Home Blog Page 188

पद्मश्री डॉ. शंकर महादेवन यांनी गायलेले “बाप्पा मोरया” गाणं प्रकाशित 

राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि युवा उद्योजक श्री पुनीतदादा बालन यांच्या हस्ते प्रकाशित

पुणे-पद्मश्री डॉ. शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड झालेलं “बाप्पा मोरया” हे गाणं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं.

या गाण्याची निर्मिती अमोल घोडके आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी केली असून, हे गाणं संपूर्ण महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी एक भक्तिपूर्ण सांस्कृतिक भेट ठरेल.

या गाण्याच्या माध्यमातून हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची परंपरा जपणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांचा जयघोष करण्यात आला आहे. पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक संगीताचा संगम साधणाऱ्या या गीतात गणेशोत्सवाचे वैभव प्रभावीपणे उभं राहिलं आहे.

“बाप्पा मोरया” या गाण्याला शंकर महादेवन यांचा सुमधुर स्वर लाभला असून, गीताचे बोल आणि संगीत शैलेश चंद्र लोखंडे यांनी लिहिले आणि संगीतबद्ध केले आहेत. संगीत संयोजन अवी लोहार यांनी केले असून, रिदम नागेश भोसेकर आणि नितीन शिंदे यांनी केले आहे. गाण्याला भक्तिरसात रंगवण्यासाठी अभिषेक शिंदे, रविराज काळे, समिहान सहस्त्रबुद्धे आणि मनोहर नारवडे यांनी कोरस गायनातून योगदान दिले असून या गीताचे मिक्सिंग अजिंक्य ढापरे यांनी केले आहे.

गाण्याच्या प्रकाशनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुनीत बालन यांनी “बाप्पा मोरया” या गीताला शुभेच्छा दिल्या.

दादा जे. पी. वासवानी यांची १०७ वी जयंती – ‘जागतिक क्षमादिन’ म्हणून साजरी

पुणे-

२ ऑगस्ट २०२५ रोजी पूज्य दादा जे. पी. वासवानी यांची १०७ वी जयंती जगभरात ‘जागतिक क्षमादिन’ म्हणून साजरी करण्यात आली. यंदाच्या वर्षीचा संदेश होता — “सोडून द्या… आणि मोकळं व्हा!”

दादा जे. पी. वासवानी यांनी क्षमाशक्तीच्या रूपांतरकारी सामर्थ्याचा जोरकस प्रचार केला. ते कायम सांगायचे, “क्षमा ही अंतःशांती आणि आत्मिक आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.” त्यांच्या या शिकवणुकीच्या प्रेरणेने दरवर्षी २ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक क्षमादिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दुपारी २ वाजता ‘मोमेंट ऑफ कॅाल्म’ — म्हणजेच ‘शांततेचा क्षण’ पाळला जातो, जो क्षमेला समर्पित असतो.

‘लेट-इट-गो’ बॉक्सचा उद्घाटन नुकतेच साधु वासवानी मिशनच्या प्रमुख दिदी कृष्णा कुमारी यांच्या हस्ते झाले. दादांच्या शिकवणुकीतून प्रेरित होऊन तयार केलेला हा बॉक्स एक प्रतीकात्मक साधन आहे — जे लोकांना त्यांच्या राग, दुःख, भीती यांसारख्या नकारात्मक भावना लिहून त्यात टाकण्यास प्रोत्साहित करतो, जेणेकरून त्या भावना अंतःकरणातून मुक्त होतील. हा उपक्रम हे शिकवतो की अशा नकारात्मक भावनांना दडपणं नव्हे, तर त्यांना पूर्णतः सोडून देणं आवश्यक आहे — ज्यातून मानसिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्य प्राप्त करता येतं. असे ४५० हून अधिक बॉक्सेस जगभरातील विविध शहरांमध्ये ठेवण्यात आले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

भोपाळच्या कविता यांनी सांगितले की, क्षमा ही रोजच्या सवयीचा भाग बनवल्यामुळे त्यांचे जीवनच पालटले. पूर्वी मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्या भोगत असलेल्या कविता आता अधिक हलकं, शांत आणि अनेक व्याधींपासून मुक्त वाटतात.

या उपक्रमात लायन्स क्लब, मास्टरकार्ड आणि वीवर्क यांसारख्या नामांकित कॉर्पोरेट संस्थांनी सहभाग घेतला. परमार्थ निकेतन, ब्रह्माकुमारीज आणि श्रीमद् राजचंद्र मिशन यांसारख्या आध्यात्मिक संस्थांनी देखील ‘मोमेंट ऑफ कॅाल्म’ पाळून सहभाग दर्शवला. भारतभरातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक ‘लेट-इट-गो’ बॉक्सच्या उपयुक्ततेचे कौतुक करत आहेत. सिंगापूर, बार्सिलोना, लॉस एंजेलिस आणि हाँगकाँग येथील साधु वासवानी केंद्रांनीही हे अभियान राबवलं.

२६ जुलै रोजी दिल्ली, न्यू यॉर्क, पुणे, मुंबई, बेंगळुरू, सिंगापूर, टेनेरिफ (स्पेन) आणि लंडन यांसारख्या शहरांमध्ये वॉकाथॉनसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर येथे “फोर्गिव्ह. रिलीझ. राईझ फ्री.” या शीर्षकाचा विशेष कार्यक्रम पार पडला, ज्याने जागतिक पातळीवर लक्ष वेधून घेतलं.

घराघरांत, कार्यालयांत, मंदिरे आणि वर्गखोल्यांत — सर्वत्र लोकांनी जुने राग, दुःख आणि भावनिक ओझं सोडून देण्यासाठी या उपक्रमात भाग घेतला.

पुणे येथील मिशनच्या मुख्यालयात तीन दिवसांचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये सत्संग, भजन, कीर्तन व दादा वासवानी यांचे प्रवचन सादर करण्यात आले. दिदी कृष्णा यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की, आपल्या त्रुटी लपवण्यात काहीही उपयोग नाही. प्रत्येकाने त्या गुरूंच्या चरणी कबूल करून क्षमा आणि आशीर्वाद मागावा, असे त्यांनी आवाहन केले.

मिशनच्या विविध संस्थांमार्फत अनेक व्यापक सेवा उपक्रमही राबवण्यात आले.

क्षमेबद्दल बोलताना दिदी म्हणाल्या, “क्षमेच्या वृत्तीइतका सद्गुणांचा विकास करणारा दुसरा कोणताही मार्ग नाही.”

‘मोमेंट ऑफ कॅाल्म’ ही मोहीम दरवर्षी नव्या लोकांपर्यंत पोहोचत आहे, कारण अधिकाधिक लोकांना समजत आहे की ‘लेट गो’ केल्यामुळे मिळणारी भावनिक आणि आध्यात्मिक मुक्तता किती अमूल्य आहे.

दादा जे. पी. वासवानी हे भारताचे प्रख्यात संत, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि मानवतावादी होते — ज्यांना संपूर्ण जगात प्रेमाचा प्रेषित म्हणून ओळखलं जातं. विज्ञान विषयात उच्च शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य प्रेम, करुणा आणि आध्यात्मिक शहाणपणाच्या सेवेत अर्पण केलं.

एकदा एका विद्यार्थ्याने त्यांना विचारलं, “माझा मित्र वारंवार तीच चूक करतो, मी काय करावं?” त्यावर दादा हसून म्हणाले, “तो चुकत राहो, तू क्षमा करत राहा!” दादा कायम सांगायचे, “क्षमा करत राहा! ज्या प्रमाणात तुम्हाला देवाने क्षमा करावी असं वाटतं, त्याच प्रमाणात तुम्हीही इतरांना क्षमा करायला हवी.”

संविधानाशी सुसंगत बाबासाहेब शिंदे यांचे कार्य : डॉ. श्रीपाल सबनीस

सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सत्कार

पुणे : भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानवकेंद्रीत आहेत. माणूसपण आणि सेवेतून समर्पण या भावनेतून बाबासाहेब शिंदे संविधानाशी सुसंगत भूमिका घेऊन समाजकार्य करीत आहेत, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.

मनोहर कोलते मैत्र संघ, पुणे, नवरत्न ओल्ड एज होम आणि स्नेहछाया परिवार बालकाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 3) महावितरणमधील प्रधान यंत्रचालक बाबासाहेब शिंदे यांचा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महावितरण मानव संसाधन विभागाचे संचालक राजेंद्र पवार, मनोहर कोलते, आर. टी. देवकांत, अनिता राकडे, दत्तात्रय इंगळे मंचावर होते. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जगत्‌‍गुरू संत तुकाराम महाराज यांची पगडी, शाल देऊन शिंदे यांचा गौरव करण्यात आला.

डॉ. सबनीस पुढे म्हणाले, शिंदे यांची भूमिका संघर्षाची असली तरी विचार संवादी आहेत. संवेदनेमुळे बोलण्यात आलेले कौशल्य अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले आहे. त्यांच्या सेवाकार्याची साक्ष अनेक उदाहरणांमधून दिसून येत आहे.

राजेंद्र पवार म्हणाले, शिंदे यांनी मैत्रीभाव जपत सहकारी, मित्रांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्यातील विनम्रता हा सहकारी आणि मित्रांमधील खरा दुवा आहे.

पुस्तकांची उपयुक्तता लक्षात घेऊन ज्या शाळांमध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले अशा शाळांना, नवरत्न वृद्धाश्रम, स्नेहछाया बालकाश्रमास पुस्तके भेद दिली. वाचनातून मनुष्य घडत जातो त्यामुळे विविध संस्था, शाळांना पुस्तके भेट देत असल्याचे बाबासाहेब शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. आर. टी. देवकांत यांनी मनोगत व्यक्त केले.

सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मनोहर कोलते म्हणाले, शिंदे यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेतली जावी या उद्देशाने त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बाबासाहेब शिंदे यांच्या कार्याची माहिती चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत थेटे यांनी केले.

मंगळागौर: स्त्रियांच्या भक्ती आणि संस्कृतीचे आध्यात्मिक माध्यम – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे (३ ऑगस्ट, २०२५): कोथरूड येथील भुसारी कॉलनी परिसरात श्रावण महिन्याच्या निमित्ताने आयोजित ‘श्रावणबहार गीत आणि मंगळागौर’ कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळागौरचे महत्त्व सांगितले. त्या म्हणाल्या की, मंगळागौर हा केवळ स्त्रियांच्या मनोरंजनाचा खेळ नसून, तो भक्ती, सामाजिक एकोपा आणि स्त्रीशक्तीचे दर्शन घडवणारे एक आध्यात्मिक माध्यम आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन सौ. मीनल निलेश धनवटे आणि निलेश धनवटे यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी श्रावण महिन्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले. मंगळागौरच्या खेळांतून स्त्रिया एकमेकांशी नातेसंबंध दृढ करतात आणि आपली सांस्कृतिक परंपरा जपतात, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. गोऱ्हे यांनी पुढे म्हटले की, या परंपरा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत आणि त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. या खेळांमध्ये शारीरिक चपळता, गाणी, फुगड्या, उखाणे आणि समूहभावना यांचा सुंदर संगम दिसून येतो.

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कोथरूडमधील महिलांचे डॉ. गोऱ्हे यांनी कौतुक केले. रविवार असूनही वेळात वेळ काढून हिंदू धर्म आणि संस्कृती जपण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी महिलांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे, युवासेना सरचिटणीस अनिकेत जवळकर, शिवसेना शहरप्रमुख (महिला आघाडी) श्रद्धा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. शेवटी, सौ. श्रद्धा शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

शिंदे गटाची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द पुढच्या महिन्यात संपेल:असीम सरोदेंचा दावा, सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा निकाल शक्य

पुणे-महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणाऱ्या शिवसेना फुटीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत वकील असीम सरोदे यांनी एक अत्यंत महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, येत्या महिनाभरात सर्वोच्च न्यायालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द संपुष्टात आणू शकते. सरोदे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

असीम सरोदेंची पोस्ट काय?

वकील असीम सरोदे यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिनाभरात संपवतील. कुणीही, कसेही, मन-मानेल त्या पद्धतीने पक्ष फोडतील, पक्ष पळवतील ही असंविधानिकता आणि पक्ष चोरी चालणार नाही असे प्रस्थापित होणे कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर प्रेम करणारा म्हणून मला महत्वाचे वाटते.असीम सरोदे म्हणाले की, असंवैधानिक प्रक्रियेतून सरकार प्रस्थापित करण्यात राज्यपाल पदावरील व्यक्तीने सक्रिय सहभागी घेणे , केंद्रीय निवडणूक आयोगाने कायदा बाह्य वागणे आणि विधानसभा अध्यक्षांनी कधीच तटस्थ न वागता बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी काम करणे याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार ते सुद्धा मला बघायचे आहे.

दरम्यान, न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे. मात्र, घटनापीठाची सुनावणी 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत असल्याने शिवसेना प्रकरणावर कोणताही निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता शिवसेना चिन्ह आणि नावाच्या वादावर 15 सप्टेंबर नंतर किंवा ऑक्टोबरमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे.

खडकवासल्यात प्रदेश काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिका-यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा

११ ऑगस्ट पासून प्रदेश काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिका-यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा

प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार

मुंबई दि. ३ ऑगस्ट २०२५
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नविनयुक्त कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता संघटना मजबूतीसाठी पावले उचलायला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून पुण्याच्या खडकवासला येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिका-यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

दि. ११ व १२ ऑगस्ट रोजी पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सर्व नवनियुक्त पदाधिका-यांसह राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे १० ऑगस्ट रोजीच या कार्यशाळेसाठी पुण्यात पोहोचणार आहेत.

१० ऑगस्ट रोजी सांयकाळी ६ वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी या कार्यशाळेसाठी निमंत्रीत पदाधिक-यांची नोंदणी होईल. ११ ऑगस्ट रोजी सकाळी, ७ वा. सामुदायिक प्रार्थनेने शिबिराची सुरुवात होईल. त्यानंतर १० वा. प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. नेते आणि वक्त्यांचे मार्गदर्शन, विविध चर्चासत्रेही होणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राजकीय व्यवहार समितीची बैठकही होणार आहे. १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने या कार्यशाळेची समाप्ती होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

ना. चंद्रकांतदादांच्या पाठपुराव्यामुळे राहुल कॅम्पसेक्सचा प्रॅापर्टी कार्डचा प्रश्न मार्गी

कोथरुडकरांचे प्रश्न सोडवण्यास सदैव कटिबद्ध- ना. चंद्रकांतदादा पाटील

माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्याकडून ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे कौतुक

पुणे

कोथरुड मतदारसंघातील पौड रोड येथील राहुल कॅाम्पलेक्सच्या प्रॅापर्टी कार्डचे बरेच वर्षे प्रलंबित होते. त्यामुळे सोसायटीचा पूनर्विकास रखडला होता. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड मधील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून राबविलेल्या मोफत कायदेशीर सल्ला कक्षच्या पाठपुराव्याने सदर काम पूर्ण झाले. आज सोसायटीच्या सभासदांना त्यांचे प्रॅापर्टी कार्ड ना. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कोथरुडकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी ना. पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे, माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी ही नामदार पाटील यांचे कौतुक केले.

यावेळी माजी मंत्री शशिकांतभाऊ सुतार, पोस्टल बॅंकेचे स्वतंत्र संचालक तथा सोसायटीचे चेअरमन विनयजी गानू, भाजपा कोथरुड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजप कोथरुड दक्षिण मंडलचे माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उद्योजक प्रवीण बढेकर, माजी नगरसेविका ॲड. वासंती जाधव, मिताली सावळेकर, गिरीश भेलके, नवनाथ जाधव, सागर शेडगे यांच्यासह इतर मान्यवर आणि सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले की, स्वामी विवेकानंद आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या सर्व सामान्यांचे कल्याण झालं पाहिजे, या शिकवणीतून काम करत असतो. त्यातूनच कोथरुड मतदारसंघात गरजेवर आधारित उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांपैकीच एक असलेल्या मोफत कायदेशीर सल्ला उपक्रमामुळे ३०० सोसायटींचे प्रश्न सोडविण्यात यश आले. राहुल कॅाम्पलेक्सचा देखील प्रश्न सोडवताना अनेकांचे सहकार्य मिळाले, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. कोथरुड मधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही यानिमित्ताने दिली.

यावेळी माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी ना. पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, कोथरुड हा अतिशय झपाट्याने विकसित होतं आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढणार आहे. त्यामुळे याची वेळीच दखल घेऊन कोथरुड मधील मिसिंग लिंकचा प्रश्न हाताळत आहेत, हे अतिशय अभिनंदनीय आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी यावेळी काढले.

रहिवासी प्रयोजनार्थ कुटुंबाना जागा पट्टे वाटपाची कार्यवाही सुरु-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे दि. २: ‘महसूल सप्ताह २०२५’ निमित्ताने जिल्ह्यात शासकीय जागेवर सन २०११ पुर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या पात्र कुटुंबांना नियमित करण्याच्या अनुषंगाने जागांचे पट्टे वाटप करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.

जुन्नर तालुक्यात एकूण १२ मंडळ भागातील शासकीय जागेवर २०११ पासून अतिक्रमण असलेली संख्या एकूण ७६४ आहेत, खेड तालुक्यात सर्वेक्षण करणेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

आमदार सुनील शेळके आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत मावळ येथे मौजे शिंदेवस्ती, ठाकर वस्ती, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे येथे वन जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यात आले. अपर तहसील पिंपरी चिंचवड अंतर्गत
देहू नगरपंचायत हद्दीतील मौजे विठ्ठलवाडी येथील सर्वे क्रमांक २ या शासकीय जागेमध्ये रहिवाशी प्रयोजनार्थ ६३४ कुंटुंबाचे अतिक्रमण असल्याचे आढळून आले आहेत.

अप्पर तहसील लोणी काळभोर अंतर्गत
मंडळ अधिकारी थेऊर यांच्यावतीने नायगाव व कदमवाकवस्ती येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करून घरकूल मंजूर करणे, त्याअनुषंगाने प्रस्ताव, आवश्यक कागदपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिरूर तालुक्यातील प्रत्येक मंडल भाग स्तरावर शासकीय जागेवर रहिवासी प्रयोजनार्थ असलेल्या अतिक्रमणाबाबत यादी तयार करण्याचे काम सुरु आहे.

पुरंदर तालुक्यात रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी दोन
लाभार्थ्यांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्यात आले. दौंड तालुक्यातील मौजे दहिटणे वाखारी दापोडी या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे.

महसूल सप्ताहानिमित्त प्रशासनाच्यावतीने गाव पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे, नागरिकांनी सहभागी होऊन विविध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

अतिरिक्त न्यायदंडाधिकारी बाल न्याय मंडळाच्या इमारतीचे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते उद्घाटन

बाल बंदींमधील ऊर्जेला योग्य वाट देत त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत – न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे

पुणे, दि. २: बाल न्याय मंडळात दाखल होणाऱ्या बालकांना त्यांच्या पूर्वायुष्यात योग्य मार्गदर्शन, साहाय्य न मिळाल्याने अजाणतेपणी गुन्हा घडतो. अशा बाल बंदीच्या समस्या, अडचणी समजून घेऊन त्यांच्यातील ऊर्जेला योग्य वाट देऊन जीवनात यशस्वी होण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी केले.

अतिरिक्त न्याय दंडाधिकारी बाल न्याय मंडळ, येरवडा या न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन होते. याप्रसंगी महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे, प्रमुख न्यायदंडाधिकारी, बाल न्याय मंडळ श्रीमती जी. एन. बागडोरिया, अतिरिक्त न्याय दंडाधिकारी श्रीमती एल. के. सपकाळ, महाराष्ट व गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, सदस्य ॲड. हर्षद निंबाळकर, ए. यु. पठाण, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत झंजाड आदी या उपस्थित होते.

पुणे येथे मोठ्या प्रमाणात बाल न्याय मंडळाकडे खटले प्रलंबित असल्याने हे नवीन मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगून न्यायमूर्ती श्रीमती मोहिते डेरे म्हणल्या, बाल न्याय मंडळासाठी आवश्यक त्या सर्व बाबी येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. निरीक्षणगृहात या बालबंदींना योग्य मार्गदर्शन, सहाय्य देण्याची यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास ते भविष्यात निश्चितच यशस्वी होतात, त्यादृष्टीने डोंगरी येथील बाल निरीक्षण गृह देशात आदर्श बनविण्यात आले. या बालकांमधील ऊर्जेला वाट करून देण्यासाठी बास्केटबॉल कोर्ट तयार करण्यात आले. व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आले. निरीक्षणगृहातील प्रत्येक खोलीला वेगवेगळी रंग संगती देण्यात आल्यामुळे मुलांमध्ये एक सकारात्मक परिणाम दिसू आला. त्यांच्यातील समस्या तपासणीची व्यवस्था, संस्कारक्षम चित्रपट दाखविणे आदी सुविधा निर्माण करण्यात आल्यामुळे त्यातून यशस्वी नागरिक घडले आहेत. या ठिकाणी येऊन इतर बालबंदींना प्रेरणा देत आहेत. याच धर्तीवर राज्यातील सर्व निरीक्षणगृहांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

न्यायाधीश श्री. महाजन म्हणाले, बाल न्याय मंडळाशी संबंधित सर्वाधिक खटले मुंबई, ठाण्याबरोबरच पुणे येथे प्रलंबित आहेत. पुणे येथे जवळपास ५ हजार खटले प्रलंबित असून दरवर्षी नव्याने १२०० दाखल आणि तितकेच निर्गत होतात. आधीचे खटले तसेच प्रलंबित राहत असल्यामुळे अतिरिक्त बाल न्याय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे खटले निकाली निघण्यास वेग येणार आहे. या ठिकाणी ४० बालबंदींना नव्या वस्तूत राहायला मिळणार आहे.

श्रीमती गुंडे म्हणाल्या, महिला व बाल विकास विभागामार्फत प्रलंबित खटले गतीने निकाली व्हावेत यासाठी राज्यातील सहा जिल्ह्यात बाल न्याय मंडळांवर सदस्यांची नेमणूक करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यात लवकरच करण्यात येणार आहे. विभागामार्फत बालकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. दहा हजार बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात आली आहेत २०२३- २५ मध्ये अनाथ आरक्षणाअंतर्गत ७४० मुलांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आले असून ही संख्या वाढत जाणार आहे. बाल संगोपन योजनेअंतर्गत एक लाखापेक्षा अधिक मुलांना २ हजार २५० रुपये इतके दरमहा अनुदान, केंद्र शासनाच्या मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोविडमुळे पालक गमावलेल्या ३३ हजार मुलांना ४ हजार रुपये डीबीटीद्वारे दिले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बालकांच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी श्री. झंजाड यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमास विविध न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ

0

मतदान केंद्र पर्यवेक्षकांचे मानधनही वाढले

मतदार नोंदणी अधिकारी (EROs) व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनाही (AEROs) मानधन देण्याचा पहिल्यांदाच निर्णय

मुंबई-शुद्ध व बिनचूक मतदार याद्या हा लोकशाहीचा पाया आहे. मतदार यादी तयार करणाऱ्या यंत्रणेत, मतदार नोंदणी अधिकारी (EROs), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AEROs), मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक (BLO Supervisors) आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLOs) यांचा समावेश असतो. हे सर्वजण नि:पक्षपाती व पारदर्शक मतदार याद्या तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घेतात तसेच या संपूर्ण प्रक्रेयेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळेच, भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी तयार करणे व त्यात सुधारणा करण्याच्या कामाशी जोडलेल्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांचे वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसेच मतदान केंद्र पर्यवेक्षकांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी 2015 मध्ये अशा प्रकारची वाढ केली गेली होती. तसेच, मतदार नोंदणी अधिकारी (EROs) व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना (AEROs) पहिल्यांदाच मानधन देण्यात येणार आहे.

अ.क्र.    पद2015 पासूनचे मानधनसुधारित मानधन
1मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO)Rs. 6000Rs 12000
2मतदार यादीच्या पुनरीक्षणासाठी BLO यांना प्रोत्साहन भत्ताRs 1000Rs 2000
3मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षकRs 12000Rs 18000
4सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO)काहीही नाहीRs 25000
5मतदार नोंदणी अधिकारी (ERO)काहीही नाहीRs 30000

याव्यतिरिक्त, आयोगाने बिहारपासून सुरू झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कामासाठीही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकरता 6,000 रुपयांची विशेष प्रोत्साहनपर रक्कमेलाही मंजूरी दिली आहे.

आयोगाच्या या निर्णयातून मतदार याद्या बिनचूक असाव्यात यासह, मतदारांना मदत करण्यासाठी व निवडणूक प्रक्रिया बळकट करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर अथकपणे काम करत असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला देण्याप्रती आयोगाच्या वचनबद्धताही प्रतिबिंबित झाली आहे.

“सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

“संवेदनशील प्रश्नांवर उपाय शोधताना स्त्री आधार केंद्राची भूमिका उल्लेखनीय – डॉ. पंकज देशमुख”

पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५:
महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पार पडली.

सार्वजनिक सणांच्या वेळी महिलांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी स्वयंसेवकांना कायद्याविषयी प्रशिक्षण देण्याचा हा २३ वा उपक्रम होता.
पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यशाळेचा मुख्य उद्देश गणेशोत्सवासारख्या गर्दीच्या काळात महिला, मुली आणि लहान मुलांवर होणारे अत्याचार, छेडछाड, चोरी किंवा लहान मुलांच्या अपहरणासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी महिला कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे हा होता. या कार्यक्रमात पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी २० पोलीस ठाणे येथील दक्षता समितीच्या महिलांनी सहभाग नोंदवला होता.

यावेळी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख यांनी ‘सण आणि महिला सुरक्षितता: कायदेसंरक्षण यंत्रणा व समाजाची भूमिका’ या विषयावर संवाद साधला. स्त्री आधार केंद्र आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी काम करताना कोणतीही समस्या सोडवणे अधिक परिणामकारक आणि सुलभ होते. त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य आमच्यासाठी नेहमीच अत्यंत उपयुक्त ठरते असे श्री देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमामध्ये बॉम्बस्फोट विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पोपट येले यांनी स्फोटके आणि बॉम्बशोधक पथकाच्या जबाबदारीबद्दल माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षक श्री. विवेक नायडू यांनी शहरी आपत्ती व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले.

डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, गणेशोत्सव महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे, मात्र सार्वजनिक गर्दीत महिलांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी. स्वयंसेवकांची उपस्थिती महिला, मुली आणि लहान मुलांसाठी खूप आश्वासक असेल. तसेच, सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या प्रत्येक महिला कार्यकर्त्याच्या योगदानाला त्यांनी दाद दिली.

यावेळी, फ्रान्समधील जीझेल पेलिकॉ यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्धच्या लढ्याचे उदाहरण देत, डॉ. गोऱ्हे यांनी प्रत्येक अन्यायग्रस्त महिलेने त्यांचे अनुकरण करावे असे आवाहन केले. या कार्यशाळेमुळे पुणे शहरातील गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक मजबूत सामाजिक यंत्रणा तयार होत आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या प्रशिक्षणाचा अनुभव कार्यकर्त्यांना आगामी काळात काम करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.

स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त अपर्णा पाठक यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेमार्फत राज्यभरात महिलांसाठी बचत गट आणि कायदेविषयक प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेतले जातात. प्रशिक्षित स्वयंसेवक गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या वेळी पोलिसांना मदत करतील. गेल्या वर्षी देखील या स्वयंसेवकांनी हरवलेल्या लहान मुलांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात मदत केली होती. गर्दीच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा तयार करणे, छेडछाड थांबवणे, आणि गरजेनुसार मदत पुरवणे अशा अनेक कामांसाठी त्यांना प्रशिक्षित करण्यात आले.

पुण्यात भर चौकात दोन पोलिसांवर चौघांचा हल्ला

पुणे-पुणे येथील मुंबई-पुणे रस्त्यावरील खडकी मधील चर्च चौकात दुचाकी वेडीवाकडी चालवल्याने जाब विचारणाऱ्या पोलिसांना भरचौकात टोळक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्यांचा गणवेश फाटला असून खडकी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जुनैद इक्बाल शेख (२७), नफीज नौशाद शेख (२५), युनुस युसुफ शेख (२५) आणि आरिफ अक्रम शेख (२५) यांचा समावेश आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी गोपाल गोठवाल (२८) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी गोठवाल आणि काजळे हे मुंबई-पुणे महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी दोन आरोपी दुचाकीवरून भरधाव वेगाने निघाले होते. पोलिसांनी त्यांना दुचाकी वेडीवाकडी का चालवतात अशी विचारणा केली.आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ करून “विचारणा करणारा तू कोण?” असे म्हटले. पोलिसांनी त्यांना दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले असता दोघांनी पोलिसांना मारहाण सुरू केली. त्यानंतर आणखी दोन आरोपी दुसऱ्या दुचाकीवरून तेथे आले आणि त्यांनीही पोलिसांना मारहाण केली.

मारहाणीत गोठवाल रस्त्यावर पडले आणि चारही आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात त्यांचा गणवेश फाटला. काजळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की केली.काजळे यांनी त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती कळवली. गस्त घालणारे पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आणि चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मारहाणीत पोलीस कर्मचारी गोठवाल यांच्या डोक्याला आणि छातीला दुखापत झाली आहे.सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले या प्रकरणाचा तपास करत आहेत.

वैदिक संस्कृतीवर दाही दिशांनी आक्रमणे; जपणुकीची जबाबदारी प्रत्येकाची-डॉ. शंकर अभ्यंकर

: वैदिक संमेलनात ब्रह्मवृंदांचा विशेष सन्मान

पुणे : वसुधैव कुटुंबकम्‌‍ची विचारधारा आपल्या राष्ट्रात नांदते आहे. भारतीय सनातन परंपरा,धर्म अलौकिक व सर्वसमावेशक आहे. विश्वरूपी घराचे देवघर म्हणजे आपले भारतवर्ष आहे. यात अनेक ऋषी, महात्मे, आचार्य, संत यांचे स्थान मोलाचे आहे. आज वैदिक संस्कृतीवर दाही दिशांनी आक्रमणे होत आहेत. त्यामुळे तिचा संकोच झाला आहे. अशावेळी धर्म व संस्कृतीची जपणूक, रक्षण करण्याचे कार्य प्रत्येकाकडून घडावे, अशी अपेक्षा विद्यावाचस्पती प्रा. डॉ. शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केली.

श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम्‌‍, दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्‌‍, शृंगेरी आणि वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वैदिक संमेलनात आज (दि. 2) ब्रह्मवृंदांचा सन्मान श्रीशारदापिठम्‌‍ शृंगेरीचे महाप्रबंधक पी. ए. मुरली यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी प्रा. डॉ. शंकर अभ्यंकर बोलत होते. संमेलन शिवशंकर सभागृह, महर्षिनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. वे. मू. भानुदास नरसिंह जोशी (ऋग्वेद घनपाठी), वे.मू. मंदार नारायण शहरकर (शुक्ल यजु. माध्यं. घनपाठी), वे. मू. राजेश गोविंद जहागिरदार (शुक्ल यजु. काण्व घनपाठी), वे. मू. किरण अरुण गोसावी (अथर्व वेद), वे. शा. सं. विश्वासशास्त्री देशमुख (घोडजकर), विद्यावाचस्पती प्रा. शंकर अभ्यंकर आणि गोसेवक गजानन अवचट यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री शृंगेरी शारदा पीठाचे महाराष्ट्र प्रतिनिधी वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेचे कार्याध्यक्ष भगवंत ठिपसे, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेचे कोषाध्यक्ष श्रीकांत फडके मंचावर होते. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, महावस्त्र, मानधन देऊन ब्रह्मवृंदांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

पुढील पिढीला धर्मसंस्कृतीचे ज्ञान करून देण्याचे उत्तरदायित्व घनपाठींचे आहे, असे सांगून डॉ. शंकर अभ्यंकर पुढे म्हणाले, हिंदू धर्म विरोधात षडयंत्र रचले जात असताना ब्रह्मवृंदांकडून लोकपालन व्हावे. यासाठी समाजात मोठ्या प्रमाणात जागरण होण्याची आवश्यकता आहे. आज हिंदू धर्माचा, वैदिक संस्कृतीचा प्रभाव वाढविण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होऊन राष्ट्र उद्धाराचे काम करत देशाला पुन्हा विश्वगुरू रूप प्राप्त करून द्यावे.

पी. ए. मुरली म्हणाले, अनेक वेदमूर्तींनी आपले संपूर्ण जीवन वेदशास्त्राच्या अभ्यासासाठी व प्रचार आणि प्रसारासाठी समर्पित केले आहे. दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्‌‍, शृंगेरीचा मुख्य उद्देश सनातन धर्माचे पालन, संवर्धन तसेच प्रचार व प्रसार करणे हा आहे. शृंगेरी मठाची जगत्‌‍गुरूंची परंपरा महाराष्ट्राशी जोडली गेलेली आहे, असे सांगून पी. ए. मुरली यांनी महाराष्ट्र आणि दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्‌‍, शृंगेरी यांचा अनुबंध उलगडला.

सत्कारमूर्तींच्या संस्कृत भाषेतील मानपत्राचे लिखाण श्रद्धा परांजपे यांनी केले होते तर वाचन मुक्ता गोखले, प्रथमेश बिवलकर, डॉ. ज्योत्स्ना खरे, अमृता करंबेळकर, श्रद्धा परांजपे, उन्मेष जोशी यांनी केले. प्रास्ताविक वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी केले.

संमेलनानिमित्त आज (दि. 2) सकाळपासून मंत्रजागर, धर्मशास्त्रीय शंकासमाधान, परिसंवाद, प्रवचन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या उत्तुंग कार्याला दिला उजाळा…!

संचालक बिभीषण चवरे यांच्या संकल्पनेतून गर्जना शाहीरांची शानदार सोहळा रंगला

मुंबई- “जग बदल घालून घाव,सांगून गेले भीमराव”असा संदेश देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 1ऑगस्ट रोजी झालेल्या जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाने गर्जना शाहीरांची हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित असा शानदार सांस्कृतिक कार्यक्रमातून उजाळा दिला.
मुंबई येथील गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात आयोजित केलेल्या
या शानदार सोहळ्याला लोकशाहिरांची मंदियाळी पाहून आलेल्या प्रेक्षकांचा उत्साह ओसांडून वाहत होता.
अण्णाभाऊ यांच्या प्रत्येक गीतांना रसिक जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते. प्रेक्षकगृहातून अनेक गाण्यांना ‘वन्स मोर’ मिळत होता.
या कार्यक्रमात लोकशाहीर मधुकर खामकर,दत्ताराम म्हात्रे,निशांत शेख,रामानंद उगले,निलेश जाधव,अविरत साळवी,गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे या सुप्रसिद्ध गायकांनी आपल्या पहाडी आवाजात अण्णाभाऊ यांचा इतिहास जागा केला. त्यांनी लिहिलेल्या रचना गायल्या, विशेष बाबत म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या एका कादंबरीच्या आधारित श्रीनिवास नार्वेकर यांनी कथावाचन केले. अश्विनी कारंडे व गणेश कारंडे यांनी एक छोटीशी नाटीका सादर केले.
आकांक्षा कदम हिने लावणी सादर करून रसिकांची मनं जिंकली.
प्रतिक जाधव यांनी उत्तम सूत्रसंचालन केले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ आणि मिलिंद बिर्जे यांनी आलेल्या सर्व लोकशाहीरांचे अगत्याने स्वागत केले.
अण्णाभाऊ साठे मराठी साहित्य विश्वात नामवंत प्रसिद्ध प्रतिभावंत अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे साहित्यिक होते.आपल्या साहित्यात लोकसंस्कृतीचे सारी अंगे त्यांच्या कथा,कादंबऱ्या,पटकथा,वगनाट्य,पोवाडे,लावण्या,गीत,नाट्य आविष्कृत केली.त्या अण्णाभाऊ साठे यांच्या उत्तुंग कार्याची आठवण ठेवून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी छोटे खानी कार्यक्रमातून उत्कृष्ट उजाळा देण्याचा प्रयत्न केला.

‘मोदी, भागवतांचे नाव घेण्यासाठी मला टॉर्चर केले’: तुरुंगात शारीरिक,मानसिक छळ केला-साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा आरोप

मुंबई-मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आपले अनुभव माध्यमांसमोर कथन केले. नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, सुदर्शन, इंद्रेश, रामजी माधव यांच्यासारख्या लोकांची नावे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात होता, असा खळबळजनक दावा साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला. तसेच तुरुंगात माझा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला आहे.माझ्यावर इतके अत्याचार झाले की ते शब्दांत मांडता येणार नाहीत. एटीएस अधिकाऱ्यांनी 13 दिवस बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले. या काळात मला ज्या यातना आणि अत्याचार सहन करावे लागले, त्यासाठी शब्द अपुरे आहेत. शब्दांनाही मर्यादा असते, असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह इतर सात आरोपींची निर्दोष मुक्त केले. सरकारी वकिल आरोपीविरुद्धचा खटला सिद्ध करू शकले नाहीत, असे कोर्टाने म्हटले होते. सुमारे 17 हा खटला चालला होता. आज माध्यमांशी बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उपरोक्त दावा केला आहे.

साध्वी प्रज्ञा पुढे म्हणाल्या, मला नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, सुदर्शन, इंद्रेश, राम माधव यांची नावे घेण्यास भाग पाडले जात होते. ‘तुम्ही या लोकांची नावे घेतल्यास आम्ही तुम्हाला मारणार नाही’ असे अधिकारी वारंवार म्हणत होते. त्यांचा मुख्य उद्देश मला त्रास देणे हाच होता. मला सर्व काही खोटे बोलण्यास सांगितले जात होते, म्हणून मी कोणाचेही नाव घेतले नाही.

या लोकांनी छळ करून माझ्याकडून खूप काही वदवून घेण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही खोटे बोलणार नाही. देशाला घाबरण्याची गरज नाही. देशभक्त आपल्या देशासाठी जगतात आणि मरतात. अनेक एटीएस अधिकाऱ्यांनी कायद्याच्या नावाखाली बेकायदेशीर कामे केल्याचा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी केला. तुरुंगात मला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला, असेही त्या म्हणाल्या.

न्यायालयाच्या निर्णयावर प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, हा भगव्याचा, धर्माचा आणि सनातन धर्माचा विजय आहे. पण यांना पराभूत करण्याची या लोकांमध्ये हिंमत नाही. या लोकांनी छळ करून भगवा आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा कुत्सित प्रयत्न केला. अशा लोकांना शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. हा संपूर्ण खटला बनावट होता, त्याला कोणताही आधार नव्हता. सत्य नेहमीच समोर येते आणि सिद्ध होते, या प्रकरणातही तेच झाले.