Home Blog Page 164

रोमांचकारी फुटबॉल स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल चॅम्पियन

सुब्रतो मुखर्जी चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत बाजी मारली

पुणे, २० ऑगस्टः जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेची फाइनल मॅच नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूल आणि इनोवेरा स्कूल यांच्यामधील अटीतटीच्या सामन्याने झाली. पहिल्या हाफ मध्ये सुरूवातीच्या काही मिनीटात दोन्ही टीम कडून गोल करण्याचा प्रयत्न केला गेला परंतू हा केवळ प्रयत्नच राहिला. दोन्ही टीमकडून झालेल्या उत्कृष्ट खेळीमुळे मॅच ०-० ने संपली. परंतू पेनाल्टी शूट आउट मध्ये ६-७ से बाजी मारून ध्रुव ग्लोबल स्कूल ने सुब्रतो मुखर्जी चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा २०२५-२६ जिंकून झोनलसाठी पात्र झाली आहे. फुलगांव येथील मैदानात नुकतीच संपन्न झालेल्या फानइल मॅचचा आनंद शंभर दर्शकांनी घेतला.
या विजयानंतर ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्य संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात.
सुब्रतो मुखर्जी चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या फाइनल मॅचमध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलचा खेळाडू तरंग गुप्ता ने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या टूर्नामेंट मध्ये खेळाडूंना विशेष पुरस्कार ही देण्यात आले. १५ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल संघाचे ध्रुव ग्लोबल स्कूलकडून कर्णधार वीरेश नाईक यांने नेतृत्व केले. या टीम मध्ये अनीश परातणे, कृष्णा बालवड, रुशील कौल, युवांश सिंग, हदय लोढा, अर्णव उपाध्याय, सिद्धार्थ दुबे, अर्णव कोरे, तरंग गुप्ता, अन्वेश खांडे, पार्थ लांडे, रणवीर जिंदाल, सुब्रमणि मायाप्पनवर, अर्णव महामुने या खेळाडूंचा समावेश होता.
या खेळाडूंना स्कूलचे प्रशिक्षक अमेय कलाटे व पार्थ सैकिया यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून खेळाडूंकडून कठोर परिश्रम करून घेतले.

आधार प्रमाणीकरणातील अडचणींवर उपाययोजना कराव्यात

डॉ. मेधा कुलकर्णीं यांची संसदेत लक्षवेधी; ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शेतकरी व मजुरांना प्रमाणीकरणात अडचणी

नवी दिल्ली : नागरिकांना आधार प्रमाणीकरणात येणाऱ्या अडचणींबाबत राज्यसभेत बुधवारी खासदार डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी सरकारचे लक्ष वेधले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शेतकरी व ग्रामीण भागातील मजुरांना या समस्यांचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘आधार हा अडथळा नसून सर्वसमावेशक कल्याणाचा मार्गदर्शक साधन ठरला पाहिजे,’ असे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

लोकसभेत विशेष उल्लेख (लक्षवेधी) करताना डॉ. कुलकर्णी म्हणाल्या की, अनेक नागरिकांचे बोटांचे ठसे झिजल्यामुळे, डोळ्यांच्या पडद्यावरील (रेटिनल) समस्या, शारीरिक अडथळे किंवा दीर्घकालीन आजारांमुळे बायोमेट्रिक पडताळणी होत नाही. त्यामुळे त्यांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य, जेष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या पेन्शन, आरोग्य सुविधा, अगदी बँकिंग सेवांपासूनही वंचित रहावे लागत आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (युआयडीएआय) ‘एक्सेप्शनल एनरोलमेंट’ आणि चेहरा ओळख (फेशियल रिकग्निशन) तसेच ओटीपी-आधारित प्रमाणीकरण यांसारख्या पर्यायी उपाययोजना उपलब्ध असल्या, तरी त्या प्रत्यक्ष पातळीवर प्रभावीपणे अंमलात आणल्या जात नाहीत, असे त्यांनी नमूद केले. “फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना या पर्यायांविषयी माहिती नसते किंवा ते मदत करण्यास अनुत्सुक असतात,” असेही त्या म्हणाल्या.

या उपाययोजना करा: डॉ. कुलकर्णी
– पर्यायी आधार प्रमाणीकरण पद्धतींची मिशन मोडमध्ये अंमलबजावणी
– बायोमेट्रिक विसंगतीमुळे कोणताही नागरिक कल्याणकारी योजनांपासून वंचित राहू नये याची हमी
– जनजागृती मोहीम व तक्रार निवारण यंत्रणा उभारणे
– प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमून तातडीने सोडवणूक सुनिश्चित करणे

‘आयुष्मान भारत गोल्ड कार्ड’ तयार करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

७० वर्ष वरील सदस्यांना अतिरिक्त प्रतीवर्ष पाच लाखापर्यंत मोफत उपचार ‘

पुणे, दि. 20: जिल्ह्यातील नागरिकांना ‘एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (एबी-पीएमजेएवाय) आणि ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने’चा (एमजेपीजेएवाय) लाभ मिळावा यासाठी
‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ तयार करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्यानुसार कार्ड तयार करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने’मुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल आणि जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील. अंगीकृत रुग्णालयांमध्ये या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील. यामध्ये १ हजार ३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि विशेष उपचारांचा समावेश आहे. तसेच कुटुंबातील वयोवृद्ध ७० वर्ष वरील सदस्यांना अतिरिक्त प्रतीवर्ष पाच लाखापर्यंत मोफत उपचार ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड’च्या माध्यमातून देणे शक्य होईल.

या योजनेअंतर्गत लाभार्थीला प्रति वर्ष पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळविण्याकरिता आयुष्मान भारत गोल्डन कार्ड (एबी-पीएमजेएवाय कार्ड) कुटंबातील सर्व सदस्यांकडे असणे बंधनकारक आहे.

शासनाने हे कार्ड बनविणे अंत्यत सोपे केलेले आहे. लाभार्थ्याला आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोरमधून ‘आयुष्मान ॲप’ डाउनलोड करून त्यावर किंवा https://beneficiary.nha.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्यावर आयुष्मान भारत गोल्ड कार्ड तयार करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करता येईल.

लाभार्थी स्वतः ‘आयुष्मान ॲप’वरून किंवा संकेतस्थळाला भेट देऊन कार्ड तयार करून घेऊ शकतात. तसेच आशा स्वयंसेविका, आपले सरकार सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकानदार (राशन दुकानदार) यांच्या माध्यमातूनही सदर कार्ड तयार करण्याची प्रक्रिया करता येईल. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या विशेष मोहिमेंतर्गत आपले व इतर इतर नागरिकांचे कार्ड काढण्याकरिता सहकार्य करावे व मोहिमेत आपला सहभाग नोंदवावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
0000

देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान देणाऱ्यांप्रती निष्ठा राखणे.. खरे भारतीयत्व….!‘देशाच्या एकात्मते’प्रती निष्ठा.. हीच् राजीवजींना आदरांजली..!

  • डॉ श्रीपाल सबनीस

पुणे : महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी या देशाच्या महान नेत्यांनी देशाची एकता, अखंडता व एकात्मतेसाठी बलिदान दिले, अशा बलिदान देणाऱ्या नेत्यांच्या प्रति निष्ठा बाळगणे हे खरे भारतीयत्व आहे असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले आहे.
स्वर्गीय राजीव गांधी यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त आज कात्रज येथील, राजीव गांधी यांच्या पुतळ्यास डॉ. सबनीस व मान्यवरांचे हस्ते पुष्पहार करून अभिवादन करण्याचा कार्यक्रम आज झाला, त्यावेळी डॉ.  सबनीस बोलत होते. यावेळी त्यांनी राजीव गांधी यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. ते म्हणाले की धर्मनिरपेक्षता भारत देशाचा आत्मा असून त्याच तत्त्वाच्या आधारे आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. राजीव गांधी यांनी त्यासाठी दिलेले योगदान संस्मरणीय आहे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास दादा पवार होते. ते म्हणाले की आधुनिक भारताच्या जडणघडणीत राजीव गांधींचे मोठे योगदान असून त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन करणे व दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. ते पुढे म्हणाले की निष्ठावान काँग्रेसजन गोपाळ तिवारी यांनी पुण्यात दिवंगत पंतप्रधान स्व लाल बहादूर शास्त्री आणि स्व राजीव गांधी यांचे पुतळे उभे करून त्यांची स्मारके निर्माण केली ती सर्वांना प्रेरणा देणारी आहेत.
राजीव गांधी स्मारक समितीचे प्रमुख आणि प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. ‘डीजीटल इंडीया’चा पाया भरणी राजीव गांधी यांनी त्याचवेळी केल्याने कोरोना सारख्या संसर्गजन्य काळात ही भारत थांबला नाही व ‘वर्क फ्रॅाम होम’ माध्यमातून विकास चक्र चालू राहिले.
उपस्थित मान्यवरांना शाल, तुळशीचे रोप व राष्ट्र ऊभारणीत महाराष्ट्राचे योगदान (धनंजय बिजले लिखित) पुस्तक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते श्रीकांत शिरोळे, राजीव जगताप, बाळासाहेब मारणे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले, सुभाष थोरवे, उद्यान अधीक्षक डॅा जाधव, नंदकुमार पापळ, भोला वांजळे, राजेंद्र खराडे, आबा जगताप, संजय अभंग, ॲड फैयाज शेख, रमेश सोनकांबळे, धनंजय भिलारे, नरसिंह अंदोली, गणेश मोरे, बाळासाहेब बाणखेले, सुभाष जेधे, महेश अंबिके, ॲड संतोष जाधव, ॲड स्वप्नील जगताप, शंकर शिर्के, अशोक काळे, राजेश सुतार, विकास दवे, सौ मनीषा फाटे, मारुती पानसरे, इत्यादी उपस्थित होते. ॲड.  फैयाज शेख यांनी आभार प्रदर्शन केले.

यंदाच्या गणेशोत्सवात ७ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकास परवानगी

सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

पुणे, दि.२०: राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा राज्यशासनाने निर्णय घेतला असून सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. यावर्षीच्या गणेशोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग, ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंचा वापर, युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीतील १२ गडकिल्ले, पर्यावरण आदी विषयावर जनजागृती करण्याकरिता गणेश मंडळांना प्रोत्साहन द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ॲड. शेलार म्हणाले, यंदाच्या गणेशोत्सवात ७ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाच्या वापराबाबत परवानगी जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देण्यात आली असून याबाबत प्रशासनाने गणेश मंडळ, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यावा. प्रसिद्ध गणेश मंडळे, गणेश मंदीराचे भक्तांकरिता थेट प्रक्षेपणाद्वारे घरातूनच दर्शनाची सोय उपलब्ध करुन द्यावी, केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाचा बँड शो आणि पोलीस दलांचा बँड शो तसेच डॉग शोचे आयोजन करावे. शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजनांचे विद्यार्थी, सामाजिक संस्थांना सहभागी करुन उपक्रमाचे आयोजन करावे. महावितरणने गणेश मंडळांना वीज उपलब्ध करुन द्यावी. आरती करणाऱ्या भजनी मंडळाना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार असून याबाबतच्या संकेतस्थळाचे उद्या लोकार्पण करण्यात येणार आहे, याचा मंडळांना लाभ देण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी,

गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले असून शासकीय आस्थापनाच्या इमारती, वारसास्थळांवर या बोधचिन्हाची रोषणाई करण्यासोबत महत्त्वाच्या चौकाचे सुशोभीकरण करुन रोषणाई करावी. विसर्जनाबाबत निर्गमित मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी. विसर्जन मार्गावर ड्रोन शोचे आयेाजन, जाहिरात फलकांवर सामाजिक संदेश देण्याची कार्यवाही करावी. विदेशी विद्यार्थी, नागरिक, विदेश दुतावासातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करावे. भारतीय हवामान विभागाकडून पावसाबाबत देण्यात येणाऱ्या अंदाजानुसार प्रशासनाने तयारी करावी.

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना सन्मान झाला पाहिजे, अधिकाधिक व्यक्ती, संस्था आणि विविध समाजघटकांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणावे. विविध सांस्कृतिक विषयांचे जतन व संवर्धन करण्याबाबत तालुका आणि जिल्हास्तरावर विविध स्पर्धां आयोजित कराव्यात. मराठी संस्कृती, कलाकार, पंरपरांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात यावा. विविध विषयांबाबत व्याख्यानमाला, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करावे. समाजमाध्यमाद्वारे व्यापक स्वरुपात प्रसार आणि प्रचार करावा.

गणेश मंडळांनी ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी

यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करुन त्यांच्या कर्तृत्वावर आधारित माहिती फलक लावावेत. मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन ॲड शेलार यांनी यांनी केले.

यावेळी आमदार श्री. शिरोळे आणि श्री. रासने यांनी गणेशोत्सव आयोजनाबाबत सूचना केल्या.

यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या तयारी, सोई-सुविधांबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील आयोजित धान्य महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे-

समुत्कर्ष ग्राहकपेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित धान्य महोत्सवास कोथरुडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ऐन गणेशोत्सवापूर्वी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने हजारो कोथरुडकरांनी सणासुदीच्या काळात लागणाऱ्या धान्यांच्या खरेदीचा मनमुराद आनंद लुटला.

कोथरुड मधील नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध मिळावे यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून १५ ॲागस्ट २०२४ रोजी समत्कर्ष ग्राहक पेठ सुरु करण्यात आली. या ग्राहक पेठेमुळे नागरिकांना दर्जेदार धान्य सवलतीच्या दरात एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासोबतच महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली. गेल्या वर्षभरापासून जवळपास ११ हजार पेक्षा जास्त कोथरुडकर या सुविधेचा लाभ घेत आहेत.

यंदाच्या १६ ॲागस्ट रोजी या ग्राहक पेठेस एक वर्ष पूर्ण होत असल्याने, ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून १९ आणि २० ॲागस्ट रोजी कर्वे रोड येथील हर्षल हॅाल येथे दोन दिवसीय धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सणासुदीच्या काळात लागणारा गहू, तांदूळ, ज्वारी कडधान्य, डाळी सर्वसामान्य ग्राहकांसाठी १५ टक्के आणि समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या सभासदांना ३० टक्के सवलतीच्या दरात खरेदीची सुवर्णसंधी या महोत्सवातून उपलब्ध करुन देण्यात आली.

या महोत्सवास कोथरुडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत, धान्य खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. जवळपास २० हजार नागरिकांनी धान्य खरेदी केली. आगामी काळात ही कोथरुडकरांसाठी अशा पद्धतीचा धान्य महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी ना. पाटील यांनी यानिमित्ताने केली.

खडकवासल्यातून सकाळी 10 वा. 39138 क्यूसेकचा विसर्ग ..पण १२ नंतर पावसाची उघडीप

पुणे-खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 35310 क्युसेक वाढवून सकाळी 10.00 वा. 39138 क्यूसेक करण्यात आला आहे.दरम्यान पावसाचे प्रमाण आता कमी होऊ लागल्याने दुपारी १२.०० वा. पानशेत धरणामधून नदी पात्रामध्ये सुरू असणारा १२३०८ क्युसेक विसर्ग कमी करून सांडव्याद्वारे ९५१२ क्युसेक व विद्युत निर्मिती केंद्र द्वारे ६०० क्युसेक का एकूण १०११२ क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.तसेच दुपारी 12.00 वा. वरसगाव धरणामधून नदी पात्रामध्ये सुरू असणारा. 12416.95 क्युसेक विसर्ग कमी करून सांडव्याद्वारे 9505.40 क्युसेक व विद्युत निर्मिती केंद्र द्वारे 600 क्युसेक एकूण 10104.5क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. या दृष्टीने अशी परिस्थिती राहिल्यास धरणातून नदीत होणारा पाण्याच्या विसर्गात देखील कमतरता केली जाण्याची शक्यता आहे, मात्र पाउस वाढला तरच विसर्ग वाढेल हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.

20 Aug Rains & Seasonal RF so far, 1500+mm

महाबळेश्वर 301.0 / 4869.4 mm रत्नागिरी 105.2 / 2330.2 mm. कुलाबा 107.2 / 1513.0 mm डहाणू 151.0 / 1622.0 mm सांताक्रूझ 209.0 / 2310.7 mm ठाणे 195.6 / 2337.0 mm माथेरान 438.4 / 4247.6 mm

सिंहगड रस्त्यावरील ‘त्या’ सोसायट्यांमध्ये शिरले पाणी , रात्रभर अधिकाऱ्यांची धावपळ आणि नागरिकांचा संताप

पुणे- सिंहगड रस्त्यावरील एकता नगर परिसरातील सोसायटीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला धारणातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग केला जात आहे.घाटमाथ्यावरील पाऊस थांबत नसल्याने आणखीन विसर्ग वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकतानगर भागातील एका सोसायटीच्या पार्किंग आणि रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. खडकवासला धरणातून 35000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.तो १० वाजता ४० हजार क्युसेक्स करण्यात आला .

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील एकता नगर या परिसरात रात्रीपासून महानगरपालिकेचे आयुक्यातंसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित आहेत. इथं अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हटवण्यासाठी महानगरपालिकेने या सगळ्या लोकांची राहण्याची व्यवस्था एका शाळेत केली आहे. मात्र तरी देखील इथले लोक घरातून बाहेर यायला तयार नाहीत.. वारंवार महानगरपालिकेचे अधिकारी त्यांना आवाहन करत आहेत. मात्र काही लोक त्यांचं घराच्या बाहेर यायला तयार नाहीत.

पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या एकता नगर परिसरात पुन्हा एकदा लोकांच्या घरात इमारतींच्या पार्किंग मध्ये पाणी शिरलं आहे. अनेक लोकं सध्या घरात अडकून पडले आहेत. गेल्या वर्षी सुद्धा फक्त प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आली अनेक मंत्री येऊन गेले मात्र परिस्थिती आहे तशीच आहे. गेल्या वर्षी या एकता नगर परिसरात अनेक लोकांचा नुकसान झालं होतं त्याचं मोबदला देखील लोकांना मिळालेला नाही. या सगळ्या परिस्थितीला सरकार आणि प्रशासन जबाबदार आहे.

पावसामुळे पुण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे आज रद्द

पुणे-पावसामुळे आज सिंहगड एक्सप्रेस सह डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आली आहे. पुण्यातून या तीन रेल्वे दररोज मुंबईसाठी धावतात. दुपारच्या सत्रातील डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस सुद्धा आज रद्द केली आहे. सोलापूर ते पुणे मार्गे मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आज धावणार नाही. काल मुंबईहून पुण्याच्या दिशेने धावणाऱ्या सुद्धा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मुंबईतील मुसळधार पावसामुळे या रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुण्याहून मुंबईसाठी आज कुठल्या ट्रेन रद्द, ते पहा

११०१०: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस

११००७: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्सप्रेस

१२१२८: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस

२२१०६: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंद्रायणी सुपरफास्ट एक्सप्रेस

१२१२६: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस

१२१२४: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्विन

२२२२६: वंदे भारत एक्सप्रेस

२०/०८/२०२५ रोजी ११.५० वाजता कोल्हापूरहून सुटणारी ट्रेन क्रमांक १७४१६ KOP-TPTY हरिप्रिया एक्सप्रेस ही पेअरिंग रेक उशिरा धावल्यामुळे २०/०८/२०२५ रोजी कोल्हापूरहून १६.४० वाजता सुटण्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

मुंबई आणि पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाचा फटका बसत असून याचा थेट परिणाम रेल्वे सेवांवर झाला आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना गाड्यांची माहिती घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. सकाळी पुणेहून मुंबईकडे धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्सप्रेस या तिन्ही महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. दुपारच्या सत्रात धावणारी डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस सुद्धा आज धावणार नाहीत. याशिवाय सोलापूर-पुणे मार्गे मुंबईकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेसही बंद करण्यात आली आहे.

मंगळवारी मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्या होत्या. सततच्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवांसह लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल करावा लागत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून अनेकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. रेल्वे प्रशासनाकडून हवामान लक्षात घेऊन पुढील काही दिवस गाड्यांबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येणार आहे. प्रवाशांनी नियोजित प्रवासापूर्वी रेल्वेची अद्ययावत माहिती तपासावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोयना धरणातून 95,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग:नदीपात्रात पूरस्थिती, एनडीआरएफकडून रेस्क्यू

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणे भरली असून, पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 13 फुटांपर्यंत उघडून 95,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

दरम्यान कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाल्याने कोयना नदीला पूर आला आहे. यामुळे पाटण तालुक्यातील संगमनगर धक्क्याजवळ पुरात अडकलेल्या 11 माकडांना वाचवण्यासाठी कराडमधील एनडीआरएफच्या (NDRF) टीमने यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन केले. दुपारपासून सुरू असलेले हे थरारक बचावकार्य रात्री उशिरा पूर्ण झाले. स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या मदतीने एनडीआरएफच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर माकडांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. या बचाव कार्यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
कोयना धरण: प्रकल्पाची एकूण क्षमता 105.25 टीएमसी असून, सध्या 101.47 टीएमसी पाणीसाठा आहे (93.66% भरले).

धोम धरण: एकूण क्षमता 13.18 टीएमसी असून, 13.50 टीएमसी पाणीसाठा आहे (97.85% भरले). धरणातून 17,274 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धोम-बलकवडी धरण: एकूण क्षमता 4.08 टीएमसी असून, 3.82 टीएमसी पाणीसाठा आहे (97.79% भरले). धरणातून 7,329 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कण्हेर धरण: एकूण क्षमता 10.10 टीएमसी असून, 9.57 टीएमसी पाणीसाठा आहे (96.93% भरले). धरणातून 14,823 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

उरमोडी धरण: एकूण क्षमता 9.96 टीएमसी असून, 9.72 टीएमसी पाणीसाठा आहे (98.29% भरले). धरणातून 8,936 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

तारळी धरण: एकूण क्षमता 5.85 टीएमसी असून, 5.45 टीएमसी पाणीसाठा आहे (94.28% भरले). धरणातून 4,435 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

वीर धरण: एकूण क्षमता 9.83 टीएमसी असून, 9.50 टीएमसी पाणीसाठा आहे (96.50% भरले). धरणातून 55,887 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

तळ कोकण व गोव्याला जाण्यासाठी केवळ आंबोली मार्गे वाहतूक सुरू

दरम्यान, तळकोकण व गोवा या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या तीन मार्गांपैकी सध्या केवळ आंबोली घाटमार्गे वाहतूक सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली आहे. सिंधुदुर्गात जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे भुईबावडा तसेच करूळ घाट आहे. तथापि, गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या ठिकाणी दरड कोसळल्या आहेत. दुसरा मार्ग म्हणजे राधानगरी तालुक्यातील फोंडा घाट. या मार्गावर देवगड निपाणी रोडवरील फेजिवडे येथील कब्रस्तान जवळ पुराचे पाणी आल्याने तो सुद्धा मार्ग ,पर्यायाने घाट बंद असल्याचे त्यांनी सांगितले.

राधानगरी धरण

पाणी पातळी :590.86M
पाणीसाठा – 8.28TMC
2 स्वयंचलित द्वारातून – 2856 विसर्ग
मोहिते पावर हाऊसमधून 1500
एकुण विसर्ग – 4356 क्युसेक
राजाराम बंधारा पाणी पातळी : 39.05″ (542.20m)
विसर्ग 56057 क्युसेक (नदी इशारा पातळी 39′ फूट व धोका पातळी 43′ फूट)
धरणांची विसर्ग माहिती

राधानगरी – 4356 क्युसेक
दूधगंगा – 25000 क्युसेक
वारणा – 39663 क्युसेक
कोयना – 95300 क्युसेक
अलमट्टी – 200000 क्युसेक
हिप्परगी – 82800 क्युसेक

कोयना धरणाचे वक्र दरवाजे 13 फुटापर्यंत उघडले

दरम्यान, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी काल कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 12 फुटांवरून 13 फुटापर्यंत उघडून 93200 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 95,300 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

पूर परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा

दरम्यान, जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तथापि पूर परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. आबिटकर म्हणाले की, मागील दोन दिवस जिल्ह्यात धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होवू शकते. तथापि नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.

अलमट्टी व हिप्परगीच्या यंत्रणांशी समन्वय ठेवा

त्यांनी सांगितले की, राधानगरी व काळम्मावाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पूर परिस्थितीच्या अनुषंगाने सतर्क रहा. मुख्यालय सोडू नका. गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करा. नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही जीवित हानी होणार नाही, याची दक्षता घ्या. अलमट्टी धरणातून जास्तीत जास्त विसर्ग होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कर्नाटक सरकारच्या संपर्कात असून जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही अलमट्टी धरण व हिप्परगी बंधाऱ्याच्या विसर्गाबाबत धरणाच्या यंत्रणांशी समन्वय ठेवावा, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये बंद:मोनोरेलमधून 800 प्रवाशांची सुटका; महाराष्ट्रात 5 दिवसांत 21 मृत्यू

मुंबई-बुधवारी मुंबईत मुसळधार पावसाचा तिसरा दिवस आहे. २४ तासांत येथे ३०० मिमी पाऊस पडला. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी आणि निमसरकारी कार्यालये बंद राहिली. मुंबईतील ३४ गाड्या (१७ जोड्या) लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. २५० हून अधिक उड्डाणांवरही परिणाम झाला आहे.

मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील २ मोनोरेलमधून सुमारे ८०० लोकांना वाचवण्यात आले. म्हैसूर कॉलनी रेल्वे स्थानकाजवळ सायंकाळी ६ वाजता एक मोनोरेल उंच ट्रॅकवर अडकली. त्यातील ५८२ प्रवाशांना क्रेनच्या मदतीने खिडकी तोडून सुमारे ४०-५० फूट उंचीवरून वाचवण्यात आले.

एमएमआरडीएने सांगितले की, वाढत्या गर्दीमुळे हे घडले. रेल्वेची मूळ वजन क्षमता १०४ आहे, जी काल वाढून १०९ टन झाली. ५ टन अतिरिक्त वजन (प्रवाशांचे) होते. त्याच वेळी, आचार्य अत्रे आणि वडाळा मोनो रेल स्टेशनवरून २०० लोकांना बाहेर काढण्यात आले.

ट्रेनमधील एका प्रवासी सागर म्हणाला- वीज आणि एसी बंद असल्याने डब्यांमध्ये गुदमरल्यासारखे होत होते. बाहेर पाऊस पडत होता आणि अंधार वाढत होता. सर्वात भयानक क्षण म्हणजे जेव्हा ट्रेन धोकादायकपणे झुकली, तेव्हा आम्ही जिवंत बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करत होतो.
मुंबईतील पर्जन्यमानाची माहिती
१९ ऑगस्टच्या सकाळी ८.३० वाजल्यापासून ते २० ऑगस्टच्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबईतील पर्जन्यमानाची (मिमी मध्ये) माहिती:-

​विक्रोळी: २२९.५ मिमी
​सांताक्रूझ: २०९.० मिमी
​भायखळा: १९३.५ मिमी
​जुहू: १५०.० मिमी
​वांद्रे: १३७.५ मिमी
​कुलाबा: १०७.४ मिमी
पावसात अडकलेल्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था
भर पावसात नागरिक जर मुंबईमध्ये कुलाबा ते वांद्रे कुठेही अडकले असतील तर त्यांना तात्पुरता राहण्याकरिता जवळच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात सोय केली आहे.
संपर्क:-

  • संतोष नाईक:- +919167924748
  • संदेश शिरधनकर:- +919920022186
  • निकेतन तोडणकर:- +918779430142
  • रिना ठाकूर:- +919004822983

महापालिकेत परमनंट नौकरी नाहीच -नवल किशोर राम

पुणे- कोणा भलत्या सलत्याच्या नादाला लागू नका आता महापालिकेत कायम स्वरूपी नौकरी नाहीच ,विशिष्ट कालावधी साठी कंत्राटी भरती होते तीही कशी होते ते जाणून घ्या आणि फसवेगिरी करणाऱ्या एजंटांपासून दूर राहा असा सल्ला खुद्द महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.

त्यांनी या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी वेळोवेळी स्थानिक दैनिक वर्तमानपत्रात सविस्तर जाहिरात देऊन तसेच महानगरपालिकेच्या https://www.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन पात्र उमेदवारांकडून https://www.pmc.gov.in/l/recruitment यावर ऑनलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात येऊन पारदर्शकरित्या पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते.
याद्वारे सर्व नागरिकांना / उमेदवारांना आम्ही सूचित करत आहोत कि, कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिका कर्मचारी भरतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये. कायम नोकरी मिळेल असे सांगणारे दावे पूर्णपणे खोटे आहेत. तसेच कंत्राटी कर्मचारी देखील विशिष्ट कालावधीसाठी नियुक्त केले जातात. त्यांना कायम करण्याचा कोणताही अधिकृत प्रस्ताव अथवा योजना अस्तित्वात नाही. कोणी व्यक्ती नोकरी संदर्भात खोटे दावे करत असल्यास, पैसे मागणी अथवा खोटी माहिती देत असल्यास अशा प्रकरणाची माहिती तात्काळ संबधित विभागाला द्यावी. तरी, कोणत्याही मध्यस्थ / दलाल / परिचित / अपरिचित व्यक्तीशी पदभरतीबाबत आर्थिक व्यवहार अथवा इतर तत्सम स्वरुपाची देवाण-घेवाण करू नये. अशा व्यक्तींकडून नागरिकांची/उमेदवारांची दिशाभूल व फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्या स्वरुपाची फसवणूक झाल्यास त्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी/उमेदवारांनी नोंद घ्यावी.
पुणे महानगरपालिकेत कर्मचारी भरती करावयाची झाल्यास त्याबाबतची संपूर्ण माहिती व सविस्तर जाहिरात अधिकृत दैनिक वर्तमानपत्रांत व पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार नागरिकांनी/उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती उपलब्ध करून घ्यावी.असेही महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी म्हटले आहे.

मिळकतकर कमी करून देतो/थकबाकी कमी करून देतो सांगणाऱ्या एजंटांपासून सावधान -अविनाश सकपाळ

पुणे- महापालिकेचा मिळकत कर अगर मिळकत कराची थकबाकी कमी करून देतो असे सांगून नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या भामट्यांचा महापालिकेत सुळसुळाट झाला असून अशा तथाकथित एजान्तांपासून नागरिकांनी सावध राहावे आणि थेट महापालीकेशीच संपर्क करून आपल्या कामाबाबत योग्य ते मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी महापालिका सर्वांना सहकार्य करणार आहे अशी ग्वाही कर आकारणी व कर कर संकलन प्रमुख व महापलिका उप आयुक्त अविनाश सकपाळ यांनी येथे दिली आहे .

या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’पुणे महानगरपालिका हद्दीतील मिळकतधारकांना आवाहन करण्यात येते की, काही मध्यस्थ/दलाल/परिचित/अपरिचित/व्यक्तीं मिळकतकर कमी करून देतो/थकबाकी कमी करून देतो असे सांगून नागरिकांकडून रोख स्वरुपात पैसे घेत असल्याचे निदर्शनास येत आहे अशी कोणी व्यक्ती कर कमी करून देणे संदर्भात खोटे दावे करत असल्यास, पैशांची मागणी करत असल्यास अशा व्यक्तीसोबत कोणताही आर्थिक व्यवहार अथवा इतर तत्सम स्वरुपाची देवाण-घेवाण करू नये. अशा व्यक्तींकडून नागरिकांची दिशाभूल व फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्या स्वरुपाची फसवणूक झाल्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. नागरिकांनी आपला मिळकत कर पुणे मनपाची अधिकृत वेबसाईट propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर, मनपाचे नागरी सुविधा केंद्र (CFC), बँक ऑफ महाराष्ट्र, आय.सी.आय.सी.आय. बँक, कॉसमॉस बँक, जनता सहकारी बँक, पुणे येथेच रोख/धनादेश/डी.डी. ने भरावा व त्याची अधिकृत पावती घ्यावी.


गोयलगंगा चौक ते इनामदार चौक हा १५४० मी. लांबीचा उड्डाणपूल अद्याप का सुरु नाही ? महापालिकेने दिले स्पष्ट उत्तर

पुणे-

सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फन टाईम सिनेमा दरम्यान सुरु असलेल्या उड्डाणपूलाच्या कामातील राजाराम पूल चौकातील ५२० मी. लांबीचा उड्डाणपूल व विठ्ठलवाडी कमान ते फन टाईम सिनेमा हा २१२० मी. लांबीचा उड्डाणपूल वाहतुकीस यापूर्वीच खुला करण्यात आलेला आहे.
सध्यस्थितीत तिसऱ्या टप्प्यातील गोयलगंगा चौक ते इनामदार चौक हा १५४० मी. लांबीचा उड्डाणपूल पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सदर पुलाचे बहुतांश कामे पूर्ण करण्यात आली आहेत. परंतु थर्माप्लास्टिक पेंट, साईनेजेस, हजार्ड मार्किंग बोर्ड, जंक्शन इम्प्रुव्हमेंट ही सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाची कामे सुरु आहेत. उड्डाणपूल सुरु करण्यापूर्वी इनामदार चौक, राजाराम चौक, मातोश्री चौक या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने व अपघात टाळण्यासाठी वाहतुक विभागाचे सुचनेनुसार काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. उड्डाणपुलावर पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्यासाठी विद्युत पोल कार्यान्वित करण्याचे काम सुद्धा सुरु आहेत. सदरची कामे सध्यस्थितीत सुरु असलेल्या पावसामुळे पूर्ण करणेस काही अडचणी येत असल्या तरी प्रलंबित सर्व कामे तातडीने पूर्ण करून उड्डाणपूल लवकरात लवकर वाहतुकीस खुला करण्याचे पुणे महानगरपालिका प्रशासनाचे नियोजन आहे.

ठाकरे बंधूंना धक्का:बेस्ट निवडणुकीत भोपळा, महायुतीला 7 शशांक राव पॅनलला 14 जागा

मुंबई-दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने प्रतिष्ठेच्या बनलेल्या बेस्ट एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ‘उत्कर्ष’ पॅनलचा दारुण पराभव झाला असून, त्यांना 21 पैकी एकही जागा मिळवता आलेली नाही. दुसरीकडे, शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकत एकहाती यश संपादन केले, तर महायुतीच्या पॅनलला 7 जागांवर समाधान मानावे लागले.

बेस्ट पतपेढीवरील ठाकरेंच्या शिवसेनेची नऊ वर्षांची सत्ता या पराभवाने संपुष्टात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढण्याचा विचार करत असताना, दोन्ही पक्षांसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे.

या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) प्रणित बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांनी एकत्र येत ‘उत्कर्ष’ पॅनलची स्थापना केली होती. त्यांच्या विरोधात भाजपचे आमदार प्रसाद लाड, नितेश राणे आणि शिवसेना (शिंदे गट) चे किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे ‘सहकार समृद्धी’ पॅनल रिंगणात होते. तसेच, बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांक राव पॅनलनेही जोरदार टक्कर दिली.

निकाल जाहीर झाल्यावर शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले, तर महायुतीच्या ‘सहकार समृद्धी’ पॅनलला 7 जागा मिळाल्या. या पराभवामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची चिंता वाढली असून, आगामी काळात त्याचा राजकीय परिणाम काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकूण निकाल (21 जागा):

शशांक राव पॅनेल – 14 जागा

महायुती सहकार समृद्धी पॅनेल – 7 जागा

उत्कर्ष पॅनेल (ठाकरे गट + मनसे) – 0 जागा