४१ टक्के ओबीसी, १९ टक्के एससी एसटी तर ३३ महिलांना संधी देण्यात आली आहे. कार्यकारिणीत भौगोलिक व सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

वादग्रस्त मंत्र्यांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, विधानसभेत मंत्री चक्क पत्ते खेळत आहेत तर बाहेर WWF सुरु आहे. गृहराज्य मंत्र्यांचे कुटुंब डान्सबार चालवते पण सरकारला त्याचे काही गांभीर्य नाही. या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत यासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने सभागृहात व रस्त्यावरही आंदोलन करून आवाज उठवला आहे. पण गेंड्याच्या कातडीपेक्षाही सरकारची कातडी जाड आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा नैतिकतेच्या आधारे घेतला नाही तर विरोधी पक्षांचा व समाजाचा दबाव वाढल्याने घ्यावा लागला आहे. इतर कलंकित मंत्र्यांचेही राजीनामे घ्यावेत ही काँग्रेसची मागणी आहे.

खा. प्रणिती शिंदे यांच्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, त्यांनी ऑपरेशन सिंदूर वा सैनिकांचा अपमान केलेला नाही, त्यांच्या विधानाचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावला आहे. सैनिकांच्या पराक्रमाचा आम्हाला अभिमानच आहे पण त्याचे श्रेय लाटण्यासाठी भाजपाने मोदींचे लष्करी गणवेशातील होर्डींग देशभर लावले. भाजपा नेत्यांने एका महिला अधिकाऱ्यांवर अत्यंत खालच्या पातळीवर वक्तव्य केले यासंदर्भात प्रणिती शिंदे यांचे विधान होते असे सपकाळ म्हणाले..

ऑपरेशन सिंदूर संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट उत्तर दिलेले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम केल्याचे ३० वेळा सांगितले त्यावर मोदी गप्प आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान ते खोडून का काढत नाहीत. मोदी खोटे बोलत आहेत, का ट्रम्प हे स्पष्ट झाले पाहिजे. तसेच केंद्रातील भाजपा सरकारने शिमला करार रद्द केला आहे का आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केलेल्या विधानावर मोदी सरकारने खुलासा केला पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले..

अतिरेकी कसाबसंदर्भात उज्ज्वल निकम यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कसाबला कायद्याने, न्यायालयीन प्रक्रियेनुसार फाशीची शिक्षा दिलेली आहे. ही फाशीची शिक्षा काँग्रेस सरकार असताना दिलेली आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम यांच्या वक्तव्यात काहीही अर्थ नाही, भाजपाने त्यांना राज्यसभा सदस्यत्व दिले आहे त्यामुळे ते काहीतरी बोलत आहेत असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले..

पौर्णिमेचा फेरा’ वेबसिरीजचा दुसरा सिझन प्रदर्शित

शुभम प्रोडक्शन फिल्म्स प्रस्तुत आणि पायल गणेश कदम निर्मित ‘पौर्णिमेचा फेरा सिझन १’ ह्या वेबसिरिजला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे आणि प्रोत्साहनामुळे ‘पौर्णिमेचा फेरा सिझन २ ’ शुभम प्रोडक्शन चॅनलवर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘पौर्णिमेचा फेरा सिझन २’ देखील सिझन १ इतकाच हॉरर आणि चित्तथरारक आहे.ही एक वेगळ्या धाटणीची दर्जेदार हॉरर कॉमेडी मराठी वेब सिरीज आहे.

मराठीत हॉरर-कॉमेडी पठडीतला सिनेमा किंवा वेब सिरीज फार क्वचितच बघायला मिळतात. कोकणातले निसर्गसौंदर्य यासोबत हॉरर, कॉमेडी आणि रहस्याचे मिश्रण असलेली ही वेब सिरीज प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यास यशस्वी ठरते. आपण जो विचार करतो त्या पलीकडे जाऊन आपल्या आजूबाजूला घटना घडत असतात. अनाकलनीय आणि भीतीदायक वाटणाऱ्या या घटनांमागचं नेमकं रहस्य काय आहे याचा उलगडा करत जाणारी ही एक रंजनीय वेब सिरीज आहे. एक चांगलं कथानक आणि त्याभोवती गुंफलेली गुंतवून ठेवणारी पटकथा ही या वेब सिरीजची जमेची बाजू आहे; जी तुम्हाला नक्कीच आवडेल.

अवधूत, संकेत आणि अमेय या तीन मित्रांभोवती फिरणारं हे कथानक आहे. मैत्रीसाठी कोणत्याही संकटाशी भिडायला तयार होणारे मित्र आपल्याला यात बघायला मिळतात. तिघेही अमेयच्या गावी कोकणात जातात. तिकडे गेल्यावर अवधूतसोबत अशा काही रहस्यमयी घटना घडायला लागतात ज्या सामान्य आयुष्यात घडणं शक्य नाही. आणि त्या मागचं गूढ नेमकं काय आहे ते संकेत आणि अमेयला उलगडत नाही. पण या घटनांमधून त्यांचा फायदाही होत आहे. त्या फायद्यामुळे निर्माण झालेले लालच, अमानवी शक्ती, त्यामुळे निर्माण झालेले संकट आणि त्या संकटातून कधी मुक्तता मिळेल कि नाही ? या सगळ्या गोष्टी यात व्यवस्थित मांडण्यात आल्या आहेत.

थरार, उत्कंठा, शोध या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरीत प्रश्नांचा शोध घेणारी ‘पौर्णिमेचा फेरा’ ही मराठी वेब सिरीज ‘शुभम प्रोडक्शन फिल्म्स’ या चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आली आहे. हास्यजत्रा कार्यक्रमातले विनोदवीर निखील बने आणि मंदार मांडवकर आपल्याला या वेब सिरीजमध्ये वेगळ्याच भूमिकेत पहायला मिळतात. त्यांना सिद्धेश नागवेकर या नव्या दमाच्या कलाकारासोबत, संदीप रेडकर, दीपा माळकर, प्राची केळुस्कर, निकिता बंदावणे, चंदन जमदाडे, संजय वैद्य, स्नेहल आयरे या सगळ्यांची साथ लाभली आहे. सगळ्या कलाकारांनी त्यांच्या भूमिका चांगल्या केल्या आहेत. ही वेब सिरीज बघताना प्रत्येकजण त्या त्या भूमिकेत चपखल बसलेला असल्याचं जाणवतं.

ह्या वेब सिरीजचे दिग्दर्शन अजय सरतापे यांनी केले असून त्याचे छायाचित्रण कुणाल महादेव परडकर ह्यांनी केले आहे. दिग्दर्शन, छायाचित्रण या कथेचा रॉनेसपणा जपत उत्कंठा निर्माण करण्यात यशस्वी झालेले आहेत. जितकं उत्तम दिग्दर्शन ह्या सिरीजला लाभलं आहे तितकच उत्तम लेखण देखील ह्या सिरीजला लाभलं आहे. ह्या वेब सिरीजची कथा शुभम विलास कदम याने लिहिली असून ह्या सिरीजचे संवाद व लेखन संदेश लोकेगावकर यांनी केले आहे. हॉरर म्हटलं कि सगळ्यात महत्वाचं असतं ते पार्श्वसंगीत. या वेब सिरीजचं पार्श्वसंगीत अगदी पूरक आहे. ते योग्य त्या ठिकाणी त्या सीनच्या गरजेनुसार भेदक वातावरण तयार करतं आणि ह्याचं सर्व यश अनिरुद्ध निमकर ज्यांनी ह्या सिरीज ला पार्श्वसंगीत दिलं त्यांना जातं.

एकंदरीत कोकणात घडणारी ‘पौर्णिमेचा फेरा’ ही हॉरर कॉमेडी वेब सिरीज तुमचं मनोरंजन नक्कीच करते. याचे दोन्ही सिझन तुम्हाला खिळवून ठेवतात. त्यामुळे ‘शुभम प्रोडक्शन फिल्म्स’ या चॅनेलवर यापुढेही अशाच वेगवेगळ्या धाटणीच्या वेब सिरीज बघायला मिळतील अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही. ज्यांना हॉरर-कॉमेडी आवडते त्यांनी ही सिरीज नक्कीच पहावी.

Link – https://youtu.be/YDUcYpH7mK4?si=5zeiGRKM4IgTyL7B

शिक्षण हेच ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना साध्य होण्याचे साधन – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सन्मान

पुणे, दि. ३०: संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे अर्थात ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना केवळ शिक्षणातून साध्य होऊ शकते. पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक सुहृदयी उपक्रम म्हणून सुरू केलेली ही मोहीम आज एक चैतन्यशील, बहु-विद्याशाखीय शैक्षणिक परिसंस्थेत रूपांतरित झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

सिम्बायोसिस विश्वभवन येथे सिम्बायोसिस आंतराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलपती पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने आयोजित केलेल्या डॉ. एस. बी. मुजुमदार यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, श्रीमती संजीवनी मुजुमदार, सकाळ मीडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. मुजुमदार यांना ९० व्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन करुन शतायुषी व्हावे अशा शुभेच्छा देत राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, सिम्बायोसिस ही संस्था भारत आणि परदेशातील हजारो तरुण मनांना सक्षम बनवत आहे. शिक्षण हे केवळ मनाला प्रकाशित करण्याचे साधन नाही तर शिक्षणाने सहानुभूती, एकता आणि शांती देखील मनामध्ये रुजवली पाहिजे हा डॉ. मुजुमदार यांचा दृढ विश्वास आहे.

पद्मभूषण डॉ. मुजुमदार यांच्या सत्काराचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सकाळ मीडिया समुहाचे अभिनंदन करून राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, ‘सकाळ’ वृत्तपत्राची स्थापना ९३ वर्षांपूर्वी स्वर्गीय नानासाहेब परुळेकर यांनी केली होती. प्रतापराव पवार आणि आता अभिजीत पवार यांनी दूरदृष्टी आणि समर्पणाने वृत्तपत्राचा समृद्ध वारसा पुढे नेला आहे. संस्था नफ्यासाठी नव्हे तर उद्देशाने बांधल्या जातात तेव्हा दृष्टी वचनबद्धतेशी जुळते तेव्हा काय होते याची सिम्बायोसिस आणि सकाळ दोन्ही आदर्श उदाहरणे आहेत, असेही ते म्हणाले.

गेल्या पाच दशकांमध्ये, सिम्बायोसिसने एक मोठी प्रतिष्ठा मिळविली केली आहे. डॉ. मुजुमदार आणि श्रीमती संजीवनी मुजुमदार यांनी शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या जगातील 85 हून अधिक देशांमधील विद्यार्थ्यांसाठी आपल्या विद्यापीठाच्या रुपाने एक घर निर्माण केले आहे. त्यांनी महाराष्ट्राला आणि विशेषतः पुणे शहराला देशातील उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून ओळख मिळवून दिली आहे.

शिक्षण हे आपले चरित्र निर्माण करते, त्याला चांगला आकार देते. मनुष्याला यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक आहे. तुम्ही तुमच्यातील प्रतिभेचा शोध घेतला पाहिजे. तुमची प्रतिभा तुमच्यासाठी आणि समाजासाठी, जगासाठी उपयुक्त असली पाहिजे आणि त्याप्रमाणे तिचा वापर केला पाहिजे. संपूर्ण जग आज खुले असून अनेक लक्ष विचलित करणाऱ्या बाबी आहेत. परंतु, त्यातून काय निवडायचे आणि पुढे जायचे हे आपल्यावर अवलंबून आहे, असेही ते म्हणाले.

प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे. मात्र, इतरांच्या भाषेचाही द्वेष होऊ नये. प्रत्येक विद्यापीठात इंग्रजीव्यतिरिक्त इतर कोणत्याही एका विदेशी भाषेचे शिक्षण दिले जावे यासाठी सर्व विद्यापीठांचा कुलपती म्हणून आपली भूमिका असल्याचेही ते म्हणाले.

खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, डॉ. मुजुमदार यांनी केवळ भारतातील आणि विदेशातील विद्यार्थ्यांनाच शिकवले नाही तर देशातील बहुजन समाजाला शिक्षित करण्यासाठी प्रयत्न केले. शिक्षण हे प्रत्येक प्रकारच्या विकासाचा पाया आहे ही राजर्षी शाहू महाराज यांची भूमिका होती. त्यांच्या विचारांनुसार डॉ. मुजुमदार यांनी काम केले.

डॉ. मुजुमदार यांचा ९० वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थ्यांचा सन्मान आहे. सिम्बायोसिस विद्यापीठ हे विचारांचे विद्यालय आहे. युरोपातील प्रगत देशात शिक्षणासाठी जाणे परवडत नाही अशा परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या रुपाने मदत करुन ते एक प्रकारे जगाची मदत करत आहेत, असेही श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले.

सन्मानाला उत्तर देताना डॉ. मुजुमदार म्हणाले, एका परदेशी विद्यार्थ्याचे दु:ख पाहून आपल्याला आयुष्याचे प्रयोजन समजले. त्यातून आणि परदेशी विद्यार्थी तसेच भारतीय विद्यार्थी यांच्यात मैत्री व्हावी, सलोखा निर्माण व्हावा आणि त्याद्वारे जागतिक शांततेचा मार्ग तयार व्हावा या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना केली. आज जगात मोठ्या प्रमाणात अशांतता आहे. युद्धाशिवायचे जग हवे असेल तर ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेला पर्याय नाही. ही संकल्पना भारतीय आहे याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.

शिक्षण म्हणजे केवळ परीक्षा, त्यातील गुण, पदवी इतकेच नाही तर जबाबदार नागरिक घडविण्याचे साधन आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आपण जागतिक नागरिक झालो पाहिजे. असे झाल्यास कोणीही विदेशी नागरिक राहणार नाही, असेही ते म्हणाले.

अभिजित पवार म्हणाले, विद्यार्थ्याला झालेला त्रास पाहून ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेनुसार डॉ. मुजुमदार यांनी या विद्यापीठाची स्थापना केली. जगातील 2 लाख विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. भौतिक, अध्यात्मिक, संतुलित जीवन कसे जगायचे हे डॉ. मुजुमदार यांच्याकडून शिकले पाहिजे. ज्ञानी ते ज्ञानयोगी असा त्यांचा प्रवास आहे. ज्ञानाची विद्यापीठे ही ज्ञानाची मंदिरे झाली पाहिजेत, असेही श्री. पवार म्हणाले.

यावेळी श्री. फडणीस यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी डॉ. मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळमार्फत तयार करण्यात आलेल्या ‘ज्ञानपर्व’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी सिम्बायोसिस विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, सकाळ मीडिया ग्रुपचे संपादक अनिकेत काणे, विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

भीक मागण्यासाठी पुण्यातून दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण: तुळजापूरातून 5 जणांना अटक

पुणे- कात्रज भागातील एका दोन वर्षांच्या मुलीचे भीक मागण्यासाठी अपहरण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अपहरण करणाऱ्या या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत अटक केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून या चिमुकलीची सुखरूप सुटका देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून, यात एका महिलेचा देखील समावेश आहे.

सुनील सीताराम भोसले (51), शंकर उजण्या पवार (50), शालुबाई प्रकाश काळे (45), गणेश बाबू पवार (35), मंगल हरफुल काळे (19), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी तुळजापूर येथील मोतीझारा इथले रहिवासी आहेत. धनसिंग हनुमंत काळे (25) यांच्या फिर्यादिवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

फिर्यादी धनसिंग हनुमंत काळे हे आपल्या कुटुंबासह कात्रज येथील वंडर सिटी परिसरातील झोपडी वजा घरात राहतात. त्यांना चार अपत्य असून त्यात दोन वर्षाच्या जुळ्या मुली आहेत. 25 जुलैच्या रात्रीच्या सुमारास संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना, यातील दोन वर्षांच्या चिमूकलीला झोपाळ्यातून उचलून अपहरण करण्यात आले. मध्यरात्री जंग आल्यावर हनुमंत यांच्या ही बाब लक्षात आली व तातडीने त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाणे गाठले व अपहरणाची तक्रार दाखल केली.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत चिमुकलीच्या शोधासाठी तातडीने पाठक पाठवण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनात दोन तपास पथके तयार करण्यात आली. याशिवाय गुन्हे शाखेने स्वतंत्र तपासपथक कार्यरत केले. तपास करताना वंडर सिटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात तीन जण एका दुचाकीवर मुलीसह जाताना दिसून आले. कात्रज ते रेल्वे स्थानक परिसरातील जवळपास 140 सीसीटीव्ही तपासले, त्यात रेल्वे स्थानकावरील फुटेजमध्ये आणखी दोन आरोपी असल्याचे दिसून आले.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास पथक तुळजापूरला रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने सुरुवातील तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून अपहरण झालेल्या चिमुकलीची सुखरूप सुटका करण्यात आली. तसेच पुढील चौकशी करत उर्वरित दोन आरोपींना देखील अटक करण्यात आली. या आरोपींची कसून चौकशी केली असता, भीक मागण्यासाठीच आपण अपहरण केल्याची कबुली दिली. या पाचही आरोपींना पुण्यात आणून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 2 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रात्रीतून वाईन शॉप फोडण्याच्या प्रकारात वाढ, बिबवेवाडीतील वाईन शॉप फोडून ७ लाखाची चोरी

पुणे- महायुती सरकारने दारूच्या करात भरमसाठ वाढ केल्यानंतर एकीकडे परमिट रूम चा धंदा मंदीत येत असताना वाईनशॉप देखील अडचणीत येऊ लागले आहेत . वाईन शॉप फोडून चोऱ्या करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. बिबवेवाडी कोठारी ब्लॉक अनंत सोसायटी शॉप नं ५ मधील क्रिस्टल वाईन शॉप फोडून चोरट्यांनी दुकानातील ५१,०००/-रु. कि.च्या वेगवेगळ्या कंपनीच्या दारुच्या बॉटल बरोबर दुकानातील इलेक्ट्रीक लॉकर व लाकडी टेबलच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेली रोख रक्कम ६,५८,००० रुपयांची रोकड पळवून नेली आहे. वाईन शॉपचे दुकानाचे शटर कुलुप लावुन बंद असताना, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे दुकानाचे लोखंडी ग्रीलचा कोयडा व आतील लोखंडी शटरचे कुलुप कशाचे तरी सहाय्याने उचकटुन, त्यावाटे आंत प्रवेश करून हि चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले . फौजदार ज्ञानेश्वर दळवी मो नं ९२८४१०११८३ हे या प्रकरणी तपास करत आहेत.

महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल करू- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे,: क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना देण्यात येणाऱ्या प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित क्रीडा पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाहक डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाहक प्रा. निवेदिता एकबोटे, सचिव प्रा. शामाकांत देशमुख, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, डॉ.विक्रम फाले, प्रा. दिपक कुटे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, खेळाडू, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.

आयुष्यात यश मिळविण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती ठेवून ध्येयाने प्रेरित होत वाटचाल करा असा सल्ला विद्यार्थ्यांना देऊन मंत्री श्री. भरणे यावेळी म्हणाले, नेहमी धाडस करून नवनवीन वाटा शोधल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करावे. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीची आदरपूर्वक सेवा करावी. आयुष्यात मोठ्यामोठ्या संधी उपलब्ध होतात, त्या संधीचे सोने करा. अहंकार बाजूला जीवनात नेहमी आनंदी रहा, असेही मार्गदर्शन त्यांनी केले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीत नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर राहिला आहे. त्यामुळे या संस्थेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी कुतुहल राहिले आहे, असेही श्री. भरणे म्हणाले.

श्री. जाधव म्हणाले, खेळामुळे खेळाडूंच्या अंगी संघर्ष करण्याची स्वयंशिस्त लागते. खेळाडूंकरिता प्रामाणिकपणा, संयम, आत्मविश्वास महत्वाचा आहे. खेळात निराश होऊ नका, नेहमी मोठी स्वप्ने पाहा, संधीचे सोने करा, कष्ट करत राहा, एक दिवस निश्चित यश मिळेल, असेही ते म्हणाले.

क्रीडा क्षेत्राला योगदान देण्याकरिता महाविद्यालयात खेळाडू कोट्याकरिता आरक्षित जागेवरच खेळाडूंना प्रवेश मिळावा, जागा रिक्त राहणार नाही याकरीता नियमात बदल होणे आवश्यक आहे. शालेय जीवनापासून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिल्यास राज्य, देशाचे नाव उज्ज्वल होण्यास मदत होईल, अशी सूचना करून आगामी काळात खेळाडूंच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच काम करीत राहील, असेही श्री. जाधव म्हणाले.

डॉ. एकबोटे म्हणाले, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याच्यादृष्टीने नेहमीच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन आहे. दिवसेंदिवस क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे.

क्रीडापटू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. या क्षेत्रातही रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. संस्थेला स्वायत्त संस्थेचा दर्जा असून क्रीडा क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवून भरीव योगदान देण्याकरिता संस्थेने प्रयत्नशील रहावे, असेही डॉ. एकबोटे म्हणाले.

डॉ. निवेदिता एकबोटे म्हणाल्या, महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्याअंगी असलेल्या कला, क्रीडा, सांस्कृतिक गुणांना वाव प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षणासोबतच क्रीडा, कलाविषयक आदी स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या स्पर्धेच्यामाध्यमातून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्याकरिता संस्था नेहमीच प्रयत्नशील आहे, असे डॉ. एकबोटे म्हणाल्या.

यावेळी डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी विचार व्यक्त केले.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले

अमेरिकन मराठी प्रेक्षकांनी घेतला मराठी चित्रपटांचा मनमुराद आनंद

सॅन होजे,(प्रतिनिधी) : संपूर्ण अमेरिका आणि कॅनडा मधील मराठी रसिकांच्या तुडुंब प्रतिसादामुळे ‘नाफा फिल्म फेस्टीव्हल २०२५ कमालीचा यशस्वी झाला. अडीच हजारांहून अधिक प्रेक्षक ‘द कॅलिफोर्निया थिएटर’ मध्ये या महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित होते. तीन दिवसांच्या या महोत्सवामुळे मनोरंजनाची दिवाळी साजरी झाल्याची प्रतिक्रिया या महोत्सवाचे आयोजक, नाफाचे संस्थापक – अध्यक्ष अभिजीत घोलप यांनी व्यक्त केले.

पहिल्या दिवशी भव्य ग्लॅमरस रेड कार्पेटच्या साथीने फिल्म अवार्ड नाईट रंगली. महाराष्ट्रातून आलेल्या कलावंतांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आणि त्यासोबत अत्यंत मानाचा “नाफा जीवन गौरव” पुरस्कार जेष्ठ अभिनेते अमोल पालकरांना देण्यात आला. दुसऱ्या दिवशी मुख्य चित्रपट महोत्सव सुरु झाला तो अभिनेते सचिन खेडेकर यांच्या वैशिट्यपूर्ण भाषणाने. त्यांचं हे भाषण विशेष गाजलं. मराठी चित्रपटसृष्टीची सध्याची अवस्था अशी का आहे? मराठी चित्रपटांबद्दल का ओरड सुरु आहे? मराठी चित्रपट चालत नाहीत याला कोण जबाबदार आहे, अशा प्रश्नांचा वेध घेताना त्यांनी रोखठोक मतं परखडपणे मांडली. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपट न चालण्याची कारणं त्यांनी आकडेवारीसह मांडली. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ‘नाफा’ सारखी संस्था कसा पुढाकार घेऊ शकते, नेमकं काय काम होणं गरजेचं आहे, याबद्दलही ते सविस्तर बोलले.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘स्नोफ्लॉवर’ या चित्रपटांचं स्क्रिनिंग आणि त्यासोबतच ‘नाफा’ची निर्मिती असलेल्या तीन शॉर्टफिल्म्सही दाखवण्यात आल्या.  सोबत सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी आणि वैदेही परशुरामी यांच्यासाठी खास ‘मीट अँड ग्रीट’ आयोजित करण्यात आलं होतं, ज्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वर्कशॉप्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना आणि कलाकारांना थेट संवादाची संधी मिळाली. अश्विनी भावे, अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित सत्रं घेतली, तर प्रसाद फणसे आणि रोहन फणसे यांनी डबिंगसंदर्भात खास वर्कशॉप घेतलं, जे सहभागींसाठी अतिशय माहितीपूर्ण ठरलं. विशेष म्हणजे अमोल पालेकर यांचं आत्मचरित्र ‘ऐवज’आणि त्याचं इंग्रजी भाषांतर ‘Viewfinder’ यांचं अमेरिकेतील प्रकाशन नाफाच्या मंचावर पार पडलं. प्रकाशनानंतर विक्रम वाटवे यांनी अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीसाठी अमेरिकेचा क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकर खास उपस्थित होता.

‘नाफा फिल्म फेस्टिव्हल’च्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात झाली एका खास सन्मानाने, अमेरिकेच्या संसदेने ‘नाफा’ला दिलेलं मानपत्र, श्री ठाणेदार यांनी ‘नाफा’च्या मंचावर अभिजीत घोलप यांना प्रदान केलं. यानंतर तीन नव्या शॉर्टफिल्म्सचं स्क्रीनिंग पार पडलं आणि आदल्या दिवशी दाखवलेल्या तीन शॉर्टफिल्म्सचे दिग्दर्शक श्रीमिरजकर (योगायोग), हर्ष महाडेश्वर(सबमिशन), संदीप करंजकर(द गर्ल विथ रेड हॅट) यांच्यासोबत डॉ. गौरी घोलप यांनी संवाद साधला. त्यानंतर बेस्ट शॉर्टफिल्म(डम्पयार्ड), दुर्वा नांदापूरकर(बेस्ट स्क्रीन प्ले – भंगी), भूषण पाल( बेस्ट सिनेमॅटोग्राफी – डम्पयार्ड) रुचिर कुलकर्णी( बेस्ट एडिटिंग – चेंजिंग रूम), प्रफुल्ला खारकर (विशेष उल्लेखनीय – बिर्याणी), गार्गी खोडे(विशेष उल्लेखनीय – सबमिशन) या स्टुडंट सपोर्टींग विभागातील  शॉर्ट फिल्म्सना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

त्यानंतर अनिल भालेराव दिग्दर्शित छबिला आणि निखिल महाजन दिग्दर्शित ‘रावसाहेब’ या चित्रपटाचं स्क्रीनिंग झालं. सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी, सचिन खेडेकर, डॉ. मोहन आगाशे यांच्या मास्टर क्लासेसला रसिक प्रेक्षकांनी सखोल दाद दिली. यानंतर झालेल्या पॅनल डिस्कशनमध्ये मराठी सिनेमा – वर्तमान, भवितव्य आणि वाटचाल या विषयावर मधुर भांडारकर, अवधूत गुप्ते, डॉ. मोहन आगाशे, गजेंद्र अहिरे, स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी , आदिनाथ कोठारे यांनी आपली मतं मांडली या पॅनल डिस्कशनचे सूत्रसंचालन वैदेही परशुरामी हिने केले. क्लोजिंग सेरेमनीच्यावेळी नाफा अध्यक्ष अभिजीत घोलप, अर्चना सराफ, रिया ठोसर, अनुप निमकर, लक्ष्मण आपटे, वृषाली मालपेकर, मानसी देवळेकर आणि इतर सर्व नाफा सदस्यांनी प्रेक्षकांशी हितगुज केले. अभिजीत घोलप यांनी पुढील वर्षीच्या नाफामध्ये काय नवं असेल, कोणते नवे देश गाठायचे आहेत, आणि या उपक्रमाचं पुढचं पाऊल काय असावं, याविषयी माहिती दिली.