Home Blog Page 182

नोकरीची पारंपारिक विचारधारा पुढे नेण्यापेक्षा, धाडसी निर्णय घेऊन व्यावसायिक व्हा-सौरभ गाडगीळ

पुणे: व्यावसायिक होण्यासाठी पहिल्यांदा नोकरी करून अनुभव घेणे गरजेचे नाही. आपल्यासमोर विविध संधी आज उपलब्ध आहेत, याचा उपयोग करून आपण थेट व्यवसायामध्ये उतरू शकतो. नोकरी करून पारंपारिक विचारधारा पुढे नेण्यापेक्षा, धाडसी निर्णय घेऊन व्यावसायिक व्हा, असा सल्ला देतानाच तरुणांमध्ये उद्योजक होण्याची मानसिकता निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केले. 

मएसो सीनियर कॉलेज पुणे, डिक्की नेक्स्टजेन आणि लघु उद्योग भारती यांच्यातर्फे उद्यमी संवाद या मुलाखतपर कार्यक्रमामध्ये ३०० हून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. सौरभ गाडगीळ बोलत होते. मएसो प्रशासकीय मंडळ सदस्य सचिन कुलकर्णी, मएसो सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ.पूनम रावत, पोस्टमन युट्यूब चॅनलचे अक्षय बिक्कड, स्टार्टअप इनोव्हेशन सेल समन्वयक प्रा. निलेश यादव यावेळी उपस्थित होते.

डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, काळानुसार व्यवसायात जर बदल घडले नाही तर अनेक मोठ्या कंपन्या आज नाहीशा झाल्या आहेत. त्यामुळे काळानुसार बदलणे हे व्यवसायामध्येही गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही कोणत्याही क्षणी स्पर्धेच्या बाहेर फेकले जाऊ शकता. त्यामुळे ग्राहकांशी संवाद कायम ठेवणे हे गरजेचे असते. त्यामुळेच आपला व्यवसाय हा काळानुरूप टिकू शकतो आणि ग्राहकांच्या पसंतीला उतरू शकतो. आज जवळजवळ २०० वर्षे झाली तरीही पीएनजी ज्वेलर्स हा केवळ मार्केटमध्येच नव्हे तर ग्राहकांच्या मनामध्ये घर करून राहिलेला आहे असेही गाडगीळ यांनी यावेळी सांगितले.

मराठी उद्योजक कोणत्याही बाबतीत मागे नाही परंतु अनेक वर्षांपासून मराठी माणसांमध्ये तुम्ही नोकरी चांगल्या प्रकारे करू शकता उद्योग करू नका, असा विचार रुजवण्यात आला आहे. त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये स्थिरस्थावर होणे पहिल्यांदा पसंत करतो, परंतु गेल्या काही वर्षांपासून मराठी माणूसही उद्योग क्षेत्रामध्ये भरारी घेत आहे त्यासाठी मराठी तरुणांमध्ये सर्वप्रथम उद्योजक निर्माण करण्याची मानसिकता निर्माण करणे गरजेचे आहे, असेही डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले. विद्यार्थीनी श्रुती येवले हिने सूत्रसंचालन केले. पोस्टमन युट्यूब चॅनलचे सर्वेश देशपांडे यांनी डॉ. सौरभ गाडगीळ यांच्याशी मुलाखत पर संवाद साधला.

महावितरण राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुण्याचे ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ सर्वोत्कृष्ट

नागपूरचे ‘रंगबावरी’ नाट्यकृती द्वितीय

पुणे, दि. ०७ ऑगस्ट २०२५:  नाशिक येथे संपन्न झालेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाच्या संघाने ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा’ या नाटकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकाविला. तर नागपूर प्रादेशिक विभागाचे ‘रंगबावरी’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला.

नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अतिशय दर्जेदार व विविध विषयांचा वेध घेत घेणाऱ्या चारही प्रादेशिक विभागाच्या नाट्यकृतींना नाशिककर रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या नाट्यस्पर्धेतील सांघिक, वैयक्तिक विजेते व उपविजेत्यांचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र व संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी अभिनंदन केले आहे.

दोन दिवसीय राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचा बुधवारी (दि. ६ ) सायंकाळी समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य महाव्यवस्थापक (प्रवसु) अरविंद भादीकर, मुख्य तपास अधिकारी दत्तात्रय बनसोडे, नाट्यस्पर्धेचे निमंत्रक व मुख्य अभियंता सुंदर लटपटे, मुख्य अभियंते हरिष गजबे (चंद्रपूर), चंद्रमणी मिश्रा (कल्याण), संजय पाटील (भांडुप), पवनकुमार कछोट (छत्रपती संभाजीनगर), नाट्यस्पर्धेचे मुख्य समन्वयक व मुख्य औद्योगीक संबंध अधिकारी संजय ढोके यांची उपस्थिती होती. या पाहुण्यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्या संघांना करंडक तसेच वैयक्तिक गटातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. नाट्यस्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रभाकर दुपारे, चंद्रकांत जाडकर,  मीनाक्षी केंढे यांनी काम पाहिले.

सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे म्हणाले, महावितरणच्या कामाचे स्वरूप पाहता नाट्यकर्मी कर्मचाऱ्यांना खूप कमी वेळ मिळतो. तरी देखील अथक परिश्रम घेत नाट्य कलावंतानी अतिशय दर्जेदार कलाकृती सादर केल्या आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नवऊर्जा देणारी ही नाट्यस्पर्धा आहे असे त्यांनी सांगितले. बक्षिस वितरण कार्यक्रमाला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते, अधिकारी, कर्मचारी व नाट्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी विकास आढे व रंगकर्मी संदीप पाचंगे यांनी केले.

या नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाने ‘डॉक्टर तुम्ही सुद्धा’, कोकण प्रादेशिक विभागाने ‘आवर्त’, नागपूर प्रादेशिक विभागाने ‘रंगबावरी’ आणि छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाने ‘केस नं. ९९‘ नाट्यप्रयोग सादर केले. पारितोषिक वितरण सोहळ्याला राज्यभरातील महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते, अधिकारी, कर्मचारी व नाट्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते.

राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –

सर्वोत्कृष्ट नाटक : प्रथम- डॉक्टर, तुम्ही सुद्धा! (पुणे), द्वितीय- रंगबावरी (नागपूर)

दिग्दर्शन : प्रथम – ज्ञानदेव पडळकर (पुणे), द्वितीय – संध्या चिवंडे (नागपूर)

अभिनय (पुरुष) : प्रथम – विजय जोशी (पुणे), द्वितीय – श्रावण कोळनुरकर (छत्रपती संभाजीनगर)

अभिनय (स्त्री) : प्रथम – रोहिणी ठाकरे(नागपूर), द्वितीय – भक्ति जोशी(पुणे)

नेपथ्य : प्रथम – सतीश सरोदे (पुणे), द्वितीय – राम मेस्त्री (कोकण)

प्रकाशयोजना : प्रथम – अभय येरडे (छत्रपती संभाजीनगर), द्वितीय – अभिजीत सिकनिस (कोकण)

संगीत : प्रथम – रुपेश देशमुख (नागपूर), द्वितीय – अनिल राजपूत (छत्रपती संभाजीनगर)

रंगभूषा व वेशभूषा : प्रथम – विकास पुरी (पुणे), द्वितीय – प्रशांत ठाकरे(नागपूर)

उत्तेजनार्थ (अभिनय) : श्रद्धा मुळे (कोकण), सचिन निकम (पुणे), सायली सायनकर (नागपूर) आणि रमेश शिंदे (छत्रपती संभाजीनगर) यांना सन्मानित करण्यात आले

शिक्षक सक्षमीकरणासाठी ‘साधना फेलोशिप’ उपक्रम

लीडरशिप फॉर इक्विटी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स व बजाज फिनसर्वचा संयुक्त उपक्रम

सिद्धेश शर्मा यांची पत्रकार परिषदेत माहिती; ३० सप्टेंबरपर्यंत फेलोशिपसाठी अर्ज करता येणार

पुणे, ७ ऑगस्ट : शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी पुण्यातील स्वयंसेवी संस्था ‘लीडरशिप फॉर इक्विटी’ (एलएफई) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या (टीआयएसएस) सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचर एज्युकेशन आणि बजाज फिनसर्व्ह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साधना फेलोशिप २०२५’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सहा महिन्यांचा हा प्रशिक्षण उपक्रम येत्या सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार असून, शिक्षणात रुची असलेल्या युवकांना प्रत्यक्ष अनुभव देत त्यांना आत्मनिर्भर आणि सक्षम शिक्षक घडवण्याचा उद्देश यामागे आहे, अशी माहिती ‘एलएफई’चे सहसंस्थापक सिद्धेश शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ‘एलएफई’च्या प्रकल्प व्यवस्थापक काजल पवार, अकॅडमिक लीडर शार्दुली जोशी आदी उपस्थित होते.

सिद्देश शर्मा म्हणाले, “शिक्षणपदवीधारक बेरोजगार उमेदवार तसेच इतर क्षेत्रांतून शिक्षण क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना ही नामी संधी उपलब्ध आहे. आठवड्यातून चार दिवस शाळांमध्ये ४०० तासांचे थेट अध्यापन प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यात विषयनिहाय अध्यापन, इंग्रजी संवादकौशल्य, डिजिटल साधनांचा वापर, मुलांशी संवाद आदी गोष्टींचा समावेश आहे. या फेलोशिपचा मुख्य गाभा ‘अनुभवातून शिका’ या संकल्पनेत आहे. प्रत्यक्ष वर्गखोल्यांमध्ये शिकवण्याचा अनुभव देत फेलोंना अनुभवी मार्गदर्शकांच्या सहाय्याने तयार केले जाणार आहे. फेलोशिपच्या कालावधीत दरमहा ५,००० रुपये मानधनही दिले जाईल. यशस्वी फेलोंना ‘टीआयएसएस’ आणि ‘एलएफई’ यांच्याकडून संयुक्त प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच ‘एलएफई’च्या नेटवर्कद्वारे रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.”

काजल पवार म्हणाल्या, “सक्षम शिक्षक घडवणे म्हणजे समाजाच्या परिवर्तनासाठी बीजारोपण करणे आहे. ‘साधना फेलोशिप’मुळे शिक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेले आत्मविश्वासी आणि सर्जनशील शिक्षक घडवता येतील. या फेलोशिपसाठी बजाज फायनसर्व्ह या प्रमुख उद्योग समूहाचे सहकार्य लाभले आहे. शिक्षणातील दर्जा आणि समावेशकता वाढवण्याच्या दृष्टीने ‘साधना’ उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे. ही फेलोशिप केवळ नोकरी मिळवण्यासाठी नव्हे, तर एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आहे. शिक्षक म्हणून प्रत्येक फेलोला एक प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात येथे करता येईल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२५ असून, अधिक माहिती www.LeadershipForEquity.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.”

‘साधना फेलोशिप’ची वैशिष्ट्ये

– इंटर्नशिप व प्रतिमहिना ५००० रुपये मानधन

– हमखास नोकरी मिळण्याची हमी

– ‘टीआयएसएस’ आणि एलएफई’द्वारे प्रमाणपत्र

– तज्ज्ञ मार्गदर्शकांडून प्रोत्साहन व प्रशिक्षण

– ४०० तासांचे अनुभवाधारीत ज्ञान घेता येणार

– स्वतःमधील शिक्षक घडवण्याची संधी

एम सँड व्यावसायिकांना अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. 7 : राज्यात विविध बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा वापर करण्याबाबत महसूल व वन विभागामार्फत दि .23 मे ,2025 रोजी धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा अधिवास असलेल्या, महाराष्ट्रात नोंदणी असणाऱ्या प्रथम पुढाकार घेणाऱ्या 50 संस्थांना एम सँड (M-sand) युनिट स्थापन करण्याकरिता उद्योग विभागाच्या व महसूल विभागाच्या सवलती लागू राहतील तसेच दि .17/7/2025 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे .

शंभर टक्के एम सँड उत्पादीत करण्यास इच्छुक असलेल्या व्यावसायिकांनी शासनाकडील महाखनिज या संगणक प्रणालीवर वैयक्तिकरित्या https://mahakhanij.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा महा ई-सेवा केंद्रामार्फत अर्ज करावेत. अर्जासोबत गट नंबर नकाशा, 7/12, आधार कार्ड, पॅन कार्ड, अर्ज फी र .रू. 520/-, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांचेकडील कंसेंट टू एस्टाब्लिश (Consent to Establish) व कंसेंट टू ऑपरेट (Consent to Operate ) बाबतचे प्रमाणपत्र, ज्या क्षेत्रावर एम सँड युनिट बसविण्यात येणार आहे अशा क्षेत्राबाबत संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून त्याबाबतचा वापर अनुज्ञेय आहे किंवा कसे याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र, आवश्यक त्या ठिकाणी अकृषिक परवानगी आदेश, तसेच उद्योग आधार नोंदणी, जिल्हा उद्योग केंद्र यांची नोंदणी असणारे प्रमाणपत्र व व्यापारी परवाना असणे बंधनकारक आहे.

जिल्हयातील सर्व क्रशरधारक व नव्याने एम सँड उत्पादीत करण्यास इच्छुक असलेल्या व्यावसायिकांनीअर्ज करावे असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. याबाबत काही अडचणी असल्यास खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचेशी संपर्क साधावा.असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

दिवेघाटातील वाहतूक मार्गात बदल

पुणे-

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्ग अंतर्गत हडपसर ते दिवेघाट या पॅकेज 6 चे रस्ता रुंदीकरण करण्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालया मार्फत सुरु आहे. पालखी मार्ग रूंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी खडकामध्ये ब्लास्टींगचे काम करणे गरजेचे असल्याने खडक ब्लास्टींगचे काम पोलीस प्रशासनाच्या नियंत्रणामध्ये सुरु आहे.
पोलीस यंत्रणेच्या परवानगीनुसार ज्या दिवशी ब्लास्टींग करण्यात येईल त्या दिवशी दिवेघाटातील वाहतूक सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत बंद करण्यात येणार असून दिवेघाटातून (दोन्ही बाजूने) प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी या दिवशी पर्यायी वाहतूक मार्गावरून वाहतूक करावी.
कात्रज बोपदेव घाट (राज्य मार्ग क्र. 131) मार्गे सासवड, खेडशिवापूर-सासवड लिंक रोड मार्गे सासवड, कापूरहोळ-नारायणपूर (राज्य मार्ग क्र. 119) मार्गे सासवड त्याच प्रमाणे हडपसर-उरळी कांचन शिंदवणे घाट मार्गे (राज्य मार्ग क्र. 61) सासवड अशा पर्यायी मार्गाचा वापर करावा असे, आवाहन एस एस कदम, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पकाई पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्तांकडून आढावा

निवडणूका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा- दिनेश वाघमारे

पुणे, दि. ७: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार संख्या, मतदान केंद्रे, तेथील सोईसुविधा, आवश्यक मनुष्यबळ, उपलब्ध इलेक्टॉनिक मतदान यंत्र आदींबाबत सूक्ष्मरितीने पूर्वनियोजन करा, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.

पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक पूर्व तयारी संदर्भात श्री. वाघमारे यांनी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित होते.

श्री. वाघमारे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ६५० स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूका होणार आहेत. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच निवडणूका होत असल्याने सर्वांची जबाबदारी मोठी आहे. निवडणुकीची पूर्वतयारी करतांना मतदार यादी, मतदान केंद्र, मतदान यंत्रे आणि मतदार जनजागृती या चार बाबींवर विशेष लक्ष द्यावे. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाते. प्रभागनिहाय व केंद्रनिहाय मतदार यादीचे काळजीपूर्वक विभाजन करावे. मतदार यादी अचूक असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मदत होईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने घेण्यात येतात. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढणार असली तरी मतदान केंद्र निश्चितीबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या निकषाद्वारे मतदान केंद्रांचे एकत्रिकरण करता येईल. सर्वसामान्य मतदार आणि दिव्यांग मतदारांसह सर्व घटकांचा विचार करून मतदान केंद्रांवर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत दक्षता घ्यावी.

प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध मतदान यंत्रांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार मतदान यंत्रांची मागणी नोंदवावी. राज्य निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश निवडणूक आयोगाशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे मिळण्याबाबत करार केला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून पुरेशी मतदान यंत्र उपलब्ध करुन दिली जातील.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंत नावे नोंदविलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत आहे, त्यासाठी भारत निवडणूक आयोगाची परवानगी लवकरच प्राप्त होईल. मात्र, त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी निवडणूक घेण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची उपलब्धता, संभाव्य मतदान केंद्रे आणि तेथील सोईसुविधांची उपलब्धता यांचाही आढावा घ्यावा, असे श्री. वाघमारे म्हणाले. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायत तसेच महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.

श्री. काकाणी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी करुन ती निवडणुकांसाठी सज्ज करण्यात यावीत. त्याचबरोबर मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळीच करण्यात याव्यात. मतदान केंद्रांच्या जुजबी दुरुस्त्यांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वापरावा. मतदान केंद्राची जागा निश्चिती, मतदान केंद्र इमारतींची स्थिती, तेथील सर्व सोयीसुविधांबाबत आतापासूनच तयारी करावी; तसेच मनुष्यबळाची उपलब्धता किंवा कमतरतेबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. गरजेनुसार वेळीच मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित जिल्ह्यांनी विभागीय आयुक्तांशी समन्वय साधावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

यावेळी सुरुवातीला विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. सन २०११ च्या जनगणनेनुसार त्यावेळची लोकसंख्या, आताची संभाव्य लोकसंख्या, मागील निवडणूकीवेळी असणारे मतदान केंद्रे, संभाव्य मतदान केंद्रे, तेथील सोईसुविधा, मतदार यादी विभाजनाचे नियोजन आदींबाबतची माहिती त्यांनी दिली. तसेच मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यापूर्वी मॉक पोल घ्यावा, तसेच खाजगी जागेतील मतदान केंद्रांच्या याद्यांना पूर्वप्रसिद्धी द्यावी अशा सूचनाही डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.

उपस्थित जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक तयारीच्या अनुषंगाने माहिती दिली तर महापालिका आयुक्तांनी तेथील महानगरपालिका निवडणूक पूर्वतयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोग कटिबद्ध -रूपाली चाकणकर

पुणे, दि.७ : महिलांना सुरक्षितता देण्यासाठी असलेल्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई, निवारण) २०१३ या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पर्यायाने नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याचे आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि एव्हीके पॉश ऍडव्हायझरी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पॉश कायदा जनजागृती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झालेल्या कार्यशाळेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, अप्पर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे, उपसचिव डॉ पद्मश्री बैनाडे, महिला बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, कामगार कल्याण विभागाचे सह संचालक श्री गिरी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, यशस्वी संस्थेचे विश्वेश कुलकर्णी, अमृता करमरकर उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना श्रीमती चाकणकर म्हणाल्या,
महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन देण्यासह त्यांच्यामध्ये सकारात्मक विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी आस्थापन प्रशासनाची आहे. महिलांनी अत्याचाराविरुद्ध न घाबरता पुढे येऊन अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करावी. अंतर्गत तक्रार निवारण समितीने सामाजिक जबाबदारी बाळगत महिलांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन कायद्याला अभिप्रेत असलेली प्रक्रिया राबवित न्याय मिळवून द्यावा.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) २०१३ कायद्याविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तथापि अद्यापही विविध आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समितीविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. या कार्यशाळेतील माहितीचा विविध आस्थापनामध्ये निश्चित उपयोग होईल अशा विश्वास त्यांनी व्यकत केला.

राज्यात सुमारे ३१ टक्के महिला विविध आस्थापनांमध्ये काम करीत आहेत. महिलांकरिता असलेल्या कायद्याविषयी समितीने माहिती देण्यासोबतच त्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्याचेही काम करावे, महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी न्याय देण्याचे प्रभावी माध्यम म्हणून समितीने काम करावे, याकामी महिला आयोगाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल.

दहा किंवा दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असणाऱ्या खासगी आस्थापनाच्या ठिकाणी नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांची कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूकीस प्रतिबंध करण्यासाठी, तक्रारीची चौकशी आणि छळ करणाऱ्या व्यक्तीस शिक्षा करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या कामकाजाचा वारंवार आढावा घेतला जातो, आगामी काळात या समितीच्या कामकाजाचे परीक्षण करण्याच्याअनुषंगाने आयोगाच्यावतीने राज्यशासनाकडे शिफारस करण्यात आली आहे, असेही श्रीमती चाकणकर म्हणाल्या.

आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विषद करताना सांगितले, पुणे जिल्ह्यासह पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेले आहे, यामध्ये माहिती तंत्रज्ञान उद्योगाची भर पडली आहे, त्यामुळे याठिकाणी विविध खासगी आस्थापना, सेवाक्षेत्रात महिला कर्मचारी काम करतात, या महिलांना सुरक्षितता पुरविण्याच्यादृष्टीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) २०१३ कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता अशा स्वरुपाची कार्यशाळेचे आयोजन करणे गरजेचे आहे. महिलाच्या सुरक्षिततेसोबत सदृढ मनाच्या समाजाची निर्मितीकरिता प्रयत्न करावे, असे आवाहन श्रीमती आवडे यांनी केली.

या कार्यशाळेत यशस्वी समुहाच्या अमृता करमरकर यांनी कायद्याच्या अनुषंगाने सर्व आस्थापनांना त्यांची भूमिका, जबाबदारीबाबत अवगत केले. नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापक डॉ ऐश्वर्या यादव यांनी न्यायालयीन प्रकरणे आणि निकालाबाबत मार्गदर्शन केले. विविध कंपन्यांचे उद्योग तज्ज्ञ यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

खेवलकरच्या मोबाईलमध्ये मुलींचे शेकडो नग्न व्हिडीओ, मोलकरणीचेही… चाकणकरांची माहिती

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलवकर यांच्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. प्रांजल खेवलकर हे सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत.
पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांना धाड टाकली होती. त्यावेळी तिथे दोन महिला देखील आढळल्या होत्या. आता याच मुद्द्यावरुन रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास केला जातोय. यासाठी प्रांजल खेवलकर यांचा मोबाईलदेखील पोलिसांकडून तपासण्यात आला आहे. त्यामध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ आढळल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांनी केला आहे. रुपाली चाकणकर यांनी अतिशय खळबळजनक आरोप केले आहेत.

“रुपाली चाकणकर यांनी यावेळी पोलिसांचं पत्र वाचून दाखवलं. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांजल खेवलकर, निखिल पोपटानी, समीर फकीर, मोहम्मद सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद मोहम्मद यादव यांच्यासोबत असलेल्या दोन महिला यांना पुणे येथून ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे असलेलं 42 लाख 35 हजार 400 रुपये किंमतीचं कोकेन, गांजा, 10 मोबाईल, 2 चारचाकी वाहने, हुक्का पॉट, दारुच्या बाटल्या अशा इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.”

“यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी हडपसर पुणे येथील घरातून जो मोबाईल जप्त केला होता, त्यामध्ये सायबर तज्ज्ञांच्या माहितीने, तांत्रिक विश्लेषणाने तपासणी केली असता, या मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रिनशॉट, पार्टीचे फोटो, व्हिडीओ, तसेच महिलांचे नग्र आणि अर्धनग्रन फोटो तसेच काही अशोभणीय कृत्याचे व्हिडीओ हाती लागले. या मोबाईलमध्ये जे व्हाट्सअॅप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण 7 मुली आढळून आल्या. या मुलींची नावे आरोष या नावाने सेव्ह केलेली होती. म्हणजेच आरोष या नावाची व्यक्ती मुलींची मानवी तस्करी करत होती. या चॅटवरुन आरुष याने मुलींना पार्टीकरता लोणावळा आणि पुणे येथे बोलावल्याची माहिती समोर आली.”

“पोलिसांनी छापा टाकण्याआधी दोन दिवसांपूर्वी त्याच ठिकाणच्या हॉटेलमध्ये रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यत दारु आणि हुक्का पार्टी चालू होती. त्यावेळेसही काही वेगळ्या मुली या ठिकाणी बोलावलेल्या होत्या. प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केलं असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधला आहे. या मुलींना चित्रपटात काम देतो असं आश्वासन देवून बोलावलं. त्यांचा वापर करुन घेतल्यानंतर त्यांच्या खर्चाचे सुद्धा पैसे दिले नाहीत. यामुळे या मुलींनी वारंवार पैशांची मागणी केल्याचंदेखील दिसून आलं आहे.”

“प्रांजल खेलवकर याने खराडीतील, गोवा, लोणावळा, साकीनाका आणि जळगाव या ठिकाणच्या हॉटेलमध्ये मुलींना बोलावून अशा प्रकारच्या पार्टी केलेल्या आहेत. या हिडन फोल्डरमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ आहेत. या मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते. काही मध्यस्थांमार्फत खेवलकर याने संपर्क करुन मुली पार्टीसाठी पाठवल्याचंदेखील चॅटमध्ये समोर येत आहे.”

“यामध्ये मोठ्या प्रमाणित अनैतिक मानवी व्यापार व वाहतुकीच्या अनुषंगाने रॅकेट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून यामध्ये प्रांजल खेवलकर आणि त्याचे सहकारी, तसेच या पार्टीत ज्या मुली उपस्थित होत्या त्या दोन वर्षांपासून संपर्कात होत्या. त्यामुळे या पार्टीत गांजा, अंमली पदार्थ घेऊन येण्याची त्यांना पूर्वकल्पना होती. त्याअनुषंगाने चॅटिंग झाल्याचं समोर आलं आहे.”
मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये 252 व्हिडीओ, 1497 फोटो

“यापुढची माहिती म्हणजे, काही शब्दांचा उल्लेख करणं संकोच वाटत आहे. या मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये 252 व्हिडीओ सापडले. त्यामध्ये 1497 फोटो, असे एकूण 1779 फोटो-व्हिडीओ आहेत. यामध्ये पार्टीचे, तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील, अशालाघ्य, मुलींचे नग्न फोटो या व्हिडीओत आहेत.”

“मुलींना विवस्त्र करुन, त्यांना नशा देवून, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करुन त्यांचे व्हिडीओ काढण्यात आले आहेत. या व्हिडीओचा वापर त्यांना परत ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आला आहे. इतकंच काय अगदी घरातील साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचे सुद्धा अतिशय वाईट अवस्थेतील फोटो यामध्ये आहेत. बऱ्याचशा विषय असा आहे की, मी सांगण्यापेक्षा ते समोर येतील. मी त्याबाबत बोलू शकत नाही. या सगळ्या मुलींना पटवण्यासाठी खेवलकर याने आरुष नावाचा माणूस ठेवला होता, असा गंभीर आरोप रुपाली चाकणकर यांनी केला आहे.”

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी रस्त्यांच्याभूसंपादनासंदर्भात हिंजवडीतील शेतकऱ्यांशी चर्चा

पीएमआरडीएच्या महानगर आयुक्त यांचा पुढाकार; समन्वयातूनच भूसंपादन प्रक्रिया राबवणार

पिंपरी (दि.७) : हिंजवडी भागातील नागरी समस्या आणि वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएच्या माध्यमातून विविध उपाय योजनांवर भर दिल्या जात आहे. या भागात नवीन रस्त्यांची आखणी करण्यात येत असून यासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन प्रक्रियेच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. ७) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी हिंजवडी भागातील शेतकऱ्यांशी औंध कार्यालयात संवाद साधला.

भूसंपादन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांशी संवाद आणि समन्वय ठेवूनच निर्णय घेण्यात येईल. कुठल्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही, त्यांचे हक्क आणि अधिकारांचा प्रथम विचार करून भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे. शेतकऱ्यांनी भूसंपादनास संमती दिली तर त्यांना २५ टक्के अधिकचा मोबदला शासनाकडून मिळणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या प्रस्तावित नवीन रस्त्यांच्या आखणीमुळे हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर होणार असून नागरी समस्या सुद्धा निकाली निघणार आहे.

प्रस्तावित रस्त्याच्या आखणीसंदर्भात भूसंपादन प्रक्रिया राबवताना थेट खरेदी, संमतीने खरेदी, टीडीआर आणि इन्सेटिव्ह एफएसआय आदीबाबत शेतकऱ्यांना पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे सविस्तर मार्गदर्शन केले. प्रस्तावित रस्त्याच्या अनुषंगाने राबवण्यात येणाऱ्या भूसंपादनाची प्रक्रिया आणि मोबदल्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. यासह शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले.

शेतकऱ्यांना जाहीर आवाहन
हिंजवडी, माण, मारुंजी भागातील प्रस्तावित रस्त्यांच्या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान बाधित शेतकऱ्यांना टीडीआर (TDR) देणार असल्याचे आवाहन महानगर आयुक्त यांनी लेखी पत्राद्वारे केले आहे. यामध्ये पांडवनगर ते माण गावठाण ते फेस ३ (टी जंक्शन), लक्ष्मी चौक ते पद्मभूषण चौक ते विप्रो सर्कल, मेझानाईन ते लक्ष्मी चौक, लक्ष्मी चौक ते मारुंजी, शिंदे वस्ती ते जगताप चौक (कासारसाई रोड), मधुबन हॉटेल (PMC हद्द) ते शिवाजी चौक या प्रस्तावित रस्त्यांचा यात समावेश असून संबंधित शेतकऱ्यांनी याचा लाभ घेता येणार आहे.

आंतरजातीय विवाह पद्धती समाजात अपेक्षित बदल घडवतील-श्रीकांत शिरोळे


पुणे :- ” सध्या जाती-धर्मातील निर्माण करणे अस्थिरता माजवणे हे राजकीय षडयंत्र सुरू असताना आंतरजातीय विवाह करणाऱ्या दापत्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करणे म्हणजे, जातीधर्मातील सलोखा ठेवून समाजातील अपेक्षित बदल घडवणारा असेल” असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत शिरोळे यांनी व्यक्त केले.
गोखलेनगर येथील पाच-पांडव सभागृह सभागृह येथे अखिल जनवाडी मंडळाने आयोजित केलेल्या जातीअंतासाठी करू काही या विषयावर डॉक्टर आनंद करंदीकर यांचे कविता वाचन कार्यक्रमात ते बोलत होते. “ते पुढे म्हणाले आपला देश 18 पगड जातीत विभागला गेला आहे विविध मध्ये एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे कुठलाही कारभार करताना सर्वांना एकत्र घेऊनच काम करावे लागणार आहे”
याप्रसंगी आंतरजातीय विवाह करणाऱ्या 50 दापत्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला गणेशोत्सवात काळात रोज काही दापत्यांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते श्रींची आरती व सत्कार सोहळ्याचे नियोजन करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष उमेश वाघ यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना सांगितले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास काळे,जयंत दौंडकर,जयश्री काळे, आदित्य माळवे, मधुरा निम्हण, मधुकर पवार आदी उपस्थित होते.
लाल बहादूर मंडळाचे आकाश धोत्रे यांनी सूत्रसंचालन तर जागृती सेवा संस्थेच्या मंगला पाटील यांनी सर्वांच्या आभार मानले.

महापालिका अधिकाऱ्यांवरील अरेरावी व दादागिरीमुळे राजकीय कार्यकर्त्यांची बदनामी-अविनाश साळवे,राहुल डंबाळे,परशुराम वाडेकर आयुक्त राम यांच्या पाठीशी

पुणे – पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना आंबेडकरी चळवळीत कार्यरत विविध पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी व आजी-माजी नगरसेवक यांनी भेट घेऊन ठाम पाठिंबा जाहीर केला. यावेळी शिष्टमंडळाने आयुक्तांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या कार्यशैलीचे समर्थन केले आणि पुणेकर नागरिक त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या बैठकीमध्ये घुसून गोंधळ घातल्याच्या घटनेमुळे निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली. या घटनेचा निषेध करताना प्रतिनिधींनी म्हटले की, लोकप्रतिनिधी म्हणवून घेत कार्यकर्त्यांकडून बैठकीत धुडगूस घालणे हे अत्यंत लाजीरवाणे आहे आणि यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांची अनावश्यक बदनामी होत आहे.

शिष्टमंडळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) प्रदेश संघटन सचिव  परशुराम वाडेकर, माजी नगरसेवक अविनाश साळवे, रोहिदास गायकवाड, शैलेंद्र चव्हाण, राहुल डंबाळे, असित  गांगुर्डे, युवराज बनसोडे, माजी उपमहापौर सुनिता वाडेकर, हिमाली कांबळे आणि आंबेडकरी चळवळीतील इतर नेते सहभागी होते.

शिष्टमंडळाने यावेळी नमूद केले की, नवल किशोर राम हे प्रशासनात दीर्घ अनुभव असलेले अधिकारी असून त्यांनी बीड, छत्रपती संभाजीनगर  व पुणे जिल्ह्यात यशस्वी कारभार केला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कोविड काळात केलेले कार्य व भीमा कोरेगावच्या दंगलीच्या वेळी दाखवलेले नेतृत्व पुणेकर विसरलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे.

मनसेकडून झालेल्या प्रकारानंतर त्याला ‘मराठी-अमराठी’ वादाचा रंग देण्याचा प्रयत्न अत्यंत हास्यास्पद असल्याचे मतही शिष्टमंडळाने व्यक्त केले. आयुक्त राम हे उत्तम मराठी बोलतात व मराठी वाचक आहेत. ते अनेक वर्षांपासून स्थानिक कार्यकर्त्यांशी मराठीतून संवाद साधत आले आहेत. त्यामुळे भाषेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण करणे म्हणजे मूळ विषयापासून लक्ष हटवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका करण्यात आली.

या प्रकारात महाविकास आघाडीचे काही घटक मनसेच्या भूमिकेला समर्थन देत असल्याचे दिसल्याने आश्चर्य व्यक्त करत, अशा स्टंटबाजीला पाठिंबा देणे दुर्दैवी असल्याचेही शिष्टमंडळाने सांगितले.

“पुणेकर नागरिक महापालिका आयुक्तांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवतात व भविष्यातही ते त्यांच्या सोबत राहतील,” असा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला. या घटनेचा अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज यांच्या कडे तीव्र शब्दात निषेध  करण्यात आला.

पुण्याहून भुवनेश्वरला निघालेल्या विमानाला पक्षी धडकला:उजव्या बाजूचे पाच ब्लेड निकामी, पायलटच्या प्रसंगावधानाने 140 प्रवाशांचा जीव वाचला

पुणे-येथील विमानतळावर पुणे-भुवनेश्वर विमानाला पक्षी धडकल्याने उड्डाण रद्द करण्यात आले आहे. पुण्याच्या विमानतळावरून भुवनेश्वरला उड्डाणाच्या तयारीत असलेले 1098 हे विमान रद्द करावे लागले आहे. पक्षाच्या धडकेत विमानाच्या एका बाजूचे पाच ब्लेड निकामी झाले असल्याचा प्रकार पायलटच्या लक्षात आल्याने विमान उड्डाण तातडीने रद्द करण्यात आले. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. विमानतळ व परिसरात कुत्रे, बिबट्या तसेच पक्षांच्या प्रमाणात वाढ झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचे दिसते.

पुणे विमानतळावर पुण्याहून भुवनेश्वरकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-1098 या विमानाला बुधवारी अपघात होता होता टळला. उड्डाणावेळी धावपट्टीवर वेग घेत असताना विमानाला पक्षी धडकल्यामुळे हा प्रकार घडला. विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनला पक्षी आदळल्याने त्याचे पाच ब्लेड निकामी झाले. मात्र, पायलटने प्रसंगावधान राखून वेळीच उड्डाण थांबवल्यामुळे विमानातील 140 प्रवाशांचा जीव वाचला. या घटनेमुळे उड्डाण रद्द करण्यात आले, परिणामी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

याच विमानातील सीट क्रमांक 22 डी वरील प्रवासी मोहम्मद नदीम यांनी सांगितले की, इंजिनने वेग वाढवल्यावर त्यातून ज्वाला बाहेर पडू लागल्या. त्यानंतर लगेचच पायलटने ब्रेक दाबले आणि विमान थांबले. ब्रेक इतके जोरात लागले की काही प्रवाशांचे फोन खाली पडले आणि एका महिलेच्या हातून तिचे मूल जवळजवळ खाली पडले.

बुधवारी सायंकाळी 4:05 वाजता पुण्याहून भुवनेश्वरकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-1098 या विमानाला मोठा अपघात होता होता टळला. दीडशेहून अधिक प्रवासी घेऊन हे विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर वेग घेत असतानाच, त्याच्या उजव्या बाजूच्या इंजिनमध्ये पक्षी धडकला. यामुळे इंजिनमध्ये बिघाड झाला, मात्र पायलटने तातडीने उड्डाण थांबवून विमान पुन्हा पार्किंग बेमध्ये सुरक्षितपणे आणले. पायलटच्या या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली, कारण जर हा प्रकार हवेत घडला असता तर मोठा अपघात झाला असता, असे हवाई वाहतूक नियंत्रण विभागाने सांगितले आहे.

पुणे विमानतळावर गेल्या काही वर्षांपासून वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पुणे विमानतळावर एकूण 145 ‘बर्ड हिट’च्या घटनांची नोंद झाली आहे. या वाढत्या घटनांमुळे विमानतळाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

एकट्या 2025 या वर्षात आतापर्यंत अशा 12 घटना घडल्या आहेत, आणि बुधवारी घडलेली ही 12 वी घटना आहे. या घटनेमुळे पुणे विमानतळावरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीर बनला असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

महाराष्ट्रात 1 कोटी मतदारांची भर:एकच व्यक्ती महाराष्ट्रासह कर्नाटक, उत्तर प्रदेशचा मतदार; राहुल गांधी यांचा पुराव्यांसह आरोप

निवडणूक आयोगाचा सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा निर्णय संशयास्पद

नवी दिल्ली-काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात अवघ्या 5 महिन्यांत 5 वर्षांहून अधिक मतदारांची मतदार यादीत भर पडली. विशेषतः एकाच मतदाराने महाराष्ट्रासह कर्नाटक व उत्तर प्रदेशातही लागोपाठ मतदान केले. या गैरव्यवहारात भाजप व निवडणूक आयोगाने हातात हात घालून काम केले, असे ते म्हणाले. राहुल यांनी यासंबंधी काही ठोस पुरावेही सादर केलेत.

राहुल गांधी यांची आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतांचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला. ते म्हणाले, महाराष्ट्रात अवघ्या 5 महिन्यांत 5 वर्षांपेक्षा जास्त मतदारांची भर पडली. यामुळे आमचा संशय बळावला. त्यातच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजेनंतरच्या टक्केवारीत अचानक मोठी वाढ झाल्याने हा संशय अधिक गडद झाला. कारण, लोकसभा निवडणुकीत आमच्या आघाडीला मोठे यश मिळाले होते. पण विधानसभेत आमचा सफाया झाला. हे खूपच संशयास्पद होते.

त्यानंतर आम्ही त्याचा शोध घेतला. त्यात लोकसभा व विधानसभा या दोन निवडणुकांमधील काळात तब्बल 1 कोटी नव्या मतदारांची वाढ झाल्याची बाब आमच्या निदर्शनास आली. आम्ही याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. लेख लिहिले. महाराष्ट्रातील मतदान चोरीला गेल्याचा आमचा एकंदरीत सूर होता, असे ते म्हणाले.

समस्येचे मूळ काय आहे? मतदार यादी ही या देशाची मालमत्ता आहे. पण त्यानंतरही निवडणूक आयोगाने आम्हाला ती देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी एक मोठी रंजक गोष्ट केली. आयोगाने सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा निर्णय घेतला. हे आमच्यासाठी अत्यंत आश्चर्यकारक होते. कारण, महाराष्ट्रात सायंकाळी 5.30 वाजेनंतर मोठ्या प्रमाणात संशयास्पद मतदान झाल्यामुळे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

वस्तुतः मतदान केंद्रांवर सायंकाळी 5.30 नंतर कोणतेही मोठे मतदान झाले नव्हते. ही बाब आमच्या लोकांना माहिती होती. या दोन गोष्टींमुळे भारतीय निवडणूक आयोगाने भाजपशी संधान साधून मतदान चोरल्याची आमची खात्री पटली, असेही राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या मतदार यादीत 40 लाख गूढ मतदार आढळल्याचाही आरोप केला. याविषयी त्यांनी आदित्य श्रीवास्तव नामक एका मतदाराचे उदाहरण दिले. या मतदाराने महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश व कर्नाटकातही मतदान केल्याचे निष्पन्न झाले. या तिन्ही राज्यांच्या मतदार यादीत या व्यक्तीचे नाव होते. याचा अर्थ या व्यक्तीने आळीपाळी तिन्ही राज्यांतील निवडणुकांत मतदान केले. राहुल गांधी यांनी यावेळी त्याचे पुरावेही दाखवले. आम्ही निवडणूक आयोगाकडे डेटा मागितला. पण त्यांनी दिला नाही. आता आम्ही निवडणुकीतील गैरप्रकाराचे त्यांना थेट पुरावेच दिलेत, असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी यावेळी भाजप व निवडणूक आयोगाने विविध राज्यांतील विधानसभा निवडणुका व लोकसभेतील मते चोरल्याचाही आरोप केला. आम्हाला निवडणुकीचे निकाल आल्यापासूनच दाल में कुछ काला है असे वाटत होते. पण भाजपाला अँटी इन्कम्पन्सी वाटत नव्हती. त्यामागे हे कारण होते. मतचोरी ही भारताविरोधातील व भारतीय राज्य घटनेविरोधात रचण्यात आलेला सर्वात मोठा गुन्हा आहे, असे ते म्हणाले.

उत्तराखंडमध्ये पूरग्रस्त ठिकाणी अडकलेल्या यात्रेकरूंना दिलासा,उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यामुळे सर्वजण सुखरूप, सरकारने दिला मदतीचा हात

0

मुंबई, दि. ६ ऑगस्ट २०२५:
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात धराली परिसरात ५ ऑगस्ट रोजी आलेल्या ढगफुटीजन्य पुरामुळे गंगोत्री यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांपैकी महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले होते. यामध्ये महाराष्ट्रातील ५१ यात्रेकरू यांचेशी संपर्क होऊन ते सुखरुप असल्याची खात्री झाली आहे.विशेषतः संभाजीनगरमधील १८ जणांच्या यात्रेकरूंचा एका ग्रुपशी संपर्क पूर्णतः तुटला होता. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने लक्ष घालून प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे या सर्व यात्रेकरूंशी संपर्क प्रस्थापित होऊन ते सुरक्षित असल्याची माहिती श्रीमती रंजना कुलकर्णी संपर्कप्रमुख लातूर जिल्हा तसेच श्री भालचंद्र चव्हाण संचालक आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून खात्री करून मिळाली. ही माहिती त्यांनी संबंधित नातेवाईकांना देऊन त्यांना दिलासा दिला.

यात्रेकरूंमध्ये प्रमिला शिवाजी दहिवाळ, शिवाजी रावसाहेब दहिवाळ, कल्पना अनिल बनसोड, उषा अजय नागरे, किरण भीमराव शहाणे, ज्योती रमेश बोरडे, नूतन, संतोष कुमार कुपटकर, उज्वला अरुण बोर्डे, मंजुषा नागरे, शुभांगी किरण शहाणे, शिवदत्त शहाणे, अरुणकुमार वामनराव बोर्डे, भारती लक्ष्मणराव कुपटकर, श्रीकृष्णा थोरहत्ते, शीतल थोरहत्ते, वेदांत थोरहत्ते आणि नवज्योत थोरहत्ते यांचा समावेश होता. पुरामुळे त्या भागातील रस्ते, घरे, हॉटेल्स आणि लष्करी तळांचेही मोठे नुकसान झाले होते. परिणामी संपर्क आणि वाहतूक पूर्णतः खंडित झाली होती. मोबाइल नेटवर्क बंद असल्यामुळे नातेवाईक अत्यंत चिंतेत होते.

डॉ. गोऱ्हे यांनी उत्तराखंड व महाराष्ट्र शासनाच्या तत्पर कार्यवाहीसाठी आभार व्यक्त केले आहेत.तसेच उर्वरीत पर्यटकांना सुखरुप परत आणण्याकरिता तातडीने कारवाईसाठी मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य,मा.अध्यक्ष उत्तराखंड विधानसभा,मा.मुख्यमंत्री उत्तराखंड राज्य निवेदनपाठवून विनंती केली असून, उत्तराखंड सरकारशी समन्वय साधून अडकलेल्या नागरिकांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला. महाराष्ट्र शासनाने देखील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विशेष दक्षता घेतली व ५१ पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आपत्तीमधील महाराष्ट्रातील नागरिकांना तातडीची मदत मिळावी यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, “ही एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि अशा वेळी शासन आपल्या नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. यात अडकलेल्या यात्रेकरूंना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये.”

राज्य सरकारकडून अडकलेल्या नागरिकांसाठी वैद्यकीय, अन्न, निवास व प्रवास सुविधांची मदत करण्यात येणार आहे. बेपत्ता किंवा रुग्णालयात दाखल असलेल्या पर्यटकांची माहिती मिळवण्यासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून या बाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे .
महाराष्ट्र राज्य शासन हेल्पलाईन नंबर 9321587143/ 022-22027990/022-22794229

उत्तराखंड राज्य शासन हेल्पलाईन नंबर
0135-2710334/8218867005

शासनाच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे या ५१ यात्रेकरूंना दिलासा मिळाला असून, त्यांच्या कुटुंबीयांनी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. सरकार आपल्या पाठीशी असल्याने आणि मा उपसभापतींच्या पाठपुराव्यामुळे भीतीच्या क्षणातही आश्वस्त वाटत असल्याचे मत यात्रेकरू व नातेवाईकांनी व्यक्त केले.

ना अधिकारी,ना पुढारी…महापालिकेची मालक ही जनता आहे – नगर अभियंता वाघमारे

पुणे – मनसे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यात झालेल्या वादंगात आता महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्त राम यांच्या पाठीशी उभे राहत मराठी माणूस,अधिकारी आयुक्त राम यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले आहे. काल महापालिकेत झालेल्या मनसे आणि आयुक्त राम यांच्या वादंगामुळे महापालिकेने मनसे च्या कार्यकर्ते आणि नेत्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार तर दिली आहेच पण त्यानंतर आता लगेचच हिरवळीवर येत जोरदार निषेधही नोंदविला आहे.

प्रकरणाची सुरुवात आयुक्तांच्या घरातून 20 लाख रुपयांच्या वस्तूंच्या चोरीने झाली. या प्रकरणात थेट निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीत घुसून जाब विचारला. मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांनी त्यांना गुंड म्हटल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलनही केले.

मनपाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार आहे. परंतु आयुक्त 30 ते 35 अधिकाऱ्यांसोबत बैठकीत असताना थेट घुसून धिंगाणा घालणे चुकीचे आहे. कर्मचाऱ्यांच्या मनात याबद्दल तीव्र संताप आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की त्यांचा जनतेला वेठीस धरण्याचा हेतू नाही. कामबंद आंदोलन सुरू असले तरी नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील पक्षांनीही आयुक्तांच्या भूमिकेविरोधात गुरुवारी दुपारी निषेध आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. पोलिसांनी या प्रकरणी मनसेचे किशोर शिंदे,प्रशांत मते,नरेंद्र तांबोळी,अविनाश जाधव,महेश लाड आणि इतरांना नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर गैर कायदेशीर मंडळी जमवणे,सभागृहात बेकायदेशीर प्रवेश करणे, सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचे आरोप आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बाळकोटगी यांनी सांगितले की आरोपींविरुद्ध कलम १३२, १८९(२), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.