Home Blog Page 168

बाजीराव पेशवे यांच्या ३२५ व्या जयंती सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन

बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे यांच्या वेशभूषेत सहभागी होणार

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि इतिहास प्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि इतिहास प्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२५ व्या जयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथून शोभा यात्रेला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे यांनी दिली.

अश्वारूढ आणि विविध वेशभूषेत युवक सहभागी होणार असून सामूहिक महाराष्ट्र गीत आणि संचलनातून होणार थोरल्या बाजीरावांना मानवंदना देणार आहेत.

सोमवार, दि. १८ ऑगस्ट  रोजी सकाळी ८ वाजता रमणबाग प्रशालेत इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांचे व्याख्यान होणार आहे. व्याख्यानानंतर रमणबाग ते शनिवारवाडा अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येईल.

या शोभायात्रेत चौघडा वादनासह अश्वारूढ युवक विशेष आकर्षण ठरणार असून ते बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे यांच्या वेशभूषेत सहभागी होणार आहेत.

शनिवारवाडा येथे शोभायात्रेची सांगता होणार असून, तेथे उपस्थित सर्वजण महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करतील. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे विद्यार्थी संचलन करून थोरल्या बाजीरावांना मानवंदना अर्पण करतील. भव्य शोभायात्रेत पुण्यातील अनेक नामांकित शाळांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. त्यामध्ये रमणबाग प्रशाला, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल (टिळक रोड), नु. म. वि., रेणुका स्वरूप, ज्ञानप्रबोधिनी (पुणे), ज्ञानप्रबोधिनी (निगडी), आर. सी. एम. गुजराती हायस्कूल, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा तसेच भाऊसाहेब हिरे हायस्कूल या शाळांचा समावेश आहे.

गोपाल कृष्ण… च्या जयघोषात इस्कॉन मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता आणि कॅम्प येथील मंदिर ; जन्माष्टमी निमित्त हजारो भक्तांनी केला भगवान श्रीकृष्णाला अभिषेक

पुणे : श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय… हरे रामा हरे कृष्णा… राधे कृष्ण गोपाल कृष्ण… च्या जयघोषात कात्रज कोंढवा रस्ता आणि कॅम्प येथील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तब्बल तीन लाख भाविकांनी राधाकृष्णाचे दर्शन घेतले तर, हजारो भक्तांनी भगवान श्रीकृष्णाला अभिषेक केला. अभिषेकाच्या ठिकाणी वृंदावनातील नंदगाव येथील विविध मंदिरांचा आकर्षक देखावा तयार करण्यात आला होता.

संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद स्थापित आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा झाला. रत्नजडीत वस्त्रालंकारानी सजलेल्या राधाकृष्णाचे रुप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तसेच फुलांनी सजविलेल्या पाळण्यातील बालकृष्णाला पाळणा देत भाविकांनी जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा केला. मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, रेवतीपती प्रभू, जयदेव प्रभू या मंदिराच्या वरिष्ठ भक्त मंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

भगवंतांना हरे-कृष्ण महामंत्राच्या जयघोषात मंदिरातील भक्तवृंदातर्फे महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर भगवंतांना २५० प्रकारचे नैवेद्य दाखवून बरोबर रात्री १२ वाजता आरती करण्यात आली, अशी माहिती प्रवक्ते जनार्दन चितोडे यांनी दिली. उपाध्यक्ष संजय भोसले यांनी जन्माष्टमी महोत्सवाचे आध्यात्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्व आणि इस्कॉन संस्थेच्या जगभरातील उपक्रमांबद्दल सांगितले. विशेष अतिथी कक्षातर्फे संपर्क प्रमुख अनंतगोप प्रभू आणि प्रसाद कारखानीस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. दर्शन आणि अभिषेकसाठी पुण्यातील सर्व आमदार, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच पालिकेतील आयुक्त आणि उपायुक्त आले होते

मंदिरामध्ये जन्माष्टमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘कृष्णसमर्पण’ सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप झाला. महोत्सवात देशभरातून ८०० कलावंतांनी शास्त्रीय नृत्य, गायन, नाट्य, वादन करून त्यांची कला भगवंतांना समर्पित केली.  श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मंदिरातील तिन्ही गाभाऱ्यातील श्री श्री राधा-वृंदावन चंद्र, जगन्नाथ-बलदेव-सुभद्रा आणि गौर-निताई यांच्या विग्रहांना आकर्षक वस्त्र-आभूषणांनी सजविण्यात आले होते. याच मंदिराच्या आवारात श्री बालाजी चे सुंदर मंदिर आहे. या सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

इस्कॉन मंदिरात राधा-कृष्णांच्या पोशाखांवर गोमती आणि गोवर्धन पर्वताचे सुंदर डिझाइन

जन्माष्टमीनिमित्त, इस्कॉन मंदिरातील राधा आणि कृष्णांचे कपडे खूप खास असतात. कारागीर या कपड्यांवर अनेक महिने काम करतात. ते कपडे जरी, मोती आणि इतर सजावटीच्या वस्तूंनी बनवलेले असतात. दरवर्षी, भगवान श्रीकृष्णासाठी एका विशिष्ट थीमवर आधारित कपडे तयार केले जातात. मंदिराचे मुख्य पुजारी रूप गोस्वामी प्रभू आणि उत्सव प्रमुख कौस्तुभ प्रभू यांनी सांगितले की, यावर्षी देवाचे कपडे पूर्णपणे हाताने भरतकाम केलेले आहेत. या कपड्यांसाठी लागणारे साहित्य विविध देशांमधून मागवण्यात आले. जपानमधून मोती, ऑस्ट्रेलियातून स्टोन आणि अमेरिकेतून हिरे मागवण्यात आले.

जन्माष्टमीच्या दिवशी देवाचा विशेष अभिषेक करण्यात आला, ज्यामध्ये १५० लिटर रसाचा वापर करण्यात आला. यात विविध पदार्थांचे मिश्रण असते. हा अभिषेक २ तास चालला आणि यात २०० हून अधिक भक्तांनी सेवा दिली. या व्यतिरिक्त, राधा-कृष्णांचा ५० किलो फुलांनी अभिषेक करण्यात आला. मंदिराची सजावटीत गोवर्धन लीलेचे प्रदर्शन होते. 

बालगोपाळांनी लुटला अभिनव ‘सायकल दहीहंडी’चा आनंद,२०० सायकलचे गरजूंना वाटप

पुणे : राधे राधे… श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी… हाथी घोडा पाल की, जय कन्हैयालाल की… गोपालकृष्ण भगवान की जय… याचा जयघोष करत ढोलताशाच्या गजरात बालगोपाळांनी अभिनव अशी सायकल दहीहंडी फोडली. जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन व इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवछत्रपती मित्र मंडळाच्या संयोजनातून शुक्रवार पेठेतील जेधे मॅन्शन, पंचमुखी मारुती मंदिर येथे या अभिनव सायकल दहीहंडीचे आयोजन केले होते.

बालगोपाळांनी ही अभिनव सायकल दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला. या सायकल दहीहंडीतील २०० सायकलींचे मोफत वाटप भोर, राजगड, मुळशी तालुक्यातील रायरी, सोंडे माथाना, कोंदवाडी, मेटपिलावरे, पाली बुद्रुक, वाजेघर बुद्रुक, लव्ही बुद्रुक, खेचरे, कळमशेत, बेलावडे, मांदेडे आणि बावीसमैल या अतिदुर्गम भागात वसलेल्या गावांमधील विद्यार्थ्यांना व पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी सायकलींच्या मधोमध क्रेनला बांधलेली दहीहंडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. मृत्युंजय वाद्यपथक, गणेशा वाद्यपथक या दोन पथकांनी बहारदार ढोलवादन केले.

यावेळी उद्योजक पुनीत बालन, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, माजी नगरसेवक अविनाश बागवे, संयोजक कान्होजी दयानंद जेधे, गौरव बोराडे, मंडळाचे कार्यकर्ते बलराज वाडेकर, साहिल भिंगे, साईराज नाईक, प्रीतम परदेशी, उमेश सपकाळ, मंगेश कोंढरे, राजवीर जेधे आदी उपस्थित होते.

पुनीत बालन म्हणाले, “आजवर इंद्राणी बालन फाऊंडेशनतर्फे पुणे, सातारा व अन्य जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अभ्यास आणि क्रीडा क्षेत्राशी निगडित ज्ञान मिळण्यास वेळ मिळावा, हा यामागचा उद्देश आहे. यंदा या अभिनव सायकल दहीहंडीच्या माध्यमातून २०० सायकलींचे वाटप करताना आनंद होत आहे.”

कृषिकेश रावले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमातून सामाजिक बांधीलकी जपत गरजू मुलांना सायकल देऊन त्यांना मदतीचा हात दिला आहे. अतिशय विधायक पद्धतीने सण, उत्सव साजरा करण्याची ही पद्धत भावली. ग्रामीण भागातील या बालगोपाळांच्या चेहऱ्यावरील सायकल मिळाल्याचा आनंद सुखावणारा असल्याचे ते म्हणाले.

कान्होजी जेधे म्हणाले, “दरवर्षी काही नवीन करण्याचा आमचा ध्यास असतो. या उपक्रमातून आपण समाजाला कशी मदत करू शकू, याकडे जास्त कल असतो. समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेतून गेल्यावर्षीपासून सायकल हंडीतून समाजातील गरजू मुलांच्या प्रवासाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.”

वाघोलीत राजस्थानच्या दोघांकडून ७६ लाखाचे मॅफेड्रॉन पकडले

पुणे- वाघोली भागात छापा मारून पोलिसांनी ७६,०१,७१०/-रु. किं. चा मॅफेड्रॉन (एम.डी.) नामक अंमली पदार्थ जप्तकरून दोघांना अटक केली आहे. हे दोघेही राजस्थान चे रहिवासी आहेत.
पोलिसांनी सांगितले कि,’ दि.१५/०८/२०२५ रोजी वरिष्ठांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत तांबे वस्ती, गुलमोहर पार्कचे मागे बकोरी, वाघोली पुणे येथे सार्वजनीक ठिकाणी आरोपी नामे १) रामेश्वरलाल मोतीजी आहिर, वय ४५ वर्षे, रा. अहिर मोहल्ला, पोस्ट लोठीयाना, गांव चक्रतीय, जिल्हा चित्तोडगड राज्य राजस्थान २) नक्षत्र हेमराज अहिर, वय २५ वर्षे रा. अहिर मोहल्ला, पोस्ट लोठीयाना, गांव चक्रतीय, जिल्हा चित्तोडगड राज्य राजस्थान यांच्या ताब्यात एकुण ७६,०१,७१०/-रू. कि. चा ऐवज त्यामध्ये ३५१ ग्रॅम ५०२ मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करुन त्यांचे विरुध्द वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२०/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.२ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा. पोलीस निरी. नितीनकुमार नाईक, सहा. पोलीस निरी. राकेश कदम, सहा. पोलीस निरी. मदन कांबळे व पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे, प्रशांत बोमांदंडी, संदिप शेळके, संदिप जाधव, नितीन जगदाळे, दिनेश बास्टेवाड, सारंग दळे, प्रशांत कापुरे, गिरीश नाणेकर, सचिन पवार, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश व्यवहारे यांनी केली आहे

दगडखाण कामगारांच्या मुलांनी फोडली ‘आपली दहिहंडी

‘शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे आयोजन : माता यशोदा सन्मान सोहळा
पुणे : गोविंदा रे गोपाळा…. गोविंदा आला रे आला… या पारंपरिक बँडवर वाजविलेल्या गाण्यांवर चिमुकल्यांचे पाय थिरकले आणि त्यांनी मोठया उत्साहात दहीहंडी फोडली. सोमवार पेठेतील दहीहंडीच्या उत्सवात संतुलन पाषाण शाळा या संस्थेतील दगडखाण कामगारांच्या मुलांनी सहभागी होत जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केला.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे कै.सौ.प्राची प्रकाश काळे स्मरणार्थ आपली दहीहंडी आणि माता यशोदा सन्मान सोहळ्याचे आयोजन सोमवार पेठेतील शाहिरी भवन गुरुकुल च्या आवारात करण्यात आले होते. यावेळी मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राध्या.लॉली दास यांच्या हस्ते सौ. सोनी दीपक जॉन या संतुलन पाषाण शाळेतील मावशींना माता यशोदा सन्मान देऊन गौरवही करण्यात आला. साडीचोळी, सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरूप होते. कार्यक्रमाला प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्राध्या.संगीता मावळे, कैलास देवकर , अरुणकुमार बाभुळगावकर, प्राध्या. रुपाली देशपांडे आदी उपस्थित होते.

संतुलन पाषाण शाळेतील  मुलांना सुग्रास पुरणपोळी जेवण व संस्थेला धान्यरुपी गोपाळकाला मदत म्हणून देण्यात आला. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व सृजनसभा या संस्थांच्या वतीने भगवान योगेश्वर कृष्णाच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून स्वर गोकुळ या संगीत सभेचे आयोजन केले होते. गोकुळाष्टमी म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा जन्मोत्सव यावर्षी ७५०वा जन्मोत्सव व स्व. शिवभूषण निनादराव बेडेकर यांचाही जन्मदिवस. यावर्षी विशेष योग म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिन. स्वरगोकुळ या विशेष संगीत सभेत सौ. शुभदा देशपांडे व डॉ. महावीर बागवडे यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन झाले. यावेळी होनराज मावळे यांनी संवादिनीची व मंगेश करमरकर यांनी तबल्यावर साथ दिली.

गुणवंत विद्यार्थांनी आपल्या गुणवत्तेचा उपयोगदेशाच्या प्रगतीसाठी करावा-निवृत्त विंग कमांडरअविनाश मुठाळ


पुणे-केशव माधव विश्वस्त निधी तर्फे पुणे जिल्ह्यातील दहावी मध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उत्तुंग यश मिळविलेल्या तसेच नववी मध्ये यश संपादन करून दहावी मध्ये प्रवेश घेतलेल्या अशा एकूण ४० विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कर्वेनगर येथील”सरस्वती विद्या मंदिर”च्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी तर प्रमुख पाहुणे म्हणून विंग कमांडर अविनाश मुठाळ (निवृत्त) हे होते.पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमधील एकूण चाळीस यशस्वी गुणवंत विद्यार्थांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.रोख बक्षीस प्रत्येकी एक हजार एक,प्रशस्तीपत्र,पुष्पगुच्छ व प्रेरणादायी पुस्तक देऊन विद्यार्थांना गौरविण्यात आले.सेवा सहयोग फाऊंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूल किट्स देण्यात आले.ह्या प्रसंगी केशव माधव चे विश्वस्त रवी जावळे,सचिव अरविंद देशपांडे,सरस्वती विद्यामंदिर च्या कार्यवाह संध्या डंबीर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजीभाग संघचालक अनिल व्यास यांची मुख्य उपस्थिती होती.

“विद्यार्थ्यांमधील सुप्तगुण ओळखून त्यांच्या क्षमतेचा विकास करण्याकडे कल असला पाहिजे.आजच्या स्पर्धात्मक युगात फक्त अभ्यासात हुशार असणे पुरेसे नसून यशस्वी होण्यासाठी मानसिकदृष्ट्या सशक्त असणे गरजेचे आहे.योग्य मार्गदर्शन, वेळेचे नियोजन,व भावनिक समतोल या तिन्ही गोष्टीचा समावेश त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात झाला पाहिजे.”अशा शब्दात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विंग कमांडर (निवृत्त) अविनाश मुठाळ यांनी मार्गदर्शन केले.”गुणवंत विद्यार्थांनी आपल्या आई वडिलांनी घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवावी तसेच आपल्या गुणवत्तेचा राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग करावा व देशाला अभिमान वाटेल असे कार्य त्यांनी करावे”,अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी हे होते.अध्यक्षीय भाषणात श्रीधर लोणी म्हणाले,”प्रतिकूल परिस्थिती असूनही ह्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे अशा विद्यार्थांना राष्ट्रीय शैक्षणिक प्रवाहात आणणे आवश्यक आहे.केशव माधव सारख्या संस्था अश्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करीत आहे ही समाजाच्या दृष्टीने समाधानकारक गोष्ट आहे.राष्ट्राची व समाजाची प्रगती या पुढच्या पिढीवरच अवलंबून आहे.”

सुरवातीस रवी जावळे यांनी अविनाश मुठाळ व श्रीधर लोणी, यांचे तर अरविंद देशपांडे यांनी संध्या डंबीर व अनिल व्यास यांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशांत कुलकर्णी यांनी केले.केशव माधव संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध समाजकार्याची माहिती अरविंद देशपांडे यांनी दिली.विश्वस्त प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले.संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती निमित्त उन्नती वैद्य व संगीता कोरडे ह्यांनी पसायदान गायिले.उपस्थित विद्यार्थांना यावेळी खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास सरस्वती विद्यामंदिर चे अध्यक्ष राजेश भांडारकर,कार्यवाह संध्या डंबीर,मुख्याध्यापक उन्नती वैद्य तसेच ज्ञानदा प्रशाला व ग.रा. पालकर शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक,विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रावण सरी : हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम..

मनोरंजनातून एकाकीपणावर मात
पुणे : ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी काम करीत असलेल्या ऑल आयकॉनिक सिनियर सिटिझन्स असोसिएशनतर्फे सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता पूना गेस्ट हाऊस येथे ‘ज्येष्ठांमधील एकाकीपणा : कारणे आणि उपाय’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्रात डॉ. दिलीप देवधर, डॉ. अमित मुंगळे, डॉ. हिमाली सर्डेकर यांचा सहभाग असणार आहे. मनोरंजनातून एकाकिपणावर कशी मात करायची या विषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या निमित्ताने ‘श्रावण सरी’ हा हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रवींद्र शाळू, सुनीला कवितकर, कल्पना क्षत्रिय, सुहास घोडके गीते सादर करणार आहेत. पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती संयोजक अजित कुमठेकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

पौलस वाघमारे यांचा षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त सत्कार

पुणे : मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे तसेच २६व्या ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पौलस वाघमारे यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा हृद्य वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रम पौलस वाघमारे फ्रेंड सर्कलतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात शुक्रवारी (दि. १५) आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह ॲड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते पौलस वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.
मागासवर्ग आयोगाचे माजी समन्वयक डॉ. मदन कोठुळे, मसाप उरळीकांचनचे अध्यक्ष लक्ष्मण घुगे, वडगाव शेरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती गलांडे, नाट्य व चित्रपट दिग्दर्शक सूर्यकांत तिवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पौलस वाघमारे यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. पौलस वाघमारे लिखित ‘अव्यक्त सत्य’ या कथासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, चांगुलपणा असणाऱ्या व्यक्तींपैकी एक असलेले पौलस वाघमारे हे सात्विक, सत्शील आणि निगर्वी व्यक्तीमत्व आहे. त्यांचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. चांगल्या माणसातीलही लक्षात राहणारी व्यक्ती म्हणजे पौलस वाघमारे होय.
सत्काराला उत्तर देताना पौलस वाघमारे यांनी ‘माझी आई’ ही स्वरचित कविता सादर केली.
लक्ष्मण घुगे म्हणाले, पौलस वाघमारे हे अक्षरांचे रान फुलविणारे लेखक आहेत. त्यांच्या साहित्यिक कलाकृती या सृजनात्मक विचारांची रचनात्मक मांडणी असणाऱ्या आहेत. त्यांच्या लिखाणाची भाषाशैली सहज सोपी असली तरी शब्दांचे रूप असामान्य आहे.
या प्रसंगी डॉ. मदन कोठुळे, मारुती गलांडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. मान्यवरांचे स्वागत अंतोनी मिस्किटा, अरुण कटारिया, आशा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली अवचरे यांनी केले.

ससूनमधील मावशी, दायी, सफाई कर्मचाऱ्यांचा मीरा देशपांडे सेवा पुरस्काराने गौरव

नर्सिंगच्या चार विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचेही वाटप
पुणे : सिटी ग्रुप ॲमानोरा येस्स फौंडेशनतर्फे ससून सर्वोपचार रुग्णालयातील सहा मावशी, दायी, सफाई महिला कर्मचाऱ्यांचा मीरा देशपांडे सेवा सन्मान पुरस्काराने तर ससून, बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंगच्या चार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ससून रुग्णालयातील महात्मा गांधी सभागृहात बुधवारी (दि. 15) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मल्लपा जाधव, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. किणीकर, सीईओ मगर, प्रशासकीय अधिकारी डॉ. आवटे, मेट्रन विमल केदार, सिटी ग्रुपचे चिफ सोशल ऑफिसर विवेक कुलकर्णी उपस्थित होते.
सिटी ग्रुपचे चिफ सोशल ऑफिसर विवेक कुलकर्णी यांनी उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, सिटी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिरुद्ध देशपांडे यांच्या मातोश्री मीरा देशपांडे यांचे ससून रुग्णालयातील नर्सिंग महाविद्यालयातच शिक्षण झाले होते तर वडिल डॉ. प्रद्युम्न देशपांडे हे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. मीरा देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या आठ वर्षांपासून रुग्णालयातील मावशी, दायी, सफाई महिला कर्मचाऱ्यांना मीरा देशपांडे स्मृती सेवा पुरस्काराने गौरविण्यात येते. तसेच परिचारिका अभ्यासक्रमातील विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सामाजिक बांधिलकी, सेवा आणि कृतज्ञतेच्या भावनेतून हा उपक्रम राबविला जातो.
चांदणी अमित चव्हाण, कलावती सोपान कांबळे, पूनम प्रमोद सुसगोहेर, त्रिवेणी गौतम सोनवणे, संगीता सनी सोलंकी, हेमा गालफाडे या सफाई कर्मचाऱ्यांचा शाल, साडी, स्मृतीचिन्ह, अकरा हजार रुपये देऊन गौरव करण्यात आला. तर सना खान, इन्सिया सय्यद, साक्षी तिरमाने, क्षितीजा मोरे या विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र, पंधार हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव आणि शिष्यवृत्ती वाटप रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्या हस्ते झाले.

शहनाई वादन-गायन जुगलबंदी तसेच ताल गजरात रसिक मंत्रमुग्ध

स्वर-मिलाप संगीत महोत्सवात मान्यवर कलाकारांसह विद्यार्थ्यांचे बहारदार सादरीकरण
पुणे : शहनाईचे सूर आणि गायन यांच्या जुगलबंदीतून साकारलेला राग मारू बिहाग तसेच तबला, पखवाज, शहनाई आणि बासरी यांच्या सूर-तालातून साकारलेला ताल गजर याने रसिकांना अद्‌भुत कलाविष्काराचा आनंद मिळाला.
निमित्त होते स्वर-मिलाप संगीत महोत्सवाचे. उमेश-महेश साळुंके व वृंदावनी संगीत विद्यालय हडपसर यांच्यावतीने हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुसुमवंदन नाट्य संस्था, हडपसरच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीस सुप्रसिद्ध गायक सुरेश पत्की, जयंत केजकर, किरण भट्ट, सरोद वादक अनुपम जोशी, संतोष कुंभार, तबलावादक महेशराज साळुंके, बापूसाहेब औताडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.
या प्रसंगी सुप्रसिद्ध सरोद वादक अनुपम जोशी यांना सुप्रसिद्ध शहनाई वादक पंडित डॉ. प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते स्वर-मिलाप संगीतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पंडित डॉ. प्रमोद गायकवाड (शहनाई) आणि किरण भट्ट (गायन) यांच्या जुगलबंदीची सुरुवात मारू बिहाग रागातील ‘नैना लगाई मैने’ या बंदिशीने झाली. नोम-तोम, आलाप यांच्या वादन गायनातून रंगलेल्या जुगलबंदीत डॉ. गायकवाड यांनी मध्यलय त्रितालात शहनाई वादनातील गत ऐकविली. यानंतर गायन-वादनातून ‘पायोजी मैने राम रतन’ ही रामधून सादर केली. रसिकांना हा अनोखा स्वराविष्कार भावला.
महोत्सवात शेवटी ताल गजर सादर करण्यात आला. महेशराज साळुंके (तबला), दीपक दसवडकर (पखवाज), उमेशराज साळुंके (गायन), अनिकेत साळुंके (शहनाई), श्रीकांत गव्हाणे (बासरी) यांच्या सादरीकरणातून तबला-पखवाज वादनातील प्रमुख ठेके, वारकरी संप्रदायातील ‘रामकृष्ण हरी’चा गजर तसेच शास्त्रीय संगीतातील काही रचनांवर सादरीकरण झाले. 51 वादक एकाच मंचावर उपस्थित होते हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. तबलावादक महेशराज साळुंके आणि पखवाज वादक दीपक दसवडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अनोख्या संगीताविष्काराला रसिकांनी उभे राहून मानवंदना दिली. ताल गजर ही प्रस्तुती महेशराज साळुंके यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांना समर्पित केली.
या प्रसंगी स्वरूपा झांबरे या विद्यार्थिनीला आदर्श विद्यार्थी पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिनल साळुंके यांनी केले तर आभार कमलेश खळदकर यांनी मानले.

महावितरणकडून विद्युत सहायकांची परिमंडल निहाय निवड यादी जाहीर

कागदपत्रांची पडताळणी दि. २० ते २२ ऑगस्टला

मुंबई: महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या ५ हजार ३८१ उमेदवारांची व संबंधित परिमंडलांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये दि. २० ते २२ ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे. या उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद परिमंडल कार्यालयांमध्ये मूळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे तसेच अद्ययावत ओळखपत्राच्या मूळ प्रतीसह स्वतः हजर राहणे अनिवार्य आहे.

महावितरणने जाहिरात क्र. ०६/२०२३ अन्वये विद्युत सहायक या पदासाठी दि. २० ते २२ मे दरम्यान ऑनलाइन क्षमता चाचणी घेतली होती. यात निवड झालेल्या उमेदवारांची यादी दि. ३० जुलैला सविस्तर माहिती व सूचनेसह कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर दि. १४ ऑगस्टला निवड यादीतील उमेदवार व त्यांना वर्ग केलेल्या परिमंडलांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

आता येत्या दि. २० ते २२ ऑगस्ट दरम्यान विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जामधील नोंदी, अर्हता, कागदपत्रे व प्रमाणपत्रांची छाननी व पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये होणार आहे. या तीनही दिवशी संबंधित परिमंडलांमध्ये सकाळी १० वाजता मूळ कागदपत्रांची पडताळणी सुरू होईल. नमूद दिवशी काही कारणास्तव पडताळणी पूर्ण झाली नाहीतर दुसऱ्या दिवशी करण्यात येईल. तथापि, सर्व मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह संबंधित उमेदवारांनी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहणार नाही त्यांची निवड रद्द समजली जाईल व भविष्यात त्यांच्या कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्युत सहायक पदी निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांची पडताळणी केल्यानंतर जे उमेदवार पात्र होतील त्यांच्या नियुक्तीबाबत संबंधित परिमंडलामध्ये पुढील कार्यवाही करण्यात येईल. याबाबतची सर्व माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय लष्कराच्या शौर्याला ‘तिरंगा फेस्टिवल’ मधून सलाम

किरण साळी मित्र परिवार आणि ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र च्या वतीने आयोजन ; भारतीय लष्कराला ७०० हून अधिक ढोल-ताशा वादनातून मानवंदना

पुणे : भारत माता की जय… वंदे मातरम चा जयघोष… एकाच वेळी ७०० हून अधिक ढोल ताशांचे वादन… देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण… रणवाद्यांचे वादन… आणि पाच वीर पत्नीचा हृदयस्पर्शी सन्मान सोहळा अशा देश प्रेमाने भारलेल्या वातावरणात भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम करण्यात आला. स्वातंत्र्यदिनी पुण्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या ‘तिरंगा फेस्टिवल’ मध्ये एक हजारहून अधिक वादक आणि पाच ते सहा हजारहून अधिक पुणेकरांनी सहभाग घेतला.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय लष्करातील सैनिकांना व त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशाने श्री जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर चौकाजवळ, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर ‘तिरंगा फेस्टिवल २०२५’ चे आयोजन करण्यात आले. किरण साळी मित्र परिवार आणि ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र च्या वतीने हा फेस्टिवल घेण्यात आला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सेनाधिकारी पद्मश्री मुरलीकांत पेटकर, राजेश पांडे, मेघराज भोसले, आयोजक किरण साळी, संजय सातपुते, आनंद सराफ, ऍड. शिरीष थिटे, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील आदी उपस्थित होते.

देश रक्षणार्थ प्राणांची बाजी लावणा-या भारतीय सैनिकांच्या पाच वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये वीरपत्नी मीनाक्षी भिसे, राणी चौधरी, सुस्मिता पालेकर, प्रतिभा खटके, दिपाली मोरे यांचा समावेश होता. तिरंगी उपरणे आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव झाला.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, भारत देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांच्या वीर पत्नींसोबत आपण आहोत, हा विश्वास देणारा हा कार्यक्रम आहे. प्रत्येक सणाला आपण सैनिकांच्या कुटुंबांसोबत असायला हवे. ढोल ताशा वादन हे सर्वत्र होत असून याला लवकरच चांगला दर्जा व उंची मिळेल.

ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र अंतर्गत असलेल्या ढोल ताशा पथकांतील ७००हून अधिक वादकांनी एकत्रितपणे वाद्यवादन केले. ढोल ताशाच्या वादनातून ‘आॅपरेशन सिंदूर’ व ‘आॅपरेशन महादेव’ मधील वीरांना मानवंदना देण्यात आली. विविध वाद्यांचा सुरेल अविष्कार असलेला ‘नादरंग’ -तालवाद्यकचेरी हा कार्यक्रम सादर झाला. याशिवाय ‘वंदे मातरम’ या स्वर मैफलीतून बालकलाकारांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. तसेच गीततिरंगा/ रामराज्याभिषेक भरतनाट्यम नृत्यावर आधारित सादरीकरण झाले. केशव शंखनाद पथकाने देखील शंख वादन केले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सामुदायिक पसायदानाने फेस्टिवलची सांगता झाली. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

महाराष्ट्रात दहीहंडीच्या विविध घटनांत १०० वर गोविंदा जखमी, एका कार्यक्रमात DCM शिंदे थोडक्यात बचावले

मुंबई- महाराष्ट्रात दहीहंडीच्या उत्सवात दोघांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. मानखुर्दमध्ये दुर्देवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. बाल गोविंदा पथकातील 32 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे.तर गावदेवी गोविंदा पथकातील रोहन वाळवी या गोविंदाचा मृत्यू झाल्याचे येथे समजले आहे .महाराष्ट्रात दहीहंडीच्या विविध घटनांत १०० वर गोविंदा जखमी झाल्याचे वृत्त असून खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमात बाल बाल बचावल्याचे समजले आहे.

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये ही दुर्घटना घडली आहे. बाल गोविंदा पथक तिथे दाखल झालं होतं. 32 वर्षीय जगमोहन चौधरी याला दहीहंडीचा रोप बांधला जात होता. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. जगमोहन चौधरी दोर बांधत असताना खाली पडला आणि या दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जगमोहनला तातडीने शताब्धी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण तिथे डॉक्टरांनी त्याला तपासलं असता त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं. यामुळे मानखुर्दमध्ये शोककळा पसरली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या निमित्ताने नव्या मुंबईत विविध कार्यक्रमास हजेरी लावली होती. एकनाथ शिंदेंचा घनसोलीतील शेवटचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर शिंदे स्टेजवरून खाली उतरत असताना अचानक स्टेज खचला. क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते जमा झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला. मात्र, शिंदे यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्यांना सावरले आणि सुरक्षितपणे घटनास्थळावरून बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.रुग्णालयांनुसार आकडेवारी

सेंट्रल मुंबईतील रुग्णालयांत 51 जखमी गोविंदांना दाखल करण्यात आले. यापैकी 32 जणांवर उपचार सुरू आहेत. ग.टी. रुग्णालयात दाखल असलेला 23 वर्षीय श्रेयस चालके हा गंभीर जखमी असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 19 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
ईस्टर्न सबर्बन रुग्णालयांत 31 जखमी गोविंदा दाखल झाले होते. यापैकी 5 जणांवर उपचार सुरू असून उर्वरित 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वेस्टर्न सबर्बन रुग्णालयांत 34 जण दाखल झाले. यातील ३ जण उपचाराधीन आहेत. कांदिवली येथील बीडीबीए रुग्णालयात दाखल असलेला 9 वर्षीय आर्यन यादव गंभीर अवस्थेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 31 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.मुंबईत आणखी एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हा गोविंदा गावदेवी गोविंदा पथकातील होता. रोहन वाळवी असे मृत्यू झालेल्या गोविंदाचे नाव आहे. रोहन अंधेरीतल्या दहीहंडीत सहभागी न होता एका टेम्पोत बसलेला असताना तो अचानक बेशुद्ध पडला, त्यानंतर त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. याआधी मानखुर्द येथे एका गोविंदाचा दहीहंडी बांधताना मृत्यू झाला. हा तरुण गल्लीतल्या बालगोपाळांसाठी पहिल्या मजल्यावरून दहीहंडी बांधता होता. त्यावेळी अचानक तो खाली पडला.

जम्मू-काश्मीरमध्ये ३ दिवसांत दुसऱ्यांदा ढगफुटी: कठुआ येथे 4 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेश: कुल्लूमध्ये ढगफुटी, मंडीमध्ये पूर; चंदीगड-मनाली चार लेन बंद

जम्मू-काश्मीरमध्ये ३ दिवसांत दुसऱ्यांदा ढगफुटीची घटना घडली आहे. रविवारी सकाळी कठुआ जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील जोद व्हॅली भागात ढगफुटीच्या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला. ६ जण जखमी झाले आहेत. जोद व्यतिरिक्त, माथेर चक, बगारड, चांग्रा आणि दिलवान-हुटली येथेही भूस्खलन झाले आहे.

भूस्खलनानंतर जोद गाव शहरापासून तुटले. बऱ्याच प्रयत्नांनंतर बचाव पथक गावात पोहोचले. येथे घरे अनेक फूटांपर्यंत पाण्याने आणि ढिगाऱ्याने भरली आहेत. लोकांना चिखलातून बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तीन दिवसांपूर्वी, १४ ऑगस्ट रोजी किश्तवाडच्या चसोटी गावात ढगफुटीची घटना घडली. या घटनेत ६५ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. २०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे.

त्याच वेळी, हवामान खात्याने १७ ते १९ ऑगस्ट दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जम्मू, रियासी, उधमपूर, राजौरी, पूंछ, सांबा, कठुआ, दोडा, किश्तवार, रामबन आणि काश्मीरच्या काही भागात ढगफुटी आणि भूस्खलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये १७ ते १९ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

त्याच वेळी, हवामान खात्याने १७ ते १९ ऑगस्ट दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जम्मू, रियासी, उधमपूर, राजौरी, पूंछ, सांबा, कठुआ, दोडा, किश्तवार, रामबन आणि काश्मीरच्या काही भागात ढगफुटी आणि भूस्खलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेश: कुल्लूमध्ये ढगफुटी, मंडीमध्ये पूर; चंदीगड-मनाली चार लेन बंद

रविवारी पहाटे ४ वाजता कुल्लूच्या शालनाला येथे ढग फुटले. यामुळे कुल्लू आणि मंडीच्या अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे टाकोली सब्जी आणि टाकोली फोरलेनवर ढिगारा पडला आहे. कुल्लू-मंडीच्या वेगवेगळ्या भागात १० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. अनेक घरे ढिगाऱ्यांनी भरली आहेत.

शालनाल खाड येथील पुरामुळे अफकॉन कंपनीच्या कार्यालयाची आणि कॉलनीची भिंत तुटली. येथे कर्मचाऱ्यांनी पळून जाऊन आपले प्राण वाचवले, स्थानिक लोकांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले. टाकोली, पनारसा आणि नागवाई येथे १० हून अधिक वाहनांचेही नुकसान झाले आहे.

चंदीगड-मनाली चार-लेन मार्ग मंडी आणि कुल्लूमध्ये अनेक ठिकाणी बंद करण्यात आला आहे. मंडी जिल्ह्यातील बागी पराशर येथेही अचानक आलेल्या पुरामुळे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या मते, आज चंबा, कांगडा, मंडी, शिमला आणि सिरमौरमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात या पावसाळ्यात आतापर्यंत २६१ जणांचा मृत्यू झाला आहे.
किश्तवाडमध्ये आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चसोटी गावात १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.२५ वाजता ढगफुटी झाली. त्यामुळे ढिगाऱ्याखाली गाडल्यामुळे आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३४ मृतदेहांची ओळख पटली आहे. ५०० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे, तर २०० लोक अजूनही बेपत्ता आहेत.

जखमींची संख्या १८० आहे, त्यापैकी ४० जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना किश्तवाड-जम्मू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ७५ जणांची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी प्रशासनाला दिली आहे. एनडीआरएफ, लष्कर (३००+ सैनिक), व्हाईट नाईट कॉर्प्स मेडिकल टीम, पोलिस, एसडीआरएफ आणि इतर एजन्सींच्या ३ टीम बचावकार्यात गुंतल्या आहेत.

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला शनिवारी चासोती येथे पोहोचले. त्यांनी आपत्तीग्रस्तांची भेट घेतली आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावर एका व्यक्तीने त्यांना सांगितले – आम्हाला काहीही नको आहे, तुम्ही सर्व काही तुमच्या घरी घेऊन जा, फक्त आम्हाला मृतदेह द्या. माझी आई आणि काकू बेपत्ता आहेत.

तरुणांनी आरोप केला होता की येथे २० जेसीबी आले आहेत, आम्ही कालपासून पाहत आहोत की फक्त २ जेसीबी काम करत आहेत. आज तुम्ही आलात तेव्हा हे सुरू झाले होते. जेव्हा एखादा नेता येतो तेव्हा जेसीबी सुरू होतात.

जिल्ह्यातील पद्दार उपविभागातील चासोती गावात हजारो भाविक माचैल माता यात्रेसाठी पोहोचले तेव्हा ही दुर्घटना घडली. यात्रेचा हा पहिला थांबा आहे. येथे बसेस, तंबू, लंगर आणि भाविकांच्या अनेक दुकाने होती. पुरात सर्व काही वाहून गेले.

महिलांनी फोडली अन्यायाची प्रतीकात्मक दहीहंडी

सोमवार पेठेत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष ॲड.नितीन परतानी यांच्या वतीने आयोजन

पुणे : सर्वत्र मोठ्या प्रमाणात महिलांवर सुरु असलेल्या अत्याचाराचा पुण्यात अभिनव पद्धतीने निषेध करीत महिलांनी अन्यायाची प्रतीकात्मक दहीहंडी फोडली. सोमवार पेठेतील रास्ते वाडा चौकात आयोजित काँग्रेसच्या दहीहंडीमध्ये ही हंडी फोडण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मुख्य आयोजक व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष ॲड.नितीन परतानी, नीलम परतानी ,अभिनेत्री श्रुती मराठे आदी उपस्थित होते. कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी संघाच्या महिलांनी ही दहीहंडी फोडली. वारजे येथील मोरया प्रतिष्ठान वाद्य पथकाने ढोल ताशा वादन केले.श्रुती मराठे म्हणाली, महिलांवरील अत्याचाराच्या बाबत आपण काहीतरी करणे गरजेचे आहे. त्यामुळे दहीहंडी सारख्या उत्सवातून मांडलेल्या या महिलांशी संबंधित विषयाला आपण पाठिंबा द्यायला हवा.

ॲड.नितीन परतानी म्हणाले,  राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे आज महिलांवरील अन्यायाची प्रतीकात्मक दहीहंडी करण्यात आली. हि हंडी महिलांनीच एकजुटीने फोडली. महिला एकजूट आणि अन्यायाला प्रतिकार करण्यास आम्ही सज्ज आहोत, असा संदेश महिलांनी यनिमित्ताने दिला.