Home Blog Page 172

सह्याद्रि हॉस्पिटलमध्‍ये रोबोटिक शस्त्रक्रिया :महिला रूग्‍णाच्‍या छातीमधून दुर्मिळ १७ सेमी आकाराचा एक्‍टोपिक थायरॉईड ट्यूमर काढला

जगातील सर्वात मोठा एक्टॉपिक थायरॉईड ट्यूमर यशस्वीपणे रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला

पुणे, ऑगस्ट ११, २०२५ – एका दुर्मिळ आणि उच्च-जोखीम असलेल्या केसमध्ये, पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी प्रगत रोबोटिक-सहाय्यित शस्त्रक्रियेच्या माध्यमातून ६२ वर्षीय महिलेच्या छातीतून आतापर्यंतचा सर्वात मोठा एक्टॉपिक ट्यूमर — १७ x १२ x ११ सेमी आकाराचा आणि ८०० ग्रॅम वजनाचा — यशस्वीरित्या काढला. या ट्यूमरचे निदान दुर्मिळ एक्टोपिक थायरॉईड गोइटर म्हणून झाले. ही अत्यंत दुर्मीळ स्थिती आहे, जेथे थायरॉईड ग्रंथी (gland) चुकीच्या ठिकाणी विकसित होते आणि मानेतील सामान्य थायरॉईड ग्रंथीशी तिचा कोणताही संबंध नसतो. अशा केसेस अत्यंत असामान्य आहेत आणि १००,००० ते ३००,००० व्‍यक्‍तींपैकी फक्‍त एका व्‍यक्‍तीमध्‍ये दिसून येते. सह्याद्रि हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या बहुविद्याशाखीय टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. या टीममध्ये सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. विनोद गोरे, लॅपरोस्कोपिक व रोबोटिक सर्जन डॉ. संजय कोलते आणि डॉ. फुलचंद पुजारी, कार्डिओथोरेसिक सर्जन डॉ. स्वप्निल कर्णे, भूलतज्ञ डॉ. विकास कर्णे आणि डॉ. बालाजी मोमले यांचा समावेश होता. सुरक्षित व यशस्वी क्लिनिकल निष्‍पत्ती सुनिश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया काळजीपूर्वक नियोजनाने आणि प्रगत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पार पाडण्यात आली. 

रुग्ण प्रथम छातीत जडपणाच्या तक्रारी घेऊन आलास्कॅनमध्ये छातीच्या मध्यभागीहृदयश्वासनलिका आणि प्रमुख रक्तवाहिन्या असलेल्या भागात मोठा ट्यूमर दिसून आलाही केस अपवादात्मक होती, जेथे तिच्या मानेतील थायरॉईड ग्रंथी पूर्णपणे सामान्य होतीतरीही ट्यूमर थायरॉईड टिश्यू असल्याचे दिसून आलेसुरुवातीला तो ट्यूमर थायमोमा असल्यासारखा वाटत होता,  पण बायोप्सीत तो दुर्मिळ एक्टॉपिक थायरॉईड गोइटर असल्याचे स्पष्ट झाले., असे सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलडेक्कन जिमखानापुणे येथील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉविनोद गोरे म्हणाले.

हा ट्यूमर हृदय, सुपीरियर व्हेना कावा (मोठी शिरा), एओर्टा आर्क (प्रमुख धमनी), पल्‍मनरी ट्रंक (फुफ्फुसामधील मुख्‍य नस) व धमन्या आणि हृदयाचे संरक्षक आवरण असलेले पेरीकार्डियम अशा महत्वाच्या रचनांजवळ धोकादायकपणे स्थित होता. यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक बनली. खरेतर, इतर राज्यांमधील अनेक हॉस्पिटल्‍सनी यापूर्वी ट्यूमरचे स्थान आणि आकारामुळे त्‍याच्‍यावर उपचार करता येणार नाही असे मानले होते.

शस्त्रक्रियेची प्रक्रिया स्पष्ट करताना डॉविनोद गोरे म्हणाले, “शस्त्रक्रिया उच्‍च अचूकतेने आणि कमीत-कमी जोखीमेने करण्यासाठी आम्ही रोबोटिक-सहाय्यित दृष्टिकोन निवडला. यामध्ये बरगड्यांमध्‍ये, विशेषतः ७व्या आणि ९व्या इंटरकोस्टल स्पेसमध्ये लहान कट करत रोबोटिक उपकरण टाकण्‍यात आले. रॉबोटिक सिस्टीममुळे छातीच्या भागाचा मोठा आणि स्पष्ट (3D view) दृश्य मिळालं आणि मानवी हातापेक्षा जास्त नियंत्रण आणि लवचिकता मिळाली, जे एवढ्या छोट्या आणि अवघड भागात खूप उपयोगी ठरलं. आम्ही ट्यूमरला छातीच्या अस्तरापासून (प्ल्युरा) हळूवारपणे वेगळे करून सुरुवात केली आणि वर जाणाऱ्या महाधमनी व फुफ्फुसीय धमन्यांमधील अरुंद, खोल भागातून मार्ग काढला. रोबोटिक उपकरणामधून शरीराच्‍या प्रत्‍यक्ष स्थितीबाबत अभिप्राय मिळत नसल्यामुळे – ज्याला हॅप्टिक अभिप्राय म्हणतात – कोणत्याही मोठ्या रक्‍तवाहिन्यांना नुकसान होऊ नये म्हणून आम्हाला दृश्य संकेतांवर आणि आमच्या अनुभवावर पूर्णपणे अवलंबून राहावे लागले.”

डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील भूलशास्त्र विभाग प्रमुख डॉविकास कर्णे म्‍हणाले, “या केसमध्ये श्वसनमार्ग सांभाळणे हे सगळ्यात मोठं आव्हान ठरलं. ट्यूमरमुळे मुख्य धमनी बाजूला झाली होती आणि श्वासनलिका दाबली गेली होती, त्यामुळे सामान्य पद्धतीने नळी घालणे (इंट्यूबेशन) खूपच धोकादायक होतं. आम्ही फायबर-ऑप्टिक इंट्यूबेशन केले. हे अत्यंत विशेष तंत्र आहे, ज्यामुळे आम्हाला भूल देण्यापूर्वी श्‍वसनमार्ग पूर्ववत करता आला. संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा दृष्टिकोन आवश्यक होता.”

बहुतेक ट्यूमर रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आला असला तरी, मर्यादित जागा आणि जवळच्या रक्‍तवाहिन्यांमुळे वरच्या बाजूला असलेल्या लहान भागापर्यंत सुरक्षितपणे पोहोचता आले नाही. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी टीमने मिनी-स्टर्नोटोमी केली, म्‍हणजेच छातीच्या हाडाच्या वरच्या भागात एक लहान सर्जिकल कट केले. यामुळे ट्यूमरच्या शेवटच्या भागापर्यंत पोहोचता आले आणि ट्यूमर सुरक्षितपणे व गुंतागूंतीशिवाय काढण्‍यात आला.

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्क्न जिमखाना, पुणे येथील लॅपरोस्कोपिक व रोबोटिक सर्जन डॉ. संजय कोलते म्‍हणाले, “या ट्यूमरचा मानेमधील थायरॉईड ग्रंथीशी कोणताही प्रत्‍यक्ष संबंध नसल्याचे आढळून आले, ज्यामुळे तो खरा एक्टोपिक गोइटर असल्याचे सिद्ध झाले. ही अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे. रूग्‍णामध्‍ये इनोमिनेट शिरा आणि कॅरोटिड धमन्यांजवळील लहान रक्‍तवाहिन्यांमधून रक्‍तपुरवठा सुरू झाला, ज्या आम्ही प्रक्रियेदरम्यान काळजीपूर्वक सील केल्या. आवाज नियंत्रित करणाऱ्या नसांपैकी एक असलेल्‍या डावीकडील रिकरंट लॅरिंजियल नर्व्हवर कदाचित दाब किंवा ताणामुळे परिणाम झाला होता, तर उजवी नस योग्‍यरित्‍या कार्य करत होती. अशा गुंतागुंतीच्या केसेसमध्ये, विशेषतः अवघड व खोल भागांपर्यंत पोहोचताना, रोबोटिक शस्त्रक्रिया अधिक अचूकता आणि नियंत्रणामुळे अत्यंत प्रभावी ठरते.”

“शस्त्रक्रिया कमीत-कमी रक्‍तस्त्रावासह पूर्ण झाली आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला रक्‍त संक्रमण किंवा व्हेंटिलेटर सपोर्टची गरज भासली नाही. वेदनांवर योग्‍यरित्‍या व्‍यवस्‍थापन करण्‍यात आले आणि रिकव्‍हरी प्रक्रिया सुलभ होती. छातीमध्‍ये लहान चीर करण्‍यासह संपूर्ण ट्यूमर काढण्‍यात आला आणि छातीचा पिंजरा (स्‍टर्नम) सिंगल वायरसह योग्‍य स्थितीत आणण्‍यात आला.” अशी माहिती सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, पुणे येथील लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. फुलचंद पुजारी यांनी दिली.

या केसबाबत मत व्‍यक्‍त करत डॉ. गोरे म्‍हणाले, “या शस्त्रक्रियेमधून अत्यंत गुंतागूंतीच्या ट्यूमरच्या व्यवस्थापनात रोबोटिक तंत्रज्ञानाचे महत्त्व दिसून येते. काळजीपूर्वक नियोजन, अनुभवी डॉक्‍टर आणि योग्य साधनांसह अशा दुर्मिळ व धोकादायक परिस्थितींवर देखील प्रभावीपणे उपचार केले जाऊ शकतात. आमचा ट्यूमर काढून टाकण्‍यासह शक्य तितक्या सुरक्षित आणि कमीत-कमी इन्‍वेसिव्‍ह पद्धतीने उपचार करण्‍याचा मनसुबा होता.” 

ही केस हे एक दुर्मिळ उदाहरण आहे की अत्यंत गुंतागुंतीच्या वैद्यकीय परिस्थितीतसुद्धा प्रगत शस्त्रक्रिया तंत्र, बारकाईने केलेले नियोजन आणि अनेस्‍थेसिया व कार्डियोव्‍हॅस्‍कुलर टीम यांच्यातील समन्वयामुळे अपवादात्मक निष्पत्ती साधता येते. या शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. स्वप्निल कर्णे यांनी प्रभावी हृदय-संबंधित सपोर्ट प्रदान केला, तसेच रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी हार्ट-लंग मशीन अत्यावश्यक बॅकअप म्हणून सतत स्टँडबायवर ठेवण्यात आले होते.

डॉ. शर्वरी इनामदार यांना ‘बेस्ट लिफ्टर इंडिया’ सह दुहेरी मुकुट

‘मास्टर क्लासिक व इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग’ स्पर्धा

दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या जागतिक पावरलिफ्टिंग स्पर्धेसाठी झाली निवड
पुणे : पुण्याच्या डॉक्टर शर्वरी इनामदार यांनी व्ही. के. कृष्णमेनन इंडोर स्टेडियम कोझिकोड येथे झालेल्या ‘मास्टर क्लासिक व इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग’ स्पर्धेत क्लासिक व इक्विप्ड या दोन्ही प्रकारात विजयश्री खेचून आणली. विविध राज्यातील स्पर्धकांसोबत चुरशीची लढत देत त्यांनी महाराष्ट्रासाठी सात सुवर्णपदके व एक रजत पदकांची कमाई केली. महिलांच्या ५७  किलो वजनी गटात दुहेरी मुकुट पटकावत त्यांनी मानाचा ‘बेस्ट लिफ्टर ऑफ इंडिया’ म्हणजेच स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडिया हा किताब आठव्यांदा पटकवला.

देशभरातील सुमारे ५६० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. गेल्या ३० वर्षातील सर्वात उच्चांकी खेळाचे प्रदर्शन या  स्पर्धेत झाले. या स्पर्धेत  गोवा, तेलंगणा, ओडिसा, मध्यप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, दिल्ली, छत्तीसगड आदी राज्यांच्या खेळाडूंसोबत त्यांची लढत झाली.

डॉक्टर शर्वरी इनामदार यांना पती डॉक्टर वैभव इनामदार यांचे मार्गदर्शन लाभले. दिनांक १० ते १९ ऑक्टोबर दरम्यान केप टाऊन -साऊथ आफ्रिका येथे होणाऱ्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप साठी त्यांची निवड झाली आहे.

डॉ. शर्वरी इनामदार म्हणाल्या, या स्पर्धेच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली याचा आनंद आहे. या स्पर्धेत भारतासाठी पदक मिळवण्याचे ध्येय आहे. आई -वडील, कुटुंबीय व मित्रपरिवार यांच्या पाठिंब्यामुळेच उच्च पातळीवरचे यश मिळवणे शक्य होते, असेही त्यांनी सांगितले.

महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाचे पाच नवीन विक्रम; एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान

मुंबई, ११ ऑगस्ट २०२५: शून्य विद्युत अपघातासाठी जनजागृती अभियानातील विविध उपक्रमांत लोकसहभागाचे महावितरणने नवीन पाच विक्रम नोंदवून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान प्राप्त केले आहे. या दोन्ही संस्थांच्या वतीने सोमवारी (दि. ११) पाचही विक्रमाच्या नोंदीचे प्रमाणपत्र व सन्मानपदक प्रदान करून महावितरणचा गौरव करण्यात आला. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या संकल्पनेतून विद्युत सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानातील लोकसहभागाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतल्याबद्दल त्यांनी सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या परीक्षक कश्मिरा मयंक शाह यांनी विद्युत सुरक्षा अभियानातील लोकसहभागाच्या पाच विक्रमांची घोषणा केली. त्यांनी या दोन्ही संस्थांच्या वतीने संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक श्री. परेश भागवत (मानव संसाधन), श्री. प्रसाद रेशमे (प्रकल्प), सौ. स्वाती व्यवहारे (वित्त) यांना प्रमाणपत्र व सन्मानपदक प्रदान करून महावितरणचा सन्मान केला. यावेळी एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या परीक्षक कश्मिरा शाह यांनी महावितरणच्या पाचही विक्रमांची माहिती दिली. संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले, की ‘लोकसहभागातून शून्य विद्युत अपघात जनजागृती अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या अभियानाची व्याप्ती आणखी वाढविण्यात येईल.’  

महावितरणने यंदा २० व्या वर्धापन दिनानिमित्त दि. १ ते ६ जून दरम्यान विद्युत सुरक्षेच्या जनजागृतीसाठी राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले होते यात सुरक्षा संदेश देणाऱ्या मॅरेथॉनमध्ये ११ हजार ८८१, ऑनलाइन प्रश्नमंजूषेत ९६ हजार १५०, शालेय निबंध व चित्रकला स्पर्धेत ७ हजार ५९३, विद्युत सुरक्षेच्या रॅलीमध्ये २७ हजार १५५ जण सहभागी झाले होते. तसेच दि. ६ जूनला एकाचवेळी ४२ हजार २०१ जणांनी विद्युत सुरक्षेची शपथ घेतली. यासह महावितरणकडून १ कोटी ९२ लाख ७९ हजार ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे तर ३५ लाख ७३ हजारांवर ग्राहकांना नोंदणीकृत इमेलद्वारे विद्युत सुरक्षेचा संदेश देण्यात आला. या सर्व उपक्रमांत तब्बल २ लाख ११ हजारांवर नागरिक, शालेय विद्यार्थी, अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.

भारत सरकारकडे नोंदणीकृत व वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीशी संलग्न एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आशियातील सर्व प्रमुख राष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड्सचे परीक्षण करून नोंदी घेतल्या जातात. त्यानुसार महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानामध्ये प्रामुख्याने विद्युत सुरक्षा रॅली, मॅरेथॉन, विद्युत सुरक्षेची शपथ, ऑनलाइन प्रश्नमंजूषा तसेच ‘एसएमएस’ व ‘इमेल’द्वारे ग्राहक संवादामध्ये लोकसहभागाच्या विक्रमांची नोंद केली. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली. त्यानंतर या नोंदी एशिया बुक ऑफ रेकॉर्डकडे पाठविण्यात आल्या. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड प्रोटोकॉलनुसार परीक्षण झाल्यानंतर या विक्रमांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

कार्यक्रमात कार्यकारी संचालक श्री. परेश भागवत यांनी अभियानाची माहिती दिली. उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमाला मुख्य अभियंते सर्वश्री मनीष वाठ, दत्तात्रेय बनसोडे, प्रशांत दानोळीकर, हरिश गजबे, वादिराज जहागिरदार, दीपक कुमठेकर, मिलिंद दिग्रसकर, मुख्य महाव्यवस्थापक श्री. भूषण कुलकर्णी, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके आदींची उपस्थिती होती.

स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व पॅथॉलॉजी तपासणीत 50% सूट-कोथरूड येथील श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम

पुणे, ११ ऑगस्ट :  “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” या तत्त्वाचे  पालन करणारे कोथरूड येथील श्री सरस्वती कराड हॉस्पिटल ने सर्व पॅथॉलॉजी तपासणी मध्ये ५०% सूट देण्याची घोषणा केली आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ही सूट दि. १ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सर्वांसाठी असणार आहे. गरजूंनी या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

ही सवलत सोमवार ते शनिवार सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत उपलब्ध असेल. गर्दी व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी, पूर्व नोंदणीची सोय उपलब्ध आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.

श्री सरस्वती कराड हॉस्पिटलच्या वतीने ही सूट पॅथॉलॉजी तपासण्या, सी टी स्कॅन, एम आर आय, सोनोग्राफी, मॅमोग्राफी, एक्स रे या तपासण्यांवर असेल.

रुग्णांनी नोंदणी व अधिक माहितीसाठी 020 69059000 वर संपर्क साधावा.

प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा पुण्यात

प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने आयोजन

पुणे : युवा पिढीतील सुप्त कलागुणांना वाव देण्याकरीता पुण्यामध्ये प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, सृजनसभा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ७ वा प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २१ ते २३ आॅगस्ट दरम्यान न-हे मानाजीनगर येथील संस्थेच्या संकुलात स्पर्धा होणार आहे. वक्तृत्व, लोकगीत गायन, वादविवाद, पथनाटय, छोटा ख्याल गायन, नाटयगीत गायन व एकल तबला वादन या प्रकारांत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्पर्धेचे उद््घाटन गुरुवार, दिनांक २१ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. उद्घाटनानंतर वक्तृत्व स्पर्धा होणार असून भारत विश्वगुरु होणार, वंदे मातरम् राष्ट्रीय गीत, तिसरे महायुद्ध? असे विषय आहेत. तर, लोकगीत गायन स्पर्धेत भारुड, भजन, पोवाडा सादरीकरण देखील याच दिवशी होणार आहे. तसेच स्व. आमदार रमेशभाऊ वांजळे निबंधलेखन स्पर्धा व कै. उद्धवराव तुळशीराम जाधवर वक्तृत्व स्पर्धा ही १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आली आहे.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, वादविवाद व पथनाटय स्पर्धा शुक्रवार, दिनांक २२ आॅगस्ट रोजी सकाळी १० पासून सुरु होणार आहेत. वादविवाद स्पर्धेकरीता आणीबाणी योग्य की अयोग्य?, धार्मिक कट्टरता आणि पेहेलगाम हे विषय असणार आहेत. तसेच पथनाटय स्पर्धेकरीता मतदान माझा हक्क आणि कर्तव्य या विषयावर सादरीकरण करण्याची मुभा स्पर्धकांना असणार आहे. तसेच, शनिवार, दिनांक २३ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता छोटा ख्याल गायन, नाटयगीत गायन व एकल तबला वादन स्पर्धा होईल.

सर्व स्पर्धा प्रकारांतील प्रथम विज्येत्याला १५ हजार ५५५ रुपये, द्वितीय क्रमांकाला ११ हजार १११ रुपये, तृतीय क्रमांकाला ७ हजार ७७७ रुपये व चषक आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविणा-या रुपये ११११ व चषक प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये पुण्यासह कोल्हापूर, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आदी शहरांतील संघांनी सहभागी होणार असून नोंदणी सुरु आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दिनांक १३ सप्टेंबर रोजी महाविद्यालयात होणार आहे. स्पर्धेत सहभागाकरिता ७९७२४८३५७५, ९९२३५३७४३६, ९११२४४५२८४ , ९२८४३८३१२५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीनिमित्त भव्य ‘कृष्ण समर्पण’ सांस्कृतिक महोत्सव

देशभरातून ८०० कलावंत, बालकलाकार आणि विविध संस्था शास्त्रीय नृत्य, गायन, नाट्य, वादन करून त्यांची कला भगवंतांना समर्पित करणार

पुणे :  आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता आणि कँप येथील मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. संस्थापक आचार्य भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी स्थापित केलेली मंदिरे असून दिनांक १५ आणि १६ आॅगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवा अंतर्गत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्ण समर्पण महोत्सवात देशभरातून सुमारे ८०० कलावंत, बालकलाकार आणि संस्था शास्त्रीय नृत्य, गायन, नाट्य, वादन करून त्यांची कला भगवंतांना समर्पित करणार आहेत, अशी माहिती  मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे, उपाध्यक्ष संजय भोसले, संपर्क प्रमुख प्रसाद कारखानीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संजय भोसले म्हणाले, श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मंदिरातील तिन्ही गाभाºयातील श्री श्री राधा-वृंदावन चंद्र, जगन्नाथ-बलदेव-सुभद्रा आणि गौर-निताई यांच्या विग्रहांना आकर्षक वस्त्र-आभूषणांनी सजविण्यात येणार आहे. याच मंदिराच्या आवारात श्री बालाजींचे सुंदर मंदिर आहे. या सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. श्रीकृष्ण जन्म आणि लीलांवर आधारित कथासुद्धा आजपासून सलग सात दिवस मंदिरात चालू असणार आहे.

दोन्ही मंदिरात सुमारे पाच लाख भाविक दर्शनासाठी येतील. मुख्य श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव १६ आॅगस्ट रोजी म्हणजेच शनिवारी आहे. पहाटे ४.३० वाजता मंगल आरतीने सुरुवात होईल. हरे-कृष्ण महामंत्राचे २४ तास कीर्तन चालू रहाणार आहे. रात्री ९.३० वाजता भगवंतांना दूध-तूप-मध-फळांचा रस अश्या विविध द्रव्य पदार्थांनी हरे-कृष्ण महामंत्राच्या घोषात अभिषेक करण्यात येईल. रात्री ११ वाजता भगवंतांना अनेक प्रकारचे अन्नपदार्थ-फळे-सुकामेवा-रस इत्यादींचा नैवेद्य दाखविण्यात येईल. त्यानंतर मध्यरात्री १२ वाजता भगवंतांची आरती होईल. मध्यरात्री १२.३० वाजेपर्यंत १५ आणि १६ आॅगस्टला दर्शन चालू राहील. सुमारे पाच लाख भाविकांना प्रसाद वाटपाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

गीता आणि भागवतावर आधारीत माहिती, आध्यात्मिक पुस्तके, पूजा-अर्चेचे साहित्य, भेटवस्तू, अगरबत्त्या, धूप, जपमाळा, गो-उत्पादने, आध्यात्मिक प्रश्न-मंजुषा, आध्यात्मिक शंका-समाधान, असंख्य प्रकारच्या फोटो-फ्रेम, असे भरपूर स्टॉल्स त्याबरोबरच विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल्ससुद्धा मांडण्यात येणार आहेत. पुणे आणि परिसरातील नागरिकांनी भगवंतांच्या दर्शन, कथा आणि प्रसाद यांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू आणि विश्वस्तांनी यांनी केले आहे. मंदिराच्या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भाविकांनी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा,असे आवाहन मंदिराच्या व्यवस्थानाद्वारे करण्यात आले आहे.

यशस्वी आंत्रप्रेन्यूअरसाठी जोखीम घ्यायला शिका- गुरू प्रसाद बिस्वाल यांचा सल्ला

एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये राइड-२०२५चे उद्घाटन७० पेक्षा अधिक स्टार्टअपः ५ हजारांहून अधिक विद्यार्थी उपस्थित.

पुणे, ११ ऑगस्टः” जीवनात यशस्वी आंत्रप्रेन्यूअर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी जोखिम घ्यायला शिकले पाहिजे. कोणताही कम्फर्ट झोन हा धोकादायक असल्याने त्यामध्ये राहू नये. सतत जोखीम घ्यायला शिकले पाहिजे. भविष्यकाळ हा आंत्रप्रेन्यूअरसाठी पोषक आहे. त्यामुळे चांगले भविष्य घडेल याची वाट न बघता आयडिया घेऊन प्रयत्नातून भविष्य घडवा.” असा सल्ला भारत फोर्जच्या एरोस्पेस बिझनेस व्हर्टिकलचे सीईओ गुरू प्रसाद बिस्वाल यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या रिसर्च, इनोव्हेशन, डिझाइन अँण्ड आंत्रप्रेन्यूअरशिप (राइड-२५) च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. हा कार्यक्रम पाच दिवस चालणार आहे.
यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीचे डीन प्रा.डॉ. नीरज महिंद्रू, हितेश जोशी, निनाद पाटील, डॉ. सिद्धार्थ चक्रबर्ती, डाॅ.सुमन देवादुला व डाॅ.उर्वशी मक्कर उपस्थित होते. तसेच ५ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनात व कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरू प्रसाद बिस्वाल म्हणाले,” जीवनात रिस्क न घेता कार्य करणे म्हणजे तुमच्या करिअर मधील सर्वात मोठा धोका आहे. अपयश हा एक प्रतिसाद असतो. त्यातून खूप काही शिकता येते. कोणत्याही करिअर मधील मूळ तत्व जाणून घेतले की उत्तरे आपोआप मिळतात. तंत्रज्ञानाच्या युगात एआय शी स्पर्धा करू शकत नाही. त्या सोबत सहयोग करूनच पुढे जावे लागेल. यशस्वी आंत्रप्रेन्यूअर बनायचे असेल तर प्रथम सातत्याने त्याचाच विचार करायला शिकणे गरजेचे आहे.”
डॉ. प्रसाद खांडेकर म्हणाले,” राइडची संकल्पनाच मुळात युवकांसाठी रिसर्च, इनोव्हेशन, डिझाइन आणि आंत्रप्रेन्युअरशीपचे टप्पे सक्षम करणे आहे. भारताच्या प्रगतीचा आलेख पाहता देशाची अर्थव्यवस्था लवकरच तीन ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहचण्याच्या मार्गावर आहे. यासाठी नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. भारतातील सध्याची परिसंस्था शिक्षण व्यवस्थेच्या पातळीवर नवोपक्रमाला आधार देण्यासाठी पुरेशी परिपक्व आहे.”  
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,”शिक्षणाच्या माध्यमातून समाजावर सकारात्मक परिणाम करणार्‍या शाश्वत, समावेशक आणि प्रगतिशील परिवर्तनावर भर देऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याला बळकटी देणे हा राइड चा मुख्य उद्देश आहे. शिक्षणानंतर नोकरी ऐवजी उद्योग व्यवसायांत विचारपूर्वक निर्णय घेऊन चांगले करिअर घडवण्यासाठी हे एक योग्य माध्यम आहे.”
प्रा.निरज महेन्द्रू यांनी स्वागत पर भाषण व राईड बद्दलची विस्तृत माहिती दिली.
प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सिद्धार्थ चक्रबर्ती यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांनो मराठी शिकण्याचा प्रयत्न करा-डाॅ.निलम गोऱ्हे

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा १०वा स्थापना दिन उत्साहात साजरा
पुणेः मराठी भाषा ही अत्यंत प्राचीन आणि सांस्कृतीकदृष्ट्या समृद्ध आहे. तिला हजारो वर्षांचा वारसा असून, मराठी साहित्य, नाटकं, गाणी अत्यंत विलोभनीय आहेत. त्यामुळे परराज्यातून शिक्षणासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्रीयन जेवण सर्वांनाच आवडते, त्यामुळे मराठी माणसाशी, मराठीत बोलल्यास तो दोन घास अधिक प्रेमाने वाढतो. तसेच मराठी शिकल्याने चांगले भांडता देखील येते, अशी कोटी महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती डाॅ.नीलम गोऱ्हे यांनी अस्खलित इंग्रजीत भाषेत केली आणि येथील स्वामी विवेकानंद सभामंडपात हजारो विद्यार्थ्यांकडून टाळ्यांचा एकच कडकडात झाला.
डाॅ.गोऱ्हे येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या १०व्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होत्या.
यावेळी, व्यासपीठावर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) वैज्ञानिक पद्मश्री डाॅ.नागराजन वेदाचलम, मालवीय राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नाॅलाॅजीचे (एमएमआयटी) संचालक प्रा.डाॅ.एन.पी.पाधी, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र. कुलपती प्रा.डाॅ.मंगेश कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., इस्कॉन पुणेचे प्रमुख राधेशाम, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डाॅ.गोऱ्हे पुढे म्हणाल्या, मला विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावायला, इथे भाषण करायला प्रचंड आवडते कारण, इथे त्यांच्याकडून सभात्याग केला जाण्याची शक्यता नसते. खरं तर, सध्या विद्यार्थ्यांवर पालकांच्या अपेक्षांचे ओझे प्रचंड वाढत चाललं आहे त्यामुळे, पालकांसाठी अभिमुखता शिबिराचे आयोजन केले पाहिजे. यासह, विद्यार्थ्यांनीही एमआयटी एडीटी सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठात शिकताना कायदा हातात न घेता एक चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न सातत्याने करायला हवा.
डाॅ.मंगेश कराड यावेळी म्हणाले, प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयटी एडीटी विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासावर भर देणारे शिक्षण पुरवत आहे. या विद्यापीठाच्या जडणघडणीत येथील प्रत्येक कर्मचाऱ्याचे बहुमुल्य योगदान आहे. त्याचमुळे आज दहाव्या वर्षात पदार्पण करत असताना यशाच्या अनेक शिखरांना आपण गवसणी घातली आहे. ‘नॅक’कडून नुकतीच मिळालेली ‘अ’ श्रेणी हे त्याचेच द्योतक आहे. भविष्यातही एमआयटी एडीटी विद्यापीठ यशाच्या नव-नव्या शिखरांवर पोचेल याचा मला विश्वास आहे.
विश्वशांती प्रार्थना सुरुवात तर राष्ट्रगीताने समारोप झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.राजेश एस., यांनी तर आभार डाॅ.पुजेरी यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा.श्रद्धा वाघटकर, प्रा.स्वप्निल शिरसाठ, डाॅ.अशोक घुगे यांनी केले.
पुण्याला अभियांत्रिकी आणि तांत्रिक शिक्षणाचा प्रचंड मोठा वारसा आहे. १८५४ साली ब्रिटीशांकडून पुण्यातील पहिल्या आणि भारतातील एकंदर तिसऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर काळाजी गरज ओळखून १९८४ साली कोथरूड येथे महाराष्ट्रातील पहिल्या खासगी महाराष्ट्र तंत्रज्ञान संस्था (एमआयटी) अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड यांनी केली. त्यामुळे, पुण्यात आणि खासकरून एमआयटीचे आमंत्रण स्विकारायला मला कायमच आवडते.

  • पद्मश्री डाॅ.नागराजन वेदाचलम,
    वैज्ञानिक, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो)


प्रा.प्रदीप प्रभूंना जीवनगौरव पुरस्कार
याप्रसंगी बिलींग विभागाचे प्रमुख, प्रा.प्रदीप प्रभू यांना विद्यापीठाच्या जडणघडणीतील बहुमुल्य योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्यासह डाॅ.अतुल पाटील, डाॅ.राजशेखर राठोड, प्रा.तुषार चौरुशी, डाॅ.शालिनी गर्ग, संदीप जाधव, यशस्विनी पिसोलकर यांचाही त्यांच्या योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.

विविध मागण्यांसाठी स्टेशन मास्टरांचे आंदोलन

पुणे – ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन (AISMA) पुणे मंडळाच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी भव्य आंदोलन करण्यात आले. पुणे रेल्वे मंडळातील शेकडो स्टेशन मास्टर्स, सहाय्यक कर्मचारी व संबंधित पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. आंदोलनानंतर मंडळ रेल्वे व्यवस्थापकांना १९ प्रमुख मागण्यांचे सविस्तर स्मरणपत्र देण्यात आले. या आंदोलनात AISMA माजी राष्ट्रीय महामंत्री धनंजय चंद्रात्रय, मंडल सचिव पुरुषुत्तम सिंग, मंडल अध्यक्ष कृष्ण मुरारी, तसेच स्टेशन मास्टर अजय सिन्हा, अमित कुमार, गंगाधर शाहू, अर्जुन कुमार, शकील इनामदार, दिनेश कांबळे, गोपाल कुमार यांसह पुणे मंडळातील एकूण १३० स्टेशन मास्टर्स उपस्थित होते.

या मागण्यांमध्ये स्टेशन मास्टर्सच्या कार्यकक्षात वातानुकूलन (AC) आणि आरामदायी फर्निचरची सोय, सर्व स्टेशनवर शुद्ध पिण्याचे पाणी, रिक्त पदांची तातडीने भरती, संवेदनशील स्टेशनवर दुसऱ्या स्टेशन मास्टरची नेमणूक, महिलांसाठी स्वतंत्र बदलण्याची खोली व शौचालय, योग्य ड्युटी रोस्टर, पदोन्नती व बदली धोरणातील सुधारणा, तसेच सुरक्षिततेसाठी आवश्यक तांत्रिक बदलांचा समावेश आहे.

संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, उष्णतेमुळे आणि उपकरणांच्या उष्णतेमुळे अनेक स्टेशन मास्टर्सना आरोग्य समस्या भेडसावत आहेत. योग्य खुर्च्या नसल्याने पाठीच्या व मानेच्या तक्रारी वाढल्या असून, याचा थेट परिणाम त्यांच्या कार्यक्षमता व एकूणच रेल्वेच्या सुरक्षिततेवर होत आहे. रिक्त पदांमुळे ड्युटीचे ओझे असह्य झाले आहे, तसेच अनेकांना आठवड्याचा निश्चित सुट्टीचा दिवस मिळत नाही. महिलांना कार्यकाळात सुरक्षित व सोयीस्कर सुविधा उपलब्ध नसल्याची खंतही नेत्यांनी व्यक्त केली.

तांत्रिक बाबींच्या संदर्भात, डाटा लॉगर सिस्टीममधील विलंब दूर करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर बदल, तसेच स्टेशन मास्टर्सना वेळेवर ओव्हरटाईम भत्ता देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, स्थानकांच्या समोर पावसापासून व उन्हापासून संरक्षणासाठी शेड उभारणे, स्टेशन परिसरातील सुरक्षाविषयक प्रोटोकॉल काटेकोरपणे पाळणे, आणि इतर विभागांकडून होणाऱ्या अनधिकृत हस्तक्षेपावर मर्यादा आणणे यांसारख्या मुद्द्यांनाही महत्त्व देण्यात आले.

संघटनेने सांगितले की, या सर्व मागण्या तातडीने पूर्ण झाल्यास कर्मचारी मनोबल वाढेल, रेल्वे सेवा अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम होईल, तसेच प्रवासी सेवांची गुणवत्ता सुधरेल. त्यांनी इशारा दिला की, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.

हे आंदोलन पुणे मंडळातील स्टेशन मास्टर्सच्या एकतेचे प्रतीक ठरले. अनेक स्टेशनवरून आलेल्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या समस्या उघडपणे मांडल्या. संघटनेच्या बॅनरखाली झालेल्या या लढ्यात, सर्व मागण्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी घोषणाबाजी व शांततापूर्ण मार्गाने निदर्शन करण्यात आले. रेल्वे व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.

राजाराम मंडळाकडून यंदा देखाव्याऐवजी संत, महापुरुषांच्या पादुकांचे दर्शन

श्रीं साठी कायमस्वरुपी मंदिराचा संकल्प ; मंडळाचे १३४ वे वर्ष

पुणे : सदाशिव पेठेतील श्री गणपती देव ट्रस्ट छत्रपती राजाराम महाराज मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १३४ वर्ष झाली आहेत. गणेशोत्सवात दरवर्षी विविध मंदिरांच्या भव्य प्रतिकृती उभारणारे मंडळ म्हणून सर्वत्र सुपरिचित असलेल्या राजाराम मंडळाकडून यंदा देखाव्याऐवजी संत, महापुरुषांच्या पादुकांचे दर्शन गणेशभक्तांना होणार आहे. ‘श्रीं’ साठी कायमस्वरूपी मंदिराचा संकल्प असल्याने यंदा देखावा उभारण्यात येणार नसल्याचे मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

युवराज निंबाळकर म्हणाले, यंदा देखाव्याऐवजी संत, महापुरुषांच्या पादुकांचे दर्शन आणि मंदिर निर्मितीचा संकल्प हे मंडळाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांच्या दर्शनाची पर्वणी भाविकांना मिळणार आहे.तर, तिस-या दिवशी संतांच्या पादुका दर्शनासाठी मंडपामध्ये आणल्या जाणार आहेत. शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोट स्वामी, शंकर महाराज, बाळूमामा महाराज, नित्यानंद स्वामी, श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज, नीम करोली बाबा, प.पू.आनंदॠषीजी म.सा. अशा नऊ ते दहा संत महात्म्यांच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत. महापुरुष आणि संतांच्या पादुकांचा संगम असलेला हा आगळा धार्मिक कार्यक्रम आहे. सलग ७ दिवस त्या दर्शनासाठी उत्सव मंडपात ठेवण्यात येणार आहेत. वासापूजन कार्यक्रम मंगळवार, दि.१२ आॅगस्ट रोजी होणार आहे.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील साडेतीनशे किल्ल्यांवरची पवित्र माती दर्शनासाठी ठेवली जाणार आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा आहे. त्यावरून केलेल्या पादुका संतांच्या पादुकांसह ठेवल्या जातील. संतांच्या आशिवार्दाने पुढच्या वर्षभरामध्ये मंदिर उभारण्याचा संकल्प मंडळाकडून पूर्ण करण्यात येणार आहे. संपूर्ण दगडी घडणीतून ते साकारले जाईल. दरवर्षी भव्य देखावे साकारण्याची आमची परंपरा आहे. परंतु यावर्षी अत्यंत आकर्षक मंदिर उभारण्याची सुरुवात होणार आहे.

उत्सव सुरू झाल्यावर तिस-या दिवशी भजन, कीर्तनाच्या पार्श्वभूमीवर पादुकांची मिरवणूक काढली जाणार आहे. सदाशिव पेठेतील ब्राह्मण मंगल कार्यालय,ज्ञान प्रबोधिनी, कुमठेकर रस्ता, ट्रेनिंग कॉलेज ते छत्रपती राजाराम मंडळापर्यंत मिरवणूक काढली जाणार आहे. यामध्ये शेकडो भाविक सहभागी होतात.

छत्रपती राजाराम महाराज मंडळाची स्थापना १८९२ मध्ये झाली. देशातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करणा-या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी या मंडळाची मूर्ती तयार केली होती. रात्री १० नंतर स्पिकर्स बंदी झाल्यामुळे उत्सवात देशातील विविध मंदिराच्या प्रतिकृती उभारण्याची संकल्पना मंडळाने आणली. यामुळे २४ तास श्रीं चे दर्शन घेत उत्सवाचा आनंद भक्तांना घेता आला. याशिवाय गणेशोत्सवात महिलांसाठी हिरकणी कशी सुरु केला, त्याचे इतर अनेक देवस्थाने व मंडळांनी अनुकरण केले. रुग्णवाहिका सेवा, रुग्णसेवा विभाग उत्सवात मंडळातर्फे सुरु करण्यात आला.

देशातील धार्मिक देवस्थानांचे देखावे उभारण्याची मंडळाची परंपरा आहे. विशेष म्हणजे मंडळ वर्गणी जमा करत नाही. तसेच संपूर्ण देखावा हा फळ्यांवर उभा केला जातो. मध्यभागात गर्दीच्या ठिकाणी हँगिंग मंडप उभारण्याची संकल्पना मंडळाने सर्वप्रथम आणली होती.  खड्डे विरहित मंडप, फळ्यांचा मंडप हे मंडळाचे वैशिष्ट्य असून वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा प्रकारे रस्त्याच्या वरच्या बाजूला देखावा साकारला जातो. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट देखील केले जाते. यामुळे शेकडो भाविक या देखाव्याचा आनंद त्यामध्ये फिरून घेऊ शकतात.

हेल्मेट घालून बँकेत दरोडा, 15 मिनिटांत 14 कोटींचे सोने, 5 लाख रोकड लुटून पळाले


सोमवारी सकाळी ११ वाजता सशस्त्र दरोडेखोरांनी बँक लुटली. दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर १५ मिनिटांत १४ किलो ८०० ग्रॅम सोने आणि ५ लाख ७० हजार रुपये रोख घेऊन पळून गेले. लुटलेल्या सोन्याची अंदाजे किंमत १४.५ कोटींहून अधिक आहे.मध्य प्रदेशातील जबलपूरपासून ५० किमी अंतरावर असलेल्या खिटोला परिसरात हा दरोडा पडला पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी केली आहे. कटनी, मांडला, दिंडोरीसह संपूर्ण जबलपूरच्या पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे.चौकशीदरम्यान, बँक अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की घटनेच्या वेळी बँकेत व्यवस्थापकासह ६ कर्मचारी उपस्थित होते. दरोडेखोरांनी हेल्मेट घालून बँकेत प्रवेश केला जेणेकरून कोणीही त्यांचे चेहरे ओळखू नयेत. सर्व आरोपींच्या हातात पिस्तूल होते.

जबलपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना इसाफ स्मॉल फायनान्स बँकेत घडली. सहा तरुण तीन बाईकवरून येथे आले. त्यांनी बँकेबाहेर त्यांच्या बाईक पार्क केल्या आणि एक एक करून आत शिरले. ते काही वेळ बँक कर्मचाऱ्यांचे काम पाहत राहिले. त्यानंतर त्यांनी बंदुका काढल्या आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावू लागले. ते वारंवार गोळीबार करण्याची धमकी देत होते. दरोडेखोर बँकेतून बाहेर पडताच अधिकाऱ्यांनी अलार्म सायरन वाजवला.

आतापर्यंतच्या पोलिस तपासात असे दिसून आले आहे की इसाफ स्मॉल फायनान्स बँक सोने तारणावर कर्ज देते. बँक उघडण्याची वेळ सकाळी १०.३० आहे, परंतु सणामुळे गेल्या काही दिवसांपासून ती सकाळी ८ ते ९ या वेळेत उघडत आहे. घटनेच्या वेळी सुरक्षा रक्षक तैनात नव्हता. सीसीटीव्हीमध्ये ४ दरोडेखोर दिसत आहेत. तथापि, बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांसमोर दरोडेखोरांची संख्या ६ असल्याचा दावा केला आहे.

रोजगाराची सुवर्णसंधी 13 ऑगस्ट रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

पुणे दि. 11 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे येथे 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता, “प्लेसमेंट ड्राइव्ह”चे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच जिल्हयातील नोकरीइच्छुक उमेदवारांसाठी क्रांतिकारक लहुजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक वसाहत, नांगरगाव, लोणवाळा, ता. मावळ जि. पुणे येथेही प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट देऊन रिक्त पदांना ऑनलाइन अॅप्लाय करणे आवश्यक आहे. खाजगी क्षेत्रातील विविध रिक्तपदांकरिता प्लेसमेंट ड्राइव्हच्या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत (Walk-in-Interview) घेण्यात येणार असून याकरिता नोकरीइच्छूक उमेदवारांनी विहीत दिनांकास प्लेसमेंट ड्राइव्हच्या ठिकाणी उपस्थित राहणे तसेच मुलाखतीस येताना आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार बायोडाटा अर्जाच्या (Resume) प्रती सोबत आणणे गरजेचे आहे.

अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, ४८१ रास्ता पेठ, पुणे येथे कार्यालयीन वेळेमध्ये प्रत्यक्ष अथवा ०२० २६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सा.बा.मोहिते, प्र.सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे.

आदिवासी भागांमध्ये मुलभूत सोई सुविधा उपलब्ध होण्यासाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक-आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके


पुणे दि: 11 – आदिवासी समाज विकासापासून दूर आहे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला काम करायचे असून या भागामध्ये मुलभूत सोई सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.
केंद्र सरकारच्या जनजाती कार्य मंत्रालय यांच्यातर्फे आयोजित धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत “आदी कर्मयोगी विभागस्तरीय प्रशिक्षण” कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे, केंद्रीय जनजाती आयोगाचे सहसचिव, अमित निर्मल, केंद्रीय जनजाती मंत्रालयाचे संचालक दिपाली मासीरकर, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त चंचल पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री. वुईके पुढे म्हणाले, आदिवासी गावपाड्यांमध्ये शासनाच्या बऱ्याच योजना अजून पर्यंत पोहोचल्या नाहीत या भागात रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, शाळा, गुणवत्तापूर्ण शिक्षण या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग नेहमी तत्पर असून, यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी एकत्र येऊन या भागांची पाहणी करून येथे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम करावे. प्रत्येक योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे असे सांगून ते पुढे म्हणाले आदिवासी भागामध्ये लोकजागृती झाली पाहिजे, आता लोकांपर्यंत आपल्याला जावे लागणार आहे आदिवासी लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवीन विचार व नवा संकल्प घेऊन ग्रामीण भागात जाऊन सर्व विभागांचे अधिकारी यांनी काम करावे. असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा 2047 पर्यंत विकसित भारत बनविण्याचा संकल्प असून त्यादृष्टीने विभागाने काम सुरू केले आहे. याबरोबरच नवं महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आदिवासी विकास विभाग गावा गावातील लोकांपर्यंत योजना पोहोचवण्याचे काम निश्चित करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री.वाघमारे, यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम बाबत माहिती विशद केली . या कार्यशाळेचे आयोजन शासनाच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत “आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे” यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या जनजातीय कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या उपक्रमाची सुरुवात 15 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात आलेली आहे. या उपक्रमामध्ये विविध 17 विभागांच्या 25 योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजना तळागाळातील आदिवासी जमातीच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी “आदी कर्मयोगी” या उपक्रमाची आखणी केंद्र शासनाच्या जनजातीय कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांनी केलेली आहे. या उपक्रमांतर्गत, आज राजस्थान, महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि केरळ या सहा राज्यांच्या प्रतिनिधींसाठी विभागीय कार्यशाळेचे आयोजन यशदा, पुणे येथे करण्यात आले. ही कार्यशाळा 11 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान 7 दिवसांची असणार आहे. यामध्ये वरील राज्यामधून विविध विभागांचे राज्यस्तरावरील 8-10 अधिकारी सहभागी झालेले आहेत. या कार्यशाळेच्या अंमलबजावणीसाठी “भारत ग्रामीण उपजीविका फाऊंडेशन (BRLF)” या संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झालेले आहेत.
या कार्यक्रमात विभू नायर, सचिव, जनजातीय कार्य मंत्रालय, नवी दिल्ली, यांसह इतर राज्यांच्या आदिवासी विकास विभागाचे सचिव दृकश्राव्य माध्यमातून सहभागी होते. या कार्यक्रमांतर्गत देशभरामध्ये शासकीय यंत्रणेतील “2 लक्ष” अधिकारी-कर्मचारी यांना “आदी कर्मयोगी” म्हणून विकसित करण्यात येणार आहे. श्रीमती मासिरकर, यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेच्या निकालाबाबत आवाहन

पुणे, दि.११ : “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५” च्या निकालाची कार्यवाही सुरु असून निकालासंदर्भात परीक्षार्थ्यांनी युट्युब चॅनेल्स व सोशल मिडिया प्लॅटफॉर्म द्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या, अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे, असे आवाहन आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता एकाच संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे व्यावसायिक परीक्षा (बी.एड./ डी.एल.एड.) उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य होते. व्यावसायिक परीक्षांचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या वेळी लागत असल्याने “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी” परीक्षेचा निकाल लावण्यासाठी माहिती प्राप्त व एकत्रित होण्यास वेळ लागत आहे. निकाल लवकरच परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार विद्यार्थी सर्वस्वी जबाबदार असतील याची नोंद घ्यावी, असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.

जिल्हयातील जवानांच्या कुटुंबियांना आता निशुल्क कायदेशीर आधार-जवानांच्या कुटुंबियांसाठी वीर परिवार सहायता योजना सुरू

पुणे दि. 11 : लष्करातील जवानांवर कायदेशीर संघर्षाचा ताण येऊ नये या उद्देशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण वीर परिवार सहायता योजना, २०२५ अंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे, जिल्हा विधी सहायता केंद्र सुरु करण्यात आले आहे.

या विधी सेवा केंद्राचे उद्घाटन 7 ऑगस्ट रोजी करण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण महेंद्र के महाजन, न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती सोनल एस पाटील, अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण डॉ. अरुण गायकवाड, तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतेश दैवानराव हंगे (निवृत्त), व कर्मचारी उपस्थितीत होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ही योजना आठवडयातून दोन दिवस मंगळवार आणि गुरूवार सकाळी १०.३० ते १२.०० वा. या वेळेत कार्यन्वीत असेल. तरी गरजुंनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन लेफ्टनंट कर्नल सतेश देवानराव हंगे (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000