Home Blog Page 183

शिमल्यात ढगफुटीने पूर: 360 घरे कोसळली; 2 दिवसांत 16 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी रात्री १०:१५ वाजता शिमला जिल्ह्यात ढगफुटी झाली. त्यामुळे नोगली नाल्याला पाणी आले.

बुधवारी, मंडीतील दवाडा येथील चंदीगड-मनाली चौपदरी उड्डाणपुलावर भूस्खलनामुळे भेगा पडल्या. राज्यातील मंडी-मनाली आणि चंदीगड-शिमला चौपदरी रस्त्यांसह ५३३ रस्ते बंद करण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशात सततच्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. प्रयागराज, वाराणसीसह २४ जिल्ह्यांमधील १,२४५ गावे पुराच्या विळख्यात सापडली आहेत. आतापर्यंत पावसामुळे ३६० घरे कोसळली आहेत. गेल्या २ दिवसांत पूर आणि पावसाशी संबंधित अपघातांमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी, फर्रुखाबादच्या पंखियान गावातील एक घर १० सेकंदात गंगा नदीत बुडाले. लखीमपूर खेरी येथे शारदा नदीला पूर आला आहे. अयोध्येतील सरयू नदीची पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा २ सेमी वर पोहोचली आहे. ४८ गावांमध्ये पुराचा धोका आहे.

बिहारमध्ये गंगा आणि सोन नद्या दुथडी भरून वाहत आहेत. राज्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. पाटण्यात गंगा धोक्याच्या पातळीच्या जवळ पोहोचली आहे. पाटणा शहरातील भद्रघाट आणि महावीर घाटातील सर्व्हिस लेनवर गंगेचे पाणी २ फुटांपर्यंत पोहोचले आहे.

जम्मूत CRPFची गाडी 200 फूट दरीत कोसळली: 3 जवानांचा मृत्यू, 5 गंभीर

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड भागात गुरुवारी सकाळी १०:३० वाजता सीआरपीएफ जवानांचे एक बंकर वाहन २०० फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात ३ जवानांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ५ जवानांची प्रकृती गंभीर आहे.

सीआरपीएफ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘सैनिकांच्या एका पथकाला घेऊन जाणारे वाहन रस्त्यावरून घसरले आणि एका उंच उतारावरून खड्ड्यात पडले. घटनास्थळावरून २ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर अनेक जखमी सैनिकांना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.’

टाटा पॉवर आणि बीएनएचएसची भागीदारी हायड्रोस क्षेत्रातील मुळशी तलाव पाणलोट क्षेत्रात जैवविविधता बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मियावाकी वृक्षारोपण करणार

– या उपक्रमात टाटा पॉवरच्या मुळशीच्या पाणलोट क्षेत्रात ४७ एकरांवर . लाख स्थानिक रोपे लावली जाणार.

– जैवविविधतेला कोणतेही नुकसान  पोहोचवण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहेत्याला अनुसरून जैवविविधताकार्बन कमी करणे आणि स्थानिक हरित आच्छादन विस्तारास समर्थन दिले जाणार

पुणे ऑगस्ट २०२५भारतातील एक सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी टाटा पॉवरने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) च्या सहकार्याने महाराष्ट्रातील मुळशी येथील त्यांच्या जलविद्युत निर्मिती केंद्रांवर मियावाकी वनीकरण उपक्रम सुरू करण्यासाठी औपचारिक सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. स्थानिक जैवविविधता पुन्हा पूर्ववत करण्यासाठी, हरित आच्छादन वाढवण्यासाठी आणि टाटा पॉवरच्या दीर्घकालीन शाश्वतता उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

टाटा पॉवरच्या लोणावळा कार्यालयात या समझोता करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आली. टाटा पॉवर आणि बीएनएचएसचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. बीएनएचएसचे अध्यक्ष, श्री प्रवीणसिंग परदेशी आणि संचालक श्री किशोर रिठे तर टाटा पॉवरकडून सीएचआरओ आणि चीफ – सस्टेनेबिलिटी व सीएसआर, श्री हिमल तिवारी, कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटीच्या प्रमुख, श्रीमती वैष्णवी प्रभाकरन, सिव्हिल व इस्टेटचे प्रमुख श्री पराग राईलकर, हायड्रो प्रोजेक्ट्सचे प्रमुख श्री कुमार प्रीतम आणि हायड्रोजचे प्रमुख श्री अजय कोन्नूर उपस्थित होते.

या भागीदारीअंतर्गत टाटा पॉवर त्यांच्या हायड्रोस तलावाच्या पाणलोट क्षेत्राभोवती योग्य जमीन ओळखून ती उपक्रमासाठी देईल, स्थानिक प्रजातींबद्दल संशोधन-आधारित माहिती प्रदान करेल, तर बीएनएचएस मियावाकी वृक्षारोपणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी, देखरेख आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाचे नेतृत्व करेल. मुळशीजवळील आडगाव आणि बर्पे या गावांमध्ये ४७ एकर जागेवर पाच वर्षांत तीन टप्प्यात हा प्रकल्प राबविला जाईल. मियावाकी तंत्राचा वापर करून, जैवविविधता पुन्हा सुरळीत करण्यासाठी, कार्बन कॅप्चर वाढविण्यासाठी, भूजलाची पातळी वाढवण्यासाठी आणि गाळ कमी करण्यासाठी ५४ स्थानिक प्रजातींसह २.७ लाख स्थानिक रोपे लावली जातील.

मियावाकी पद्धत हे वृक्षारोपणाचे एक सिद्ध तंत्र आहे, यामध्ये मर्यादित जागेत दाट, जलद वाढणारी आणि स्वयंपूर्ण स्थानिक जंगले निर्माण केली जातात. कॉम्बिनेशन्स काळजीपूर्वक निवडून, थरांमध्ये स्थानिक प्रजातींची लागवड करून, या पद्धतीमध्ये नैसर्गिक अधिवास पुन्हा पूर्ववत करण्यास प्रोत्साहन दिले जाते, मातीची गुणवत्ता लक्षणीयरीत्या वाढवली जाते, जमिनीमध्ये पाणी धारणा क्षमता सुधारली जाते आणि परागकण आणि इतर वन्यजीवांना आधार दिला जातो. मुळशीच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील पाणलोट क्षेत्रांमध्ये मियावाकी पद्धतीचा वापर केल्याने जैवविविधता पुन्हा पूर्ववत होईल, इतकेच नव्हे तर नैसर्गिक हवामान बफर देखील तयार केले जाईल आणि इकोसिस्टिमच्या दीर्घकालीन लवचिकतेमध्ये योगदान दिले जाईल.

या प्रसंगी आपले विचार मांडताना बीएनएचएसचे अध्यक्ष श्री. प्रवीणसिंग परदेशी म्हणाले, हा प्रकल्प आणि टाटा पॉवरसोबत आमचा सहयोग या दोन्ही बाबी आम्हाला खूप जवळच्या आहेत आणि भारताच्या शाश्वत भविष्यासाठी आम्हा दोघांच्या दृष्टिकोनाचे हे प्रतिबिंब आहे. जबाबदारीचे भान राखून तयार करण्यात आलेल्या व्यवसाय पद्धती आणि समुदाय-केंद्रित उपक्रमांद्वारे शाश्वत विकासाला चालना देण्यात टाटा पॉवरने सातत्याने प्रयत्न करून एक अनुकरणीय उदाहरण समोर ठेवले आहे. नाजूक इकोसिस्टिम्सचे संवर्धन आणि स्थानिक जैवविविधता वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. राष्ट्रनिर्माण आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाला केंद्रस्थानी मानणाऱ्या  कंपनीशी सहयोग केल्याने हा प्रयत्न आमच्यासाठी खरोखर अर्थपूर्ण बनला आहे.”

या प्रसंगी बोलताना, टाटा पॉवरच्या सस्टेनेबिलिटी आणि सीएसआरचे चीफ, सीएचआरओ, श्री. हिमल तिवारी म्हणाले: एक शतकाहून अधिक काळ, पश्चिम घाटात टाटा पॉवरचे जलविद्युत प्रकल्प निसर्ग आणि विकास यामधील समन्वय दर्शवत आहेत. बीएनएचएसच्या सहयोगाने मियावाकी वनीकरणाचा हा उपक्रम त्या वारशाचा एक भाग आहे, हा उपक्रम महत्त्वाच्या इकोसिस्टिम पुन्हा पूर्ववत करेल, स्थानिक जैवविविधतेचे पुनरुज्जीवन करेल आणि कोणत्याही हवामानाला तोंड देईल अशी वृद्धी करण्याप्रती आमची वचनबद्धता मजबूत करतो. विज्ञानावर आधारित हे सहकार्य व्यवसायापुरते मर्यादित न राहता भारताच्या नैसर्गिक वारशाचे दीर्घकालीन संरक्षक म्हणून काम करणाऱ्या सस्टेनेबिलिटीच्या आमच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे.”

बीएनएचएसचे संचालक श्री. किशोर रिठे म्हणाले, “बीएनएचएसने टाटा समूहासोबत दीर्घकालीन आणि विश्वासार्ह संबंध प्रस्थापित केले आहेत. या महत्त्वाच्या उपक्रमासाठी टाटा पॉवरसोबत हा सहयोग वाढवताना  आम्हाला आनंद होत आहे. आम्ही एकत्र मिळून या प्रदेशात जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी मोजता येणारा प्रभाव निर्माण करू इच्छितो.”

या उपक्रमाद्वारे टाटा पॉवर त्यांच्या “सस्टेनेबल इज अटेनेबल” या फिलॉसॉफीचे मोजता येऊ शकेल अशा पर्यावरणीय कृतीत रूपांतर करत आहे. तज्ञांच्या सहकार्याने आणि शास्त्रोक्त अंमलबजावणीद्वारे, कंपनी केवळ हरित आच्छादन आणि भूजल पुनर्भरण वाढवत नाही तर कोणत्याही हवामानाला तोंड देऊ शकेल अशी वीज कंपनी म्हणून स्वतःचे स्थान देखील मजबूत करत आहे. हा उपक्रम कंपनीच्या मुख्य ऑपरेशन्समध्ये शाश्वततेचा समावेश करण्याच्या व्यापक धोरणाचे प्रतिबिंब आहे – जिथे पर्यावरणीय व्यवस्थापन, समुदायाचा सहभाग आणि दीर्घकालीन मूल्य निर्मिती यांचा मिलाप होतो.

टाटा पॉवरने स्वतःच्या विद्यमान पर्यावरणीय व्यवस्थापन उपक्रमांचा भाग म्हणून संपूर्ण भारतात ४.४ दशलक्षाहून अधिक झाडे आणि रोपे लावली आहेत. या प्रयत्नांमध्ये प्रमुख वृक्ष मित्र कार्यक्रम, कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखालील मोहीम आणि हरित आच्छादनाचा विस्तार करण्यासाठी, जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात कार्बन सिक्वेस्ट्रेशन वाढवण्यावर केंद्रित उपक्रमांचा समावेश आहे. विज्ञानावर आधारित प्रकल्प आणि धोरणानुसार आखलेल्या संवर्धन कृतीद्वारे, टाटा पॉवर कोणत्याही हवामानाला तोंड देतील अशी लँडस्केप्स आणि शाश्वत समुदाय विकासासाठी उत्प्रेरक म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे.

महापालिकेतील आयुक्त विरुद्ध मनसे राड्याविरोधात मध्यरात्री गुन्हा दाखल अन सकाळी अधिकाऱ्यांचे आंदोलन सुरु

पुणे-शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मनसेचे १) किशोर शिंदे,२) प्रशांत मते,३) नरेंद्र ताबोळी,४) अविनाश जाधव ५) महेश लाड आणि इतर अशा कार्यकर्त्यांच्या विरोधात महापालिकेतील कर्मचारी अमोल शिवाजी पवार वय-३५ वर्षे धंदा-नोकरी रा. फ्लैट नंबर १/२०२, श्रऑनिवास संकूल,गोकूळनगर, कात्रज-कॉडया रोड, पुणे ४११०४६ यांनी आज मध्यरात्री म्हणजे ७ तारीख सुरु झाल्यावर १२ वाजल्यानंतर ५ ते १० मिनिटे झाल्यावर गुन्हा रजि.नं व कलम१२२/२०२५ भा. न्या. में कलम १३२,१८९ (२), म.पो. अधि. कलम ३७(१) (३) रह 135 अन्वये फिर्याद दाखल करून गुन्हा नोंदविला आहे आणि नमूद गुन्ह्यातील आरोपीना नोटीस देण्यात आलेली आहे.

दि.०६/०८/२०२५ रोजी सायंकाळी ४.५० ते ६ वाजण्याच्या दरम्यान पुणे महानगरपालिकाआयुक्त यांचे सभागृह व आवार या ठिकाणी येऊन
मनसे कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.
दिनांक ०६/०८/२०२५ रोजी १६/०० वाजताचे सुमारास आयुक्त पुणे महानगरपालिका यांचे सभागृहात शहर स्वच्छता बाबत मिटींग चालू होती. सदर खेळी अंदाने ३० ते ३५ अधिकारी सभागृहात हजर असताना अंदाजे १६/५० ते १८/०० वाजताचे सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे, प्रशांत मते, नरेंद्र साबोळी, अविनाश जाधव, महेश लाड व इतर यानी गैरकाद्याची मंडळी जमवून सभागृहाचे आत विनापरवाना प्रवेश करून धावून जावून सुरक्षारक्षाकांना धक्का बुक्की करुन आयुक्त व अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांना ‘तुम्हाला महाराष्ट्रात राहू देणार नाही असे बोलून शासकीय कामात आडचळा निर्माण केला. त्यानंतर सभागृहाचे बाहेर आल्यावर त्यांचे सोबत इतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकारी त्यातील काही जनांनी पुणे महानगरपालिकाचे मुख्य प्रवेशद्वाराचे बंद असलेल्या गेटवर चढून आत मध्ये प्रवेश केला च अंदाजे १० ते १२ जण यांनी मिळून आयुक्त साहेब यांचे विरुध्द असंबंच्द घोषणा दिल्या तसेच त्यांनी पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा यांच्या दिनांक ०५/०८/२०२५ रोजीचे ००/०९ चा. पासून ते दिनांक १८/०८/२०२५ रोजीचे २४/०० या पर्यंत १४ दिवसासाठी जाहिर असलेला मनाई आदेशाचे उल्लधंन केले. असे फिर्यादीत म्हटले आहे .
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे अधिक तपास करत आहेत .

आयुक्त नवलकिशोर हे मनसे नेत्याला ‘आप बाहर निकल जाओ’ म्हटल्याने प्रकरण चिघळले

महापालिका आयुक्त बंगल्यातील सुमारे २५ लाखाच्या साहित्य चोरीच्या बातमीचे वेगळेच पडसाद

पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत आयुक्त नवल किशोर राम हे स्वच्छता अभियानासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होते. त्यावेळी विनापरवानगी माजी नगरसेवक ॲड. किशोर शिंदे यांच्यासह आणखी तीन कार्यकर्ते आयुक्तांच्या बैठकीत घुसले. या मनसेचे नेते अचानक बैठक कक्षामध्ये आल्याने महापालिका आयुक्तांनी विचारले आपण कोण आहात, असे थेट आत कसे आलात, त्यावेळी शिंदे म्हणाले, मी दोन वेळा नगरसेवक होतो. चार वेळा आमदारकी लढवली आहे. त्यावर आयुक्त हिंदीमध्ये म्हणाले आप बाहर निकलो, असे म्हटल्यावर शिंदे यांनी त्यास आक्षेप घेत तुम्ही महाराष्ट्रात आहात, मराठीत बोला! असे सांगितले. त्यावर आयुक्तांनी विचारले, तुमचे काम काय आहे? यावर शिंदे म्हणाले, मी माजी नगरसेवक आहे. त्यावर आयुक्तांनी पुन्हा त्याच प्रश्नाची पुनरावृत्ती केली. यामुळे संतप्त झालेल्या शिंदे यांनी थेट आयुक्तांच्या खुर्चीकडे धाव घेतली. मी तुला महाराष्ट्राबाहेर पाठवीन अशी धमकी शिंदे यांनी दिली. त्यावर आयुक्त संतप्त झाले. महाराष्ट्रात मी अनेक वर्षे काम केले. मात्र बैठकीदरम्यान कुणीही जबरदस्तीने घुसलेले कधी पाहिले नव्हते. शिंदे हे मराठी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात असे वाटत नाही. ते गुंडागर्दी करत होते.

पुणे -महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी म्हटले आहे कि , ते कार्यकर्ते अचानक बैठकीत शिरले. मी त्यांना ओळखत नाही. अचानक आतमध्ये आल्याने त्यांना हिंदीत ‘आप बाहर निकल जाओ’बोललो. त्यावर साहेब मराठीत बोला नाहीतर महाराष्ट्राबाहेर घालवू असे ते म्हणाले, यावर ते अंगावर धावून आले. हा प्रशासनाचा अवमान आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे. यामुळे मी सकाळपासून मराठीतच बैठक घेत आहे.मनसे कार्यकर्ते हे फक्त गोंधळ घालण्याच्या हेतूने या ठिकाणी आले. त्यांचे कुठले विकासात्मक काम असते तर आम्ही समजून घेतले असते. मात्र त्यांचे तसे कुठले नागरिकांचे प्रश्न नव्हते. फक्त गोंधळ घालणे हा एकच अजेंडा होता. कुठलेही नागरिकांचे प्रश्न घेऊन न येता बैठकीत येऊन हातवारे करून माझ्या अधिकाऱ्यांसमोर असे बोलणे योग्य नव्हते. शिवाय त्यांनी धमकीची भाषा वापरली आहे, असेही नवल किशोर राम यांनी सांगितले.मात्र महापालिका आयुक्त बंगल्यातील सुमारे २५ लाखाच्या साहित्य चोरीबाबत त्यांनी अद्याप कोणताही स्पष्ट आणि समाधानकारक खुलासा केलेला नाही. तर दुसरीकडे ॲड. किशोर शिंदे म्हणाले, आम्ही आयुक्त बंगल्यातील साहित्य गायब झाल्याप्रकरणी निवेदन देण्यासाठी आलो होतो. बाहेर काही वेळ थांबल्याने बैठक कधी संपणार हे विचारण्यासाठी गेलो होतो. त्यांनी तू कोण? या भाषेत विचारणा केली. आमचा गुंड असा उल्लेख केला. त्यामुळे आम्ही बैठक कक्षाच्या बाहेर ठिय्या मारला. परंतु काही वेळाने त्यांनी परत आमच्या ठिकाणी येत तुमची गुंडगिरी सहन केली जाणार नाही, असा पुनरुच्चार केला. कर्मचाऱ्यांनी आमच्याकडील मोबाईल काढून घेतला. आयुक्तांनी मराठी लोकांना गुंड म्हणणे आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्यावर गुन्हे दाखल करा. आयुक्त कार्यालयाच्या आवारातील सीसीटीव्ही तपासा, मोबाईलवरील चित्रीकरण तपासा. आम्ही मागे हटणार नाही असा दावा शिंदे यांनी केला.

महापालिकेच्या मुख्य इमारतीत सुरू असलेल्या आयुक्तांच्या बैठकीत आंदोलक माजी नगरसेवक ॲड. किशोर शिंदे हे विना परवानागी घुसले. त्यावरून शिंदे आणि आयुक्त नवल किशोर राम यांच्यात शाब्दिक चकमक होऊन जोरदार वाद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्तांच्या म्हणण्यानुसार शिंदे यांनी आयुक्तांना मी तुला महाराष्ट्र बाहेर पाठवीन अशी धमकी दिली. त्यावर शिंदे हे मराठी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात असे वाटत नाही. ते गुंडागर्दी करत होते. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया आयुक्तानी दिली.

पालिकेत हा प्रकार घडल्याचे कळताच मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पालिकेत गोळा झाले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणााबाजी केली. मनसेचे नेते बाबू वागसकर, रणजीत शिरोळे, साईनाथ बाबर हे पालिकेत आले. त्यांची व आयुक्तांची बराच वेळ बैठक सुरू होती.पालिकेत हा प्रकार घडल्यानंतर मोठा प्रमाणात पोलिस फौजफाटाही मागविण्यात आला. पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पोलिस आयुक्तांना फोन केला. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस यांनी पालिकेत धाव घेतली. महापालिकेची सर्व प्रमुख दरवाजे बंद करण्यात आले. एवढेच नव्हे तर आयुक्त कार्यालयातील सर्व दरवाजे बंद करण्यात आल्याने अनेकजण आतमध्ये अडकून पडले होते.

ट्रम्प यांनी भारतावर 25% अतिरिक्त कर लादला: आता एकूण 50% टॅरिफ,21 दिवसांनी लागू होईल

रशियन तेल खरेदी ठरले कारण

वॉशिंग्टन-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर २५% अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली आहे. त्यांनी गुरुवारी यासंबंधीच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. हा आदेश २७ ऑगस्टपासून लागू होईल. यापूर्वी त्यांनी ३० जुलै रोजी २५% कर जाहीर केला होता. आता अमेरिका भारतावर एकूण ५०% कर लादणार आहे.

रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे ट्रम्प यांनी भारताविरुद्ध ही कारवाई केली आहे. त्यांनी एक दिवस आधी म्हटले होते की, रशियाकडून तेल खरेदी करून भारत युक्रेन युद्ध सुरू ठेवण्यात रशियाला मदत करत आहे. यामुळे अमेरिका भारताविरुद्ध कारवाई करेल.

ट्रम्प यांनी आजच्या कार्यकारी आदेशात लिहिले आहे- भारत सरकार रशियाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तेल आयात करत आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेत येणाऱ्या भारतीय वस्तूंवर २५% अतिरिक्त शुल्क लागू होईल. हे शुल्क २१ दिवसांनंतर लागू होईल.

तथापि, काही विशिष्ट परिस्थितीत, जसे की जर माल आधीच समुद्रात लोड केला गेला असेल आणि त्यांच्या मार्गावर असेल, किंवा जर ते विशिष्ट तारखेपूर्वी अमेरिकेत पोहोचले असतील तर या शुल्कातून सूट देखील दिली जाईल.

मार्च २०२२ च्या सुरुवातीला अमेरिकेने रशियन तेल आणि संबंधित उत्पादनांच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घालणारा आदेश जारी केला होता. आता ट्रम्प प्रशासनाला असे आढळून आले आहे की भारत ते रशियन तेल खरेदी करत आहे, जे रशियाला आर्थिक मदत करत आहे. यामुळे आता अमेरिकेने भारतावर हा नवीन शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे.
काही भारतीय वस्तूंवर कर लागू होणार नाही

एप्रिल २०२५ मध्ये जारी केलेल्या दुसऱ्या आदेशात ज्या काही उत्पादनांना आधीच टॅरिफमधून सूट देण्यात आली होती त्यांना सूट देण्यात येईल. या वस्तूंमध्ये सेमीकंडक्टर, स्मार्टफोन, संगणक, औषधनिर्माण, ऑटोमोटिव्ह भाग, तांबे आणि इतर धातू आणि खनिजे यांचा समावेश आहे.

याचा अर्थ असा की, भारतातून या वस्तूंच्या शिपमेंटवर अतिरिक्त शुल्क लागू होणार नाही. या आदेशात असेही म्हटले आहे की, भविष्यात गरज पडल्यास, राष्ट्रपती त्यात सुधारणा करू शकतात, म्हणजेच ते शुल्क दर बदलू शकतात किंवा अधिक नवीन तरतुदी जोडू शकतात.

ट्रम्प यांनी काल भारताच्या औषध उत्पादनांवर २५०% कर लादण्याची धमकी दिली होती. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले होते की, ते सुरुवातीला औषधांवर एक छोटासा कर लादतील, परंतु नंतर ते १५०% आणि नंतर दीड वर्षात २५०% पर्यंत वाढवतील.

ट्रम्प म्हणाले होते- आम्हाला औषधे आपल्या देशातच बनवायची आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की, अमेरिका औषध उत्पादनांसाठी परदेशी देशांवर, विशेषतः भारत आणि चीनवर खूप अवलंबून आहे. या टॅरिफचा भारतीय औषध क्षेत्रावर वाईट परिणाम होऊ शकतो.

अमेरिका भारताकडून जेनेरिक औषधे, लस आणि सक्रिय घटक खरेदी करते. २०२५ मध्ये भारताची अमेरिकेला औषध निर्यात ७.५ अब्ज डॉलर्स (सुमारे ६५ हजार कोटी रुपये) पेक्षा जास्त होती.

चीननंतर भारत हा रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. युक्रेन युद्धापूर्वी, भारत रशियाकडून फक्त ०.२% (प्रतिदिन ६८ हजार बॅरल) तेल आयात करत होता. मे २०२३ पर्यंत ते ४५% (प्रतिदिन २० लाख बॅरल) पर्यंत वाढले, तर २०२५ मध्ये, जानेवारी ते जुलै या कालावधीत, भारत रशियाकडून दररोज १७.८ लाख बॅरल तेल खरेदी करत आहे.गेल्या दोन वर्षांपासून, भारत दरवर्षी १३० अब्ज डॉलर्स (११.३३ लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीचे रशियन तेल खरेदी करत आहे.

विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची घरभेटीद्वारे पडताळणी-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे दि.6 : ‘महसूल सप्ताह 2025 निमित्ताने जिल्ह्यात विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटीद्वारे पडताळणी करुन अनुदानाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.

या उपक्रमाअंतर्गत जुन्नर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेतील 40 आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनातील 31 याप्रमाणे आंबेगाव तालुक्यात 49 व 37, अप्पर तहसील पिंपरी चिंचवड 23 व 20, अप्पर तहसील लोणी काळभोर 203 व 71, हवेली 180 व 420, मावळ 17 व 10, मुळशी 15 व 17, इंदापूर 21 व 5, खेड 143 व 112, शिरूर 14 व 16, भोर 113 व 27, वेल्हा 65 व 28, बारामती 142 व 115, पुरंदर 9 व 7 आणि दौंड तालुक्यात 142 व 115 लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली आहे.

दौंड तालुक्यात संजय गांधी निराधार योजना 53 आणि श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजनेची 17 प्रकरणे नव्याने मंजूर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी कळविले आहे.
0000

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून रक्षाबंधनला थेट खात्यात मदतीचा हप्ता

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शासनाच्या संवेदनशील निर्णयाचे अभिनंदन

मुंबई, : राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या दूरदृष्टीपूर्ण योजनेमुळे राज्यातील लाखो बहिणींना दरमहा आर्थिक आधाराचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट ₹१५०० मासिक मदत जमा केली जाते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या या योजनेमुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे.

रक्षाबंधनाचा सण लक्षात घेता, राज्य शासनाने जुलै २०२५ महिन्याचा ₹१५०० हप्ता दिनांक ९ ऑगस्ट २०२५ पूर्वी लाभार्थी बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने एकूण ₹७४६ कोटींचा निधी वितरित केला आहे. योजनेच्या निधी वितरणासाठी बीम्स प्रणालीचा वापर करण्यात आला असून, पारदर्शक व वेळेवर निधी स्थानांतरण सुनिश्चित केले गेले आहे.

या निर्णयाचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मनःपूर्वक स्वागत करताना नमूद केले की, “हा निर्णय केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही, तर तो महिलांच्या सशक्तीकरणाचा एक प्रेरणादायी टप्पा आहे. तो मानवी मूल्यांशी जोडलेला आणि सामाजिक समतेची जाणीव असलेला आहे.”

डॉ. गोऱ्हे यांनी यासोबतच सांगितले की, आम्ही आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्यातून खातेदार महिलांना कर्ज, व्यवसाय आणि बाजारपेठेची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. महिलांचे बचत गट, स्वयंरोजगार आणि उत्पादन विक्री यांना चालना देण्याच्या दिशेने हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने पावले टाकता येतील. याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ज्या बॅंका लाडक्या बहिणी तसेच, महिलांचे बचत गट सहकार्य करित असतील त्यांच्याबरोबर कार्यक्रम आखण्याचा निर्णय शिवसेनेच्यावतीने केला गेला आहे.

महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेल्या या दूरदृष्टीपूर्ण धोरणात्मक निर्णयाचे डॉ. गोऱ्हे यांनी आभार मानले. त्यांनी विशेषतः मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बालविकास मंत्री श्रीमती अदिती तटकरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या नेतृत्वाचे व महिलांविषयी असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले.

या योजनेला एक वर्ष पूर्ण होत असताना, काही राजकीय टीकाकारांकडून “ही योजना बंद होणार” असा चुकीचा प्रचार केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात लाभार्थी महिलांचा या योजनेवर ठाम विश्वास आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणावर योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्यात आत्मविश्वास आणि आर्थिक सक्षमता वाढली आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट सांगितले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ऑगस्ट २०२५ मधे एक वर्ष पूर्ण होत आहे त्या धर्तीवर या योजनेतील प्राप्त निधीचा वापर, त्याचे परिणाम आणि महिलांमध्ये झालेला सकारात्मक बदल याचा सखोल अभ्यास करून सरकारने सदर योजनेची गरज का आहे? याबाबत प्रभावी अहवाल तयार करण्याची गरज डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

विशेषतः, योजनेसाठी ना आदिवासी विकास विभागाचा, ना सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरण्यात आलेला आहे. यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद असून तो केवळ महिलांच्या शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी वापरला जात आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे आदिवासीं व मागासवर्ग विभागाचा निधी वळवल्याचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट होते.

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला असून त्यांची राजकीय इच्छाशक्ती व महिलांविषयीची बांधिलकी हे यशस्वी अंमलबजावणीमागचे प्रमुख कारण आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या सहकार्यामुळे योजना राज्यभर पोहोचली आहे.

शेवटी, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “ही योजना त्यांच्या जीवनात नवे स्वप्न, नवे संधी आणि नवा आत्मविश्वास घेऊन येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांच्या शारीरिक, सामाजिक आणि आर्थिक दर्जात वाढ घडवणाऱ्या या योजनेचा पुढील टप्पा हा व्यावसायिक,सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणारा ठरेल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

आई कलाग्राम फाउंडेशन तर्फे ध्यास माझा समाजसेवेचा फॅशन शो आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

पुणे : समाजसेवा म्हणजे फक्त काम नव्हे…तर ती एक निःस्वार्थ भावना असते. अशा मानणाऱ्या आणि त्यावर काम करणाऱ्या देशभक्त सुनिताताई निंबाळकर यांनी सुरू केलेली आई कलाग्राम फाउंडेशन’ ही संस्था लोकहिताचे अनेक उपक्रम आयोजित करते. त्याचाच एक भाग म्हणून समाजात विविध क्षेत्रात उत्तम काम करून देश सेवा करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी ‘राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा’ आणि ‘ध्यास माझा समाजसेवेचा फॅशन शो’ चे आयोजन येत्या शुक्रवार, दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ४.३० ते ९ या वेळेत कॅम्प येथील जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल येथे केले आहे; अशी माहिती कार्यक्रमाच्या आयोजका सुनीता निंबळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी व्यवसाय मार्गदर्शक एस. एस. सावंत, सुनीता धायगुडे, शिल्पा टिकोणे व फाउंडेशनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आई कलाग्राम फाउंडेशन ही एक बहुउद्देशीय संस्था असून संस्थेचा आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये राज्यघटून एकूण ४० पुरस्कार देण्यात येणार आहे यामध्ये, सामाजिक संस्था (NGO), कला, क्रीडा, उद्योजक, शिक्षक, कायदा आदी अनेकांचा सहभाग असणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह अशी या पुरस्काराचे स्वरूप असून हे पुरस्कार मित्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ उद्योजक किसन भोसले, माईंड पॉवर ट्रेनर व लेखक दत्ता कोहिनकर, व्यावसायिक मार्गदर्शक एस. एस. सावंत सर, उद्योजक प्रकाश नेवसे, समाजसेवक चंद्रकांत पाटील, पुष्पा कटारिया आणि दीपक भोसले आदि उपस्थित राहणार आहे.

समाजामध्ये उत्तम समाजसेवक निर्माण व्हावे यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन, आर्थिकबाजूने समाजात सक्षमता वाढावी यासाठी उद्योजक मेळावे व मार्गदर्शन शिबिर, विविध क्षेत्रात उत्तम काम करून राष्ट्राची सेवा करणाऱ्या व्यक्तींना कौतुकाची थाप मिळावी या उद्देशाने फाउंडेशन कार्यक्रम घेत आहेत. शहरातील अथवा ग्रामीण भागातील सामान्य जनतेसाठी, दुःखात सापडलेल्या प्रत्येकासाठी या फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून नागरी समस्या, आदिवासी, धनगर, कातकरी समाजासाठी काम, आरोग्य शिबिराचे आयोजन करणे, जनजागृती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महिलांच्या अन्यायाविरुद्ध लढा देणे,जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदनांवर मलम देण्याचे काम, गरिबांच्या घराच्या जप्त्या थांबवने, सावकारीच्या जाळ्यात अडकलेल्यांना मदतीचा हात देणे, शिक्षणात अडथळा आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व योग्य ती मदत, कायद्याविषयी अज्ञान दूर करत अनेकांना न्याय मिळवून देणे इत्यादी अनेक कामे सुनीताताई यांच्या जीवनाचं मिशन झालं आहे.

राजकीय स्वार्थासाठी भावनांचा गैरवापर नको – भाऊसाहेब आंधळकर

पुणे – अहिंसा परमो धर्म! या दृष्टिकोनातून जैन समाज, जैन मुनिवर्य हत्तींकडे पाहतात. भगवान महावीर यांनी जो अहिंसेचा संदेश दिलेला आहे, त्या संदेशाच्या मार्गावर जैन बांधव चालतात तसेच जैन बांधवांचा या देशाच्या इकॉनॉमी मध्ये सिंहाचा वाटा आहे. जैन स्वामी मठांची जैन बांधवांची भगिनींचा आम्ही आदर करतो. आणि स्वतः अहमदनगर येथील आनंदा श्रमामध्ये प्रत्येक महिन्यातील एखाद्या गुरुवारी जातो. आणि जैन मुनींचा आशीर्वाद घेतो. त्या जैन समाजाचा त्यांच्या गुरुवर्यांचा, त्यांचा रोष कुणालाही परवडणार नाही. त्यामुळे नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्ती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करून परत आणावीच लागणार यात तीळ मात्र शंका नाही. आज नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी या हत्तीच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयानंतर उभ्या राहिलेल्या परिस्थितीबाबत माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहे. एक माजी पोलीस अधिकारी या नात्याने मला जनतेपुढे सत्य मांडणे आवश्यक वाटत असल्याचे सांगत माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जैन समाजातील काही नागरिक त्यांच्यासोबत पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

राजकीय स्वार्थासाठी भावनांचा गैरवापर – न्यायालयीन प्रक्रियेने हा विषय मार्गी लावण्याऐवजी काही राजकीय नेते या मुद्यावर केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी जनभावना भडकवण्याचे काम करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे त्यातील मुख्य चेहरे आहेत.राजू शेट्टी यांची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे. राजू शेट्टी यांनी एप्रिल २०१८ मध्ये वनविभागाला पत्र लिहून हत्ती सांभाळण्याची व्यवस्था नसल्याचे मान्य केले होते व हत्तीचा ताबा घेण्याची विनंती केली होती. यामुळेच पेटा सारख्या संघटनांनी लक्ष वेधून घेतले आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतरच्या घटनांचा रोख राजू शेट्टी यांच्या पत्रामुळेच बदलला. आज, तेच राजू शेट्टी आपल्यालाच माधुरीवरील प्रेमाचे प्रदर्शन करताना दिसतात. २०१८ मधील पत्र आणि पेटा प्रतिनिधींसोबतचे त्यांचे फोटो देखील सार्वजनिक झाले आहेत, त्यामुळे आता ते स्वतःची प्रतिमा वाचवण्यासाठी विविध अफवा पसरवत आहेत. त्यांनी हत्तीचा तात्पुरता ताबा घेण्याचे पत्र दिले, पण ते पत्र कुठेही “परत देऊ” अशी भाषा वापरत नाही. यामुळे त्यांची भूमिका स्पष्टपणे दुटप्पी आणि भ्रामक आहे. पेटावर दोन कोटींचा आरोप करत अफवा पसरवणे ही जबाबदारीशून्य आणि दिशाभूल करणारी वागणूक आहे.

राजू शेट्टी यांचा मोर्चा की केवळ स्टंट?

राजू शेट्टी यांनी रविवारी कलेक्टर ऑफिस बंद असतानाही तेथे मोर्चा नेण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. मोर्चात त्यांच्या अंगावर माधुरीचा फोटो असलेला बनियन होता, परंतु इतर कार्यकर्त्यांकडे तो नव्हता. हे स्पष्टपणे दर्शवते की, हा मोर्चा केवळ राजकीय पुनर्वसनाचा स्टंट होता.

माधुरीच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करताना आंधळकर म्हणाले की, जैन समाजाच्या भावना आम्हाला माहीत आहेत. नंदनी मठ हे श्रद्धास्थान असून महादेवी हत्ती हा त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे. सरकारने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून तामिळनाडू राज्यात आपली परंपरा संस्कृती या अन्वयी पिढ्यांपुढे चालणारा जल्लीकट्टू सारख्या खेळावर सुद्धा या पिता सारख्या संघटनांनी तक्रार केल्याने मद्रास हायकोर्ट 2014 बंदी आणली व 2017, 2018 मध्ये या ठिकाणी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी गेल्या 2023 ला जलीकट्टू व बैलगाडा शर्यत हा खेळ आहे यामुळे अशी बंदी उठवली गेली, घटनांचे उदाहरण घेऊन कायद्यात दुरुस्ती करावी.
महादेवी उर्फ माधुरी हिला नंदनी मठात परत आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. कोणताही राजकीय पक्ष किंवा नेते यावर राजकारण करत असतील, तर जनता त्यांना योग्य धडा शिकवेल. राजू शेट्टी यांच्यासारख्या नेत्यांनी जर जनभावनांचा फक्त राजकीय स्वार्थासाठी वापर केला, तर आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा आंधळकर यांनी दिला.

राज ठाकरेंच्या सहकाऱ्यांना आयुक्तांनी भरली थेट धमकी,म्हणाले,तुम्ही गुंड आहात…

पुणे- अगोदर पुण्याचे जिल्हाधिकारी आणि नंतर थेट दिल्ली दरबारी रुजू झालेले आय ए एस अधिकारी नवल किशोर राम यांनी काही माहिती अधिकार कार्यकर्ते असलेल्या भाजपच्याच कार्यकर्त्यांना थेट महापालिकेच्या आवारात देखील प्रवेश बंदी घालण्याचा (बेकायदेशीर ?)हुकुम सोडल्यावर आज महापालिकेत आंदोलक बनून आलेल्या राज ठाकरे यांच्या जवळच्या मनसैनिकांना अर्थात किशोर शिंदे,साईनाथ बाबर आणि अन्य मंडळींना थेट धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात..आयुक्त रुबाबदार पद्धतीने नव्हे तर आक्रमक पद्धतीने उभे राहून बसलेल्या मनसैनिकांना तुम्ही गुंड आहात असे म्हणताना दिसत आहेत.त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून आणि काही कृतींवरून आता आयुक्त हे मराठी विरोधी किंवा भाजपच्या दिल्लीश्वरांनी पुण्यात विरोधकांना चेपवायला पाठविलेले अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

नेमके हे मनसे चे शिष्ट मंडळ आयुक्त कार्यालयात गेले कशाला होते ?

आता प्रश्न हा उभा राहतो कि हे मनसे चे शिष्ट मंडळ नेमके महापालिका आयुक्त कार्यालयात गेले कशाला होते तर त्याचे उत्तर आजच्या सर्व वृत्तपत्रात दडले आहे. आजच्या वृत्तपत्रांमध्ये महापालिका आयुक्त बंगल्यात चोरी झाली पण FIR झालेला नाही अशा बातम्या आल्या आहेत आणि हि चोरी लपविली जाते कि काय अशी शंका निर्माण होत होती. सुमारे २० लाखाचे साहित्य आयुक्त बंगल्यासाठी मागविले जाणार असे या बातमीत म्हटले होते .महापौर बंगल्यातून झालेल्या चोरीचा यात संदर्भ देण्यात आला होता.नेमके यात काय आहे ? तुम्ही येताच हे काय सुरु झाले आहे अशी विचारणा करायला हे शिष्टमंडळाने आयुक्त कार्यालय गाठले होते मात्र येथे यावेळी आयुक्त यांची कसली तरी गोपनीय मिटिंग सुरु होती अन त्यात हे धडकले.यामुळे वादंग झाल्याचे समजते.

नवल किशोर राम यांच्या वादग्रस्त कृती – दरम्यान या प्रकारामुळे दिल्लीहून आलेले हे आयुक्त आता भाजपचे एजंट म्हणविले जाऊ लागले आहेत.त्यांनी जनतेची आणि आयुक्तांची होणारी भेट जवळ जवळ बंद केल्याचा त्यांच्यावर आरोप होतो आहे. एवढेच नव्हे तर काही भाजपचे कार्यकर्ते जे माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून महापालिकेत जात होते त्यांच्यावर जरी काही आरोप होत असले तरीही महापालिका आयुक्त यांना अशा कार्यकर्त्यांना नागरिकांना महापालिकेच्या आवारात येण्यास बंदी घालण्याचा कायद्याने कोणताही अधिकार नाही असे सांगितले जाते.तरीही त्यांनी बंदी घालून हुकूमशाहीची चाहूल करवून दिली. आणि जर माहिती अधिकार नावाने किंवा राजकीय कार्यकर्ता म्हणून कोणी प्रशासनाला त्रास देत असले गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य करत असेल तर त्यांच्या विरोधात पोलीसात तक्रार नोंदवून रीतसर कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांनी हि बंदीची कारवाई केली आणि नंतर ओरडा झाल्यावर संबधितांविरोधात पोलिसात तक्रार केली.स्थायी समिती,सर्वसाधारण सभा जनतेला दडवून चालविणे ठराविक लॉबीलाच जवळ करून त्यांनाच सहकार्य करणे असे आरोप या आयुक्तांवर होत आहेत. वास्तविक पाहता ज्यांचे काम पुण्यात जिल्हाधिकारी असताना अत्यंत चांगले होते त्यांनी आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर असे काय झाले म्हणून चर्चा होऊ लागली आहे.

आयुक्तांच्या बंगल्यात खरेच चोरी झाली काय ?

दुसरा मुद्दा असाही मांडला जातो कि महापालिका आयुक्त यांच्या बंगल्यात खरेच चोरी झाली काय ? कि या बातम्या पसरवल्या गेल्या ? या पूर्वी भोसले नामक जे आयुक्त होते त्या मराठी आयुक्तांना बदनाम करण्याचा डाव तर नव्हता ना ? एक ना अनेक प्रश्न आयुक्तांच्या बंगल्यात चोरी या शीर्षकाने निर्माण केले आहेत. जर चोरी झाली तर पोलिसात तक्रार का नाही केली ? असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. महापौर बंगल्याच्या बाबतीतही हा प्रश्न आहेच. एवढे सुरक्षा रक्षक, C C TV कॅमेरे असताना हि चोरी खरेच झाली काय ? कि स्वताहून कोणी येथील साहित्य सहमतीने नेले ? एक ना अनेक मुद्दे चर्चिले जात आहेत.पुणे महापालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्याचे नाव तपस्या आहे.या बंगल्यात आता विद्यमान आयुक्त नवल किशोर राम राहायला आले आहेत . यापूर्वी इथे आधीचे आयुक्त राजेंद्र भोसले रहात होते. राजेंद्र भोसले यांनी बंगला सोडल्यावर तो नवल किशोर राम यांच्या ताब्यात आल्यावर या बंगल्यात असलेल्या ॲंटिक वस्तू, महागडे झुंबर, फ्रीज , किचनची चिमणी , एलईडी टीव्ही , महागड्या लाईट फिटींग , स्वीच , मोठ्या कुंड्या , बंगल्यात असलेली माती असा सुमारे पंचवीस लाख रूपयांचा ऐवज गायब असल्याच लक्षात आलं आहे. आता या वस्तू कुठे गेल्या यावर महापालिकेत कुणी एक चकार शब्द काढायला तयार नाही. उलट नवे आयुक्त रहायला गेल्यावर लगेच सगळं पुन्हा आहे तसं करण्यासाठी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातून वीस लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र जे चोरीला गेलं आहे त्याची कुठेही फिर्याद करण्यात आलेली नाही.

एकंदरीत प्रशासकीय काळात आता प्रशासक म्हणून आयक्त या एकमेव अधिकाऱ्याच्या हाती सर्वाधिकार असल्याने मोठी समस्या निर्माण होते असताना दिसत आहे. आणि ते एकटेच प्रत्येक बाबीवर टार्गेट देखील होऊ शकतील असेही चित्र नाकारता येणारे नाही.

राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून,प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि.०६ : - उत्तराखंड राज्यात उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या ढगफुटीच्या घटनेमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तराखंड राज्याचे सचिव (वित्त) दिलीप जवळकर,पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) निलेश भरणे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे हीच प्राथमिकता आहे. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटक, भाविकांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले आहे. अडकलेल्या पर्यटकांमध्ये नांदेड जिल्ह्यातील ११ आणि इतर जिल्ह्यातील ४० अशा एकूण ५१ पर्यटकांचा समावेश आहे. त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून पर्यटकांशी सतत संपर्क साधत आहे. उत्तराखंडच्या प्रशासनाशी सुद्धा राज्य शासन सातत्याने संपर्कात असून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी व त्यांना महाराष्ट्रात लवकरात लवकर परत आणण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सदन,नवी दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत,अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक :
1) राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र
माहितीसाठी संपर्क: 93215 87143/ 022-22027990/022-22794229
2) राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड
संपर्क 0135-2710334/8218867005

१ एप्रिलपासून सार्वजनिक ट्रस्ट च्या बचत खात्यांसाठी आरबीआयचे नवे नियम ,गणेश मंडळानी नियमांची माहिती घेऊन कागदपत्रांची पूर्तता करावी – संदीप खर्डेकर

पुणे-भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) १ एप्रिल २०२५ पासून अमलात आलेल्या सुधारित मास्टर निर्देशानुसार सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट आणि अशा संस्थांच्या बचत खात्यांवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्देशांनुसार फक्त ठरावीक निकष पूर्ण करणाऱ्या नोंदणीकृत करमुक्त ट्रस्टनाच सहकारी बँकांमध्ये बचत ठेव खाती ठेवण्याची परवानगी असेल; इतर अपात्र संस्थांची बचत खाती चालू खात्यात रूपांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे उद्यम सहकारी बँकेचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते व क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले.. या नियमनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि अपंजीकृत सोसायट्यांसारख्या सर्व संस्थांच्या बँकिंग व्यवहारांमध्ये तातडीची शिस्त लागणार असल्याची माहिती ह्या क्षेत्रातील तज्ञानी दिली आहे..मात्र ह्या नियमाची माहिती नसल्याने अनेक मंडळाचे व्यवहार अडविले असल्याने त्यांची अडचण होत आहे असे निदर्शनास आल्याचेही संदीप खर्डेकर म्हणाले.

मुख्य निर्देश:
करमाफी पात्र ट्रस्टसाठीच बचत खाते: नोंदणीकृत धर्मादाय ट्रस्ट ज्यांचे संपूर्ण उत्पन्न आयकर कायदा, १९६१ अंतर्गत करमुक्त आहे, अशांनाच सहकारी बँकांमध्ये बचत ठेव खाते ठेवण्याची मुभा आहे.

प्रमाणपत्राची सक्ती: अशा पात्र संस्थांनी आयकर विभागाकडून प्राप्त वैध करमाफी प्रमाणपत्र (उदा. कलम 12A अथवा फॉर्म 10AC) बँकेत सादर करणे बंधनकारक आहे.

प्रमाणपत्र नसल्यास खाते रूपांतर – जर संस्थेकडे असे करमाफी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर तिचे बचत खाते बंद करून चालू खात्यात रूपांतरित करावे लागेल.

गैर-नोंदणीकृत संस्थांनाही मर्यादा: अपंजीकृत सोसायट्या, अपार्टमेंट/कॉनडोमिनियम रहिवासी संघ आणि गणेशोत्सव मंडळे यांनाही हे नियम तितकेच बाध्य आहेत; अशा सर्वांना बचत खाते ठेवण्यास मनाई असल्याने बँकांनी त्यांच्यासाठी चालू खातीच उघडावीत.

विद्यमान खात्यांचे त्वरित रूपांतर – ज्या विद्यमान बचत खात्यांसाठी संबंधित संस्थांनी अद्याप वरीलप्रमाणे करमाफी प्रमाणपत्र सादर केलेले नाही, ती खाती तत्काळ बंद करून चालू खात्यात रूपांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अशा संस्थांच्या जमा रकमेवर आता बचत खात्याचे व्याज मिळणार नाही.
उद्य‍म विकास सहकारी बँकेचे संचालक संदीप खर्डेकर यांनी सर्व सार्वजनिक न्यास, मंडळे व संस्थांना नवीन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. “या नव्या निर्देशांचे काटेकोर पालन केल्यास बँकिंग व्यवस्थेत शिस्तबद्धता येऊन अनियमित व्यवहारांना आळा बसण्यास मदत होईल,” असे खर्डेकर म्हणाले. “फक्त ज्यांनी आपले करमाफी प्रमाणपत्र (12A/10AC) सादर केले आहे त्यांनाच बचत खात्यावरील व्याजाचा लाभ मिळत राहील; जे मंडळे वा संस्थांनी अद्याप हे प्रमाणपत्र सादर केलेले नाही, त्यांना आता चालू खात्यावर कामकाज करावे लागेल. त्यामुळे त्यांच्या आर्थिक व्यवहारांत आवश्यक शिस्त येईल,” असेही त्यांनी नमूद केले. खर्डेकर यांनी सार्वजनिक ट्रस्ट संस्थांनी आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने या बदलाचे त्वरीत पालन करून रिझर्व बँकेच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १९ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि. ६ : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथक १ व ३ च्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत १९ लाख ७१ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ व ३ चे निरीक्षक देवदत्त पोटे यांच्या पथकास मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार मंगळवारी (५ ऑगस्ट) मार्केट यार्ड पुणे तसेच शेलपिंपळगाव ता. खेड व आंबी ता. मावळ या तीन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून ५ वाहनांसह ३ हजार २२० लिटर गावठी हातभट्टी दारु असा एकूण १९ लाख ७१ हजार २०० रुपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक डी. एस. सूर्यवंशी श्री. वाय.एम.चव्हाण, श्री. ए.डी. गायकवाड सहाय्यक दुय्यम निरीक्षक सागर साबळे संजय साठे, जवान सर्वश्री. अहमद शेख भरत नेमाडे, चंद्रकांत नाईक, विजय भानवसे अमर कांबळे, अनिल दांगट, जी. बी. माने, जयदास दाते. जगन्नाथ चव्हाण व महिला जवान अक्षदा कड, जवान नि वाहन चालक प्रमोद खरसडे व शरद हंडगर यांनी सहभाग घेतला.

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित मद्य तसेच गावठी हातभट्टी दारूच्या निर्मिती, विक्रीमुळे महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. याबाबत कोणास माहिती मिळाल्यास निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ ताडीवाला रोड, पुणे व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक ३, तळेगाव दाभाडे ता. मावळ, या पथकांशी संपर्क साधावा, असे आवाहन निरीक्षक देवदत्त पोटे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

राज्यातील 5 ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; नियमितपणे आढावा, समन्वय साधणार

मुंबई, दि. ६ : – राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांतील कामांचा नियमितपणे आढावा घेऊन, त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना सादर करतील.

राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांचा विकास करण्यासाठी आराखडे तयार करण्यात आले आहेत. या आराखड्यांची अंमलबजावणी वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने व्हावी या करिता या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्योतिर्लिंग व त्यांच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त अधिकारी पुढीलप्रमाणे – श्री क्षेत्र भीमाशंकर (जि.पुणे) – सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही. राधा., श्री. क्षेत्र घृष्णेश्र्वर (जि. छत्रपती संभाजीनगर) – उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी. श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) – वित्त विभागाचे प्रधान सचिव श्री. सौरभ विजय. श्री. क्षेत्र औंढा नागनाथ (जि. हिंगोली) – वित्त विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती रिचा बागला. श्री. क्षेत्र परळी वैजनाथ (जि. बीड) – इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव श्री. आप्पासाहेब धुळाज.

या पाच ज्योतिर्लिंगांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना उच्चाधिकारी समित्यांच्या बैठकांमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार वेळोवेळी शासन निर्णय देखील काढण्यात आले आहेत. त्यानुसार श्री. क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १४८ कोटी ३७ लाख रुपयांच्या सुमारे ११ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. श्रीक्षेत्र घृष्णेश्र्वर तीर्थक्षेत्र विकास आराखडा १५६ कोटी ६३ लाख रुपयांचा आहे. श्री श्रेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखड्यातील २७५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. श्री. क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा १५ कोटी २१ लाख रुपयांचा आहे. तर श्री श्रेत्र परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील २८६ कोटी ६८ लाख रुपयांच्या ९२ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विविध कामांना गती मिळावी, ही कामे दर्जेदार आणि गतीने व्हावीत, यासाठी संबंधित अधिकारी समन्वय साधणार आहेत. अशा पद्धतीने विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयीन स्तरावरून समन्वय, संनियंत्रणासाठी अधिकारी नियुक्तीचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.