Home Blog Page 1618

वैशाली सामंत यांची पहिली निर्मिती असलेलं ‘सांग ना’ गाणं प्रदर्शित

0

टि-सिरीज मराठी प्रस्तुत ‘सांग ना’साठी एकत्र आले अभिजीत-सुखदा, वैशाली,अश्विन,राहुल!

आपल्या सर्वांची आवडती लाडकी गायिका वैशाली सामंत हिने इतकी वर्षे वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी गाऊन आपलं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. हिंदी, मराठी तसेच इतर कुठल्याही भाषांमध्ये वैशाली सामंत सहजतेने वावरलेली आहे. आणि फक्त गायिकाच नव्हे तर संगीतकार, गीतकार असा तिचा प्रवास उंचावत गेला आहे. आता आणखी एक पाऊल पुढे म्हणजे निर्मिती क्षेत्रात तिने पदार्पण केलं आहे. ते निमित्त म्हणजे टी सिरीज प्रस्तुत “सांग ना…!”

‘टी सिरीज’ आणि वैशाली सामंत यांनी मिळून केलेलं हे पहिलं इंडिपेंडंट साँग आहे. आणि या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर जे दोघंही उत्कृष्ट कलाकार आहेत आणि खऱ्या आयुष्यात नवरा बायको आहेत ते या गाण्याच्या निमित्तानं पडद्यावर आपल्याला पहिल्या प्रथमच एकत्र दिसणार आहेत. ‘सांग ना…’ या गाण्यात छोटीशी उत्कंठावर्धक कथा आहे. कथा जरी मॅाडर्न आॅफिसमधली असली, तरी त्यातील शब्दरचना रांगड्या भाषेतील आहे. त्यामुळं हे गाणं रसिकांना वेगळाच अनुभव देणारं ठरेल. याचं कॅाम्पोझिशन आणि व्हिडीओ एकदम कॉन्ट्रास्ट आहे.

‘सांग ना…’ या गाण्याबद्दल बोलताना वैशाली सामंत अश्या म्हणाल्या, फिल्मी आणि नॉन फिल्मी अश्या दोन प्रकारचं संगीत असतं, जेव्हा तुम्ही नॉन फिल्मी म्हणजे आजच्या भाषेत म्हणायचं तर इंडिपेंडंट गाणं करता, तेव्हा ते गाणं कसं असावं याचे फ्रीडम आपल्याला असते. आणि ते गाणं चांगलं करण्याची जबाबदारीही आपलीच असते. माझ्यासाठी गाणं म्हणजे एक दागिना आहे. त्याची जडण घडण कशी असावी, तो दागिना सुंदर दिसण्यासाठी जशी नजकात महत्वाची आहे तसेच गाण्याचे आहे. त्याचे शब्द, त्याची चाल, त्याचा ठेका आणि त्याच्यातील स्वर हे सगळे इंपॉर्टन्ट अस्पेक्ट्स आहेत. आणि मी प्रत्येकवेळी हा प्रयत्न करते कि माझ्याकडून माझ्या श्रोत्यांसाठी काहीतरी वेगळा जॉनर, वेगळा दागिना मी सादर करू शकेन. या वेळी जेव्हा सांग ना.. मी ऐकलं तेव्हा असंच वाटलं कि ह्या प्रकारचं गाणं या आधी माझ्याकडून नाही झालंय. सांग ना..मध्ये शब्द, ठेका, आणि एक छान ट्रान्स असलेली चाल आहे आणि एका मुलीचा हट्ट आहे, स्वताच्या प्रियकरासाठी ती गाताना कसे एक्सप्रेशन आहेत, हे सगळं बघून मला असं वाटलं कि हे मी गावं आणि मग ‘सांग ना’ या गाण्याची खऱ्या अर्थानं प्रोसेस सुरु झाली. अश्विनने ज्या तऱ्हेने याचे शब्द लिहिलेत त्याच्या कॉन्ट्रास्ट याचा व्हिडीओ असावा असं लगेच मनात आलं. टी-सिरीज’ला हे गाणं आवडलं आणि त्यांनी मलाच या गाण्याची निर्मिती करण्यास सांगितली. आणि त्यामुळेच मी गायिका, संगीतकार थोडीशी गीतकार करता करता आज निर्माती झाले. ‘ऐका प्रॉडक्शन या नावच एक मुझिक प्रॉडक्शन लेबल सुरु केलं आहे. ही मुझिक कंपनी नाहीये, फक्त मुझिक प्रॉडक्शन लेबल आहे आत्तातरी. कारण गाण्याच्या क्षेत्रात बरंच काही चालू आहे, माझ्या मनातला व्हिडीओ कसा असावा याविषयी माझ्या मनात नेहमी कुतूहल असायचे, व्हिडीओ असा पाहिजे, तसा पाहिजे तर या निमित्ताने मी माझ्या मनातला व्हिडीओ तुमच्या समोर सादर करत आहे. अभिजित आणि सुखदा खांडकेकर यांनी माझ्या व्हिडीओत येण्यास मान्यता दिली ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पहिलीच वेळ होती माझी प्रॉडक्शनची तरीही त्या दोघांनी जे आज इंडस्ट्रीत अत्यंत नामवंत आणि रुजलेले असे कलाकार आहेत. त्यांनी माझ्या नवीन प्रॉडक्शनमधे यायला हो म्हटलं ही खूप मोठ्ठी गोष्ट आहे, मी त्यांची खूप आभारी आहे. विशेषकरून राहुल खंदारे याचं मी कौतुक करेन, माझी जी संकल्पना होती व्हिडीओची ती अब्झोरब करून अत; पासून इति;पर्यंत त्यांनी माझी साथ दिली आहे. International Institute of Sports Management (IISM)चे माझे मित्र निलेश आणि रसिका कुलकर्णी यांनी या गाण्याच्या व्हिडिओसाठी त्यांचे ऑफिस उपलब्ध करून दिले त्यामुळेच माझ्या मनातला हा व्हिडीओ आपल्यासमोर मी साकार करू शकले आहे.

‘सांग ना…’ हे गाणं खऱ्या अर्थानं अनोखा आनंद देणारं असल्याची भावना व्यक्त करत अभिजीत खांडकेकर म्हणाला की, सुखदा आणि मी फार कमी वेळा एकत्र आलो आहोत, पण म्युझिक अल्बमसाठी आम्हाला एकत्र आणण्याची किमया ‘सांग ना…’नं केली आहे. आम्हाला एकत्र पाहण्याची आमच्या चाहत्यांची इच्छा या निमित्तानं पूर्ण झाली आहे. वैशाली सामंत यांचा मी खूप मोठा फॅन आहे. माझ्या पहिल्या चित्रपटातील गाण्याला त्यांचा आवाज होता. लोकप्रियतेचे बरेच विक्रम आपल्या नावे करणाऱ्या गायिकेनं अल्बमसाठी विचारणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. भंडारेंनी हे गाणं खूप सुंदररीत्या शब्दबद्ध केलं आहे.

‘सांग ना…’ हे गाणं आपल्यासाठी बऱ्याच कारणांमुळं खास असल्याचं सांगत सुखदा खांडकेकर म्हणाली की, कोणतंही पहिलं वहिलं काम स्पेशल असतं. ‘सांग ना…’ हा अभिसोबतचा माझा पहिला म्युझिक व्हिडीओ असल्यानं खूपच खास आहे. बऱ्याच वर्षांनी आम्ही एकत्र काम केलं आहे. वैशालीताईच्या प्रोडक्शन हाऊसमधील हे पहिलं प्रोडक्शन असल्यानंही ‘सांग ना…’ हे गाणं स्पेशल आहे. कलाकार जेव्हा प्रोड्युसर होतो, तेव्हा खूप चांगली कलाकृती घडवतो. कारण त्याला कलाकार आणि निर्माता अशा दोन्ही बाजू माहित असतात. ‘सांग ना…’ हा अल्बम उत्तम, श्रवणीय आणि नेत्रसुखद बनवण्यासाठी संपूर्ण टिमनं खूप मेहनत घेतली आहे. एका दिवसात हसत-खेळत शूटिंग पूर्ण केलं. अभी आणि मी जरी नवरा-बायको असलो तरी अगोदर खूप चांगले मित्र आहोत. त्यामुळं आमची केमिस्ट्री प्रेक्षकांना आकर्षित करेल. राहुल खंदारे व्हिडीओ शूट करताना खूप क्लीअर होते. त्यामुळं काम करणं सोपं झालं.

डिओपी पार्थ चव्हाण यांनी ‘सांग ना…’ची सिनेमॅटोग्राफी केली असून, मनीषा शॅा यांनी प्रोडक्शनची जबाबदारी सांभाळली आहे. अमेय नरे यांनी अतिशय सुरेख म्युझिक अरेंजमेंट केलं असून, बासरीवादन विजू तांबे यांनी केलं आहे. शॅनेल फरेरा यांनी बॅकींग व्होकल्स गायलं आहे. मिक्सींग अँड मास्टरींग रुपक ठाकूर यांनी, तर सत्यजीत भोसले यांनी संकलन केलं आहे. कॅास्च्युम तन्मय जंगम, हेअर प्रीती गांधी आणि मेकअप अमित सावंत यांनी केला आहे. ‘अॅट स्टुडिओ’मध्ये रेकॅार्ड करण्यात आलेल्या या गाण्याचं पोस्ट प्रोडक्शन ‘एसटीटी प्रोडक्शन्स’नं केलं आहे.

लतादीदींच्या गाण्याचा तो प्रत्यक्ष थरार कधीच विसरू शकणार नाही

0

पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचच्यावतीने  भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्यांवर आधारित  ‘ मै नही तो क्या…’ या कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : सुनियो जी अरज म्हारी ओ बाबुला हमर… या गाण्याच्या रेकाॅर्डिंगला लतादीदींनी पुण्यातील काही लोकांना बोलावले होते आणि त्यातील एक भाग्यवान मी होते. लतादीदींचे ते गाणे ऐकताना  त्यांच्या आवाजाचा प्रत्यक्ष थरार मी अनुभवला आणि त्यावेळेला आपले आयुष्य आता थांबले तरी चालेल असे वाटले. त्यांच्या आवाजातील ती जादू प्रत्यक्ष अनुभविण्याचे भाग्य मला मिळाले. रेकाॅर्डिंग झाल्यानंतर स्वतःचेच गाणे अत्यंत नम्रपणे ऐकणाऱ्या  लतादीदींनी  मी कधी विसरू शकणार नाही, अशी आठवण  भारतीय चित्रपटांच्या अभ्यासक सुलभा तेरणीकर यांनी सांगितली.

पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचच्यावतीने गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्यांवर आधारित  ‘ मै नही तो क्या…’ या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले. यावेळी डॉ. सुनिल देवधर, डॉ. गौरी दामले, लायन शरदचंद्र पाटणकर, दत्ता सागरे, आनंद सराफ, जोत्स्ना सरदेशपांडे, डॉ. सतीश देसाई,संजय मरळ, प्रकाश भोंडे आणि सदानंद लोणकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन किशोर सरपोतदार व मुख्य  समन्वयक अजित कुमठेकर यांनी केले.

कार्यक्रमात गायिका मनिषा निश्चल यांनी लता मंगेशकर यांच्या हिंदी-मराठी गाण्यांचे सादरीकरण केले. प्रसन्न बाम (संवादिनी), अमिक पुंडे (तबला) यांनी साथसंगत केली.

सुलभा तेरणीकर म्हणाल्या, सन १९४२ च्या मार्च महिन्यात पुण्यात सरस्वती सिनेटोनच्या ‘किती हसाल’साठी लतादीदींना गायला बोलावले होते. दिग्दर्शक वसंत जोगळेकर लिहितात, ‘एक कृश, सावळी मुलगी होती; पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू आणि कमालीचे तेजस्वी पाणीदार डोळे लक्षवेधी होते.’ या घटना म्हणजे आपल्यासाठी लतादीदींच्या आठवणींचा खजिनाच आहे, असेही त्यांनी सांगितले.

मनिषा निश्चल यांनी चलते चलते, यूँही कोई मिल गया था…मन डोले मेरा तन डोले… ओ सजना बरखा बहार आयी… कभी कभी मेरे दिल मे… मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा… निळ्या आभाळी, कातरवेळी  अशा हिंदी-मराठी गीतांच्या सादरीकरणाने लता दिंदीच्या आठवणींना उजाळा दिला.

फडणवीसांनी अब्दुल सत्तारांना झापले

0

मुबई-काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच सुनावल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार राज्य सरकारच्या काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत परस्पर जाहीर वक्तव्य केल्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस संतापले.तसेच, यापुढे कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका, अशी सक्त ताकीद फडणवीसांनी अब्दुल सत्तार यांच्यासह उतावीळ मंत्र्यांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मंत्र्यांना समज दिल्याची माहिती आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही नवीन सन्मान योजना राबवण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. याबाबत शिंदे- फडणवीस अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच ही माहिती प्रसारमाध्यमांमध्ये फुटली. त्यामुळे सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेतली. मंत्रिमंडळ बैठकीतच फडणवीसांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरत ही माहिती फोडल्याबद्दल जाब विचारला.

तुम्ही माहिती जाहीर कशी केली? फडणवीसांची सक्त ताकीद

फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांना थेट विचारणाच केली की, शेतकरी सन्मान योजनेबाबत कोणताही निर्णय झालेला नसताना तुम्ही ही माहिती जाहीर कशी केली? त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्तार यांना खडसावले. त्यावर अब्दुल सत्तार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सत्तार यांनी सांगितले, आपण निर्णय झाल्याचे माध्यमांना म्हणालो नाही, तर विचार सुरू असल्याचेच सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्र्यांचे समाधान झाले नाही व त्यांनी परस्पर लोकप्रिय घोषणा करणाऱ्या सर्वच मंत्र्यांना सक्त ताकीद दिली.फडणवीस यांनी मंत्र्यांना ताकीद दिली की, केवळ विचार सुरू असताना घोषणा केल्यास त्या निर्णयाचे महत्त्व निघून जाते. कोणताही निर्णय जाहीर करण्याचे अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडेच आहेत. एखाद्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी देणे किंवा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही मंत्र्याने अशा सवंग घोषणा करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करा, परस्पर घोषणा करू नका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे परस्पर घोषणा करणाऱ्या मंत्र्यांची चांगलीच कोंडी झाली.

ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश

0

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्राथमिक अधिसूचना जाहीर

मुंबई, दि.१३ : ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी दि. १२ सप्टेंबर रोजी नगरविकास विभागामार्फत त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामाली, नारीवली, बाळे, नागाव, भंडाली, उत्तरशिव आणि गोटेघर या १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने माहे जानेवारी २०२१ ते मे २०२२ कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.  मात्र ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याची कार्यवाही सुरू असल्याने त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहीर झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर कार्यक्रमानुसार या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या आणि त्यानंतर हद्दवाढीची कार्यवाही झाल्यास ग्रामपंचायतींचे अस्तित्व संपुष्टात येईल. नव्याने स्थापित नागरी प्राधिकरणांच्या निवडणुका घ्याव्या लागतील परिणामी निवडणुकीवर दुहेरी खर्च होईल. याबाबी विचारात घेता ठाणे तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांना पत्र पाठविले आहे.

मेक्सिको संसदभवनाच्या आवारात नव्या भारत आणि मेक्सिको ऑरगॅनिक मैत्री उद्यानाचे उद्घाटन

0

मेक्सिन सिटी, मेक्सिको, १३ सप्टेंबर २०२२ – युपीएल या शाश्वत शेतीसाठी लागणारी उत्पादने व सेवा पुरवणाऱ्या जागतिक पुरवठादार कंपनीने मेक्सिकोमधील भारतीय दुतावासाच्या सहकार्याने सन्माननीय चेंबर ऑफ ड्युटीजशी करार केला असून या कराराअंतर्गत मेक्सिकोच्या संसद भवनाच्या आवारातील उद्यानाचे सौंदर्यीकरण व देखभाल केले जाणार आहे.

तीन घटकांमधील बांधिलकीचे प्रतीक असलेल्या मैत्री उद्यानाच्या आज झालेल्या उद्घाटनासह शाश्वतता आणि हरित जागांच्या प्रसाराला चालना दिली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मान्यवरांनी लावलेल्या उपस्थितीने आम्ही भारावून गेलो असून लोकसभेचे अध्यक्ष (लोकसभा), भारतीय संसद, मेक्सिकोच्या चेंबर ऑफ डेप्युटीज समान, ए. ई. श्री. ओम बिर्ला जे मेक्सिकोच्या अधिकृत भेटीवर असलेल्या भारतीय संसद प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करत आहेत, त्यांनी आणि डिप. सर्जियो गुटेरेझ लुना – मेक्सिकन चेंबर ऑफ डेप्युटीजचे अध्यक्ष यांनी एकत्रितपणे उद्घाटन केले.

ऑरगॅनिक मैत्री उद्यान – भारत आणि मेक्सिको स्थापन करण्यासाठी युपीएल जबाबदार असून त्याद्वारे कंपनीच्या नॅचरल प्लँट प्रोटेक्शन (एनपीपी) बिझनेस युनिट पोर्टफोलिओमधून शाश्वत जैवसुविधा व तंत्रज्ञान पुरवले जाते. या सुविधा मातीचे आरोग्य जपतात आणि पाण्याचा प्रभावी वापर करतात तसेच उद्यानातील झाडे व जैवविविधतेला चालना देतात. भारतात युपीएलने निकृष्ट झालेली वने व जमिनींच्या पुनर्वसनासाठी मोहीम हाती घेतली आहे. कंपनी स्थानिक भागधारकांना सहभागी करून घेत रोप ते जंगल धोरण राबवून वनाच्छादित जमीन वाढवण्यावर भर देते. समाजाला प्रोत्साहन देत या जंगलांच्या देखभालीसाठी प्रशिक्षित केले जाते व युपीएलद्वारे त्यासाठी आवश्यक सुविधा पुरवल्या जातात.

लोकसभेचे अध्यक्ष ए. ई. श्री. ओम बिर्ला म्हणाले, की आज उद्घाटन करण्यात आलेले उद्यान दोन्ही देशांतील मैत्री आणखी बळकट करेल आणि त्याचा सुगंध इतर देशांपर्यंत पोहोचेल.

डिप. सर्जियो गुटेरेझ लुना – मेक्सिकन चेंबर ऑफ डेप्युटीजचे अध्यक्ष म्हणाले, की चेंबर ऑफ डेप्युटीजला देण्यात आलेल्या या सुंदर  बगिचारूपी भेटीने आम्ही भारावून गेलो आहोत. हे उद्यान भारत व मेक्सिको यांची स्वतंत्र ओळख तयार होण्यापूर्वीपासून त्यांच्यात अस्तित्वात असलेल्या शतकभर जुन्या मैत्रीचे प्रतीक आहे.

मेक्सिकोमधील भारताचे राजदूत एच. ई. पंकज शर्मा म्हणाले, की हे ऑरगॅनिक मैत्री उद्यान भारत व मेक्सिकोमधील दृढ मैत्रीची अभिव्यक्ती असून युपीएलने मेक्सिकोमधील हवामान व वने लक्षात घेऊन त्याची निर्मिती केली आहे. त्याद्वारे मानव व निसर्गातील सेंद्रीय नाते जपण्याचाही प्रयत्न आहे.

भारत व मेक्सिको मैत्री समूहाचे अध्यक्ष डिप. साल्वाडोर कॅरो कॅब्रेरा म्हणाले, की हे उद्याने मैत्रीचे प्रतीक म्हणून कायम अस्तित्वात राहील.

युपीएल एलएटीएएम प्रादेशिक विपणन संचालक अमित अगरवाल म्हणाले, की युपीएल मेक्सिको व तिथल्या शेतकऱ्यांसाठी इतिहासाचे संवर्धन करतो आणि एक नवा उपक्रम अस्तित्वात येताना पाहाणे अनोखे आहे. हे बहारदार उद्यान हवामानाच्या दृष्टीने स्मार्ट सुविधा व तंत्रज्ञान कशाप्रकारे शाश्वततेची नवी समीकरणे मांडण्यासाठी व पर्यायने झाडांचे व आपल्या पृथ्वीचे आरोग्य जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते याचे उत्तम उदाहरण आहे.उद्घाटन दिनी युपीएल एलएटीएएम प्रादेशिक विपणन संचालक अमित अगरवाल एलआयसी, रॉबर्टो एक्सलांते – जनरल डिरेक्टर मेक्सिको आणि क्युबा व इतर टीम सदस्यांचे प्रतिनिधीत्व केले.

पुण्यात बनावट पनीर बनविणाऱ्या आणखी एका कारखान्यावर धाड, तिसरी कारवाई

0

टिळेकरनगर परिसरातील मे.सद्गुरू कृपा मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या कारखान्यावर कारवाई

पुणे, दि. १३ : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर परिसरातील मे.सद्गुरू कृपा मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या कारखान्यावर कारवाई करून २२ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा बनावट पनीर, स्किम्ड मिल्क पावडर, पामेलिन तेल आदी साठा जप्त केला. ५ सप्टेंबरपासून नकली पनीर बनवणाऱ्या तिसऱ्या कारखान्यावर ही कारवाई झाली आहे.

कारखान्यावर छापा टाकला असता अस्वच्छ परिस्थितीत दूध पावडर आणि पामोलिन तेलाचा वापर करुन बनवलेले बनावट पनीर तसेच स्किम्ड मिल्क पावडर व पामोलिन तेल साठविल्याचे आढळले. साठ्यातून तपासणीसाठी नमुने घेत किंमत २ लाख ३९ हजार ८०० रूपये किंमतीचे १ हजार १९९ किलो पनीर, १८ लाख ७१ हजार ६५२ रूपये किंमतीचे ४ हजार ७३ किलो स्किम्ड मिल्क पावडर, १ लाख ५३ हजार ६७५ रूपये किंमतीचे १ हजार ४८ किलो आरबीडी पामोलीन तेल असा एकूण २२ लाख ६५ हजार २१७ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. घेतलेले नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले असून अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड आणि आयुक्त परिमलसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कार्यालयातील सहायक आयुक्त रुपाली खामणे, अन्न सुरक्षा अधिकारी सुप्रिया जगपात व सोपान इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

कोविड काळात काम करणाऱ्याकामगारांना कायम करा;राज्य सरकारने दिले महापालिकेला आदेश- कामगारनेते यशवंत भोसले यांची माहिती

0

पुणे-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कोविड काळामध्ये मानधनावर काम करणाऱ्या 687 कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे असे आदेश राज्य सरकारने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दिले आहेत अशी माहिती कामगार नेते व राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी दिली आहे.

भोसले म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कोरोना काळामध्ये एएनएम, जीएनएम नर्सेस, टेक्निशियन अशा विविध पदांवर मानधनावर कर्मचारी काम करीत होते. या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे असा ठराव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 18 मार्च 2020 रोजी मंजूर केला होता.

अर्जाकडे दुर्लक्ष केले

हा ठराव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. यामध्ये आरोग्य व वैद्यकीय विभागातील विविध पदांचा समावेश होता. या ठरावास शासनाची मंजुरी मिळण्याच्या अगोदरच पिंपरी चिंचवड आयुक्तांनी 2021 मध्ये नर्सेस व आरोग्यातील तांत्रिक कर्मचाऱ्यांची नवीन कामगार भरतीची जाहिरात विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध देऊन त्याची प्रक्रिया सुरू केली होती. याबाबत राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला होता. या अर्जाकडे दुर्लक्ष करून आयुक्तांनी भरती प्रक्रिया सुरू ठेवली होती.

8 सप्टेंबरला अध्यादेश जारी

याबाबत उच्च न्यायालय मुंबई येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आदेश दिले आहेत की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पाठवलेल्या ठरावाबाबत सहा आठवड्यात निर्णय घ्यावा. त्यानंतर राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने राज्यपाल यांच्या सहीने 8 सप्टेंबर 2022 रोजी अध्यादेश जारी केला आहे.

कार्यपूर्ती अहवाल सादर करा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने वैद्यकीय संवर्गातील मानधना वरील वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना नियमित करणे बाबतच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सुनावणी झाली असून याबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून कार्यपूर्ती अहवाल सादर करावा. कोविड काळात कार्यरत कर्मचाऱ्यांनी महत्त्वाचे काम केले असल्याबाबत आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी यापूर्वी कळवलेले आहे. तसेच आयुक्त यांनी त्यांच्या प्रस्तावामध्ये सदरची पदे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणले आहे.

दूरगामी फायदा होणार

सदर अभिप्रायच्या आधारे आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या आधारे या 687 एकत्रित मानधन तत्वावरील कार्यरत कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. याचा एकूण 687 मानधनावरील कर्मचाऱ्यांना लाभ होणार असून त्याचबरोबर राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लाखो कर्मचाऱ्यांना देखील या आदेशाचा दूरगामी फायदा होणार आहे.

शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त; औरंगाबाद उच्च न्यायालयाचा आदेश

0

आघाडी सरकारने नेमले विश्वस्त बरखास्त झाल्याने शिंदे सरकार नवीन विश्वस्त मंडळ नेमणार

औरंगाबाद-साईबाबा संस्थानाचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर 16 सदस्यांची नेमणूक विश्वस्त मंडळात करण्यात आली होती. मात्र, हे विश्वस्त नियमाला धरून नसल्याने त्याचा आक्षेप याचिकाकर्ते उत्तमराव शेळके यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली होती.

गेल्या अनेक दिवसांपासून या याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यानंतर आजा याप्रकरणाचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. त्यानुसार, साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिलेले आहेत. त्याचबरोबर पुढील दोन महिन्यात नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याचेही कोर्टाने सांगितले आहे. तोपर्यंत साई संस्थानचे कामकाज त्रिसदस्यीय समिती पाहणार आहे.

जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी आणि साईबाबा संस्थानेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या तिघांनी दोन महिने हा कारभार पाहायचा आहे. मात्र, हा कारभार पाहताना त्यांनी कुठलेही आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घ्यायचे नाही, असे देखील कोर्टाने बजावले आहे. त्यामुळे आता आघाडी सरकारने नेमले विश्वस्त बरखास्त झाल्याने शिंदे सरकार नवीन विश्वस्त मंडळ कधी नेमणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर रशिया दौर्‍यावर रवाना

0

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण, तैलचित्राचे अनावरण

मुंबई, 12 सप्टेंबर
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण तसेच तैलचित्राचे अनावरण अशा दोन कार्यक्रमांसाठी आज रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर हे रशिया दौर्‍यावर रवाना झाले. विनय सहस्त्रबुद्धे हे सुद्धा या दौर्‍यात असतील.

या दौर्‍यात उद्या, दि. 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी देवेंद्र फडणवीस हे रशियातील भारतीय समुदायासोबत एका कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्याशी संवाद साधतील. दि. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर, मॉस्को येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे ते लोकार्पण करतील, तर त्याचदिवशी सायंकाळी मॉस्कोतील भारतीय दुतावासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण करतील. इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स, लोमोनोसोव्ह मॉस्को युनिव्हर्सिटी, द इन्स्टिट्युट ऑफ ओरिएंटल स्टडिज ऑफ द रशियन अ‍ॅकडमी ऑफ सायन्स, रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज, पुश्किन रशियन लँगवेज इन्स्टिट्युट, सेंट पिटसबर्ग युनिव्हर्सिटी अशा अनेक संस्था या आयोजनात सहभागी आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारत-रशिया संबंधांची 75 वर्षे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे रशियातील वास्तव्य आणि त्यांच्या साहित्याचा रशियात असलेला प्रभाव असे सर्व योग साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय काही उद्योजक आणि कंपन्यांसोबत सुद्धा महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या अनुषंगाने या दौर्‍यात भेटीगाठी होणार आहेत.

यापूर्वी लंडनमधील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, जपानमधील विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अशा कार्यक्रमांसाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे त्या-त्या देशांमध्ये गेले होते. आता अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक रशियात होत असल्याने महाराष्ट्रासाठी हा मोठा गौरवाचा विषय आहे आणि त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

काऊचा मान मोठा …

0

काव काव काव…आजूबाजूच्या गल्लीत जवळपास सगळीकडेच काव काव काव अशी हाक मारताना दिसणारे पाहिले किंवा कानावर पडणारे आवाज ऐकले की समजावं पितृपक्ष सुरू झाला आहे. अनंत चतुर्दशीनंतर पौर्णिमा झाली की पितृपक्ष चालू होतो तो सर्वपित्री अमावस्येला संपतो. यास ‘पितृ पंधरवडा’ असेही म्हणतात. कोकणात याला ‘म्हाळवस’ असा शब्द प्रचलित आहे. 
एरवी हाट हाट करून गॅलरीत किंवा अंगणात येणाऱ्या कावळ्यांना उडवून लावले जाते; पण पितृपक्षात मात्र त्यांचा मोठा मान असतो. पितृपक्षातील श्राद्धात ठेवल्या जाणाऱ्या पिंडाला किंवा वाडीला कावळ्याने चटकन येऊन शिवले की त्या घरातील मंडळींना धन्य झाल्यासारखे वाटते. 
असे मानले जाते की जर त्या आत्म्याची कशातच वासना राहिलेली नसेल तर पटकन कावळा त्या पिंडाला शिवतो. अन्यथा तासनतास गेले तरी शिवत नाही. कारण आत्मा त्या पिंडावर बसलेला असतो व तो कावळ्याला जवळ येऊ देत नाही. असं म्हणतात की, फक्त कावळा आणि कुत्रा या दोनच प्राण्यांना मृत्यू व आत्मा दिसतो. कावळ्याला पितृपक्षात एवढे महत्त्व देण्याची आणखीही बरीच कारणे आहेत. माणसांना फक्त उजेडातच दिसते. मांजराला उजेडात तसेच अंधारातही दिसते. वटवाघूळ व घुबडाला फक्त अंधारातच दिसते. यावरून स्पष्ट होते की प्रत्येकाला वेगवेगळी दृष्टी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे पिंडातील जीवात्मा दिसण्याची दृष्टी कावळ्यास मिळाली आहे, असं मानलं जातं. आज आपण एवढी वैज्ञानिक प्रगती केलेली असली आणि डोळ्याप्रमाणे लेन्स तयार केली असली तरी जीवात्मा पाहू शकलेलो नाहीत. कारण लेन्स तयार झालेली असली तरी तिच्यात ती कावळ्याची दृष्टी पाहण्यासाठीचे प्राण नाहीत!पितृपक्षात आणि श्राद्धात मोठा मान असणाऱ्या कावळ्याबद्दल कुतूहलापोटी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता रंजक माहिती मिळाली ती अशी – कावळ्याची स्मरणशक्ती खूपच चांगली असते तसेच तो खूप बुद्धिमानही आहे. कावळ्याबद्दल असेही म्हटले जाते की तो एकाच डोळ्याने पाहू शकतो, म्हणून त्याला ‘एकाक्ष’ म्हणतात.जुनी जाणती वयोवृद्ध मंडळी तर कावळ्याने कुठे घर बांधले आहे यावरून पावसाचा अंदाज ठरवतात. वनअभ्यासक, साहित्यिक व पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकातून या विषयी अधिक माहिती मिळते. काही ठिकाणी रोजच्या अन्नातील एक घास कावळ्यासाठी काढून ठेवण्याची प्रथा आहे, यास काकबली असे म्हणतात. व्यकंटेश स्तोत्रात ‘काकविष्ठेचे झाले पिंपळ’ असे म्हटले आहे. कारण पिंपळ, वड यांसारख्या झाडांची फळे कावळे खातात. त्यांच्या विष्ठेतून वडपिंपळाच्या बिया बाहेर पडतात आणि त्या रुजतात. महाराष्ट्रातच नाही तर इतर अनेक देशांमध्ये सुद्धा निरनिराळ्या पद्धतीने पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. म्हणजेच ही कृतज्ञ राहण्याची भावना जगाच्या पाठीवरही एकसारखीच आहे. 
पितृपक्षात आपले पितर, आपले पूर्वजच आपल्याला आशिर्वाद द्यायला येतात तर मग पितृपंधरवडा हा अशुभ कसा मानायचा? हे दिवसही शुभ मानायलाच हवेत की! त्या निमित्ताने मदत, दानधर्म किंवा काही सामाजिक कार्य केले तर आपल्या पूर्वजांना ते नक्की आवडेल. कावळ्याच्या रूपाने आलेला त्यांचा आत्माही पिंडाला नक्कीच शिवेल आणि आपले पूर्वज  आपल्याला भरभरून आशिर्वाद देतील. कावळ्याची वाडी ठेवताना ती अशा जागी ठेवली तर जेणेकरून सगळीकडे ते अन्न सांडणारही नाही आणि कावळा अथवा इतर पशुपक्षी ते अन्न खाऊ शकतील. 
जन्मानंतरचा पहिला घास काऊच्या साक्षीनं खाणाऱ्या माणसाचा शेवटचा प्रवास कावळ्याच्या उपस्थितीशिवाय अपूर्ण आहे, एवढं मात्र खरं. आपल्या धार्मिक परंपरेचा, विधीचा आदर राखून त्याला आधुनिकतेची जोड देऊन सामाजिक बांधिलकीतून पितृपक्षातील कार्य करायला काय हरकत आहे. त्याचप्रमाणे आताच्या या काळात सहजासहजी न दिसणारा कावळा पक्षी पुढे जाऊन नामशेष होणार नाही ना याचीही काळजी घ्यायला हवीच आहे…नाहीतर वड, पिंपळ यांसारख्या वृक्षांच्या जातीही नामशेष होतील की. निसर्गाचे हे चक्र असेच अबाधित राहण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत.अन्यथा अजून काही वर्षांनी चिऊ ये… .काऊ ये…असे म्हणताना हे पशुपक्षी फक्त पुस्तकातूनच हजेरी लावतील.या सर्व बाबींचा विचार करून निसर्गाचा समतोल सांभाळून पिंडाला शिवण्यासाठी येणाऱ्या आत्मरूपी कावळ्याला सद्भावनेने नमस्कार करून म्हणावे काव काव काव…ये…रे…ये…
पूर्णिमा नार्वेकर, दहिसर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातीलनवीन आधुनिकीकरण झालेल्या सभागृहाचे उद्घाटन

0

मुंबई दि. १२ सप्टेंबर – मंत्रालयामधील मुख्य इमारतीच्या सातव्या मजल्यावरील परिषद सभागृह क्रमांक ५ या सभागृहाचे आधूनिकीकरण करण्यात आलेले आहे. या सभागृहाचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
सभागृह क्रमांक ५ चे आधुनिकीकरण अत्यंत आकर्षक व सुंदर पध्दतीने करण्यात आले आहे. सदर सभागृह प्रशस्त असून आसन व्यवस्था उत्तम आहे. सदरील परिषद सभागृहामध्ये मंत्री तसेच सचिव यांच्या बैठका आयोजित करण्यात येणार आाहेत. या सभागृहाची आसन व्यवस्था ५० इतकी आहे.

वानवडी येथील पनीर कारखान्यावर कारवाई

0

पुणे, दि. १२ : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने वानवडी येथील बनावट पनीर तयार करणाऱ्या मे. टिपटॉप डेअरी प्रॉडक्टस या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारुन बनावट पनीर बनवित असल्याचे आढळून आल्याने कारवाई करुन साठा जप्त करण्यात आला.

कारखान्यावर छापा टाकला असता ८०० किलो बनावट पनीर तयार करून ठेवल्याचे आढळले. हे पनीर तयार करण्यासाठी ३५० किलो स्किम्ड मिल्क पावडर व २७० किलो पामोलिन तेल साठविल्याचे आढळले. साठ्यातुन तपासणीसाठी नमुने घेत किंमत १ लाख ६७ हजार ७९० रूपये किमतीचे ७९९ किलो पनीर, १ लाख २१ हजार ८०० रूपये किमतीचे ३४८ किलो स्किम्ड मिल्क पावडर, ३९ हजार ६६४ रूपये किमतीचे २६८ किलो आर बी डी पामोलीन तेल असा एकूण ३ लाख २९ हजार २५४ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. सदर नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले असून अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सहायक आयुक्त बाळू ठाकूर, अन्न सुरक्षा अधिकारी निलेश खोसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

अपघातांची कारणे शोधून उपाययोजनांवर भर द्यावा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

0

पुणे, दि. १२: रस्ते अपघाताच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस तसेच परिवहन विभाग यांनी दरमहा बैठक घ्यावी. याद्वारे कार्यक्षेत्रात झालेल्या अपघातांची कारणे शोधून त्याठिकाणी भविष्यातील अपघात टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, पुणे शहरचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) राहूल श्रीरामे आदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये पुणे ग्रामीण पोलीस तसेच पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षात झालेल्या अपघातांचा व त्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचएआय, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम-राष्ट्रीय महामार्ग विभाग, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील धोकादायक अपघात ठिकाणांबाबतचा (ब्लॅकस्पॉट) आढावा घेऊन केलेल्या उपाययोजना व त्यानंतर अपघात प्रमाणात झालेली घट याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी अपघात नोंदणी व विश्लेषण प्रणालीबाबत (आयरॅड) सादरीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख त्यावर म्हणाले, ‘आयरॅड’ प्रणालीवर प्रत्येक अपघाताची नोंद होणे अपघातस्थळाची सर्वंकष माहिती होण्यासाठी उपयुक्त आहे. त्यातून संबंधित ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांकडे प्राधान्याने लक्ष केंद्रीत करता येऊन भविष्यातील अपघातानांना आळा घातला जाऊ शकतो. या ॲपद्वारे माहिती भरणे बंधनकारक असून सर्व संबंधित विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन याची काटेकोर अंमलबजावणी करावी. ‘आयरॅड’वर खासगी रुग्णालयांनी अपघातातील रुग्णांची माहिती भरण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना द्याव्यात.

संत तुकाराम महाराज पालखी राष्ट्रीय महामार्गाबाबतच्या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील ग्रामस्थांच्या समस्यांसंदर्भात एनएचएआयचे कार्यकारी अभियंता तसेच ग्रामस्थांचे म्हणणे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख तसेच समिती सदस्यांनी ऐकून घेतले. या ठिकाणी एनएचएआयने त्यांचे रस्ता सुरक्षा सल्लागार, पोलीस विभाग, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा संयुक्त पाहणी करुन त्याचा अहवाल द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

पुणे ग्रामीण पोलीसांना देणार दोन स्पीडगन
ग्रामीण पोलीस वाहतूक विभागाच्या मागणीनुसार रस्ता सुरक्षा निधीतून वाहनांचा वेग मोजण्यासाठी २ स्पीडगन लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यात याव्यात असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

बैठकीस पीएमआरडीए, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड मनपा, पुणे जिल्हा परिषद, पोलीस विभाग, पीएमपीएमएल, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभाग, शिक्षण, एसटी महामंडळ, तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मेमनचे हस्तक होण्यापेक्षा मोदींचे सहकारी होऊ-शिंदेंची ठाकरेंवर टीका

0

पैठण-दाऊद-मेमनचे हस्तक होण्यापेक्षा मोदींचा सहकारी होऊ. आम्हाला साबणाचे बुडबुडे म्हणणाऱ्यांची आम्ही त्याच साबनाने धुलाई केली, अशी टीका सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.मुख्यमंत्री शिंदे यांची पैठणमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या नाराजी नाट्यावर भाष्य केले. शिवाय सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली.

मुख्यमंत्री म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांना पसंती देणारी ही पैठणमधील गर्दी आहे. आमची लढाई सोपी नव्हती. सर्वचजण आमचा कार्यक्रम करायला टपले होते. आमचे पन्नास लोक ठाकरे गटाला, मविआला पुरून उरले. आम्ही सत्तेतून पायउतार झालो आणि आम्ही विरोधकांकडे गेलो.

मुख्यमंत्री म्हणाले, पन्नास आमदार विरोधकांच्या गोटात जातात हे जगातील एकमेव उदाहरण आहे. आमच्यामागे लाखो लोकांचे आशीर्वाद होता. मला भाजप, शिवसेनेच्या लोकांनी माझी स्तुती केली. मी चांगले काम करुन त्यांचा वनवास संपवला. अडीच वर्षे समाजात नकारात्मक भाव होते. आम्ही हे जाणले आणि लोकांना मोकळा श्वास घेण्यासाठी पाऊले उचलली. लोकभावनेला हात घालून दहिहंडी आणि गणेशोत्सवातील बंधने मोकळी केली.

टाटा मेमोरियलचा स्तनाचा कर्करोग बरा होण्याचा दर आणि जगण्याचा दर लक्षणीयरीत्या वाढवण्यासाठी सोपा आणि कमी खर्चाचा अभ्यास

0

मुंबई, 12 सप्टेंबर 2022

टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (ESMO) वैद्यकीय परिषदेमध्ये भारतीय ऐतिहासिक बहुकेंद्रीय स्तनाच्या कर्करोगाच्या अभ्यासाचे निकाल आज सादर केले. वार्षिक ESMO परिषद ही जगातील सर्वात प्रतिष्ठित कर्करोग परिषदांपैकी एक आहे आणि दरवर्षी युरोपमध्ये आयोजित केली जाते.

“लवकर निदान झालेल्या स्तनाच्या कर्करोगात रुग्णांना शस्त्रक्रियेपूर्वी ट्यूमरच्या भागात भूल देण्याचा, उपचार पश्चात त्यांच्या जगण्यावर होणार परिणाम’ हा अभ्यास एक यादृच्छिक नियंत्रित परीक्षण आहे, ज्याची संकल्पना आणि रचना डॉ. बडवे यांनी केली आहे, जे ह्या अभ्यासाचे प्रमुख संशोधक देखील आहेत आणि 2011 ते 2022 दरम्यानच्या 11  वर्षांच्या कालावधीत मुंबईतील टाटा स्मारक केंद्रासह भारतात 11  कर्करोग केंद्रांवर संशोधकांनी हे योजित केले आहे.

या अभ्यासात स्तन कर्करोगाचा लवकर निदान झालेल्या 1600 महिलांचा समावेश होता ज्यांच्यावर शस्त्रक्रियेद्वारे उपचार करण्याची योजना होती. यापैकी निम्म्या रुग्णांचा समावेश नियंत्रण गटामध्ये (गट 1) होता, त्यांना मानक शस्त्रक्रिया आणि त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वांनुसार केमोथेरपी, हार्मोन थेरपी आणि रेडिओथेरपीसह शस्त्रक्रिया पश्चातच्या मानक उपचार मिळाले. इतर अर्ध्या रुग्णांना, जे अभ्यास गटामध्ये (गट 2) होते, त्यांना शस्त्रक्रियेच्या अगदी आधी, ट्यूमरच्या सभोवताली, सामान्यतः वापरली जाणारी एक स्थानिक भूल औषधीचे (0.5% लिग्नोकेन) इंजेक्शन मिळाले. त्यानंतर त्यांच्यावर मानक शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर नियंत्रण गटात दिल्या गेलेल्या शस्त्रक्रिया पश्चातच्या उपचारांनुसार उपचार केले गेले. डॉ. बडवे यांच्या मागील संशोधनाने असे सुचवले आहे की शस्त्रक्रियेद्वारे प्राथमिक कर्करोग काढून टाकण्याच्या अगदी अगोदर, दरम्यान आणि नंतर लगेचच एक संधी उपलब्ध असते जेव्हा कर्करोगविरोधी औषधाने रुग्णाच्या पुढील आयुष्यात प्रसारित स्टेज ४ (प्रगत अवस्था) च्या पसरणाऱ्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

लिग्नोकेन, जे सामान्यतः वापरले जाणारे आणि स्वस्त, स्थानिक भूल देणारे औषध आहे, त्याचे कर्करोगाच्या पेशींचे विभाजन, हालचाल आणि इतर कर्करोग-विरोधी गुणधर्मांवर प्रतिबंधात्मक प्रभावामुळे ते एक योग्य हस्तक्षेप असल्याचे मानले जाते.

ट्यूमर सभोवताली इंजेक्शनच्या तंत्राचे रेखाचित्रातून याविषयी माहिती मिळते. खाली दर्शविले आहे जे सोपे आहे आणि ज्यास कोणत्याही अतिरिक्त स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही.

उपचार पूर्ण झाल्यानंतर नियंत्रण गट (गट 1) आणि स्थानिक भूल गट (गट 2) यांच्यातील बरे होण्याच्या दरांची आणि जगण्याच्या दरांची तुलना करण्यासाठी रुग्णांचा अनेक वर्षे नियमितपणे पाठपुरावा करण्यात आला. जेव्हा दोन्ही गटांमध्ये पुरेसा पाठपुरावा झाला तेव्हा सप्टेंबर 2021 मध्ये उपलब्ध डेटाचे विश्लेषण केले गेले. अपेक्षेप्रमाणे, लिग्नोकेन प्राप्त झालेल्या रुग्णांमध्ये विषाक्तता नव्हती. 6 वर्षांचे रोग-मुक्त जगणे (बरा होण्याचा दर) नियंत्रण गटात 81.7% आणि स्थानिक भूल देण्याच्या गटात 86.1% होता आणि स्थानिक भूल देऊन कर्करोगाच्या पुनरावृत्ती किंवा मृत्यूच्या जोखमीमध्ये 26% सापेक्ष घट झाली, जी सांख्यिकीयदृष्ट्या महत्वाची होती. त्याचप्रमाणे दोन गटांमध्ये 6 वर्षांत रुग्णांचे एकूण जगणे 86.2% च्या तुलनेत 89.9% होते आणि स्थानिक भूल देणार्‍या इंजेक्शनने मृत्यूच्या जोखमीत 29% घट झाली, जी देखील सांख्यिकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची होती. कालांतराने दोन अभ्यास गटांमध्ये रोगमुक्त जगणे आणि एकूण उत्तरजीविता खाली चित्रित करण्यात आले आहे.

रोगमुक्त जगणे

एकूण उत्तर जीविता

हे फायदे लक्षणीय आहेत आणि हस्तक्षेपाने (औषधीने) प्राप्त झाले ज्याची किंमत प्रति रुग्ण रु. 100/- पेक्षाही कमी होती. ह्याच्या तुलनेत, लवकर निदान झालेल्या स्तनाच्या कर्करोगाच्या रूग्णांमध्ये अधिक महाग, लक्ष्यित औषधांद्वारे खूपच कमी प्रमाणात फायदे साध्य केले गेले आहेत ज्याची किंमत प्रति रुग्ण दहा लाखांपेक्षा जास्त आहे.

डॉ. बडवे यांच्या सादरीकरणानंतर त्यांनी लगेचच पॅरिसमधून आपली प्रतिक्रिया दिली, ” जागतिक स्तरावर हा अशा प्रकारचा पहिला अभ्यास आहे, ज्याने शस्त्रक्रियेपूर्वी एकल हस्तक्षेपाने मोठा फायदा दर्शविला आहे. जगभरात लागू केल्यास, ह्याने दरवर्षी 100,000 पेक्षा जास्त जीव वाचवता येईल. शास्त्रज्ञांसाठी, शस्त्रक्रियेच्या [निरीक्षण] कृतीवर कर्करोगाची घातक प्रतिक्रिया टाळण्यासाठी कर्करोगाच्या वातावरणात अशा प्रकारे सुधारणा करण्यासाठी हे शस्त्रक्रिया पूर्वी हस्तक्षेपाचे पर्याय निर्माण करते. टाटा स्मारक केंद्र  आणि अणुऊर्जा विभागाचे ध्येय भारतीय आणि जागतिक लोकसंख्येच्या फायद्याकरिता, कर्करोगासाठी कमी खर्चात हस्तक्षेप विकसित करणे आहे आणि अणुऊर्जा विभागाद्वारे समर्थित हा अभ्यास आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

टाटा स्मारक केंद्र मधील मेडिकल ऑन्कोलॉजीचे प्रोफेसर, आणि ACTREC चे संचालक, डॉ. सुदीप गुप्ता, जे अभ्यासाचे एक सहायक संशोधक देखील आहेत, ते म्हणाले: “हा अभ्यास स्तनाच्या कर्करोगावर एक स्वस्त आणि तात्काळ लागू करण्यायोग्य उपचार प्रदान करतो ज्याचा उपयोग या आजारावर उपचार करणाऱ्या प्रत्येक सर्जनद्वारे केला जाऊ शकतो. मोठ्या यादृच्छिक चाचणीचे परिणाम, जे नवीन उपचारांच्या महत्वाचे मूल्यमापन करण्याचा सुवर्ण-मानक मार्ग आहे, ते या तंत्राच्या वापरास समर्थन देण्यासाठी सर्वोच्च पातळीचे पुरावे प्रदान करतात. हा अभ्यास याचा पुरावा आहे की भारतीय केंद्रे जागतिक प्रभाव असणाऱ्या अभ्यासाची रचना आणि आयोजन करू शकतात.”

अभ्यास संघ:

क्रमांकसंस्थेचे नावसंशोधक
 टाटा स्मारक केंद्र, मुंबई,डॉ. राजेंद्र बडवेडॉ. सुदीप गुप्ताडॉ. वाणी परमारडॉ. नीता नायरडॉ. शलाका जोशीकु. रोहिणी हवालदारकु. शबिना सिद्दीकीश्री. वैभव वनमाळीकु. अश्विनी देवडेकु. वर्षा गायकवाड
 कोल्हापूर कॅन्सर सेंटर, कोल्हापूरडॉ. सूरज पवार
 मॅक्स सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल, पटपरगंज, नवी दिल्लीडॉ. गीता कडयप्रथ
 बी. बोरूआ कॅन्सर इन्स्टिट्यूट, गुवाहाटीडॉ. बिभूती भुसन बोरठाकूर
 बसवतारकम इंडो-अमेरिकन कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, हैदराबादडॉ. सुब्रमण्येश्वर राव थम्मिनेदी
 गुजरात कॅन्सर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, अहमदाबादडॉ शशांक पांड्या,
 मलबार कॅन्सर सेंटर (MCC), कोडियेरी, थलासेरी, कन्नूरडॉ. सठेसन बी
 सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल, मिरजडॉ.पी.व्ही.चितळे _
 स्टर्लिंग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणेडॉ. राकेश नेवे
 नॉर्थ ईस्टर्न इंदिरा गांधी रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल सायन्सेस (NEIGRIHMS), शिलाँग,डॉ. कॅलेब हॅरिस
 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्लीडॉ. अनुराग श्रीवास्तव

अधिक माहितीसाठी संपर्क: डॉ सुदीप गुप्ता, टाटा मेमोरियल सेंटर: 9821298642