Home Blog Page 176

क्रिएटिव्ह फाऊंडेशन तर्फे आंगणवाडी साठी उपयुक्त साहित्य देऊन ओवाळणी – संदीप खर्डेकर.

पुणे-

बहिणींच्या प्रेमाची उतराई होऊ शकत नाही, आज आंगणवाडी सेविकांनी मला राखी बांधून मायेच्या धाग्यात बांधले असल्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले. क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम माझ्यासाठी भावनिक क्षण असल्याची भावना देखील मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.बहीण भावाचे नाते हे पवित्र नातं असून ही आपली परंपरा आहे संस्कृती आहे असेही ते म्हणाले.
आज क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे आंगणवाडी सेविकांसोबत “अण्णांच्या” घरी जाऊन रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी माजी नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, विविध आंगणवाडीतील सेविका शिक्षिका सुरेखाताई होले ,जया काळे,उषा आवळे,विद्या भरेकर,सुनिता मुटकुळे,संगिताताई वांद्रे,
मीनाताई कोंडे,मेघना ववले,संध्याताई खळदकर इ उपस्थित होत्या.
ह्या भगिनींनी ओवाळणी म्हणून आंगणवाडीतील बालकांना उपयुक्त साहित्य द्यावे अशी विनंती केली होती, त्यास अनुसरून ह्या नऊ आंगणवाडीतील बालकांसाठी वजनकाटा व उंची मोजण्याचे उपकरण भेट देण्यात आले असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
तसेच येणाऱ्या काळात त्यांना मागणीनुसार आवश्यक साहित्य पुरविण्यात येईल असे माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी जाहीर केले.
मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यस्त दिनक्रमातून सेविकांसाठी वेळ काढल्याबद्दल क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर व सर्व सेविकांनी कृतज्ञता व्यक्त केली. मुरलीधरअण्णा मोहोळ यांनी आम्हाला राखी बांधण्याचा मान दिला हे आमच्यासाठी खूप भाग्याचा प्रसंग असल्याचे सुरेखाताई होले व विद्याताई भरेकर म्हणाल्या.

अॅागस्ट क्रांतिदिनी ना. पाटील यांचे पुण्यातील ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांना अभिवादन

पुणे

स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या पुणे शहर आणि जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांची माहिती पुणेकरांना व्हावी; यासाठी ९ अॅागस्ट क्रांतिदिनानिमित्त श्री देवदेवेश्वर संस्थाने प्रदर्शनी उभारण्यात आली आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ना. पाटील यांनी राष्ट्रध्वजाचे पूजन करुन सर्व क्रांतिकारकांना अभिवादन केले. यावेळी पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवा, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, ॲड. मंदार रेडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ना. पाटील म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात असंख्य राष्ट्रभक्तांनी योगदान दिले. अनेकांनी बलिदान देखील दिले. त्यांचे स्मरण ठेवणे आपली जबाबदारी आहे. श्री देवदेवेश्वर संस्थानने पुणे शहर आणि जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांची नव्या पिढीला ओळख व्हावी, यासाठी राबविलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, अशी भावना व्यक्त केली.

पुढील पाच वर्षांत उद्योगांचे वीजदर कमी होणार

सौरऊर्जेमुळे औद्योगिक वीजदर कपात करणे झाले शक्य

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांचे प्रतिपादन

पुणे, दि. ९ ऑगस्ट २०२५ – आतापर्यंत आपण दरवर्षी वीज दरवाढ करत आलो आहोत. परंतु इतिहासात पहिल्यांदाच आपण औद्योगिक वीजदर कपात केली आहे. दरवर्षी सरासरी १.९ टक्के प्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये १० टक्के दर कमी होतील. तसेच उद्योगांची भविष्यातील वाढ लक्षात घेऊन प्रकल्प आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी उद्योजकांनीही सहकार्य करावे असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.

शुक्रवारी (दि. 8) गणेशखिंड येथील महावितरणच्या प्रादेशिक संचालक कार्यालयात पुणे शहरातील उद्योजक संघटनांसोबत महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी संवाद साधला. यावेळी महावितरणचे संचालक (संचालन) सचिन तालेवार, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी, संचालक (मासं) राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक परेश भागवत व दिनेश अग्रवाल, प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनिल काकडे यांचेसह शहरातील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकेश चंद्र म्हणाले, ‘भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा एक ट्रिलियनचा असून, त्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी ठोस पाऊले उचलली आहेत. यामध्ये वीज कंपन्यांनाही त्यांचे योगदान द्यावे लागणार आहे. सौरऊर्जेतून स्वस्तात मिळणारी वीज शेतकऱ्यांना दिवसा देऊन शेतीसोबत उद्योगांनाही त्याचा फायदा मिळणार आहे. वीजदर कपात करुन एक पाऊल पुढे टाकलेलेच आहे. महावितरण व महापारेषण या कंपन्या विजेच्या पायाभूत सुविधेसाठी मोठी गुंतवणूक करीत आहेत.’

पुण्यातील उद्योजकांची वाढती वीज मागणी लक्षात घेता महावितरणने एमआयडीसीकडे नविन वीज उपकेंद्रांसाठी जागेची मागणी केली आहे. एमआयडीसी याबाबत सकारात्मक असून, सर्व्हे करुन नविन जागेचा शोध घेतला जाणार आहे. नविन जागांसाठी महावितरण आग्रही आहे. तसेच नव्याने विस्तारित होणाऱ्या औद्योगिक वसाहतींचा बहृत आराखडा तयार करतानाच वीज उपकेंद्रांसाठी जागेचे आरक्षण टाकण्यात यावे यासाठीही महावितरण पाठपुरावा करत असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले.

‘स्वागत कक्षा’ची सुरुवात

उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरणने ‘स्वागत कक्षा’ची निर्मिती केलेली आहे. प्रत्येक मंडल कार्यालय स्तरावर हा कक्ष कार्यरत असून, उद्योजक व महावितरण यांच्यातील समन्वय वाढून वीज सेवा गतिमान होण्यास त्याची मदत होणार आहे. अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता महिन्यातून एकदा स्वागत कक्षाची बैठक घेऊन समस्या मार्गी लावतील असे लोकेश चंद्र यांनी सांगितले.

‘लोड ब्रेक स्विच’चा वापर करावा- लोकेश चंद्र

वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारीवर उत्तर देताना सीएमडी लोकेश चंद्र म्हणाले, ‘जिथे दाब वाढविण्याची गरज आहे. तिथे तो तातडीने वाढवून देण्याच्या सूचना संबंधित अभिंयंत्यांना दिलेल्या आहेत. वीजपुरवठा खंडित होण्यामागे अंतर्गत बिघाड हे देखील एक कारण आहे. एखाद्या उद्योगाच्या अंतर्गत बिघाडामुळे त्या फिडरवरील इतर ग्राहकांनाही खंडित विजेचा फटका बसतो. त्यामुळे उद्योगांनीही ‘लोड ब्रेक स्विच’चा वापर करावा. त्यासाठी उद्योगांनीही पुढाकार घ्यावा. हे बसविल्याने 50 टक्के ट्रिपिंग कमी होतील.’ त्यास उद्योगांनी पसंती दिली.

‘पुरुषोत्तम‌’मध्ये भाग घेणे हा नाटक शिकण्याचा पाया : सुहास जोशी

महाराष्ट्रीय कलोपासकच्या ‌‘कलोपासकांचे आख्यान‌’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासकच्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेणे हा नाटक शिकण्याचा पाया आहे. व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केल्यानंतर पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे महत्त्व कळले. पुण्यातून रंगभूमीला मिळालेल्या कलाकारांमधून अर्ध्याहून अधिक कलाकार पुरुषोत्तमच्या मांडवाखालून गेलेलेे आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी काढले.

महाराष्ट्रीय कलोपासकची 90 वर्षे आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या 60 वर्षांचा इतिहास मांडणाऱ्या ‌‘कलोपासकांचे आख्यान‌’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (दि. 9) सुहास जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. रंगभूमीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. श्यामला वनारसे, महाराष्ट्रीय कलोपासकचे उपाध्यक्ष डॉ. सुहास जोशी, पुस्तकाचे लेखक शामराव जोशी, गोपाळ जोशी, डॉ. स्वाती महाळंक, पुस्तकाचे संपादक मिलिंद सबनीस, भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे मंचावर होते. भरत नाट्य मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सुहास जोशी पुढे म्हणाल्या, 1964 सालच्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत मी सहभागी झाले होते. त्या काळात पुण्यातील सगळे नाटकवाले विद्यार्थी स्पर्धेला आवर्जून हजर असत. स्पर्धेत भाग घेण्याव्यतिरिक्त इतर संघांनी सादर केलेली नाटके बघणे, प्रतिस्पर्धी काय ताकदीचा आहे हे ओळखून आपली तयारी करणे हे आम्हा सर्वांसाठीच आव्हानात्मक व आनंददायी होते. पुरुषोत्तमच्या माध्यमातून हजारो कलाकार निर्माण झाले आहेत. कलोपासकच्या माध्यमातून रंगमांचावर स्पॉट लाईटची संकल्पना राजाभाऊ नातू यांनी पुढे आणली हे मला आजच समजले. परंतु ते या क्षेत्रातील अतिशय कुशल जादूगारच होते याचा अनुभव आम्ही कलाकारांनी अनेकवेळा घेतला आहे. महाराष्ट्रीय कलोपासकच्या शंभराव्या वर्षात नक्की येईन, असेही त्यांनी आनंदाने सांगितले.

‌‘भरत‌’सारखा प्रयोग कुठेही रंगत नाही …
भरत नाट्य मंदिरातील रंगमंचावर अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाट्य प्रयोग केले आहेत याचा आवर्जून उल्लेख करून सुहास जोशी म्हणाल्या, भरत नाट्य मंदिराच्या रंगमंचावर रंगतो तसा प्रयोग पुण्यातील कुठल्याही रंगमंदिरात रंगत नाही. याचे कारण काय ते माहिती नाही. प्रेक्षक रंगमंचाच्या अगदी जवळ असतात की, पुण्यातील इथे येणारे प्रेक्षक सुजाण सदाशिव-नारायण पेठेतील असतात?

कलोपासक म्हणजे विश्रब्ध रंगावकाश : डॉ. श्यामला वनारसे
कलोपासक आणि पुरुषोत्तम स्पर्धेच्या वाटचालीचा आढावा घेऊन डॉ. श्यामला वनारसे म्हणाल्या, कलोपासक म्हणजे विश्रब्ध रंगावकाश आहे. इथे येऊन अनेक कलाकार कर्ते, यशस्वी आणि कीर्तीमान झाले आहेत. कलोपासक हा संस्थात्मक कामाचा भक्कम पाया आहे. रंगभूमीचे बाजारीकरण होत असताना समाजात सांस्कृतिक जाण निर्माण करण्याचे कार्य कलोपासकच्या माध्यमातून होत आहे. नाटकाने जीव धरण्यासाठी कलोपासकसारखी संस्था ताकद देत आहे. कलोपासकची संस्थात्मक, सामाजिक आणि मानसिक भूमिका मांडणारा इतिहास अजून जास्त प्रमाणात समाजासमोर यावा. वयोमानपरत्वे या सोहळ्यासाठी रंगमंचावर येणे शक्य नव्हते तरी कलोपासकमधील व्यक्ती रंगमंचावर न जाताही काय करत आहेत याला दाद देण्यासाठी मी आवर्जून उपस्थित राहिले आहे.

मिलिंद सबनीस यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले तर गोपाळ जोशी यांनी लेखनप्रवासाचा धावता आढावा घेतला. रवींद्र खरे यांनी भरत नाट्य संशोधन मंदिर आणि महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थांचा अनुबंध उलगडला. मान्यवरांचे स्वागत डॉ. सुहास जोशी यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अवंती लोहकरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांच्या मुलाखातीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांनी महाराष्ट्रीय कलोपासकची आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची वाटचाल याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांच्याशी श्यामराव जोशी आणि सुरभी नातू यांनी संवाद साधला.

सौर प्रकल्प वेळेत पूर्ण नाही केल्यास कारवाई

अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांचा इशारा

पुणे जिल्ह्यात 1083 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांचे काम सुरु

पुणे, दि. 9 ऑगस्ट, 2025 – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत पुणे जिल्ह्यात 1083 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांचे काम सुरु असून त्यासाठी 7 कंपन्या (एजन्सी) काम करत आहेत. या कंपन्यांनी आपल्या कामांचा वेग वाढून प्रकल्प वेळेत कार्यान्वित करावेत अन्यथा त्यांना पुढील 5 वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले जाईल असा इशारा ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी दिला आहे. शुक्रवारी (दि.8) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘टास्क फोर्स’च्या बैठकीत त्या बोलत होत्या.

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात  ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ राबविली जात आहे. यातून राज्यात 16 हजार मेगावॅटची निर्मिती होणार असून, पुणे जिल्ह्यात 131 वीज उपकेंद्रांतर्गत 1083 मेगावॅट इतकी वीज निर्माण होणार आहे. या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हापातळीवर ‘टास्क्‍ फोर्स’ची निर्मिती करण्यात आली असून, याचा आढावा घेण्यासाठी ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला व महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी बैठक घेतली. या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, महावितरणचे संचालक योगेश गडकरी, राजेंद्र पवार, प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांचेसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

दीड वर्षापूर्वी 7 कंपन्यांना 1083 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचे कार्यादेश दिले होते. यातील 36 मेगावॅटचे प्रकल्प आवादा कंपनीने पूर्ण केले आहेत. तर अनेक कंपन्यांचे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. सप्टेंबर 2025 पर्यंत बरेच प्रकल्प पूर्ण होतील. परंतु काही कंपन्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने, त्यांनी कामाची गती वाढवावी अन्यथा त्यांच्यावर निविदेतील तरतुदीनुसार काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात येईल असा इशारा आभा शुक्ला यांनी दिला.

महावितरणचे उपविभागीय अभियंता यांना या योजनेसाठी नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यांनी या प्रकल्पांना लागणाऱ्या जागा ताब्यात देण्यासाठी समन्वय साधून येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम करावयाचे आहे. सोबतच महसूल, पोलीस, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांनीही या कामातील अडचणी दूर कराव्यात अशा सूचना शुक्ला यांनी संबंधितांना दिल्या.

महावितरणचे विद्युत सुरक्षा अभियान देशात आदर्श

केंद्रीय राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्याकडून कौतुक

मुंबई, ९ ऑगस्ट २०२५: महावितरणच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभरात विद्युत सुरक्षा अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाचे केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री ना. श्री. श्रीपाद नाईक यांनी कौतुक केले आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांना पत्र पाठवून ‘शून्य विद्युत अपघात उदिद्ष्टाच्या जनजागृतीसाठी हे अभियान देशासाठी एक आदर्श आहे’ असे त्यांनी गौरवोद्गार काढले.

विद्युत सुरक्षेबाबत राज्यभरात जनजागृती करण्यासाठी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या सूचनेनुसार महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘प्रकाशमान महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र’ या विद्युत सुरक्षा अभियानाला सुरवात करण्यात आली. मानव संसाधन विभागाचे संचालक श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक श्री. परेश भागवत यांच्या नियोजनातून दि. १ ते ६ जून दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांत तब्बल २ लाख ११ हजारांवर नागरिक, शालेय विद्यार्थी, अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यासह महावितरणकडून मोबाईल ‘एसएमएस’द्वारे १ कोटी ९३ लाख आणि ‘ई-मेल’द्वारे ३५ लाख ७३ हजार वीजग्राहकांना विद्युत सुरक्षेबाबत संदेश पाठविण्यात आले.  

आजवरच्या सर्वाधिक लोकसहभागाच्या विद्युत सुरक्षा अभियानाची खास दखल घेत केंद्रीय नवीन व नवकरणीय राज्यमंत्री ना. श्री. श्रीपाद नाईक यांनी पत्राद्वारे कौतुक केले आहे. ‘महावितरणने शून्य विद्युत अपघाताच्या उदिदष्टासाठी सुरू केलेल्या जनजागृती अभियानाचे केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय मंत्रालयाच्या वतीने कौतुक करतो. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने हे अभियान राबवविले आहे. त्यातून प्रत्यक्ष लोकसहभाग व डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे विद्युत सुरक्षेबाबत प्रभावी प्रबोधन व जनजागरण करण्यात आले. महावितरणचे सर्व संचालक, क्षेत्रीय अभियंते, अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी दिलेले योगदान शून्य विद्युत अपघाताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यांची या अभियानामुळे विद्युत सुरक्षेसाठी असलेली बांधिलकी दिसून येते. विद्युत सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण होत आहे. महावितरणचे हे विद्युत सुरक्षा अभियान देशातील इतर राज्यांसाठी आदर्श आहे’, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री ना. श्री. श्रीपाद नाईक यांनी कौतुक केले आहे. 

2 लाख भारतीयांनी २०२४ मध्ये भारतीय नागरिकत्व सोडले

0

नवी दिल्ली- परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, २०२४ मध्ये २,०६,३७८ भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडून इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारले. कीर्ती सिंह म्हणाले की, नागरिकत्व सोडण्याची कारणे वैयक्तिक आहेत आणि ज्या व्यक्तीने हा निर्णय घेतला आहे त्यालाच हे माहिती आहे.

ते म्हणाले की, सरकार अनिवासी भारतीयांशी संबंध वाढवण्यावर भर देत आहे, त्यांच्या ज्ञानाचा आणि नेटवर्कचा फायदा घेत आहे. यशस्वी आणि प्रभावशाली अनिवासी भारतीय देशाची सॉफ्ट पॉवर मजबूत करतात असा सरकारचा विश्वास आहे.

सरकारने गेल्या ५ वर्षांचा डेटादेखील सादर केला. या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या २०२० च्या तुलनेत जवळजवळ अडीच पट जास्त आहे.
२०२० पासून नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये थोडीशी घट झाली आहे. त्याच वेळी, गेल्या तीन वर्षांत हा आकडा दोन लाखांच्या वर राहिला आहे.काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री कीर्ती यांनी गेल्या पाच वर्षांचा डेटाही दिला. सरकारच्या म्हणण्यानुसार, २०२० मध्ये ८५,२५६ लोकांनी, २०२१ मध्ये १,६३,३७० लोकांनी, २०२२ मध्ये २,२५,६२० लोकांनी आणि २०२३ मध्ये २,१६,२१९ लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले. यापूर्वी, २०११ मध्ये ही संख्या १,२२,८१९, २०१२ मध्ये १,२०,९२३, २०१३ मध्ये १,३१,४०५ आणि २०१४ मध्ये १,२९,३२८ होती.

दिल्लीमध्ये पावसाचा रेड अलर्ट, 100 विमानांना विलंब:हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे भूस्खलन, चंदीगड-मनाली महामार्ग बंद

नवी दिल्ली- दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शनिवारी सकाळीही पाऊस सुरूच आहे. येथे पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे १०० हून अधिक विमानांना विलंब झाला आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे दिल्लीतील अनेक भागात पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत वाहतूक कोंडी होत आहे.

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील शारोद नाला येथे ढगफुटीची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, परंतु शारोद नालाला लागून असलेल्या बरोगी नाल्याची पाण्याची पातळी वाढली आहे. भूस्खलनामुळे चंदीगड-मनाली महामार्ग बंद आहे.

बिहारमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. बेगुसरायमध्ये आलेल्या पुरामुळे ११८ शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. खगरियामध्ये ३२ आणि वैशालीमध्ये ८० शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. पटनामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

या हंगामात मान्सून उत्तर प्रदेशात चांगलाच बरसत आहे. सततच्या पावसामुळे नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अमरोहामध्ये, ३ दिवसांच्या सततच्या पावसामुळे एका जीर्ण घराची पडझड झाली, ज्यामुळे एका दुचाकीस्वारावर त्याचा जीव गेला. जौनपूरमध्येही एक घर कोसळले.

भाजप आणि निवडणूक आयोग संघटीत निवडणूक घोटाळा निषेधार्थ पुणे शहर युवक कॉंग्रेसचे आंदोलन

पुणे-काल देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून, भाजपा व निवडणूक आयोगाने मिळून देशातील व राज्यातील निवडणूकीत मतांची चोरी केली आहे आणि हा देशद्रोहच भाजपाने केला आहे या

या भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी भाजपा आणि निवडणू‌क आयोगिची पोलखोल केली यासा खा. राहुल गांधी यांच्या समर्थानासाठी पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. सौरभ अमराळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपा आणि निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध करण्यात आला

यावेळी पुणे शहर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश अबनावे, प्रदेश सचिव आनंदकुमार दुबे, प्रदेश सचिव अजिनाथ केदार, मेघश्याम धर्मावत, प्रदेश सचिव दिलीपसिंह देशमुख, हडपसर विधानसभा अध्यक्ष मतीन शेख, कोथरूड विधानसभा अध्यक्ष राज जाधव, छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ विक्रांत धोत्रे, तुषार पठारे, हर्षल हांडे, स्वप्निल गायकवाड, यश कोलते पाटील, अक्षय बहिरट,सागर नेरे व अनिरूद्ध जगदाळे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशोत्सव जोरात आणि धूमधडाक्यात साजरा करू-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

श्री तुळशीबाग महागणपती भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन आणि गणेशोत्सव मंडळांच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान
पुणे : यंदा राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून घोषित केले. त्याकरिता ६०० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यंदा गणपतींचे लाईव्ह दर्शन, विविध स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव जोरात आणि धूमधडाक्यात साजरा करू, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे करण्यात आले. त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार हेमंत रासने,  स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम आदी उपस्थित होते.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पुण्याच्या गणेशोत्सवातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सुरेश पवार, श्रीकांत शेटे, रवींद्र माळवदकर, संजय बालगुडे, दत्ता सागरे, बाळासाहेब मारणे, संजीव जावळे, युवराज निंबाळकर, नितीन पाटील, शिरीष मोहिते, राजाभाऊ धावडे यांचा समावेश होता. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांच्या संकल्पनेतून ‘मराठी बाणा’ हा ७० एमएम मराठी कार्यक्रम यावेळी सादर झाला.

हेमंत रासने म्हणाले, लोकमान्यांनी संघटीत समाज निर्माण व्हावा, म्हणून गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. आज हा उत्सव जगाचा नकाशावर पोहोचला आहे पुण्याची सांस्कृतिक राजधानी ही ओळख निर्माण करण्यात गणेशोत्सव कार्यकर्त्यांचा देखील मोठा वाटा आहे. त्यामुळे हा उत्सव २४ तास निर्बंध मुक्त व भयमुक्त साजरा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नितीन पंडित यांनी प्रास्ताविक केले.

वीजचोरी अन् वाढती थकबाकी खपवून घेतली जाणार नाही-महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र

पुणे: मागेल त्यांना वीजजोडणी उपलब्ध असताना थेट आकडे टाकून किंवा वीज मीटर फेरफार करून वीजचोरी होत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. वीजचोरीविरुद्ध मोहीम आणखी कठोर करा. थेट फौजदारी कारवाई सुरू करा. यासोबतच वीजबिलांच्या थकबाकी वसूलीला वेग द्या असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी दिले.  

पुणे येथील ‘प्रकाशभवन’मध्ये आयोजित पुणे प्रादेशिक विभागातील विविध कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी संचालक सर्वश्री सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प), योगेश गडकरी (वाणिज्य) व राजेंद्र पवार (मानव संसाधन) तसेच कार्यकारी संचालक श्री. परेश भागवत व श्री. दिनेश अग्रवाल, पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे, मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे (पुणे), श्री. धर्मराज पेठकर (बारामती), श्री. स्वप्निल काटकर (कोल्हापूर), श्री. पंकज तगलपल्लेवार (मुख्यालय) यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र म्हणाले, की वीज हानी कमी करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वीजचोरीविरुद्ध कठोर मोहिम सुरू करणे आवश्यक आहे. घरगुती, व्यावसायिक व इतर कोणतेही ग्राहक मीटरमध्ये फेरफार करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करा. थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित झाला आहे त्यांच्या वीजजोडण्यांची तपासणी करा. वीजचोरी आढळल्यास ताबडतोब कारवाई करा. गेल्या काही महिन्यांपासून वीजबिलांच्या थकबाकीमध्ये वाढ होत आहे, ही गंभीर बाब आहे. थकबाकी वसूलीला आणखी वेग देण्याची सूचना त्यांनी केली. यासह अचूक बिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी तात्काळ स्थानिक उपाययोजना कराव्यात. प्रत्येक युनिटचे बिलिंग झाले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नवीन वीजजोडण्या तसेच वीज भार वाढवून देण्याचे काम नियमाने दिलेल्या मुदतीतच झाले पाहिजे. मागणीप्रमाणे वीज उपलब्ध असताना नवीन वीजजोडण्यांना विलंब होत असल्यास सहन केले जाणार नाही. यासह सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीज यंत्रणा सक्षम करण्याची मागणी होण्यापूर्वीच संबंधित कार्यालयांनी स्थानिक उपाययोजना करून वीजयंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी महावितरणकडे निधीची व साधन सामग्रीची कोणतीही कमतरता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून छतावरील सौर प्रकल्प कार्यान्वित झालेल्या ग्राहकांच्या वीजबिलविषयक तक्रारी असल्यास त्याचे विनाविलंब निराकरण करा. त्यात दिरंगाई झाल्यास गंभीर नोंद घेण्यात येईल असे श्री लोकेश चंद्र यांनी सांगितले.

या बैठकीमध्ये सुधारित वितरण क्षेत्र योजना, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०, मागेल त्यांना सौर कृषीपंप आदी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे मेट्रोचे जाळे शहरात निर्माण करुन वाहतूक कोंडी सोडवण्यावर भर -अजित पवार

५०० मीटरमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी -देवेंद्र फडणवीस

पुणे, दि.८: पुणे व पिंपरी चिंचवड शहर सर्वंकष गतिशीलता योजना सर्व संबंधित विभागाने समन्वयाने निश्चित करावी. ग्रेड सेपरेटर्स, रिंग रोड सेपरेटर्स, टनेल्स सेपरेटर्स बाबत एकत्रित आराखडा तयार करावा. पुढील ३० वर्षांचा विचार करुन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे महामेट्रोच्यावतीने आयोजित ‘पुणे शहर सर्वंकष गतीशीलता’ योजनेचे सादरीकरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, ‘मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव (गृह) इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, प्रधान सचिव अश्विनी भिडे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, गतिशीलता योजना १ लाख ३० हजार कोटी रुपयांची असून पहिल्या टप्प्यात ६२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी. या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात सार्वजनिक वाहतूक ३० टक्क्यांपर्यंत नेण्याचे ध्येय असून त्यानंतर ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे ध्येय ठेवावे. कोणत्याही व्यक्तीला ५०० मीटरमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होईल याप्रमाणे नियोजन करा. सर्व विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात. महानगरांमध्ये सरासरी वेगमर्यादा ३० किमी पर्यंत जाईल याप्रमाणे नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

श्री. पवार म्हणाले, पुणे मेट्रोचे जाळे शहरात निर्माण करुन वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता शासन प्रयत्नशील आहे. पुणे शहर सर्वंकष गतिशीलता योजना आराखड्यात हडपसर ते लोणी काळभोर मेट्रोलाईन प्रास्तवित आहे. पुणे शहराची वाढती लोकसंख्या, पुणे-सोलापूर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता लोणी काळभोर ऐवजी हडपसर ते उरुळी कांचन मेट्रोलाईन असा बदल करण्याबाबत विचार करावा. पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे वाढते नागरीकरण त्याकरिता लागणारे पाणी पुरवठ्याबाबत नियोजन करावे, असेही श्री. पवार म्हणाले.

श्री. हर्डीकर म्हणाले, पुणे शहर सर्वंकष गतीशीलता योजना आराखडा यापूर्वी २०१८ मध्ये तयार करण्यात आला होता, सुधारित आराखड्यात सन २०५४ मधील लोकसंख्या वाढ, रस्ते अपघात, वाढते नागरिकरण आणि त्याअनुषंगाने पीएमपीएल बस वाहतूक आराखडा, डेपो, मेट्रो सेवांचा विस्तार, बीआरटीएस कॉरीडॉर, पुरंदर विमानतळाकरिता बाह्यवळण रस्ता, रिंग रोड, मिसिंग लिंक आराखडा, सायकल जाळे, मुख्य बाजारपेठ मार्ग, ट्रक टर्मिनल, लॉजिस्टिक हब, मल्टि मॉडेल इंटिग्रेशन हब, सार्वजनिक वाहतूकतळ, पर्यटन विकास; त्यामाध्यमातून रोजगार निर्मिती, माहीती तंत्रज्ञान क्षेत्रात होणारी वाढ आदी बाबींचा करता २ हजार ५५० चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या मान्यतेकरिता आराखडा सादर करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

महानगरपालिका आयुक्त श्री.राम आणि श्री.सिंह यांनी पुणे व पिंपरी चिंचवड वाहतूक व्यवस्थापन आराखड्याबाबत, तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार व विनयकुमार चौबे यांनी महानगर पालिका क्षेत्रात वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि त्या अनुषंगाने अंमलबजावणीबाबत माहितीचे सादरीकरण केले.

यावेळी आमदार योगेश टिळक, भीमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, हेमंत रासने, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला ‘क्रांतीज्योत’ यात्रा काढून काँग्रेसच्या वतीने शहिदांना अभिवादन.

पुणे-

९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन ते हुतात्मा बाबूगेणू स्तंभ, मंडईपर्यंत ‘क्रांतीज्योत यात्रा’ काढून शहिदांना अभिवादन करण्यात आले.

क्रांतीज्योत यात्रेचा मंडई येथील हुतात्मा बाबूगेणू स्तंभास पुष्पहार अर्पण करून समारोपीय भाषणात अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. या लढ्यात गोंदिया जिल्ह्यातील काही लोकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांतिलढ्याची आठवण म्हणून ९ ऑगस्टला ‘क्रांती दिन’ पाळला जातो. परंतु आज या दिवसाचे महत्व नवीन पिढीलाच नाही, महात्मा गांधीच्या ‘‘अंग्रेज चले जाव’’ या घोषणेमुळे लाखो सत्याग्रही देशाच्या विविध भागात ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधात चले जाव चे आंदोलन करायला लागले. त्यावेळेस लाखो देशवासियांच्या मनात एकच ध्येय होते की भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे. १९४२ च्या मुंबईला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये छोडो भारत आंदोलनाचा ठराव संमत झाला. काँग्रेसने या देशामध्ये अखंडत्व, सार्वभौमत्व ठेवले याचे स्मरण देशवासियांनी करायला पाहिजे. १९४० ला वर्ध्याच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पूर्ण स्वराज्याचा विषय मांडण्यात आला त्यानुसार पं. जवाहरलाल नेहरूंची एकतेची, अखंडतेची परंपरा त्यांच्या मुलीने, नातवाने अखंडपण चालू ठेवली याचे स्मरण करणे गरजेचे आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, सुडाची भावना न ठेवता हा देश अखंड राहिला पाहिजे. मी त्या लढ्यातील लाखो हुतात्म्यांना शतश: प्रणाम करून आदरांजली अर्पण करतो.’’

यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे खजिनदार ॲड. अभय छाजेड यांनी स्वातंत्र्याचा इतिहास विशद केला. यावेळी माजी आमदार दिप्ती चवधरी, धनंजय दाभाडे, कमल व्‍यवहारे, अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, वैशाली मराठे, यशराज पारखी, मेहबुब नदाफ, गुलाम हुसेन खान, राज अंबिके, द. स. पोळेकर, सतिश पवार, विनोद रणपिसे, प्रदिप परदेशी, समिर शेख, सुजित यादव, राजू ठोंबरे, अक्षय माने, हेमंत राजभोज, रमेश सकट, रमेश सोनकांबळे, अनिल पवार, सेवादलाचे प्रकाश पवार, लतेंद्र भिंगारे, ॲड. रमेश पवळे, गणेश गुगळे, संतोष आरडे, विल्सन चंदवेल, प्राची दुधाने, अर्चना शहा, सीमा सावंत, माया डुरे, अनिता धिमधिमे, प्रियंका मधाळे, सुदंरा ओव्‍हाळ, अनुसया गायकवाड, ज्योती परदेशी, राजेश मोहिते, महेश विचारे, अशोक लोणारे, संतोष वाघमारे, योगेश नायडू, नुर शेख, विकार शेख, ॲड. नंदलाल धिवार, संदिप मोकाटे, सचिन भोसले, नवाज सय्यद, राज घेलोत, चेतन पडवळ, अमित कांबळे, वैभव डांगमाळी, देवीदास लोणकर, नरसिंह अंदोली, मतीन शेख, अक्षय बहिरट, संतोष सुपेकर, संजय डोंगरे हर्षद हांडे, योगीराज नाईक, शेहबाज शेख, फारूक नदीवाले, युसूफ शेख, रामदास केदारी आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 मुख्यमंत्र्यांना राखी बांधत भगिनींकडूनलव्ह जिहादविरोधी कायद्याची मागणी

पुणे: रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘राखी सन्मानाची, कायद्याची मागणी भगिनींची’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यभर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार असून, या मोहिमेअंतर्गत हिंदू महिलांनी आपल्या भागातील आमदार, खासदार, नगरसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना राखी बांधून महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तात्काळ लागू करण्याची भावनिक मागणी केली आहे.

या मोहिमेची सुरवात पुण्यातील पोलीस परेड ग्राउंड, शिवाजीनगर येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक हिंदू महिलांनी राखी बांधून झाली. यावेळी उपस्थितीत हिंदू भगिनींनी लव्ह जिहादविरोधी कायद्याची जलद अंमलबजावणी करण्याची गरज पटवून दिली. लव्ह जिहादविरोधी कायदा लवकरात लवकर करून त्वरित त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी महिलांनी केली.

या उपक्रमाचे उद्दिष्ट केवळ राखी बांधण्यापुरते मर्यादित न राहता, हिंदू भगिनींच्या सन्मानाचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण करणे असून, प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या जबरदस्तीने धर्मांतर, मानसिक छळ, मारहाण, लैंगिक अत्याचार आणि आत्महत्येसारख्या गंभीर घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा आवश्यक असल्याचे महिलांनी ठामपणे मांडले.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

0

पुणे : वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हिंजवडीसह चाकण परिसरात काढण्यात येणाऱ्या अतिक्रमणानंतर त्या भागात तातडीने रस्ते विकसित करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयातून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपेक्षित प्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांनी चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगााने पाहणी केल्यानंतर आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चाकण एमआयडीसीसह परिसरातील खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे व्यवसायिक, कामगार, वाहनधारकांना अनेक अडचणी येतात. या भागात अतिक्रमणधारकांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम राबवत तातडीने अरुंद असलेले रस्ते रुंद करण्यासाठी तातडीने पावणे उचलणे अपेक्षित आहे. अतिक्रमण काढल्यानंतर त्या ठिकाणी जर रस्ते विकसित झाले नाही तर पुन्हा अतिक्रमण वाढते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयातून अतिक्रमण काढल्यानंतर तातडीने रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले.

चाकणसह परिसरात येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अशा वाहनांवर ठराविक वेळेची बंधने घालत एमआयडीसी भागात ट्रॅक टर्मिनल सुरू करण्यावर भर देत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आरटीओ यांच्यासह पोलीस यंत्रणेने संयुक्तपणे नियोजन करणे अपेक्षित आहे. यासह कचऱ्याची समस्या निकाली काढत या भागातील अतिक्रमणे तातडीने काढावी. रस्ते विकसित करताना जर कोणी चुकीची भूमिका घेत असेल तर त्यांच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. यावेळी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कशी सोडवता येईल, यासंदर्भात उपाययोजनांची माहिती, त्याचे कालबद्ध टप्पे व मास्टर प्लॅनचे सादरीकरण केले.

उपाययोजनांची कामे समाधानकारक
गेल्या महिन्याभरापासून हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्या निराकरणासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा विविध उपायोजनांवर भर देत आहे. आजपर्यंत झालेली कामे समाधानकारक असल्याने ती नागरिकांना दिलासा देणारी आहे. त्यामुळे उर्वरित कामे याच गतीने पुढेही सुरू ठेवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले. चाकण भागात पण प्रशासकीय यंत्रणा अशाच पद्धतीने उपायोजनांवर भर देणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

चाकणसह एमआयडीसी भागात पाहणी
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी चाकणसह एमआयडीसी भागातील नागरी समस्या व वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने पाहणी केली. यादरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक त्या उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली. यात त्यांनी भारत माता चौक मोशी, समृद्धी पेट्रोल पंप सॅनी कंपनी नाणेकरवाडी, बंगला वस्ती मेदनकरवाडी – सासे फाटा, चाकण चौक, आंबेठाण चौक, चाकण चौक ते कडचीवाडी, हिंगणे चौक खराबवाडी, म्हाळुंगे पोलीस चौकी एमआयडीसी रस्ता आदी भागात पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.