Home Blog Page 1607

लम्‍पीतून ३ हजार २९१ जनावरे रोगमुक्त – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

0

मुंबईत लम्‍पी रोगाचे नियंत्रण, प्रतिबंध व निर्मूलन करण्यासाठी प्राणी प्रदर्शने, बाजार, यात्रा व जनावरांच्या ने-आण करण्यास पूर्णतः बंदी घोषित

मंत्रालयात समन्वय कक्ष सुरु, संपर्कासाठी ०२२-२२८४५१३२ क्र. जारी

मंगळवारी २५ लाख लसमात्रा प्राप्त होणार

मुंबई, दि. 19 : राज्यातील पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या सूचना, मनुष्यबळ वाढ, पुरेशा लसमात्रा, पशुधनावर करण्यात आलेले उपचार आणि निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने राज्यातील लम्‍पी आजार आटोक्यात येत आहे. 3 हजार 291 जनावरे औषधोपचारामुळे ठीक झाल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

श्री. सिंह म्हणाले, राज्यात दि. १९ सप्टेंबर २०२२ अखेर जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली व रायगड अशा 27  जिल्ह्यांमधील 1108 गावांमध्ये 9 हजार 375 जनावरांमध्ये लम्‍पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधितांपैकी 3 हजार 291 जनावरे बरी झाली असून, उर्वरितांवर उपचार सुरु आहेत.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 49.83 लाख लसीच्या मात्रा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या लस मात्रांपैकी बाधित क्षेत्राच्या 5 कि.मी. परिघातील 1108 गावातील 16.45 लाख जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून लसीकरण मोहीम सुरु आहे. त्यानंतर प्राधान्याने गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.

मंगळवार दि. 20 सप्टेंबर रोजी 25 लाख लसमात्रा प्राप्त होणार आहेत. बाधित जिल्ह्यातील जळगांव 94, अहमदनगर 30, धुळे 9, अकोला 46, पुणे 22, लातूर 3, औरंगाबाद 5, सातारा 12, बुलडाणा 13, अमरावती 17, कोल्हापूर 9, सांगली 2, वाशिम १, जालना १, ठाणे 3,नागपूर 3 व रायगड 1 अशा 271 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबईत लम्‍पी रोगाचे नियंत्रण, प्रतिबंध व निर्मूलन करण्यासाठी प्राणी प्रदर्शने, बाजार, यात्रा व जनावरांची ने – आण करण्यास पूर्णतः बंदी घोषित

राज्यासह देशात अनेक ठिकाणी लम्‍पी आजार जनावरांमध्ये वेगाने फैलावत असल्याने मुंबईतही सावधगिरी बाळगली जात आहे. मुंबईत बैलगाड्या, घोडागाडी तसेच अनेक ठिकाणी गायीदेखील पाळल्या जातात. हे लक्षात घेता मुंबईत लम्‍पीचा फैलाव टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रदर्शन, जत्रा तसेच गर्दीच्या ठिकाणी प्राण्यांची ने – आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. निर्देशांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार, असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी जनावरांचे गोठे आहेत. मंदिरांबाहेर गायी बांधल्या जातात. मिरवणुकांमध्ये बैलगाड्यांचा वापर केला जातो. त्यामुळे गर्दीच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी जनावरांना नेण्यास या आदेशाद्वारे मनाई करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्यांमध्ये या सूचना प्रसिद्ध करण्याबाबत सांगण्यात आले असून परिसरात जनावरे पाळणाऱ्यांपर्यंत संदेशही दिले जात आहेत. 13 ऑक्टोबरपर्यंत पशुपालकांनी या नियमांचे पालन करावे, असे या आदेशात नमूद आहे. तसेच लम्‍पी करीता मुंबई हे ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित करण्यात आले असून मुंबईत प्राणी आणण्यास सक्त मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही मुंबई पोलीसांनी दिला आहे.

समन्वय कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८४५१३२

श्री.सिंह म्हणाले, लम्‍पी नियंत्रणासाठी लसीकरण करणे, बाधित पशुधनास औषधोपचार करणे, पशुपालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. तथापि, काही ठिकाणी पशुपालकांना येणाऱ्या समस्या, अडचणींचे निराकरण करुन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, तसेच शेतकरी, पशुपालकांना संपर्क साधता यावा, आणि क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधता यावा यासाठी मंत्रालयामध्ये रुम नं. 520, 5 वा मजला (विस्तार) येथे समन्वय कक्ष सुरु करण्यात आला आहे. पशुपालक समन्वय कक्षातील ०२२-२२८४५१३२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतील.

लम्‍पी वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरु केल्यास निश्चित बरा होतो. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे घाबरुन न जाता मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन श्री. सिंह यांनी केले आहे.

जुन्नरच्या दशरथ लक्ष्मण केदारी या तरुण शेतकर्‍याच्या आत्महत्येबाबत डॉ. नीलम गोर्‍हे यांची कुटुंबीयांची विचारपूस व शासनाकडे निवेदन

पुणे, ता. १९ : दिनांक १७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील दशरथ केदारी या तरुण शेतकऱ्याने त्यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे माननीय पंतप्रधानांना ‘तुमच्या नाकर्तेपणामुळे आत्महत्या करत आहे’ असा स्पष्ट उल्लेख या चिठ्ठी मध्ये आहे. या पार्श्वभूमीवर आज विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्र शासनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे सूचना केल्या आहेत.

आपल्या निवेदनात त्यांनी महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे होत असलेले दुर्लक्ष त्याचबरोबर गेली अनेक वर्ष राज्यात नापिकी, दुष्काळ, शेतीमालाला हमीभाव न मिळणे, त्याचबरोबर शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दिवसेंदिवस बुडण्याचे प्रमाण वाढणे या आणि अशा अनेक कारणांमुळे मानसिकरित्या खचून जाऊन शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्या पुढे म्हणतात, केंद्र सरकारची कृषी विषयक धोरणे आणि निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे होत नाहीत याबद्दल पुरेसे मत स्पष्ट करणारी ही घटना आहे.

सदर शेतकऱ्याच्या कुटुंबीयांशी याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना या कुटुंबीयांना शक्य तेवढी अधिकाधिक मदत मिळवून देण्याबाबत सूचना केली आहे.त्यांवर जिल्हाधिकारी यांनी लवकरच बैठक घेऊन बैठकीचे आश्वासन दिले आहे. पोलीस अधिक्षक , पुणें यांच्याशीही नीलम गोर्हे यांनी बोलुन माहिती घेतली असतां पोलीस अहवाल सादर केल्याचे सांगितले. डॉ. नीलम गोर्हे यांनी केदारी परिवाराशी संवाद साधला तेंव्हा शिवसेना पदाधिकारी माऊली खंडागळे, प्रसन्ना डोके, संभाजी तांबे , मा. ज्योत्स्ना महांबरे ताई ऊपस्थित होते. राज्य सरकारच्या माध्यमातून या कुटुंबीयांना शक्य तितकी मदत देण्यात यावी अशी अपेक्षा नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर शिवसेनेच्या माध्यमातून केदारी परिवारास आर्थिक मदत देखील त्या पाठवणार आहेत.

कृषी क्षेत्रासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे. या शेतकर्‍याने जिल्हा बँक आणि इतर सरकारी संस्थामधून शेतीसाठी लागणार्‍या कर्जाच्या अटी जाचक असल्याकारणाने खाजगी ठिकाणाहून कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. याच जाचाला कंटाळून श्री. केदारी यांनी आत्महत्या केली असल्याचे दिसून आले आहे.

या निवेदनात त्यांनी पुढील मुद्द्यांवर भर दिला आहे :
१.शेतकरी आणि एकंदर कृषि विभागाच्या कार्य पद्धतीवर आणखी प्रभावी स्वरूपाचे धोरण आखण्याची आवश्यकता आहे.
२.शेतीमालाला योग्य भाव मिळणे यासाठी बाजार समित्यांची कार्यपद्धतीमध्ये सुधारणा आणणे
३.कृषि क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून शेतकर्‍यांना उत्पादन आणि उत्पन्न या दोन्हीमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने धोरणे आखण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित होत आहे.
४याबाबत आपल्या स्तरावरून कृषि विभाग, शेतकरी संघटना, शेतकरी संस्था यांची एक बैठक आयोजित करण्यात यावी. राज्याचे कृषि धोरणात सुधारणा करण्यासाठी त्यांच्या सूचना विचारात घेण्यात याव्यात.

ग्राहकांना फसवणुकी विरोधात तक्रार करण्याचे आवाहन

पुणे दि.१९-वस्तूंचे वितरण करताना वजने व मापे संदर्भातील नियमांचे पालन न करणाऱ्या आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अस्थापनांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन वैध मापन शास्त्र यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.

उप नियंत्रक वैध मापन शास्त्र पुणे कार्यालयामार्फत वेळोवेळी विविध मोहिमांचे आयोजन करून वजने व मापे यांची विहीत मुदतीत फेरपडताळणी व मुद्रांकन न करणाऱ्या तसेच आवेष्टित वस्तु नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर नियमानुसार कारवाई केली जाते.

पेट्रोल मापात कमी देणे, आवेष्टित वस्तुवरील मुळ छापील किंमत खाडाखोड करणे, छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे, गॅस सिलींडर वितरीत करणाऱ्या वितरक प्रतिनिधिकडे वजन काटा उपलब्ध नसणे अशा पद्धतीचे उल्लंघन आढळल्यास या विभागाकडुन कारवाई केली जाते.

येणाऱ्या सण-उत्सवात ग्राहकांची फसवणुक होऊ नये याकरीता ग्राहकांनी नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या नियंत्रक कक्ष संपर्क क्रमांक ०२२-२२६२२०२२ ०२०-२६१३७११४ व्हॉटस अप क्रमांक ९८६९६९१६६६ या क्रमांकावर किंवा dclmms_complaints@yahoo.in या ईमेल पत्त्यावर संपर्क करून तक्रार नोंदवावी, असे आवाहन उप नियंत्रक वैध मापन शास्त्र पुणे जिल्हा यांनी केले आहे.

रोटरीतर्फे २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘धडकन प्रकल्प’

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत उद्घाटन तर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत समारोप

पुणे : जागतिक हृदय दिनानिमित्त रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ आणि रिव्हाइव्ह हार्ट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सीपीआर जागरूकता आणि प्रशिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रकल्प ‘धडकन’ नावाने राबविला जाणार आहे. रिव्हायव्ह हार्ट फाउंडेशनसह रोटरी क्लब च्या वतीने २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ दरम्यान सीपीआर संबंधी जागरूकता करण्यासाठी प्रशिक्षण व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत, अशी माहिती रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ चे गव्हर्नर डॉ. अनिल परमार आणि रिव्हायव्ह हार्ट फाउंडेशनचे व प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या धडकन प्रकल्पाचे उद्घाटन 24 सप्टेंबर रोजी नॅशनल फिल्म अर्काइव्ह येथे सकाळी 10.30 वाजता अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर, 2 ऑक्टोबर रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सकाळी 9 वाजता माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि रोटरी क्लबचे ३१३१ चे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ.अनिल परमार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.

रोटरी क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. अनिल परमार आणि रिव्हायव्ह हार्ट फाउंडेशनचे प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा धडकन प्रकल्प राबविला जाणार आहे. 2017 मध्ये सुरू केलेले रिव्हाइव्ह हार्ट फाउंडेशन (iCARE) हा भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे जो आपत्कालीन वैद्यकीय मदत येईपर्यंत, सडन कार्डियाक अरेस्टच्या पीडित व्यक्तीला जिवंत कसे ठेवायचे याचे महत्त्वपूर्ण ज्ञान प्रदान करण्यासाठी स्वतःला समर्पित करतो.

24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा आठवडा सडन कार्डियाक अरेस्ट अवेअरनेस वीक 2022 म्हणून घोषित करण्यात आला आहे. या सप्ताहा दरम्यान रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 आणि रिव्हिव्ह हार्ट फाउंडेशन यांच्या वतीने CPR शिकवण्यासाठी विविध गटांसोबत ऑनलाइन, ऑफलाइन आणि हायब्रिड प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आली आहेत.

CPR प्रशिक्षण हृदयरोग तज्ज्ञांद्वारे दिले जाणार आहे. डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. सुनील साठे आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. किंजल गोयल त्यांच्या हृदयरोग तज्ज्ञांच्या टीमसह सज्ज असणार आहेत. ह्रदये पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी आपण उपस्थित राहावे.

प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे. दोन्ही सभागृह हाऊसफुल्ल झाल्यानंतर प्रवेश बंद केला जाईल.

‘धडकन’ हा प्रकल्प लक्ष्मी रोड होस्ट क्लब आरसीपी चे अध्यक्ष हेमंत शिरगुप्पी, सह-यजमान क्लब आरसीपी डाउनटाउन अध्यक्ष झिमरा इस्रायल, आरसीपी इंदापूरचे अध्यक्ष नरेंद्रकुमार गांधी, आरसीपी सेंट्रल अध्यक्ष उदय धर्माधिकारी, आरसीपी सहवास अध्यक्ष अजय मुताटकर, आरसीपी बिबवेवाडी अध्यक्ष वर्धमान गांधी, आरसीपी गांधी भवनच्या अध्यक्षा पद्मजा जोशी, आरसीपी निगडीच्या अध्यक्षा प्रणिता अलूरकर आणि जिल्हा संचालक रोग प्रतिबंधक व उपचार आरटीएन पल्लवी साबळे आणि टीम डॉ. आनंद केंच, आरटीएन महेंद्र चित्ते, आरटीएन श्याम धुमाळ आणि डिस्ट्रीक्ट पीआय संचालक डॉ जिग्नेश पंड्या यांनी संयुक्तपणे आयोजित केला आहे.

ज्ञान प्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाचा ‘कला मेळावा ‘ उत्साहात

संगीत रसास्वाद, आवाज साधना, चित्रकला तंत्र , नाट्य , लोकनृत्य प्रशिक्षण उपक्रमांची घोषणा

पुणे :

ज्ञान प्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाच्या कला व संस्कृती विशेष उद्दिष्ट गटातर्फे आयोजित ‘कला मेळावा ‘ शनिवारी उत्साहात पार पडला. हा वार्षिक मेळावा दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता ज्ञान प्रबोधिनी उपासना मंदिर , सदाशिव पेठ येथे झाला.मिलिंद संत,डॉ. समीर दुबळे,शिवाली वायचळ,डॉ. वैदेही केळकर,अमिता पटवर्धन,अमित वझे,अदिती जोगळेकर-हर्डीकर, चेतना गोसावी, श्रीनिवास देसाई,पूर्णिमा पारेख यांच्यासह अनेक उपस्थित होते.

विविध कला माध्यमांमधून वैयक्तिक व सामाजिक स्वास्थ्य तसेच आनंद निर्मिती साठी कार्यरत असलेल्या या गटातर्फे आयोजित या मेळाव्यामधे गतवर्षीच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला गेला. आगामी वर्षात नियोजित असलेल्या उपक्रम व कार्यशाळांसंबंधी माहिती देण्यात आली. संगीत रसास्वाद, सर्वांसाठी आवाज साधना, चित्रकला तंत्र प्रशिक्षण, नाट्य प्रशिक्षण, लोकनृत्य प्रशिक्षण इत्यादी आगामी कार्यशाळांची सविस्तर माहिती देण्यात आली.

‘कला भावनांना हात घालते.कलेचा विचार करताना आपण दुसऱ्याला समजून घेतो म्हणून आनंद निर्मिती होते.वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर आनंद निर्देशांक वाढतो. हा आनंद वाढवून सामाजिक स्वास्थ वाढविण्यासाठी ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थ्यांच्या कला गटाने प्रयत्न करावा,जगाचे सौंदर्यपूर्वक अवलोकन करावे,असे आवाहन मिलिंद संत यांनी केले.

डॉ.समीर दुबळे म्हणाले, ‘ कार्यशाळांमधून स्वतःची ओळख नव्याने होते.आनंदाचा प्रदेश दिसणे ही कलाविषयक कार्यशाळांचा उद्देश आहे. चांगले रसिक निर्माण करण्याची व्यवस्था असली पाहिजे.अमित वझे म्हणाले,’ अभिव्यक्ती प्रयोगशाळा म्हणजे स्वतःच स्वतःवर प्रयोग करणे होय.वर्षानुवर्ष व्यक्तीमत्वावर चढलेली पुटं काढून मोकळं होणे, हा उद्देश असणार आहे.

सर्व कलांना स्पर्श करणारे उपक्रम
आगामी वर्षात नियोजित असलेल्या उपक्रम व कार्यशाळांसंबंधी माहिती या मेळाव्यात देण्यात आली.१ ऑक्टोबरला डॉ. सुचेता परांजपे, डॉ. स्वाती दैठणकर , सुवर्णा गोखले यांच्या उपस्थितीत ”शेडस् ऑफ वूमनहूड ‘ या डॉक्यू फिल्मचे उद्घाटन होणार आहे.ऑक्टोबर पासून आवाज साधना, संगीत रसास्वाद लोकनृत्य कार्यशाळा, वॉटर कलर -ऑईल कलर टेक्नीक्स ‘,प्रसंग नाट्य दर्शन,दृश्य कला आस्वाद अशा विविध कार्यशाळा आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती मेळाव्यात देण्यात आली.

डेंगी, चिकनगुनिया सारखे आजार थोपवण्यासाठी उपाययोजना करा

सुनील माने यांचे सहआयुक्तांना निवेदन

पुणे ता. १९ (प्रतिनिधी) : औंध –बाणेर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या औंध, बाणेर, बालेवाडी,बोपोडी, चिखलवाडी, औंधरोड येथे सध्या डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या सारख्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी विनंती आज भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी  औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहआयुक्त श्री संदीप खलाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

यावेळी त्यांच्यासोबत खडकी युवा मोर्चा अध्यक्ष अजित पवार, स्वप्नील कांबळे, अनिल माने आदी उपस्थित होते.  

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात अद्यापही पाऊस सुरू आहे. पावसाचे पाणी सर्वत्र साठून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे औंध –बाणेर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या औंध, बाणेर, बालेवाडी,बोपोडी, चिखलवाडी, औंधरोड येथे सध्या डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या सारख्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे नागरिक प्रचंड त्रासले आहेत.

नागरिकांचे स्वास्थ बिघडल्याने महानगरपालिका,शासकीय रुग्णालये तसेच खासगी रुग्णालयात गर्दी वाढली आहे. नागरिक मोठ्या संख्येने डेंगीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या रुग्णालयात डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या सारख्या साथरुग्णांवरील औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी.

तसेच क्षेत्रीय कार्यालयामार्फत आपण औषध फवारणी, वस्ती पातळीवर धूर फवारणी यासारख्या उपाययोजना कराव्यात तसेच वस्तीमधील ड्रेनेज लाईनची स्वच्छता, जनजागृती, याप्रमाणेच डास उत्पत्ती ठिकाणे शोधून ती नष्ट करणे, डासांची उत्पत्तीसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणे आदी उपाय योजना तातडीने कराव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे.

गोदरेज अप्लायन्सेसतर्फे नवी प्रीमियम उत्पादने लाँच, सणासुदीच्या दिवसांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढीचे उद्दिष्ट

सणांच्या निमित्ताने ग्राहकांसाठी १०० पेक्षा जास्त नवी उत्पादने आणि विविध ग्राहक योजना

मुंबई, १९ सप्टेंबर २०२२ – गोदरेज अप्लायन्सेस या गोदरेज अँड बॉइसची प्रमुख कंपनी गोदरेज समूहाचे व्यावसायिक युनिटने सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दिल बोले वॉव हे नवे कॅम्पेन तयार केले असून त्यात सणांच्या निमित्ताने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी १०० पेक्षा जास्त नव्या मॉडेल्सचा तसेच विविध ऑफर्सचा समावेश असेल.

विविध विभागांमध्ये प्रीमियम उत्पादनांना मागणीचा ट्रेंड वाढत असल्याचे लक्षात घेत कंपनीने इयॉन वेलवेट श्रेणी तयार केली आहे, ज्यात आधुनिक वैशिष्ट्ये असलेले साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर्स आणि जर्मशील्ड तंत्रज्ञान, आधुनिक स्वरूप आणि बॅक पॅनेल कंट्रोल्स असलेली टॉप लोड वॉशिंग मशिन्स आणि इयॉन क्रिस्टल सीरीज – खाद्यपदार्थांना पृष्ठभागामुळे होणाऱ्या संसर्गापासून वाचवणारे नॅनो शील्ड तंत्रज्ञान असलेले ग्लास डोअर फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्स, सेमी- ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्सची नवी श्रेणी, डीप फ्रीझर्सयांचा समावेश आहे. त्याशिवाय ब्रँडने यावर्षी देशांतर्गत तयार करण्यात आलेली स्मार्ट एसीचा समावेश असलेली एसीची श्रेणी, काउंटर टॉप डिशवॉसर्स, ग्लास डोअर सिंगल डोअर रेफ्रिजरेटर्स उपलब्ध केले आहेत. त्याशिवाय कंपनीने गोदरेज इन्सुलीकुल ही आटोपशीर व पोर्टेबल इन्सुलीन कुलरची श्रेणी लाँच केली आहे, ज्यामध्ये इन्सुलीनचा प्रभावीपणा २ ते ८ अंश सेल्सियसला राखला जातो.

या नव्या ऑफर्सविषयी गोदरेज अप्लायन्सेसचे, गोदरेज अँड बॉइसचा भाग, व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, ‘गेल्या वर्षीच्या सणासुदीच्या हंगामापासून यंदा ऑक्टोबरपर्यंत आम्ही १०० पेक्षा जास्त नवी उत्पादने एसकेयूज लाँच करत ग्राहकांना भरपूर निवड मिळवून दिली आहे. ही नवी श्रेणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रीमियम उत्पादनांवर केंद्रित असून त्यात साइड बाय साइड रेफ्रिजरेटर्सपासून टॉप एंड ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्स, डबल डोअर रेफ्रिजरेटर्स, आधुनिक एसी यांचा समावेश आहे. यातील बहुतांश प्रीमियम उत्पादने आरोग्याला प्राधान्य देणारी असून त्यांच्यासाठी पेटंट अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यात रेफ्रिजरेटर्समधील फूड डिसइनफेक्शन तंत्रज्ञान, वॉशिंग मशिन्स जर्म डिसइनफेक्शन किंवा इन्सुलीनसाठी थर्मोइलेक्ट्रिक प्रीसिजन कुलिंग यांचा समावेश असून त्यामुळे ग्राहकांचे आरोग्य राखण्यास मदत होते. या उत्पादनांना ग्राहक योजनांची जोड देण्यात आली आहे व त्यामुळे येत्या सणासुदीच्या दिवसांत एकत्रितपणे ५० टक्क्यांची वाढ होईल असा अंदाज आहे.’

ग्राहक योजनांअंतर्गत ग्राहकांना विस्तारित वॉरंटी, एक्सचेंज, आघाडीच्या बँकांच्या मदतीने १२००० रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जाणार आहे. ग्राहकांना केवळ एक रुपयाचे डाउन पेमेंट करून गोदरेज अप्लायन्सेस घरी नेता येणार आहेत. ईएमआयचे सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून दिले जातील. या योजना पॅन भारतातील १८,००० पेक्षा जास्त दुकानांमध्ये १०० पेक्षा जास्त उत्पादनांवर उपलब्ध केल्या जातील. गोदरेज अँड बॉयसचे १२५ वर्षांचे सेलिब्रेशन सुरू असल्यामुळे प्रत्येक ग्राहकाला नोंदणी केल्यावर एक लाख रुपये जिंकण्याची संधी मिळेल.

लंपी नियंत्रणासाठी सनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक

पुणे दि.१९-जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार लंपी स्किन रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण व निर्मुलन करण्यासाठी तसेच गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशी यांच्या वाहतुकीवर, बाजार भरवण्यावर, जनावरांची जत्रा व जनावरांच्या प्रदर्शनावर बंदी घालणे इ. अनुषंगिक उपाययोजना प्रभावीपणे सनियंत्रीत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांची त्यांच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये पुढील आदेश होईपर्यंत सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमणुक केली आहे.

उपविभागीय अधिकारी यांनी शासनाच्या ८ सप्टेंबरच्या अधिसूचनेनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील तालुक्यांमध्ये व गावांमध्ये जनावरातील लंपी रोग नियंत्रणासाठी पुढील आदेश होईपर्यंत सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करावयाची आहे. गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशी यांच्या वाहतुकीवर बाजार भरवण्यावर, जनावरांची जत्रा व जनावरांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याबाबत व आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक लसीकरण करणे आवश्यक असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.

प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अंतर्गत अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. त्यामुळे गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तसेच गोजातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधीत झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आलेली आहे.

गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गो प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आलेली असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या अनुषंगाने प्रभावी उपाययोजना करण्यासाठी सनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

राहुल गांधींना पक्षाचे अध्यक्ष करा, महाराष्ट्र काँग्रेसचा ठराव मंजूर

प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना.प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रतिनिधींच्या बैठकीत दोन्ही ठराव एकमताने मंजूर.

मुंबई, दि. १९ सप्टेंबरमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी (AICC delegate ) यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या ठरावाला अनुमोदन दिले व सर्व प्रदेश प्रतिनिधींनी हा ठराव एकमताने मंजूर केला. तसेच सदर बैठकीत खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी अशी विनंती करणारा ठराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला. प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी या ठरावाला अनुमोदन दिले, हा ठरावही सर्व प्रतिनिधींनी एकमताने मंजूर केला.प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या बैठकीला प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, मधुकर चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, AICC चे सचिव व सहप्रभारी सोनल पटेल, संपतकुमार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बसवराज पाटील, आ. कुणाल पाटील, APRO दिनेशकुमार, नरेश रावत, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, सोशल मीडिया विभागाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार यांच्यासह सर्व प्रदेश प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले व आभार प्रदर्शन महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी केले.काँग्रेस पक्षांतर्गत निवडणुक प्रक्रिया कार्यक्रम सर्वांच्या सहकार्यांने व्यवस्थित पार पडला असून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे असे प्रदेश निवडणूक अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांनी सांगितले. राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारीपासून भारत जोडो पदयात्रा सुरु केली आहे. या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहनही पल्लम राजू यांनी यावेळी केले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर सुरु असलेली भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येणार आहे, या यात्रेच्या तयारीबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

वेदांता: देवेंद्र फडणवीस यांची नरेंद्र मोदींच्या आग्रहाखातर गुजरात निवडणुकीसाठीची रेवडी भेट!

पुणे-गेल्या महिनाभरामध्ये गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने जो धडाका लावला आहे आणि जनतेचा जो प्रतिसाद आहे तो पाहून भाजपचे धाबे दणाणले आहे.महाराष्ट्रातील बेरोजगारांचे काय व्हायचे ते होऊ दे गुजरात मध्ये मात्र निवडणुकांमध्ये फायदा व्हायला हवा. निवडणूक,सत्ता अधिक महत्त्वाची,मराठी माणूस जाऊदे खड्ड्यात असं धोरण भाजप -शिंदे गटाचे असल्याने देवेंद्र यांनी नरेंद्र यांच्या आग्रहाखातर गुजरातला दिलेली ही निवडणूक रेवडी आहे! असा आरोप मुकुंद किर्दत(राज्य प्रवक्ता, आप) यांनी केला आहे.

किर्दत यांनी असे म्हटले आहे कि,’ वेदांता फॉक्सकाँन कंपनी साधारणपणे दीड लाख कोटी ची गुंतवणूक पुणे जिल्ह्यात करणार होती. परंतु अचानक हा प्रोजेक्ट गुजरातकडे गेला. यावर प्रस्थापित पक्ष एकमेकांना दोष देत आहेत. महाविकास आघाडी भाजपवर ठपका ठेवत आहे, तर भाजप -शिंदे गट हा महाविकास आघाडीला दोष देत आहे. खरे तर महाराष्ट्राने या कंपनीला बऱ्याच सवलती म्हणजे स्टॅम्प ड्युटी पासून जमीन, विज बिल आदी मध्ये घसघशीत सवलती देण्याचे ठरवले होते. अचानक गुजरात मध्ये ही कंपनी गेली आणि त्यानिमित्ताने सव्वा लाख रोजगार संधी गमावली याला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्यक्षामध्ये या कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणुकीस प्रथम पसंती दिली असावी असे एकूण कागदपत्रावरून वाटते. परंतु गेल्या महिनाभरामध्ये गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने जो धडाका लावला आहे आणि जनतेचा जो प्रतिसाद आहे तो पाहून भाजपचे धाबे दणाणले आहे. मोदी सरकार सिसोदियांच्या मागे खोटेनाटे आरोप लावते आहे तर आरोग्य मंत्री जैन यांच्यावरही असेच आरोप करून त्यांना अटक केली आहे. गुजरात मध्ये रोजगारावरून सामान्य जनतेमध्ये रोष आहे याला सामोरे जाण्यासाठी मोदींना काहीतरी करून दाखवण्याची गरज होती आणि त्यामुळेच देवेंद्र फडवणीस यांनी मोदींना गुजरातसाठीची ही भेट दिली आहे. महाराष्ट्रात कंपनीला जरी गुंतवणूक करण्यात रस असला तरी आज भाजपला गुजरात मध्ये रोजगार निर्मितीत आलेल्या अपयशाला झाकण्यासाठी काहीतरी दाखवणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे सत्ता हातात आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगारांचे काय व्हायचे ते होऊ दे गुजरात मध्ये मात्र निवडणुकांमध्ये फायदा व्हायला हवा. निवडणूक,सत्ता अधिक महत्त्वाची,मराठी माणूस जाऊदे खड्ड्यात असं धोरण भाजप -शिंदे गटाचे असल्याने देवेंद्र यांनी नरेंद्र यांच्या आग्रहाखातर गुजरातला दिलेली ही निवडणूक रेवडी आहे!

पंतप्रधानांना चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

पुणे-जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील रानमळा येथील एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिठ्ठी लिहून जन्मदिनाच्या शुभेच्छा देत आत्महत्या केली.आत्महत्येआधी या शेतकऱ्याने एक चिठ्ठी लिहिली. त्यात त्यांनी आपल्या यातना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद मोदी यांचा शेतीवर कंट्रोल नाही. रिझर्व बँक ऑफ इंडियाने फायनान्स करणाऱ्या कंपन्यांवर अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र, तरीही या कंपन्यांची दादागिरी कमी होत नाही. याच कंपन्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे या शेतकऱ्याने लिहिले आहे.फायनान्सवाले दमदाटी करतात. पतसंस्थावाले अपशब्द वापरतात. यामुळे आत्महत्या करत असल्याचे शेतकारी दशरथ केदारी यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. ते शेतकरी अल्पभूधारक असून त्याने शनिवारी आत्महत्या केली.

दशरथ लक्ष्मण केदारी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबरला वाढदिवस झाला. एकीकडे त्यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 94 कोटी रुपये खर्चून भारतात आणलेल्या चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडत होते. तर त्याच्याच दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याने त्यांनाच शुभेच्छा देत आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केदारी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. तसेच त्यांच्या शेतमालाला देखील बाजारभाव मिळत नव्हता. त्यात बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्जवसूलीसाठी त्यांच्या कडे तगादा लावला होता. तसेच त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी देखील केली जात होती. यामुळे केदारी यांनी शनिवारी शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली.

केदारी यांनी चिट्ठीत नमूद केले आहे की, रिझर्व बँक ऑफ इंडियाने फायनान्स करणाऱ्या कंपन्यांवर अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र, तरीही या कंपन्यांची दादागिरी कमी होत नाही. याच कंपन्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत आहे.

दुर्गम भागातील रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी सॅटेलाइट केंद्रांच्या माध्यमातून दूर-दृश्य प्रणालीद्वारे टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध करून द्याव्यात –नितीन गडकरी

0

नागपूर/मुंबई, 19 सप्टेंबर 2022


नागपूरच्या एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचा चौथा स्थापनादिन आज साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधित केले. एम्सच्या संचालक डॉ विभा दत्ता यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, की आता आरोग्य विषयक संस्थांमध्ये रुग्णांना भरती करून घेण्याची सुविधा 24 तास उपलब्ध करण्याबाबत विचार व्हायला हवा कारण आरोग्यविषयक समस्या कुठल्याही क्षणी उद्भवत असतात. ते म्हणाले की नागपूरच्या आसपासच्या भागात  मूत्रपिंड प्रत्यारोपण, विशेष करून सिकल सेल अॅनिमिया तसेच थॅलेसेमिया यांसारख्या समस्या असलेले  रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या भागांमधील अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या दोन समुदायांमध्ये 70% प्रमाणात सिकल सेल अॅनिमिया, थॅलेसेमिया यांची समस्या दिसून येते. यावर संशोधन व्हायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या एम्सचा उपयोग येथील लोकांना व्हावा, अवयव प्रत्यारोपणासारख्या सोयी सामान्य लोकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न व्हायला हवे असे ते म्हणाले. या संस्थेत शस्त्रक्रियेसाठी उत्तम सुविधा आहेत, उत्तमोत्तम  तज्ञ डॉक्टर आहेत त्यामुळे  ज्या आजारांसाठी येथील गरीब रुग्णांना मुंबई, दिल्लीला जावे लागते त्यासंदर्भातील सुविधा रुग्णांना येथे उपलब्ध झाल्या तर त्यांचा मोठा फायदा होईल असे मत त्यांनी नोंदविले.

केंद्रीय मंत्री  म्हणाले की, “नागपूर आज मेडिकल हब म्हणून विकसित होत आहे, मध्य प्रदेश तसेच आजूबाजूच्या भागातून उपचारासाठी गरीब रुग्ण येथे येतात. गडचिरोली हा आकांक्षी जिल्हा आहे, तेथे आरोग्य सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे अशा दुर्गम भागातील गरीब, गरजू रुग्णांना  सॅटेलाईट केंद्रांच्या माध्यमातून या संस्थेतील डॉक्टर्स दूर-दृश्य प्रणालीद्वारे टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध करून दिल्या तर त्या सामाजिक तसेच आर्थिकदृष्ट्या मागास भागातील रुग्णांना त्याचा मोठा लाभ मिळेल.”

नागपूर हे औषध निर्माणाच्या बाबतीत देखील पुढारलेले शहर आहे. एम्स संस्थेच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य लोकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी पातळीवर जी कामे करणे किंवा निर्णय घेणे आवश्यक असेल त्याची माहिती आपल्याला द्यावी,  अशी सूचना नितीन गडकरी यांनी एम्स प्रशासनाला केली.

कोविड काळात या संस्थेने उत्तम कार्य केले आहे. जसे वैद्यकीय विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळणे आवश्यक आहे तसेच सामान्य रुग्णांना देखील उत्तम प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संस्थेच्या अद्ययावत इमारतीच्या कामाची केंद्रीय मंत्र्यांनी प्रशंसा केली. येणाऱ्या काळात ही संस्था जगातील सर्वोत्तम अशा प्रकारची संस्था असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एम्स संस्थेमध्ये येणारा रस्ता दुमजली पद्धतीने विकसित करण्याचे काम लवकरच सुरु होईल अशी माहिती त्यांनी दिली.

ऊर्जानिर्मितीसाठी सांडपाण्याचा वापर करून वर्षाला 300 कोटी रुपयांचा महसूल मिळविणारे नागपूर हे देशातील पहिले शहर आहे. येथे आता एम्स, आयआयएम, ट्रिपलआयआयएम, आयआयटी, सिंबायोसिस विद्यापीठ, उत्तमोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत, कायदेविषयक अशा उत्तमोत्तमशिक्षण संस्था आहेत, मिहान आहे. 11 सीटर फाल्कन जेट विमान निर्मितीचे काम या वर्षीच्या अखेरीस सुरु होईल असे त्यांनी सांगितले. येत्या 2-3 महिन्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम देखील सुरु होईल. एम्स संस्थेच्या नजीक नवे रेल्वे स्थानक उभारण्यावर विचारविनिमय सुरु आहे असे त्यांनी सांगितले. हा परिसर उत्तम प्रकारे विकसित झाला आहे. या संस्थेत येण्यासाठी आवश्यक बस सेवेच्या विकासात असेलल्या समस्या लवकरच सोडविल्या जातील असे ते म्हणाले. ही संस्था देशात पहिल्या क्रमांकाची संस्था व्हावी यासाठी आपण सर्व प्रयत्न करत आहोत. 

‘जेम’वर आतापर्यंत 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक सार्वजनिक खरेदी

0

मुंबई, 19 सप्‍टेंबर 2022

“मी 2017 पासून जेम (GeM- Government e-Marketplace) वर नोंदणी केल्यापासून माझा व्यवसाय वाढला आहे. पूर्वी, मी फक्त फोर्ट परिसरातील माझ्या दुकानाच्या परिसरात आणि फक्त मुंबईतच वस्तू पुरवू शकत होतो. आता, मी माझी उत्पादने सर्वत्र पाठवतो ! इंडिया पोस्ट आणि तीन खाजगी कुरिअर सेवा प्रदात्यांशी करार केला असून ते  माझ्या दुकानात वस्तू न्यायलाही येतात  आणि वेळेत त्या वितरितही  करतात”, हितेश पटेल सांगत होते. जेमवर नोंदणीकृत असलेल्या  मिलन स्टेशनर्स अँड प्रिंटर्स या फर्मचे ते मालक आहेत. 

जोसेफ लेस्ली डायनॅमिक्स मॅन्युफॅक्चरिंग प्रा.लि. या अग्निसुरक्षा उपकरणे पुरवठादार कंपनीचे व्यवस्थापक  उमेश नई सांगत होते की त्यांना जेमच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 30 कोटींच्या ऑर्डर मिळाल्या आहेत!  “जेममुळे व्यवसाय करण्याच्या खर्चात लक्षणीय घट झाली आहे.  विशेषत: यामुळे संभाव्य खरेदीदारांना भेटण्यासाठी प्रवासाची गरज कमी झाली आहे. आमची एमएसएमई कंपनी आहे,त्यामुळे  पोर्टलद्वारे प्रदान करण्यात येणारे   एमएसएमई विक्रेत्यांसाठी लाभ आमच्या कंपनीला  मिळतात. जेम हे खूप चांगले व्यासपीठ आहे. आमच्यासारख्या छोट्या कंपनीसाठी अत्यंत फायदेशीर आहे.”

एमएसएमई फर्म ओंकार एंटरप्राइझचे केतन चौधरी यांनी सांगितले की जेममुळे  त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत झाली. त्यांनी 2020 मध्ये जेमवर नोंदणी करून  प्रिंटर आणि टोनरची विक्री सुरू केली. आता ते संगणक आणि लॅपटॉपही विकत आहेत! “जेम आमच्यासारख्या लहान व्यवसायांना विस्तार करण्यात मदत करते”, असे त्यांनी सांगितले. 

सरकारी ई-मार्केटप्लेस जेम वरील अनेक  विक्रेत्यांनी आज मुंबई येथे आयोजित(विक्रेत्यांशी संवाद)मध्ये त्यांचे अनुभव सांगितले. यात  विक्रेत्यांना जेमची  नवीन वैशिष्ट्ये  आणि कार्यक्षमतेबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली.  यामुळे  त्यांना पोर्टलचा उपयोग अधिक सुलभतेने करता येतो. जेमचे महाराष्ट्र व  दमण आणि दीवसाठीचे बिझनेस फॅसिलिटेटर( व्यवसाय सुलभकर्ते) निखिल पाटील यांनी माहिती दिली की जेम  पोर्टल फक्त केंद्र सरकारच्या कार्यालयांपुरते मर्यादित नाही. हे केंद्र/राज्य सरकारी मंत्रालये, विभाग, संस्था आणि सार्वजनिक उपक्रमांसह सर्व सरकारी खरेदीदारांसाठी वन-स्टॉप ऑनलाइन खरेदी पोर्टल प्रदान करते.

आपल्या सादरीकरणात पाटील यांनी लघु आणि मध्यम उद्योगांना जेम पोर्टलच्या माध्यमातून  व्यवसाय करण्याचे लाभ सांगितले. सूक्ष्म आणि लघुउद्योगांना  विशेषत: एकच मालक असलेल्या उद्योगांना  आता जेम मंचावर  ऑर्डर स्वीकारण्याच्या वेळेस  कर्ज मिळू शकते. व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी गेल्या 24 महिन्यांत जेमवर अंदाजे 2,000 किरकोळ आणि 460 हून अधिक कार्यावली  सादर करण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमाला जेमचे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश संचालक आणि महाराष्ट्रातील जेमचे  नोडल अधिकारी निशांत दीनगवाल देखील उपस्थित होते. यावेळी पत्र सूचना कार्यालयाच्या  मुंबई प्रदेश  कार्यालयाचे उपसंचालक  दीपजॉय मामपल्ली हेही उपस्थित होते.

गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जेम) :

राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी पोर्टल -गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जेम ), ही  वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी अथपासून इतिपर्यंत सेवा पुरवणारी  ऑनलाइन बाजारपेठ आहे. सार्वजनिक खरेदीची पुनर्व्याख्या प्रस्थापित करण्याच्या  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा एक भाग म्हणून 9 ऑगस्ट 2016 रोजी या पोर्टलचा प्रारंभ करण्यात आला.  जेम संपर्कविरहित, कागदविरहित आणि कॅशलेस असून  कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता या तीन स्तंभांवर उभारलेले आहे. 

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सुवर्णजडीत मंदीर निर्मितीसाठी खुल्या हृदयाने दान करावेः खासदार श्रीनिवास पाटील

श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट

पुणे, दिः19, सप्टेंबरः जगतगुरू संत श्री तुकाराम महाराज यांचे भंडारा डोंगरवर सुवर्णजडीत मंदीर निर्मितीसाठी १-१ रूपया जमा करू. आजच्या या संकल्पाला कल्प वृक्षात बदलू. त्यासाठी समस्त वारकरी, भाविक भक्त आणि महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनी खुल्या हृदयाने दान करण्याचे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट, मावळ, जि. पुणेचे यांच्यावतीने भंडारा डोंगर येथे जवळपास १५० कोटी रूपये खर्च करून सुवर्णजडित मंंदिराची निर्मिती करण्याचे कार्य सुरू झाले आहे. यासाठी लागणार्‍या निधी संकलनासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती, आळंदी देवाची, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट, अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी केलेल्या आवाहानानंतर खासदार श्रीनिवास पाटील यांनी १ महिन्याची १ लाख ११ हजार रूपये पेन्शन दिली. तसेच विविध शैक्षणिक संस्थांनी एक दिवसाचे वेतन, कारखानदार, उद्योगपती, भाविक भक्तांनी आपल्या यथाशक्ती नुसार दान राशीचे चेक दिले. तसेच, डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी स्व.उर्मिला कराड यांच्या सोन्याचे १०० तोळे दागिणे आणि संस्थेच्या कर्मचार्‍यांच्या एक दिवसाचे वेतन दिले. त्याच प्रमाणे समाजातील अन्य दानशुर व्यक्तिंनी यथाशक्ती दान दिले आहे.
यावेळी खासदार श्रीरंग अप्पा बारणे, शांती ब्रह्म मारूतीबाबा कुर्‍हेकर, माजी खासदार नानासाहेब नवले, माजी मंत्री कमलकिशोर कदम, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती, आळंदी देवाची, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, बापूसाहेब मोरे, समाजसेवक उल्हासदादा पवार, मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्र कराड नागरे, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड, मदनमहाराज गोसावी, आळंदी देवस्थानाचो डॉ. अभय टिळक, आमदार सुनील शेळके, बाळा भेगडे, कृष्णराव भेगडे, डॉ.यू.म.पठाण, नितीन महाराज मोरे, राहुल कलाटे, बापूसाहेब देहूकर, संजोग वाघेरे, बाळासाहेब काशीद, भाऊसाहेब भेगडे यांच्यासह अनेक भक्तगण मोठया संख्येत उपस्थित होते.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, मंदिराच्या कार्याला योग्य दिशा देण्यासाठी आणि उभारणीसाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. मावळची भूमी ही भक्ती शक्तीची परंपरा असणारी आहे. येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना अभंग सुचले. तुकोबारायांचे चिंतनस्थळ असणार्‍या भंडारा डोंगरावर साकारलेले मंदिर जगाला प्रेरणा देईल.येथे मुख्यमंत्री, खासदार, भाविक भक्त, शेतकरी, प्रतिनिधी यांनी भेटे देऊन आपला सहयोग दयावा.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मंदिर निर्मितीचा संकल्प घेऊन जे कार्य सुरू केले आहे. त्याला प्रत्येकांनी हातभार लावला. येथे उभारण्यात येणार्‍या भव्य शिल्पामुळे जगद्गुरूंचे कार्य संपूर्ण जगभरात पोहचण्याचे कार्य लवकर होईल.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ज्ञानाचे तीर्थ क्षेत्र म्हणून हे उदयास येणार आहे. स्वामी विवेकानंद म्हणत असे की आपले हात हे घेण्यासाठी नाही देण्यासाठी सुध्दा असतात. याच न्यायानुसार उदार अंतःकरणाने मदत करून आपल्या घराण्याच्या नावलौकिकात व वैभवात भर पाडा. या सुवर्णजडित मंदिराच्या माध्यमातून भारताच्या वैभवात भर पडेल. याच अर्थाने भारत विश्वगुरू म्हणून संपूर्ण जगासमोर उदयास येईल.
उल्हास पवार म्हणाले, गाथेच्या जन्मभूमीत मंदिर उभारले जात आहे, हा सुवर्ण पर्वत आहे. येथील मंदिर सुवर्णमय करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे.
या प्रसंगी नानासाहेब नवले व माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी आपले मनोगत मांडून जनतेस आवाहन केले.
प्रास्ताविक बाळासाहेब काशिद यांनी केले.
बापूसाहेब भेगडे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

विद्यार्थ्यांनी देशविकासाचा आणि विश्वकल्याणाचा मंत्र जपावा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि.१९: अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अभ्यास करताना देशविकासाचा, मानवतेचा आणि पर्यायाने विश्वकल्याणाचा मंत्र जपावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे अभियंता दिनानिमित्त आयोजित ‘सीओईपी अभिमान अवॉर्ड्स’ वितरण सोहळ्यात राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमास राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, सीओईपीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, सीओईपी संचालक प्रा. डॉ. मुकुल सुतावने, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भारत गीते, मानद सचिव प्रा. एस.एस. परदेशी आदी उपस्थित होते.

सीओईपीच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करताना राज्यपाल म्हणाले, येथून विश्वविख्यात अभियंता भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांच्यासह आपल्या क्षेत्रातील उच्च व्यक्तिमत्वे घडली. त्यांनी आपल्या मातृभूमीसाठी केलेले कार्य विद्यार्थ्यांसमोर ठेवले पाहिजे. आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जात असताना त्या माध्यमातून देशासाठी काम करावे. आज आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना संपूर्ण जग भारताकडे आशेने पहात आहे. जगामध्ये आपापसात सहयोगाचे युग आले असून त्याचा लाभ अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असेही श्री. कोश्यारी म्हणाले.

श्री. कोश्यारी पुढे म्हणाले, सध्याचे युग हे कृत्रिम प्रज्ञा (एआय), इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आणि सायबर क्षेत्राचे असल्याने या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी काम करावे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक तरतुदी आहेत. आंतर विद्याशाखीय अभ्यास रचना केल्यामुळे विद्यार्थ्यांना एका क्षेत्रात शिक्षण सुरू असताना मध्येच त्याच्या आवडीप्रमाणे वेगळ्या क्षेत्रातील शिक्षणाकडे वळता येईल. या तरतुदींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.

सामाजिक दायित्व जपत संस्थेसाठी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याची भूमिका ठेवल्याबद्दल सीओईपीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे कौतुक करत भविष्यातही संस्थेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी भरीव निधीद्वारे योगदान देतील, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

प्रतापराव पवार म्हणाले, या संस्थेचा मोठा इतिहास असून येथील विद्यार्थी शिक्षण घेत असताना ज्ञानाची निर्मिती करतात. महाविद्यालयाचे विद्यापीठामध्ये रूपांतर झाल्यामुळे ते ज्ञाननिर्मितीचे विद्यापीठ बनणार आहे. आपण देशातील नव्हे तर जगातील उत्तमोत्तम विद्यापीठाशी स्पर्धा करायला हवी. संस्थेला शासनानेही मोठे सहकार्य लाभत असून १५० कोटी रुपयांचा निधी तसेच नवीन कॅम्पस साठी ३० एकर जागा दिली आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत अभ्यासरचनेद्वारे भविष्य घडवावे, असेही त्यांनी आवाहन केले.

भारत गीते यांनी प्रास्तविकात कार्यक्रमाविषयी माहिती दिली.  माजी विद्यार्थी संस्थेच्या विकासासाठी तसेच शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भरीव आर्थिक मदत जमा करतात. १५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी १ कोटी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा या कार्यक्रमासाठीच्या शुभेच्छा संदेशाची चित्रफीत दाखवण्यात आली. गौर गोपाल दास यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय जीवनविद्या प्रशिक्षक गौर गोपाल दास, राज पथ इन्फ्राकॉन प्रा. लि. चे संस्थापक अध्यक्ष व संचालक जगदीश कदम, लडाख केंद्रशासित प्रदेशाचे पोलीस प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक सतीश खंदारे, टाटा प्रोजेक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक पै, ‘एस्सार ऑइल अँड गॅस’चे माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विलास तावडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी  या प्रसंगी सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेच्या स्मरणिकेचे प्रकाशन, तसेच संस्थेच्या इतिहास व घडामोडींवर आधारित चित्रफितीचे अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमास संस्थेचे माजी विद्यार्थी, प्राध्यापक, विविध विद्याशाखांचे प्रमुख, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.