Home Blog Page 186

ब्राह्मण महासंघाच्या संघटनात्मक वाढीसाठी मेळावे, संमेलने आवश्यक : डॉ. गोविंद कुलकर्णी

जिल्हाध्यक्ष केतकी कुलकर्णी यांच्या पुढाकारातून मेळावा, सभासद संमेलनाचे आयोजन

पुणे : ब्राह्मण महासंघाचे कार्य महाराष्ट्रासह देशातील 22 राज्यात सुरू आहे. नव्या काळाची आव्हाने पेलण्यासाठी संघटन मजबूत करणे, सदस्यसंख्या वाढवणे आणि सातत्याने एकत्र येणे आवश्यक आहे. महिला मेळावे, सभासद संमेलनासारखे उपक्रम त्यामुळे स्वागतार्ह आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी रविवारी येथे केले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष केतकी कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या महिला मेळावा व सभासद संमेलनात ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, माजी प्रदेशाध्यक्षा मोहिनी पत्की, जिल्हाध्यक्ष मंदार रेडे आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष केतकी कुलकर्णी हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. लॉ कॉलेज रोडवरील आगाशे शाळेच्या सभागृहात मेळावा आयोजित केला होता. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी केतकी कुलकर्णी यांच्या निवडीची घोषणा या प्रसंगी करण्यात आली.
प्रास्ताविक करताना केतकी कुलकर्णी म्हणाल्या, आपल्या ज्ञातीचा अभिमान बाळगत, एकत्र येणे आणि संघटन वाढवणे, यावर भर देत महिला आघाडीचे काम सुरू आहे. उद्योजकीय वृत्ती वाढीस लागावी, यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
डॉ. गोविंद कुलकर्णी पुढे म्हणाले, “केतकी कुलकर्णी यांच्या समर्थ आणि धडाडीच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा महिला आघाडी उत्तम कार्य करत आहे. लवकरच महासंघाच्या 10 हजार पदाधिकाऱ्यांचा माहिती असणारे बुकलेट प्रकाशित केले जाईल. प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी महासंघाच्या विविध शाखांची व कार्याची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी मनोगत व्यक्त केले.
मोहिनी पत्की म्हणाल्या, ज्ञातीमधील पौरोहित्य करणाऱ्यांना नियमित मानधन मिळावे, तसेच ॲट्रोसिटीचा अधिकार मिळावा, या मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करण्याची आवश्यकता आहे.
आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक या विषयावर मार्गदर्शन करताना यामिनी मठकरी यांनी महिलांचे आर्थिक विषयांतील निर्णयस्वातंत्र्य आणि सूक्ष्म नियोजन, यांची सांगड आवश्यक असल्याचे सांगितले. रेणुका जोशी यांनी महिलांचे आरोग्य हा विषय मांडला.
महासंघासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा स्तरावरील महिला शाखांच्या अध्यक्षांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगते व्यक्त केली. नेहा नाटेकर यांनी शंखवादन केले. सीमा रानडे यांनी सरस्वती वंदना सादर केली. माधवी पानसरे यांनी सूत्रसंचालन केले तर महिला आघाडीच्या सरचिटणीस आकांक्षा देशपांडे यांनी आभार मानले.

नदी सुधार योजनेत अपघात..मातीच्या ढिगार्‍याखाली दबले चौघे :वाचवले 3 जणांचे प्राण

पीएमआरडीएच्या पथकाचे बचाव कार्य; एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

पुणे (दि.४ ) : नांदेड सिटी शेजारी पुणे महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या पाईप लाईनच्या मातीच्या ढगाराखाली दबलेल्या ४ पैकी ३ कामगारांचे प्राण वाचवण्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन विभाग आणि पीडीआरएफच्या पथकाला यश आले. संबंधित कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु या घटनेत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.४) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली.

गेल्या काही दिवसापासून नांदेड सिटी शेजारी जायका प्रोजेक्ट अंतर्गत नदी सुधार योजनेचे सुरू आहे. यासाठी संबंधित भागात पाईपलाईन टाकण्यासाठी मोठी चारी खोदण्याचे काम सुरू होते. पण दुर्दैवाने या चारित ४ कामगार मातीच्या ढिगार्‍याखाली दबल्याची घटना घडली. यासंबंधी सायंकाळी सहा वाजता पीएमआरडीएच्या पथकाला माहिती मिळताच त्यांनी तातडीने अवघ्या पाच ते सात मिनिटात घटनास्थळ गाठत मदत कार्यास सुरुवात केली. त्यामुळे चार जणांपैकी तिघांना वाचवण्यात पीएमआरडीएच्या अग्निशमन विभाग व पीडीआरएफच्या पथकाला यश आले. यातील एका कामगाराचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला.

मदत कार्य तातडीने मिळाल्यामुळे चार कामगारांपैकी तिघांचा जीव वाचवण्यात पीएमआरडीएच्या पथकाला यश आले. संबंधित कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या पथकात अग्निशमन व पीडीआरएफच्या ३० जवानांनी शर्तीचे प्रयत्न केले. पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागासह पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन जवान आणि पीडीआरएफ जवान यांनी रेस्क्यू ऑपरेशन केले.

सत्यं शोधं सुंदरम्‌‍‌’ने ‌‘पुरुषोत्तम‌’चा शुभारंभ

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेला रविवार, दि. 10 ऑगस्ट रोजी प्रारंभ होणार आहे. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च ‌‘सत्यं शोधं सुंदरम्‌‍‌’ या एकांकिकेने हीरक महोत्सवी वर्षातील स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

स्पर्धा दि. 10 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2025 या कालावधीत भरत नाट्य मंदिरात होणार आहे. स्पर्धेसाठी 51 संघांनी प्रवेश निश्चित केला असून स्पर्धेचे लॉटस्‌‍ आज (दि. 4 ऑगस्ट) शनिवार पेठेतील सुदर्शन रंगमंच येथे विद्यार्थी प्रतिनिधींच्या उपस्थितीत काढण्यात आले. स्पर्धेसंदर्भातील नियमावली स्पर्धक संघांना सुरुवातीस समजावून सांगण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी स्पर्धकांच्या हस्ते चिठ्ठ््या काढून लॉटस्‌‍ निश्चित करण्यात आले.

स्पर्धा दि. 10, दि. 17 आणि दि. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 9 अशा दोन सत्रात होणार असून दि. 11 ते 16 ऑगस्ट आणि दि. 18 ते 23 ऑगस्ट या कालावधीत सायंकाळी 5 ते 9 या वेळात होणार आहे.

नाट्यकलेतून आदर्शवत माणूस घडतो : श्रीयोगी मुंगी

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित नाट्यछटा स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पुणे : नाट्यकलेद्वारे माणूस केवळ शिकत नाही तर चांगला, आदर्शवत माणूस म्हणूनही घडतो. नाट्यकलेचे संस्कार बालवयापासूनच होत आहेत ही आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यावाणीचे कार्यक्रम अधिकारी श्रीयोगी मुंगी यांनी व्यक्त केले.

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित 34व्या दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी श्रीयोगी मुंगी बोलत होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ कवयित्री संजीवनी बोकील यांच्या हस्ते झाले.

संजीवनी बोकील यांनी स्पर्धकांना गोष्टीरुपी मार्गदर्शन केले. शूरसेनची गोष्ट सांगून निसर्गातील पाने फुले वेली, फळे आणि बागा कशाप्रकारे मानवी जीवन सुंदर करण्यासाठी मानवाला मदत करतात हे सांगितले. आपल्या आजूबाजूचे वातावरण कितीही प्रदूषित झाले असले तरी आपले मन स्वच्छ आणि निर्मळ असावे, असेही त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकात नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी म्हणाले, सहाशेपेक्षा जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.

कार्यक्रमाची सुरुवात पूजा पारखी आणि दिप्ती असवडेकर यांच्या नाट्यसंस्कार गीताने झाली. दिपाली निरगुडकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रतीक पारखी, पूजा पारखी, अनुराधा कुलकर्णी, आशिष तिखे, दिप्ती असवडेकर, राधिका देशपांडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. विश्वस्त संध्या कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर अपूर्वा तिखे यांनी आभार मानले.

लेखन स्पर्धेतील विजेत्या नाट्यछटांचा संग्रह असलेल्या ‌‘सुमन नाट्यछटा‌’ आणि संध्या कुलकर्णी लिखित ‌‘सप्तरंगी नाट्यछटा‌’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन या प्रसंगी झाले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल :
गट क्र. 1 (शिशुगट) : प्रथम -प्रज्वल जोशी, द्वितीय – नित्या चोपडे, तृतीय – मिहित मठपती, उत्तेजनार्थ – विराट गोटे.
गट क्र. 2 (पहिली-दुसरी) : प्रथम – आदित्य कुलकर्णी, द्वितीय – शौनक मेस्त्री, तृतीय – मीरा अडकर, उत्तेजनार्थ – अमायरा जाधव, अनिश रिसबूड.
गट क्र. 3 (तिसरी-चौथी) : प्रथम – गार्गी वैद्य, द्वितीय – शिवंश मोरे, तृतीय – आनिका लहुरीकर, उत्तेजनार्थ – राघव घाटणेकर, पार्थ ठोंबरे.
गट क्र. 4 (पाचवी-सातवी) : प्रथम – स्पर्श कलवनकर, द्वितीय – नील देशपांडे, तृतीय – आरोही उंडे, उत्तेजनार्थ – राही पोहनेरकर, सन्विता कुलकर्णी.
गट क्र. 5 (आठवी-दहावी) : प्रथम – अर्चीस थत्ते, द्वितीय – इरा जोशी, तृतीय – सई भोसले, उत्तेजनार्थ – सनत देशपांडे, कैवल्य चांदवले.
गट क्र. 6 (खुला) : प्रथम – निकिता वाणी, द्वितीय – हर्षदा कुलकर्णी, तृतीय – सोमनाथ भवर, उत्तेजनार्थ – अश्विनी आठवले, सचिन काळे.

आज खरा इतिहास समोर आणण्यास संशोधक घाबरतात

पुरातत्त्व आणि संग्रहालये महाराष्ट्र राज्याचे संचालक डाॅ. तेजस गर्गे 

पुणे – आज समाजमाध्यमांवर विषय भडकपणे मांडले जातात आणि त्यामुळे आपण सत्यापासून दूर जात आहोत. नागरिकांपर्यंत खरा इतिहास पोहोचवण्यासाठी संशोधकांनी सुवर्णमध्य शोधणे आवश्यक आहे. मात्र आज समाज अस्मिता प्रकर्षाने पुढे येत असल्यामुळे त्याचाही संशोधकांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक संशोधक खरा इतिहास मांडण्यास घाबरतात. अशा परिस्थितीत त्यांनी इतिहास मांडण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व आणि संग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी व्यक्त केले.

इंद्रायणी साहित्य द्वारा प्रकाशित, संदीप परांजपे संपादित ऐतिहासिक नोंदी दुर्गांच्या, जिल्हा सातारा आणि कोल्हापूर या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ भारत इतिहास संशोधन मंडळ येथे पार पडला. यावेळी ज्येष्ठ गिर्यारोहक वसंत लिमये, पुरातत्त्व संशोधक डॉ. सचिन जोशी, संदीप परांजपे, अरुणकुमार बाभूळगावकर उपस्थित होते. 

डॉ. तेजस गर्गे म्हणाले,  संशोधक म्हणून आपण अनेकदा एकटे असतो. परंतु, संशोधकांनी एकत्र येऊन काम केल्यास तयार होणारा संदर्भग्रंथ हा बहुविषयक स्वरूपाचा असेल. आपला इतिहास इंग्रजी भाषेत फारच अल्प प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणूनच मराठीबरोबरच इंग्रजीतही इतिहासाची नोंद व्हायला हवी, तेव्हाच तो जागतिक पातळीवर पोहोचू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. सचिन जोशी म्हणाले, अनेक सर्वसामान्य लोक किल्ल्यांवर जातात, पण तिथे नेमके काय पाहायचे आणि किल्ला कसा पाहावा याची माहिती त्यांना नसते. आपल्याला किल्ल्यांचा इतिहास संपूर्ण माहिती नसल्यामुळे त्याचा योग्य संदर्भ लक्षात येत नाही. मात्र, किल्ल्यावर जाण्यापूर्वी त्याचा इतिहास वाचून गेल्यास, तेथे अनेक ऐतिहासिक गोष्टींचे संदर्भ समजू शकतात. त्याचबरोबर गडकिल्ल्यांवर पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. वसंत लिमये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

संदिप परांजपे यांनी पुस्तकाची माहिती दिली आणि त्याचा उपयोग सर्वसामान्य, अभ्यासकांना कसा होईल हे सांगितले. चिंतामणी केळकर यांनी सूत्रसंचालन केले. मुग्धा कोपर्डेकर यांनी आभार मानले. 

महिलांच्या विशेष उपचारांसाठी मुंबईत अत्याधुनिक युरोगायनकोलॉजी विभागाची स्थापना

0

सर्व स्तरांतील महिलांना उच्च दर्जाची आणि समतोल उपचार सेवा देण्यासाठी उपक्रम

मुंबई, 4 ऑगस्ट 2025 – सिटिअसटेक ही आरोग्य तंत्रज्ञान, सेवा आणि उपाययोजना पुरविणारी आघाडीची कंपनी असून, महाराष्ट्र शासनाच्या कामा आणि अ‍ॅलब्लेस रुग्णालयाच्या सहकार्याने महिलांच्या युरोगायनकोलॉजी विभागाचे नूतनीकरण व एक अत्याधुनिक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्कृष्टता केंद्र उभारण्याच्या उपक्रमात सहभागी झाली आहे. हा विभाग भारताच्या सार्वजनिक आरोग्य प्रणालीमध्ये महिलांच्या पेल्विक फ्लोअर (कमीशा भागातील स्नायूंचे आरोग्य) उपचाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतो. या युरोगायनकोलॉजी विभागात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) मान्यतेने विद्यापीठ-संलग्न फेलोशिप कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, या क्षेत्रातील भावी तज्ज्ञांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सिटिअसटेकने डॉ.अपर्णा हेगडे आणि अर्मन (ARMMAN) यांच्या सहकार्याने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत या प्रयत्नाला पाठबळ दिले असून, तंत्रज्ञान-सक्षम, सर्वांना सुलभ अशा आरोग्यसेवेला प्रोत्साहन देण्याची कंपनीची बांधिलकी यामधून अधोरेखित होते.

सिटिअसटेकच्या CISO आणि CSR व सस्टेनेबिलिटी प्रमुख पूनम शेजाळे म्हणाल्या, “भारतातील एक तृतीयांश महिलांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी युरोगायनकोलॉजीसंबंधी समस्या येतात. या समस्या अनेकदा निदर्शनासही येत नाहीत. सिटिअसटेकच्या सखोल तांत्रिक ज्ञानाची सांगड डॉ.तुषार पालवे आणि डॉ.अपर्णा हेगडे यांच्या चिकित्सकीय व सामाजिक दृष्टिकोनाशी घालून आम्ही असे सार्वजनिक आरोग्यसेवा केंद्र उभं करत आहोत, जे सर्व स्तरांतील महिलांना उच्च दर्जाची आणि समतोल उपचार सेवा प्रदान करेल.”

कामा आणि ‍ॅलब्लेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ.तुषार पालवे म्हणाले, “कामा रुग्णालयासोबत भागीदारी करत सिटिअसटेकने अत्याधुनिक केंद्र स्थापन केल्याबद्दल आम्ही त्यांच्या ऋणी आहोत. हे केंद्र सर्वात दुर्बल गटातील रुग्णांपर्यंत सेवा पोहोचवेल. अशी सकारात्मक भूमिका घेणाऱ्या कॉर्पोरेट्सची संख्या वाढावी, अशी आमची आशा आहे.”

हे दोन मजली केंद्र भारतातील सर्वात प्रगत युरोगायनकोलॉजी केंद्रांपैकी एक आहे. तळमजल्यावर सहा क्लिनिक खोल्यांसह जागतिक दर्जाचा बाह्यरुग्ण विभाग आहे, तर पहिल्या मजल्यावर अत्याधुनिक निदान केंद्र आहे. येथे व्हिडीओ-युरोडायनॅमिक्स, ब्लूटूथ-सक्षम युरोफ्लोमेट्री, 2D/3D पेल्विक फ्लोअर अल्ट्रासाउंड, अँडोअनल अल्ट्रासाउंड, एनोरेक्टल मॅनोमेट्री, फ्लुरो-डिफेकोग्राफी, ऑफिस सीस्टोस्कोपी, लेझर आणि युरोस्टिम पेल्विक फ्लोअर थेरपी युनिट यांसारखी प्रगत उपकरणे उपलब्ध आहेत. ही सर्व उपकरणे आणि सुविधा एकत्रितपणे हे केंद्र भारतातील सर्वात अत्याधुनिक युरोगायनकोलॉजी केंद्र बनवितात.

“माझं स्वप्न होतं की, दर्जेदार उपचार सर्वांना, त्यांच्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीकडे न पाहता, सन्मान आणि गोपनीयतेच्या अधिष्ठानावर मिळावेत. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मी अमेरिका सोडली. या विभागात देशातील बहुतांश रुग्णालयांमध्ये नसलेली उच्च दर्जाची निदान सुविधा आणि उपकरणं उपलब्ध आहेत. हे केंद्र केवळ उत्कृष्ट उपचारांसाठीच नाही, तर अत्याधुनिक संशोधन व प्रगत प्रशिक्षणासाठी एक केंद्रबिंदू म्हणून विकसित करणे हे आमचं ध्येय आहे. आमचा उद्देश आहे, अशी एक नवी पिढी तयार करणे, जी जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाने सज्ज असेल आणि भारतभर या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवेल,” असं डॉ.अपर्णा हेगडे, सन्माननीय सहप्राध्यापिका, युरोगायनकोलॉजी विभाग, कामा आणि ‍ॅलब्लेस रुग्णालय, तसेच ARMMAN संस्थेच्या संस्थापिका म्हणाल्या.

सिटिअसटेकचे प्रमुख, प्रशासन, खरेदी, इमिग्रेशन  प्रवास विभाग, मनोज बळवाणी म्हणाले, “सिटिअसटेक अनेक अर्थपूर्ण उपक्रमांना पाठिंबा देते, पण हा उपक्रम आमची तांत्रिक नवकल्पना या पलीकडे जाऊन समाजाप्रती असलेली व्यापक बांधिलकी स्पष्टपणे दाखवितो. आम्ही केवळ निधीच नव्हे, तर आमचे डिझाइन, तांत्रिक कौशल्य आणि खरेदी प्रक्रियेतील अनुभव यांचाही उपयोग करून जागतिक दर्जाचं, टिकाऊ आरोग्यसेवेचं वातावरण निर्माण करण्यात योगदान दिलं. या माध्यमातून आम्ही केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरते मर्यादित न राहता, सन्मान, काळजी आणि दीर्घकालीन परिणामकारकता यांचा मूल्याधारित प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहोत.

कामा आणि अ‍ॅलब्लेस रुग्णालयातील देशातील पहिल्या युरोगायनकोलॉजी विभागाची संकल्पना आणि स्थापना प्रसिद्ध युरोगायनकोलॉजिस्ट व ARMMAN या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापिका डॉ.अपर्णा हेगडे मांडली आहे. 2018 मध्ये त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागासोबत एक सामंजस्य करार (MoU) केला होता, ज्या अंतर्गत या विभागाचा विकास केला जाणार होता. हा प्रस्ताव 2023 मध्ये शासनाकडून मंजूर करण्यात आला. हे केंद्र पेल्विक फ्लोअरशी संबंधित विकारांचे निदान व उपचार करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आले आहे. यात पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स, लघवीचे अपघाताने होणारे स्रवण (urinary incontinence), मलावरोध, भगंदर, मूत्र विसर्जनातील बिघाड (dysfunctional voiding), प्रसूतीनंतरचे पेरिनियल इजा, लघवीच्या संक्रमणांचा त्रास, मूत्राशयातील वेदना (bladder pain syndrome), बद्धकोष्ठता (constipation) इत्यादी विकारांचा समावेश होतो. हे विकार भारतातील जवळपास प्रत्येक चारपैकी एका महिलेवर परिणाम करतात, पण बहुतेक वेळा योग्य निदान व उपचार न मिळाल्यामुळे दुर्लक्षित राहतात. रुग्णांच्या गोपनीयतेस, सहवेदनेला आणि वैद्यकीय उत्कृष्टतेला प्राधान्य देऊन डिझाइन केलेले हे केंद्र जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण व संशोधनासाठीही एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.

हे केंद्र म्हणजे शासन, आरोग्यसेवा प्रदाते, खासगी क्षेत्र आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील सहकार्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. देशभरात महिलांच्या विशेष आरोग्यसेवांचा समतोल आणि व्यापक प्रवेश वाढविण्यासाठी हे एक विस्तारक्षम मॉडेल ठरू शकते.

गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप…

पुणे- ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, करिअर मार्गदर्शन शिबिर आणि शिष्यवृत्ती प्रदान सोहळा काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि एअरमार्शल भूषण गोखले यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते, परंतु काही कारणास्तव त्यांचे आगमन रद्द झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी भाषा मंडळाचे संचालक आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. केशव देशमुख सर यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी उपस्थिती दर्शवली तर सुप्रसिद्ध साहित्यिक वि. दा. पिंगळे सर, क्रिकेट खेळाचे प्रशिक्षक श्याम ओक, माजी नगरसेविका सौ लक्ष्मी दुधाने यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

यावेळी ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने इयत्ता बारावीच्या ओजस देशपांडे, तेजल गव्हाणे, सार्थक भास्कर, हर्षदा शेलार आणि ऋतुजा भांडवलकर या पाच विद्यार्थ्यांना तर इयत्ता दहावीच्या गुरुराज धोंगडे, सई धडपळे, मिहीर आपटे, आदर्श सातपुते आणि भार्गव मराठे या पाच विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि आर्थिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. याप्रसंगी तब्बल पाचशे ते साडेपाचशे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह उपस्थिती दर्शवली असून आपल्या प्रभागातील पलक निलेश वरपे या महाराष्ट्र राज्याकडून क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ८३% गुण प्राप्त केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. अभ्यासासह आपला छंद जोपासत खेळाला प्राधान्य दिले आणि पलकने उत्तम गुण प्राप्त केले असून तिच्या या मेहनतीत तिच्या पालकांनीही साथ दिल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करत सत्कार केला.

यावेळी मार्गदर्शन करताना पुस्तकांचे महत्व, अभ्यासाबद्दल दृष्टिकोन आणि गेल्या १४ वर्षांत ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेले कार्य आदी गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला. समाजात वावरत असताना आपण समाजासाठी काही देणे लागतो, असे प्रतिपादन करताना सहकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी माझे सहकारी श्री. प्रमोदजी शिंदे, दीपकजी चांदकुडे, श्री. किशोरजी शेडगे, श्री. विष्णूजी सरगर, श्री. विनायकजी देशमुख तर सूत्रसंचालक रत्नाताई दहीवळकर तसेच ओंकार चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याला ॲडव्हान्स डॉक्युमेंट फोल्डर प्रदान करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता.

आपल्या समाजातील विद्यार्थी वर्गाला यथायोग्य मार्गदर्शन लाभणे आवश्यक असून याबाबत शिबिराचे आयोजन केल्याने पालक आणि विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. त्यांचे हे शब्द हीच आमच्या परिश्रमांची पोहोच पावती असून भविष्यातही असेच अधिकाधिक उपक्रम राबवण्याचा आमचा मानस असेल.

वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका; तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुख्यमंत्री वॉररुमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला 30 प्रकल्पांचा आढावा

 मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारावेत
 वॉररुमधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करा
 बीडीडी चाळ वासियांना लवकरच सदनिकांचे वाटप

मुंबई, दि. 4 : पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतल्यानंतर ते वेळेत पूर्ण व्हायला हवेत. त्यामुळे पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्णत्वास यायला हवेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मुख्यमंत्री वॉररुमधील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रविण परदेशी यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते. तर दूरदृष्यप्रणालीद्वारे विविध विभागांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वॉररुमच्या आजच्या तिसऱ्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी 30 प्रकल्पांच्या सद्यःस्थितीचा आढावा घेतला. यापूर्वी झालेल्या दोन बैठकांमध्ये एकूण 33 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला होता. त्यावेळी सुमारे 135 मुद्यांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. या निर्णयांवरील अंमलबजावणीची माहिती यावेळी देण्यात आली.

मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारावेत
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आपल्याकडे तंत्रज्ञान अद्ययावत आहे. त्यामुळे कमी कालावधीत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत. मुंबईसह राज्यातील सर्व मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ज्या अडचणी येतात त्यांचे निराकरण वेळेत करावेत. तसेच मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारावेत. तसेच मेट्रो प्रकल्प वेळेत मार्गी लागण्यासाठी कुशल यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे. मेट्रो प्रकल्प तसेच इतर सुविधा प्रकल्पांसाठी लागणारा निधी तातडीने वितरित करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

वॉररुमधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करा
पायाभूत सुविधा प्रकल्प राबविताना तो वेळेत पूर्ण होईल, याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवे. प्रत्येकाचे स्वतंत्र डॅशबोर्ड न करता फक्त सीएम डॅशबोर्डवरच प्रत्येक प्रकल्पाची सद्यःस्थिती नोंदविली गेली पाहिजे. प्रकल्पासंबंधित सर्व गोष्टी या डॅशबोर्डवर वेळोवेळी अद्ययावत करण्यात यावेत. तसेच प्रकल्पातील अडचणी सोडविण्यासाठी वॉररुम आढावा बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी पुढील बैठकीपूर्वी पूर्ण करण्यात यावी. आवश्यक अशा बाबींसाठी मंत्रिमंडळ बैठकीत विषय आणून ते विषय पूर्णत्वास आणायला हवेत.

तसेच आढावा बैठकीतील निर्णयानंतरही काही अडचण आल्यास वॉररुमला कळविण्यात यावे, जेणेकरून त्या अडचणी तातडीने सोडविता येतील. वॉररुमधील प्रकल्पांची तसेच निर्णयांची अंमलबजावणी गांभीर्याने करावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

यावेळी वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवाशांना लवकरच सदनिकांचे वाटप करता येईल. तसेच नायगाव व एन.एम.जोशी मार्ग चाळीतील रहिवाशांना ठरलेल्या वेळेत सदनिका देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी बीडीडी चाळ, मुंबईतील मेट्रो लाईन 4 (वडाळा ते कासारवडवली), मेट्रो लाईन 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण), मुंबई मेट्रो 6 (स्वामी समर्थनगर-विक्रोळी), मेट्रो लाईन 2 बी (डीएन नगर ते मंडाळे), मुंबई मेट्रो 7 ए (अंधेरी-छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2), मुंबई मेट्रो लाईन 9 (दहिसर (पू) ते मिरा भाईंदर), ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह टनेल प्रकल्प, बोरिवली ते ठाणे जोड बोगदा प्रकल्प, उत्तन-विरार सी लिंक, शिवडी-वरळी ईलेव्हेटेड कॉरिडॉर, पुणे मेट्रो, दहिसर ते भाईंदर लिंक रोड, गोरेगाव मागाठाणे डीपी रोड, गोरेगाव–मुलुंड लिंक रोड आणि उत्तर सागरी किनारा मार्ग, विरार अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर, धारावी पुनर्विकास प्रकल्प, जालना नांदेड महामार्ग, पुणे रिंगरोड, बांद्रा वर्सोवा सी लिंक, छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा प्रकल्प, कुडूस आरे कनेटिव्हिटी, कुडुस बाभळेश्वर वीज जोडणी प्रकल्प, शिक्रापूर बाभळेश्वर विद्युत प्रकल्प, वाढवण बंदर प्रकल्प आदी प्रकल्पांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे यांनी सादरीकरणाद्वारे वॉररुम प्रकल्पांची माहिती दिली.

महापालिका निवडणुकीसाठी महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाचा वापर थांबवा : महाविकास आघाडी

पुणे-महापालिका निवडणुकीसाठी महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाचा वापर थांबवा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनाच भेटून लेखी निवेदन देऊन केली आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे अरविंद शिंदे,माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,शिवसेनेचे संजय मोरे, गजानन थरकुडे, आमदार बापू पठारे,माजी आमदार जयदेवराव गायकवाड, माजी महापौर अंकुश काकडे, कमलताई व्यवहारे, वसंततात्या मोरे, रवींद्र माळवदकर, सुनिल माने, किशोर कांबळे, सुजित यादव, आसिफ शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि,’ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. प्रभाग रचना व इतर प्रशासकीय बाबींची पूर्तता होत असताना या सर्व प्रक्रियेत सत्ताधारी पक्षांचा, विशेषतः भारतीय जनता पक्षाचा हस्तक्षेप अतिशय चिंतेची बाब आहे.

आपल्या पक्षासाठी सोयीचे ठरतील अशा प्रभागांची रचना करणे, राजकीय फायद्यासाठी शहरात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींना प्रवृत्त करणे अशा अनेक मार्गाने भारतीय जनता पक्ष सक्रिय झाला आहे. या दुर्दैवी प्रकारात पुणे महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनातील काही घटकांचे सत्ताधाऱ्यांना सहकार्य मिळत आहे असा महाविकास आघाडीचा आरोप आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या शहरातील प्रमुख नेत्यांनी आज पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम व पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली.

प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत भारतीय जनता पार्टीचा वाढता हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. महानगरपालिका प्रशासनाने याबाबत वेळीच सुधारणा न केल्यास महाविकास आघाडीकडून प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान दिले जाईल असा इशारा महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. तसेच, पुणे शहरातील विविध भागात हेतू पुरस्कार धार्मिक व जातीय तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्याची सत्ताधाऱ्यांची नीती आहे. पोलीस प्रशासनाने याबाबत कठोर भूमिका घेत पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी अशी मागणी ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.

आंबेडकरांनी फोनवर पोलिस अधिकाऱ्याला खडसावले

पोलिस अधिकाऱ्याने दोन दिवस थांबा, अशी विनंती करताच संतप्त झालेल्या प्रकार आंबेडकरांनी ‘दोन दिवस नाही ताबडतोब एफआयआर झाली पाहिजे. नाहीतर मी….

पुणे-कोथरूड पोलिस ठाण्यात तिन्ही दलित तरुणींवर पोलिसांकडून कथित छळ केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघड झाली आहे. या प्रकरणात तब्बल 24 तास उलटल्यानंतरही पुणे पोलिसांकडून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. परिणामी, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका पोलिस अधिकाऱ्याला फोन करून निर्वाणीचा इशारा दिला.

पुण्यातील या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी रात्रीपासून आमदार रोहित पवार, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आणि सुजात आंबेडकर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलिस आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, मात्र एफआयआर नोंदवण्यात आला नाही. यानंतर संतप्त झालेल्या प्रकाश आंबेडकर यांनी कदम नावाच्या पोलिस अधिकाऱ्याला फोन लावून याबद्दल जाब विचारला.

प्रकाश आंबेडकर यांनी कदम नावाच्या पोलिस अधिकाऱ्याला फोन लावला. मात्र, एक-दोन दिवसांत एफआयआर दाखल करुन घेऊ, असे तो अधिकारी सांगत होता. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, एक लक्षात घ्या कदम…. ती मुलगी 25 वर्षांची आहे. कुठलातरी पोलिस औरंगाबादमधून येतो आणि हे सगळ्या कोणाच्यातरी घरात घुसतात. हे पोलिस कोणत्या कायद्याखाली मुलींच्या घरात घुसतात? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला. पोलिसांना कोणाच्या घरात घुसण्याचा परवाना दिलेला नाही ना? त्यामुळे तुम्ही याप्रकरणात मुलींच्या तक्रारीनुसार, एफआयआर नोंदवून घ्या आणि मग त्याचा तपास करा, अशा शब्दांत त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला खडसावले.

त्यावर पोलिस अधिकाऱ्याने दोन दिवस थांबा, अशी विनंती करताच संतप्त झालेल्या प्रकार आंबेडकरांनी ‘दोन दिवस नाही ताबडतोब एफआयआर झाली पाहिजे. नाहीतर मी त्यांना सांगतो, धरणे देऊन बसा. कायदा हा कायदा आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. चौकशी होत राहील, त्यामधून सत्य समोर येईल. पण एफआयआर नोंदवायला पोलिसांचा इतका विरोध का? तुम्ही एफआयआर नोंदवत नसाल तर सुप्रीम कोर्टाला पत्र पाठवू का, अशी विचारणा प्रकाश आंबेडकर यांनी केली.
पुणे पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता या मुलींना अवघ्या चार ओळींचे पत्र देत गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. मुलींनी ज्याबाबत तक्रार केली आहे, ती घटना एका खोलीत घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी घडलेली नाही. त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. मुलींनी जी अॅट्रोसिटीची तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये कोणतेही तथ्य आढललेले नाही. त्यामुळे याप्रकरणात गुन्हा दाखल करता येणार नाही, असे पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिच्या मदतीला तत्काळ धाव घेत, पुण्यातील तीन महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला वन स्टॉप सखी सेंटरमध्ये दाखल केलं आणि स्वावलंबनासाठी आवश्यक अशा कौशल्यविकास प्रशिक्षणाचीही सोय केली. मात्र, या पीडित महिलेच्या नातेवाईकांमध्ये एकजण निवृत्त पोलिस अधिकारी असून, त्यांच्या दबावाखाली पुणे पोलिसांनी कोणतीही कायदेशीर नोटीस, समन्स किंवा वॉरंट न दाखवता कोथरूडमधील या तीन सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरावर छापा टाकला आणि त्यांना जबरदस्तीने पोलिस ठाण्यात नेले.

या तिन्ही कार्यकर्त्या महिलांनी आरोप केला आहे की, कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये त्यांना एका वेगळ्या खोलीत नेऊन लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच अत्यंत खालच्या पातळीवरचे आणि अपमानास्पद प्रश्न विचारले. सहायक पोलिस निरीक्षक (API) प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलिस स्टेशनचे PSI अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी पीडित महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात गेली असता, पोलिसांनी त्यांची नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही या महिलांनी केला आहे.

पुणे पोलिसांनी मारहाणीचे आरोप फेटाळले:कोथरूड पोलिसांवरील आरोपांमध्ये तथ्य नाही; मारहाण, शिवीगाळ काहीच झाले नाही – पोलिस उपायुक्त संभाजी कदम

पुणे-पुण्यातील कोथरूड पोलिसांवर तीन मुलींनी मारहाण, शिवीगाळ आणि जातीवाचक शब्द वापरण्याचा आरोप केला होता. मात्र, या आरोपांमध्ये कोणताही तथ्य नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी या सर्व आरोपांना फेटाळून लावत, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. तसेच, या प्रकरणात पोलिस कर्मचारी प्रेमा पाटील यांचा कुठलाही सहभाग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात कोणताही विश्वासार्ह पुरावा समोर आलेला नसल्याने गुन्हा दाखल होऊ शकत नाही. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी संबंधित मुली करत असल्या तरी, ती कायदेशीर निकषांनुसार ग्राह्य धरली जाऊ शकत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणात तथ्य नसल्याचे पोलिसांनी पुन्हा अधोरेखित केले आहे.

पोलिस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, छत्रपती संभाजीनगरची एका मिसिंग महिलेची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचा तपास करण्यासाठी पोलिस पुण्यात आले होते आणि त्यांना आम्ही दोन दामिनी मार्शल दिले. कोथरूड पोलिस स्टेशनला त्यांनी पत्र देऊन महिला कर्मचारी गरज असल्याचे सांगितले होते, तसा लेखी अर्ज दिला होता. महिला सहाय्यता कक्ष आणि हिरकणी कक्ष या ठिकाणी या महिलेची चौकशी केली. यात मिसिंग मुलगी होती ती ट्रेस झाली आणि तिचे वन स्टॉप सेंटर कोंढव्यात होते हे दिसून आले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे जे पथक होते ते पथक मुलीला घेऊन निघून गेले.

पुढे बोलताना संभाजी कदम म्हणाले, त्यानंतर पहाटे पोलिसांनी आम्हाला मारहाण केल्याची तक्रार संबंधित मुलींनी केली होती. यात प्रथमदर्शनी कोणतेही तथ्य आढळून आले नाही. अनेक कार्यकर्ते पोलिस आयुक्तालयात आले तिथेही त्यांना यात तथ्य नसल्याचे सांगितले. या संदर्भात सगळ्यांना लेखी पत्र देऊन देखील कळवण्यात आले आहे.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिस कर्मचारी प्रेमा पाटील यांचा काहीही संबंध नाही, त्या ना संबंधित पथकात होत्या ना दामिनी मार्शल पथकाचा भाग होत्या, असे स्पष्ट करत पोलिस उपायुक्तांनी मुलींनी केलेल्या आरोपांमध्ये कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे सांगितले. तसेच, या संपूर्ण प्रकरणात काही प्रशासकीय त्रुटी असून त्याचा सध्या तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

किती पोरांसोबत झोपते?’मस्त मजा करते, ऐष करते’, लेस्बियन आहात का? मोकाट सुटल्यात; दलित तरुणींच्या तक्रारीत पुणे पोलिसांवर आरोप

पुणे – कोथरूड पोलिस ठाण्यात 3 दलित तरुणींचा छळ झाल्याच्या आरोपामुळे वातावरण तापले आहे. या तरुणींनी पोलिसांवर जातीवाचक शेरेबाजी, विनयभंग व शाब्दिक लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंबंधी पीडित मुलीने दिलेली तक्रार समोर आली आहे. त्यात या आरोपांचा उल्लेख आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, पीडित तरुणींनी आपल्या तक्रारीत पीएसआय कामठे, कॉन्स्टेबल शिंदे, सायबर पोलिस सानप यांच्यासह पिवळ्या रंगाचे चेक्सचे शर्ट घातलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा उल्लेख केला आहे. हे सर्व पोलिस कर्मचारी व निवृत्त पोलिस अधिकारी असलेले माझ्या मैत्रिणीचे सासरे आमच्या कोथरूड येथील फ्लॅटवर आले होते. त्यावेळी फ्लॅटमध्ये आम्ही दोघी मैत्रिणी होतो. त्यांनी घरात शिरताच झाडाझडती सुरू केली. आम्हाला दुपारी 3.30 वा. कोथरूड पोलिस ठाण्यात नेले. 7.30 वाजेपर्यंत आम्हाला पोलिस स्टेशनच्या वरच्या मजल्यावर बसवून ठेवण्यात आले. आम्हाला आमच्या विवाहित मैत्रिणीचा पत्ता विचारून मारहाण करण्यात आली. सुरुवातीला आम्ही काहीच सांगितले नाही. पण मारहाण सहन न झाल्याने अखेर आम्ही तिचा पत्ता सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच लैंगिक शेरेबाजीही केली.

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आम्हा तिघींनाही कोथरूड पोलिस स्टेशनच्या वरच्या मजल्यावरील एका रुममध्ये ठेवले. तिथे माझा 4 तास छळ झाला. यावेळी पोलिसांनी मला माझे आडनाव विचारले. तुझे आडनाव काय? मग तू अशीच वागणार असे पोलिस म्हणाले. यावेळी एक महिला पोलिस अधिकारी म्हणाली, की तुझा स्वभाव असाच राहिला, तर कुणीतरी तुला असेच मारून टाकेल. तुझा खून होईल. तू अशी जिवंत राहूच शकत नाहीस. त्यामुळे मी कुटुंबीयांपासून इथे लांब (पुण्यात) एकटी राहते. या धमकीमुळे मला आता सतत भीती वाटत आहे.

पीडित तरुणी आपल्या तक्रारीत पुढे म्हणते, एकट्या राहत अशाच मोकाट सुटल्यात. किती पोरांसोबत झोपते? तुझ्या रुमवर पोरं झोपायला येतात का? तुझी व तुझ्या मैत्रिणींची ओढणी एकाच रंगाची आहे. तुम्ही लेस्बियन दिसत आहात. तुम्हाला पाहूनच वाटत आहे की, तुम्ही एलजीबीटीक्यू समुदायाच्या आहात असे विविध आरोप करून माझे आळीपाळीने शाब्दिक लैंगिक शोषण करण्यात आले.

तुला बाप नाही. फक्त माय आहे. तू पगाराचे पैसे घरी देतेस का? की त्यांनीही तुला वाऱ्यावर सोडले आहे? पोलिसांनी चौकशीशी काहीच संबंध नसल्याची वाक्य बोलून मला टॉर्चर केले. यावेळी काही पुरुष पोलिस सतत माझे शरीर न्याहाळत होते. जणू काही ते डोळ्यांनी माझे शरीरच स्कॅन करत होते. महिला पोलिसही सतत निरीक्षण करत होत्या. एक पोलिस अधिकारी तर चक्क माझ्या अंगावर धावून आला. त्याचा हाता, खांद्याचा व हनुवटीचा घाणेरडा स्पर्श मला झाला. एका प्रकरणात केवळ चौकशीसाठी मला ठाण्यात आणले असता त्या पोलिस अधिकाऱ्याने मला गाल व पाठीवर गुद्दे व चापटा मारल्या. कंबर व पायावरही लाथा मारल्या, असा आरोपही सदर तरुणीने आपल्या तक्रारीत केल्याचा दावा ‘एबीपी माझा’ने आपल्या वृत्तात केला आहे.

कॉन्स्टेबल शिंदे यांनी माझ्या मोबाईलमधील फोटो पाहून, ‘मस्त मजा करते, ऐष करते’, अशी टिप्पणी केली. पोलिस वारंवार माझी जात विचारत होते. नाव सांगितले की हसायचे. एकाने शिवी दिली की इतरजण हसायचे. पोलिसांनी माझ्या मोबाईलमधील पर्सनल चॅटही वाचले. माझ्या व्हॉईसनोट ऐकल्या. दोन मित्रांसोबतचे चॅट वाचून, ‘या दोघांमधला तुझा बॉयफ्रेंड कोण?’ असेही पोलिसांनी विचारले. कोथरुड पोलिस ठाण्यात जवळपास चार तास माझा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला असा आरोप पीडित तरुणीने केला.

छत्रपती संभाजीनगर येथील एक 23 वर्षीय विवाहित महिला पतीच्या छळाला कंटाळून पुण्यात आली होती. ती तिथे आपल्या मैत्रिणींसोबत राहत होती. पुणे पोलिसांनी या मुलीला मदत करणाऱ्या 3 मुलींना कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतले. यावेळी त्यांना कोथरूड पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ, मारहाण व लैंगिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी रविवारी रात्री मध्यरात्री उशिरापर्यंत आंदोलन केले.

इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे जाणार:राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे निमंत्रण

मुंबई-महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात आहेत. तसेच मुंबई महापालिका समोर ठेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात आता इंडिया आघाडीची बैठक राजधानी दिल्लीत होणार असून उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीची एकही बैठक झाली नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने आता बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी दिल्लीत पोहोचणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांना भोजनाचे निमंत्रण देखील असल्याची माहिती आहे.

इंडिया आघाडीची बैठक 7 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे हे 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी दिल्लीत पोहोचणार आहेत. तसेच सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार दिल्लीतच आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक घेतली जाणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत.

महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, आदित्य ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित असणार आहेत. त्याचसोबत इंडिया आघाडीचे इतर राज्यातील प्रमुख नेत्यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशन असल्याने इंडिया आघाडीचे सर्वच प्रमुख नेते सध्या दिल्लीतच आहेत. त्यामुळे या बैठकीला सर्वच नेते उपस्थित असणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगामी दिल्ली दौऱ्यावरही निशाणा साधला. या दौऱ्यात उद्धव काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार आहेत. याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, त्यांनी डीनर डिप्लोमसी करावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट डिप्लोमसी करावी. नंतर लंच डिप्लोमसी करावी. कितीही डिप्लोमसी केली, तरी जोपर्यंत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मार्ग सोडून ते दुसऱ्या मार्गावर जातील, तोपर्यंत लोक त्यांना मतदान करणार नाहीत.

पुण्यात तीन तरुणींवर बेकादेशीर कारवाई करणाऱ्या पोलीसांवर तात्काळ कारवाई करा: हर्षवर्धन सपकाळ

गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ का? मुजोर पोलिसांवर ऍट्रॉसिटी कलामाखाली गुन्हे दाखल करा.

मुंबई, दि. ४ ऑगस्ट २०२५
राज्यातील पोलीस यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा अशी आहे. गुन्हेगार मोकाट फिरतात आणि पोलीस मात्र सर्वसामान्य जनतेवर कायद्याची दंडेलशाही दाखवत आहेत. पुण्यातील कोथरूड पोलीसांनी तीन तरुणींच्या घरात घुसून त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले, त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ज्या पोलिसांनी हा प्रताप केला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? या पोलिसांवर ऍट्रॉसिटी कलमाखाली तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, एका महिलेला मदत केल्याच्या कारणावरून या तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींच्या घरात घुसून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. या मुजोर पोलिसांना कोण पाठिशी घालत आहे? पुण्याचे पोलीस आयुक्त काय खुर्चीवर बसून झोपा काढतात काय. कोणाच्या दडपणाखाली पोलीस काम करत आहेत. तीन तरूण मुलींवर पोलीस अत्याचार करतात आणि कारवाई होत नाही. एफआयआर नोंदवण्यास कोणत्या मुहुर्ताची वाट पहात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याच्या पालकमंत्र्यांनी जातीने या प्रकरणी लक्ष घालून मुजोर पोलिसांवर कठोर कारवाई करावी.
पुण्यात ड्रग्जचा काळाबाजार खुलेआम सुरु आहे, कोयता गँगचा हैदोस सुरु आहे, त्याला आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पुण्यात दादागिरी वाढली आहे असे खुद्द मुख्यमंत्रीच जाहीरपणे सांगत आहेत पण कारवाई मात्र करत नाहीत, असा हतबल मुख्यमंत्री काय कामाचा. पुणे पोलीसांनी सर्वसामान्य लोकांना कायद्याचा नाहक बडगा दाखवण्याऐवजी पुण्यातील अवैध धंदे व गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम करण्याची गरज आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

नवीन प्रभाग रचना, OBC आरक्षणासह होणार महापालिका निवडणुका:सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सर्व याचिका फेटाळल्या

सर्व निवडणुका नवीन वॉर्ड रचनेप्रमाणे घ्याव्यात,27 टक्के ओबीसी आरक्षणासह होणार निवडणुका,प्रभाग रचना निश्चित करणे हा राज्याचा अधिकार

मुंबई-सर्वोच्च न्यायालयाने नव्या प्रभाग (वॉर्ड) रचनेला आणि ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावत, निवडणुकांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार आणि 27 टक्के ओबीसी आरक्षणासह होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. काही स्थानिक घटकांनी नव्या रचनेतील बदलांवर आक्षेप घेतले होते. मात्र, आज न्यायालयाने या याचिका फेटाळत राज्य सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये नव्या प्रभाग बांधणीच्या आधारे निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. याचिकेत 11 मार्च 2022 पूर्वीच्या वॉर्ड रचनेनुसार निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली असून, सुप्रीम कोर्टाने ती फेटाळून लावली. ही निवडणूक सुद्धा नवीन वॉर्ड रचनेप्रमाणे घेण्यात यावी, असे निवडणूक आयोगाने अधिसूचित केले होते. त्यामुळे आजच्या आदेशाप्रमाणे नवीन वॉर्ड/प्रभाग रचनेनुसार निवडणुका होतील, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका देखील सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावली. या याचिकेच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने सांगितले की, आमच्या 6 मे 2025 च्या आदेशानुसार 27% ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घेण्यात येतील. तसेच वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे. राज्य विधिमंडळाने तसा कायदा केला आहे आणि या कायद्याला स्थगिती नसल्याने हा पूर्णपणे अधिकार राज्य सरकारचा आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी प्रभाग रचना की जुनी प्रभाग रचना याविषयी वाद सुरू होता. महाविकास आघाडीच्या काळात प्रभाग रचनेमध्ये काही बदल करण्यात आले होते. त्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा त्या प्रभाग रचनेत बदल करण्यात आले. मात्र, वॉर्ड रचना कशी असावी याचा अधिकार पूर्णपणे राज्य सरकारचा आहे, त्यानुसार प्रभाग रचना होईल. जी प्रभाग रचना राज्य सरकार ठरवेल त्यानुसारच निवडणुका होईल, असे आज सर्वोच्च न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.