Home Blog Page 187

पुण्यातील खडकी परिसरात पोलिसांवर हल्ला; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

वर्दीतील कर्मचाऱ्यांवर असा हल्ला म्हणजे संपूर्ण न्यायव्यवस्थेचा अपमान, सुरक्षिततेसाठी उपाययोजनांची गरज : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, दि. ४ ऑगस्ट २०२५ : पुणे शहरातील खडकी येथील चर्च चौकात ३१ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर चार जणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्याच्या घटनेबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निषेध व्यक्त केला आहे. पोलिसांवर अशा प्रकारचा हल्ला हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून, या प्रकरणातील आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले की, पोलीस हे समाजाच्या सुरक्षेचा आधारस्तंभ आहेत. वर्दीतील कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ला होणे केवळ पोलीस दलाचाच नाही, तर संपूर्ण न्यायव्यवस्थेचाही अपमान आहे. अशा घटना समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या ठरतात. विशेष म्हणजे, हल्ल्याच्या वेळी उपस्थित नागरिकांनी केवळ प्रेक्षकाची भूमिका घेतल्याचे निरीक्षण झाले असून, हेही चिंतेचे कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेतील आरोपींना कोणताही जामीन मिळू नये आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी शासकीय अभियोक्त्यामार्फत न्यायालयात ठोस व सखोल बाजू मांडली जावी, असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे. तसेच, कर्तव्यावर असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बॉडी कॅमेरे, वॉकी-टॉकी, GPS ट्रॅकिंग प्रणाली आणि पोर्टेबल SOS बटण यांसारख्या आधुनिक उपकरणांची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून अशा घटनांचे वेळेवर आणि अचूक निदान करता येईल व पोलिसांची सुरक्षा सुनिश्चित होईल, असेही त्यांनी सुचवले आहे.

पोलिसांबाबत जनतेमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवावी, असेही त्यांनी नमूद केले. यासाठी स्थानिक समुदाय, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांसोबत संयुक्त उपक्रम हाती घेण्यात यावेत. नागरिक आणि पोलीस यांच्यातील परस्पर विश्वास व संवाद वाढल्यास अशा घटनांना आळा बसू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि पोलीस दलाचे मनोबल वाढवण्यासाठी त्वरीत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात तत्काळ लक्ष घालावे, असे आवाहन केले आहे.

सहकारनगरमधील २० वर्षापूर्वीचे सर्वोत्कृष्ट क्रीडा संकुल वर्षानुवर्षे धूळ खात पडून..

पुणे- व्यावसायिकतेच्या नियमावलीत आणि कचाट्यात सापडलेली महापालिका आपली जबाबदारी असलेल्या सामाजिकतेची ससेहोलपट वर्षानुवर्षे होता असलेली पाहूनही ती मुकाट सहन करत असल्याचे दिसून येत आहे. सहकारनगर मधील सुमारे अर्धा एकर च्या भूखंडावर २००४ साली तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी, चंद्रकांत छाजेड,उल्हास पवार,आमदार विश्वास गांगुर्डे ,शरद रणपिसे आणि तत्कालीन महापौर दीप्ती चौधरी,आयुक्त नितीन करीर यांच्या कारकिर्दीत महापालिकेने स्थानिक कार्यकर्ते आणि नगरसेवक यांच्या मागणीवरून येथील अर्धा एकरच्या भूखंडावर अलिशान असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने क्रीडा संकुल उभारले.येथे काय नाही ? ते विचारा,माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचे बॉक्सिंग रिंगण, स्केटिंग साठी व्यवस्था,क्रिकेट साठी व्यवस्था, पोहण्याचा तलाव,योगा हॉल, झुंबा डान्स हॉल, आणि व्यायाम शाळा असे बरेच काही आहे. सध्याच्या मंत्री महोदया माधुरी मिसाळ यांनीही या संकुलाच्या उभारणीत योगदान दिलेले आहे पण हे संकुल वर्षानुवर्षे धूळ खात पडून असल्याचे दिसून आले आहे.

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ असलेले या संकुलाची अवस्था निश्चित ठीक नाही त्याचा जनतेला व्यावसायिक दृष्टीने नाही तर सामाजिक दृष्टीने तरी फायदा व्हायलाच हवा होता अशी खंत हे संकुल उभारणी साठी त्याकाळी विशेष परिश्रम घेतलेले स्वर्गीय माजी नगरसेवक नाना वाबळे यांचे पुत्र महेश वाबळे यांनी सुद्धा व्यक्त केली आहे.

या परिसरात जवळपास पर्वती तळजाई सारखे जंगल, सदू शिंदे मैदान, यासह अन्य पोहण्याचे तलाव देखील आहेत.व्यायामाची आणि पोहण्याची लोकांची व्यवस्था नाही असे नाही . पण येथून राष्ट्रीय स्तरावर , आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू निर्माण व्हावेत या दृष्टीने उभारलेले हे भव्य संकुल मात्र धूळ खात पडून आहे.येथील जागा, व्यवस्था रेडीरेकनर त्या अनुषंगाने आकारण्यात येणारे भाडे या व्यावसायिक चक्रात महापालिका प्रशासन अडकल्यानेच हे संकुल असे धूळ खात पडले आहे महापालिकेचे हात व्यावसायिक दृष्टीने बांधून टाकण्यात आले आहेत मात्र ते चालवायला घेणाऱ्यांनी सामाजिक दृष्टीकोनच अवलंबायचा या सूत्रामुळे महापालिकेच्या मालमत्तांची हेळसांड होते आहे . महापालिकेने देखील एवढी मोठी जागा आणि संकुल जर सामाजिक दृष्टीकोनातूनच बांधले आहे तर त्याकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून का पाहावे असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. कोणत्याही अवस्थेत का होईनात महापालिकेची एवढी मोठी मालमत्ता कोणाच्याही कामाला न येता ती अशी धूळ खात पडून राहणे हेच आजवर प्रशासनाने या दुष्टचक्रात अडकल्याने पत्करल्याचे चित्र आहे.

नागरिकांचा न्यायदानावरील विश्वास दृढ करण्याची न्यायाधीश व वकिलांची महत्त्वपूर्ण जबाबदारी-उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे

पुणे: न्यायालय विटांनी बांधलेली इमारत नसून ती न्यायमंदीर आहे, याठिकाणी निष्पक्ष आणि लवकर निर्णयाद्वारे नागरिकांच्या हक्काचे सरंक्षण करण्यासोबतच कायदा आणि राज्यव्यवस्था राखली जाते, यामुळे लोकशाहीवरचा विश्वास दृढ होतो,
न्यायदानावरील विश्वास दृढ करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी न्यायाधीश आणि वकीलांची आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते – डेरे यांनी केले.

मुळशी तालुक्यातील पौड येथील पूर्णवेळ दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर, प्रथम जिल्हा व सत्र न्यायधीश महेंद्र के महाजन, पौडचे प्रथम न्यायदंडाधिकारी सागर मोहीते, आमदार शंकर मांडेकर, महाराष्ट व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. विठ्ठल कोंडे देशमुख, उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, सदस्य ॲड. हर्षद निंबाळकर, आयुबखान पठाण, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत झंजाड आदी उपस्थित होते.

न्यायमूर्ती मोहीते म्हणाल्या, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करावा लागू नये, यासाठी न्याय पायाभूत सोयीसुविधा आवश्यक आहे. नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात जनजागृती झाल्यामुळे खटल्यांची संख्येत देखील वाढ होत आहे, यावरुन अद्यापही नागरिकांचा न्यायालयावर विश्वास आहे, असे दिसून येते.

न्यायदानातील विलंब हा न्याय नाकारण्याच्या बरोबरीचा असतो. त्यामुळे वकीलवर्ग न्यायदानातील महत्वाचा घटक असल्यामुळे हा विलंब टाळण्यासाठी त्यांचा मोठावाटा आहे. वकील हे नागरिकांच्या हक्काचे धारक आणि रक्षक आहेत. न्यायाच्या माध्यमातून जनसेवा होत असल्याने नवोदित वकिलांनी ज्येष्ठ वकिलांच्या हाताखाली काम प्रामाणिकपणे केले पाहिजे, असेही न्यायमूर्ती मोहिते म्हणाल्या.

न्यायमूर्ती मारणे म्हणाले, पुणे हा देशातील सर्वात मोठा न्यायिक जिल्हा असून राज्यातल्या तेरा टक्के खटल्याचे प्रमाण पुणे जिल्ह्याचे आहे. शिवाजीनगर न्यायालयातील गर्दी कमी करण्याकरिता जिल्ह्यात ठिकठिकाणी न्यायालयांची उभारणी करण्यात येत आहे. मुळशी तालुक्याचा झपाट्याने विकास होत असून येथे पर्यटनाचा विकास होतोय.जमिनींच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे येथे सक्षम न्यायव्यवस्था निर्माण करणे गरजेचे होते. नवीन न्यायालयाची भावना म्हणजे सर्वांसाठी न्याय असा आहे, असेही न्यायमूर्ती मारणे म्हणाले.

यावेळी न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर आणि प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांनी आपले विचार व्यक्त केले.

या प्रसंगी विधी व न्याय विभागाचे सहसचिव विलास गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे, पोलिस उपअधीक्षक राजेंद्र चोपडे, तहसीलदार विनयकुमार चोबे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, जिल्हा न्यायाधीश, बार असोसिएशन आणि वकील संघटनेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुळशी वकील संघटनेचे अध्यक्ष
ॲड. संभाजी बलकवडे, ॲड.संजय मारणे, ॲड. योगेश साठे, ॲड.रणजित टेमघरे, ॲड. अमोल शितोळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. जिल्हा न्यायाधीश अरविंद वाघमारे, विलास कचरे व किशोर शिंदे यांनी त्यासाठी सहकार्य केले.

ॲड. बलकवडे यांनी प्रास्ताविक केले आणि न्यायदंडाधिकारी श्री. मोहीते यांनी आभार मानले.

सहकार पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास १८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

पुणे, दि. ४: सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना सहकार पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून संस्थांनी १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना सन २०२३-२४ चा पुरस्कार देवून त्यांचा उचित गौरव करण्यासाठी शासनाने सहकार पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. यासाठी यापूर्वी ३१ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास कळविण्यात आले होते. तथापि, सन २०२५ या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये अधिकाधिक सहकारी संस्थांना पुरस्कार मिळण्याकरिता प्रस्ताव सादर करता यावेत यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

इच्छुक सहकारी संस्थांनी सविस्तर प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या सहायक निबंधक, सहकारी संस्था किंवा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात सादर करावेत.

सहकारी संस्थांनी पुरस्काराच्या अटी, निकष आदी अधिक माहितीसाठी https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच तालुक्याचे सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक अथवा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे अपर निबंधक (पतसंस्था) सहकारी संस्था, श्रीकृष्ण वाडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना नावनोंदणीचे आवाहन

पुणे, दि.4: धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाअंतर्गत सभासद नोंदणीकरिता https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या मंडळाअंतर्गत देण्यात येणाऱ्या योजनांचा ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी धारकांच्या एका कुटुंबातील अधिकाधिक चार व्यक्ती लाभ घेता येणार आहे. त्यांच्याकडे अनुज्ञप्ती, बॅज, परवाना, शिधापत्रिका, आधार कार्ड, पॅनकार्डची आवश्यकता आहे. अर्जदारांनी आपली नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीनेच करून शुल्क भरणा करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे कार्यकारी अधिकारी तथा सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

पिंपरीतील व्यापाऱ्यांना संरक्षण पुरवावे, अन्यथा गुरुवारी बाजारपेठ बंद – श्रीचंद आसवानी

पिंपरी मर्चंट फेडरेशन ची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी, पुणे (दि. ०३ ऑगस्ट २०२५) पिंपरी कॅम्प परिसरात शुक्रवारी झालेल्या गोळीबार घटनेतील आरोपींना अटक करून कायदेशीर कडक कारवाई करावी, तसेच व्यापाऱ्यांच्या समस्या समजून घेऊन ज्यांना गरज आहे त्यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि बाजारपेठांमध्ये दिवस, रात्र पोलीस गस्त वाढवावी अन्यथा गुरुवारी बाजारपेठ बंद करण्यात येईल असा इशारा पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष, उद्योजक श्रीचंद शामनदास आसवाणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे दिला आहे.
तसेच पत्र फेडरेशन ने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात दिले आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की, शहरातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांचा अंकुश राहिला नाही. यामुळे व्यापारी भयभीत झाले असून त्यांच्या वित्त व जीवितहानी विषयी भीती निर्माण झाली आहे. याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घालून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना स्पष्ट आदेश द्यावेत अशीही मागणी पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष उद्योजक श्रीचंद शामनदास आसवाणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
शुक्रवारी पिंपरीतील एका युवा व्यापाऱ्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला यामध्ये व्यापारी जखमी झाला आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड मध्ये एकच खळबळ उडाली. पिंपरी बाजारपेठ परिसरात यापूर्वी देखील व्यापाऱ्यांवर दहशत बसवण्यासाठी अशा प्रकारच्या काही घटना घडल्या आहेत. त्याबाबत व्यापाऱ्यांनी वेळोवेळी पोलिसांना पिंपरी मर्चंट फेडरेशनच्या वतीने निवेदन देऊन पोलीस संरक्षण व पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. तरी देखील पोलिस प्रशासन दखल घेत नाही आता फेडरेशनने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे.

वैदिक संमेलनातून संशोधनात्मक कार्य व्हावे : डॉ. गीताली टिळक

श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम्‌‍ दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्‌‍,शृंगेरी, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे आयोजित वैदिक संमेलनाचा समारोप

पुणे : भारतीय ज्ञानपरंपरा आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा स्वरूपाची वैदिक संमेलने आयोजित करण्यात यावीत तसेच याविषयी संशोधनात्मक कार्य व्हावे ज्या योगे वेदाभ्यास, ज्ञानपरंपरेचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेच्या अध्यक्ष व टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी केले.
श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम्‌‍ दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्‌‍,शृंगेरी आणि वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय वैदिक संमेलनाचा आज (दि. 3) समारोप झाला. त्या वेळी डॉ. गीताली टिळक अध्यक्षपदावरून बोलत होत्या. वासुदेव निवास, पुणेचे पीठाधीश आणि विश्वस्त योगश्री प.पू. शरदराव जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री शृंगेरी शारदा पीठाचे महाराष्ट्र प्रतिनिधी वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेचे कार्याध्यक्ष भगवंत ठिपसे, कार्यवाह श्रद्धा परांजपे व्यासपीठावर होते. संमेलन शिवशंकर सभागृह, महर्षिनगर येथे आयोजित करण्यात आले होते.

डॉ. गीताली टिळक पुढे म्हणाल्या, वेदशास्त्रातील शिक्षण विषयात पदवी अभ्यासक्रम टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सुरू करण्याचा मानस आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व टिळक कुटुंबिय वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या कार्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहेत. टिळक नावाबरोबर जबाबदारी येते या वडिलांच्या शिकवणुकीमुळे मी वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे, असे त्यांनी आवजूर्न नमूद केले.

वेदाध्यायनाला साधनेची-चैतन्याची जोड मिळाल्यास शांती प्राप्ती होते, असे सांगून प.पू. शरदराव जोशी यांनी श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम्‌‍ दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्‌‍,शृंगेरी आणि वासुदेव निवासाची परंपरा यांच्यातील धार्मिक अनुबंधांविषयी सविस्तर माहिती दिली.

संमेलनानिमित्त सकाळपासून मंत्रजागर, धर्मशास्त्रीय शंकासमाधान, परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यज्ञीय वृक्षांचे समकालीन महत्त्व या विषयावर वैद्य कौशिक दाते (सोलापूर) यांचे व्याख्यान झाले. आयुर्वेद शास्त्रानुसार ग्रहांप्रमाणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या वृक्षांच्या गुणधर्माबद्दल त्यांनी सविस्तर विवेचन केले.

प्रास्ताविकात श्रद्धा परांजपे यांनी संस्थेच्या कार्याची ओळख करून देत वैदिक संमेलानाच्या तीन दिवसातील उपक्रमांचा आढावा घेतला. याप्रसंगी संस्थेच्या कार्याला हातभार लावणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर खांडेकर, तुषार भट यांनी केले तर आभार श्रीकांत फडके यांनी मानले.

महसूल सप्ताहानिमित्त जिल्ह्यात पाणंद, शिवरस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि.३: ‘महसूल सप्ताह २०२५’च्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी करुन दुतर्फा वृक्षारोपण लावण्याकरिता उद्दिष्ट निश्चित करुन त्यानुसार कार्यवाही करण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्देश दिले.

जुन्नर तालुक्यात टिकेकर वाडी, नारायणगाव, शिरोळी, उदापूर, आर्वी, पिंपळगाव, आंबेगाव तालुक्यात लौकी येथे पाणंद रस्त्याच्या तसेच मावळ तालुक्यात इंदुरी सांगुडी येथे शिव रस्त्याच्या तसेच नवलाख उंबरे, मंडळ वडगाव, गहुंजे ते सांगवडे, थोराण येथील स्मशानभूमी कडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.

मुळशी तालुक्यातील चाले, नेरे, दत्तवाडी, भुगाव, आंग्रेवाडी, भुकूम, कुळे, खुबवली, मारूंजी ९ गावामध्ये तसेच घोटावडे गावठाण ते बंधाऱ्याकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याच्या
अंदाजे दीड कि.मी.दोन्ही बाजूला वृक्षारोपण केले.

अप्पर तहसील पिंपरी चिंचवड.अंतर्गत
निरगुडी व विठ्ठलनगर, देहू येथे पाणंद रस्त्याच्या दुतर्फा तसेच अप्पर तहसील लोणी काळभोर अंतर्गत अष्टापूर ते पिंपरी-सांडस शिवस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केले आहे.

हवेली तालुक्यात खेडशिवापुर येथील श्रीरामनगर गाव ते गाऊडदरा या दोन गावांना जोडणाऱ्या शिव रस्त्याची दुतर्फा वृक्षारोपण लागवड करण्यात आली. भोर तालुक्यात भोंगवली येथे वृक्षारोपण आणि बंद असलेले १०० हून अधिक रस्ते वाहतूकी साठी पुन्हा सुरू करण्यात आले. वेल्हा (राजगड) येथील अडवली, कानंद, ओसांडे, बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये पानंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली.
खेड येथील चाकण महसूल मंडळातील गोणवडी ते बोरदरा शिवरस्ता खुला करून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.

पुरंदर तालुक्यातील मौजे आडाचीवाडी येथे पाणंद रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली. तसेच शेतकऱ्यांच्या सहमतीने पानंद रस्ता मोकळा करून लोकसहभागातून मुरूमीकरणाचे काम सुरू करण्यात आले.दौंड तालुक्यात एकूण १६ तसेच शिरूर तालुक्यात १० गावांमध्ये वृक्षलागवड करण्यात आली.

या मोहिमेत गावातील ग्रामस्थानी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, दरम्यान रस्त्यासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रशासनाच्यावतीने सत्कार करण्यात आला, असेही श्री. डुडी म्हणाले.

श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 561 जणांनी केले रक्तदान

पुणे – मानाचा चौथा महागणपती म्हणून प्रसिद्ध असलेले श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदानात पुण्यातील विविध गणेश मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध ढोल ताशा पथकातील वादक मित्र असे मिळून तब्बल 561 युवकांनी रक्तदान केले .
हे शिबिर रविवार, दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत नु. म. वि. शाळा, बाजीराव रोड येथे आयोजित करण्यात आले होते . या रक्तदान शिबिरास  कसब्याचे  आमदार हेमंत रासने, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे सह मानाचा पहिला श्री कसबा गणपती चे अध्यक्ष श्रीकांत शेटे आदी मान्यवरांनी भेट दिली . यावेळी रक्तदान करण्यास तरुणांसोबत
तरुणीचाही उत्साह दिसून आला
रक्तदान शिबिरात रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, स्वरुपवर्धिनी, श्री गजलक्ष्मी, शिवमुद्रा, गजर प्रतिष्ठान, स्वराज्य ट्रस्ट, उगम प्रतिष्ठान, तालगर्जना, मैत्री वेलफेअर फाउंडेशन, समर्थ प्रतिष्ठान, नादब्रम्ह ट्रस्ट ढोल ताशा पथकांचा समावेश होता.तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे श्री विकास जी पवार (अध्यक्ष),  विनायक जी कदम (उपाध्यक्ष),  नितीन पंडित  (कोषाध्यक्ष),कृष्णकुमार गोयल (स्वागताध्यक्ष), सह आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .

डीजे आणि लेझर बीमवर खटले टाकून उपयोग काय ? दोन्हींचा वापर होऊच नये – खर्डेकर

आयुक्त साहेब विसर्जन मिरवणूक सुरु कधी करायची ,मंडळाच्या विसर्जन रथांचा क्रम कसा असेल ..सामोपचाराने ठरवा हो

पुणे- पुण्याच्या गणेशोत्सवाची जागतिक पातळीवर ओळख आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीला दिशा देणारा उत्सव म्हणून लोकप्रिय झालेल्या उत्सवाने आता सामाजिक चळवळीचा वेध घ्यायला सुरुवात केल्याचे दिसून यावे अशी दिशा मिळू लागणार आहे . हा उत्सव अगदी २ वर्षाच्या मुला पासून ते ९० वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वांनाच हवाहवासा वाटावा कोणालाही उपद्रवकारक वाटू नये यासाठी आता अधिक काळजी घेण्याचे प्रयत्न देखील सुरु झालेत . गुलालाची उधळण रोखली गेली,विना गुलाल मिरवणुकीचे प्रयत्नही बऱ्याच अंशी यशस्वी झाल्याचे पूर्वीच पाहायला मिळालेत त्यानंतर आता कर्णकर्कशच नव्हे तर हृदयाला आणि कानांना इजा पोहोचविणारे DJ नकोतच आणि डोळ्यांना इजा पोहोचविणारे लेझर बीम देखील नकोत अशी भूमिका संदीप खर्डेकर , अंकुश काकडे आणि श्रीकांत शिरोळे आणि अनेकांनी व माध्यमांनी देखील गेल्या काही वर्षापूर्वीपासून मांडायला सुरुवात केली , पण DJ आणि लेझर बीम वर अद्याप म्हणावा तसा आवर घालता आलेला नसावा असे मानले जाते ,ते वापरणाऱ्यावर खटले भरले जातात .. पण त्यांना काहीही अर्थ नसतो . ती तेवढ्यापुरती कारवाई असते , नंतर हे खटले काढूनही घेतले जातात . त्यामुळे DJ आणि लेझर बीम नसावेतच या साठी पोलिसांनी काही भूमिका घेणे गरजेचे असल्याचे बोलले जाऊ लागले आहे . या शिवाय विसर्जन मिरवणूक जर २४ तासात संपवायची असेल तर ती सकाळी ७ वाजता सुरु करावी असा आग्रह हि आता धरला जातोय . मानाच्या गणपतींनी दिवसभर व्यतीत केल्यावर अन्य मंडळांना तेवढी स्पेस मिळत नाही हि खंत व्यक्त केली जाते . त्यात आता मनाच्या गणपती नंतर विसर्जन मिरवणुकीत भाऊ रंगारी आणि मंडई गणपतीने सहभागी होण्याची घोषणा केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता भाजपचे प्रवक्ते असलेले संदीप खर्डेकर यांनी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष म्हणून पोलीस आयुक्तांना एक पत्र देत मंडळांची बैठक बोलवा आणि सामोपचाराने सारे काही ठरवा असे आवाहन केले आहे. काय म्हटले आहे नेमके खर्डेकर यांनी या पत्रात ते वाचा जसेच्या तसे…..

प्रती,
मा. अमितेशकुमार,
पोलीस आयुक्त, पुणे…
विषय – गणेश विसर्जन मिरवणूकीतील गैरप्रकारांबाबत….

मा. महोदय,
मी गणेशोत्सवाशी 1983 सालापासून जोडलेला कार्यकर्ता असून आता चाळीस वर्षाहून जास्त काळ विविध मंडळाशी संबंधित आहे.
गणेशोत्सवाला आता जेमतेम वीस दिवस राहिलेत आणि विसर्जन मिरवणूकीतील मानाच्या गणपतींच्या नंतर च्या क्रमवारी वरून मतभेदाचे फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. भाऊसाहेब रंगारी मंडळ आणि अखिल मंडई मंडळाने मानाच्या गणपतीपाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होण्याची घोषणा केल्यानंतर काही मंडळानी सकाळी सात ला मिरवणूक सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. तर काहींनी परस्पर केलेले घोषणेला विरोध दर्शविला आहे.या परिस्थितीत शहरातील प्रमुख गणेश मंडळाचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व सार्वजनिक उत्सवांशी संबंधित शहरातील काही प्रतिष्ठित नागरिक यांची तातडीने बैठक घेऊन याबाबत चे धोरण निश्चित करावे आणि ह्या विषयांवरून गणेशोत्सवाची शांतता भंग होऊ नये यासाठी सर्वांच्या सहमतीने सर्वमान्य धोरण निश्चित करावे अशी आग्रही मागणी करत आहे.
गतवर्षी मी, अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे यासह अनेक पुणेकरांनी डीजे च्या वापरावर निर्बंध आणावेत यासाठी मोहीम उघडली होती. यावर्षी मध्यवर्ती भागातील मंडळाना मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ देणारे उद्योजक पुनीत बालन यांनी डीजे विरुद्ध घेतलेली भूमिका स्वागतार्ह असून यामुळे मोठा फरक पडेल असे दिसते.
यासह मिरवणूकीतील काही गैरप्रकारांबाबत पोलीस प्रशासनाने पाऊले उचलणे गरजेचे आहे असे वाटते.
यात प्रामुख्याने…
1) मिरवणुकीतील डीजे आवाजाच्या पातळीवर आणि डोळ्यांना इजा करणाऱ्या लेझर बीम वर पोलीस खात्याने अंकुश ठेवणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी आधीच मंडळाशी संवाद साधावा असे वाटते. कारणं ऐन मिरवणुकीत mob psychology मुळे आणि रस्त्यावर असलेल्या प्रचंड गर्दी मुळे पोलीस कारवाई करत नाहीत आणि नंतर दाखल केलेल्या खटल्यांना काहीच अर्थ उरत नाही.
2) बाहेरून मिरवणूक बघायला आलेली आणि शिक्षणासाठी आलेली काही मंडळी झुंडीने विविध मंडळापुढे नाचण्यासाठी उत्सुक असतात. ते कुठल्याही मंडळाचे कार्यकर्ते नसतात आणि त्यांच्यामुळे मिरवणूक रेंगाळते, यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
3) मुलांच्या, पुरुषांच्या अश्लील हावभाव करत केलेल्या नृत्यामुळे उत्सवाचे पावित्र्य भंग होतेच पण गेली काही वर्षे महिलांचा / मुलींचा मिरवणुकीत सहभाग वाढत असून त्यांच्यात देखील अश्लील हावभाव करत नाचणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, यावर देखील लक्ष ठेवणे गरजेचं आहे असं वाटतं.
4) सध्या पुणे शहरात बहुतांश नवे पोलीस अधिकारी नेमणूकीस आहेत. पुणेकरांना ओळखणारे आणि पुणेकर असलेले व मंडळाच्या कार्यकर्त्यांची मानसिकता जाणणारे अधिकारी फारसे राहिले नाहीत, ही बाब लक्षात घेऊन या महत्त्वाच्या उत्सवासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे पथक तयार करावे ही विनंती.
5) ढोल ताशा पथकातील वादक हे एका मंडळाचे विसर्जन झाल्यावर दुसऱ्या मंडळाच्या वादनासाठी लक्ष्मी रस्त्याने खांद्यावर ढोल घेऊन उलटे जाताना प्रचंड धक्काबुक्की करत जातात, तसेच वादन करताना देखील जोशात उड्या मारतात व टिपरू इतके उंचावतात की ते नागरिकांना लागतेच. त्याच बरोबर पथकातील वादकांची संख्या मर्यादित असावी याबद्दल देखील मार्गदर्शक सूचना द्याव्यात ही विनंती.
6) काही तथाकथीत पोलीस मित्र किंवा स्वयंसेवक हे प्रचंड दादागिरी करतात व फुकट फौजदारकी करताना महिलांना, लहान मुलांना,शहरातील प्रतिष्ठितांना देखील सोडत नाहीत व ह्यांच्या अरेरावी मुळे सगळेच त्रस्त झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे ह्यांना देखील आवर घालण्याची आवश्यकता आहे याची दखल घ्यावी.
यासह वेळोवेळी अन्य उपयुक्त सूचना करेनच… तूर्त ह्या बाबतीत गांभीर्याने विचार करून कार्यवाही करावी ही विनंती.
आपलाच,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995

मशिदींवरील भोंगे, लाऊड स्पीकर हटवा,न्यायालयाचा अवमान आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान करणे थांबवा – किरीट सोमैय्या फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल

पुणे- मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, अपर पोलीस महासंचालक यांची नियमावली (SOP), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान सभेतील घोषणा या सर्वांचा आधार घेत मशिदींवरील भोंगे हटवा याबाबत लेखी निवेदन देण्यासाठी आज भाजप नेते किरीट सोमैया यांनी पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले .

वाचा त्यांचे लेखी निवेदन जसेच्या तसे …….

संदर्भः केएस/मुंबई/02/3805/2025
दि. 03 ऑगस्ट, 2025
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन
पुणे.

महोदय,
विषयः मशिदी वरील अनधिकृत भोंगे / लाऊड स्पीकर.
संदर्भ :- मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, अपर पोलीस महासंचालक यांची नियमावली (SOP), मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस यांची विधान सभेतील घोषणा.
मुंबई उच्च न्यायलयाने जानेवारी 2025 मध्ये मशिदीवर (धर्मस्थानात) अनधिकृत भोंगे, लाऊडस्पीकर, ध्वनी प्रदूषण संबंधात अंतिम आदेश दिले. यात त्यांनी ध्वनी मर्यादा 50 डेसीबल पेक्षा अधिक असू नये यासंबंधी स्पष्ट निर्देश दिले आहे.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्टपणे सांगितलं आहे की, “भोंगे चालणार नाही”.
मुंबई मध्ये भोंगा मुक्त मुंबई मोहीम यशस्वी रित्या मुंबई पोलीसांनी पार पाडली.
महाराष्ट्रात आपल्या भागात मोठ्या प्रमाणात मशिदीवर अनधिकृत भोंगे आहेत. ध्वनी प्रदूषण पण तीव्र आहे. अनेक मशिदच्या ट्रस्टींनी लाऊडस्पीकर / भोंग्याची परवानगी घेतलीच नाही. ध्वनी मापक यंत्रही बसवले नाही.
मशीद आणि मदरसा परवानगी न घेता किंवा मिळालेल्या परवानगीचे निर्देश न पाळता मोठ्या प्रमाणात आपल्या भागात लाऊडस्पीकर, भोंगे वाजवत आहे, दिवसा 4/5 वेळा अश्या प्रकाराने गोंगाट होतो हे महाराष्ट्रातील जनतेला, न्यायालयाला, महाराष्ट्र अपर पोलीस महासंचालक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आम्हाला मान्य नाही.

  1. काही पोलीस अधिकारी आम्ही परवानगी दिली नाही असे सबब दाखवून कारवाई करत नाही.
  2. वास्तविकरीत्या ध्वनी प्रदूषणची मर्यादा, ध्वनी आवाज यांच्या मर्यादेत भोंगे बसूच शकत नाही. एवढ्या उंचीवर, खुल्या आकाशात बाहेरच्या जनतेसाठी भोंगे, लाऊडस्पीकर लावणे हे कायद्यात बसतच नाही,
  3. हे बेकायदेशीर आहे हे माहीत असूनही अनेक पोलीस स्टेशनचे अधिकारी कारवाई करत नाही याची गंभीर दखल घ्यावी लागणार.
  4. काही पोलीस अधिकारी आम्ही डेसीबल मोजतो हे सांगतात त्यावेळी हे सत्य नसते, कारण एवढ्या उंचीवरून, मीनाऱ्यावरून त्या लाऊडस्पीकर / भोंग्याच्या तोंडाशी धरून जे ध्वनीवर्धक माप घ्यावे लागते, ते घेता येत नाही, हे शक्यच नाही.
  5. पोलीस कॉन्स्टेबल हे मशिदी/ मदरसाच्या समोरच्या फुटपाथ वरून, लांबून काही वेळेला माप घेतात आणि रिपोर्ट देतात हे फक्त चुकीचं नाही तर बेकायदेशीर आहे हे स्थानिक पोलीसांनी लक्षात ठेवावे लागणार.
  6. आपल्या भागातील सगळ्या मशिद, मदरसावरवर जर लाऊडस्पीकर, भोंगे असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई करणे हे बंधनकारक आहे.
  7. कोणत्याही मशिद (धर्मस्थानक) यांना परवानगी हवी असल्यास 10 X 15 इंच बॉक्स स्पीकरची परवानगी देता येते ही परवानगी तिथे येणाऱ्या त्यांच्या भक्तांना व्यवस्थित ऐकायला जावे त्यासाठी दिली जाते त्याचे तोंड हे आतल्या बाजूला असणे बंधनकारक आहे.
    आपण यासंबंधात ताबडतोब कारवाई करावी. आपल्या भागातील मदरसा, मशिदीवरील अनधिकृत भोंगे/लाऊडस्पीकर ताबडतोब काढण्यात यावे ही विनंती.
    न्यायालयाचा अवमान आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान करणे तसेच पोलीस महासंचालक यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणे हे मान्य नाही.
    धन्यवाद !
    आपला,
    (डॉ. किरीट सोमैया)

हिंदूंच्या कथित बदनामी’चा थयथयाट करून युतीकडून सत्तेतील अपयश लपवण्याचा प्रयत्न..!

२०१४ ते १९ स्व-सत्ताकाळात प्रगट का करू शकले नाहीत..काँग्रेस’चे हिंदू बदनामीचे षडयंत्र ..? सरकारी वकील बदलून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता काय..?

नैतिक व संविधानिक Character Less (चारीत्र्य हिन) राजवटीत गुन्हेगार व भ्रष्टाचाऱ्यांना मोकळीक …! काँग्रेस’ची प्रखर टिका
पुणे दि ३ ॲागस्ट २५
मुंबई बॅाम्ब स्फोटा नंतर, मालेगाव बॅाम्ब स्फोटातील हिंदुत्ववादी संघटनेच्या आरोपींना, सन्मानपुर्वक नव्हे तर ‘पुराव्या अभावी’ एनआयए विशेष न्यायालयाने आरोप मुक्त केल्याने ‘सत्तेतील भाजप व शहा प्रायोजक, शिंदे सेनेचा’ काँग्रेसच्या नावे चाललेला थयथयाट हा सत्तेतील अपयश लपवण्याचा प्रयत्न चालल्याची टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, मालेगांव बाँम्ब स्फोटा’चा तपास तत्कालीन एटीएस प्रमुख, कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी म्हणून ख्याती असलेले श्री हेमंत करकरे यांनी केला होता. त्यावेळी संबंधित आरोपीं विरोधातील ॲाडीओ क्लिप्स, इलेक्ट्रॉनिक साहित्य, जबाब इ सक्षम पुरावे देखील समोर आल्याचा सुतोवाच तपास यंत्रणे कडुन झाला होता.
२०१४ नंतर देशात व राज्यात सत्तापालट झाल्यानंतर
सरकारी वकील रोहिणी सालीयान यांनी एनआयए कडून न्यायालयीन कामकाजात दबाव येत असल्याचे स्पष्ट केल्यावर ही, त्यांचे जागी ‘नविन सरकारी वकीलांची नेमणूक’ कोणत्या हेतूने केली (?) असा सवाल ही काँग्रेस ने विचारला.
सप्टेंबर २०११ मध्ये देशातील राज्यांचे पोलीस प्रमुख व आयबी’चे संचालक यांचे बैठकीत तपास यंत्रणेतील गंभीर बाबी पुढे आल्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी गृहमंत्री नात्याने ‘भगवा दहशतवादाचे’ प्रयत्न काही प्रवृत्तीं कडून सुरू असल्याचा सुतोवाच केला. असीमानंद सारख्या आरोपींचा कबुली जवाब ही त्यावेळी पुढे आला होता.
देशाच्या गृहमंत्र्यांचे ‘सकृत दर्शनी परिस्थिती’वरील मत हे पक्षाचे राजकीय मत’ नसते तर तत्कालीन वास्तव परिस्थितीवर असते.
न्यायालयाने आरोपींना पुरावा अभावी निर्दोष निकाल दिल्यानंतरच् भाजप’ने ‘भगवा दहशतवाद’ वक्तव्यावर रान पेटवण्याचा प्रयत्न करणे हे सत्तेतील अपयश लपवण्याचा व जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे गोपाळदादा तिवारी यांनी सांगीतले.
काँग्रेस’वर षडयंत्राचा आरोप करतांना “२०१४-१९ राज्यात व देशात एक हाती सत्ता असुनही” एक ही एफआयआर नोंदवू शकले नाही वा त्यावर ब्र शब्द ही केला नाही (?) त्यावेळी सरकारी वकील बदलून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता काय..? असा उपरोधिक सवाल काँग्रेस ने केला.
काँग्रेस ‘हिंदू विरोधी’ असल्याचा तथ्यहीन, बालीश आरोप करणारे ‘भारतीय संस्कृतीचा’ इतिहास सांगणाऱ्या ‘रामायण व महाभारत’ मालिका सुमारे ३ वर्षे तत्कालीन पंतप्रधान इंदीराजी व राजीवजी गांधी यांनीच देशात आणलेल्या टीव्ही- दुरदर्शन मुळे दर रविवारी घरोघरी दाखवल्या गेल्याचे सोईस्कर विस्मरणात गेले काय असा खोचक सवाल ही राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी विचारला.
महायुती सरकार, न्यायालयाच्या ‘मुंबई बॅाम्ब हल्ला निर्णय’ विरोधात अपील करणार, मात्र मालेगांव स्फोट निर्णय विषयी अपील करणार नाही (?) हे धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस’ला मान्य आहे काय (?)असा ही सवाल त्यांनी अजीतदादा पवारांना केला.
जेंव्हा केंद्रीय तपास यंत्रणेने आरोपीं विरुध्द ‘मृत्यु दंडाची’ मागणी केली होती, तर ‘एनआयए’ची विश्वासार्हता पणास लागली असतांना ‘वरीष्ठ न्यायालयात’ अपील करणे नैसर्गिक न्याय तत्वाने अपेक्षित आहे.
त्यामुळे सरकार अपील बाबत ‘जात व धर्म’ पाहून निर्णय घेऊन, मंत्री पदाच्या शपथे विरोधी भुमिका घेणार काय(?) व निष्पाप नागरिकांच्या हत्ये बाबत न्याय मिळणार काय (?) याकडे देशातील जनतेचे लक्ष असल्याचे काँग्रेस ने म्हंटले आहे.

‘सनातनी दहशतवाद’ ही भाषा म्हणजे हिंदू धर्माचा अपमान: नीतेश राणे

आव्हाड यांच्या विधानाशी पवार-सुप्रियाताई सहमत आहेत का?,

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ‘सनातनी दहशतवाद’ या विधानावरून राज्यात नवा राजकीय वाद पेटला आहे. भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी या मुद्द्यावरून आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ही भाषा म्हणजे हिंदू धर्माचा अपमान असून, आव्हाडांच्या या भूमिकेशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सहमत आहेत का, असा थेट सवाल राणे यांनी केला आहे.

राणेंची पोस्ट काय?

नीतेश राणे म्हणाले की, ‘हिंदू दहशतवाद’ किंवा ‘सनातनी दहशतवाद’ ही भाषा भारताच्या हिंदू आणि संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे. आधी सुशीलकुमार शिंदे मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरत आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याशी शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे सहमत आहेत का? राष्ट्रवादी शरद पवार गटाचीही भूमिका हीच आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं.

नीतेश राणे म्हणाले की, खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदू धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच आव्हाडांचा अजेंडा असतो. दहशतवाद हा हिंसेशी जोडलेला असतो, जिचा उद्देश लोकशाही, सहिष्णुता आणि समाजविरोधी कट रचणं असतो. सनातन हिंदू परंपरेचा इतिहास हा प्रश्नौत्तरं, संवाद, वैचारिक संघर्ष आणि लोकशाहीचं दर्शन आहे.
मतदारसंघासाठी महाराष्ट्राचे वाट्टोळे करू नका

नीतेश राणे म्हणाले की,‘सनातनी दहशतवाद’ हा शब्द वापरणं म्हणजे आपल्या इतिहासाची, हिंदू परंपरेची आणि सामाजिक क्रांतीच्या प्रवाहाची थट्टा करण्याचा प्रकार आहे. इथल्या हिंदू समाजानं तुमच्या ‘बाटग्या’ विचारांना कधी साथ दिली नाही आणि भविष्यातही ते देणार नाहीत. केवळ आपला एक मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे वाट्टोळे करू नका.

सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल !:बुद्ध, फुले, आंबेडकरांचा छळ करणारेच खरे दहशतवादी- जितेंद्र आव्हाड


मुंबई-“सनातनी दहशतवाद” ही संकल्पना आजची नाही, तर प्राचीन काळापासून सुरू आहे. भगवान बुद्ध, संत, समाजसुधारक, महापुरुष यांच्यावर अन्याय करणारे तेव्हाचे आणि आजचेही सनातनी दहशतवादीच आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, तुम्हाला राजे म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही, असे म्हणत त्यांची हेटाळणी करणारे सनातनी दहशतवादीच होते.शत्रूशी हातमिळवणी करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा कट रचणारे सनातनी दहशतवादीच होते.

जितेंद्र आव्हाडांची पोस्ट काय?

जितेंद्र आव्हाड यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल ! सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे…भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. बौद्ध भिख्यूंना मारणारे तत्कालीन सनातनी दहशतवादीच होते. चार्वाकाला मारणारे सनातनी दहशतवादीच होते. बसवेश्वरांना मारणारे सनातनी दहशतवादीच होते. संत ज्ञानेश्वरांना छळणारे सनातनी दहशतवादीच होते. संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, तुम्हाला राजे म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही, असे म्हणत त्यांची हेटाळणी करणारे सनातनी दहशतवादीच होते.शत्रूशी हातमिळवणी करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा कट रचणारे सनातनी दहशतवादीच होते. त्यांना शत्रूच्या हातात पकडून देणारेही सनातनी दहशतवादीच होते. महात्मा फुलेंवर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांच्या खुनाची सुपारी देऊन मारेकरी घालणारे सनातनी दहशतवादीच होते. स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आद्य शिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्यावर शेणगोटे मारणारे सनातनी दहशतवादीच होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांना बदनाम करणारे , त्यांच्या खुनाचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते. एका वर्गाला शूद्र ठरवून त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणारे सनातनी दहशतवादीच होते.
माणसाला माणूस म्हणून जगूच द्यायचे नाही; शूद्रांना पाण्यापासून वंचित ठेवणारे सनातनी दहशतवादीच होते.
आगरकर हे केवळ सनातनी प्रवृत्ती विरोधात होते म्हणून त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसवणारे आणि ते शिक्षणापासून वंचित कसे राहतील, याचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते. महात्मा गांधी यांच्यावर अनेकदा हल्ले करणारे आणि प्रार्थनेला जाणाऱ्या निशस्त्र महात्म्यावर गोळ्या झाडणारे सनातनी दहशतवादीच होते.
अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी झगडणारे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे सनातनी दहशतवादीच होते.
सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या गोविंद पानसरे यांचा खून करणारे सनातनी दहशतवादीच होते.
कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या समाज सुधारणेच्या कार्याला संपवण्यासाठी त्यांना ठार मारणारे सनातनी दहशतवादीच होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, स्त्रियांना या समाजात स्थानच नाही. त्या केवळ उपभोगाच्या वस्तू आहेत, असे मानणारे सनातनी दहशतवादीच होते. आपली आई उपभोगण्याची वस्तू आहे, असे मानणारे सनातनी दहशतवादीच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान ज्या सनातनी दहशतवादाविरोधात होते, त्या मनु स्मृतीला आपले संविधान मानणारे सनातनी दहशतवादीच होते. या सनातनी दहशतवादाने भारताला जाती-व्यवस्थेत ढकलले अन् सनातन्यांनीच देशात विषमतावादी वर्णव्यवस्था लादली. अशांना सनातनी दहशतवादी म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? ‘सनातनी दहशतवाद’ हा शब्द मागील हजारो वर्ष अस्तित्वात होता अन् पुढील हजारो वर्ष अस्तित्वात राहिल. जोपर्यंत जातीव्यवस्था – वर्णव्यवस्था आहे, तोपर्यंत सनातनी दहशतवाद विसरताच येणार नाही.

लष्करी अधिकाऱ्याची स्पाइसजेटच्या 4 कर्मचाऱ्यांना मारहाण:एकाचा पाठीचा कणा तुटला, तर दुसऱ्याचा जबडा; बेशुद्ध कर्मचाऱ्याला लाथा मारत राहिला..

नागरी विमान वाहतूक मंत्रालयालाही पत्र पाठवण्यात आले..७ दिवसानंतर घटना उघडकीस ..

श्रीनगर -जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर विमानतळावर, एका लष्करी अधिकाऱ्याने अतिरिक्त सामानावरून स्पाइसजेटच्या चार कर्मचाऱ्यांना मारहाण केली. एका कर्मचाऱ्याचा पाठीचा कणा तुटला. दुसऱ्याचा जबडा तुटला. तिसऱ्याच्या नाकातून रक्त येऊ लागले. तरीही आरोपी त्यांना लाथा मारत राहिला, चौथा कर्मचारी बेशुद्ध पडला.ही घटना २६ जुलै रोजी घडली. हे प्रकरण आता उघडकीस आले आहे. एअरलाइननेही एक निवेदन जारी करून आरोपी लष्करी अधिकाऱ्याला नो-फ्लाइंग लिस्टमध्ये टाकले आहे. लष्करानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि आरोपींवर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.
२६ जुलै रोजी, श्रीनगरहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या फ्लाइट SG-386 च्या बोर्डिंग गेटवर एका प्रवाशाने, जो लष्करी अधिकारी असल्याचे सांगितले जाते, त्याने चार कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला.एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, आरोपी अधिकाऱ्याकडे दोन केबिन बॅगा होत्या, ज्यांचे एकूण वजन १६ किलो होते. हे ७ किलोच्या मर्यादेच्या दुप्पट होते. स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला सांगितले की तुमचा सामान निर्धारित मानकांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.आरोपी अधिकाऱ्याने अतिरिक्त पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर, तो बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण न करता जबरदस्तीने एअरोब्रिजमध्ये घुसला. हे सुरक्षा नियमांचे उल्लंघन होते.

कर्मचाऱ्यांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जवळच ठेवलेल्या स्टँडने त्याने कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यांना लाथा आणि मुक्काही मारले. त्यापैकी काहींना जबड्याला दुखापतही झाली.स्पाइसजेटचा एक कर्मचारी जमिनीवर बेशुद्ध पडला, पण प्रवासी बेशुद्ध कर्मचाऱ्याला लाथ मारत राहिला. बेशुद्ध कर्मचाऱ्याला मदत करण्यासाठी खाली वाकत असताना, दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या जबड्यावर जोरदार लाथ मारली गेली आणि त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येऊ लागले. जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे एअरलाइनने सांगितले. नागरी विमान वाहतूक नियमांनुसार, प्रवाशाला नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.स्पाइसजेटने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून त्यांच्या कर्मचाऱ्यांवरील प्राणघातक हल्ल्याची माहिती दिली आहे आणि योग्य कारवाई करण्याची विनंती केली आहे. एअरलाइनने विमानतळ अधिकाऱ्यांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना सोपवले आहे.