Home Blog Page 185

‘स्थानिक’ निवडणुका दिवाळीनंतरच..VVPAT चा वापर नाही,ओबीसी आरक्षणासाठी लॉटरी सिस्टीम

राज्य निवडणूक आयुक्तांचे सूतोवाच
मुंबई-महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी दिली. विशेष म्हणजे या निवडणुकीत ईव्हीएमला जोडण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षांनी यापूर्वी अनेकदा ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतांची जुळवणी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आयोगाच्या व्हीव्हीपॅट न वापरण्याच्या निर्णयावर मोठा वाद होण्याची शक्यता आहे.राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी नाशिक विभागातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यात दिवाळीनंतर टप्याटप्याने निवडणूक होणार असल्याची माहिती दिली.

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाने 4 महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार, मनपा, जिल्हा परिषद व नगपालिका अशा सर्वच निवडणुकांचा टप्प्याटप्याने कार्यक्रम आखण्यात येणार आहे. नाशिक विभागात एकूण 50 लाख 45 हजार मतदार व 4882 मतदान केंद्र आहेत. यासाठी 8705 कंट्रोल युनिट्स व 17 हजारांहून अधिक मतदान यंत्रांची गरज आहे. सर्व निवडणुका एकाचवेळी घेतल्या तर मनुष्यबळाची समस्या निर्माण होईल. त्यामुळे या निवडणुका टप्प्याटप्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण कोणत्या संस्थेची निवडणूक प्रथम होणार, हे अद्याप निश्चित करण्यात आले नाही.

राज्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी ओबीसी आरक्षणासाठी लॉटरी पद्धत अवलंबण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निश्चित असते. पण ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाणार आहे. मागील निवडणुकांतही ओबीसी आरक्षण होते. त्यावेळीही हेच तत्व पाळण्यात आले होते. यंदाही त्याची अंमलबजावणी केली जाईल. प्रस्तुत निवडणूक 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारावर घेण्यात येईल. प्रारूप रचना निश्चित झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबवण्यात येईल. आजच्या बैठकीत अधिकारी, कर्मचारी व इतर तांत्रिक बाबींचाही आढावा घेण्यात आला.

आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार नसल्याचेही राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी ईव्हीएममध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतांची जुळवणी करण्याचीही मागणी केली होती. त्यातच आता आयोगाने स्थानिकच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या प्रकरणी मोठा वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे.

मतदार EVM मशीनवर उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबतो. त्याचवेळी उमेदवाराचे नाव, क्रमांक व चिन्ह यांचा उल्लेख असलेली VVPAT स्लिप 7 सेकंद मतदाराला दिसते. त्यानंतर आपोआप ही स्लिप कट होऊन बीप वाजतो आणि स्लिप सीलबंद पेटीत जमा होते. या माध्यमातून मतदारांना आपले मत आपल्या पसंतीच्या उमेदवारालाच गेले का? हे पडताळून पाहण्याची संधी मिळते. VVPAT मशीन उघडण्याचा अधिकार फक्त निवडणूक अधिकाऱ्यांना असतो. ती मतदारांना उघडता येत नाही. त्याला हातही लावता येत नाही. VVPAT मधला पेपर रोल प्रत्येक मतदानावेळी 1500 स्लिप प्रिंट करू शकतो. दरम्यान, EVM मशीनमध्ये गडबड असल्याचे आरोप निवडणूक आयोगाने नाकारले आहेत.

आता फ्लॅटच्या आकारानुसारच देखभाल शुल्क- मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

मुंबई-मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणात सुनावणी करताना फ्लॅटच्या आकारानुसार मेंटेनन्स शुल्क आकारण्याचा महत्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. कोर्टाने महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप अॅक्ट -1970 नुसार हा निर्वाळा दिला आहे. सद्यस्थितीत विविध निवासी संकुले व सोसायट्यांत फ्लॅट धारकांना समान देखभाल शुल्क आकारले जाते. पण आता कोर्टाच्या आदेशानुसार हे शुल्क फ्लॅटच्या आकारानुसार द्यावे लागणार आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, पुण्यातील एका निवासी संकुलातील वाद थेट हायकोर्टापर्यंत पोहोचला होता. या निवासी संकुलात 11 इमारतींचा समावेश होता. त्यात 356 हून अधिक फ्लॅटधारक आहेत. सोसायटीच्या कॉन्डोमिनियम व्यवस्थापन मंडळाने फ्लॅटचा आकार केवढाही असला तरी सर्वच फ्लॅट धारकांना एकसमान देखभाल शुल्क आकारले होते. तसा ठरावही मंजूर केला होता. सोसायटीच्या या निर्णयावर लहान आकाराच्या फ्लॅट धारकांनी आक्षेप घेतला होता. कॉन्डोमिनियन व्यवस्थापन मंडळाचा हा निर्णय कायद्याचे स्पष्ट उल्लंघन करणारा आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

त्यानंतर या फ्लॅट्स धारकांच्या सूचनेनुसार फ्लॅटच्या आकारानुसार देखभाल शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्यानंतर आणखी काही फ्लट धारकांनी त्याला विरोध दर्शवला. या प्रकरणी त्यांनी पुण्यातील सहकारी न्यायालयात धाव घेतली. मे 2022 मध्ये त्यांची याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर त्यांनी या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. हायकोर्टात फ्लॅट धारकांच्या वकिलांनी सर्वच फ्लॅटधारकांना एकसमान देखभाल शुल्क लागू करण्याचा युक्तिवाद केला.

देखभालीचा खर्च हा सर्वच रहिवाशांनी वापरलेल्या समान क्षेत्रासाठी व सुविधांसाठी आकारला जातो. त्यामुळे जास्त आकाराच्या फ्लॅट्सम्ध्ये जास्त रहिवासी राहतात असे गृहित धरूण त्यांना जास्त देखभाल शुल्क आकारणे अन्यायकारक आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. पण हायकोर्टाने त्यांचा दावा फेटाळून लावला. कायदा व कॉन्डोमिनियमचे स्वतःचे घोषणापत्र दोन्ही अपार्टमेंटच्या आकारानुसार प्रमाणित देखभालीचे (मेंटेनन्स चार्जेस) समर्थन करतात. त्यामु्ळे मोठ्या आकाराच्या फ्लॅटधारकांना देखभालीच्या खर्चाचा वाटा जास्त द्यावा लागेल, असे कोर्टाने या प्रकरणी स्पष्ट केले.

उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबईतील एका सहकारी न्यायालयाने गत जानेवारी महिन्यात एका गृहनिर्माण संस्थेला प्रति चौरस फूट आधारावर देखभाल शुल्क आकारण्यास मनाई केली होती. या वादावर अंतिम निर्णय येईपर्यंत न्यायालयाने सोसायटीला कायदेशीरपणे अनिवार्य प्रति युनिट बिलिंग पद्धतीचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. वकील आभा सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हा आदेश दिला होता.

राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचा 6 ते 8 ऑगस्ट रोजी दौरा

0

पुणे दि. 5: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ (मंत्री दर्जा) व सदस्य गोरक्ष लोखंडे (सचिव दर्जा) हे बुधवार 6 ते 8 ऑगस्ट 2025 दरम्यान पुणे जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

बुधवार 6 ऑगस्ट रोजी अध्यक्ष व सदस्य हे आयुक्त पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या समवेत मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत आढावा बैठक व दलित वस्ती, रमाई घरकुल योजनेचा आढावा व कामाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाचे अधिकारी व विकसक यांच्यासोबत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पात्र व अपात्र नागरिकांच्या गैरसोयीबाबत आढावा बैठक घेणार आहेत.

गुरुवार 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत शासकीय विश्रामगृह (आयबी) येथे जिल्ह्यातील बारामती, खेड, देहू, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे, सासवड, इंदापूर, भोर, आंबेगाव, मंचर, जेजुरी चे मुख्याधिकारी यांच्यासोबत दलित वस्ती रमाई घरगुल योजनेचा आढावा, कामाची पाहणी भेटी व तपासणी करणार आहेत.

शुक्रवार 8 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा. ते सायं. 6 वाजेपर्यंत सर्व नगरपालिकांच्या कामांची तपासणी व सर्व नगरपालिका यांना प्राप्त होणाऱ्या महसूलांच्या एकूण 5 टक्के निधी आस्थापना वजा खर्च आर्थिक दुर्बल घटकांवर केलेल्या खर्चाची मागणी 5 वर्षाचा आढावा व कामाची तपासणी करणार आहेत.

आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांना पुणे दौऱ्यादरम्यान ज्यांना भेट घ्यावयाची आहे त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी केले आहे.
0000

डी.एल.एड. परीक्षेचा निकाल जाहीर

0

पुणे, दि. ५: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जून २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या डी.एल.एड. परीक्षेचा निकाल https://www.mscepune.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असून उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व छायाप्रत मागणीसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०२५ असा राहील, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

डी.एल.एड. परीक्षेसाठी मराठी माध्यमांच्या ९ हजार ९६१, उर्दू- २ हजार ३१८, हिंदी- २६२, इंग्रजी- १ हजार ३३१ व कन्नड माध्यमांच्या ३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण १३ हजार ५२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ९ हजार २ विद्यार्थी म्हणजे ६४.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश हस्तपोच मिळणार आहे, अशी माहितीही श्रीमती ओक यांनी दिली आहे.

भाजपच्या प्रवक्त्या होत्या आता झाल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश: हा लोकशाहीवर सर्वात मोठा आघात- रोहित पवार

मुंबई-सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणे म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वांत मोठा आघात असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. दोन वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यावरून रोहित पवारांनी हल्लाबोल केला आहे.

आमदार रोहित पवारांनी ट्विट करत म्हटले की, याचा भारतीय न्याय व्यवस्थेच्या निःपक्षपणावर दूरगामी परिणाम होईल. केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणे म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का? असा सवाल पवारांनी उपस्थित केला.

पुढे रोहित पवार म्हणतात, सत्तेवर कुणाचा अंकुश निर्माण होऊन सत्तेचे केंद्रीकरण होऊ नये तसेच चेक अँड बॅलन्स राहावा यासाठी संविधानात सेपरेशन ऑफ पॉवरचे तत्व अवलंबले आहे. राजकीय प्रवक्त्याची न्यायाधीशपदी नियुक्ती म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवरच्या तत्त्वाला आणि पर्यायाने संविधानाला हरताळ फासण्याचा हा प्रयत्न नाही का?जेंव्हा उच्च न्यायालयातील न्यायाधीश पदावरील व्यक्ती राजकीय पार्श्वभूमी आणि सत्ताधारी पक्षातील पदाचा उपभोग घेतलेली असेल तेंव्हा न्यायदानाची प्रक्रिया राजकीय आकस बाळगून होणार नाही, याची खात्री कोण देणार? एका राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीने पुर्ण न्यायदानाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही का? असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.


सदरील नियुक्त व्यक्तीच्या पात्रतेबाबत कुठलाही आक्षेप नाही, परंतु संबंधित व्यक्तीची नियुक्ती करताना ‘न्यायदान हे सामान्य नागरिकांसाठी कोणत्याही अभिनिवेशाशिवाय असते’ या सामान्य माणसांच्या भावनेलाच आघात बसत आहे. परिणामी संबंधित राजकीय व्यक्तीची न्यायाधीश पदावरील नियुक्ती बाबत पुनर्विचार करावा. आदरणीय सरन्यायाधीश साहेबांनीही याबाबत मार्गदर्शन करायला हवे.

उत्तराखंडमधील धराली येथे ढगफुटी, गाव गेले वाहून:34 सेकंदात घरे आणि हॉटेल ढिगाऱ्यात गाडली गेली

नवी दिल्ली-उत्तराखंडमधील धराली येथे ढगफुटीमुळे खीर गंगा गाव वाहून गेले आहे. मंगळवारी दुपारी १.४५ वाजता ही घटना घडली. या घटनेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. त्यात असे दिसून येते की डोंगरावरून पावसाचे पाणी आणि ढिगारा येऊन ३४ सेकंदात संपूर्ण गाव वाहून गेले.गंलीधराली हे उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील एक लहान गाव आहे, जे गंगोत्रीजवळील हर्षिल क्षेत्रापासून फक्त २ किमी पुढे आहे. गंगोत्री धाम येथून ८-१० किमी अंतरावर आहे.चारधाम यात्रा मार्गावर असल्याने, धरालीमध्ये अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि होमस्टे आहेत. त्यामुळे पुरात अनेक लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.धराली हे गंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. ते समुद्रसपाटीपासून सुमारे २,७०० मीटर उंचीवर आहे आणि हिमालयाच्या कुशीत असल्याने पर्यटक आणि यात्रेकरूंसाठी एक आकर्षक ठिकाण आहे.

धरालीला गंगेचे मातृगृह (मुखबा) असेही म्हणतात, कारण हिवाळ्यात गंगोत्री मंदिर बंद असताना, गंगेची मूर्ती धरालीजवळील मुखबा गावात आणली जाते.उत्तरकाशीचे डीएम प्रशांत आर्य म्हणाले की, आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. ५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.धराली गाव डेहराडूनपासून २१८ किमी अंतरावर आहे. घटनेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. लष्करासह एसडीआरएफ, एनडीआरएफच्या बचाव पथकेही घटनास्थळी पोहोचली आहेत.

पूर गावाकडे येताच लोक ओरडू लागले. अनेक हॉटेलमध्ये पाणी आणि ढिगारा शिरला आहे. धराली बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. अनेक हॉटेल आणि दुकाने कोसळली आहेत. गेल्या २ दिवसांपासून येथे मुसळधार पाऊस पडत आहे. मुख्यमंत्री धामी म्हणाले की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.
मान्सूनच्या पावसामुळे उत्तर प्रदेश-बिहारमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंगेर, बक्सर, पूर्णिया, भोजपूर, पटना यासह बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. बिहारमधील पूर्णियामध्ये ३८ वर्षांनंतर विक्रमी पाऊस पडला. रविवार ते सोमवार या काळात येथे २७०.६ मिमी पाऊस पडला. यापूर्वी १९८७ मध्ये २९४.९ मिमी पाऊस पडला होता.

उत्तर प्रदेशात, प्रयागराज, वाराणसीसह १७ जिल्ह्यांमधील ४०२ गावे पुराच्या विळख्यात सापडली आहेत. आतापर्यंत पावसामुळे ३४३ घरे कोसळली आहेत. गेल्या २४ तासांत पूर-पावसाशी संबंधित अपघातांमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जौनपूर, चंदौली, सुलतानपूर, कानपूर, पिलीभीत आणि सोनभद्र येथे ५ ऑगस्टपर्यंत, वाराणसी, हमीरपूर आणि लखीमपूर येथे ६ ऑगस्टपर्यंत, तर प्रयागराज आणि मिर्झापूरमध्ये ७ ऑगस्टपर्यंत शाळांच्या सुट्ट्या वाढविण्यात आल्या आहेत.

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे ३१० रस्ते बंद आहेत. सोमवारी झालेल्या पावसानंतर शिमला येथे ३ घरांवर भूस्खलन झाले. एक दिवस आधी लोक घराबाहेर पडले होते. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चंदीगड-मनाली चार लेन मार्गही बंद आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे नदीत वाहून ३ जणांचा मृत्यू झाला.

पोलीस आणि गणेश मंडळे बैठक तर झाली पण …CP म्हणाले, मंडळात मतभेद नाहीत पण ..

पुणे- गणेश विसर्जन मिरवणूक सकाळी ७ वाजता सुरु करायची आहे , ती सुरु करू द्यायची काय ? मनाच्या पाच गणपतींच्या विसर्जन रथांच्या नंतर मंडई आणि भाऊ रंगारी गणपतींचे विसर्जन रथ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होय द्यायचे काय ? अनंत चतुर्दशीलाच गणेश विसर्जन व्हावे हि धार्मिकता आता तरी पाळणे सुरु करायचे काय ? किंवा विसर्जन मिरवणुकीत किती ढोल पथके एखा एका मंडळाला ठेवता येऊ शकतील ? असे सारे प्रश्न आहे तसेच ठेऊन आज पोलीस आयुक्त आणि गणेश मंडळांची बैठक पार पडली . हि बैठक खूपच चांगल्या वातावरणात झाली. कोणत्याही महत्वाच्या मोठ्या मंडळात मतभेद असल्याच्या चर्चा आहेत पण तसे काही नसल्याचे दिसून आले आहे. पुन्हा एक बैठक होऊन मंडळे आपसात चांगली भूमिका ठरवून उत्साहात उत्सव साजरा करतील असा विश्वास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज गणेश मंडळाच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर व्यक्त केला .

रिमोटद्वारे होणारी १९ लाखांची वीजचोरी भोसरी एमआयडीसीमध्ये उघडकीस

पुणे, दि. ५ ऑगस्ट, २०२५- भोसरी एमआयडीसीमध्ये गेल्या २ वर्षांपासून एका औद्योगिक ग्राहकाकडून रिमोटचा वापर करुन केली जाणारी वीजचोरी महावितरणने नुकतीच उघडकीस आणली असून, या ग्राहकाकडून महावितरणने १९ लाख १९ हजारांचा दंड वसूल केला आहे. तसेच वीजचोरीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.

महावितरणचे अध्यक्ष तथा लोकेश चंद्र यांनी वीज वितरण हानी कमी करण्याबाबत क्षेत्रिय अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार महावितरण पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी वीजचोरी विरोधात मोहीम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या. गणेशखिंड मंडलाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड व भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी खास पथक तयार केले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वाखाली सहा. अभियंता गजानन झापे, वीज कर्मचारी हर्षद लोखंडे, सोमनाथ गायकवाड, महेश वाघमारे यांनी भोसरी एमआयडीसीमध्ये तपासणी सुरु केली. तेंव्हा मे. गणेश प्रेसिंग या औद्योगिक ग्राहकाकडून रिमोटद्वारे वीजचोरी केली जात असल्याचे आढळले. वीजचोरीसाठी वापरलेले सर्व साहित्य महावितरणने जप्त केले आहे. तसेच या ग्राहकाला मागील दोन वर्षांमध्ये केलेल्या ७७२७० युनीटच्या वीजचोरी पोटी १९ लाख १९ हजार ३६२ रुपयांचा दंड व २ लाख ३० हजारांचे तडजोड आकाराचे देयक देत दंड वसूल करण्यात आला आहे. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.

काँग्रेसच्या नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांचे ७ व ८ ऑगस्टला टिळक भवनमध्ये निवासी शिबीर.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार

मुंबई, दि. ५ ऑगस्ट २०२५
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिनांक ७ व ८ ऑगस्ट २०२५ रोजी पक्षाचे दादर येथील मुख्यालय टिळक भवन येथे नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांचे शिबीर आयोजित केले आहे. हे दोन दिवसीय निवासी शिबीर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून पक्ष संघटना मजबूत करण्यास प्राधान्य दिले आहे. दिनांक ४ जून २०२५ व २६ जून २०२५ रोजी निवड समितीसमोर मुलाखती घेऊन ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील सर्वच ५५३ ब्लॅाक अध्यक्षांचे शिबिर घेण्याचे प्रदेशाध्यक्षांनी ठरविले असून पहिल्या टप्प्यात नवनियुक्त ब्लॅाक अध्यक्षांचे शिबिर पार पडणार आहे. त्यांनंतर टप्प्याटप्याने सर्वांचे शिबिर होणार आहे. ७ ऑगस्ट रोजी सकाळी या शिबिराची सुरुवात होणार असून दुसऱ्या दिवशी ८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शिबिराची सांगता होणार आहे. काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळात पोहचवणे, पक्ष संघटन मजबूत करणे व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह राज्यातील विविध सामाजिक, राजकीय मुदद्यांवर या शिबिरात ऊहापोह केला जाणार आहे. नेते व विविध क्षेत्रातील वक्ते या शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत.

टाटा एआयएतर्फे भारतातील सुपरवुमेनचे सक्षमीकरण आणि संरक्षण करण्यासाठी ‘शुभ शक्ती’ योजना सुरू

काम करणाऱ्या भारतीय महिलांमध्ये कमी असलेले विमा संरक्षण प्रमाण भरून काढण्यासाठी महिला-केंद्रित लाभ, सर्वसमावेशक संरक्षण आणि परवडणाऱ्या प्रीमियमसह असलेली योजना

मुंबई, 5 ऑगस्ट 2025: टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सने ‘शुभ शक्ती’ ही खास महिलांसाठी डिझाइन केलेली टर्म इन्शुरन्स योजना सुरू केल्याची घोषणा केली आहे. ही फक्त एक जीवन विमा योजना नसून, प्रत्येक महिलेच्या जीवनातील विविध टप्पे व आर्थिक गरजांशी सुसंगत अशी एक सर्वांगीण संरक्षण योजना आहे. त्यायोगे ती वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात भरभराट करत स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम होऊ शकते. 

पारंपरिकदृष्ट्या, टर्म लाईफ इन्शुरन्स उद्योग पुरुष-केंद्रित पद्धतीने डिझाइन केला गेला आहे. मुख्यत्वे घरातील कर्त्या पुरुषांच्या गरजांवर अधिक भर देण्यात आला आहे आणि महिलांच्या विशेष गरजांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मात्र आज भारतीय महिला अडथळे पार करत आहेत आणि कामाच्या ठिकाणी नेतृत्व करीत आहेत, उद्योजक होत आहेत आणि आर्थिक निर्णय घेणाऱ्या बनत आहेत. आर्थिक वर्ष 18 मधील 23.3% वरून आर्थिक वर्ष 24 मध्ये महिला कामगार सहभाग दर 41.7% असा वाढलेला आहे. याचा अर्थ महिलांनी केवळ आर्थिक योगदानच दिले नाही, तर त्यांच्या आर्थिक भविष्याची सुरक्षितता देखील सुनिश्चित केली आहे.

तथापि, जरी महिला आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने प्रगती करत असल्या, तरी टाटा एआयएच्या एका अलीकडील सर्वेक्षणात आढळले की, 89% विवाहित महिला आजही आर्थिक नियोजनासाठी त्यांच्या पतीवर अवलंबून आहेत. केवळ 44% महिला पर्याय उपलब्ध असला तर स्वतंत्रपणे आर्थिक निर्णय घेतात.

ही दरी दर्शवते की महिलांच्या विशिष्ट आर्थिक गरजा व अडचणी लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या उपायांची अत्यंत तातडीने आवश्यकता आहे. या सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आता परिस्थितीत बदल होत आहे. डिसेंबर 2024 मध्ये 2.7 कोटी महिलांनी त्यांचे क्रेडिट स्कोअर ट्रॅक केले. केवळ एका वर्षात यात 42% वाढ झाली असून त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्याबाबत जागरूकतेत वाढ दिसून आली आहे.

‘शुभ शक्ती’ — महिलांच्या सामर्थ्याचा उत्सव

“भारतीय महिला जरी स्वत:च्या आर्थिक गुंतवणूक व नियोजनाची जबाबदारी घेत असल्या तरी अजूनही त्यांना विमा संरक्षण खूपच कमी आहे. त्यामुळे आपत्तीच्या वेळी त्यांचे कुटुंब असुरक्षित राहते,” असे टाटा एआयएच्या चीफ कमप्लायन्स ऑफिसर गायत्री नाथन यांनी सांगितले. “शुभ शक्तीच्या माध्यमातून आम्ही अशा उपायांची निर्मिती करत आहोत जी आजच्या महिलांच्या ताकदीशी सुसंगत आहे. स्त्री ला तिच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे, तिच्या आरोग्यात गुंतवणूक करणे आणि चिंतेपासून मुक्त जीवन जगण्यास मदत करणे हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे. तिच्या आकांक्षांना पाठबळ देणे, मानसिक शांती प्रदान करणे आणि तिच्या प्रियजनांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करता ती जीवनाच्या प्रत्येक आव्हानाला सामोरे जाऊ शकेल एवढं तिला सक्षम करणे हेच आमचे ध्येय आहे.”

शुभ शक्ती: तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संरक्षण देणारी योजना

महिलांच्या गरजा बहुविध असतात हे लक्षात घेऊन, टाटा एआयए शुभ शक्ती ही योजना लवचिक, सर्वसमावेशक आणि आई, मुलगी, जोडीदार आणि व्यावसायिक अशा महिलांच्या आयुष्यातील विविध भूमिकांमध्ये त्यांच्या सोबत देण्याची खात्री देते.

महिला-केंद्रित लाभ:

·         गर्भावस्थेदरम्यान प्रीमियम मध्ये सुट – प्रत्येक प्रसूतीनंतर 12 महिन्यांसाठी दोन वेळा प्रीमियम ब्रेक्स. यामुळे कोणताही आर्थिक बोजा न घेता स्त्रीयांना त्यांच्या आरोग्य आणि बाळाकडे लक्ष देणे शक्य होईल.

·         महिलांसाठी प्रीमियम दर सुमारे 15% कमी — संपूर्ण प्रीमियम पेयिग टर्म (PPT) दरम्यान दरवर्षी लागू.

·         आधीच्या 15% सूट व्यतिरिक्त सिंगल मदर्ससाठी अतिरिक्त 1% कायमस्वरूपी प्रीमियम सवलत

तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खास आरोग्य लाभ:

·         पीसीओडी सपोर्ट, आयव्हीएफ विषयक सल्लासेवा, वजन व्यवस्थापन यांसह महिलांकेंद्रित खास वैद्यकीय सेवा सुविधा

·         गर्भाशय मुखाचा कर्करोग, HPV, फ्लू इ. लसिकरणासाठी सहाय्य

·         तज्ञ डॉक्टर सल्ला, वार्षिक आरोग्य तपासणी आणि जीवनशैलीशी निगडित आरोग्य व्यवस्थापन

मुलांच्या शिक्षणासाठीचे संरक्षण

·         तुमच्या मुलांचे स्वप्न कधीही थांबता कामा नये. आयुष्यात कितीही संकट आली तरी मुलांच्या शिक्षणावर कोणत्याही संकटाचा परिणाम होणार नाही हे सुनिश्चित करत 3 मुलांपर्यंत वय 25 वर्षांपर्यंत मासिक उत्पन्न

·         नवऱ्याचा मृत्यू किंवा अपघाती मृत्यू झाल्यास प्रीमियम माफ – अनपेक्षित घटनेमध्ये कोणताही प्रीमियम न भरता योजना पुढे सुरू राहते. त्यामुळे कुटुंबाचे आर्थिक संरक्षण अबाधित राहते.

टाटा एआयए हेल्थ बडी — याचे कारण निरोगी जीवनाचे बक्षीस मिळायलाच हवे

निरोगी, स्वास्थ्यपूर्ण, तणावमुक्त जीवनाच्या प्रवासाला योग्य आधाराची गरज असते. टाटा एआयए हेल्थ बडी हा शुभ शक्तीचा एक अविभाज्य भाग असून महिलांसाठी सर्वसमावेशक व प्रोत्साहनात्मक वेलनेस प्लॅन सादर करतो. शुभ शक्ती आणि हेल्थ बडी मिळून आरोग्य आणि संपत्ती दोन्ही सुरक्षित ठेवण्यासाठी समग्र उपाययोजना सादर करतात.

·         निरोगी जीवनाचे बक्षीस: नियमित आरोग्य तपासणी व फिटनेस लक्ष्य पूर्ण केल्याबद्दल बक्षिसे

·         कुटुंबासाठी आरोग्य आणि वेलनेस लाभ: संपूर्ण कुटुंब निरोगी ठेवण्यासाठी आपल्या जीवलग लोकांकरता आरोग्य लाभ

·         Lifestyle Nudges: वैयक्तिक आहार सल्ला, अॅक्टीव्हीटी लक्ष्य, फिटनेससाठी बक्षिसे

·         परवडणारी योजना: महिलांसाठी 15% प्रीमियम सूट, डिजिटल खरेदी आणि सॅलराइड प्रोफाइलवर अतिरिक्त अशी कायमस्वरूपी सूट

बना तुमच्या कुटुंबाची ‘शुभ शक्ती’

टाटा एआयए शुभ शक्ती ही केवळ जीवन विमा योजना नाही. ती महिलांना सामर्थ्य, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता देत सक्षम बनवणारी योजना आहे. ही योजना महिलांचे आरोग्य, कुटुंबाचे संरक्षण आणि आर्थिक सक्षमीकरणावर भर देत सर्वांगीण उपाय सुविधा पुरवते. शुभ शक्तीच्या साहाय्याने, तुम्ही स्वप्न पाहू शकता, आत्मविश्वासाने जगू शकता आणि तुमच्या कुटुंबाला एका सुरक्षित, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र भविष्यात घेऊन जाऊ शकता.

कारण कणखर, सक्षम महिलेला तिच्याइतकंच कणखर आणि सक्षम संरक्षण मिळायलाच हवं.

केएफआयएलने ३ महिन्यात मिळविला 96 कोटीचा निव्वळ नफा

केएफआयएलने आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीचे वित्तीय निकाल केले जाहीर
स्टँडअलोन महसूल ₹1,685 कोटी असूनवर्षभरात 8% ने वाढ;
तर स्टँडअलोन निव्वळ नफा ₹96 कोटी असूनत्यात 27% वाढ.

पुणेभारत – 4 ऑगस्ट 2025: किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड (BSE: 500245), ही भारतातील आघाडीची कास्टिंग्ज व पिग आयर्न उत्पादक कंपनी असून, स्टील व सिमलेस ट्यूब्स क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावते. कंपनीने आज आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीसाठीचे अलेखापरीक्षित वित्तीय निकाल जाहीर केले.

आर्थिक वर्ष  2026 च्या पहिल्या तिमाहीच्या निकालांवर भाष्य करताना केएफआयएलचे व्यवस्थापकीय संचालक आरव्हीगुमास्ते म्हणाले, “आर्थिक वर्ष 2026 ची पहिली तिमाही ही केएफआयएलसाठी चांगली सुरुवात ठरली आहे. स्वतंत्र महसूल 8% ने वाढून ₹1,685 कोटी झाला असून, निव्वळ नफा 27% ने वाढून ₹96 कोटी झाला आहे. ट्रॅक्टर, लोखंड आणि स्टील क्षेत्रातील मागणीत झालेली सुधारणा, सकारात्मक बाजार भावना आणि पुरवठा साखळीतील अडथळे कमी होणे यामुळे हा परिणाम साधता आला आहे. या तिमाहीत आम्ही आमच्या संपूर्ण मालकीच्या दोन उपकंपन्या — ऑलिव्हर इंजिनिअरिंग आणि अ‍ॅडिका एनर्जी सोल्युशन्स — यांचे केएफआयएलमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला, ज्यामुळे आमची रचना सुलभ होईल व कार्यक्षमतेत वाढ होईल. याशिवाय, कर्नाटकातील जंबुनाथा लोहखनिज खाणीसाठी इलेक्ट्रॉनिक लिलावात आम्हाला प्राधान्यक्रमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले, हा आमच्या कच्च्या मालाच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हे सर्व घडामोडी आमच्या दीर्घकालीन मूल्यनिर्मिती, कार्यदक्षता आणि शाश्वत वाढीसाठी असलेल्या कटिबद्धतेला बळकटी देतात.”

आर्थिक वर्ष  2026 च्या पहिल्या तिमाहीच्या स्टँडअलोन कामगिरीचा आढावा :

●       ऑपरेशन्समधून महसूल: आर्थिक वर्ष  2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹1,685.1 कोटी, तर आर्थिक वर्ष  2025 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹1,553.7 कोटी – वार्षिक आधारावर 8% वाढ

●       ईबीआयटीडीए*: आर्थिक वर्ष  2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹213.9 कोटी, तर आर्थिक वर्ष  2025 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹187.4 कोटी – वार्षिक 14% वाढ

●       ईबीआयटीडीए* मार्जिन: आर्थिक वर्ष  2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 12.7%, तर आर्थिक वर्ष  2025 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 12.1% होते.

●       करपूर्व नफा (PBT#): आर्थिक वर्ष  2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹130.4 कोटी, तर आर्थिक वर्ष  2025 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹104.3 कोटी – वार्षिक 25% वाढ

●       करपश्चात नफा (PAT): आर्थिक वर्ष  2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹95.8 कोटी, तर आर्थिक वर्ष  2025 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹75.6 कोटी – वार्षिक 27% वाढ

आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये (संघटित) वित्तीय कामगिरीचा आढावा:

●        ऑपरेशन्समधून महसूल : आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹1,698.1 कोटी, तर मागील वर्षी याच तिमाहीत ₹1,553.7 कोटी — वार्षिक 9% वाढ

●       ईबीआयटीडीए*: आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹216.9 कोटी, तर मागील वर्षी ₹187.0 कोटी — वार्षिक 16% वाढ

●       ईबीआयटीडीए* मार्जिन: आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 12.8%, तर मागील वर्षी 12.0%

●       करपूर्व नफा (PBT#): आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹127.2 कोटी, तर मागील वर्षी ₹98.5 कोटी — वार्षिक आधारावर 29% वाढ

●       करपश्चात नफा (PAT): आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये ₹95.1 कोटी, तर मागील वर्षी ₹69.7 कोटी — वार्षिक 36% वाढ

विधवा महिला पेन्शन योजना पेन्शन योजनेची रक्कम रुपये १,५०० वरून रुपये ५००० करा

  • खासदार रविंद्र वायकर यांनी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे व सचिव यांना पाठवले पत्र
  • नियमात बदल करून वार्षिक उत्पन्न रुपये २१,००० वरून रुपये १ लाख करा
  • अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ व डिजिटल स्वरूपात उपलब्ध करा

मुंबई :राज्यातील असंख्य दिन दुबळ्या महिलांसाठी जगण्यासाठी आधारस्तभ असलेल्या विधवा महिला पेन्शन योजनाच्या वार्षिक उत्तपन्नाच्या मर्यादेत वाढ करण्यात यावी तसेच मासिक पेन्शनची रक्कम रुपये १,५०० वरून रुपये ५,००० करण्यात यावी अशी मागणी, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी पत्राद्वारे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच सचिव यांच्याकडे केली आहे.

हि योजना महिला व बालविकास विभागामार्फत महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. हि योजना राज्यातील दिन दुबळ्या महिलांसाठी जगण्याचा एकमेव आशेचा किरण आहे. परंतु अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. याचे कारण तहसीलदार यांच्याकडून त्या महिलांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्नाचा दाखला हा रुपये २१,००० इतका लागत आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत २१,००० म्हणजे मार्सिक १,७५० वेतन हे सामन्यातील सामान्य परिवार इतक्या वेतनामध्ये परिवाराचे पालन पोषण करून शकत नाही, मुंबई मध्ये एखादी सामान्य घरकाम करणारी महिला हि मासिक ८,००० ते १०,००० इतके वेतन मिळवते. त्यामुळे सदर वार्षिक उत्त्पन्न २१,००० च्या नियमावलीत बदल करून वार्षिक वेतन १,००,००० च्या आत करणे आवश्यक आहे. जेणेकरून विधवा महिलांना त्याचा लाभ घेता येईल. तसेच मुंबई महापालिकेद्वारा विधवा महिलेस पेन्शन देण्याची सुविधा करण्यात आल्यास महाराष्ट्रातील कित्येक महिलांना या योजनीचा लाभ घेणे शक्य होणार आहे, असे खासदार वायकर यांनी मंत्री तटकरे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. तसेच नियमावलीत काही बदलहि त्यांनी सुचवले आहेत.

यात अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ व डिजिटल स्वरूपात उपलब्ध करावी. उत्पन्न व इतर अटींमध्ये लवचिकता ठेवून गरजूंना न्याय द्यावा, रुपये १,५०० असलेली पेन्शन रक्कम सध्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रुपये ५,००० प्रती महिना करण्यात यावी. या सूचनांचा सहानभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे महिला व बालविकास मंत्री तसेच सचिव यांना केली आहे.

उद्योजकता विकास केंद्रामार्फत क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्न

पुणे, दि. ५: महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, मुंबई व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लघु, मध्यम उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवणे, गतीने बदल स्वीकारणे आणि सतत सुधारणा करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळा पुण्यात नुकतीच संपन्न झाली.

कार्यशाळेला कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे कंपनी सचिव अक्षय पाठक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या उपसंचालक श्रीमती मंजुषा चव्हाण, छत्रपती संभाजीनगरचे समन्वय विभाग प्रमुख प्रदीप इंगळे, नागपूर विभागाचे रितेश रंगारी, एच. आर. वाघमारे, बार्टीचे राज्य समन्वयक डी. यू. थावरे तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेत ३३५ उद्यमींनी सहभाग नोंदवला. तसेच १७८ उद्योग करु इच्छिणाऱ्या नवउद्योजकांनी विविध स्टॉलला भेटी दिल्या. कार्यशाळेत जेम पोर्टल, डिजिटल लोन, आर्थिक साक्षरता, महिला आणि अनुसूचित जाती-जमाती मधील उद्योजकांमध्ये जागृती निर्माण करुन क्षमतेत वाढ करणे, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, बाजारपेठ ब्रँडिंग व मार्केटिंग, नवीन बाजारपेठ शोधणे, वित्तपुरवठ्याच्या योजनेचा लाभ घेणे आदी विषयांवर विषय तज्ञांनी मार्गदर्शन केले, असे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी डॉ. ए. एस. डबीर यांनी कळविले आहे.
0000

वसतिगृह प्रवेश व ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’साठी अर्ज प्रक्रिया सुरु

पुणे, दि. ५: राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या ‘शासकीय वसतिगृह प्रवेश योजना’ आणि ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’साठी १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी.धुळाज यांनी केले आहे.

राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग घटकांतील विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात मागे पडू नयेत या उद्देशाने या योजना राबविण्यात येतात. या या योजनेंतर्गत गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना निवास, पोषणयुक्त आहार, शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य आणि मार्गदर्शन या स्वरूपात साहाय्य पुरविले जाते. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारित शिक्षण आणि व्यावसायिक प्रगतीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. संपर्ण गुणवत्ता आणि पारदर्शकतेने अर्जांची छाननी, निवड प्रक्रिया आणि लाभार्थ्यांपर्यंत अचूक अंमलबजावणी होणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी १०० विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वसतिगृह सुविधा, वसतिगृह प्रवेश दिला जाणार आहे. तसेच ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’अंतर्गत ६०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य दिले जाणार आहे. या योजना उच्च शिक्षणाकडे वाटचाल करणाऱ्या ग्रामीण, आदिवासी आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना गरजेनुसार आधार ठरणार आहेत.

अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला व ओळखपत्र यांची स्कॅन प्रत जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळण्यात येईल. नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोकण, लातूर व अमरावती येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयांमार्फत अर्जांची छाननी करून निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यातील अधिकृत वसतिगृहात प्रवेश व शैक्षणिक खर्चासाठी निधी देण्यात येईल, असे श्री. धुळाज यांनी कळविले आहे.

अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण: राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने सामाजिक परिवर्तन घडवणारी चळवळ हाती घेतली आहे. ज्ञानज्योती योजना आणि वसतिगृह प्रवेश योजनेद्वारे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी घटकांतील विद्यार्थिनींसाठी शिक्षण, निवास, शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून सुरक्षित व सक्षम अशी शैक्षणिक वाटचाल घडवून आणली आहे. या योजनांमुळे ग्रामीण व दुर्बल पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या असून त्या व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करू लागल्या आहेत. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन असल्यामुळे विद्यार्थिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
0000

हडपसरमध्ये कोयताधारी टोळीचा धुडगूस:हप्ता मागत सहा ते सात वाहनांची आणि दुकानांची तोडफोड

पुणे–पुणे शहरात सातत्याने वाहन तोडफोडीच्या घटना होत असतानाच हडपसर येथील साडेसतरानळी परिसरात कोयताधारी सहा ते सात जणांच्या टोळक्याने हप्ता द्या म्हणत वाहनांची व दुकानाची तोडफोड करत धुडगुस घातला. यावेळी टोळक्याने हत्यारे हातात मिरवून दहशत पसरवत नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले.

हडपसर येथील साडेसतरा नळी परिसरात २०३ छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास टोळके हातात हत्यारे धेऊन परिसरात दाखल झाले. यावेळी कोयताधारी टोळक्याने पाणीपुरीच्या गाड्या, दुचाकी, चार चाकी वाहने, रिक्षांची अशा पाच ते सहा वाहनांची तसेच स्वीटमार्ट दुकानाची तोडफोड केली. वर्दळीच्या वेळी टोळक्याने धुडगुस घातल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. तोडफोडीच्या घटनेच्यावेळी नागरिकांनी आपली दुकाने तात्काळ बंद केली. यावेळी टोळक्याने हातात हत्यारे घेऊन परिसरात दहशत माजवली. सामान्य नागरिकांच्या गाड्या फोडून नुकसान करणार्‍या टोळक्याचा पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

या तोडफोडीच्या घटनेनंतर हडपसर पोलिस घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी लागलीच आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक कामी लावले आहे. शहरात वारंवार तोडफोडीच्या घटना घडत असताना व सामान्य नागरिकांना वेठीस धरणार्‍या अशा टोळक्यांचा कायमचा बंदोबस्त कधी होणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

यावेळी नागरिकांनी सांगितले टोळक्याकडे कोयत्यासारखी हत्यारे होती. त्यांनी दुकांनाची तोडफोड तर केलीच पण येथे नागरिकांना धमकावले. यावेळी दुचाकीवर हत्यारे घेऊन आलेल्या टोळक्याने हप्ता द्या म्हणून तोडफोड केली. तसेच पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांची धिंड काढावी अशीही मागणी नागरिकांनी यावेळी केली.