Home Blog Page 178

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

0

पुणे : वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हिंजवडीसह चाकण परिसरात काढण्यात येणाऱ्या अतिक्रमणानंतर त्या भागात तातडीने रस्ते विकसित करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयातून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपेक्षित प्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांनी चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगााने पाहणी केल्यानंतर आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चाकण एमआयडीसीसह परिसरातील खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे व्यवसायिक, कामगार, वाहनधारकांना अनेक अडचणी येतात. या भागात अतिक्रमणधारकांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम राबवत तातडीने अरुंद असलेले रस्ते रुंद करण्यासाठी तातडीने पावणे उचलणे अपेक्षित आहे. अतिक्रमण काढल्यानंतर त्या ठिकाणी जर रस्ते विकसित झाले नाही तर पुन्हा अतिक्रमण वाढते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयातून अतिक्रमण काढल्यानंतर तातडीने रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले.

चाकणसह परिसरात येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अशा वाहनांवर ठराविक वेळेची बंधने घालत एमआयडीसी भागात ट्रॅक टर्मिनल सुरू करण्यावर भर देत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आरटीओ यांच्यासह पोलीस यंत्रणेने संयुक्तपणे नियोजन करणे अपेक्षित आहे. यासह कचऱ्याची समस्या निकाली काढत या भागातील अतिक्रमणे तातडीने काढावी. रस्ते विकसित करताना जर कोणी चुकीची भूमिका घेत असेल तर त्यांच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. यावेळी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कशी सोडवता येईल, यासंदर्भात उपाययोजनांची माहिती, त्याचे कालबद्ध टप्पे व मास्टर प्लॅनचे सादरीकरण केले.

उपाययोजनांची कामे समाधानकारक
गेल्या महिन्याभरापासून हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्या निराकरणासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा विविध उपायोजनांवर भर देत आहे. आजपर्यंत झालेली कामे समाधानकारक असल्याने ती नागरिकांना दिलासा देणारी आहे. त्यामुळे उर्वरित कामे याच गतीने पुढेही सुरू ठेवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले. चाकण भागात पण प्रशासकीय यंत्रणा अशाच पद्धतीने उपायोजनांवर भर देणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

चाकणसह एमआयडीसी भागात पाहणी
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी चाकणसह एमआयडीसी भागातील नागरी समस्या व वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने पाहणी केली. यादरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक त्या उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली. यात त्यांनी भारत माता चौक मोशी, समृद्धी पेट्रोल पंप सॅनी कंपनी नाणेकरवाडी, बंगला वस्ती मेदनकरवाडी – सासे फाटा, चाकण चौक, आंबेठाण चौक, चाकण चौक ते कडचीवाडी, हिंगणे चौक खराबवाडी, म्हाळुंगे पोलीस चौकी एमआयडीसी रस्ता आदी भागात पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

दुसऱ्या कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत रियाझ अकबर अली,रहीम खान,अभिजीत त्रिपणकर,मोहम्मद गुफरान यांची आगेकूच

पुणे, 8 ऑगस्ट 2025: सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या कै. विनायक निम्हण स्मृती करंडक ५९व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत रियाझ अकबर अली, रहीम खान, अभिजीत त्रिपणकर, मोहम्मद गुफरान यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.

गोविंदा गार्डन मंगल कार्यालय, सोमेश्वर कॉर्नर, बाणेर, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत जागतिक विजेत्या रत्नागिरीच्या रियाझ अकबर अलीने मुंबईच्या निखिल घोलपचे आव्हान 22-06, 25-00 असे सहज मोडीत काढले. पुण्याच्या रहीम खानने मुंबई उपनगरच्या राहुल कुटेचा 25-00, 25-00 असा तर, आठव्या मानांकित पुण्याच्या अभिजीत त्रिपणकर याने मुंबईच्या निखिल कांबळेचा 25-00, 25-00 असा एकतर्फी पराभव केला. मुंबईच्या मोहम्मद गुफरानने मुंबई उपनगरच्या अभिषेक भारंबेचा 25-14, 25-05 असा पराभव करून आगेकूच केली.

उद्घाटनप्रसंगी बोलताना सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष असून सातत्याने दरवर्षी आम्ही ही कॅरम स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करत आहोत. सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित अशा स्पर्धांच्या माध्यमातून कॅरम या खेळाला एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहील.

क्रीडा अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य मिलिंद डांगे यावेळी म्हणाले की, क्रीडा भारतीच्या माध्यमातून केवळ खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि समाजातील अशा प्रतिभावान व्यक्तींना पुढे आणण्याचे काम करण्यात येते. आपल्या देशात कुस्ती, कबड्डी, हॉकी, खो-खो, धनुर्विद्या या पारंपरिक खेळाच्या स्पर्धा वर्षानुवर्षे होत आहे. याबरोबरच कॅरम खेळाच्या देखील स्पर्धा मोठ्या स्वरूपात होत असून सनी निम्हण यांच्या पुढाकाराने सलग तीन वर्षे ही राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा यशस्वीपणे केली जात आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो.

स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य मिलिंद डांगे, सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व माजी नगरसेवक सनी निम्हण, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे चेअरमन भरत देसलडा, एमसीएचे सचिव अरुण केदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजय जाधव, अजित सावंत, झेनेटिक स्पोर्टसचे मालक नरेंद्र पाटणकर, मन्सूर खान, यतिन ठाकूर, अभिजीत मोहिते, आशुतोष ढोमिसे, उमेश वाघ आणि सुशील गुजर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया कुणाल यांनी केले.

पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी पूर्व नियोजन महत्वाचे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे: पूर्व नियोजन, कालमर्यादा, पारदर्शकता, गुणवत्ता आणि विविध विभागांच्या समन्वयाच्या माध्यमातून राज्यातील पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची गतीने उभारणी करून सर्व यंत्रणांनी एकत्रितरित्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे आयोजित पायाभूत सुविधा विकास प्रकल्प प्रशिक्षणाचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, ‘मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, मुख्य सचिव राजेशकुमार, प्रधान सचिव अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्याच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल एक ट्रिलियन डॉलरकडे सुरू आहे. ही वाटचाल अधिक गतीने होण्यासाठी राज्यात पायाभूत सुविधा विकास प्रकल्प महत्वाचे आहेत. पूर्व नियोजनाच्या माध्यमातून अशा असे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासोबत त्यांची गुणवत्ता व उपयोगिता वाढते. राज्याने रस्ते, रेल्वे, पूल, भुयारी मार्गासह विविध अभियांत्रिकी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. त्याचा समृद्ध अनुभव आपल्या गाठिशी आहे. प्रकल्पांच्या उभारणीत गतिशक्ती, जिओ डेटासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. शासनाच्या विविध विभागांकडे डेटा उपलब्ध आहे, त्याचा उपयोग करून घेण्यासाठी विभागांमध्ये समन्वय महत्वाचा आहे. त्याबरोबरच नियोजनासाठी क्षेत्रीय पाहणी आवश्यक आहे. असलेल्या माहितीचा योग्यवेळी उपयोग करून विकासप्रकल्पांना चांगली गती देता येते.

दर्जेदार प्रकल्पनिर्मितीचे उद्दीष्ट ठेवून काम करा
प्रकल्पांसाठी विकासक निवडताना त्याच्या क्षमतांचा विचार करणे गरजेचे आहे. प्रकल्पाचे करार करताना राज्याच्या हिताच्यादृष्टठीने सूक्ष्म अभ्यासाद्वारे त्यात आवश्यक सर्वच बाबींचा समावेश करायला हवा. प्रकल्प पूर्ण होत असताना काम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होत असल्याची खात्री करून त्याचे वेळोवेळी पर्यवेक्षण होणे आवश्यक आहे. भूसंपदनाअभावी प्रकल्पाची किंमत वाढू नये यासाठी भूसंपादन वेळेत पूर्ण होईल आणि त्याचा मोबदला वेळेवर अदा होईल याची दक्षता घ्यावी. भूसंपादन पूर्ण झाल्यावर प्रकल्पाची सुरूवात करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

विविध कारणांसाठी विकास प्रकल्पांच्या उभारणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे नमूद करून ते म्हणाले, राज्य शासनाने महत्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वॉर रूम कार्यान्वित केली असून सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. राज्यात वेळेत आणि दर्जेदार प्रकल्प निर्माण झाल्यास संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांचेही कौतुक केले जाते, ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. वित्त पुरवठ्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. या सर्व पर्यायांचा विचार करून अधिकाधिक पायाभूत सोयीसुविधांचे प्रकल्प हाती घेता येतील, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

पायाभूत सुविधा प्रकल्प हे महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा-अजित पवार
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पायाभूत प्रकल्प हे विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीत महत्त्वाचे पाऊल असून विकसित राज्याच्या विकासदृष्टीचे आणि धोरणाचे साक्षीदार आहेत. विकसित महाराष्ट्र ही एक चळवळ असून पायाभूत सुविधा विकास हा त्यातील केंद्रीय घटक आहे. त्यामुळे रस्ते, पूल, बंदरे, ऊर्जा प्रकल्प, नदी पुनरुज्जीवन प्रकल्प असे अनेक पायाभूत प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी सर्वांनी उच्च क्षमतेने काम करावे. राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामधील अडचणी दूर होऊन कामांना गती मिळावी या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, पायाभूत सुविधा प्रकल्प हे महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा आहेत. या प्रकल्पांमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यातील महत्वकांक्षी प्रकल्पांची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी वॉर रूमची स्थापना करण्यात आली असून दर दोन महिन्यांनी कामांचा आढावा घेण्यात येतो. महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशादर्शक काम केले आहे. राज्याची ही ओळख कायम ठेवतांना पायाभूत सुविधा प्रकल्प अंमलबजावणीची क्षमता वाढविण्यासाठी कार्यशाळा निश्चितच उपयुक्त आहे. या माध्यमातून नवनवीन कौशल्य, दृष्टीकोन विकसित होईल आणि ते क्षमता वृद्धीसाठी महत्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला.

परदेशी यांनी राज्यातील पायाभूत सुविधा विकास प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या निधीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. उपलब्ध निधी वेळेत खर्च होईल व प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण होतील याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले, पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण न होण्याच्या कारणांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी पायाभूत प्रकल्पाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. प्रकल्पांच्या कामाचे नियोजन करताना सर्व अडथळ्यांची पूर्वकल्पना असणेही आवश्यक आहे. विकसित ‘महाराष्ट्र २०४७ व्हिजन’ पायाभूत सुविधा क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम केल्यानंतरच पूर्ण होईल. त्यासाठी अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करावीत असे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेनंतर राज्यातील प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात भिडे म्हणाल्या, पायाभूत प्रकल्पाची गतिशील अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचे महाराष्ट्राचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा आहे. राज्यातील विकास प्रकल्प वेगाने पूर्ण होण्यासाठी विचारांचे आदान-प्रदान होणे आवश्यक असून त्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी दोन दिवसीय कार्यशाळेतील कार्यक्रमाविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाला राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन,पुण्यासाठी आणखी ५ नवीन पोलीस स्टेशनला मान्यता देणार

पुणे : पोलीसांसमोराची आव्हाने, कायदा व सुव्यवस्थेचे नवे प्रश्न लक्षात घेवून ६० वर्षानंतर पोलीस दलाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनची नवी रचना, नार्कोटीक्स, फॉरोन्सिक युनिट तयार करण्यात आले आहे. यापुढेही पोलस दल आधुनिक करण्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच पुणे शहरासाठी लोहगाव, लक्ष्मीनगर, नऱ्हे, मांजरी, येवलेवाडी अशा पाच पोलीस स्टेशनची मागणी केली असून त्यास मंजुरी देण्यात येईल. त्यासाठी लागणाऱ्या एक हजार मनुष्यबळाला मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे आयोजित पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने शहरात उभारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि नवीन उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अपर मुख्य सचिव (गृह) इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रजंन कुमार शर्मा आदी उपस्थित होते.

पुण्याला दोन पोलीस उपायुक्त देण्याबाबत येत्या काळात मान्यता देण्यात येईल असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, शहरांचा विस्तार होत असताना पोलीस दलातही सुधारणा होणे गरजेचे आहे. एक नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन आणि चार पोलीस स्टेशनचे भूमिपूजन करण्यात आले आहे. राज्य शासनाने शहरासाठी ७ पोलीस स्टेशन मंजूर करण्याची ही राज्यात पहिलीच वेळ आहे. पुणे शहराचा विस्तार आणि औद्योगिक-शैक्षणिक महत्व लक्षात घेता शहराची सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे.

पुणे शहरातील सीसीटीव्ही प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन १० वर्षापूर्वी करण्यात आले होते. या प्रणालीला आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज नियंत्रण कक्ष जोडला जाणे आवश्यक होते. या कक्षासह आज देशातील सर्वाधिक आधुनिक सीसीटीव्ही प्रणाली शहरासाठी सुरू करण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीवर प्रभावी नियंत्रणासोबत गुन्हे आणि परिस्थितीचे विश्लेषण करण्याचे काम कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सहाय्याने करण्यात येईल. गुन्हेगारांचा तातडीने शोध घेण्यासाठी या यंत्रणेची मदत होणार आहे. गुन्हेगार आता पोलिसांच्या नजरेपासून वाचू शकणार नाही.

पुण्याच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक सुविधा

निर्मनुष्य जागेवर लक्ष ठेवण्याचे काम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बोपदेव घाटापासून सुरू होणार आहे. पुढील दोन वर्षात शहर परिसरातील अशा २२ टेकड्यांवर लक्ष ठेवण्यात येईल. या यंत्रणेत कॅमेरे बंद झाल्यानंतर नियंत्रण कक्षाला त्वरित सूचना मिळणार आहे. २४ तासात या कॅमेऱ्यांची दुरूस्ती करण्यात येईल. पुण्याच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक आणि सक्षम यंत्रणा यानिमित्ताने उभी करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी सूचना देणारी यंत्रणा पब्लिक ॲड्रेस सिस्टीमच्या माध्यमातून उभी करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाशी जोडलेल्या आणि ड्रोनची सुविधा असलेली ५ आधुनिक नियंत्रण वाहने पोलीस दलासाठी उपलब्ध झाली आहेत. ही वाहने गरजेच्यावेळी मिनी आयुक्तालयाप्रमाणे काम करू शकतील.

पुण्यातील वाहतूक व्यवस्था आधुनिक तंत्रज्ञनाधारित प्रणालीद्वारे सुधारणार

पुणे हे भविष्यातील विकसीत आणि महत्वाचे शहर आहे. त्यामुळे ग्रोथ हबच्या माध्यमातून पुण्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचा वाहतूकीचा प्रश्न सोडविण्यासाठी उपग्रहाचा उपयोग करून अत्याधुनिक एकात्मिक वाहतूक नियंत्रण प्रणाली उभारण्यात येणार आहे. या प्रणालीशी ट्रॅफिक सिग्नल जोडण्यात येतील. याद्वारे शहरातील वाहतूकीची गती वाढविण्यास आणि पर्यायी रस्त्यावर वाहतूक वळविण्यास होण्यास मदत होईल. कृत्रिम बुद्धीामत्तेच्या सहाय्याने वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रात वाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सविधांचा विचार करून पुढील १० वर्षासाठी आराखडा तयार करण्यात येत असून त्याचे सादरीकरण आज करण्यात येणार आहे. जनतेसाठीदेखील हे उपलब्ध करून देण्यात येईल. जनतेच्या सूचनांच्या आधारे अंतिम वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येईल, असे श्री.फडणवीस म्हणाले.

शासनाने अंमली पदार्थाविरुद्ध कठोर कार्यवाही सुरू केली आहे. पुणे पोलिसांनीदेखील या संदर्भात चांगली कामगिरी केली आहे. हे काम निरंतर चालणारे असून यापुढेही अंमली पदार्थाविरोधात मोठी मोहिम सुरू करावी लागणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. विधी संघर्षित बालकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविणाऱ्या प्रकल्पाबाबत पुणे पोलिसांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी शासन प्रयत्नशील-अजित पवार

श्री. पवार म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार होत असल्याने पोलीस दलावर कायदा सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी आहे. समाजात वावरताना जनतेला सुरक्षित वाटावे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीस दलाला आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शासनाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राज्यात ५ टक्के अर्थात १ हजार १०० कोटी रुपये पोलीस दलासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागासाठी पोलीस दलाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात ४० कोटींचा निधी देण्यात आला.

आज उद्घाटन करण्यात आलेल्या चंदननगर पोलीस स्टेशनची इमारत सर्व सुविधांनी सुसज्ज अशी उत्तम प्रकारे बांधण्यात आली आहे. पोलीसांना चांगली सुविधा मिळत असताना पोलीस स्टेशनला तक्रार घेवून आलेल्या नागरिकांना न्याय मिळावा यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न करावे. नागरिकांनीदेखील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बंडगार्डन पोलीस स्टेशनचे लवकर स्थलांतर करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

येणाऱ्या कालावधीत अनेक सण साजरे होत असून ते आनंदात साजरे व्हावेत यासाठी पोलीस दल नागरिकांशी संवाद साधून चांगले नियोजन करीत आहेत. नागरिकांनीही नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित करावे. शासन, पोलीस प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय असल्यास सण-उत्सव उत्साह आणि आनंदात साजरे होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाल गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी कायद्यात अपेक्षित सुधारणांबाबत पोलीस दलाने आवश्यक सूचना कराव्यात असे सांगून राज्य शासन पोलिसांना सुविधा देण्यात कोणतीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही श्री.पवार यांनी दिली.

अमितेश कुमार यांनी प्रास्ताविकात पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले, पुणे शहर पोलीस दल सक्षमीकणासाठी शासनाने मागील तीन वर्षात एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये शासनाने शहरात ७ नवीन पोलीस स्टेशन आणि ८१६ मनुष्यबळाला मंजूरी दिली. सीसीटीव्ही प्रकल्पासाठी २ हजार ८०० कॅमेरे आणि इंटिग्रटेड कमांड ॲण्ड कंन्ट्रोल सेंटरसाठी साडेचारशे कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात असून प्रकल्पाच्या कामांना सुरूवात झाली आहे. शहरात २२ घाट आणि टेकड्यांवर सुरक्षा कवच मजबूत करण्यासाठी सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्पासाठी ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १५० वाहनांना मंजूरी देण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीसाठी २०० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे. या कामांमुळे पोलीस दलाची क्षमता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवीन प्रकल्प आणि सुविधामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था बळकट होईल असे नमूद करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पोलीस दल कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दृष्टी’ इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर व चंदननगर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन, तसेच लोणीकाळभोर, नांदेड सिटी, खराडी, कोंढवा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे प्रकल्पाचे दूरदृष्यप्रणालीद्वारे भूमिपूजन करण्यात आले. त्यांनी ‘दृष्टी’ इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची पाहणी करून माहिती घेतली.

श्री. फडणवीस यांच्या हस्ते दृष्टी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन, मोबाईल सर्वेलन्स व्हॅनचे लोकार्पण आणि ड्रोन फ्लॅग ऑफ करण्यात आले. चंदन नगर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन, लोणी काळभोर , नांदेड सिटी, खराडी, कोंढवा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतींचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच श्री. फडणवीस यांनी आयटीएमएस यंत्रणेची उद्घोषणा केली. पोलीसांनी २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे विश्लेषण करून धाराशीव येथून सुखरूप परत आणलेल्या कात्रज येथील कोमल काळे या दोन वर्षाच्या मुलीचा सत्कार मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासात योगदान देणाऱ्या पोलीसांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. उपस्थित महिलांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना राखी बांधली.

कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, भीमराव तापकीर, राहुल कूल, बापुसाहेब पठारे, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, शंकर जगताप, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – युनिक्लोचे पहिले स्टोअर लवकरच उपलब्ध होणार

पुणे भारत  जपानमधील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कपड्यांचा ब्रँण्ड युनिक्लो आता पुण्यात दाखल होत आहे. येत्या २६ सप्टेंबर रोजी द पॅव्हिलियन मॉलमध्ये पहिले स्टोअर सुरु होणार असल्याची घोषणा पॅव्हिलियनकडून नुकतीच करण्यात आली. पुणे हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून उद्यास येत असल्याने या शहरांत युनिक्लो आपले स्टोअर सुरु करण्यात असल्याचे कंपनीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. लाईफवेअर संकल्पनेवर आधारित कपड्यांची खरेदी करण्याचा नवा अनुभव पुणेकरांना घेता येईल. पुण्यातील नवे स्टोअर हे युनिक्लोच्या पश्चिम भारतातील विस्ताराचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. हे युनिक्लोचे भारतातील १८वे स्टोअर असेल. या नव्या स्टोअरच्या माध्यमातून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत लाइफवेअर पोहोचवण्याचा ब्रँण्डचा उद्देश आहे.

पुण्यात लवकरच दाखल होणा-या नव्या स्टोअरबाबत युनिक्लो इंडियाचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. केंजी इनोए यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले. “ पुणे हे वेगाने वाढणारे शहर आहे. या शहरात चैतन्यमय जीवनशैली आढळते. पुण्यात आमच्या लाईफवेअर संकल्पनेवर आधारित कपड्यांची गुणवत्ता ग्राहकापर्यंत पोहोचवता येणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. मुंबईतीस स्टोअरच्या यशानंतर पुण्यातील द पॅव्हेलियन येथे सुरु झालेले स्टोअर हे पहिले पश्चिम भारतातील विस्ताराचा प्रमुख टप्पा आहे. आम्ही संपूर्ण भारतात विस्तार करणार आहोत. भारतातील सर्व ग्राहकांना लाईफवेअर कपड्यांची उपलब्धता करुन देणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

पुण्यात वाढती विद्यार्थी संख्या, व्यावसायिकांची वर्दळ पाहता येथील कपड्यांची फॅशन आता बदलू लागली आहे. युनिक्लो हे फॅशन ब्रॅण्ड दैनंदिन जीवनातील कपड्यांमध्ये उच्च दर्ज्याची फॅशन उपलब्ध करुन देते. पुणेकरांची फॅशनची बदलती मागणी लक्षात घेत युनिक्लो या शहरवासीयांना निश्चितच दैनंदिन जीवनातील कपड्यांमध्ये चांगली गुणवत्ता उपलब्ध करुन देईल.

द पॅव्हिलियन मॉलच्या तळमजल्यावरील ९२१३ चौरस फूट या विस्तीर्ण जागेवर युनिक्लोचे स्टोअर पुणेकरांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. रोजच्या जीवनातील चांगल्या डिझाइन्सचे कपडे युनिक्लोमध्ये उपलब्ध असतील. महिला व पुरुषांसह लहान मुले आणि नवजात शिशूंचे कपड्यांची नवी रेंजही खरेदी करता येईल. युनिक्लोची सिग्निचर कॅटेगरी असलेली फ्लॅनल शर्ट्स, डॅनिम्स, निट्स, ब्रा टॉप्स, कोअर टीशर्ट्स, इजी पॅन्ट्स, पॉलोज तसेच खास युनिक्लोची नावीन्यपूर्ण शैली असलेली हिटेक्स, फ्लीस, पफटेक या फॅब्रिकमध्ये या कपड्यांची रेंज उपलब्ध असतील.

पुनीत बालन स्टुडिओज निर्मित ‘जग्गू आणि ज्युलिएट’ला उत्कृष्ट चित्रपटाचा द्वितीय पुरस्कार

  • महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव २०२५ च्या पुरस्कार सोहळ्यात विविध पुरस्काराचे वितरण

पुणे ;- ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव २०२५ च्या पुरस्कार सोहळ्यात ‘पुनीत बालन स्टुडिओज’ची निर्मिती असलेल्या ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या चित्रपटाला द्वितीय क्रमाकांचा उत्कृष्ट चित्रपट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याशिवाय चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक यासह अन्य सहाय्यकांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी ‘पुनीत बालन स्टुडिओ’च्या माध्यमातून मुळशी पॅटर्न, रानटी, जग्गू आणि ज्युलिएट अशा काही दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती केली. तीन वर्षांपूर्वी त्यांचा ‘जग्गू आणि ज्युलियट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. उत्तराखंडच्या निर्सगरम्य परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्यामधील अमेय वाघ (जग्गू) आणि वैदही परशुरामी (ज्युलिएट) यांची फुललेली प्रेमकथा, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव २०२४ व २०२५ च्या उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात २०२५ च्या उत्कृष्ट पुरस्कारामध्ये ‘पुनीत बालन स्टूडिओज’च्या ‘जग्गू आणि ज्युलिएट’ चित्रपटाला द्वितीय क्रमांक मिळाला. या चित्रपटातील प्रमुख कलाकार अमेय वाघ याला उत्कृष्ट अभिनेता तर याच चित्रपटाचे दिग्दर्शक महेश लिमये यांना उत्कृष्ट दिग्दर्शक द्वितीय क्रमांक मिळाला. तसेच याच चित्रपटातील इतरही सहकलाकारांना पुढील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट विनोदी अभिनेता- उपेंद्र लिमये, उत्कृष्ट वेशभुषा- मानसी अत्तरदे, उत्कृष्ट लेखक- अंबर हडप व गणेश पंडित आणि उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक- राहुल-संजीर याप्रमाणे ‘जग्गू आणि ज्युलिएट’ चित्रपटात कलाकारांला सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव २०२५ च्या पुरस्कार सोहळ्यात ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या चित्रपटाला द्वितीय क्रमाकांचा उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल मी सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करतो. याशिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेता व इतर सहायकांना विविध पुरस्कार मिळाले त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन. ‘पुनीत बालन स्टुडिओज’ निर्मित सर्वच चित्रपटांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला, याबाबत मी प्रेक्षकांचाही आभारी असून भविष्यात अशाच दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून प्रेक्षकांचे प्रेम मिळविण्याचा प्रयत्न करेल.’’
– पुनीत बालन, निर्माते, पुनीत बालन स्टुडिओज

काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांचे दोन दिवसीय शिबिर टिळक भवनात संपन्न.

  • प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसह विविध विषयातील तज्ञांचे शिबिरार्थींना मार्गदर्शन.

मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांच्या दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे करण्यात आले होते. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिबीराचे उद्घाटन केले तर प्रभारी रमेश चेन्नथला यांनी देखील व्हिडिओ काँफ्रन्सच्या माध्यमातून संवाद साधला.

माजी खासदार कुमार केतकर यांनी समकालीन राजकीय परिस्थिती या विषयावर बोलताना देशातील लोकशाही समोर आज हुकूमशाहीचे मोठे आव्हान आहे. काँग्रेस पक्षाने लोकशाहीच्या संवर्धनासाठी बलिदान दिले आहे. याच बलिदानाचा वारसा घेवून काँग्रेस कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी आता सक्षमपणे मैदानात उतरावे असे आवाहन केतकर यांनी केले. डॉ. विश्वास उटगी यांनी बँक खासगीकरण हा भांडवलदारांचे खिसे भरण्याचा कार्यक्रम असल्याचे सांगून मोदी सरकारच्या जनविरोधी आर्थिक धोरणांचा समाचार घेतला. ज्येष्ठ नेते आमदार अमित देशमुख यांनी देखील शिबिरार्थ्यांसोबत संवाद साधून पक्ष वाढवण्याचे आवाहन केले.

शाहीर संभाजी भगत यांनी सांस्कृतिक राजकारण या विषयाची मांडणी करताना आजवर पुरोगामी पक्ष, संघटनांनी सांस्कृतिक राजकारणाकडे दुर्लक्ष केले त्याचा गैरफायदा प्रतिगामी शक्तींनी घेतला त्यामुळे आगामी काळात सांस्कृतिक राजकारण हे जोरकसपणे करण्याविषयी मार्गदर्शन केले.
आशुतोष शिर्के यांनी नव्या मानसिकतेची सुरुवात ही विजय साकार करण्याची पूर्व अट असल्याचे सांगितले. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अपयशाची आणि टिकेची भीती न बाळगता वास्तवाचा स्वीकार करून पुढील वाटचाल केली पाहिजे हे सांगितले. तसेच निमिष साने आणि संदीप ढवळे पाटील यांनी काँग्रेस पक्षांर्गत नेतृत्व विकसित करण्यासाठी सुरू असलेल्या नेतृत्व संगम, शक्ती अभियान, जय जवान जय किसान अशा विविध उपक्रमांची माहिती दिली.
संवाद स्वरुपात हे सत्र पार पडले. सायंकाळी सर्वधर्मीय सामूहिक प्रार्थना झाली. शिबिराच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात श्रमदानाने झाली. शिबिरार्थींनी टिळक भवन परिसराची स्वच्छता करून कचरा गोळा केला. त्यानंतर राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी भाषा आणि राजकारण या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली. मराठी भाषा संवर्धन आणि राजकारण हे हातात हात घालूनच होवू शकते. या दिशेनेच महाराष्ट्र धर्म आपण जागवू शकतो आणि तसे झाले तरच महाराष्ट्राचा गायपट्टा होण्यापासून वाचवू शकतो यावर पवार यांनी जोर दिला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा त्यासाठी प्रेरणादायी आहे तो आपण वाचला पाहिजे असे प्रा. पवार म्हणाले.
श्यामसुंदर सोन्नर यांनी संतसाहित्य आणि संविधान या विषयाची मांडणी करताना संपूर्ण संत साहित्याचा आशय हाच भारतीय संविधानाचा गाभा आहे. समता, लोकशाही आणि सामाजिक न्याय हीच संताची भूमिका राज्य घटनेच्या अंमलबजावणीतून अपेक्षित आहे याविषयी विस्ताराने मांडणी केली.
प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राजकारणाचे विकेंद्रीकरण हा काँग्रेस पक्षाचा धोरणात्मक कार्यक्रम आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामसभांच्या बळकटीकरणातून सर्व समाजघटकांच्या विकासाची दिशा निश्चित होवू शकेल त्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच परिकल्पनेतील भारत या विषयी देखील सपकाळ यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस गुरबचनसिंग बच्चर, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यावेळी उपस्थित होते. तर सांगली जिल्यातील राष्ट्र सेवा दलाच्या पथकाने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.

‘चिप मिनिस्टर’ देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाचे दलाल की वकील? प्रश्न आयोगाला मग उत्तर भाजपा का देते? – हर्षवर्धन सपकाळ

  • मतचोरीविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक; दादरमध्ये रास्तारोको आंदोलन..
  • मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी न करता राहुल गांधींवर आगपाखड कशासाठी?

मुंबई – लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली, हे पुराव्यासह मांडून देशात एकच खळबळ उडवून दिली. राहुल गांधींच्या धमाक्यानंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. दादरमध्ये चक्काजाम करून निवडणूक आयोग व भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तासभर चक्काजाम करण्यात आला, या आंदोलनात प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, राजन भोसले, किशोर कन्हेरे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, अनंत गाडगीळ यांच्यासह आंदोलनात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला.

या आंदोलनाआधी टिळक भवनमधील पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग व भाजपाचा खरपूस समाचार घेतला, राहुल गांधी यांनी अत्यंत तर्कसंगत मांडणी करून मतदानातील मोठा घोटाळा उघड केला, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कसे सुरु आहे? हे दाखवून दिले. निवडणुकीतील हा घोटाळा स्पष्ट दिसत असल्याने सरकारने राजधर्म पाळत एखादी एसआयटी गठीत करायला हवी होती अथवा सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायमूर्तींकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे होती. पण राहुल गांधी यांनी पुरावे देत तथ्य मांडूनही ना केंद्र सरकारने चौकशी करण्याची धमक दाखवली ना निवडणूक आयोगाने काही खुलासा केला, उलट राहुल गांधी यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले, हा आणखी हास्यास्पद प्रकार आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या १९६० च्या नियमावलीनुसार, जर अशा प्रकारे कोणी हरकत घेतली वा आक्षेप नोंदवला तर नियम १७/१८/१९ नुसार ताबडतोब चौकशी करावी, असे कायदाच सांगत आहे, मग चौकशी का केली जात नाही? असे सपकाळ म्हणाले.

देवेंद्र फडणवीस ‘चिप मिनिस्टर’!
निवडणूक आयोगाची पोलखोल केल्यानंतर भाजपाची पिलावळ राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली त्यातून ते निवडणूक आयोगाचे दलाल आहेत, वकील आहेत की प्रवक्ते असा प्रश्न पडतो. फडणवीस यांच्यात अहंकार दडलेला आहे, या अहंकराचा दर्प नाही तर दुर्गंधी त्यांच्या बोलण्यातून दिसली. हे ‘चिफ मिनिस्टर’ नाही चर ‘चिप मिनिस्टर’ आहेत. जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगावर बोलले जाते तेव्हा तेंव्हा भाजपा व देवेंद्र फडणवीस यांची तडफड का होते? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व फडणवीस आयोगाचा बचाव करण्यास का येतात? कारण ‘दाल में कुछ काला है’ असे नाही तर सर्व दालच काळी आहे. राहुल गांधी यांनी जो घोटाळ दाखवला त्यातून निवडणूक आयोग बरोबरचे हितसंबंध उघडे पडतील याची भिती देवेंद्र फडणवीस यांना वाटत असावी म्हणूनच त्यांची फडफड होत असावी, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने मतदानावेळीच हरकत का घेतली नाही, या प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपाकडून असे प्रश्न उपस्थित करून भ्रम पसरवला जात आहे. मतदानावेळी व त्यांनतरही काँग्रेसने आक्षेप घेतलेले होते व हरकतीही उपस्थित केल्या आहेत. पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केलेल्या आहेत. निवडणूक आयोगाला भेटून घोटाळाचे पुरावेही त्याचवेळी दिले आहेत पण भाजपा केवळ बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहे.

मतचोरीविरोधात काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार..
मतचोरी विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यभर आंदोलन करणार आहे. रॅली काढून, पदयात्रा व यात्रा अशा विविध प्रकारे हे आंदोलन करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते हे वर्दी नसलेले पोलिसच-सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा 

  • दत्तात्रय कावरे यांना लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार प्रदानपुणे परिवार तर्फे गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार सोहळा.

पुणे : गणपती मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते वर्दीत नसतात पण वर्दी नसलेले पोलिसच आहेत. त्यांनी गणेशोत्सवात पोलिसांसोबत काम करून, कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. मंडळांनी पोलिसांच्या कोणत्याची कृतीचा आणि सूचनेचा राग मानून घेऊ नका. तुमच्या सुरक्षेसाठी पोलिस असतात. पोलिस सदैव गणपती मंडळाच्या सोबत आहेत. चांगल्या आणि सुरक्षित पद्धतीने गणेशोत्सव पार पाडू, अशी भावना सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी व्यक्त केली.

पुणे परिवारच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे माजी अध्यक्ष दत्तात्रय कावरे यांना तर दिपक दाते, हेमचंद्र दाते यांना लोकमान्य गणेश सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. माजी आमदार उल्हास पवार, आमदार हेमंत रासने, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, पुनीत बालन, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, महेश सूर्यवंशी, आयोजक विनायक घाटे, ॲड. प्रताप परदेशी, शिरीष मोहिते, प्रकाश ढमढेरे यावेळी उपस्थित होते.

रंजनकुमार शर्मा म्हणाले, गणेशोत्सवाच्या संदर्भात बैठका सुरू आहेत त्यामध्ये सगळ्यांचे समाधान होईल असा सर्व मंडळाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतला जाईल. एक गणपती एक पथक, इतर गणपती मंडळांना चांगला वेळ असे अनेक मुद्यांसदर्भात विचार सुरू आहेत. गणेश मंडळाच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्याचा सन्मान केला जातो हे स्तुत्य आहे. मागील वर्षापेक्षा चांगले काम यापुढेही कार्यकर्त्यांनी करावे. ढोल ताशा पथक विदेशात जाऊन वादन करतात या पथकांचा अभिमान आहे, असेही त्यांनी सांगितले. 

उल्हास पवार म्हणाले, जो पर्यंत चंद्र सूर्य असेल तो पर्यंत हा गणेशोत्सव चालू राहील. अनेक देशांमध्ये गणपती ही आद्य देवता आहे. या गणपतीचा उत्सव कसा असला पाहिजे, याचे आत्मचिंतन करायला पाहिजे. लोकांचे प्रबोधन व्हावे ही भूमिका गणेशोत्सवामागे होती तो विचार कार्यकर्त्यांनी आणि गणेश मंडळांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेमंत रासने म्हणाले, गणेशोत्सवाला राज्यउत्सव म्हणून दर्जा मिळाला आहे. राज्यउत्सवाच्या माध्यमातून पुण्याचा उत्सव निर्बंध आणि भयमुक्त करायचा आहे, ही सगळ्यात पहिली मागणी आहे. उत्सवातील त्रुटी सगळ्यांनी मिळून दूर केल्या पाहिजेत. उत्सवात येऊन कोणाला अडचण वाटता कामा नये. महिला सुरक्षा, आरोग्य या सुविधा चांगल्या पद्धतीने आपण देऊ. खाकी वर्दीतले पोलिस ही गणेशोत्सवाचे कार्यकर्तेच आहेत. उत्सवात मिठाचा खडा टाकण्याचे काम कोणी करत असेल तर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.

पराग ठाकूर म्हणाले, संकटसमयी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याची आठवण आधी येते. परंतु मंगल समयी तो सगळ्यात शेवटी असतो. ॲड. प्रताप परदेशी म्हणाले, गणेशोत्सव मंडळातील खरा कार्यकर्ता पुणेकरांसमोर आणण्याचे काम या पुरस्काराच्या माध्यमातून होते.

होनाजी तरुण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष राहुल आलमखाने, तरुण शिव गणेश मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश जगताप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळाचे कार्यकर्ते ओंकार कलढोणकर, विधायक मित्र मंडळाचे अध्यक्ष अभिषेक मारणे, सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पाटील यांना आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समर्थ प्रतिष्ठान वाद्य पथकाचे संजय सातपुते यांना गणराया गुणगौरव पुरस्कार तर सामाजिक कार्यकर्ता सिराज पूनावाला यांना सद्भावना सलोखा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

महेश सूर्यवंशी, पुनीत बालन यांनी मनोगत व्यक्त केले. विनायक घाटे यांनी प्रास्ताविक केले. ॲड. प्रताप परदेशी यांनी पुरस्काराची माहिती दिली. प्रकाश ढमढेरे यांनी आभार मानले.

भिम पेमेंट अ‍ॅपद्वारे युजर्सना त्यांच्या डिजिटल पेमेंट्स प्रवासात मदत करणारे सहा मार्ग 

डिजिटल पेमेंट्स आता केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते भारतभरात मोठ्या शहरापासून लहान गावांपर्यंत प्रत्येकाच्या रोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग झाले आहे. जास्तीत जास्त नागरिक दैनंदिन गरजांसाठी पेमेंट अ‍ॅपकडे वळत असून डिजिटल मनी मॅनेजमेंट वेगाने विकसित होत आहे. ही व्यवस्था आता केवळ पैसे पाठवण्यापुरती किंवा मिळवण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यात खर्चावर देखरेख करण्यापासून, बिलांची अद्ययावत माहिती मिळवण्यापर्यंतच्या सोयी आणि आर्थिक निर्णय योग्य माहितीसह सहजपणे, आत्मविश्वासाने घेता यावेत यासाठी टुल्सचा समावेश आहे.

आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी युजर्सना भिम पेमेंट अ‍ॅप वापरून पुढील सहा मार्गांनी अर्थपूर्ण स्टेप्स घेता येतील –

1. तुमच्यासाठी सोयीच्या असलेल्या भाषेत पेमेंट्स करा

भिम पेमेंट्स अ‍ॅपद्वारे हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ आणि ओडिया यांसह १५ भाषांमध्ये सेवा दिली जाते. यामुळे युजर्सना हे अ‍ॅप वापरणं सोपं जातं व त्यांना आपल्या आवडीच्या भाषेत व्यवहार पूर्ण करता येतो. यामुळे विशेषतः दुकानदार, ज्येष्ठ नागरिक किंवा दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांतले फर्स्ट टाइम युजर्स यांची मोठी सोय होते. आपल्याला माहीत असलेल्या भाषेत संवाद साधणं सोपं वाटतं आणि विश्वास वाढतो. पर्यायाने डिजिटल व्यवहार भीतीदायक वाटत नाहीत.

2. इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी असतानाही व्यवहार करण्याची सोय

हे अ‍ॅप कमी किंवा अस्थिर इंटरनेट सुविधा असतानाही चालत असल्यामुळे ग्रामीण भागातील युजर्ससाठी किंवा सतत नेटवर्क इश्यू असलेल्या ठिकाणी ते फायदेशीर ठरतं. स्थानिक बाजारात असताना किंवा रोजच्या कामाच्या वेळी महत्त्वाची पेमेंट्स पूर्ण होत असल्याचा विश्वास नक्कीच लाभदायक ठरतो.

3. कोणतेही अतिरिक्त प्रयत्न न करता खर्चाचा आढावा

भिम पेमेंट्स अ‍ॅपमध्ये स्पेंड्स अनालिटिक्ससारखी वैशिष्ट्ये समाविष्ट असल्यामुळे युजर्सना त्यांचे पैसे नेमके कुठे खर्च होतात याचा मासिक आढावा घेता येतो. स्पिल्ट एक्सपेन्सेसारख्या पर्यायामुळे लोकांना त्यांचे कुटुंबीय किंवा मित्रपरिवारासोबत सहजपणे खर्च वाटून घेता येतो. रूममेट्स, एकत्र प्रवास करताना किंवा एकत्रितपणे किराणा खरेदी करताना सहजपणे ट्रॅकिंग करता येते.

4. संपूर्ण खर्चाचा समन्वय एकाच ठिकाणी

फॅमिली मोडच्या मदतीने युजर्सना त्यांच्या कुटुंबातील सदस्य ऑनबोर्ड करता येतील, विशिष्ट पेमेंट्स असाइन करता येतील व एकत्रित खर्च पाहाता येतील. बिलं मॅनेज करणारं एखादं जोडपं असो किंवा एकत्रित खर्च करणारे भाऊ- बहीण असो, या सुविधेमुळे प्रत्येकाला माहिती मिळते व खर्च सुरळीतपणे जाणून घेता येतो.

5. विश्वासार्ह व्यक्तींना पेमेंट्समध्ये मदत करण्याची मुभा द्यानियंत्रण आपल्या हातात ठेवून

युपीआय सर्कल सुविधेमुळे युजर्सना त्यांच्या ऐवजी पेमेंट इनिशिएट करणाऱ्या व्यक्तींचं नेटवर्क तयार करता येतं. यामध्ये प्रत्येक व्यवहारासाठी प्रायमरी युजरची परवानगी आवश्यक असते. केयरगिव्हर्स किंवा मुलं अथवा घरातल्या मदतनीसांना खरेदी करू देणाऱ्या बिझी आई- वडिलांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरते. त्यांना किराणा किंवा युटिलिटी बिल्ससारखी दैनंदिन पेमेंट्स सहजपणे करता येतात. विशेष म्हणजे, हे करताना त्यांना प्रत्येक व्यवहाराची माहिती आणि पूर्ण नियंत्रण ठेवता येतं.

6. महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी रिमाइंडर्स

अ‍ॅक्शन नीडेड या सेक्शनमध्ये राहिलेली पेमेंट्स, कमी बॅलन्स किंवा युपीआय लाइट अ‍ॅक्टिव्हेशन यांसाठी रिमाइंडर्स दिला जातो. अशा रिमांइंडर्समुळे महत्त्वाची पेमेंट्स राहून जाण्याची शक्यता कमी होते व युजर्सना रोज स्वतःहून ट्रॅक करण्याची गरज राहात नाही. त्यांना आपोआप अपडेट्स मिळतात. त्याशिवाय युजर्सना वीज, पाणी आणि इतर युटिलिटी बिल्स थेट अ‍ॅपद्वारे भरता येतात. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त किंवा छुपे शुल्क आकारले जात नाही. यामुळे मासिक खर्चाचे व्यवस्थापन सोपे होते.

वेगाने विकसित होत असलेल्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये सोपे, विश्वासार्ह टुल हाताशी असणं हा पैसे स्वतंत्रपणे हाताळण्यासाठीचा महत्त्वाचा घटक आहे. अशाप्रकारच्या सुविधा देशभरातील युजर्सना आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यासाठी मदत करतील.

चाकणला स्वतंत्र महानगरपालिका होणार,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुतोवाच

पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले. ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केली आहे? मी सकाळी 6 वाजता दौरा करतोय, एक गाडी थांबली की गाड्यांच्या रांगा लागतायेत. मग पिक टाईममध्ये काय अवस्था होत असेल, असं अजित पवार म्हणाले. तसेच अजित पावर पाहणी करत असताना चाकणच्या चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरली. त्यामुळं अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले. ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केली आहे?, सगळी वाहतूक सुरु करा, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुककोंडीचा आढावा घेताना अजित पवारांनी आधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटोही दाखवले.

पुणे: उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (8 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक आणि परिसराची पाहणी केली. पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी नित्याची असती. याचं चौकातून चाकण एमआयडीसीमध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं. या एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहनं ये-जा करतात. त्यामुळं या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे. यावेळी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका होणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. चाकणच्या वाहतूक कोंडीची पाहणी करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे सोबतच बारामतीची तुलना चाकण सोबत करू नका असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे, अशी घोषणा अजित पवारांनी यावेळी केली. आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला. सकाळी 5:45 वाजता मी आलो. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे, त्यासाठी निधी ही देतोय. त्यानंतर पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग करुयात. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही खूप त्रास सहन केलाय, तुम्ही सहनशीलता दाखवली. पण आता यातून सुटका करुयात. चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे. काहींना आवडेल न आवडेल, पण हे करावं लागेल, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात नव्यानं तीन महापालिका कराव्या लागणार असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे, मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका आणि चाकण आणि हिंजवडी भागात ही महापालिका करावी लागणार आहे, असंही अजित पवारांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

डॉक्टर नव्हे,देव !

जगात दया, धर्म, मानवता यांची नेहमीच वानवा रहात आली आहे. त्यात आता तर
दिवसेंदिवस नितिमत्तेचे अवमूल्यन होत आहे. सख्खे भाऊ एकमेकांचे जीव घेत आहेत.वृध्द आईवडिलांना
मुलं वृध्दाश्रमाची वाट दाखवित आहेत. एकीकडे मानवी मूल्यांचे इतके पतन होत असताना पुण्याचे डॉ. अभिजित आणि डॉ. मनिषा हे दाम्पत्य भिकारी, निराधार, अनाथांसाठी आशेचे किरण बनले आहेत. त्यांच्या ह्या कार्यामुळे भिकाऱ्यांचे डॉक्टर अशी त्यांची ओळख होत निर्माण झाली आहे.

प्रेरणा :

मुळचे सातारा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले डॉ. अभिजित यांनी बीएएमएस केले . त्यानंतर त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली . ते चांगले स्थिरावले होते. अशात त्यांना एका परोपकारी भिकारी बाबाजीची आठवण आली. डॉ. अभिजित यांना ही नोकरी मिळण्याआधीच्या काळात वैफल्य आले होते. त्यांचा डॉक्टरी व्यवसाय चालेनासा झाला होता. अत्यंत उव्दिग्न मनस्थितीत ते एकदा खडकवासला येथील
मंदिरात जाऊन बसले असता तेथे एका भिकारी बाबाजीने त्यांना खूप धीर दिला.”हिम्मत हारू नको बाळ ” म्हणून त्यांना दिलासा दिला. इतकेच नाही तर केवळ शाब्दिक दिलासा देऊन न थांबता त्यांनी स्वतःच्या कटोऱ्यात जमा झालेले भिकेचे सर्व पैसे देऊन प्रत्यक्ष मदत केली.

पुढे स्थिरस्थावर झाल्यावर या प्रेरणादायी बाबाजींना भेटण्यासाठी डॉ अभिजीत तेथे गेले असता त्या बाबाजीचे निधन झाल्याचे त्यांना कळाले. हे ऐकताच डॉ. अभिजित यांना अतिव दु:ख झाले. ज्या बाबाजींनी आपल्या पडत्या काळात आपल्याला दिलासा दिला, त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकलो नाही,त्यांना शेवटपर्यंत भीक मागून जगावे लागले ही बाब त्यांच्या मनाला चटका लावून गेली. आता या चुकीचे आपण परिमार्जन करावे असा निश्चय करून आपले उर्वरित आयुष्य अशा भिकारी, दु:खी, कष्टी लोकांना मदत करण्यासाठी, त्यांना माणूस म्हणून उभे करण्यासाठी वेचावे असा त्यांनी मनाचा ठाम निर्धार केला. चांगल्या नोकरीवर पाणी सोडून ह्या जगा अघाटीत सेवायज्ञात उडी घेतली. लोक काय म्हणतील ? याची पर्वा केली नाही.सुदैवाने पत्नी डॉ. मनीषा हिनेही त्यांच्या विचारांना साथ देऊन सक्रीय सहभाग दिला.
डॉ. मनीषा यांनी वैद्यकीयव्यवसायातून प्रपंच चालविला आणि उर्वरित पैसे त्या पतीच्या कार्यात मदत करण्यासाठी देत राहिल्या.डॉ. अभिजित दिसेल त्या भिकाऱ्यांची मदत करू लागले. त्यांच्या दु:खावर फुंकर घालू लागले. मात्र सुरूवातीला भिकारी त्यांच्यावर विश्वास ठेवत नसत. हा डॉक्टर आपल्या किडन्या तर काढायला आला नसेल ना? अशा शंकेने,भीतीने ते फुकट उपचार करून मिळत असतानाही उपचार करून घ्यायला घाबरत असत. पुढे मात्र हळुहळु डॉ. अभिजितयांची सचोटी व सेवा पाहून ते डॉक्टरांच्या जवळ येऊ लागले.

डॉ. अभिजित कोणत्या देवाचा कोणता वार आहे हे लक्षात घेऊन त्या-त्या दिवशी मंदिर, मशिद, चर्चच्या ठिकाणी जाऊन तेथे येणाऱ्या भिकाऱ्यांची विचारपूस करू लागले. त्यांचा औषधोपचार करणे, त्यांच्या जखमा पुसून मलमपट्टी करणे, जेथे गरज असेल अशा आजारी भिकाऱ्यांना दवाखान्यात भरती करू करणे, आवश्यक तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था करणे आदी बाबी ते स्वतःच्या पैशातून करू लागले. या लोकांना आंघोळ घालणे, त्यांच्या अंगावर कपडे घालणे इ. कामे करू लागले. आता ते भिकाऱ्यांच्या जीवनाचे अभिन्न अंग बनले आहेत.

एका सर्वेक्षणानुसार पुण्यात सुमारे ३५०० भिकारी आहेत. त्यापैकी ११०० जणांशी ते जोडल्या गेले आहेत . घरून सकाळीच औषधाच्या बॅगा ,कटिंग, दाढीचे सामान घेऊन ते आपल्या बाईकवर निघतात.भिकारांच्या वस्तीत जातात. त्यांना तपासून औषधोपचार
करतात.डोक्याचे केस, दाढी-कटिंग वाढल्याने विद्रुप दिसणाऱ्या भिकाऱ्यांना ते चांगले करतात. बऱ्याचशा भिकाऱ्यांना अंधत्व आल्याचे आढळल्यावर तपासणी करून अनेकांच्या त्यांनी नेत्र शस्त्रक्रिया करवून घेतल्या आहेत.

स्वावलंबी करण्याची गरज:

भिकाऱ्यांचा समाज आणि सर्व सामान्य माणसांचा समाज ह्यात मोठी दरी आहे. भिकाऱ्यांना नेहमी हेटाळणी, तिरस्कार सहन करावा लागतो. याचे एकमेव कारण म्हणजे तो आपले स्वत्व हरवलेला परावलंबी माणूस आहे. तर दुसरीकडील समाज स्वावलंबी आहे. वास्तविक पाहता ही पण माणसं आहेत आणि ती पण माणसंच आहेत. म्हणूनच भिकारी समाजाला स्वावलंबी करणे गरजेचे आहे. ते स्वावलंबी व्हावेत, त्यांचे आजार, अपंगत्व घालवून रोजगार उपलब्ध करून दिल्यावर त्यांना माणूसपण पुन्हा प्राप्त
होऊन त्यांचे भीक मागणे थांबावे यासाठी डॉ. अभिजित यांची सदैव धडपड सुरू असते. या कामासाठी पैसा कमी पडतो म्हणून त्यांनी सोहम ट्रस्टची स्थापना केली. त्याव्दारे लोकांना आवाहन करून मदत गोळा करण्याचे कामही ते करीत आहे. अशिक्षित, निर्धन अशा या समाजाला दोन पैसे मिळविता यावे यासाठी ते वेगवेगळे उपाय करीत आहेत. मंदिरातून निर्माल्य गोळा करणे, निर्माल्यापासून पावडर तयार करून त्यापासून औषधोपयोगी द्रव्य तयार करून विकणे, वाया गेलेले कापड मिळवून पिशव्या तयार करणे,द्रव साबण, शोभेच्या वस्तू, गुच्छ इत्यादी तयार करणे, यासह ज्यांच्यात कौशल्य असेल त्यांना कौशल्यानुरूप कामे मिळवून देणे अशाप्रकारे त्यांना उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

डॉ अभिजीत ह्यांना त्यांच्या कामाकरिता स्वतंत्र जागेची फार गरज होती. ही गरज द बिबवेवाडी येथे २५०० चौरस फूट जागा देऊन दानिश शहा या दानशूर व्यक्तीने पूर्ण केली. सोबत आवश्यक साहित्यही घेऊन दिले.

प्रशिक्षण केंद्र:

दानिश शहा यांनी दिलेल्या
जागेत “मध्यरात्रीचा सूर्य “
हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

ह्या केंद्रात काही प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भिक्षेकरी वेगवेगळे कौशल्य अवगत करीत आहेत. हा “मध्यरात्रीचा सूर्य ” भिकारांच्या जीवनातील अंधार दूर करीत आहे.

मुलेमुली दत्तक:

डॉ. अभिजित यांनी भिक्षेकऱ्यांच्या कुटुंबातील ५२ मुलेमुली दत्तक घेऊन त्यांना शिक्षित करण्याचे ते प्रयत्न करीत आहेत. त्यापैकी काहींना शासकीय विभागात उत्तम नोकऱ्या पण मिळाल्या आहेत. एक मुलगी तर आता
स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे.

देवाची कल्पना:

डॉ. अभिजित यांची देवाविषयीची संकल्पना साधी आहे. भिकारी, दीनदुबळे, निराधार यांची सेवा हीच त्यांची पूजा असून, रंजले-गांजले हेच त्यांचे देव आहेत. ते म्हणतात, एखाद्या भिकाऱ्याला जेव्हा मी आंघोळ घालतो तेव्हा तो माझ्यासाठी अभिषेक असतो. त्यामुळे मला कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज नाही. वेद जाणण्याऐवजी दु:खीतांच्या वेदना जाणाव्या, असा विचार ते मांडतात. मी कोणीच नाही जे काही आहात ते तुम्ही सगळे आहात. ह्या कार्यात आर्थिक, मानसिक प्रोत्साहन तुम्ही मला देता, त्यामुळे मी हे करू शकतो. तुमच्याबरोबरच पत्नी डॉ. मनिषा हिचा ही तेवढाच महत्त्वाचा वाटा माझ्या यशात आहे. ती नसती तर मी काहीच करू शकलो नसतो, असे ते मानतात.

दृष्टिक्षेपात कार्य:

२८५ भिक्षेकऱ्यांना स्वतंत्र व्यवसाय टाकून दिला.

५२ मुलामुलींना दत्तक घेऊन शिक्षित करण्यात येत आहे. काहींना चांगल्या नोकऱ्याही मिळाल्या आहेत.

२५०० नेत्र शस्त्रक्रिया करवून घेऊन त्यांचे अंधत्व दूर केले.

३० जणांना श्रवणयंत्रे मिळवून दिली.

१४४ जणांवर ५ लाख रुपयांवरील खर्च असलेल्या मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

१०० लोकांचा चमू तयार करून पुण्यातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात येत आहे. त्या बदल्यात त्यांना वेतन देण्यात येत आहे.

पुरस्कार :

डॉ. अभिजित आणि डॉ. मनिषा यांच्या या मानवतावादी
कामाची दखल घेऊन त्यांना आता पर्यंत २५०० पुरस्कार मिळाले आहेत. लोकमान्य टिळक, संत गाडगेबाबा, मदर टेरेसा ह्या सारख्या महत्वपूर्ण पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. शासनातर्फेही त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे.

मुलाखतीचा शेवट करताना डॉ अभिजीत म्हणाले,
“मला कितीही बक्षीसे मिळाली तरी खरे बक्षीस मला तेव्हाच मिळेल जेव्हा मी सर्व भिकाऱ्यांना स्वावलंबी करून प्रतिष्ठा मिळवून देईल.” हेच त्यांचे अंतिम स्वप्न आहे.डॉक्टरांचे हे उदात्त स्वप्न साकार करण्यासाठी आपणही सर्व जण मिळून शक्य ती मदत करू या.


लेखन: रणजीत चंदेल
निवृत्त माहिती अधिकारी
यवतमाळ
संपादन:देवेंद्र भुजबळ
_9869484800

ट्रम्प पाकिस्तान-बांगलादेशवर मेहरबान, टॅरिफ 20% पेक्षा जास्त नाही:भारत-ब्राझीलवर 50% टॅरिफचा मार

जगभरातील देशांना आयात शुल्काची धमकी देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे विशेषतः भारताच्या दोन शेजारी देशांवर दयाळू आहेत. ट्रम्प यांनी पाकिस्तानवर 19% आणि बांगलादेशवर 20% आयात शुल्क लादण्याची घोषणा केली आहे.उलट, त्यांनी भारतावर दोनदा २५% टॅरिफ लादण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सेकंडरी सँक्शन्सचीही धमकी दिली आहे.

भारताप्रमाणेच ट्रम्प यांनी ब्राझीलवर ५०% टॅरिफ लादला आहे. त्याच वेळी, चीनवर सध्या ३०% टॅरिफ लादला जात आहे. फायनान्शियल टाइम्सच्या अहवालानुसार, जर टॅरिफ दर वाढला तर चीनचा जीडीपी सुमारे १% ने कमी होऊ शकतो.
ट्रम्प यांनी पाकिस्तानवर १९% टॅरिफ लादला आहे. दक्षिण आशियातील कोणत्याही देशावर अमेरिकेने लावलेला हा सर्वात कमी कर आहे. एप्रिलच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी पाकिस्तानवर २९% कर लादण्याबद्दल बोलले होते.

नवीन आदेशात, ट्रम्प यांनी पाकिस्तानला १०% सवलत दिली आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत तेल करारही केला आहे. या अंतर्गत, अमेरिका पाकिस्तानमध्ये तेल साठवणूक, प्रक्रिया आणि बांधकाम करण्यास मदत करेल.

पाकिस्तानचा सर्वात मोठा निर्यात क्षेत्र म्हणजे त्याचा कापड उद्योग (८०%). अमेरिका त्याचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. कमी शुल्कामुळे त्याचा अमेरिकन बाजारपेठेतील वाटा वाढू शकतो.

अमेरिकेने पाकिस्तानसोबत केलेल्या करारामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. याद्वारे पाकिस्तान अमेरिकेशी हातमिळवणी करून आपले प्रादेशिक स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.

अमेरिकेच्या मदतीने पाकिस्तानला जागतिक बँक आणि आयएमएफकडूनही आर्थिक मदत मिळू शकते.
अमेरिकेने बांगलादेशवर २०% टॅरिफ लादला आहे. एप्रिलच्या सुरुवातीला बांगलादेशवर ३७% टॅरिफ लादण्यात आला होता. ४ महिन्यांत अमेरिकेला १७% कर कमी करण्यास भाग पाडण्यात बांगलादेशला यश आले.

बांगलादेश हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कापड निर्यातदार आहे. भारतावरील जास्त कर त्याच्या कापड निर्यातीत वाढ करू शकतात. २०२४ मध्ये त्याची निर्यात ८ अब्ज डॉलर्स (७० हजार कोटी रुपये) होती, जी २०२६ पर्यंत १० अब्ज डॉलर्स (८८ हजार कोटी रुपये) पर्यंत पोहोचू शकते.

कमी टॅरिफमुळे बांगलादेशला अमेरिकन बाजारपेठेत त्याचा ९% वाटा टिकवून ठेवता येईल. FBCCI च्या मते, यामुळे २०२६ पर्यंत देशाचा GDP ०.२% वाढू शकतो.
. भारत – २५ ते ३० लाख नोकऱ्या धोक्यात

अमेरिकेने ६ ऑगस्ट रोजी भारतावर २५% अतिरिक्त टॅरिफ लादला. यामुळे भारताचा एकूण टॅरिफ २५% वरून ५०% पर्यंत वाढला आहे. हा अतिरिक्त टॅरिफ २७ ऑगस्टपासून सुरू होईल. ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवण्याचे कारण रशियाकडून तेल खरेदी करणे असल्याचे सांगितले.

यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह (USTR) च्या २०२४च्या अहवालानुसार, भारताने अमेरिकेला सुमारे ७.३५ लाख कोटी रुपयांच्या वस्तू निर्यात केल्या. ५०% टॅरिफमुळे अमेरिकन बाजारपेठेत भारतीय उत्पादने महाग होतील, ज्यामुळे मागणी कमी होईल.

अमेरिका भारतातून १५% कापड आयात करते. वाढीव टॅरिफमुळे हे प्रमाण कमी होऊ शकते, ज्यामुळे भारतातील कापड उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

उच्च दरांमुळे रोजगारावरही परिणाम होईल. फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार, एमएसएमई (लघु आणि मध्यम उद्योग) क्षेत्रातील २५-३० लाख नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.

२०२४ मध्ये भारताने ११ अब्ज डॉलर्स (₹९१ हजार कोटी) किमतीचे रत्ने आणि दागिने निर्यात केले. किमती वाढल्याने मागणी कमी होऊ शकते. याचा परिणाम भारतातील दागिन्यांची बाजारपेठ असलेल्या सुरतच्या हिऱ्या आणि पॉलिशिंग हबवर होईल.

निवडणुका बॅलेट पेपरवर आणि एक वॉर्ड 1 नगरसेवक पद्धतीनेच झाल्या तरच खरी लोकशाही

पुणे: निवडणुका बॅलेट पेपरवर आणि एक वॉर्ड 1 नगरसेवक पद्धतीनेच झाल्या तरच लोकशाही खरी.. अशी स्पष्ट भावना नागरिकात असताना,कार्यकर्त्यांमध्ये देखील असताना राजकीय पक्षांच्या सोयी साठी त्या प्रभाग पद्धतीने आणि EVM वर घेतल्या जात आहेत हे आजवर लोक समजून चुकले आहेत.विधानसभा,लोकसभा का सिंगल मतदार संघात घेता त्यांचेही 4/4 प्रभाग करून घ्या 4/4 आमदार, खासदार निवडण्याची संधी द्या अशी उपरोधिक मागणी केली जात असताना स्थानिक स्वराज्य संस्थेत खरे लोकप्रतिनिधी नकोत तर राजकीय पक्षांचे गुलाम प्रतिनिधी हवेत असा आरोप आता जनतेतून होऊ लागला आहे .

दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीत निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट (VVPAT) वापरणार नसल्याचे जाहीर करत असतानाच पुणे महानगरपालिकेच्या वतीने सावरकर भवन येथे घेतलेल्या ईव्हीएम मॉक पोल मध्ये व्हीव्हीपॅट द्वारे 4 चिठ्ठ्या जास्तीच्या आल्याचा विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन एका मशीनवर 51 वेळा मतदान करण्यात आल्या. ईव्हीएम यंत्रांवर मतदान करताना व्हीव्हीपॅट जोडून ही टेस्ट घेण्यात आली. मात्र त्यापैकी 51 मतांची प्रत्यक्ष मोजणी झाली असताना व्हीव्हीपॅटमध्ये 55 चिठ्ठ्या सापडल्या. विशेष म्हणजे या चिठ्ठ्यांमध्ये प्रत्येकी दोन जास्तीची मते क्रमांक 1 व क्रमांक 3 ला पडल्याचे दिसून आले. परंतु वरिष्ठांनी याची वाचता कुठे होऊ नये याची पद्धतशीरपणे काळजी घेतल्याचे दिसून आले.

व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय जाहीर करणारा आयोग, मग पुणे मनपा मध्ये मॉक पोल कशासाठी करताय ,हा सरळसरळ दुटप्पीपणा आहे आणि वरिष्ठ पातळीवरून अशा टेस्टिंगचे आदेश न मिळता महानगरपालिका अधिकारी अशा पद्धतीची चाचणी घेणार नाहीत.अशीही भावना व्यक्त होत आहे.

एकीकडे आयोग व्हीव्हीपॅट वापरणार नसल्याचे ठाम सांगतो आणि दुसरीकडे मात्र चाचणीत यंत्र वापरतो, ही बाब संशयास्पद ठरते आहे.
देशपातळीवर सध्या ईव्हीएम विरोधात वातावरण आहे. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत मतदार संख्येच्या वाढीबाबत आरोप होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत सत्ताधारी काही वेगळे घडवू पाहत असल्याची व्यक्त होणारी शक्यता नाकारता येणारी नाही.

महत्वाचे मुद्दे:

51 मतांच्या चाचणीला 55 व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या!

व्हीव्हीपॅट वापरणार नसल्याचं जाहीर करूनही, चाचणीत वापर?

क्रमांक 1 व 3 ला सर्वाधिक मते – हेतुपुरस्सर घडवलेली चाचणी?

विरोधकांना भ्रमात टाकण्याचे कारस्थान?

साडेसतरानळी, हडपसर परिसरात दहशत माजवणाऱ्या आरोपींचा २४ तासात छडा; सहा आरोपी ताब्यात

पुणे :रात्री साडेबाराच्या सुमारास साडेसतरानळी चौक, हडपसर येथे दोन दुचाकीवर टोळक्याने हातात कोयते, तलवारी, लोखंडी रॉड घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. त्यांनी दुकानांच्या शटरवर, वाहनांवर बेधुंदपणे वार करत तोडफोड केली आणि परिसरात भीतीचं वातावरण तयार केलं. फरार आरोपींना हडपसर पोलिसांनी अहिल्यानगर येथून जेरबंद केले, गुन्हेगारांची दहशत संपवण्यासाठी साडेसतरानळी परिसरात त्यांची धिंड काढून मस्ती जिरवली. जेथे दहशत तेथेच धिंड पुणे पोलिसांचा हा नवा पॅटर्न राज्यभर चर्चेत आला आहे.

या गंभीर घटनेनंतर हडपसर पोलिसांनी तत्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा (गु. र. नं. ७४१/२०२५, भा.दं.वि. कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०७, ३२७, ३४, शस्त्र कायदा कलम ४, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५) अंतर्गत नोंदवून तपासाला सुरुवात केली.

हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि गुप्त बातम्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ०६ ऑगस्ट रोजी २४ तासांच्या आत हडपसर पोलीस पथकाने कारवाई करत सहा आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये चार विधीसंघर्ष बालकांचा समावेश आहे

श्रेयस विकास आलेकर (वय २२, रा.हडपसर, पुणे)

रोहित संदीप खाडे (वय १९, रा. गोकुळ नगर , कात्रज, पुणे)

चार अल्पवयीन बालक यांचा समावेश आहे

या घटनेतील आरोपींनी गुन्हा केल्यानंतर तातडीने फरार होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलीस उपआयुक्त डॉ.राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांनी सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने कारवाई राबवली.

अहिल्यानगर परिसरातून आरोपींना हडपसर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले

सध्या गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांची धिंड काढणे, हा पोलिसांचा नवा पॅटर्न राज्यभर चर्चेत आहे. याच प्रकारे या गुन्हेगारांना ज्या ठिकाणी त्यांनी दहशत माजवली होती, त्या साडेसतरानळी चौकातच त्यांची धिंड काढण्यात आली.
या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा आणि पोलिसांबद्दल विश्वास वाढला आहे.

डॉ. अमितेश कुमार – पोलीस आयुक्त, पुणे शहर
रंजन कुमार शर्मा – सह पोलीस आयुक्त, पुणे
मनोज पाटील – अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे

डॉ.राजकुमार शिंदे – पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५
संजय मोगले – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर यांच्या मार्गदर्शनाखाली,
निलेश जगदाळे गुन्हे पोलीस निरीक्षक, अश्विनी जगताप पोलीस निरीक्षक गुन्हे,
पोलीस उप निरीक्षक – हसन मुलानी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी,
कर्मचारी – संदीप राठोड, दीपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखिल पवार, निलेश किरवे बापू लोणकर अमोल दनके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महावीर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे,
आदींनी ही धडक कारवाई केली.

क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना तातडीने निवेदन देऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली.
हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथके आरोपींच्या शोधात रवाना झाली अहिल्यानगर येथून सहा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. जेथे आरोपींनी तोडफोड करून दहशत केली होती तेथेच या आरोपींची पोलिसांनी धिंड काढून नागरिकांना दिलासा दिला यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते.

हडपसर परिसरात वाढत्या कोयता गँगच्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी वेळेत दाखवलेली तत्परता आणि दृढ निश्चय प्रशंसनीय आहे. अशा पद्धतीने कडक आणि तातडीची कारवाई झाली तर गुन्हेगारी रोखली जाऊ शकते, असा विश्वास क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी व्यक्त केला.