Home Blog Page 173

एअर इंडियाचा प्रमोशनल सेल ‘नमस्ते-वर्ल्ड’

·         देशांतर्गत प्रवासासाठी सर्वसमावेशक एकेरी भाडे 1,499 रुपयांपासून

·         आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सर्वसमावेशक राउंड-ट्रिप भाडे 12,310 रुपयांपासून

·         सवलत मूल्याची सवलत 15 ऑगस्टपर्यंत

·         थेट ऑनलाइन बुकिंग केल्यास कोणतेही सुविधा शुल्क नाही आणि अतिरिक्त सवलती

गुरुग्राम10 ऑगस्ट 2025: एअर इंडियाने ‘नमस्ते वर्ल्ड’ प्रमोशनल सेल सुरू केला आहे. या अंतर्गत एअरलाइनच्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर तिकिटाचे सर्वसमावेशक आकर्षक दर उपलब्ध आहेत. या विशेष ऑफरचा भाग म्हणून, देशांतर्गत एकेरी प्रवासासाठी 1,499 रुपयांपासून तिकीट दर सुरू होतात तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी दुहेरी प्रवासाचे तिकीट दर 12,310 रुपयांपासून सुरू होतात.

दरातील ही सवलत 15 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 23:59 वाजेपर्यंत लागू असेल. या सवलत मूल्यांतर्गत बूक केलेल्या तिकिटांवर 31 मार्च 2026 पर्यंत प्रवास करता येईल. इंटरनॅशनल सेल पॉईंट्सवरही ही तिकिटे बूक करता येतील. तेथे संबंधित देशाचे तिकीट दर स्थानिक चलनांमध्ये दिलेले आहे.

पहिल्या दिवशी वेब-एक्सक्लुझिव्ह

‘नमस्ते वर्ल्ड’ सेल हा 10 ऑगस्ट 2025 रोजी केवळ एअर इंडियाच्या वेबसाइट आणि मोबाइल ऍपवर उपलब्ध असेल. त्यानंतर, या सेल अंतर्गत तिकिटांचे बुकिंग एअर इंडिया वेबसाइट, मोबाइल ऍप, विमानतळावरील तिकीट खिडक्या, ग्राहक संपर्क केंद्र आणि ट्रॅव्हल एजंट यासह अन्य सर्व चॅनेलवर उपलब्ध असेल.

थेट बुकिंगचे फायदे

एअर इंडियाची वेबसाइट आणि मोबाईल ऍपवरून तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांना हा सेल सुरू असतानाच्या काळात कोणतेही सुविधा शुल्क भरावे लागणार नाही. याव्यतिरिक्त, FLYAI हा प्रोमो कोड वापरून प्रवासी प्रति व्यक्ती INR 1,000 पर्यंत बचत करू शकतात, तसेच VISAFLY या प्रोमो कोडचा वापर करून व्हिसा कार्डद्वारे पेमेंट केल्यास प्रति प्रवासी ₹2,500 पर्यंत सूट मिळू शकते.

व्हिसा कार्डवरील ऑफर्स
प्रवाससवलतप्रोमो कोड
देशांतर्गत (एकेरी)थेट INR 250 ची सवलत VISAFLY
देशांतर्गत (दुहेरी)INR 500 ची सवलत
आंतरराष्ट्रीय (एकेरी)INR 1,500 पर्यंत सवलत
आंतरराष्ट्रीय (दुहेरी)INR 2,500 पर्यंत सवलत


विशेष सहाय्यक ऑफर्ससह प्रवासाचा उत्तम अनुभव

‘नमस्ते वर्ल्ड’ सेलला पूरक म्हणून, लोकप्रिय सहाय्यक सेवांवर एअर इंडिया विशेष डील देखील देत आहे. यामुळे प्रवाशांना अनोख्या किमतीत अनेक सुविधांसह प्रवासाचा आनंद घेता येईल. एअर इंडियाने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना प्रीपेड बॅगेजवर 60% पर्यंत सूट मिळेल तर पसंतीच्या आणि अतिरिक्त लेगरूमच्या सीट निवडीवर 15% पर्यंत सूट मिळू शकेल. एअर इंडियाच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष चॅनेलच्या माध्यमातून बुकिंगवर या ऑफर मिळतील. यामुळे सवलत मूल्यात अधिक आराम आणि सुविधा मिळतील.

आंतरराष्ट्रीय मार्गांवरील दुहेरी प्रवासतिकीट दरांचा अंदाज
(भारतातून बाहेर प्रवासनमुनादाखल यादी)
सेक्टर चलनइकॉनॉमीप्रीमियम इकॉनॉमीबिझनेस
भारत-यूके INR 44,50095,000 1,43,000 
भारत-युरोप INR  44,000 75,5311,30,000 
भारत-कॅनडा INR 62,199NA 1,77,399
भारत-ऑस्ट्रेलिया INR 51,317 NA1,63,291
भारत-यूएसए INR 49,6351,05,6661,90,666
भारत-श्रीलंकाINR12,31023,13022,050
भारत-यूएई INR 18,06022,300 58,650 
भारत-सिंगापूर INR 14,02023,760 43,260 
भारत-थायलंड INR 21,03024,37062,350 
भारत-इंडोनेशिया INR 46,910 69,570 1,58,980 
भारत-मलेशिया INR 22,18025,720 62,640 
भारत-जपान INR 38,070 NA1,56,970 
आंतरराष्ट्रीय मार्गांवरील सर्वसमावेशक दुहेरी तिकिटांच्या दराचा अंदाज
(भारतातील प्रवासनमुनादाखल यादी)
सेक्टर चलनइकॉनॉमीप्रीमियम इकॉनॉमीबिझनेस
यूके – भारत GBP 4406851,530
युरोप-भारत EUR  423708 1,350 
कॅनडा- भारत CAD 1,059NA 2,879
ऑस्ट्रेलिया- भारत AUD 830 NA3,898
यूएसए-भारत USD 5411,1222,847
यूएई-भारत AED 730810 2,350 
सिंगापूर -भारतSGD 212358716 
थायलंड-भारत THB 7,7808,580 26,880 
इंडोनेशिया-इंडिया IDR 86,85,0001,47,98,000 2,97,01,000 
मलेशिया-भारत MYR 1,1801,280 3,130 
जपान-इंडिया JPY 70,100 2,10,8002,81,400 


या सेलमध्ये मर्यादित जागा आहेत आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्या उपलब्ध आहेत. याशिवाय देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील निवडक मार्गांसाठी हा सेल असेल. तसेच विनिमय दर आणि करांमुळे वेगवेगळ्या शहरांमधील तिकिटाच्या दरात किरकोळ बदल होऊ शकतो.

मुख्य मंत्रीसाहेब..पुण्याला अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक)मिळण्यासाठी मुहूर्त कधी आहे ?

माजी आमदार मोहन जोशी यांचा सवाल

पुणे : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलीस खात्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) पद निर्माण करून सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक सरकारने करणे गरजेचे आहे. पण, ती नेमणूक करण्यासाठी मुख्य मंत्री साहेब मुहूर्त कधी लागणार? अशी विचारणा माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (रविवारी) पत्रकाद्वारे केली आहे.

पुण्याच्या वाहतुकी संदर्भात मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे भेटीत बैठक घेऊन घोषणा केल्या. या घोषणांची पूर्तता होण्यासाठी आणखी पंचवीस, तीस वर्षे लागणार आहेत. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी तातडीने दिलासा देण्याची गरज आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

मुंबईच्या धर्तीवर पुण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) नेमावे, या पदावरील व्यक्तीला प्रशासकीय अधिकारी अधिक असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने उपाययोजनांची अंमलबजावणी करता येते. याकरिता तीन वर्षांपासून काँग्रेस पक्ष मुख्य मंत्री आणि पालकमंत्र्यांकडे मागणी करीत आहे. ही मागणी मान्य करून कार्यवाही करावी, असे आवाहन मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका व्हावी या विषयाला काँग्रेस पक्षाने प्राधान्य दिले आहे. मेट्रो रेल योजना काँग्रेसने आणली, बीआरटी मार्ग चालू केले. बीआरटी मार्गाची गरज मुख्य मंत्र्यांना आता वाटू लागली पण त्यांच्याच भाजपने विरोध करून योजना हाणून पाडायचा प्रयत्न केला. मेट्रो कामाला तीन वर्षांचा विलंब भाजप नेत्यांमधील वादामुळे झाला, असेही मोहन जोशी यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

नवीन ट्रॅक्टर नियम शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार-आमदार सतेज पाटील यांचा आरोप

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मसुदा अधिसूचनेमुळे देशभरातील कोट्यवधी शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अधिसूचनेत ट्रॅक्टरसाठी जीपीएस ब्लॅक बॉक्ससारखी उपकरणे सक्तीने बसवण्याची तरतूद आहे. ही अधिसूचना म्हणजे थेट शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा असल्याचा आरोप काँग्रेसचे विधनपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केला.

या नव्या नियमांमुळे ट्रॅक्टर मालकांवर ३०,००० रुपयांहून अधिकचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार असून, ग्रामीण भागात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरसाठी ही तांत्रिक साधने पूर्णतः अनावश्यक आहेत. या मसुदा अधिसूचनेत ‘हॉलेज ट्रॅक्टर’साठी

जिपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस, प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये एआयएस-140 प्रमाणित लोकेशन ट्रॅकर बसवणे बंधनकारक केले आहे. ब्लॅक बॉक्स, अपघाताची नोंद ठेवण्यासाठी ‘इव्हेंट डेटा रेकॉर्डर’ अनिवार्य केले आहे. ट्रॉलीसाठी नवे महागडे मेकॅनिकल कपलिंग व इलेक्ट्रिकल कनेक्टर बंधनकारक. केले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

“शेती करणाऱ्या ट्रॅक्टरवर हवाई प्रवासासारखी तंत्रज्ञाने कशाला?”

“शेतीमध्ये फक्त १०-१५ किमी वेगाने वापरला जाणारा ट्रॅक्टर कुठल्या अपघाताचे रेकॉर्ड ठेवणार? शहरात बसलेले अधिकारी हे नियम तयार करताना शेतकऱ्याचे वास्तव विसरतात,” असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला.

शेतकऱ्यांना हरकती नोंदवण्याचे आवाहन

सरकारने १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत या अधिसूचनेवर हरकती नोंदवण्याची मुदत दिली असून, आमदार पाटील यांनी सर्व शेतकरी, ट्रॅक्टर मालक आणि शेतकरी संघटनांना खालील ई-मेलवर हरकती पाठवण्याचे आवाहन केले.

“सरकारने ‘हॉलेज ट्रॅक्टर’ची व्याख्या स्पष्ट करून शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरना या नियमांतून वगळावे किंवा ही अधिसूचना तात्काळ रद्द करावी,” अशी मागणी त्यांनी केली.शेतकऱ्यांना आधीच महागाई, निसर्गाचा लहरीपणा आणि उत्पादन खर्चात वाढ यांचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी हे नवे नियम त्यांना आणखी अडचणीत टाकणारे ठरणार असल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.

कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांच्या प्रयत्नातून राज्य विकासाच्या मार्गावर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे प्रतिपादन

बोपोडी येथील पाणी साठवण टाकीचे लोकार्पण

पुणे:

स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून करण्यात येणारा पाठपुरावा, त्याला मिळणारी लोकप्रतिनिधींची साथ, मंत्री व खुद्द मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आबेडकर हॉकी स्टेडीयम चिखलवाडी, बोपोडी येथे समान पाणी पुरवठा प्रकल्पा अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या ३० लाख लिटर क्षमतेच्या पाणी साठवण टाकीचे उद्घाटन आज (दि. १०) आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या च्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, माजी नगरसेका सनी निम्हण , रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे , शिवाजीराव मतदारसंघ अध्यक्ष अविनाश कदम , माजी नगरसेवक आनंद छाजेड, दलीत पँथर चे अध्यक्ष यशवंत नडगम , खडकी बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अभय सावंत, सामजिक कार्यकर्ते बाळासाहेब रांनवडे  , बी एल येडे , ॲड सुनील जपे ॲड रीटा उपाध्याय , शहाबुद्दीन काजी, राजेश अग्रवाल, खडकीचे पोलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम, श्याम काची, योगेश करनूर, अमित मोहिते, अप्पासाहेब वाडेकर, अनिल जोशी, सादिक शेख यांच्यासह परिसरातील विविध सोसायट्यांचे अध्यक्ष, प्रतिनिधी उपस्थित होते.

पुढे बोलताना शिरोळे म्हणाले, विकासाची ही गती यापुढेही कायम ठेवली जाणार असून बोपोडी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम साठी राज्य शासन आणि महापालिकेकडून निधी उपलब्ध करून देऊन खेळाडूंसाठी अध्ययवत सुविधा उभारल्या जातील. त्याचप्रमाणे या परिसरातील रुग्णालयांना अत्याधुनिक स्वरूप प्राप्त करून देऊन नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्याचा संकल्प असल्याचे शिरोळे यांनी यावेळी सांगितले.

या परिसराच्या विकासात रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे संघटक सचिव परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीताबाई वाडेकर यांचे मोठे योगदान असल्याचा उल्लेखही शिरोळे यांनी आवर्जून केला. विशेषतः जनसेवेसाठी सुनीताताई यांची जिद्द आणि आत्मीयता प्रभावित करणारी ठरली, असेही त्यांनी नमूद केले.

महायुती सरकारच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या साथीने स्थानिक पातळीपासून राज्य पातळीपर्यंत विकास आणि वेग घेतला असून विरोधक दीर्घकाळ विरोधातच राहतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

प्रास्ताविक करताना परशुराम वाडेकर म्हणाले, लोकप्रतिनिधी असून देखील गेली आठ वर्ष आमच्या घरात टँकर चे पाणी येत आहे. त्यामुळे पाण्याची या भागात किती गरज आहे याची जाणीव झाली. त्यामुळे वैयक्तिकरीत्या पाठपुरावा करून बोपोडी भागातील पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न केले. या कामात येथील सर्वपक्षीय नगरसेवकांची मदत झाली. असे सांगत या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, त्याप्रमाणेच येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम हे देखील आमच्या जिव्हाळ्याचे आहे. त्याचा प्रश्नही सोडवावा ही विनंती शिरोळे यांना वाडेकर यांनी यावेळी केली.

सनी निम्हण म्हणाले, गेली आठ, नऊ वर्ष वाडेकर यांच्या कडून चिकाटीने बोपोडी भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आज राखीपोर्णिमेच्या निमित्ताने पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून येथील महिला भगिनींना ओवाळणी मिळाल्याचा आनंद आहे.

आनंद छाजेड म्हणाले, सुरवातीला बोपोडी भागात 24 तास पाणी येत होते. पण कालांतराने लोकसंख्या वाढली. अन् पाणी हळू हळूहळू कमी येऊ लागलं. मात्र आता या पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून येथील रहिवाश्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

सूत्रसंचालन ॲड. ज्ञानेश्र्वर जावीर यांनी केले, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.

विविध समुदायातील युवा महिला खेळाडूंचा शोध घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे खेलो इंडियाचे उद्दिष्ट्य- क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

खेलो इंडिया अस्मिता हा क्रीडा क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठीचा एक सकारात्मक  कार्यक्रम – युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जळगाव-केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांच्या हस्ते आज महाराष्ट्रात जळगाव इथल्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर खेलो इंडिया अस्मिता फुटबॉल लीग 2025-26 चे उद्घाटन झाले. क्रीडा क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठीचे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दिशेनेच सकारात्मक कृतीच्या भक्कम तत्वावर ही लिग स्पर्धा होईल. या तत्त्वाला धरूनच विविध समुदायातील युवा महिला खेळाडूंचा शोध घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा या लिग स्पर्धेचे उद्दिष्ट आहे.

या संपूर्ण दिवसभराच्या स्पर्धात्मक उपक्रमाच्या निमित्ताने 13 वर्षांखालील खेळाडू एकत्र आले होते.  यावेळी रक्षा खडसे यांनी उपस्थितांना संबोधित केले. ही लिग स्पर्धा म्हणजे आवडीचे कामगिरीत रूपांतर करणारा उपक्रम आहे, महिलांमध्ये क्रीडा क्षेत्राशी संबंधित दडलेल्या सुप्त प्रतिभेला’ वाव देणे हा या लीगचा उद्देश आहे असे त्यांनी सांगितले. पहिल्यांदाच खेळणाऱ्या खेळाडूंपासून ते आजही इतरांच्या नजरेत न आलेले विजेते, अशा प्रत्येकाला व्यासपीठ देण्यासाठीच या लीगची आखणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

या लीगचे व्यापक उद्दिष्टही त्यांनी अधोरेखित केले. ही लीग स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित नसून, अडथळ्यांवर मात करण्याच्या वृत्तीशीही संबंधित असल्याचे त्या म्हणाल्या. हा एक सकारात्मक कृती कार्यक्रम असून, यातून आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायांसह इच्छुक महिला खेळाडूंना प्रकाशझोतात आणण्यासाठी टाकलेले एक मोठे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.

खेलो इंडिया अस्मिता लीग हा’ खेलो भारत धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणी आणि महिला सक्षमीकरणासाठी खेळांना प्रोत्साहन दिले जात आहे. ही लीग युवा मुलींसाठी एक समर्पित व्यासपीठ असून, यामुळे पूर्वापार चालत आलेला असमतोल दूर करून नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत.

जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या सचिव केतकीताई पाटील आणि फारुख शेख यांच्यासह अनेक मान्यवर या लीगच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. यासोबतच महाविद्यालयाच्या प्रशासनातील प्रतिष्ठित सदस्यही या समारंभात सहभागी झाले होते. या सहभागातून या उपक्रमाला मिळालेल्या व्यापक संस्थात्मक पाठबळाचीही प्रचिती आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  बंगळूरु इथे सुमारे 22,800 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी


ऑपरेशन सिंदूरचे यश, सीमेपलीकडील दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्याचे सामर्थ्य आणि दहशतवाद्यांना पाठबळ पुरवणाऱ्या पाकिस्तानला काही तासांमध्ये गुडघे टेकायला लावण्याची क्षमता, हे भारताचे नवे रूप संपूर्ण जगाने पाहिले आहे : पंतप्रधान

आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी एक प्रमुख अर्थव्यवस्था आहे  : पंतप्रधान

गेल्या 11 वर्षांमध्ये आपली अर्थव्यवस्था 10 व्या स्थानावरून पहिल्या पाचमध्ये पोहोचली, आता आपण आघाडीच्या  तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत : पंतप्रधान

डिजिटल इंडियाच्या सोबतीनेच विकसित भारताची वाटचाल पुढे जात राहील  : पंतप्रधान

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होणे, हेच आपले पुढचे सर्वात मोठे प्राधान्य असायला हवे  : पंतप्रधान

बंगळूरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकमध्ये बंगळूरु इथे सुमारे 7,160 कोटी रुपये खर्चाच्या बंगळूरु मेट्रोच्या यलो लाइनचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी 15,610 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बंगळूरु मेट्रो टप्पा -3 प्रकल्पाची पायाभरणीही केली. यासोबतच त्यांनी के.एस.आर. रेल्वे स्थानकावर तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडाही दाखवला.

यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले.  कर्नाटकच्या भूमीवर पाऊल ठेवताच आपल्याला आपलेपणा जाणवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कर्नाटकाची समृद्ध संस्कृती, इथल्या लोकांचे प्रेम आणि मनाला स्पर्श करणारी कन्नड भाषेची गोडी, याचा उल्लेखही त्यांनी आपल्या संबोधनात केला. आपल्या संबोधनाला सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळूरुची अधिष्ठात्री देवी अण्णम्मा तायी यांच्या चरणी वंदनही केले. शतकांपूर्वी नाद प्रभू केम्पेगौडा यांनी बंगळूरु शहराचा पाया रचला होता, याचे स्मरण त्यांनी करून दिले. केम्पेगौडा यांनी परंपरांशी जोडलेल्या आणि प्रगतीची नवी उंची गाठणाऱ्या शहराची कल्पना मांडली होती, असे पंतप्रधानांनी सांगितले. या विचारांचा आत्मा बंगळूरुने कायमच जगला आणि जपला आहे, आणि आज बंगळूरु तेच स्वप्न साकार करत आहे असे पंतप्रधान म्हणाले.

आज उदयाला येत असलेले बंगळूरु हे शहर नव्या भारताच्या उदयाचे प्रतीक बनले असल्याचे ते म्हणाले. बंगळुरू शहराच्या अंतरंगात तत्वज्ञानाचा दृष्टीकोन असल्याचे ते म्हणाले. या शहरातल्या प्रत्येक घडामोडीत तांत्रिक कौशल्य दिसून येते. बंगळूरुने भारताला माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक नकाशावर अभिमानाचे स्थान मिळवून दिले आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केले. बंगळूरुच्या यशाचे श्रेय इथल्या लोकांचे कठोर परिश्रम आणि त्यांच्यातल्या प्रतिभेचे आहे असे ते म्हणाले.

21 व्या शतकात, शहर नियोजन आणि शहर पायाभूत सुविधा या आपल्या प्रत्येक शहरांच्या महत्त्वाच्या गरजा असल्याची बाब पंतप्रधानांनी नमूद केली. त्या अनुषंगानेच बंगळूरुसारख्या शहरांनी भविष्यासाठी सज्ज असणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.  गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने बंगळूरुसाठी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले असून, आज या मोहिमेला नवी गती मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या या भेटीत पंतप्रधानांनी बंगळूरु मेट्रोच्या यलो लाइनचे उद्घाटन केले तसेच मेट्रो फेज-3 ची पायाभरणीही केली. देशाच्या वेगवेगळ्या भागांना जोडणाऱ्या तीन नव्या वंदे भारत गाड्यांनाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. बंगळूरु आणि बेळगावी दरम्यान वंदे भारत सेवा सुरू झाल्याने बेळगावीमधील व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याव्यतिरिक्त, नागपूर आणि पुणे, तसेच श्री माता वैष्णो देवी कटरा आणि अमृतसर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. या रेल्वे सेवांचा लाखो भाविकांना फायदा होईल आणि पर्यटनालाही चालना मिळेल असे ते म्हणाले. या प्रकल्पांसाठी आणि नवीन वंदे भारत गाड्यांसाठी त्यांनी बंगळूरु, कर्नाटक आणि संपूर्ण देशातील जनतेचे अभिनंदनही केले.

ऑपरेशन सिंदूरनंतर आपली बंगळूरुची ही पहिलीच भेट असल्याचे त्यांनी नमूद केले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय संरक्षण दलांनी मिळवलेले यशही त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले.  सीमेपलीकडे दूरवर असलेले दहशतवाद्यांचे तळ तिथपर्यंत पोहचून नष्ट करण्याची भारताच्या संरक्षण क्षमताही त्यांनी अधोरेखित केली. दहशतवाद्यांना पाठबळ पुरवणाऱ्या पाकिस्तानला काही तासांत गुडघे टेकायला लावण्याच्या भारताच्या क्षमतेबद्दल त्यांनी उपस्थितांना सांगितले. आत्ताच्या नवीन भारताचे हे नवे रूप संपूर्ण जगाने पाहिले आहे असे ते म्हणाले.  ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे श्रेय हे तंत्रज्ञानाची ताकद आणि संरक्षण क्षेत्रातील मेक इन इंडियाच्या सामर्थ्याचे आहे असे त्यांनी सांगितले. या यशात बंगळूरु आणि कर्नाटकातील तरुणांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा दखलपूर्ण उल्लेख त्यांनी केला तसेच, या यशातील भूमिकेबद्दल सर्वांचे अभिनंदनही केले.

आता जगातील प्रमुख शहरांच्या यादीत बंगळूरुची दखल घेतली जात असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. भारताने जागतिक स्तरावर केवळ स्पर्धाच नव्हे, तर नेतृत्वही केले पाहिजे असे ते म्हणाले. आपली शहरे स्मार्ट, वेगवान आणि कार्यक्षम असतील, तरच प्रगती साध्य करता येईल ही बाबही त्यांनी नमूद केली. आधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यावर सरकारचा मोठा भर असल्याचे त्यांनी सांगितले. आर.व्ही. रोड ते बोम्मसंद्रा दरम्यानच्या बंगळूरु मेट्रोच्या यलो लाइनची सुरुवात झाल्याची घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली. या मेट्रो रेल्वे मार्गिकेमुळे  बंगळूरुमधील अनेक महत्त्वाचे भाग परस्परांशी जोडले जातील. बासवनागुडी आणि इलेक्ट्रॉनिक सिटी दरम्यान प्रवासाच्या वेळेतही आता मोठी बचत होईल, यामुळे लाखो लोकांचे जगणे आणि काम करणे सुलभ होईल असे ते म्हणाले.

यलो लाइनच्या उद्घाटनाच्या बरोबरीनेच बंगळूरु मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याची – अर्थात ऑरेंज लाइनची – पायाभरणीही झाली असल्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली.  ही ऑरेंज लाइन सुरू झाल्यावर, यलो लाइनसोबत मिळून दररोज 25 लाख प्रवाशांना प्रवासाची सोय उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. यामुळे बंगळूरुची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि नवी  उंची गाठेल असे ते म्हणाले. बंगळूरु मेट्रो रेल्वे सेवेने देशात सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या विकासाच्या संदर्भात एक नवीन आदर्श निर्माण केला असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.  इन्फोसिस फाऊंडेशन, बायोकॉन  आणि डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या कंपन्यांनी अनेक महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांसाठी काही प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असल्याचा दखलपूर्ण उल्लेखही पंतप्रधानांनी केला. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधी अर्थात  CSR चा अशा रितीने झालेला उपयोग प्रेरणादायी असल्याचे अधोरेखित करून या योगदानाबद्दल त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्राचे अभिनंदनही केले.

भारत हा सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारी एक प्रमुख अर्थव्यवस्था आहे. गेल्या अकरा वर्षांत, जागतिक पटलावर भारताची अर्थव्यवस्था 10 व्या स्थानावरून पहिल्या पाचमध्ये पोहोचली आहे आणि आता पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. Reform, Perform and Transform या भावनेतून, सुस्पष्ट उद्दिष्टे आणि प्रामाणिक प्रयत्नांसह केल्या जात असलेल्या सुधारणांमुळेच ही गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांची प्रगती आणि विस्ताराबद्दलही पंतप्रधानांनी उपस्थितांना माहिती दिली. 2014 मध्ये मेट्रो सेवाचा विस्तार फक्त पाच शहरांपुरता मर्यादित होता, मात्र आज, 24 शहरांमध्ये 1,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत मेट्रो रेल्वे सेवेचे जाळे पसरले आहे, आणि यामुळे भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठे मेट्रो जाळ्याचा विस्तार असलेला देश बनला आहे, असे त्यांनी सांगितले. 2014 पूर्वी, देशात केवळ 20,000 किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले होते, मात्र गेल्या अकरा वर्षांत तब्बल 40,000 किलोमीटरपेक्षा जास्त रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले असून, ही शाश्वत वाहतूक विकासाच्या प्रक्रियेतली एक मोठी झेप असल्याचे ते म्हणाले.

आता भारताचे यश केवळ जमिनीपुरते मर्यादित राहिले नसून ते गगनात देखील भरारी घेत असल्याची बाब त्यांनी नमूद केली. 2014 मध्ये भारतात केवळ 74 विमानतळ होते, आणि आज ही संख्या 160 पेक्षा जास्त झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जलमार्गांशी संबंधित पायाभूत सुविधांमध्येही मोठी प्रगती झाली असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. देशात 2014 मध्ये फक्त तीन राष्ट्रीय जलमार्ग कार्यरत होते, आता ही संख्या आता तीसवर पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भारताने घेतलेल्या महत्त्वपूर्ण झेप बाबत बोलताना,  मोदी यांनी अधोरेखित केले की, 2014 पर्यंत देशात केवळ 7 एम्स  आणि 387 वैद्यकीय महाविद्यालये होती, तर आज 22 एम्स आणि 704 वैद्यकीय महाविद्यालये लोकांची सेवा करत आहेत. पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या 11 वर्षांत देशभरात एक लाखांहून अधिक नवीन वैद्यकीय जागांची भर घालण्यात आली आहे. या विस्ताराचा परिणाम स्पष्ट करताना त्यांनी वाढलेल्या संधींमुळे मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना कशा प्रकारे फायदा झाला आहे त्याकडे लक्ष वेधले.  मोदी यांनी पुढे सांगितले की, गेल्या 11 वर्षांत आयआयटींची  संख्या 16 वरून 23, आयआयआयटींची (IIITs) संख्या 9 वरून 25 आणि आयआयएमची  संख्या 13 वरून 21 झाली आहे. आज विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध आहेत, असे ते म्हणाले.

राष्ट्र वेगाने प्रगती करत असताना, गरीब आणि वंचित लोकांचे जीवन त्याच वेगाने बदलत आहे, असे सांगत पंतप्रधानांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4 कोटींपेक्षा जास्त पक्की घरे देण्यात आल्याची माहिती दिली.सरकारने आता आणखी 3 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे त्यांनी जाहीर केले.  मोदी यांनी सांगितले की, केवळ 11 वर्षांत देशभरात 12 कोटींहून अधिक शौचालये बांधली गेली आहेत. या उपक्रमामुळे कोट्यवधी माता आणि भगिनींना सन्मान, स्वच्छता आणि सुरक्षितता मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.

“देशातील विकासाला भारताच्या आर्थिक वाढीमुळे मोठी गती मिळत आहे,” असे  मोदी यांनी नमूद केले. 2014 पूर्वी भारताची एकूण निर्यात केवळ 468 अब्ज डॉलर होती, तर आज ती 824 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, आधी भारत मोबाईल फोनची आयात करत असे, पण आता मोबाईल हँडसेटच्या पहिल्या पाच निर्यातदार देशांमध्ये भारताचा समावेश आहे. या बदलात बंगळूरुने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी नमूद केले.  मोदी यांनी पुढे सांगितले की, 2014 पूर्वी भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात सुमारे 6 अब्ज डॉलर होती, ती आता वाढून जवळपास 38 अब्ज डॉलर झाली आहे.

अकरा वर्षांपूर्वी भारताची ऑटोमोबाईल(स्वयंचलित वाहने) निर्यात सुमारे 16 अब्ज डॉलर होती, ती आज दुप्पट होऊन भारत जगातील चौथा सर्वात मोठा ऑटोमोबाइल निर्यातदार बनला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. या कामगिरीमुळे आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक मजबूत होत आहे आणि देश आगेकूच करत राहील आणि विकसित भारताची उभारणी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“विकसित भारताचा प्रवास डिजिटल इंडियाच्या सोबतीने पुढे जाईल,” असे सांगत  मोदी यांनी इंडिया एआय मिशन सारख्या उपक्रमांमुळे भारत जागतिक एआय नेतृत्वाकडे वाटचाल करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, सेमीकंडक्टर मिशनलाही गती मिळाली असून, लवकरच भारताकडे आपली स्वतःची ‘मेड-इन-इंडिया’ चिप असेल. कमी खर्चात उच्च-तंत्रज्ञान अंतराळ मोहिमा राबवणारे राष्ट्र म्हणून भारत एक जागतिक उदाहरण बनला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारत भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या सर्व क्षेत्रांत प्रगती करत आहे आणि या प्रगतीचा सर्वात उल्लेखनीय पैलू म्हणजे गरिबांचे झालेले सक्षमीकरण आहे, यावर त्यांनी भर दिला. डिजिटायझेशन आता देशाच्या प्रत्येक गावात पोहोचले असून, यूपीआयमुळे (UPI) जगातील 50% पेक्षा जास्त रिअल-टाइम व्यवहार भारतात होतात, असे पंतप्रधानांनी सांगितले. तंत्रज्ञान सरकार आणि नागरिकांमधील दरी कमी करत आहे, असे सांगताना ते म्हणाले की, आज 2,200 पेक्षा जास्त सरकारी सेवा मोबाईलवर उपलब्ध आहेत. उमंग ऍपमुळे नागरिक घरबसल्या सरकारी कामे पूर्ण करू शकतात, तर डिजीलॉकरमुळे सरकारी प्रमाणपत्रे सांभाळण्याचा त्रास संपला आहे, असे त्यांनी सांगितले. भारत आता एआय-शक्तीवर आधारित धोके शोधण्यासारख्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. डिजिटल क्रांतीचे फायदे समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावेत, हेच आपले उद्दिष्ट आहे, यावर त्यांनी भर दिला. या राष्ट्रीय प्रयत्नात बंगळूरु सक्रीय योगदान देत असल्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होणे, ही आपली पुढील मोठी प्राधान्यक्रमाची बाब असली पाहिजे,” असे पंतप्रधानांनी जाहीर केले. भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांनी जगभरात आपली छाप सोडली आहे आणि संपूर्ण जगासाठी सॉफ्टवेअर आणि उत्पादने विकसित केली आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले. आता भारताच्या स्वतःच्या गरजांना अधिक महत्त्व देण्याची वेळ आली असून, नवीन उत्पादनांच्या विकासाला गती देण्याची गरज आहे, विशेषतः प्रत्येक क्षेत्रात सॉफ्टवेअर आणि ऍप्सचा वापर होत असताना हे महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी जोर दिला. या क्षेत्रात भारताने नवीन उंची गाठणे आवश्यक आहे, असे  मोदी म्हणाले. उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये नेतृत्व करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे सांगताना, ‘मेक इन इंडिया’ आणि उत्पादन क्षेत्रात बंगळूरु आणि कर्नाटकची उपस्थिती मजबूत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भारताच्या उत्पादनांनी ‘झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट’ या मानकांचे पालन करावे, म्हणजेच उत्पादने गुणवत्तेत निर्दोष असावीत आणि पर्यावरणावर कोणताही नकारात्मक परिणाम होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. कर्नाटकची प्रतिभा आत्मनिर्भर भारताच्या या दृष्टिकोनाचे नेतृत्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोदी यांनी सांगितले की, केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकारे, सर्वच जनतेची सेवा करण्यासाठी वचनबद्ध आहेत, आणि नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. या दिशेने नवीन सुधारणांची अंमलबजावणी करणे ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या दशकात केंद्र सरकारने सातत्याने सुधारणा पुढे नेल्या आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. कायद्यांमधील गुन्हेगारी तरतुदी रद्द करण्यासाठी जन विश्वास विधेयक मंजूर केल्याचे उदाहरण त्यांनी दिले आणि जन विश्वास 2.0 देखील आणले जात असल्याचे जाहीर केले. त्यांनी राज्य सरकारांना अनावश्यक फौजदारी तरतुदी असलेले कायदे ओळखण्याचे आणि ते रद्द करण्याचे आवाहन केले. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य-आधारित प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने मिशन कर्मयोगी उपक्रमाचा  मोदी यांनी उल्लेख केला. राज्ये त्यांच्या अधिकाऱ्यांसाठीही हा शिक्षण आराखडा स्वीकारू शकतात, असे त्यांनी सुचवले. आकांक्षी जिल्हा कार्यक्रम आणि आकांक्षी तालुका कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करत पंतप्रधानांनी राज्यांना विशेष लक्ष देण्याची गरज असलेल्या प्रदेशांची ओळख करण्यास सांगितले. निरंतर सुधारणांच्या प्रयत्नांचे आवाहन करत, या संयुक्त उपक्रमांमुळे कर्नाटक विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल आणि आपण सर्वजण मिळून विकसित भारताचे स्वप्न साकार करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, केंद्रीय मंत्री मनोहरलाल, एच. डी. कुमारस्वामी, अश्विनी वैष्णव, व्ही. सोमण्णा, शोभा करंदलाजे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी बंगळूरु मेट्रोच्या फेज-2 अंतर्गत आर. व्ही. रोड (रागीगुड्डा) ते बोम्मसंद्र या यलो लाईन प्रकल्पाचे उद्घाटन केले. 19 किमी पेक्षा जास्त लांबीच्या या मार्गावर 16 स्थानके असून, यासाठी सुमारे 7,160 कोटी रुपये खर्च आला आहे. या यलो लाईन प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे बंगळूरुचे मेट्रो जाळे 96 किमी पेक्षा जास्त झाले आहे, ज्यामुळे या भागातील मोठ्या लोकसंख्येला फायदा होईल.

पंतप्रधानांनी 15,610 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या बंगळूरु मेट्रोच्या फेज-3 प्रकल्पाची देखील पायाभरणी केली. या प्रकल्पाची एकूण लांबी 44 किमी पेक्षा जास्त असून, यात 31 उन्नत स्थानके असतील. हा पायाभूत प्रकल्प निवासी, औद्योगिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील शहराच्या वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करेल.

पंतप्रधानांनी बंगळूरुमधून 3 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यात बंगळूरु ते बेळगावी, अमृतसर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा आणि नागपूर (अजनी) ते पुणे या गाड्यांचा समावेश आहे. या हाय-स्पीड रेल्वेगाड्यांमुळे प्रादेशिक संपर्क मोठ्या प्रमाणात वाढेल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रवाशांना जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव मिळेल.

नागपूर ते पुणे… आता फक्त 12 तासांत!

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (ऑनलाईन) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे ‘नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ’ कार्यक्रम संपन्न झाला. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर ते पुणे हे अंतर सुमारे 12 तासांत पूर्ण होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे 5 तासांनी कमी होणार आहे. नागपूर (अजनी) -पुणे वंदे भारत एक्सप्रेस वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड येथून दौंड कॉर्डलाइन मार्गे पुण्याला पोहोचेल. या सेवेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील धार्मिक स्थळांपर्यंतचा प्रवास सुलभ होणार असून व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर ते पुणे मोठ्या प्रमाणावर प्रवास होतो, परंतु सध्या प्रवाशांना खासगी बसेसचे महागडे तिकीट घेऊन प्रवास करावा लागतो. राज्य सरकारच्या विनंतीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सकारात्मक प्रतिसादातून वंदे भारत सेवा सुरू झाली आहे. नागपूर-पुणे ही देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस आहे. तसेच नगर-दौंड मार्गे पुणे येथे जाणाऱ्या विद्यमान मार्गाऐवजी नगर ते पुणे असा थेट रेल्वे मार्ग उभारल्यास अंतर आणि वेळ दोन्ही वाचतील, याबाबतही नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पुणे या औद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी रेल्वेचे नवीन मार्ग निर्माण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके तसेच रेल्वेचे अधिकारी, विद्यार्थी, प्रवासी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हडपसर मध्ये कोयते वापरणाऱ्या गुन्हेगारांची शोध मोहीम

पुणे-हडपसर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची राबवलेल्या विशेष मोहिमेत कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चार कोयते जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला वाचवू पाहणाऱ्या त्याच्या आईलाही सहआरोपी करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये विश्वजित उर्फ यश रामचंद्र मोरे (वय २०, रा. गोंधळेनगर, हडपसर) याचा समावेश असून त्याच्यासह एका अल्पवयीन आणि त्याच्या आईविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी रात्री अकरा ते पहाटे दोन वाजेपर्यंत शहरातील विविध भागांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन मध्ये सराईत गुन्हेगारांची अचानक तपासणी करण्यात आली. हडपसर पोलिसांनी मोरे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, अल्पवयीनाने कोयते घरात लपवल्याचे उघड झाले. चौकशीत हे कोयते लपवण्यासाठी त्याच्या आईने परवानगी दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी चार कोयते जप्त केले.

ही कारवाई परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे, अश्विनी जगताप, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अविनाश गोसावी, अमित साखरे, बापू लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजित राऊत, महेश चव्हाण आणि पथकाने केली.

पोलिसांनी या गुन्ह्यात अल्पवयीनाच्या आईला सहआरोपी करत पालकांकडून गुन्हेगारी कृत्यांना मिळणाऱ्या पाठिंब्याविरुद्ध कारवाईचा इशारा दिला आहे. यापूर्वीही अल्पवयीनांना वाहने चालविण्यास देणाऱ्या पालकांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते. शहरात कोयते उगारून दहशत माजविणाऱ्या गुंडांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कृषी अवजारे विक्री करणाऱ्यांनी खातरजमा करूनच कोयत्यांची विक्री करावी आणि ती सराईत वा अल्पवयीनांना करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आजच्या महिलांनी जिजामातेची भूमिका बजावण्याची गरज!

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

‘झाल’ उपक्रमातील माहेरवाशिणींचा एकत्रिकरण सोहळा संपन्न

पुणे-नवीन पिढी संस्कारक्षम घडविण्यासाठी महिलांनी जिजामातांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पीढिवर संस्कार केले पाहिजेत. कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठिमागे महिला भक्कम उभी राहते, त्यामुळेच तो पुरुष यशस्वी होतो, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मध्ये राबविण्यात आलेल्या ‘झाल’ उपक्रमातील माहेरवाशिण महिलांचा एकत्रिकरण सोहळा आशिष गार्डन येथे संपन्न झाला. यावेळी उद्योजिका स्मिता पाटील, माजी नगरसेविका आणि भाजपा मध्य मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हर्षाली माथवड, माजी नगरसेविका अँड वासंती जाधव, छाया मारणे, डॉ. श्रद्धा प्रभूणे-पाठक यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले की, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्यामुळे शिवाजी महाराज घडले आणि त्यांनी हिंदवी साम्राज्य उभा केलं. कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठिमागे महिला भक्कम उभी राहते, त्यामुळेच तो पुरुष यशस्वी होतो. त्यामुळे नवीन पीढि संस्कारक्षम घडविण्यासाठी महिलांनी जिजामातांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पीढिवर संस्कार केले पाहिजेत,

ते पुढे म्हणाले की, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रमाणेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आदर्श समाज निर्माण करण्यासाठी मंदिरांची पुनरबांधणी केली. त्याशिवाय त्यांचा राज्य कारभार इतका आदर्श होता की, त्यांनी आजही त्यातील काही मूल्ये ही दीशादर्शक आहेत. त्यांच्यासोबतच, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, सावित्रीमाई फुले, महाराणी ताराराणी यांसारख्या अनेक महिलांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला. त्यामुळे तसाच आदर्श आजच्या महिलांनी उभा करावा, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला कोथरुडमधील अनेक माहिला आणि रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या झाल उपक्रमातील अनेक नववधू उपस्थित होत्या. त्यापैकी काहींनी ना. पाटील यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

आयुक्तांच्या हकालपट्टीची दलित अत्याचार प्रतिबंधक कृती समितीची मागणी

सोमवारी विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या अपमानाविरुद्ध महामोर्चा आणि निषेध सभेचे आयोजन

पुणे (दि. १० ऑगस्ट २०२५) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा रद्द करावा, या मागणीसाठी मागील आठवड्यात काढण्यात आलेल्या मोर्चात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे सहभागी झाले होते. राजशिष्टाचारानुसार या मोर्चाला सामोरे जाण्याची नैतिक जबाबदारी आयुक्त शेखर सिंह यांची होती. परंतु आयुक्त सिंह अथवा अतिरिक्त आयुक्त देखील या मोर्चाला सामोरे गेले नाहीत. आयुक्तांची ही वर्तणूक राजशिष्टाचार पायदळी तुडवणारी आहे, तसेच आण्णा बनसोडे हे अनुसूचित जाती, जमाती समाजाचे प्रतिनिधी असल्यामुळे आयुक्तांनी मोर्चाला सामोरे जाण्याचे टाळले याचा निषेध करण्यासाठी आणि आयुक्त शेखर सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यासाठी दलित अत्याचार प्रतिबंधक कृती समिती, पिंपरी चिंचवडच्या वतीने सोमवारी (दि. ११ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता, पिंपरी येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळा येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. यानंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे.
रविवारी पिंपरी चिंचवड येथे शिव, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या प्रतिनिधींची व दलित अत्याचार प्रतिबंधक कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये रिपब्लिकन नेते सुरेश निकाळजे, बाबा कांबळे, राहुल डंबाळे, बाळासाहेब रोकडे, संतोष निसर्गंद, कुणाल वाव्हळकर, अजीज शेख, गोपाल तंतरपाळे, प्रमोद क्षीरसागर, सिकंदर सूर्यवंशी, अजय झुंबरे, योगेश भोसले, संजय शर्मा, रवींद्र ओव्हाळ, यश बोध, गंगा ताई धेंडे, बळीराम काकडे, रमेश शिंदे, संतोष वाघमारे, चंद्रकांत बोचकुरे, प्रवीण वाघमारे, ॲड. नीलध्वज माने, पंकज वाघमारे, नजीर मुलाणी आदी या बैठकीमध्ये उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह यांचे हे कृत्य भारतीय संविधानाच्या कलम १४ (समता), कलम १५ (जातीच्या आधारावर भेदभाव प्रतिबंध) आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ अंतर्गत दंडनीय अपराध असून, आयुक्तांच्या जातीवादी मानसिकतेचे स्पष्ट द्योतक आहे अशी भावना पिंपरी चिंचवड शहरात आंबेडकरी चळवळीत कार्य करणाऱ्या जनतेमध्ये निर्माण झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील बहुजन मागासवर्गीय आणि कष्टकरी जनता अण्णा बनसोडे यांच्या अपमानाचा तीव्र निषेध करते. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि आयुक्त शेखर सिंह यांची हकालपट्टी करून कडक कारवाई करावी या मागणीसाठी या मोर्चा सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
उपेक्षित आणि वंचित समाजाचे नेतृत्व करीत असताना आण्णा बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष पदावर काम केले आहे. तसेच पिंपरी येथून तिसऱ्यांदा आमदार म्हणून ते निवडून आले आहेत. आता महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष या संविधानिक पदावर काम पाहत आहेत. सामान्य कार्यकर्ता ते विधानसभेचे उपाध्यक्ष पद हा त्यांचा राजकीय प्रवास आंबेडकरी चळवळीतील जनतेला प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाला सामोरे जाण्याचे ऐतसे कर्ज यांनी टाळले हा आंबेडकरी चळवळीचा आपण असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्वाची हमी दिली आहे. संविधानाचे राज्य असलेल्या या देशात, मागासवर्गीय व्यक्ती उच्च पदावर पोहोचल्याची खंत आयुक्त सिंह यांच्या वर्तणुकीतून व्यक्त होते अशा आयुक्तांची हकालपट्टी झालीच पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरातील शिव-फुले-शाहू-आंबेडकरवादी संघटना, पुरोगामी समाजवादी चळवळीचे कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी संविधानिक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आणि सामाजिक न्यायासाठी या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रविवारी झालेल्या बैठकीत करण्यात आले.

कोथरूड मधील केसरी अपार्टमेंटमध्ये २२ लाखांची घरफोडी

पुणे- कोथरूड येथील रामबाग कॉलनीतील केसरी अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी दोन सदनिका फोडून २२ लाख १७ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी शान चिटणीस (५१) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शान चिटणीस यांची केसरी अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर दोन नंबरची सदनिका आहे. त्याचबरोबर पहिल्या नंबरची सदनिकाही याच इमारतीत आहे. ते दरवाजाला कुलूप लावून बाहेर गेले असताना चोरट्यांनी सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप व लॅच तोडून घरात प्रवेश केला.

चोरट्यांनी लाकडी कपाटाचे ड्रॉवर उचकटून त्यामधील हिऱ्यांचे दागिने, सोन्याचे दागिने, चांदीची नाणी आणि रोख रक्कम असा एकूण २२ लाख १७ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सदनिका एक आणि दोन मध्ये चोरी झाल्याची नोंद केली आहे.

भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर, देश यशाचा झेंडा फडकवतोय_PM मोदींचा दावा

पंतप्रधानांनी ३ वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला

बंगळुरू-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांना उत्तर दिले. मोदींनी बंगळुरूमध्ये म्हटले- भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आपण १० व्या क्रमांकावरून पहिल्या ५ व्या क्रमांकावर आलो आहोत. लवकरच पहिल्या ३ मध्ये येऊ. ही ताकद सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनातून आली आहे. देशाच्या कामगिरीचा झेंडा आकाशात उंच फडकत आहे.पंतप्रधान आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी बंगळुरूमधील केएसआर रेल्वे स्थानकावर ३ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये बंगळुरू ते बेळगाव, अमृतसर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा आणि नागपूर (अजनी) ते पुणे या गाड्यांचा समावेश आहे.

ऑपरेशन सिंदूरबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले- भारतीय सैनिकांची दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला गुडघे टेकण्याची क्षमता संपूर्ण जगाने पाहिली आहे. त्याच्या यशामागे आपल्या तंत्रज्ञानाची आणि मेक इन इंडियाची शक्ती आहे. बंगळुरूच्या तरुणांनीही यात मोठे योगदान दिले आहे.पंतप्रधानांनी बंगळुरू आणि राज्यासाठी अनेक विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केली. या प्रकल्पांचा एकूण खर्च २२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पंतप्रधानांनी बंगळुरू मेट्रोच्या यलो लाईनचेही उद्घाटन केले. ही लाईन आरव्ही रोड (रागीगुड्डा) ते बोम्मासंद्रा पर्यंत जाईल.


मोदींच्या भाषणातील ६ महत्त्वाचे मुद्दे…

यलो मेट्रो लाईनच्या आगमनाने लाखो लोकांना फायदा होईल. आज ऑरेंज लाईनचा पायाभरणी समारंभही झाला. त्याच्या उद्घाटनानंतर, यलो आणि ऑरेंज मेट्रो लाईन्सचा २५ लाख लोकांना फायदा होईल. इन्फोसिससह अनेक मोठ्या कंपन्यांनी बंगळुरू मेट्रोला निधी दिला. याबद्दल कॉर्पोरेट क्षेत्राचे अभिनंदन.
भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आपण १० व्या क्रमांकावरून पहिल्या ५ मध्ये पोहोचलो आहोत. लवकरच आपण पहिल्या ३ मध्ये येऊ. ही ताकद सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनातून आली आहे. देशाच्या कामगिरीचा झेंडा आकाशात उंच फडकत आहे.
२०१४ पूर्वी ७४ विमानतळ होते आणि त्यांची संख्या १६० पेक्षा जास्त आहे. फक्त ३ राष्ट्रीय जलमार्ग होते, आता ही संख्या ३० झाली आहे. ११ वर्षांपूर्वी ७ एम्स होते, आता २२ एम्स आणि ७०० वैद्यकीय महाविद्यालये आहेत. २०१४ पूर्वी भारताची एकूण निर्यात ४६८ अब्ज डॉलर्स होती. आज ती ८२४ अब्ज डॉलर्स आहे.
भारत जागतिक एआयच्या दिशेने पुढे जात आहे. सेमीकंडक्टर मिशनला गती मिळत आहे. मेड इन इंडिया चिप्स लवकरच उपलब्ध होतील. भविष्याशी संबंधित तंत्रज्ञानात भारत पुढे जात आहे.
पूर्वी आपण मोबाईल फोन आयात करायचो पण आज आपण टॉप ५ निर्यातदारांपैकी एक झालो आहोत. यामध्ये बंगळुरूची खूप मोठी भूमिका आहे. २०१४ पूर्वी आपली इलेक्ट्रॉनिक निर्यात ६ अब्ज डॉलर्स होती जी आता ३८ अब्ज डॉलर्स झाली आहे. ऑटोमोबाईल निर्यात १६ अब्ज डॉलर्स होती जी आता दुप्पट झाली आहे.
योग्य सुधारणा ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. भारत सरकारने कायद्याला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी जन विश्वास विधेयक मंजूर केले आणि लवकरच ते २.० देखील मंजूर करेल. राज्य सरकारनेही अशी विधेयके मंजूर करावीत.

देशाचे मेट्रो नेटवर्क जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सध्या, भारतातील मेट्रो नेटवर्क जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे आणि लवकरच ते दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क बनणार आहे. असा अंदाज आहे की देशभरातील मेट्रो दररोज सुमारे १ कोटी लोकांना सेवा देतात.

बंगळुरूमध्ये शहरी कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या शुभारंभानंतर पंतप्रधान मोदी एका जाहीर सभेला संबोधित करतील, जिथे ते येत्या काळात शहर आणि राज्याच्या विकासाच्या रोडमॅपवर चर्चा करण्याची शक्यता आहे.

धर्माविरोधात जाल, तर कोर्टालाही मानणार नाही; वेळ पडल्यास शस्त्र हातात घेऊ:जैन मुनींचा इशारा

मुंबई-कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाद्य टाकण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी कायम ठेवल्यानंतर जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाचा आदेश लागू असूनही अलीकडेच दादर कबुतरखान्याजवळ काही जैन बांधवांनी कबुतरांना धान्य टाकले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना थांबवले. या कारवाईनंतर जैन समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, 13 ऑगस्टपासून उपोषणाला बसणार आहेत. तर वेळ पडल्यास शांतताप्रिय असणारा आमचा समाज शस्त्रंही हातात घेईल आणि कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नसल्याचा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना जैन मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले, आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग वापरणार आहोत. शस्त्र उचलणे हा आमचा स्वभाव नाही, पण धर्माविरोधात पाऊल उचलले गेले तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही भारताचे संविधान, कोर्ट आणि सरकारला मानतो, परंतु आमच्या धार्मिक तत्त्वांवर गदा आणली तर आम्ही कोणालाही मानणार नाही.

जैन मुनी पुढे म्हणाले, 13 ऑगस्टपासून आम्ही उपोषणाला बसणार आहोत. मी एकटा आंदोलनाला बसणार नाही. देशभरातील 10 लाख जैन बांधव इकडे उपोषणाला बसतील. गरज पडल्यास शांतताप्रिय समाज असतानाही आम्ही धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही. कोर्टाच्या आदेशालाही आम्ही जुमानणार नाही.

निलेशचंद्र विजय यांनी आरोप केला की, हा निर्णय राजकीय हेतूने आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला गेला आहे. आमच्या ‘पर्युषण पर्वा’नंतर पुढचा निर्णय घेऊ. जीवदया हा आमच्या धर्माचा मूलभूत सिद्धांत आहे. मुंगीपासून हत्तीपर्यंत कुठल्याही जीवाचा वध होऊ नये, असे आमच्या धर्मात सांगितले आहे. मग जैन धर्मालाच का लक्ष्य केले जात आहे? असा सवालही त्यांनी केला. दारू व मांसाहारामुळे किती लोक मरतात, हेही दाखवा, असे निलेशचंद्र वियज यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य टाकण्यास बंदी असतानाही, काही लोक त्याचे उल्लंघन करत आहेत. याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेने आता कठोर पावले उचलली असून, अशा व्यक्तींवर कडक कारवाई सुरू केली असून, दंड आकारण्यात येत आहे. 13 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत पालिकेने 142 प्रकरणे नोंदवली असून, एकूण 68 हजार 700 रुपये दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक दंड हा चर्चेत असलेल्या दादर पश्चिम भागातील कबुतरखान्यावरून गोळा करण्यात आला आहे. या ठिकाणी 51 व्यक्तींकडून 22 हजार 200 रुपये दंड वसूल झाला आहे.

सामजाची गरज ओळखूनच उपक्रम आखणं ही मोदीजींची शिकवण- ना. चंद्रकांतदादा पाटील

कोथरुडने कलाक्षेत्राला अनेक दिग्गज मान्यवर दिले- ना. मुरलीधर मोहोळ

आंतरसोसयटी एकांकीका स्पर्धेसारखे उपक्रम हे केवळ कोथरुडमध्येच शक्य- प्रशांत दामले

पुणे- कोथरुडने कलाक्षेत्राला अनेक दिग्गज कलावंत दिले आहेत. त्यामुळे कोथरुडकर मंडळी ही कलाकारच आहेत, अशी भावना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली. तर समाजाची गरज ओळखून उपक्रम आखणं ही मोदीजींची शिकवण आहे, अशी भूमिका नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धेसारखे उपक्रम हे केवळ पुण्यात आणि कोथरुडमध्येच होऊ शकतात, असे कौतुकोग्दार प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी काढले.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड विधानसभा मतदारसंघात आयोजित आंतर सोसायटी एकांकीका स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा आज येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, कोथरुड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, स्पर्धेचे परिक्षक यशोधन बाळ, भालचंद्र करंदीकर, अनुराधा राजहंस, संयोजक मधुरा वैशंपायन, अशुतोष वैशंपायन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, सर्वसामान्यपणे लोकप्रतिनीधी निवडताना आपण सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणाऱ्या व्यक्तीला निवडून देत असतो. मात्र, चंद्रकांतदादा पाटील हे केवळ नागरिकांच्या अडीअडचणी सोडवत नाहीत, तर मर्यादेच्या पलिकडे जाऊन काम करतात, ही त्यांची खासियत आहे. कोथरुडने कलाक्षेत्राला अनेक दिग्गज दिले आहेत. त्यामुळे कोथरुडकर मंडळी ही कलाकार आणि दर्दी आहेत, हे सांगण्याची गरज नाही. आंतर सोसायटीला मिळालेला उत्सफूर्त प्रतिसाद हे त्याचेच द्योतक आहे.

ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, समाजाची गरज ओळखून कार्यक्रम आखणं ही मोदीजींची शिकवण आहे. ते मुख्यमंत्री असल्यापासून त्यांच्या माध्यमातून कर्णवतीमध्ये अनेक मुलांचे मोफत शिक्षण होत आहे. स्वामी विवेकानंद आणि जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी देखील समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुखी समाधानी करण्यासाठी काम केलं पाहिजे, ही शिकवण दिली. त्यातूनच आदर्श घेऊन, कोथरुड विधासभा मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आंतर सोसायटी एकांकीका स्पर्धा ही त्यांपैकीच एक असल्याची भावना ना. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच, हौशी गायकांसाठी सप्टेंबर मध्ये वेगळी स्पर्धा घेण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

यावेळी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनीही एकांकिका स्पर्धेचे मुक्तकंठाने कौतुक केले. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार दडलेला असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपले आत्मपरिक्षण केल्यास, त्याला त्याच्यातील कलेची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. कोथरुडमध्ये नाटकाचे प्रयोग यशस्वी का होतात, हे आज मला स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमामुळे लक्षात आलं. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला आंतरसोसयटी एकांकिका स्पर्धेचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, अशा प्रकारचा उपक्रम केवळ कोथरुडमध्येच शक्य आहे, अशी भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोथरुडच्या इंद्रधनू सोसायटीने सादर केलेल्या ‘पापक्षालन’ या एकांकीकेने पहिले पारितोषिक पटकावले. तर सूस-पाषाण येथील कृष्ण-कमल सोसायटीची ‘मळभ’ एकांकिका आणि बाणेरच्या नंदन प्रॉसपेराने सादर केलेल्या हिप्पोपोटेमसचे पोस्टमार्टमला द्वितीय पारितोषिक विभागून देण्यात आले. तिसरं पारितोषिक देखील सृष्टी सोसायटीच्या ‘गुलाबी सिर’, बळवंत पूरम साम्राज्य ‘द कॉन्शन्स’ला विभागून देण्यात आले.

महापालिकेच्या निवडणुका महायुतीच्या वतीने लढविल्या जाणार असल्याच्या पक्षश्रेष्ठीच्या सूचना : शिवसेना नेत्या तथा उपसभापती विधानपरिषद डॉ नीलम गोऱ्हे

पुणे- पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेत्या आणि उपसभापती विधानपरिषद डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते शिवसेना सदस्य नोंदणी आणि आरोग्य शिबिराचा कार्यक्रम उदघाटन नुकताच पार पडले. या कार्यक्रमाचे उपशहरप्रमुख नितीन पवार यांनी आयोजन केले होते.

त्यावेळी डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा महायुतीचा बालकिल्ला आहे. पण कोथरूड आणि शिवाजीनगर हे दोन मतदारसंघ तसेच पुण्यातील अनेक भाग शिवसेनेचे बालकिल्ले राहिल्याचे सांगत त्या पुढे म्हणाल्या की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. आता येत्या कालावधीत महानगरपालिकेची निवडणुक होणार आहे. त्या निवडणुका महायुतीच्या वतीने लढविल्या जाणार असल्याच्या सूचना पक्षश्रेष्ठीच्या असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य शिबिराबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राज्यभरात महायुती सरकाराच्या माध्यमांतून आरोग्य शिबिराचे आयोजन केले जात आहे. त्या शिबिराना नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. त्यातून एखाद्या नागरिकांनाला कोणत्याही आजाराचे निदान झाल्यास तात्काळ पुढील उपचार दिले जात आहे.जेणेकरून भविष्यातील आरोग्या विषयक धोके टाळणे शक्य होते.त्या दृष्टीने आज कोथरूड विधानसभा मतदारसंघात आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.या आरोग्य शिबिराचा लाभ प्रत्येकाने घ्यावा,या निमित्ताने मी सर्वांना एक सांगू इच्छिते की, आपल्या सर्वांच्या पाठीशी महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे.तसेच आपल्या सर्वांचे आशिर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू द्या,असे आवाहन देखील त्यांनी उपस्थित नागरिकांना त्यांनी केले.

यावेळी युवासेना सचिव किरण साळी, सहसंपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुनाईत, शहरप्रमुख श्रद्धा शिंदे, अनिकेत जावळकर, सुप्रिया पाटेकर, मीनल धनवटे, विराज डाकवे, सुनील काकडे, राजू गोखले, उदय भेलके, लखन तोंडे, शुभम कांबळे, सुनील पासलकर, युवराज शिंगाडे, राजू विटकर, सुधीर जोशी तसेच तज्ञ् डॉक्टर्स उपस्थित होते.