Home Blog Page 1602

आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम,येथे तीन हजार कोटी रुपयांच्या आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी

0

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम,येथे आंध्र प्रदेशचे रस्ते आणि बांधकाम मंत्री दादीसेट्टी रामलिंगेश्वर राव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तीन हजार कोटी रुपयांच्या आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी झाली. 

यावेळी झालेल्या समारंभात उपस्थितांना संबोधित करताना गडकरी म्हणाले की, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ते काकीनाडा  किनारपट्टी आर्थिक क्षेत्र (सेझ),सेझ पोर्ट, मासेमारीसाठी बंदर (फिशिंग हार्बर) आणि काकीनाडा अँकरेज पोर्ट यांची हरीत क्षेत्र रस्ते जोडणी (ग्रीन फील्ड रोड कनेक्टिव्हिटी) होईल, ज्यामुळे काकीनाडा बंदरातून तांदूळ,मासे, तेल जेवण, लोह-खनिज,जैव-इंधन, ग्रॅनाइट यांची निर्यात सुरळीतपणे होऊ शकेल.

या रस्ते प्रकल्पांत कैकाराम, मोरामपुडी, उंडाराजावरम, तेताली आणि जोन्नाडा येथील पाच उड्डाणपुलांचे बांधकाम समाविष्ट आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर, अनेक ठिकाणांहून सहजपणे आणि सुरक्षितपणे वाहतूकीची व्यवस्था होईल, असेही गडकरी यावेळी पुढे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाअंतर्गत आंध्रप्रदेशला समृद्ध करण्यासाठी तेथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,तसेच वरील प्रकल्पांच्या विकासामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल,असेही गडकरी यांनी यावेळी नमूद केले.

महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीचे आयोजन

पुणे दि.२२: आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतीक मंत्रालय, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या अर्थसहाय्यातून उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, शासकीय विभागीय ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

रॅलीचे उद्घाटन उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्या हस्ते झाले. रॅलीला सारस बाग येथून प्रारंभ झाला. रॅली पुरम चौक मार्गे बाजीराव रोड, नातुबाग चौक, शनिपार चौक, आप्पा बळवंत चौक मार्गे शासकीय विभागीय ग्रंथालय येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी लेखिका माधवी कुंटे, सहाय्यक ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर, ग्रंथपाल सुरेश रिद्दीवाडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले उपस्थित होते.प्रास्ताविक श्री.रिद्दीवाडे यांनी केले. रॅलीमध्ये सेंट हिल्डाज मुलींची शाळा, जिजामाता मुलींची शाळा, नूतन मुलींची शाळा, ठाकरसी कन्या प्रशाला, सुंदराबाई राठी मुलींच्या शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला

विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपूल एक वर्षात पूर्ण करणार

आमदार शिरोळे यांची मागणी पुम्टाच्या बैठकीत मान्य

पुणे – पुणे विद्यापीठ चौकातील नवीन एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे काम नियोजित वेळेपेक्षा एक वर्ष अगोदरच पूर्ण करण्याची आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची आग्रही मागणी पुणे युनिफाईड मेट्रो पोलिटन ट्रान्स्पोर्ट ॲथॉरिटी (PUMTA) पुम्टाच्या बैठकीत आज (गुरुवारी) मंजूर करण्यात आली. त्यामुळे जानेवारी २०२४मध्ये विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल वाहनचालकांना वापरासाठी उपलब्ध होणार आहे.

विद्यापीठ चौकातला जुना उड्डाणपूल दोन वर्षांपूर्वी पाडल्यानंतर येथील वाहतूक विस्कळित झाली. वाहनचालकांना त्याचा अतोनात त्रास होऊ लागला. पुणे महापालिका, वाहतूक पोलीस, पीएमआरडीए, मेट्रो अधिकारी, विभागीय आयुक्त अशा विविध पातळ्यांवर ही समस्या सोडविण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पाठपुरावा केला. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे आमदार शिरोळे यांनी विस्तृतपणे हा विषय मांडला. त्यावेळी कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी पुम्टाची बैठक पुण्यात होईल, आणि बैठकीला आमदार शिरोळे यांना बोलावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते, त्यानुसार विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल या एकाच विषयावर पुम्टाची आज बैठक झाली. त्यात आमदार शिरोळे यांनी आग्रही भूमिका घेतली आणि पुलाचे काम नियोजित वेळेपेक्षा एक वर्ष अगोदर करण्यास मंजुरी मिळविली.

हिंजवडी – शिवाजीनगर या मेट्रो चे काम ६ महिन्यापूर्वी सुरु झाले. त्यांनी एकाच वेळी तीन ठिकाणी काम सुरु केले मात्र त्यामध्ये विद्यापीठ चौकाचा समावेश नव्हता. त्यांच्या नियोजनानुसार सप्टेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२४ या दरम्यान विद्यापीठ चौकातील मेट्रो आणि उड्डाणपूल यांचे काम करण्यात येणार होते. मात्र गेले दोन वर्ष वाहतुकीचा त्रास सहन करणारे वाहन चालक यांना आणखी दोन = अडीच वर्षे हा त्रास सहन करावा लागणार होता.

शिरोळे यांनी पुम्टा च्या बैठकीत याच मुद्द्यावर भर दिला. पुलाचे बांधकाम प्राधान्याने १ वर्षात पूर्ण करावे यासाठी योग्य ती तांत्रिक छाननी करावी. मेट्रो त्याच्या नियोजित वेळेला सुरु करावी मात्र उड्डाणपूल हा वाहनचालकांना लवकर उपलब्ध करून द्यावा यावर त्यांनी भर दिला. सुमारे दीड तास याबाबत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. पूल बांधणारी टाटा प्रोजेक्ट कंपनी यांनी तीन महिने लवकर काम करण्याचे आश्वासन दिले मात्र १ वर्षातच काम पूर्ण करावे असा आग्रह शिरोळे यांनी धरला. त्यांचे म्हणणे विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव यांनी मान्य केले. या बदलासाठी आवश्यक असणारा तांत्रिक अहवाल येत्या दोन महिन्यात सादर करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना व टाटा कंपनीला केली. त्यामुळे हा पूल येत्या वर्षात बांधून पूर्ण करण्याचा निर्णय पुम्टा च्या बैठकीत आज घेण्यात आला.

दरम्यानच्या काळात वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग जसे कि पुणे विद्यापीठातील वॅमनिकॉम आणि चतुश्रुंगी पोलीस स्टेशन पासून जाणारे आतील रस्ते उपलब्ध करून देण्याचे मनपा आयुक्त श्री विक्रम कुमार यांनी बैठकीत मान्य केले. त्याचवेळी प्रकल्प पूर्ण होईपर्यंत येथील सर्व मार्गांवर वाहतूक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची शिरोळे यांची मागणी पोलीस उप आयुक्त यांनी मान्य केली.

शिरोळे म्हणाले “माझ्या मतदारसंघातील असंख्य मतदारांसह पुणे व पिंपरी – चिंचवड मधील नागरिकांना येथील वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता तो सोडविण्यासाठी मी गेले वर्षभर प्रयत्नशील होतो. तत्कालीन उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार यांचेबरोबर ही या विषयाबाबत बैठक घेतली होती. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना हा विषय सांगितला होता. त्यांच्या मार्गदर्शनानुसार हा प्रश्न सोडविण्यासाठी काम केले. विधिमंडळात प्रश्न मांडल्याने त्याला गती प्राप्त झाली. नोव्हेंबर २०२४ ऐवजी डिसेंबर २०२३ मध्येच हे बांधकाम पूर्ण करण्याचे सर्व अधिकाऱ्यांनी पुम्टा च्या बैठकीत मान्य केले. त्यामुळे या भागातून जाणाऱ्या सर्वच वाहनचालकांची सोय होणार आहे.

या बैठकीत शिरोळे यांच्यासमवेत विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव, मनपा आयुक्त श्री. विक्रम कुमार, पीएमआरडीए चे आयुक्त श्री. राहुल महिवाल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, टाटा चे अधिकारी, पोलीस व पिंपरी – चिंचवड मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

राजकीय दबावाखाली महापालिका प्रशासक हडपसरला सापत्न वागणूक देत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप -महापालिकेसमोर निदर्शने

पुणे-राजकीय दबावाखाली महापालिका प्रशासक हडपसरला सापत्न वागणूक देत असून त्यातून हडपसरवासीयांच्या आरोग्याच्या समस्या वाढवीत असल्याचा आरोप आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महापालिकेसमोर आंदोलन करत केला. या आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार श्री.चेतन तुपे ,माजी महापौर वैशालीताई बनकर , माजी नगरसेवक योगेश ससाणे,अशोक कांबळे,गफुर पठाण,प्रदीप देशमुख,मृणालिनी वाणी,रुपाली पाटील,डॉ. शंतनु जगदाळे,दिपक कामठे, आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

हडपसर मतदारसंघातील रामटेकडी येथे कचरा डेपो शेजारीच पुणे महानगरपालिका मोकाट कुत्र्यांच्या उपचारासाठी हॉस्पिटल बांधत आहे.अगदी कचरा डेपो शेजारी होत असलेल्या या हॉस्पिटलमुळे प्राणीमित्रांच्या आरोग्याचा प्रश्न सुटण्याऐवजी वाढणार आहे.या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.तसेच सदर हॉस्पिटल योग्य ठिकाणी हलविण्याची मागणी करण्यात आली.
पुणे शहरात पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यात प्रामुख्याने कुत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. या कुत्र्यांची गणना व्हावी. त्यांना आरोग्य व व्हॅक्सिनेशनच्या सर्व सुविधा मिळाव्यात, अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. हडपसर रामटेकडी येथे होणारे हॉस्पिटल कचरा डेपो शेजारीच असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या प्राण्यांना विविध प्रकारच्या विषाणूंची लागण होण्याची शक्यता आहे. ही शक्यता पाहता सदर जागेत प्राण्यांचे हॉस्पिटल होणे हे अतिशय धोकादायक ठरू शकते. हडपसर परिसरात सातत्याने अश्या प्रकारचे प्रकल्प येत असल्याने पुढील काळात हडपसर परिसरातील नागरिकांना त्यांच्या विकास कामांसाठी जागाच शिल्लक राहणार नसल्याचा धोका आहे.
शहरातील इतर भागात स्वच्छ ठिकाणी सदर हॉस्पिटल हलवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रयत्नशील आहे. तश्या आशयाचे निवेदन आयुक्तना देण्यात आले असून याबाबत तातडीने पुनर्विचार करणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

सीमा आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त५० पुरोहित व अंध विद्यार्थिनींना साहाय्य

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या सुविद्य पत्नी व महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध दिवाळी फराळ व खाऊ वाटप करण्यात आले.
ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र प्रदेशतर्फे मंत्र जागर करून सीमाताई आणि रामदास आठवले यांचे दीर्घायुष्य आणि यशासाठी प्रार्थना करण्यात आली. ५० पुरोहित बंधुना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. कोथरुड येथील अंध शाळेत मुलींच्या हस्ते केक कापून, त्यांच्यासाठी स्नेहभोजन व्यवस्था करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या मुलींना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. 
पुणे बार असोसिएशन सदस्या ॲड अर्चिता मंदार जोशी यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम झाला. माजी नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर, मोनिकाताई मोहोळ, अखिल महाराष्ट्रीय ब्राह्मण महासंघाचे कार्याध्यक्ष आनंद दवे, ‘आरपीआय’चे ॲड मंदारभाऊ जोशी, महासंघाचे श्वेता कुलकर्णी, विद्या घटवाई, हर्षद ठकार, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री थत्ते आदी उपस्थित होते.

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयामार्फत संस्कारी पिढ्या निर्माण करण्याचे कार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर दि.22 : माणसाच्या शरीराची स्वच्छता आंघोळीने होईल. मात्र, मनाची स्वच्छता, शुद्धता करण्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारीमार्फत देशभर कार्य सुरू आहे. या ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या राजयोगी शिक्षिका -शिक्षक देशभर संस्कारी पिढ्या निर्माण करण्याचे कार्य करतात. याचा आम्हाला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात या संस्थेच्या कार्याचे महत्व विशद केले.

विदर्भात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कार्याला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला नागपूर येथील लक्ष्मीनगर, नंतर धरमपेठ त्यानंतर वसंत नगर तर आता जामठा परिसरात ‘विश्वशांती सरोवर’ हे मोठे केंद्र या ठिकाणी निर्माण झाले आहे. नागपूर येथील ब्रह्मकुमारींच्या सुवर्ण महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित होते.

व्यासपीठावर राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यासह राजयोगिनी संतोष दीदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मोहन मते, माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, अजय संचेती, नागपूर येथील ब्रह्मकुमारी वरिष्ठ राजयोगी शिक्षिका रजनी दीदी, उपमुख्यमंत्री यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस, किरीट भंसाली, केंद्राचे वरिष्ठ साधक उपस्थित होते.

भारताचे हृदयस्थान असणाऱ्या नागपूर शहरांमध्ये गेल्या 50 वर्षात प्रजापिता ब्रह्मकुमारीमार्फत संस्कारी पिढ्या निर्माण करण्याचे कार्य आमच्या भगिनीमार्फत सुरू आहे. आज जमलेल्या गर्दी आहे. या गर्दीमध्ये भव्यता नाही, शुद्धता आहे, साधेपणा आहे, आमच्या मनाची स्वच्छता तुम्ही ठेवता. याचा आम्हाला आनंद आहे, असे फडणवीस म्हणाले.

जगातल्या सर्व ठिकाणी शांती नांदावी, यासाठी या ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या भगिनी जगभर काम करतात. शांतीकडे जाणारा मार्ग निश्चित करण्याचे काम ब्रह्मकुमारी करत आहे. जगातला अंधकार दूर करणे गरजेचे आहे अज्ञानाच्या अंधारात असल्यामुळे संघर्ष आहे. हा संघर्ष कमी करून शांती निर्माण करण्याचे पवित्र काम आपण करीत असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

जगभरातील देशभरातील संशोधन व उत्खननातून अनेक पुरावे पुढे आले आहेत .जगातली सर्वात प्राचीन सभ्यता भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे भारत जगाला विचार देऊ शकतो. जगाला देखील भारताकडून हीच अपेक्षा आहे. त्यामुळे देशाला, जगाला शांतता बहाल करण्याचे काम ब्रह्मकुमारीमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे, या कार्यासाठी आमच्या शुभेच्छा असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनीही यावेळी संबोधित केले. ते म्हणाले ब्रह्मकुमारी यांचे विचार अतिशय शुद्ध असून जगामध्ये शांती प्रस्थापित करणे हे त्यांचे काम आहे त्यांच्या कामामुळे भारताला विश्वगुरू बनविण्याचे स्वप्न आम्ही सर्वांनी बघितले आहे ते निश्चित पूर्ण होईल.

साधे व स्वच्छ विचाराचे जगणे भ्रष्टाचार देखील दूर करू शकते. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रत्येक नागरिकांने साधेपणाची व शुद्ध आचाराची जीवनपद्धती अवलंबल्यास विश्वगुरू होण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी खासदार विजय दर्डा, अजय संचेती यांनीही संबोधित केले. विदर्भात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कार्याला 50 वर्षे झाले आहेत. वरिष्ठ राजयोगी शिक्षिका रजनीदीदी यांच्या मार्गदर्शनात नागपूर, विदर्भातील प्रमुख शहरातील हजारो राजयोगी शिक्षिका व शिक्षक सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी जामठा येथील विश्वशांती सरोवर येथे एकत्रित आले होते.

मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा- क्रीडा मंत्री गिरीष महाजन

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोनेरी यश संपादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंना दिल्या शुभेच्छा

पुणे दि.२२-राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

गुजरात येथे सुरू झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, क्रीडा संचालक सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, खजिनदार धनंजय भोसले, क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते

श्री. महाजन म्हणाले, प्रशिक्षक, संघटक, व्यवस्थापक आणि खेळाडूंनी मित्रत्वाच्या भावनेने एकत्रीतपणे उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रयत्न करावे. खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. खेळाडूंनी शास्त्रोक्त पद्धतीने सराव करून चांगली कामगिरी करावी. शासनातर्फे खेळाडूंच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल.

खेळाडूंचा भोजन भत्ता वाढवून २०० ऐवजी ४८० करण्यात आला आहे. गावपातळीवर चांगल्या सुविधा असाव्यात यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत. खेळाडूंनी शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे आणि व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्री.दिवसे म्हणाले, बालेवाडी येथे १५ क्रीडा प्रकारांचे सर्व शिबीर सुरू असून राज्यात इतरत्रही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहेत. खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यापुढील काळात क्रीडा विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करून शासनास सादर करण्यात येईल. प्रत्येक खेळाडूंची माहिती डिजिटल स्वरूपात ठेवण्यात येईल. खेळाडूंनी गुजरात येथील स्पर्धेत खिळाडूवृत्तीने सहभाग घेऊन सुवर्ण कामगिरी करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

प्रास्ताविकात श्री.शिरगावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेविषयी माहिती दिली. खेळाडूंना शासनातर्फे उत्तम सुविधा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे खेळाडू चांगली कामगिरी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

३४ क्रीडाप्रकारात खेळाडू पदकासाठी लढणार
श्री.महाजन यांनी बालेवाडी येथील सराव शिबिरात सहभागी खेळाडूंची भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पदक विजेत्या महाराष्ट्र टेबल टेनिस संघांचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी स्पर्धेला भेट देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ३४ क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचे ७०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ध्यानचंद पुरस्कारार्थी प्रदीप गंधे हे पथकाचे नेतृत्व करत असून बॅडमिंटन खेळाडू चिराग शेट्टी आणि कबड्डी खेळाडू सोनाली शिंगटे यांच्या ध्वजधारक संचलनात पथकाच्या अग्रभागी असतील.

स्पर्धेसाठी पुण्यातील बालेवाडी येथे महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मागील दोन आठवड्यापासून खेळाडू या स्पर्धेसाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करत आहेत.

स्पर्धेचे औपचारिक उदघाटन २९ सप्टेंबर रोजी होणार असून तिरंदाजी, कनॉइंग कयाकिंग, फुटबॉल, कबड्डी, खो खो, लॉन टेनिस, नेमबाजी, रोईंग, रब्बी ट्रायथालन मल्लखांब, सॉफ्ट टेनिस, रोलर स्केटिंग, योगासन अथलेटिक्स, बॉक्सिंग, तलवारबाजी, ज्युडो, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, सायकलिंग, सॉफ्ट बॉल, स्क्वश, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी आणि जलतरण या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचा सहभाग आहे.

या स्पर्धेतील काही स्पर्धांना उद्घाटनापूर्वीच सुरुवात झाली आहे. यामध्ये टेबल टेनिसचा समावेश आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी पदके मिळवली आहेत. महाराष्ट्राचा महिला संघ रौप्य तर पुरुष संघाला कांस्य पदकाचा मानकरी ठरला.

शाश्वत विकास संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग महत्वाचा-गिरीष महाजन

पुणे दि.२२:- शाश्वत विकास संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग महत्वाचा असून गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेच्या मानसिकतेतही परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे भारत सरकारचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्रालय व राज्य शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, केंद्रीय पंचायत राज विभागाचे सचिव राजेश कुमार,अतिरिक्त सचिव चंद्रशेखर कुमार,सह सचिव रेखा यादव, राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, यशदाचे उप महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी आदी उपस्थित होते.

ग्राम विकास मंत्री महाजन म्हणाले, देशात व राज्यात शाश्वत विकासांच्या ध्येयांची पंचायत राज यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी करणे हे महत्वाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यातील पंचायत राज संस्थांचे योगदान अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. ग्राम पंचायतीमध्ये या ध्येयांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाने नऊ संकल्पना निश्चित केल्या असून या संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे.

शाश्वत विकासाचे उद्दिष्टे साध्य करण्यासोबतच देशाच्या विकासात भर घालण्यासाठी गावाला स्वच्छ-सुंदर बनवावे लागेल. यासाठीच पंचायत राज विभागाच्या माध्यमातून सरपंचांना महत्वाचे अधिकारी देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींना विकास काम तसेच विविध योजनांची अंमलबजावणीसाठी थेट निधी देण्यात येतो. गावात मुलभूत सुविधांसोबतच गाव स्वच्छ, सुंदर, पाणी, आरोग्य यासह गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. असे ते म्हणाले.

राज्यात राळेगण सिद्धी व हिवरेबाजार या गावांनी ग्राम विकासात केलेले काम समोर ठेवून सरपंचांनी आपले गाव स्वच्छ, सुंदर व जलसमृद्ध करावे, असे आवाहन श्री. महाजन यांनी केले.

केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील म्हणाले, शहराप्रमाणे गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. गावाला सुरक्षित व समृद्ध करण्यासोबतच गावांचा शाश्वत विकास करण्यासाठी सरपंचांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. संकल्प, स्वप्न, सामर्थ्य या तीन सूत्रांच्या आधारे सरपंच काम करतात. शाश्वत विकासाचे लक्ष साध्य करण्यासाठी सरपंचासोबतच गावाती प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे.

जलजीवन मिशनच्या माध्यमातून ‘हर घर नल’ संकल्पना पूर्ण करण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा. पाणी वाचविण्यासाठी गावात विचार होण्याची गरज आहे. स्वच्छ, सुंदर गावासोबत जलसमृद्ध गाव निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा नक्कीच दिशादर्शक ठरेल. राज्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्यशासन एकत्रितपणे सर्वोतोपरी मदत करेल असे त्यांनी सांगितले.

भारत सरकारचे सचिव सुनिल कुमार म्हणाले, देशाला विकासित करण्यात ग्रामीण भारताची भूमिका महत्वाची आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. गाव व शहर हा भेद दूर करण्यासाठी १७ उद्दिष्टांपैकी ९ उद्दिष्ट केंद्रीत करण्यात आली आहेत. असे त्यांनी सांगितले.

राज्याचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले, पंचायतराज विभागाने शाश्वत विकासासाठी नऊ संकल्पना विकसीत केल्या आहेत. नऊ संकल्पनेला विचार घेत ग्रामपंचायतींना विकासाचे नियोजन करावयाचे आहे. राज्यात राळेगण सिद्धी, हिवरेबाजार, पाटोदा ही आदर्श गावे आहेत. लोकसहभाग व शासकीय योजनांची जोड देवून हजारो गावे विकासाच्या प्रक्रियेत पुढे येत आहेत. महाराष्ट्रात ग्राम विकासाच्या दृष्टीने अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वपूर्ण ठरतो आहे. यासाठीच ग्राम विकासाचे प्रशिक्षण व संशोधन केंद्र सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जलसमृद्ध गाव, स्वच्छ गाव पुस्तिका तसेच नऊ उद्दिष्टावर आधारीत पोस्टर पुस्तिका व ‘ग्राम विकासाचा रोड मॅप’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महा ई ग्राम पोर्टलचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी देशातील विविध राज्यातील सरपंच, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना योजनेसाठी अर्ज भरण्याबाबत आवाहन

पुणे दि. २२- शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता केंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्याक समाजातील इयत्ता १ली ते १० वी वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन व नुतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी मधील फक्त मुलींसाठी असलेली बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन विद्यार्थीनींचे ऑनलाईन अर्ज ३० सप्टेंबर पूर्वी भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील आर्थिक दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांनी www.scholarship.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावे, असे आवाहन शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

महागाई व ऑपरेशन लोटस विरोधात पुण्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या गाडीचा ताफा अडवला

पेट्रोल दरवाढ, गॅस सिलेंडर दरवाढ, बेरोजगारी आदी समस्या वर अर्थमंत्री काहीही बोलत नाहीत आणि सत्ता मिळविण्यासाठी पोलिसी बळावर दौरे करतात : आप चे लक्षवेधी आंदोलन

पुणे : महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, जनविरोधी आर्थिक धोरणे याचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या गाडीचा ताफा अडवला, अशी माहिती आप पक्षाचे प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांनी दिली .देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

भाजपच्या मिशन लोकसभा या कार्यक्रमांतर्गत त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती विजयासाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. दौऱ्यावर असताना सीतारामण यांचा ताफा पुणे शहरातील वारजे येथे आपच्या कार्यकर्त्यांकडून अडवण्याचा प्रयत्न केला. राज्य प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी सांगितले कि,;

जीवनावश्यक वस्तूंवरती म्हणजे लस्सी दही औषधे इत्यादी सामान्य माणसाला लागणाऱ्या गोष्टींवर जीएसटी लावल्याच्या आणि महागाईच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना वारजे जवळ काळे झेंडे दाखवत ताफा अडवला.
गेल्या काही वर्षांमध्ये करोना लॉकडाऊन मुळे सामान्य माणसाचं आर्थिक गणित ढासळून गेलेला आहे अशी स्थिती असताना सामान्याच्या खिशाला चाट देणाऱ्या जीएसटी चा निषेध म्हणून पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या अर्थमंत्र्यांना ही जनतेची भावना कळावी यासाठी काळे झेंडे दाखवले असे या कार्यकर्त्यांनी सांगितले. तीन चार दिवसांपूर्वी प्रंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवशी जुन्नर मधील केदारी नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली व मोदींच्या नावे चिट्ठी लिहिली त्या कुटुंबांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी अर्थमंत्री या पन्ना प्रमुखांच्या भेटी घेत निवडणुकीचा अजेंडा पुढे नेत आहेत पेट्रोल दरवाढ, गॅस सिलेंडर दरवाढ, बेरोजगारी आदी समस्या वर अर्थमंत्री काहीही बोलत नाहीत हे गंभीर आहे. देशामध्ये सामान्य माणूस भरडला जातो आहे, परंतु अदानी जगामध्ये नंबर वन कडे वाटचाल करीत आहे. अशा स्थितीत महागाई विरोधात कोणीच बोलत नसताना आपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरणे हे विशेषच आहे. अक्षय शिंदे ,निलेश वांजळे व सतीश यादव या आप च्या कार्यकर्त्यांना स्थानिक वारजे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी तत्काळ आपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अर्थमंत्री सीतारामण यांचा ताफा पुढे जाऊ दिला.यात आपचे वारजे माळवाडी भागातील कार्यकर्ते निलेश वांजळे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. यावेळी महागाई विरोधात, केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात व ऑपरेशन लोटस विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पुण्याची नेहा नारखेडे 13 हजार कोटींची मालकीन; देशातील श्रीमंतांच्या यादीत समावेश

कॉन्फ्लुएंट स्ट्रीमिंग डेटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या सहसंस्थापक नेहा नारखेडे यांनी देशातील सर्वांत कमी वयाच्या सेल्फ मेड वूमन आंत्रप्रेन्योरच्या यादीत स्थान मिळवून केवळ पुण्याचीच नव्हे, तर महाराष्ट्राची मान देशात उंचावली आहे. याबद्दल नेहाजींचं मनःपूर्वक अभिनंदन! ‘आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२२’ मध्ये समावेश झालेल्या नेहा यांचं हे यश इतर महिलांसाठी तसंच स्वबळावर उभं राहण्याचा ध्यास घेतलेल्या सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशी मला खात्री आहे. नेहा नारखेडे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!

-चंद्रकांतदादा पाटील,उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री

पुणे : बुधवारी IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 जाहीर झाली. त्यामध्ये गौतम अदानी देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.भारतात 2022 मध्ये एक हजार कोटी किंवा त्यापेक्षा अधिक वैयक्तिक संपत्ती असलेल्या भारतीयांची संख्या प्रथमच 1 हजार 100 वर पोहोचली आहे.

या यादीत पुण्यातील कॉन्फ्लुएंट या स्ट्रीमिंग डेटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या सहसंस्थापक नेहा नारखडे या ३७ वर्षीय मराठमोळ्या महिलेने स्थान मिळवले आहे. नेहा नारखडे यांनी भारताच्या सर्वांत कमी वयाच्या सेल्फ मेड वुमन आंत्रप्रेन्योरच्या यादीत स्थान मिळवले आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची ही ११ वी वार्षिक रँकिंग आहे.बुधवारी जाहीर झालेल्या IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार, नेहा नरखडे या देशातील १० सर्वांत श्रीमंत भारतीय महिलांमध्ये ८व्या स्थानावर आहेत. ३७ वर्षीय नेहा नरखेडेंची एकूण संपत्ती तब्बल १३ हजार ३८० कोटी आहे. नेहा नारखेडेचे पुण्यात लहानाची मोठी झाली. नेहा यांनी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी कॉलेज, एससीटीआरमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली. नंतर त्या जॉर्जिया टेक येथे कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी २००६ साली परदेशी गेल्या.

नारखेडे यांनी सुरुवातीला ओरॅकल आणि नंतर लिंक्डइन येथे सॉफ्टवेअर अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. नंतर त्यांनी कॉन्फ्लुएंट या कंपनीची स्थापना केली. पुढे २०१४ साली नेहा आणि त्यांची लिंक्डइन कंपनीतील दोन सहयोगी मैत्रिनींनी कॉन्फ्लुएंट सुरू करण्यासाठी कंपनी सोडली.

ठाकरेंपेक्षा शिंदेंना मतदारांनी दिले वरचे स्थान-शंभूराज देसाई यांचा दावा

पुणे : उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा वरचे स्थान मतदारांनी देखील एकनाथ शिंदे यांना दिले आहे हे नुकत्याच २ टप्प्यात झालेल्या नगर पालिका आणि पंचायतीच्या निवडणुकीतून दिसून आले आहे त्यामुळे आमचा निर्णय योग्यच होता असा दावा आज राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शिवसेनेचे बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेतील प्रश्नांना उत्तरे देताना केला . शंभूराज देसाई यांनी आज पुण्यात उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देखील दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरे करण्यापेक्षा प्रशासकीय कामात लक्ष द्यावे असा सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता . त्यावर ते म्हणाले की, प्रशासकीय काम कुठेही थांबलेले नाही. मंत्रिमंडळाच्या नियमित बैठका होत आहे. मंत्री देखील नियमितपणे काम करीत आहे. माननीय मुख्यमंत्री हे कुठे ही मौजमजा करण्यास फिरत नाही. राज्यातील जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी ते फिरत आहेत. राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या करीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली येथे दोन दिवसापासून आहेत. राज्यातील प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ते पुढे म्हणाले की, मागील मुख्यमंत्री अडीच वर्षात मंत्रालयात आले नाहीत. त्यावेळी पवार साहेबांनी, मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होते. तुम्ही मंत्रालयात जावा,तुम्ही लोकांना भेटा, तुम्ही लोकांचे प्रश्न समजून घ्या. त्यावेळी शरद पवार यांनी हाच सल्ला किंवा आदेश दिला असता.तर ते अधिक बर झालं असत, अशा शब्दात शंभूराजे देसाई यांनी शरद पवार यांना टोला लगावला.दसरा मेळाव्या वरून वाद सुरू आहे. त्या प्रश्नावर शंभूराज देसाई म्हणाले की,शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू गर्जना यात्रा राज्यभरात सुरू आहे. सातारा,सोलापूर, अहमदनगर आणि पुणे या चार जिल्ह्यांची माझ्यावर जबाबदारी होती. त्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या यात्रेतून मागील अडीच महिन्यामध्ये जनतेसाठी केलेल काम सांगितले. या यात्रेतून जनतेच्या भावना लक्षात घेता. शिवसेना आणि भाजपची नैसर्गिक युती राहिली पाहिजे होती. मात्र लोकांना अडीच वर्षात बोलण्याची संधी मिळत नव्हती.आमच्या भूमिकेमुळे लोकांना बोलण्याची संधी मिळाली आहे. हे लवकर होण्याची गरज होती. अशा तरुण वर्गाकडून प्रतिक्रिया आल्या असल्याच त्यांनी सांगितले.तसेच ते पुढे म्हणाले की,मुंबईत पाच तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा होणार आहे.न्यायालयामध्ये शिवसेना ठाकरे गट गेलेला आहे. त्यामुळे दसरा मेळावा ही बाब न्यायप्रविष्ट झालेली आहे.आम्ही कायद्याच, नियमांच पालन करणारे कार्यकर्ते आहोत.आम्ही दोन्ही जागेवर परवानगी मागितलेली आहे. प्रशासन आणि न्यायालय जिथे परवानगी देईल.त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने मेळावा होणार असल्याच त्यांनी सांगितले.

‘हास्य योगाचे माहेरघर’ अशीही आता पुण्याची ओळख

डॉ. रामचंद्र देखणे यांचे प्रतिपादन; नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या रौप्य महोत्सवी मेळाव्याचे उद्घाटन
पुणे : “विनोदी लेखन ही अभिव्यक्ती, तर हास्य ही अनुभूती आहे. विनोदाचे मूळ दुःखात असून, हसण्यामुळे अप्रिय दुःखाचे विस्मरण होते. प्रत्येक विनोदात तत्त्वचिंतन असते. त्यातून फुलणारे हास्य माणसाला अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीच्या द्वंद्वापलीकडे घेऊन जाते. अध्यात्म, विज्ञान आणि सामाजिक संवादाची जोड असलेला हास्ययोग आपण नियमित केला पाहिजे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले. हास्य चळवळीमुळे हास्य योगाचे माहेरघर अशीही ओळख आता पुण्याला मिळाली असल्याचे ते म्हणाले.

नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या रौप्य महोत्सवी मेळाव्याचे उद्घाटन डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते झाले. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडामंच येथे झालेल्या या सोहळ्यात क्रीडावैद्यक तज्ज्ञ डॉ. हिमांशु वझे, निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले, कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे, उपाध्यक्ष सचिन आपटे, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश धोका, ‘नवचैतन्य’चे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे, सुमन काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, सचिव पोपटलाल शिंगवी आदी उपस्थित होते.

८५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, तसेच २५ वर्षाच्या हास्य चळवळीच्या कार्याबद्दल सुमन व विठ्ठल काटे यांचा सत्कार करण्यात आला. उषा महाजन व निवृत्त न्यायाधीश जगदीश लिमये या देणगीदारांचा सन्मान करण्यात आला. चंदन भिडे व सहकाऱ्यांनी गणेशवंदना सादर केली. सुमन व विठ्ठल काटे यांनी विविध हास्यप्रकार घेत सभागृहात नवचैतन्य फुलवले.

डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, “हास्याची दिंडी घेऊन हास्य क्लबच्या माध्यमातून वैष्णवांचा मेळा भरवणा विठ्ठल म्हणजे विठ्ठल काटे आहेत. हास्य आणि विनोद ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे. अध्यात्म, संत साहित्यातही हसण्याला प्राधान्य दिले आहे. ज्ञानोबा-तुकोबा पासून ते आचार्य अत्रे, पुलं देशपांडे यांच्यापर्यंत खळखळून हसवणारे साहित्य निर्माण झाले आहे. त्यातून नकळत तत्त्वज्ञानही उद्धृत होते.”

डॉ. हिमांशु वझे म्हणाले, “चित्ताची साम्य अवस्था टिकवण्याचे काम हास्य करते. हसणे हा शंभर नंबरी सोन्यासारखा अलंकार ईश्वराने आपल्याला दिलेला आहे. आहार, विहार आणि आनंदी जगणे आपल्या आरोग्याला संतुलित ठेवेल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी हास्ययोग प्रभावशाली असून, त्याला वैज्ञानिक आधार आहे.”

“सशक्त भारताचे नागरिक सशक्त राहायला हवेत. कोरोना काळात मकरंद टिल्लू यांनी ही हास्ययोग चळवळ ऑनलाइन सुरू केली. त्यामुळे परिवारातील अनेकांना आरोग्य चांगले राहण्यात मदत झाली. देशभरात या चळवळीचा विस्तार झाला. लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हे कार्य असेच पुढेही चालू राहावे”, असे विठ्ठल काटे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

मिलिंद काळे म्हणाले, “हसणे हे आपल्या जीवनाचा आणि दैनंदिन कामकाजाचा भाग असावा, हा विचार रुजविण्याचे काम नवचैतन्य हास्ययोग परिवाराने केले. प्रत्येकाने हास्ययोग केला, तर समाजात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.” भूषण गोखले म्हणाले, “निखळ हास्य, विनोद बुद्धी आपल्या जगण्याला आनंद देते. आपला हसरा चेहरा सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो. हास्यक्लबने गेल्या २५ वर्षात ही ऊर्जा देण्याचे काम केले आहे.”

“आपण स्वतःसाठी एक दीड तास देतो, तेव्हा आपल्याला २४ तासांची ऊर्जा मिळते. त्यामुळे व्यायाम, हास्ययोग, प्राणायाम करायला हवा. निरोगी आयुष्याचा हा मंत्र आहे,” असे प्रकाश धोका म्हणाले.
“रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त २५ जिल्ह्यात ६१ गावात ही हास्ययोग चळवळ घेऊन जाणार आहे. देशविदेशात आता हास्ययोगाच्या शाखा भरू लागल्यात याचे समाधान आहे”, असे मकरंद टिल्लू यांनी नमूद केले.प्रास्ताविक पोपटलाल शिंगवी यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष राजवळ यांनी केले. आभार रामचंद्र राऊत यांनी मानले.
भावनिक नात्याने होऊ आनंदयात्री
नोकरी-व्यवसायानिमित्त पुण्यातील अनेकांची मुले बाहेर असल्याने एकाकीपण येते आहे. त्यातून संवाद होत नाही. नैराश्य येते. अशावेळी हास्यक्लब उपयुक्त ठरतील. संवादाचे, भावनिक नाते निर्माण होऊन या लोकांनाही आनंदयात्री होता येऊ शकते. हास्य क्लबच्या सदस्यांनी यात पुढाकार घेऊन अशा आजीआजोबांना भावनिक आधार देण्याचे करावे, असे डॉ. रामचंद्र देखणे यांनी सूचित केले.

अवैध हातभट्टी बंद करण्यासाठी मोहीम राबवा – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

पुणे, दि.२२: जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या माध्यमातून होणारी मद्यविक्री संपूर्णपणे बंद करण्यासाठी मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त अनिल चासकर, अधीक्षक चरणसिंह राजपूत, उपअधीक्षक संजय पाटील, युवराज शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या माध्यातून होणारी मद्यविक्री बंद करुन संबंधितावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करा. कार्यवाही करतांना पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी. परराज्यातून होणारी अवैध मद्यवाहतूक रोखण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. पोलीस विभागाप्रमाणे अवैध दारू व्यवसायाला प्रतिबंध घालण्यासाठी खबऱ्यांची मदत घेण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अधीक्षक श्री.राजपूत यांनी बैठकीत विभागाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीत दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स तर्फे उत्साहात साजरी

पुणे:कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त  त्यांच्यापुतळ्याला यशस्वी  एकेडमी  फॉर  स्किल्स  संस्थेच्या संचालिका  स्मिता  धुमाळ यांच्या  हस्ते  पुष्पहार  अर्पण  करूनअभिवादन करण्यात आले.

कर्मवीर भाऊराव  पाटील   यांनी  शैक्षणिक  क्षेत्रात दिलेल्या अमूल्ययोगदानामुळेच  समाजाला  स्वावलंबी होण्याचा व शिक्षणाचे  महत्व जाणण्याचा अनमोल  संदेश मिळाला. त्यांनी  केलेल्या  कार्याची प्रेरणा घेऊन युवकांनी कौशल्य  विकास प्रशिक्षणाद्वारे करिअरमध्ये  प्रगती  केली  पाहिजे, असे  मत  यावेळी  स्मिता धुमाळ यांनी  व्यक्त केले.

या कार्यक्रमाला कर्मवीर  भाऊराव पाटील श्रमिक संघटनेचे अध्यक्ष  मनोहर  परदेशी, कार्याध्यक्ष विजेंद्र परदेशी, रेखा परदेशी यांच्यासह ‘यशस्वी’ संस्थेचे  ज्ञानेश्वर गोफण, नीतीन कोद्रे  आदी  उपस्थित होते.