Home Blog Page 1609

नाना पटोलेंनी नाशकातून हि दिला स्वबळावर लढण्याचा नारा

नाशिक- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी असतात. आगामी महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका काँग्रेस महाविकास आघाडीसोबत नव्हे तर स्वबळावर लढेल, असे ते म्हणालेत.नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाच्या मंथन शिबीराच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष पटोले नाशिकला आले हाेते. प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी एकला चलो ची भूमिका घेतली. रज्यात मुंबई सह अन्य महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही पूर्ण केली असल्याचे पटोले यांनी सांगितले आहे.

माध्यमांनी काळजी करू नये.

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे पटाेले यांनी प्रसार माध्यमांशी बाेलताना सांगितले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी लढत असेल तर त्याची काळजी माध्यमांनी करू नये. एकेकाळी शिवसेना- भाजप एकत्र लढले हाेते. ते आता वेगळे लढत आहेत. त्यांचे मत विभाजनही होत असून त्याची काळजी करा असा सल्लाही त्यांनी दिला. जाती निहाय जनगणना करावी असा ठरावही मेळाव्यात मंजूर करण्यात आला.

नाना पाटोळे यांनी मांडलेले मुद्दे

  • ओबीसी, भटक्या विमुक्तंना त्रास देणाऱ्यांचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. – स्वातंत्र्याच्या लढ्यात आत्ताचे राज्यकर्ते कुठेच नव्हते ते इंग्रजांसोबत होते.
  • देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा फक्त 50 घरात लाईट होती, मात्र त्यानंतर काँग्रेसने देशाला उभे केले.
  • देशात भूक बळी सुरू होती तेंव्हा आईने मला रेशनच्या लाईन मध्ये भल्या पाहाटे उभे केल्याचे आठवते, मात्र त्यानंतर हरित क्रांती काँग्रेसने आणली आणि आज आपण धान्य निर्यात करतो आहे.
  • आशिष शेलारचा बिर्याणी खातानाचा फोटो सद्या व्हायरल होत आहे, याकूब मेमनचा भाऊ बिर्याणी खाऊ घालत होता. – जीएसटी कायद्याने सामान्य लोकांना लुटले जात आहे. – एक माणूस आता देशात श्रीमंत व्हायला निघाला आहे. त्याने घेतलेले कर्ज माफ करायला घेतले. 57 लाेकांचे 10 लाख कोटीचे कर्ज माफ केले. – उद्या युद्ध झाले तर बँकेत ठेवलेला तुमचा पैसा विश्वगुरू घेऊन जातील. – राज्यात भाजप प्रणित सरकार आल्या नंतर ओबीसी मुला मुलींची शिष्यवृत्ती काढून घेतली. – राज्यातले उद्योग बाहेर जात आहे. मुंबई जर गुजरात मध्ये गेली तर नवल वाटायला नको.
  • गुजरात पाकिस्तान आहे का हे त्यांनी ठरवावं मात्र आमचे उद्योग इतरत्र जाऊ नये अशी आमची मागणी आहे. – ओबीसी मराठा भांडणात व शिवसेनेच्या दसरा मेळावा वादात आम्हाला पडायचे नाही.

पुण्यातून पुन्हा काँग्रेसचा स्वबळाचा नारा

पुणे-देशभरातून भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार राष्ट्रीय पातळीवर भाजपतेर समविचारी पक्षांचे एक संघटन बनविण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातून आणि राज्यातून वारंवार कॉंग्रेस पक्ष मात्र स्वबळाचा नारा देतो आहे. कॉंग्रेसच्या अनेकांचे मत आहे राष्ट्रवादीशी आघाडी केल्यानेच कॉंग्रेसची वाताहत झाली आहे . अनेक ठिकाणांहून कॉंग्रेस समूळ नष्ट झाली तिथे राष्ट्रवादी बळकट बनली आहे. यापूर्वी राज्यातून प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे , त्यानंतर माजी गृहराज्यमंत्री तत्कालीन पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी पुण्यातून स्वबळाचा नारा दिला होता आता नवे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी देखील स्वबळावर लढण्या चाच नारा दिला आहे.

या संदर्भात शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले कि,’ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कोअर कमिटीची बैठक काल काँग्रेस भवन येथे संपन्न झाली. या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीत सर्व नेते मंडळीं व कार्यकर्त्यांनी पुणे महानगरपालिका निवडणुक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवावी अशी आग्रही मागणी केली. या मागणीनुसार निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे यावर चर्चा झाली. कार्यकर्त्यांच्या तसेच सर्व नेतेमंडळींच्या आग्रही मागणी नुसार येणारी पुणे महानगरपालिकेची निवडणुक काँग्रेस पक्ष स्वबळावर लाढणार आहे.आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रभागाची व पक्ष संघटनेची बांधणी करण्यास सुरूवात करावी असा निर्णय चर्चाअंती सर्वांच्या समंतीने घेण्यात आला.

कॉंग्रेस ने स्वबळावर लढण्याचा एकीकडे नारा सुरु ठेवला असला तरी दुसरीकडे पक्षाला स्थानिक पातळीवर भक्कम आधार देणारे नेतृत्व नसल्याने कॉंग्रेस स्वबळावर किती लढेल याबाबत साशंक असलेली काही जण राष्ट्रवादीशी संधान बांधून आहेत . नुकतीच मार्केड यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या एका माजी महापौरांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भेट घेऊन चर्चा केल्याचे वृत्त आहे. एकीकडे भाजपमधून आता पुन्हा स्वगृही परतू पाहणारे काही नगरसेवक मार्गावर असताना आता तेही कॉंग्रेस कि राष्ट्रवादी अशा साशंकेत दिसू लागले आहेत.

कॉंग्रेस आणि आप दोघेही आणणार नवे चेहरे – भाजपा आणि राष्ट्रवादीच्या आपसातील लढाईत कॉंग्रेसचे स्वबळावर येणारे तर निवडून येतील पण काही नवे चेहरे देखील कॉंग्रेसकडून विजय प्राप्त करण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. आप कडून येणारे चेहरे देखील नवीन असतील .भाजपा आणि राष्ट्रवादी आपसात भांडत असताना या दोन्ही पक्षांच्या सदस्यांची संख्या वाढणे अनेकांना साहजिकच वाटते आहे.

जपान-भारत सागरी सराव 2022 संपन्न

0

भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या जपान-भारत सहावा सागरी सराव 2022, जिमेक्स-22(JIMEX 22) चा  बंगालच्या उपसागरात समारोप झाला.17 सप्टेंबर 22 रोजी पारंपारिक स्टीम पास्टसह (परेड सह) दोन्ही बाजूंनी एकमेकांचा निरोप घेतला.

आठवडाभर चाललेल्या या सरावात,फ्लॅग ऑफिसर कमांडिंग ईस्टर्न फ्लीटचे  रिअर अडमिरल संजय भल्ला यांच्या नेतृत्वाखालील भारतीय नौदलाच्या जहाजांनी त्याचबरोबर कमांडर एस्कॉर्ट फ्लोटिला फोरचे रिअर अडमिरल हिराता तोशियुकी यांच्या नेतृत्वाखालील जपान मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स (JMSDF) ची जहाजे इझुमो आणि ताकानामी यांनी भाग घेतला.

जिमेक्स-22 ( JIMEX 22), दोन्ही देशांच्या नौदलाने संयुक्तपणे केलेल्या काही अत्यंत जटिल सरावांचे साक्षीदार ठरले. दोन्ही देशांच्या सैन्याने आधुनिक स्तरावरील पाणबुडीविरोधी युद्ध, शस्त्रात्राने गोळीबार आणि हवाई संरक्षण आदी युध्द कौशल्यांचा सराव केला. शिपबोर्न हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने आणि पाणबुड्याही या सरावात सहभागी झाल्या होत्या. भारतीय नौदल (IN) आणि जपान मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स (JMSDF)च्या जहाजांनी  जहाजे पुरवठा आणि सेवांसाठी परस्पर तरतुदीच्या करारानुसार परस्परांसमवेत  संयुक्तपणे हे अभियान आयोजित केले.

2012 मध्ये सुरू झाल्यापासून जीमेक्सचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या सरावाने, दोन्ही देशांच्या नौदलांमधील परस्पर सामंजस्य आणि परस्पर कार्यक्षमता अधिक  मजबूत केली.

उद्योग जगतातील नेतृत्वाने मराठवाड्यात शंभर देवराया निर्माण कराव्यात- माहिती संचालक गणेश रामदासी

पुणे, दि.१८: मानवी जीवनासाठी वृक्षाचे महत्व लक्षात घेऊन सयाजी शिंदे यांनी लातूर जिल्ह्यात संजीवनी बेट येथे निर्माण केलेल्या देवराईच्या धर्तीवर उद्योग जगतातील व्यक्तींनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यात शंभर देवराई निर्माण करण्याची मुहूर्तमेढ रोवावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनायालयाचे संचालक गणेश रामदासी यांनी केले.

बालगंधर्व मंदीर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाडा समन्वय समितीच्यावतीने आयोजित मराठवाडा भूषण पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अभिनेता सयाजी शिंदे, समन्वयक समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर, सचिव दत्ताजी मेहेत्रे आदी उपस्थित होते.

मराठवाडा समन्वय समितीने प्रशासकीय सेवेत केलेल्या कार्याची दखल घेवून पुरस्कासाठी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त करून श्री. रामदासी म्हणाले, दिल्लीत कार्यरत असतांना दिल्लीतील महाराष्ट्राचा परिचय, तेथील विविध क्षेत्रात कार्यरत माणसांची माहिती नागरिकांना होण्यासाठी संकलनात्मक माहिती पुस्तकांचे संपादन केले होते. दिल्लीत महाराष्ट्राचे जसे प्रतिनिधित्व दिसते तसे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने पुण्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचे प्रतिबिंब दिसून येते. प्रत्येक जिल्ह्याची संस्कृती, भाषा, खाद्यसंस्कृती, साहित्य आदी वैशिष्टपूर्ण माहिती याठिकाणी मिळते. मराठवाड्यातील उद्योजकांनी पुढाकार घेतल्यास स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण होत असताना १०० देवराया निर्माण झालेल्या असतील.

श्री. रामदासी पुढे म्हणाले, पुण्यात मराठवाड्यातील लोक कष्टाची भाकरी शोधत असतात.मराठवाड्यातील सुशिक्षित तरुणाला रोजगार मिळण्यासाठी तसेच उद्योग क्षेत्रात लागणारे कुशल, प्रशिक्षित कामगार उपलब्ध होण्यासाठी मराठवाडा समन्वय समितीने एक ॲप तयार करावे असे आवाहन त्यांनी केले.

नागरिकांच्या प्रलंबित अर्जाचा स्थानिक पातळीवर निपटारा करुन त्यांना सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी  राज्यात १७ सप्टेंबर पासून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यामध्ये सेवा, कर्तव्य आणि साधना संकल्पनेवर भर देण्यात आलेला आहे. त्यामधील सेवा खूप महत्वाची बाब आहे. त्यामुळे मनामध्ये मदत करण्याची भावना असल्यास ती सेवेत परावर्तीत होऊन कर्तव्याचा भाग बनते. परंतु त्यासाठी साधना आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

व्यक्तीला निरोगी आयुष्य जगता यावे यासाठी आगामी २०२३ हे वर्ष जागतिक पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. त्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा या सारख्या पौष्टिक तृणधान्याला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळणार आहे. त्यामुळे व्यक्तीने आपल्या आहारात भाकरी, तृणधान्य समावेश करावा. यामाध्यमातून प्रत्येकांनी आपण आपल्या मातीशी प्रमाणिक राहून शेतकऱ्याला आर्थिकदृष्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे श्री. रामदासी म्हणाले.

मुंबईत महिला खेळाडूंना शौचालय नाहीत ही दुर्दैवी बाब – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

मुंबई :
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे सर्वाधिक कर संकलन आणि बजेट प्रणाली आहे. तरीही इतक्या मोठ्या शहरात शौचालयाची सोय नसल्याने महिलां आणि वृध्दांना परिणाम भोगावे लागतात ही दुर्दैवाची बाब आहे अश्या शब्दांत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. केंद्रीय मंत्री श्री. अनुराग ठाकूर हे सध्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. आज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, महानगरपालिकेने खेळाकडे आणि खेळाडूंकडे आणि प्रामुख्याने महिला खेळाडूंकडे साफ दुर्लक्ष केले आहे. आम्ही शहराचे सौंदर्यीकरण आणि खेळांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करू अशी ग्वाही त्यांनी दिली. मुंबई शहराच्या विकासाकरिता आणि नवी धोरणे सुरू करण्यासाठी योग्य आराखडा तयार केला जात आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. भारतात चित्ता आणण्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना मंत्री श्री. अनुराग ठाकूर म्हणाले, काँग्रेस कोणत्याही विषयाला कुठेही जोडत आहे. भारत आज स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनत आहे. भारताबाहेर निर्यातही वाढली आहे. देशात रोजगारही वाढत आहे. त्यामुळे या टीकेला काहीही अर्थ उरत नाही. मुंबई महानगरपालिकेने छोट्या व्यावसायिकांकडेही दुर्लक्ष केले आहे. येणाऱ्या काळात केंद्राच्या योजनेतून लघु उद्योजकांसाठी ठोस काम केले जाईल अशी ग्वाही मंत्री श्री. अनुराग ठाकूर यांनी दिली.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या भेटीबाबत मंत्री श्री. अनुराग ठाकूर म्हणाले, यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण आणण्याची आवश्यकता नाही. आम्ही आगामी निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली लढवणार आहोत. भाजपाच्या वतीने सर्व मतदारसंघात सुरू असलेल्या या दौऱ्याचा शिवसेना – भाजपा युतीला फायदाच होईल असही ते म्हणाले.

यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, आमदार कॅप्टन तमिळ सेलवन, आमदार प्रसाद लाड, राजेश शिरवाडकर, श्वेता परुळकर, सतीश निकम, राजेश सिंग, ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.

ब्लॅकमेल केल्यामुळेच सरनाईक शिंदेंसोबत गेले-सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

0

पुणे-बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची केस मागे घेण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी क्लोजर रिपोर्ट सादर केला गेला. त्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने सरनाईक आणि राज्याची माफी मागावी, भाजपने देशासमोर राज्याची प्रतिमा खराब केल्याचा आरोपही यावेळी सुप्रिया यांनी केला, पुण्यात त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्यात की, भाजपने ब्लॅकमेल केल्यामुळेच सरनाईक शिंदेंसोबत गेले. आज तुम्ही म्हणता की, आमच्याकडे काही पुरावेच नाही, मग तुम्ही पहिल्यांदा त्यांच्यावर आरोप केले ते खोटे होते का? याची कबूली दिली पाहिजे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने सरनाईक कुटुंबियांची हात जोडून माफी मागावी. जर त्यांच्यावर झालेले आरोप खोटे असतील तर त्यांनी देशासमोर महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी सुळे यांनी केली.

पुढे सुळे म्हणाल्या की, ज्यांच्यावर खोटे आरोप झाले, नंतर ते सरकारमध्ये गेलेत त्यानंतर त्यांना क्लिनचीट मिळाली, त्यामुळे त्यांच्यावर खोटे आरोप झाले की, ब्लॅकमेल करण्यात आले, याला राजकारण म्हणत नाही, असा टोलाही यावेळी सुळेंनी भाजपवर लगावला.

शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिंदे गटात गेलेले आमदार प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणात कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला. त्यानंतर आता ईडीदेखील याच अहवालाच्या आधारे क्लोजर रिपोर्ट सादर करणार असल्याची चर्चा आहे. तपासात प्रगती होत नसल्याने क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.

टॉप्स सिक्युरीटीज प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे पोलिसांनी म्हटले. याच रिपोर्टच्या आधारावर अटकेत असलेल्या आरोपींनी ईडीच्या कारवाईविरोधात कोर्टात अर्ज केला आहे. अमित चांदोले आणि टॉप्स सिक्युरीटीचे माजी संचालक शशिधरन यांनी कोठडीला विरोध करत आता दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे.

साल 2014 एमएमआरडीएला 350 ते 500 सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट टॉप्स ग्रुप या कंपनीला मिळाले होते. मात्र या सुरक्षा रक्षक कंत्राटबाबत गैरप्रकार झाला आणि त्याचा आर्थिक फायदा प्रताप सरनाईक आणि अमित चांदोले यांनी घेतला, अशी तक्रार कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्यानं केली होती. या कंत्राटात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याच्या आरोप ठेऊन मनी लॉंड्रिंग कायद्यांतर्गत टॉप्स ग्रुपच्या माजी व्यवस्थापकीय संचालक एम. शशिधरन यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे. तर ईडीने आमदार सरनाईक यांच्या घरावर तसेच कार्यालयात धाडी टाकून कुटुंबियांची चौकशी यापूर्वीच केली आहे. यात सरनाईकांचे निकटवर्तीय अमित चांदोले यांनाही ईडीने अटक केली आहे.

दरम्यान जामीन मिळावा म्हणून एम. शशिधरन आणि अमित चांदोले या दोघांनी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या समोर सुनावणी पार पडली. दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणात सी समरी रिपोर्ट स्वीकारला असून आपल्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी शशिधरन आणि चांदोले या दोघांनी न्यायालयाकडे केली. त्यांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने ईडीला उत्तर सादर करण्याचे आदेश देत सुनावणी 21 सप्टेंबर रोजी निश्चित केली आहे

‘इजिप्सी’मधून गूढ, अद्भुत इजिप्तची घडेल सफर

0

ज्ञानलक्षी, प्रवासवर्णनपर साहित्याला वाचकांची मोठी मागणीप्रा. मिलिंद जोशी यांचे प्रतिपादन; मनोविकास प्रकाशनातर्फे रवि वाळेकर लिखित ‘इजिप्सी’ ग्रंथाचे प्रकाशन
पुणे : “चरित्र, आत्मचरित्र, माहितीपर लेखन यासारख्या ज्ञानलक्षी व प्रवासवर्णनपर साहित्यकृतींना वाचकांची मोठी मागणी आहे. मध्यमवर्गीय माणसालाही आपण जग पाहायला हवे, अशी भावना गेल्या काही वर्षात रुजत आहे. प्रवास करतानाच लेखनाची कला विकसित होतेय, ही मराठी साहित्याच्या समृद्धतेत भर घालणारी गोष्ट आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

मनोविकास प्रकाशनातर्फे रवि वाळेकर लिखित ‘इजिप्सी : एका गूढ, अद्भुत सफर’ या ग्रंथाचे प्रकाशन प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या प्रकाशन सोहळ्यावेळी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख, प्रकाशक ‘मनोविकास’चे अरविंद पाटकर, वाळेकर यांच्या पत्नी शिल्पा उपस्थित होते. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी मुखपृष्ठ, तर गौरी खराडे यांनी ग्रंथाची मांडणी व सजावट केली आहे.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “पु. ल. देशपांडे, अनिल अवचट, मीना प्रभू यांसारख्या लेखकांनी प्रवासवर्णन या साहित्याला वेगळी ओळख दिली. स्थिती, गती आणि संस्कृतीची गुंफण असणारे हे प्रवासवर्णनपर साहित्य मराठी साहित्याला अधिक समृद्ध करत आहे. रवि वाळेकर हे या मालेतील एक सूर गवसलेले लेखक आहेत. उघड्या डोळ्यांनी जग पाहत, त्याचे अतिशय रसाळ, सहज, ओघवत्या, मिश्किल पण तितक्याच गांभीर्याने केलेले वर्णन वाचकाला गुंतवून ठेवते. 
“वाळेकर यांच्या लेखनात सूक्ष्म निरीक्षण, विनोद बुद्धी आहेत. ते तात्कालिक न वाटता दीर्घकालीन असल्याचे जाणवते. ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती जोपासल्याशिवाय असे प्रभावी लेखन होत नाही. इजिप्तला आपण प्रत्यक्ष जाऊन यावे, ते आपल्या डोळ्यांनी पाहावे, इतक्या प्रभावीपणे त्याची मांडणी केली आहे. इजिप्शियन संस्कृती, समाज, शहरांची रचना, वारसास्थळे अशा विविधांगी गोष्टींची सफर वाळेकर ‘इजिप्सी’मधून घडवतात,” असे प्रा. मिलिंद जोशी म्हणाले.

दीपा देशमुख म्हणाल्या, “इजिप्सी हा ग्रंथ अतिशय रंजक आणि ओघवत्या शैलीत मांडला आहे. नियमित वाचक नसलेल्यांनाही वाचनाची गोडी लावणारा असा हा ग्रंथ आहे. वाळेकर यांनी इजिप्त देशाची सफर घडवली आहे. पुस्तक वाचल्यावर आपण आयुष्यात एकदा तरी इजिप्त पाहायला हवे, असे वाटते. गूढ आणि अद्भुत अविष्कार असणाऱ्या इजिप्तचा ‘इजिप्सी’ ग्रंथ हा एक महत्वाचा दस्तावेज झाला आहे.” 

रवि वाळेकर म्हणाले, “पुस्तक घडविण्यात लेखक, मुखपृष्ठकार, प्रकाशक या सर्वांचे योगदान आहे. आपल्याला इजिप्तबद्दल मोजक्याच गोष्टी माहीत असतात. मकरंद अभ्यंकर यांच्याकडून इजिप्तला जाण्यापूर्वी मार्गदर्शन घेतले. रामायण, महाभारत काळापूर्वीचे वास्तू आजही सुस्थित असून ते आपल्याला बघता येतात. इजिप्त आजही जगाला अनभिज्ञ असून, त्याचा जितका उलगडा करू, तितका तो अधिक रंजक आहे.” 
‘इजिप्सी’मधील लेखन अतिशयोक्ती नसून, वाचण्याची भूक निर्माण करणारी साहित्यकृती आहे. वाचकांचा चांगला प्रतिसाद ‘इजिप्सी’ ग्रंथाला मिळेल, अशी आशा अरविंद पाटकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली. मंजिरी चौधरी-तिक्का यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

सरदार पटेलांच्या निजामावरील पोलीस ॲक्शनप्रमाणेच प्रधानमंत्री, गृहमंत्र्यांची काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याची हिम्मत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, दि १८ : काश्मीर मधून 370 कलम हटविण्याची हिंमत प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दाखविली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हैदराबाद मुक्ती संग्रामानिमित्त काल हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाला उपस्थितांनी दाद दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी मधून आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, त्यावेळी येथील परेड ग्राऊंडवर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

काल सकाळी औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री हैद्राबाद येथे पोहोचले आणि त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी आयोजित केलेल्या हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.

या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिस्तबद्ध, आकर्षक परेड

प्रारंभी महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटक अशा तीनही राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी दर्शकांची मने जिंकून घेतली. विशेषतः महाराष्ट्राच्या ढोल ताशाच्या पथकांनी तर वातावरणात चैतन्य निर्माण केले. यावेळी आदिलाबादच्या पथकांनी लांबाडी तसेच गुसाडी, चिडूतालु, कोलाटम ही नृत्ये सादर केली. कर्नाटक पथकाने डोला कुनिथा बँड वाजविला. परेडमध्ये लष्कराच्या दलांनी, एनसीसी विद्यार्थ्यांनी देखील संचलन केलं आणि वाहवा मिळविली.

1948 मध्ये निजामाच्या विरुद्ध पोलीस ॲक्शन द्वारे कारवाई करत तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थानाला स्वतंत्र करून देशात विलीन केले हा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की, सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कश्मीर मधून 370 कलम हटविण्याची हिंमत दाखविली आहे.

मुख्यमंत्री आपल्या छोटेखानी भाषणात म्हणाले की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यावर माझा पहिला कार्यक्रम होता देशव्यापी हर घर तिरंगा मोहीम. राज्यातल्या अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकावून आम्ही ही मोहीम यशस्वी करून दाखवली.  आज देशात पहिल्या प्रथमच केंद्र सरकारने हैदराबाद राज्याचा मुक्तिसंग्राम कार्यक्रम सुरू करून, हा मुक्ती संग्राम नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा मोठा प्रयत्न केला आहे आणि आम्हाला याचा अभिमान आहे. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेला लढा आजही आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हैदराबाद मुक्तिसंग्राम हा निजामासारख्या क्रूर शासकापासून मुक्ती मिळवण्याचा दिवस आहे. हा दिवस म्हणजे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना नमन करण्याचा आहे, असेही मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले.

नाविन्याचा ध्यास, समर्पित वृत्ती व कठोर परिश्रम यशाचे गमक

0

५० व्या वर्धापनदिनी ‘टेक्नोफोर’च्या संस्थापकांची भावना; कर्मचाऱ्यांच्या वतीने कृतज्ञता सन्मान
पुणे : “नाविन्याचा ध्यास, कठोर परिश्रम, समर्पित वृत्ती, सुयोग्य व्यवस्थापन, काटेकोर नियोजन व अंमलबजावणी आणि कामगारांची एकजूट हेच ‘टेक्नोफोर’च्या यशाचे गमक आहे. ५० वर्षांचा हा समृद्ध वारसा नव्या पिढीने असाच पुढे न्यावा. स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या प्रवासात कर्मचारी, कुटुंबीय, ग्राहक व संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या प्रत्येकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहोत,” अशी भावना टेक्नोफोर संस्थेच्या संस्थापकांनी केली.

तंत्रज्ञानाधारित नाविन्यपूर्ण उत्पादन निर्मिती व निर्यात क्षेत्रातील अग्रणी असलेल्या टेक्नोफोर संस्थेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त (सुवर्णमहोत्सव सोहळा) सर्वश्री रमाकांत कुलकर्णी, उदय गोडबोले व प्रवीण ढोले या तीन संस्थापकांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. शनिवार पेठेतील विष्णुकृपा सभागृहात आयोजित सोहळ्यात ‘टेक्नोफोर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत नानजकर, अजित गोखले, सुरेश सुब्रह्मण्यम, मनुष्यबळ विकास व्यवस्थापक मंदार पुरंदरे आदी उपस्थित होते. यावेळी चौथे संस्थापक दिवंगत श्रीकांत कुडेकर यांना आदरांजली वाहण्यात आली.

रमाकांत कुलकर्णी म्हणाले, “संस्थेतील कर्मचाऱ्यांशी आमचे नाते आपुलकीचे व जवळकीचे राहिले. ते केवळ कामगार नसून, सहकारी आहेत. त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना आवश्यक मदत करण्यावर, तसेच चांगल्या कामासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यावर भर असतो. त्यातून प्रेरित होऊन कर्मचारी संस्थेच्या प्रगतीत चांगले योगदान देतात. सर्व कर्मचारी ‘टेक्नोफोर’ला कुटुंब मानून ५० वर्षांची ही परंपरा यापुढेही कायम जपतील.”

उदय गोडबोले म्हणाले, “पाचशे रुपयांच्या भांडवलात सुरु केलेला व्यवसायाला ५० वर्षे होत आहेत. आज ‘टेक्नोफोर’ जगातील ३२ देशांत उत्पादनांची निर्यात करत आहे. यामागे अपार मेहनत, नाविन्यता आणि गुणवत्ता आहे. या वाटचालीत कामगारांचे, सहकाऱ्यांचे योगदान खूप मोलाचे राहिले आहे. या प्रवासात आलेल्या अनेक अडचणींवर आत्मविश्वासाच्या जोरावर मात करून आम्ही चौघांनी ‘टेक्नोफोर’ ही संस्था नावारूपास आणली. नोकरी सोडून व्यवसायात नवनवे प्रयोग केले.”

प्रवीण ढोले म्हणाले, “आयआयटीमधील आम्ही चार वर्गमित्रांनी काहीतरी नवीन करावे, या हेतूने अल्प भांडवलात सुरु केलेला व्यवसाय जगभर विस्तारला आहे. वेळोवेळी मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेत ‘टेक्नोफोर’ वाढविण्याचे प्रयत्न केले. चार वेगळ्या शाखेतील अभियंत्यांनी एकत्रित येऊन केलेल्या या प्रयोगाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन ही प्रगती केली. परदेशी उत्पादने आयात करण्यापेक्षा भारतीय बनावटीची उपकरणे तयार करण्याला आमचे प्राधान्य होते.

यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रातिनिधिक मनोगते व्यक्त करण्यात आले. मीनाक्षी दामले यांनी सूत्रसंचालन केले. अनिकेत नानजकर यांनी आभार मानले.

सेवा पंधरवडा निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध सेवांचे वितरण

0

पुणे दि.१८-राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत भोर तालुक्यातील इंगवली येथे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते विविध सेवांचे वितरण करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार सचिन पाटील, गट विकास अधिकारी स्नेहा देव, विविध विभागाचे अधिकारी, इंगवली ग्रामस्थ उपस्थित होते.

उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करून जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, कोविड कालावधी नंतर महसूल विभागात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालत आयोजित केल्याने त्यातून प्रलंबित फेरफार निर्गमित करण्यात येऊन नागरिकांना विहित मुदतीत सेवा देण्यात येत आहे. सेवा हमी कामकाजामध्ये आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात दिलेल्या एकूण सेवांपैकी ९६ टक्के सेवा या वेळेत दिलेल्या आहेत. सेवा पंधरवड्यात देखील प्रशासनाकडून जास्तीत जास्त सेवा व प्रलंबित प्रकरणे निर्गमित करण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या २ ऑक्टोबरपर्यंत भोर उपविभागातील विविध गावात अशा शिबिराचे आयोजन करून नागरिकांच्या अर्जावर आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच त्यांना विविध सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री. कचरे यांनी यावेळी दिली.

शिबिरात महसूल विभागाच्यावतीने लागवडीखाली आणलेल्या पोटखराब अ वर्ग क्षेत्राचे आदेश व सुधारीत ७/१२ , नवीन शिधापत्रिका व सुधारित मालमत्ता पत्रक आदी सेवांचे वितरण करण्यात आले.

सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील;निती आयोगाने सहकार्य करावे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, दि.१८: महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनासाठी निती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था स्थापना होत असून त्यामाध्यमातून कृषी, आरोग्य, शिक्षण रोजगार, पर्यावरण या विषयावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्रात सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यासाठी निती आयोगाने राज्याला सहकार्य करावे, असे आवाहन करतानाच देशाच्या पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राच्या १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा महत्वाचा वाटा असेल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांच्या आयोगातील तज्ञांनी आज मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह राज्य प्रशासनातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या समवेतच्या तज्ञांनी महाराष्ट्रात विविध क्षेत्राच्या परिवर्तनासाठी आयोगामार्फत राज्याला कशाप्रकारे सहकार्य करण्यात येणार आहे याविषयी सादरीकरण केले.

राज्याचा विकास आणि सामान्यांच्या अपेक्षापूर्तीची सांगड घालावी

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्यासाठी निती आयोगाच्या धर्तीवर स्थापन होणाऱ्या राज्यस्तरीय संस्थेच्या माध्यमातून राज्याचा सर्वागिण विकास आणि सामान्यांना शासनाकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ती यांची सांगड घालण्यात यावी. त्यासाठी निती आयोगाच्या अनुभवाचा फायदा राज्याला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

सेवा, योजनांचा लाभ अधिक पारदर्शक आणि गतिमानपणे उपलब्ध व्हावा

सामान्य नागरिकांना राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सेवा, योजनांचा लाभ या अधिक पारदर्शक आणि गतिमानपणे उपलब्ध होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी कृषी, आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती, पर्यावरण, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यस्तरीय संस्थेस निती आयोगाकडून या क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढविण्यावर भर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधांचे जाळे राज्यात आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या योजनांची यशस्वी अमंलबजावणीकरण्यावर आमचा भर असून राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर होण्यासाठी महाराष्ट्र मेहनत करण्यात कमी पडणार नसल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट २०२७ मध्ये गाठू शकतो- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले, निती आयोगासारखी राज्यस्तरीय संस्था राज्यात स्थापन करण्यासाठी वित्त विभागाने चांगली तयारी केली आहे. राज्याने २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे, मात्र आपण अधिक चांगले काम केलं तर २०२७ मध्येच हे उद्दिष्ट गाठू शकतो, असे त्यांनी सांगितले.

ॲसेट मॉनिटायजनेशन हा महत्वाचा मुद्दा निती आयोगाने मांडला असून त्या दृष्टीने राज्यात नव्याने साकारण्यात येत असलेला समृद्धी महामार्ग हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. ई मोबिलीटीच्या क्षेत्रात राज्याने पुढाकार घेतला असून पुढील तीन वर्षांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ईलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढविणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

ब्लॉकचेन, ड्रोन यंत्रणेचा वापर महसुल, कृषी, आरोग्य विभागात वाढविणार

ब्लॉकचेन, ड्रोन यंत्रणेचा वापर महसुल, कृषी, आरोग्य विभागात वाढविण्यावर भर असल्याचे सांगत राज्यातील दुर्गम भागात ड्रोनद्वारे औषध पोहोचविण्याचा प्रयत्न राहील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील कृषी क्षेत्रात सौरउर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात येणार असून पुढील सौरउर्जेच्या माध्यमातून तीन वर्षांत सुमारे चार हजार मेगा वॅट वीज कृषीपंपांना उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी सादरीकण केले.

‘चक्र’ बांबूच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन

0

पुणे – लोणी काढणाऱ्या ताकाच्या रवीपासून ते अवकाशात उडणाऱ्या विमनापर्यंत, चक्राची मानवाच्या आयुष्यातील उन्नती दाखवणाऱ्या अनेक अनोख्या गोष्टींच्या बांबूतील प्रतिकृती पाहण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. जागतिक   बांबू दिनाचे औचित्य साधून “चक्र” ह्या तीन दिवसीय प्रदर्शन घोले रोड येथील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे भरविण्यात आले आहे. जे.जे. महाविद्यालयातील कला शाखेतून उत्तीर्ण झालेले रमेश दाते, हे गेली ४० वर्षे बांबू सारख्या आव्हानात्मक विषयात अभ्यास आणि वाखाणण्याजोगे काम करत आहेत. त्यांनी साकारलेल्या विविध बांबूरुपी प्रतिकृतींचे प्रदर्शन सोमवार १९ व  मंगळवार,  २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते ८ पाहण्यास उपलब्ध आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन वनराईचे सचिव अमित वाडेकर यांच्या हस्ते झाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते विविध उपक्रमांचा शुभारंभ

0

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस (17 सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (2 ऑक्टोंबर) दरम्यान संपूर्ण देशात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा साजरा केला जात असून, या अतंर्गत संपूर्ण देशात अनेक सेवा उपक्रम राबविले जात आहेत. पुण्यातही विविध उपक्रमांचे आयोजित केले असून, त्याचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाला.

मोदीजींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा उपाध्यक्षा माजी आ. प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी सायकल रॅलीचे आयोजन कोथरुडमध्ये करण्यात आले होते. त्याचा शुभारंभ मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला. या सायकल रॅलीमध्ये अनेक विद्यार्थी आणि तरुण सहभागी झाले होते.

सेवा पंधरवडा अतंर्गत पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली होती. त्याचा शुभारंभ ही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झाला. ना. पाटील यांनी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसराची स्वच्छता केली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर, शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

सेवा पंधरवडा अंतर्गत भाजपा महिला मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण देशात आदर्श अंगणवाडी अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत महिला मोर्चा उपाध्यक्षा माजी आमदार प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांच्या माध्यमातून कोथरुडमधील किष्किंदानगर येथील आंगणवाडी सेविकांना गौरविण्यात आले.

त्याचप्रमाणे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुडमधील जनसंपर्क कार्यलाय परिसरात ही सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत कोथरुडमधील नागरिकांना विविध प्रकारचे दाखले मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचा शुभारंभही आज चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाला. त्यासोबतच अंगणवाडी सेविकांना सतरंजीचे वाटपही यावेळी करण्यात आले.

मोदीजींच्या कार्याची उंची प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या साधकांनी उत्तम ओळखली- मंत्री चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे-पंतप्रधान मोदीजींच्या कार्याची उंची प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या साधकांनी उत्तम प्रकारे ओळखली, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली. तसेच मोदीजींनी देशाची एकात्मता टिकवण्यासाठी अतिशय मोठं कार्य केलं, असेही प्रतिपादन पाटील यांनी यावेळी केले.

पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय बाणेर, पुणे यांच्या वतीने 60 फूट उंच व 44 फूट रुंद सर्वात मोठे ग्रीटिंग कार्ड उभारुन अतिशय अभिनव पद्धतीने शुभेच्छा दिल्या. या ग्रिटींग कार्डचे उद्घाटन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रजापिता ब्रह्मकुमारीचे बी.के.डॉ त्रिवेणी, बी.के.डॉ गंगाधर भाई, डॉ.दीपक हरके, विकास गुजर,भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपचे पुनित जोशी, लहू बालवडकर आदी मान्यवर देखील उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मोदीजींचे कार्य इतके मोठे आहे, त्याची उंची शब्दात व्यक्त करणे अतिशय कठीण आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान तणाव निर्माण झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी संपूर्ण जगाने माननीय मोदीजींकडेच पुढाकार घेण्याचे आवाहन केले. माननीय मोदीजींच्या कार्याची उंची इतकी मोठी आहे, ती प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या साधकांनी उत्तम प्रकारे ओळखली.

ते पुढे म्हणाले की,मोदीजींच्या नेतृत्वात देश अतिशय झपाट्याने विकास करत आहे. कोणत्याही प्रश्नांना शिल्लक न ठेवण्यासाठीची त्यांची धडपड सुरू आहे. यासाठी प्रचंड साधना केली. त्यातूनच त्यांना जी ऊर्जा मिळत, त्यातून ते आज मोठ मोठ्या आव्हानांवर सहज मात करत आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

यावेळी भाजपाचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, ओम शांतीचे बी. के.‌गंगाधर भाई यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक डॉ. दिपक हरके यांनी केले. आभार डॉ. बी. के. त्रिवेणी यांनी मानले.

समाज घडविण्यात शिक्षकांचे अनन्य साधारण महत्व-सुरेश कोते

0

कुंभार समाज शिक्षक संघातर्फे गुणगौरव समारंभ
नारायणगाव/पुणे, ता. १८ : “देशासाठी, समाजासाठी शिक्षक अहोरात्र कष्ट घेऊन मुलांना घडवतात. समाज घडविण्यात शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे अभिमानास्पद काम जुन्नर तालुका कुंभार समाज शिक्षक संघ करीत आहे,” असे मत लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेश कोते यांनी व्यक्त केले.
जुन्नर तालुका कुंभार समाज शिक्षक संघातर्फे शिक्षक दिनानिमित्त नुकताच ‘गुणगौरव समारंभ २०२२’ आयोजिला होता. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सुरेश कोते बोलत होते. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील पर्यवेक्षीय अधिकारी रंगनाथ जाधव, ह.भ. प. निलेश महाराज कोरडे यांच्या हस्ते शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय अंबाडे, कुंभार समजोन्नती मंडळाचे अध्यक्ष संतोष कुंभार, पांडुरंग कार्लेकर गुरुजी, बाबाजी कुंभार आदी उपस्थित होते.
सुरेश कोते म्हणाले, “विद्यार्थ्यांना घडविण्याची जुन्नर तालुक्याची परंपरा आहे. या तालुक्याला शिवाजी महाराजांच्या काळापासून एक वेगळा इतिहास आहे. शिक्षकांचा सत्कार करण्याचे संघाचे काम कौतुकास्पद आहे. शिक्षकांनी समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य असेच अविरतपणे सुरू ठेवावे.” दरम्यान, सत्कारार्थी विद्यार्थी, शिक्षकांनी आपला सन्मान केल्याबद्दल संघाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.