Home Blog Page 174

हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेला सुरुवात

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेला आज (दि. 10 ऑगस्ट) जल्लोषात सुरुवात झाली.
भरत नाट्य मंदिर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा दि. 24 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळच्या सत्रात ‌‘सत्यं शोधं सुंदरम्‌‍‌’ (अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च), ‌‘मॅरेज ॲकॅडमी..‌’ (पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी), ‌‘वर्दी‌’ (एन. बी. पी. सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट कॅम्पस, आंबेगाव) तर सायंकाळच्या सत्रात ‌‘झेप‌’ (गरवारे वाणिज्य महाविद्यालय स्वायत्त), ‌‘मोक्ष कॅफे‌’ (अजिंक्य डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय), ‌‘द स्मेल‌’ (इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स) या एकांकिकांचे सादरीकरण झाले.

सोमवार, दि. 11 ऑगस्ट रोजी सादर होणाऱ्या एकांकिका
वेळ : सायंकाळी 5 वाजता
‌‘इन बिटवीन ऑफ‌’ (बृहन महाराष्ट्र महाविद्यालय), ‌‘व्हिक्टोरिया‌’ (डी. ई. एस. पुणे युनिव्हर्सिटी, शिवाजीनगर), ‌‘मृगजळ‌’ (टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, स्वायत्त)

संस्था आणि स्पर्धेचा चित्रमय इतिहास..

महाराष्ट्रीय कलोपासकचे 90वे वर्ष आणि पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा हीरक महोत्सव यानिमित्त भरत नाट्य मंदिराच्या आवारात संस्था आणि स्पर्धेचा ‌‘मागे वळून पाहताना‌’ हा चित्रमय इतिहास मांडण्यात आला आहे. तसेच सेल्फी पाँईटही करण्यात आला आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत यश मिळविलेल्या संघांची नावेही येथे झळकत आहेत.

सीबीआयने महाराष्ट्रातील बेकायदेशीर कॉल सेंटरचे रॅकेट केले उध्वस्त


सायबर फसवणुकीत सहभागी 5 आरोपींना अटक

44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन, सोने, आलिशान गाड्या आणि मोठी रोकडही केली जप्त

मुंबई-केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी (रेनफॉरेस्ट रिसॉर्ट) इथे एका भाडे तत्वावरील जागेत, काही खासगी व्यक्तींद्वारे चालवल्या जात असलेल्या एका बेकायदेशीर कॉल सेंटरचे रॅकेट उध्वस्त केले.या सायबर फसवणुकीच्या प्रकरणात सीबीआयने दि. 8 ऑगस्ट रोजी मुंबईचे  रहिवासी असलेल्या 6  व्यक्ती तसेच इतर अज्ञात व्यक्ती आणि बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालमध्ये नमूद केल्यानुसार, आरोपींनी परस्परांच्या सोबतीने, तसेच इतर काही अज्ञात व्यक्तींसोबत गुन्हेगारी कट रचून, बेकायदेशीर कॉल सेंटरच्या माध्यमातून स्वतःला अमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेस कॉल सेंटरचे प्रतिनिधी असल्याचे भासवले, आणि त्यांनी फसव्या कॉल्सच्या माध्यमातून  आर्थिक फसवणूक केली.

या गुन्ह्यातील आरोपी  अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांची फसवणूक करून, त्यांच्याकडून गिफ्ट कार्ड्स किंवा क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून बेकायदेशीर कमाई करत होते. हे कॉल सेंटर महाराष्ट्रात नाशिकमध्ये इगतपुरी इथून चालवले जात होते. आरोपींनी हे बेकायदेशीर कॉल सेंटर चालवण्यासाठी डायलर्स, व्हेरिफायर्स आणि क्लोजर्स अशा पदांअंतर्गत सुमारे 60 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती.

या प्रकरणात सीबीआयने केलेल्या तपास आणि कारवाई अंतर्गत 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन आणि इतर महत्त्वाच्या  डिजिटल पुराव्यासंह,  1.20 कोटी रुपयांची  बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोने आणि 1 कोटी रुपये किमतीच्या 7 आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कॉलसेंटरच्या माध्यमातून अंदाजे 5000 USDT क्रिप्टोकरन्सी (5 लाख रुपये) मूल्याचे, तसेच 2000 कॅनेडियन डॉलरचे गिफ्ट व्हाउचरचे (1.26 लाख रुपये) व्यवहार आढळून आले. यासोबतच संबंधित कॉलसेंटरच्या ठिकाणी सीबीआयने छापा मारल्यानंतर तिथे कॉल सेंटरमध्ये कार्यरत असलेले 62 कर्मचारी परदेशी नागरिकांना फसवण्याचे काम करत असल्याचे आढळून आले.

या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 5 आरोपींना अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे.

दिवाळी व छट दरम्यान कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी कामातून 5 आठवड्यांची सुट्टी घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी आनंदाची बातमी


रेल्वेने गर्दी कमी करण्यासाठी व प्रवाशांचा प्रवास सुलभ करण्यासाठी ‘राउंड ट्रिप पॅकेज’ अंतर्गत परतीच्या प्रवासाच्या मूळ भाड्यात 20% ची सूट केली जाहीर

प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्या जाणाऱ्या उपक्रमात राउंड ट्रिप पॅकेजसाठी 14 ऑगस्टपासून आरक्षण होणार सुरू, 13 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान जाण्याच्या तर, 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 दरम्यानच्या परतीच्या प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध

सध्या लागू असलेली 60 दिवसांची आगाऊ आरक्षण कालावधी अट, परतीच्या प्रवासासाठी लागू राहणार नाही

नवी दिल्‍ली-

भारतीय रेल्वे गर्दी टाळण्यासाठी, आरक्षण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, प्रवाशांची सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सणासुदीच्या काळातील वाढलेली गर्दी नियंत्रणात ठेवण्याच्या तसेच, विशेष गाड्यांसह दोन्ही बाजूंच्या प्रवासासाठी गाड्यांचा योग्य वापर खात्रीशीर करण्याच्या उद्देशाने, “सणासुदीच्या गर्दीसाठी फेस्टिव्हल रश राउंड ट्रिप पॅकेज” या नावाने एक प्रायोगिक योजना सादर करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना सूट दिलेल्या दरात फेरी प्रवासाची संधी मिळणार आहे. ही योजना अशा प्रवाशांसाठी लागू असेल जे खाली नमूद केलेल्या कालावधीत परतीचा प्रवास निवडतील:

  1. ही सवलत केवळ तेव्हाच लागू होईल जेव्हा जाण्या येण्याचे (दोन्ही बाजूंचे) तिकीट एकाच प्रवाशाच्या नावाने आरक्षित केले जाईल. परतीच्या प्रवासाचे प्रवाशाचे तपशील जाण्याच्या प्रवासासारखेच असतील.
  2. 14 ऑगस्ट 2025 पासून आरक्षण सुरू होईल.  सर्वप्रथम जाण्याचे तिकीट 13 ऑक्टोबर 2025 ते 26 ऑक्टोबर 2025 या कालावधीत असलेल्या प्रवासासाठी आरक्षित करावे लागेल आणि नंतर कनेक्टिंग जर्नी फीचर वापरून 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 या कालावधीत परतीचे तिकीट आरक्षित करता येईल. परतीच्या प्रवासाच्या आरक्षणासाठी आगाऊ आरक्षण कालावधी अट लागू होणार नाही.
  3. वर निर्देशित आरक्षण केवळ जाण्याच्या आणि येण्याच्या कन्फर्म तिकीटासाठीच दिले जाईल. 
  4. 20 % सवलत केवळ परतीच्या प्रवासाच्या मूळ भाड्यावरच मिळेल. 
  5. या योजनेअंतर्गत आरक्षण जाण्याच्या आणि परतीच्या प्रवासात एकाच वर्गासाठी आणि समान ओ-डी जोडीसाठी असेल.
  6. या योजनेअंतर्गत आरक्षित केलेल्या तिकिटांचे भाडे परत केले जाणार नाही.
  7. वरील योजना फ्लेक्सी भाडे असलेल्या गाड्या वगळता सर्व वर्गांसाठी आणि विशेष गाड्यांसह सर्व गाड्यांसाठी (मागणीनुसार गाड्या) लागू असेल.
  8. दोन्ही प्रवासांच्या तिकिटावर कोणताही बदल करता येणार नाही.
  9. परतीच्या प्रवासाच्या तिकिटासाठी इतर कोणत्याही सवलती, रेल्वे प्रवास कूपन, व्हाउचर आधारित बुकिंग, पास किंवा पीटीओ इत्यादी लागू होणार नाहीत. 
  10. जाण्याच्या आणि परतीच्या प्रवासाची तिकिटे एकाच पद्धतीने आरक्षित केले गेले पाहिजे; इंटरनेट (ऑनलाइन) बुकिंग, किंवा आरक्षण केंद्रातून काउंटर बुकिंग.
  11. या पीएनआरसाठी, चार्टिंग दरम्यान कोणत्याही कारणाने भाड्यात वाढ झाल्यास कोणतेही अतिरिक्त भाडे वसूल केले जाणार नाही.

मनविसेच्या राज्य प्रमुख संघटक पदी प्रशांत कनोजियांची फेरनिवड

पुणे –

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या राज्य प्रमुख संघटक पदी पुन्हा प्रशांत कनोजिया यांची निवड करण्यात आली आहे.

 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्यातील मनविसे वर्धापन दिन मनविसे कर्जत येथील शिबिरात राज्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यात प्रशांत कनोजिया यांच्यावर 
पुन्हा “राज्य प्रमुख संघटक”
पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विद्यार्थी दशेपासुन सामाजिक चळवळीत कार्य करणारे कनोजिया यांनी महाविद्यालयात शाखाध्यक्ष , विभाग अध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष पदापासून अनेक पदांवर आजपर्यंत यशस्वी कार्य केले आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न असो किंवा पालकांना भेडसावणाऱ्या  समस्यांवर आवाज उठविण्यासाठी वेळोवेळी आंदोलन केलेले आहे. विद्यार्थी न्याय हक्कासाठी जेल भोगली आहे
समाजातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते सतत आग्रही आणि आक्रमक राहिलेले आहेत. वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या
 रुग्णवाहिकांना सहज सुकर मार्ग मिळावा आणि रुग्णांना, अपघातग्रस्तांना वेळेत हॉस्पिटलमध्ये उपचार मिळावेत यासाठी कनोजिया यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या  हेल्प रायडर्स एक जीव वाचवण्याची चळवळीचे कार्य राज्यस्तरावरच नाही तर आंतरराज्य पातळीवर पसरले आहे.मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सोपवलेली प्रत्येक जबाबदारी निश्चितच  पार पाडली जाईल. विद्यार्थी आणि पालकांसाठी दिशादर्शक कार्य केले जाईल विद्यार्थी सुरक्षा व हक्काच्या शैक्षणीक सुविधा भेटण्यासाठी
पालकांची फसवणूक,पिळवणूक या विषयावर विशेष कार्य करणार आहे अशी ग्वाही नियुक्तीनंतर प्रशांत कनोजिया यांनी दिली. 

गळयातील सोने हिसका मारुन चोरून पळवणारे धायरीचे २ भामटे गजाआड

पुणे- वृध्द महिलांना हेरून त्यांच्या गळयातील सोन्याचे दागिने न जबरदस्तीने हिसका मारुन चोरी करून पळवणारे २ भामटे पोलिसांनी गजाआड केले आहेत.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’सिंहगड रोड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३८७/२०२५ भा.न्या.सं.क. ३०९ (४), ३ (५) अन्वये दि. ०४/०८/२०२५ रोजी गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील तक्रारदार महिला या वयस्कर असल्याने त्याचा गैरफायदा घेवुन दोन अनोळखी इसमांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या गळयातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारुन चोरी करुन घेवुन गेले होते.
वरिष्ठांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार आण्णा केकाण, तानाजी सागर व निलेश भोरडे यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दोन दिवसापुर्वी ओसीस सोसायटी समोर, सार्वजनिक रोडवर झील कॉलेज चौक न-हे पुणे येथे दोन अनोळखी इसमांनी एका वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरी केली होती. सदरचे इसम राममंदिर जवळ अंबाईदरा धायरी पुणे येथे थांबलेले असुन त्यामधील एकाने लालसर रंगाचा शर्ट घातलेला व डोक्यावर पांढ-या रंगाची टोपी घातलेला साधारण ३० ते ३५ वयोगटातील इसम आहे व दुसरा पांढ-या रंगाचा शर्ट व हाफ बर्मुडा पॅट घातलेला साधारण २५ ते ३० वयोगटातील इसम आहे.
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन त्यांचे आदेशाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन खात्री करता, बातमीतील वर्णनाचा दोन इसम हे थांबलेले दिसले, त्यास स्टाफच्या मदतीने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव राहुलकुमार शामकुमार वय ३३ वर्षे रा. फ्लॅट नं.१४ तिसरा मजला, गणेश हाईटस मतेनगर अंबाईदरा धायरी पुणे. गोविंदा कुमार ओमप्रकाश वय ३५ वर्षे रा. सदर असे असल्याचे सांगितले, त्याचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता, हा गुन्हा त्यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन दाखल गुन्हयातील चोरी केलेली ६०,०००/-रु.किं.ची सोन्याची चैन व सिंहगड रोड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३९१/२०२५ बीएनएस कलम २०२३ चे कलम ३०३ (२) मधील गेली ३०,०००/-रु.किं.ची एक होंडा कंपनीची काळ्या रंगाची शाईन मोटार सायकल तिचा आर टी ओ नंबर एम एच १२ टी एम ४६५७ ही जप्त करण्यात आली आहे. असा एकुण ९०,०००/- रु.किं.चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे , पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३ , संभाजी कदम,सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग अजय परमार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन दिलीप दाईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, देवा चव्हाण, सागर शेडगे, निलेश भोरडे, तानाजी सागर, राहुल ओलेकर, गणेश झगडे, विनायक मोहिते, सतिष मोरे, संदिप कांबळे, समीर माळवदकर, शिरीष गावडे यांचे पथकाने केली.

फरार बाबा खानला अखेर महिनाभरात पकडला

पुणे- सुमारे एक महिन्यापासून खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी बाबा खान ला पोलिसांनी अखेर येथे जेरबंद केले आहे. पोलिसांनी या संदर्भात सांगितले कि,’दिनांक ०२/०७/२०२५ रोजी एक अल्पवयीन पिडीत मुलगा हा त्याचे रहाते घराजवळील सार्वजनीक शौचालय, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ, पुणे येथे गेला असताना आरोपी गौरव गणेश तेलंगी ,अलोक सचिन अलगुडे व बाबा पुर्ण नाव, पत्ता माहित नाही यांनी पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पिडीतास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने धारधार हत्याराने डोक्यावर, पाठीवर वार करून तसेच डावे हाताचे मनगटापासून पंजा वेगळा करून गंभीर जखमी केले म्हणुन शिवाजीनगर पो.स्टे. येथे गु.र.नं.९९/२०२५, भा.न्या.सं. कलम १०९,३ (५), आर्म अॅक्ट क.४/२५, महा. पो. अॅक्ट ३७ (१), (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता .
हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडील पोलीसांनी गौरव गणेश तेलंगी व अलोक सचिन अलगुडे यांना यापुर्वीच अटक केली होती पण बाबा खान पळाला होता .
युनिट-१ चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपी बाबा पुर्ण नाव, पत्ता माहित नाही याचा शोध घेत असताना युनिट १ चे पोलीस अंमलदार हेमंत पेरणे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, या गुन्ह्यातील WANTEDआरोपी बाबा याचे पुर्ण नाव साजिद उर्फ बाबा नजिर लाला खान असे असून तो दिनांक ०८/०८/२०२५ रोजी रात्रीचे वेळी त्याचे मित्रांना भेटण्यासाठी अंगारशहा तकीया, गंजपेठ, पुणे येथे येणार असून त्याने लाल रंगाचा पठाणी ड्रेस घातलेला आहे. अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने लागलीच युनिट १ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी अंगरशहा तकीया, गंजपेठ, पुणे येथे सापळा रचुन साजिद उर्फ बाबा नजिर लाला खान, वय २३ वर्ष, रा. व्दारा-मोहसिन शेख दत्त मंदीरा, सुखसागर, बिबवेवाडी यास ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेवून अधिक तपास करता, त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारांचे मदतीने केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कार्यवाहीसाठी शिवाजीनगर पोलीसंच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-२, पुणे शहर, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यमनिट-१ गुन्हे शाखा पुणे शहर कुमार घाडगे, सहा. पोलीस निरी. बर्गे, पोलीस अंमलदार विनोद शिदे, विठ्ठल साळुंखे, मयुर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, निलेश साबळे व उमेश मठपती यांचे पथकाने केली आहे.

कंत्राटदार, अभियंत्यांनी विधायक कार्याला प्राधान्य द्यावे-डाॅ. श्रीपाल सबनीस

पुणे: “कोणताही प्रकल्प उभारताना कंत्राटदार, अभियंता हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मात्र अनेक कंत्राटदार, राजकीय पुढारी भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडलेले दिसतात. अभियंत्यांनी यापासून दूर राहत समाजाचा विचार करून विधायक कार्य करण्याला प्राधान्य द्यावे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

‘अभियंता मित्र’ या मासिकाच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘शोध अभियांत्रिकी मनाचा’ कार्यक्रमात डॉ. सबनीस बोलत होते. मंगळवार पेठेतील सिंचनभवनच्या डाॅ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, जलसंपदा विभागाचे माजी अधिकारी नंदकुमार वडनेरे, अभियंता मित्र मासिकाचे संपादक डाॅ. कमलकांत वडेलकर, दिनकर गोजारे , सुनिल कदम, अनिरुद्ध पावसकर, युवराज देशमुख, आ रेखा खेडेकर,व्यंकटराव गायकवाड, प्रवीण किडे यांच्यासह पुणे व मुंबई महानगरपालिकेतील अनेक अभियंते उपस्थित होते.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “सभोवतालचे राजकारण, धर्मकारण, सत्ताकारण अर्थकारण, संस्कृतीकरण भ्रष्टाचाराने बरबटलेले असताना,  अभियंत्यांच्या भोवती तयार झालेले आरोपाचे, संशयाचे भूत बाजूला करून विधायक कार्य करणाऱ्या अभियंत्याची सकारात्मक बाजू मांडणे, त्यांचा गौरव करणे हे स्तुत्य काम आहे. वडेलकरांनी या मासिकाच्या माध्यमातून ते अविरतपणे मांडले आहे. अभियंत्याच्या कर्तृत्वाला जात-धर्म नसतो. त्यामुळे समाजहित लक्षात घेऊन विधायक कार्य उभा करण्याची आज गरज आहे. अभियंता तसेच पत्रकार म्हणून वडेलकर शासनाच्या मदतीशिवाय,  जाहिरातीशिवाय मासिक चालवण्याचे शिवधनुष्य पेलत आहेत.”

पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, “उत्कृष्ट कार्यक्षमता असणारे अनेक अभियंते आजही कार्यरत आहेत. परंतु त्यांची चांगली बाजू समाजासमोर येत नाही. अशावेळी वडेलकर ती आपल्या मासिकातून मांडत आहेत,त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे.”

वडेलकर यांनी स्वागत प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली. तसेच अभियंता मित्र मासिकाच्या माध्यमातून अभियंता मनाचा शोध कसा घेतला जातो, चांगले काम करणाऱ्या अभियंत्याच्या कार्यावर प्रकाश टाकला जातो, याविषयी सविस्तरपणे विवेचन केले.

सुमारे तीन लक्ष पन्नास हजार रु.स्वर्गीय मोतीलाल धूत व स्वर्गीय प्रभाकर गानू शिष्यवृत्ती  सौ अलका धूत श्री. विजय धूत याच्या हस्ते प्रदान करण्यात आली. ग्रंथ प्रकाशन, लेखक अभियंत्यांचा, तसेच गुणवंत पाल्यांचा सत्कार, उत्कृष्ट अभियंता पुरस्कार वितरण आणि अभियंता मित्र मासिकाच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

मनिष गोखले यांनी सूत्रसंचालन केले. वडेलकर यांनी आभार मानले.

राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का ?

कॉंग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांचा परखड सवाल.

पुणे–भा.ज.प च्या प्रवक्तेपदी राहिलेल्या एका व्यक्तीची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदासाठी शिफारस करण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. प्रवक्ता हा त्याच्या राजकीय पक्षाचा चेहरा असतो असे म्हंटले जाते. मग, एका राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा कशी असू शकते असा प्रश्न गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.

या संबंधात ऍना म्याथीव् वि सर्वोच्य न्यायालय व कृष्णमूर्ती वि केंद्र सरकार यासारख्या खटल्यांमध्ये न्यायमूर्तीपदासाठी शिफारस केलेली व्यक्ती जर योग्यपात्रतेची असेल तर केवळ राजकीय विचारसरणी हि आडकाठी असू शकत नाही असे मत जरी सर्वोच्य न्यायालयाने व्यक्त केलेले असले तरीही प्रत्यक्ष पक्षप्रवक्ता राहिलेल्या व्यक्तीची नेमणूक करणे नैतिक दृष्ट्या योग्य आहे का? हा खरा प्रश्न आहे.

काँग्रेसनेही यापूर्वी अश्या शिफारसी केल्याचे आज भा. ज. प. नेते जरी सांगत असले तरीही काँग्रेस सरकारने यापूर्वी कुठल्याही प्रवक्त्याची न्यायमूर्तीपदासाठी शिफारस केलेली नाही.

किंबहुना देशातील काही कांग्रेस प्रवक्ते हे नामांकित वकिल आहेत. मग न्यायव्यवस्थेत जर असे कुठलेही निकष वा संकेत नसल्यास अश्या कांग्रेस प्रवक्त्याची न्यायमूर्तिपदासाठी केंद्र सरकार शिफारस करणार का ? याचे उत्तर भा. ज. प. देईल का असा प्रश्न गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.

वास्तविक सैन्यातील व् सनदी अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर किमान एक वर्ष ” कूलिंग पीरियड ” अन्वये निवडणूक लढविता येत नाही. असे असतानाही न्यायव्यवस्थेतील सर्वोच्य पदावर राहिलेल्या व्यक्तीची निवृत्तीनंतर त्वरित एखाद्या संसदीय सभागृहाचा सदस्य नेमण्याची अस्वीकारार्थ प्रथा मोदी सरकारने सुरु केल्यापासून एक चुकीचा संदेश जात असल्याची भावना सर्वसामान्य माणसांमधे निर्माण झाली आहे असेही गाडगीळ यांनी म्हंटले आहे.

देशात इंग्रज राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही व संविधान गिळंकृत करु पाहणाऱ्या प्रवृत्तींनो ‘चले जाव’: हर्षवर्धन सपकाळ

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस पक्ष व सामाजिक संघटनांची पदयात्रा व हुतात्म्यांना आदरांजली.

मुंबई- .

९ ऑगस्ट १९४२ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘करो या मरो’चा मंत्र देत जुलुमी इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. आज देशात तीच परिस्थिती आहे, हुकूमशाही प्रवृत्ती फोफावली असून ती लोकशाही व संविधान गिळंकृत करु पहात आहे. आज या प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवण्याची गरज असून देशाला घातक असलेल्या या प्रवृत्तीला ‘चलो जाव’चा इशारा देत आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट क्रांती मैदाना पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. गवालिया टँक येथे स्वातंत्र्य चळवळ व ‘अंग्रेजो चले जाव’ ‘भारत छोडो’, आंदोलनातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा ताई गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजन भोसले, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, चरणसिंग सप्रा, सरचिटणीस संदेश कोंडविलकर श्रीरंग बर्गे, श्रीकृष्ण सांगळे, ॲड. अमित कारंडे, मधू चव्हाण, भावना जैन, मोनिका जगताप, धनंजय शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व सामाजिक संस्थांचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आज महात्मा गांधींचा संदेश व देशाला स्वातंत्र कसे मिळाले याची आठवण सर्वांना झाली पाहिजे. स्वातंत्र्यासाठी मोठा लढा द्यावा लागला आणि मोठ्या संघर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे पण आज देशातील परिस्थिती पाहता पुन्हा एकदा ‘चले जाव’चा नारा देण्याची गरज असून देशात आज एका नव्या क्रांतीची गरज आहे. नागपूरची चिप थैमान घालत असून ती सर्व व्यवस्था करप्ट करत आहे, ती चिप लोकांच्या डोक्यात घसुवण्याचा प्रयत्न सुरु आहे. महात्मा गांधी यांचा खून करणारी प्रवृत्ती, स्त्री-पुरुष समानता नाकारणारी प्रवृत्ती व स्पृश-अस्पृशता माननाऱ्या प्रवृत्तीला गाडण्याची गरज आहे, असे आवाहन करत आज ही प्रवृत्ती ठेचली नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

कोल्हापूर येथे एनसीसी आंतर-संचालक क्रीडा नेमबाजी स्पर्धेचा प्रारंभ

कोल्हापूर-

कोल्हापूर राष्ट्रीय छात्र सेना गट मुख्यालयाच्या वतीने कोल्हापूर येथील संभाजी महाराज क्रीडा संकुलात आज राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) आंतर-संचालक क्रीडा नेमबाजी स्पर्धेला सुरूवात झाली. राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक आणि तांत्रिक सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात देशभरातील विविध संचालक मंडळांमधील उत्कृष्ट एनसीसी कॅडेट नेमबाज सहभागी झाले असून ते रायफल आणि पिस्तुल नेमबाजीच्या विविध श्रेणींमध्ये स्पर्धा करणार आहेत. क्रीडा भावना, अचूकता आणि शिस्त यांचा प्रसार करणे, सोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी देशातील प्रतिभावान नेमबाज शोधणे तसेच त्यांचा विकास करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.

उद्घाटन समारंभाला एनसीसी ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर के पैठणकर, एनसीसी जीपी मुख्यालय कोल्हापूर, वरिष्ठ एनसीसी अधिकारी, नागरी प्रशासनातील मान्यवर आणि क्रीडा अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर एनसीसी ग्रुपच्या ग्रुप कमांडर पैठणकर यांनी आपल्या भाषणात एकाग्रता, संयम आणि मानसिक ताकद वाढवणारा खेळ म्हणून नेमबाजीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की हा कार्यक्रम तरुण कॅडेट्सना नेमबाजीत उत्कृष्ट कामगिरी करण्यास आणि एनसीसीच्या “एकता आणि शिस्त” या ब्रीदवाक्याचे पालन करण्यास प्रवृत्त करेल.

संभाजी महाराज क्रीडा संकुल, हे आपली आधुनिक शूटिंग रेंज आणि सुविधांसह, राष्ट्रीय शूटिंग मानांकनानुसार आणि कठोर सुरक्षा व्यवस्थेसह स्पर्धा आयोजित करण्यासाठी सज्ज आहे.

हा कार्यक्रम सांस्कृतिक आणि आंतर-संचालक सौहार्दपूर्ण संबंधांसाठी एक व्यासपीठ म्हणून देखील काम करत असून यामुळे भारताच्या विविध प्रदेशातील छात्रांमधील बंध दृढ होत आहेत.

 निवडणूक आयोगाने 334 बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांना (RUPPs) सूचीमधून वगळले

नवी दिल्‍ली-

  1. देशातील राजकीय पक्षांची (राष्ट्रीय / राज्य / बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्ष – RUPPs) लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 29A च्या तरतुदींनुसार निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली जाते.
  2. सध्या, निवडणूक आयोगाकडे 6 राष्ट्रीय पक्ष 67 राज्य पक्ष आणि 2854 बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी आहे. (परिशिष्ट : राष्ट्रीय आणि राज्य पक्षांची यादी)
  3. राजकीय पक्षांच्या नोंदणीसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, जर एखाद्या पक्षाने सलग 6 वर्षे निवडणुका लढवल्या नाहीत, तर त्या पक्षाचे नाव नोंदणीकृत पक्षांच्या यादीतून वगळले जाईल.
  4. याव्यतिरिक्त, लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 29A नुसार, पक्षांना नोंदणीच्या वेळी त्यांचे नाव, पत्ता, पदाधिकारी इत्यादी तपशील देणे गरजेचे असते तसेच कोणत्याही बदलाची माहिती आयोगाला तात्काळ कळवणे आवश्यक असते.
  5. यापूर्वी, जून 2025 मध्ये, निवडणूक आयोगाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (CEOs) वरील नियमांचे पालन केले जात आहे किंवा नाही यासंबधी 345 बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांची (RUPPs) पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते.
  6. यानंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशी केली, या बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांना (RUPPs) कारणे दाखवा नोटीस पाठवली तसेच प्रत्येक पक्षाला त्यांची बाजू मांडण्यासाठी वैयक्तिक सुनावणीची संधी दिली.
  7. त्यानंतर, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवालात, एकूण 345 बिगर मान्यताप्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांपैकी (RUPPs) 334 बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्ष (RUPPs) वर नमूद अटींचे पालन करत नसल्याचे आढळले. तर उर्वरित प्रकरणांची पुन्हा पडताळणी केली जावी यासाठी ती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे परत पाठवण्यात आली आहेत.
  8. सर्व तथ्ये आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या शिफारशींचा विचार केल्यानंतर आयोगाने 334 बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्ष (RUPPs) वगळले आहेत. (दुवा: https://www.eci.gov.in/list-of-political-parties). आता, एकूण 2854 बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांपैकी (RUPPs) 2520 शिल्लक आहेत. ही कार्यवाही म्हणजे निवडणूक व्यवस्था पूर्णतः निर्दोष करण्याच्या  निवडणूक आयोगाच्या  सर्वसमावेशक आणि निरंतर धोरणाचा हा एक भाग आहे.
  9. हे बिगर मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्ष (RUPPs) लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 29B आणि 29C मधील तरतुदींनुसार, प्राप्तीकर कायदा, 1961 आणि निवडणूक चिन्हे (आरक्षण आणि वाटप) आदेश, 1968 शी संबंधित कोणत्याही  तरतुदींनुसार कोणताही लाभ घेण्यासाठी पात्र असणार नाहीत. या आदेशाने बाधित झालेला कोणताही पक्ष, आदेशाच्या 30 दिवसांच्या आत आयोगाकडे अपील करू शकतो.

परिशिष्ट

मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष

अ.क्र.राजकीय पक्षाचे नाव
1आम आदमी पार्टी
2बहुजन समाज पार्टी
3भारतीय जनता पार्टी
4कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)
5इंडियन नॅशनल काँग्रेस
6नॅशनल पीपल्स पार्टी

मान्यताप्राप्त राज्य पक्ष

अ.क्र.राजकीय पक्षाचे नावअ.क्र.राजकीय पक्षाचे नाव
1एजेएसयू पार्टी2ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम
3ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक4ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
5ऑल इंडिया एन.आर. काँग्रेस6ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस
7ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट8अपना दल (सोनेलाल)
9आसाम गण परिषद10भारत आदिवासी पार्टी
11 भारत राष्ट्र समिती 12 बिजू जनता दल 
13 बोडोलँड पीपल्स फ्रंट 14 सिटिझन ॲक्शन पार्टी – सिक्कीम 
15 कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 16 कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी लेनिनवादी) (लिबरेशन) 
17 देसिया मुप्पोकू द्रविड कळघम 18 द्रविड मुन्नेत्र कळघम 
19 गोवा फॉरवर्ड पार्टी 20 हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी 
21 इंडियन नॅशनल लोक दल 22 इंडियन युनियन मुस्लिम लीग 
23 इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा 24 जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स 
25 जम्मू आणि काश्मीर नॅशनल पॅंथर्स पार्टी 26 जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी 
27 जनसेना पार्टी 28 जनता दल (धर्मनिरपेक्ष) 
29जनता दल (संयुक्त)30 जननायक जनता पार्टी 
31 जनता काँग्रेस छत्तीसगड(जे) 32 झारखंड मुक्ती मोर्चा 
33 केरळ काँग्रेस 34 केरळ काँग्रेस (एम) 
35 लोक जनशक्ती पार्टी 36 लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) 
37 महाराष्ट्र नवनिर्माण सेना 38 महाराष्ट्रवादी गोमंतक 
39 मिझो नॅशनल फ्रंट 40 नाम तमिळर कटची 
41 नागा पीपल्स फ्रंट 42 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 
43 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार 44 नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी 
45 पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट 46पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल
47राष्ट्रीय जनता दल 48राष्ट्रीय लोक समता पार्टी
49राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी50रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)
51रिव्होल्यूशनरी गोअन्स पार्टी52रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी
53समाजवादी पार्टी54शिरोमणी अकाली दल
55शिवसेना56शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
57सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट58सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा
59तेलुगु देसम पार्टी60टिपरा मोथा पार्टी
61युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी62युनायटेड पीपल्स पार्टी, लिबरल
63विदुथलाई चिरुथैगल कटची64व्हॉईस ऑफ द पीपल पार्टी
65युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी66झोरम नॅशनलिस्ट पार्टी
67झोरम पीपल्स मूव्हमेंट  

भाकड जनावरे गोरक्षकांना दत्तक द्यावीत

सुनील माने यांची मागणी
पुणे : वाहतुकीस अडथळा ठरणारी भाकड जनावरे गोरक्षकांना दत्तक द्यावीत व गोरक्षकांसाठी ‘भाकड जनावरे दत्तक योजना’ जाहीर करावी. या जनावरांचा नीट सांभाळ होतो की नाही हे पाहण्यासाठी एक समिती निर्माण करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी गोसेवा आयोगाचे महाराष्ट्र अध्यक्ष शेखर मुंदडा यांना दिले. या बाबतचे पत्र त्यांनी ई – मेल वर पाठवले आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गायीला महाराष्ट्र शासनाने मातेचा दर्जा दिला आहे हे आपण सर्व जाणतोच. तथापि, अनेक शेतकरी व गोरक्षकांच्या भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या भाकड गायी गुरांचे मालक यांनी या गायी बेवारस म्हणून सोडून दिल्या आहेत. राज्यासाठी ही नामुश्कीची गोष्ट आहे.
अनेक रस्त्यांवर अशा पद्धतीने आढळणाऱ्या भटक्या गायी आणि गुरे यांच्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो, अपघात होतात. वाहनधारकांनी कितीही हॉर्न वाजवला तरी ही जनावरे रस्त्यातून लवकर बाजूला होत नाहीत. यामुळे वाहतूक कोंडी होऊन रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. यात लोकांचा वेळ वाया जातो. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या भाकड जनावरांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करणे गरजेचे आहे. यासाठी राज्यातील गोरक्षकांची यादी करावी व त्यांना ही जनावरे दत्तक म्हणून द्यावीत. गोरक्षकांसाठी ‘भाकड जनावरे दत्तक योजना’ जाहीर करावी. या जनावरांचा नीट सांभाळ होतो की नाही हे पाहण्यासाठी एक समिती निर्माण करावी. या समितीने याबाबतचा प्रतिमहिना आढावा घेऊन लोकांसाठी अहवाल सादर करावा अशी व्यवस्था निर्माण करावी अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात पहिल्या मालगाडीचे आगमन

नवी दिल्‍ली

जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात पहिल्या मालगाडीचे काल आगमन झाल्याच्या प्रसंगाचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. या घटनेमुळे आता काश्मीर राष्ट्रीय मालवाहतूक जाळ्याशी जोडले गेले असून, हे एक महत्त्वाचे यश ठरले आहे.

याविषयी केंद्रीय रेल्वे, दळणवळण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावर प्रसारित केलेल्या संदेशाला  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिसाद दिला.  या घडामोडीमुळे  जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रगती आणि समृद्धी दोन्ही वाढीला लागेल असे त्यांनी म्हटले आहे.

संदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेली प्रतिक्रिया :

“जम्मू आणि काश्मीरमधील व्यापार आणि दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा दिवस ! यामुळे प्रगती आणि समृद्धी दोन्ही वाढीला लागेल.”

ICICI बँकेच्या बचत खात्यात किमान ₹50,000 रक्कम ठेवणे आवश्यक:पूर्वी ही मर्यादा ₹10,000 होती

गेल्या ५ वर्षांत, ११ सरकारी बँकांनी त्यांच्या बचत खात्यांमध्ये किमान सरासरी शिल्लक न ठेवल्याबद्दल ग्राहकांकडून सुमारे ९,००० कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे…

नवी दिल्ली- आयसीआयसीआय बँकेच्या खातेधारकांना आता त्यांच्या खात्यात किमान ५०,००० रुपये शिल्लक ठेवावे लागतील. जर शिल्लक यापेक्षा कमी असेल तर ग्राहकांना दंड भरावा लागू शकतो. हा नियम १ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाला आहे.

शहरे, गावे आणि महानगरांमध्ये खाते ठेवण्यासाठी किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची आवश्यकता वेगवेगळी आहे, बँकेने त्या सर्वांमध्ये ती वाढवली आहे. महानगर आणि शहरी भागात आता किमान मर्यादा ५०,००० रुपये, निमशहरी भागात २५,००० रुपये आणि गावांमध्ये उघडलेल्या खात्यांसाठी १०,००० रुपये आहे.

२०१५ नंतर पहिल्यांदाच बँकेने किमान शिल्लक मर्यादा वाढवली

यापूर्वी, महानगर आणि शहरी भागात सरासरी किमान शिल्लक राखण्याची अट १०,००० रुपये, निम-शहरी भागात ५,००० रुपये आणि ग्रामीण शाखांमध्ये २५०० रुपये होती.

किमान खात्यातील शिल्लक मर्यादेत झालेल्या या वाढीसह, आयसीआयसीआयकडे आता देशांतर्गत बँकांमध्ये सर्वाधिक किमान खाते शिल्लक (एमएबी) मर्यादा आहे. बँकेने १० वर्षांनंतर किमान शिल्लक मर्यादेत बदल केला आहे.

देशातील प्रमुख बँकांमध्ये किमान शिल्लक आणि दंडाचे नियम

भारतीय बँकांमध्ये बचत खात्यांसाठी वेगवेगळ्या किमान शिल्लक आवश्यकता आहेत. हे नियम बँक, खात्याचा प्रकार आणि खात्याचे स्थान (महानगर, शहरी, निम-शहरी, ग्रामीण) यावर अवलंबून बदलू शकतात.

१. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

किमान शिल्लक रक्कम: २०२० पासून सर्व बचत खात्यांसाठी किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची आवश्यकता नाही.
नियम: बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाउंट (BSBDA) आणि जनधन अकाउंटमध्ये शून्य बॅलन्स आहे. दंड नाही.
२. पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)

किमान शिल्लक: जुलै २०२५ पासून किमान शिल्लक दंड नाही.
नियम: आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी शून्य-बॅलन्स खाती उपलब्ध.
३. एचडीएफसी बँक:

किमान शिल्लक: मोठी शहरे: ₹१०,०००; लहान शहरे: ₹५,०००; ग्रामीण: ₹२,५००.
नियम: दंड: ₹६०० पर्यंत. एप्रिल २०२५ पासून वाढ होण्याची शक्यता.
४. अ‍ॅक्सिस बँक:

किमान शिल्लक: मोठी शहरे – ₹१२,०००; लहान शहरे: ₹५,०००; ग्रामीण: ₹२,५००.
नियम: शून्य-बॅलन्स खाती उपलब्ध. दंड: खात्याच्या प्रकारावर अवलंबून.
५. बँक ऑफ बडोदा

किमान शिल्लक: जुलै २०२५ पासून सामान्य बचत खात्यांमध्ये कोणताही दंड नाही. प्रीमियम खात्यांमध्ये ₹५००–₹२,००० (स्थानानुसार).
अटी: काही खात्यांमध्ये शून्य-बॅलन्स पर्याय उपलब्ध आहे.

‘तांबव्याचा विष्णूबाळा’ रुपेरी पडद्यावर अवतरणार 

मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनेता सयाजी शिंदे यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्रत्येक भूमिका अगदी लीलया साकारणारे सयाजी शिंदे यांनी त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत नुकतीच त्यांनी ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या महत्त्वपूर्ण चित्रपटाची घोषणा केली आहे. 

सातारा जिल्ह्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या तांबवे गावातील विष्णू बाळा पाटील यांच्या संघर्षाची कथा या चित्रपटातून उलगडणार आहे. सत्यघटनेवर आधारलेल्या, रक्तरंजित संघर्षाचा नायक असलेल्या विष्णूबाळाची मध्यवर्ती भूमिका सयाजी शिंदे साकारणार असून मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांची मांदियाळी या भव्य चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. ‘विश्वविनायक सिनेमॅटिक सफारी फिल्म एलएलपी प्रोडक्शन’ बॅनरअंतर्गत येणाऱ्या ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या चित्रपटाचे लेखन अरविंद जगताप यांचे असून दिग्दर्शन अनुप जगदाळे करणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते मनोहर जगताप आहेत. हा चित्रपट मराठीसोबत हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सातारच्या ग्रामीण भागात घडलेल्या या सूडनाट्याचा थरार जनसामान्यांना अचंबित करणारा असणार आहे, असा विश्वास सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक अनुप जगदाळे आपल्या या नव्या कलाकृतीबद्दल बोलताना सांगतात कि, ‘काहीतरी नवीन आणि वेगळा अनुभव देणारा चित्रपट करावा असं मनात होतं. सयाजी शिंदे यांच्या साथीने ही सत्यकथा भव्यदिव्य स्वरूपात मांडण्याची कल्पना सुचली. एक वेगळ्या धाटणीचा कथाविषय आणि दमदार कलाकार यांना एकत्र पहाण्याची पर्वणी प्रेक्षकांना या चित्रपटामुळे लाभणार आहे.

गावच्या भाऊबंदकीतून आणि श्रेयवादातून सख्ख्या चुलत भावांमध्ये विकोपाला गेलेला वाद आणि त्यातून कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी विष्णूबाळाने केलेला रक्तरंजित संघर्ष ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.  

२००१ साली ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ हा मराठी चित्रपट आला होता. यात सयाजी शिंदे यांच्यासोबत अनेक मात्तबर कलाकारांनी भूमिका केल्या होत्या. आता पुन्हा एकदा नव्या कलाकारांच्या संचात हा चित्रपट भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.