Home Blog Page 171

वाहननिर्मिती क्षेत्रात देश जागतिक स्तरावर अग्रस्थान मिळवेल

  • केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
  • ‘प्राज’ इंडस्ट्रीजच्या वतीने ‘प्राज बायोव्हर्स’ या जागतिक उपक्रमाची घोषणा
  • डॉ. प्रमोद चौधरी यांच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘होरायझन्स बियॉन्ड ड्रीम्स… अ‍ॅज इज व्हॉट इज’ या इंग्रजी पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

पुणे : वाहननिर्मिती, संशोधन व डिझाईन या क्षेत्रातील देशाची गतिमानता आणि गुणवत्ता पाहता, नजीकच्या भविष्यात वाहननिर्मिती क्षेत्रात देश जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक मिळवेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मी मंत्री झालो, तेव्हा आपण जगात ७ व्या क्रमांकावर होतो, आज आपण तिसऱ्या स्थानी आहोत, असेही ते म्हणाले. जागतिक जैवइंधन दिनानिमित्त सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे डब्लू मॅरिएट येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी ‘प्राज बायोव्हर्स’ या जैव अर्थव्यवस्थेशी संबंधित जागतिक उपक्रमाची घोषणा केली, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना गडकरी बोलत होते. डॉ. प्रमोद चौधरी यांच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘होरायझन्स बियॉन्ड ड्रीम्स… अ‍ॅज इज व्हॉट इज’ या इंग्रजी पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण यावेळी करण्यात आले.

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपाध्यक्ष विक्रम गुलाटी, हिरो मोटोकॉर्पच्या ऑपरेशन्स विभागाचे कार्यकारी संचालक विक्रम कसबेकर, किर्लोस्कर ब्रदर्सचे व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी आणि प्राजच्या बायो-एनर्जी विभागाचे अध्यक्ष अतुल मुळे हे याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “देशातील वाहन उद्योग क्षेत्र हे २२ लाख कोटींचे उद्योगविश्व असून या क्षेत्राने साडेचार कोटी इतका रोजगार निर्माण केला आहे. त्याचप्रमाणे हा उद्योग सर्वाधिक निर्यातक्षमताही राखून आहे. मात्र, या उद्योगाच्या काही बाजू नकारात्मक आहेत. ४० टक्के वायूप्रदूषण हे वाहनांमुळे होते. त्यामुळेच प्रदूषणकारी जीवाश्म इंधनाला प्रदूषणरहित, स्वच्छ इंधनाचे पर्याय निर्माण करणे आणि त्यांचा सार्वत्रिक वापर वाढविणे गरजेचे आहे. प्राज इंडस्ट्रीजच्या माध्यमातून डॉ. प्रमोद चौधरी आणि त्यांच्या टीमने यासंदर्भात केलेले कार्य कौतुकास्पद आहे.”

ते पुढे म्हणाले की, “आज ग्रामीण अर्थव्यवस्थेत असंतुलन आहे. कारण कृषी क्षेत्राचा वाटा अवघा १२ टक्के आहे, पण आजही देशातील सुमारे ६५ टक्के जनता ही कृषी क्षेत्र आणि कृषी आधारित उद्योगांवर अवलंबून आहे. सेवा क्षेत्राचा वाटा मात्र वाढत आहे. हे प्रमाण संतुलित करण्यासाठी पर्यायी इंधनस्रोतांची आवश्यकता आहे. पर्यायी इंधनस्रोत कृषी क्षेत्राला बळकटी देतील. आपला शेतकरी केवळ अन्नधान्य उत्पादक न राहता, तो इंधन उत्पादक होण्यासाठी, वाहन उद्योगाने पर्यायी इंधनस्रोतांना अनुकूल अशी निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.”

मी रस्ते बनवितो, हे सर्वपरिचित आहे, पण माझ्या ६ डॉक्टरेट्स या कृषी क्षेत्रातील कार्याशी संबंधित आहेत. त्यामुळे वाहननिर्मिती उद्योग कृषी क्षेत्राशी संलग्न होणे, मला महत्त्वाचे वाटते. इथेनॉल, हायड्रोजन आणि बांबू, असे नवे इंधनस्रोत आपल्या संशोधनाच्या, नवकल्पनांच्या, स्टार्टअप्सच्या केंद्रस्थानी आले, तर आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होणे शक्य आहे, असेही गडकरी म्हणाले.

भारतामध्ये अन्नधान्याची निर्मिती वाढली आहे, ते ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. काही वर्षांपूर्वी मक्यापासून इथेनॉल तयार करण्यास सुरुवात झाली, त्यानंतर मक्याच्या दरात चांगली वाढ झाली. बिहार मधल्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला. त्याचप्रमाणे अन्य धान्याचा वापर करून इथेनॉल तयार केले गेले तर त्याचा शेतकरी वर्गाला चांगला फायदा होऊ शकतो. आपल्याकडे ज्या ठिकाणी पडीक जमीन आहे, तिथे बाबूंची लागवड करून त्यापासून इथेनॉल तयार केले तर प्रदूषणाचा प्रश्न सुटण्यास देखील चांगली मदत मिळू शकते, इतकेच नाही तर त्यामधून चांगल्या प्रकारची रोजगार निर्मिती होऊ शकते असे गडकरी यांनी नमूद केले.

डिझेलमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणा होते, त्यावर पर्याय म्हणून आपसोमिथेनॉल हा चांगला पर्याय आहे, भविष्य काळात तो देशासाठी वरदान ठरणार आहे. भारतामध्ये चांगल्या प्रकारचे संशोधन सुरु आहे, त्यामुळे भारत आत्मनिर्भर होण्यास वेळ लागणार नाही. डॉ प्रमोद चौधरी यांनी इथेनॉल क्षेत्रात केलेले काम मोठे असून त्याची सुवर्णाक्षरांनी नोंद करण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.

‘प्राज बायोव्हर्स’ या उपक्रमाविषयी माहिती देताना प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “प्राज बायोव्हर्स ही संपूर्ण जैव अर्थव्यवस्थेच्या परिसंस्थेला एकत्र आणणारी चळवळ आहे. याद्वारे जैव अर्थव्यवस्थेशी संबंधीत अनेकविध घटक एकत्र येण्यासोबतच नवोपक्रमांना चालना देणे, एकमेकांना आवश्यक सहकार्य करणे, प्रेरणा देणे आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढविणे अशा पद्धतीने एकत्रितपणे काम केले जाईल. याद्वारे आपण देशासोबतच जागतिक पातळीवर देखील शाश्वत विकासासाठी नवीन क्षितिजे शोधू शकू असा आम्हाला विश्वास आहे.”

संजय किर्लोस्कर, विक्रम गुलाटी, विक्रम कसबेकर आणि विशाल सोनी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. अतुल मुळे यांनी आभार मानले. चैतन्य राठी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले

तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ

कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार

मुंबई- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांच्या विविध योजनांतर्गत कर्ज प्रकरणातील जामिनदाराबाबतच्या अटी आणि शर्तीमध्ये सुधारणा करण्यास तसेच महामंडळाना देण्यात येणाऱ्या शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे लघुउद्योजकांना कर्ज घेण्याची प्रक्रिया आधिक सुटसुटीत होणार तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार आहे.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून स्वतःच्या आणि राष्ट्रीय महामंडळाच्या विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये मुदत कर्ज योजना, ऋण योजना आणि बीज भांडवल योजना यांचा समावेश आहे.
महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या दोन लाख रुपयांपर्यतच्या कर्ज योजनेसाठी लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर किंवा एका जामिनदाराच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविण्यास मान्यता देण्यात आली. दोन ते पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी पूर्वी दोन जामिनदारांची अट होती. आता त्याऐवजी एका जामिनदारांची तरतूद करण्यात आली आहे. हा जामिनदार स्थावर मालमत्ता किंवा नावावर जमीन असलेला किंवा खासगी क्षेत्रातील नोकरदार किंवा शासकीय, निमशासकीय, शासकीय अनुदानित संस्थेतील नोकरदार असावा, अशी तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर लाभार्थी आणि जामिनदारांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविला जाणार आहे.
राष्ट्रीय अनुसूचित जाती मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ (NSCFDC), राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळ (NSKFDC) यांच्या योजना राज्यातील महामंडळामार्फत राबविण्यात येतात. यासाठी राष्ट्रीय महामंडळाकडून राज्य महामंडळास कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला जातो. या कर्जनिधीमधून मुदती कर्ज योजना, बीज भांडवल योजना लघुऋण वित्त योजना, तसेच शैक्षणिक कर्ज योजना राबविल्या जातात.
या योजना राबविण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास ६०० कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास १०० कोटी, आणि संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळास ५० कोटी रुपयांच्या शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. यामुळे प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली निघतील त्याचबरोबर नवीन लाभार्थ्यांनाही कर्ज मिळेल.

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवास: प्रति आसन देणार अनुदान शासन

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय

मुंबई- सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी उडान योजनेच्या धर्तीवर एक वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट (व्हायअबिलिटी गॅप फंडिंग- व्हीजीएफ) निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
केंद्र शासनाने सामान्य नागरिकांना विमानप्रवास परवडेल यादृष्टीने उडान (रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम) योजना सुरू केली आहे. सोलापूर विमानतळासाठीदेखील ही योजना लागू होणार आहेत. ही योजना लागू होईपर्यंत वर्षभरासाठी प्रति आसन ३ हजार २४० रुपये दराने (शंभर टक्के व्हिजीएफ) व्यावहारिकता तूट म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवास दर कमी होण्यास मदत होणार आहे.
या निर्णयानुसार सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे या हवाई मार्गासाठी स्टार एअर कंपनीस दर आसनामागे हा व्यावहारिक तूट निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरीता १७ कोटी ९७ लाख ५५ हजार २०० रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
या विमानतळासाठी उडान योजना लागू झाल्यानंतर शासनाकडून देण्यात येणारा हा निधी बंद करण्यात येईल व केंद्र शासनाच्या उडान योजनेप्रमाणे २० टक्के व्यवहारिकता तूट (व्हिजीएफ) देण्यात येणार आहे.

राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढक्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार

पुणे-राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या १५० रुपयांऐवजी १७० रुपये मार्जिन मिळणार आहे.

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना ५३ हजार ९१० रास्तभाव दुकानदारांमार्फत ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रीक पडताळणी करून अन्नधान्य, साखर व इतर वस्तुंचे वितरण करण्यात येते.
या दुकानदारांना केंद्र सरकारकडून ४५ रुपये आणि राज्य सरकारकडून १०५ रुपये असे एकूण क्विंटलमागे १५० रुपये मार्जिन म्हणून दिले जात होते. या मार्जिन रकमेत वाढ कऱण्याची विनंती या दुकानदारांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार या मार्जिनमध्ये क्विंटलमागे २० रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार क्विंटलमागे रास्त भाव दुकानदारांना १७० रुपये (१७०० रुपये प्रति मेट्रीक टन) असे मार्जिन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे ९२ कोटी ७१ लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद केली जाणार आहे.

महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर

पुणे-महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आज सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
राज्याच्या पोलीस दलात सन २०२४ दरम्यान रिक्त असलेली व २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहेत. भरण्यात येणारी पदांची संख्या अशी, पोलीस शिपाई – १० हजार ९०८, पोलीस शिपाई चालक – २३४, बॅण्डस् मॅन – २५, सशस्त्री पोलीस शिपाई – २ हजार ३९३, कारागृह शिपाई – ५५४. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.
भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी, तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘वॉर 2′ १४ ऑगस्टला …

बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन याला विश्वास आहे की त्याचा आगामी चित्रपट ‘वॉर 2’, जो १४ ऑगस्ट रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे, प्रेक्षकांसाठी थिएटरमध्ये पाहण्यासारखा अनमिसेबल प्रोजेक्ट ठरणार आहे.

या चित्रपटात हृतिक, पॅन-इंडियन सुपरस्टार ज्युनियर एनटीआर विरुद्ध एका नो-होल्ड्स-बार्ड, रक्तरंजित लढाईत भिडणार आहे, ज्याला तो मोठ्या पडद्यावरील एक भव्य व्हिज्युअल अनुभव मानतो.

हृतिक म्हणाला, “‘वॉर’ मध्ये कबीरची भूमिका करताना मला जे प्रेम आणि कौतुक मिळाले, त्याने मला ‘कहो ना… प्यार है’, ‘धूम २’ आणि ‘कृष’च्या काळातील प्रेमाची आठवण करून दिली. यावेळी मी पुन्हा कबीर म्हणून परत आलो आहे, आणि ही भूमिका करणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण प्रेक्षकांनी हा कॅरेक्टर खूप आवडला होता. या वेळी तो आधीपेक्षा अधिक इंटेन्स आणि द्विधा मनस्थितीत आहे — खूप भावनिक. मला वाटते ‘वॉर २’ हा असा चित्रपट असेल जो चुकवता कामा नये.”

हृतिक, ज्याने गंभीर दुखापतींवर मात करून हा चित्रपट पूर्ण केला, सांगतो की या प्रोजेक्टसाठी सहन केलेला प्रत्येक त्रास आणि वेदना योग्य ठरल्या.

तो म्हणाला, “हे कठीण होते (वेदना आणि दुखापतींवर मात करणे). आम्ही खूप मेहनत घेतली. ‘वॉर २’ च्या शूटिंगदरम्यान आलेल्या सर्व वेदना, सर्व दुखापती या सगळ्या त्याच्यासाठीच होत्या. कधी सेटवर वेदना होत होत्या तेव्हा मी विचार करायचो — हे सगळं खरंच वर्थ आहे का? पण आता जेव्हा प्रेक्षकांचं प्रेम पाहतो, तेव्हा उत्तर आहे — हो, नक्कीच.”

‘वॉर २’ हा प्रतिष्ठित वायआरएफ स्पाय युनिव्हर्सचा सहावा चित्रपट आहे, ज्याने आतापर्यंत केवळ ब्लॉकबस्टरच दिल्या आहेत.

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा‘अभंग तुकाराम’

मराठी जनमानसासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची ‘अभंग गाथा’ याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचला, आणि जगद्गुरूंच्या अभंगांनी त्याच्यावर कळस चढवला. तुकोबारायांची ही अभंग गाथा तत्कालीन समाजव्यवस्थेने लादलेल्या जलदिव्यातून तावून सुलाखून निघाली आणि आजही आपल्या जीवनाचा भक्कम पाय म्हणून उभी आहे. आजही मराठी लोकांच्या वापरात या गाथेतल्या अभंगाची चरणे, म्हणी, वाक्प्रचार या स्वरूपात आपल्याला ऐकू येतात. एकूणात रोजच्या जगण्यात आज ३५० वर्षांनंतरही संत तुकाराम आपल्या या अजरामर रचनांमधून वास्तव्य करताना आपल्याला दिसतात. जगद्गुरूंचे हे तत्वज्ञान नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘अभंग तुकाराम’ हा नवा कोरा चित्रपट ७ नोव्हेंबरला घेऊन येत आहेत. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

संत तुकारामांची अभंग गाथा तत्कालीन समाजव्यवस्थेतील धर्माच्या ठेकेदारांनी इंद्रायणीत बुडवण्याचा आदेश दिला. तेव्हा संत तुकोबारायांनी हे आव्हान स्वीकारले आणि गाथा नदीत बुडवल्या. त्यांनतर या गाथा कशा तरल्या ? त्यातून काय संदेश दिला गेला ? आणि या सगळ्यात संपूर्ण समाजाने संत तुकारामांवरील भक्तीपोटी आणि प्रेमापोटी काय काय त्याग केला ? याचे थरारक आणि त्याचवेळेस भावस्पर्शी असे चित्रण ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटाचे मोशन टिझर पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. त्यात पाण्याच्या तरंगांबरोबर वर जाणारे अभंगांचे कागद दिसतात. त्याबरोबर आपल्याला पाठमोरे संत तुकोबाराय दिसत आहेत. ज्यांनी आकाशाकडे हात पसरून साद घातलेली दिसत आहे. त्यांच्या समोरून उगवणारा सूर्य हा आशेचे किरण पसरवीत आहे. त्याचवेळी “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती” हि तुकोबारायांची अमर रचना अत्यन्त सुमधुर स्वरात समूहाकडून ऐकू येत आहे. त्या तालावर ‘अभंग तुकाराम’ हे चित्रपटाचे नाव भव्य स्वरूपात आकाशात आकाराला येऊन संत तुकारामांचे आणि त्यांच्या रचनांचे अभंगत्व अधोरेखित करताना दिसत आहे.

अत्यंत सुंदर अशा तांत्रिक सफाईने सादर केलेले चित्रपटाचे हे शीर्षक रसिकांच्या कुतूहलाचा आणि भावपूर्ण आतुरतेचा विषय बनले आहे. या चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून आपला वारकरी संप्रदायाचा अभ्यास सिद्ध केलेले दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल १० अभंगांचा समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाचे अप्रतिम संगीत निर्माण करणारे प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे.

स्वातंत्र्यदिनी पुण्यात पहिल्यांदाच ‘तिरंगा फेस्टिवल’

किरण साळी मित्र परिवार आणि ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र च्या वतीने आयोजन ; भारतीय लष्कराला ५०० ढोल-ताशा वादनातून मानवंदना

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय लष्करातील सैनिकांना व त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशाने पुण्यात ‘तिरंगा फेस्टिवल २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. किरण साळी मित्र परिवार आणि ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र च्या वतीने शुक्रवार, दिनांक १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ ते रात्री ८ यावेळेत श्री जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर चौकाजवळ, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर तिरंगा फेस्टिवल २०२५ होणार आहे, अशी माहिती आयोजक किरण साळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा फेस्टिवल पहिल्यांदाच होत आहे. देश रक्षणार्थ प्राणांची बाजी लावणा-या भारतीय सैनिकांच्या पाच वीरपत्नींचा सन्मान तिरंगा फेस्टिवल मध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये वीरपत्नी मीनाक्षी भिसे, राणी चौधरी, सुस्मिता पालेकर, प्रतिभा खटके, दिपाली मोरे यांचा समावेश आहे. तिरंगी उपरणे आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव होणार आहे. सेनाधिकारी पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते सन्मान सोहळा होणार असून विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र अंतर्गत असलेल्या पुण्यातील ढोल ताशा पथकांतील ५००हून अधिक वादक एकत्रितपणे वाद्यवादन करणार आहेत. ढोल ताशाच्या वादनातून ‘आॅपरेशन सिंदूर’ व ‘आॅपरेशन महादेव’ मधील वीरांना मानवंदना देणार आहेत. संपूर्ण रस्त्यावर तिरंगी ध्वज लावण्यात येणार असून तिरंगी टॅटू यांसह विविध आकर्षण फेस्टिव्हलमध्ये असणार आहेत.

विविध वाद्यांचा सुरेल अविष्कार असलेला ‘नादरंग’ -तालवाद्यकचेरी हा कार्यक्रम देखील होणार आहे. याशिवाय प्रख्यात कलादिग्दर्शक गणेश लोणारे व सहकारी यांचे देशभक्तीपर पथनाट्य व सादरीकरण होणार आहे. ‘वंदे मातरम’ या स्वर मैफलीतून बालकलाकार देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करणार आहेत. तसेच गीततिरंगा/ रामराज्याभिषेक भरतनाट्यम नृत्यावर आधारित सादरीकरण होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सामुदायिक पसायदानाने फेस्टिवलची सांगता होणार आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर हा फेस्टिवलला उपस्थित राहणार असून पुणेकरांनी यामध्ये सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आंदोलनासाठी मुस्लिम समुदायाच्या पाठिंबा

-15 ऑगस्ट रोजीच्या ठिय्या आंदोलनात मुस्लिम समाज सहभागी होणार

पुणे : मंगळवार पेठ येथील डॉ.  बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावना लगतच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीच्या वतीने येत्या 15 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या ठिय्या आंदोलनाला मुस्लिम समुदायाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे तसेच या आंदोलनामध्ये मुस्लिम समुदायिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी  नगरसेवक अॅड. हाजी  गफूर पठाण यांनी सांगितले. 

कोंढवा येथील सतेज हॉल या ठिकाणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम समाज बांधवांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आलेली होती, या बैठकीत वरील प्रमाणेचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच याच वेळी मुस्लिम समुदायासाठी सातत्याने काम करत असल्याबद्दल राहुल डंबाळे यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला. 

मुस्लिम समुदाय हा कायम आंबेडकरी विचारधारेसोबत जोडला गेला आहे. या ठिय्या आंदोलनाला मुस्लिम समुदायाचे मिळालेले पाठबळ अत्यंत महत्त्वपूर्ण असून यामुळे आंदोलकांची ताकद वाढली असल्याने स्मारकाचा  लढा सुटण्याच्या मार्गावर आलेला आहे, असे राहुल डंबाळे यांनी यावेळी सांगितले

दरम्यान पुणे शहरातील विविध भागांमध्ये कार्यरत असलेल्या सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना एकत्रित करून या आंदोलनामध्ये मुस्लिम समाज जास्तीत जास्त संख्येने सहभागी होईल याबाबत प्रयत्न केले जाणार असल्याचे अॅड. हाजी  गफूर पठाण यांनी यावेळी सांगितले

महाराष्ट्र मुस्लिम फाउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत हसीनाताई इनामदार , आबीद सय्यद , जमीर कागजी , जावेद शेख, एजाज पठाण , बीलाल पटेल , सज्जन कवडे आदी मान्यवर सहभागी झाले होते. 
दरम्यान याच अनुषंगाने मागील आठवड्यामध्ये मुस्लिम समाजाची बैठक देखील पार पाडली होती याच माजी नगरसेवक रशीद शेख आयुब शेख रफिक शेख मेहबूब नदाफ रईस सुंडके मुक्तार शेख हाजी फिरोज शेख सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख अंजुम इनामदार जुबेर मेमन सलीम पटेल आसिफ खान आदी मान्यवरांनी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे

‘टँगो मल्हार’ या चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

चित्रपट या माध्यमाची जादू काही औरच आहे. कोणत्याही क्षेत्रात काम केलं, तरी स्वतः चित्रपट करण्याची उर्मी काहींना स्वस्थ बसू देत नाही. संगणक शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी आगामी ‘टँगो मल्हार’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले असून येत्या १९ सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

“टँगो मल्हार” या चित्रपटाची निर्मिती ॲगलेट्स अँड आयलेट्स प्रॉडक्शन या निर्मिती संस्थे अंतर्गत करण्यात आली असून साया दाते या निर्मात्या आहेत. “टँगो मल्हार” या चित्रपटात एका रिक्षा चालकाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या तरुण अशा मल्हारला अचानकपणे “टँगो” या अर्जेटिनाच्या नृत्य प्रकाराचा शोध लागतो आणि त्याची आवड निर्माण होते. या नृत्य प्रकारामुळे त्याच्या आयुष्यात काय काय गोष्टी रंजकपणे घडत जातात या कथासूत्रावर ‘टँगो मल्हार’ हा चित्रपट बेतला आहे.चित्रपटाच लेखन साया दाते, मनीष धर्मानी यांनी केले आहे. सुमेध तरडे, ओंकार आठवले यांनी छायांकन, क्षमा पाडळकर यांनी संकलन, तुषार कांगारकर यांनी ध्वनी आरेखन, शार्दूल बापट, उदयन कानडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत केलं आहे. चित्रपटात नितेश कांबळे, कीर्ति विश्वनाथन, सीमा वर्तक, अक्षय गायकवाड, मनीष धर्मानी, मनीषा महालदार, संदेश सूर्यवंशी, पंकज सोनावणे या नवोदित कलाकरांचा अभिनय आपल्याला पहायला मिळणार आहे.

साया दाते यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित “मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी” (एमआयटी) येथून मॅकेनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी दहा वर्षं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करताना अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत युट्यूबमध्ये काम केलं, त्यानंतर भारतात परत येऊन पुण्यात स्वतःची कंपनी उभी केली. उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी प्रतिष्ठित फोर्ब्जच्या ‘३० अंडर ३०’ या यादीत त्यांना स्थान मिळालं होतं.

साया यांच्यात चित्रपट प्रेमाचं बीजं बालपणीच पेरलं गेलं होतं. वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी ‘ऑन द अदर लाइन’ ही शॉर्टफिल्म दिग्दर्शित केली होती. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात सुद्धा ही शॉर्टफिल्म गौरवली गेली. त्याशिवाय त्या स्वतः टँगो डान्सरही आहेत. त्यामुळे एकीकडे तंत्रज्ञान, उद्योगात उत्तम काम करत असताना कलेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे आपली आवड जपण्यासाठी त्यांनी ‘टँगो मल्हार’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आहे. त्यामुळे एका संगणक शास्त्रज्ञ, उद्योजिकेचा मराठी चित्रपट निर्मिती, दिग्दर्शनाचा प्रयत्न नक्कीच उत्सुकता वाढवणारा आहे यात शंका नाही.

फुफ्फुसांच्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्याकबुतरांना अनियंत्रित दाणे टाकणे टाळाच-डॉ. कल्याण गंगवाल

मानवी वस्त्यांमधील कबुतरखान्यांचे मोकळ्या जागेत स्थलांतर करावे

शाकाहार, अहिंसावादी कार्यकर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांचे आवाहन

पुणे, ता. १२: “जैन धर्मातील प्राण्यांप्रती दया, करुणा आणि अहिंसेच्या तत्त्वांवर माझा गाढ विश्वास आहे. कबुतरांना दाणे टाकणे ही श्रद्धेची आणि परंपरेची गोष्ट असली, तरी डॉक्टर म्हणून माझा कबुतरांना दाणे टाकण्याचा विरोध आहे. फुफ्फुसातील आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या कबुतरांना अनियंत्रित दाणे टाकणे टाळायलाच हवे,” अशी स्पष्ट भूमिका पुण्यातील शाकाहार व अहिंसावादी कार्यकर्ते, सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी मांडली. मानवी वस्त्यांमधील कबुतरखान्यांचे स्थलांतर करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “एक डॉक्टर, पर्यावरणप्रेमी आणि जबाबदार नागरिक म्हणून मला वास्तव सांगणे भाग आहे. कबुतर हा भारतातील स्थानिक पक्षी नसून तो मध्यपूर्वेतून आलेला आगंतुक प्रजातींमधील पक्षी आहे. त्याचे प्रजनन अतिवेगाने होते. कबुतरांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्य धोक्यात येते. फुफ्फुसाचे गंभीर आजार त्यामुळे होत आहेत. यासह सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, वाहतुकीस अडथळे तसेच चिमणीसारख्या स्थानिक पक्ष्यांचे नामोनिशाण पुसले जात आहे.”

“कबुतरांना खाऊ दिला नाही, तर ते मरतील, ही समजूत चुकीची आहे. पृथ्वीवरील लाखो प्रजाती माणसांशिवाय लाखो वर्षे जगल्या आहेत. निसर्गाने त्यांना टिकण्याची क्षमता आणि संतुलन दिले आहे. कबुतरांना न खाऊ घातल्यास त्यांची नैसर्गिक अन्नशोध प्रवृत्ती वाढते, संख्या नियंत्रणात राहते आणि निसर्गसाखळी सुरक्षित राहते. धर्मापेक्षा आरोग्य व विज्ञान महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत व कबुतरखान्यांवर बंदी घालावी. कबुतरांना खाद्य द्यायचे असल्यास मर्यादित प्रमाणातच करावे; रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणी, गल्ल्यांमध्ये हे टाळावे,” असेही आवाहन त्यांनी केले.

कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या विरोधात धार्मिक मुद्दा उपस्थित करणे अयोग्य आहे. हा मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा विषय असून, कबुतरखान्यांवर बंदी योग्य आहे. या निर्णयाचे आपण प्रत्येकाने स्वागत करायला हवे. राज्य सरकारने यासंदर्भात कडक पावले उचलावीत व मानवी आरोग्य जपण्याला प्राधान्य द्यावे.”

दूषित प्रशासन व्यवस्थेमुळे देशाची फाळणी : वजाहत हबीबुल्लाह

0

जनतेला बरोबर घेऊन केलेले शासन हेच सुशासन :
लोकतंत्र यशस्वी होणे जनतेच्याच हाती :
जनसेवकाची भूमिका पारदर्शक असावी : वजाहत हबीबुल्लाह

सरहद, पुणेतर्फे देशाचे माजी गृह सचिव डॉ. माधव गोडबोले स्मृती व्याख्यान

पुणे : प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मालकीच्या भावनेने राज्य करणे म्हणजे प्रशासन अथवा सुशासन नव्हे तर लोकतंत्रामध्ये आपण जनतेची सेवा करण्यासाठी आहोत ही भावना जनसेवकाची असली पाहिजे. सुशासनाबद्दल प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असून शकतो, परंतु जनतेला सोबत घेऊन केलेले शासन हे खरे सुशासन होय. सरकारची प्रत्येक कृती जनतेला माहिती असणे आवश्यक आहे. लोकतंत्रात अनेक कमतरता असतात कारण लोकतंत्र कधीही परिपूर्ण असू शकत नाही. लोकतंत्र यशस्वी होणे पूर्णपणे जनतेच्या हातात असते, असे प्रतिपादन भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष वजाहत हबीबुल्लाह यांनी केले. माहिती अधिकाराच्या माध्यमातून पारदर्शक सरकार निर्माण करून योग्य ते कायदे लागू करून सुशासन निर्माण करण्यात सफलता मिळविण्यासाठी जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणे आवश्यक आहे. जनसेवकाने पारदर्शक राहून जनता सुरक्षित करण्यात हातभार लावला तर लोकतंत्र नक्कीच यशस्वी होईल, असेही त्यांनी नमूद केले.

सरहद, पुणेतर्फे भारताचे माजी गृह सचिव स्व. डॉ. माधव गोडबोले स्मृतिप्रित्यर्थ आज (दि. ११ ऑगस्ट) ‌‘सुशासन : कल्पना की वास्तव‌’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वजाहत हबीबुल्लाह बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव,राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर होते. व्याख्यानाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. व्याख्यान टिळक स्मारक मंदिर येथे झाले.
याच कार्यक्रमात डॉ. माधव गोडबोले स्मृतिप्रित्यर्थ गट विकास अधिकारी प्रकाश पोळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवृत्त विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे, हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांचा सन्मान करण्यात आला.
.. तर पंडितांचे स्थलांतर टळले असते
दूषित प्रशासन व्यवस्थेमुळे देशाची फाळणी झाली, जनता मारली गेली असे सांगून वजाहत हबीबुल्लाह पुढे म्हणाले, देशातील हिंदू-मुस्लिमांध्ये धर्मावरून कायम तेढ निर्माण व्हावी हाच पाकिस्तानचा हेतू राहिला आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे पहेलगामधील धर्मविचारून केलेली हिंदूंची हत्या होय. १९६८ ते १९८२ या काळात काश्मीरमध्ये कार्यरत असताना तेथील सामाजिक वातावरण पूर्णत: अहिंसा आणि प्रेमाचेच होते. पाकिस्तानने धार्मिक तेढ निर्माण केल्यानंतर प्रशासनाने स्थानिक जनतेला विश्वासात घेवून हिंदूंची सुरक्षितता सांभाळली असती तर पंडितांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले नसते. काश्मीरी आम जनतेला विश्वासात घेऊन सुशासन निर्माण करणे ही त्या काळातील सरकारची जबाबदारी होती.
माहिती अधिकाराविषयी बोलताना वजाहत हबीबुल्लाह पुढे म्हणाले, या विभागात काम करू लागल्यानंतर जनतेला नव्हे तर सरकारी कर्मचाऱ्यांनाही सरकारी कायद्यांविषयक तसेच सरकारच्या प्रत्येक कृतीविषयक माहिती नव्हती, हे लक्षात आले. सरकारी कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या विभागीय कामकाजाबद्दलही माहित नव्हते. सरकारमध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार सुरू आहे, दु:शासन होत आहे हे जनतेला ठाऊक नव्हते. जनसंपर्क ठेवायची इच्छा असली तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सामान्य जनतेला पोहोचण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात. सचिवालयातही मोठ्या प्रमाणात ‘बिझनेस हाऊसेस’मार्फत भ्रष्टाचार होत आहे याची कल्पना मला देखील नव्हती. लोकतंत्र जनतेच्याच हातात आहे असे सांगताना ट्रम्पसारखा एक जोकर जनतेनेच निवडून दिला आहे अशी टिप्पणीही त्यांनी केली.

समाजभान ठेवून सुजाण नागरिक बनणे आवश्यक : डॉ. नितीन करीर
डॉ. नितीन करीर म्हणाले, माहिती अधिकार हा साध्य नाही तर तो सुशासनाकडे जाण्याचा मार्ग आहे. नैतिकता, कार्यक्षमता, परिणामकता आणि पारदर्शकता म्हणजे सुशासन होय. प्रत्येक प्रशासकीय निर्णयाला नैतिकता व विवेकाचा पाया असणे आवश्यक आहे. कायदा निर्माण केल्यानंतर त्याची सुयोग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी या करिता प्रशासनाने तत्पर राहणे आवश्यक आहे. कायदे करताना जनतेचा विचार लक्षात घेऊन, चर्चा करून त्याची पारदर्शकतेने अंमलबजावणी होत आहे की नाही याकडे लक्ष असणे आवश्यक आहे. चांगल्या विचारांच्या लोकांनी काहीही न करणे यातूनच वाईटाचे साम्राज्य उभे राहते म्हणून प्रत्येक व्यक्तीने समाजभान ठेवून सुजाण नागरिक बनणे, अन्यायाविरुद्ध लढा देणे, एकत्र येणे आणि सरकारला योग्य-अयोग्यतेची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. हे साधल्यास सुशासन हे स्वप्न न राहता सत्य होईल.
सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले आणि ना. गोपाळकृष्ण गोखले, शहीद भगतसिंग आणि डॉ. माधव गोडबोले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रास्ताविकात संजय नहार यांनी वजाहत हबीबुल्लाह यांचा परियच करून देत कार्यक्रमाविषयी माहिती दिली. स्वातंत्र्यपूर्वकाळात देशाला लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची तर स्वातंत्र्यानंतर ना. गोपाळकृष्ण गोखले आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारांची गरज आहे. युवा पिढीला मार्गदर्शन मिळावे यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
या प्रसंगी ‘बीड वाचतंय’ या उपक्रमाच्या बोधचिन्हाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण झाले. वजाहत हबीबुल्लाह यांचे स्वागत डॉ. नितीन करीर यांच्या हस्ते पुणेरी पगडी आणि शाल देऊन करण्यात आले. तर डॉ. शैलेश पगारिया व शैलेश वाडेकर यांनी ग्रंथ व स्मृतीचिन्ह भेट दिले. डॉ. नितीन करीर यांचा सन्मान लेशपाल जवळगे, अनुज नहार यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार लेशपाल जवळगे यांनी मानले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा, सोशल मीडियाचा वापर वाढवा, महाराष्ट्र काँग्रेसमय करा: सतेज पाटील

जातनिहाय जनगणनेसाठी राहुल गांधींनी घेतलेल्या भूमिकावर जनजागृती करा: सचिन राव

शाहीर संभाजी भगत, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, निवृत्त प्रशासकीय अधिकारी महेश झगडे यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन.

पुणे/मुंबई दि. ११ ऑगस्ट २०२५

राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका होत आहेत. या निवडणुका अत्यंत महत्वाच्या असून काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी विषयवार कामाची जबाबदारी घेतली पाहिजे. प्रभाग रचना, गट व गण तसेच मतदार याद्यांचा अभ्यास करा व काही हरकती असतील तर त्या नोंदवल्या पाहिजेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न करा त्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी अस्त्र आहे. ७१ टक्के लोक सोशल मीडियाचा वापर करतात, त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहण्यासाठी सक्रीय रहा, असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केले आहे.

खडकवासला येथे पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेत बोलताना सतेज ऊर्फ बंटी पाटील पुढे म्हणाले की, आपल्या भागातील जनतेचे प्रश्न हाती घेऊन आंदोलने केली पाहिजेत. आठवड्यातून एक तरी आंदोलन झाले पाहिजे. १८ ते २५ वयोगटातील तरुण नवमतदार काँग्रेस सोबत जोडला गेला पाहिजे त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागा, आगामी काळात महाराष्ट्र काँग्रेसमय झाला पाहिजे असा संकल्प करा व त्यादृष्टीने वाटचाल करा असे आवाहनही पाटील यांनी केले.

काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव यांनी ‘सामाजिक न्याय व जनगणना’ या विषयावर मार्गदर्शन केले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहचला पाहिजे यासाठी प्रत्येक समाज घटकाची संख्या निश्चित झाली पाहिजे. राहुल गांधी यांनी यासाठी आग्रही भूमिका घेत जातनिहाय जनगणना करण्याची मागणी लावून धरली. सरकारलाही अखेर झुकावे लागले व जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा लागला. ज्या समाज घटकाची जेवढी लोकसंख्या तेवढा त्यांचा हिस्सा असला पाहिजे. जातनिहाय जनगणनेसाठी राहुल गांधींनी घेतलेल्या भूमिकावर जनजागृती करा, असेही सचिन राव म्हणाले.

‘सांस्कृतिक राजकारण’ या विषयावर शाहीर संभाजी भगत यांनी मार्गदर्शन केले, देशात आज सर्व क्षेत्राचे धार्मिकीकरण केले आहे. सण, उत्सवाचेही व्यावसायीकरण व धार्मिकीकरण केले आहे. सण व उत्सव हे हत्यार बनवले आहेत, याची सुरुवात घर व शाळेतूनच होते. आज जे लोक सत्तेवर आहेत ते कदाचित सत्तेवरून जातीलही पण सांस्कृतीक सत्तेवरून ते जाणार नाहीत. समाजात विष पेरण्याचे काम सुरु असून हे चित्र बदलले पाहिजे. काँग्रेसच्या हाती सत्ता येईल पण जमीन हातात घ्यावी लागणार आहे आणि विष पेरलेली ही जमीन कसावी लागणार आहे, असे संभाजी भगत म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी ‘सामाजिक राजकीय आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन केले, निवडणूक जिंकण्यासाठी सामाजिक द्वेष पसरवण्याचा प्रकार सुरु आहे. कोपर्डीची घटना, परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीचा पोलीस कोठडीतील मृत्यू, बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची क्रूर हत्या आणि पुण्यात तीन मुलींना पोलिसांनी केलेली जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीची घटना याची त्यांनी उदाहरणे दिली. पुण्यातील या घटनेवेळी १७-१८ तास ठिय्या देऊनही पोलीसांनी एसटीएसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. अशा प्रसंगी त्यांच्या पाठीशी काँग्रेसने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. हिंदू मुस्लीम वाद जाणीवपूर्वक निर्माण केला जात असून त्यांना नागरिकत्व सिद्ध करायला लावले जात आहे. आधी मतदार सरकार ठरवत होते आता SIR आणून सरकार मतदार ठरवू लागले आहे. महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक आणले असून अर्बन नक्षलवाद नावाचा बागुलबुवा उभा केला आहे. न्याय व्यवस्थेतही सर्वकाही आलबेल नाही. न्यायाधीशच विचित्र टिपण्णी करु लागले आहेत हे सर्व भयंकर आहे. अदानी अंबानीसाठी आजचे सत्ताधारी देशालाच देशोधडीला लावत आहेत, असे टकले म्हणाले..

निवृत्त प्रशासकीय अधिकारी महेश झगडे यांनी ‘प्रशासन व कार्यकर्ता’ या विषयावर मार्गदर्शन केले, लोकशाहीत शासन व प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत असे गोंडस नाव दिले आहे पण ते खरे नाही. खरे तर प्रशासनच सरकार असल्यासारखे वागत आहे. प्रशासन ही व्यवस्था सरकार चालवण्यासाठी सहकार्य करणारी व्यवस्था आहे. प्रशासक बटीक वा गुलाम असता कामा नये तर ती स्वतंत्र बाण्याची असली पाहिजे. या प्रशासनाला भक्कम कवच कुंडले आहेत त्यामुळे त्यांना काढून टाकणे खूप कठीण आहे. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला प्रशासनाबद्दल माहिती असणे गरजे आहे, असेही झगडे म्हणाले

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचा उद्या दिनांक १२ ऑगस्ट ला समारोपाची दिवस आहे. प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेरा, इतिहासकार अशोककुमार पांडेय व ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे हे मार्गदर्शन करतील.

कलंकित मंत्र्यांविरोधात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा

कलंकित मंत्री हटवा, मुख्यमंत्री राजीनामा द्या’ घोषणांनी परिसर दणाणला

पुणे – महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुणे जिल्हा व शहराच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ‘महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन’ जोरदारपणे पार पडले.‘कलंकित मंत्री हटवा, मुख्यमंत्री राजीनामा द्या’ या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा भ्रष्ट, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या, डान्सबार चालवणाऱ्या, रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना पाठीशी घालण्याऐवजी तात्काळ मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा, अन्यथा त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी ठाम मागणी केली.

शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, “आजचे हे युती सरकार हे कलंकित सरकार असून, सामान्य जनतेला दिशाभूल करत आहे. महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणाऱ्या मंत्र्यांना सत्ता टिकवून ठेवणे म्हणजे लोकांचा विश्वासघात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना राज्यभर अधिक आक्रमक आंदोलन करेल.”

यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक वसंत मोरे, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, प्रकाश भेगडे, उल्हास शेवाळे, अशोक खांडेभराड, संजय काळे, संतोष मोहोळ, राम गायकवाड, रवींद्र मुजुमले, गणपत खाटपे, राजाराम बाणखेले, सचिन पासलकर, रामभाऊ पारिख, आबा कुंभारकर, आबा निकम, प्रशांत राणे, अनंत घरत, पंढरीनाथ खोपडे, राकेश मांढरे, प्रशांत बधे, सचिन खैरे, पोपट शेलार, भोलेनाथ पडवळ, किरण देशमुख, संजय देशमुख, राहुल शिंदे, सयाजी शिंदे, गणेश शिवले, मकरंद पेटकर, राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, दीपक शेडे, दिलीप पोमन, बाळासाहेब मोडक, रमेश शिरसागर, बाळासाहेब भांडे, सचिन भगत, किशोर रजपूत, रुपेश पवार, चंदन साळुंखे, दीपक जगताप, नागेश खडके, शशिकांत पापळ, राहुल शेडगे, नितीन निगडे, अमर मारटकर, संतोष भुतकर, प्रवीण रणदिवे, संतोष ढोरे, सचिन चिंचवडे, परेश खांडके, अमोल काळे, पुरुषोत्तम विटेकर, सूर्यकांत पवार, हरिश्चंद्र सपकाळ, राजेश मोरे, उत्तम भुजबळ, अमोल देवळेकर, युवराज पारिख, सागर पाटील, मुकुंद चव्हाण, प्रवीण डोंगरे, गिरीश गायकवाड, जुबेर शेख, पराग थोरात, रमेश परदेशी, सुरज खंडागळे, हेमंत धनवे, विजय रावडे, राजाराम नवघणे, संदीप आमले, दत्ता घुले, प्रथमेश भुकन, तेजस मर्चंट, ज्ञानेश्वर डफळ, अमोल दांगट, अनिल परदेशी, बाळासाहेब गरुड, सुनील गायकवाड, शंतनू उभे, अनिल दामजी, दत्ता देवकर, मिलिंद पत्की, संजय लाहोट, राजेश राऊत.तर महिला आघाडीच्या
स्वाती ढमाले, पद्मा सोरटे, विद्या होडे, रेखा कोंडे, रोहिणी कोल्हाळ, सलमा भाटकर, अमृता पठारे, निकिता मराटकर, ज्योती चांदेरे, करुणा घाडगे, सोनाली सोनवणे, सीमा मगर, ज्योती वीर, सीमा गायकवाड, सविता गोसावी, स्नेहल पाटोळे, सरोज कसबेकर.आंदोलनात सहभागी झाल्या होत्या .

शिवसेनेचे हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भव्य, उत्स्फूर्त आणि घोषणाबाजीने गाजले. पुढील टप्प्यात महाराष्ट्रभर अशाच आंदोलने घेणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘बिटीया फाउंडेशन’ तर्फे;पुण्यात शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल!

0

१४ ऑगस्ट रोजी पारितोषिक वितरण सोहळा.

पुणे- उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘बिटीया फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. या फेस्टिव्हलअंतर्गत निवडक चित्रपटांचे स्क्रीनिंग १० ऑगस्ट २०२५ रोजी मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक सभागृह, कोरेगाव पार्क येथे पार पडले. या वेळी एकूण ३०० कलाकृतींची नोंदणी झाली होती. त्यापैकी परीक्षकांनी निवडलेल्या २५ कलाकृतींचे स्क्रीनिंग करण्यात आले, तर १७ कलाकृतींना पारितोषिक वितरणासाठी निवडण्यात आले. या स्पर्धेसाठी ज्युरींमध्ये दिग्दर्शक-अभिनेत्री वृशा सेन-दाभोळकर, निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता विशाल गोरे, दिग्दर्शक-अभिनेता सचिन दानिया आणि दिग्दर्शक-संगीतकार जाहिर दरबार यांचा समावेश होता.

स्पर्धेत १ मिनिट ते ७ मिनिटांच्या शॉर्ट फिल्म्स तसेच स्वतंत्र कॅटेगरीत १ मिनिटांच्या सोशल मीडिया रील्स सादर करण्यात आल्या. समाजजागृती, सांस्कृतिक मूल्ये, सध्याची पिढी, पर्यावरण, वाहतूक, भ्रष्टाचार, महिला सक्षमीकरण, ‘से नो टू ड्रग्स’, ‘गुड टच – बॅड टच’, एड्स जनजागृती, ‘नो मीन्स नो’, हुंडाबळी, घरगुती हिंसा अशा विषयांवरील चित्रफितींना प्राधान्य देण्यात आले, तसेच इतर सर्जनशील व सामाजिक आशय असलेल्या कलाकृतींनाही उत्साहाने स्थान मिळाले.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन हॉल, नवी पेठ येथे होणार आहे. माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, खासदार राजनी ताई पाटील, जॉइंट पोलीस कमिशनर रंजन शर्मा, माजी खासदार प्रदीपदादा रावत, अभिनेत्री स्मिता गोंदकर, सुहाना मसालाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल चोरडिया, सुर्यादत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे डॉ. संजय चोरडिया, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, दूरदर्शनचे माजी अतिरिक्त संचालक मुकेशा शर्मा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज भोसले आणि राज इम्पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राज जैन राणावत हे मान्यवर या सोहळ्यात पाहुणे असतील.

या कार्यक्रमात तीन प्रमुख कॅटेगरींमध्ये सहा मुख्य पारितोषिके आणि दोन प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जाणार आहेत. पारितोषिकांमध्ये रोख रक्कम, ट्रॉफी, प्रमाणपत्रे आणि आकर्षक भेटवस्तूंचा समावेश असेल. मुख्य पारितोषिकांमध्ये कॅमेरा व स्मार्टफोन शॉर्ट फिल्म्स कॅटेगरीत – पहिला क्रमांक ₹२५,०००, दुसरा क्रमांक ₹१५,००० आणि तिसरा क्रमांक ₹९,००० असेल. रील कॅटेगरीत – पहिला क्रमांक ₹५,०००, दुसरा क्रमांक ₹३,००० आणि तिसरा क्रमांक ₹२,००० असा गौरव दिला जाईल, अशी माहिती ‘बिटीया फाउंडेशन’च्या संगीता तिवारी यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, या उपक्रमातून तरुणांना समाजातील ज्वलंत विषयांवर भाष्य करण्याची संधी मिळून, चित्रपटसृष्टीत करिअर घडविण्याची प्रेरणा मिळेल.