Home Blog Page 166

श्रावण महोत्सवानिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन; महिलांच्या कल्पकलतेला उद्योजकतेची नवी दिशा — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे-
श्रावण महोत्सवानिमित्त मिती ग्रुप आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भव्य पाककला स्पर्धा’ आज टिळक वाडा, लोकमान्य सभागृह, पुणे येथे उत्साहात पार पडली. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष सहकार्याने ही स्पर्धा रंगली असून, पुणेकर महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विविध स्वादिष्ट आणि आकर्षक पदार्थांची मेजवानी सादर केली.

या वेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “श्रावण महोत्सव हा स्त्रियांच्या आनंद, एकोपा आणि सर्जनशीलतेचा सोहळा आहे. पाककला स्पर्धा ही केवळ चव आणि परंपरेचा उत्सव नसून महिलांना आत्मविश्वास, संधी आणि उद्योजकतेकडे नेणारे व्यासपीठ आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, महिलांनी घरगुती स्वयंपाकघरातून उद्योगजगताकडे टाकलेले पाऊल हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. “भारतात महिलांनी घेतलेल्या कर्जाची ९९ टक्के परतफेड केली जाते, हा विक्रम देशाच्या प्रगतीचा द्योतक आहे. त्यामुळे बँकाही महिलांना उद्योग उभारण्यासाठी उत्साहाने कर्ज देत आहेत,” असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

सोमवारचा उपवास असूनही महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून समाधान व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “या स्पर्धेमुळे महिलांच्या कलागुणांना छंदापुरते न राहता रोजगार आणि उद्योजकतेचे नवे दालन खुले होणार आहे.”

या कार्यक्रमासाठी कुणाल टिळक यांचे विशेष सहकार्य लाभले. मिती ग्रुप आणि स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्यांनी व उत्तरा मोने यांनी उत्कृष्ट संयोजन करून स्पर्धेला संस्मरणीय रूप दिले.

पुण्यात मुंबई-बंगळुरू मार्गावर बसला भीषण आग; 30 वर प्रवासी सुखरूप

पुणे- मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसला भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. बसमधील ३० वर सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली असून सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बाह्यवळण मार्गावरून सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास प्रवासी बस जात होती. नऱ्हे परिसरातील श्री स्वामी नारायण मंदिराजवळ धावत्या बसमधून अचानक मोठ्या प्रमाणात धूर येण्यास सुुरुवात झाली. बसचालकाच्या निदर्शनास हा प्रकार वेळीच आला. बसमधील वाहकाने त्वरित गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना जागे केले. बसमधील प्रवासी त्वरित गडबडीत बसमधून बाहेर पडल्याने गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्राचे प्रमुख प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून आग थोड्याच वेळात आटोक्यात आणली. आगीत बस पूर्णपणे जळाली, तसेच घटनास्थळी मोठा धूर झाला होता. बसमधील प्रवासी त्वरित बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कुणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर यांनी दिली. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. बसमधील तांत्रिक बिघाड किंवा शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यभर मुसळधार पावसाचा कहर :५१,२०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात

५१,२०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ६ फुटांवरून ८ फुटापर्यंत उघडून ५१,२०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ५३,३०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

मुंबईतील सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयांसह शाळा, कॉलेज बंद
मुंबई-भारतीय हवामान खात्याने आज मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अति मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतेक भागात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसामुळे मुंबईची परिस्थिती बिकट आहे. मुंबईकरांना कोणताही दिलासा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. आजही सततचा मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी रात्रीपासून मुंबईत पाऊस पडत आहे. मंगळवारी सकाळपासून पाऊस आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे. हवामान खात्याने मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात रेड अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले की, राज्यातील अनेक भागात सततच्या पावसामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, नांदेड जिल्ह्यात 200 हून अधिक ग्रामस्थ अडकले आहेत, ज्यामुळे बचाव आणि मदत कार्यासाठी सैन्य तैनात करण्यात आले आहे. कोकणातील काही नद्यांची पाण्याची पातळी धोकादायक पातळी गाठली आहे आणि जळगावमध्ये मोठे नुकसान झाले आहे.
विक्रोळीत सर्वाधिक 255.5 मिमी पावसाची नोंद
18 ऑगस्ट 2025 सकाळी 08:30 पासून 19 ऑगस्ट 2025 सकाळी 08:30 पर्यंत (मिमी मध्ये)

​विक्रोळी: 255.5 मिमी
​भायखळा: 241.0 मिमी
​सांताक्रूझ: 238.2 मिमी
​जुहू: 221.5 मिमी
​वांद्रे: 211.0 मिमी
​कुलाबा: 110.4 मिमी
​महालक्ष्मी: 72.5 मिमी

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीतील पाणी पातळी वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर कोयना धरणाची पाहणी केली. कोयना धरणात सद्यस्थितीला ९२.१७ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातून ५६००० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. आजपर्यंत महाबळेश्वर व नवजा येथे अनुक्रमे ५६०० व ६२०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरला १२व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘बेस्ट अॅक्ट्रेस’चा विशेष ज्युरी पुरस्कार!

मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर काही काळ ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करत चर्चेत आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या १२व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात (२०२२–२३) तिच्या मोग या कोंकणी चित्रपटासाठी तिला ‘बेस्ट अॅक्ट्रेस’चा विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाला.

जोजो डिसुझा दिग्दर्शित मोग ही प्रेम, संघर्ष आणि मानवी नात्यांची कहाणी सांगणारी फिल्म आहे. यात नक्षत्राने साकारलेली सेलिना ही साधी पण भावनिक गुंतागुंतीत सापडलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. मराठी पार्श्वभूमी असूनही तिने या भूमिकेसाठी शून्यापासून कोंकणी भाषा शिकली, गोव्यातील घराघरांत बोलली जाणारी कोंकणी–मराठी मिसळलेली बोली आत्मसात केली आणि स्थानिक उच्चारांवर मेहनत घेतली. तिच्या या प्रामाणिक तयारीमुळे सेलिनाला वास्तवाचा स्पर्श मिळाला आणि ज्युरींनी तिच्या अभिनयाला विशेष दाद दिली. सेलिना ही भूमिका केवळ नायिकेची नाही, तर संपूर्ण कथानकाचा भावनिक आधारस्तंभ ठरते.

या महोत्सवात मोगला एकूण ८ पुरस्कार मिळाले, ज्यात सर्वोत्कृष्ट कोंकणी चित्रपट हाही मानाचा समावेश आहे. गोवा राज्य सरकारतर्फे आयोजित या फेस्टिव्हलचा समारोप पणजीतील कला अकादमी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. गोवा राज्य चित्रपट महोत्सव हा स्थानिक चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा सोहळा मानला जातो, आणि या व्यासपीठावर मिळालेला पुरस्कार नक्षत्राच्या कारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

नक्षत्राचा प्रवास मालिकांपासून मोठ्या पडद्यापर्यंत गेला आहे. माझीया माहेरा मधील पल्लवी, लेक माझी लाडकी मधील सानिका, सुर राहू दे मधील आरोही आणि चंद्र आहे साक्षीला मधील सुमन काळे या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. तर फत्तेशिकस्तमधील बहू बेगम, प्रीतममधील सुवर्ण, तसेच सापळा, मुक्ताई आणि अलीकडील ऑल इज वेलमधील तिच्या मुख्य भूमिकांनी तिला चित्रपटसृष्टीत वेगळं स्थान मिळवलं.

पुरस्कार स्वीकारताना नक्षत्रा म्हणाली :
“हा सन्मान माझ्यासाठी फक्त पुरस्कार नाही, तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे. मोगसाठी मी भाषा शिकण्यापासून व्यक्तिरेखेचं वास्तव पकडण्यापर्यंत मेहनत घेतली आणि त्या प्रयत्नाची दखल घेतल्याचा मला आनंद आहे. हा पुरस्कार मला आणखी जबाबदारी देतो — दर्जेदार, प्रामाणिक आणि प्रेक्षकांच्या मनात ठसतील अशा भूमिका साकारत राहण्याची. मग ते टीव्ही असो, वेब सिरीज असो किंवा चित्रपट — मी प्रत्येक माध्यमासाठी तयार आहे.”

या सन्मानामुळे नक्षत्रा मेढेकरचं पुनरागमन अधिक प्रभावी झालं असून प्रेक्षक आणि रसिक तिच्या पुढील कामाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन

सार्वजनिक आरोग्य सेवांवर होणार परिणाम

पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत १५ ते २० वर्षांपासून कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून (दि.१९) बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती, महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध आरोग्य कामगार संघटना प्रथमच एकत्र येऊन यामध्ये सक्रिय सहभागी झाल्या आहेत. अत्यावश्यक सेवेसह प्रसूती, नवजात कक्ष, अतिदक्षता विभाग, लसीकरण, औषध, वितरण यांसह तांत्रिक व अतांत्रिक विभागात कार्यरत असणारे राज्यभरातील १० हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याने सार्वजनिक आरोग्य सेवांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

१० वर्षांपेक्षा अधिक काळ सेवेत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ६९ संवर्गानुसार, नियमित समायोजन तात्काळ करावे. असा शासन निर्णय १४ मार्च २०२४ रोजी झाला होता. तसेच २०२२ साली मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने NHM मधील १० वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि समकक्ष पदांवर थेट शासन सेवेत समायोजनाचे आदेश दिले होते. महामहीम राज्यपाल यांनी देखील आपल्या अभिभाषणात या शासन निर्णयाचा उल्लेख करत याविषयी अनुकूलता व्यक्त केली होती.
नंतर राज्यभर ३७ दिवसांचे संप आंदोलन झाल्यावर शासनाने १४ मार्च २०२४ ला ३०% मंजूर पदांवर समायोजनाचा निर्णय घेतला. पण दीड वर्षाहून अधिक काळ लोटूनही हा निर्णय अंमलात आला नाही. त्यामुळे १४ मार्च २०२४ चे शासन आदेश त्वरित लागू करणे आणि उर्वरित ६९ संवर्गांचे नियमित समायोजनकरणे ही प्रमुख मागणी आंदोलकांची आहे.

त्यासह १५% मानधन वाढ तात्काळ लागू करणे, बदली धोरण, EPF व इन्शुरन्स योजना, शैक्षणिक पात्रता व कामाच्या जबाबदारीनुसार वेतन सुसूत्रीकरण, सेवेत असताना मृत्यू झाल्यास ५० लाख व अपंगत्व आल्यास २५ लाख सानुग्रह अनुदान, आदी १८ प्रमुख मागण्या लेखी दिलेल्या कालबद्ध आश्वासनासह मान्य कराव्यात, अशी आंदोलकांची प्रमुख अपेक्षा आहे.

याआधी ८ जुलै २०२५ रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य विभागाचे सचिव यांची बैठक लवकरच घेतली जाईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. तसेच आझाद मैदान येथे झालेल्या लक्षवेधी आंदोलनाची दखल नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात घेण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, सामंजस्याची भूमिका घेत २१ जुलै २०२५ पासून होणारे आंदोलन कर्मचाऱ्यांनी स्थगित केले होते. परंतु, त्यानंतरही कोणतीही ठोस पावले उचलली न गेल्याने आता कर्मचारी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामार्फत राजकीय पातळीवर सकारात्मक वातावरण असले तरी केवळ प्रशासकीय दिरंगाई आणि उदासीनतेमुळे आज राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग ठप्प होण्याची वेळ आली आहे.
……………………….

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण शिल्पकार राम सुतार यांचा भव्य सन्मान

१०१ वर्षांच्या वयातही प्रेरणादायी कलाविष्कार घडवणारे राम सुतार हे भारताच्या सांस्कृतिक वारशाचे खरे संवाहक” — डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, — जगभर भारताचा मान उंचावणारे, १०१ वर्षीय ऋषीतुल्य शिल्पकार राम सुतार यांचा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन भव्य सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सुप्रसिद्ध शिल्पकारांचे सुपुत्र अनिल सुतारही उपस्थित होते.

राम सुतार यांच्या कलाकृती ही केवळ शिल्प नसून इतिहासाची जिवंत साक्ष आहेत. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सारखा भव्य प्रकल्प, संसद भवनातील महात्मा गांधींची प्रतिमा, तसेच सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत यांसह अनेक महापुरुषांच्या मूर्ती त्यांनी साकारल्या. पन्नासहून अधिक भव्य शिल्पांची निर्मिती करणाऱ्या सुतार यांच्या कलेत वास्तवदर्शी तपशील, मानवी भावना आणि अप्रतिम कलावैभवाचा संगम दिसतो.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गौरव करताना सांगितले,“राम सुतार हे फक्त शिल्पकार नाहीत, तर भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे जिवंत प्रतीक आहेत. त्यांनी आपल्या शिल्पांमधून देशभक्ती, एकात्मता आणि मानवी मूल्यांचा प्रभावी संदेश दिला आहे. १०१ वर्षांच्या वयातही त्यांचा उत्साह आणि कलाविष्कार पाहून प्रेरणा मिळते, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.”आपल्या अविस्मरणीय योगदानासाठी राम सुतार यांना यापूर्वी पद्मश्री (१९९९), पद्मभूषण (२०१६), टागोर पुरस्कार (२०१६) यांसह असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत

राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समाधानी, आनंदी होऊ दे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भीमाशंकराकडे प्रार्थना

पुणे दि. १८ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे, राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे. चांगले पीक येऊ दे; राज्यातील सर्व जनतेच्या जीवनात सुख, समाधान, आनंदाचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना भीमाशंकराकडे केल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

पुजेनंतर उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, तहसीलदार तथा देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त प्रशांत बेडसे, गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, दत्तात्रय कौदरे, रत्नाकर कोडीलकर, सरपंच दत्तात्रय हिले आदी उपस्थित होते.

भीमाशंकराचे दर्शन घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यातून, देशभरातून लाखो शिवभक्त येथे श्रावणातील सोमवारी दर्शनासाठी येतात. आपणही त्यातील एक शिवभक्त असून दरवर्षीप्रमाणेच श्रावणातील दर्शनासाठी आलो आहे. हे प्राचीन देवस्थान असून दर्शन घेऊन समाधान, आनंद लाभतो.

श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विकास आराखडा २८० कोटी रुपयांचा तयार केलेला असून येथे येण्यासाठीचा रस्ता चांगला करण्यासह येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे श्री. शिंदे माध्यमांशी संवाद साधताना यावेळी म्हणाले.
0000

देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

पुणे दि. १८ : शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन २०२५-२६’ योजना राबविण्यात येत असून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी लॉटरीसाठी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ६ वा मजला, डीटीसी सेंटर, म्हात्रे पूल, एरंडवने येथे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९० शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत नेदरलँड, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, इस्राएल, जपान, मलेशिया, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, चीन, दक्षिण कोरिया या देशांमधील शेतीचे प्रगत तंत्रज्ञान, विविध पिकांची उत्पादकता, कृषी उत्पादनांचे बाजार व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, कृषी प्रक्रियेतील अद्ययावत पद्धती आदींची माहिती मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली आहे.
0000

निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयाचा आधार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामाध्यमातून ५ हजारावर रुग्णांना साडेसहा कोटीहून अधिक रुपयांची वैद्यकीय मदत

समाजातील निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून मोठा आधार मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रयत्नांतून १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या पाच महिन्यात पुणे जिल्ह्यातील ५ हजार ११२ रुग्णांना तब्बल ६ कोटी ५२ लाख ५६ हजार ६५७ रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.

धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० च्या कलम ४१ अअ आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या (रिट याचिका क्र. ३१३२/२००४) निर्णयानुसार धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा निर्धन रुग्णांसाठी मोफत आणि १० टक्के खाटा दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे बंधनकारक केले आहे.

विशेष वैद्यकीय मदत कक्षाची भूमिका

निर्धन व दुर्बल रुग्णांना धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा पारदर्शक व तातडीने उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई येथे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक आहेत.
या कक्षाच्या कार्यकक्षेत पुढील बाबींचा समावेश होतो : धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल रुग्णांना त्वरित उपलब्ध करून देणे, उपलब्ध/रिक्त खाटांची माहिती रुग्णांना रिअल-टाईममध्ये देणे, कोणत्या रुग्णालयात कोणत्या आजारावर उपचाराची सुविधा आहे, याबाबत माहिती देणे, रुग्ण व नातेवाईकांना योजनेंतर्गत मिळणाऱ्या सवलतींची माहिती सहजतेने देणे, रुग्णालयात नियुक्त समन्वयकांमार्फत गरजूंना मदत करणे. या प्रक्रियेसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. धर्मादाय रुग्णालयातील खाटा खरोखरच निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना मिळाव्यात, यासाठी राज्यस्तरीय समितीमार्फत देखरेख ठेवली जाते. विशेष मदत कक्षामुळे रुग्णांना खाटांची उपलब्धता, उपचार सुविधा व शासनाच्या सवलतींची माहिती रिअल-टाईममध्ये मिळते. त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळून त्यांचे प्राण वाचण्यास मोठी मदत होत आहे.

जिल्हास्तरीय समिती व पुण्यातील धर्मादाय रुग्णालये

पुणे जिल्ह्यातील एकूण ५८ धर्मादाय रुग्णालयांतून निर्धन व दुर्बल रुग्णांना लाभ मिळत आहे. या रुग्णालयांना शासनाच्या विविध कर व अनुदान सवलती मिळतात. त्यामुळे गरीब रुग्णांसाठी आरक्षित खाटा उपलब्ध करून देणे त्यांच्यावर कायदेशीर जबाबदारी आहे. निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दराने उपचार मिळावेत, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समितीमार्फत धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटांची माहिती ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते आणि त्यावर राज्यस्तरीय मदत कक्ष सतत देखरेख ठेवतो.

वैद्यकीय मदतीसाठी अर्ज कसा करावा?

रुग्णांना मदत मिळण्यासाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाकडे विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा लागतो.
आवश्यक कागदपत्रे :
• रुग्णाचे आधारकार्ड
• शिधापत्रिका
• पॅनकार्ड
• उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांच्याकडून)
• रुग्णालयाने दिलेले उपचाराचे अंदाजपत्रक

कुठे संपर्क साधावा?

  • जिल्हाधिकारी कार्यालय कक्ष, पुणे. पत्ता: खोली क्रमांक १०, तळमजला, जुनी जिल्हा परिषद, पुणे
  • डॉ. मानसिंग साबळे, जिल्हास्तरीय कक्षाचे वैद्यकीय अधिकारी तथा अध्यक्ष आहेत,
    वैद्यकीय मदतीचा अर्ज भरण्यासंदर्भात अडचण आल्यास कक्ष प्रमुखांच्या ८०८७६७८९७७ या भ्रमणध्वनी क्रमांक तसेच cmrfpune@gmail.com ईमेल पत्त्यावर क्रमांकावर संपर्क साधावा.
    • टोल-फ्री हेल्पलाईन : १८०० १२३ २२११
    • संकेतस्थळ : https://charitymedicalhelpdesk.maharashtra.gov.in

रामेश्वर नाईक,कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष, मंत्रालय मुंबई

धर्मादाय रुग्णालय निर्धन व दूर्बल घटकांतील रुग्णांसाठी आशादायी ठरत आहे. पारदर्शक व ऑनलाईन प्रणालीमुळे आरक्षित खाटांची माहिती रूग्ण व नातेवाईकांना सहज उपलब्ध होत आहे. त्यातून रूग्णांना वेळेत उपचार मिळत आहेत. पुणे जिल्ह्यात वितरित करण्यात आलेली ६.५२ कोटींची मदत ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या कार्यप्रणालीचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.

जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

धर्मादाय रुग्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण ५८ धर्मादाय रुग्णालये असून निर्धन व दूर्बल घटकांतील रुग्णांना लाभ देण्यात येत आहे. रुग्णालये धर्मादाय स्वरुपाची असल्याने त्यांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ देण्यात येतो. रुग्णालयांनी गरिबांकरिता आरक्षित खाटा पारदर्शकपणे उपलब्ध करून देऊन योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी शासनाने विहीत केलेल्या अटी व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याकरिता समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. १८: हर घर जल-जल जीवन मोहिमेअंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याकरिता जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, यादृष्टीने सर्वांगिण बाबींने विचार करुन जिल्ह्यातील एकही वाडी, वस्ती, शाळा, अंगणवाडी पाण्यापासून वंचित राहणार नाही,याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समिती बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री. डूडी म्हणाले, हर घर जल-जल जीवन मोहिमेअंतर्गतपाणी पुरवठा योजनांचा प्रस्ताव सादर करतांना शाश्वत पाणीसाठा, प्रकल्पाकरिता लागणारी जागेची उपलब्धता व त्याकरिता पर्यायी व्यवस्था, सोलार प्रकल्प, पाणी पुरवठा योजना चालविणारी यंत्रणा आदी सर्वांगीण बाबींचा समावेश करावा. प्रलंबित कामांवर लक्ष केंद्रीत करुन ती गतीने पूर्ण करण्यावर भर द्यावा. येणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता प्रशासकीय यंत्रणेने स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. पुर्ण झालेली पाणीपुरवठा योजना संबंधित ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही करावी. या योजनांकरिता लवकरात लवकर महावितरणने वीज जोडणी करुन द्यावी. पाणी पुरवठा योजनांअंतर्गत पाण्याचा शाश्वत स्त्रोतांचा समावेश करुनच अटल भूजल योजनेअंतर्गत आराखडा सादर करावेत. यापूर्वी जिल्हा भूजल विकास यंत्रणेने स्थळ पाहणी करुन पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करावी.

श्री. पाटील म्हणाले, जलजीवन मोहिमेत जिल्ह्यात एकूण १ हजार ८३६ ग्रामपंचायतीचा समावेश आहे, यामाध्यमातून ९ हजार ३३५ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. जागेबाबत प्रलंबित कामाबाबत यंत्रणेने पाठपुरावा करावा, स्थानिक पातळीवरील विषय जागेवर मार्गी लावण्याकरिता समन्वय ठेवावा, असेही श्री. पाटील म्हणाले.

यावेळी जलजीवन मोहिमेतील कामांची सद्यस्थिती, जिल्हा परिषद आणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने कामाच्याअनुषंगाने प्रस्तावित आराखडा, कृती आराखडा, प्रगतीपथावरील कामे, कामे करतांना येणाऱ्या अडचणी, प्रकल्पाकरिता लागणरी जागा, वीज जोडणी आदी विषयांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

स्पेनचे महाराष्ट्र मंडळ, युगांडाचे बेंजामिन तुमवेसीगये  ठरले ‘ग्लोबल गणेश फेस्टिव्हल २०२४’चे विजेते

पुणे: पुण्याच्या गौरवशाली गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी गेल्या वर्षीपासून ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. या फेस्टिव्हलमध्ये झालेल्या ग्लोबल गणेश करंडक २०२४ या जागतिक स्पर्धेत स्पेनच्या बार्सिलोना येथील महाराष्ट्र मंडळ (उत्सव विभाग) व युगांडाच्या बेंजामिन तुमवेसीगये (फोटोग्राफी विभाग) हे विजेते ठरले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गणेशोत्सव झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते घेण्यात येणार आहे.

उत्सव विभागात जपान येथील योकोहामा मंडळाने द्वितीय, झाम्बिया येथील महाराष्ट्र मंडळ लुसाकाने तृतीय, तर नायजेरियाच्या महाराष्ट्र मंडळ रेसिडेन्स असोसिएशनने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. फोटोग्राफी विभागात जर्मनीतील कार्तिक संघानी यांनी द्वितीय, तर भारतातील पुणेकर असलेल्या आनंद चैनी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेसाठी ऋशिकेष कायत, ऋतुजा नराल, तेजस्विनी गांधी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले होते.

स्पर्धेच्या संयोजनात ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ, स्वागत समिती प्रमुख अमोल जोशी, आंतरराष्ट्रीय समन्वयक धनश्री पाटील, मुख्य समन्वयक अनिरुध्द येवले, डॉ. सतिश देसाई, प्रणव भुरे, चिन्मय वाघ यांनी पुढाकार घेतल्याचे प्रसिद्धीप्रमुख जीवराज चोले यांनी कळवले आहे.

विकसित भारतासाठी युवकांची भूमिका महत्वाची – ले. जनरल धिरज सेठ

पुणे, १८ ऑगस्टः” गेल्या ७८ वर्षांमध्ये देशाने तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात उत्तुंग झेप घेऊन विकसीत भारताची घोडदौड सुरू केली आहे. देशातील प्रत्येकाला प्रगतीचे द्वार खुले करून आत्मनिर्भर भारताची नींव रोवली आहे. देशाला आकार देण्यासाठी युवकांबरोबरच प्रत्येक नागरिकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.” असे मत ले. जनरल धिरज सेठ यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने कोथरुड कॅम्पस येथे ले. जनरल धीरज सेठ व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ७९ वां स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, माईर्सचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी व डब्ल्यूपीयूचे कुलसचिव गणेश पोकळे उपस्थित होते. तसेच संस्थेचे सर्व संचालक, प्राध्यापक, कर्मचारी व हजारो विद्यार्थी उपस्थित होते.
ले. जनरल धीरज सेठ म्हणाले,”राष्ट्रपिता म. गांधी यांनी अहिंसेचा नारा दिला तर सुभाषचंद्र बोस यांनी सेना उभी करून देशाला सशक्त बनविण्याचा प्रयत्न केला होता. तसेच बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे हा मंत्र देऊन क्रांतीचे बीज पेरल्याचे त्यांनी सांगितले.”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”भारतमातेसाठी समर्पित भावना जागविण्याचा हा दिवस आहे. शिस्त, चारित्र्य आणि समर्पण या गोष्टींच्या आधारे प्रत्येकाने देशसेवा करावी. तसेच प्रत्येकाने माता, पिता आणि देशसेवेचे कर्तव्य बजावावे. भारताजवळ विश्वगुरू बनण्याबरोबरच जगाला सुख, शांती आणि समाधान देण्याची शक्ती आहे.”
डॉ.प्रसाद खांडेकर यांनी राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येकांनी कार्य करण्याचे सांगितले. डॉ. आर. एम. चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले. विद्यार्थी पृथ्वीराज शिंदे यानी सर्वांनी शपथ दिली.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व अक्षिता सक्सेना यांनी आभार मानले.

माऊलींच्या सुवर्णकलशाला श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सची झळाळी-संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीकडून २२ किलो कलश निर्मितीचा मान

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगरकरांचा सन्मान

पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण झाले. भाविकांच्या वर्गणीतून तयार केलेला हा अद्वितीय २२ किलोचा सुवर्ण कलश पुण्यातील श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सने साकारला आहे. अपार श्रद्धा आणि उत्तम कामगिरीचा आशीर्वाद म्हणून आळंदी देवस्थान संस्थानाने नगरकर परिवाराला मिळाल्याची भावना आहे. कलशाचे विधिवत पूजन करून, नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर हा कलश नगरकर परिवाराने देवस्थान समितीकडे सुपूर्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, बापूसाहेब पाठारे, महेश लांडगे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, यांच्यासह संत परंपरेतील मान्यवर व देवस्थान समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात नगरकर ज्वेलर्सचे वसंत नगरकर, प्रसाद नगरकर व पुष्कर नगरकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या संमतीने नगरकर ज्वेलर्सला हे पवित्र कार्य करण्याची संधी मिळाली. ८ ऑगस्टला कलश निर्मितीची सूचना आल्यानंतर वरचा कळस आणि खाली कुंभ असे दोन भागात काम सुरु झाले. चोख २२ किलो सोन्याच्या वापर करीत सलग सहा दिवस २२ ते २५ कारागिरांनी भक्तीभाव, निष्ठा व सर्जनशील कौशल्यातून हा कलश साकारला. हा सुवर्ण कलश केवळ वास्तूशोभा नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेला दिलेला तेजोमय मुकुट आहे, अशी भावना वसंत नगरकर यांनी व्यक्त केली.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त मंदिरावर प्रतिष्ठापित झालेला सुवर्णकलश बनविण्याचा क्षण महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल. श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाचे प्रतीक आहे. नगरकर ज्वेलर्ससाठी हा क्षण म्हणजे भक्तिभाव, समर्पण आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठीचा सुवर्ण वारसा आहे. नगरकर ज्वेलर्सना लाभलेला हा ऐतिहासिक मान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला समृद्ध करणारा ठरला, असे प्रसाद नगरकर म्हणाले.

श्रावण महोत्सवानिमित्त भव्य भजन स्पर्धा; महिलांच्या सहभागामुळे समाजाला नवा आत्मविश्वास : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, दि. १८ ऑगस्ट २०२५ —
शिवसेना पुणे शहराच्या श्रावण महोत्सवानिमित्त द्वारका गार्डन, सुनिता नगर, वडगावशेरी येथे भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषद उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे संयोजन हेमंत बत्ते यांनी केले होते. मनोज अष्टेकर, गौरव कश्यप, उदय खांडके, प्रणव जोशी, दिनेश मुकुलकड, उत्तम नार्वेकर, श्रीकांत अप्पा कुलकर्णी, तुषार टाकळकर, रोहन साळवी आदींनी स्पर्धेचे आयोजन यशस्वी केले.

या प्रसंगी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “आज श्रावणी सोमवार असून महिलांच्या भजनी मंडळाचा कार्यक्रम हा खरोखरच प्रेरणादायी आहे. महिलांच्या आवाजातली भक्ती ऐकताना संत जनाबाईंची आठवण होते. घरची जबाबदारी सांभाळून जेव्हा महिला अशा पवित्र कार्यात सहभागी होतात तेव्हा त्या संपूर्ण समाजाला नवा आत्मविश्वास देतात.”

तसेच महिलांच्या विकासाबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “महायुती सरकारने स्त्रियांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सुविधा दिल्यामुळे एसटी महामंडळ पुन्हा नफ्यात आले आहे. हजारो महिला एसटीने प्रवास करू लागल्याने एसटीच्या अर्थचक्राला गती मिळाली आहे. तसेच महिलांचे बचत गट, उद्योजकता यामुळे ग्रामीण व शहरी भागात आर्थिक चक्राला बळकटी मिळत आहे. महिलांना दिलेली कर्ज ९९% परतफेडीचा विक्रम करतात हीच त्यांची विश्वासार्हता आहे. महिलांनी घेतलेले कर्ज फक्त परतफेडच नव्हे तर अनेक ठिकाणी रोजगारनिर्मिती आणि कुटुंबाच्या स्थैर्याला बळ देण्यासाठीही मोलाचे ठरले आहे.”

या कार्यक्रमाला शिवसेना पुणे शहर संघटक आनंद गोयल, दिलीप देवकर, विनोद गलांडे, अनिता परदेशी, पद्मा शेळके, चेतन गलांडे, लक्ष्मण सावंत, धनंजय शिंदे, मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पृथ्वी वाचवायची असेल तर पर्यावरण वाचविणे काळाची गरज -शोभाताई आर धारीवाल

पुणे-पृथ्वी वाचवायची असेल तर पर्यावरण वाचविणे काळाची गरज आहे ,वृक्षतोडीवर वृक्षारोपण हा पर्याय नसून वृक्षपुनर्रोपण हा जास्त प्रभावी उपाय असे प्रतिपादन येथे शोभाताई आर धारीवाल यांनी केले आहे .रवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रविवार रोजी सायंकाळी 4 वाजता पद्मश्री आचार्य चंदनाजी , मुकेश मुनिजी , जयप्रभ विजयजी ,आगमचंद्रजी स्वामी यांच्या उपस्थितीत ” उवसग्गहरं स्तोत्र ‘सामूहिक जपाचे आयोजन श्रीमान रसिकलालजी एम धारीवाल स्थानक बिबवेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आलेले होते .यावेळी त्या बोलत होत्या .या कार्यक्रमासाठी पुनीत बालन ,पोपटशेठ ओसवाल, वालचंदजी संचेती , विजयकांतजी कोठारी ,अचल जैन, विविध जैन संस्थांचे पदाधिकारी,नामवंत उद्योजक, तसेच शोभाताई आर धारीवाल वसतिगृह एफसी रोड, शोभाबेन आर धारिवाल छात्रालय डेक्कन व शोभाताई आर धारीवाल वसतिगृह चिंचवड येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी , विविध गणेश मंडळे , आळंदी येथील वारकरी संप्रदायाचे भाविक तसेच जैन- अजैन बंधू भगिनी यावेळी उपस्थित होते.

शोभाताई धारिवाल म्हणाल्या,’ जैन धर्मामध्ये संस्कार आणि मूल्य यांची परंपरा हजारो वर्षांपासून चालू आहे , धर्मात अनेक मंत्र सांगितलेली आहे त्यापैकी उवसग्गहरं मंत्र संकटावर मात करणारा असून याच मंत्राने श्रीमान रसिकशेठ धारीवाल साहेब रुग्णालयात व्हेंटिलेटर असतांना वैद्यकीय सेवेसोबतच रोजच्या जापणे सकारात्मक ऊर्जा तयार होऊन प्राण वाचू शकले अशी माझी धारणा आहे ,म्ह्णूनच मी रसिकलाल एम धारीवाल फाऊंडेशन द्वारा दरवर्षी सामूहिक स्तोत्र पठण जाप आयोजीत करते जेणेकरून समाजामध्ये सकारात्मक भावना निर्माण होईल आणि अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे ही सामाजिक गरज आहे , यात फक्त जैन समाज सामील होत नसून इतर समाजही मोठ्या प्रमाणात स्तोत्र पठणाचा लाभ घेतो, यावर्षीचे आयोजनाचे हे नववे वर्ष आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वतःहून या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वांचे स्वागत करते असे प्रतिपादन शोभाताई आर धारिवाल यांनी वावेळी व्यक्त केले ,आर एम डी फाऊंडेशन द्वारा आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात भारत भर कार्य केले जाते ,गरजू व हुशार विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्वारे उच्चशिक्षणासाठी मदत केली जाते, अत्यवस्थ शाकाहारी रुगांना आर्थिक मदत केली जाते , आज बांधकाम किंवा रस्ते विस्तारण्यासाठी मोठ्या मोठ्या झाडांना तोडल्या जाते , वृक्षतोडीवर वृक्षारोपण हा पर्याय नसून वृक्षपुनर्रोपण हा जास्त प्रभावी उपाय आहे अशा वेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांच्या द्वारे ५० ते १०० वर्षे वयाची मोठी वृक्ष वाचविण्याची मोठी मोहीम हाती घेतलेली असून आतापर्यंत २१०० पेक्षा जास्त वृक्षांना वाचविण्यात यश आले आहे, पृथ्वीला वाचविण्यासाठी पर्यावरण वाचविणे गरजेचे आहे आवाहनही यावेळी शोभाताई यांनी उपस्थितांना केले . त्याच वेळी त्यांनी यावर्षी डीजे मुक्त दहीहंडी उत्सव साजरा करणारे बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांची स्तुतीही केली आणि एकप्रकारे पृथ्वीला आणि पर्यावरणाला वाचविण्याची धुराच जान्हवी धारिवाल बालन आणि पुनीत बालन यांनी खांद्यावर घेतली आहे यासाठी त्यांनी दोघांचेही अभिनंदन केले .

लहानवयातच जान्हवी यांनी बिहारमधील विरायतन संस्थेच्या कार्यात खूप मोठं सहकार्य केले आहे आज विरायतन संस्थेच्या द्वारे सुरु असलेली रुग्णसेवा,शिक्षण कार्य यामध्येही त्यांचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे मी त्यांना खूप आशीर्वाद देते असे मत आचार्य पद्मश्री चंदनाजी यांनी व्यक्त केले . पू . श्री जयप्रभ विजयजी यांनी उवसग्गहरं स्तोत्र चे महत्व श्रावकांना समजावून सांगितले, तर पू .श्री आगमचंद्रजी स्वामी यांनी अशा प्रकारचे उपक्रम स्तुत्य असून त्याचा लाभ सर्वांना व्हावा , मुकेश मुनिजी यांनी अशा प्रकारचे सामूहिक स्तोत्र जपाचे लोकांसाठी लाभदायक आहेत असे असे आशीर्वाद दिले .
स्तोत्र पठणानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता .