Home Blog Page 1620

एमसीएने भारतातील चिनी शेल कंपन्यांवर केली कारवाई SFIO ने मुख्य सूत्रधाराला केली अटक

0

नवी दिल्ली-

केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (उद्योग व्यवहार मंत्रालय) 8 सप्टेंबर 2022 रोजी एकाच वेळी केलेल्या शोध आणि जप्तीच्या कारवाईनंतर, SFIO अर्थात  गंभीर फसवणूक तपास कार्यालयाने काल  डॉर्टसे नामक व्यक्तीला अटक केली आहे. हरियाणात गुरुग्राम इथल्या जिलियन हाँगकाँग लिमिटेड या कंपनीच्या  संपूर्ण मालकीची उपकंपनी, जिलियन कन्सल्टंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, बंगळुरू येथील फिनिन्टी प्रायव्हेट लिमिटेड आणि  हैदराबाद मधील पूर्वीची सूचीबद्ध कंपनी ह्युसीस कन्सल्टींग लिमिटेड, या कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकून ही शोध मोहीम राबवण्यात आली.

डॉर्टसे हा जिलियन इंडिया लि.च्या कार्यकारी मंडळावर आहे आणि भारतात  मोठ्या संख्येने चीनशी संबंधित असलेल्या शेल कंपन्या (बनावट कंपन्या) स्थापन करुन, त्यांच्या कार्यकारी मंडळावर, डमी(बनावट) संचालक नेमण्याच्या संपूर्ण जाळ्याचे प्रमुख सूत्रधार म्हणून त्याचे नाव स्पष्टपणे समोर आले आहे. आर.ओ.सी. अर्थात  कंपन्यांच्या रजिस्ट्रार (निबंधक) म्हणजेच नोंदणी अधिकाऱ्याकडे केलेल्या नोंदीनुसार, अटक करण्यात आलेला डॉर्टसेने, स्वतःला हिमाचल प्रदेशातील मंडी येथील रहिवासी असल्याचे दाखवले होते.

अनेक शेल कंपन्यांमध्ये डमी म्हणून काम करण्यासाठी जिलियन इंडिया लिमिटेडकडून डमी संचालकांना पैसे दिले जात असल्याचेही, आर.ओ.सी, दिल्ली अर्थात दिल्ली येथील कंपनी निबंधकांनी  केलेल्या तपासातून मिळालेले पुरावे आणि त्याचवेळी राबवलेल्या शोध मोहिमेतून स्पष्टपणे समोर आले आहे.  कंपनीचे सील्स आणि डमी संचालकांच्या डिजिटल स्वाक्षरीने भरलेली खोकी, घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहेत. भारतीय कर्मचारी, चिनी इन्स्टंट मेसेजिंग अॅपद्वारे या चिनी शेल कंपन्यांच्या संपर्कात होते.  Husys Ltd. देखील Jilian India Ltd. च्या वतीने काम करत असल्याचे आढळून आले. Husys Ltd चा Jilian Hong Kong Ltd. सोबत करार असल्याचेही प्राथमिक तपासात उघड झाले आहे. देशाच्या आर्थिक सुरक्षिततेला बाधा पोहोचवू शकणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या आर्थिक गुन्ह्यांमध्ये या चिनी शेल कंपन्यांचा सहभाग असण्याची शक्यता सुद्धा आतापर्यंतच्या तपासातून निर्माण झाली आहे.

कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने, त्यांच्याच अखत्यारीत काम करणाऱ्या SFIO कडे, जिलियन कन्सल्टंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर 32 कंपन्यांच्या चौकशीचे काम,  9 सप्टेंबर 2022 रोजी सोपवले होते. डॉर्टसे आणि एक चिनी नागरिक हे जिलियन कन्सल्टंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे दोन संचालक आहेत. तपासातून मिळालेल्या माहितीनुसार,  डॉर्टसे दिल्ली एनसीआरमधून (दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) बिहार राज्यातील एका दुर्गम ठिकाणी पळून गेला होता आणि रस्ते मार्गाने भारतातूनही पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. SFIO ने तात्काळ एक विशेष पथक तयार करुन या दुर्गम ठिकाणी नियुक्त केले.  10 सप्टेंबर 2022 च्या संध्याकाळी, SFIO ने डॉर्टसे याला अटक केली आणि नंतर न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून त्याच्या ट्रान्झिट रिमांडचे (आरोपीच्या स्थलांतरासाठीची कोठडी) आदेश मिळवले होते.

प्रकल्प 17 ए मधील ‘तारागिरी’ या तिसऱ्या युद्धनौकेचे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कडून जलावतरण

0

मुंबई, 11 सप्‍टेंबर 2022

प्रकल्प  17 ए मधील   तिसरी युद्धनौका   ‘तारागिरी’ चे आज माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने जलावतरण केले. या युद्धनौकेसाठी एकात्मिक बांधणी पद्धत वापरण्यात आली आहे. या पद्धतीमध्ये  विविध भौगोलिक ठिकाणी नौकेच्या प्रमुख  भागाचे (हुल ब्लॉक्स)  बांधकाम करण्यात येऊन एमडीएल येथे त्याचे एकत्रीकरण किंवा बसवण्याचे काम केले जाते.  तारागिरीची पायाभरणी  10 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आली होती  आणि ऑगस्ट 2025 पर्यंत ती नौदलाकडे सुपूर्द होणे अपेक्षित आहे. या युद्धनौकेचे  आरेखन  भारतीय नौदलाच्या अंतर्गत असलेल्या नौदल डिझाइन ब्युरो या आरेखन संस्थेने केले आहे. युद्धनौका पर्यवेक्षण पथकाच्या (मुंबई)  देखरेखीखाली एमडीएल  विस्तृत आरेखन  आणि बांधणी  करत आहे

प्रकल्प 17 अंतर्गत पहिली युद्धनौका ‘निलगिरी’चे जलावतरण 28 सप्टेंबर 2019 रोजी झाले होते आणि 2024 च्या पहिल्या सहामाहीत तिच्या  सागरी चाचण्या होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्प 17 ए एकूण 25,700 कोटी रुपये खर्चाचा आहे.प्रकल्प 17 अंतर्गत दुसरी  युद्धनौका ‘उदयगिरी’चे जलावतरण 17 मे 2022 रोजी झाले होते आणि 2024 च्या दुसऱ्या सहामाहीत तिच्या सागरी चाचण्या होण्याची अपेक्षा आहे. 28 जून 2022 रोजी चौथ्या आणि अंतिम जहाजाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.

149.02 मीटर लांब आणि 17.8 मीटर रुंद असलेली ही युद्धनौका ,दोन गॅस टर्बाइन्स आणि 02 मुख्य डिझेल इंजिनांच्या सीओडीओजी  संयोजनाद्वारे चालवली जात असून त्याचे आरेखन, सुमारे  6670 टन वजन घेऊन स्थानांतर करताना  28 नॉट्सपेक्षा जास्त वेग  प्राप्त करण्याच्या दृष्टीने केलेले आहे. प्रकल्प 17ए अंतर्गत युद्धनौकेच्या मुख्य भागाच्या बांधणीत वापरलेले पोलाद  हे स्वदेशी विकसित डीएमआर  249 ए असून ते भारतीय पोलाद प्राधिकरणाने  (SAIL) उत्पादित केलेले लो कार्बन मायक्रो अलॉय ग्रेड पोलाद  आहे. स्वदेशी बनावटीच्या या स्टेल्थ युद्धनौकेमध्ये  अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स, अत्याधुनिक कृती माहिती प्रणाली, एकात्मिक मंच व्यवस्थापन प्रणाली, जागतिक दर्जाची मॉड्युलर लिव्हिंग स्पेस, अत्याधुनिक वीज वितरण प्रणाली आणि इतर अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये असतील.या युद्धनौकेवर  जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी स्वनातीत  क्षेपणास्त्र प्रणाली बसवली जाणार आहे. शत्रूच्या विमानांपासूनचा धोका परतवून लावणारी हवाई संरक्षण क्षमता या युद्धनौकेची राहील.जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रे  व्हर्टिकल लॉन्च जवळ असतील आणि लांब पल्ल्याच्या जमिनीवरून  हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीने युद्धनौका सज्ज राहील. दोन 30 मिमी रॅपिड फायर गन युद्धनौकेला सर्व बाजूनी  संरक्षण क्षमता प्रदान करतील तर एक एसआरजीएम  गन युद्धनौकेत  नौदलाच्या प्रभावी  भडिमाराला पाठबळ देईल. स्वदेशी बनावटीचे  ट्रिपल ट्यूब वजनाला हलके पाणतीर  लाँचर्स आणि रॉकेट लाँचर्स युद्धनौकेच्या  पाणबुडीविरोधी क्षमतेत भर घालतील.

या समारंभाचे प्रमुख अतिथी व्हाइस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी, पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ यांच्या पत्नी श्रीमती चारू सिंग यांच्या हस्ते या जहाजाचे नामकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला, व्हाइस ऍडमिरल नारायण प्रसाद, एव्हीएसएम, एनएम, आयएन (निवृत्त), माझगाव डॉक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्हाइस ऍडमिरल के एम देशमुख एव्हीएसएम, व्हीएसएम,  सी डब्लू पी अँड ए आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेचे पालन करून 11 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय दुखावटा जाहीर केल्याने हा कार्यक्रम केवळ तांत्रिक प्रक्षेपणापुरता मर्यादित होता. कार्यक्रम समुद्राच्या भरतीवर अवलंबून असल्याने वेळापत्रकात कोणताही बदल करणे शक्य नव्हते.

1 अब्ज 32 कोटी रुपयांचा बनावट इन्व्हॉईस गैरव्यवहार करणाऱ्या जाळ्याच्या सूत्रधाराला सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाने केली अटक

0

मुंबई, 11 सप्‍टेंबर 2022

मुंबई विभागातल्या भिवंडीच्या केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाच्या ( CGST COMMISSIONRATE) अधिकाऱ्यांनी,  बनावट इन्व्हॉईस म्हणजेच मालपुरवठा देयक यादी तयार करणारे जाळे उध्वस्त केले आहे. या जाळ्याच्या माध्यमातून 1अब्ज 32 कोटी रुपयांचे इन्व्हॉईस जारी केले गेले आहेत, तसेच 23 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा (मालखरेदी वरील  करभरणा) गैरव्यवहार करण्यात आला आहे. यासंदर्भात भिवंडीच्या केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाने 9 सप्टेंबर 2022 रोजी एका व्यक्तीला, या घोटाळ्याचा सूत्रधार म्हणून अटक केली असून त्याची 23 सप्टेंबर 2022 पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे

भिवंडीच्या केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाच्या कर चुकवेगिरी प्रतिबंधक पथकाने,  मेक्टेक स्टील ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, यु.जी.एस.के. ट्रेडर, वर्ल्ड एंटरप्राईजेस, रोलेक्स एंटरप्राईजेस, एच.एच.टी. एंटरप्राइजेस, तसेच यश एंटरप्राइजेस यासारख्या बनावट कंपन्यांच्या केलेल्या चौकशी अंती, आरोपी आणि या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आढळून आले.

मिळालेल्या विशिष्ट गुप्त महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारावर भिवंडीच्या केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाच्या कर चुकवेगिरी प्रतिबंधक पथकाने आरोपीच्या निवासस्थान आणि परिसराची झडती घेतली. हा आरोपी वस्तू सेवा कर घोटाळ्याच्या आठ प्रकरणांच्या चौकशीसाठी हवा होता.

या आरोपीने, या बनावट कंपन्यांची संकेतस्थळे निर्माण करून त्या संकेतस्थळांच्या माध्यमातून, कुठल्याही प्रकारचा माल आणि सेवा पुरवठा न करता, एक अब्ज 32 कोटी रुपयांची बनावट इन्व्हॉईस तयार केली आणि 23 कोटी 16 लाख रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा केला, असे तपासातून निष्पन्न झाले आहे.

36 बनावट केंद्रीय वस्तू सेवा कर कंपन्या स्थापन करून त्या माध्यमातून केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाच्या विविध विभागांमध्ये बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट गैरव्यवहार करण्याचे जाळे आपण निर्माण केल्याची कबुली देखील या आरोपीने दिली आहे.

तपासा दरम्यान मिळालेल्या परिस्थितीजन्य आणि वस्तुस्थितीदर्शक पुराव्यांच्या आधारावर, सदर आरोपीला 9 सप्टेंबर 2022 रोजी, केंद्रीय वस्तू सेवा कर कायदा 2017 च्या कलम 69 अंतर्गत,  कायद्याच्या कलम 132 चे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली.

कर घोटाळा करणारे आणि बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट जाळे चालवणाऱ्यांविरुद्ध, मुंबईचा केंद्रीय वस्तू सेवा कर विभाग राबवत असलेल्या विशेष मोहिमेचा, ही कारवाई म्हणजे एक भाग आहे. भिवंडीच्या केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाने गेल्या एक वर्षात केलेली ही सतरावी अटक आहे.

महिलांमधील वाढता व्यावसायिक दृष्टीकोन स्तुत्य-रुक्साना अंकलेसरिया

0

लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागतर्फे ‘सारस फ्ली एक्स्पो’

पुणे : “महिलांकडे ‘मल्टिटास्किंग’चे कौशल्य असते. घरचा व्याप सांभाळून विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवून त्या आपल्यातील कला व व्यावसायिक दृष्टीकोन विकसित करत असतात. अशावेळी लायन्स क्लबने या महिला व्यावसायिकांचे प्रदर्शन आयोजित करून त्यांना प्रोत्साहन व संधी दिली आहे,” असे मत सामाजिक कार्यकर्त्या रुक्साना मेहेर अंकलेसरिया यांनी व्यक्त केले. 

लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागतर्फे मुकुंदनगर येथील शिवशंकर सभागृहात ‘सारस फ्ली एक्स्पो’ या महिलांनी स्वतः बनविलेल्या हस्तकला व अन्य वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन रुक्साना मेहेर अंकलेसरिया व शशिकला फत्तेचंद रांका यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी क्लबचे मार्गदर्शक फत्तेचंद रांका, क्लबचे अध्यक्ष अनिल सुगंधी, सचिव पूनम अष्टेकर, माजी अध्यक्ष दीपाली गांधी, आशा ओसवाल, सदस्या चैताली पटनी, चैताली पटवा, मनीषा शहा, उत्कर्ष गांधी, अनिकेत आघाव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रदर्शनात महिलांनी बनवलेल्या वस्तू खूपच सुदंर आणि दर्जेदार आहेत. अतिशय बारकाईने आणि कलाकुसरीने या वस्तू तयार केल्या आहेत. त्यांच्यातील कलाकाराची मेहनत या वस्तूंमधून दिसत आहे, अशा शब्दांत शशिकला रांका यांनी महिलांच्या कलाकुसरीचे कौतुक केले.

समाजातील गरजू, वंचित रुग्णांना अल्प दरात डायलेसिस करता यावे, यासाठी या प्रदर्शनातून निधी संकलन केले जाते. उपक्रमाचे हे सातवे वर्ष असून, प्रदर्शनात जवळपास १०० स्टॉल्स उभारण्यात आले असून यामध्ये घरातील सुशोभित वस्तुंपासून ते कपडे, हाताने बनविलेले कलाप्रकार, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे, असे फत्तेचंद रांका यांनी सांगितले.

ऋषिकेश येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाला अपघात; चौघांचा मृत्यू अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, दि.११ : उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील चौघा यात्रेकरुंचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि अपघातातील जखमींना ऋषिकेश येथील एम्स हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली. मृत्युमुखी पडलेल्या चौघा यात्रेकरुंचे पार्थिव राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालत ते मुंबईत आणले आणि नातेवाईकांकडे सुपुर्द झाले. या दु:खद प्रसंगात मुख्यमंत्र्यांनी केलेली तातडीची मदत नातेवाईकांसाठी दिलासा देणारी ठरली.

पालघर जिल्ह्यातील काही यात्रेकरु ऋषिकेश येथे देवदर्शनासाठी गेले होते. या यात्रेकरुंच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात मनोर येथील जितेश लोखंडे (वय ४३ वर्षे), वसई येथील धर्मराज खाटेकर (वय ४० वर्षे), पुरुषोत्तम खिलखुटी (वय ३७ वर्षे), दहिसर येथील शिवाजी बुधकर (वय ५३ वर्षे) या चौघांचा मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांचे सहकारी सचिन जोशी यांना मिळताच त्यांनी तातडीने त्याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तातडीने उत्तराखंडमधील यंत्रणेशी संपर्क साधला आणि जखमींना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. एवढेच नाही तर रुग्णालय प्रशासनाशी संपर्क करुन त्यांनी जखमींवर उपचाराची माहितीही घेतली.

अपघातातील मृतांचे शवविच्छेदन आणि इतर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर त्यांचे पार्थिव त्याचदिवशी रात्री दिल्ली विमानतळावर आणण्यात आले, तेथून पहाटे हे पार्थिव मुंबईत विमानाने आणण्यात आले, त्यानंतर लगेचच ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

इतक्या जलदगतीने संपूर्ण सोपस्कार पार पाडून कोणत्याही अडचणींशिवाय पार्थिव नातेवाईकांकडे सुपुर्द केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच प्रशासकीय गतिमानतेचे कौतुक होत आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, हेच यातून अधोरेखित झाले आहे, अशी भावना अपघातग्रस्तांचे नातेवाईक दयानंद सावंत यांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही:शरद पवारांचे मोदी सरकारला खुले आव्हान, दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रसचे अधिवेशन

0

नवी दिल्ली–शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर हे आमचे प्रेरणास्थान आहेत. शिवाजी महाराज हे कधीच दिल्लीसमोर झुकले नाहीत. बाजीराव पेशवे यांनी इथूनच दिल्लीला आव्हान दिले. पेशव्यांनी याच तालकटोरा स्टेडियममध्ये तळ ठोकला होता. असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मोदी सरकारसमोर झुकणार नसल्याचा इशारा दिला आहे.

दिल्लीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिवेशन होत आहे. राष्ट्रवादीचे हे आठवे अधिवेशन असून, शरद पवारांच्या उपस्थिती हे अधिवेशन पार पडत आहे. यासाठी देशभरातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती देखील पाहायला मिळत आहे.

“ छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांकडून आपल्याला प्ररेणा मिळालेली आहे. त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या विचारधारेने काम करणं हे आपण आपलं सर्वप्रथम कर्तव्य मानतो. आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रगतीशील पक्षाच्या रुपात काम करू इच्छिते. शिवाजी महाराजांचा इतिहास जर तुम्ही पाहिलात, तर त्यांनी एक गोष्ट आपल्या सर्वांसमोर मांडली आहे आणि ती म्हणजे, दिल्लीच्या तख्तासमोर न झुकून त्यांनी स्वाभिमानाचा परिचय दिला आहे. आज आपण एका ऐतिहासिक मैदानात दिल्लीच्या तालकटोरा मैदानात जमलेलो आहोत. याच ठिकाणाहून पेशव्यांनी दिल्लीच्या शासनाला आव्हान दिलं होतं. मला आनंद आहे की दिल्लीच्या तख्ताला जिथून आव्हान दिलं गेलं होतं, त्या ठिकाणी आज आपलं अधिवशेन आयोजित करण्यात आलेलं आहे.”

“ आपण आपल्या स्वातंत्र्याचं पंच्चाहत्तरवं वर्ष साजरं करत आहोत. या वर्षात देशाने काही संकटं आणि राजकीय चढउतार पाहिले. याच कालावधीत आपण हे देखील पाहिलं की आपले जे शेजारील राष्ट्र आहेत, श्रीलंका, बांग्लादेश या ठिकाणी आपण तानाशाही पाहीली. ज्याचा परिणाम तिथल्या सरकार, संसदीय लोकशाहीवर झाला. काही मोजक्या लोकांच्या हाती तिथली सत्ता गेली होती. मागील ७५ वर्षांत देशात अनेक बदल झाले, आपल्याला समजातील काही वर्गांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज भारत खाद्य,अन्न उत्पादनात केवळ आत्मनिर्भरच नाहीतर जगातील अनेक देशांची धान्याची जी गरज आहे ती भारतामधील शेतकरी भागवतो. आपल्या सर्वांना आपल्या शेतकऱ्यांबद्दल अभिमान आहे. परंतु, दुर्दैवाने आपण शेतकरी आत्महत्येच्या घटना देखील या देशात पाहतो. आपण पाहीलं आहे, की मागील वर्षी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात याच दिल्लीत शेतकऱ्यांनी ठिय्या देत आंदोलन केलं होतं. भारत सरकार शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकण्यास तयार नव्हतं. जगाने हे शेतकरी आंदोलन पाहीलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शेतकरी वर्ग आणि कृषी क्षेत्राच्या हिताचं रक्षण करते आणि सदैव करणार आहे. शेतकऱ्यांसाठी वारंवार लढण्याची वेळ आली तरी आपली तयारी असायला हवी.” असंही यावेळी शरद पवार म्हणाले.

याचबरोबर, “ राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे आणि अखंडित राखण्यासोबतच गतीशील विकासाची आज आवश्यकता आहे. काही सांप्रदायिक घटक सातत्याने समाजात जाती आणि धर्माच्या आधारावर विभाजन करू इच्छितात. हा सर्वांसाठी विशेषकरून महिला, अल्पसंख्याक, दलित, आदिवासींसाठी एक फार मोठा धोका आहे. निवडून आल्यानंतर आपण राज्यघटना आणि सर्व धर्मांचा सन्मान करू, अशी शपथ घेतो. परंतु काहीजण शपथ घेतल्यानंतर हिंदुत्व, मंदिर किंवा मशीद सारख्या मुद्य्यांवर वादग्रस्त भूमिका घेऊन, अल्पसंख्यांकाच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आजही करतात. त्यामुळे आपल्याला जागृत राहीलं पाहिजे.” असं म्हणत शरद पवारांनी निशाणा साधला.तर, “ आज देशात महागाई अभूतपूर्व पातळीवर पोहचली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, धान्य या सर्वांचे दर गगनाला भिडले आहेत. वाढत्या करांमुळे सामान्य माणसांवर मोठा भार निर्माण झालेला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया अभूतपूर्व घसरण अनुभवत आहे. याचे अर्थव्यवस्थेवर दुरोगामी परिणाम होऊ शकतात.” असं म्हणत शरद पवारांनी देशाच्या आर्थिक परिस्थतीवर बोट ठेवलं.

६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही बससेवांमधून ५० टक्के सवलत आहे,७५ च्या पुढच्यांना मोफत ;मात्र जवळ ठेवा’हे ‘ओळखपत्रे …

0

एसटी महामंडळामार्फत ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’

योजनेचे स्वरुप
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २६ ऑगस्ट २०२२ पासून एसटी महामंडळामार्फत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची विशेष योजना. तसेच ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व बससेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास.

योजनेची वैशिष्ट्ये
• ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वातानुकुलित, शयनयानसह सर्व सेवा प्रकारांमध्ये ही सवलत अनुज्ञेय.
• ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आता राज्य परिवहन महामंडळाच्या वातानुकुलित, शयनयान आणि शिवनेरी या उच्चश्रेणी बससेवांमध्येही ५० टक्के सवलत.

अटी व शर्ती
• प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र आवश्यक.
• ही सवलत शहरी बसेसकरीता लागू नाही.
• महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत प्रवासाची सवलत अनुज्ञेय.

तिकीट परतावा
२६ ऑगस्ट, २०२२ नंतरच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण केलेल्या ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकिट परतावा देय असून त्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामडळाचे जवळचे आगार, बसस्थानकावर तिकिटासह अर्ज व वयाच्या पुराव्याची प्रत सादर करावी लागणार आहे.

नागरिकांनी तक्रारी, अर्ज विभागीय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सादर करावे

0

‘विभागीय मुख्यमंत्री सचिवालया’चे कामकाज अधिक गतिमान करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई, दि.११: ग्रामीण भागीतील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये. स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा. सामान्यांना लोकाभिमुख, पारदर्शक प्रशासन अनुभवता यावे म्हणून क्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज अधिक गतिमान करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
नागरिकांनी देखील आपल्या तक्रारी, निवेदने, अर्ज विभागीय मुख्यमंत्री सचिवालयात सादर करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

सुशासन नियमावली संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ८ सप्टेंबरला घेतलेल्या बैठकीत विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाच्या कामकाजाविषयी चर्चा झाली. नागरिकांचे विविध प्रश्न आणि शासनस्तरावरील कामे तालुका, जिल्हा पातळीवरच निकाली निघावेत यासाठी विभागीय मुख्यमंत्री सचिवालय अधिक सक्षम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिल्या.

नागरिकांची शासनस्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, आदी मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयात स्विकारुन त्यावर कार्यवाही करण्यासाठी संबंधीत क्षेत्रीयस्तरावर कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. मात्र यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पार्दशकता, गतिमानता आणतानाच सर्वसामान्य जनतेला कमी त्रास व्हावा या हेतूने कोकण, अमरावती, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सचिवालयाचे क्षेत्रीय कार्यालय (सीएमओ) यापूर्वीच सुरु करण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयांमधील महसुल उपायुक्त यांना विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी घोषित करण्यात आले आहे. ते याबाबत संनियंत्रण करीत असून विभागीय कक्षांमध्ये अर्ज स्विकारणे, पोच पावती देणे, अर्जावर कार्यवाही करणे तसेच प्राप्त अर्ज, त्यावरील कार्यवाही केलेले अर्ज व प्रलंबीत अर्ज इ. बाबतचा मासिक अहवाल मुख्यमंत्री सचिवालयाला पाठवितात. मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयाचे या क्षेत्रियस्तरावरील मुख्यमंत्री कार्यालयावर संनियंत्रण केले जात आहे.

माहिती अधिकाराअन्वये प्राप्त होणाऱ्या माहिती अर्जावर प्रशासकीय विलंब टाळण्याच्या दृष्टीने व तातडीने कार्यवाही होण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांमधील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात जन माहिती अधिकारी, सहायक जन माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी यांना पदनिर्देशित करण्यात आले आहे.

न्यायालयात सुनावणी आणि सरन्यायाधीश- सीएम शिंदे एकाच मंचावर, याचा संदेश समाजात काय जाईल ?याची ही काळजी घेऊ नये ?

0

पुणे- न्यायालयात सुनावणी ,प्रकरण ज्यांच्याबाबत सुरु आहे त्या सीएम एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सरन्यायाधीश एकाच मंचावर पाहायला मिळाले तर याचा संदेश समाजात काय जाईल ? याची ही काळजी घेऊ नये ? अशा स्वरूपाचे प्रश्न आता समाज माध्यमातून विचारले जाऊ लागले आहे अशी टीका राष्ट्रवादी कडून करण्यात येते आहे.एकूणच हे प्रकरण गंभीर असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे हे संकेतांना धरून नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरू आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे याबाबतचा आक्षेप जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.

सरन्यायाधीश उदय लळीत यांचा सत्कार समारंभ नुकतच पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपले मत मांडले. ते म्हणाले की, “सरन्यायाधीश यांना व्यासपीठावर बसवणे चुकीचे आहे. मी त्याबाबत माझे मत मांडले. घटनापीठाकडे खटला सुरू असताना सरन्यायाधीशांना कार्यक्रमात नेणे हे चुकीचे आहे.” अशी प्रतिक्रिया पाटलांनी दिली. याबाबत राज्यपालांना भेटणार का असा प्रश्न विचारला असता याबाबत टाइमपास करायला आमच्याकडे वेळ नाही, अशी खोचक प्रतिक्रियाही जयंत पाटलांनी यावेळी दिली.

27 सप्टेंबरला सुनावणी

दरम्यान, राज्यात मविआ सरकार कोसळले असून, शिवसेना कुणाची हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडे देण्यात आले आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात होणार आहे. गेल्या सुनावणीत पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. त्यात शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी कोर्टात युक्तीवाद केला. निवडणूक आयोगाच्या सुनावणीवरील स्थगिती उठवण्यात यावी, यासह शिवसेनेने धनुष्यबाण गोठवावे आणि घटनापीठाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी कौल यांनी केली आहे.

सरन्यायाधीश उदय लळीत न्याय क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरतील-मुख्यमंत्री

0

मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या जागेबाबत लवकरच निर्णय घेणार

मुंबई : महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यामुळे ते न्याय क्षेत्रासाठी निश्चितच दीपस्तंभ ठरतील या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा आज सायंकाळी मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्याच्या अर्थसंकल्पात सध्या एक टक्केपेक्षा थोडी कमी तरतूद विधि व न्यायसाठी असून ती वाढवून एक टक्क्यांपर्यंत आणण्याचा देखील मानस मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी जास्तीची जागा देण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे व लवकरच त्याबाबतीत निर्णय घेतला जाईल हे सांगितले.

हॉटेल ताज पॅलेसच्या क्रिस्टल हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय विधि व न्यायमंत्री किरेन रिजिजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, अमिता उदय लळीत, झुमा दत्ता,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांची उपस्थिती होती. मुंबई उच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती उपस्थित होते.

यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते सरन्यायाधीश उदय लळीत यांचा हृद्य सत्कार करण्यात आला तसेच संस्कृतमधील गौरव पत्र देण्यात आले. तर झुमा दत्ता यांच्या हस्ते अमिता उदय लळीत यांना मानचिन्ह देण्यात आले.

सतत स्वतःला विकसित करा – सरन्यायाधीश उदय लळीत

आपल्या सत्काराला उत्तर देताना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी त्यांच्या कारकिर्दीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुंबईपासून करिअरची सुरुवात करून आज सरन्यायाधीश म्हणून मुंबईत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत सत्कार स्वीकारताना मला कृतज्ञ वाटते आहे असे सांगून उदय लळीत म्हणाले की, वकील व्यवसायात सतत स्वतःला विकसित करणे व सुधारणा करीत राहणे हीच या व्यवसायाची खासियत आहे. सर्वोच्च न्यायालय ही माझी मातृसंस्था आणि कर्मभूमी आहे. माझ्या क्षमतेनुसार मी सर्वोच्च न्यायालयात काम केले.

देशातील न्यायदान वेगानं होईल – मुख्यमंत्री

सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नियुक्तीने आपल्या मनात आनंद आणि अभिमानाची भावना आहे असे सांगून मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, कमीत कमी वेळात कामकाज अधिक वेगानं व्हावं आणि न्यायव्यवस्थेची चाके वेगाने फिरावीत यादृष्टीने सरन्यायाधीश उदय लळीत हे केवळ बोलून थांबले नाहीत तर त्यांनी ज्या पद्धतीनं कामाला सुरुवात केली आणि प्रकरणे निकाली काढली, ते पाहता निश्चितच देशातील न्यायदान वेगानं होईल यात काही शंकाच वाटत नाही. सरन्यायाधीश वेळोवेळी ज्या मार्गदर्शक सूचना करतील किंवा निर्णय देतील त्याची काटेकोर अंमलबजावणी राज्य सरकार करेल अशीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

कलह मिटविण्याची इच्छा असलेले लळीत

मी उदयजी लळीत यांना आज पहिल्यांदाच भेटलो आणि त्यांच्या शालीनता, नम्रता, सभ्यता यामुळे आपण प्रभावित झालो आहे. कोकणात लळीत हा कीर्तन परंपरेतील एक लोककला असून या प्रयोगाच्या शेवटी कीर्तनकार देवाला गाऱ्हाणे घालतात. त्यात ते म्हणतात की, “आपापसातले कलह मिटोत, मनात किल्मिष ना उरो, निकोप मनाने व्यवहार चालोत”. कलह मिटविण्याची इच्छा प्रकट करणाऱ्या लळीतांचे नाव धारण करणाऱ्या उदयजी लळीत आज न्यायदानाच्या सर्वोच्च पदावर पोहचले हा विलक्षण योगायोग असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

नवीन इमारतीसाठी जास्तीची जागा

राज्यातील न्यायपालिका अधिक मजबूत करण्यासाठी त्यांना सुविधा देण्याबरोबरच नवीन न्यायालयांच्या निर्मितीसाठी राज्य शासन सकारात्मकपणे कार्यवाही करीत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जास्तीची जागा देण्यासंदर्भातदेखील राज्य शासन लवकरच निर्णय घेईल.

यावेळी केंद्रीय विधि व न्यायमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, 2047 मध्ये जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील, तेव्हा आपला देश पूर्णपणे विकसित असावा अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा असून आपण सर्वांनी यादृष्टीने प्रयत्न करावेत.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक यांची देखील भाषणे झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी प्रारंभी स्वागतपर भाषण केले

पुण्याच्या संपदा सुरेश मेहता आता राष्ट्रपतींची खाजगी सचिव पदी …

0

नवी दिल्ली/पुणे-पुणे येथील हुजूरपागा आणि स.प. महाविद्यालयात शिक्षण घेतलेली पुण्याच्या संपदा सुरेश मेहता यांच्याकडे काल भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खाजगी सचिवाची जबाबदारी देण्यात आली आहे. मेहता संपदा सुरेश हे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत.त्यांचे वडील सुरेश मेहता हे व्यवसायाने सी ए  आहेत ,तर काका विठ्ठल मेहता हे ड्रायव्हिंग स्कूल चालवितात . या दोन्ही बंधूंचा पुण्याच्या समाजकारणात आपापल्या परीने मोठा सहभाग राहिला आहे. आपल्या कुटुंबाने दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि प्रेरणेने तसेच स्व कौशल्याने संपदा या दहावी च्या परीक्षेत तसेच बारावीच्या परीक्षेत मेरीट मध्ये झळकल्या होत्या तेव्हा आमच्या पत्रकार लोणकर बंधूंनी तत्कालीन सुदर्शन ,पुणे दर्शन या स्थानिक दुरचित्रवाहिण्यांवर त्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांची मुलाखत प्रसारित केली होती . तेव्हाच संपदा यांनी आपल्या उद्दिष्टांची दिशा दर्शविली ज्यात त्या पूर्णतः यशस्वी झाल्या आहेत .बीकॉम मध्येही त्या मेरीट मध्ये झळकल्या .२००८ साली त्या आय ए एस महाराष्ट्र केडर मध्ये पहिल्या आल्या . जळगाव ,नाशिक , गडचिरोली , मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी असिस्टंट कलेक्टर,डेप्युटी कलेक्टर,कलेक्टर अशा पदांवर तसेच महाराष्ट्रात जीएसटी प्रमुख संचालक पदावर काम केल्यावर त्यांची दिल्लीत जीएसटी संचालनालयात नेमणूक झाली . काल  त्यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खाजगी सचिवाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याच्या कन्येची हि भरारी पुण्याला निश्चितच अभिमानास्पद असून आपल्या कुटुंबासह आपल्या शिक्षकवृंद आणि प्रोत्साहनदात्या प्रत्येकाला याबाबतचे श्रेय संपदा मेहता यांनी दिले आहे.  

संपदा मेहता, IAS, यांचा अल्प परिचय:-

जन्म पुणे दिनांक १६ जानेवारी, १९८२.

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण: – हुजूरपागा, पुणे -४११ ०३०.

महाविद्यालयीन शिक्षण: – सर परशुराम भाऊ महाविद्यालय, पुणे -४११ ०३०.

इयत्ता दहावी – पुणे विभागात गुणवत्ता यादीत.
इयत्ता बारावी – वाणिज्य शाखा – पुणे विभाग सर्व प्रथम.
सनदी लेखापाल अभ्यासक्रम – सुरेश के मेहता आणि कंपनी, पुणे.

परीक्षा उत्तीर्ण २००४-CA Final.

सन २००६- UPSC- पहिल्यांदा निवड केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग – Central Excise, गाझियाबाद येथे एक वर्ष.

सन २००७-UPSC- दुसऱ्यांदा निवड- आयकर विभाग- नागपूर.

सन २००८-UPSC- तिसऱ्यांदा निवड- भारतीय प्रशासन सेवा -IAS- महाराष्ट्र राज्य स्तरावर प्रथम क्रमांक.
मसुरी येथे एक वर्षाचे प्रशिक्षण.

२००९ – महाराष्ट्र राज्य सेवेत IAS अधिकारी म्हणून रुजू
नंतर
१. जळगाव जिल्हा उपजिल्हाधिकारी,
२.नाशिक – आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी,
३. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा परिषद – मुख्य कार्यकारी अधिकारी,
४. नंतर पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि कृषी कार्यालयात विवीध पदांची जबाबदारी,
५.‌व्यवस्थापकीय संचालक – हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई,
६. जिल्हाधिकारी, मुख्य मुंबई,
७. नंतर वस्तू आणि सेवा कर विभाग – सहसंचालक, मुंबई,
८. नंतर संचालक, राजस्व विभाग, केंद्रीय अर्थ मंत्रालय, नवी दिल्ली.
९. आताची नियुक्ती – मा. महामहीम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या खाजगी सचिवपदी ११ सप्टेंबर रोजी नियुक्ती.

स्काऊट गाईड समभाग आणि प्रशासकीय प्रशिक्षणाच्या निमित्ताने परदेश दौरे.

पती श्री रणजीत कुमार, IAS-2008 – महाराष्ट्र राज्य.

सध्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभाग, उत्तर प्रभाग, ( Department of Personnel and Training, New Delhi, North block ) येथे सहसचिव (Joint Secretary) या पदावर कार्यरत.

मुलगा चि ॐ आणि मुलगी – कु. अन्विका- प्राथमिक शिक्षण नवी दिल्ली येथे.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल… उद्धव ठाकरे

0

मुंबई / पुणे दि.१० : विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या दि.१२ सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो याचे औचित्य साधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानिमित्ताने महात्मा फुले यांचे मुंडासे, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक तसेच घोंडगी आणि काठी हे श्री ठाकरे यांना डॉ.गोऱ्हे यांनी भेट दिली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने महाराष्ट्रात वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर गेली वीस वर्षे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बरोबर अतिसंवेदनशील पध्दतीने काम करत आहेत ते अधिक त्यांच्या हातून कार्य घडावे अशा प्रकारच्या शुभेच्छा डॉ.गोऱ्हे यांनी श्री ठाकरे यांना दिल्या. यावेळी श्री ठाकरे यांनी डॉ.गोऱ्हे यांना चांगल्या प्रकारचे सतत यश मिळावे व हातून समाज हिताचे कार्य घडावे अशा शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशा भावना श्री ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

या प्रतिकात्मक भेटी मागची भूमिका स्पष्ट करताना डॉ.नीलमताई म्हणाल्या, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण, एकाच वेळी ओला दुष्काळ आणि अपुरा पाणी पुरवठा याच्या कात्रीत सापडलेला शेतकरी आणि शेतीच्या सर्वांगीण विकासाकडे होणारे शासनाचे दुर्लक्ष; यावर उपाय म्हणून महात्मा फुल्यांनी तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर ओढलेला आसूड आज परत हातात घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.

या दृष्टीने गेली वीस वर्षे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न अत्यंत संयमाने आणि संवेदनशीलतेने हाताळणाऱ्या मा. उद्धवजींनी शेतकऱ्याचा आसूड हातात घ्यावा अशी प्रार्थना यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी केली.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. गोऱ्हे यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचे महत्व अधोरेखित करताना महाराष्ट्रात असलेल्या शेतकरी समस्या, स्त्री-सुरक्षा आदी विषयांवर लक्ष वेधले.

यावेळी, शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख आनंद गोयल, प्रशांत राणे, महिला सहसंपर्क प्रमुख विजया शिंदे, महिला शहरसंघटिका सविता मते, माजी नगरसेविका संगीता ठोसर, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, युवासेना सहसचिव शर्मिला येवले आदी जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित

अमृता फडणवीस आणि भामला फाउंडेशन यांच्या मार्फत मुंबईच्या जुहू समुद्रकिनारी स्वच्छता मोहिम

0

अभिनेते अनुपम खेर,परिणीती चोप्राआदी मान्यवर सहभागी

मुंबई-एकंदरीत १० दिवसांचा गणेशोत्सव सोहळा हा चांगल्या पद्धतीने पार पडला. तथापि गणेशमूर्ती विसर्जनानंतर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर दिसणारे दृश्य हे उदासीनतेचे दिसते कारण विसर्जनानंतर मूर्तीचे अवशेष आणि प्लास्टिक हे सारं काही किनाऱ्यावर जमा होते.

शहर नागरी प्राधिकरणाच्या प्रयत्नांना पाठिंबा देताना, गणपती विसर्जनानंतर शहरातील समुद्रकिनाऱ्यांच्या चिंताजनक समस्येबद्दल जनजागृती करण्याच्या प्रयत्नात, अमृता फडणवीस (दिव्यज फाउंडेशनच्या) आणि भामला फाउंडेशनचे  संस्थापक आसिफ भामला यांनी१० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईतील जुहू बीचवर स्वच्छता मोहिम राबवली.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले, मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या उदात्त उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवून सुरवात झाली. त्याच सोबत या ठिकाणी बीएमसी आयुक्त श्री. इक्बाल सिंग चहल, मुंबईचे पोलीस आयुक्त श्री.  विवेक फणसाळकर, श्रीमती. पूनम महाजन, जुहूचे आमदार श्री अमीत साटम आणि महाराष्ट्र विधानसभेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर यांसाहित अनेक मान्यवर उपस्थित होते.

राजकारणाच्या क्षेत्रातील नामांकित नावांव्यतिरिक्त, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि परिणीती चोप्रा, अपारशक्ती खुराणा यांच्यासह काही उल्लेखनीय नावांनीही स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. विशेष म्हणजे २००० हून अधिक स्वयंसेवक या उदात्त हेतूसाठी मदतीचा हात देण्यासाठी पुढे आले.

याच कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असलेल्या अमृता फडणवीस  त्यांचे मत व्यक्त करताना म्हणाल्या,

स्वतःला आणि पर्यावरणाला स्वच्छ ठेवणे ही मूलभूत गरज आहे आणि या बद्दलची शिकवण आपल्याला लहानपणापासून देण्यात आली आहे. स्वच्छतेचे धडे गिरवून त्यांना आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात लागू करणे हा एकमेव उपाय आहे. जेणेकरून आपण मातृ निसर्गाच्या संसाधनांचा पूर्ण आनंद घेऊ शकतो,  आपल्या मुलांना शुद्ध शांत पर्यावरण देऊ शकतो आणि सागरी जीवन निर्मल बनवू शकतो.

प्लॅस्टिकचे दीर्घकाळ विघटन होत नसल्यामुळे, आपल्या अन्न आणि पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण आधीच दिसून येत आहेत आणि जर हे थांबले नाही तर ते निसर्गासोबत आपल्यासाठी सुद्धा धोक्याचे आहे.

ज्या पद्धतीने आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रीदवाक्य आहे ना खाऊंगा ना खाने दुंगा, त्याचप्रमाणे आपण सुद्धा मनाशी घट्ट केलं पाहिजे की, ना कचरा करुंगा ना करणे दुंगा.

तसं ही आपल्या भारतीय संस्कृतीत असे मानले जाते की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते.याच बरोबर उपस्थित भामला फाउंडेशनचे संस्थापक असिफ भामला यांनी सगळ्या नागरिकांचे कौतुक करताना म्हणाले की, स्वच्छता मोहीम राबवत असता, जुहू समुद्रकिनाऱ्यावड येणाऱ्या आणि तिथे राहणाऱ्या सगळयाच नागरिकांनी अगदी रात्री पासून ते पहाटे पर्यंत ही किनारपट्टी साफ करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे, ज्याचे त्यांना खूप कौतुक आहे.

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची अखेर सांगता …

0

पुण्यात तब्बल ३१ तास मिरवणुकीचा विक्रम; पोलिसांचा मात्र साडेअठ्ठावीस तासाचा दावा

राजकीय आश्रयामुळेच मिरवणुकीस विलंब

पुणे- पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची अखेर सांगता झाली आहे. दरम्यान शेवटचे मंडळ टिळक चौकात आल्यानंतर बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी आपल्यावरील ताण कमी केला.पोलिसांच्या नोंदी नुसार अखिल मंडइ मंडळाचा गणपती आज सकाळी साडेदहा वाजता तर दगडूशेठ गणपती आज सकाळी अकरा वाजून २० मिनिटांनी विसर्जित झाला.पोलिसांनी सांगितले कि, यावेळी एकूण ३५६६ सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्ती स्थापना करून विसर्जन केले .अनंत चतुर्दशी दिवशी २८४३ मंडळांनी विसर्जन केले बाकी मंडळांनी १० दिवसांच्या आत विसर्जन केले .घरगुती गणपती ची संख्या या वर्षी ५ लाख ५२ हजार ४३२ एवढी होती.अनंत चतुर्दशीला ३ लाख १० हजार ६०१ घरगुती गणपतीचे विसर्जन झाले . इतरांनी अगोदरच्या काळात केले.मानाचा पाचवा गणपती काल रात्री पावणे नऊ वाजता विसर्जित झाला . दरम्यान मानाच्या गणपतींनी विसर्जित होण्याच्या वेळेबाबत केलेल्या विक्रमाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असले तरी पोलिसांनी मात्र त्यावर काही भाष्य केलेलं नाही.लक्ष्मी रस्त्याने २९२ गणेश मंडळांनी आपल्या गणपतीचे मिरवणुकीने विसर्जन केले , हि मिरवणूक सकाळी १० वाजता सुरु झाली होती , मानाच्या ५ व्या गणपतीचे रात्री पावणे नऊ वाजता विसर्जन होणे हे ऐतिहासिक विक्रम नोंदविला गेला आहे. टिळक रोडने १९७ मंडळांनी मिरवणुकीने जाऊन विसर्जन केले तर कुमठेकर रस्त्याने ४८ एवढे तर केळकर रस्त्याने ७१ एवढे गणेश मंडळांनी मिरवणुकीने विसर्जन केले. अलका चौकातून ६०८ मंडळांच्या मिरवणुकीने गणेशाचे विसर्जन झाले.

पुण्यातील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत यंदा दणदणाटाने अतिधोकादायक पातळी गाठली, असल्याचे निरीक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तंत्रशास्त्र विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. शनिवारा, सकाळी ८ वाजल्यानंतर शरातील काठी भागातील ध्वनिपातळी १२८.५ डेसिबलवर पोहोचली. ही पातळी अतिधोकादायक समजली जाते. राज्य शासनाच्या आदेशानुसार यावर्षीच्या मिरवणुकीत सर्वच शासकीय यंत्रणांनी नरमाईचे धोरण स्वीकारले. त्याचा परिणाम आवाजाचा अतिरेक होऊन कानठळ्या बसवणाऱ्या ध्वनीने सारा परिसर दुमदुमून गेला.

मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जनाची वेळ

कसबा गणपती
बेलबाग चौक – 11:20
अलका चौक – 3:15
विसर्जन – 4:15

तांबडी जोगेश्वरी
बेलबाग चौक – 11:55
अलका चौक – 4:45
विसर्जन – 5:37

गुरुजी तालीम
बेलबाग – 1:30
अलका चौक – 6:15
विसर्जन – 7.27

तुळशीबाग
बेलबाग चौक – 3:30
अलका चौक – 7:30
विसर्जन – 8.01 मिनिटे

केसरी वाडा
बेलबाग चौक – 3:45
विसर्जन – 8.45

पुण्यात तब्बल ३१ तास मिरवणुकीचा विक्रम; पोलिसांचा मात्र साडेअठ्ठावीस तासाचा दावा

अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी १० वाजता मिरवणूक सुरु होते हे गृहीत धरून यंदाची मिरवणूक ३१ तास चालली.मात्र पोलिसांनी हि मिरवणूक ९ सप्टेंबर रोजी १२ वाजून ४६ मिनिटांनी सुरु झाली आणि १० सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता संपल्याचे नोंदवून मिरवणुकीची हि एकूण वेळ २८ तास आणि २९ मिनिटे एवढी असल्याचे नोंदविले आहे.

राजकीय आश्रयामुळेच मिरवणुकीस विलंब

काही माध्यमांनी पोलीस आणि मांडले यांच्यातील समन्वयाचा अभाव अशी ओरड विलंब लागण्यामागे असल्याची चालविली आहे. पण प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी पोलिसांनी मंडळांशी सौम्य आणि आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केल्याचे दिसले आहे. २ वर्षानंतर उत्सव झाला त्यामुळे खूप उत्साह होता हे हि कारण अनेकांना प्रत्यक्षात रुचणारे नाही .या उत्सवास राजकीय आश्रय प्राप्त झाला होता आणि खुद्द मुख्यमंत्री यांनीच यंदा जोरात गणपती , निर्बंधमुक्त गणेश उत्सवाची घोषणा केली होती त्यामुळे हा उशीर झाल्याचे स्पष्ट झालेले आहे.

‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक श्री स्वानंदेश रथातून संपन्न,सकाळी सव्वा अकरा वाजता विसर्जन

0

११ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास पांचाळेश्वर घाट येथे श्रीं चे विसर्जन झाले.

पुणे : मोरया, मोरया… गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… च्या निनादाने लक्ष्मी रस्त्याचा परिसर दुमदुमून गेला. अनंत चतुर्दशीला ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा हजारो मोतिया रंगाच्या व एलईडी दिव्यांनी उजळलेल्या श्री स्वानंदेश रथामध्ये विराजमान होत सांगता मिरवणुकीत सहभागी झाले. वाजत गाजत आलेली ही गणरायाची स्वारी पाहण्यासोबतच श्रीं चे दर्शन घेण्याकरिता हजारो गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरून शनिवारी सकाळी थाटात निघाली. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी अग्रभागी असलेला स्वच्छतेचा संदेश देणारा ‘जय गणेश स्वच्छता अभियान रथ’ बेलबाग चौकात दाखल झाला.

त्यामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून ते हिंजवडी आयटी पार्क पर्यंत आणि श्री कसबा गणपती मंदिरापासून ते पाताळेश्वर लेण्यांपर्यंतची चित्रे लावण्यात आली होती. पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्याकरिता ट्रस्टतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून याविषयी अधिकाधिक जनजागृती करण्यात आली. याशिवाय देवळणकर बंधू यांचा नगारा, प्रमोद गायकवाड यांचे सनई वादन देखील झाले.

त्यापाठोपाठ स्व-रूपवर्धिनी पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यामध्ये ध्वज, टाळ यांसह मर्दानी खेळ व ढोल-ताशा पथकही सहभागी झाले होते. दरबार ब्रास बँड, प्रभात ब्रास बँड यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यामागे केरळचे चंडा या पारंपरिक वाद्यांचा समूह देखील मिरवणुकीत सहभागी झाला होता.

बेलबाग चौकामध्ये सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी मुख्य श्री स्वानंदेश रथ दाखल झाला. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व इतर पोलीस अधिका-यांच्या हस्ते श्रीं ची आरती करण्यात आली. त्यानंतर पुढे हा रथ मार्गस्थ झाला.श्री स्वानंदेश रथ हा दाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमध्ये साकारण्यात आला. रथावर ८ खांब साकारण्यात आले होते. संपूर्ण रथावर तब्बल १४ शार्दुलच्या मूर्ती साकारण्यात आल्या. तर, रथाच्या वरच्या बाजूला बसविण्यात आलेल्या ५ कळसांवर कीर्तिमुख देखील लावण्यात आले. हा रथ व श्रीं चे विलोभनीय रूप डोळ्यात साठविण्यासोबतच मोबाईल मध्ये देखील अनेकांनी छायाचित्र टिपले.

पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त देखील पारंपरिक वेशात मोठया संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी गणेशभक्तांनी श्रीं ची आरती व स्वागत देखील केले. टिळक चौकामध्ये सकाळी १० वाजून २५ मिनिटांच्या सुमारास मुख्य रथाचे आगमन होताच मोरया, मोरया… जय गणेश असा जयघोष झाला. त्यानंतर ११ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास पांचाळेश्वर घाट येथे श्रीं चे विसर्जन झाले.