Home Blog Page 1601

नवरात्रीनिमित्त तळजाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

 मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई

तळजाई माता देवस्थानतर्फे अभिषेक, आरती, भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम; विजय थोरात यांच्या हस्ते घटस्थापना

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक ४०० वर्षे जुन्या तळजाई मंदिरात नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २६ सप्टेंबर ते ५ आॅक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन तळजाई येथील मंदिरात करण्यात आले आहे. अभिषेक, आरती, भजन असे धार्मिक कार्यक्रम उत्सव काळात होणार आहेत. सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता विजय थोरात यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे, अशी माहिती देवस्थानचे प्रमुख अण्णा थोरात यांनी दिली.

उत्सवकाळात मंदिर विविध फुलांनी सुशोभित करण्यात येणार असून आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात येणार आहे. नऊ दिवस रोज सकाळी ७ वाजता अभिषेक होणार आहे. दिवसभर पुणे शहरातील तसेच जिल्ह्यातील भजनी मंडळे येथे सेवा रुजू करणार आहेत. उत्सवात ४० ते ५० शाळांचे विद्यार्थी, गुरुजनांसह दर्शनाला येतात. भक्तांना भेळभत्ता प्रसादाचे वाटप करण्यात येते. अष्टमीच्या दिवशी होम-हवन, तसेच कन्यापूजन देखील होणार आहे. पुणे शहरातील विविध भागातील महिला या ठिकाणी श्री सुक्त पठण देखील करणार आहेत. 

अण्णा थोरात म्हणाले, सन १६७२ दरम्यान महाराष्ट्रामध्ये शिवराज्याभिषेकाची धामधूम होती. सभारंभ रायगडावर होता आणि आराध्य देवतांचा आशीर्वाद राजांना हवा होता. तुळजापूरहून, देवीचे प्रस्थान ठेवले आणि ही पालखी पुणे मार्गे पुढे रायगडाला जाणार होती. जिजाऊ मातेच्या दर्शनासाठी काही काळ पालखी जेथे ठेवली गेली तो हाच तळजाईचा पठार. साक्षात महाराष्ट्राच्या कुलदैवतेचे अधिष्ठान आणि जिजाऊंचा पदस्पर्श या परिसरास लाभला आहे.

रावबहाद्दूर ठुबे यांचे या परिसरात वास्तव्य होते. ते देवीचे परमभक्त होते. येथील तळ्याचे पाणी दुष्काळातही आटत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे. मला स्थानापन्न करण्यासाठी जे आसन तयार करशील ते सूर्यदयापूर्वीच तयार झाले पाहिजे नाही तर मी जमिनीवर ठाण मांडीन. दृष्टांताप्रमाणे ठुबे यांनी शोध घेतला आणि त्यांना तांदळाच्या स्वरूपातील पदमावती, तळजाई माता, तुळजाभवानी यांच्या मूर्ती मिळाल्या. तळ्यापासून आलेली माता म्हणून तिचे तळजाई असे नाव पडले. मातेने आसन वेळेत न झाल्याने तिने जमिनीवरच ठाण मांडले.

तळजाईच्या कृपेने वैभवाचा काळ अनुभवलेल्या रावबहाद्दूरांच्या निधनानंतर हा परिसर पुन्हा एकदा उजाड झाला होता. परंतु कै. अप्पासाहेब थोरात यांच्या सेवेतूनच या परिसराचा विकास झाला. मंदिराचा गाभारा आणि मंडप बांधला गेला. प्रवेशद्वाराशी पडवी मारुती मंदिर आणि तळजाई,पदमावती, तुळजाभवानी यांची घुमटाकार मंदिरे बांधण्यात आले. नवरात्रीच्या काळात अप्पांचा मुक्काम देवीच्या चरणापशीच असे. या काळात ते फक्त फलाहार घेत असत. मातेच्या सेवेतून प्रेरणा घेऊन अप्पांनी झुणका भाकरकेंद्राची योजना भारतात सर्वात प्रथम राबवली ती गोरगरीबांच्या सेवेच्या दृष्टिकोनातूनच, असेही अण्णा थोरात यांनी सांगितले. 

नवीन आष्टी – अहमदनगर रेल्वे मार्ग दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा – मुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास

0

बीड, दि. 23 : नवीन आष्टी – अहमदनगर हा नवीन रेल्वेमार्ग बीड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. राज्यातील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सर्वच प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधण्यावर आपले सरकार भर देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या २६१ कि.मी. रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा असलेल्या नवीन आष्टी – अहमदनगर ६६ कि.मी. मार्गाचे उद्घाटन आणि डेमू सेवेचा प्रारंभ अशा दुहेरी कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे बोलत होते.

प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती होते. माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार सर्वश्री बाळासाहेब आजबे, लक्ष्मण पवार, सुरेश धस, आष्टीच्या नगराध्यक्षा श्रीमती पल्लवी धोंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांच्यासह रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

दिवंगत गोपिनाथरावांनी पाहिलेले रेल्वे प्रकल्पाचे स्वप्न आज सत्यात आले आहे, याचे आपणास विशेष समाधान असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आज गोपिनाथराव हयात असते तर त्यांनी हा मार्ग बीड-नगरवासियांना अर्पण केला असता. राज्यातल्या अनेक विकास प्रकल्पांबाबत त्यांनी दूरदृष्टी दाखवली होती. त्यात या रेल्वे प्रकल्पाचाही समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रगती योजनेत अहमदनगर – बीड – परळी या २६१ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गाचा समावेश आहे. त्यासाठीच्या ५० टक्के खर्चाच्या तरतुदीची जबाबदारी शासनाने उचलली आहे, असे  स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, हा रेल्वे प्रकल्प केवळ दोन भूभाग आणि स्थानकांना जोडणारा नाही, तर माणसे, नातीगोती आणि हृदयांना जोडणारा आहे. या रेल्वेमुळे आता अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांना रोजच विकासाची धडधड जाणवणार आहे. विद्यमान शासनाच्या विकासाचा मार्ग वेगाचा राहणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी तोडगा काढण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील हा बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकल्याबद्दल मध्य रेल्वेच्या  कर्मचारी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

दीर्घ संघर्षानंतर अहमदनगर-आष्टी रेल्वे धावत असल्याचा आपणास आनंद असल्याचे  सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिवंगत गोपिनाथराव मुंडे यांनी बीड येथे रेल्वेसेवा सुरू व्हावी, यासाठी सातत्याने पुढाकार घेतला होता. आज पहिल्या टप्प्यात न्यू आष्टी – अहमदनगर डेमू आणि रेल्वे मार्गाचे उद‌्घाटन झाले. हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.

आपण मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाचा दर तीन महिन्याला आढावा घेत होतो. यासाठी आवश्यक तो भरीव निधी केंद्र व राज्य शासनाने दिला. राज्याचा भागीदारी हिस्सा सुरू करण्याचा निर्णयही या शासनाने घेतला, असे स्पष्ट करुन श्री. फडणवीस म्हणाले, येथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार कृष्णा – मराठवाडा प्रकल्पास सुधारित मान्यता देऊन भरीव निधी दिला जाईल. शिवाय मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी समुद्रातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातील गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा शासनाचा निर्धार आहे, असे सांगतानाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीचे लवकरच लोकार्पण करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती सर्वांच्या साक्षीने आज होत असल्याचे सांगून रेल्वे मंत्री दानवे म्हणाले, मराठवाड्यातील बीडव्यतिरिक्त अन्य जिल्हे रेल्वेने जोडले गेले होते. पहिल्या टप्प्यातील रेल्वेने आज दिवंगत गोपिनाथराव मुंडे यांच्यासह सर्वांच्या मनातील स्वप्नपूर्तीची सुरवात होत आहे. या मुख्य प्रकल्पासाठी 96 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. यासाठी निधीची कमतरता पडू देणारं नाही. बीडपर्यंतचा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अहमदनगर – परळी रेल्वेच्या विद्युतीकरणास मंजुरी देण्यात आली असून, 2014 पासून रेल्वे कामांना गती मिळाली आहे. 400 वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येत असून त्यापैकी 120 गाड्या  लातूरच्या कारखान्यात तयार करण्यात येणार असल्याचे श्री. दानवे यांनी  यावेळी सांगितले.

बीड आणि अहमदनगर जिल्हा रेल्वेने जोडले जात असल्याचा आनंद व्यक्त करून राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सहकारी कारखानदारी सुरू ठेवण्यात बीड जिल्ह्याचे योगदान आहे. या रेल्वेमुळे बीड हा राज्यातील एक अग्रगण्य जिल्हा होईल. या रेल्वेला परळीपर्यंत नेण्याची जबाबदारी रेल्वे राज्य मंत्री दानवे यांची असल्याची अपेक्षा आहे. रेल्वेसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे व खा. प्रीतम मुंडे यांनी पाठपुरावा केल्याबद्दल तसेच पुरेसा निधी दिल्याबद्दल प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रेल्वे राज्य मंत्री यांचे आभार मानले.

खा. प्रीतम मुंडे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मनोगतात बीडवासियांची स्वप्नपूर्ती होत असल्याचा आनंद व्यक्त करून केंद्र व राज्य शासनाने भरीव निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

उपस्थित मान्यवरांनी यावेळी रेल्वे संघर्ष समितीतील लढा दिलेल्यांचे आभार मानले.  मान्यवरांच्या हस्ते कोनशीलेचे अनावरण करुन रेल्वे स्थानकाची पाहणी केली. मान्यवरांच्या हस्ते न्यू आष्टी अहमदनगर डेमू सेवेचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. रेल्वे मार्गाची माहिती देणारी लघुफित यावेळी दाखवण्यात आली.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, माजी आमदार भीमराव धोंडे, रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी प्रास्ताविक तर आमदार सुरेश धस यांनी आभार मानले.

नवीन आष्टी – अहमदनगर नवीन मार्गाविषयी…

  • 66किमी नवीन आष्टी-अहमदनगर ब्रॉडगेज लाईन हा अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या 261 कि.मी. नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात समसमान म्हणजे प्रत्येकी ५० टक्के खर्चाचा वाटा आहे.
  • डेमू (DEMU) सेवा नवीन आष्टी – अहमदनगर पट्ट्यातील रहिवाशांना आणि जवळपासच्या भागातील रहिवाशांना सुलभ ठरेल. यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक – आर्थिक विकासाला चालना मिळेल.
  • डेमू ट्रेन अहमदनगरहून सकाळी 07.45 वाजता सुटेल आणि न्यू आष्टीला सकाळी 10.30 वाजता पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात न्यू आष्टी येथून सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि दुपारी 1.55 वाजता अहमदनगर येथे पोहोचेल. ही गाडी रविवार वगळता आठवड्यात दररोज धावणार आहे.
  • कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोहो येथे थांबेल.

महालक्ष्मी मंदिरात सोमवारपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन ; धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा उत्सव
पुणे :  श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवाचा प्रारंभ सोमवार, दिनांक २६ सप्टेंबर पासून होणार आहे. दिनांक २६ सप्टेंबर ते ५ आॅक्टोबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबतच देवी जागर नृत्य, महिला पोलीस व महिला पत्रकार सन्मान, परिचारिका गौरव सोहळा, कन्यापूजन, भोंडला, नारी तू नारायणी सन्मान सोहळा, शालेय विद्यार्थी संगीत स्पर्धा, विविध कलाकारांतर्फे गरबा नृत्य असे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा नवरात्र उत्सव महालक्ष्मी मंदिरात साजरा होणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
पत्रकार परिषदेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अ‍ॅड. प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.
सोमवारी (दि.२६) सकाळी ९ ते ११.३० यावेळेत अ‍ॅड. एस. के. जैन यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. तसेच, सायंकाळी ६.३० वाजता मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते होईल. याशिवाय दहा दिवसात श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत.
मंगळवारी (दि.२७) दुपारी २  वाजता केशव महिलांच्या ग्रुपतर्फे श्रीसूक्त व विष्णू सहस्त्रनाम पाठ होणार आहे. तर, सायंकाळी ७ वाजता प्रिया डिसा यांचा देवी जागर नृत्याचा कार्यक्रम मंदिरात होईल. बुधवारी (दि.२८) सायंकाळी ५ वाजता महिला पोलिसांचा सन्मान सोहळा व आरती होईल.
गुरुवारी (दि.२९) महिला पत्रकारांचा गौरव व त्यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता आरती होणार आहे. शुक्रवारी (दि.३०) विश्वकर्मा विद्यालयातर्फे दुपारी २ वाजता स्वरांजली कार्यक्रम होईल. तसेच सायंकाळी ५ वाजता कमला नेहरू हॉस्पिटलमधील परिचारिकांचा सन्मान सोहळा होणार आहे. शनिवारी (दि.१) सायंकाळी ५ वाजता देवदासींच्या मुलींचे कन्यापूजन हा आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विविध सामाजिक संस्थेतील मुलींचे कन्यापूजन होईल. रविवारी (दि.२) सायंकाळी ५ वाजता पुणे शहरातील विविध शाळांतील शिक्षकांचा भोंडला होणार आहे.
सोमवारी (दि.३) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिनाचा गौरव सोहळा नारी तू नारायणी या कार्यक्रमात होईल. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी (दि.४) दुपारी ४  वाजता भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थी संगीत स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान भारतीय सैन्यदलातील दिव्यांग सैनिकांच्या हस्ते होणार आहे. दस-यानिमित्त बुधवारी (दि.५) श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे. सायंकाळी हळदी कुंकू व ओटीचा कार्यक्रम, आर्ट आॅफ लिव्हिंग तर्फे भजनसंध्या आणि रात्री ९ वाजता गरबा नृत्य होईल. 
उत्सवात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत. भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. मंदिराच्या ५०० मीटर परिघातील सर्व भक्तांना यामुळे विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच मंदिर व आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटिव्ही कॅमेरे आणि २५ हून अधिक सुरक्षारक्षक असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून पुणेकरांनी मोठया संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम्स लिमिटेडतर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

0

दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम्स लिमिटेड (दिवगी)ने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) कडे दाखल केला आहे.

दिवगी ही सिस्टम लेव्हल ट्रान्सफर केस, टॉर्क कपलर आणि ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (“DCT”) सोल्यूशन्स विकसित करण्याची आणि पुरवठा करण्याची क्षमता असलेल्या भारतातील मोजक्या ऑटोमोटिव्ह घटक कंपन्यांपैकी एक आहे. क्रिसील अहवालानुसार कंपनी भारतातील टॉर्क कपलरची एकमेव उत्पादक आणि भारतातून जागतिक ओईएम मध्ये ट्रान्सफर केसेस उत्पादित आणि निर्यात करणारी एकमेव कंपनी आहे. कंपनीची इलेक्ट्रिक वाहनांसाठी (“EVS”) ट्रान्समिशन सिस्टीम विकसित करण्याची आणि प्रदान करण्याची क्षमता देखील आहे.

कंपनी प्राथमिक समभाग विक्रीतून (आयपीओ) निधी उभारण्याची योजना आखत आहे आणि २,०००

ऑफर (“ऑफर फॉर सेल”) असून त्यामध्ये प्रत्येकी ५ रु. चे दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.

क्रिसील अहवालानुसार कंपनी ट्रान्सफर केस सिस्टीम भारतातील ऑटोमोटिव्ह OEM ना पुरवणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असून भारतातील प्रवासी वाहन उत्पादकांसाठी ट्रान्सफर केस सिस्टमची  सर्वात मोठी पुरवठादार आहे.

कंपनीने ताज्या इश्यूमधून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग भांडवली खर्चाच्या गरजा भागवण्यासाठी त्याच्या उत्पादन सुविधांच्या उपकरणांच्या/यंत्रांच्या खरेदीसाठी अंदाजे १,५३३.३८ दशलक्ष रुपये आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

विक्रीच्या ऑफरमध्ये ओमान इंडिया जॉइंट इन्व्हेस्टमेंट फंड II द्वारे १७,५०,००० पर्यंतचे इक्विटी शेअर्स, Nrjn फॅमिली ट्रस्ट (त्याच्या कॉर्पोरेट ट्रस्टी, एनट्रस्ट फॅमिली ऑफिस लीगल आणि ट्रस्टीशिप सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे प्रतिनिधित्व) द्वारे ११,५४,००० पर्यंतचे इक्विटी शेअर्स, भारत भालचंद्र दिवगी यांच्या द्वारे ४९,४३० पर्यंतचे इक्विटी समभाग,  संजय भालचंद्र दिवगी यांच्या द्वारे ४०,४६० पर्यंतचे इक्विटी समभाग, आशिष अनंत दिवगी यांच्या द्वारे १०४,०२० पर्यंतचे इक्विटी समभाग,  अरुण रामदास इडगुणजी यांच्या द्वारे ३३,६६० पर्यंतचे इक्विटी समभाग आणि किशोर मंगेश कलबाग यांच्या द्वारे १५,२३२ पर्यंतचे इक्विटी समभाग समाविष्ट आहेत.

इंगा व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत अभ्यासाअंतीच निर्णय-राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे स्पष्टीकरण

0

मुंबई दि.२३: राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत शासन स्तरावर अभ्यासाअंतीच निर्णय घेण्यात येईल. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

२२ सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत काही माध्यम प्रतिनिधींनी सुपर मार्केटमधील वाईन विक्री धोरणाबाबत प्रश्न विचारला असता याबाबत मागील सरकारच्या काळात घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सविस्तर निवेदन केले होते. यामध्ये सदर निर्णयांच्या अनुषंगाने याबाबतचा प्रस्ताव हा राज्यातील जनतेच्या सूचना तसेच प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी

जनतेसमोर ठेवला आहे. प्रस्तावावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून पूर्ण अभ्यासाअंती मंत्रिमंडळ याबाबतचा निर्णय घेईल, असे निवेदन केले होते. मात्र काही माध्यमांनी याबाबत बोलण्याचा विपर्यास करून वृत्त दिले आहे. राज्य शासन सुपर मार्केटमधील वाईन धोरणांच्या बाजूने असे संकेत असल्याचे काही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.असा कोणताही निर्णय झालेला नसून निवेदनात सांगितल्याप्रमाणे शासन सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत पूर्ण अभ्यासांती निर्णय घेईल, असे मंत्री श्री. देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

बनावट सोन्याचे दागिने ओळखण्याचे प्रशिक्षण

गोल्ड व्हॅल्युअर्स करीता शनीवारी विनामूल्य कार्यशाळा
पुणे :

गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनतर्फे पुणे जिल्ह्यातील गोल्ड व्हॅल्युअर्स करीता शनिवारी पुण्यात कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.२४ सप्टेंबर २०२२ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुर्वांकुर बँक्वेट हॉल, टिळक रस्ता येथे ही कार्यशाळा होणार आहे.गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनचे पुणे जिल्हाध्यक्ष दामोदर खरोटे,पुणे शहर प्रमुख सत्यनारायण वर्मा, प्रशासकीय सचिव सतीश पितळे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

कार्यशाळेत असोसिएशनचे तज्ञ कोअर कमिटी मेंबर्स व्हॅल्युअर्स बांधवांना व्हॅल्युएशन संबंधी सखोल मार्गदर्शन करतील. तसेच बनावट सोन्याचे दागिने ओळखण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येईल. सराफ असोसिएशन पुणेचे अध्यक्ष फतेचंद रांका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम काळे,कार्याध्यक्ष राजेन्द्र डिंडोरकर,सचिव.राजाभाऊ वाईकर, उपाध्यक्ष नचिकेत भुर्के ,उपाध्यक्ष चेतन राजापूरकर ,खजिनदार दीपक देवरुखकर हे मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत.अशा प्रकारच्या कार्यशाळा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत घेण्याचे असोसिएशनचे नियोजन आहे.

आधी प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा! आदित्य ठाकरेंना भाजपचे आव्हान

मुंबई- घराण्याच्या वारशातून शिवसेनेचे नेतेपदाची माळ गळ्यात पडलेले आदित्य ठाकरे यांच्या वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयीच्या आक्रोशाचे पितळ येत्या शनिवारी ते स्वतःच उघडे करणार आहेत. या प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारने अडीच वर्षात काहीही प्रयत्न केले नसल्याचा पुरावा आदित्य ठाकरे स्वतःच येत्या शनिवारी तळेगावजवळ आयोजित केलेल्या आंदोलनातून देणार असल्याने त्यांच्या आंदोलनाची महाराष्ट्र वाटच पाहात आहे, अशी खोचक टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.

मतदारांचा कौल खुंटीवर टांगून फसवणुकीने मिळविलेली सत्ता आणि प्रकल्पाच्या वाटाघाटींचा वाटा या दोन्ही बाबी हातून गेल्याने ठाकरे पितापुत्रांना नैराश्याने ग्रासले आहे. तळेगावजवळ जेथे हा प्रकल्प येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे, त्याबाबत साधा सामंजस्य करारदेखील ठाकरे सरकारने केलाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता आदित्य ठाकरे या प्रकल्पाच्या नियोजित स्थळी आंदोलन करणार असल्याच्या वावड्या शिवसेनेकडून उठविल्या जात आहेत. त्यामुळे, आधी या प्रकल्पासाठी राखून ठएवलेली जागा दाखवा आणि मगच आंदोलन करा, असे आव्हानही उपाध्ये यांनी दिले. तळेगावातील भूसंपादन फॉक्सकॉनच्या नियोजित प्रकल्पासाठी नव्हे, तर एमआयडीसीच्या नियोजित टप्पा-४ प्रकल्पासाठी करण्यात आले होते. ही जमीन फॉक्सकॉन प्रकल्पासाठी असल्याचे संबंधित जमीन मालकांनाही माहीत नाही, त्यामुळे प्रकल्पाची नियोजित जागा व त्यासंबंधीच्या अधिकृत सरकारी नोंदी अगोदर ठाकरे यांनी दाखवाव्यात, असेही उपाध्ये म्हणाले. ठाकरे पितापुत्रांना महाराष्ट्राची माहिती नाही. वडिलोपार्जित नेतृत्वाच्या वारशातून राज्यावर हक्क सांगणाऱ्या ठाकरे कुटुंबाने आपल्या सत्ताकाळात फॉक्सकॉन प्रकल्पासाठी नेमकी जागा अधिसूचित केली असती, तरी या प्रकल्पासाठी काही केल्याचे श्रेय त्यांना मिळाले असते. पण वाटाघाटींच्या नावाखाली वेगळ्याच हालचालींचा सुगावा लागल्यामुळेच फॉक्सकॉनने महाराष्ट्रातून काढता पाय घेतला असा आरोपही उपाध्ये यांनी केला.

आदित्य ठाकरेंना पाच प्रश्न

फॉक्सकॉनचा प्रकल्प तळेगावजवळ नियोजित होता, असे आदित्य ठाकरे वारंवार सांगत आहेत. त्यामुळे, तळेगावातील कोणती जागा या प्रकल्पासाठी ठाकरे सरकारने देऊ केली होती, त्यासंबंधी विशिष्ट जागेच्या महसुली नोंदी केल्या गेल्या होत्या का, या प्रकल्पासाठी ठाकरे सरकारने किती वेळा अधिकृत बैठका घेतल्या, त्यामध्ये कोणत्या वाटाघाटी झाल्या, ठाकरे सरकारने या प्रकल्पासाठी वेदान्ता-फॉक्सकॉनला कोणत्या सवलती दिल्या, या प्रश्नांची उत्तरे आदित्य ठाकरे यांनी आंदोलनाआधी महाराष्ट्रास द्यावीत, असेही उपाध्ये म्हणाले. ज्या ठिकाणी ते आंदोलन करणार आहेत, त्या जागेवर नियोजित प्रकल्पाची नोंद आहे ना याची अगोदर खात्री करून घ्यावी, अन्यथा भलत्याच ठिकाणी आंदोलन करून महाराष्ट्राची फसवणूक करण्याचा प्रयत्नच फसेल व पुन्हा पितळ उघडे पडेल असा टोलाही त्यांनी मारला.

शिवाजी पार्कवर ठाकरेंच्याच ओरीजनल शिवसेनेचा दसरा मेळावा होणार- शिंदे गटाला हायकोर्टाचा धक्का

कायदा सुव्यवस्थेच्या हमीसह शिवसेनेला परवानगी-पालिकेला फटकारले

मुंबई- शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका हायकोर्टाने आज फेटाळून लावली. तिन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यानंतर आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी परवानगीबाबत थोड्याच वेळात निर्णय येणार आहे. परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून आज मुंबई उच्च न्यायालयात प्रदीर्घ चर्चा झाली.मुंबई उच्च न्यायालयात शिवाजी पार्कवरील शिवसेना व शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या मुद्यावर आज जोरदार युक्तिवाद झाला. या सुनावणीत शिवसेनेकडून अ‌ॅड. चिनाॅय, शिंदे गटाकडून जनक द्वारकादास यांनी बाजू मांडली. महापालिकेतर्फेही अ‌ॅड. मिलिंद साठे यांनी बाजू कोर्टात आज मांडली​​​​. तिन्ही गटाचा युक्तिवाद आता संपला असून शिंदे गटाला हायकोर्टाने धक्का देत त्यांची अंतरिम याचिका फेटाळली आहे.

कोर्टाचे निरीक्षण

  • शिवसेनेचा अर्ज नाकारून महापालिकेने अधिकाराचा दुरुपयोग केला असे दिसते.
  • कायदा आणि सुव्यवस्थेची हमी आम्ही देतो अशी ठामपणे हमी दिली आहे.
  • कोर्टाने शिवसेनेकडे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत हमी मागितली. त्यावर कोर्टाला शिवसेनेनेही हमी दिली आहे.
  • महापालिकेला वस्तूस्थितीची माहिती आहे, त्यामुळे त्यांचा निर्णय योग्य आहे. पालिकेचा निर्णय अंतीम नाही, त्यांचा निर्णय तथ्यात्मक आहे.
  • तिन्ही गटाने दिलेले दाखले कोर्टाने नोंदवले आहेत.
  • अर्ज नाकारण्याचा महापालिकेचा निर्णय बरोबर
  • कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करुनच महापालिकेने अर्ज नाकारले. तो त्यांचा अधिकार आहे.

कोर्टाची दोन्ही गटाला विचारणा

शिवाजी पार्क मैदानाच्या मागणीसाठी शिवसेनेने प्रथम याचिका दाखल केल्याचा दावा करत शिंदे गटाची याचिका धूडकावून लावण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती. त्यावर कोर्टाने या प्रकरणी पहिला अर्ज कुणी केला? अशी विचारणा केली.

सरवणकरांचा याचिका फेटाळली

शिंदे गटाचे सदा सरवणकर यांच्या याचिकेवर कोर्टाचे निकाल वाचन सुरू आहे. शिवसेना कुणाची हे अद्याप ठरलेले नाही. अद्याप निकाल आलेला नाही. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले त्यानंतर सरवणकरांची याचिका कोर्टाने फेटाळली.

आम्हीच शिवसेना दोन्ही गटाचा दावा

मुंबई महापालिकेने शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे या दोन्ही गटांना मैदान मिळवण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे या प्रकरणातील चूरस वाढली आहे. दरम्यान, या प्रकरणी लंच ब्रेकनंतर दुपारी 2.30 च्या सुमारास पुन्हा सुनावणी झाल. शिंदे गट आणि उद्धव यांच्या सहकाऱ्यांनी आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. तर महापालिकेने आपण कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांवर अवलंबून असल्याचे म्हटले आहे.

तिन्ही गटाचा युक्तिवाद संपला

ठाकरे गटाचे काऊंटर अर्ग्युमेंट

ठाकरे गट- मी कोर्टाचा वेळ घालवू ईच्छित नाही. खरी शिवसेना कोण यावर युक्तिवाद न होता शिवाजी पार्कचे मैदान कुणाला मिळावे यावर निर्णय हवा. आम्हाला नैतिकदृष्ट्या अधिकार मिळवा.

न्यायालय- दोन्ही पक्ष एकच असतील तर एकालाच परवानगी कशी दिली जाणार. मुंबई महापालिकेच्या निर्णयाला आव्हान दिले आहे का?

शिंदे गट- होय आम्ही महापालिकेच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. आमच्या गटात कोणताही वाद नाही.

शिंदे गट- कोण व्हिप, कोण शिवसेना याचे शिंदे गटाच्या वकीलांकडून कोर्टात वाचन.

न्यायालय – आम्हाला या प्रकरणाशी काही देणे घेणे नाही.

शिंदे गट- आम्ही सुप्रीम कोर्टाबाबत नव्हे तर ठाकरे गटाकडून आलेल्या अर्जाबाबत बोलत आहोत.

शिंदे गटाला न्यायालयाने सुनावले

न्यायालय – अनावश्यक बोलु नका, मी येथे सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात खटल्यांवर आम्ही बोलणार नाही. तो विषय येथे काढू नका. हा विषय याचिकेपुरताच ठेवा. तुम्हाला एमएमआरडीएने परवानगी कशी मिळाली हे आम्ही पाहू अशी तंबी कोर्टाने दिली.

शिंदे गट- आम्ही बीकेसीसाठी एमएमआरडीएमध्ये पहिल्यांदा अर्ज केला त्यामुळे आम्हाला परवानगी मिळाली.

शिंदे गट- अनिल देसाई पक्षाविरोधात कसे जाऊ शकतात. ते पक्षापेक्षा मोठे आहेत का?

शिंदे गट- अनिल देसाई अर्ज करतात ते शिवसेनेसाठी करतात का? सदा सरवणकरही अर्ज करू शकतात. ते शिवसेनेत आहेत आणि शिवसेनेचेच सरकार आहे. सरवणकरांनी शिवसेना सोडली नाही, त्यांची आमदारकी रद्द झालेली नाही. देसाईंनी सांगावे आमचा कुणी स्थानिक आमदार नाही.

ठाकरे गट- खरी शिवसेना हे अजून सुप्रीम कोर्टात ठरणार आहे.- ठाकरे गटाच्या वकीलांची कोर्टात बाजू

शिंदे गट- आम्हीच शिवसेना, कोर्टात दावा.

महापालिकेचा युक्तीवाद संपला

  • आमची याचिका नीट समजून सांगणे महत्वाचे आहे. दसरा हा शिवसेनेचा मेळावा आमचे सर्व नेते मेळाव्यात असतात.- शिंदे गट
  • आम्हीच शिवसेना- शिंदे गटाचा कोर्टात दावा.
  • खरी शिवसेना हे अजून सुप्रीम कोर्टात ठरणार आहे.- ठाकरे गटाच्या वकीलांची कोर्टात बाजू
  • उद्धव ठाकरेंचे सरकार आता नाही- शिंदे गटाचे वकील जनक द्वारकादास.
  • मुंबई महापालिकेकडून मिलिंद साठे यांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी जुन्या निकालांचा दाखला दिला.
  • शांततेत लोक मैदानात जमू शकतात. रॅली, सभा देऊ नये. तसा नियम आहे.
  • 2012 साली शिवसेनेने बीकेसी मैदानावर मेळावा घेतला होता.
  • त्यामुळे 2013 पासून शिवसेनेने मैदानावरचा राजकीय सभांचा अधिकार गमावला.
  • दोन्ही गटांना शिवाजी पार्क दसरा मेळाव्यासाठी देण्यास पालिकेचा विरोध
  • दोन्ही गटाला मैदान मिळण्याचा अधिकार नाही. शिवाजी पार्क हे सायलन्स झोन आहे.
  • हीच जागा हवी असा अधिकार कुणालाही गाजवता येणार नाही.
  • दसरा मेळावा ही परंपरा, पण अधिकार असू शकत नाही.

शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गट आग्रही आहे. याप्रकरणी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. गेली 28 वर्षे ज्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती, त्याच पालिका प्रशासनाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व शिंदे गटाला शिवाजी पार्क मैदान नाकारले होते. दसरा मेळाव्याला कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अभिप्राय पोलिसांनी दिल्याचे कारण पुढे करत पालिकेच्या जी – उत्तर विभागाने दोन्ही गटांना तसे पत्र पाठवून कळवले होते.

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मागितलेली परवानगी मुंबई महानगरपालिकेने नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर सुधारित याचिका करण्याची ठाकरे यांच्या शिवसेना गटाची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या वतीने ठाकरे गटाच्या याचिकेला विरोध करणारी मध्यस्थी याचिका केली. यावर आज सुनावणी पार पडली.

मंगळवारी (ता. २७) राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सव

पर्यटनातील कार्याबद्दल शुभदा जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार; गणेश चप्पलवार यांची माहिती
पुणे : परभन्ना फाउंडेशन आणि पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या मंगळवारी (ता. २७ सप्टेंबर २०२२) सकाळी १० ते २ या वेळेत पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात आयोजित पहिल्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात निवड झालेल्या लघुपटाचे स्क्रीनिंग, पर्यटनावरील परिसंवाद आणि बक्षीस वितरण होणार आहे. पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गिरीकंद ट्रॅव्हल्सच्या शुभदा जोशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती लघुपट महोत्सवाचे प्रमुख व परभन्ना फाउंडेशनचे गणेश चप्पलवार यांनी दिली. याप्रसंगी पर्यटन विभागाच्या पल्लवी कुमावत, संयोजन समितीतील अजित शांताराम, सल्लागार पंकज इंगोले आदी उपस्थित होते.
गणेश चप्पलवार म्हणाले, “महोत्सवात लघुपट, माहितीपट, व्ही-लॉग, छायाचित्रण या माध्यमातून १३ राज्यातील ७० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. ज्युरींनी परीक्षण करत यातील २५ स्पर्धकांची स्क्रीनिंगकरीता निवड केली असून, त्याचे स्क्रीनिंग यावेळी होईल. पर्यटन व माध्यमांची भूमिका यावरील परिसंवादात ‘एफटीआय’चे माजी अधिष्ठाता अमित त्यागी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, माध्यम व संज्ञापन विभागातील प्रा. विश्राम ढोले व जेट इंडिया एव्हिएशनच्या शिरीन वस्तानी सहभागी होणार आहेत.”
“बक्षीस वितरणासाठी पर्यटन विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर, ‘एफटीआयआय’चे अध्यक्ष शेखर कपूर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, उद्योजक रोहित राठी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सर्वोत्कृष्ट लघुपट, सर्वोत्तम माहितीपट, सर्वोत्तम छायाचित्रण, सर्वोत्तम दिग्दर्शक, विशेष जूरी उल्लेख अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. माहितीपट व चित्रपट निर्माते आदित्य शेट, ऐतिहासिक चित्रपट अभ्यासक मोनिया अचारी (जर्मनी), लेखक आणि चित्रपट निर्माते अक्षय इंडीकर, प्रा. वैशाली केंदळे, लेखक आणि दिग्दर्शक जुनेद इमाम, चित्रपट निर्माते अमर देवकर, संजय दानाईत यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले आहे,” असे चप्पलवार यांनी सांगितले.

सन २०१९ आणि २०२० चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

0

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी आणि संगीताचार्य कै.अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मराठी चित्रपटासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार मधु कांबीकर यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार वसंत इंगळे यांना जाहीर

मुंबई, दि. 22 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन 2019 आणि 2020 या वर्षासाठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील मराठी नाटक कलाक्षेत्रासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार कुमार सोहोनी यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार गंगाराम गवाणकर यांना जाहीर करण्यात आला आहे. कंठसंगीतासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार पंडितकुमार सुरुशे यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार कल्याणजी गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. उपशास्त्रीय संगीतासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार शौनक अभिषेकी यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार देवकी पंडित यांना जाहीर करण्यात आला आहे. मराठी चित्रपटासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार मधु कांबीकर यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार वसंत इंगळे यांना जाहीर करण्यात आला आहे. किर्तनासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार ज्ञानेश्वर वाबळे यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार गुरुबाबा औसेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. शाहिरीसाठी सन 2019 साठीचा पुरस्कार अवधूत विभूते यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  कै. कृष्णकांत जाधव (मरणोत्तर) यांना जाहीर करण्यात आला आहे. नृत्यासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार शुभदा वराडकर यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  जयश्री राजगोपालन यांना जाहीर करण्यात आला आहे. कलादानासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार अन्वर कुरेशी यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  देवेंद्र दोडके यांना जाहीर करण्यात आला आहे. वाद्यसंगीतासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार सुभाष खरोटे यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  ओंकार गुलवडी यांना जाहीर करण्यात आला आहे.तमाशासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार शिवाजी थोरात यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  सुरेश काळे यांना जाहीर करण्यात आला आहे. लोककलेसाठी सन 2019 साठीचा पुरस्कार सरला नांदुलेकर यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  कमलाबाई शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. आदिवासी गिरीजनसाठी सन 2019 साठीचा पुरस्कार मोहन मेश्राम यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  गणपत मसगे यांना जाहीर करण्यात आला आहे.

 सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 2020-21 व 2021-22 या वर्षांसाठीचे नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आणि संगीताचार्य कै.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.सन 2020 – 21 साठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार सतीश आळेकर यांना तर 2021 – 22 साठीचा पुरस्कार दत्ता भगत यांना जाहीर करण्यात आला आहे.सन 2020 – 21 साठीचा संगीताचार्य कै.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार दिप्ती भोगले यांना तर 2021 – 22 साठीचा पुरस्कार सुधीर ठाकूर यांना जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

संविधानाच्या रक्षकांच्या रक्षणासाठी शिवसेना कटिबद्ध : डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, ता. २२ : भारतात गेल्या काही वर्षांपासून सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाने मनासारखे राजकीय निर्णय घेण्याची सुरुवात केली आहे. यामध्ये काही वेळा अमुक एका राज्याच्याच विकासाचा विचार होऊन त्याप्रमाणे निर्णय घेण्याची घाई होत आहे. अशावेळी संविधान बचावो अभियानासारख्या समाजहिताच्या चळवळी या स्वागतार्ह आहेत. कोणतेही राजकीय हेतू समोर न ठेवता केवळ समाजाच्या आणि सामान्य नागरिकांच्या हितासाठी सुरु झालेल्या या अभियानाचे मी स्वागत करते. भारतीय संविधानाच्या रक्षकांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या पाठीमागे शिवसेना कायमच खंबीरपणे उभी असेल असे प्रतिपादन आज शिवसेना उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.

विविध समाजवादी संघटना, राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या ‘ नफरत छोडो – संविधान बचाओ’ मोहिमेच्या बांद्रा, मुंबईतील चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, उल्का महाजन, तुषार गांधी, सुभाष लोमटे, फिरोझ मिठीबोरवाला, एस. एल. गुड्डी, विशाल हिवाळे, योगेंद्र यादव, अतुल लोंढे, आली भोजानी यांच्यासह विविध राज्यातील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. सत्ता, संपत्ती अशा गोष्टींकडे लक्ष देणाऱ्या लोकांनी संविधानाची मुल्ये जपली पाहिजेत. आजवर शिवसेनेने नाणार रिफायनरी, लवासा, स्वामिनाथन समितीच्या अहवाल अशा कितीतरी समाज हिताच्या गोष्टींवर पाठिंबा दिला आहे. महिलांवर देशभरात अत्याचार होत आहेत. मात्र गुन्ह्यांमध्ये दोष सिद्धीचे प्रमाण मात्र कमीच आहे. समाजमाध्यमे आणि एकूणच समाजात महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजूनही म्हणावा तेवढा विकसित झालेला नाही. त्यामुळे आपल्या देशात अजून काम करायला हवे अशा सकारात्मक गोष्टी बऱ्याच आहेत.

यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे संबंधित विचार मांडून पुढील कार्यक्रम ठरवला जाईल असेही नीलमताईंनी सांगितले.

कोथरूडमध्ये हास्ययोग भवन उपलब्ध करणार-चंद्रकांत पाटील

नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या रौप्य महोत्सवाचा समारोप

पुणे : “समाजात वाढणारी नकारात्मकता कमी करण्याचे काम नवचैतन्य हास्ययोग परिवार करत आहे. सद्यस्थितीत हास्यक्लब लोकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मोलाचे योगदान देत आहे. आनंदी जीवनासाठी हास्ययोग गरजेचा असून, हास्य योगाचा प्रसार आणखी जोमाने व्हावा, यासाठी लवकरच कोथरूडमध्ये हास्ययोग भवन उपलब्ध करून दिले जाणार आहे,” असे आश्वासन राज्याचे उच्च व तांत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्याच्या समारोपावेळी पाटील बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडामंच येथे झालेल्या या सोहळ्यात शहर भाजपचे संदीप खर्डेकर, माजी नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे, ‘नवचैतन्य’चे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे, सुमन काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, सचिव पोपटलाल शिंगवी, विजय भोसले आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “पोटाच्या भुकेनंतर मनाची भूक महत्वाची असते. आज जगात ‘हॅपिनेस इंडेक्स’ला महत्व आले असून, लोकांना आनंदी जीवन जगण्यात हास्यक्लब मोलाची भूमिका बजावत आहे. ही चळवळ समाजाला सकारात्मक ऊर्जा देणारी आहे. यातून ‘स्व’चा शोध घेण्यासाठी लोक प्रयत्न करत आहेत.”
मकरंद टिल्लू यांनी स्वागत प्रास्ताविक केले. विठ्ठल काटे यांनी आभार मानले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनीही विविध हास्यप्रकाराची प्रात्यक्षिके करत आनंद लुटला.

‘रंगीला रे…’ने श्रोते मंत्रमुग्ध

दिवसभर रंगलेल्या या आनंदमय सोहळ्याच्या उत्तरार्धात गायिका मनीषा निश्चल, गायक गफूर पठाण व सहकाऱ्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना समर्पित ‘रंगीला रे…’ सदाबहार गीतांचा नजराणा सादर केला. ‘सत्यम शिवम सुंदरम’ या अजरामर गीताला खुद्द चंद्रकांत पाटील यांनीही उत्स्फूर्त दाद दिली. त्यानंतर निश्चल व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.

लष्करी परिचर्या सेवेकडून सैन्यदले आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वोत्तम सेवेची आदर्श परंपरा कायम

0

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022

लष्करी परिचर्या सेवा, भारतात शांतता काळात आणि प्रत्यक्ष सैन्यस्थळे तसेच परदेशातील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमधे सैन्यदले आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वोत्तम सेवा देत आहे, असे लष्करी रुग्णालयाचे (आरआर) कमांडंट लेफ्टनंट जनरल अशोक जिंदाल यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथे परिचर्या महाविद्यालय, लष्करी रुग्णालयाच्या (आर अँड आर) पाचव्या तुकडीच्या परिचर्या पदवीधरांच्या नियुक्ती (कमिशनिंग) समारंभात ते आज प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

तरुण लेफ्टनंट्सनीं परिचर्या सेवेची प्रतिष्ठा आणि नैतिकता टिकवून ठेवावी आणि प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे आवाहन लेफ्टनंट जनरल अशोक जिंदाल यांनी केले. लष्करी परिचर्या सेवेच्या अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल स्मिता देवराणी यांनी नव्याने नियुक्त झालेल्या परिचर्या अधिकाऱ्यांना सेवेची शपथ दिली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत परिचर्या पदवीधरांचा सत्कार करण्यात आला.

या समारंभाला ज्येष्ठ अधिकारी-कर्मचारी आणि नवनियुक्त परिचर्या अधिकाऱ्यांचे पालक उपस्थित होते.

आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम,येथे तीन हजार कोटी रुपयांच्या आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी

0

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम,येथे आंध्र प्रदेशचे रस्ते आणि बांधकाम मंत्री दादीसेट्टी रामलिंगेश्वर राव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तीन हजार कोटी रुपयांच्या आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी झाली. 

यावेळी झालेल्या समारंभात उपस्थितांना संबोधित करताना गडकरी म्हणाले की, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ते काकीनाडा  किनारपट्टी आर्थिक क्षेत्र (सेझ),सेझ पोर्ट, मासेमारीसाठी बंदर (फिशिंग हार्बर) आणि काकीनाडा अँकरेज पोर्ट यांची हरीत क्षेत्र रस्ते जोडणी (ग्रीन फील्ड रोड कनेक्टिव्हिटी) होईल, ज्यामुळे काकीनाडा बंदरातून तांदूळ,मासे, तेल जेवण, लोह-खनिज,जैव-इंधन, ग्रॅनाइट यांची निर्यात सुरळीतपणे होऊ शकेल.

या रस्ते प्रकल्पांत कैकाराम, मोरामपुडी, उंडाराजावरम, तेताली आणि जोन्नाडा येथील पाच उड्डाणपुलांचे बांधकाम समाविष्ट आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर, अनेक ठिकाणांहून सहजपणे आणि सुरक्षितपणे वाहतूकीची व्यवस्था होईल, असेही गडकरी यावेळी पुढे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाअंतर्गत आंध्रप्रदेशला समृद्ध करण्यासाठी तेथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,तसेच वरील प्रकल्पांच्या विकासामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल,असेही गडकरी यांनी यावेळी नमूद केले.

महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीचे आयोजन

पुणे दि.२२: आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतीक मंत्रालय, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या अर्थसहाय्यातून उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, शासकीय विभागीय ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

रॅलीचे उद्घाटन उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्या हस्ते झाले. रॅलीला सारस बाग येथून प्रारंभ झाला. रॅली पुरम चौक मार्गे बाजीराव रोड, नातुबाग चौक, शनिपार चौक, आप्पा बळवंत चौक मार्गे शासकीय विभागीय ग्रंथालय येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी लेखिका माधवी कुंटे, सहाय्यक ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर, ग्रंथपाल सुरेश रिद्दीवाडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले उपस्थित होते.प्रास्ताविक श्री.रिद्दीवाडे यांनी केले. रॅलीमध्ये सेंट हिल्डाज मुलींची शाळा, जिजामाता मुलींची शाळा, नूतन मुलींची शाळा, ठाकरसी कन्या प्रशाला, सुंदराबाई राठी मुलींच्या शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला