Home Blog Page 184

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे विभागातील ६३९५ रूग्णांना ५५ कोटींची मदत

मुंबई, दि. ६ : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः पुणे विभागात मागील सात महिन्यामध्ये रूग्णांना तब्बल ५४ कोटी ९१ लाख ३७ हजार रूपयांची मदत दिली गेली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ज्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. रुग्णांनी प्रथम महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधीचा उपयोग खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचतो अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

२० गंभीर आजारासाठी मदत
कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे

  • रूग्णाचे आधार कार्ड
  • रूग्णाचे रेशन कार्ड
  • रूग्ण दाखल असल्यास त्याचा जिओ टॅग फोटो जोडणे बंधनकारक आहे.
  • तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (१.६० लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे)
  • संबंधित आजाराचे वैद्यकिय रिपोर्ट जोडणे आवश्यक आहे.
  • वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र
  • रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असावी
  • अपघात ग्रस्त रूग्णांसाठी एफआयआर रिपोर्ट आवश्यक आहे.
  • अवयव प्रत्यारोपण रूग्णांसाठी झेडटीसीसी नोंदणी पावती आवश्यक आहे.
    सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात aao.cmrf-mh@gov.in या ईमेल वर पाठवावीत. अधिक माहिती करिता टोल फ्री ९३२१ १०३ १०३ या क्रमाकांवर चौकशी करावी.

पुणे विभागातील मदतीचा आढावा (१ जानेवारी ते ३१ जुलै २०२५)

जिल्हा रुग्णसंख्या मदत रक्कम
पुणे २१४२ २० कोटी ५६ लाख ९१ हजार
कोल्हापूर १७१३ १३ कोटी १७ लाख ६४ हजार
सांगली ९३६ ७ कोटी ३५ लाख ७८ हजार
सोलापूर ७६४ ६ कोटी ५८ लाख २० हजार
सातारा ८४० ७ कोटी २२ लाख ८५ हजार


संपूर्ण राज्यात पेपरलेस प्रणाली, जिल्हा कक्षांची स्थापना आणि विविध सकारात्मक बदलांमुळे गरजू रुग्णांपर्यंत वेळेत मदत पोहोचत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार कक्षाचे कामकाज पारदर्शक पद्धतीने राबवले जात असून निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचत आहे. यापुढेही जास्तीतजास्त गरजू रूग्णांना मदत केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.

ठाकरे बंधु महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

मुंबई : आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधु एकत्र येण्याची चर्चा जोर धरत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत दोनवेळा ठाकरे बंधु एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. तर, यंदा उद्धव ठाकरेंच्या वाढदिनी राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन त्यांचा शुभेच्छा दिल्याने महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-मनसेची युती होणारच, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून मुंबईतील बेस्टच्या पतपेढीसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनाआणि मनसेची युती झाली आहे. दोन्ही पक्षाच्या युतीचे पॅनेल येथे निवडणुकीच्या मैदानात असणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार अशा चर्चा सुरू असताना बेस्ट महामंडळाच्या निमित्ताने येथील निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. बेस्ट उपक्रम कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाल्याची माहिती समोर आली आहे. बेस्ट पतपेढीची निवडणूक 18 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी येथील मनसे आणि ठाकरेंची शिवसेना संघटनांची युती झाल्याचे समजते. ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेने युती झाली असून प्रणित उत्कर्ष पॅनल या निवडणुकीत निवडणूक एकत्र निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे, गेल्या काही महिन्यांपासून राज्यात ठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा जोर धरत असतानाच आता महापालिका निवडणुकांपूर्वीच शिवसेना-मनसेची युती झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंकडून मनसैनिकांना महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे. 20 वर्षांनी आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही कशाला वाद निर्माण करता, असे म्हणत राज ठाकरेंनी मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांना एकत्रितपणे राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे, पुढील काळात शिवसेना-मनसे युती होईल, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे. कारण, काही केल्या ठाकरेंना मुंबई महापालिका भाजपच्या किंवा महायुतीच्या ताब्यात जाऊ द्यायची नाही. महापालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा अबाधित ठेवण्याची ठाकरे बंधु एकत्र येऊ शकतात.

उत्तराखंड दुर्घटना- 5 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 5 मृत्यू:11 सैनिकांसह 100 हून अधिक जण बेपत्ता, 400 जणांना वाचवले

डेहराडून-उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील ढगफुटीमुळे प्रभावित झालेल्या धारली, हर्षिल आणि सुखी टॉप भागात शोध मोहीम सुरू आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. १०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. एसडीआरएफ, एनडीआरएफ, आयटीबीपी आणि सैन्य बचाव कार्यात गुंतले आहे.

आयटीबीपीचे प्रवक्ते कमलेश कमल म्हणाले – ४०० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे. १०० हून अधिक लोक अजूनही अडकले आहेत. त्यांनाही संध्याकाळपर्यंत वाचवले जाईल. एनडीआरएफचे डीआयजी शाहिदी म्हणाले की, ११ लष्करी जवान बेपत्ता आहेत.

बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर धामी यांनी धारली आणि इतर ठिकाणांचे हवाई सर्वेक्षण केले. त्यांनी बचाव कार्याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली.

येथे, धारली घटनेपासून केरळमधील २८ पर्यटकांचा एक गट बेपत्ता आहे. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, सर्वांनी एक दिवस आधी गंगोत्रीला जाण्याबद्दल बोलले होते, परंतु भूस्खलनानंतर त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

गंगोत्री यात्रेकरूंसाठी मुख्य थांबा असलेल्या धराली गावातील बाजारपेठ, घरे, हॉटेल्स, डोंगरावरून वाहून आलेल्या खीर गंगा नदीत येणाऱ्या ढिगाऱ्याने वाहून गेले, हा विनाश अवघ्या ३४ सेकंदात झाला.
हिमालयातील दरीवर वसलेले धराली, १० वर्षांत तिसऱ्यांदा नष्ट झाले

१८६४, २०१३ आणि २०१४ मध्ये धराली गावात डोंगरावर ढग फुटले. यामुळे खीर नाल्याने प्रचंड हानी झाली. तिन्ही आपत्तींनंतर भूगर्भशास्त्रज्ञांनी राज्य सरकारला धराली गाव दुसरीकडे हलविण्याचा सल्ला दिला. त्यांनी असेही म्हटले की धराली आपत्तीच्या बाबतीत टाइम बॉम्बवर वसले आहे. परंतु, ते हलविण्यात आले नाही.

वरिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ प्रा. एस.पी. सती म्हणतात की, धराली हे ट्रान्स हिमालयात (४ हजार मीटरपेक्षा जास्त) असलेल्या मुख्य मध्यवर्ती पर्वतरांगेत आहे. ही एक दरी आहे जी मुख्य हिमालयाला ट्रान्स हिमालयाशी जोडते. भूकंपांसाठी देखील हे एक अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे. खीर गंगा नदी ज्या पर्वतावरून येते तो ६ हजार मीटर उंच आहे, तिथून जेव्हा जेव्हा पूर येतो तेव्हा तो धरालीला उद्ध्वस्त करतो.

सुमारे ६ महिन्यांपूर्वी, टेकडीचा एक भाग तुटून खीर नदीत पडत होता. पण तो अडकला. कदाचित यावेळीही तोच भाग तुटून खाली पडला असेल.

१५०० वर्षे जुने कल्प केदार मंदिरही उद्ध्वस्त

या दुर्घटनेत धाराली येथील प्राचीन कल्प केदार महादेव मंदिरही ढिगाऱ्यात गाडले गेले. भागीरथी नदीच्या काठावर असलेले हे १५०० वर्ष जुने मंदिर पंच केदार परंपरेशी संबंधित आहे. स्थानिक लोकांच्या श्रद्धेचे ते सर्वात मोठे केंद्र होते.

महाराष्ट्राचे 34 पर्यटक उत्तराखंडमध्ये बेपत्ता ? पुणे जिल्ह्यातील 19?

अवसरीच्या 19 जणांचा शोध सुरू

पुणे उत्तराखंडच्या धराली येथील ढगफुटीनंतर महाराष्ट्रातील तब्बल 34 पर्यटकांशी संपर्क होत नसल्याची बाब पुढे आली आहे. यात पुणे जिल्ह्यातील 19 व जळगावच्या धरणगाव तालुक्यातील 15 पर्यटकांचा समावेश आहे. प्रशासनातर्फे सध्या या पर्यटकांशी संपर्क साधण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न केला जात आहे.

उत्तराखंडच्या धराली गावात मंगळवारी भयंकर ढगफुटी झाली होती. त्यानंतर नदीला आलेल्या पुरात अख्खे गावच भूईसपाट झाले होते. या घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 50 हून अधिक जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यातच महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, जळगाव, नांदेड आदी जिल्ह्यांतील अनेक पर्यटक उत्तराखंडच्या पर्यटनासाठी गेले होते. यापैकी 34 पर्यटकांशी संपर्क होत नसल्यामुळे काळजी वाढली आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील 1990 च्या 10 वीच्या बॅचमधील 8 पुरुष व 11 महिलांचा एक समूह पर्यटनासाठी 1 ऑगस्ट रोजी उत्तराखंडला रवाना झाला होता. या सर्वांचा गंगोत्री परिसरातून शेवटचा संपर्क झाला होता. काल सकाळी या समुहातील काही जणांनी गंगोत्री येथील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मंगळवारी दुपारी धराली येथे ढगफुटी झाली तेव्हा हा समूह त्याच भागात होता. या समुहातील एका महिलेने आपल्या मुलाशी फोन करून आपण सर्वजण सुखरूप असल्याचे कळवले होते. पण त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही.

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील 15 भाविकांचा एक समूह उत्तराखंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्यांचे नातलग कालपासून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अजून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती आहे.

सोलापूरचे 4 तरुण सुरक्षित-दुसरीकडे, सोलापूरचे 4 तरुणही गंगोत्री परिसरात अडकलेत. त्यांच्याशीही संपर्क करण्यात अडथळे येत आहेत. विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले, मल्हारी थोटे अशी या तरुणांची नावे आहेत. त्यांनी मंगळवारी सकाळी आपण गंगोत्री परिसरात असल्याचे सांगितले होते. पण त्यानंतर त्यांचा संपर्क झाला नाही. यामुळे काळजी व्यक्त केली जात होती. पण आता ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.छत्रपती संभाजीनगरचे 18 पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकलेत. यात प्रमिला शिवाजी दहिवाळ, शिवाजी रावसाहेब दहिवाळ, कल्पना अनिल बनसोड, उषा अजय नागरे, किरण भीमराव शहाणे, ज्योती रमेश बोरडे, नूतन, संतोष कुमार कुपटकर, उज्वला अरुण बोरडे, मंजुषा नागरे, शुभांगी किरण शहाणे, शिवदत्त शहाणे, अरुणकुमार वामनराव बोर्डे, भारती लक्ष्मणराव कुपटकर, श्रीकृष्णा थोरहत्ते, शीतल थोरहत्ते, वेदांत थोरहत्ते, नवज्योत थोरहत्ते यांचा समावेश आहे. हे सर्वजण सुखरुप असल्याची माहिती आहे.

51 पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती-दुसरीकडे, राज्य आपत्कालीन कार्यालयाने महाराष्ट्रातील 51 पर्यटक उत्तराखंडमध्ये सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. यात नांदेड जिल्ह्यातील 11, सोलापूरच्या 4 व इतर जिल्ह्यातील 36 पर्यटकांचा समावेश आहे. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासन तत्पर असून पर्यटकांची संपर्क करत आहे. त्यासाठी राज्य शासनामार्फत उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र व उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी संपर्क साधला जात आहे. या पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी महाराष्ट्र सदन, दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत. येथील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून पुढील सूचना वेळोवेळी दिल्या जाणार असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे.

आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र : 9321587143 / 022-22027990 / 022-22794229

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड : 0135-2710334 / 821

बी.जे. मेडिकल कॉलेजमधील 23 वर्षीय तरुणीने वसतिगृहात गळफास घेतला

पुणे- शहरातील नामांकित बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या 23 वर्षीय तरुणीने मंगळवारी रात्री वसतिगृहातील एका रिकाम्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे.

ज्योती कृष्णकुमार मीना (वय 23, रा. राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ज्योती मीना ही मूळची राजस्थान येथील रहिवासी असून ती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती कॉलेजच्या वसतिगृहात राहत होती. मंगळवारी रात्री हॉस्टेल मधील तिच्या खोली समोरील एका मोकळ्या खोलीत तिने गळफास घेतला असल्याचे उघडकीस आले आहे. ही बाब लक्षात येताच सहकाऱ्यांनी आणि अधिवास कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती बंड गार्डन पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच बंड गार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली असून, त्यातून ती नैराश्यात होती, हे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मात्र ,आत्महत्येचे नेमके कारण काय, हे स्पष्ट होणे बाकी आहे. बंड गार्डन पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

याबाबत बंड गार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड म्हणाले,मयत तरुणी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता ती रूम मधून बाहेर पडली होती. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात परीक्षा सुरू असल्याने ती अभ्यास करण्यासाठी हॉस्टेल मध्ये दुसरीकडे गेली असल्याचा संशय तिचा रूम मधील दुसऱ्या मैत्रिणीला होता. परंतु रात्री उशीर होऊनही ती रूम मध्ये परत आली नसल्याने तिचा शोध सुरू झाला. हॉस्टेल मधील वॉर्डन यांनी याबाबत पोलिसांकडे रात्री साडेअकरा वाजता तक्रार दिली. तिचा शोध घेताना, बुधवारी रात्री एक वाजता तिच्या रूम समोरील दुसऱ्या रूम मध्ये तिचा गळफास घेतलेला मृतदेह मिळून आला आहे. याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.

अमेरिकेतील बोस्टन येथील नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लिजिस्लेटर्स २०२५ मध्ये भारतातील २४ राज्यातून १३० आमदारांचा सहभाग

पुणे, ६ ऑगस्ट : जागतिक पातळीवर लोकशाही संवाद बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, भारतीय विधिमंडळातील १३० हून अधिक सदस्यांचे एक शिष्टमंडळ ४ ते ६ ऑगस्ट २०२५ दरम्यान अमेरिकेच्या बोस्टन शहरात होणार्‍या नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लिजिस्लेटर्स ( NCSL) समिटमध्ये सहभाग घेत आहे. या उपक्रमाची माहिती एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट चे डॉ. परिमल माया सुधाकर (एनएलसी भारत) यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या ऐतिहासिक सहभागासाठी नॅशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्स भारत ( NLC भारत) या मंचाने पुढाकार घेतला असून, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले आहेत.
एनएलसी भारत हे भारतीय लोकप्रतिनिधींना सक्षम करणारे आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर विधिमंडळीय सहकार्य, संवाद व चांगल्या कार्यपद्धतींचे आदानप्रदान घडवून आणणारे एक अग्रगण्य व्यासपीठ आहे.
या शिष्टमंडळात देशभरातील २४ हून अधिक राज्यांमधून आलेले आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य (MLA व MLC) सहभागी असून, हे प्रतिनिधी २१ वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करतात. हे शिष्टमंडळ भारताच्या समावेशक, लोकशाही आणि वैविध्यपूर्ण नेतृत्वाचे प्रतीक आहे.
या उपक्रमाची सुरुवात २०२४ मध्ये, जेव्हा ५० लोकप्रतिनिधींनी लुईव्हिल, अमेरिका येथे झालेल्या विधिमंडळ परिषदेत सहभाग घेतला होता, अशा ऐतिहासिक प्रयत्नाने झाली. हा स्वतंत्र भारताच्या इतिहासात एक वेगळा टप्पा होता, कारण अशा प्रकारची संकल्पना ना सरकारने घेतली होती ना इतर कोणत्याही संस्थेने.
आता ही चळवळ अधिक बळकट होत, एकूण १३० लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन जगातील कोणत्याही परिषदेत भारतीय विधिमंडळाचे सर्वात मोठे प्रतिनिधित्व घडवून आणले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे – सीमापार ज्ञानविनिमय, विधिमंडळीय कार्यक्षमता वाढवणे, तसेच शासन व कायदेप्रक्रियेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्तम पद्धतींचा थेट अनुभव घेणे.
गेल्या दोन दिवसांमध्ये शिष्टमंडळाने अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रमांत सहभाग घेतला. बोस्टन कन्वेन्शन अ‍ॅण्ड एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या जनरल सेशनमध्ये त्यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर आरोग्य सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि वाहतूक व्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरील सत्रांमध्येही सहभाग घेतला.
यानंतर त्यांनी मॅसेच्युसेट्स स्टेट हाऊसला शैक्षणिक भेट दिली, ज्यामध्ये तेथील विधानप्रक्रिया व इतिहास याचा अभ्यास करण्यात आला. याच दौर्‍यात, छउडङ चे अध्यक्ष श्री. वेन हार्पर यांच्याशी झालेल्या औपचारिक संवादातून दोन्ही देशांतील संस्थात्मक संबंध अधिक दृढ झाले.
या दौर्‍यादरम्यान, शिष्टमंडळाने विविध राज्यांतील आणि इतर देशांतील विधिमंडळ सदस्यांशी उत्स्फूर्त संवाद साधला, ज्यातून आंतरराष्ट्रीय सहकार्य व परस्पर समजूत वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला.
मुंबईत २०२३ मध्ये पार पडलेल्या एनएलसी भारतच्या पहिल्या परिषदेनंतर, हा दौरा निरपेक्ष, माहितीवर आधारित व पक्षभेदापलीकडचा लोकशाही संवाद वाढवण्यासाठी आखलेल्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या समिटमध्ये भारतीय लोकप्रतिनिधी २,००० हून अधिक अमेरिकी आणि ७,००० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसोबत सहभागी होत आहेत. चर्चेचे विषय आहेत – कृत्रिम बुद्धिमत्ता व प्रशासन, डिजिटल लोकशाही, सायबर सुरक्षा, मतदारांचा विश्वास आणि धोरणात्मक नवकल्पना.
एनएलसी भारतचे संस्थापक डॉ. राहुल कराड म्हणाले, हे केवळ एक शिष्टमंडळ नाही, तर भारताच्या लोकशाही शक्तीचे आणि विविधतेतील एकतेचे जिवंत प्रतीक आहे. एवढ्या व्यापक प्रमाणावर आमदार व विधान परिषदेचे सदस्य आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच एकत्र आले आहेत. हे प्रतिनिधी जेव्हा या व्यासपीठावर पाऊल ठेवतात, तेव्हा केवळ वैयक्तिक आकांक्षा नाही, तर अब्जावधी नागरिकांची आशा आणि आपल्या प्राचीन संस्कृतीचे प्रतिनिधित्व ते करतात. आमचा हेतू साधा पण प्रभावी आहे – जगभरातील लोकशाहींच्या दरम्यान बंध निर्माण करणे, परस्पर शिकणे आणि उत्तम प्रशासनासाठी संवाद सुरू ठेवणे.
या दौर्‍यात अमेरिकन विधिमंडळ व्यवस्थेवर आधारित शैक्षणिक सत्रे, स्थानिक संस्था व विधानसभांना भेटी, तसेच राजकारण, शिक्षण व उद्योग क्षेत्रातील भारतीय वंशाच्या नेतृत्वाशी संवाद यांचा समावेश आहे. या सहभागामागील प्रमुख उद्देश आहे जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाहींमध्ये अर्थपूर्ण संवाद घडवणे आणि भारतीय वंशीय समुदायांशी संबंध दृढ करणे.
बोस्टनमधील हे शिष्टमंडळ भारतीय लोकप्रतिनिधींसाठी नियोजित आंतरराष्ट्रीय अनुभववृद्धी कार्यक्रमांच्या मालिकेतील एक भाग आहे. येत्या काळात आशिया, युरोप आणि अमेरिका खंडांतील इतर देशांमध्ये अशा दौर्‍यांचे आयोजन होणार आहे. या सहकार्याधारित सहभागाच्या मॉडेलमधून एनएलसी भारतचे उद्दिष्ट आहे – एक सशक्त, माहितीपूर्ण, आणि जागतिक स्तरावर जोडलेले विधिमंडळीय वातावरण तयार करणे, जे भारताच्या लोकशाही मूल्यांना बळकटी देईल आणि भारताला जागतिक लोकशाही नवोन्मेषाचा अग्रदूत म्हणून प्रतिष्ठा मिळवून देईल.

‘वॉर 2’ मध्ये हृतिक रोशन आणि एनटीआर यांचा जबरदस्त डान्स

यशराज फिल्म्सने आज अधिकृतरीत्या जाहीर केलं की भारतातील दोन मोठे सुपरस्टार्स – हृतिक रोशन आणि एनटीआर – यांच्यात ‘वॉर 2’ या आगामी अ‍ॅक्शनपटात होणारी डान्स टक्कर केवळ मोठ्या पडद्यावरच अनुभवता येणार आहे.

या जबरदस्त डान्स ट्रॅकचं नाव आहे ‘जनाबे आली’, ज्याला भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात मोठ्या, भव्य आणि जोशपूर्ण डान्स सीन्सपैकी एक मानलं जात आहे.
वायआरएफ उद्या सकाळी या गाण्याची पहिली झलक प्रदर्शित करणार आहे, जी प्रेक्षकांना या भव्य दृश्याचा थोडासा अनुभव देईल.

मात्र, या गाण्याचं पूर्ण रूप फक्त चित्रपटगृहातच पाहता येईल, कारण ते खास सिनेमॅटिक अनुभवासाठी डिझाइन करण्यात आलं आहे.

वायआरएफ ने आपल्या सोशल पोस्टमध्ये म्हटलं आहे: “डान्स फ्लोरवरही होईल वॉर! उद्या पाहा त्या डान्स राइव्हलरीची झलक – जी तुम्हाला केवळ मोठ्या पडद्यावरच पाहायला मिळेल, जेव्हा ‘वॉर 2’ 14 ऑगस्टपासून हिंदी, तेलुगु आणि तमिळमध्ये थिएटर्समध्ये प्रदर्शित होईल!

#JanaabeAali #SalamAnali #Kalaaba”

‘वॉर 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केलं आहे आणि निर्मिती आदित्य चोप्रा यांची आहे. हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वात मोठ्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असून, त्यात अ‍ॅक्शन, भव्य दृश्यं आणि आता एक विस्मयकारक डान्स शोडाउन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘वॉर 2’ 14 ऑगस्ट 2025 रोजी जगभरात हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

नाविन्यपूर्ण शिक्षण हेच राष्ट्राच्या प्रगतीचे साधन-डाॅ.अभय करंदीकर

: ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात ‘विद्यारंभ-२५’ला प्रारंभ 
पुणेः एकविसाव्या शतकातशिक्षणाची परिभाषा पूर्णपणे बदलली आहे. शिक्षण आता केवळ विद्यापीठे, प्रयोगशाळा, पदवी घेण्यापर्यंत मर्यादित राहिले नसून ते राष्ट्राच्या प्रगतीचे एक साधन बनले आहे. त्यामुळे, विकसित भारत@२०४७ चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीसह इतर क्षेत्रात 

राष्ट्रासमोर असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठीचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवे. धाडसी विचारांनीच भारत देश घडला असून, विद्यार्थ्यांनीही सर्वोत्तम देत आपल्या क्षेत्रात असणाऱ्या समस्यांना सोडविण्याचे धाडस दाखवावे, असे मत भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे (डीएसटी) सचिव प्रा. डाॅ.अभय करंदीकर यांनी व्यक्त केले. 

ते येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या १०व्या विद्यारंभ-२५ कार्यक्रमात बोलत होते.यावेळी, व्यासपीठावर, माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डाॅ.विश्वनाथ दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष  प्रा.डाॅ.मंगेश कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., कार्यकारी संचालक 

प्रा.डाॅ.सुनीता कराड, कार्यकारी संचालक डाॅ.विनायक घैसास, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, 

डाॅ.मोहित दुबे यांच्यासह विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक उपस्थित होते.डाॅ.करंदीकर पुढे म्हणाले, डाॅ.अब्दुल कलाम यांनी म्हटल्याप्रमाणे, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत. कारण, त्यातून येणारे अपयश देखील ऐतिहासिक असते. तसेच,

 एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या १५०+ एकरांच्या सुसज्ज अशा या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी क्रेया, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर यांसारखे अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जातात, व त्यातून सध्या ७५+ संशोधन प्रकल्प चालू असल्याचे पाहून आनंद झाला.विश्वशांती प्रार्थनेने सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.राजेश एस., यांनी तर आभार डाॅ.दुबे यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. 

श्रद्धा वाघटकर व डाॅ.अशोक घुगे यांनी केले. 

संपूर्ण विश्वाचे लक्ष भारताकडेः प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड….अध्यक्षीय भाषणात प्रा.डाॅ. विश्वनाथ कराड यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. ते म्हणाले, विद्यार्थी दशेत गुरे चारत असतानाच शहरात जावून मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी नक्कीच मोठी स्पप्ने पाहावीत, कारण ती एक दिवस नक्कीच पूर्ण होतात. अमेरिका भेटीत मला समजले की, संपूर्ण विश्वाचे लक्ष सध्या भारताकडे आहे. कारण, सध्या अशांतता, युद्धाचे सावट, उठाव यांच्यात गुरफटलेल्या विश्वाला सुख, शांती आणि समाधानाचा राजमार्ग दाखविण्याचे सामर्थ्य भारतीय संस्कृतीत आहे, असेही त्यांनी पुढे म्हटले. 

एआयसारख्या तंत्रज्ञानामुळे सध्या सर्व क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडत आहे. शिक्षण क्षेत्रातही याचा मोठा प्रभाव पडला आहे. विद्यार्थ्यांनीही या संसाधनाचा विधायक वापर करून बदलत्या जगासोबत राहिले पाहिजे. पारंपारिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर द्यायला हवा. त्यासाठी, नोकऱ्यांसाठी आवश्यक असणारी कौशल्य व नवउद्योजक घडवणारे शिक्षण देण्याची जबाबदारी आता विद्यापीठांची आहे. अगदी तसेच अभिप्रेत शिक्षण एमआयटी एडीटी विद्यापीठ पुरवित असून त्याचमुळे यंदा ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नव्याने प्रवेश घेत पुनश्च एमआयटी ब्रँड वर विश्वास दर्शविला आहे.

-प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्याध्यक्ष,
एमआयटी एडीटी विद्यापीठ, लोणी-काळभोर, पुणे

ध्वजगीतातून उर्जानिर्मितीसह देशप्रेमाचा जागर : एअर मार्शल प्रदीप बापट

जिल्हास्तरीय ‌‘अमृतप्रभा समूहगान‌’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पुणे : ध्वजगीतातून देशाचा गौरवशाली इतिहास जागविला जातो, उर्जा संचारते. अशा गीतांद्वारेच सैन्याचेही मनोबल वाढविण्यासह मदत होते. त्याचप्रमाणे एकता, शिस्त, राष्ट्रसन्मान आणि उर्जानिर्मितीसह देशप्रेमाचा जागर अशा स्फूर्तीदायक गीतांमधून होतो, असे प्रतिपादन एअर मार्शल (निवृत्त) प्रदीप बापट यांनी केले.

दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे शालेय तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित जिल्हास्तरीय ‌‘अमृतप्रभा समूहगान‌’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण आज (दि. 6) एअर मार्शल (निवृत्त) प्रदीप बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सोमवार पेठेतील संस्थेच्या आबासाहेब अत्रे प्रशालेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे मानद अध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्यकारी मंडळ मानद सदस्य भारत वेदपाठक तसेच स्पर्धेचे परीक्षक संजय गोगटे, भरत कामत, मोहन पारसनीस, सुयोग कुंडलकर, रेवती कामत, आरती कुंडलकर मंचावर होते. स्पर्धेसाठी यंदा ‌‘ध्वजगीत/झेंडागीत‌’ असा विषय देण्यात आला होता. स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. या समूहगीत स्पर्धेसाठी पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व कनिष्ठ महाविद्यालय अशा तीन गटांमध्ये 65 शाळा सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचे संयोजन डॉ. भारती एम. डी., संतोष अत्रे व प्रसाद भडसावळे यांनी केले.

‌‘ऑपरेशन सिंदूर‌’मुळे आत्मनिर्भर भारत संकल्पना प्रत्यक्षात

‌‘ऑपरेशन सिंदूर‌’च्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली असे सांगून एअर मार्शल प्रदीप बापट म्हणाले, ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ दरम्यान ब्रह्मोस, आकाश अशी भारतीय बनावटीची क्षेपणास्त्रे वापरली गेली यातून भारतीय तंत्रज्ञान उत्तम आहे हे सिद्ध झाले आणि या कामगीरीतून देशाच्या तिरंग्याचा मान राखला जात तो डौलाने उंचचउंच फडकत आहे. आजचे विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्याने कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडविली तरी देशसेवेसाठी सदैव तत्पर रहावे.

परीक्षकांच्या वतीने भरत कामत, सुयोग कुंडलकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेला कशापद्धतीने सामोरे जावे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेत प्रथम आलेल्या तीनही गटातील संघांनी गीत सादरीकरण केले. मान्यवरांचे स्वागत संजीव ब्रह्मे, भारत वेदपाठक यांनी केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल

इयत्ता 5वी ते 7वी
प्रथम क्रमांक : भारतीय विद्या भवन परांजपे विद्यालय (कोथरूड)
द्वितीय क्रमांक : सरहद सी. बी. एस. ई. इंग्लिश मिडीयम स्कूल (कात्रज, पुणे)
तृतीय क्रमांक : सह्याद्री नॅशनल स्कूल ( वारजे माळवाडी )
उत्तेजनार्थ : जयवंत पब्लिक स्कूल (हडपसर), एंजल्स हायस्कूल (लोणी काळभोर)

इयत्ता 8वी ते 10वी
प्रथम क्रमांक : माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालय (टिळक रस्ता)
द्वितीय क्रमांक: न्यू इंडिया मिडीयम स्कूल (कोथरूड)
तृतीय क्रमांक: एंजल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज (लोणी काळभोर)
उत्तेजनार्थ : सरहद ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (निंबाळकरवाडी, कात्रज)
इनोव्हेरा स्कूल (हडपसर), एच. एच. सी. पी., हुजूरपागा हायस्कूल (लक्ष्मी रस्ता)

कनिष्ठ महाविद्यालय गट
प्रथम क्रमांक : एच.एच.सी.पी.हुजूरपागा हायस्कूल (नारायण पेठ)
द्वितीय क्रमांक : विमलाबाई गरवारे प्रशाला
तृतीय क्रमांक : म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा

ट्रम्प धमकावत आहेत,अन अदानींविरुद्ध अमेरिकेत सुरू असलेल्या चौकशीमुळे मोदी हतबल:राहुल गांधी


नवी दिल्ली-काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे टिकू शकत नाहीत. याचे कारण म्हणजे अदानींविरुद्ध अमेरिकेत चौकशी सुरू आहे. अशा परिस्थितीत मोदींचे हात बांधलेले आहेत. मोदींचे A-A (अदानी-अंबानी) शी काय संबंध आहेत, हे उघड झाले आहे.गेल्या वर्षी अमेरिकेत अदानींसह ८ जणांवर अब्जावधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप होता. अमेरिकन अॅटर्नी ऑफिसच्या आरोपपत्रानुसार, अदानी यांच्या कंपनीने भारतात अक्षय ऊर्जा प्रकल्प अनुचित मार्गाने मिळवले होते. यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्यात आली होती. चौकशी सुरू आहे.
लोकसभेत दुसऱ्या दिवशी ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले- ट्रम्प यांनी २९ वेळा म्हटले आहे की आम्ही युद्ध थांबवले. जर त्यांच्यात हिंमत असेल तर पंतप्रधानांनी सभागृहात सांगावे की ते खोटे बोलत आहेत.जर पंतप्रधान मोदींकडे इंदिरा गांधींच्या ५० टक्केही ताकद असेल तर सांगा की ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे एकही लढाऊ विमान पडले नाही. पंतप्रधान ज्या पद्धतीने त्यांची प्रतिमा वाचवण्यासाठी सशस्त्र दलांचा वापर करत आहेत ते देशासाठी धोकादायक आहे.

ट्रम्प आज भारतावर आणखी कर लादण्याची घोषणा करू शकतात. काल, म्हणजे मंगळवारी, त्यांनी सांगितले होते की ते २४ तासांच्या आत भारतावर मोठे कर लादणार आहेत. ट्रम्प यांनी ३० जुलै रोजी भारतावर २५% कर लादण्याची घोषणा केली होती.त्यांनी म्हटले होते की, भारत रशियासोबत व्यवसाय करून युक्रेनविरुद्ध रशियन युद्धयंत्रणेला इंधन देत आहे. यामुळे अमेरिकेला कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

याच्या एक दिवस आधी त्यांनी म्हटले होते की भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करत आहे आणि ते खुल्या बाजारात विकत आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये किती लोक मारले जात आहेत याची भारताला पर्वा नाही. या कारणास्तव, मी भारतावरील शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवीन.युक्रेन युद्धापूर्वी, भारत रशियाकडून फक्त ०.२% (प्रतिदिन ६८ हजार बॅरल) तेल आयात करत होता. मे २०२३ पर्यंत ते ४५% (प्रतिदिन २० लाख बॅरल) पर्यंत वाढले, तर २०२५ मध्ये जानेवारी ते जुलै या कालावधीत, भारत रशियाकडून दररोज १७.८ लाख बॅरल तेल खरेदी करत आहे.गेल्या दोन वर्षांपासून, भारत दरवर्षी १३० अब्ज डॉलर्स (११.३३ लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीचे रशियन तेल खरेदी करत आहे.

पुणे ब्लाइंड स्कूलमध्ये ‘ऐकाकी ऑडिओ लर्निंग लॅब’ची स्थापना

पुणे : दृष्टी नसली तरी दृष्टिकोन असतो, ध्येय असते आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हवी असते योग्य दिशा. ही दिशा आता पुण्यातील दृष्टिहीन विद्यार्थ्यांना मिळाली आहे ‘ऐकाकी ऑडिओ लर्निंग लॅब’च्या रूपाने. शिक्षणाच्या प्रकाशाकडे नेणारा हा आवाज दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील नवी आशा आहे. दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, कोथरूडमधील पुणे ब्लाइंड स्कूलमध्ये ‘ऐकाकी ऑडिओ लर्निंग लॅब’ची स्थापना करण्यात आली आहे.

लर्नकीज एज्युटेन्मेंट प्रा. लि. आणि विकसित भारत इनोव्हेट प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने या लॅबची निर्मिती करण्यात आली असून, शैक्षणिक दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे, असे ऐकाकी ऍपचे निर्माते सचिन पंडित यांनी सांगितले. विकसित भारत इनोव्हेट प्रा.लि.  या संस्थेने लॅबचे संपूर्ण नियोजन, तांत्रिक रचना व कार्यान्वयन प्रभावीपणे पार पाडले आहे.

विकसित भारत इनोव्हेट प्रा. ली. च्या मंजुषा वैद्य म्हणाल्या की, या लॅबच्या माध्यमातून इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमावर आधारित ऑडिओ कंटेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पाठ्यपुस्तकातील प्रत्येक धड्याचे ऑडिओ रूपांतर केले गेले असून, विद्यार्थ्यांना हेडफोन व ऑडिओ प्लेयरद्वारे सहजतेने अभ्यास करता येतो. प्रत्येक धडा आवाजाच्या चढ-उतारासह शास्त्रीय दृष्टीकोनातून वाचिक अभिनयातून रेकाॅर्ड केल्यामुळे विद्यार्थ्यांना विशेष रस निर्माण झाला आहे. त्यांना न समजलेल्या गोष्टी देखील पुन्हा ऐकता येतात. विद्यार्थ्यांना हेडफोन व आॅडिओ प्लेअरच्या माध्यमातून वैयक्तिक पातळीवर ऐकण्याची सुविधा ‘ऐकाकी ऑडिओ लर्निंग लॅब’ च्या माध्यमातून करण्यात आली आहे.  स्व-अध्ययनासोबतच स्वतःच्या गतीप्रमाणे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

या प्रकल्पाला प्रतिष्ठित कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व कार्यक्रमांतर्गत विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला नवी दिशा देणाऱ्या या प्रकल्पामुळे, दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या शिक्षण क्षेत्रात एक आशादायक आणि परिणामकारक पाऊल उचलले गेले आहे, असे अंध शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा रांका यांनी सांगितले. या संपूर्ण उपक्रमात अश्विनी भालेकर, समीर साळुंके व नेहा तातुसकर यांनी मोलाचा सहभाग घेतला.

मोबाईलचा अतिवापर माणसाला अधोगतीकडे नेणारा

विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये ‘मोबाईल व्यसनमुक्ती’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे: “मोबाईल हे मूलतः संवादाचे माध्यम होते. मात्र, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे त्यातील संवाद हरपून अन्य गोष्टी मानवी मेंदूला वेडे करू पाहत आहेत. मोबाईलचा गरजेपुरता वापर केला, तर आपल्या जगण्याला पूरक असे साधन आहे. मात्र, त्याचा अतिवापर माणसाला अधोगतीकडे घेऊन जाणारा आहे. कृत्रिम बुद्धिमतेमुळे आपली विचार करण्याची क्षमता खुंटत असून, माणसाच्या बौद्धिक क्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व वक्ते अच्युत गोडबोले यांनी केले. 

विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर व माजी विद्यार्थी नवनाथ जगताप लिखित, रुद्र प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘मोबाईल व्यसनमुक्ती’ या पुस्तकाचे प्रकाशन अच्युत गोडबोले व ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांच्या हस्ते झाले. समितीच्या सेनापती बापट रस्त्यावरील लजपतराय भवन विद्यार्थी संकुलात झालेल्या कार्यक्रमात समितीचे कायम विश्वस्त डॉ. भाऊसाहेब जाधव, सी. ई. पोतनीस, सामाजिक कार्यकर्ते यजुर्वेंद्र महाजन, प्रदीप गारटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जवळपास ५०० पेक्षा अधिक लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

अच्युत गोडबोले म्हणाले, “टीव्हीपाठोपाठ आलेल्या मोबाईल, इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे एक मोठा विस्फोट झाला आहे. ज्ञानवर्धनाचे साधन होण्याऐवजी त्याचे व्यसन लागून न्यूनगंड तयार होऊ लागला आहे. तुलनात्मक मानसिकतेमुळे नैराश्य येण्यासह आत्मविशास खालावत आहे. मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. सतत गुंतून राहिल्याने शारीरिक व्याधींनाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अतिवापर टाळा. स्वतःची विचार क्षमता विकसित करा. सोशल व इमोशनल इंटेलिजन्स, सांघिक भावना, श्रवणकला, वाचन यावर भर दिला पाहिजे. समितीमध्ये या सर्व गोष्टींवर भर दिला जातो, याचा आनंद आहे.”

प्रतापराव पवार म्हणाले, “मोबाईलचा उपयुक्त वापर चांगला आहे. मात्र, सर्वकाही त्यावर अवलंबून असता कामा नये. स्वतःसाठी वेळ देता यावा. आपला प्राधान्यक्रम ठरवून वेळेचे योग्य नियोजन केले, तर तुमचे चारित्र्य अधिक संपन्न होण्यास मदत होईल. सबबी न सांगता केलेले कष्ट, जपलेला प्रामाणिकपणा आणि शिस्त आपल्याला यशाकडे घेऊन जाते. तुमचे चारित्र्य मोबाईल नव्हे, तर स्वतः तुम्ही घडवत असता. त्यामुळे स्वतःला समृद्ध करण्यासाठी इतर अनेक पर्यायांचा योग्य वापर करा.”

यजुर्वेंद्र महाजन यांनी मोबाईलचा वापर अनेकांना फायद्याचा ठरतो, असे सांगत नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे कारणही मोबाईलच असल्याचे सांगितले. तुषार रंजनकर यांनी मोबाईल, इंटरनेटच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्याची गरज अधोरेखित केली. मेंदूवर थेट परिणाम करणाऱ्या मोबाईलच्या व्यसनाला आपण गांभीर्याने घ्यायला हवे, असे नवनाथ जगताप यांनी नमूद केले. पर्णवी म्हस्के, सुप्रिया केळवकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

जयवंत दळवी जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर

0

पुणे : सिद्धहस्त लेखक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्याच कथांवर आधारित कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून अनिता पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांनी ‌‘कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच‌’ ही कथा सादर केली. पल्लवी भालेकर (पुरुष) यांना द्वितीय तर धनंजय जोशी (जीवा शिंगी) यांना तृतीय क्रमांक मिळाला.

एकपात्री कलाकार परिषद, रसिक कलारंजन आणि निळू फुले कला अकादमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे यंदाचे पहिले वर्ष असून 40 स्पर्धकांनी कथांचे सादरीकरण केले. दि. 1 ते दि. 5 ऑगस्ट या कालावधीत स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्घाटन जयवंत दळवी यांचे सुपुत्र गिरीश दळवी यांच्या हस्ते झाले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज (दि. 5) आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ पत्रकार सु. ल. खुटवड यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे परीक्षक ज्येष्ठ कलाकार रवींद्र देशपांडे, कल्पना देशपांडे तसेच एकपात्री कलाकार परिषदेचे पपिचंद श्रीश्रीमाळ, रसिक कलारंजनचे प्रमुख बिपिन दफ्तरदार मंचावर होते. शास्त्री रोडवरील निळू फुले कला अकादमी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ज्योती ब्रह्मे (रावसाहेब सदावर्ते), ज्योती कानेटकर (प्रभूची कृपा), प्रिया उंडे (भंडाऱ्याचे हॉटेल) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे आणि जयवंत दळवी यांच्या साहित्यातून आपल्यावर संस्कार झाल्याचे सांगून सु. ल. खुटवड म्हणाले, दळवी यांच्या साहित्याची समीक्षकांनी दखल घेतली नाही त्याचप्रमाणे दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू असूनही सरकारनेही काही कार्यक्रम घेतले नाहीत याची खंत आहे.

रवींद्र देशपांडे म्हणाले, केवळ हौस म्हणून स्पर्धेत सहभागी होऊ नये. चांगल्यात चांगले काय देता येईल याचा कायम विचार आणि क्षमतांचा वापर करायला हवा. कल्पना देशपांडे यांनी तांत्रिक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुपमा कुलकर्णी, भाग्यश्री देशपांडे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी दिलीप धायगुडे, अंजली दफ्तरदार, अनुराधा कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

भाजपाचे पदाधिकारीच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात?: हर्षवर्धन सपकाळ

न्यायपालिकेतही भाजपाचा थेट प्रवेश,

मुंबई, दि. ५ ऑगस्ट २०२५
लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायपालिका हा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. सर्वसामान्य जनतेचा आजही न्यायपालिकेवर विश्वास आहे परंतु मागील काही वर्षातील घटना पाहता न्यायपालिकेवरचा विश्वासही डळमळीत होत चालला आहे. आता तर थेट न्यायाधिशपदावरही सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असेल तर ते निष्पक्षपातीपणे न्याय देतील याबाबत शंका नक्कीच येऊ शकते आणि हा प्रकार लोकशाहीला अत्यंत घातक आहे, असे परखड मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या अॅड. आरती अरूण साठे यांनी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रच्या प्रवक्त्या म्हणून काम केले आहे. दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश प्रवक्त्यांची यादी जाहीर केली, त्यात साठे यांचेही नाव आहे. जी व्यक्ती एका पक्षाची सक्रीय पदाधिकारी आहे त्यांची जर न्यायाधीशपदी नियुक्ती होत असेल तर, त्या जो निकाल देतील तो निष्पक्ष असेल असे कसे म्हणता येईल. अशा प्रकारच्या नियुक्त्या या लोकशाही व्यवस्थेचा गळा घोटणाऱ्या आहेत तसेच गंभीर व चिंताजनक आहेत.

देशात २०१४ पासून लोकशाही व संविधानाला पद्धतशीरपणे धाब्यावर बसवून सर्व राज्यकारभार सुरु आहे. सर्व स्वायत्त संस्था सरकारच्या बटीक बनल्या असून सरकारी आदेशानुसार काम करत आहेत, यात निवडणूक आयोगाचीही भर पडलेली आहे. परंतु सर्वात गंभीर व चिंतानजक प्रकार न्यायपालिकेचा बनला आहे. मागील ११ वर्षातील जे काही महत्वाचे निकाल न्यायालयाने दिले आहेत त्यावरून सर्वसामान्यांच्या मनात संशय वाढत चालला आहे. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचे प्रकरण असो वा चीन संदर्भात विरोधी पक्षनेते नात्याने त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर न्यायालयाने टिप्पणी करणे हे चिंताजनकच नाही तर अत्यंत आक्षेपार्ह आहे. विरोधी पक्षाने सरकारला प्रश्न विचारायचे नाही तर कोणी विचारायचे. देशप्रेमी कोण, हे ठरवणे ना तर न्यायपालिकेच काम आहे ना ही न्यायाधिश यांचे ते काम आहे. न्यायपालिकेतील मोठ्या पदावरून निवृत्त होताच राज्यपाल, राज्यसभा सदस्य अथवा एखाद्या देशाचे राजदूत किंवा एका महत्वाच्या संस्थेचे प्रमुखपद बक्षिस सारखे पदरात पाडून घेतले जाते हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, न्यायापालिकेचा आम्हाला नितांत आदर आहे पण जे चालले आहे ते चुकीचा पायंडा पाडणारे आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास हेच खरे शिक्षण-स्वामी स्वरूपानंद सरस्वती 

माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचा ४३ वा स्थापनादिन  संपन्न

पुणे, : ” शिक्षणाचा प्रचार व प्रसार करत असताना त्याचे प्रयोजन काय आहे, हा चिंतनाचा मुद्दा आहे. शिक्षणाचा केंद्रबिंदू व्यक्ती असून त्याचा सर्वांगीण विकास हेच मुख्य प्रयोजन असावे.” असे विचार श्रुतिसागर आश्रम फुलगाव चे संस्थापक स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचा ४३ व्या  स्थापनादिनाच्या समारंभात मुख्य पाहुणे म्हणून ते बोलत होते.
 कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख होते. तसेच गरीबे इन्स्टिट्यूट फॉर सॉफ्ट पॉवर अँड पब्लिक डिप्लोमसी यूएसचे संस्थापक आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते प्रा. फर्नांडो गरिबे , गरिबे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष  रोनाल्ड सी. गुनेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष, विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, विश्वस्त व सचिव प्रा. स्वाती कराड – चाटे, विश्वस्त डॉ. विनायक घैसास, एमआयटी डब्ल्यूपीयू चे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. संजय उपाध्ये लिखित आणि प्रा. शशांक दिवेकर प्रस्तुत “गीत विश्वनाथ, विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा: यात्रा वचनपूर्तीची” हा कार्यक्रम झाला.
स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले, “शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा, बुद्धीचा आणि मनाचा विकास  झाला तर सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहील.  मनाची मशागत करणारी मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती आवश्यक असून व्यक्तिमत्वाचा विकास हेच खरे शिक्षण ठरू शकेल”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”  मूल्याधिष्ठित नागरिक घडावा या विचारातून ही शिक्षण संस्था  कार्यरत आहे. अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयातून जगात शांती नांदेल. विश्वशांती साठी मानवतावादाचे वैश्विक सिद्धांत विद्यार्थ्यांमध्ये  रुजावे यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे.”
प्रा. फर्नांडो गरिबे म्हणाले, “सध्याचे जग जिथे विसंगती आणि मतभेदांना तोंड देत आहे. अशावेळी आंतरिक ज्ञानाचा शोध घेणे हे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी  ज्ञानाबरोबर आंतरिक ज्ञानाचा शोध घ्यावा व वैश्विक मानवता जागवावी.”
संजय देशमुख म्हणाले, ” विश्वशांतीचा मंत्र देणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी पसायदानातून विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखविला आहे. ही शिक्षणसंस्था पसायदानाचा  वैश्विक विचार शिक्षणाच्या माध्यमातून नव्या पिढीमध्ये रुजविण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहे.
 माईर्सचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांनी दृकश्राव्य माध्यमातून संस्थेच्या कार्याचा आढावा सांगितला.
यानंतर माईर्स शिक्षण संस्था समूहातील विविध शाखांमधील उल्लेखनीय सेवा देणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानपत्र व  रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, संस्थेचा माजी विद्यार्थी म्हणून जागतिक स्तरावर केलेल्या रचनात्मक कार्यासाठी माईर्स शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष व विश्वस्त डॉ. सुनिल कराड यांना  गोल्डन हॉल ऑफ फेम अवॉर्ड मोस्ट प्रिव्हियस ज्वेल्स ऑफ नॉलेज डिवाइन अँड युनिक पर्ल्स ऑफ विस्डम ने सन्मानित करण्यात आले.
 डॉ. मंगेश कराड यांनी  प्रास्ताविक केले.
प्रा. स्वाती कराड चाटे यांनी आभार मानले व  डॉ. रत्नदीप जोशी यांनी सूत्रसंचालन केले.