Home Blog Page 170

घरगुती वीज ग्राहकांनी ओलांडला १,००० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा टप्पा

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सूर्यघर मोफत वीज योजनेतील यशस्वी कामगिरी

मुंबई, दि. १३ ऑगस्ट २०२५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने यशस्वी कामगिरी केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेच्या अंतर्गत घरगुती ग्राहकांच्या छतावरील सौर ऊर्जानिर्मिती क्षमतेने एक हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांचे, महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तसेच छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या पुरवठादारांचे अभिनंदन केले आहे.

मा. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या या योजनेचा घरगुती ग्राहकांना थेट लाभ असल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महावितरण राज्यात या योजनेची अंमलबजावणी करत आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू केलेल्या या योजनेत गेल्या दीड वर्षात छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या राज्यातील ग्राहकांची संख्या अडीच लाखापेक्षा अधिक झाली असून त्यांची एकत्रित क्षमता १,००० मेगावॅट अर्थात एक गिगावॅट झाली आहे. या ग्राहकांना केंद्र सरकारकडून १८७० कोटी रुपये अनुदान मंजूर झाले.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र हे आघाडीचे राज्य ठरले आहे. योजनेच्या अंमलबजावणीत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डिकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनी देशभर सौर ऊर्जेच्या वापराबाबत जागृती करण्यात येणार असून त्याच वेळी राज्यातील वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जानिर्मितीच्या बाबतीत एक हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला आहे.

छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात नागपूर जिल्ह्याने ४०,१५२ लाभार्थी ग्राहक आणि १५७ मेगावॅट क्षमतेसह प्रथम क्रमांक मिळविला आहे. नागपूर जिल्ह्यापाठोपाठ पुणे (१९,१९५ ग्राहक व ८९ मेगावॅट क्षमता), जळगाव (१८,८९२ ग्राहक व ७० मेगावॅट क्षमता), अमरावती (१५,२४५ ग्राहक व ६३ मेगावॅट क्षमता), छत्रपती संभाजीनगर (१६,६६४ ग्राहक, ५९ मेगावॅट क्षमता) व नाशिक (१५,४६८ ग्राहक, ५५ मेगावॅट क्षमता) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

योजनेचा असा लाभ घ्या

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांनी राज्यात एक हजार मेगावॅट क्षमतेचा टप्पा ओलांडला असून अन्य घरगुती वीज ग्राहकांनी आणि गृहनिर्माण संस्थांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.

योजनेचा लाभ घेण्यासाठी https://pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ग्राहक महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधू शकतात.

छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ग्राहकांना थेट अनुदान मिळते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला तीस हजार रुपये, दोन किलोवॅटला साठ हजार रुपये तर तीन किलोवॅटला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. गृहनिर्माण संस्थांनाही पाचशे किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट १८ हजार रुपये अनुदान मिळते. छतावर बसविलेल्या सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पातून पुढे २५ वर्षे वीजनिर्मिती होते. या वीजनिर्मितीमुळे ग्राहकाची घरगुती गरज पूर्ण होते व अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते.

‘टाटा पॉवर’ची ‘घरघर सोलर’ मोहीम पुण्यात सुरू

महाराष्ट्रात छतावरील सौरऊर्जा प्रसाराला गती देणार

·         स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विशेष योजना जाहीर – फक्त १९४७ रुपयांमध्ये छतावरील सौर प्रणालीचे मालक होण्याची संधी; ही रक्कम स्वातंत्र्य वर्षाचे प्रतीक असून, महागड्या वीजबिलांपासून मुक्ततेचेही प्रतीक.

·         राज्यात पुढील तीन वर्षांत ८०० मेगावॅट इतकी रूफटॉप सोलर यंत्रणा बसविण्याचे कंपनीचे लक्ष्य.

·         ‘रूफटॉप सोलर’चे एक हजार चॅनेल भागीदार व किरकोळ विक्रेते नियुक्त करण्याची योजना, त्यामुळे वितरणाचे जाळे होणार अधिक बळकट.

·         निवासी ग्राहकांसाठी ‘लाइफस्टाइल सोल्युशन्स’ सादर; यामध्ये ‘मायसाईन’ ही अखंडित वीजपुरवठ्यासाठी कॉम्पॅक्ट, बुद्धिमान सोलर + बॅटरी बॅकअप प्रणाली; तसेच ‘सोलर डिझाईन स्पेसेस’ या टिकाऊपणा व सौंदर्याचा संगम असलेल्या २५ निवडक आकर्षक रूफटॉप यंत्रणांची श्रेणी, यांचा समावेश.

पुणे, १३ ऑगस्ट २०२५ : ‘टाटा पॉवर’ची उपकंपनी असलेल्या व अक्षय ऊर्जा क्षेत्रातील देशातील अग्रगण्य कंपनी अशी ख्याती मिळवलेल्या ‘टाटा पॉवर रिन्यूएबल्स’ने आज पुण्यात घरघर सोलर ही आपली महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली. या उपक्रमाचा उद्देश निवासी घरांवर सौरऊर्जा प्रणालींचा वापर वाढवणे हा असून, दर्जेदार, परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध सौरऊर्जा उपायांसह विश्वासार्ह सेवा प्रदान करणे हे त्यामागचे ध्येय आहे.

टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचा एक भाग असलेल्या ‘टाटा पॉवर सोलारूफ’ने ‘घरघर सोलर’ मोहिमेदरम्यान महाराष्ट्रासाठी विशेष योजना जाहीर केली असून, ती स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सादर करण्यात आली आहे.

नव्या योजनेत ग्राहकांना फक्त १९४७ रुपये भरून छतावरील सौर प्रणालीचे मालक होता येईल. ही रक्कम भारताच्या स्वातंत्र्य वर्षाचे प्रतीक असून, जास्त रकमेच्या वीजबिलांपासून स्वातंत्र्य ही संकल्पना ती दर्शवते. या प्रणालीच्या किंमतीसाठी जवळपास १०० टक्के कर्जसुविधा उपलब्ध आहे. दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीसाठी २३६९ रुपयांपासून सुरू होणारे परवडणारे मासिक हप्ते, ६० महिन्यांपर्यंतचा सोयीस्कर कर्जकालावधी आणि जलद प्रक्रियेसाठी त्वरित डिजिटल कर्जमंजुरीची सुविधा अशी या योजनेची वैशिष्ट्ये आहेत. अतिरिक्त लाभ म्हणून, ‘टाटा पॉवर सोलारूफ’च्या सर्व निवासी ग्राहकांना ‘टाटा एआयजी’ कंपनीकडून एक वर्षाची मोफत सौर विमा सुविधा देण्यात येत आहे.

योजनेचे तपशील :

 पर्याय२ केडब्ल्यूपी३ केडब्ल्यूपी५ केडब्ल्यूपी१० केडब्ल्यूपी
प्रारंभिक भरणा१९४७१९४७१९४७१९४७
अनुदानपूर्व ईएमआय३८५९५०८०८२५४१४११४
अनुदानानंतर ईएमआय२३६८३१४३६३१७१२१७७
कालावधी (महिने)६०६०६०६०

*ही अंदाजे संख्या असून, प्रणालीची किंमत व कालावधी यानुसार त्यात बदल होऊ शकतो.


‘पंतप्रधान सूर्य घर योजने’अंतर्गत निवासी ग्राहकांना केंद्र सरकारकडून पहिल्या २ किलोवॅट क्षमतेसाठी प्रति किलोवॅट ३०,००० रुपये आणि त्यानंतरच्या १ किलोवॅटसाठी प्रति किलोवॅट १८,००० रुपये इतकी अनुदानाची तरतूद आहे. ३ किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या प्रणालीसाठी एकूण अनुदानाची कमाल मर्यादा ७८,००० रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ग्राहकांनी सौरऊर्जेचा स्वीकार जास्तीत जास्त करावा यासाठी ‘टाटा पॉवर सोलारूफ’ने एसबीआय, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक यांसह १५ आघाडीच्या वित्तीय संस्थांशी भागीदारी केली असून, निवासी ग्राहकांसाठी सुलभ कर्जसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.


‘टाटा पॉवर सोलारूफ’ने महाराष्ट्रात जुलै २०२५पर्यंत एकूण ७७५ एमडब्ल्यूपी इतक्या क्षमतेच्या निवासी छतांवर सौरऊर्जा यंत्रणा बसविल्या असून, याचा लाभ २७,९१० ग्राहकांना मिळाला आहे. पुढील तीन वर्षांत आणखी ८०० मेगावॅट क्षमतेचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पुण्यात आधीच २०० मेगावॅट क्षमतेसह भक्कम उपस्थिती असलेल्या कंपनीने त्याच कालावधीत आणखी २५० मेगावॅट क्षमता वाढवण्याची योजना आखली आहे. त्यामुळे राज्यात स्वच्छ ऊर्जेचा प्रसार गतीमान करण्याच्या तिच्या बांधिलकीला अधिक बळ मिळणार आहे.

तसेच, कंपनीने पुढील तीन वर्षांत १,००० चॅनेल भागीदार आणि किरकोळ विक्रेते नियुक्त करून महाराष्ट्रातील आपली कार्यव्याप्ती वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे तिचे वितरणाचे जाळे अधिक सक्षम होणार आहे. टाटा पॉवर सोलारूफ संपूर्ण देशभरातील ग्राहकांना उच्च कार्यक्षमतेचे मॉड्यूल, २५ वर्षांची हमी, विमा, केंद्रिय अनुदान, सोयीस्कर वित्तीय सुविधा आणि उत्कृष्ट विक्रीपश्चात सेवा अशी वैशिष्ट्ये असलेले ‘रूफटॉप सोलर’मधील एक संपूर्ण सोल्युशन आतापर्यंत देत आली आहे.

छतावरील सौरऊर्जा यंत्रणेला अधिक लोकप्रिय करण्यासाठी ब्रँडिंग आणि जाहिरातींची व्यापक मोहीम आणि त्यातून जनजागृती उपक्रम कंपनी हाती घेणार आहे. यामध्ये सौर उपायांचे फायदे, स्वीकारण्याची सुलभ प्रक्रिया, आयुष्यभराची सेवा आणि दर्जाची हमी या बाबींवर विशेष भर दिला जाईल.

स्वच्छ ऊर्जेविषयीच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘टाटा पॉवर सोलारूफ’ने निवासी ग्राहकांकरीता दोन लाइफस्टाइल सोल्युशन्स सादर केली आहेत. यातील ‘मायसाईन’ ही यंत्रणा कॉम्पॅक्ट व बुद्धिमान स्वरुपाची सोलर + बॅटरी बॅकअप अशी प्रणाली असून ती अखंडित वीजपुरवठा देते. त्याचप्रमाणे ‘सोलर डिझाईन स्पेसेस’ या प्रणालीमध्ये टिकाऊपणा व सौंदर्य यांचा संगम असलेल्या २५ आकर्षक रूफटॉप सोलर यंत्रणांची निवडक श्रेणी समाविष्ट आहे. ही दोन्ही उत्पादनेही स्वातंत्र्य दिनाच्या योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत.

गेल्या दहा वर्षांपासून देशातील अव्वल क्रमांकाची रूफटॉप सोलर कंपनी असलेली टाटा पॉवर सोलारूफ आपल्या ग्राहकांना मॉड्यूलवर २५ वर्षांची हमी, विश्वासार्ह दर्जाची खात्री, ४५० हून अधिक जिल्ह्यांमध्ये विशेष विक्री व सेवा, संपूर्ण भारतात आयुष्यभराची सेवा व विक्रीपश्चात सहाय्य, सोयीस्कर वित्तपुरवठ्याचे पर्याय आणि छतावरील सौर प्रणालींसाठी विमा अशा व्यापक सुविधा प्रदान करीत आहे.

सुलभ वित्तपुरवठा, देशव्यापी उपस्थिती आणि विविध नाविन्यपूर्ण उपायांद्वारे टाटा पॉवर स्वच्छ ऊर्जेला मुख्य प्रवाहात आणत आहे आणि प्रत्येक भारतीय घराला सौरऊर्जा वापरण्यास सक्षम करत आहे.

#GharGharSolar या मोहिमेअंतर्गत छतावरील सौरऊर्जा स्थापनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक ग्राहकांनी १८००२५७७७७७ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन कंपनीने केले आहे.

“हर घर तिरंगा” अभियानास आळंदीत उत्स्फूर्त प्रतिसाद-मुख्याधिकारी माधव खांडेकर

पुणे, दि. 13: हर घर तिरंगा अभियानांतर्गत आळंदी नगरपरिषदेअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांपासून नागरिक, कर्मचारी, महिला बचत गट, विविध संस्था यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली आहे.

आळंदी शहरात हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता स्पर्धा व विविध देशभक्तीपर व जनजागृतीचे उपक्रमाचे पुढीलप्रमाणे आयोजन करण्यात आले. ७ ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद शिक्षण विभाग शाळा क्रमांक दोन व चार या शाळां मधील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना स्वच्छतेचे महत्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. ८ ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद शाळा क्र. 3 येथे चित्रकला स्पर्धा तसेच तिरंगा राखी मेकिंग स्पर्धा तिरंगा रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. ११ ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक 4 मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त “हस्ताक्षर स्पर्धा व माझे संविधान” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. १२ ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक चार मध्ये समूहगीत गायन स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, देशभक्ती आणि सामूहिक जबाबदारी यांचे प्रभावी संदेश देण्यात आले.“हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता” अभियानांतर्गत आळंदी शहरात घेतलेले हे विविध उपक्रम नागरिकांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारे ठरले, अशी माहिती श्री. खांडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली.

डिजिटल जगात स्वतःचे संरक्षण कसे करावे हे आत्मसात करणे गरजेचे -अवंती दळवी

डिजिटल जगात स्वतःचे संरक्षण कसे करावे पद्मावती अ‍ॅरेझ व्हील्स कर्मचाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम संपन्न

पुणे- पद्मावती अ‍ॅरेझ व्हील्स येथे कर्मचाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी इम्पॅक्ट अ‍ॅक्टिव्हिटी आयोजित करण्यात आली. परस्परसंवादी सत्रे, प्रत्यक्ष उदाहरणे आणि उपयुक्त सुरक्षा टिप्स यांच्या माध्यमातून आपण लोकांना डिजिटल जगात स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दल सतत जनजागृती करत राहणे आवश्यक आहे असे येथे अवंती दळवी यांनी सांगितले .

हा उपक्रम एस.पी. कॉलेज आणि क्विक हील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ईशा जोशी आणि अवंती दळवी यांनी मार्गदर्शन केले. लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी व त्यांना सायबर सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या समर्पित प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले. सत्रादरम्यान कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला व सायबर गुन्ह्यांबाबतचे स्वतःचे अनुभव शेअर केले, ज्यामुळे हा उपक्रम माहितीपूर्ण व परिणामकारक ठरला.

आचार्य अत्रे नगरमध्ये…

आचार्य अत्रे मराठीचे सर्वाधिक लोकप्रिय नाटककार होते.  ते लंडनला डी.एड. करायला गेले आणि फार्सिकल कॉमेडीचे मर्म आत्मसात करून आले. त्यांची विनोदी नाटके सर्वांना आवडत. अ. ए. सोसायटी हायस्कूलमध्ये असताना आम्ही ‘पाणिग‘हण’ हे नाटक केले. दुसर्‍यावेळी पुन्हा अत्र्यांचे ’वंदेभारतम्’ हे नाटक केले. हौशी कलावंतांना अत्र्यांची नाटके करणे सहज शक्य होते. त्यांचे ’लग्नाची बेडी’ हे नाटक तर हौशी नाट्यसंस्थांनी डोक्यावर घेतले. ’घराबाहेर’ हेही नाटक खूप चालले…
अत्रे आपल्या विनोदी भाषणाबद्दल प्रसिद्ध होते पण त्यांची भाषणे अत्यंत भावपूर्ण असत. मी त्यांच्या लिखाणाचा वेडा होतो. त्यांचे प्रत्येक पुस्तक मी वाचून काढले. अगदी एकलव्यासारखे मी त्यांना गुरुस्थानी मानले होते.
नगर महाविद्यालयाचे निमंत्रण
आचार्य अत्रे यांना अहमदनगर महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे उद्घाटनाचे निमंत्रण पाठवण्यात आले. ते पुण्याहून नगरला कारने येणार होते. दुपारी निघून तीन वाजेपर्यंत नगरच्या रेल्वे गेट जवळून त्यांना घेऊन येण्यासाठी मी स्टेशनवर गेलो… ठरल्याप्रमाणे त्यांची निळी अ‍ॅम्बॉसिडर गाडी रेल्वे फाटकाजवळ आली. ती थांबवून मी त्यांना नमस्कार केला. मागच्या सीटवर अत्रे एकटेच संपूर्ण पडले होते. त्यांच्या पायाजवळ सीटखाली एक मोठी रमची बाटली आडवी पडली होती… त्यांनी पांढरी अर्धी चड्डी आणि पांढरा बनियान घातला होता. डोक्यावर गोल कॅप होती. ‘चला, प्रथम भालेराव साहेबांकडे जाऊ… नंतर कॉलेजवर…’ मी म्हटले. खरं म्हणजे अत्र्यांचा तो ‘अवतार’ पाहून मी मनातून फार घाबरून गेलो होतो.
नगर एस.टी.स्टँडसमोर हाजी इब‘ाहिम बिल्डिंग आहे. त्यात इंपिरीयल हॉटेलशेजारी असलेल्या एका फ्लॅटमध्ये अ‍ॅड. भालेराव राहात. त्यांनी अत्र्यांचे स्वागत केले. भालेराव अत्रेंना म्हणाले, ’हा रतन सोनग‘ा…‘, ‘अरे, मला मुलाची ओळख करून देता? मला माहित आहे.’ त्यांनी म्हटले…
’आम्ही तासाभराने परत येतो…’ असे सांगून टी बार्नबस यांच्या फ्लायमाऊथ गाडीने आम्ही कॉलेजात गेलो. आचार्य अत्रे येणार म्हणून सगळ्या कॉलेजमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या भाषणाला नागरिकांची गर्दी होणार म्हणून हा कार्यक्रम जिमखान्याच्या स्टेजवर घेण्यात आला होता. समोर विस्तृत मैदानावर खुर्च्या आणि सतरंज्या टाकल्या होत्या. नियोजित वेळी डॉ. रानडे,  यांच्यासोबत आचार्य अत्रे आले. आमचे मराठी विभाग प्रमुख डॉ. शां. पां. बंडेलू, प्राचार्य बार्नवस आणि मी बसलो होतो. मी प्रास्ताविक केले. डॉ. शां. पां. बंडेलूनी स्वागत केले. समोरचे मैदान विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी फुलून गेले होते. दुपारी पाहिलेले अत्रे आणि आता दिसणारे अत्रे यामध्ये खूपच फरक होता. मॅनिला आणि फुल पँटमध्ये अत्रे विलक्षण रुबाबदार दिसत होते.
सभ्य स्त्री पुरुष हो!
अशी सुरवात करून त्यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली. समोर पटांगणावर विशाल जनसमुदाय होता. कॉलेजचा विद्यार्थी वर्ग पुढे बसलेला होता. ’आज मी मराठी साहित्य मंडळाचे उद्घाटन करायला आलो.’ लोकांनी प्रत्येक वाक्याबरोबर हंशा आणि टाळ्या द्यायला सुरवात केली होती. अत्र्यांची कीर्तीच अशी होती की, हा ‘जाम हसवणारा माणूस’ आहे अशी समजूत होती. काहीही बोलले तरी ते लोक खुशीत असत. ते पुढे म्हणाले, माझी मराठी भाषा ज्ञानेश्वर, तुकोबाची आहे… ती जशी ‘अमृताशी पैजा जिंकणारी’ आहे तशी नाठाळाचे माथी काठी हाणणारी आहे. मराठी माणसाची व्याख्या करायला गेलो तर ज्याला ज्ञानेश्वरांची एक ओवी तुकारामांचा एक अभंग माहित आहे तो मराठी माणूस प्रत्येक मराठी माणसाला हे समजते.
आमचे मराठी साहित्य संतांच्या वाणीने समृद्ध आहे. आमचे काव्य केशवसुत, गडकरी, माधव ज्यूलियन, यशवंत यांंनी आपल्या कवितांनी नटवले आहे. पण सध्या नवकाव्याचा उदय झाला आहे. कोण तो कवी मर्ढेकर कसली कविता लिहितो.
‘पिपात मेले ओल्या उंदिर
मुरगळलेल्या मानविण…’
शी:ऽऽ पिपात उंदीर कसे मेले? त्यांच्या माना कुणी मुरगळल्या? ह्याच  उंदरावर बसून नवकाव्याचा प्लेग महाराष्ट्रात आला ! (प्रचंड हंशा…)
साहित्यात एक वाद नेहमी चालू असतो. ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला…’ आमचे ना. सि. फडके म्हणतात, ‘कला ही कलेसाठी असते… तिचा जीवनाशी संबंध नसतो…’ आम्ही म्हणतो, ‘कला ही कलेसाठी तर कपडे हे कपड्यांसाठी काय? आम्ही या फडक्याच्या चिंध्या करून टाकल्या! हे नाक शिंकरण्याचे फडके असेच साहित्यात लुडबुड करते!’
साहित्य म्हणजे जे माणसाला सहित घेऊन जाते ते साहित्य. आचार्य विनोबांनी साहित्याची चांगली व्या‘या केली आहे. साने गुरुजी हे थोर साहित्यिक. त्यांचे सर्व साहित्य मराठी माणसाला जीवनाचे मांगल्य शिकवले… जीवनात जे जे पवित्र आणि मंगल आहे ते मराठी साहित्य आहे.
पंचतंत्र… इसापनीती च्या कथा माणसाला महत्त्वाची शिकवण देतात. सगळ्या प्राण्यात माणूस हा प्राणी हुशार आहे… पण काही माणसे स्वार्थात इतकी बरबटली असतात की त्यांना इतरांच्या दु:खाचे भान नसते. गरीबा बद्दल जिव्हाळा नसतो. निसर्गाबद्दल प्रेम नसते… महान लोकांविषयी आदर नसतो.
शेवट करताना आचार्य अत्रे म्हणाले, ‘मी मेल्यावर माझ्या समाधीवर पुढील वाक्य लिहा… ’हा माणूस मूर्ख होता पण कृतघ्न नव्हता!’ टाळ्यांचा प्रचंड कडकटात ही सभा संध्याकाळी संपली…

लेखक: प्रा. रतनलाल सोनग्रा

महाराष्ट्रातील सौर ऊर्जेच्या विविध योजनांची अंमलबजावणी व यश इतर राज्यांसाठी आदर्श

केरळचे अपर मुख्य सचिव पुनीत कुमार

मुंबई: गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रात महावितरणने सौर ऊर्जेच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे वीजदर कपातीसह शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा, घरगुती ग्राहकांना सौर दिवसा वीज दरात सवलत तसेच क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होऊन औद्योगिक व व्यावसायिक वीज दरात घट होण्यास सुरवात झाली आहे. सौर योजनांची ही अंमलबजावणी व फलनिष्पत्ती इतर राज्यांसाठी आदर्श आहे, असे गौरवोद्गार केरळ राज्याचे अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्री. पुनीत कुमार यांनी बुधवारी (दि. १३) काढले.

महाराष्ट्रातील विविध सौर ऊर्जा योजनांची अंमलबजावणी व माहिती घेण्यासाठी श्री. पुनीत कुमार यांनी महावितरणच्या ‘प्रकाशगड’ मुख्यालयास भेट दिली. यावेळी आयोजित बैठकीत अपर मुख्य सचिव (ऊर्जा) सौ. आभा शुक्ला व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी विविध सौर योजनांमुळे सन २०३० पर्यंत राज्याच्या वीजक्षेत्रात होणारे आमुलाग्र बदल, ग्राहकाभिमुख फायदे, वीज दर कपात, आर्थिक गुंतवणूक व रोजगार संधी आदींची माहिती दिली. यावेळी संचालक श्री. सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प), श्री. योगेश गडकरी (वाणिज्य), श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) उपस्थित होते.

मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्याच्या वीज क्षेत्रासाठी रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सन २०३० पर्यंत तब्बल ३८ हजार मेगावॅट हरित ऊर्जेसह ४५ हजार मेगावॅट विजेची आणखी भर पडणार आहे. राज्यातील नवीकरणीय ऊर्जेची क्षमता १३ टक्क्यांवरून ५२ टक्के होणार आहे. यामध्ये सुमारे ३ लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ७ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. तसेच पुढील पाच वर्षांमध्ये वीज खरेदीमध्ये ८२ हजार कोटी रुपयांची बचत होईल व त्यायोगे सर्व वर्गवारीचे वीज दर कमी होत जाणार आहे अशी माहिती अपर मुख्य सचिव सौ. शुक्ला यांनी दिली.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी सांगितले, की देशात सर्वाधिक ४५ लाख कृषिपंप महाराष्ट्रात आहे. दररोज ३० टक्के म्हणजे १६ हजार मेगावॅट विजेचा कृषिपंपांना पुरवठा केला जातो. दिवसा व शाश्वत वीजपुरवठ्यासाठी आतापर्यंत पीएम कुसुम-सी योजना व मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेतून देशात सर्वाधिक ५ लाख १२ हजार सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहे तर मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० मधून जगातील सर्वांत मोठा १६ हजार मेगावॅटचा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. आतापर्यंत कार्यान्वित झालेल्या १९७२ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांमधून ३६९ उपकेंद्रांद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येत आहे. यासह पीएम सूर्यघर योजनेमधून अडीच लाख घरगुती ग्राहकांचे वीजबिल शुन्यवत झाले आहे.

या बैठकीमध्ये केरळचे अपर मुख्य सचिव श्री. पुनीत कुमार यांनी सौर योजनांच्या विविध मुद्दयांवर चर्चा केली. केरळमध्ये नद्या व पर्वतांमुळे प्रामुख्याने जलविद्युत निर्मितीवर भर देण्यात आला आहे. मात्र आता सौर ऊर्जेवर लक्ष केंद्रीत केले आहे. महाराष्ट्राने सौर ऊर्जेत कमी कालावधीमध्ये केलेली मोठी प्रगती व त्यास मिळालेले यश अनुकरणीय आहे असे श्री. पुनीत कुमार यांनी सांगितले. यावेळी कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, परेश भागवत, धनंजय औंढेकर, स्वाती व्यवहारे, दत्तात्रेय पडळकर, दिनेश अग्रवाल, भुजंग खंदारे, विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश कोहाट व श्री. संतोष सांगळे यांची उपस्थिती होती.

आंबेडकर भवन शेजारील लीजवर दिलेल्या भूखंडावरील काम थांबविण्याचे खासगी बिल्डरला आदेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीने मानले शासनाचे आभार

पुणे: मंगळवार पेठ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन शेजारील जागा आंबेडकर भवनांच्या विस्तारीकरणासाठी मिळावी अशी आंबेडकरी चळवळीची मागणी होती. मात्र ही जागा एका खासगी बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला गेला होता. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबेडकरी समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन बिल्डरला जागा देण्याचा निर्णय अखेर रद्द केला आहे.असा दावा करण्यात येत आहे . मात्र MSRDC ने एन जी व्हेंचर्स ला दिलेल्या पत्रात म्हटले आहेकी,’ मंगळवार पेठ, पुणे येथील नगर भूमापन क्र.४०५ मधील ८९०० चौ. मी. जमिनीबाबत.महामंडळ व आपलेत दि. ०४.०९.२०२४ रोजीचा झालेला भाडेपट्टा करार झाला आहे. या भाडेपट्टा करारा अन्वये आपणास महामंडळाने मंगळवार पेठ, पुणे येथील नगर भूमापन क्र.४०५ मधील ८९०० चौ. मी. जमिन भाडेतत्वावर ६० वर्षा करिता दिलेली आहे. सदर जागेचा ताबा महामंडळामार्फत दि.११.११.२०२४ रोजी आपणास देण्यात आलेला आहे.तथापि, प्रत्यक्ष जागेवर आपणामार्फत सुरु असलेल्या कामास महामंडळामार्फत पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत आहे.सदरचे पत्र उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन विस्तार कृती समितीने मात्र मुख्यमंत्र्यांनी बिल्डरला जागा देण्याचा निर्णय अखेर रद्द केला असे सांगत या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला असून शासनाचे आभार मानले आहेत.

“ राज्य शासनाने आंबेडकरी जनभावनेची व आंदोलनाची दखल घेऊन नियोजित स्मारकाच्या जागेतील खासगी विकसकाच्या कामाला स्थगिती दिल्याबद्दल शासनाचे , मुख्यमंत्र्यांचे आम्ही आभार मानत आहोत. तसेच हा विजय आंबेडकरी पक्ष संघटनांच्या एकजुटीचा व सामाजिक संघटनांच्या आंदोलनाच्या दबावामुळे झाल्यामुळे सर्व आंदोलकांचे सुद्धा आभार व्यक्त करतो.”-शैलेंद्र चव्हाण , आंदोलनाचे निमंत्रक



“ आंबेडकरी आंदोलकांनी २५ वर्षांपासुन सातत्यपूर्ण केलेली लढाई व चळवळीतील दोन पीढ्यांचा हा विजय असून शासनाने शक्य तितक्या लवकर या ठिकाणी बाबासाहेबांचे स्मारक उभे करावी अशी भावना आंबेडकरी जनतेमध्ये आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय नागरी उड्डयण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे तसेच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचेही आभार व्यक्त करीत आहोत. आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे.-राहुल डंबाळे , आंदोलनाचे समन्वयक

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुण्यात भव्य स्मारक व्हावे ही आंबेडकरी समाजाची मागणी होती. त्यासाठीचा ठराव पुणे महापालिकेने मंजूर केलेला असताना सदरची जमीन खासगी बिल्डरला देण्यात आली होती, कृती समितीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे या बाबत पाठपुरावा केला होता, येत्या १५ ऑगस्ट रोजी ५० ते ६० हजार लोक ठिय्या आंदोलन करणार होते, त्याची जोरदार तयारी सुरू होती, आंबेडकरी समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी बिल्डरला जमीन देण्याचा निर्णय रद्द केला याबद्दल समिती त्यांची आभारी आहे, आता लवकरात लवकर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक या जागेवर उभारावे ही शासनाला विनंती.-परशुराम वाडेकर, आंदोलनाचे समन्वयक

रशियाच्या स्वस्त तेलाचा सामान्यांना फायदा नाही:तेल कंपन्या आणि सरकार मात्र गलेलठ्ठ..कसे ते वाचा

गेल्या ३ वर्षांपासून भारताला रशियाकडून प्रति बॅरल ५ ते ३० डॉलर्सच्या सवलतीत कच्चे तेल मिळत आहे. या सवलतीपैकी ६५% रक्कम रिलायन्स आणि नायरासारख्या खासगी कंपन्यांना तसेच इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमसारख्या सरकारी कंपन्यांना मिळाली.सरकार46% टॅक्सही वसूल करत आहे सरकारला फायदा झाला.पण सामान्य माणसाची मात्र लुट झाली पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा मोठा भाग करांमध्ये जातो. केंद्र सरकार पेट्रोलवर प्रति लिटर १३ रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर १० रुपये उत्पादन शुल्क आकारते. याशिवाय, राज्य सरकारे मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारतात. एकूणच, पेट्रोलच्या किमतीच्या ४६% आणि डिझेलच्या किमतीच्या ४२% कर आहेत.कागदावर तेलाच्या किमती नियंत्रित नसल्या तरी किरकोळ किमती सरकार आणि तेल कंपन्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. सरकारला करांमधून स्थिर उत्पन्न हवे आहे आणि तेल कंपन्या जुन्या एलपीजी सबसिडीच्या तोट्याचे कारण देऊन त्यांचे नफा सिद्ध करतात. परिणामी, स्वस्त तेलाचा फायदा सामान्य लोकांच्या खिशात न जाता कंपन्या आणि सरकारच्या तिजोरीत जात आहे.या करातून केंद्र सरकार दरवर्षी २.७ लाख कोटी रुपये कमावते आणि राज्य सरकारे २ लाख कोटी रुपये कमावतात. एप्रिल २०२५ मध्ये उत्पादन शुल्कात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केल्याने केंद्राला ३२,००० कोटी रुपये अतिरिक्त मिळाले. हा कर सरकारसाठी उत्पन्नाचा एक स्थिर आणि विश्वासार्ह स्रोत आहे. ग्राहकांना स्वस्त तेलाचा फायदा देण्याऐवजी, सरकार इतर खर्च भागवण्यासाठी हे पैसे आपल्या तिजोरीत ठेवत आहे.
२०२०च्या आर्थिक वर्षात, भारताने रशियाकडून आपल्या गरजेच्या फक्त १.७% तेल आयात केले. २०२५ च्या आर्थिक वर्षात हा वाटा ३५.१% पर्यंत वाढला आहे. रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याचा फायदा तेल कंपन्यांच्या नफ्यावरही दिसून येतो.

२०२२-२३ मध्ये इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमचा एकूण नफा ₹३,४०० कोटी होता.
२०२३-२४ मध्ये या तिन्ही सरकारी कंपन्यांचा नफा २५ पटीने वाढला. या तिन्ही कंपन्यांनी मिळून ८६,००० कोटी रुपये कमावले.
२०२४-२०२५ मध्ये या कंपन्यांचा नफा ३३,६०२ कोटी रुपयांपर्यंत कमी झाला, परंतु तो २०२२-२३ च्या नफ्यापेक्षा जास्त आहे.
जर आपण खाजगी रिफायनरीजबद्दल बोललो तर भारतात प्रामुख्याने दोन मोठ्या खासगी कंपन्या आहेत ज्यांचे तेल शुद्धीकरण कारखाने आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नायरा एनर्जी, दोन्हीही सर्वात जास्त कच्च्या तेलावर प्रक्रिया करतात. रिलायन्सने प्रति बॅरल १२.५ डॉलर्सचा रिफायनिंग मार्जिन मिळवला आणि नायराने १५.२ डॉलर्सचा रिफायनिंग मार्जिन मिळवला. म्हणजेच, त्यांनी ते स्वस्तात विकत घेतले, त्यावर प्रक्रिया केली आणि जास्त किमतीत विकले आणि प्रत्येक बॅरलवर अधिक नफा मिळवला.

रशियन कच्च्या तेलात रिलायन्स-नायराचा ४५% वाटा: डेटा आणि विश्लेषण कंपनी केप्लरनुसार, भारताने २०२५च्या पहिल्या सहामाहीत (२४ जूनपर्यंत) रशियाकडून २३१ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात केले. यामध्ये रिलायन्स आणि नायराचा ४५% वाटा होता. २०२२ मध्ये, रिलायन्सचा वाटा ८% आणि नायराचा ७% होता.

रिलायन्स रशियाकडून एकूण तेलाच्या सुमारे ३०% तेल खरेदी करते: रिलायन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, रिलायन्स खरेदी करत असलेल्या कच्च्या तेलाच्या सुमारे ३०% तेल रशियाकडून येते. परंतु नफ्याचे श्रेय फक्त रशियन कच्च्या तेलावरील सवलतीला देणे चुकीचे आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे देण्यात आलेल्या सवलतीपूर्वी आणि नंतरही असेच घडले आहे. युरोपला उत्पादने विकून मिळणारे उत्पन्न हे आपल्या एकूण उत्पादनाचा एक छोटासा भाग आहे.

रशियाचे तेल अमेरिका-युरोपमध्ये प्रक्रिया करून विकले जात होते: रशियन कच्चे तेल आयात करून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ सारख्या उच्च मूल्याच्या उत्पादनांमध्ये शुद्ध केले जात होते. त्यानंतर, ते युरोप, अमेरिका, यूएई, सिंगापूरसारख्या देशांमध्ये निर्यात केले जात होते. २०२५च्या पहिल्या सहामाहीत, दोन्ही कंपन्यांनी ६० दशलक्ष टन शुद्ध उत्पादने निर्यात केली, त्यापैकी १५ दशलक्ष टन युरोपियन युनियनला विकले गेले. त्याची किंमत १५ अब्ज डॉलर्स होती.
फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर युरोपने रशियन तेलावर बंदी घातली. त्यानंतर रशियाने आपले तेल आशियाकडे वळवले. २०२१ मध्ये भारताने रशियन तेलाच्या फक्त ०.२% आयात केली होती, परंतु २०२३ पर्यंत ते दररोज २.१५ दशलक्ष बॅरलपर्यंत पोहोचले. २०२५ मध्ये, रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला, जो दररोज सरासरी १.६७ दशलक्ष बॅरल तेल पुरवत होता. हे भारताच्या एकूण गरजेच्या सुमारे ३७% आहे.

रशियाकडून तेल खरेदी करण्याचे भारताला अनेक थेट फायदे आहेत…इतर देशांपेक्षा स्वस्त तेल: रशिया अजूनही भारताला इतर देशांपेक्षा स्वस्त तेल पुरवत आहे. २०२३-२०२४ मध्ये रशियाकडून स्वस्त तेल मिळाल्याने भारताने १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत केली. तथापि, पूर्वी प्रति बॅरल ३० डॉलर्सपर्यंत असलेली सवलत आता प्रति बॅरल ३-६ डॉलर्सपर्यंत कमी झाली आहे.
दीर्घकालीन करार: भारतातील खाजगी कंपन्यांचे रशियासोबत दीर्घकालीन करार आहेत. उदाहरणार्थ, डिसेंबर २०२४ मध्ये, रिलायन्सने रशियासोबत १० वर्षांसाठी दररोज ५ लाख बॅरल तेल खरेदी करण्याचा करार केला. असे करार एका रात्रीत मोडणे शक्य नाही.
जागतिक किमतींवर परिणाम: भारताच्या रशियन तेल आयातीमुळे जागतिक तेलाच्या किमती स्थिर राहण्यास मदत होते. जर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले तर जागतिक पुरवठा कमी होऊ शकतो, ज्यामुळे किमती वाढू शकतात. युक्रेनशी युद्धानंतर मार्च २०२२ मध्ये तेलाच्या किमती प्रति बॅरल १३७ डॉलरवर पोहोचल्या होत्या.
भारत रशियाकडून स्वस्त कच्चे तेल आयात करतो, ज्याचे शुद्धीकरण करून ते पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधन यांसारख्या उत्पादनांमध्ये करते. ही उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात केली जातात, विशेषतः युरोपमध्ये, जिथे रशियाकडून थेट तेल आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. भारताचे म्हणणे आहे की त्यांचा व्यापार पूर्णपणे पारदर्शक आहे आणि त्यात काहीही बेकायदेशीर नाही.

रशियाकडून तेल आयातीवर कोणतीही बंदी नाही, फक्त किंमत मर्यादा लागू आहे, जी २०२२ मध्ये तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने लागू केली होती. ही किंमत मर्यादा रशियाच्या तेल उत्पन्नावर मर्यादा घालण्याच्या उद्देशाने होती, परंतु जागतिक ऊर्जा बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी रशियन तेलावर पूर्णपणे बंदी घालण्याच्या उद्देशाने नव्हती. भारताने असा युक्तिवाद केला की रशियाकडून तेल खरेदी केल्याने जागतिक तेलाच्या किमती नियंत्रणात राहतात.

जर रशियासारख्या मोठ्या तेल उत्पादक देशाने बाजारातून तेल काढून घेतले तर आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी २०२२ मध्ये वॉशिंग्टन डीसी येथे पत्रकार परिषदेत युरोपच्या दुटप्पी मानकांवर टीका केली होती. ते म्हणाले होते, “आपण जे तेल खरेदी करतो ते युरोप एका दुपारी खरेदी करतो त्यापेक्षा कमी आहे.”

भारत आपल्या गरजेच्या ८०% पेक्षा जास्त तेल आयात करतो. रशिया व्यतिरिक्त, तो बहुतेक तेल इराक, सौदी अरेबिया आणि अमेरिकेसारख्या देशांकडून खरेदी करतो. जर त्याला रशियाकडून तेल आयात करणे थांबवायचे असेल, तर त्याला या देशांकडून आयात वाढवावी लागेल…

इराक: रशियानंतर भारताचा दुसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश, जो आपल्या आयातीपैकी सुमारे २१% तेल पुरवतो.
सौदी अरेबिया: तिसरा सर्वात मोठा पुरवठादार, जो आपल्या तेलाच्या गरजेच्या १५% (दररोज सुमारे ७ लाख बॅरल) पुरवतो.
अमेरिका: जानेवारी-जून २०२५ मध्ये, भारताने अमेरिकेतून दररोज २.७१ लाख बॅरल तेल आयात केले, जे मागीलपेक्षा दुप्पट आहे. जुलै २०२५ मध्ये, भारताच्या तेल आयातीत अमेरिकेचा वाटा ७% पर्यंत पोहोचला.
दक्षिण आफ्रिकेतील देश: नायजेरिया आणि इतर दक्षिण आफ्रिकेतील देशही भारताला तेल पुरवठा करतात आणि सरकारी रिफायनरीज या देशांकडे वळत आहेत.
इतर देश: अबू धाबी (यूएई) येथून येणारे मुरबान क्रूड हा भारतासाठी एक मोठा पर्याय आहे. याशिवाय, भारताने गयाना, ब्राझील आणि इतर लॅटिन अमेरिकन देशांकडूनही तेल आयात करण्यास सुरुवात केली आहे. तथापि, त्यांच्याकडून तेल खरेदी करणे सहसा रशियन तेलापेक्षा महाग असते.

अलिकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% कर लादला आहे. त्यांनी रशियाकडून तेल खरेदी करणे हे याचे कारण असल्याचे सांगितले आहे. ट्रम्प म्हणतात की, भारतीय रिफायनरी कंपन्या त्यावर प्रक्रिया करतात आणि ते युरोप आणि इतर देशांना विकतात. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये किती लोक मारले जात आहेत याची भारताला पर्वा नाही.

महामहोपाध्याय पुरस्कार डॉ.नंदकिशोर कपोते यांना जाहीर

पुणे- अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीने प्रतिष्ठेचा व मानाचा समजला जाणारा “महामहोपाध्याय” पुरस्कार प्रसिद्ध व ज्येष्ठ कथक नर्तक डॉ.नंदकिशोर कपोते यांना जाहीर झाला आहे. डॉ.नंदकिशोर कपोते यांना या पूर्वी भारत सरकार चा संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्कार माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मिळाला आहे. तसेच याशिवाय महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार, शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार , पुणे महानगरपालिकेचा बालगंधर्व पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पं.विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या स्मरणार्थ हा महामहोपाध्याय पुरस्कार देण्यात येतो. महामहोपाध्याय पुरस्कार हा कलाक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. डॉ.नंदकिशोर कपोते यांना सोमवार दिनांक १८ ऑगस्ट ला मुंबई येथे रविंद्र नाटयमंदीर येथे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या दीक्षांत समारोह कार्यक्रमात हा महामहोपाध्याय पुरस्कार देण्यात येणार आहे.

हत्तीण, कबुतर, वाघ यामुळे महायुती सरकारची अवस्था ‘सर्कसी’ प्रमाणे ; काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते माजी आमदार प्रा. अनंत गाडगीळ यांची उपरोधिक टीका.

मुंबई, : कोल्हापूरच्या हत्तीणीच्या प्रश्नाने जनतेच्या दुखावलेल्या भावना, दादरच्या कबुतरांच्या प्रश्नाने प्रदूषित झालेले वातावरण, वांद्र्याच्या वाघाने शिवाजीपार्कवर सुरु केलेला फेरफटका, यासाऱ्या घटना हाताळतांना महायुती सरकारची ‘सर्कस’ झाली आहे.

सर्कसीमध्ये ‘तारेवरची कसरत’, हे एक मोठे आकर्षण असते. कोल्हापुरातील हत्तीण आणि वनतारातील ‘अंबारी’, दोन्ही सांभाळतांना महायुती सरकारचीच तारेवरची कसरत होत आहे.

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतांनाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला विरोध दर्शवतो तरीही महायुती सरकार ठोस कारवाई करीत नाही. याउलट पुण्यामध्ये गणपती मंडळांवर त्वरित खटले दाखल होतात यातून महायुती सरकारचा दुटप्पीपणा दिसून येतो.
काँग्रेस अल्पसंख्यांकांच्या दबावासमोर झुकते असा कायम प्रचार करणाऱ्या भा. ज. प. ने अल्पसंख्यांकातील एका समुदायाच्या आर्थिक ताकदीपुढे जणू शरणागतीच पत्करली आहे.
यातून भा. ज. प. चा दुतोंडी चेहेरा उघड झाला आहे, असेही प्रा. गाडगीळ यांनी म्हटले आहे.

याशिवाय, सर्कशीमध्ये विदूषकाने विचित्र वक्तव्य करताच रिंग मास्टर त्याला फटका देतो, तेच चित्र राज्यातील मंत्र्यांचे वर्तन व वक्तव्यांनंतर राज्यात दररोज दिसून येत आहे.आतातर बांद्र्याच्या वाघाच्या आसन व्यवस्थेवर ‘सिंहां’सनावर बसलेले प्रतिक्रिया देऊ लागल्यामुळे एकंदरीत महायुती सरकारने स्वतःला ‘लाफ्टर क्लब’च बनविले आहे, अशी टीकाही प्रा. गाडगीळ यांनी केली आहे.

तळजाई परिसरात जुगाराच्या अड्ड्यावरील पोलिसांच्या छाप्यात भाजपचा पदाधिकारी रंगेहाथ पकडला

पुणे-काल (सोमवारी)तळजाई परिसरात जुगार अड्ड्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. यावेळी अड्ड्यावरती जुगार खेळताना एका भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह 2 ते 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पदाधिकाऱ्याला पकडण्यात आल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची आणि सहकारनगर पोलिसांनी ही छापेमारी केली होती, औदुंबर विठ्ठल कांबळे असे या भाजपच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. कांबळे याच्यासोबत इतर 2 ते 3 जण जुगार खेळत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औदुंबर कांबळे हा पर्वती विधानसभा मतदारसंघाचा चिटणीस म्हणून कार्यरत आहे. कांबळे त्याच्या इतर दोन ते तीन सहकाऱ्यांसोबत तळजाई परिसरात असणाऱ्या एका रिकाम्या कारखान्यात रमी खेळत होता. यावेळी सहकार नगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट दोनने छापा टाकला असता ते सर्वजण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री राघवेंद्र स्वामी यांच्या 354व्या आराधना महोत्सवाची रथोत्सवाने सांगता

पुणे : नंजनगुडू श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठातर्फे श्री राघवेंद्र स्वामी यांच्या ३५४व्या आराधना महोत्सवाची आज (दि. १२ ऑगस्ट) भव्य रथोत्सवाने भक्तीमय वातावरणात सांगता झाली.

महोत्सव दि. १० ते १२ ऑगस्ट या कालावधीत सदाशिव पेठेतील लक्ष्मी रस्त्यावरील श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठ येथे आयोजित करण्यात आला होता. श्री राघवेंद्र स्वामी महासंस्थानचे मंत्रालय (आंध्रप्रदेश) पिठाधीश्वर श्री श्री १०८ श्री सुबुधेंद्रतीर्थ श्रीपादा: पिठाधीपतिगलू नंजनगुडू यांच्या शुभआशीर्वादाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

रथोत्सवाला श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठापासून सुरुवात झाली. लक्ष्मी रस्त्याने हा रथोत्सव असंख्य भाविकांच्या उपस्थितीत नगरकर तालिम चौकातून शनिपाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लिंबाजी महाराज विठ्ठल मंदिरात आला. येथे श्री राघवेंद्र स्वामी आणि भक्त प्रल्हादराय यांची भेट झाली. रथोत्सव कुमठेकर रस्त्याने मार्गस्थ होत खालकर मारुती येथे आला. येथे महाआरती होऊन रथोत्सवाची सांगता झाली. आकर्षक फुलांनी रथ सजविण्यात आला होता. सजावटीसाठी फुले बंगळुरू येथून आणण्यात आली होती. रथोत्सवापुढे भाविकांनी भक्तीगीतांवर ताल धरत ‘गोविंदा गोविंदा..’ असा जयघोष केला.

तीन दिवसीय उत्सवानिमित्त सुप्रभात सेवा, दुग्धाभिषेक, अलंकार, महामंगल आरती, अन्नदान सेवा, पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती मठाचे व्यवस्थापक दत्तात्रय जोशी यांनी सांगितली. या निमित्ताने मठातील वृंदावनास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

बालगोपाळ फोडणार अभिनव सायकल दहीहंडी -दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना होणार २०० सायकलींचे मोफत वाटप

जेधे सोशल वेल्फेअर फाऊंडेशन, इंद्राणी बालन फाऊंडेशनतर्फे आयोजन

पुणे: जेधे सोशल वेल्फेअर फाऊंडेशन आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या वतीने यंदाही अभिनव बालगोपाळ सायकल दहीहंडीचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. १६) सकाळी ११.३० वाजता जेधे मॅन्शन, पंचमुखी मारुती मंदिराजवळ, शुक्रवार पेठ, पुणे येथे ही दहीहंडी बालगोपाळांच्या हस्ते फोडण्यात येणार आहे. या सायकल दहीहंडीमध्ये २०० सायकल आहेत. दहीहंडी फोडल्यानंतर अतिदुर्गम भागातील १००, तर शहराच्या मध्यवस्तीतील १०० गरजू विद्यार्थ्यांना या सायकलींचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. बालगोपाळ सायकल दहीहंडीच्या माध्यमातून गरजू बालगोपाळांच्या जीवनात आनंदाचे क्षण भरविण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे, अशी माहिती उपक्रमाचे आयोजक पुनितदादा बालन आणि कान्होजी दयानंद जेधे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

कान्होजी जेधे म्हणाले, “जेधे सोशल वेल्फेअर फाउंडेशन आणि इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी अभिनव पद्धतीने दहीहंडी साजरी केली जाते. याआधी सायकल दहीहंडी, खेळण्यांची दहीहंडी आयोजित केली होती. त्यातून समाजाच्या वंचित घटकांतील मुलांना हजारो खेळण्यांचे वाटप केले होते. गेल्यावर्षीपासून इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून पुनीत दादा बालन यांच्या सहकार्याने सायकल दहीहंडी घेतली जात आहे. यंदा या उपक्रमात भोर, राजगड, मुळशी तालुक्यातील रायरी, सोंडे माथाना, कोंदवाडी, मेटपिलावरे, पाली बुद्रुक, वाजेघर बुद्रुक, लव्ही बुद्रुक, खेचरे, कळमशेत, बेलावडे, मांदेडे आणि बावीसमैल या अतिदुर्गम भागात वसलेल्या गावांमधील विद्यार्थ्यांना व पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गरजू विद्यार्थ्यांना सायकली मोफत दिल्या जातील. श्री शिव छत्रपती मित्र मंडळ कार्यक्रमाचे संयोजक आहे. याप्रसंगी मृत्युंजय पथक आणि गणेशा वाद्य पथक यांचे ढोल-ताशा वादन होणार आहे.”

अवयवदानाविषयी जनजागृती होणे आवश्यक : डॉ. अविनाश भोंडवे

आडकर फौंडेशनतर्फे कोमल पवार स्मृती पुरस्काराने पंकज मोदाणी यांचा सन्मान

पुणे : देशात अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होऊन पन्नास वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही आज समाजात पाहिजे तेवढ्या प्रमाणात अवयव दानाविषयी जागृती झालेली दिसत नाही. गरजू रुग्ण आणि अवयवदात्याची उपलब्धता यात मोठी तफावत आहे. या करिता अवयवदान विषयी जनजागृती मोठ्या प्रमाणात होणे काळाची गरज आहे. अवयवदान व प्रत्यारोपणाची अत्यंत खर्चिक असल्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. ज्या योगे अवयव तस्करीला आळा बसण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आय. एम. ए.चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले.

अवयवदानासाठी जनजागृती करणारे रिबर्थ फौंडेशनचे अध्यक्ष पंकज मोदाणी यांचा आडकर फौंडेशनतर्फे आज (दि. १२ ऑगस्ट) कोमल पवार स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण आय. एम. ए.चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते राजेश शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पत्रकार भवन, नवी पेठ येथे कार्यक्रम झाला. अवयव दानाविषयी माहिती मिळाल्यानंतर उपस्थितांपैकी काही जणांनी अवयव दानाचा अर्ज देखील भरून दिला.
अवयवदानाविषयीची जनजागृती फक्त सुशिक्षित, उच्चवर्गीयांमध्ये न होता समाजातील सर्व स्तरात होणे अत्यंत आवश्यक आहे, असे सांगून डॉ. भोंडवे म्हणाले, अवयवदान म्हणजे मृतदेहाची विटंबना हा गैरसमज दूर करून अवयवदानाची चळवळ मोठ्या प्रमाणात पुढे नेणे आवश्यक आहे. मेंदूमृत व्यक्ती, मृत व्यक्ती तसेच जीवंत व्यक्ती देखील अवयव दान करू शकते या विषयी देखील त्यांनी माहिती दिली.
सत्काराला उत्तर देताना पंकज मोदाणी म्हणाले, घरातील आजारापणामुळे अवयवदानाचे महत्त्व कळले, त्यानंतर या क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय घेतला. यातूनच रिबर्थ फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. फाऊंडेशनच्या माध्यमातून अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचे मोलाचे कार्य विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात केले जात आहे. ज्यात विविध रुग्णालये, सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे, ग्रीन कॉरिडॉर मुव्ही कॉम्पिटिशनमध्ये सहभाग यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. कोमल पवार स्मृती पुरस्कार ही आमच्या संस्थेच्या कामाची फक्त पोचपावतीच नव्हे तर जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून आमच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. हा पुरस्कार मी माझ्या मातोश्री तसेच रिबर्थ फाऊंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करीत आहे.
अवयवदानाच्या जनजागृतीसाठी आम्ही प्रयत्नरत आहोत, असे राजेश शेट्टी यांनी सांगितले.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्काराविषयी माहिती सांगितली. पुरस्काराच्या माध्यमातून अवयवदानासारख्या महत्त्वाच्या विषयावर जनजागृती व्हावी हा उद्देश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन निरुपमा महाजन यांनी केले. मानपत्राचे लेखन प्रभा सोनवणे यांचे होते.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘पुनर्जन्म’ या विषयावर कविसंमेलन झाले. यात प्रभा सोनावणे, भारती पांडे, सुजाता पवार, ऋचा कर्वे, अनुराधा काळे, तनुजा चव्हाण, कपिल घोलप, प्रतिमा कुलकर्णी, स्वप्नील पोरे, प्रतिमा जोशी यांचा सहभाग होता.

बीट मार्शलने रात्री साडेअकरा वाजता कॅनालमध्ये उडी मारुन वाचविला तरुणीचा जीव

पुणे- अवघ्या २५ वर्षाची तरुणीने आत्महत्या करण्यासाठी रात्री साडेअकरा वाजता कॅनालमध्ये उडी तर घेतली पण …. तेथून जाणाऱ्या एका बीट मार्शलने कॅनालमध्ये उडी मारुन या तरुणीचा जीव वाचविला

पर्वती पोलीस स्टेशन पर्वती दर्शन बीट मार्शल वरील पोलीस अंमलदार किरण पवार व पोलीस अंमलदार राहुल उन्हाळे हे दि.११/०८/२०२५ रोजी रात्रपाळी ड्युटीवर असताना रात्रौ २३/३० वा.च्या सुमारास सावरकर चौक येथुन मित्रमंडळ चौकाकडे निघाले असता त्या ठिकाणी कॅनाल संरक्षक जाळीचे आतील कठड्यावर एक २५ वर्ष वयाची महिला आत्महत्या करण्यासाठी उभी होती. लोक तिला बाहेर ये म्हणत होते. त्यावेळी मार्शल डयुटीवरील अंमलदार हे त्या ठिकाणी गेले तेवढयात त्या महिलेने पुर्ण क्षमतेने वाहत असलेल्या कॅनालचे पाण्यात उडी मारली. त्यावेळी पोलीस अंमलदार किरण पवार यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कॅनालमध्ये उडी घेवुन वाहत्या पाण्यात बुडत असलेल्या महिलेस कॅनालमधुन बाहेर काढुन तिचा जीव वाचविला. त्यावेळी पोलीस अंमलदार राहुल उन्हाळे यांनीही त्या महिलेस बाहेर काढण्यास मदत केली. त्यावेळी त्या ठिकाणी सदर महिलेचे मित्र व नातेवाईक आले. तिला उपचारार्थ राव हॉस्पीटल येथे नेले त्या महिलेची प्रकृती चांगली आहे.
पोलीस अंमलदार किरण पवार व पोलीस अंमलदार राहुल उन्हाळे यांचे उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच सदर कामगिरीबाबत पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभागराजेश बनसोडे,पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०३, संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड, अजय परमार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांनी व्यक्तीशः त्यांचा सन्मान केला. तसेच पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०३ पुणे शहर यांनी प्रत्येकी १० हजार रुपयांचे रिवार्ड जाहीर केले.