Home Blog Page 169

१२ वर्षे झाली डॉ. दाभोळकर खुनाचे सूत्रधार अजूनही मोकाट…

डॉ. दाभोळकर खुनाचे सूत्रधार अजूनही मोकाट:सीबीआयकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची अंनिसची मागणी

पुणे-डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण खुनाला २० ऑगस्ट रोजी १२ वर्षे पूर्ण होत आहेत. याविषयी पुणे सत्र न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांना दोषी ठरवून शिक्षा दिलेली आहे. असे असले तरीही या खुनामागचे सुत्रधार अजूनही मोकाटच आहेत. त्यांना पकडण्याचे कुठलेही प्रयत्न शासनाच्या पातळीवर सुरु नाहीत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या सूत्रधारांना कधी पकडणार असा संतप्त सवाल हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी व अनिल वेल्हाळ यांनी अंनिसमार्फत पुणे येथील पत्रकार परिषदेमध्ये केला.राष्ट्रीय पातळीवर जादूटोणा विरोधी कायदा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

ते पुढे म्हणाले की ‘डॉ नरेंद्र दाभोळकरांचा खून हा त्यांचे विचार संपवण्यासाठी केलेला एक सुनियोजित कट होता’ असे निरीक्षण पुणे येथील सत्र न्यायालयाने नोंदवले असतानादेखील त्यामागचे सूत्रधार शोधण्यासाठी शासन काहीही प्रयत्न करत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे खूनखटले देखील अजून सुरु असल्याने या चारही खूनांमागील सुत्रधारावर कारवाई होऊ शकलेली नाही. जोपर्यंत हे सूत्रधार पकडले जात नाहीत तोपर्यंत विवेकवादी कार्यकर्त्यांना असलेला धोका कायम आहे, असेदेखील त्यांनी यावेळी नमूद केले.

डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्ताने ऑल इंडिया पिपल सायन्स नेटवर्क यांच्या माध्यमातून देशभरात २० ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस’ म्हणून पाळला जातो. या वर्षी देखील त्या अंतर्गत देशातील पंधरा पेक्षा अधिक राज्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार याविषयी कार्यक्रम केले जाणार आहेत.यावर्षी १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृति व्याख्यानाचे आयोजन साने गुरुजी स्मारक पुणे येथे करण्यात आले आहे. या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक हे ‘भारताचे संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ याविषयी व्याख्यान देतील. हेमंत गोखले, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.

शौर्य गाजविणाऱ्या माजी सैनिकांचा महापालिकेतर्फे विशेष सन्मान

‘हर घर तिरंगा’ उपक्रम तसेच महापालिका अमृत महोत्सवानिमित्त आयोजन
‘माँ तुझे सलाम‌’सांगीतिक कार्यक्रमाला पुणेकरांची दाद
पुणे : ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्‌’, ‘राजमाता जिजाऊ की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा तसेच युद्धामध्ये शौर्य गाजविणाऱ्या माजी वीर सैनिकांचा सन्मान असे देशभक्तीमय वातावरण पुणेकरांनी आज (दि. १३ ऑगस्ट) अनुभवले.
निमित्त होते पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या ‌‘हर घर तिरंगा’ या अभियानाअंतर्गत तसेच महापालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त शौर्य, धैर्य, लष्कर सेवेतील अतुलनीय पराक्रमाचा आविष्कार, राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा तसेच समाजसेवेमध्ये ऐतिहासिक काम करणाऱ्या माजी सैनिकांच्या गौरव सोहळ्याचे! बालगंधर्व रंगमंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने देशभक्तीपर हिंदी, मराठी गीतांचा ‌‘माँ तुझे सलाम‌’हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रम महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता.
अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, सहआयुक्त गोविंद दांगट, राजेश कादबाने, तिमय्या जंगले, सांस्कृतिक विभाग उपायुक्त सुनील बल्लाळ, प्रशासन अधिकारी राजेश कामठे, दीपक राऊत, सुरेखा भणगे, प्रशासकीय अधिकारी संगीता कोकाटे आदी मंचावर होते.
निवृत्त कॅप्टन परशुराम शिंदे, निवृत्त कॅप्टन बाबू जाधव, निवृत्त सुभेदार मेजर हेरंब सालेकर, निवृत्त सुभेदार मेजर विवेकानंद घाडगे, निवृत्त नायक पोपट महाजन, निवृत्त हवालदार अशोक कड, निवृत्त नायक सदाशिव पाटील, निवृत्त नायक सुखदेव भोसले, निवृत्त ऑडनरी फ्लाईट लेफ्टनंट श्यामराव चव्हाण, वीरचक्रप्राप्त निवृत्त कर्नल सदानंद साळुंखे, हवालदार बजरंग निंबाळकर तसेच पॅराऑलिंपिकमध्ये सहभागी रफीक लतिफ खान यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
सत्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त करताना परशुराम शिंदे म्हणाले, या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशाविषयी आपुलकी, आदर आणि प्रेम निर्माण झाले आहे. महापालिकेच्यावतीने माजी सैनिकांचा आवर्जून गौरव करण्यात आला याविषयी कृतज्ञ आहोत.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली तर राजेश कामटे यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती प्रास्ताविकात सुनील बल्लाळ यांनी सांगितली.
अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेतर्फे आयोजित बोधचिन्ह स्पर्धा, माझी वारी वेषभूषा स्पर्धा तसेच आषाढी वारी छायाचित्र स्पर्धेच्या विजेत्यांना आणि परिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
‌या निमित्ताने हिंदी व मराठी देशभक्तीपर गीतांच्या ‘माँ तुझे सलाम‌’या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची होती तर सूत्रधार निकिता मोघे होत्या. केतकी महाजन-बोरकर यांनी संयोजन केले. जितेंद्र भुरुक, गणेश मोरे, अश्विनी खुरपे, आकाश सोळंकी, माधुरी भोसेकर यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. सादरीकरणाला पुणेकर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. रशिद शेख, सुनील जाधव, बाबा खान, रोहित जाधव, सोमनाथ फाटक, सुनील साळवी यांची साथसंगत होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील जोशी यांनी केले तर आभार राजेश कामटे यांनी मानले.

पद्मश्री जयमाला शिलेदार जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांगीतिक कार्यक्रम

‌‘स्वरमाऊली जयमाला‌’ ध्वनीचित्रफीतीद्वारे महोत्सवाचा शुभारंभ
पुणे : पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठी रंगभूमि, पुणे आणि गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार असून याचा शुभारंभ गुरुवार, दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी ‌‘स्वरमाऊली जयमाला‌’ या ध्वनीचित्रफीतीच्या उद्घाटनाने होणार आहे. शिलेदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संगीत सौभद्र या नाटकाचा पाच तासांचा दीर्घ प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी होत आहे. या निमित्ताने जयमालाबाई शिलेदार यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या कार्यक्रमांबरोबरच संगीत रंगभूमीच्या उज्वल परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांचे संपूर्ण वर्षभर आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जयमालाबाई शिलेदार यांच्या कन्या, मराठी रंगभूमि, पुणे आणि गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा दीप्ती शिलेदार-भोगले यांनी आज (दि. 13 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत दिली. संस्थेच्या विश्वस्त वर्षा जोगळेकर, निनाद जाधव या प्रसंगी उपस्थित होते.
पद्मश्री जयमालाबाई शिलेदार या मराठी संगीत रंगभूमीचे वैभव आहेत. संगीत रंगभूमीची परंपरा जतन करणे आणि त्याच वेळी नाविन्याचा शोध घेत राहणे असा त्यांचा जीवनप्रवास आहे. अनेक वर्षे नायिकेच्या भूमिका साकारून आपल्या संगीताभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनात मानाचे स्थान मिळविले. हे सगळे करीत असतानाच त्यांनी संगीत नाटकाचा वसा पुढील पिढीकडे पोहोचविण्यासाठी अमाप कष्ट घतले. जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या चतुरस्र कारकीर्दीला वंदन करण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी ‌‘स्वरमाऊली जयमाला‌’ या ध्वनीचित्रफीतीच्या उद्घाटनाने होणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. ध्वनीचित्रफीतीचे उद्घाटन ज्येष्ठ नाट्य-चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून डॉ. किरण ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उद्घाटन समारंभ सर्वांसाठी खुला आहे.
रविवार, दि. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 3 या वेळात बालगंधर्व रंगमंदिर येथे संगीत नाट्य रसिकांसाठी खास पर्वणी ठरेल असा संगीत सौभद्र या नाटकाचा दीर्घ प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. पाच तासांच्या या प्रयोगामध्ये नटी सूत्रधारापासून भरतवाक्यापर्यंतचा समावेश आहे. रंगमंदिराच्या दोन वेळा घेऊन हा नाट्यप्रयोग सादर होणार असून रसिकांना अल्पोपाहार ही देण्यात येणार आहे. वर्षभर होणारे सर्व कार्यक्रम नाममात्र दरात असणार आहेत.
संगीत नाटकाचे सौंदर्य वेगवेगळ्या पद्धतीने रसिकांना उलगडून दाखविण्यासाठी दर महिन्याला एक असे वर्षभर विविध सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‌‘तो राजहंस एक‌’ हा अतुल खांडेकर यांचा बालगंधर्व यांच्या गानप्रतिभेला वंदन करणारा कार्यक्रम, ‌‘अष्टनायिका‌’ हा जयमालाबाईंनी साकारलेल्या संगीत नाटकातील काही प्रमुख नायिकांवर आधारित कार्यक्रम, ‌‘अंबरी जोवरी शशीरवि‌’ हा जयमालबाई, कीर्तीताई, नीलकंठबुवा अभ्यंकर यांनी संगीत दिलेल्या नाट्यसंगीत आणि भजनांचा कार्यक्रम, ‌‘नाट्यसौरभ‌’ हा संगीत नाटकातील रंगतदार नाट्यप्रवेशांचा कार्यक्रम, ‌‘तालबंधातली ठेव ही‌’ हा नाट्यसंगीतातील तालवैविध्याचे सप्रयोग सादरीकरण, ‌‘स्वरवंदना‌’ हा संगीत नाटकातील तीन बुजूर्ग संगीतकारांच्या स्वररचनांवर आधारित कार्यक्रम, ‌‘रंगभाषा‌’ हा संगीत नाटकातील मराठी भाषेचं सौंदर्य दाखवणाऱ्या नाट्य प्रवेशांचा कार्यक्रम, ‌‘नाट्यसंगीतातील लोकधारा‌’ हा संगीत नाटकांमधून लोकसंगीताचा झालेला आकर्षक वापर यावर आधारित कार्यक्रम, संगीत नाटकाचे अभिवाचन, ‌‘पदरचना विस्मयकारा‌’ हा संगीत मानापमान नाटकातील विस्मयकारी शब्द-स्वररचनांद्वारे होत असलेले भाव प्रकटीकरण दर्शविणारा कार्यक्रम, वेगवेगळ्या संगीत नाटकात आलेले नटी सूत्रधार प्रवेश यावर आधारित कार्यक्रम… असे विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
युवा पिढीला संगीत नाटकांचा आनंद कळावा, या कलाप्रकाराचं वैशिष्ट्य जाणवावं हाच जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश आहे.

भाजपा आणि स्वातंत्र्यदिनाचा संबंधच काय?: हर्षवर्धन सपकाळ.

मुंबई, दि. १३ ऑगस्ट २०२५
स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे, स्वातंत्र्य दिन व भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा भाजपाचे पूर्वज ब्रिटिशांसोबत होते, काहीजण ब्रिटिशांची पेन्शन खात होते, इंग्रजांना मदत करत होते. भाजपाच्या पूर्वजांवरचे हे काळे डाग लपवण्यासाठीच स्वातंत्र्यदिनी कोणी काय खायचे याचे फतवे काढले जात आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले की, वन नेशन वन लिडर संकल्पना आणून एकच नेता, एकच पेहराव, एकच भाषा आणि एकच खानपान करून देशातील विविधतेतील एकता संपवायची आणि हुकूमशाही आणायची हा भाजपाचा डाव आहे. हिंदू-मुस्लीम वाद तर दररोजच सुरु आहे. आधी मराठा ओबीसी वाद घातला त्यानंतर मराठी हिंदी वाद व आता १५ ऑगस्टला मासांहार करु नये यासाठी फतवा काढला आहे, जनतेवर सर्वप्रकारे सरकारी नियंत्रण आणण्याचा हा प्रकार आहे.

कबुतरांना जगण्याचा अधिकार आहे तसाच माणसांनाही जगण्याचा अधिकार आहे. कबुतरांचे पंख व विष्टेपासून फुप्फुसाचे गंभीर आजार होतात यात काहीजणांना जीवही गमवावा लागतो त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही तेवढाच महत्वाचा आहे, पण भाजपा सरकारने जाणीव पूर्वक कबुतर जिहाद सुरु केला आहे. सरकारने अदानीला अर्धी मुंबई देऊन टाकली आहे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडेही मुंबईत भरपूर जमीन आहे. या जमिनीवर लोढा व अदानी विशेष कबुतर प्लाझा उभा करावा असे सपकाळ म्हणाले.

भाजपा युती सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरु आहे, प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे, राज्य दिवाळखोरीत काढले आहे तसेच मतचोरीच्या वास्तवापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपा सरकारनेच कबुतर खान्याच्या प्रश्नाला हवा दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात दंगा नियंत्रण पथक स्थापन केले होते पण देवेंद्र फडणवीस यांनी दंगो करो पथक स्थापन केले आहे. हे पथक नागपूर, पुणे, नाशिक, मुंबईमध्ये पाठवून सामाजिक शांतता भंग करत आहे. जैन समाजातील महान संत महावीर यांनी विनय, विवेकता, विनम्रता याची शिकवण दिली आहे, त्याचे पालन होताना दिसत नाही.

NSUI च्या नवनियुक्त अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत NSUI चे नवनियुक्त महाराष्ट्र अध्यक्ष सागर साळुखे यांचा पदग्रहण सोहळा टिळक भवनात पार पडला. मावळते अध्यक्ष आमीर शेख यांनी अध्यक्षपदाची सुत्रे साळुंके यांच्या हाती दिली. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष वरूण चौधरी, माजी अध्यक्ष अमीर शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या रिसर्च विभागाच्या लेनी जाधव वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

प्रदेश काँग्रेसच्या SC विभागाची बैठक..

शिव, शाहू, फुले व आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे काम काँग्रेसचा अनुसुचित जाती विभाग करेल. तसेच भाजपा व निवडणूक आयोग यांनी संगनमताने केलेली मतचोरी राहुलजी गांधी यांनी उघड केली आहे. हा मतचोरीच्या विरोधात महाराष्ट्रात तीव्र आंदोलन केले जाईल, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष, माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी सांगितले आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश अनुसुचित जाती विभागाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राजेंद्र पाल गौतम, महाराष्ट्र प्रदेश एसी. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कोंढव्यात ८ मजली ६ मजली अनधिकृत इमारतींवर महापालिकेची जोरदार कारवाई:धनकवडीतही कारवाई करणार

सावधान अनधिकृत बांधकामे असलेली घरे विकत घेऊ नका अन्यथा कारवाई होताना रडू नका -महापालिकेचे स्पष्ट आवाहन

पुणे- गेल्या ७ तारखेपासून महापालिकेने कोंढव्यातील अनधिकृत बांधकाम केलेल्या बहुमजली इमारतींना लक्ष केले असून अनेक ६ मजली ते ८ मजली इमारती पाडण्याची कार्यवाही सुरु केली आहे. धनकवडी गावात आणि परिसरातही मोठ्या प्रमाणावर अशी बांधकामे झालेली असून त्यावरही कारवाई करणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

कोंढवा बुद्रुक परिसरामधील स.नं. 6 (पार्ट )अजमेरा पार्क गल्ली नं. 2 येथे तळ मजला अधिक 6 मजलेअसे (आर सी सी) बांधकाम असलेली इमारत तसेच इनाम नगर स. नं. 15 (पार्ट) व 16 (पार्ट) येथे तळ मजला अधिक 8 मजले (आर सी सी) अशा अनधिकृत इमारतीवर पुणे महापालिकेच्या विशेष पथकाने कारवाई केली. त्यामध्ये 20 हजार चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले.

पुणे महापालिकेने अनधिकृत बांधकाम कारवाईसाठी विशेष पथक नियुक्त केले आहे. कार्यकारी अभियंता यांचे नियंत्रणाखाली 1 उप अभियंता, 5 कनिष्ठ अभियंता 10 बिगारी, 3 पोलिस, 5 MSF, 1 जेसीबी, 4 ब्रेकर, दोन गॅस कटर यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

या शिवाय कोंढवा खुर्द परिसरामध्ये अनाधिकृत बांधकाम कारवाई साठी नियुक्त केलेल्या विशेष पथकामार्फत कोंढवा खुर्द J K पार्क जवळ P+8 मजल्याच्या सुमारे 5000 चौ. फुट आर सी सी बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे.

विद्यापीठ चौकातील पुल वाहतुकीसाठी खुला करावा-सुनील माने यांचा मागणी


पुणे ता.१३.(प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी अनेक वाहन धारकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता तत्काळ वाहतुकीसाठी खुला करावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी पीएमआरडीएला दिले आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. यासाठी काही दिवसांपूर्वी तेथे असलेला उड्डाणपुल पाडला होता. त्याजागी आता मेट्रो, तसेच वाहतुकीसाठी रस्ता असणारा दुमजली उड्डाणपुल तयार करण्यात आला आहे. यातील एका रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. पुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री यांचा वेळ मिळत नसल्याने हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होत नाही असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असल्याने सातत्याने वाहन धारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे नेत्यांच्या उद्घाटनाची वाट बघत बसण्यापेक्षा स्वातंत्र्य दिनापर्यंत हा पुल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालीच मुंबई महापालिकेची निवडणूक अजितदादांची राष्ट्रवादी लढविणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिकांकडे मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा;अजितदादा पवार आणि सुनिल तटकरे यांनी सोपवली मोठी जबाबदारी…

राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या नेतृत्वाखाली लढवणार…

मुंबई दि. १३ ऑगस्ट – आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेले आणि मुंबई अध्यक्ष राहिलेले नवाब मलिक यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सोपवली आहे.

मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, आमदार सना मलिक- शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, राजू घुगे यांची तर निमंत्रित म्हणून दक्षिण जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, उत्तर – पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष अजय विचारे, उत्तर – मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष अर्शद अमीर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव आदींचा समावेश आहे.

बिल्डरच्या ताब्यातून भूखंड काढून घेऊन तो स्मारकाला द्या या मागणीकडे दुर्लक्ष नाही:ठिय्या आंदोलन 15 ऑगस्ट रोजी होणार


स्थगिती निर्णयाबद्दल शासनाचे अभिनंदन परंतु स्मारकाची घोषणा होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही

पुणे : मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन च्या शेजारील  राज्य शासनाच्या एमएसआरडीसीच्या जागेवर भारतरत्न डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभे करावी यासाठी पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून मोठे आंदोलन उभे करण्यात आलेले आहे, याच आंदोलनाचा भाग म्हणून येत्या 15 ऑगस्ट रोजी दुपारी १  वाजता हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीच्या वतीने देण्यात आली. 

समितीच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की,  रस्ते विकास महामंडळाची जागा स्मारकाला मिळावी यासाठी सुमारे वीस वर्षापासून आंबेडकरी चळवळ प्रयत्न करत आहे.  राज्य सरकारने ही जागा खाजगी विकसकाला 60 वर्षाच्या भाडे करारावर दिल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र नाराजगी निर्माण झाली होती.  त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक व्हावी म्हणून आंबेडकरी चळवळी कडून आंदोलने करण्यात येत आहे, 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनासंदर्भामध्ये आतापर्यंत शहरांमध्ये शंभर पेक्षा अधिक ठिकाणी विविध बैठका झाल्या आहेत, या ठिय्या आंदोलनाला मुस्लिम, मातंग, मेहतर व इतर समाज बांधवांकडून देखील पाठिंबा प्राप्त झालेला असून त्यांचे प्रतिनिधी या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होणार आहेत. 

पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर सकारात्मक वातावरण निर्माण व्हावी म्हणून त्यांनी राज्य सरकारशी  संपर्क साधून सदर जागेवर विकसकाकडून करण्यात येणाऱ्या कामाला स्थगिती देण्याबाबतचे आदेश प्राप्त करून समितीकडे  दिलेले आहेत.  राज्य शासनाच्या या भूमिकेचे समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले असून हे अत्यंत सकारात्मक पाऊल असली तरी आंबेडकरी जनता ही स्मारकाची वाट पाहत आहे त्यामुळे स्मारकाची घोषणा होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा एकमुखी निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला व त्यानुसारच 15 ऑगस्ट रोजी चे नियोजित आंदोलन हे अधिक मोठ्या प्रमाणात परंतु शांततेत होईल असा विश्वास या बैठकीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

सदर प्रसिद्धी पत्राद्वारे राज्यातील व शहरातील आंबेडकरी जनतेला आव्हान करण्यात येत आहे की समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होत असताना खालील प्रमाणे आचारसंहिता निश्चित करण्यात आली असून त्याचे पालन करत या आंदोलनामध्ये शांततेने सहभागी व्हावे व आपला स्मारकाचा दीर्घकाळ सुरू असलेला लढा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करावा व या आंदोलनामुळे कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याबाबत प्रत्येक सहभागी आंदोलकांनी सजग राहावे असेही  आवाहन  यावेळी करण्यात आले. 

दरम्यान आंदोलन हे केवळ स्मारकाच्या निर्मितीसाठी असल्यामुळे या आंदोलनाला पहिल्यापासूनच कोणताही राजकीय रंग देण्यात आलेला नाही व तो यापुढेही देण्याचा कोणताही मनोदय नसल्याचा स्पष्ट निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला परंतु काहीही झालं तरी विद्यमान सरकारने शक्य तितक्या लवकर शक्यतो १५ ऑगस्ट पूर्वीच स्मारक निर्मितीची घोषणा करून आंदोलनापासून समाजाला परवृत्त करावे अशी देखील अपेक्षा समितीने  व्यक्त केली आहे. 

आंदोलनात  सहभागी होताना खालील सूचनांचे पालन करावे

  • आंदोलनात कोणीही कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणार नाही. 
  • आंदोलनात केवळ भारतीय तिरंगा राष्ट्रध्वज व अशोक चक्रांकी  निळा ध्वज घेऊन सहभागी व्हायचे आहे. 
  • या आंदोलनात कोणत्याही प्रकारची सभा व भाषणे होणार नाही याची नोंद घ्यावी
  • या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन पोलिसांशी व अन्य कार्यकर्त्यांशी हुज्जत घालण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत अशा व्यक्तींवर तात्काळ कारवाई केली जाईल. 
  • आंदोलनात कोणत्याही धार्मिक प्रतीकांचा महापुरुषांच्या फोटोंचा व धार्मिक झेंड्यांचा वापर करू नये. 
  • आंदोलन सहभागी होणाऱ्या कुटुंबीयांनी आपली लहान मुले, मौल्यवान बाग दागिने यांची काळजी घ्यावी
  • संपूर्ण आंदोलनावर सीसीटीव्ही व ड्रोन द्वारे नजर असेल. 

जागतिक शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी होण्याकरिता निवड चाचणीचे आयोजन

पुणे, दि. १३ : आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघाद्वारे शांग्लुओ, चीन येथे ४ ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत 15 वर्षाखालील मुला-मुलींकरीता जागतिक शालेय व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाची निवड करण्यासाठी भारतीय शालेय खेळ महासंघाने २५ ते ३० ऑगस्ट २०२५ दरम्यान राष्ट्रीय निवड चाचणीचे आयोजन केले असून ऑगस्ट २०२५ च्या तिसऱ्या आठवड्यात श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे राज्यस्तरीय निवड चाचणीचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

राज्य निवड चाचणीपूर्वी १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजता चंद्रशेखर आगाशे शारिरीक शिक्षण महाविद्यालय, गुलटेकडी येथे विभागीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे. या निवड चाचणीद्वारे पुणे विभागातून ५ मुले व ५ मुलींची राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी निवड करण्यात येणार आहे. यासाठी खेळाडूचा जन्म १ जानेवारी २०१० ते ३१ डिसेंबर २०१३ या दरम्यान झालेला असावा. निवड चाचणीत सहभागी खेळाडूंच्या भोजन व निवासाची व्यवस्था त्यांनी स्वत: अथवा त्यांच्या शाळेने करावी.

निवड चाचणीच्या कागदपत्रांमध्ये खेळाडूंनी शासकीय विभागाने वितरित केलेला इंग्रजीमधील मूळ जन्मदाखला सादर करणे अनिवार्य आहे. खेळाडूंनी राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सहभागासाठीचा पात्रता नमुना मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीसह सादर करावा. खेळाडूंकडे राष्ट्रीय चाचणीवेळी किमान ६ महिन्याची वैधता शिल्लक असलेले भारतीय पारपत्र (पासपोर्ट) असणे अनिवार्य राहील. खेळाडूकडे पारपत्र नसल्यास विभागीय निवड चाचणीवेळी संबंधित विभागाकडे पारपत्र तात्काळ मिळण्याकरिता अर्ज केल्याचा पुरावा सादर करणे अनिवार्य असेल.

व्हॉलीबॉल खेळाडूंनी अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी (७०२०३३०४८८), सुरेश काकड (८८८८८०६१५८), क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकते (९९२३९०२७७७), अश्विनी हत्तरगे (७३८७८८०४२७) या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. लकडे यांनी केले आहे.
०००००

कामगार मंत्र्यांनी केली ‘कामगार भवन’ इमारतीची पाहणी

0

पुणे दि.13 :- जुना मुंबई-पुणे रोड, शिवाजीनगर येथे बांधण्यात येत असलेल्या “कामगार भवन” इमारतीच्या बांधकामाची कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी पाहणी करून सद्यस्थितीबाबत माहिती घेवून संबंधितांना इमारतीच्या बांधकामाबद्दल सूचना दिल्या.
यानंतर कामगार मंत्री फुंडकर यांनी इमारत बांधकामाचे कंत्राटदार रवी शिंदगे यांना इमारतीचे बांधकाम डिसेंबर 2025 अखेर पर्यंत पुर्ण करुन देण्याबाबत आदेश दिले. यावेळी उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभाग, कामगार विभाग, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयाच्या अधिका-यांना या कामगार भवनाचे बांधकाम वेळेत पूर्ण करुन घेण्याबाबत कंत्राटदाराकडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांसोबत समन्वय साधून वेळोवेळी पाठपुरावा करण्याची सूचनाही त्यांनी दिली.
या “कामगार भवन” इमारतीमध्ये अपर कामगार आयुक्त, पुणे विभाग, पुणे, कामगार उप आयुक्त, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, पुणे, बाष्पके संचलनालय, पुणे आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ, पुणे आदी कार्यालयांचा समावेश असणार आहे.
या पहाणीवेळी कामगार विभागाचे अपर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, कामगार उप आयुक्त (प्र.) निखिल वाळके, अधीक्षक अभियंता भरत कुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता डॉ. सुरेंद्रकुमार काटकर, DISH व बाष्पके संचालनालयाचे अधिकारी व मे. ओंकार कन्स्ट्रक्शन, (कंत्राटदार) उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश जारी

पुणे दि. 13 : सार्वजनिक गणेशोत्सव शांततामय वातावरणात पार पाडावा, गणपती विसर्जन मिरवणूका रात्री उशिरापर्यंत चालू असल्याने या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याकरिता तालुका स्तरावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्तीबाबत अपर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी आदेश जारी केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव 27 ऑगस्ट 2025 रोजी सुरुवात होणार असून 6 सप्टेंबर 2025 अनंत चतुदर्शीच्या दिवशी सांगता होणार आहे.जिल्ह्यामध्ये साधारणत: 5 व्या, 7 व्या, आणि 9 व्या दिवशी गणपती विसर्जन होतात. मोठ्या मंडळांचे दहाव्या, अनंत चतुर्शीच्या दिवशी गणपती विसर्जन केले जाते. या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूका मोठ्या प्रमाणात निघतात. तसेच ठिकठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असतात, याबाबीचा विचार करता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता – 2023 च्या कलम 14 नुसार तालुका स्तरावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

स्वप्नपूर्ती साठी उत्तम आरोग्य पाहिजे – डॉ. सुप्रिया गुगळे

पीसीसीओई मध्ये महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न

पिंपरी, पुणे (दि. १३ ऑगस्ट २०२५) महाविद्यालयात शिकत असताना उत्तम करियर करण्याची स्वप्नं सर्व युवक, युवती पाहतात, मात्र ही स्वप्नपूर्ती होण्यासाठी प्रथम सर्वांनी आरोग्य जपले पाहिजे. आरोग्य म्हटले की शरीराचा, मनाचा, आत्म्याचा विचार मनात येतो. तसेच सामाजिक आरोग्य, भावनिक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे असे मार्गदर्शन डॉ. सुप्रिया गुगळे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओई) मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहयोगाने गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या महिला सक्षमीकरण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. गुगळे बोलत होत्या. यावेळी मानसिक आरोग्य प्रशिक्षक डॉ. मानसी सोंगगिरकर – बोराडे तसेच डॉ. जी. एन. कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. एस. यु. भंडारी, आयसीसीचे उपाध्यक्ष डॉ. व्हि. वाय. भालेराव आदी उपस्थित होते.
डॉ. गुगळे यांनी सांगितले की, उत्तम आरोग्यासाठी नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. तसेच डोळे, तळपाय, कानाची पाळी यांना हलक्या हाताने तेल लावून मसाज केला पाहिजे. निसर्गात फिरणे हे देखील लाभदायक असते. मानसिक आरोग्य प्रशिक्षक डॉ. मानसी सोंगीरकर बोराड यांनीही महिलांचे आरोग्य, जीवन संतुलन, निर्णय घेण्याची क्षमता या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. वृषाली भालेराव यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘ग्लोबल गणेश फेस्टिवल २०२५’च्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

वैभव वाघ यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे: गौरवशाली परंपरा असलेल्या पुण्याचा गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक करण्यासाठी ग्लोबल गणेश फेस्टिवलचे आयोजन केले आहे. यंदा फेस्टिवलचे दुसरे वर्षआहे. फेस्टिवलच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. ग्लोबल गणेश फेस्टिव्हल २०२५ च्या अध्यक्षस्थानी यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, स्वागताध्यक्षपदी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ग्लोबल गणेश फेस्टिव्हल २०२५ चे कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अनिरुद्ध येवले, आंतरराष्ट्रीय समन्वयक धनश्री पाटील, समन्वयक महेश साने, कार्यकारी अधिकारी ऋषिकेश कायत, प्रसिद्धीप्रमुख जीवराज चोले, सांस्कृतिक प्रमुख प्रणव भुरे आदी उपस्थित होते.

वैभव वाघ म्हणाले, “पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढावी, गणेशोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक पद्धतीने जावा, यासाठी पुण्यातील गणेशोत्सव आयोजनात अग्रस्थानी असलेल्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून गेल्यावर्षीपासून या फेस्टिवलचे आयोजन केले जात आहे. जागतिक गणेश मंडळे व पुण्यातील गणेश मंडळांचा सामंजस्य करार घडवून आणण्यावर भर दिला जाणार आहे. यानिमित्ताने जागतिक स्तरावर विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. धार्मिक पर्यटन विकसित करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्याची गरज आहे. ‘मोरया हेल्पलाईन’द्वारे परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी सहकार्य केले जात आहे.”

“यंदा या फेस्टिवलला राज्याच्या पर्यटन विभागाचे सहकार्य लाभले आहे. जगातील अनेक महोत्सवांपेक्षा गणेशोत्सव हा अधिक व्यापक व भव्यदिव्य स्वरूपाचा आहे. परंतु, या उत्सवाला म्हणावी तशी जागतिक स्तरावर ओळख मिळाली नाही. या उत्सवाचा पर्यटन केंद्र म्हणूनही मोठा विकास होऊ शकतो. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, त्यातून रोजगारनिर्मिती उभारण्यासाठी आणि आपला पारंपरिक व ऐतिहासिक गणेशोत्सव जगभर जाण्यासाठी ‘ग्लोबल गणेश फेस्टिवल’ आयोजित करण्यात येत आहे. फेस्टिव्हलच्या माध्यमातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोहचणे हेच मुख्य धेय आहे,” असे अनिरुद्ध येवले यांनी नमूद केले.

सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा मानबिंदु आहे. अनेक कलाकार, तंत्रज्ञ, सामाजिक-राजकीय नेतृत्व घडविण्याची कार्यशाळा म्हणूनही याकडे पाहिले जाते. लोकमान्य टिळक, भाऊसाहेब रंगारी यांनी सुरु केलला हा गणेशोत्सव सातासमुद्रापार पोहचला. आज १०० हून अधिक देशांमध्ये हा गणेशोत्सव साजरा होतो. मात्र, पर्यटनाच्या दृष्टीने अजूनही त्याकडे नीटसे गांभीर्याने पाहिले जात नाही. ही बाब लक्षात घेऊन, २०२४ मध्ये राष्ट्रप्रथम ट्रस्ट, सदैव फाऊंडेशन आणि अमित फाटक फाऊंडेशन यांच्या वतीने आणि जय गणेश व्यासपीठाच्या समन्वयातून ‘ग्लोबल गणेश फेस्टिव्हल’ या लोकचळवळीची सुरुवात झाली. ग्लोबल गणेश फेस्टिव्हल २०२५ ला पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य, उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य तसेच पुणे श्रमिक पत्रकार संघाचे विशेष सहकार्य आहे, असे जीवराज चोले यांनी नमूद केले.

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध आदेश जारी

पुणे दि. १३: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कोणत्याही खाजगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना त्याची पूर्व माहिती ७ दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून संबंधीत प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी होवून त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दौंड, बारामती, शिरुर तालुक्याच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळू माफिया देखील टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ड्रोनच्या मध्यमातून टेहाळणी करुन इतर प्रकारच्या चोऱ्याही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

हे आदेश 12 ऑगस्ट 2025 पासून पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील. आदेशाचा भंग करुन पोलीसांच्या परवानी शिवाय कोणताही व्यक्ती ड्रोन कॅमेरादवारे चित्रीकरण करताना आढळून आल्यास अशी व्यक्ती भारतीय न्याय संहितेचे कलम २३३ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000

‘महाज्योती’कडून मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

पुणे, दि. १३ : महाराष्ट्र शासनाच्या समान धोरणांतर्गत कार्यरत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर येथे सन २०२५-२६ साठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाकरिता अर्ज प्रक्रिया सुरु असून www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर २० ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज ऑनलाइन स्वीकारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी केले आहे.

ही योजना इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) मधील विद्यार्थ्यांसाठी आहे. शासनाच्या समान धोरणांतर्गत ‘महाज्योती’ मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजसेवा तसेच संयुक्त गट ‘ब’ व ‘क’ अशा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाबाबतची सर्व माहिती, पात्रता निकष, अटी-शर्ती आणि अर्ज प्रक्रिया संकेतस्थळावर सविस्तर उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांना अनिवासी व ऑफलाईन माध्यमांतून प्रशिक्षण घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. ऑफलाइन प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतन तर प्रशिक्षणाच्या प्रारंभी एकरकमी आकस्मिक निधी मिळणार आहे. प्रशिक्षण नामांकित संस्थांमार्फत दिले जाणार असून प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड प्रवेश परीक्षेद्वारे केली जाईल. अधिक माहितीसाठी ०७१२-२८७०१२०/१२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे श्री. वावगे यांनी कळविले आहे.

अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण: महाज्योतीने सामाजिक परिवर्तन घडवणारी चळवळ हाती घेतली असून स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षण योजनेद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षणासह विद्यावेतनाचे आर्थिक पाठबळ दिले जात आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्याच्या संधी उपलब्ध होत आहेत. परिणामी, बहुजन प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक व दीर्घकालीन परिवर्तन घडत आहे. ही योजना फक्त प्रशिक्षणापुरती मर्यादित नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या भविष्यातील प्रगतीचा पाया आहे. यातून त्यांना केवळ ज्ञानच नव्हे, तर आत्मविश्वास आणि संधी मिळेल. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशाचे शिखर गाठण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत नोंदणी करावी.